वनस्पतिविचार/शोषणाच्या अन्य रीति व श्वासोच्छ्वास क्रिया

विकिस्रोत कडून
१४ वे ].    शोषणाच्या अन्य रीति व श्वासोच्छ्वास क्रिया.    ११५
-----

प्रकरण १४ वें.
---------------
शोषणाच्या अन्य रीति व श्वासोच्छ्वास क्रिया.
---------------

 मागील प्रकरणी सांगिल्याप्रमाणे वनस्पति मुळांतून निरिंद्रिय द्रव्ये शोषण करून पुढे पानांत त्यापासून सेंद्रिय पदार्थ तयार करते. त्याचप्रमाणे नायट्रोजनयुक्त सेंद्रिय पदार्थ वनस्पतिशरीरांत तयार होतात. जरूर लागणारे नायट्रिक आम्ल अथवा गंधकी आम्ल झारापासून वनस्पतिशरीरांत बनते. हे क्षार सुद्धा मुळांतून शोषिले जातात.

 पुष्कळ वेळां कार्बन् वायु वनस्पतिखाद्यांपैकी मुख्य आहे असे वाटण्याचा संभव आहे. पण नुसता कार्बन् वायु वनस्पतीस उपयोगी पडत नाहीं. जेव्हां वनस्पतीचे बीजस्थितीपासून जनन होत असते, अशा वेळेस बीजाभोंवती कार्बन् वायूचे जणू वेष्टण झाले असते, पण ह्या कार्बन् वायूचा किंचित् ही उपयोग बीजास नसतो. त्या वेळचे बीजाचे खाद्य म्हणजे बीजामध्ये सांठविलेलें सेंद्रिय पदार्थ असतात, तेच होय. जर ह्या सांठविलेल्या पदार्थाचा बीजास उपयोग करू दिला नाही, तर मोड उपाशी मरून जाईल. ज्या वनस्पतीमध्ये हरितवर्ण नसतो, त्या वनस्पतीस कार्बन् वायूचा उपयोग नसतो. तसेच हिरव्या वनस्पतीस कार्बन् वायु प्रकाश नसतांना मिळत असला, तर त्या कार्बन वायूचा फायदा वनस्पतीस न होता उलट नुकसान होण्याचा संभव असतो. म्हणून जे पदार्थ अथवा जे वायू वनस्पति सजीवतत्त्वास मोकळ्या स्थितीत मिळाले असतां त्यापासून पोषण कार्य घडते, त्यासच वनस्पतीचे खाद्य म्हटले असतां चालेल. शिवाय हिरवट वनस्पति आपलें अन्न शोषून घेतात, असे म्हणता येणार नाही. तर अन्ने तयार करण्यास जी द्रव्ये लागतात, ती द्रव्ये वनस्पति शोषून घेतात. ह्या शोषित द्रव्यावर वनस्पति-शरीरांत विशिष्ट कार्य घडून वनस्पतीचे खरे अन्न तयार होते, ज्या वनस्पतींत हरितवर्ण कण नसतात, त्या वनस्पतीस आपले अन्न तयार-स्थितींत बाह्यवस्तूंत शोषणे जरूर असते. आता पुष्कळ वनस्पति

