वनस्पतिविचार
मराठी भाषेत शास्त्रीय विषयावर जे ग्रंथ आजपर्यंत झाले आहेत, त्यांची संख्या अत्यल्प आहे हे कोणासहीं नाकबूल करता येणे शक्य नाहीं. व जे कांहीं लिहिले गेले आहेत, ते अशा विषयावरील विदेशीय ग्रंथांच्या मानाने अगदी नाहींतच असे म्हटले असतां चालेल. शास्त्रीय विषयाची केवळ शास्त्र या दृष्टीने व्यावहारिक उपयुक्ततेचा विचार बाजूस ठेवून चर्चा करणारी पुस्तकें लिहिण्याचा प्रघात आमच्या देशांत विशेष नव्हता. कोणताही ग्रंथ कांहीं व्यावहारीक उपयुक्ततेच्या दृष्टीनेच लिहिला जात असे आणि म्हणूनच यंत्रशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, निरिंंद्रिय व सेंद्रिय पदार्थाचे रसायनशास्त्र व वनस्पति शास्त्र या विषयांवर लिहिलेले स्वतंत्र ग्रंथ विशेष उपलब्ध नाहींत. वरील विषयांची माहिती आमच्या पूर्वजांस मुळीच नव्हती, असे मात्र यावरून कोणीही समजू नये. पदार्थविज्ञानशास्त्र, यंत्रशास्त्र वगैरे विषयांतील मुख्य मुख्य सिद्धांत त्यांना खास माहीत होते, याविषयी विश्वसनीय आधार सांपडतात. परंतु वरीलसारख्या विषयांची संकलित माहिती निरनिराळ्या स्वतंत्र ग्रंथांतून दिलेली अशी सांपडत नाही. ही उणीव आधुनिक ग्रंथकरांनी अंशतः भरून काढली आहे. वर नमूद केलेल्या विषयावर लिहिलेली छोटेखानी पुस्तकें आज थोडीबहुत उपलब्ध आहेत व याच तऱ्हेचा एक प्रयत्न वनस्पति शास्त्रासंबंधानें मी केला आहे. वनस्पतींच्या गुणधर्माविषयी वैद्यकांत उपयोगी पडणारी माहिती आमच्या वैद्यकावरील ग्रंथांत सांपडते. परंतु या ग्रंथांतून वनस्पतींच्या मूळांपासून तो शेंड्यापर्यंत असणाच्या निरनिराळ्या भागांचे वर्णन, त्यांच्या व्याख्या, त्यांच्या निरनिराळ्या जाती, त्यांचे रंगरूपभेद, व सजीव कोटीतील एक व्यक्ति, या नात्यानें-तिच्या पोषणाच्या, वाढीच्या व वंशविस्ताराच्या दृष्टीनें- या निरनिराळ्या भागांची कर्तव्ये व तसेच या निरनिराळ्या भागांच्या अंतररचनेत असणारे वैचित्र्य वगैरे विषयांची केवळ शास्त्र या दृष्टीने केलेली चर्चा आपणास आढळत नाही. वरील प्रकारची थोडीबहुत माहिती देणारी पुस्तके माझ्यापूर्वी डॉक्टर ( सध्या सर ) भालचंद्र कृष्ण भाटवडेकर, राव ब०
रा० काशीनाथ बाळकृष्ण मराठे, गुरुवर्य प्रो० भाटे, वगैरेसारख्या विद्वान् गृहस्थांनी लिहिलेली आहेत. सर भालचंद्र व रा० ब० मराठे यांच्या पुस्तकांत वनस्पति शास्त्रांतील मुख्य भागांची अत्यंत त्रोटक अशी माहिती दिली आहे. प्रो० भाटे यांच्या ' जननमरणमीमांसा व जीवनशास्त्र' या पुस्तकांतून वनस्पति व प्राणिकोटी यांमधील साम्यभेदांचा तुलनात्मक रीतीने ऊहापोह केलेला आहे. या पुस्तकांतील विषय सुलभ व चटकदार भाषेत कोणत्याही सुशिक्षित माणसास सहज समजेल अशा