वनस्पतिविचार/अंतर रचना

विकिस्रोत कडून

७४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
प्रकरण ९ वें.
---------------
अंतररचना.

 मुळ्या: –पूर्वीप्रमाणे पावटा लाकडाचे भुसांत पेरून त्यावर पाण्याचा हबका द्यावा, व न वाळेल अशी व्यवस्था करावी. कांही दिवसांनी वाढता कोंब, दोन डाळिंबी, आदिमूळ व त्यावरील द्वितीयक अगर त्रितीयक मुळ्यांच्या शाखा, तसंच पाने वगैरे क्रमाक्रमाने दिसू लागतील, खोड, पाने वगैरेंची विशेष विचक्षणा न करितां तूर्त आपले लक्ष्य केवळ मुळे व उपमुळे इकडेच देऊ.

 मुख्य मूळ भुसांत लांबवर गेले असून त्यावर उपमुळे वरून खाली फुटत जातात. उपमूळ जोराने उपटलें असतां मुळावर त्याजागी खोल भोंक पडलेलें आढळेल. ह्यावरून त्याची उत्पत्ति मुख्य मुळाच्या केवळ बाह्यत्वचेपासून होत नाही. त्याचा उगम आंत खोल असतो. मुळांवर तसेच उपमुळ्यांवर बारिक बारिक केंस अग्राकडील भागाजवळ दृष्टीस पडतात. हे केंस सूक्ष्मयंत्रांत तपासिलें असतां ते एकपेशीमय आहेत असे आढळेल. केसांचा उगम बाह्यत्वचेपासून होतो. त्यांचा वनस्पति जीवनक्रमांत फार मोठा उपयोग असतो. हा उपयोग वनस्पतीच्या पोषणक्रियेत फारच महत्त्वाचा असतो, जमिनींतून द्रव स्थितीत अन्नद्रव्ये शोषून घेणे हे काम ह्या केंसाद्वारे घडत असते. केसांतील जीवनकण शोषणकार्याकरितां फार तत्पर असतात. साध्या पेशीप्रमाणे, केसांत केंद्र, सजीवतत्व, पेशद्रव्ये, जडस्थाने, पेशीरस वगैरे आढळतात. केसांचा संबंध जमिनीच्या खरखरीत भागाशी नेहमी येत असल्यामुळे ते वरचेवर झडून जातात. पण त्याबरोबरच नवीन केंस उत्पन्न होत असतात. हरितवर्ण शरीरे (Chloroplasts ) केंसात आढळत नाहींत.

 येणेप्रमाणे केंसाचे परीक्षण झाल्यावर मुख्य मुळ्या पाहण्यास सुरुवात करावी, अग्राजवळ वस्त्रयाने माडवा पातळ छेद घेऊन कांच पट्टीवर ठेवून पूर्वीप्रमाणे सूक्ष्मदर्शकयंत्रांतून दर्शक पाहण्याकरितां तो तयार करावा.

 सूक्ष्मयंत्रांत हा भाग पाहताक्षणी असे दिसेल की, तो भाग निरनिराळ्या आकाराच्या पेशींचा बनलेला आहे. ह्या निरनिराळ्या थरांतील पेशी आपण बाहेरून क्रमाने आंत पाहूं.
९ वे ].     अंतररचना.( Tissue).     ७५
-----


 प्रथम बाह्यत्वचा ( Epidermis) दृष्टीस पडते, ती एकपेशीमय असून त्यापासूनच वरील केंस उत्पन्न होतात. बाह्यत्वचेनंतर साल (Cortex) आढळते. येथील पेशी मृदुसमपरिमाणी असून आंतील अंगांस अंतरत्वचा ( Endodermis ) असते. अंतरत्वचेतील पेशींच्या भित्तिका जाड असतात. वाटल्यास आयडीनचा उपयोग करून पहावा, म्हणजे सात्विक कणामुळे ती निळसर दिसू लागेल. अंतरत्वचेनंतर स्तंभ (Stete ) दिसतो. स्तंभांत प्रथम परिवर्तुल (Pericycle ) एक अगर दोन पदरी आढळते. मुळांतील परिवर्तुळ अधिक महत्त्वाचे असते. कारण त्यापासून दुय्यम मुळ्या उत्पन्न होतात. परिवर्तुळांत कांहीं पेशी संवर्धक होऊन त्या बाहेरील अंगाकडे लंबदिशेत वाढू लागतात. संवर्धक पदराची पूर्ण सांखळी होण्यास परिवर्तुळाचा उपयोग होतो. परिवर्तुळानंतर आंत वाहिनीमय जालें (Vascular bundles ) असतात. प्राथमिक मुळांत ती केवल काष्ठाची अथवा तंतुकाष्ठाची असतात. संवर्धक पदर ( Cambium) प्रथम तेथे असत नाहीं. काष्ठ व तंतुकाष्ठ यांचे दरम्यान संयुक्त जाल Conjunctive tissue असते. पुढे जेव्हां पूर्ण ग्रंथी तयार होते, त्यावेळेस संवर्धक पदर संयुक्तजालापासून उत्पन्न होतो. संयुक्त जालें, काष्ठ अगर तंतुकाष्ठ ग्रंथींच्या डोक्यावर असणाऱ्या परिवर्तुळाकडून एकमेकांस जोडिली जातात, त्यामुळे संयुक्त जालांस अर्धवट नागमोडी वर्तुळाकृति येते. मध्यभागी भेंड ( Pith ) असते.

 काष्ठग्रंथीची रचना विशेष पाहण्यासारखी असते. परिवर्तुळाकडील बाजूस काष्ठाच्या पेशी वाटोळ्या व लहान असून भेंडाकडे ह्या मोठमोठ्या आढळतात. ह्या लहान पेशी प्रथमकाष्ठाच्या (Protoxylem) असून मोठ्या पेशी नूतन काष्ठाच्या असतात. म्हणजे कोंवळ्या मुळांत प्रथमकाष्ठ बाह्यांगास परिवर्तुळाजवळे असून, नवीन काष्ठाचे पदर आंत वाढत जातात, ह्याचे उलट खोडामध्ये काष्ठाची वाढ असते. मुळ्या व खोड ह्यांच्या वाढीसंबंधी हा भेद प्राथमिक स्थितीमध्ये स्पष्ट असतो. पण जसे जसे मूळ मोठे होत जाते, त्याप्रमाणे हा भेद कायम राहत नाही. त्यांतील ग्रंथी केवळ साध्या न राहता, पुढे निश्चित होत जातात. संयुक्तजालापासून संवर्धकपदर काष्ठ व तंतुकाष्ठ ह्या दोहोंमध्ये वाढतो. काष्ठवाढीची दिशा पूर्वीप्रमाणे अंतरवर्धिष्णु ( Endogenous ) न राहतां काष्ठाची वाढ बहिवर्धिष्णु होऊ लागते.
७६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
म्हणजे जुने मूळ व खोड ह्यांतील ग्रंथीसंबंधी रचना अथवा काष्ठवाढीची दिशा ह्यामध्ये फरक कांहीं राहत नाही. प्राथमिक कोंवळ्या स्थितीत दिसणारे फरक हळू हळू कमी होत असतात. ग्रंथीद्वयामध्ये असणारे संयुक्तजाल वाढून त्यापासून नवीन पेशी काष्ठाकडे तसेच तंतुकाष्ठाकडे जमत जातात. तंतुकाष्ठ आपले दोन्ही अंगास वाढते. तसेच काष्ठ दोन्ही बाजूस वाढून पसरत जाते. तंतुकाष्ठ व काष्ठ ही दोन्ही द्विगुणित होतात. दोहोंमध्ये पेशीवर्धक संयुक्तपदर असतो. त्यामुळे, पूर्णग्रंथी होण्यास फारसे कठीण पडत नाहीं, तंतुकाष्ठाचे खाली संयुक्तपदर असून, नंतर काष्ठ येते. येणेप्रमाणे त्यापासून पूर्ण ग्रंथी तयार होतात. पूर्णग्रंथीची संख्या पूर्वीइतकीच कायम असते. कारण एक भाग तंतुकाष्ठ व एक भाग काष्ठ असे दोन भाग मिळून ग्रंथी बनल्यामुळे त्या द्विगुणित होण्याचा परिणाम संख्यावाढीकडे न होता, त्यापासून पूर्वीची संख्या कायम राहते. जशी जशी मुळांत दुय्यम वाढ होऊ लागते, त्याप्रमाणे मध्यभागी असलेले भेंड (Pith ) पूर्वीप्रमाणे आढळत नाहीं, तेही कमी होत असते. प्रथमकाष्ठाच्या चोहोबाजूंकडे काष्ठपेशी वाढत गेल्यामुळे ते आपले पूर्वीचे बाह्यस्थान सोडन आतील बाजूस झाल्यासारखे दिसू लागते. व पुढे तर नवीन काष्ठपेशींची वाढ बाहेरच होत गेल्यामुळे, ते कायमचें आतील भागांत राहते. ग्रंथीची रचना आंत अरुंद व बाहेर रुंद असते. सर्व ग्रंथी वर्तुलाकृतीतच परस्पर चिकटल्या असतात. एकंदरीत प्राथमिक व दुय्यम वाढीत पुष्कळ फरक होत जातात, हे वरील विवेचनावरून स्पष्ट कळेल.

 मुळाचा आडवा छेद न घेतां तो सरळ उभा घेऊन सूक्ष्मदर्शकयंत्रामध्ये पाहिला असतां, पहिल्याप्रमाणे पेशीजालें लांबट व दीर्घ स्थितीत आडळतील. तंतुकाष्ठांत चाळणीदार नळ्या, काष्ठांमध्ये फिरकीदार व वळेदार वाहिन्या, पाहण्यास आढळतात. बाकी मुख्य तत्त्वांत फरक नसतो. नूतन काष्ठांत खांचेदार वाहिन्या व प्रथम काष्ठांत वळेदार अगर फिरकीदार वाहिन्या असतात. प्रथम व नूतन काष्ठ ओलखण्यास ह्यामुळे सुळभ पडते.

 शेवटले अग्र वरच्याप्रमाणेच सूक्ष्मदर्शक यंत्रांतून पाहिले असता, त्यांत चार किंवा पांच संरक्षक पदर आढळतात. आंत वाढती पेशी ( Growing cell ) असते. कधी कधी अग्राची बाह्यरचना टोपीसारखीच असते, हे पूर्वी

९ वे ].     अंतररचना.( Tissue).     ७७
-----
पाहिलेच आहे. वाढत्या पेशींत द्विधा होण्याची शक्ति मोठी जबर असून, त्यापासून मुळांतील इतर पेशीजालांचा उगम असतो.

 कांहीं मुळांत वाढती पेशी ( Growing cell ) लहान असून, कांटकोनाकृतीत ती द्विधा होत जाते. उच्च वर्गामध्ये वनस्पतींच्या वाढत्या कोंबांत असली वाढ नेहमी असते. क्षुद्रवर्गात वाढती पेशी मनोऱ्याप्रमाणे असून, ती समांतररेषेत बुडाकडून आडवी द्विधा होत जाते, व नेहमी मनोरी आकार वाढत्या पेशींत कायम असतो.

 एकदल अथवा द्विदल वनस्पतीमध्ये मुळांच्या अंतररचनेत मुख्य तत्त्वांत फारसा फरक नसतो. तंतुकाष्ठ व काष्ठग्रंथीची संख्या, एकदल वनस्पती अधिक असते. द्विदल अगर बहुदल वनस्पतीमध्ये मुळांत ग्रंथींची संख्या दोन पासून सहापर्यंत असते, पण एकदलांत ती संख्या आठपासून वीसपर्यंत सुद्धा आढळते. शिवाय येथील ग्रंथींची वाढ दुय्यम नसल्यामुळे प्राथमिक वाढ चांगली होते. तसेच पूर्ण ग्रंथामध्ये संयुक्त पदर न राहिल्यामुळे ग्रंथीची वाढ कायम व पूर्ण होते. द्विदल वनस्पतीमध्ये संवर्धक पदर ग्रंथीत असल्यामुळे वाढ पूर्ण अशी कधी होत नाही. कारण संवर्धक पदरापासून नवीन पेशी उत्पन्न होतात, म्हणून द्विदल वनस्पतीमध्ये मुळांची रुंदी ही थोडथोडी अधिक वाढते. पण एकदलामध्ये मुळे अधिक रुंद न होतां त्यांस तंतुमय ( Fibrous ) आकार येतो. एकदलामध्ये मुळ्यांत भेंडाच्या पेशी जाड कातडीच्या असून त्या अधिक कठीण व चिंवट होतात.

 एकदल वनस्पतीची मुळे तपासण्याकरितां मक्याची तंतुमय मुळे मका पेरून तयार करावीत. ती सूक्ष्मदर्शक यंत्रांत पाहिली असतां वरील प्रकारची व्यवस्था त्यांत दिसेल.

 जुन्या मुळांत खोडाप्रमाणे कवच ( Bark ) वाढते. परिवर्तुळाजवळ संवर्धक शक्ति उत्पन्न होऊन बाहेरील अंगास कॉर्क पदर व आंतील अंगास दुसरे पदर उत्पन्न होतात. कॉर्क पदराचे बाह्यांगाचा अंतरसंबंध तुटल्यामुळे तो भाग वाळू लागतो. संवर्धक शक्ति कांहीं काल नाहीशी होऊन पुनः कांहीं दिवसांनी ती आंतील पदरांत उत्पन्न होते. त्यामुळे पूर्वीसारखे पदर पुनः उत्पन्न होतात, होता होता हे पदर ग्रंथींमधील तंतुकाष्ठापर्यंत मुद्धां पोहोंचतात.

७८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
असल्या संवर्धक पदराचे बाह्यांगाकडील मृत पदरास ( Bark) असे म्हणतात. येथील कवचाची घटकजालें खोडावरील कवचाच्या घटकजालासारखीच असतात. जागजागी कवचावर भेगा अगर चिरा पडतात. कांहीं वनस्पतींत हे कवच वर्षास झडून नवीन कवच त्या जागी तयार होते.

 खोड—सूर्यकमळाचे बी पेरून त्याचे खोड सुक्ष्मदर्शक यंत्रांत पाहण्याकरिता तयार करावे. वस्त्र्याने शक्य असेल तितका पातळ आडवा छेद कापून कांच पट्टीवर तो भाग ठेवण्याचे पूर्वी पाण्याचा अगर ग्लिसरीनचा थेंब सोडावा व त्यावर तो भाग ठेवून कांच झांकणी (Cover slip ) हवा आंत न राहील अशा बेताने हळु सोडावी व यंत्रांतून पाहण्यास सुरवात करावी.*

 यंत्रामध्ये आपणास काय काय दिसते ते पाहूं:--

 १ प्रथम उपरीत्त्वचा अगर बाह्यत्वचा ( Epidermis) असून त्यावर तांतेसारखा पातळ पडदा कधी कधी आढळतो. हा पडदा संरक्षक असतो. बाह्यत्वचेपासून जागजागी केंस उगम पावलेले दृष्टीस पडतात. ते केंस केवळ एकपेशीमय नसून बहुपेशीमय सुद्धा असतात.

 २ दुसरा भाग म्हणजे साल ( Cortex) होय. बाह्यत्वचेला लागून वाटोळ्या पेशीचे चार अगर पांच पदर आढळतात. ह्यांत हरितवर्ण शरीरें ( Chlorophyll bodies ) असून जागजागी पेशीमध्यें पोकळ्या (Intercellular spaces ) असतात. शेवटी अंतरत्वचा ( Endodermis ) पदर असतो. कोवळ्या खोडांत अंतरत्वचा चांगली ओळखता येते. कारण त्यावेळी त्यामध्ये सत्त्वाचे कण असतात. जुन्या खोडांत ही त्वचा ओळखितां येत नाहीं.

 ३ नंतर स्तंभ (Stele ) सुरू होतो. स्तंभांतील मुख्य भाग म्हणजे वाहिनीमय ग्रंथी (Vascular bundle ) व त्यांचे सभोंवतीं असणारे

-----
 * ( हवेचे बुडबुडे आंत राहिले असतां मुख्य भागाकडील लक्ष्य कमी होऊन मन गोंधळण्याचा संभव असतो. अगोदर सूर्यकमळाच्या खोडाचे तुकडे करून ते स्पिरिट अगर अलकोहलमध्ये ठेवून देतात. त्यायोगाने ते तुकडे कठीण होऊन कापताना वस्त्र्याखाली लवत नाहींत व त्याचे पातळ भाग चांगले घेता येतात.) 
९ वे ].     अंतररचना.( Tissue).     ७९
-----
संयुक्त पदर होत. पैकी परिवर्तुळ ( Pericycle ) ग्रंथ्यतराल पदर (Medullary rays ) तसेच भेंड ( Pith ) हीं जालें सालीसारखीच असतात. परिवर्तुळाचे कठीण तंतु बनून त्याचे पुंजके ग्रंथीच्या शेंड्याकडे दिसतात, ह्या तंतूच्या पेशी दीर्घ व जाडकातडीच्या असतात.

 दोन ग्रंथींमध्ये समपरिमाण पेशीचा भाग असतो. त्यास अंतरालपदर ( Medullary rays ) म्हणतात. हे पदर, भेंड व अंतरत्वचा ( Endodermis ) जोडणारे मध्य सांधे आहेत.

 ग्रंथाची रचना वर्तुळाकृती असते. सूर्यकमळ द्विदल वर्गापैकी असल्यामुळे खोडांतील ग्रंथीची मांडणी व्यवस्थित असते. काष्ठ, तंतुकाष्ठ व संवर्धक पदर, हे तिन्ही प्रत्येक ग्रंथीमध्ये असतात. अंतराल पदरामध्ये ( Medullaiy Rays ) कांहीं पेशी संवर्धक होऊन बाजूस असणाऱ्या ग्रंथींमधील संवर्धक पदराशीं त्या भिडल्यामुळे, खोडांत संवर्धक पदराचे पूर्ण वर्तुळ बनते. अंतराल संवर्धक पदरामुळे ( Inter fascicular Cambium ) अंतराल पदर वाढत जातात. जशी जशी खोडाची रुंदी दरवर्षी अधिक वाढते, त्याबरोबर नवीन अंतराल पदर ह्या नवीन अंतराल संवर्धक पदरापासून उत्पन्न होतात, ह्या संवर्धक पदरापासून निराळ्या ग्रंथीसुद्धा उत्पन्न होतात. ह्या ग्रंथी ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्यांत प्रथमकाष्ठ (Protoxylem ) पदर असत नाहीत. शिवाय असल्या ग्रंथींचा संबंध पानांशी येत नाही. प्राथमिक ग्रंथींचा संबंध नेहमी पानाशी असतो. नवीन ग्रंथी उत्पन्न होतातच असे नाहीं, जर ह्यापासून नवीन ग्रंथी तयार झाल्या नाहीत, तर पूर्वीच्या प्राथमिक ग्रंथी अधिक रुंद व मोठ्या होतात. सारांश ग्रंथींमध्ये संवर्धक पदर व अंतराल संवर्धक पदर, ह्यांत वाढीसंबंधाने फारसा भेद आढळत नाही. दोन्ही पदर आपली संवर्धन कामें सारखीच करितात.

 कोवळ्या स्थितीपेक्षां पूर्णावस्थेस पोंचलेल्या खोडांत फारसा फरक होत नसतो. पूर्वीपेक्षा पदर अधिक होऊन त्यांतील प्रत्येक पेशी पूर्ण वाढलेली असते. बाह्यत्वचेमध्ये जागजागी त्वचारंध्रे ( Stomata ) असून त्यांच्या द्वाररक्षक पेशीद्वयामध्ये हरितवर्ण शरीरे आढळतात. शिवाय खोड हिरवळ असल्यामुळे बाह्य त्वचेत सुद्धां कधी कधी हरितवर्ण असतो. साल पहिल्यासारखीच असून

८०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
परिवर्तुळाच्या पेशी मात्र अधिक जाड होऊन त्यापासून चिवट तंतू बनतात. अशावेळी तंतूंचे पुंजके निळसर रंगाचे असून स्पष्ट दिसतात. ग्रंथीतील वाहिन्या मोठ्या होतात. भेंडींतील पेशी पहिल्याप्रमाणे रसाळ असत नाहींत. त्यांत जीवन कण फारसे आढळत नाहींत. हवा शिरून भेंड पूर्वीपेक्षां हलकें व पांढरे होते.

 खोडाचा उभा छेद सूक्ष्मदर्शक यंत्रांत पूर्वीप्रमाणे पाहिला असतां ही सर्व जालें लंब व दीर्घ स्थितीत असलेली आढळतील. परिवर्तुळाच्या जाड व परस्पर गुंतलेल्या तंतुमय शाखा स्पष्ट पाहण्यांत येतात. काष्ठांतील वाहिन्या (Vessels ) व तंतुपदर तसेच तंतुकाष्ठांतील चाळणीदार पट्टे वगैरे पाहावयास सांपडतात. आडवे व उभे भाग जेव्हां पांच सहावेळां सूक्ष्मदर्शक यंत्रांत पाहिले जातील, त्यावेळेस खोडाची खरी खरी अंतररचना माहीत होते.

 कवचाची उत्पत्ति तिची कमी अधिक जाडी अथवा तिचे निरनिराळे घटक पदर वगैरे पूर्वी वर्णिले आहेत. एखादें जुने लाकूड करवतीने आडवें कपिलें असतां आंत लाकडावर निरनिराळी वर्तुळे असलेली दृष्टीस पडतात. ही वर्तुळे कशी उत्पन्न झाली, हा साहजिक प्रश्न उद्भवतो. लाकूड जितके जुने व अधिक रुंद असते, त्या मानाने अधिक वर्तुळे असतात. नूतन व कच्च्या लाकडांत हीं वर्तुळे कमी असतात. वर्तुळांचा संबंध लाकडाचा जुनेपणा अथवा नवीनपणा ह्यावर पुष्कळ अवलंबून असतो. वर्षभर झाडांच्या अंतरक्रिया सारख्या चालतात असें नाहीं. कांही ऋतंत संवर्धन काम जोराने चालते व कांहीं ऋतूंत ते काम मंद व शिथिल असते. हिवाळ्यांत विशेषेकरून संवर्धन काम फार मंद चालते, संवर्धक पदराची शक्ति उन्हाळ्यात जोराची असून पुष्कळ काष्ठपदर उत्पन्न होतात. पण हिवाळ्यांत ती शक्ति मंद होऊन काष्ठपदर नवीन तयार होत नाहीत. शिथिलता संपून, जेव्हां वसंतऋतु सुरू होतो, तेव्हां पूर्वीसारखी वाढ होते. त्या वेळेस पूर्वीची शिथिलता व नवीन वाढ दर्शविणारी वर्तुलें पडतात. ह्यावरून वर्तुले म्हणजे शिथिलतेनंतर संवर्धनशक्ति जोरात सुरू झालेली द्योतक चिन्हे आहेत. तसेच साधारणपणे वर्षातून एकदा ती शक्ति शिथिल पडते, म्हणून त्या वर्तुलावरून झाडास अमुक वर्षे झाली असे ठरविता येईल. ज्याप्रमाणे जनावरांची वयें त्यांच्या दातांवरून सांगता येतात, त्याचप्रमाणे झाढांची वये लाकडांतील वर्तुलावरून अनुमानाने ठरविता येतात.
९ वे ].     अंतररचना.( Tissue).     ८१
-----
एखादे वेळेस एका वर्षांत दोन वर्तुळे पडतात. कारण, त्या वर्षांत दोन ऋतूंमध्ये संवर्धक शक्ति मंद होऊन पुनः जोराने सुरू होते. कच्च्या लाकडांपेक्षा जुन्या लाकडाचा रंगही वयाधिक मानाने पालटत जातो. ही वर्तुळे हिरवल झाडापेक्षा मोठमोठ्या वृक्षांत चांगली स्पष्ट असतात. ह्याचे कारण मोठे वृक्ष पुष्कळ वर्षे टिकून त्यांत वर्षाचे वर्षास नवीन नवीन वर्तुळे तयार होतात, त्यामुळे जुनी वर्तुळे जवळ जवळ आंत खेचिली जाऊन बाहेरील अंगास स्पष्ट व मोठी वर्तुळे आढळतात. हिरवळ खोड नाजूक असून बहतेक वर्षभरच टिकण्याजोगें असतें, सूर्यकमलांत असली वर्तुळे असत नाहींत; कारण त्याचे खोड वार्षिक असते.

 एकदलधान्य वनस्पतीची रचना पाहण्याकरितां मक्याचे खोड पसंत करावें. ताजे खोड अथवा स्पिरिटमध्ये ठेविलेले तुकडे ही दोन्ही सारखी उपयोगी पड़तात. साधारणपणे मध्यम आकाराचे खोड कापण्यास घ्यावे, म्हणजे त्यामध्ये वाहिनीमयग्रंथी स्पष्ट पाहण्यास मिळतात. १ उपरित्वचा प्रथम आढळते. पेशी कांहीशा वांकड्या तिकड्या असून जाड कातडीच्या असतात. उपरीत्वचेमध्ये त्वचारंध्रे पुष्कळ वेळां दृष्टीस पडतात.

 २ उपरीत्वचा अथवा बाह्यत्वचा झाल्यावर साल ( Cortex) दिसते. सालीत पदर दोन तीन असून पेशी पिंगट रंगाच्या व जाड कातडीच्या आढळतात. अंतरत्वचा (Endodermis) परिवर्तुळ वगैरे स्पष्ट दिसत नाहींत मृद्सम परिमाण पेशीजालें ( Parenchymatous ground tissue ) पुष्कळ असून सर्व खोडाचा मध्य भाग त्यांनीच भरलेला असतो, वाहिनीमय ग्रंथी पुष्कळ असून त्या समपरिमाणी पेशी जालांत जणू बुडालेल्या असतात. समपरिमाण पेशी सतेज असुन जीवनकणांनी पूर्ण भरलेल्या असतात. बाहेरील बाजूकडील पेशीत हरितवर्ण शरीरे अधिक असतात. पेशीमध्ये पोकळ्या जागजागी पुष्कळ दृष्टीस पडतात.

 कोंवळ्या स्थितीत ग्रंथी वर्तुलाकृतींत रचिल्या असून, पुढे ही स्थिति कायम राहत नाही. कारण ग्रंथीची रचना अव्यवस्थित होऊन त्या चोहोकडे त्याच स्थितीत पसरलेल्या आढळतात. बाह्यांगाकडील ग्रंथी लहान असून मध्यम अंगाकडील ग्रंथी पूर्ण वाढलेल्या व मोठ्या असतात. मध्यभागापेक्षां बाह्यांगाकडे

८२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
जास्त ग्रंथींचा भरणा असतो. प्रत्येक ग्रंथीसभोंवतीं जाड कातडीच्या पेशीचे म्यान असते. जाड कातडीच्या पेशीचा रंग पिवळट किंवा तांबुस असतो. ग्रंथींमध्ये काष्ठ ( Xylem ) व तंतुकाष्ठ (Phloem) असून संवर्धक पदराचा अभाव असतो. काष्ठवाहिन्या चार असून पैकी फिरकीदार एक व वळेदार एक अशा दोन वाहिन्या प्रथमकाष्ठांत (Protoxylem) असून दुसऱ्या दोन खाचेदार बाह्यांगाकडे असतात. वाहिन्या सोडून काष्ठाची मध्य जागा बहुतेक काष्ठतंतून भरलेली असते. काष्ठाचा आकार इंग्रजी V अक्षरासारखा असून निमूळते टोंक मध्यभागाकडे असते. वरील रुंद व्हीच्या पोकळीत तंतुकाष्ठ चाळणीदार वाहिन्या व प्रथमतंतुकाष्ठ (Protophloem ) असतात. जसा आडवा भाग कापून वरील सर्व पदर दिसतात, तद्वतच उभा सरळ भाग कापिला असतां ते सर्व दीर्घ स्थितीत अढळतात. बाकी इतर फरक नसतो. ग्रंथामध्ये संवर्धक प्रदर अथवा अंतरालसंवर्धक पदर आढळत नसून त्यामुळे खोडाची रुंदी वाढत नाहीं; परंतु नारळ, ताड वगैरे झाडे एकदलधान्यवर्गापैकी असून त्यांचा बुंधा बराच मोठा व रुंद असतो. अथवा मक्याचे खोडसुद्धा कोवळ्या स्थितीपेक्षा जुन्या स्थितीत आपल्या मानाने रुंद व मोठे होत असते. जर असल्या खोडांची द्वितीय वाढ (Secondary Growth ) संवर्धक पदराच्या अभावामुळे होत नसते, तर ही रुंदी व जाडी कोठून आली असा साहजिक प्रश्न उत्पन्न होतो. स्ट्रॉसबरगर साहेबाचे असे म्हणणे आहे की, पूर्वी असलेल्या सालीतील पेशी अधिक ताणल्या जाऊन मोठ्या फुगतात, त्यामुळे खोडासही द्वितीय वाढ आली आहे असे वाटते. शिवाय अशाकडील वाढ प्राथमिक स्थितीत अति जोराची असून पुष्कळ पेशी उत्पन्न होतात. ह्या पेशींमुळे नवीन कांडी व अंतरकांड जास्त रुंदीची होतात. तसेच खोडास उलट्या शंकूसारखा आकार येतो. पण पुढे लवकरच सारखी वाढ होऊन उभा सरळ सोट बनतो.  घायपात, दर्शना वगैरेमध्ये खोडाची रुंदी दरवर्षी थोडी अधिक वाढते. ही रुंदी ग्रंथीच्या संवर्धक पदरामुळे नसून स्तंभाच्या बाह्यांगांत म्हणजे परिवर्तुळामध्ये कांहीं पदर संवर्धक होऊन नवीन ग्रंथी उत्पन्न होतात, व त्यामुले खोड थोडे अधिक वाढत जाते. दर्शनाच्या ग्रंथींमध्ये मध्यभागी तंतूकाष्ठ असून सभोंवती काष्ठाचे वेष्टण असते.

९ वे ].     अंतररचना.( Tissue).     ८३
-----
गवत, बांबू वगैरे तृण जातींत, ग्रंथी मध्यभागी नसून बाहेरील अंगास वाढतात. मध्यभागांतील पेशी पुढे नाहीशा झाल्यामुळे खोडांत मध्यपोकळी उत्पन्न होते.

 येथे एक गोष्ट सांगणे जरूर आहे की, एकदल धान्य वनस्पतीच्या खोडांत खरें कवच (True bark ) नसून सालीच्या पेशी जाड कातडीच्या बनून त्याच कवचाचे काम देतात. दरवर्षी साल झडून नवी कधी येत नाहीं, खोडामध्ये वय दर्शविणारी वर्तुळे ( Annual rings) अथवा अंतराल पदरही आढळत नाही.

 फर्नचा खोड याचप्रमाणे सूक्ष्मदर्शकयंत्रांत पाहिला असता त्यांत एकापेक्षा अधिक स्तंभ (Steles ) आढळतात. उपरित्वचा येथे असते खरी पण तिचे महत्त्व फारसे नसते; कारण संरक्षण करण्याचे काम आंतील जाड कातडीच्या पेशीचे वर्तुळ करीत असते. हे वर्तुळ दोन जागी अपुरे असते. ह्या दोन अपुऱ्या जागेचा त्वचारंध्रासारखा उपयोग होतो असे म्हणता येईल. त्यामुळेच अंतरवायूचा बाह्य हवेशी संबंध राहतो. साधारणपणे खोडांत तीन मुख्य जालें आढळतात. जागजागी काळ्या रंगाचे पट्टे असून लंब दिशेत जाड कातडीची पेशी जालें असतात. पिवळट रंगाच्या वाटेच्या ग्रंथी अव्यवस्थित असून इतर भाग मृदु समपारमाण पेशींनी भरलेला असतो. जाड कातडीच्या पेशींत लांकडी तत्व असल्यामुळे त्या टणक लाकडाप्रमाणे कठीण होतात. समपरिणाम जालांत मध्यपोकळ्या असून ह्या पेशींमध्ये सात्विक कण सांठविले असतात. ग्रंथासभेवती अंतर्त्वचेचा एक एक पदर असून अंतरत्वचेमध्यें सात्विक कण वगैरे असत नाहीत. परिवर्तुळांत सत्त्वाचे कण आढळतात. ग्रंथीचे मध्य भागी काष्ठ असून दोन्ही बाजूस तंतूकाष्ठ असते. संवर्धक पदर ग्रंथीमध्ये असत नाहींत. पूर्वीप्रमाणे काष्ठामध्ये अथवा तंतूकाष्ठांमध्ये निरनिराळ्या वाहिन्या असतात. एकंदरीत हे खोड एकदल अथवा द्विदल वर्गापेक्षा वेगळे असून ह्यांत अधिक स्तंभ असल्यामुळे असल्या खोडास बहुस्तंभी ( Poly steler ) म्हणतात. पूर्वीची खोडें एकस्तंभ असून त्यांत सर्व काष्ठादि पदरांचा समावेश होतो.

 पाने:--पानाच्या अंतररचना मुख्य तीन असून व्यक्तिमात्र पानाच्या आकार मानाप्रमाणे ह्या तीन रचनेपैकी, कोणताना कोणती रचना प्रत्येकांत
८४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
आढळते. पाने देंठयुक्त अथवा देठरहित असतात. देठाची अंतररचना साधारणपणे कोवळ्या खोडाप्रमाणे असते. देठ पूर्ण वाटोळा नसल्यामुळे त्यांची रचना अर्थचंद्राकृति दिसते. त्याचे दोन्ही पृष्ठभाग निराळ्या रचनेचे दिसतात. काष्ठ पदर वरील पृष्ठभागाकडे वळलेले असतात. खोडामध्ये काष्ठ मध्यभागाकडे असते. हा फरक देंठ व खोड ह्यांत चांगला दिसतो. ग्रंथींची संख्या दोन अथवा तीन असून, ग्रंथीमध्ये संवर्धक पदर फार वेळ नवीन पेशी उत्पन्न करण्याचे काम करीत नाही. अंतराल संवर्धक पदर ( Inter fascicular Cambium ) तसेच साधारण अंतरत्वचा ( Endodermis ) ह्यांचा अभाव असतो. बाह्य त्वचेत कधी कधी त्वचारंध्रे असून त्यांचा संबंध आंतील वायुयुक्त पोकळ्यां ( Air chamber ) शी असतो. पानांप्रमाणे देठामध्येही हरितवर्ण पदार्थ (Chlorophyll) असतो.

 पानाचा आडवा छेद घेणे फार कठीण असते. कारण वस्त्र्याच्या पात्याखाली कापण्याचे वेळी तो भाग लवत जातो, म्हणून बटाटा उभा चिरून त्या चिरेंत पानाचा तुकडा ठेवून द्यावा. वस्त्र्याने बटाट्याच्या भागासकट चिरेत असलेले पान कापावे म्हणजे पानाचा पातळ भाग कापला जाईल अथवा धाटाचे भेंड उभे चिरून त्या चिरेंत पानाचा तुकडा ठेवून द्यावा, म्हणजे वरील पानाचा पातळ भाग कापला जाईल. भेंड पात्याखालीं न लावतां कापण्यासही मऊ असते. अशा रीतीने कापून तयार केलेला पातळ भाग सुक्ष्मदर्शक यंत्रांत पाहण्यास सुरुवात करावी. मात्र त्यांत मध्यशिरेचा आडवा भागही यावा. कापण्यास आपण प्रथम सूर्यकमळाचे पान पसंत करू.

 १. मध्यशिरेत एक वाहिनीमय ग्रंथी मोठी असून शिरेचा साधारण आकार अर्धचंद्राकृति असतो. खोलगट भाग हा वरील पृष्ठभाग असून बाहेर फुगलेला भाग अधःपृष्ठभाग असतो. दोन्ही पृष्ठभागांवर बाह्य त्वचेचा एक पेशीमय पदर असून त्यापासून जागजागी केस आलेले दृष्टीस पडतात. ग्रंथीमधील काष्ठावरील पृष्ठभागाकडे व तंतुकाष्ठ अधःपृष्ठभागाकडे आढळते. बाह्यत्वचेनंतर आढळणाऱ्या समपरिमाण पेशीमालिकेंत हरितवर्ण शरीरे असतात, व त्यामुळे त्यांस हिरवा रंग आलेला असतो.

 १. मध्ये शीर पाहिल्यानंतर बाजूकडील भाग पहावेत. मध्यशिरेच्या बाह्य त्वचेचे पदर दोन्ही बाजूस तसेच वाढलेले आढळतात. त्वचारंध्रे अधःपृष्ठ-

९ वे ].     अंतररचना.( Tissue).     ८५
-----
भागावर पुष्कळ असतात. वरील पृष्ठभागावर अध:पृष्ठमागाचे मानाने त्वचारंध्र मुळीच असत नाहीत असे म्हटले असतां चालेल. द्वाररक्षक पेशीमध्ये हरित वर्ण शरीरे असून जवळच्या पेशींत सात्विक कण आढळतात. बाह्यत्वचेच्या इतर पेशींमध्ये कधीही सात्विककण सांपडत नाहीत. बाह्यत्वचेमध्ये पिंडमय केस ( Glandular hairs ) ही असतात.

 २. बाह्यत्वचेनंतर वरील पृष्ठभागांत लोखंडी गजासारख्या लांबट पेशींची मालिका ( Palisade parenchyma ) हिरवीगार असते. ह्या मालिकेत पुष्कळ हरितवर्ण शरीरे असल्यामुळे पानांस हिरवागार रंग येतो. कधी कधी एका रांगेवर दुसरी रांग येते. मधून मधून अरुंद पेशींमध्ये पोकळ्या (Inter cellular spaces ) आढळतात.

 ३. खालील भागी लोखंडी गजासारख्या लंबपेशी न आढळतां स्पंजाप्रमाणे अव्यवस्थित जाळीदार पेशीमालिका वरील मालिकेशी जुडलेल्या असतात. गजासारख्या लंबपेशीमालिका तसेच स्पंजासारख्या जाळीदार पेशी मिळून बहुतेक पानांचा मध्यभाग भरलेला असतो. मधून मधून ग्रंथी अथवा ग्रंथीच्या फिरकीदार अथवा वळेदार वाहिन्या दृष्टीस पडतात. पानांच्या शिरा कठीण काष्ठाच्या बनल्या असतात. अव्यवस्थित स्पंजासारख्या पेशींमध्ये पोकळ्या मोठमोठ्या असतात. शिवाय त्वचारंध्रे अधःपृष्ठभागांवर अधिक असल्यामुळे त्यांचा असल्या पोकळ्यांशीं विशेष संबंध येतो. कधी कधी निरिंद्रीय द्रव्यें निरनिराळ्या स्फटिकमय आकृतीत रचलेली पानांमध्ये आढळतात. ह्या पानांत विशेष महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही बाजू निरनिराळ्या अंतररचनेच्या असतात. वरील पृष्ठभाग व अंधःपृष्ठभाग ह्यांत रचनेसंबंघी नेहमी फरक असतो. वरील पृष्ठभाग अधिक हिरवा असून अधिक सफाईदार असतो, पण अधोभाग शिरांमुळे जास्त गडबडीत झाला असून त्यांत वरीलप्रमाणे हिरवा रंग नसतो. उन्हामध्ये असले पान समोर धरिलें असतां अधोभागांत फिक्का रंग असतो, ह्याची साक्ष सहज पटेल. खोड किंवा मुळे ह्यांमध्ये दोन्ही बाजू सारख्या रचनेच्या असून मुख्य तत्त्वांत फरक नसतो. पानांचा रचना वरील दोन्हींपेक्षा वेगळी असून, पाठ व पोट परस्पर भिन्न असतात. पानांस ज्या प्रकारचे काम करावे लागते, त्यास योग्य असाच आकार येतो. तसेच पाट व पोट भिन्न असल्यामुळे पानांस आपले काम फार सोईने करितां येते, ह्याविषयी पुढे सांग-

८६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
ण्यांत येईलच. पाठ व पोट भिन्नरचनेची असलेली पाने, नेहमी द्विदल तसेच एकदलधान्यवनस्पतींत आढळतात.

 युकॅलिप्टसचे पान वरीलप्रमाणे सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये पाहिले असत बाह्यत्वचारंध्रे गजासारख्या लंबपेशीमालिका ही सर्व दोन्ही बाजूस सारखीच दिसतात, मध्यभागी अव्यवस्थित स्पंजासारख्या जाळीदार पेशी व पेशीमध्ये पोकळ्या आढळतात. बाह्य त्वचेखाली जागजागी तैलोत्पादक पिंड ( Oil glands ) अथवा तैलबिंदूही दृष्टीस पडतात, एखादी दुसरी ग्रंथी स्पष्ट अथवा अस्पष्ट दिसते. ग्रंथीपासून शिरारज्जु ( Vein strands ) पानांत पसरल्यामुळे पानास जरूर लागणारी बळकटी मिळून पानाचा सापळा मजबूत होतो. तसेंच द्रव पदार्थ अथवा पाणी इकडून तिकडे नेआण करण्याचे काम शिरारज्जूच करितात. सूर्यकमळाचे पानांत तसेंच युकेंलिप्टसचे पानांत अंतररचनेसंबंधी पुष्कळ फरक असतो. येथे पाठ व पोट परस्पर भिन्न नसून दोन्ही बाजू सारख्याच असतात. झाडावर ही पाने असतांना त्यांच्या दोन्ही बाजू सूर्यप्रकाशाकडे वळलेल्या असतात. नेहमी साधारणपणे पानाची एक बाजू सूर्यप्रकाशाकडे वळते व दुसरी पहिल्या बाजूखाली झांकली असते, अशा प्रकारची पाने बहुधा फारशी नसतात.

 रसाळ व मांसल पानांत पेशीजालें परस्पर भिन्न असत नाहींत. जसे पानफुटी, तरवार, क्रॅॅसुला, स्मायलॅक्स, वगैरे. तरवारीचे पान आडवें कापून सूक्ष्मदर्शक यंत्रांत पाहिले असतां पूर्वीप्रमाणे प्रथम बाह्यत्वचा व त्वचारंध्रे दिसतात. लोखंडी गजासारख्या अथवा स्पंजाप्रमाणे जाळीदार पेशी नसून, त्या वाटोळ्या व सारख्या थरावर थर असलेल्या दृष्टीस पडतील. हरितवर्ण शरीरे ह्या समाकारी ( Homogeneous ) पेशीमालिकेंत असतात. मध्यभागाकडे मोत्यांचे सराप्रमाणे इकडून तिकडे जाणाऱ्या समपरिमाण पेशीरचना पाहण्यास फारच मनोहर असतात. पेशीमध्ये पोकळ्या पुष्कळ असून, वरील मौक्तिकसरांनी गुंफलेल्या आढळतात. नेहमीप्रमाणे ग्रंथी, तसेच शिरारज्जु मधून मधून दृष्टीस पडतात. येथे एक गोष्ट लक्ष्यांत ठेवण्यासारखी आहे की, पानांतीलं ग्रंथीमध्ये केवळ काष्ठ व तंतुकाष्ठ असते. त्यांत संवर्धकपदर असत नाही; पण सुरूंच्या कांहीं जातीत पाने वरील प्रकारची असून, त्यांत अंतर त्वचा ( Endoderms ) दोनतीन पदरी
१० वे ].     कर्तव्ये.     ८७
-----
परिवर्तुळ वगैरे स्पष्ट असतात, तसेच ग्रंथीमध्ये काष्ठ व तंतुकाष्ठ पदरामध्ये संवर्धक पदर ( Combium ) असतो.

 उपपुष्पपत्रांची रचना ( Bracts ) बहुतेक साध्या पानासारखी असते, पुष्पावरणे, हरित किंवा पीतदले हीसुद्धा एकप्रकारची पाने होत. त्यांची रचनाही मूलतत्त्वांत पानाप्रमाणे असते; ते भाग नाजूक असल्यामुळे कांहीं बाबतींत फरक पडत जाणारच. शिवाय त्यांचे काम वेगळे असल्यामुळे निरनिराळी रंजित शरीरे त्यांच्या समपरिमाण पेशींत आढळतात.

---------------