११६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
अन्य प्रकारे अन्न-द्रव्ये शोषण करितात. वरील नियम साधारण वनस्पतीचा असतो. असल्या वनस्पति दोन्हीं उच्च तसेंच क्षुद्र वर्गामध्येही आढळतात. आळंब्याचा वर्ग सेंद्रिय पदार्थ तयार करू शकत नाही. त्या वनस्पतींत हरितवर्ण नसतो. अशांना तयार सात्विक सेंद्रिय पदार्थ मिळाले पाहिजेत, म्हणजे त्यांची वाढ होते. म्हणून आळंब्या सेंद्रिय पदार्थावर वाढलेल्या आढळतात; त्या पदार्थांमधून सेंद्रिय पदार्थ खाऊन आपलें पोषण करतात. भूछत्रे ( Mushrooms ) नेहमी मृत सेंद्रिय पदार्थांवर उगवतात, त्यांस ते पदार्थ तयार करता येत नाहीत, म्हणून घाणेरडे सेंद्रिय पदार्थ भक्षण करून आपली उपजीविका करितात. उच्च वर्गामध्ये सुद्धा ह्या वनस्पति आपली मुळे दुसऱ्या झाडांच्या शरीरांत खुपसवून अन्न शोषण करतात. ह्यापैकी काहींना आपले भक्ष्य स्वतंत्रपणे तयार करता येते. ज्या वेळेस मूळ झाडांची पाने गळून नवीन सेंद्रिय पदार्थ पूर्वीप्रमाणे तयार होत नाहीत, अशा वेळेस बांडगुळे स्वतः सेन्द्रिय पदार्थ तयार करून आपणास व आपल्या यजमानास पुरवितात. बांडगुळाची पाने हिरवी असल्यामुळे त्यास ह्या रीतीनें अन्न तयार करता येते. तेव्हां वृक्षादनी ( Parasites ) सुद्धा आपला नेहमीचा साधा नियम सोडून कधी कधी अन्य रीतीनें अन्न मिळवितात,  ह्याच मालिकेत मांसाहारी वनस्पति येतात. कारण मांसहारी वनस्पति, किडे व कीटक खाऊन उपजीविका करितात. सेंद्रिय पदार्थ शरीरात तयार करण्याचे भानगडीत न पडतां आयत्या तयार मांसान्नावर निर्वाह करणे त्यांस बरे वाटते. किडे अथवा कीटक फसून त्यांचे भक्ष्य व्हावेत, या कारणाकरिता निरनिराळे मधुरस त्यांच्या चमत्कारिक शरीराच्या भागांत सांठविले असतात. एकदा जे किडे मधुरसास लुब्ध होऊन त्यांचे पानांत घुसतात, ते पुनः सुटून बाहेर जाऊ शकत नाहीत. अशा वनस्पतींच्या पानांत निरनिराळी विशिष्ट रचना आढळते. कांहींचा देठ पोकळ असून आंत कांहीं पाचक आम्लें व रस असतात. किडे रस पिऊ लागले म्हणजे त्या आम्लाचे योगाने त्यांचे शरीर भाजून जाते, व हळु हळु ते कुजू लागते. शरीर पूर्ण कुजल्यावर वनस्पति त्याचा उपयोग करून घेतात. कांहीं वनस्पति शरीर कुजेपर्यंत वाट पहात नाहींत. किडे गुरफटून मेल्यावर आंतून पाचक आम्ल निघून त्या किड्यांचे
१४ वे ].    शोषणाच्या अन्य रीति व श्वासोच्छ्वास क्रिया.    ११७
-----
शरीर आपोआप त्या आम्लांत विरघळून जाते. किड्याचे शरीरांत असणारे सेंद्रिय पदार्थ चट् सारे नाहींसे केले जातात.

 प्राणिशरीरांत अन्न भक्षण केल्यावर पोटांमध्ये पाचक आम्लाचा परिणाम होऊन ते अन्न विरघळून जाते व त्यांतील पोषक पदार्थ उपयोगांत आणिले जातात. तद्वतच ह्या वनस्पति पाचक आम्ल त्यावर सोडून किड्यांतील सेंद्रिय पदार्थ उपयोगांत आणितात. कांहीं वनस्पतीचे शरीरावर पिंडमय केंस असतात. एकंदर शरीराचा देखावा मनोहर असतो. किडा किंवा मुंगी आली म्हणजे केसांतून एकप्रकारचा रस उत्पन्न होऊन त्यांस ते अडकवले जातात. जर किड्याने सुटून जाण्याकरितां ज्यास्त धडपड केली, तर इतर केंसास ज्यास्त उत्तेजन मिळून पुष्कळ चिकट रस चोहोबाजूने त्या किड्याभोंवती येऊन त्या रसांत तो किडा पूर्ण गुटमळला जातो, व शेवटी तो मरतो. मग वरीलप्रमाणे त्याचे शरिराचे सेंद्रिय पदार्थ उपयोगांत आणिले जातात.

