वनस्पतिविचार/मूळ

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
प्रकरण ४ थे.
---------------
मूळ Root.
---------------

 बीजापासून जमिनीत घुसणारा कोंब हा आदिमूळ ( Radicle) होय, त्यावर पुढे फांद्या फुटून पुनः फांद्यांवर पोटफांद्या येतात. मुळांचे अथवा फांद्यांचे अग्रांजवळ बारीक केंस येतात. हे केंस मुळास फार उपयोगी पडतात, ह्यांच्या द्वारे मुळे जमिनीतून पाणी व अन्नद्रव्ये शोषण करतात. मुळांवरील फांद्या अथवा पोटफांद्या ह्यांचे बारीक निरीक्षण केले असतां आपणांस असें आढळेल की, त्या फांद्या जणू मुळांचे अंग फोडून बाहेर आल्या आहेत, फांद्यांची उत्पत्ती बाह्य नसुन आंत खोल असते. अशा फांद्यांपैकी एखादी सरळ उपटली असतां मुळावर छिद्र पडलेले आढळते. त्यावरून स्पष्ट खात्री होते की, फांद्यांचा उगम खोल आहे.

 मूलावरण ( Rootcap )—मुळांच्या अग्रांवर जाड पापुद्यांचे वेष्टण असते. ह्या वेष्टणाचा मुळास उपयोग असतो. मुळाचा वाढता बिंदू ( Growing point ) ह्या वेष्टणामुळे रक्षिला जातो. हे वेष्टण निरनिराळ्या मुळांत निरनिराळ्या प्रकारचे आढळते. कोवळ्या मुळांत पिंगट रंगाचें वेष्टण असते. कधी कधी वेष्टणांचे पुष्कळ पापुद्रे मिळून जाड टोपीसारखा आकार मुळाचे अग्रासभोवती आला असतो, ह्यास मूलावरण ( Rootcap) म्हणतात. मुळे जमिनींत वाढू लागली म्हणजे साहजिक ती जमिनीच्या खरखरीत भागांत घुसतात. त्यांचा खरखरीत भागाशी संबंध असल्यामुळे मुळाशी अग्रें झिजून जातात; व असे झिजणे चालू राहिले तर आंतील वाढत्या अग्रास नुकसान पोहोचण्याचा संभव आहे. नुकसान पोहोचणे म्हणजे एक परीने झाडाच्या अवयवांपैकी एकास व्यंग करणे होय. अग्रे झिजू नयेत, म्हणून हे पापुद्रे अथवा त्यांवरील वेष्टणे ह्यांची योजना परमेश्वराने केली असते. हे पापुद्रे झिजून गेल्यावर आंतून नवीन पापुद्रे येण्याची व्यवस्था होत असते,


१८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

व येणेप्रमाणे वाढत्या बिंदूचे रक्षण होते. वरचेवर नवीन पापुद्रे उत्पन्न करण्याचे काम वाढते अग्र करिते. केवड्याचे झाडावरील लोंबत्या मुळांवर टोपीसारखें स्पष्ट आवरण असते. कित्येक मुळांत अग्र नुसते सुजलेलेंसे वाटते व हा सुजवटा संरक्षक पापुद्र्यामुळे येतो.

 मुळांचे प्रकारः–मुख्य मूळ नेहमी बुडाकडून अग्रांकडे निमुळते असून जमिनीत सरळ घुसत जाते. त्यावरील फांद्याही त्याच प्रमाणे अग्राकडे निमुळत्या असतात. कित्येक वेळां मुख्य मुळास 'किंकरी मूळ' (Tap root) ह्मणतात, कारण ते सुताराच्या किंकराप्रमाणे जमिनीत भोंक पाडून शिरते. कित्येक वनस्पतींमध्ये मुख्य मूळ सरळ जमिनीत न घुसतां त्या ऐवजी पुष्कळ लहान लहान तंतुमय मुळांचा पुंजका जमिनींत शिरतो. तंतुमय मुळे बहुतेक सारख्या आकाराची असून त्यांमध्ये मुख्य मूळ असे कोणतेच नसते. अशी मुळे एकदळ धान्य-वनस्पतींमध्ये नेहमी आढळतात. एकदळ धान्य-वनस्पति ओळखण्याची ही एक खूण आहे. जेव्हां केवल रोपा पाहून एकदल अथवा द्विदल धान्यवनस्पति ठरविण्याची असते, अशा वेळेस मुळे जर तंतुमय असतील तर वनस्पति एकदल असते. तृणजातींमधील वनस्पति, कांदे, लसूण, ताड, माड वगैरेमध्ये मुळे तंतुमय असतात. त्यांवरून ही सर्व उदाहरणे एकदलधान्यवनस्पतिवर्गीपैकी आहेत, हे निराळे सांगणे नको.

 आगंतुक मुळेः-नेहमी सर्व मुळे जमिनीत मुख्य मुळापासून उत्पन्न होतात, असें नाहीं. पुष्कळ वेळां खोड, फांद्या, तसेच पाने, ह्यांपासून मुळे फुटतात, वडाचे झाडामध्यें बुंध्यापासून अथवा फांद्यांपासून निघणारी मुळे नेहमी पाहण्यांत येतात. ब्रह्मी, स्ट्रॉबेरी, दुर्वा वगैरे वनस्पतींमध्ये फांद्यांपासून नवीन आगंतुक मुळे निघतात. पानफुटीमध्ये पानांच्या कडांपासून नवीन कळ्या उत्पन्न होऊन जेव्हां जमिनीत रुजतात त्यावेळेस त्यांपासून मुळ्याही सुटतात. त्यावरून त्यास ' पानफुटी अथवा पर्णफुटी,' हे नाव पडले.

 ही मुळेसुद्धा जमिनीत घुसणाऱ्या मुख्य मुळाप्रमाणे वनस्पतीस उपयोगी पडतात. काही ठिकाणी मुख्य झाडास बळकटी अशा मुळांकडून मिळते. ह्यांचे द्वारे कांहीं वनस्पति अन्नग्रहण करितात, व कांहीं आपल्या मुळांत अन्नसांठा कृरितात, सारांश मुख्य मुळे व ही आगंतुक मुळे ह्यांमध्ये फरक कांहीं नसतो. 
४ थे ].     मूळ Root.     १९
-----

अशा आगंतुक मुळांस 'अस्थानोदूत (Adventitious ) मुळे म्हणतात कारण ती आपली नेहमीची जागा सोडून खोडावर अथवा फांदीवर येतात. हे नांव अशा मुळास यथार्थ आहे. तंतूमय मुळेसुद्धा ह्याच सदराखाली येतात. गव्हाचा रोपा एका बीजापासून उत्पन्न होतो, पण त्यास पुष्कळ फांद्या येतात, व प्रत्येक फांदीचे बुडी तंतुमय मुळे आढळतात. ही सर्व तंतुमय मुळे मिळून एक पुंजका बनतो. फांदीपासून मुळे येतात, म्हणून ती अस्थानोद्भूत आहेत, उसाच्या कांड्यापासून आगंतुक तंतुमय मुळे निघालेली नेहमी पाहण्यांत येतात.

 मांसल मुळेः–पावटा, तूर, मोहरी, बाभूळ, सिसव, इत्यादि वनस्पतींमध्ये एक मुख्य मूळ असून त्यापासून दुसरी पोटमुळे फुटतात. मुख्य मूळ हें आदिमूळ ( Radicle ) वाढूनच तयार होते. वरील उदाहरणांत मुळे टणक असतात, पण गाजर, चुकंदर, सलजम, मुळा, वगैरे वनस्पतींत मुळे टणक नसून लबलबीत अगर मांसल असतात. मांसल मुळ्यांचे आकार वेगवेगळे असतात. गाजर बुडाशी वाटोळे असून अग्राकडे निमुळते होत जाते. मुळे अगर चुकंदर बुडाशी किंचित् वाटोळे असून खाली मोठे होतात व पुनः अग्राकडे गांजराप्रमाणे अणकुचीदार होतात. सलजमाचे वूड रुंद व वाटोळे असून ते एकदम शेंड्याकडे निमुळते होते. आर्किडमध्ये मुळ्या गांठदार वाटोळ्या व लांबट असतात. कधी कधी ती मुळे हस्तसदृश असून हातांस असणारी बोटे, अगर त्यांसारखे भाग ही त्यांमध्ये आढळतात. राताळी मोठी असून दोन्ही टोकांस किंचित निमुळती असतात. वरील उदाहरणापैकी राताळी मात्र आगंतुक मुळ्या आहेत. राताळ्यांचे वेल जमिनीवर पसरून जागजागी कांड्यापासून ही मुळे फुटतात, व ती वाढत मोठी होतात. मुळा, गाजर, सलजम वगैरे मात्र आदिमूळापासून वाढल्या कारणाने ती आगंतुक नाहीत, ती केवळ मांसल वर्गापैकी आहेत.

 सर्व मांसल मुळांमध्ये वनस्पति कांहीं विशिष्ट प्रकारचे अन्न सांठवितात, ह्या साठविलेल्या अन्नाचा उपयोग वनस्पतीस जरूरीच्या प्रसंगी होत असतो. कित्येकांत सत्त्व Starch, कित्येकांत साखर Sugar', कित्येकांत नायट्रोजन युक्त द्रव्ये आढळतात. वनस्पतिवर्ग मेहनत करून काटकसरीने पुढील तरतुदीकरितां ह्या अन्नाचा सांठा करितात, प्राणिवर्ग हरप्रयत्न करून त्या संचित
२०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

अन्नाचा उपयोग आपणाकडे करितो, त्यामुळे वनस्पतींची मेहनत व दूरदुर्शीपणा ही दोन्ही व्यर्थ होतात. मुळे हीच केवळ अन्नाची कोठारे नसून वनस्पतीची इतर अवयवे सुद्धा ह्या कामाकरिता उपयोगी पडतात. खोड, पाने, फळे, अगर बीजें, ह्या सर्वांमध्ये मुळाप्रमाणेच अन्नसाठा केला असतो.

 आगंतुक मुळ्यांचे वेगवेगळे प्रकार असून त्यांचा उपयोग निरनिराळा असतो. आयव्हीं अथवा बिग्नोनिया, हे वेलवर्गापैकी आहेत. त्यांचा धर्म भिंतीचा अथवा दुसरे वनस्पतीचा आश्रय घेऊन वर चढण्याचा असतो. चढण्यास सुलभ पडावे म्हणून कांड्यापाशी जागजागी आगंतुकमुळे फुटून ती भिंतीत अथवा आश्रयाचे जागीं घुसतात. असल्या आगंतुक मुळ्यांचा चढण्याकडे चांगला उपयोग होतो. पिंपळीचा वेल भिंतीवर चढतो; ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची आगंतुकमुळे फुटतात. जरी असल्या मुळांचा उपयोग नेहमी वर चढण्यास होतो, तथापि प्रसंगी त्याचेकडून अन्नद्रव्ये शोषण केली जातात.

 हवेत लोंबणारी मुळे ( Aerial roots ):-वडाच्या पारंब्या जमिनीकडे लोंबत असलेल्या नेहमी आढळतात. पारंब्या म्हणजे फांद्यांपासून निघणारी आगंतुक मुळे होत. ही मुळे हवेत लोंबतीं राहिल्याकारणाने त्यांस पवनोपजीवी म्हणतात. पारंब्या जमिनींत घुसून वडाचे झाडास चांगली मजबुती मिळते. दरवेळेस पारंब्या जमिनीत घुसल्यावर तो वृक्ष मोठा घनछायेचा होतो.

 श्रीमंत पहिले बाजीरावसाहेब एकदां उत्तर-हिंदुस्थानांत स्वारी करण्यास निघाले असतां वाटेत त्यांचा तळ नर्मदातीरी पडला. आख्यायिका अशी आहे की, स्वारीत लवाजमा व सरंजाम एका वटवृक्षाखाली राहिला, त्यावरून तो वृक्ष किती विस्तृत असावा ह्याची कल्पना सहज करितां येईल.

 ऊस, केवडा, जोंधळा, पिंपरणी, नांद्रुक, आर्किड वगैरेमध्यें असली आगंतुक मुळे आढळतात. असल्या मुळावर बारिक केस येत नाहीत, कारण ह्यांचा उपयोग अन्नशोषणाकडे क्वचित होतो. त्या मुळांवर केंस येतात ती कोरड्या हवेत पांढुरकीं होतात व दमट हवेत हिरवळतात. अथवा कधी कधी, तांबूस पिंगट बनतात.

 परान्नभक्षक (Parasitic) मूळे-आगंतुक मुळ्यांचा दुसरा एक प्रकार आढळतो.त्यास परान्नभक्षक मुळे म्हणतात. जसे बांडगूळ, अमरवेल वगैरे. अमर-

४ थे ].     मूळ Root.     २१
-----

वेलीचे वर्णन पूर्वी आलंच आहे. हा वेल आश्रयाचे झाडास विळखे मारून अगदी गच्च धरतो. विळखे सोडवितांना मुळ्या फांदीत घुसल्या कारणाने ती सहसा सुटत नाहींत. ह्या मुळ्यांकडून आश्रयाच्या झाडांतील अन्नरस शोषण करून अमर-वेल वाढत असतो. वेल मोठा वाढत गेला असतां आश्रयाचे झाडावर वाईट परिणाम होतो. दिवसानुदिवस ते झाड आपोआप खंगू लागते. त्यावरील फुलें अगर फळे चांगली पोसत नाहीत. कारण जें नवीन अन्न त्यांत तयार होते ते बहुतेक त्या मुळ्या शोपून घेतात.

 बांडगुळाची सुद्धा अशी स्थिति असते. बांडगुळे आंब्याचे अगर फणसाचे झाडावर वाढतात. त्यांची फांदी आंब्याचे फांदींत घुसते. तेथून आंत मुळे घुसतात. बांडगुळाची पाने हिरवी असून पूर्ण वाढलेली असतात. त्यामुळे त्यांस हवेतून स्वतंत्रपणे कार्बन-आम्लवायु शोषितां येतो. बांडगुळे केवळ अन्नरसाकरितां आश्रयाचे झाडावर अवलंबून असतात. पानांतील हरितवर्णपदार्थाच्या (Chlorophyll) साहाय्याने कार्बन आम्लाचे विघटीकरण करून अन्नरसाच्या मिश्रणामुळे त्यास सेंद्रिय पदार्थ करितां येतात. म्हणूनच आश्रयाचे झाडाचे फारसे नुकसान होत नाही, पण अमरवेलाची गोष्ट ह्याहून वेगळी असते. अमरवेल पिवळ्या रंगाचा असून त्याची पानें अपूर्ण असतात.हरित-वर्णपदार्थाच्या अभावामुळे हवेतून त्यास स्वतंत्रपणे कार्बन संस्थापना करितां येत नाही. त्यास शरीरपोषणाकरिता दुसऱ्यावर पूर्णपणे अवलंबून रहावे लागते, म्हणून बांडगुळापेक्षां अमरवेलाने ज्यास्त नुकसान होते. वेळेवर काळजी न घेतली व अमरवेलाचे लोंबते धागे काढून टाकिले नाहीत, तर आश्रयाचे झाडास पुष्कळ नुकसान पोहचते. बागेतील झाडावर बांडगुळे अथवा अमरवेल वाढू लागली असतां; ताबडतोब ते नाहींसे करावेत, दुर्लक्ष्य करिता उपयोगी नाही.

 वनस्पतींचे रोग ह्याच प्रकारचे परान्नभक्षक आहेत व ते सर्व केवळ परावलंबी असतात. त्यांची उपजीविका दुसऱ्या वनस्पतीवर नेहमी होत असते. अतिथी व यजमान हा परस्पर संबंध येथे लागू पडतो. त्या वनस्पति म्हणजे यजमान व त्यांवर अवलंबून राहणारे रोग हे त्यांचे अतिथी होत. पण अतिथीस एकंदर चांगली जागा व अन्नदान दिले म्हणजे तो अतिथी संतुष्ट होऊन
२२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

तेथेंच कायमचें बिऱ्हाड देण्याचे ठरवितो, व हळु हळु आपला संसार थाटवू लागतो. एकंदर संसार थाटविल्यावर यजमानास त्यास घालवून देण्याची ताकद नसते व निमूटपणे त्याचा खर्च चालविणे भाग पडते. याप्रमाणे लवकरच यजमानाचे डोक्यावर हात फिरवून तो त्याचे वाटोळे करून टाकतो. ' भटास दिली ओसरी व भट हातपाय पसरी' या म्हणीची सत्यता अशा ठिकाणी चांगला दिसून येते. तांबोरा, काजळी, बुरा इत्यादि रोग ह्याच जातीचे आहेत. तांबोरा एकदां गव्हावर पडला म्हणजे तो नाहींसा करणे हे जवळ जवळ अशक्यच आहे. आजपर्यंत शेंकडों प्रयत्न झाले पण हा रोग नाहींसा करण्याचा रामबाण उपाय अजून निघाला नाहीं. बिलकूल संबंध नसतां शक्य तेवढी काळजी घेत असतां ह्या रोगाचा प्रादुर्भाव एकाएकी कसा होतो, हा मोठा चमत्कार आहे.

 खरोखर जगन्नियंत्याची नानातऱ्हे.च्या जीवांची परंपरा राखण्याची तऱ्हा फारच विलक्षण व अगाध आहे. एकाचा नाश तर दुसऱ्याचा उदय, एक तरतो तर दुसरा मरतो. सारांश ह्या जीवनकलहांत ईश्वराच्या करणीचे जितकें कौतुक करावे तितके थोडेच आहे.

 भूछत्रे घाण व कुजलेल्या जागेवर उगवतात व मृतसेंद्रिय पदार्थ मुळांतून शोषण करून घेतात. कुजट घाण नाहीशी होऊन प्राणिवर्गाचे आरोग्यावर त्यामुळे चांगला परिणाम होतो. हरितवर्णपदार्थ (Chlorophyil) त्याचे शरीरांत नसल्यामुळे त्यास कार्बन आम्ल हवेमधून शोषण करितां येत नाहीं, व त्यामुळे सेंद्रिय पदार्थ नवीन करितां येत नाहींत. म्हणून आयत्या तयार असणा-या सेंद्रिय पदार्थांची त्यास जरूरी असते. पाण-वनस्पतीची मुळे तंतूसारखी असतात. ती चिखलात रुतून तेथूनच अन्नशोषण करतात. पाणमुळ्यांवर कोणतेही आवरण असत नाहीं व आवरणाची जरूरी नसते. कारण जमिनीत घुसणा-या मुळ्यांप्रमाणे त्यांचा संबंध कठीण सक्तपदार्थाशी येत नसतो. शिंगाडा ही एक पाणवनस्पति आहे. त्याच्या मुळ्या एका जागी येतात असे नाहीं. प्रत्येक काड्यांपासून मुळ्या सुटून पुंजके बनतात. ह्या सर्व मुळ्या चिखलापर्यंत गेल्या नसतात. कांहीं चिखलांत शिरून बाकी पाण्यांत लोंबत्या राहतात. कांहीं लोकांनी ह्या मुळ्यांच्या पुंजक्यास विशिष्ट पाने आहेत असे म्हटले आहे. कमळाची मुळे शिंगाड्याप्रमाणे कांहीं चिखलात राहतात, व काही पाण्यांत
५ वे ].     स्कंद अगर खोड Stem.     २३
-----

तरतात. वुइलो ओढ्याचे कांठावर उगवतो. त्याची मुख्य मुळे जमिनीत जातात, पण दुसरी आगंतुक मुळे बाजूला निघून ती पाण्यांत वाहत राहतात. पाण्यांत वाहतीं राहल्यामुळे त्यांची एक जणू जाळी बनते. नवीन कालवा जेव्हा एखादे जागेतून जातो, त्यावेळेस शेजारच्या जमिनीत उगवणाऱ्या झाडाची मुळे कालव्याचे पाण्याकडे धाव घेतात, व त्यांची वाढ त्या दिशेत फार जोमाची होते. वुइलो वगैरेची मुळे जर एकदां पाण्याचे नळींत घुसली तर ती इतकी वाढतात की, त्या योगाने नळीचे तोंड बंद होऊन, नळीतून वाहणारा पाण्याचा प्रवाह बंद होतो. पाण्याचे नळ नेहमी ओढ्यांतून, कालव्यांतून पाणी नेण्याकरिता बसविले असतात व कांठावर उगवणाऱ्या झाडांची मुळे त्यांत शिरतात. पाण्यांतील मुळे लांकडासारखी कठीण होत नाहींत. पाणी वाहते असेल तर प्रवाहा बरोबर मुळे वाहत राहतात.

 बीजजनन होत असतां आदिमूळ अगोदर बाहेर पडून जमिनीत घुसते, याचे कारण मुळास बळकटी व अन्न देण्याचे काम करावयाचे असते. उगवते बीज एका जागी मजबूत राहिले नाही, तर वाऱ्यामुळे अथवा इतर कारणांनी इकडे तिकडे जाऊन रोपा कायमचा मजबूत होणार नाही. म्हणून मुळे प्रथम वाढून जमिनीत चांगली घुसतात, व त्यायोगे आपली दोन्ही कार्ये चांगल्या रीतीने घडवून आणतात,

---------------