पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणारेही ते पहिलेच. शोषणाच्या चरकात पिढ्यानपिढ्या पिळून निघालेल्या; सर्वच राजकीय पक्षांकडून, सरकारी यंत्रणेकडून सदैव लाथाडल्या गेलेल्या शेतकऱ्याची वेदना त्यांनीच प्रथम 'इंडिया'च्या वेशीवर टांगली. उद्याच्या भारतासाठी छोटे-मोठे कुठलेही प्रयत्न करणारा कोणीही माणूस यापुढे त्या वेदनेकडे दुर्लक्ष करू शकणार नाही.
 'इंडिया विरुद्ध भारत' हीच मांडणी 'संघटित विरुद्ध असंघटित' अशीही करता येते. समाजातील संघटित घटक आपापल्या मागण्या संघटनेच्या बळावर, कुठल्याही विरोधाला न जुमानता, पदरात पाडून घेऊ शकतात – मग ते विमानाचे पायलट असोत की प्राथमिक शिक्षक, सरकारी नोकर असोत की रिक्षावाले. जागतिकीकरणाच्या युगातही खऱ्या अर्थाने वंचित राहिले आहेत ते समाजातील असंघटित घटक. आणि शेतकरी हा देशातील सर्वांत मोठा असंघटित घटक पूर्वीही होता आणि आजही आहे. शहरातही आपल्या अवतीभवती दिसणारे अनेक सारे वंचित याच असंघटित घटकात मोडतात – कोरिअरवाली मुले, छोट्या दुकानांतील कामगार, कचरा गोळा करणारे आणि घरोघर दूध-पेपर टाकणारे. त्यांची यादी खूप मोठी होईल. खोलात जाऊन विचार केल्यावर लक्षात येते, की यांचेही पूर्वज एकेकाळी शेतकरीच होते. कधीच न परवडणारी शेती विकत विकत एक दिवस शेतमजूर आणि त्यातही भागेनासे झाल्यावर निर्वासित म्हणून शहरात हाच त्यांच्यापैकी बहुतेकांचा जीवनप्रवास असतो.
 अशा शेतकऱ्यांची संघटना उभारणे महाकठीण काम. ते कोणी करू शकेल हेच पूर्वी शक्य कोटीतले वाटत नसे. पूर्णतः असंघटित आणि विखुरलेल्या अशा या सर्वांत मोठ्या समाजघटकाची प्रबळ अशी संघटना जोशींनीच प्रथम उभारून दाखवली.
 दुबळा, पिचलेला, लाचार मानला गेलेला शेतकरीसुद्धा आपल्या न्याय्य हक्कांसाठी ताठ मानेने उभा राहू शकतो; कसल्याही आमिषाची अपेक्षा न ठेवता, आपली कांदा-भाकरी बरोबर बांधून घेऊन, लाखालाखाच्या संख्येने सभांना हजर राहू शकतो, रस्ते अडवू शकतो, लाठ्या झेलू शकतो, गोळ्या खाऊ शकतो हे त्यांनीच आम्हांला दाखवून दिले. इतक्या मोठ्या संख्येने हा शेतकरी पूर्वी कधीही – अगदी स्वातंत्र्यलढ्यातही – असा पेटला नव्हता. जोशींनी घडवून आणलेले शेतकरी आंदोलन हा एक चमत्कारच होता.
 लक्ष्मीमुक्तीच्या अभूतपूर्व आंदोलनातून दोन लाख महिलांचे नाव सात बाराच्या उताऱ्यावर लावले गेले, आयुष्यात प्रथमच या भगिनींच्या नावे जमिनीचा एक तुकडा झाला; हाही एक चमत्कारच होता. जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडून तिचे लक्ष दूर वळवण्यासाठी, स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी नेतेमंडळी धर्मभेद, जातिभेद, प्रांतभेद, भाषाभेद हे सगळे क्षुद्र भेद उभे करतात; सर्वसामान्य जनतेच्या मनात ते नसतात, हे त्यांनी स्वत:च्या अनुभवांवरून सिद्ध करून दिले.
 शेती प्रश्न त्यांनीच ऐरणीवर आणला. शेती प्रश्नाला आज सर्वच राजकीय पक्ष निदान आपल्या बोलण्याततरी प्राधान्य देतात हे त्यांचेच यश. जवळजवळ सर्व नेते आणि विचारवंत उदारीकरणाला आणि जागतिकीकरणाला विरोध करत असताना, येऊ घातलेली मुक्त अर्थव्यवस्था देशाच्या फायद्याची आहे; सबसिडी, ४९४ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा