Jump to content

वनस्पतिविचार/कल्पना

विकिस्रोत कडून

२ रे ].     कल्पना     
-----
प्रकरण २ रें.
---------------
कल्पना.
---------------

 सर्वसाधारण वनस्पतिसंबंधी कल्पना अशी आहे की, बी जमिनीत पेरून रुजलें म्हणजे त्याचा लहान रोपा तयार होतो. मुळ्या जमिनीत जातात. बुंधा जमिनीचाहेर वाढतो; व बुंध्यावर पाने, डाहळ्या, फुलें व फळे क्रमाक्रमाने येत जातात. फळामध्ये बी तयार होते, म्हणजे बी पेरल्यापासून बी तयार होण्यास वनस्पतीची निरनिराळी वरील स्थित्यंतरे होत जातात. शिवाय मुळ्या, खोड, पाने, डाहळ्या, फुले व फळे सर्व मिळून एक पूर्ण वनस्पति बनली असे समजण्यांत येते, जसे आंबा वगैरे.

 मोहरीः–मोहऱ्या जमिनीत पेरिल्या असतां प्रथम दोन लहान पाने दिसूं लागतात. हळूहळू त्यांचे खोड वर येते व पाने मोठी होतात. पुढे तो रोपा वाढून त्यावर नवीन पाने व डहाळ्या येतात व शेवटी पिवळी फुले येऊन त्यां पासून शेंगा तयार होतात. शेंगा सोलून पाहिल्या असतां आंत पूर्वीप्रमाणे मोहऱ्या आढळतात. इतक्या गोष्टी होण्यास तीन महिने लागतात. म्हणजे एवढ्या अवधीत मोहरीचे जनन, वाढ व मरण हीं पुरी होतात. मोहरी ही वनस्पति उच्च वर्गापैकी असून तिजवर सर्व अवयवे आढळतात.

 आकाशवेलः–आकाशवेल अथवा अमरवेल नांवाची वनस्पती पुष्कळांनी झाडांवर लोंबत असलेली पाहिली असेल. तिचे लोंबते पिवळे तंतू झाडांवर पसरले असतात; व कांहीं जागी झाडांच्या डहाळ्या सभोंवतीं तिचे धागे गुंडाळले असतात. ह्या वनस्पतीचा जमीनींशी संबंध नसतो. पाने अथवा इतर अवयवें पूर्णावस्थेस पोहोचलेली नसतात. बहुतकरून पाने येतच नाहींत. आलीच असली तर ती फार लहान असून, तुरळक असतात. ऋतूमध्ये त्यांस फुले येऊन त्याची फळे तयार होतात. व फळांत बीजें सुद्धा वाढतात. पण बहुतकरून ह्यांची उत्पत्ति बीजांपासून होत नाही. कारण त्याची नुसती एक फांदी जरी दुसरे झाडांवर पडली तरी ती जीव धरते, व त्यांतून नवीन मुळे फुटून दुसरे झाडाचे शरीरांत ती घुसतात, व तेथून अन्न शोषण करून आपला
१०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

चरितार्थ चालवितात. डहाळ्यांसभोंवतालचा विळखा सोडवून पाहिला म्हणजे मुळे डहाळींत घुसलेली दृष्टीस पडतील. विळखे सहसा सोडविता येत नाहीत; कारण मुळे आंत घुसल्यामुळे त्यांचा डाहळीशी एकजीव झाला असतो. अशा वनस्पति खरोखर परान्नपुष्ट आहेत, ह्यांत संशय नाहीं. ह्या वेलास कांहीं लोक नारूचा वेल म्हणतात. हा वेलसुद्धा वनस्पतीच्या उच्च वगांपैकी आहे; परंतु मोहरीप्रमाणे सर्व अवयवे ह्यामध्ये पूर्णावस्थेस आलेली नसतात.

 ( फर्नः )–बागेतील शीतगृहामध्ये ' फर्न' नांवाचे हिरवे रोपे कुंड्यांतून लाविलेले नेहमी दृष्टीस पडतात. त्यांचे खोड मातींत असून, बाहेर त्यांची पाने लांब वाढली असतात. पानांचे अग्र उलट्या गुंडीप्रमाणे बनले असते. ह्यास फुले कधी येत नाहीत. पानांच्या पाठीमागील भागांवर किनाऱ्यापाशी लहान फोडाप्रमाणे फुगवटे असतात. फुगवट्याचे आवरण उघडून पाहिले असतां आंत पिंगट रंगाची भुकटी आढळते. ही भुकटी सूक्ष्मदर्शक यंत्रासालीं तपासली असता ती पेशीमय आहे असे आढळून येते. प्रत्येक पेशी योग्य परिस्थिति मिळाली असतां उगवते. कांहीं काळ ही उगवती स्थिति जमिनीत राहून नंतर त्यापासून पूर्वीप्रमाणे हिरवा रोपा बाहेर दिसू लागतो. ह्या रोपड्यांची उत्पत्ति त्या पिंगट भुकटीपासून होते. फळांतील बीजाप्रमाणे येथे बीजे असत नाहीत. ही वनस्पति क्षुद्र जातीपैकी आहे.

 भूछत्रेः-पावसाळा सुरू झाल्यावर उकिरड्यावर भूछत्रे (Mushroom.) उगवलेलीं नेहमी पाहण्यांत येतात. वरील भाग छत्रीसारखा असून खाली जाड दांडी जमिनीत गेली असते. छत्रीच्या खालील पृष्टभागांवर लहान लहान झालरीप्रमाणे पडदे असतात. ह्या पडद्यांमध्यें धूसर रंगी भुकटी आढळते. ह्यास फुले अथवा फळे येत नाहीत, ह्याची अवयवे इतरांप्रमाणे पूर्णावस्थेस पोहोचलेली नसतात, खोड, पाने वगैरे भाग असत नाहीत. वरील वनस्पतीप्रमाणे ह्यांत हिरवारंग दिसत नाही. ही भूछत्रे आपली उपजीविका मृतसेंद्रिय पदार्थांवर करतात. हवेतून पौष्टिक द्रव्ये शोषण करण्याची शक्ति ह्यांमध्ये नसते. ह्यांची उत्पत्ति पडद्यामध्ये असणा-या भुकटीपासून होते. कांहीं ठिकाणी त्यांचा भाजीसारखा उपयोग करतात. कुत्र्याच्या मुतापासून हीं उत्पन्न होतात, असा समज आहे; पण तो खरा नाहीं. भू-छत्रे क्षुद्रवनस्पति आहेत.

२ रे ].     कल्पना     ११
-----

 शैवाल तंतुः—(Spirogyra) वाहत्या अगर सांठलेल्या पाण्यांत शैवालतंतू (Spirogyra ) आढळतात. त्यांचा एक तंतु घेऊन त्याचे सूक्ष्मदर्शक यंत्राने अवलोकन केले असतां, तो तंतू सारख्या पेशी एकास एक लागून बनला आहे असे आढळेल. प्रत्येक पेशींत जीवनकण असून पेशीचे केंद्र जीवनकणांमध्ये असते. पेशींत फिरकीच्या मळसूत्राप्रमाणे हिरवे पट्टे असतात. व मधून मधून त्या पट्टयांत रत्नाप्रमाणे चकाकणारे पुंजके आढळतात, पुंजक्याभोवती सत्वाचे बारीक कण जमलेले असतात. ह्या पुंजक्यास ' पिरनॉइडबॉडीजू ' ( Pyrenoid bodies. ) म्हणतात. शैवालतंतूची वाढ पेशी विभागाने होते, म्हणजे पेशीचे भाग पडून नवीन पेशी तयार होतात, व त्यामुळे तंतु वाढत वाढत जातो. तंतूची प्रत्येक पेशी स्वतंत्रपणे आपले जीवन चालवू शकते, पण जोपर्यंत त्या पेशी परस्पर चिकटलेल्या असतात, तोपर्यंत त्या सर्वांचा हितसंबंध एकच असतो. शैवालतंतु वनस्पतीच्या क्षुद्रवर्गापैकी आहेत. भूछत्रांमध्ये नसणारा हिरवा रंग ह्यांत चांगला स्पष्ट असतो, त्यामुळे आपलें अन्न स्वतंत्रपणे हवेतून त्यास मिळविता येते.

 किण्व. (yeast:)—उसाचा रस अथवा ताडी उघड्या हवेत राहू दिली असतां आपोआप त्यास कुजट घाण येऊ लागते. ही कुजट घाण आंबटावर असते. ह्या आंबट घाणीचे कारण हवेतून किण्व (yeast ) नांवाची एक पेशीमय वनस्पति त्या रसांत पडते.किण्वाबरोबर इतर सूक्ष्म जंतु (Bacteria) ही निर्माण होतात. तूर्त आपण किण्वा ( yeast ) कडेच लक्ष्य देऊ. ही वनस्पति सूक्ष्म असल्यामुळे नुसत्या डोळ्यास दिसण्याजोगी नसते. ती पहावयास सूक्ष्मदर्शक यंत्राचे सहाय घेतले पाहिजे. किण्व वनस्पति त्यारसामध्ये पडल्यावर रसांतील पौष्टिकद्रव्ये शोषून आपली वाढ करू लागते. वाढ झपाट्याने झाल्यामुळे रसांतील पौष्टिकद्रव्ये लवकरच संपतात व त्यांत उलटपक्षी घाणजनक आम्ले तयार होतात. ह्या आम्लांची आंबट घाण पुढे येऊ लागते. म्हणूनच असले पदार्थ कधीही उघडे ठेवू नये. रसांत गोडी आणणारी जी साखर, तींतील आक्सिजन ह्या वनस्पति खाऊन टाकून पाणी व इतर आम्लें बनू देतात.

