वनस्पतिविचार/पचन, वाढ व परिस्थिति

विकिस्रोत कडून
प्रकरण १५ वें.
---------------
पचन, वाढ व परिस्थिति.
---------------

 वनस्पतिशरीरांत उत्पन्न होणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर पाचकतत्त्वाचा परिणाम होऊन त्यांची 'ने-आण' चांगली होते. न विरघळलेल्या स्थितीत पदार्थ पेशीपासून दुसऱ्या पेशीत जाणे मुष्कलीचे असते. त्यास अवश्य द्रवस्थिति पाहिजे तेव्हां कोठे पेशीभित्तिकेंतून रस्ता मिळतो. जेथे सेंद्रिय द्रव्ये सांठविली जातात, तेथून ती दुसरीकडे न्यावयाची असली तर त्यांवर प्रथम सजीवतत्त्व पाचकशक्तीचा उपयोग करून त्यास विरघळविते, व द्रव्यस्थितीत दुसरीकडे पाठविते. सजीवतत्त्वास ही जरी शक्ति असते, तथापि वनस्पतिशरीरांत निराळे पाचकरस ( Enzimes ) तयार असतात. सजीवतत्वामुळे कांहीं विशिष्टपिंडांस असे, रस उत्पन्न करण्याची शक्ति असते. जेथे जेथे व जेव्हा जेव्हां जरूरी असते, त्यावेळेस त्या ठिकाणी हा पाचकरस उत्पन्न होऊन पचनकार्य घडत असते. जेव्हां सजीवतत्वास हा पाचकरस स्वतः उत्पन्न करावयाचा असतो, त्यावेळेस त्यास कणीदार आकार येतो. कणीदार भागाचे पुष्कळ फरक होत होत पाचकरस उत्पन्न होतो. ज्याप्रमाणें पेशीभित्तिका सजीवतत्त्वाच्या घटकद्रव्यांतून बनते, व ती बनतांना जसे जसे जीवनकणांत फरक होत जातात, तद्वत्च हा पाचकरस उत्पन्न होतांना जीवनकणांमध्यें फरक होत असतात.


१२६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
वनस्पतीची पचनक्रिया नेहमी बहुतकरून पेश्यंतर होत असते. क्वचित् क्वचित प्रसंगी ही क्रिया पेशीबाह्य घडते, म्हणजे अन्नशोषण करण्याचे पूर्वी त्यावर पाचक आम्लाचा परिणाम होऊन पचनक्रिया बहुतेक बाहेर घडते नंतर पचन क्रियेने उत्पन्न केलेले पदार्थ शरीरांत शोषिले जातात. आळंब्या वर्गात बहुतेक अनशोषणक्रिया बाह्य होऊन नंतर ते अन्न शोषिलें जाते. पेश्यंतर होणारे पचन पुष्कळ अंशी क्षुद्रप्राण्याच्या पचनासारखे असते. वनस्पतिशरीरातील सजीव तत्त्व असल्या पचनक्रियेस चालून देते, त्यामुळे पचनक्रिया सेंद्रिय पदार्थांवर होऊन त्या पदार्थांमध्ये असणारी गुप्त शक्ति व्यक्त होऊन वनस्पतीचे इतर व्यवहार चालू राहतात. सात्त्विक सेंद्रिय पदार्थांवर तसेच नायट्रोजनयुक्त सेंद्रिय पदार्थांवर पचनक्रिया करणारे पाचक रस वेग वेगळे असतात. ह्या रसापासून संकीर्ण पदार्थ साधे होऊन पचविण्यास योग्य होतात. संकीर्ण वस्तू साधी होणे व साधी वस्तू संकीर्ण होणे, म्हणजे ' वस्तूविघात' व ' वस्तुघटना' ही दोन्हीं कार्ये सजीव तत्त्वाच्या चपलतेवर अवलंबून असतात; व जेथे घटना होते, त्याबरोबरच दुसरीकडे अन्य वस्तुंची विघटना असावयाचीच, व ही दोन्ही कार्ये बरोबरच होत असतात.  पाचकरस विशेषेकरून अंधारांत अथवा मंद उजेडात आपलें पचन काम झपाट्याने चालवितो. अती कडक उन्हांत त्याची पचनक्रिया मंदावते. जेथे जेथे पोषक अन्नांचा साठा असतो, त्याठिकाणी असल्या रसाचे अस्तित्व असते. जर तेथे तयार रस नसेल तर विशिष्ट पिंडांची योजना असते. हेतू एवढाच की, ज्यावेळेस जरूरी असेल, त्यावेळेस ताबडतोब पाचक रसाचा उपयोग होऊन पचनक्रिया पूर्ण व्हावी. बीजें, कंद, पाने, किंवा मुळ्या ह्यांमध्ये रसाची योजना असते. ह्यांमध्ये सांठविलेले सेंद्रिय पदार्थ लवकर पचविले जाऊन त्याचा उपयोग शरीरसंवर्धनाकडे होत असतो. मांसाहारी वनस्पतीमध्ये पाचकरस बाहेरचे अंगास येऊन आपले भक्ष्याचे पचन करून त्यांतील पौष्टिक पदार्थ आंतील अंगास द्रव्यस्थितीत आणण्याची व्यवस्था होते, मक्याचे दाण्यांत गर्भ व पौष्टिक अन्न ह्यांचे दरम्यान बीजदलाचा विशिष्ट पडदा ( Scutellum ) असतो. ह्या पडद्यास बीजदल ( Coty Ledon ) असे संबोधितात. मका किंवा त्यासारखी इतर बीजे ह्यांमध्यें

१५ वे ].    पचन, वाढ व परिस्थिति.    १२७
-----
ह्याच प्रकारचा पडदा अन्न व गर्भ ह्यांचे दरम्यान आढळतो. ह्या पडद्यांत पुष्कळ पाचक पिंड असतात. जेव्हां बीजास सर्द हवा मिळते त्यावेळेस आंतील गुप्त सजीवतत्त्व जागृत होऊन अन्न पोषण करण्यास सुरवात होते. गर्भबाहेरील अन्न ह्या पाचक पिंडाकडून गर्भात शोषिले जाऊन गर्भ वाढू लागतो, ब हळूहळू अंकुर बाहेर पडतात; म्हणजे उगवत्या गर्भास पडद्यामध्ये असणाऱ्या पाचक पिंडाकडून बाहेरील अन्न उपयोगास मिळते. पचन केलेल्या अन्नापासून जीवनकण कसे तयार होतात अथवा कसे शरीरवर्धन होते, ह्यासंबंधी अजून अज्ञान आहे. वनस्पतीच्या वाढत्या कोंबाची बारीक तपासणी जरी केली तरी, त्यासंबंधानें कांहीं पत्ता लागत नाही. कारण वाढत्या कोंबांत जीवनकण अथवा खरी वाढ असते. वनस्पतीशरीरांत असणारी साखर कशी व कोठे जाते, तसेच नायट्रोजनयुक्त पदार्थ किंवा अॅॅमिडो असिड्स कोणते मार्गाने जाऊन त्यांचे पर्यवसान जीवनकण तयार होण्यांत कसे होते, ह्याविषयी अजून कांहीं कळलें नाही. हे एक खरोखर मोठे गूढ आहे. प्राणिवर्गातील अन्नासंबंधाने ज्याप्रमाणे अभ्यास व शोध झाले आहेत, त्याप्रकारचे प्रयोग अजून वनस्पति अन्नासंबंधाने झाले नाहीत.  वस्तु आंबणे:–पाचकरस अथवा पाचकरसोत्पादक पिंड नसून कांहीं वेळां पाचक रसासारखें कार्य दृष्टीस पडते. हे कार्य पुष्कळ अंशी श्वासोच्छ्वास क्रियेसारखे असते. साखरेचा पाक कांही दिवस उघडा राहू दिला असता, त्यांत किण्ववनस्पति ( Yeast ) उत्पन्न होऊन साखरेस घाण येऊ लागते. ती किण्ववनस्पति साखरेसारख्या संकीर्ण पदार्थाचे विघटीकरण करून ऑक्सिजन वायु भक्षण करिते. पुढे त्यापासून कार्बन् आम्ल व आलकोहल तयार होतात. इतर आम्लेही त्यांत उत्पन्न झाल्यामुळे त्या पाकास घाण येत असते. विशेषे करून आळंबी जातीच्या क्षद्रवनस्पति असली नासाडी करू शकतात. खरोखर ह्याठिकाणी किण्ववनस्पतीने हवेतून ऑक्सिजन शुद्ध वायु न शोषण करितां, साखरेच्या घटकावयवांतून तो वेगळा करून भक्षण केला, ह्यामुळे साखरेचे संकीर्णत्व नाहीसे होऊन त्यापासून कार्बन आम्ल वगैरे वस्तू त्यांत उत्पन्न झाल्या. असल्या प्रकारास साधारण नांव ' वस्तू आंबणे ' असे प्रचारांत आहे. तेव्हां ' वस्तु आंबणे, ( Fermentation ) किंवा श्वासोच्छ्वास क्रिया सुरु

१२८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
असणे ह्यांत तात्त्विकदृष्ट्या विशेष फरक कांहींच नसतो. जसे श्वासोच्छवास क्रियेमध्ये वस्तू जळते, त्याचप्रमाणे येथे अलग केलेल्या ऑक्सिजन् वायूचे योगाने सात्विक सेंद्रिय पदार्थ जळले जातात. त्यांची संकीर्णता मोडून जाते. आंबण्याची क्रिया अथवा सडण्याची क्रिया कांहीं विशिष्ट उष्णतेमध्ये चालू राहते. शिवाय निरनिराळ्या आळंब्याकडून होणारी ही नासधूस वेगवेगळ्या प्रकारची असते. भयंकर सांथीचे रोग वगैरे ह्या आळंब्यावर्गीय बॅॅक्टिरिया जंतूकडूनच उत्पन्न होतात.

 पाचकरस अथवा आंबणे ह्या दोन्ही गोष्टींचा मुख्य उद्देश सेंद्रिय पदार्थाचा उपयोग होऊन सजीव तत्त्वाच्या घटकायवास भर घालणे अथवा नवीन जीवनकण तयार करणे होय. ह्या सेंद्रिय पदार्थाचे कसे जीवनकण होतात, ह्याविषयी अज्ञान असल्याचे पूर्वी सांगितलेच आहे. परिमाणांवरून कारण शोधणे या तत्त्वानुसार सजीव तत्त्वाच्या घटक द्रव्यांवरून ती द्रव्ये कशी होत गेली, यांचे अनुमान करणे तूर्तच्या प्रसंगी योग्य असते. शिवाय जीवंत स्थितींत व मृत स्थितीत घटकद्रव्यांत फरक होतो व तो समजणे दुर्बोध आहे. सजीव तत्त्वाच्या घटक द्रव्यांचे पृथक्करण करू लागले असतां तें मरून जाते. मेल्याबरोबर त्या द्रव्यांत रासायनिक फरक होत जातात म्हणून मृतस्थितीत जी द्रव्ये आढळतात, ते खरे पृथक्करण नव्हें.

 जी द्रव्ये पेशी घटकावयवांमध्ये आढळतात, ती सर्व सेंद्रिय पदार्थापासून सजीव तत्त्वाच्या चांचल्यशक्तीमुळे उत्पन्न झाली आहेत. खरोखर सेंद्रियअन्नापासुन जीवनकण तयार होतात, व त्या कणांत पुनः घडामोड होऊन पेशीद्रव्यें किंवा पेशीवाढ होत असते. वनस्पतिशरीरसंवर्धनांत सजीव तत्त्वाचे घटकावयव खर्च होत असतात, पण त्याबरोबरच अनादिरसापासून ते घटकावयव नवीन तयार होतात. जोपर्यंत सजीव तत्त्व जिवंतस्थितींत असते, तोपर्यंत त्यामध्ये सारखे फरक होत राहतात, तसेच इतर श्वासोच्छ्वासादि क्रियेमुळे रासायनिक फरक सेंद्रियपदार्थात होत असतात. ह्या फरकांचा परिणाम जीवनकणवर्धनांत होऊन वनस्पतिघटकद्रव्ये उत्पन्न होतात.

 पेशीघटना: —प्रथम ज्या पेशींत ही द्रव्ये तयार व्हावयाची असतात, त्यांत सजीव तत्त्वे व मधून मधून जडस्थाने आढळतात. सेंद्रिय अन्नापासून