 ह्या वरील प्रकारापेक्षा आणखी निराळा प्रकार पुष्कळ वेळा पाहण्यांत येतो की, ज्याचे योगाने दोन परस्पर भिन्न वनस्पति एके ठिकाणींं संयोग पावून परस्पर फायदा करून घेतात. दोघांनाही परस्परांची जरूरी असते. एका वनस्पतीस एक कार्य करितां येते; पण ते दुसऱ्यास करितां येत नाही. तसेच दुसऱ्यास जे करितां येते, ते पहिल्यास करितां येत नाही. म्हणून दोघांचा संयोग झाला असता दोन्हीं परस्पर कार्ये करुन 'देवाण घेवाण' या न्यायाने परस्पर उपयोग करतात. क्षुद्र वर्गांपैकी आळंब्या व तसेच शैवाल हरितवर्ण ह्यांचा पुष्कळ वेळां संबंध येतो, व हा संयोग दोघांच्या जीवनक्रमांत महत्त्वाचा असतो. हरितवनस्पतीस हवेतून कार्बवायु शोषून त्यापासून सात्त्विक सेंद्रिय पदार्थ बनविता येतात; पण अशास पाण्याची जरूरी असते. आळंब्या हवेतून पाणी शोषून त्यास पुरवतात. तसेच ज्या पदार्थांवर ही संयोगस्थितीत वाढतात, त्यापासून निरिंद्रिय द्रव्ये शोषून जेव्हां हरितवनस्पतीमध्ये येतात, त्या वेळेस ती वनस्पति हवेतून कार्बवायु शोधून त्यांपासून सात्विक सेंद्रिय पदार्थ बनविते. हे तयार असलेले सात्विक सेंद्रिय पदार्थ आळंबीस उपयोगी पडतात, कारण तिला असले पदार्थ बनविता येत नाहीत. पण हे तयार करण्यास जरूर लागणारे पाणी तसेच निरिंद्रिय द्रव्ये ही हरितवनस्पतीस

११८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
आळंबी पोहोंचविते. एकूण दोन्ही परस्परांस उपयोगी पडून परस्पर जीवनकार्ये साधितात.

 कांहीं उच्चवर्गीय झाडांच्या मुळ्यांचा व आळंब्याचा अशा प्रकारचा परस्पर फायदेशीर संयोग होतो. ओक जातीच्या कांहीं झाडांत मुळे जमिनीत घुसल्यावर त्यावर शोषक केस येत नाहीत, पण अशा वेळेस आळंब्याचे धागे मुळांवर वाढून मुळांची सर्व बाजू व्यापून टाकतात. इतकेच नव्हे तर हें धागे जमिनीत घुसून केंसाप्रमाणे शोषणक्रयेस उपयोगी पडतात. खरोखर मुळांवरील शोषक केंस न आल्यामळे ही झाडे वाळून गेली पाहिजेत; पण होत नाही. कारण केंसाचे काम हे आळंबी धागे करीत असतात, व त्याचे मोबदला त्यास मुळांतून सात्विक सेंद्रिय पदार्थ मिळतात, ह्यामुळे दोघांचे परस्पर काम होतं. ' जगांत कांहीं द्यावे व कांहीं उलट घ्यावे', असा न्याय्य आहे व तदनुसार येथे परस्पर प्रकार घडतो. खरोखर अशा ठिकाणी उच्च वर्गीय वनस्पात क्षुद्वर्गीय वनस्पतीवर पुष्कळ अंशी अवलंबून असते. नेहमीं क्षुद्र वनस्पति उच्चवनस्पतीवर उपजीविका करते; पण वरील ठिकाणी उलट स्थिति असते. ह्याच प्रकारचा संयोग डाळवर्गातील मुळांचा व सूक्ष्म जंतू (बॅक्टिरिया ) चा असतो. बॅक्टिरिया हवेतून नायट्रोजन वायु शोषण करून त्या झाडास पुरवितात व उलट ते त्यांतून सेंद्रिय पदार्थ भक्षण करितात. भुईमूग, वाटाणे, उडीद, मूग वगेरे झाडे मुळासकट उपटून पाहिली असती मुळावर फोडासारख्या वाटोळ्या ग्रंथी आढळतात. ह्या ग्रंथीमध्ये सूक्ष्म बॅक्टिरिया जंतू असतात.

 मागे सांगितलेल्या वृक्षांदनी वनस्पतींत जरी दोन वनस्पतींचा संबंध येत असतो, तथापि दोन्ही परस्पर साहाय्य न करितां, एक दुसऱ्यावर आपला योगक्षेम चालवितात. त्यामुळे दुसऱ्यास फायदा न होतां उलट नुकसान होते. दोन्हीं परस्पर मदत करती तर दोहोंचे नुकसान न होतां उलट फायदा दोहोंसही झाला असता.

 सेंद्रिय पदार्थ तयार झाल्यावर ज्या भागास जरूरी असेल त्या भागात त्यांची पाठवणी करणे हे पुढील काम असते. शिवाय पानामध्ये हे पदार्थ पुष्कळ वेळ राहू दिले, तर नवीन सेंद्रिय पदार्थ बनण्यास अडथळा येईल. तयार झाल्याबरोबर ताबडतोब दुसऱ्या ठिकाणी नेण्याची व्यवस्था झाली पाहिजे.

