Jump to content

वनस्पतिविचार/पर्ण

विकिस्रोत कडून
६ वे ].     पर्ण Leaf.     ३५
-----
प्रकरण ६ वें.
---------------
पर्ण Leaf.
---------------

 उत्पत्तीः–बीज रुजलें असतां ज्या एक किंवा दोन डाळिंबी दृष्टीस पडतात, त्या बीजस्थितींमधील पानें अगर बीजदले होत. कित्येकवेळा त्या डाळिंब्या मोठ्या वाढून हिरव्या रंगाच्या होतात. जसे-एरंडी, भोपळा, वगैरे. अशा ठिकाणीं बीजदलें हींच रोप्यावरील पहिली पाने होत. -

 महत्वः-वनस्पतिचरित्रांत पाने मोठ्या महत्त्वाची आहेत. पानाशिवाय पुष्कळ वनस्पतींना हवेतून कार्बन आम्ल शोषून घेता येणार नाही, व कार्बन आम्लाचे विघटीकरण होऊन कार्बन संस्थापन होणे वनस्पति पोषणास अवश्य असते. म्हणूनच वनस्पति आयुष्यक्रमात पानाचे एवढे महत्त्व असते.

 खोडावर दोन प्रकारची उपांगे असतात. पैकीं कांहीं सादृश असून कांहीं असादृश आहेत. सादृश उपांगें म्हणजे खोडावरील फांद्या व असादृश उपांगें हीं खोडावर येणारी हिरवी पाने होत.

 खोडावरील ज्या भागापासून पाने निघतात त्यास कांडे (Node) अशी संज्ञा आहे, व दोन कांड्यांमधील भागास ‘अंतरकांडे' (Inter-node) अगर पेर म्हणतात. प्रत्येक पानास बूड, अग्र, दोन बाजू, तसेच कडा असतात. साधारणपणे पानास दोन पृष्ठभाग असतात. पण कांहीं पानांत ह्यास अपवाद आढळतो. कारण त्या पानाचे किनारे जमिनीकडे किंवा आकाशाकडे वळलेले असतात, म्हणून असल्या पानास वरचा पृष्ठभाग अगर अधः पृष्ठभाग नसतो. जसे, युकॅॅलिप्टसू.

 कळीः–पानाचे पोटांत (Axil) नेहमी एक कळी अगर मुगारा असतो असा साधारण नियम आहे. पुष्कळ वेळां मुगारे अगर कळ्या कमी अधिक आल्यामुळे त्यांची जागा बदलते.

 पाने कधी कधी उमलल्याबरोबर गळून पडतात, व कधी पुष्कळ दिवस राहतात. कांहीं पानें एक ऋतूपर्यंत टिकतात, व पुढे गळू लागतात; व कांहीं

३६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
पुष्कळ दिवस टिकल्यामुळे वनस्पती नेहमी हिरवीगार राहते. म्हणजे पानांचा नियम सार्वत्रिक सारखा आहे असे नाहीं. झाडांच्या गुणधर्मावर, तसेच त्यांच्या परिस्थितीवर पाने राहणे अगर गळून जाणे अवलंबून असते. खरोखर वनस्पतींचा जातिस्वभाव ह्या ठिकाणी प्रधान असतो.

 स्वरूपः-कळीमध्ये पाने एकवटून संकुचित स्थितीत असतात. जशी जशी कळी उमलू लागते, तशी तशी पाने खाली सुटू लागतात. नवीन पानांचा भरणा आपोआप आंतून तयार होत असतो. पानांची वाढ प्रथम अग्राकडे दृष्टीस पडते. नंतर पानांचे बूड वाढते. वाढतां वाढतां पानास कायमचे स्वरूप प्राप्त होते.

 भागः–पानाचे मुख्य तीन भाग आहेत. [१] बूड. [२] देंठ. (Peticle) व [३] पत्र (Lamina) ह्या तिन्ही भागांमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे पत्र होय. ह्याचीच वाढ विशेषेकरून जास्त होते. कधी कधी पत्रास फांद्या येऊन त्यावर उपपत्रे येतात.

 पानाचे बूडः--खोडावर अथवा फांदीवर ज्या ठिकाणी पान चिकटते त्या पानाच्या भागास बूड समजावे. कांहीं पानांत हा भाग चांगला स्पष्ट असून त्या ठिकाणी थोडा फुगवटा ( Pulvinus ) आला असतो. जसे, आंबा, बाहवा, वगैरे. कांही ठिकाणी हा फुगवटा न वाढतां, पानाचे बूड म्यानासारखे वाढून खोडासभोवती गुंडाळते. तृणधान्यवनस्पतीमध्ये ह्या प्रकारची पाने नेहमी आढळतात. जसे ऊंस, गहू, बाजरी, बांबू वगैरे. सुपारी किंवा ट्रेडसूकॅनसिया वनस्पतीमध्ये पानाचे बूड खोडाभोवती गुंडाळलेले असून तृण धान्य वनस्पतीमधील पानाप्रमाणे सोडविता येत नाही. बुडाची जणू एक नळी बनली असून त्यांतून खोड वाढला आहे असे वाटते. बालकंद म्हणून एक हिरवळ तंबाकू सारखा लहान रोपा आहे. त्यामध्ये पानांचे बुडापासून दोन शेपट्या खोडावर चिकटून जातात. बालकंदाप्रमाणे थिसल नांवाच्या कांटेऱ्या वनस्पतींत ह्याच प्रकारे पानाचें बूड असते.

 उपपर्णे (Stipules:)-पानांचे बुडाशी कधी कधी एक अथवा दोन उपांगे आढळतात. उपांगांत पानांप्रमाणे हरितवर्ण पदार्थ असतो. पानांच्या उपांगांस ' उपपर्णे ' (Stipules,) म्हणतात, सिसम, मसूर, हरभरे वगैरेमध्ये

६ वे ].     पर्ण Leaf.     ३७
-----
उपपर्णे लहान असून फार दिवस पानांचे बुडी राहत नाहींत. लाख, वाटाणे वगैरेमध्ये उपपर्णे मोठी असल्यामुळे ती मुख्य पानें अगर पत्रे आहेत असा चुकीचा समज होण्याचा संभव आहे. गुलाबांत, पानांचे बुडी ती दोन्ही बाजूस चिकटलेली असतात. वुइलो, छतावर, तगर वगैरेमध्यें पानांचे देठावर उपपर्णे येतात. कुटू ( Buckwheat ) नांवाची वनस्पति उत्तर-हिंदुस्थानांत पुष्कळ ठिकाणी आढळते. तिच्या फळांतील बीजें दळून त्या पिठाचा उपयोग भाविक लोक एकादशीचे दिवशी अगर उपवासाचे दिवशीं करितात. येथे पानांचे बुडाशी उपपर्णे वाढून देठाभोवती गुंडाळतात. ह्या उपपर्णत हरितवर्ण पदार्थ (Chlorophyll ) नसतो. अशा प्रकारची खोडाभोंवती गुंडाळलेली उपपर्णे रेवाचिनीमध्ये आढळतात. बाभूळ, वाघाटी, इंगाडारसिस वगैरेमध्ये कांटेरी उपपर्णे असतात. मंजिष्ठ, कॉफी, आयक्झोरा वगैरेमध्ये पाने समोरासमोर असून उपपर्णे पानांचे पोटाकडील बाजूस येतात. दोन्ही उपपर्णे एकमेकांस चिकटून, एकच उपपर्ण आहे असे वाटते. स्मायलॅॅक्समध्ये उपपर्णे लांब सुतासारखी असून, त्यांचा दोरीप्रमाणे वेलास वर चढण्यास उपयोग होतो. सोनचाफा, अंजीर, वड, पिंपळ इत्यादि झाडांमध्ये उपपर्णांचा उपयोग कळ्यांभोंवती संरक्षक आवरणासारखा होतो.

 पाने चांगली फुटली म्हणजे कांहीं उपपर्णे गळू लागतात. तसेच कांहीं पानांबरोबर पुष्कळ दिवस टिकतात. जसे गुलाब, बेरी, स्ट्रॉबेरी, वाटाणे वगैरे. उपपर्णे एकदल धान्य वनस्पतींमध्ये कधी आढळत नाहीत. विशेषेकरून द्विदलधान्य वनस्पतींमध्ये पानांचे बुडाशी ती आढळतात. विशिष्ट वनस्पतींमध्ये तीं विशिष्ट रीतीनें उपयोगी पडतात ही गोष्ट खरी; तथापि त्यांचा सार्वत्रिक उपयोग आहे असे म्हणता येणार नाहीं.

 देठः-सर्वच झाडांच्या पानांस देठ असत नाही, पण आंबा, फणस, उंबर, पिंपळ वगैरेमध्यें तो असतो. साधारणपणे देंठाचा आकार वाटोळा असतो. ऊस, वेळू, दूर्वा वगैरे तृणवनस्पतींत देठाचा आकार तरवारीच्या म्यानासारखा असून तो खोडाभोंवतीं गुंडाळतो. म्हणजे येथे पानाचे बूड व देठ दोन्ही म्यानासारखी होतात. जेथून खरे पत्र सुरू होते, त्या ठिकाणी पातळ माशीच्या पंखाप्रमाणे पांढरा पापुद्रा असून त्यावर कधी कधी केस येतात. लिंबू, नारिंग, चकोत्रा वगैरे पानांच्या देठावर दोन्ही बाजूस दोन पक्ष वाढतात. कांहीं अकॅशियामध्ये
३८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
देंठाची वाढ जास्त होऊन वर वाढणारी पत्रे अगदी नामशेष होतात. अशा ठिकाणीं पत्राची कामें देठास करावी लागतात. कांहीं मांसाहारी वनस्पतींमध्ये पानांचा देंठ सुरईसारखा मोठा वाढतो, पण मुख्य पान अगर पत्र फारसे वाढत नाहीं. सुरईच्या तोंडावर एक झांकणही असते. असल्या वनस्पतीचे भक्ष्य किडा, मुंगी अथवा फुलपाखरू असते. ते चुकून सुरईत गेले असतां तेथे असणाऱ्या रसांत गुटमळून मरण पावते, व पुढे त्या रसांत ते विरघळून शरीरांत एकजीव होते. ते भक्ष्य सुरईत अडकल्यावर तोंडावर झांकण बसते, त्यामुळे त्यास बाहेर सुटून जाण्यास मार्ग मुळीच उरत नाहीं.

 पान अगर पत्रः-(Lamina) पानांचा मुख्य भाग म्हणजे पत्र होय. पत्रांत देठापासून मध्यशीर शेंड्यापर्यंत सरळ जाते. मध्यशिरेपासून पुष्कळ पोटशिरा निघून किनाऱ्याकडे जातात. कित्येक वेळां एका मध्यशिरेऐवजी अधिक मध्यशिरा आढळतात, व प्रत्येकीपासून पूर्वीप्रमाणे पोटशिरा निघतात. ह्या सर्व शिरा मिळून पानांचा सांगाडा तयार होतो, शिरा एकमेकांत गुंतल्यामुळे त्यांचे जाळे बनते. कॉस्टिक पोटॅशमध्ये पाने शिजवून हळू हळू बोटाने थंड पाण्यांत त्यावरचा बलक सोडविला असतां केवळ सांगाडा दृष्टीस पडेल. अगर पावसाळ्यानंतर झाडाखालून पाने कुजून एखादे वेळी आयते तयार झालेले सांगाडे सांपडतात. सांगाड़े निरनिराळ्या आकाराचे असून साधे अगर संयुक्त असतात.

 शिरा : –पत्राचा आकार कधी साधा असतो अथवा पुष्कळ लहान लहान सांगाडे एके ठिकाणी मिळून त्यांस संयुक्त आकार येतो. शिरांच्या रचनेप्रमाणे पत्रास आकार येतो. जसे खोडावर फांद्यांची काही विशिष्ट रचना आढळते, तद्वत् पत्रांतील शिरांची विशिष्ट मांडणी असून त्या मांडणीप्रमाणे पत्रास निर निराळे स्वरूप प्राप्त होते. आंब्यांच्या पत्रांत देठापासून मध्यशीर सरळ शेंड्यापर्यंत जाते. मध्यशिरेपासून बाजूस पुष्कळ शिरा निघून एकमेकांत गुंततात व त्यामुळे पानांचा एकाकी साधा सांगाडा तयार होतो, म्हणून ते पान साधे असते. बेलाचे पानांत तीन लहान देंठ असून प्रत्येक दलाचा सांगाडा मुख्य शिरेवर चिकटून राहतो, व त्याचे स्वरूप आंब्याप्रमाणे साधे न राहृतां संयुक्त होते. सारांश शिरांची मांडणी निरनिराळी असून त्याप्रमाणे पानांस वेगवेगळे

६ वे ].     पर्ण Leaf.     ३९
-----

आकार प्राप्त होतात. सांगाडे साधे, तर पाने साधी, सांगाडे संयुक्त तर पानें संयुक्त, हे तत्त्व नेहमी लक्षात ठेवावे.

 आंबा, फणस, तुळस, उंस वगैरेमध्ये पाने साधी (Simple) असून गुलाब, वाटाणा, शेवरी, बेल, उडीद, मूग वगैरेमध्यें पाने संयुक्त ( Compound) असतात. कित्येक वेळां संयुक्त पानांमध्ये पत्राच्या जोड्या असल्यामुळे त्यास जोडीदार पाने (Pinnate) म्हणतात. जसे बाभूळ, बाहवा, निंब, वगैरे. शेवर किंवा टॅपिओकामध्ये पाने संयुक्त असून जोडीदार असत नाहींत. त्यांची पत्रे वाटोळी चिकटल्यामुळे त्यास हस्तसादृश्य आकार येतो. साध्या पानांत सुद्धा पुष्कळ मुख्य शिरा देठापासुन वाढून त्यांचा सांगाडा हातासारखा बनतो. एरंडी, कापूस, अंबाडी वगैरेमध्ये पाने साधी असून पानांस एकाकी जोडीदार आकार येतो.

 असो. पानांच्या विचारांत आकार, अग्रे, बाजू अगर कडा व पृष्ठभाग वगैरे गोष्टींचे वर्णन येणे भाग आहे. पाने साधी अगर संयुक्त, जोडीदार अथवा हस्तसादृश्य वगैरे बाबींचा विचार झाला पाहिजे. पानांच्या शिराविषयीं भेद, समांतर किंवा जाळीदार, ह्यांपैकी कोणत्या प्रकारची पाने एकदल तसेच द्विदल धान्यवनस्पतींमध्ये आढळतात, पानांची खोडावरील मांडणी, त्यापासून होणारे फायदे, पानांचीं अन्य स्वरूपे, पानांची आवरणे, वगैरे प्रत्येक गोष्टीचा निर्देश झाला पाहिजे. इतक्या बाह्य गोष्टींचा विचार झाल्यावर नंतर पानांची अंतररचना, त्यांपासून रोज घडणारी कार्ये, पानांची जीवनचरित्रांतील महती वगैरकडे आपले लक्ष्य द्यावे लागेल. आतां आपणही क्रमाक्रमाने एका एका गोष्टींचा या ठिकाणी विचार करू.

 आकार- साध्या पानांचे आकार पुष्कळ प्रकारचे आढळतात. आळवाचा देठ अगर नॅॅस्टरसियमचा देठ, पत्राच्या मध्यभागी चिकटल्यामुळे त्यास ढालीसारखा आकार येते. कित्येक वेळां मध्यशिरेच्या दोन्ही बाजूंस पत्राची वाढ सारखी होत नाही. जसे बकाणा लिंब. दर्भामध्ये पत्राच्या बुडाची तसेच अग्राजवळील रुंदी सारखी असते. बांबू, वेत, केवडा, कण्हेर वगैरे मध्यें पाने मध्यभागी रुंद असून दोन्ही टोकास निमुळती असतात. त्यामुळे त्यास भाल्यासारखा आकार येतो. वडाचे पान लांबट असून बुडाशी तसेच शेंड्याशी सारख्या

४०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
रुंदीचे असते. पिंपळ, तुती वगैरेमध्ये पाने बुडाशी रुंद असून शेंड्याकडे निमूळत असतात. फणसामध्ये पानांस चमच्यासारखा आकार असतो. उतरण, गुळवेल, समुद्रशोक, भोंपळा वगैरेची पाने पत्त्यांतील लालबदामाच्या आकाराची असतात. आंबोशीमध्ये तीन पत्रे असून प्रत्येक पत्राचा उलट्या लालबदामाप्रमाणे आकार असतो. म्हणजे टोंकाकडे खोलगट असून बुडाकडे निमूळते पत्र असते. चांदव्याची पाने अर्धचंद्राकति असतात. बनवारीची पाने बाण लावून सज्ज केलेल्या तिरकमट्याप्रमाणे दिसतात. ब्रम्हीमध्यें पाने मूत्रपिंडाकृति असतात. सिरस, मुळे वगैरेमध्ये पाने विणाकृति असतात. विण्याचा मोठा भाग शेंड्याकडे असून खाली विण्यावरील खुट्यांवजा लहान पत्रे असतात. कृष्णकमळ एरंडी वगैरेची पानें हस्तसदृश असतात असे पूर्वी आलेच आहे. अशा प्रकारे पानांचे आकार नानातऱ्हेचे असतात.

 कडा-( Margin) फणस, रुई, मांदार, तुळस, वगैरेमध्ये पानांच्या कडा सारख्या असतात. कित्येक पानांत कडा करवतीच्या दात्याप्रमाणे अणकुचीदार असतात. जसे केवडा, अकॅलिफा, वगैरे. घायपातीच्या पानांत करवतीप्रमाणे कडा असून दाते उलटे व सुलटे असतात. मुद्रा, अजेरटम वगैरेमध्ये पानांच्या कड्यावर वांटोळे दाते असतात. हे दाते बोचण्याची भीत नसते. पाथरीच्या कडा पाण्याच्या लाटेप्रमाणे आंत बाहेर आलेल्या असतात. पिवळा धोत्रा, हॉली वगैरेमध्ये कडा कांटेरी असतात.

 अग्र-( Apex) पत्रांची अग्रे वेगवेगळी असतात. मोहरीत पानाची अग्रे वांटोळी असतात. देवनळ, वेळू, ऊस, आंबा वगैरेमध्ये ती अणकुचिदार असतात. तुती, ऱ्हिया, पिंपळ, वगैरेमध्यें अग्रे हळूहळू निमूळती होत जातात. कांचन, कचनार, आपटा, त्रिधारी निवडुंग वगैरेमध्ये अग्रावर खोलगटा असतो. घायपात, रुलिया, केवडा वगैरेमध्ये शेंडा दाभणासारखा बोंचक कठीण असतो. तीळ, भुयमूग वगैरेमध्ये पत्रे शेंड्याकडे वाटोळी असून त्यावर मध्यभागी थोडासा उंचवटा असतो.

 पृष्ठभागः-काहीं पानांचे पृष्ठभाग खरखरीत व कांहींचे मऊ असतात. भोपळा, फाळसा, सागवान, ऊस वगैरेमध्ये पाने खरखरीत असतात. कर्दळ, केळी, गुलछबू, नागवेल वगैरेमध्यें पाने मऊ गुळगुळीत असतात. वेत, जंगली-

६ वे ].     पर्ण Leaf.     ४१
-----

वांगी, वगैरेची पाने कांटेरी असतात. मखमल, समुद्रशोक, बाळकंद वगैरे पानावर लुसलुसीत मऊ लव येते. विलायती शेर, रासन, युकॅलिप्टस, कोभी वगैरे पाने चामड्यासारखी असतात. बिगोनीया, पानाचा ओवा, पानफुटी वगैरेची पाने मांसल असतात.

 वर्णः-पानांचे रंग नानाप्रकारचे आढळतात. नेहमींचा रंग हिरवा असतो. हा रंग पानामध्ये असणे अवश्य असते. कोवळी पानें तांबूस रंगाची असुन पिकली म्हणजे ती पिवळट फिक्या रंगाची होतात. झाडे दुसऱ्या वृक्षाच्या सांवलीत वाढू लागली असतां सूर्य प्रकाश न मिळाल्यामुळे ती पिवळी रोगट दिसु लागतात. क्रोटन्, अकॅलिफा, ट्रेडेस्कॅन्शीया, अरॉयड़ी वगैरेची पाने तांबड्या पिवळ्या टिपक्याची असतात. शोभेसाठी बागेत ही झाडे लावितात. तांबड्या भाज्या, रामदाणा, कॉक्सकांब, वगैरेमध्यें पाने लाल असतात. केवळ रंगावरून साधे अगर संयुक्त पान ओळखणे कठीण आहे. हे रंग दोन्ही प्रकारच्या पानांत असतात,

 भेदः–साधी पाने व संयुक्त पाने ओळखण्यास फारसे कठीण पडू नये; पण कांही ठिकाणी साध्या पानासारखी संयुक्त पाने असल्यामुळे ओळखण्यास कठीण असते. जसे लिंबू, महाळुंंग, चकोत्रा, वगैरेमध्ये पाने दिसण्यांत साधी असतात; पण वास्तविक ती साधी नसून संयुक्त असतात. संयुक्त पानांत एकापेक्षा अधीक सांधे असतात, व त्या सांध्यावरून त्याची संयुक्तता व्यक्त होते, महाळुगाच्या पानास दोन सांधे असतात. एक सांधा जेथे पान सुरू होते त्या ठिकाणी असतो, व दुसरा सांधा देंठ पत्रास चिकटलें असतें त्या जागी असतो. साध्या पानास देठाचे जागी सांधा नसून देठापासून सरळ मध्यशीर वाढली असते. आतां संयुक्तपानांची पत्रे व साधी पाने ह्यांत अंतर कोणते असा प्रश्न विचारला असतां पानांची व्याख्या पुनः सांगणे भाग पडेल. पानांच्या व्याख्येत ह्याविषयी पूर्ण भेद सांगितला असतो. खोडावरील हिरव्या रंगाची पसरती असादृश्य उपांगे म्हणजे पाने होत; व पानांचे पोटी कळी असणे अवश्य आहे. वाटाण्याची पाने संयुक्त कां, व आंब्यांची पाने साधीं कां ?- वाटाण्याच्या पानास लहान लहान पत्रे असतात व आंबाच्या पानास एकत्र पत्र असते. शिवाय पत्राचे पोटीं कळी नसून मुख्य पानाचे पोटीं कळा असते, ही गोष्ट

४२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
पूर्णपणे लक्ष्यांत ठेविली असतां सहसा संयुक्त पानांची मोठी पत्रे व साधी पाने ह्यांतील फरक तात्काळ कळतो. बाहव्याचे पानांत पुष्कळ मोठी हिरवीगार पत्रे असतात व प्रत्येक पत्रास स्वतंत्र पान समजण्याचा संभव असतो. पण वरील कळीसंबंधी खूण ताडून पाहिली म्हणजे पानाची पत्रे तसेच पाने हें लवकर लक्ष्यांत येते.

 जोडीदार संयुक्त पाने:-( Pinnately compound leaves) बाभूळ, बाहवा, वाटाणे, शिरस, निंब, वगैरेमध्ये जोडीदार संयुक्त पाने आढळतात. कित्येक वेळा जोड्याचे शेवटी एकच पत्र मोकळे राहते. जसेः-- बकाणा. कांहीं पानांत सारख्या जोड्या असतात. जसे, लाजाळू, शमी, आवळा, इत्यादि. आवळ्याची पाने द्विसंयुक्त असतात. म्हणजे येथील पत्रेही जोडीदार असतात. गाजर, शोपा, धने, कॉसमॉस, शेवगा, वगैरे पाने त्रिसंयुक्त आढळतात. विलायती बाभळीची पाने दोन जोड्यांची व वाल, उडीद, बेल, क्लोव्हर वगैरे मधील पाने त्रिदली असतात. कधी कधी चार पत्रे असल्यामुळे चौपाती नांवाची वनस्पति पाहण्यांत येते.

 संयुक्त हस्तसदृश पाने (Palmately Compound leaves)- एका देठापासून पुष्कळ पत्रं जेव्हां हस्तसादृश्याने वर्तुलाकृतींत येतात, तेव्हां त्या संयुक्त पानास संयुक्त हस्तसादृश पाने म्हणतात. जसे, गोरखचिंच, शेवरी वगैरे.

 शिरांची मांडणी (Venation)-पांढऱ्या चाफ्याचे पान उन्हांत समोर धरिले असतां शिरांची सरळ मांडणी सहज दिसते. जोडीदार शिरा मुख्य मध्य शिरेपासून निघून पुढे पोटशिरा जास्त वाढून एकमेकांत गुंततात. बाह्व्याच्या पानांचं ह्या प्रकारे निरीक्षण केले असतां देंठापासून सरळ वाढ णाच्या मध्यशिरेवर बाजूस पुष्कळ पत्रे आल्यामुळे पत्रागणिक एक एक लहान मध्यशीर उत्पन्न होते. जेथे जेथे मुख्य मध्यशिरेपासून इतर पोटमध्यशिरांचा उगम असतो, तेथे तेथे पान संयुक्त असते व उलटपक्षी जेथे जेथे मध्यशीर एकच असून पोटमध्यशिरा नसतात, तेथे तेथे पान साधे असते. म्हणूनच चाफ्याचे पान साधे व बाहव्याचे पान संयुक्त असे समजण्यांत येते. गव्हांचे पानांत शिरा समांतर रेषेत आढळतात. वेळू, गुलछबू , तरवार, ऊस वगैरे मध्ये शिरा समांतर जातीच्या असून वर्तुलाकृति येतात. आंबा, चांफा, वड,
६ वे ].     पर्ण Leaf.     ४३
-----

पिंपळ वगैरेमध्ये शिरा पक्ष्याच्या पंखाप्रमाणे मुख्य मध्यशिरेपासून बाजूला पिसाप्रमाणे येतात. भोपळा, कारली, कापूस, एरंडी वगैरेमध्ये शिरा हस्तसादृश जाळीदार असतात. समांतर शिरेचे पान, त्या दिशेत फाडिलें असतां सरळ फाटत जाते; पण जाळीदार शिरांचे कोणतेही पान सरळ फाटत नाही. शिवाय फाडण्यास जरा कठीण पडते. ह्याचे कारण जाळी तुटण्यास त्रास होतो व ती जाळी जागजागी गुंतलेली असते.

 जाळीदार शिरांच्या दोन मुख्य जाती आहेत:—पंखाकृती अथवा जोडीदार (Feather shaped or Pinnate). २ हस्ताकृती अगर वाटोळ्या पसरणाऱ्या (Palmate). पहिल्याची उदाहरणे आंबा, वड, फणस, पिंपळ, वगैरे वर दिलीच आहेत; व कारली, दोडके, एरंड्या, कापूस वगैरे उदाहरणे दुसऱ्यापैकी आहेत. समांतर शिरांचेही मुख्य दोन भेद आहेतः-१ सरळ उभे समांतर (Parallel) वर्तुळ समांतर (Carved veined) गहूं, बाजरी, जव, तरवार लिली वगैरे उदाहरणे पहिल्या समांतराची आहेत. कवळ, अळू, घुंया, सुरण, ताडमाड, बगैरे उदाहरणे दुसऱ्या प्रकारची होत.

 केळ, चवेणी, कर्दळ, वगैरे मध्ये मुख्य मध्य शिरेपासून आडव्या समांतर शिरा उत्पन्न होतात. ही तऱ्हा ह्याच समांतरामध्ये असते.

 वरील शिरांच्या मांडणीवरून एवढे सिद्ध होते की, एकदलधान्य वनस्पती व द्विदलधान्य वनस्पतींमध्ये शिरा निरनिराळ्या प्रकारच्या आढळतात. समांतर शिरांची मांडणी ही एकदल धान्य वनस्पतींमध्ये नेहमी आढळते, व जोडीदार अगर हस्तसादृश जाळीच्या शिरा द्विदलधान्य वनस्पतीमध्ये असतात. केवळ पानांच्या शिरा पाहून वनस्पति अगर द्विदल ठरविण्यास फार सोपे असते. कारण वरील शिरांची मांडणी विशिष्ट वनस्पति जातींत विशिष्ट प्रकारची असते हे ठराविक आहे.

 पानांचा खोडावरील उगम:–कांहीं पाने जमिनीच्या पृष्ठभागांतून आली आहेत असे वाटते. त्यांचा संबंध खोडाशी जमिनीमध्ये असतो, जसे, कांदे, लसुण, लिली, गुलछबू, इत्यादि. कांही ठिकाणी खोडाचीं अंतर-कांडी अगर पेरी संकुचित झाल्याकारणाने पुष्कळ पाने जमिनीवर गुच्छासारखी दिसतात. जसे, जंगली गोभी, पाथरी वगैरे. पाने खोडावर जमिनीबाहेर नेहमी
४४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
येतात, असा साधारण पुष्कळ वनस्पतींचा नियम आहे. कांहीं विशिष्टबीजदलें जमिनीबाहेर कोंबावर वाढून हिरवी दिसू लागतात. जसे, भोपळा, एरंडी वगैरे.  खोडावरील पानांची मांडणी:–आपण बारकाईने पानांच्या मांढणीकडे लक्ष्य दिलें असतां असे आढळते की, पाने केवळ वांकडी तिकड़ी अव्यवस्थितपणे खोडावर येतात असे नाही. त्यांच्या येण्याची एक व्यवस्थित रचना असते व ती रचना त्या वनस्पतींमध्ये बहुधा नेहमी आढळते. आगंतुक कारणांनी अगर झाडांच्या कांड्यांत अथवा अंतरकांड्यांत वाढी संबंधानें कमी अधिक फरक झाल्यामुळे कदाचित पानांच्या नेहमीच्या मांडणीमध्ये बदल पडतो. पण हा बदल कायमचा अगर सार्वत्रिक नसतो. कायम व्यवस्थित मांडणी पानामध्ये असणे अगदी अवश्य आहे. जर व्यवस्थित मांडणी नसेल. तर त्यापासून पुष्कळ नुकसान आहे. पानास नेहमी सूर्यप्रकाश सारखा व्यवस्थितपणे मिळणे हे अधिक श्रेयस्कर असते. क्षुद्र वर्गातील कांहीं वनस्पतीस सुर्यप्रकाशाची फारशी जरूरी नसते व त्यांपैकी काहीं तर सूर्यप्रकाश म्हणजे आपला शत्रु असे समजतात. व्यवस्थित मांडणीमुळे पानांस प्रकाश सारखा पोहोचतो. नाहीं तर कांहीं पाने सूर्यप्रकाशाकडे नेहमी वळलेली राहतील, व कांहीं पाने छायेत राहिल्यामुळे फिकट किंवा रोगट दिसु लागतील. कांहीं पाने प्रकाशांत फार तापली जातील व कांही पानें छायेमुळे निरुपयोगी बनतील, श्रमविभागाचे तत्त्व अशा ठिकाणी बिलकूल राहणार नाही. ज्या पानांस फार काम करावे लागते ती लवकरच थकून कामाच्या नालायक होतील, व ज्यांस अगदीच काम नसते ती बोलून चालून निरुपयोगी आहेतच. म्हणूनच अव्यवस्थित मांडणी झाडावर असतां कामा नये, सृष्टिदेवतेने ही गोष्ट लक्ष्यात ठेवूनच पानाच्या सुव्यवस्थित मांडणीची सोय केली आहे. छायेखालीं न येणे किंवा प्रकाश सारखा मिळणे, हे साधण्याकरितां सृष्टिदेवतेने पुष्कळ उपाय केले असतात. कांहीं पानास देठाची योजना करून ते पान खोडापासून वर उचलले असते, किंवा काही ठिकाणीं देंठाचा अभाव असतो. कांहीं झाडांच्या फांद्या उभ्या सरळ येतात, तर काहींच्या आडव्या असून पाने त्यावर सारखी पसरतात, व कांही वनस्पतीमध्ये अंतरकांडी अगर पेरी दीर्घ अगर संकुचित केली असतात. ह्यामुळे पाने कधी कधी जमिनीवर झुपका
६ वे ].     पर्ण Leaf.     ४५
-----

करतात. पण झुपक्यामध्ये सुद्धा एकमेकांच्या छायेखालीं न सांपडतील व सर्वांस सूर्यप्रकाश सारखा मिळेल, अशी तजवीज असते. ह्यामुळे प्रत्येक झाडावरील पानांच्या मांडणीत त्यांच्या परिस्थितीप्रमाणे फरक आढळतो.

 मांडणीचे मुख्य प्रकार:-१. एक झाल्यावर एक. (Alternate ) २. समोरा समोर. (Opposite) ३. वर्तुळाकृती (Whorled). आंबा, तीळ, गुलाब, वगैरेमध्यें पाने एक झाल्यावर एक येतात. प्रथम एक पान एका बाजूस येऊन त्याचे दुसरे बाजूस दुसरें पान येते. मका, बाजरी, वेळू, लोकॅॅट वगैरे उदाहरणे ह्या प्रकारची आहेत. ।

 हीं पाने काल्पनिक मळसूत्राकृतीमध्ये येऊन केव्हाही दोन पाने खाली अगर वर एकमेकांच्या डोक्यावर येतात. उदाहरणार्थ आपण निंबाची पाने तपासू. हीं पाने मळसूत्राकृतींमध्ये आली असून एका विशिष्ट पानापासून वर मोजीत गेले असता सहावे पान बरोबर त्याचे डोक्यावर येते. ते विशिष्ट पान सोडून पुढे तपासलं तर कोणतेही पहिलें व सहावें पान परस्पर एकमेकांच्या खाली व वर सरळ लंब रेषेत येते, व त्यामध्ये दोन काल्पनिक मळसूत्राकृती वर्तुळे पुरी होतात. अशा रीतीने त्या दोन पानांचे अंतर वर्तुळाच्या अंशांत दाखविता येते. पुष्कळ द्विदलधान्य वनस्पतिमध्ये ह्या प्रकारची मांडणी आढळते, अशोक झाडांत तिसरे पान, मुळपानांवर लंब रेषेत येते. नास्पाती, सफरचंद वगैरेमध्ये पांचवें पान मूळ पानांवर येते. कित्येक ठिकाणी आठवें व कित्येक ठिकाणी तेरावें पान मूळ पान सोडून लंब रेषेत येते.

  रुई, मांदार, तुळशी वगैरेमध्यें पाने समोरा समोर येतात. मांदाराची पानें सुद्धा मळसूत्राकृतीमध्ये रचलेली आढळतात. म्हणजे पानाची जोडी एक सोडून एक अशी एकमेकांच्या डोक्यावर येते. येथे एका पानाचे ऐवजी पानांची जोडी मळसूत्राकृतींत रचिली असते, एवढाच काय तो फरक.

 कण्हेर, रसूलिया, छतावर, हमेलिया वगैरेमध्यें पाने एका सांध्यापाशी पुष्कळ आल्यामुळे वर्तुळाकृतींत होतात. एका सांध्यापाशी एकच पान आलें असते तर एक झाल्यावर एक अशी पाने आली असती, पण पुष्कळ पाने एका ठिकाणी येतात म्हणूनच वर्तुलाकृती मांडणी असा भेद केला आहे.

४६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
रुई, मांदार वगैरेमध्ये जी दोन पाने समोरासमोर येतात, तीसुद्धा एकाच सांध्यापासून निघाली असतात. ह्या दृष्टीने पाने ' समोरासमोर ' येणारा वर्ग वर्तुलाकृती सदराखाली येईल. पानांचा व फांद्यांचा संबंध अगदी निकट असतो. कारण पानांशिवाय फांद्या येणे अगदी अशक्य असते, म्हणून जी मांडणी पानांमध्ये आढळते, त्याच प्रकारची मांडणी फांद्यांमध्ये असते. एवढेच नव्हे तर फुलांचे मोहोर व तत्संबंधी रचना ह्यांचाही संबंध पानांच्या मांडणीशी जुळतो.

 पानांची अन्य स्वरूपः-हॉली, बारबेरी वगैरेमध्यें पार्ने कांट्यासारखी असतात. बारबेरीमध्यें पाने बुडाशी साध्या पानासारखी असून अग्रांकडे कठीण कांट्याप्रमाणे बनतात. घायपातीमध्ये सुद्धा अग्र कठीण दाभणासारखे झाले असते. कंटककोष्ट ( Thorn ) कंटकपर्ण ( Spine ) व त्वककंटक (Prickle) ह्यांमधील परस्परभेद पूर्वी दिलेच आहेत. पर्णकंटक बारबेरीमधलं कांट्यासारखी पाने होत.

 ग्लोरिओसा सुपरबा, नांवाचा एक वेल आहे. त्याची पाने अग्रांकडे धाग्यासारखी असतात. ही पाने वेलास वर चढण्याकरिता उपयोगी पडतात. म्हणूनच असल्या पानांस ' सूत्रपर्ण' हे नांव योग्य आहे. लाख, वाटाणे वगैरेमध्ये पानांचा अग्राजवळील पत्रे सूत्रमय असतात. ह्यांचाही इतरांप्रमाणे उपयोग आश्रयांवर चढण्याकरितां होतो. कांहीं पानांचे देठ वांकडे होऊन सूत्राप्रमाणे उपयोगी पडतात, जसे-चढणा-या अन्टीराह्यनम् सोलॅनमू, जास्मि नाइड्स वगैरे रान जाईमध्ये पाने वळसे घेऊन वर चढतात; त्यामध्ये सूत्रे वगैरे असत नाहींत.

 ज्या पानांचे पोटांतून फुलांचे मोहोर, अगर पुष्पदांडी उत्पन्न होते, त्या पानांस उपपुष्पपत्रं (Bracts ) असे म्हणतात. असल्या उपपुष्पपत्राचे रंग निरनिराळे असतात.

 मांसहारी पानांचे आकार, त्यांचे देठ तसेच त्यावर येणारे विशिष्ट केस हे चमत्कारिक असून त्यांच्या विशिष्ट जीवनचरित्रास उपयोगी पडणारी ती पाने आहेत, ह्यांत संशय नाहीं.

---------------