१५ वे ].    पचन, वाढ व परिस्थिति.    १२९
-----
सजीव कण वाढू लागतात, व होता होतां सर्व पेशी सजीवकणांनी भरून जडस्थाने नाहीशी होऊन पेशीवर सारखे कणीदार जीवनकण उत्पन्न होतात. त्यामुळे गारेच्या स्फटिकाप्रमाणे पेशी पांढरी दिसू लागते. काही वेळाने हे कण पेशीरसांतून दुसरे जागीं जाऊन पेशीस पूर्वीसारखा आकार येतो. जडस्थाने पुनः उत्पन्न होऊन कणीदार आकार कमी होतो. पेशीविभागाचे वेळी केंद्रांत गडबड होऊन त्याचे दोन भाग होतात. त्या दोन्ही भागांचा संबंध बारीक जीवनकणतंतू द्वारे होत असतो. रवाळ जीवनकण ( Microsomata ) मध्यभागी जमून पातळ पडदा तयार होतो. जीवनकणांचे विघटीकरण होऊन त्यांच्या घटकद्रव्यांतून हा पडदा तयार होतो. पेशीभित्तिकेची जाडी वाढत असतांना ह्याचप्रकारचे विघटीकरण होऊन बाह्य पडद्यावर भित्तिकेचे विशिष्टघटक द्रव्य जमत जाते.

 सत्वाचे कण हें सेल्युलोज व ग्रॅॅन्युलोज ह्या दोन द्रव्याच्या अभेद्य मिश्रणाने बनले असतात. पेशी द्रव्यांत सुद्धा सत्त्वाचे कण पुष्कळ असतात. हरित अगर शुभ्र शरीरांकडून हे कण तयार होतात. ज्याप्रमाणे पेशी-घटक-द्रव्य (Cellulose ) जीवन कणांच्या विघटीकरणापासून तयार होते, तद्वतच सत्त्व ( Starch ) सुद्धा उत्पन्न होते.

 पेशींतील निरनिराळया घटक द्रव्यापैकी महत्त्वाची द्रव्ये म्हणजे अल्ब्युमेन ( Albumen ) व सेल्युलोज (Cellulose ) ही होत. अल्ब्युमेन द्रव्याशिवाय जीवनकण तयार होत नाहींत. नायट्रोजन साररूपांत शोषिला जाऊन त्याचा सात्विक सेंद्रिय पदार्थांशी संबंध येतो. रासायनिक संयोग होऊन अल्ब्यूमेन द्रव्ये तयार होतात. त्यापासून जीवनकण तयार होत असतांना ह्या अल्ब्युमेन-द्रव्यांत कसे कसे स्थित्यंतर होत असते, ह्याविषयी आपलें अज्ञान आहे.

 सेल्युलोज सात्विक सेंद्रियद्रव्यांपैकी आहे. त्याचे घटकप्रमाण सत्त्वासारखेच असते. त्याच्या घटकावयवामध्ये नायट्रोजन नसतो. नायट्रोजनचा अभाव हा फरक अब्ल्यूमेन व सेल्युलोज द्रव्यामध्ये आहे. पेशी भित्तिका ह्याच द्रव्याची बनली असते.

 घटणेस अप्रत्यक्ष मदत-अल्ब्युमेन व सेल्युलोज ह्या दोन मुख्य द्रव्याव्यतिरिक्त वनस्पती-घटणेकडे दुसरी अनेक द्रव्ये अप्रत्यक्ष मदत करतात. पानांतील

१३०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
हरिद्वर्णक (Chlorophyll ) वनस्पतीपोषणास अप्रत्यक्ष मदत करितो. हें प्रसिद्ध आहेच. तो सजीव हरिद्वर्ण शरीरांत असून त्याची उत्पत्तीसुद्धा सजीव कणाच्या विघटीकरणामुळे होते. तथापि ह्याच्या उत्पत्तीस चार बाह्य गोष्टींची अवश्यकता असते. १ प्रकाश, २ विशिष्ट उष्णता, ३ शुद्ध हवा, व ४ लोहाचा अंश ह्या बाह्य गोष्टीपैकी एखादी गोष्ट कमी असली तर हरिद्वर्ण शरीरांत फरक होतो. हिरवी पाने प्रकाश कमी असेल तर पिवळी फिकट होतात; पण प्रकाश पुनः मिळू लागला असतां पूर्वीप्रमाणे ती हिरवी होतात.

 उष्णता कमी झाली असता त्याचा परिणाम त्यावर लगेच होतो. वसंत ऋतूचे सुरुवातीस झाडांची पानें तांबूस असतात, पण अधिक उष्णता मिळू लागली म्हणजे ती आपोआप हिरवीं होतात.

 शुद्ध ऑक्सिजन वायू वनस्पतीस न मिळाला तर पाने रोगट अगर फिकट होतात, पण उलट तो वायु चांगला मिळाला असतां पूर्वीची स्थिती येते.

 जमिनीत लोहाचा अंश नसेल तर हरिद्वर्ण ( Chlorfyll) कणच उत्पन्न होणार नाहींत.

 फुलामध्ये सुद्धा निरनिराळे रंग आढळतात. केवळ पुंकेसर (Staminate) अगर केवल स्त्रीकेसर (Pistillate) फुलांत अशाच चमत्कारिक रंगांचा उपयोग होतो. रंगास भुलून निरनिराळे कीटक त्यावर बसतात व त्याचा परिणाम पराग ने आण करण्यांत होऊन गर्भधारणेस मदत होते.

 फुलांमध्ये मधुररस आढळतो. ह्याचा उपयोगही पुष्कळ वेळां गर्भसंस्थापनक्रियेस होतो. रंगाचा अथवा मधुररसाचा वनस्पतिकार्यास अप्रत्यक्ष उपयोग असतो.

 मेण, निरनिराळी तेलें, रेझिन, टॅनिन् वगैरे पदार्थ सजीव कणांच्या प्रत्यक्ष निघटीकरणामुळे जरी नाहीं, तथापि त्यांपासून तयार झालेल्या पदार्थांतून हे पदार्थ शेवटीं उत्पन्न होतात. आता ह्या पदार्थांपैकी काही ठिकाणी तेल हें प्रत्यक्ष त्यांच्या विघटीकरणापासून उत्पन्न होते. म्हणजे जसे कांहीं विशिष्ट-पिंडापासून विशिष्टरस उत्पन्न होतो, तद्वतच जीवनकणांपासून तेल उत्पन्न होते. अलीकडील शोधांती रेझिन ही वस्तु पेशीभित्तिकेच्या विघटीकरणामुळे उत्पन्न होते, असे सिद्ध झाले आहे.

१५ वे ].    पचन, वाढ व परिस्थिति.    १३१
-----
असो; सेंद्रिय द्रव्ये तयार झाली किंवा त्यापासून अल्ब्यूमेन द्रव्ये बनलीं, अथवा हवेत उष्णता किंवा जमिनीत पाणी ही पुष्कळ असली, तथापि त्यांपासून नवीन वाढ होत नसते. त्यावर जीवनकार्य झाले पाहिजे, म्हणजे सजीवतत्वाच्या चैनन्य शक्तीने वाढीस उपयोगी पडणाऱ्या साधनापासून नवीन कण तयार झाल्यावरच खरी वाढ झाली असे म्हणता येईल. केवळ हीं सर्व साधने एकेजागी गोळा केली असतां इच्छित वाढ होत नसते, त्यांस सजीव तत्त्वाचे अवश्य साहाय्य पाहिजे, त्याविना कांहीं नाहीं.  वाढ:–मुळांच्या किंवा खोडांच्या वाढत्या कोंबाकडे लक्ष्य दिलें असतां, असे आढळून येईल की, रोज रोज त्याची थोडी थोडी वाढ होत असते. कोवळ्या पानापासून मोठी पाने तयार होतात. लहान फांदीपासुन मोठी फांदी होते. ही वाढ कशी होते व ह्या वाढीस कोण उत्पादक आहे, हे मात्र सहसा कळणार नाही. वाढत्या कोंबांत संवर्धक पदर असून त्यांच्या पेशींत द्विधा होण्याची शक्ति मोठी जबर असते. त्यामुळे नेहमी नवीन पेशी होत जातात. नवीन झालेल्या पेशी पहिल्याप्रमाणे मोठ्या होतात. त्यांत पेशीद्रव्ये, सजीवकण वगैरे जमत जाऊन पुनः त्यापासून नवीन पेशी उत्पन्न होतात. त्या पेशीस पुढे कायमचे स्वरूप प्राप्त होते. कोंबाच्या अग्राजवळच्या पेशी वाटोळ्या असतात. खालील बाजूच्या पेशी लंब व दीर्घ होतात. प्रथम पेशीमध्ये पाणी जमून जेव्हां चोहोबाजूस ती तणाणते, त्यावेळेस पेशीस पूर्वीपेक्षा मोठा आकार येतो. हा अकार कायम टिकणारा नसतो. कारण पेशींतील पाणी दुसरे पेशींत जाऊन ती पूर्ववत संकुचित होते, तणाणलेल्या स्थितीत जीवनकणभित्तिकेच्या बाजूकढे सारखे असतात. जीवनकणापासून नवीन पदार्थ भित्तिकेवर जमून भित्तिका पूर्वीपेक्षा जाड व मोठी होते. पेशीमध्यभागांत जडस्थाने (Vacuoles ) असल्यामुळे नवीन पाणी त्या ठिकाणी जमून पेशी पूर्वीपेक्षा जास्त तणाणते. ह्यावेळेस पूर्वीपक्षां ती पेशी जास्त व टणक झाल्यामुळे फाटण्याची भीति नसते. ही तणालेली स्थिति बहुतेक कायम राहते. कारण आंत जमलेल्या जीवनकणांपासून पेशीघटकद्रव्ये तयार होऊन ती भित्तिकेवर जमत गेल्यामुळे पेशीची वाढ कायम होते. तसेच नवीन सजीव शरीरे जेव्हां पेशींत उत्पन्न होऊन पेशी मोठी होते त्यावेळेस पेशीची खरो
१३२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
खर वाढ झाली असे म्हणता येईल. नुसता मोठा आकार होणे म्हणजे वाढ नव्हे, तसेच पाण्याने चोहोबाजूने तणाणणे म्हणजे वाढ नव्हे. तर त्यांत नवीन सजीव पदार्थ तयार होऊन कायमचा मोठा आकार होणे हे खऱ्या वाढीचे लक्षण आहे.

 वाढ म्हणजे नव्या जीवन कणाची उत्पत्ति होऊन त्यापासून वनस्पतिघटनात्मक कार्य बनत असते. त्याचा परिणाम शरीराचा आकार वाढून त्याचे वजनही अधिक होते. वाढीस चार पांच गोष्टींची अवश्य जरूरी असते.

 ह्या गोष्टी योग्य प्रमाणात मिळत गेल्या म्हणजे वाढीचे काम सुरळीतपणे चालते. जेथे वाढ होण्याची असते त्याठिकाणी पोषक द्रव्याचा भरपूर सांठा पाहिजे. ह्या सांठ्यापासून पेशी-घटक-द्रव्ये तसेच जीवनकण घटकावयव उत्पन्न होतात. नेहमी वाढत्या कोंबांत पुष्कळ पोषक द्रव्ये खर्च होतात. ह्याचे कारण असे आहे की, तेथे नवीन पेशी उत्पन्न होऊन पूर्वीच्या पेशीस कायमस्वरूप प्राप्त होते.

 पोषक अन्नाप्रमाणे पाण्याची ही जरूरी असते. पोषक अन्न द्रवस्थितीत जात असते. याकरितां पाणी अवश्य पाहिजे. तसेच पेशी तणाणण्यास पाण्याची जरूरी असते. अधिक पाणी पेशींत न शिरेल तर पेशी तणाणणे बंद होईल. तणाणण्याची कायम स्थिति राखण्यास पाण्याचा भरपूर पुरवठा पाहिजे. म्हणून जितकें पोषक अन्न महत्त्वाचे असते, तितकेच पाणी महत्त्वाचे आहे, ह्यांत संशय नाहीं.

 तिसरी अवश्य स्थिती म्हणजे एक प्रकारची विशिष्ट उष्णता होय. उष्णतेशिवाय वाढ होणार नाही. ऑस्मॉसिस क्रिया किंवा बाष्पीभवन ह्यास उष्णतेची जरूरी असून ह्या क्रियेशिवाय निरिंद्रिय द्रव्ये व पाणी वर चढणार नाहींत. तेव्हां पाणी व सेंद्रिय अन्न वगैरे जी वाढीची साधने ती तयार होण्यास उष्णतेची जरूरी असते. ह्या साधनांशिवाय वाढ होणार नाही. तसेच उष्णतेमुळेच द्रवात्मक सेंद्रिय पदार्थांवर कांहीं विशिष्ट कार्य घडून जीवनकणाची घटना होते. जीवन-पदार्थ-घटना म्हणजे खुल्या उष्णतेची मोट एकेजागी बांधून गुप्त स्वरूपांत ठेवणे होय. ह्या दृष्टीने वाढ म्हणजे खुली उष्णता नाहीशी करून एकत्र व्यवस्थित स्वरूपांत ठेवणे असे होते. जीवनकण-घटना झाल्यावर

१५ वे ].    पचन, वाढ व परिस्थिति.    १३३
-----
पेशी तणाणली असतां नवीन कण भित्तिकेवर जमून किंवा भित्तिकेच्या रंध्रांत बसून ती जाड व रुंद होत जाते, म्हणजे पेशांची वाढ होते.

 चवथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोकळी हवा अथवा हवेतील शुद्ध ऑक्सिजन वायू वाढत्या कोंबास मिळणें जरूर असते. ऑक्सिजन वायूचा परिणाम पोषक सेंद्रिय पदार्थांवर होऊन त्यापासून उत्तेजितशक्ति पेशी-घटनात्मक कार्यास मिळते. ह्याच वायूमुळे पेशी-घटक-द्रव्ये जीवनकण-घटकावयवांतून तयार होतात. ह्या दृष्टीने ऑक्सिजन वायूचीं वनस्पति किंवा प्राणी, ह्या दोन्हींच्या जीवन-क्रमांत अत्यंत जरूरी असते. हा वायु म्हणजे प्राणवायु होय,

 ह्या चारही गोष्टींची अनुकूल स्थिति असली म्हणजे अधिक जीवनकण तयार होऊन अधिक पेशी उत्पन्न होतात. मुळांची, खोडांची अथवा पानांची वाढ ह्याच रीतीने होते. जीवनकण अधिक होऊन पेशी द्विधा होतात व पुढे त्यास दीर्घ कायम स्वरूप मिळून मुख्य अवयव वाढतो. मुळाची वाढ खोडापेक्षा साधी असते. खोडाची वाढ म्हणजे त्याच्या वाढत्या कोंबाची तसेच अंतरकांड्याची वाढ असते. मुळे किंवा खोड जाड व रुंद होणे त्याच्या अंतरसंवर्धक पदावर अवलंबून असते. संवर्धक पदराची जशी कमी अधिक तीव्रता त्यामाणे कमी अधिक वाढ होत जाते. पानाची वाढ नेह्मीं अग्राकडे तसेच बाजूकडे सारखी असते, असें नाहीं. पुष्कळ वेळां बाजूकडील वाढ प्रथम होऊन नंतर अग्रांकडील बाजू वाढू लागते, फर्न वनस्पतीचे पान अग्रांकडे गुंडाळलेलें असते. प्रथम बाजू वाढून नंतर अग्र वाढते. ह्याचे कारण पानाच्या कोवळ्या स्थितीत पेशीचे तणाणणे व त्यामुळे होणारी वाढ ही दोन्ही पोटांकडील बाजूपेक्षां पाठीकडील बाजूंत जास्त आढळतात, नाही तर दोन्ही बाजूकडील वाढ सारखी झाली असती, म्हणून अग्र दीर्घ होऊन गुंडाळते.

 कोवळ्या स्थितींत वाढीवर फारच लवकर परिस्थितींचा परिणाम होतो, व परिस्थितीप्रमाणे उत्तेजन व प्रत्युत्तर दिले जाते. वाढत्या प्रदेशांत पेशीच्या निरनिराळ्या तणाणण्याप्रमाणे पेशीच्या वाढीवर फरक होतो. तणाणण्याचा जोर उभा व आडवा असतो. तसेच वाढ सुद्धा उभी व आडवी असते. परिस्थिती भिन्न असल्यामुळे वनस्पतींच्या अंतर अथवा बाह्य रचनेत सुद्धां फरक डोतो, पाणवनस्पति व जमिनीवरील वनस्पती ह्यांत पुष्कळ फरक असतो.

१३४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
कांहीं पाणवनस्पति पाण्यात बुडाल्या असतात व कांहीं अर्ध्या बुडाल्या असून वरचे बाजूस पाने येतात. पाण्यात बुडालेल्या वनस्पतींची मुळे कधी वाहती व लोंबत असतात. अथवा कधी चिखलांत बुडाली असतात. खोड बहुतकरून नाजूक व लांब असते. खोडामध्ये लाकडी तत्त्व वाढलें नसते. वाहिनीमय ग्रंथी (Vascular bundles ) कमी असतात. बुडालेल्या पानांवर बाह्यत्वचा फार पातळ असते, व त्वचारंध्रे असत नाहींत. पाणी जर धावते असले तर, पानें फाटकी असतात. फाटक्या भागांतून पाणी वाहण्यास सुलभ पडते. ज्यांची पाने पाण्यावर आली असतात, त्यास लांब व पोकळ देंठ असतो. जर पाणी खाली उतरत गेले तर बुडांकडे देठांची गुंडाळी होत जाते व पाणी पुनः जास्त चढत चाललें तर ती गुंडाळी सुटून पाने पाण्याबरोबर वर येतात. असल्या पानाच्या उपरी पृष्ठभागांवर त्वचारंध्रे असतात. पानांवर मेणाचे सारवण असल्यासारखे असते. त्यामुळे पाणी वर पडले असतां मोत्याप्रमाणे चमकत राहते.

 ही पाण-वनस्पतींची स्थिति त्यांना योग्य असते. त्यांची जीवनकार्ये ह्या रचनेमुळे न बिघडतां उलट त्या कार्याना साजेशी ती रचना असते. मुळ्यांचे रचना अथवा वाढ चांगली होत नाहीं. शोषक अवयवांची जरूरी असत नाहीं. त्यामुळे केस वगैरे मुळ्यावर पाण-वनस्पतीमध्ये येत नाहींत. निरिंद्रिय द्रव्यें सभोवतालच्या पाण्यातून केवळ मुळ्यांतूनच नव्हे तर पाण्यात बुडालेल्या सर्व भागांतून शोषिली जातात. बाष्पीभवनप्रवाह येथे सुरू असण्याची जरूरी नसते, म्हणून बाष्पीभवनसंबंधी रचना पूर्णावस्थेस पोहोचलेली नसते. पाणवनस्पतीमध्ये पेशीमध्यपोकळ्या मोठमोठ्या असून त्यांत हवा पूर्ण भरली असते. ह्यामुळे वनस्पतीचे शरीर हलकें होऊन तरंगण्यास योग्य होते. हवेनें भरलेल्या पेशीमध्यपोकळ्या असल्या वनस्पतीमध्ये हवेचे साठेच असतात. ह्या हवेचा उपयोग अंतरजीवन पदार्थासही होत असतो. पाण्यातूनच ऑक्सिजन वायू शोषिला जातो.

 जमिनीवर उगवणाऱ्या वनस्पतीस जर पाण्याचा भरपूर साठा मिळाला तर त्यांची पाने चांगली पूर्ण वाढतात. उलट पाण्याचा थोडासाच पुरवठा असला तर त्या मानाने पानांचा आकार कमी होतो. वालुकामय प्रदेशांत जमिनीत पाणी कमी असल्यामुळे वनस्पतीची पाने मुळीच वाढत नाहीत. आल्यास
१६ वे ].    उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा.    १३५
-----
फारच लहान असतात. अशा वेळी कंटकपर्णे ( Spines ) येऊ लागतात की, ज्याचे योगानें बाष्पीभवन कमी होऊन जीवनकार्य चालू राहते.

 हवेचे निरनिराळे फरक व जमीनिची मगदूर ह्यांचा परिणाम वनस्पतिवर्धनांवर होत असतो. अतिथंडी किंवा उष्णता असली तर त्यापासून संरक्षण करणारी अंगे वनस्पतीस प्राप्त होतात. त्यांची रचना त्या परिस्थितीस योग्य अशी बनते. जमिनींत अन्नसामुग्री असेल तर वनस्पति चांगली पोसते. तसेच वनस्पतीस जेव्हां कीटकादि शत्रूपासून पुष्कळ त्रास होतो, तेव्हा त्यांचे निवारण करण्याकरिता वेळोवेळी त्यास निरनिराळी व्यवस्था करावी लागते. कधी कधी विषारी केंस शरीरांवर येतात. कीटक त्रास देऊ लागले तर, ते केंस किड्यास बोचतात. बोचल्यावर केसांतून विषारी रस किड्याचे शरीरांत शिरतो. त्यामुळे त्यास वेदना होऊन त्यापासून पुनः त्रास होण्याची भीति नसते. अशाच प्रकारे कांटे उपयोगी पडतात. अतिथंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून पानावर मखमली सारखें केंस येतात. एकंदरीत वनस्पती आपल्या परिस्थिति प्रमाणे आपली व्यवस्था करिते. परिस्थति प्रतिकूल असली तर, तीस अनुकूल करण्याची तजवीज करून जीवनक्रम आक्रमू लागते. प्रसंगाप्रमाणे ' पाठ देऊन वेळ काढणे ' हे तत्त्व वनस्पति–आयुष्य-चरित्रांतही दिसते. एकच वनस्पति निरनिराळ्या परिस्थितीत राहिली तर परिस्थितीप्रमाणे तिजमध्ये स्थित्यंतर होत असते.

---------------