वनस्पतिविचार/कर्तव्यें

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
प्रकरण १० वें.
---------------
कर्तव्ये.
---------------

 वनस्पतीची मुख्य अंगें चार असून, प्रत्येकास कांहीं विशिष्ट काम करावें लागते. ही अंगे म्हणजे मुळ्या, खोड, पाने व फुलें होत. ही सर्व अवयवें उच्च वर्गीय वनस्पतीमध्ये आढळतात, ही गोष्ट खरी; पण क्षुद्र वर्गीय वनस्पतींत हीं सर्व सांपडणे कठीण असते. शिवाय क्षुद्रवर्गात कांहीं वनस्पति तर एकपेशीमय असतात. अशा ठिकाणी त्या एका पेशीसच सर्व कामे करणे भाग पडते. एक पेशीमय वनस्पति साधी असून त्यांत संकीर्णता अगदी नसते. जशी जशी अधिक संकीर्णता वनस्पतिशरीरांत उत्पन्न होत जाते, त्याप्रमाणे उच्चवर्गीय होऊ लागते. म्हणूनच शरीराच्या कमी अधिक संकीर्णतेप्रमाणे वनस्पतीस निरनिराळी अवयवें उत्पन्न होऊन ती क्षुद्र अथवा उच्च वर्गीय बनत जातात. अमुक एक वनस्पति उच्च वर्गीय आहे अथवा क्षुद्रवर्गीय आहे, हे ठरविणे तिच्या अवयवसंकीर्णतेवर पुष्कळ अंशी अवलंबून असते. संकीर्णतेबरोबर श्रमविभागत्व जास्त जास्त दृग्गोचर होत असते. जेथे संकीर्णता नाही, तेथे श्रमविभागही नाही, हा सर्वसामान्य सिद्धांत वनस्पतिचरित्रांत नेहमी पाहण्यास सांपडतो. उच्च वर्गामध्ये निरनिराळी अवयवे असल्यामुळे व प्रत्येक अवयवांकडून निराळे काम घडत गेल्यामुळे, श्रमविभागत्व पूर्णपणे दृष्टोत्पत्तीस येते. यावरून ज्या ज्या ठिकाणी कामासंबंधी अधिकाधिक वाटणी आढळते, त्या त्या वनस्पतींस उच्च वर्गाची समजणे गैरवाजवी होणार नाही.


८८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

 वनस्पति उच्चवर्गीय असो वा क्षुद्रवर्गीय असो. प्रत्येकीस ' पोषण व प्रजोत्पत्ति ' ही दोन कर्तव्ये सारखी लागू आहेत. ही दोन कर्तव्ये करणे अथवा ती घडवून आणण्याची खटपट करणे, ह्याविषयी वनस्पतीचे प्रत्येक अवयव आपआपल्यापरी वनस्पतीस उपयोगी पडते. वनस्पतीचे सर्व भाग ह्याच कर्तव्यांत परोपरीनें निमग्न आढळतात. ही गोष्ट खरी की, प्रत्येक भागास उत्पत्ति करितां येणार नाही. अथवा पोषणही साधता येणार नाही; पण त्यांचे अंतिम साध्य ह्या तत्त्वांकडे असते, हे सहज दिसून येणार आहे. अप्रत्यक्ष रीतीने का होईना, पण प्रत्येक भागाचा प्रयत्न जीवनक्रमान्त ह्या गोष्टीविषयी असतो. क्षुद्रपेशी अथवा मोठा वृक्ष ही दोन्ही आपआपला जीवनक्रम आक्रमित असतात. दोन्हींमध्ये वर सांगितलेली मुख्य कर्तव्ये साधारण आहेत. क्षुद्रपेशी एकटी असल्यामुळे आपली कर्तव्ये पार पाडण्याच्या हेतूने आपला क्षुद्र प्रयत्न करून शेवटी पोषण व उत्पत्ति ही दोन्ही साधते. मोठ्या वृक्षास निरनिराळी अवयवे असल्यामुळे प्रत्येकाकडून वेगवेगळे काम करवून शेवटी तो वृक्ष ती दोन्ही अंतिमकर्तव्ये साधितो. प्रत्येकाच्या ' शारीर ' संकर्णितेप्रमाणे व श्रमविभागाच्या सोईप्रमाणे, प्रयत्नांत तसेच रीतींत थोडा अधिक फरक असेल, पण मुख्य अंतिम साध्यांत फरक नसतो.