रीतीने मांडला आहे. परंतु या तिन्ही पुस्तकांत वर निर्दिष्ट केलेल्या भागांची विस्तृत अशी थोडीबहुत माहिती ज्यांत सांपडेल, असा एखादा ग्रंथ आपल्या भाषेत असावा अशी सहज प्रेरणा मनांत एक दिवस उत्पन्न झाली, आणि ईशकृपेनें व कांहीं मित्रांच्या प्रोत्साहनाने ती मनांत कायम राहिल्यामुळे, या प्रेरणेचे रूपांतर प्रयत्नांत झाले व त्या प्रयत्नांचे दृश्य फल हा वेड्यावाकड्या भाषेत लिहिलेला ग्रंथ होय. ग्रंथकर्त्यास अवश्य असणारे भाषाप्रभुत्व माझे ठिकाणी नाही, तसेच आपल्या अल्पमतीच्या जोरावर लिहिलेले पुस्तक स्वतः प्रसिद्ध करण्याचे द्रव्यबल तरी जवळ होते, असेही नाही. तेव्हां अशा प्रतिकूल परिस्थितीत लिहिलेल्या ग्रंथांत बरेच दोष वाचकांस सांपडणे संभवनीय आहे. परंतु मातृभाषेची एक अत्यल्प सेवा, एवढ्याच एका गोष्टीच्या भरंवशावर वाचकवर्ग या माझ्या कृतीकडे हंसक्षीरन्यायाने पाहून योग्य त्या सूचना करतील, अशी मी आशा करितों.
आवृत्ति काढण्याचा सुदिन उगवल्यास, ही चित्रांची उणीव भरून काढण्याची उमेद ग्रंथकर्ता बाळगीत आहे.
आतां पारिभाषिक शब्द शास्त्रीय ग्रंथांत ग्रंथकर्त्याने स्वतः तयार करून घालावे किंवा नाहीं, याविषयी बरेच मतवैचित्र्य आहे. स्वभाषेची वाढ होण्यास पारिभाषिक शब्द आपल्याच भाषेत असावेत, असे मला वाटत असल्यामुळे, मी ते यथामति तयार करून घातले आहेत. ते शब्द यथार्थच आहेत, असा माझा आग्रह नाही, आणि म्हणूनच त्यांची योग्यायोग्यता हा विषय इंग्रजीतून शिकलेल्या विद्वान् लोकांस ठरविता यावा व त्याप्रमाणे अशा चर्चेस चालन मिळावे, या दुहेरी हेतूने तयार केलेल्या प्रत्येक पारिभाषिक शब्दापुढे तत्सदृश इंग्रजी शब्द दिला आहे; व कांही ठिकाणी एकच अर्थ दर्शविणारे दोन प्रकारचे शब्द कोठे कोठे पडले आहेत, असा संशय आल्यामुळे पुस्तकाच्या शेवटीं ‘शब्द सूची ' ही दिली आहे, तिचा उपयोग वाचकांनी करावा अशी त्यांस नम्र विनंति आहे.
सरतेशेवटी ज्यांचे सहाय्य मिळाले नसतां माझ्या ह्या कृतीस आजचे स्वरूप निदान इतक्या लवकर प्राप्त होणे कधीही शक्य नव्हते व ज्यानी स्वभाषेची सेवा आज कित्येक वर्षे तनमनधन अर्पण करून चालविली आहे, असे जे ग्रंथप्रसारक मंडळीचे चिटणीस रा० रा० दामोदर सांवळाराम यंदे यांचे व तसेंच माझी हस्त लिखित प्रत तपासून मला कांहीं अत्यंत उपयुक्त सूचना केल्याबद्ल, गुरुवर्य प्रो० भाटे ( यांनी माझ्या ग्रंथास प्रस्तावना लिहून माझा विशेषच गौरव केला आहे), प्रो० दीक्षीत, रा ० रा. लक्ष्मण बाळाजी मोडक, परममित्र रा० बाळाजीपंत पटवर्धन, रा० भास्करराव घारे, रा० माधवराव फाटक व डॉ० नंदकिशोर यांचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे, आणि ते मी मोठ्या आनंदानें करितो.
शेतकी कॉलेज
कानपूर, १२-७-१३.
'वनस्पतिविचार ' म्हणजे झाडाबद्दलची माहिती. 'झाड' म्हटल्याबरोबर वड, पिंपळ, बाभूळ, कोऱ्हांटी, तगर, कण्हेर, पुदीना, मका, मोहरी इत्यादि अनेक लहान मोठे वृक्ष नजरेपुढे येतात आणि साधारण मनुष्यास देखील हो सिद्ध शब्द (झाड) अत्यंत परिचयाचा वाटतो, व तो पुष्कळ अंशाने मार्गदर्शक असतो, हेही पण खरे आहे. " पुष्कळ अंशाने " म्हणण्याचे कारण साधारण मनुष्यास ‘ झाड ' या शब्दानें बुरसा, धोंड ( दगड ) फूल, शेवाळे, भूछत्र, अळंबे इत्यादि अनेकविध सूक्ष्म वनस्पतींचा बोध होत नाहीं. लहानमोठ्या वृक्षलतादिकांचा समावेश करण्याच्या उद्देशाने ' झाडेझुडें ' झाडे झुडपे ' 'झाडझाडोरा ' इत्यादि शब्दांची योजना होते; परंतु तेथे देखील वरील सूक्ष्म वनस्पति लक्षांत न येऊन अगर निरुपयोगी समजल्या गेल्यामुळे, प्रायः वगळलेल्याच असतात. 'वनस्पति' म्हणजे काय ? वन म्हणजे अरण्य अगर जंगल; अर्थात झाडाझुडपांचा प्रचंड समुदाय. साधारण छोट्या समुदायास वन म्हणत नाहींत; बाग, शेत, कुरण वगैरे कांहीतरी म्हणतात. या वनाचा पति ( षष्ठीतत्पुरुष समास मानल्यास वनस्पति ! ) म्हणजे मालक अगर नियंता कोण ? खरा मालक ईश्वर असला, तरी ' वनस्पति ' हा शब्द ईश्वरवाचक नाहीं हें खास. तो जगच्चालक प्रभु वनाचाच काय, परंतु अखिल सृष्टीचा खरोखरीचा सर्वतोपरी मालक आहे, ही निर्विवाद गोष्ट आहे. तर मग ' वनस्पति ' म्हणजे जंगल अधिकारी (Conservator of Forest ) तर नव्हेना ? छेः, असा अर्थ करणे म्हणजे केवळ शब्दच्छलच होईल. अरण्याचा टाप आखून घेऊन त्यांत इतर कोणालाही फिरकू न देणाऱ्या मृगराजास ही यथार्थपदवी देण्यात आली आहे. त्या अर्थी वनस्पति म्हणजे सिंह होय असे म्हटल्यास ‘ वनस्पति ' आणि ' प्राणि ' म्हणजे ' झाडे ' आणि 'जनावरे ' असे वर्ग करण्यास सवडच उरत नाही. उडु म्हणजे तारा आणि मृग म्हणजे जनावर. सर्व ताऱ्यांमध्ये मोठा म्हणून चंद्रास उडुराज म्हणतात, आणि सर्व प्राण्यांमध्ये प्रबल म्हणून सिंहास मृगराज म्हणतात. अशा अर्थाने पहातां नर्मदातटाकी असलेल्या कबीरवडाप्रमाणे सर्व झाडाझुडपांमध्ये अत्यंत विस्तीर्ण अशा झाडास तरुराज अगर वृक्षराज असे म्हणणे अगदी सयुक्तिक होईल. आणि पुढे क्रमेंकरून वटवृक्षाचे अगर इतर कोणत्याही याहून मोठ्या झाडाचे हे विशेषनामदेखील बनविता येईल. तरुराज अगर वृक्षराज म्हणण्याऐवजी वनराज ऊर्फ वनस्पति म्हणण्यामध्ये दोन अडचणी येतात. वन हा शब्द समुदायवाचक असल्याने तो प्रत्येक झाडास लावता येत नाहीं. उडूंचा राजा म्हणून उडुराज, मृगांचा राजा म्हणून मृगराज, त्याप्रमाणेच वनांचा ( झाडांचा नव्हे ) राजा म्हणून वनराज ऊर्फ वनस्पति असे प्रतिपादन करता येत नाही. शिवाय उडुराज, मृगराज या शब्दाप्रमाणे वनराज अगर वनस्पति हें विशेषनाम करून कोण्या एका विविक्षित झाडास दिल्यास हल्ली चालू असलेल्या वहिवाटीप्रमाणें प्रत्येक झाडास ते लावता यावयाचें नाहीं. सारांश, सांकेतिक अगर पारिभाषिक या नात्याने वनस्पति हा शब्द तरु, वृक्ष, लता, झाड इत्यादिकांशी समानार्थक समजावयाचा आहे. त्याच्या व्युत्पत्तिबद्दल काथ्याकूट करण्यांत कांहीं हांशील नाहीं.
‘प्राणी ' या शब्दाची देखील अवस्था अशीच आहे. ज्यास प्राण आहे तो प्राणी, प्राणाचे स्वरूप ओळखणे बरेच कठीण व दीर्घ प्रयासाचे असून, परिणामी प्रस्तुत इष्ट कार्यास साधकच होईल; अशाबद्दल बिलकुल खात्री नाहीं. प्राण ही एक प्रकारची शक्ति आहे, असे सांगितल्याने कांहीं विशेष बोध होत नाहीं. कारण उष्णता, प्रकाश, विद्युत, चुंबकाकर्षण वगैरे शक्तीचे प्रकार सहज सुचविता येतात. मनुष्य मेला म्हणजे प्रथम त्याचे शरीर गार पडते. बाकी सर्व निदान कांहीं वेळपर्यंत तरी अगदी यथापूर्व असते. अशा प्रसंगी प्राण म्हणजे उष्णता असे सकृद्दर्शनी ठरल्यासारखे दिसते खरे. कारण प्राणोक्रमणामुळेच म्हणजे त्या उष्णतेच्या अभावींच, रुधिराभिसरण, श्वासोच्छ्वास, ज्ञानतंतुस्फुरण इत्यादि दरोबस्त क्रिया बंद पडतात. उलटपक्षी आगगाडीच्याएंजिनांत पाणी, कोळसा ( अगर लांकडे ) भरून उष्णता पोचविली म्हणजे एंंजिन पूर्ववत सर्व क्रिया करू लागते; परंतु तीच उष्णता मनुष्याच्या मृत शरीरास दिल्यास काय होते ? अन्नपचन, रुधिराभिसरणादि क्रिया पूर्ववत् सुरू होण्याचे बाजूलाच रहाते; परंतु चितेवरील जबरदस्त उष्णतेमुळे सर्व शरीरच्याशरीर भस्मीभूत होते, म्हणजे त्याची राख रांगोळी होते. आणि त्याबरोबर व्यक्तिशः जिवंत असलेल्या त्या मृत शरीरातील असंख्य पेशी मात्र मृत्युमुखांत बळजबरीने कोंबल्या जातात ! याप्रमाणे प्राण म्हणजे केवळ उष्णता कांहीं नव्हे, असे खात्रीलायक सिद्ध होते.
प्राण म्हणजे एकप्रकारचा वायु आहे, असे सिद्ध करणे देखील वरीलप्रमाणेच दुरापास्त होणार. मनुष्याच्या शरीरामध्ये एक वायु असतो, त्याला स्थल परत्वे प्राण, अपान, उदान, समान, व्यान, हीं नांवे आहेत, असे सांगण्यांत येते; परंतु हवेप्रमाणे त्या वायूचे पृथक्करण झालेले नाही व तो वायु म्हणजे कोणतें मूलतत्त्व अगर कोणत्या मूलतत्त्वांचे मिश्रण हे ठरलेलें नाहीं. यदाकदाचित् तसे ठरलेले असते, तरी मृत शरीरामध्ये तो वायु भरल्याने मनुष्य पुन्हां जिवंत झाला असता किंवा नाही, याबद्ल पुष्कळ वानवाच आहे. खाटीक बकऱ्याचे पोट फाडून आतील आंतडी, कोथळा, वगैरे बाहेर काढितो; परंतु पुन्हां ते सर्व भाग त्याला पूर्ववत् जागच्या जागी बसवितां येत नाहीत; कारण ते बाहेर काढतांना असा कांहीं एक पदार्थ फाटतो अगर नासतो की, जो आज तारखेस आम्हांस बनवितांच येत नाही. याचप्रमाणे प्राण गेला म्हणजे अशी एक कांहीं चीज बाहेर जाते कीं, जिचे पूर्ण स्वरूप आज मितीस आम्हांस कळलेले नाही. याच कारणामुळे सचेतन-अचेतन, सजीव-निर्जीव, सेंद्रिय-निरिंंद्रिय यांच्यांमधील खरा भेद कळत नाही, आणि तप्त अपोगोलकांत चैतन्य आहे की नाही, ह्वेने तट्ट फुगलेल्या भात्यांत जीव आहे की नाही, लोहचुंबक टाचणीला अगर सुईला आकर्षितो, ती क्रिया इच्छापूर्वक अगर सहेतुक होय की नव्हे, इत्यादि प्रश्न आम्हांस अगदीं गोंधळवून सोडतात. एंजिनमध्ये पाणी भरून त्याची वाफ करून, ती आळीपाळीने दट्ट्याच्या दोन्हीं बाजूस सोडिली, म्हणजे दट्ट्या मागे-पुढे सरून गाडी हालू लागते; तथापि पाण्यास बेतवार उष्णता देऊन वाफ योग्य मार्गाने आणि योग्य प्रमाणानें पोचविण्यास ड्रायव्हर हजर असावा लागतो. ते काम फायरमन ( आगवाला )या टोकास जसा 'अनादि' शब्द त्याप्रमाणे त्या टोकास * अनंत' हा शब्द जोडण्यांत येतो.
इतके हे सर्व सूक्ष्म व क्लिष्टं भेदाभेद बाजूस ठेवून केवळ झाडझुडपांकडेच आपण जर नजर फेंकिली, तर तेथे देखील शब्दयोजनाचातुर्य जितक्यास तितकेंच दिसते. झाडांना प्राण असल्याचें पदोपदी हरतऱ्हेनें कबूल करावयाचे, परंतु त्यांना प्राणिमात्र म्हणावयाचें नाहीं ! अर्थावरूनच केवळ पहाता सिंहव्याघ्रादिकांना वनस्पति कां म्हणू नये आणि झाडाझुडपांना प्राणी कां म्हणू नये, याचे उत्तर देतां येण्यासारखे नाही. काही प्राणी अंडी घालतात, त्याप्रमाणे झाडेदेखील घालतात. प्राण्यांमध्ये त्यांना अंडी म्हणतात, तर इकडे झाडांमध्ये त्यांना बिया म्हणतात इतकाच काय तो फरक. कोंबडीचे अंडे, योग्यकालपर्यंत उबविलें गेलें म्हणजे पुढे त्यांतून पिल्लू बाहेर येते, त्याप्रमाणेच बीजाला उष्णता, ओलावा, हवा वगैरे अवश्य तितकी साधनसामुग्री मिळाली म्हणजे त्यांतून अंकुर बाहेर येतो व पुढे योग्य काली त्या बीजास जनक वृक्षाचे रूप प्राप्त होते. प्राण्यांप्रमाणे झाडांसदेखील बाल्य, तारुण्य, वार्धक्य या स्थिती आहेत; व ती देखील वाढतात, खातात, पितात, वळतात, सुकतात व मरतात. इतके सर्व कबूल असून देखील त्यांना प्राणी असे न म्हणण्याचा इतका हट्ट कां हें कांहीं कळत नाही. या प्राण्यांवर ( झाडांवर ) ताव मारणारे आणि त्या प्राण्यांवर ताव मारणारांची कुचेष्टा करणारे अशा कोणी, हा नामकरणामध्ये बुद्धिपुरस्सर पक्तिप्रपंच केला असल्यास कोणास माहित ? विलायतेतील वनस्पत्याहारामध्ये कोंबड्याच्या अंड्यांचा समावेश होतो, म्हणून हसणाऱ्या मंडळीनी इकडच्या आपल्या वनस्पत्याहारांत प्राण्यांपासून मिळणारे दूध व तज्जन्य दही, ताक, लोणी, तूप यांचा समावेश होतो हे विसरून कसे चालेल ? वास्तविक पहातां गाय असो, म्हैस असो, अगर शेळीं असो, तिच्या आचळांतील दूध (हें वासरू, रेडकू, कोंकरुं, करडू , हवे ते त्याला म्हणा ) तिच्या पोरांकरितां ईश्वराने निर्मिलेले असते. परंतु आपण ते निःशंकपणे काढून घेतो आणि त्याच्या ऐवजी म्हशीच्या रेडकांस पीठ चारतो आणि ताक पाजतों ! दूध म्हणजे खरोखर एक प्रकारचे रक्तच होय. परंतु आम्हा वनस्पत्याहाऱ्यांची या दुधावर भारी भिस्त आहे. नुसते दूध पिऊन निराहार, उपोषणे, उपवास वगैरे
एकंदरींत सारांश असा की, प्राण्यांपैकी काहींना सांकेतिक अगर पारिभाषिक या नात्याने वनस्पति हो शब्द लावण्यास येतो. अशा या वनस्पतींमधील आणि प्राण्यांमधील भेद खुलासेवार सांगणे कित्येकदां अगदी अशक्य होते. हा भेद सांगण्याच्या प्रयत्नाची पुष्कळ शिकस्त झाली आहे, तथापि
आजमितीस असे पुष्कळ सजीव पदार्थ आहेत की, ज्यांना धड प्राणीही म्हणतां येत नाहीं आणि वनस्पतीही म्हणता येत नाही. या वर्गाला झूफाईटस ( Zoophytes ) असे नाव दिले आहे. या नांवाचा अर्थ प्राणिरूप वनस्पति अगर ' वनस्पतिरूप प्राणी ' असा होतो. हा शब्दप्रयोग दगडफूल, अबदुलभट, सीतारामखान, आब्राहामाप्पा हा अशा प्रकारचा आहे, आणि यावरून वनस्पति आणि प्राणी यांच्यामधील भेद सांगणे नेहमी शक्य नसते, हे उघड सिद्ध होते. एकंदरींत खरे सजीव कोण आणि खरे निर्जीव कोण, याचा विचार येथे कर्तव्य नाही. तसेच वनस्पति आणि प्राणि यांच्यामधील खरा भेद कोणता तेही पहावयाचें नाहीं, या अखिल वस्तुजातापैकी कांहीं- की ज्यांना पारिभाषिक अगर सांकेतिक नांव वनस्पति हें दिले आहे, आणि ज्यांच्यापैकी पुष्कळांचा बोध व्यवहारामध्ये झाड या शब्दाने होतो, अशा-वस्तूंबद्दलची कांहीं माहिती येथे देण्यात येत आहे. वनस्पतिविचार म्हणजे वनस्पतीचे विचार नव्हेत, वनस्पतींमध्ये मज्जातंतुजाल आहे की नाही, याबद्ल बरीच शंका आहे. इष्ट वस्तूचे विचारपूर्वक सेवन आणि अनिष्टाचा बुद्धिपुरस्सर त्याग हें
आमची एकंदर इंद्रियेच अशी दुबळी आहेत की खात्रीपूर्वक घडून आलेल्या परिणामांच्या पूर्वपीठिकेची मीमांसा त्यांस होत नाही, मग भविष्यत्काली होऊ घातलेल्या कार्याचे कारण जाणणे बाजूलाच राहिले. रसायनशास्त्रवेत्ते पाणी, लोह, चुना, फास्फरस इत्यादि अनेक पदार्थ मनुष्य शरीराचे घटक म्हणून दाखवितात आणि जीवनशास्त्रविशारद कमी अधिक प्रमाणाने रूपांतर पावलेल्या पेशी, अस्थि, स्नायु, रुधिर, त्वचा वगैरे शरीराच्या भागांतून काढून दाखवितात; परंतु हे घटक भाग एकत्र करून हा शरीर रूपी गाडा कोणी कसा चालू केला हे त्यांच्याने सांगवत नाही आणि पेशींच्या एकीकरणाने बनलेल्या शरीराचें सौंदर्य अगर कुरूपता याचा मागमूस सांगता येत नाहीं. आनुवंशिक संस्कार घडलेले दिसतात व त्यांची दृश्यफलें अनुभवण्यास मिळतात. परंतु सूक्ष्मपेशीवरील संस्कारदर्शक सूक्ष्मतर लिपी वाचता येत नाही. सारांश अशा प्रसंगी कारणाचा उमज पडला नाही म्हणून कार्याच्या खरेपणाबद्ल मन साशंक राहूं शकत नाही, याकरितां 'सब झूट ' पंथ पत्करण्यापेक्षां श्रद्धालुपणा पत्करणे विशेष सयुक्तिक अगर सुसंगत होईलसे वाटते. कारण पहिल्यामध्ये वाजवीहून फाजील घमेंड येते आणि दुसऱ्यामध्यें खराखुरा विनय येतो.
ग्रंथकाराने हा ग्रंथ अशाच भावनेने लिहिला आहे व वाचकांनीही पण त्याच भावनेने वाचला पाहिजे. या विषयाचा इंग्रजीतून परिचय करून घेतलेल्यांना हा ग्रंथ कांहींसा भाषांतररूप वाटेल; त्यास उपाय नाहीं. निव्वळ देशी उदाहरणे देणे, क्लिष्ट आणि पारिभाषिक शब्द होता होईतों न वापरणे इत्यादि उपायांनी ग्रंथाचा रूक्षपणा कमी करून त्याला अधिक मनोहर करता येते; परंतु सबंध विषय हाती घेतल्यानंतर वरील पद्धतीने सांगोपांग विवेचन होण्यास अडचण येते. अशा कामी चित्रांची योजना अत्यंत आवश्यक व उपयुक्त असते, परंतु हुबेहुब चित्रे आजतारखेस येथे क्वचितच तयार होतात आणि जीं होतात ती मिळविणे हे अनेक तऱ्हेनें ग्रंथकर्त्यांच्या शक्तीबाहेरचे आहे. झाडाचे हुबेहुब चित्रच दाखविलें म्हणजे नांवाचे फारसे महत्त्व उरत नाही. वनस्पति-बाग तयार करून त्यांत साक्षात् जिवंत झाडे दाखविणे किंवा झाडाचे भाग वाळवून जपून ठेवणे आणि त्यांचा उपयोग करणे, हे विषय अगदी अलग आहेत. ग्रंथलेखनाशी त्यांचा काही संबंध नाही. ग्रंथामध्ये
सर्जन लेफटेनंट के. आर. कीर्तीकर यांणींं आपल्या Poisonous plants of India या ग्रंथामध्ये चित्रांची उणीव कशी भरपूर रीतीने भरून काढलेली आहे हे पुष्कळांस माहित आहेच लोकाश्रय, राजाश्रय अगर इतर कोणताहि आश्रय मिळून प्रो० दामले यांना या ग्रंथाची द्वितीयावृत्ति लवकरच काढण्याचा प्रसंग येईल आणि त्यावेळी ते सुंदर चित्रांची वाण चांगली भरून काढतील अशी आम्ही मनःपूर्वक आशा करितो.
प्रकरण. | मुख्यविषय व पोटविषय. | पृष्ठ. |
१ | सजीव व निर्जीव वस्तूंची मीमांसा..... ... | १ |
२ | कल्पना-मोहरी, आकाशवेल, फर्न, भूछत्रे, शैवालतंतु, किण्व. | ९ |
३ | जनन-वाल अथवा पावटा, एरंडी, मका, खजूर..... | १३ |
४ | मूळ —मूलावरण, मुळांचे प्रकार, आगंतुक मुळे, मांसल मुळे, | |
हवेंत लोंबणारी मुळे, परान्नभक्षक मुळे..... ... ... ... | १७ | |
५ | स्कंध अगर खोड–मुळे व स्कंध, आवरणे, फांद्यांची उत्पत्ति, | |
फांदीची व्यवस्था, एकपाद, आगंतुक कळ्या, बलाबलता, धांवती | ||
फांदी, मूळकोष्ठ, ग्रंथीकोष्ठ, सकंदकोष्ठ, कंद, पर्णकोष्ठ, रसकस | ||
कंटककोष्ठ, सूत्रकोष्ठ, पाणवनस्पती..... ... ... ... | २३ | |
६ | पर्ण-उत्पात, महत्त्व, कळी, स्वरूप, भाग, पानाचे बूड, | |
उपपर्णे, देठ, पान अगर पत्र, शिरा, आकार, कडा, अग्र, | ||
पृष्ठभाग, वर्ण, भेद, जोडीदार संयुक्त पाने, संयुक्त हस्तसादृश | ||
पाने, शिरांची मांडणी, जाळीदार शिरांच्या दोन मुख्य जाति, | ||
पानांचा खाडावरील उगम, खोडावरील पानांची मांडणी, | ||
मांडणीचे मुख्य प्रकार, पानांचीं अन्य स्वरूपें .... ... | ३५ | |
७ | पेशी, सजीवतत्व व केंद्र –पेशी, सजीवतत्त्व, पेशीभित्तिका, | |
केंद्र, रंजितशरीरें, चलनादि धर्म, पेशीद्रव्ये, केंद्र, पेशीविभाग, | ||
कळी सोडणे. .... ... ... ... | ४७ | |
८ | पेशीजाल -मृदुसमपरिमाण पेशी, लंबवर्धक पेशी, वाहिनी | |
व पेशीजाल, पेशीजालांतील पोकळ्या वाहिनीमय जाल, दुग्ध | ||
रसवाहिनींजाल, पिण्डजाल, वाढता कोंब, पेशीरचना, संरक्षक | ||
पेशीजालरचना, साल, वाहिनीमय ग्रंथरचना .... ... | ५९ | |
९ | अंतर रचना -मुळ्या, खोड, पाने .... ... ... | ७४ |
प्रकरण. | मुख्यविषय व पोटविषय. | पृष्ठ. |
१० | कर्तव्यें. ... | ८७ |
११ | ऑस्मासिस क्रिया व मूलजनित शक्ति -शोषणक्रिया, | |
पाण्याची उपयुक्तता, मूलजनित शक्ति.... ... ... ... | ९१ | |
१२ | बाष्पीभवन. ...... ... ... | ९८ |
१३ | क्षार, कार्बनवायु व हरित्वर्ण शरीरे. ... ... ... | १०६ |
१४ | शोषणाच्या अन्य रीति व श्वासोच्छ्वास क्रिया | |
सेंद्रियरस मार्ग. ... ... ... ... ... ... ... | ११५ | |
१५ | पचन, वाढ व परिस्थिति –वस्तु आंबणे, पेशिघटना, | |
घटनेस अप्रत्यक्ष मदत, वाढ. ... ... ... ... ... | १२५ | |
१६ | उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा–ज्ञानतंतु. ... ... ... | १३५ |
१७ | जननेंद्रिये-फुले. ... ... ... ... .... ... | १४४ |
१८ | पुष्पबाह्य वर्तुळे (पुष्पकोश व पुष्प मुगुट) द्वितीय वर्तुळ | १५३ |
१९ | पुंकोश व स्त्री कोश -पुंकोश, केसर, स्त्रीकोश. ... .. | १६० |
२० | बीजाण्ड व गर्भधारणा--बीजाण्ड, गर्भधारणा. ... | १६९ |
२१ | उपपुष्पपत्रे व मोहोर. ... ... ... ... | १७६ |
२२ | फळ -व्याख्या | १८४ |
२३ | बीज. ... ... ... ... ... ... ... | १९५ |
२४ | पुनरुत्पत्ति.... ... ... ... ... ... ... | २०३ |
२५ | पारिभाषिक शब्दांचा कोश.... ... ... ... ... | २११ |