पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१,८५,३०२ मते मिळवून विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे १,१५,८८७ मते भाजपच्या धनाजी वेंकटराव देशमुख यांना पडली. शरद जोशी तिसऱ्या क्रमांकावर होते; त्यांना फक्त ७१,४६० मते पडली.

 स्वतः शरद जोशी निवडणुकीत कधीच निवडून येऊ शकले नाहीत; पण त्यांचे मोरेश्वर टेमुर्डे, वामनराव चटप, वसंतराव बोंडे, शिवराज तोंडचिरकर व सरोजताई काशीकर हे मागे लिहिल्याप्रमाणे संघटनेच्या तिकिटावर निवडून आले. त्यातले मोरेश्वर टेमुर्डे विधानसभेचे उपसभापतीही झाले. त्याशिवाय त्यांचे एकेकाळचे काही निकटचे सहकारी पुढे वेगवेगळ्या पक्षांत गेले व आमदार म्हणून निवडूनही आले. उदाहरणार्थ, पाशा पटेल (भाजप), अनिल गोटे (भाजप), शंकर धोंडगे (राष्ट्रवादी काँग्रेस) किंवा राजू शेट्टी व सदाशिव खोत (स्वाभिमानी शेतकरी संघटना). ते वेगळ्या पक्षात गेले म्हणून जोशींनी त्यांच्यावर राग धरला नाही; त्यांना थांबवायचा प्रयत्नही केला नाही. आपापल्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी, स्वतःचा विकास करून घेण्यासाठी त्यांनी केले ते योग्यच आहे असे ते म्हणत. त्यांतील एक पाशा पटेल यांनी आपल्या 'सकाळ'मधील एका लेखात म्हटले आहे, “मला भाजपमध्ये पाठवावं अशी मागणी गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांनी शरद जोशी यांच्याकडे केली. त्यांनी ती मान्य करून मला भाजपमध्ये पाठवलं." आपापल्या परीने या सर्वांनीच चांगले कामही केले; राजू शेट्टी हे तर स्वतःच स्थापन केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षाच्या तिकिटावर पुढे खासदार म्हणूनही निवडून आले.

 राजकारण्यांना जोशीविषयी कायम दुरावाच कसा वाटत आला याचे एक उदाहरण म्हणजे चाकण शिक्षण मंडळाचा अनुभव. १९८७ साली जोशींनी ती संस्था सुरू केली व तिच्यातर्फे एक कॉलेज काढले. खरेतर अशा स्वरूपाचे विधायक समजले जाणारे उपक्रम करण्यात त्यांना फारसे स्वारस्य नव्हते, पण जिथे आपल्या कामाची सुरुवात झाली त्या भागातील जुन्या सहकाऱ्यांचा आग्रह त्यांना मोडवेना. त्या परिसरात तशी उच्च शिक्षणाची आबाळच होत होती; नाही म्हटले तरी कॉलेजमुळे या स्थानिक माणसांची एक मोठी गरज भागली जाणार होती. नाव जोशींचे असले तरी संस्थेची बहुतेक व्यावहारिक जबाबदारी होती डॉ. अविनाश अरगडे आणि एक स्थानिक व्यापारी मोतीलाल सांकला यांच्याकडे. जोशींचा पुढाकार म्हटल्यानंतर पहिली दोन वर्षे व पुढे १९९२ ते १९९८ ही सहा वर्षे अशी एकूण आठ वर्षे म्हात्रे यांनी कॉलेजच्या प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळली. एक दानशूर बांधकाम व्यावसायिक शांतिलाल मुथा यांनी कॉलेजसाठी इमारतही विनामूल्य बांधून दिली. संस्था भ्रष्टाचारापासून पूर्णतः मुक्त होती, संघटनेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील संपर्कामुळे ती चांगली वाढलीही असती. पण तरीही जोशींचे नाव जोडलेले असल्यामुळेच स्थानिक राजकारण्यांनी संस्थेला खूप विरोध केला. कॉलेजचे उद्घाटन करण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी कबूल केले होते व ते कार्यक्रमाला आलेही; पण स्थानिक विरोधकांच्या कारवायांमुळे महाविद्यालयाला

३३६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा