हिंदुस्थानातील पाऊस व झाडे

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf

हिंदुस्तानांतील
पाऊस व झाडें
ह्या विषयाचे शास्त्रीय व सुलभ रीतीने विवेचन
---------------
हा ग्रंथ
बळवंत गणेश देशपांडे
माजी एक्स्ट्रा असिस्टंट कन्सरव्हेटर ऑफ फॉरेस्टस्
यांनीं लिहून पुणे पेठ बुधवार घ. नं. १०९
येथे प्रसिद्ध केला.
---------------
मुद्रक
रावजी श्रीधर गोंधळेकर
जगद्धितेच्छु प्रेस पुणे-सिटी.
---------------
सन १९०९ इ०
---------------
किंमत १ रुपया.-----
सन १८६७ च्या २५ व्या आक्टाप्रमाणे रजिस्टर करून
सर्व हक्क स्वाधीन ठेविले आहेत.
-----


प्रस्तावना.
--------------------

 आजपर्यंत मराठी भाषेत मनोरंजक, ऐतिहासिक व इतर उपयुक्त विषयांवर अनेक ग्रंथ झालेले आहेत. ह्या ग्रंथांनी आपआपली कामें बऱ्याच चांगल्या रीतीने बजाविली असून पुढेही त्यांचा प्रसार व उपयोग व्हावा तसा होत जाण्यास काही अडचण येईलसे दिसत नाही, ही समा- धानाची गोष्ट आहे. परंतु, माझ्या मते, वास्तविक उपयुक्त ग्रंथ म्हटले म्हणजे शास्त्रीय विषयांवरील होत. अशा प्रकारचे व त्यांतूनही सोप्या व मनोरंजक भाषेत लिहिलेले ग्रंथ हे देशाचे उन्नतीस विशेष उपयोगाचे आहेत. परंतु असे ग्रंथ आपल्या भाषेत फारच थोडे झाले आहेत. हा विषय रुक्ष असल्यामुळे असल्या ग्रंथांपासून अर्थात् मनोरंजन होत नाहीं, म्हणून हे ग्रंथ वाचण्याची बहुतकरून कोणास गोडी वाटत नाही. आणि असल्या ग्रंथांचा खप सहजच कमी असल्यामुळे, ह्या विजयावर नवीन ग्रंथ रचणारास मिळावे तसे उत्तेजन मिळत नाही.

 शास्त्रीय ग्रंथांचे वाचनाने मनास बिलकुल आनंद होत नाही असे मात्र नाही. उलट अशी गोष्ट आहे की, ह्या विषयाची एकदां गोडी मात्र लागली पाहिजे, म्हणजे ह्याच्या अध्ययनानें मनास इतका आनंद होतो कीं, त्या पुढे इतर मनोरंजक विषयांवरील ग्रंथांच्या वाचनापासून होणारा आनंद कांहींच नाही. मात्र ह्या विषयांत शिरकाव होण्याला प्रथमारंभी वाचकाला यावरील सोप्या व मनोरंजक भाषेत लिहिलेल्या ग्रंथांचे साहाय्य मिळाले पाहिजे.

 ज्या एकाद्या गोष्टीचे कारण आपणांस बहुत दिवस समजत नव्हतें,

त्या गोष्टीचे कारण आपणांस एकाएकीं समजलें तर किती आनंद होतो! 

आणि ज्या गोष्टी प्रथम दर्शनी अगदी विसदृश दिसतात, त्या एकाच कारणाचे परिणाम आहेत असे समजल्यावर मनास किती आनंद होतो व किती आश्चर्य वाटते, ह्याचा पुष्कळांस अनुभव असेल.

 शास्त्रीय विषय समजून घेण्याची गोडी लहानपणापासून मुलांस लाविली पाहिजे. ही गोडी मोठेपणी लागण्याचा संभव फार कमी. आपल्या सभों- वतीं नित्य जे अनेक सृष्टव्यापार चाललेले असतात, त्यांचे स्वरूप व कारणे काय आहेत हे जाणण्याची इच्छा, मुलांस कळू लागल्यापासून स्वभावतःच उत्पन्न होते. "पाऊस कां पडतो," " विजा कां चमकतात,?" " गडगडते हे काय," तसेच "चंद्र काय आहे," "सूर्य काय आहे?" वगैरे प्रश्न लहान मुलें करतांना सर्वांनी ऐकलेच असेल. मुलांची ही जिज्ञासा योग्य उत्तरे देऊन तृप्त करणे हे आपले कर्तव्य आहे. परंतु अशा प्रकारचे प्रश्न विचारले असता, त्रासून जाऊन त्यांजवर रागावणे व या रीतीने त्यांची जिज्ञासा कुंठित करणे ह्यासारखी अनिष्टकारक दुसरी कोणतीच गोष्ट नसेल. कित्येक गोष्टींची कारणे मुलांस समजावून देणे हे आपल्या शक्ती- बाहेर असते हे खरे, परंतु अशा वेळीं न रागावतां त्यांस समाधान वाटेल अशी तांत्रिक माहिती सांगणे श्रेयस्कर आहे. प्रश्न तसाच कठीण अस- ल्यास पुढे उत्तर देण्याचे आश्वासन द्यावें; परंतु त्यांची जिज्ञासा कुंठित करू नये, असे केले असतां, त्यांच्या बुद्धीचा विकास होण्याचा योग्य पाया घातला असे होईल.

 अशा रीतीने पदार्थविज्ञानशास्त्राचा पाया देशामध्ये रोंवला गेला म्हणजे त्यापासून फारच हित होण्याचा संभव आहे. ह्याच शास्त्राचे अभ्यासाने युरोपखंडांतील लोकांची प्रगति झाली आहे. आगगाड्या, तारायंत्रं, आगबोटी वगैरे अनेक तऱ्हेचे शोध, ज्यांपासून मनुष्यमात्राचे सुखांत

अनंतपट भर पडली आहे, हे सर्व अर्वाचीन शास्त्रांचे परिणाम होत. 

ह्याच ज्ञानाचे प्रसाराने त्यांचा उद्योग, व्यापार, संपत्ति व बल हीं वा- ढली आहेत; व म्हणूनच हें खंड सर्व पृथ्वींत पुढे सरसावलेले आहे.

 सृष्टचमत्कारांमध्ये फार महत्त्वाचा ऋतु जो हिंदुस्तानचा पावसाळा, तसेच झाडे व पाऊस यांजमध्ये असलेला अन्योन्यसंबंध, हे अशा प्रकारचे शास्त्रीय विषय होत. ह्या विषयांबद्दल सामान्य लोकांमध्ये फारच अज्ञान आहे. ह्यांविषयी खेड्यांतील लोकांस जितकी माहिती असते तितकीसुद्धां प्रायः शहरांतील लोकांस नसते. "वळिवाचा पाऊस म्हणजे काय," "झडीचा पाऊस म्हणजे काय," "ते पडण्याचे दिवस कोणते" वगैरे माहिती खेड्यांतील लोकांस जशी असते तशी शहरांतल्या लोकांस साधारणतः नसते.