 सूक्ष्मदर्शकयत्रांतून ताडीचा एक थेंब पाहिला असतां पुष्कळ वाटोळ्या पेशी दृष्टीस पडतात. प्रत्येक वाटोळी पेशी ही एक किण्व (yeast) वनस्पति होय.
१२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

पेशीतील जीवनतत्त्व (Protoplasm) रसांतून पोषक द्रव्ये शोषण करून ती सर्व आपले पोटांत सांठविते. द्रव्यें सांठविलेल्या जागेस जडस्थाने (Vacuols) म्हणतात. जडस्थानांत शोषिलेले पाणी व ही द्रव्ये एकवटून राहतात. पेशीची वाढ व उत्पत्ति ही दोन्ही सारखीच होतात. पेशीची एक बाजू जास्त फुगून तो फुगलेला भाग पूर्वीच्या पेशीसारखा मोठा होतो. जोपर्यंत ते दोन्ही भाग एकमेकांस चिकटून राहतात, तोपर्यंत पेशीची वाढ होत आहे असे समजतात. जेव्हां तो फुगवटा मूळ पेशीपासून वेगळा होऊन स्वतंत्रपणे व्यवहार करूं लागतो, तेव्हां त्याची स्वतंत्र उत्पत्ति होते असे मानतात. ही स्वतंत्रपेशी मूल पेशीसारखीच किण्व (yeast) वतस्पति बनते. ह्या रीतीने शेकडो पेशी उत्पन्न होतात.

 किण्व (Yeast ) वनस्पति अमीबा नांवाच्या शुद्र प्राण्यासारखी असते. दोहोंमध्ये फारच सूक्ष्म फरक असतो. चलनशक्ति दोहोत साधारण असते. किण्व (Yeast) वनस्पति अमोनियम टारटरेटचा उपयोग करून आपलें पोषण करू शकते. पण कोणताही प्राणी मग तो क्षुद्र असो व उच्च असो, एकपेशीमय असो अथवा बहुपेशीमय असो, तथापि असल्या केवळ नायट्रोजनयुक्त अन्नावर राहू शकत नाही. ह्या फरकामुळे किण्ववनस्पतींचे क्षुद्र एकपेशीमय प्राण्यापासून वर्गीकरण करितां येते.

 सारांश मोहरीस सर्व अंगें होती, तर अमरवेलांत अवयवांची पूर्णावस्था मुळीच नव्हती. मोहरी आपलें अन्नद्रव्य मुळांकडून शोषून घेते, तर अमरवेल उदरपोषणाकरितां परावलंबी आहे. फर्न मोहरीप्रमाणे अन्नद्रव्ये शोषून घेते, तर त्यास फुले येत नाहींत. भूछत्रे केवळ जमिनीत उगवतात असे नाही, तर पुष्कळ वेळा झाडाच्या खोडावर अथवा मुळावर ती उगवतात. वनस्पतींच्या पानांत आढळणारा हरितरजक (Chlorophyll) त्यांत बिलकूल नसतो. शैवालतंतु जमिनावर न उगवतां पाण्यांत वाढतात. किण्ववनस्पती (yeast) ची तऱ्हा ह्या सर्वांहून अगदी वेगळी असते. ती हवेत सर्वत्र राहू शकते व वाटेल तेव्हां वाटेल त्या ठिकाणी आपला प्रादुर्भाव करू शकते. फक्त तिच्या वाढीस योग्य परिस्थिती व भरपूर अन्नाचा सांठा पाहिजे. तेव्हां अशा स्थितीत वनस्पति म्हणजे एकाप्रकारची असते असे कधीही ठाम ठरविता येणार नाही. परमेश्वराच्या सृष्टीत किती चमत्कार आढळतील ह्याचा नियम नाहीं, वर दिलेल्या

३ रें.].     जनन Germination.     १३
-----

उदाहरणांवरून वनस्पतींसंबंधी किती वैचित्र्य आहे हे वाचकांच्या लक्ष्यांत येईल, त्यांचे अस्तित्व पाण्यात, हवेत, जमिनीवर, अंधारांत, सूर्यप्रकाशांत वगैरे सर्व ठिकाणी असू शकते. त्यांचा आकार रेणूपासून वृक्षासारखा असू शकतो, त्या स्वावलंबी अथवा परावलंबी असू शकतात, व त्यांचे रंग वेगवेगळे असतात.

---------------