१४ वे ].    शोषणाच्या अन्य रीति व श्वासोच्छ्वास क्रिया.    ११९
-----
फांद्यांचे, खोडांचे अथवा मुळांचे वाढते कोंब ह्यांस सेंद्रिय द्रव्याची विशेष जरूरी असते. त्याचप्रमाणे कांहीं पेशी जीर्ण होऊन नवीन वाढण्याचा जेथे संभव असतो, त्या ठिकाणी संघट्टनात्मक द्रव्याची आवश्यकता असते. अथवा संरक्षक केंस, पापुद्रे वगैरे जेव्हा वनस्पतीस पाहिजे असतात, तेव्हा त्यांची पूर्तता करण्यास सेंद्रिय पदार्थ त्या जागी पाठवून तजवीज करणे भाग असते, तसेच कीटक, मधमाशा वगैरे प्राण्यांस फसवून त्यांपासून कार्ये करून घेण्याकरितां कांहीं विशिष्ट अवयवांत मधुर रस अथवा त्याप्रकारचे दुसरे रस सांठविणे जरूर असते. ह्या रसाचा उगम सुरू राखण्याकरितां तयार केलेले सेंद्रिय पदार्थ खर्चिले जातात. असल्या विशिष्ट अवयवांकडे सेंद्रिय द्रव्याची बोळवणी करणे अवश्य असते. त्याच रीतीने मांसाहारी वनस्पतींमध्ये व्यक्तिमात्र विशिष्ट रचना व विशिष्ट रस उत्पादनाची जरूरी असल्यामुळे अशा ठिकाणी सेंद्रिय द्रव्ये पाठविल्याशिवाय कसे भागेल ? हवेच्या फरकामुळे सेंद्रिय द्रव्ये तयार करण्याची शक्ति वनस्पतिशरीरांत कमी अधिक होत असते. अशा कारणाकरितां दूरदर्शीपणाने जागजागीं शिल्लक राखून ठेविली पाहिजे. बीजें ही पुढील रोपड़ीं होत. त्यांच्या जननस्थितीस उपयोगी पडावीत म्हणून त्यांमध्ये कांहीं द्रव्ये सांठविणे जरूर आहे. इतक्या सगळ्या गोष्टी संभाळून वनस्पति आपले शरीरसंवर्धन करिते. जागजागी नुकसान व अपघात प्राण्यादिकांपासून वनस्पतीस सोसावे लागतात, ते नुकसान भरून काढण्याकरितां अथवा ते मुळापासूनच न होऊ देण्याकरितां निरनिराळया सोई प्रसंगविशेषीं वनस्पतीस कराव्या लागतात. अशा गोष्टीस सेंद्रिय द्रव्ये लागतात. हा खर्च सांठविलेल्या द्रव्यांतून करावा लागतो. वंशवर्धन करणे व तत्संबंधी अवयवांची जोपासना व वृद्धि करणे, ही सर्व वनस्पतिजीवनक्रमांत मोठी महत्त्वाची असतात. ऋतुकाली रोजच्या रोज तयार झालेल्या असल्या द्रव्यांपैकी बहुतेक भाग ह्यांकडे पाठविला जातो.  सेंद्रिय रसमार्ग–पानाच्या रचनेत वरील व खालील बाजू भिन्न रचनेच्या असतात. वरील बाजू गजासारख्या पेशींची असून खालील बाज स्पंजासारख्या पेशींची असते. दोन्हींचा संबंध मध्यभागाचे सुमारास असतो. अव्यवस्थित पेशींचा एक भाग वरील पेशीशी संबंध पावून, दुसऱ्या भागांचा संबंध पानांतील रज्जूशीं असतो. तयार झालेले सेंद्रिय पदार्थ वरून अव्यव
१२०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
स्थित भागांमध्ये येतात, व तेथूनच पुढे शिरांतून खाली दुसरे जागी पाठविले जातात. याप्रमाणे सारखे चालले असल्यामुळे पानांत सेंद्रिय पदार्थ सांठले जात नाहीत. जर सेंद्रिय पदार्थ लवकर दूर करण्याची व्यवस्था नसती, तर पाने सेंद्रिय पदार्थांनी पूर्ण भरून नवीन सेंद्रिय पदार्थ तयार झाले नसते. तयार झालेल्या सेंद्रिय पदार्थांवर निरनिराळी कार्ये एका पेशींतून दुसरे पेशींत जातांना होत असतात. ह्यामुळे पदार्थ जसे जसे दुर जातील तसे तसे ते जास्त तावून सुलाखले असतात. वनस्पति शरीरांत चार प्रकारची व्यवस्था आढळते व त्याचे योगाने असले सेंद्रिय पदार्थ चोहोकडे पोहोचविले जातात.

 १. पहिली व्यवस्था म्हणजे वाहिनीमय ग्रंथीभोवती असलेले समपेशीपरिमाणी म्यान होय. ही त्याने ( Vascular bundle sheath ) पानामध्ये चांगली वाढली असतात.

 २. ग्रंथीद्वयामधील असणारे ग्रंथ्वंतराल पदर ( Medullary rays ) ह्यांच्या पेशीसुद्धा वरीलप्रमाणे सम परिमाणी असुन भित्तिका टणक व लाकडी असतात.

 ३. मृदुतंतुकाष्ठ Soft bast हे तंतुकाष्ठ प्रत्येक गंथीमध्ये नेहमी असते. येथील वाहिन्या चाळणीदार असून, इतरांप्रमाणे येथेही पेशी समपरिमाणी Parenchymatous असतात.

 ४. दुग्धरसवाहिन्या ( Laticeferous Vessels ) ह्याच्या पेशी पातळ असून त्यांच्या शाखा जागजागी एकमेकांत गुंतलेल्या असतात. विशेषेकरून ह्या वाहिन्या वाहिनीमय ग्रंथीसभोंवती असतात. ह्या सर्वच वनस्पतीमध्ये असत नाहींत.

 वर सांगितलेल्या ह्या चारी रस्त्यांनी सेंद्रिय पदार्थ द्रव स्थितींत ठिकठिकाणी पोहोचविले जातात. एवढेच नव्हे, तर विशिष्ट सेंद्रिय पदार्थ विशिष्ट मार्गाने जातात. जसे ग्रंथ्यंतराल पदरांतून मुख्यत्वेकरून सात्त्विक पदार्थच जात असतात. पानाच्या शिरासभोवतालच्या प्रदेशांतून केवल ग्ल्यूकोसाइड्स (विशिष्ट साखर ) जातात. इतर समपरिमाण पेशींतून साखर जाते. मृदुतंतुकाष्ठसमुच्चयांतून नायट्रोजनयुक्त द्रव्येंं वाहत जातात. ह्या नायट्रोजनयुक्त द्रव्यांचा वनस्पतीच्या वाढीस फार मोठा उपयोग असतो.

१४ वे ].    शोषणाच्या अन्य रीति व श्वासोच्छ्वास क्रिया.    १२१
-----
कित्येक वेळां हुशार माळी मृदु तंतुकाष्ठांवर प्रयोग करून फायदा करून घेतो. एखादेवेळेस झाड चांगले वाढलेले असून त्यास फळे येत नाहीत, अशा वेळेस माळी चाकूने संवर्धक पदरापर्यंत फांदीवरील एक इंचभर जागा कापून टाकतो, त्यामुळे वर जाणारा पाण्याचा प्रवाह पूर्वीप्रमाणे चालून तयार झालेले सेंद्रियपदार्थ खाली येण्याचे थांबतात, वरील फांदी जास्त वाढून त्यावर फुले व फळे येऊ लागतात. असला प्रयोग वरचेवर होऊ दिल्यास फायदा न होतां झाड अजीबात वाळून जाण्याचा संभव असतो. खालील भाग वरून सेंद्रिय पदार्थ न येऊ दिल्यामुळे खालील भाग सुकत जातो. अशा प्रयोगास ‘वळी बांधणे' ( Ringing ) म्हणतात.

 सत्त्व अथवा सत्त्वासारखे दुसरे कण द्रवस्थितीत नेले जातात. प्रत्येक पेशींची भित्तिका सूक्ष्म व छिद्रमय असल्यामुळे त्यांतून सात्विक द्रव हळुहळु वाहत जातो. प्रत्येक पेशींत हा रस गाळिला गेल्यामुळे तो दोषरहित होतो. पुष्कळ वेळां असा प्रश्न उद्भवतो की, असल्या पेशिमालिकेची काय जरूरी आहे ? पेशी-मालिकेऐवजी रसवाहक नळ्या सार्वत्रिक असत्या तर रस ने आण करण्याचे काम जास्त सुलभ झाले असते, दिसण्यांत प्रश्न योग्य वाटतो, पण नैसर्गिक गोष्टी व तजविजी योग्यच असतात. पेशी-मालिकेत भित्तिका असल्यामुळे सात्विक द्रवाचा प्रवाह सारखा व्यवस्थित चालून तो थोडा थोडा प्रत्येक पेशीत खेळत राहतो. तो रस एका जागीच सर्व जमत नाहीं. पेशीच्या नळ्या असत्या तर तो एका जागी जमून राहण्याचा अधिक संभव आहे. रस सार्वत्रिक न खेळतां केवल एका जागी सांठणे हे वनस्पतीच्या आरोग्यदृष्ट्या चांगले नसते; म्हणून पेशिमालिकेंत भित्तिका असणे अवश्य आहे. शिवाय पेशिमालिकेंतून रस वाहत असतांना त्याचे भिन्न भिन्न रूपांतर होत असते. सत्त्वापासून साखर अथवा नायट्रोजनयुक्त द्रव्ये वगैरे तयार होतात. ह्या निरनिराळ्या स्थित्यंतरामुळे जीवनकण व पेशी-घडणात्मक द्रव्ये उत्पन्न होतात, म्हणून पेशिमालिका केवळ रस वाहकच आहे असे नाही, तर त्यांत वनस्पतिसंवर्धनास योग्य असे फेरबदल होत जातात.

 श्वासोच्छ्वासक्रिया:--वनस्पतिशरीरांत बाष्पीभवन, कार्बन संस्थापन, वगैरे क्रिया जशा महत्त्वाच्या आहेत, तशीच श्वासोछ्वासक्रिया महत्वाची आहे.

१२२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
जोपर्यंत प्राणी अथवा वनस्पति जिवंत असतात, तोपर्यंत ही क्रिया सारखी चालू राहते. ही क्रिया मृत्यूबरोबर बंद होते. रात्रीं, दिवसा निद्रितावस्थेत तसेच जागृतावस्थेत ही क्रिया चालत असते. प्राणी वर्गात ही क्रिया चालविण्याची जी विशिष्ट अवयवें असतात, त्यांस फुफ्फुसें ह्मणतात. वनस्पतिवर्गात असली अवयवे नसल्यामुळे तिच्या प्रत्येक जिवंत पेशींत ही क्रिया चालते. ह्या पेशी सुर्यप्रकाशाकडे हवेत असोत अथवा जमिनीत गाडलेल्या राहोत, सूक्ष्म असोत वा पूर्ण वाढलेल्या असोत, ह्या सर्वांतून ही क्रिया सारखी सुरू असते. श्वासोच्छ्वास बंद होणे म्हणजे मरणें, अथवा जिवंत असणे व श्वासोच्छ्वास करणे ही दोन्ही समानार्थी उपयोग करतात. हा नियम सर्व सजीव कोटीस लागू असतो; मग ती कोटी प्राणिवर्गाची असो अथवा वनस्पतिवर्गाची असो.  वनस्पतिशरिरांत कार्बनसंस्थापन झाल्यामुळे सेंद्रिय पदार्थ बनण्यांत सूर्य किरणांची शक्ति खर्चिली जाऊन त्यांत त्या शक्तीचा गुप्त सांठा राहतो. ह्या सांठलेल्या शक्तीचा उपयोग होण्यास श्वासोश्वासक्रियेची जरूरी असते. श्वासोश्वास क्रियेने हे शक्तीचे सांठे फोडून साधे केले जातात. त्या शक्तींचा सजीव तत्वास उपयोग होतो. सजीव कणांच्या चांचल्यशक्तीमुळे सूर्यप्रकाशांत हरितवर्ण शरीरें बनून त्यापासून पुनः नवीन सेंद्रिय पदार्थ उत्पन्न होतात, एकंदरीत हो रहाटगाडगे सुरळीत चालावे म्हणून दोन्ही क्रिया परस्पर सहाय्य करितात. एका क्रियेने कार्बन संस्थापन करावेत ह्मणजे सेंद्रिय पदार्थ बनवावेत व दुसऱ्या क्रियेमुळे त्या पदार्थांचा उपयोग जीवनकणांस होत जावा. जोपर्यंत श्वासक्रियेचा परिणाम सेंद्रिय पदार्थावर होत नाही, तोपर्यंत शरीरसंवर्धनाकडे त्यांचा उपयोग होणार नाहीं. रेलवेच्या कारभारांत दोन खातीं मुख्य असतात. एक ट्रॅफिक् खाते व दुसरे लोको खाते. ट्रॅफिक् खात्याकडून दररोज शेकडो रुपये जमविले जातात; पण लोकोखात्याकडून त्या रुपयांचा खर्च केला जातो. लोकोखाते रुपये खर्च करून ट्रॅफिक् खात्यास अधिक उत्पन्न मिळविण्याची साधनें तयार करते. इंजिंने बांधणे, गाड्या तयार करणे, वगैरे गोष्टी लोको खातेच करिते; पण या गोष्टींचा परिणाम ट्रॅफिक् खात्यास उत्पन्न वाढविण्याकडे होतो, नुसते ट्रॅफिक् खाते अथवा नुसते लोकोखाते कधीही चालणार नाहीं. परस्पर दोन्हींची सांगड असणे जरूर आहे. एकाने उत्पन्न करावे,

१४ वे ].    शोषणाच्या अन्य रीति व श्वासोच्छ्वास क्रिया.    १२३
-----
दुसऱ्याने त्या उत्पन्नाचा खर्च करून ते उत्पन्न येत राहील अशी तजवीज करावी. शिवाय ट्रॅॅफिक् खाते सुरू होण्यापूर्वी लोक खाते अस्तित्वात येते. ते कायम राखणे ट्रॅॅफिक् खात्याच्या उत्पन्नावर अवलंबून असते. हा दृष्टांत वनस्पतिशरिरांत असणाऱ्या खात्यास लागू पडतो. एका खात्याकडून सेंद्रिय पदार्थ उत्पन्न करावेत, व दुसऱ्याकडून ते पदार्थ खर्चून पुनः सेंद्रिय पदार्थ उत्पन्न करण्याची शक्ति व साधने पहिल्या खात्यास द्यावी, असा परस्पर संबंध असतो. जमा असल्याशिवाय खर्च नाहीं व खर्चाशिवाय जमेस महत्त्व नाहीं. खर्च होऊन जी शिल्लक राहते, ती शरीरपुष्टीकडे उपयोगी पडते.

 श्वासोच्छ्वासक्रियेंत हवेतून शुद्ध आक्सिजनवायु शोषिला जाऊन बाहेर कार्बन् आम्लवायु सोडिला जातो. पूर्वीच्या कार्बन संस्थापनेत कार्बनवायु शोपिला जाऊन त्याचे विघटीकरण होऊन त्यापासून सेंद्रिय पदार्थ बनल्यावर उलट आक्सिजन वायु सोडिला जाते. ह्या दोन्ही क्रिया परस्पर विरुद्ध आहेत. दिवसाउजेडी कार्बन संस्थापन क्रिया जोराने चालत असल्यामुळे श्वासोच्छ्वास क्रिया स्पष्ट समजली जात नाही; पण रात्री कार्बन संस्थापन बंद असल्यामुळे श्वासोच्छ्वास क्रिया स्पष्ट कळते. लहान रोपड्यावर चोहों बाजूकडून एखादें कांचेचे झाकण घालून बाहेरून आंत नवीन हवा न येईल अशी व्यवस्था करावी. नंतर त्या रोपड्यास श्वासोच्छ्वास क्रियेस शुद्ध आक्सिजन वायु न मिळाल्यामुळे ती क्रिया बंद पडून तो रोपा मरून जातो. मागाहून पुनः शुद्ध हवेत तो रोपा ठेविला तर तो जगत नाही. शुद्ध हवा वनस्पतीस अगर प्राण्यास नेहमी अवश्य पाहिजे. जर ही हवा कमी मिळत जाईल, तर त्याचा परिणाम त्यांच्या शरीरप्रकृतीवर ताबडतोब होईल.

 इंजिनमध्ये असणारी लांकडे जळून ज्याप्रमाणे इंजिनाकडून काम होत असते, तद्वतच वनस्पतिशरीरांतील सेंद्रिय पदार्थ जळून त्यांपासून मोठे कार्य होत असते. श्वासोच्छ्वास क्रिया म्हणजे सेंद्रिय पदार्थ जळणे होय, व त्यामुळे प्राणवर्गाप्रमाणेच वनस्पतिशरीरात एक प्रकारची कायम उष्णता आढळते. निरनिराळ्या वनस्पतींची श्वासोच्छ्वास क्रिया कमी अधिक जोराची असते. ज्यांमध्ये सेंद्रिय पदार्थ कमी आहेत, त्या पदार्थात श्वासोच्छ्वासकिया कमी वेळ चालते. कारण ते सेंद्रिय पदार्थ एकदां श्वासोच्छ्वास क्रियेमुळे जळून

१२४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
गेले म्हणजे पुढे नवीन तसले पदार्थ न मिळाले तर ती श्वासोच्छ्वासक्रिया बंद होणारच. पूर्ण वाढत्या स्थितीपेक्षां कोवळ्या स्थितीत आपल्या मानाने श्वासोच्छ्वासक्रिया अधिक जोराने चालते. बीजजनन होत असतां प्रथम ही क्रिया मंद असून पुढे जेव्हां बीजाचे अंकुर दीर्घ होतात, त्यावेळेस ही क्रिया जोराने चालू होते; पण पाने वाढून स्वतंत्र रितीने अन्नशोषणक्रिया सुरू झाली म्हणजे त्यामधील श्वासोच्छ्वासक्रिया पूर्वीपेक्षा मंद चालते. हिंवाळ्यात झाडे निद्रितावस्थेत असतांना श्वासोच्छ्वास क्रिया मंद चालते व असे चालणे जरूरीचे असते. कारण निद्रावस्थेत नवीन सेंद्रिय पदार्थ तयार होत नाहींत व जर श्वासोच्छ्वास क्रिया नेहमीप्रमाणे जोराची सुरू असली तर ते सेंद्रिय पदार्थ लवकर संपून पुढे पंचाईत पडली असती. पण उन्हाळ्यांत श्वासोच्छ्वास क्रिया जोराने चालू होते. उष्णतेचा परिणाम ह्या क्रियेवर नेहमी होत असत. उष्णता अधिक तर श्वासोच्छ्वास क्रियेचा जोर अधिक असतो. बीजे जिवंत असून, निद्रितावस्थेत असल्यामुळे त्यामध्ये श्वासोच्छवासक्रिया चालत नाहीं. बीजे पुष्कळ दिवस टिकतात. ह्याचे कारण त्यामध्ये श्वासोच्छ्वासक्रिया न चालणे होय. बटाट्याच्या कोठाऱ्यास सर्द हवा लागली तर बटाटे श्वासोच्छ्वासक्रिया सुरू करितात व त्यापासून अंकुर फुटू लागले म्हणजे बटाटे फार दिवस टिकत नाहींत. श्वासोच्छ्वास क्रियेमुळे आंतील सेंद्रिय अन्न दिवसेंदिवस कमी होऊन बटाटे कुजू लागतात. ह्याकरितां वरचेवर बटाटे चाळवून सडलेले बटाटे बाहेर काढीत असावे. बीजांस सुद्धा सर्द हवा लागून उपयोगी नाही. नाही तर श्वासोच्छ्वास क्रिया सुरू होऊन बीजें उगवू लागतील. बीजे ठेवण्याची जागा चांगली कोरडी असली पाहिजे. पाण्याचा अंश श्वासोच्छ्वास क्रियेस उत्तेजित करून बीजापासून अंकुर फुटतात. बीजांतील निरनिराळ्या द्रव्याप्रमाणे श्वासोच्छ्वास क्रिया कमी अधिक चालते. तेलट बीजें हवेतून ऑक्सिजन वायु जास्त शोषण करतात. सात्विक बीजे हा वायु कमी घेतात. ज्यामध्ये नायट्रोजनयुक्त पौष्टिक द्रव्ये असतात, अशी बीजे जास्त श्वासोच्छ्वास करितात.  पाण वनस्पति पाण्यांतून आक्सिजन वायु शोषण करून श्वासोच्छ्वास क्रिया चालवितात. अति खोल पाण्यांत आक्सिजन वायु मिळणे अशक्य असेल अशा ठिकाणी वनस्पति उत्पन्नही होणार नाहीत. पुष्कळ वेळा पाण
१५ वे ].    पचन, वाढ व परिस्थिति.    १२५
-----


वनस्पति बाटलीत बूच घालून दुसरे गांवीं पाठावतात; पण असे पाठविणे फार धोक्याचे असते. कारण ह्यामुळे वनस्पतिची श्वासोच्छ्वास क्रिया बंद होऊन आंतलेआंत त्या मरून जाण्याची भीति असते. बाटलीस घट्ट बूच असल्यामुळे बाहेरील शुद्ध हवा मिळणे शक्य नसते. ह्याचा परिणाम श्वासोच्छ्वास क्रियेवर होऊन शेवटी ती वनस्पति मरते; म्हणून अशा रीतीने न पाठवितां मोकळ्या हवेची तजवीज करून वनस्पति पाठविली पाहिजे.

---------------