वनस्पतिविचार/फळ

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
प्रकरण २२ वें.
---------------
फळ.
---------------

 व्याख्या: –गर्भधारणा पूर्ण होताच अण्डाशयांत हळूहळू निरनिराळे फरक होऊ लागतात. गर्भधारणेमुळे हें फरक होण्यास एकप्रकारचे उत्तेजन मिळते. वास्तविक हे फरक गर्भधारणा घडवून आणण्यास कारणीभूत

२२ वे ].    फळ.    १८५
-----
आहेत असे नाही, तर ते गर्भधारणा पूर्ण होण्याचे परिणाम आहेत असे स्हटले तरी चालेल. अण्डाशय मोठा होणे अथवा पेशीसमुच्चय मऊ होणे, अण्डाशयांत कप्पे अगर खण कमी अधिक वाढणे, तसेच पोषकद्रव्याचा सांठा बीजामध्ये भरणे, अथवा वेगवेगळी चव बीजांत अगर अण्डाशयपेशीसमुच्चयांत उत्पन्न होणे, वगैरे गोष्टी, तसेच इतर अनुषंगिक फरक गर्भधारणा झाल्यावर आपोआप होऊ लागतात. अशा प्रकारचे फरक होत जाऊन पक्व होणाऱ्या अण्डाशयास फळ ही संज्ञा देता येते. पण क्षुद्रवर्गात फळ ही संज्ञा कोठे लावावयाची हा प्रश्न उद्भवतो. क्षुद्रवर्गात गर्भधारणा पूर्ण होते खरी, पण त्यापासून बीजोत्पाते होत नसते. एक विशिष्ट पेशी स्त्रीपुरुषतत्त्वसंयोग होऊन उत्पन्न होते, व ती कांहीं काळ विश्रांति घेऊन पुनः त्याजपासून वनस्पति वाढू लागते. बीजसुद्धा त्याचप्रकारे कांहीं काळ विश्रांति घेऊन योग्य परिस्थिति मिळाली असतां त्यापासून अंकुर उत्पन्न होऊ लागतात. ह्या दृष्टीने उच्चवर्गीय बीज व क्षुद्रवर्गीय ती विशिष्ट जननपेशी ह्यांत फरक नसतो; पण फळासंबंधी प्रश्न राहतोच. क्षुद्रवर्गात स्त्रीपुरुषतत्त्वसंयोग होऊन उत्पन्न होणारे बीज ज्या पेशींत असते, त्यासच फळ समजलें असतां अयोग्य होणार नाही. कारण ती पेशी अगर तो विशिष्ट भाग म्हणजे तेथील अण्डाशयच समजला पाहिजे. पण ह्यांत म्हणण्यासारखे-गर्भधारणा झाल्यावर–फरक न होता त्यापासून उत्पन्न होणाऱ्या बीजांत फरक दृष्टीस पडतात. कांहीं अतिक्षुद्रवर्गात जसे आळंब्या वगैरेमध्ये एका विशिष्ट धाग्यावर जीवनकणांचा समुच्चय होऊन त्याच्या विशिष्ट जननपेशी ( Gonidia ) तयार होतात. ह्या पेशी योग्य वेळ आली म्हणजे आपोआप बाहेर गळून स्वतंत्रपणे त्यांपासून निराळे धागे पूर्वीप्रमाणे उत्पन्न होतात. अशा ठिकाणीं गर्भधारणा होत नाही किंवा स्त्रीपुरुषसंयोगही होत नाहीं. येथील प्रत्येक पेशीस स्वतंत्रपणे शरीरसंवर्धन करण्याची शक्ति असून केव्हां केव्हां त्यावर स्त्री अगर पुरुषव्यंजक पेशी उत्पन्न होऊन त्यापासून गर्भधारणा घडते, ह्या स्थितीत फळ ही संज्ञा कोठे लागू पडते ? तर त्या धाग्यावरील विशिष्ट जीवनकणांचा समुदाय जो असतो त्यासच जर फळ म्हणावें, तर तो अण्डाशय नाहीं अगर बीजे त्यामध्ये नाहीत. बरे फळ ही संज्ञा जेथे म्हणून जननपेशी (Spores ) चा समुदाय असतो, त्यासच लावावी असे गृहीत धरले, तर परागपीटिका अथवा स्त्रीकेसरदलें ( Carpels ) ह्यांस ती संज्ञा कां लावू 
१८६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
नये ? कारण परागकण व बीजाण्डे ही दोन्ही पुरुष व स्त्री जननपेशी(Spores) माहेत. पण तसे न करितां गर्भीकृत अण्डाशयासच फळ हे नांव देतात. कांहीं क्षुद्रवर्गींत खऱ्या फळासारखे फळ आढळते. असो. उच्चवर्गात फळे वेगवेगळ्या तऱ्हेची आढळतात, तेव्हां आपण तिकडेच वळावें हें बरें.

 गर्भधारणा झाल्यावर फळ बनू लागले असता त्यांत नवीन पेशींची भर होत जाते, अथवा कांहीं उलट पेशी कमी होऊन त्यांस निराळेच स्वरूप प्राप्त होते. धोत्रा, बाहवा वगैरेच्या अण्डाशयांत फळ वाढतांना नवीन कप्पे अगर खण उत्पन्न होतात. हे निरनिराळे पडदे नाळेपासून वाढून दोन्ही बाजूंस मिळाल्यामुळे नवीन नवीन खण एकावर एक बनत जातात. बाभळीची शेंग अशाच प्रकारची असते. धोत्र्यासंबंधाचे मागें वर्णन सांगितलेच आहे. ओकवृक्षाच्या फळांतील अण्डामध्ये तीन केसरदलें (Carpels) असून प्रत्येकांत दोन अण्डे असतात; पण पुढे गर्भधारणा होऊन फळ तयार होऊ लागले असता त्यांत एकच बीज उत्पन्न होते. शिवाय खणांची संख्या तिन्हींची एकावर येते. म्हणजे पांच बीजाण्डे व दोन स्त्रीकेसरदलें (Carpels) फळाच्या वाढिंत नाहीशी होतात.

 अशाचप्रकारची स्थिति पुष्कळ फळांत आढळते. झेंडूच्या फुलांत दोन स्त्रीकेसरदले असून फळामध्ये एक कप्पा व एक बीज राहते. पपनस, चकोत्रा, साखरलिंबू, केळी, डाळिंब, पेरू वगैरे फळांत मधुररस व गोडचव फळे पक्व झाली असतां उत्पन्न होते. अण्डाशयाच्या तसेच नाळेच्या पेशी मऊ मांसल होऊन पेशींत मधुररस उत्पन्न होत जातो. पुष्कळ वेळां नाळेच्या पेशी अधिक मांसल होऊन फळांमध्ये गीर अगर बलक तयार होतो. जसे-पेरू, टोमॅटो, वांगे, वगैरे.

 जरी वर फळाची व्याख्या गर्भीकृत पक्वअण्डाशय अशी केली आहे, तथापि व्यवहारांत फळ ही संज्ञा लावतांना ह्या व्याख्येकडे दुर्लक्ष केले जाते. अशी फळे पुष्कळ आहेत की, त्यांत केवळ पक्व अण्डाशयच असतो, असे नाही, तर फुलांतील पहिले वर्तुळ अथवां पुष्पधार किंवा इतर भाग मिळून व्यावहारिक फळ तयार होते. अथवा कधी फुलांचे मोहोर, उपपुष्पपत्रे, पुष्पदांडी वगैरेचा फळामध्ये समावेश केला जातो. अशा फळास खरी ( True ) फळे न म्हणतां भ्रामक (Spurious ) फळे समजणे योग्य दिसते. नास्पाती, स्ट्राबे, सफरचंद, अननस, स्ट्राबेरी, फणस, तुती, अंजीर, वगैरे फळे खरी नसून भ्रामक आहेत. त्यांचे वर्णन पुढे करण्यात येईल. 
२२ वे ].    फळ.    १८७
-----
सर्वच फळे मऊ व मांसळ होतात, असें नाहीं. कांहीं फळे सुकी होऊन लांकडासारखी कठीण बनतात. कठीण टणक होणे, वाळून जाणे अथवा मांसल होणे, हे व्यक्तिमात्र फळांच्या गुणधर्मावर अवलंबून असते. तसेच त्याची वंशपरंपरा कायम राहणे, पक्ष्यादिगणापासून संरक्षण होणे, किंवा त्यांच्या संगोपनास जरूर लागणारी एखादी विशिष्ट स्थिति प्राप्त होणे, वगैरे गोष्टीसुद्धां फलांच्या विशिष्ट आकारास किंवा त्यांचे मऊ व टणक होण्यास कारणीभूत होतात. तसेच फळांवरील विशिष्ट केंस अथवा काटे किंवा त्यावरील पंखासारखे भाग वगैरे फळास उपयोगी पडतात. धोत्र्याचे फळांवर अगर एरंडीचे फळावर एक प्रकारचे कांटे येतात, ते फळाचे संरक्षण करण्याचे कामी उपयोगी पडतात. मधुमालतीचे फळास दोन पंख असतात, त्यामुळे ती फळे हवेतून सहज उडू शकतात. फळे गोड बनल्यामुळे पक्षी ती खाऊन त्यांची बीजे इकडे तिकडे फेकतात, त्यामुळे त्यांची वंशपरंपरा चोहोंकडे पसरली जाते.

 फळाचे बाह्यांग निरनिराळ्या तऱ्हेचे आढळते. खरखरीत, मऊ, लुसलुसित कांटेरी, तंतूंनी वेष्टलेले, आवरणानी परिवृत्त, असे वेगवेगळे बाह्यांग निनिराळ्या फळांत असते. ह्या सर्वांचा आपआपल्या परि थोडाबहुत उपयोग असतो. अण्डाशयाचा बाहेरील भाग हा फळाचे बाह्यांग बनतो. आंतील बीजे बाह्यांगांत वेष्टिली असतात. कांहीं ठिकाणी बाह्यांग अधिक वाढून

आंतील बीजाची वाढ फार कमी होते, अथवा कधी कधी ते वाढतच नाहीं, जसे-सोनकेळे, कांहीं द्राक्षे, वगैरे. बेदाणा ज्या द्राक्षापासून तयार करतात तेथे बी मुळीच असत नाहीं. सोनकेळ्यामध्ये एक लांब सुतासारखा मध्यभागी दोरखंड असून त्यांत बीजें असत नाहींत. अशा पुष्ट फळांची बाह्यांगें खाण्याचे कामी जास्त उपयोगी पडतात. कित्येक फळांत बाह्यांगांत तीन स्पष्ट पदर दिसतात. जसे-आंबा, नारींग, खारीक वगैरे. आंब्यामध्ये पहिला पदर सालीचा असून दुसरा पदर आंतील रसाळ गीर बनतो. तिसरा पदर म्हणजे कोय होय. कोयींत बीज असते. आपण नेहमी आंब्यामध्ये गीर खातो, व त्याच्या मधुर रसाकरितां आंबा प्रसिद्ध आहे. नारिंगामध्य बाह्यांगाचा पहिला पदर पिवळा असून दुसरा पदर कापसासारखा पांढरा असतो. तिसरा भाग आंब्याचे कोयीप्रमाणे कठीण असून त्यांचे जाळ्यांप्रमाणे 
१९०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
स्त्रीकेसरदलाच्या दोन बाजू एकपाठीकडील ( Dorsal ) व एकपोटाकडील ( Ventral ) हें पूर्वी सांगितलेच आहे. स्त्रीकेसरदलाची मध्यशीर ही पाठीकडील बाजू होते व कडा एकेजागी जळन पोटाकडील बाजू बनते. जेव्हा पुष्कळ स्त्रीकेसरदलें परस्परांस चिकटून संयुक्त अण्डाशय तयार होतो, अशावेळेस परिघाकडील बाजू ही मध्य शिरेकडील बाजू असते व पोटाकडील बाजू आंतील भाग असून तेथेच त्यास बीजे चिकटली असतात. फळे फुटून बीजे बाहेर मोकळी होतांना ह्या बाजूचा उपयोग असतो. बहुतकरून फळे किनाऱ्याकडे पोटाकडील अथवा पाठीकडील बाजूशी फुटतात. नेहमींची रीत म्हणजे ज्या बाजूस बीजें चिकटली असतात, ती प्रथम फुटून बीजें मोकळी होतात. तूर, उडीद, मसूर वगैरे डाळवर्गात फळांत दोन्ही बाजू फुटून आंतील पडदे गळून बीजें मोकळी होऊन बाहेर पडतात. जितकी स्त्रीकेसरदलें ( Carpels ) असतात, तितकी पडद्यांची संख्या असते. तसेच अण्डाशयांतील खण व कप्पे यांवरही त्यांची संख्या अवलंबून असते. संयुक्त फळांत सर्व स्त्रीकेसरदले मध्यभागी चिकटल्याकारणाने सर्व विभाग पावणारे पडदे एकेजागी जमून त्यांचा एक उभा जाड सोंट तयार होतो. फळ फुटू लागले असतां हा पडदा आतील बाजूस सैल होऊन सुटा होऊ लागतो व त्याबरोबरच बीजेंही गळू लागतात. कित्येक फळे सरळ उभी न फुटतां, पेटीचें झांकण जसे उघडते त्याप्रमाणे आडवी फुटतात. कांहीं वेळां फळे आडवीं फुटतांना अर्धी बाजू फुटून, अर्धी बाजू तशीच चिकटून राहते. अथवा पुष्पकोश ( Calyx ) फळांशी संलग्न असल्यामुळे वरील बाजु तेवढी आडवी फुटते, व खालील अर्धा भाग पुष्पकोशाच्या संयोग-जोरामुळे चिकटून राहतो. जसे—कडहल ( Monkey-pot). अफू, अंटिराह्यनम्, तंबाखू वगैरे फळे न फुटतां त्यावर बारीक बारीक छिद्रे पडून त्यांतून बीजे गळू लागतात. ही छिद्रे कांही ठिकाणी अग्राकडे, कधी बाजूकडे, अगर बुडाकडे पडतात. फळे अव्यवस्थितपणे फार क्वचित् फुटतात. मोहरी, शिरस, वगैरेमध्ये दोन्ही पडदे फुटून बीजे त्याबरोबर न गळतां मध्यकणांशी चिकटून राहतात. कापूस, केशरी बोंड, वगैरेमध्ये पडदे फुटून अण्डाशयाची दले वेगळी होऊन त्यांत बीजे राहतात. एरंडीमध्ये फळाची तीन शकले होतात, पण बीजें वेगळी होत नाहीत. प्रत्येक शकलात एक एक बीज असते. 
२२ वे ].    फळ.    १९१
-----
फळांचे वर्गीकरण करण्यांत त्यांची स्त्रीकेसरदलें संयुक्त अगर सुटीं, अधःस्थ को उच्चस्थ, सुकीं अगर मांसल, एकबीजी अगर बहुबीजीं, फुटणारी अथवा न फुटणारी, वगैरे गोष्टींचा विचार केला जातो. शिवाय फळे खरीं अगर भ्रामक, तसेच फळे कापिली असतां त्यांत स्पष्ट दिसणारे विभाग, बीजाची मांडणी, फळांतील गीर, अण्डाशयापासून अगर नाळेच्या कमी अधिक वाढीपासून उत्पन्न होतो ह्याविषयी विचार, फळांचे बाह्यांग, बीजाची सोडवणूकं, वगैरे सर्व गोष्टींचे मनन करून फळांचे वर्गीकरण कसे कंरितां येईल हे पाहिले पाहिजे. तसेच व्यावहारिक व शास्त्रीय फळे ह्यांतील भेद, अथवा फळ एकदली अगर एकबीजी असून जेव्हां विशेष मोठे नसते, तेव्हां बीज व फळ ह्यांमधील फरकही सांगितला पाहिजे. नाहीतर फळास बीज अथवा बीजास फळ, असा चुकीचा समज होण्याचा संभव आहे. साधी फळे, संयुक्त फळे, बहुगुणित फळे, वगैरे प्रकार फळांचे करितां येतात. असो, वरील गोष्टींच्या अनुसंधानानें कांहीं फळांचे वर्णन खाली देण्याचा विचार आहे.

 तुळशी व माठ ह्या दोन्ही वर्गातील फळे उच्चस्थ असून एकबीजी असतात. दोन्हीमध्ये बारीक बीज असून दोन्हींतील फळांचे बाह्यांग सुके वाळलेले असते. पण तुळशीवर्गात फळांतील बाह्यांग बीजापासून अलग करितां येत नाही, व माठामध्ये ते वेगळे करितां येते. ही फळे लहान व एकबीजी असल्यामुळे फळ व बीज ही दोन्ही एकच असावीत असे वाटते. निदान दोन्हींतील फरक स्पष्ट कळत नाही. फळांवर नेहमीं परागवाहिनीचें कांहीं चिन्ह असते, पण बीजावर तिचा संबंध नसल्याने कोणतीही त्याप्रकारची खूण असणे शक्य नाही. ह्या जातीची फळे सुकी असून फुटत नाहींत, व बीजें मोकळी होत नाहींत.

 आंबा, लोकॅट, जांभूळ, बकुळ वगैरे फळे उच्चस्थ असून त्यांतील बाह्यांगाचे तिन्ही पडदे स्पष्ट असतात. बाह्यांगाच्या मध्य पडद्याचा गीर बनून खाण्याचे कामी येतो. फळे मांसल असून आतील बीजे दगडासारखी कठीण होतात. हीं फळे फुटून बीजे बाहेर गळत नाहीत.

 पावटा, भुयमूग, वाटाणा, उडीद, तूर, ताग, वगैरे फळांस शेंगा म्हणतात, ही फळे एकदली असून आंत नाळेपासून पडदे उत्पन्न होऊन पुष्कळ खण
१९२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
तयार होतात. ही फळे फुटून बीजे बाहेर गळतात. शेंगेचे निमुळते अग्र हें परागवाहिनीचा अवशिष्ट भाग होय, फळांवर पुष्पकोश कायम राहतो.

 बाभूळ, खैर, वगैरे बीजे शेंगेसारखी असून ती फुटत नाहींत. प्रत्येक खणांत एक एक बीज असते.

 तृणजातीच्या फळास दाणे म्हणतात. प्रत्येक दाण्यावर फळाची खुण स्पष्ट असते. ह्या फळांत निराळीं बीजे दाखविता येत नाहीत. कणीस म्हणजे फळांचा गुच्छ होय, फुलामध्ये अधिक स्त्रीकेसरदले असुन फळांत ते एकच राहते. फळांतील एका बाजूस असणारा गर्भ म्हणजे येथील बीज होय. असल्या फळांत एकच बीजदल असते. ही फळे कधीही फुटत नाहींत.

 एरंडी वर्गातील फळे नेहमी त्रिदळी असून दले वेगळी होतात. जिरे, धने, सोपा, वगैरेमध्ये फळे द्विदली असून प्रत्येक दलांत एक बीज असते. येथे पुष्पाधार वाढून त्यास दोन्ही दले चिकटली असतात. मधुमालती, पापडी, वगैरे फळांमध्ये दोन पक्ष असतात; त्यामुळे ती फळे हवेतून वाऱ्याने सहज इकडे तिकडे जाऊ शकतात.

 पेरु, घोसाळी, दोडके, भोपळे, वगैरेमध्ये फळे मांसल होऊन ती फुटत नाहींत. बीजे पुष्कळ असून ती परिघाकडील बाजूस नाळेशी चिकटलीं असतात. पेरुंचीं बीजें सुटी होऊन गीरांत बुडाली असतात. घोसाळ्यात ती सुटी न होता त्यांचा नाळेशी संबंध तसाच कायम असतो. गीराची उत्पत्ति नाळेच्या मांसल पेशीसमुच्चयापासून होते.

 लिंबूवर्गाची फळे वाटोळी व मांसल असतात. फळाची साल जाड असून त्यांत सुवास उत्पन्न करणारे तेलोत्पादक पिंड असतात. प्रत्येक फांकेवर तंतुमय वेष्टण असून मध्यभागी त्याचे जणू दोरखंड बनते. प्रत्येक फाकेंत दोनपासून चारपर्यंत बीजे असतात. असली फळे हा वर्ग खेरीज इतरत्र असत नाहींत.

 मोहरी, शिरस, गोभी, वगैरेमध्ये फळे शेंगेसारखी असून त्यांत एकाऐवजी दोन स्त्रीकेसरदले असतात. शिवाय दोन्ही नाळांचा संबंध एकत्र येऊन मध्य भागी पातळ पापुद्रा उत्पन्न होतो. ह्यास बीजे चिकटतात. फळे बुडाकडून 
२२ वे ].    फळ.    १९३
-----
अग्राकडे फुटत जातात. फळांतील बाह्य पडदे गळून गेले, तथापि बीजें मध्यपापुद्यावर तशीच चिकटून राहतात. मुळ्यांच्या डिंगऱ्या शिरसापेक्षा लहान असून अधिक जाड असतात. त्या इतराप्रमाणे फुटत नाहीत.

 अफू, धोत्रा, कापूस, केशरी बोंड, वगैरे फळे उच्चस्थ व बहुदली असतात. अशा फळास बोंडे म्हणतात. ही बोंडे फुटून बीजे बाहेर गळतात. असली बोंडे पुष्कळ वनस्पतींमध्ये असतात.

 बहुदलवनस्पतींत फळे अग्राकडे निमुळती असतात, त्यामुळे त्यांस कोनाकृति येते. येथे अण्डाशय स्त्रीकेसरदलांनी पूर्ण आच्छादित नसल्यामुळे बीजाण्डे अथवा बीजें उघडी असतात. फळे वाळून ती लाकडांसारखी टणक होतात. प्रत्येक दलावर दोन बीजे असतात. देवदार, सुरू वगेरे उदाहरणे ह्या वर्गापैकी आहेत,

 स्ट्राबेरी, नास्पाती, सफरचंद वगैरे फलें मौल्यवान समजतात. स्ट्राबेरीमध्ये पुष्पाधार ज्यास्त वाढून वरच्या बाजूस अधिक फुगतो. फुगलेल्या भागांत दाणेदार कण असतात. हे फळ म्हणजे केवळ एक पक्व अण्डाशय आहे असे नाहीं, तर पुष्पाधार मांसल होऊन त्यावरील वेगवेगळे लहान लहान अण्डाशय मिळून एक पूर्ण फळ बनते. ह्या फळाची रुचि आंबट-गोड असते. उन्हाळ्यांत ह्या फळांचा उपयोग साहेब लोकांत होतो, त्यामुळे त्यास अधिक किंमत येते, हिंदू लोकांत ह्या फळाचा खप फारसा नसतो.

 नास्पातीं अगर सफरचंद ही फळे आडवी कापून पाहिली असतां मध्यभागी कठीण व टणक अण्डाशय दिसतो. येथे पांच स्त्रीकेसरदले असून प्रत्येकांत दोन बीजें असतात. बाहेरील मांसल भाग पुष्पाधारापासून उत्पन्न होतो. हा मांसल भाग रुचकर असतो. ही फळे खाण्यास पौष्टिक असतात. आजारी माणसांस ह्या फळापासून फार फायदा होतो.

 तुती, फणस, वगैरे फळे साधी नसून त्यांची उत्पत्ति एका फुलापासून न होतां पुष्कळ फुलांच्या समुदायापासून होते. पक्व तुतीचे परीक्षण केले असतां, असे आढळून येईल की, ते फळ पुष्कळ लहान लहान फलांचे बनले आहे, तसेच प्रत्येक फळ वेगळे असते. त्याबद्दलची खुण म्हणजे परागवाहिनीचा अवशिष्ट भाग हा सुद्धा त्यावर पाहण्यास सांपडतो. म्हणजे एका साधारण पुष्पाधारावर पुष्कळ छोटी फळे परस्पर चिकटून एक फळ तयार होते,

१३ 
१९४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
पिकलेल्या स्ट्राबेरीमध्ये व काळ्या तुतींत बाह्यदृष्टया फरक आढळणार नाही, पण स्ट्राबेरी फलाची उत्पत्ति एका फुलापासून असते व तुतींमध्ये पुष्कळ फुलापासून एक फळ तयार होते. हा फरक पूर्ण लक्ष्यांत असावा. स्ट्राबेरीचे फुलांत स्त्रीकेसरदले सुटी असल्यामुळे फळामध्ये लहान फळासारखे दाणेदार कण दृष्टीस पड़तात; पण तुतींमध्ये असला दाणेदार आकार वेगवेगळ्या फुलांतील अण्डाशयामुळे उत्पन्न होतो.

 फणसाच्या वाढीची तऱ्हा फार चमत्कारिक असते. प्रथम फणसाचा मोहोर दोन उपपुष्पपत्रांमध्ये वेष्टिलेला असून, ती उपपुष्पपत्रे गळल्यावर आंतील लबलबित पुष्पदांडीवर हिरव्या व पांढऱ्या रंगाचे बारीक ठिपके दिसू लागतात. हे ठिपके फणसाची बारीक फुलें होत. गर्भधारणक्रिया पूर्ण झाली म्हणजे, आंतील छोटेखानी फळे वाढू लागतात. ज्याप्रमाणे धोत्रा, एरंडी वगैरे फळांत बाहेरचे अंगास काटेदार सुजवटे येतात, तद्वत्च फणसाचे फळ वाढू लागले म्हणजे, ते येऊ लागतात. प्रथम बुडाकडे हे कांटे येऊन नंतर वरवर येत जातात. फणस उभा कापिला असतां आंतील फळांची तसेच बीजांची मांडणी दिसते. आठळ्यावरील गऱ्याची उत्पत्ती बहुतेक अण्डाशयांतील पेशी समुच्चयापासून होते, गऱ्यांंचा तसेच आठळ्यांचा भाजीमध्ये अगर नुसता खाण्यांत उपयोग करतात.

 अंजीर, उंबर, पिंपरणी वगैरे खरी फळे नसून भ्रामक (Spurious ) आहेत. उंबर कापून पाहिले असतां आतील बाजूवर लहान लहान फळे किंवा फुले दृष्टीस पडतात. ही सर्व फुलं एका साधारण पुष्पाधारावर असून जेव्हां फळ पक्व होऊ लागते, त्यावेळेस पुष्पाधार मऊ व मांसल होतो. त्यांतील पेशीसमुच्चय रुचकर होतो. फळांत पुष्कळ वेळां किडे आढळतात. उंबरे बेसावधपणाने पुष्कळ वेळां खाण्यांत येतात, त्यामुळे ते किडे पोटांत जाऊन एखादा रोग उत्पन्न होण्याची भीति असते. तेव्हां ही फळे खाणाऱ्यानी किड्यांंविषयी सावधगिरी घ्यावी हे उत्तम

----------