पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

  आपल्या श्रेयविहीनतेचे भानही जोशींना कायम आहे. त्यांनी अनेकदा उद्धृत केलेल्या मॉमच्या त्या चार संतांच्या गोष्टीत प्रतिबिंबित झालेले. अगदी कॉलेजात असतानाही हातातोंडाशी आलेला यशाचा घास शेवटच्या क्षणी हिरावून घेतला गेला असे त्यांच्या बाबतीत दोन-तीनदा घडले होते. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील अगदी अपेक्षित असे यश तसे ओझरतेच हाती लागले होते. निवडणुकीत ते कधीच यशस्वी ठरले नाहीत; त्यांच्या सभांना गर्दी करणारेही त्यांना मत देत नव्हते. "तुमचे आयुष्य खडतर आहे आणि तुमच्या नशिबात राजयोग नाही" असे त्यांची पत्रिका पाहणाऱ्या एका धुळ्यातील ज्योतिषाने १९८५च्या सुमारासच त्यांना सांगितले होते. त्यांनी ती गोष्ट 'माझा असल्या ज्योतिष्यावर अजिबात विश्वास नाही' म्हणून झटकून टाकली नव्हती; अनेक वर्षांनी जोशींनी ते भविष्य मला ऐकवले होते; म्हणजेच त्यांच्या ते स्मरणात होते. ते भविष्य खरे निघाले असे म्हणता येईल का?

 एखाद्याला आयुष्यात किती यश लाभावे हे बऱ्याच प्रमाणात नियतीवर अवलंबून असते असे काहीसे त्यांचे मत शेवटच्या काळात बनत गेले होते; पण त्याचबरोबर एकूणच महात्म्यांच्या मर्यादा त्यांना खूप पूर्वीच कळून चुकल्या होत्या – खरे तर पूर्वीच त्या मर्यादा त्यांना जाणवल्या होत्या. अगदी तीस वर्षांपूर्वीच्या एका लेखात ते लिहितात,

भोवतालच्या वास्तविकतेशी संबंध नसलेला असा चैतन्यमय, प्रकाशमय विचार कोण्या थोर व्यक्तीच्या मनात तयार होतो आणि त्या विचाराप्रमाणे या व्यक्ती जगाचा इतिहास बदलतात, ही कल्पना दूर सारावयास हरकत नाही. विचाराने क्रांती होत नाही एवढेच नव्हे, तर विचाराने संघटनाही बनत नाही. प्रत्येक व्यक्तीचे आणि व्यक्तिसमूहाचे काही आर्थिक हितसंबंध असतात किंवा हितसंबंधांविषयी काही आडाखे असतात. या आडाख्यांच्या अनुरोधाने कृती करण्यासाठी संघटना उभी केली जाते आणि कार्यक्रमाच्या नियोजित दिशेला पूरक असा विचार, तत्त्वज्ञान प्रत्येक संघटना तयार करते. व्होल्टेअरच्या विचाराने फ्रेंच राज्यक्रांती झाली नाही; फ्रेंच राज्यक्रांतीच्या विचाराला व्होल्टेअरने शब्द दिला. थोडक्यात, विचार हा कारक नसतो; विचार ही एक सोय असते. सोईस्कर विचार आंदोलनाला वाचा देतो, प्रेरणा देतो, पण शेवटी अर्थकारण खरे. विचार हा अर्थकारणाचे प्रतिबिंब, हेच त्याचे खरे स्वरूप."

(शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख, पृष्ठ १५० -१)


 नवव्या प्रकरणात नमूद केल्याप्रमाणे शेतकरी आंदोलनाला मिळालेल्या यशाचे श्रेयही त्यांनी स्वतःकडे कधीच घेतलेले नाही, तर ते त्या वेळच्या विशिष्ट परिस्थितीला दिले आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. ओढूनताणून प्रत्येक विजयाचे श्रेय स्वतःकडे घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या जगात हा वैचारिक प्रामाणिकपणा अगदी क्वचितच कुठे पाहायला मिळतो.



४८६ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा