वनस्पतिविचार/सजीव व निर्जीव वस्तूंची मीमांसा

विकिस्रोत कडून



वनस्पतिविचार.
---------------
प्रकरण १ लें.
---------------
सजीव व निर्जीव वस्तूंची मीमांसा

 पृथ्वी कांहीं विशिष्ट वस्तूंची बनली आहे व प्रत्येक वस्तु तीन स्वरूपांमध्यें असू शकते. ही स्वरूपें वायु, द्रव व घन होत. ही स्वरूपें प्रत्येक वस्तूस कमीअधिक उष्णतेच्या मानाने प्राप्त होतात. नेहमीचे उदाहरण-पाणी हे घ्या. ह्यास ही तिन्ही रूपे कमी अधिक उष्णतेप्रमाणे देता येतात. पाण्याचें बर्फ, त्याची वाफ, अगर वाफेचे पाणी, अथवा पुनः बर्फ, इत्यादि रूपे पाणी ह्या वस्तूस फारच थोड्या प्रयासाने देता येतात. आतां पृथ्वीवरील सर्व वस्तूंचा विचार केला असतां आपणांस असे आढळून येईल की, कांहीं वस्तु वायुरूपांत, कांहीं द्रवरूपांत व कांहा घनस्थितीत असतात. उदाहरणार्थ, वातावरण, समुद्र, डोंगर, वगैरे.

 पुष्कळ शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की, हें सर्व विश्व प्रथम अत्युष्ण वायुरूपीं होतें व ह्या वायुरूप विश्वास चक्रगति प्राप्त झाली होती. चक्रगतीबरोबरच केंद्रोत्सारिणी ( Centrifugal ) शक्ति उत्पन्न होत असते. शेतकरी गोफणींत दगड घालून दोन तीन वेळां गोफण फिरविल्यावर आंतील दगड फार जोराने फेकू शकतो. प्रथम शेतकरी गोफणीस चक्रगति देतो. जसजसा चक्रगतीचा जोर अधिक होतो, त्या प्रमाणात केंद्रात्सारिणी शक्ति अधिक वाढते. ह्या नियमान्वये गोफणींतील दगड वेगाने दूर जातो. तद्वतच ह्या अत्युष्ण चक्रगति प्राप्त झालेल्या वायुरूप गोलापासुन शेंकडों लहान लहान वायुरूपीं गोल दूरवर फेंकिले गेले. अशा दूरवर फेंकिलेल्या गोलांपैकी पृथ्वी हा एक गोल आहे.

     वनस्पतिविचार,     [ प्रकरण
-----

 सृष्टिनियम असा आहे की, प्रत्येक वस्तूंतून उष्णता आकाशांत सर्व दिशेला जाते. यामुळेच सुर्यमंडळापासून सर्व दिशेला उष्णता जात आहे. ह्या नैसर्गिक नियमान्वयें त्या दूर फेंकिलेल्या वायुरूपीं पृथ्वी-गोलापासून उष्णता आकाशांत Space नाहीशी होत गेली. अशी उष्णता जात चालल्यावर त्या गोलावरील ज्या वस्तूंना वायुरूपांत राहण्यास उष्णता कमी झाली, त्या वस्तु द्रवरूपांत जाऊ लागल्या. अशा द्रवरूप पावलेल्या वस्तु गोलाच्या मध्यभागांकडे जमत जाऊन, त्यावर द्रवरूपी नवीन आवरणे येत चालली. ह्यांपैकी कांहीं आवरणांना कालांतराने घनस्थिति येत गेली. पृथ्वीचा पृष्ठभाग ह्याच आवरणांपैकी घनत्व पावलेला जड भाग होय. पृथ्वीच्या पोटांत वरील जाड कवचाखाली अजूनही अत्युष्ण द्रवरूप वस्तु आहेत. हे ज्वालामुखी पर्वत, त्यांतून वाहणारा पाषाणरस, भूकंप, इत्यादि प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टींवरून स्पष्ट व्यक्त होत आहे. सारांश, पृथ्वी ही पूर्वी वायुरूपांत असून नंतर जशी जशी उष्णता कमी झाली, तशी तशी ती द्रवरूपांत जाऊन मागाहून घनरूपांत येत गेली. हल्लीच्या उष्णतेच्या मानाने जे पदार्थ वायुरूपांत राहणे शक्य आहेत, ते त्या स्थितीत आहेत. त्या पदार्थांचेच पृथ्वीसभोवतालचे वातावरण झाले आहे. जे पदार्थ द्रवरूपांत राहणे शक्य आहे, ते आपण द्रवस्थितीत पाहतों; जसे पाणी वगेरे, तसेच राहिलेल्या पदार्थांचे डोंगर, जमीन, वगैरे पृथ्वीचे घनरूप भाग होत.

 एकंदरीत आपली पृथ्वी विशिष्ट रूपांत असलेल्या निरनिराळ्या वस्तूंची बनली आहे. वरील सर्व वस्तूंचे बारकाईने निरीक्षण केले असता त्या दोन प्रकारच्या आहेत असे आपणांस आढळून येईल. १ निर्जीव वस्तू व २ सजीव वस्तु. दोहोंमध्ये पुष्कळ फरक आहे. निर्जीव वस्तूचे पुष्कळ कण एके जागी जमून ती वस्तु वाढत असते. वाळू ही निर्जीव वस्तु आहे. वाळूचे कण एके ठिकाण मिळून त्यांचा दगडासारखा थर बनतो. नवीन कण सारखे जमत गेले असता थरांवर थर होत जातील. असे थर जमून एक मोठा पाषाणसमुच्चय तयार होईल, भूकंप, तसेच पृथ्वीच्या कवचांतील अंतर घडामोडीने हा समुच्चय वर उचलला जाऊन टेकडी अथवा डोंगरही तयार होतील. असे डॉगर जवळ जवळ तयार झाले, तर पर्वतांची रांग अगर ओळ बनेल. त्याचप्रमाणे उलटपक्षी भूकंप, भूगर्भातील अंतर घडामोडी, सूर्यकिरणें, पर्जन्य, हवा, थंडी, इत्यादि
१ लें ]     सजीव व निर्जीव वस्तूंची मिमांसा.     

-----

कारणांमुळे ह्या पर्वतांची कालांतराने पूर्ववत् वाळू बनेल, म्हणजे पूर्वीच्या वाळूत कोणत्याही प्रकारचा रासायनिक फरक न होतां फक्त कणांच्या कमी-अधिक संख्येप्रमाणे बाह्यदृश्य आकारांत फरक होत असतो.

 आतां सजीव पदार्थांचा विचार केला असता असे आढळेल की, त्याही पदार्थांस वाढ असते. बीं जमिनीत पेरून त्यास माफक ओलावा देण्याची व्यवस्था केली असता त्यापासून अंकुर फुटू लागतात. प्रथम लहान रोपा तयार होऊन पुढे त्यावर पाने, फांद्या, कळ्या, फुले, फळे, वगैरे क्रमाक्रमाने येत जातात. कदाचित तो रोपा अति मोठा होऊन त्याचा वृक्ष तयार होईल, अथवा लहानच झुडुपासारखा राहील. कांहीं काल तो वृक्ष अगर रोपा वाढत जाऊन त्यावर पाने, फुलें, वगैरे येत जातील. नंतर तो वृक्ष जुना होऊन, सृष्टिनियमानुसार त्याच्या फांद्या सुकू लागतात. हळू हळू तो वृक्ष जसा आला तसा समूळ नाहीसा होऊन जातो. खरोखर वृक्षांची वाढ म्हणजे विशिष्ट वस्तूंची वाढ असते. पण त्या वस्तूंच्या मूलस्थतीत व मागाहून वृक्षाच्या स्थितीत महदंतर असते. शेंकडों निरनिराळी रासायनिक कार्ये त्यावर घडून त्याचे स्वरूप अगदी बदलून गेले असते. जमिनीच्या मातीपासून अथवा वातावरणांतील वायूपासून वृक्षाची रचना होत असते खरी; पण मातीचे रूप अगर वातावरणांतील वायुतत्त्वें वृक्षांत जशीच्या तशीं सांपडणार नाहींत. माती अथवा वायु तत्वें निर्जीव असून वृक्षाच्या शरीरांत त्यांचे सात्मीकरण ( assimilation) होऊन त्यापासून जीवनकार्ये घडू लागतात. सजीव वस्तूस निर्जीव पदार्थांना आपलेप्रमाणे करण्याची शक्ति आहे. अशी शक्ति निर्जीव पदार्थांमध्ये नसते. निर्जीव वस्तूंची वाढ म्हणजे पुष्कळ निर्जीव कणाचे एकीकरण होय. त्याचे विघटीकरण केले असता त्यांत रासायनिक फरक झालेले दिसत नाहींत. ज्या स्थितीत त्यांचे एकीकरण होते, त्याच स्थितीत त्यांचे विघटीकरण होते. सजीव वस्तु निर्जीव वस्तूंचे एकीकरण करून त्यांस सजीवत्व आणितात. ह्या कार्यात आवश्यक रासायनिक फरक, तसेच इतर मिश्रीकरणे होत असतात.

 हे सजीव तत्त्व दोन तऱ्हेने दृश्य झालेले आहे. दोन्हींचा प्रथम ओघ सारखाच असून पुढे ते दोन्ही ओघ अगदी उलट दिशेने गेल्यामुळे त्यांत अत्यंत
     वनस्पतिविचार,     [ प्रकरण
-----

फरक दिसू लागले. दोन्हींचे आद्य व अंतिम हे सारखेच. जनन, पोषण व मरण ही दोन्हीला सारखीच. पहिलें सजीव तत्त्व म्हणजे वनस्पति व दुसरें सजीव तत्त्व, प्राणी हे होय.

 रोपा, बीजापासून उत्पन्न झाल्यावर जमीनीतून, तसेच हवेतून, पाणी व अन्नद्रव्ये त्यास मिळवावी लागतात. फुले, फळे, व बी उत्पन्न होऊन शेवटी तो रोपा मरून जातो. तद्वतच प्राणी जननीपासून उत्पन्न होऊन कांही दिवस तिजवर पोषणासाठी अवलंबून राहतो. कांहीं काल लोटल्यावर त्यास स्वतंत्रपणे पोषणाची सोय करितां येते. शेवटीं तो जगांत होता ह्याची ओळख ठेवून नाहीसा होतो. म्हणजे जनन-मरणादि साधारण नियम दोन्ही, वनस्पति व प्राणी ह्यांस सारखेच लागू आहेत.

 आंब्यापासून आंबे, पेरूपासून पेरू, हरभऱ्यापासून हरभरे, शिरसापासून शिरस, तसेच गव्हांपासून गहूं उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे प्राणिवर्गामध्ये गाईपासून गाई, घोड्याासून घोडे, मांजरापासून मांजरे, मनुष्यापासून मनुष्यें उत्पन्न होतात. म्हणजे ज्याप्रकारचे पूर्व सजीवतत्त्व असेल, त्याप्रकारचे बीज त्यांपासून उत्पन्न होते. सजीव वस्तूंपासून सजीव वस्तु उत्पन्न होते व ती मुख्य तत्त्वांत आपल्या पूर्व तत्त्वाप्रमाणे असते, यांत संशय नाहीं. बाह्य गोष्टीमुळे कदाचित् क्षुल्लक बाबींत थोडा फरक दिसेल, पण हा फरक विशेष नसतो.परिस्थितीप्रमाणे आकारसादृशांत फरक पडत जाईल. कदाचित हा आकारसादृश्याचा फरक आनुवंशिक होत जाऊन त्यापासून जाति, उपजाति, पोटप्रकार बनतील, पण ही स्थिति येण्यास युगानुयुगे लागतात. डार्विन साहेब उत्क्रांति मधल्या सूक्ष्म फरकामुळेच विचित्रकोटी प्राणी अथवा वनस्पति झाल्या असे लिहितो. मानव कोटीची पहिली स्थिति माकडासारखी असावी असे तो अनुमान काढितो. मानव जातीचे पूर्वज माकडे आहेत हे जरी गृहीत धरून चाललें, तथापि तो काल कल्पनातीत आहे. शिवाय माकडापासून फरक कसे होत गेले हे दर्शविणाऱ्या मधल्या पोटजाति जितक्या असावयास पाहिजेत तितक्या नाहींत. खरोखर माकडाची जात कमी असून मध्ये पोटजातींचा भरणा अधिक असला पाहिजे; पण त्याचे उलट दिसत आहे. मधल्या साखळीचा उलगडा चांगला होत नाही, म्हणूनच बीज तसे अंकुर हे सिद्धतत्त्व आहे, असे समजण्यास सार्वत्रिक हरकत नाही.

१ लें ].     सजीव व निर्जीव वस्तूंची मिमांसा.     
-----
,

 एकाच जमिनींत निरनिराळ्या बीजापासून वेगवेगळे अंकुर फुटतात. जमिनीतील घटकद्रव्ये सारखी असली, किंवा बाह्यपरिस्थिति सारखी केली, अथवा सर्वांची निगा सारखी घेतली, तरी सुद्धा बीजांतील सजीवतत्त्वे आपल्या पूर्व जातींवर जातात, हे लक्ष्यात ठेवण्यासारखे आहे. निर्जीव वस्तूपासून सजीववस्तु कधी उत्पन्न होत नाहीं. दगडापासून अथवा मातीपासून वनस्पति अगर प्राणी कधी उत्पन्न झाले नाहीत. मात्र सजीव वस्तु, निर्जीववस्तू आपल्या शरिरात घेऊन त्यावर निरनिराळी रासायनिक कार्ये करून त्यांस आपले प्रमाणे एकजीवित्व आणू शकते. वनस्पति जमिनीतील निर्जीव क्षार शोधून त्यापासून स्वशरीर वर्धन करीत असते.

 प्रथम सजीववस्तु कशी उत्पन्न झाली ह्याविषयी मतभेद आढळतो. कांहीच्यामते एकंदर काल असा आला की, ज्यामध्ये माफक उष्णता, माफक शीत व माफक इतर द्रव्ये मिळून त्यांपासून सजीववस्तु निर्माण झाली, म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे निर्जीववस्तूपासून सजीववस्तु उत्पन्न झाली. ते म्हणतातः-त्या कालांत उत्पन्न झालेल्या सजीववस्तूंपासून पुढे क्रमाक्रमाने नवीन सजीववस्तू तयार होऊन परिस्थित्यनुरूप विचित्र सजीव सृष्टि बनत गेली. विशेषेकरून नास्तिकवादी ह्या मताचा अनुवाद करितात. जरी पहिली सजीववस्तु निर्जीववस्तुपासून बनली, तथापि हा व्यवहार पुढे तसाच सारखा राहिला आहे असे मात्र म्हणता येणार नाहीं. ' सजीववस्तु, सजीववस्तुस निर्माण करते' हें तत्त्व अबाधित आहे.

 आतां वरील वनस्पति व प्राणी ह्यांपैकी वनस्पतिवर्ग प्रथम अस्तित्वांत आला असला पाहिजे. प्राणिवर्ग नेहमी वनस्पतिवर्गावर अवलंबून असतो. वनस्पतिवर्गाने अन्न उत्पन्न करावे, व त्यांवर प्राणिवर्गाने खुशाल उपजीविका करावी. वनस्पतिवर्ग जमिनीतील निर्जीव क्षारांपासून अन्नद्रव्ये तसेच वातावरणांतील आवश्यक वायूरूपी द्रव्ये शोषण करून आपले शरीरांत त्यापासून खरे अन्न तयार करतो. पण ही स्थिति प्राणिवर्गाची नसते. प्राणिवर्गास जमिनीतील निर्जीव क्षारापासून अन्न तयार करता येत नाहीं. अन्नाकरितां त्यास नेहमी वनस्पतिवर्गाकडे पहावे लागते. परमेश्वराने प्राणिवर्गाची निर्वाहाची साधने तयार करून नंतर प्राणिवर्गास जन्मास घातले.

     वनस्पतिविचार,     [ प्रकरण
-----

'प्रथम तरतूद व नंतर उत्पत्ती' असा सृष्टिनियम ठरलेला आहे. तदनुरूप वनस्पति व प्राणि या दोहोंची परंपरा दिसते.

 तसेच भूगर्भ शास्त्रवेत्ते म्हणतात की, हृल्ली वातावरणांत जे कार्बन आम्लवायूचे सूक्ष्म प्रमाण आढळते, ते प्रमाण पूर्वी एका काळी फार अधिक होते. त्या काळी वनस्पति फार जोमाने वाढून त्यांचा विस्तार हल्लींपेक्षा फार मोठा असे, पूर्वी जोमाने वाढलेल्या वनस्पति कालगतीने जमिनीत पुरल्या जाऊन त्यांवर वजनदार खनिज पदार्थांचे दडपण पडल्यामुळे त्यांचे खाणीत सांपडणारे दगडी कोळसे तयार झाले. दगडी कोळसे केव्हा तयार झाले, हे जरी ठाम सांगता येत नाही, तथापि त्यांच्या उत्पत्तीचा काल फारच प्राचीन असावा ह्यात संशय नाही. ज्या कालीं कार्बन आम्लवायूचे प्रमाण वातावरणात अधिक होते, तो काल प्राणिवर्गाच्या जीवनसूत्रास प्रतिकूल असला पाहिजे. कारण प्राणिवर्गाची जीवनसूत्रे कार्बन वायूमध्ये चांगली चालत नाहीत; पण उलटपक्षी तो वायु वनस्पतीस फार हितावह असल्यामुळे त्यांची वाढ त्या काळीं अधिक जोमाची होती.

 यावरून एवढे खास म्हणता येईल की, वनस्पतींच्या अनुकूल कालांत प्राणिवर्गाची प्रगति फार कमी असून त्यांचे अस्तित्वही फार थोड्या प्रमाणात असावे असे ठरते, तसेंच जर प्राणिवर्गाचे अस्तित्व त्यावेळी फार थोडे होते, तर असें कां म्हणू नये, की प्रथम वनस्पतिवर्ग अस्तित्वात येऊन तिच्या अनुकूल कालांत त्या वर्गाची वाढ अतिविस्तृत झाली, व त्याबरोबरच नुकती कोठे प्राणिवर्गाच्या अस्तित्वास सुरुवात झाली होती. सारांश, वनस्पतिवर्ग प्रथम अस्तित्वात येऊन मागाहून प्राणिवर्ग उत्पन्न झाला असे म्हणता येईल.

 उत्कांतिनियमानुसार प्रथम साधी व सरळ सृष्टि उत्पन्न होऊन नंतर त्यांत कमी-अधिक फरक होत गेले. फरक होत असतांना क्रमाक्रमाने आश्चर्यकारक संकीर्णता सृष्टिरचनेत येत गेली. या सिद्धतत्वाप्रमाणे वनस्पतिकोटी प्राणिकोटीपेक्षां प्रथम निर्माण झाली असली पाहिजे. कारण प्राणिवर्गापेक्षां वनस्पतिकोटी साधी व सुलभ रचनेची आहे. प्राणिकोटीमध्ये अधिक दुर्गम व संकीर्णरचना दृष्टीस पडते, म्हणून प्राणिवर्गाची उत्पति नतर झाली असावी.

१ लें ].     सजीव व निर्जीव वस्तूंची मिमांसा.     
-----
,

 कनिष्ट प्राणिवर्गामध्ये तसेच कनिष्ट वनस्पतिवर्गात बाह्यदृष्ट्या कोणताही फरक नाही. त्या दोहोंत चलनवलनशक्ति थोडी अधिक असते. डायटम् (Diatom ), डेस्मिड ( Desmid ) वगैरे एक-पेशीमय वनस्पति पाण्यांत इकडे तिकडे धांवत असतात. अॅमिबा नांवाचे शुद्ध एकपेशीमय प्राण्यास वरील प्रकारची गति असते. जनन, बाल्यदशा, तारुण्य, जन्म व मरण हीं दोहोंस साधारण आहेत. दोहोंचे शरीर पेशीमय असते. कदाचित् ते एकपेशीमय अथवा बहुपेशीमय असू शकेल. जसजसे त्यांच्या उच्चवर्गाकडे लक्ष्य द्यावे, तसतसे त्यामध्ये अधिकाधिक फरक दिसू लागतात. उच्च वनस्पतिवर्गास चलनशक्ति नसून त्यास एका जागेपासून दुसरे जागी जाणे शक्य नसते. पण उच्च प्राणवर्गात ती चलनशक्ति पूर्णावस्थेस पोहोचली असते. अन्नग्रहण करण्याची रीत दोहोंची वेगवेगळी असते. वनस्पतीस अन्नद्रव्ये कधीही घनस्थितीत शोषतां येत नाहीत. जमिनीतील क्षार पाण्यात पूर्णपणे विरघळल्यानंतरच त्यांस शोधितां येतात; पण उच्च प्राणी बहुतेक अन्न घनस्थितीतच खातात. जमिनीतून क्षार व पाणी तसेच हवेतून वायु, वनस्पति मुळान्वयें व पर्णद्वारे शोषून घेतात, पण त्यांचे वास्तविक हे खरे अन्न नसून ती केवळ अन्नद्रव्ये होत, त्यांपासून शरिरांत निराळे सात्त्विक अन्न तयार करावे लागते. पण प्राणी जें म्हणून खातो ते त्याचे भक्ष्यच असते, त्यास निराळे या अन्नापासून सात्विक अन्न शरीरात तयार करावयाचे नसते. प्राणकोटी अधिक संकीर्ण रचनेची असल्यामुळे त्यात फुफ्फुसे, रुधिराभिसरण व्यवस्था, काळीज, अन्नरसनळी वगैरे पूर्ण सोय असते. अशी व्यवस्था वनस्पतिवर्गात नसते. मग ती वनस्पति उच्च वर्गीय किंवा क्षुद्रवर्गीय असो. ज्ञानतंतुरचना उच्च प्राणिवर्गात पूर्णत्वास गेल्यामुळे, त्यांस कोणत्याही प्रकारचे ज्ञान चटकन होते. मनुष्यप्राण्यास जे श्रेष्ठत्व आहे ते त्याच्या श्रेष्ठ ज्ञानतंतुरचनेमुळेच होय. श्रेष्ठ पदवी केवळ आकार, वजन अथवा विस्तार ह्यांवर नसून अंतरसंकीर्ण ज्ञानतंतूवर आहे. आतां उच्च वनस्पतिवर्गातसुद्धा ही ज्ञानतंतूरचना फार सुक्ष्म प्रमाणात असावी, असे वाटते. ह्या बाबतीत वनस्पतिवर्ग प्राणिवर्गापेक्षां फारच मागे आहे, असे म्हटले पाहिजे.

 आता कोणत्याही विषयासंबधी भरपूर सुसंबद्ध माहिती म्हणजे त्या विषयाचे शास्त्र झाले असे समजण्यास हरकत नाही. शास्त्रांत सर्व बाजूंनी व सर्व दृष्टींनी
     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

 विचार करून एकत्र केलेली माहिती असते. पुष्कळ लोकांचे अनुभव, त्यांचे शोध, त्यांचे विचार एकत्र करून निरनिराळ्या दिशेने त्या विषयावर नवीन प्रयत्न करणे म्हणजे त्या विषयाच्या शास्त्राचा अभ्यास करणे हे होय, भौतिक शास्त्र केव्हाही परिपूर्ण झाली नाहीत अशी शास्त्रे पूर्णावस्थेस पोहोंचली असे म्हणणे म्हणजे, आपलें अज्ञान प्रगट करणे होय. रोज रोज नवीनं चमत्कार आढळतात. त्या चमत्कारांची योग्य मिमांसा करणे मोठे कठीण असते. चमत्कारांचे कोडे उलगडणे म्हणजे तत्संबंधी पूर्ण ज्ञान होणे होय. उपलब्ध ज्ञान संपादन करून नवीन ज्ञानाची भर पूर्वीच्या ज्ञानांत घालणे फार प्रयासाचे आहे; व ह्याहून अधिक प्रवासाचे काम कोडें उलगडण्याचे आहे. विशेषेकरून जीवनशास्त्रासंबंधी अधिक अज्ञान कबूल करावे लागते. कारण त्या शास्त्राचे नियम केवळ एक दृष्टीने पाहतां उपयोगी नाहींत. त्या नियमांवर अम्मल करणारी निराळी चैतन्य शक्ती असते. साध्य व्यावहारिक गोष्टी कोणत्या आहेत व जीवनशक्तीच्या अंमलाखाली कोणत्या येणाऱ्या आहेत, हे समजावयास फार मुष्कील पडते.

 इतकी इतर शास्त्रीय मीमांसा झाल्यावर आपण आपल्या मुख्य विषयांकडे वळणे उत्तम आहे. आपणांस वनस्पतिशास्त्राविषयी विचार करावयाचा आहे, तर कोणत्या गोष्टींचे विवेचन त्या शास्त्रांत येणे जरूरीचे आहे, इकडे लक्ष्य देणे भाग आहे. 'वनस्पति' म्हणजे काय, ही कल्पना पूर्ण झाल्यावर त्यांची बाह्यरचना व अंतररचना याचा विचार करावयाचा आहे. बाह्यांग व अंतरंग माहिती झाल्यावर प्रत्येक अंग व अवयव कोणत्या कामास उपयोगी पडते, त्यापासून वनस्पतीस काय फायदा होतो, ती अंगें प्राणिमात्रांच्या अवयवांसारखी आहेत काय, त्यापासून तीच कार्ये घडतात काय, वगैरे गोष्टींची माहिती देण्याचा विचार आहे. वनस्पतीच्या निरनिराळ्या जाति, क्षुद्र वर्ग व उच्च वर्ग ह्यांतील फरक, पुष्पयुक्त अथवा पुष्परहित तरुवर्ग ह्यांच वर्गीकरण, तसेच परस्पर अवयवांचा संबंध व त्यापासून उत्पन्न होणारी उपयोगी द्रव्ये, यांचे वर्णन योग्यवेळी देण्यात येईल. बालसंगोपन, वंशवर्धन व शरीररक्षण ही तीन्हीं कार्ये कशी घडतात, व तत्संबंधी चमत्कार वगैरे गोष्टी, क्रमाक्रमाने वर्णन करण्याचा विचार केला आहे.

---------------