 वरील चार अवयवांपैकी पहिली तीन अवयवें पोपणक्रिया घडवून आणण्यात खटपट करीत असतात. उत्पत्तीस शेवटलें एक अंग पुरे असते. शिवाय शरीर पूर्ण वाढल्याखेरीज प्रजोत्पत्तीचा विचार अमलात येत नाही. म्हणूनच उच्चवर्गात अथवा क्षुद्रवर्गात शरीरसंवर्धन पूर्ण झाल्यावर उत्पत्तीसंबंधाची अवयवे येऊ लागतात. तोपर्यंत उत्पत्तीची अवयवे येत नाहींत. हे तत्त्व केवळ वनत्पतींमध्येंच दृष्टीस पडते असे नाही, तर प्राणिवर्गामध्ये सुद्धा ही स्थिति आपण पाहतो. शरीर पूर्ण वाढून योग्य ऋतु येईपर्यंत उत्पत्तीसंबंधी विचार प्राणिवर्गातही नसतो. अवयवें प्रथमपासून असतील; पण त्यांमध्ये त्यावेळी प्रजोत्पत्तीचैतन्य नसते. ऋतु प्राप्त झाला व योग्य परिस्थिति जुळली, म्हणजे उत्पत्तिकार्य आपोआप घडून येते. प्रत्येक वर्गाचा योग्य ऋतु व उत्पत्तिकाल वेगवेगळा असतो.

 पोषणक्रिया घडविणे हे कांहीं साधे काम नाहीं; ते साध्य करविण्यास तीन अवयवें अहोरात्र खटपट करीत असतात. नुसत्या अवयवांची खटपट होऊन

१० वे ].     कर्तव्ये.     ८९
-----
भागत नाही, तर त्यास योग्य परिस्थितीचीही जरूरी असते, अवयवें चांगली कामें करीत आहेत, पण जमिनींत अन्नाचा अंश मुळीच नाहीं, किंवा अन्न असून अवश्य लागणारे पाणी नाहीं, अथवा अन्न असून न मिळण्यासारख्या स्थितींत ते असले, तर अशा स्थितीत अवयवे असून सुद्धा पोषणक्रिया कशी चालेल ? व अवयवाच्या खटपटीचाहीं काय उपयोग होणार आहे ? म्हणून खटपट व परिस्थिति यांची योग्य सांगड जुळून आली म्हणजे सर्व गोष्टी फलप्रद होतात. तीन निरनिराळी अवयवे वेगवेगळ्या रीतीने कामे करीत असून शेवटी पोषण हे साध्य घडून येते. तीन निरनिराळ्या कामांचा परिणाम पोषणक्रिया साधण्यांत होतो. निरिंद्रिय द्रव्ये शोषून घेणे, त्यावर रासायनिक क्रिया घडविणे, कार्बन आम्लवायु हवेतून शोधून त्याचे विघटीकरण करणे, तसेच शोषित निरिद्रिय द्रव्यांशी मिसळून त्यास सेंद्रियत्व आणणे, वगैरे क्रिया ही अवयवें स्वतंत्र रीतीने करीत असतात व त्या सर्वांचा परिणाम व उद्देश शरीरसंवर्धन व पोषण ह्यांकडे होतो. वरील सर्व क्रिया लक्ष्यांत घेतल्या असतां शरीरपोषण हे किती घडामोडीचे काम आहे, हे सहज कळेल. प्राणी आपलें भक्ष्य अवयवांच्या साधनांनी जमवून पोटांत घेतो. पोटांत त्या कच्च्या अन्नावर निरनिराळ्या आम्लांचा रासायनिक परिणाम होऊन त्या अन्नास शुद्ध स्वरूप प्राप्त होते. ह्यावरही पुष्कळ निरनिराळ्या क्रिया घडून त्याचे शेवटी शुद्ध रक्त बनते. हे रक्त पोषक व निरोगी असून सर्व शरीरभर खेळिले गेल्यावर त्यापासून शरीर-पोषण व संवर्धनकार्य आपोआप घडत जाते. म्हणजे जशा निरनिराळ्या प्रकारच्या क्रिया प्राण्यांच्या शरीरात अन्नावर होऊन प्राण्यांचे शरीरपोषण होते, तद्वतच कांहीं प्रकारच्या क्रिया वनस्पतिअन्नावर होऊन वनस्पतिपोषण होत असते. प्राणी व वनस्पतिवर्ग दोन्ही भिन्न असल्यामुळे त्यांच्या निरनिराळ्या रीतींत फरक असेल, पण मूळ साध्यांत फरक नसतो.  शरीरसंवर्धन झाल्यावर क्रमाने प्रजोत्पत्ति साधण्याकडे वनस्पतीचे लक्ष्य जाते. ते कार्य घडवून आणणारी साधने व अवयवे ह्यांचा हळूहळू प्रादुर्भाव होतो. फुलें ही उत्पत्तीसंबंधाची अवयवे आहेत. क्षुद्र वनस्पतींमध्ये ही जननेंद्रिये असत नाहींत. त्यांमध्ये उत्पत्तीसंबंधी निराळी तजवीज असते. उच्चवर्गामध्ये पुरुषतत्त्व व स्त्रीतत्त्व ह्यांचा मिलाफ होऊन त्यापासून बीजोत्पात्त होते, व बीजे म्हणजे पुढील प्रजा होत. गर्भधारणा उच्चवर्गात ज्याप्रमाणे पूर्णत्वास आली

९०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
असते, त्याप्रमाणे क्षुद्रवर्गामध्ये नसते. तथापि क्षुद्र वर्गामध्ये जननेंद्रियाच्या मुख्य तत्त्वांत फरक नसतो. अतिक्षुद्र एकपेशीमय वनस्पतींत शरीरवर्धन व प्रजोत्पत्ति ह्यांत फरक आढळत नाहीं. मध्यम शुद्रवर्गात निराळ्या जननपेशी ( Spore) असतात. आतां ही गोष्ट खरी की, फुलासारखी जननपेशीची एका विशिष्ट जागीं योजना नसून जेथे त्यास योग्य जागा आढळते, त्याठिकाणी त्या जननपेशींचा प्रादुर्भाव होतो. दोन विशिष्टतत्त्वांचा मिलाफही येथे कांहीं ठिकाणी पाहण्यांत येतो. म्हणजे जशी जशी शरीरसंकीर्णता, वनस्पती मध्ये अधिक दिसून येते, त्याबरोबर इतर बाबींतही तेच तत्व अधिक अधिक स्पष्ट होऊ लागते.

 जसे शरीरवर्धन हे एक अवश्य कर्तव्य असते, त्याचप्रमाणे वंशवर्धनहीं तितकेच महत्त्वाचे दिसून येते. वंशवर्धन साधण्याकरितां वनस्पति आपल्या स्वतःचा नाश झाला तरी विशेष फिकीर करीत नाही. उद्दिष्ट हेतु साध्य करण्याविषयी पूर्ण दृढनिश्चय असतो. पुष्कळशा वनस्पति अशा आहेत की, बीजोत्पादन झाल्यावर लागलीच त्यांस मृत्यु येतो. बीज तयार झाल्यावर मृत्यु येणार अशी जरी त्यांची खात्री असते, तथापि बीज उत्पन्न करणे हे आपलें अवश्य कर्तव्य आहे, असे वनस्पति समजतात. बालसंगोपन जसे प्राणिवर्गात असते, तद्वतच वनस्पतिवर्गातही त्याचप्रकारचे आढळते. बीजास रुजण्याच्यावेळी उपयोगी पडण्याकरितां वनस्पति आपल्या घासांतून अर्धा घांस अलग करून त्यामध्ये सांठवितात. बीजे म्हणजे वनस्पतींचा वंश आहे. तेव्हां वंशवर्धनाकरितां व्यक्तीने खटपट करणे अथवा मृत्यु आला असतां त्यास न डगमगणे, हे सर्वसिद्ध तत्त्व वनस्पतीपासून श्रेष्ठ प्राणिवर्गानेही शिकण्यासारखे आहे, ह्यांत संशय नाहीं. कुळाची वाढ होण्याकारता एक जीव नाहीसा होतो; पण त्याबरोबरच शेंकडों नवे जीव उत्पन्न होतात, हा सिद्धांत वनस्पतिवर्ग नेहमी पाळीत असल्यामुळे, जीवनकलहांत इतक्या अडचणी असतांही त्यांचा वंश आजतागत अव्याहत चालला आहे,

 असो; ' पोषण व उत्पत्ति ' ही वनस्पतिचरित्रांत मुख्य असून ती वनस्पतीची अवयवें कशा रीतीने साधतात, इकडे आपण लक्ष देऊ. जननेंद्रियांसंबंधाने विचार, पोषणविचार झाल्यावर मागाहून करण्यात येईल. तसेच फुलांचे बाह्यांगवर्णन, निरनिराळे प्रकार, गर्भसंस्थापना, गर्भ, वगैरेंचा उल्लेख तेथेच करण्यांत येईल.

---------------