पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मागवला व माझा तो वाढदिवस डॉ. मनमोहन सिंग आणि शरद जोशी यांच्यासोबत साजरा झाला!" पुढे शेतकरी संघटनेच्या एका अधिवेशनात नितीननी एक कृषिप्रदर्शनदेखील भरवले होते व त्यातून संघटनेला पाच लाख रुपये मिळवूनही दिले होते. अखेरपर्यंत दोघांचा स्नेह कायम राहिला.
 पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठाचे मनोहर आपटे हे तर त्यांचे खूप जवळचे मित्र बनले. ते वारल्यानंतर त्यांच्यावर जोशींनी एक उत्तम लेखही लिहिला होता.

 काळाच्या ओघात इतरही काही पुणेकरांशी जोशींचा स्नेह जुळला. उदाहरणार्थ, आकाशवाणीवरील प्रसिद्ध वृत्तनिवेदक अरुण बेलसरे, रॅलीज इंडियामधील एक अधिकारी प्रतापराव बोर्डे, फडतरे चौकातील ओबीसी ड्रायक्लिनिंग वर्क्सचे मालक बाबा व्यापारी.
 आणखीही काही पुणेकरांचा इथे उल्लेख करायला हवा. उदाहरणार्थ, ल.स. तथा अण्णा केळकर. 'मॅट्रिक मॅगझिन'ची कल्पना त्यांचीच. ते वाचूनच अनेक प्राथमिक शिक्षकांनी बाहेरून परीक्षा दिली व शैक्षणिक गुणवत्ता सुधारली. एक मुद्रण व्यावसायिक, ग्रंथसंग्राहक व कौटुंबिक मित्र म्हणूनही ते जोशींच्या जवळिकीतले बनले. श्रेया जोशी व सुनील शहाणे यांचा साखरपुडा केळकरांच्या घरीच झाला. दत्तवाडीचे स. वा. भिडे हे दूध व्यावसायिक म्हणून संपर्कात आले. त्यांच्या अनुभवाचा बराच उपयोग दूध आंदोलनाच्या वेळी दूधाचा उत्पादनखर्च काढताना जोशींना झाला. अ. पु. तथा नाना आठवले हे असेच एक जवळचे मित्र. ते कॅलेंडर्सचा व्यवसाय करत. जोशींच्या काही पुस्तकांची व शेतकरी संघटक'ची सुरुवातीच्या चार वर्षांतली छपाई त्यांनीच करून दिली.

 शेतकरी चळवळ वणव्यासारखी पसरली, याचे मोठे कारण म्हणजे तत्कालीन तरुण शेतकरी समाजात शरद जोशींचे जबरदस्त आकर्षण निर्माण झाले होते. त्याची दोन कारणे असावीत.
 पहिले कारण म्हणजे, ते अतिशय तळमळीने करीत असलेले शेतीतील गरिबीचे मर्मभेदी विश्लेषण व त्यावर सुचवत असलेला उपाय. सगळा शेतकरी समाज त्या मांडणीसाठी जणू भुकेलेला होता; शिवाय जोशी जो विचार देत होते तो विचार इतर कोणीच देत नव्हते. 'आपण इतकी वर्षं इतकी मेहनत करूनही आपली स्थिती का सुधारत नाही?' या शेतकरी तरुणाला कायम छळणाऱ्या प्रश्नाला जोशींचा विचार हे अचूक व मनाला भिडणारे उत्तर होते. या विचाराच्या ताकदीमुळेच हा 'बाहेरचा' माणूस शेतकऱ्यांना इतका भावला. शरद जोशी ही त्या समाजाची त्यावेळची गरज होती. पंकज उदासने त्याच्या एका गजलेत म्हटले आहे,
 'कितने दिनों के प्यासे होंगे यारो सोचो तो,
 शबनम का कतरा भी जिनको दरिया लगता है!'

 दवाचा एक थेंबदेखील समुद्रासारखा भासावा, इतकी ह्या समाजाची तहान तीव्र होती. मुळातली तहानच इतकी तीव्र असल्याने हे भारावलेपणही तितकेच उत्कट होते.

सहकारी आणि टीकाकार३७७