पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

आपल्या काही मागण्याही पदरात पाडून घेता येतात हे सारे उघड होते. किंबहुना, शेतकऱ्यांची संघटना बांधणे अशक्य आहे, असे सगळे म्हणत असताना शेतकरी संघटना इतक्या झपाट्याने उभी राहिली हेच फार मोठे यश होते. पण त्याचवेळी आंदोलनाच्या मर्यादाही स्पष्ट होत गेल्या.
 उदाहरणार्थ, 'शेतकरी तितुका एक एक' असे कितीही म्हटले तरी कांदा आंदोलनातले शेतकरी ऊस आंदोलनात सामील नव्हते, ऊस आंदोलनातले शेतकरी निपाणीला गेले नव्हते आणि निपाणी आंदोलनातले शेतकरी कापूस आंदोलनात नव्हते. शेतकरी त्याच्या शेतीशी कायम बांधलेला असतो, तो सहजासहजी 'रजा टाकून' कुठे जाऊ शकत नाही. पिकांकडे किंवा गुरांकडे रोजच लक्ष द्यावे लागते. आंदोलनासाठी कितीही इच्छा असली तरी इकडेतिकडे सतत फिरणे काही कार्यकर्त्यांना जमले तरी सर्वसामान्य शेतकऱ्याला फारच अवघड असते.
 शिवाय एखाद्या आंदोलनानंतर त्या विशिष्ट शेतीमालाला जास्त भाव मिळाला, म्हणजे तो प्रश्न कायमचा मिटला असे नसायचे; पुढच्या वर्षी पुन्हा तोच प्रश्न उभा राहायचा. त्यासाठी सतत जागरूक राहणे, सतत संघर्षाच्या तयारीत असणे ही पूर्वअट होती. 'सतत जागरूक राहणे ही स्वातंत्र्याची किंमत आहे,' हे जोशींचे आवडते उद्धृत होते. (Eternal vigilance is the price of freedom.') पण केवळ संघटनेच्या बळावर अशी जागरूकता दाखवणे अशक्य होते. कारण भावावर परिणाम करणारे अनेक घटक होते व ते कोणाच्याच नियंत्रणाखाली नव्हते. कायमस्वरूपी रास्त भाव मिळावा यासाठी व्यवस्थाबदल हाच मार्ग होता.
 'आपल्या संघटनेला वर्गणी अशी काहीही नाही. पाठीवरचा पोलिसांच्या लाठीचा एकतरी वळ संघटनेची वर्गणी म्हणून मला दाखवा, असे एकेकाळी जोशी व माधवराव मोरेंसारखे त्यांचे लढवय्ये साथी म्हणत असत. पण पोलिसांची लाठी चालायची ती एका तडाख्यावर कधीच थांबत नसे. लॉकअपमधला छळही अनेकांच्या नशिबी आला होता. एकदा पाशवी असा पोलिसी मार खाल्लेला शेतकरी इतका पिचून जायचा, की पुन्हा आंदोलनात उतरायची हिंमत तो सहसा करत नसे. सर्वसामान्य शेतकरी हा तसा पापभीरू असायचा; तो काही सराईत गुंड किंवा अतिरेकी नव्हता, आणि पोलीस कस्टडीत बंद होणे हे त्याच्या दृष्टीने महादिव्य होते.
 सत्याग्रही स्वरूपाच्या आंदोलनाला यश मिळायची शक्यता तेव्हाच असते जेव्हा सरकार संवेदनाक्षम असते; गेल्या पंधरा-वीस वर्षांत एकूण समाजच बदलत गेला होता व त्या प्रमाणात सरकारची संवेदनक्षमतादेखील झपाट्याने कमी होत गेली होती. पूर्वी आंदोलनात दोन-चार जण हुतात्मा झाले तरी त्याचे सरकारवर दडपण यायचे; आता कितीही माणसे मेली तरी शासन ढिम्म हलत नव्हते. सगळे जणू रोजचेच झाले होते; मुर्दाड बनलेल्या सरकारवर त्याचा काहीच परिणाम होत नसे.
 शेतकरी आंदोलनात रास्ता रोको, रेल रोको हे एक महत्त्वाचे हत्यार होते. अशा कामात अर्थातच गनिमी काव्याचा भाग खूप होता. पोलिसांपासून स्वतःचे संरक्षण करणे, अनपेक्षित

अंगाराकडून ज्योतीकडे : शोध नव्या दिशांचा - ४१५