 पाऊस पडणे ही गोष्ट आपल्या इतकी परिचयाची आहे की, त्याबद्दल आपणांस विशेष कांहींच वाटत नाही. "पाऊस कसा पडतो," “गडगडते हे काय" अशा प्रकारचे प्रश्न मुले अगदी लहानपणी आपल्या घरच्या माण- सांस करितात, परंतु त्यांस "इंद्राचा हत्ती समुद्राचे पाणी सोंडेत घेऊन गोड करून फेंकतो म्हणून पाऊस पडतो," व "आभाळांत म्हातारी हरबरे भरडते म्हणून गडगडते" अशा प्रकारची मात्र उत्तरे मिळतात. पुढे, मुले शाळेत जाऊ लागल्यावरही त्यांचे ज्ञानांत विशेष भर पडते असे नाहीं. मराठी क्रमिक पुस्तकांमध्ये पाऊस, मेघ, धुकें, दंव वगैरेबद्दल तांत्रिक माहिती दिलेली असते. परंतु जून लागतांच पावसाळा कां सुरू होतो व ती आॅॅक्टोबर अखेरच कां संपतो, हिंदुस्तानचे निरनिराळे भाग कमी जास्त पाऊस पडण्याची कारणे काय वगैरेबद्दल यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेण्यास साधन नसते. म्याट्रिक्युलेशनपर्यंतचे इंग्रजी अभ्यासक्रमाचीही स्थिती हीच. मात्र नैसर्गिक भूगोलामध्ये नैऋत्येकडील नियतकालिक वारा व ईशान्येकडील नियतकालिक वारा ह्यांजबद्दल थोडी सविस्तर माहिती, तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये ऋतु कसे होतात ह्याबद्दलची सर्व साधा-

रण माहिती प्राप्त होते, ह्यापलीकडे कांहीं नाहीं. पुढे कॉलेजचे अभ्यास

क्रमांत तरी जास्त काय कळते ? ' उष्णता,' 'विद्युत् ' वगैरे शास्त्रांवरील ग्रंथांत प्रायः मेघ, धुके, दंव वगैरेबद्दल साद्यंत वर्णन असते इतकेच; बाकी हिंदुस्तानचे पावसाळ्याबद्दल माहितीचा अभावच.

 इ०सन १८७६-७७ व १८७७-७८ साली जे लागोपाट बडे दुष्काळ पडले त्या वेळी पाऊस कमी पडण्याची कारणे काय व जंगलांचा आणि पावसाचा कांहीं संबंध आहे की काय ह्याबद्दल वर्तमानपत्रांतून बरीच वाटाघाट झाली. शास्त्रीय पद्धतीने ह्या विषयाची वाटाघाट करणे हा वर्तमानपत्रांचा विषय नव्हता हे उघड आहे. पुढे ह्या दुष्काळांचे संबंधाने चौकशी करण्याकरितां सरकारकडून एक कमिशन नेमण्यांत आले. त्या वेळी मात्र तज्ज्ञ लोकांची मते कमिशनने घेतली. त्यांत सरकारचे हवाखात्याचे रिपोर्टराचा निबंध छापला आहे. हिंदुस्तानांतील पावसाळ्या- संबंधाने पद्धतशीर वर्णन केलेले प्रथमचे वाङ्मय हेंच होय.

 पुढे सन १८८० अगर १८८१ साली, प्रायः वरील निबंधाचेच आधारें कै० प्रो० केरो लक्ष्मण छत्रे यांनी पुणे शहरी हिराबागेमध्ये मराठीत ह्याच विषयावर व्याख्यान दिले. व ते ज्ञानप्रकाशांत छापूनही निघालें होते. हे व्याख्यान फारच मनोरंजक रीतीने दिले होते. हिंदुस्तानचे पावसाळ्याबद्दल मराठींत सविस्तर उपलब्ध माहिती काय ती एवढीच.

 सरकारचे जंगलखात्याचे वाङ्मयांतसुद्धा ह्या विषयासंबंधाने पद्धतशीर माहिती आढळत नाही. जास्त पाऊस पडण्यास जंगले कशी कारणीभूत होतात व त्यांचे रक्षणापासून फायदे कसे होतात यांजबद्दल त्रोटक लेख अनेक आहेत. परंतु ह्या विषयाचे शास्त्रीयरीत्या केलेले विवरण आढळत नाहीं.

 अशा महत्त्वाचे विषयासंबंधाने प्रयासाने मिळविलेली माहिती एकत्र करून तिचे यथामति शास्त्रीय पद्धतीने विवरण करून आपल्या देशबांध- वांस सादर करावे ह्या हेतूने हे पुस्तक रचिलें आहे.

 झाडांची वृद्धि करणे ही गोष्ट आपल्या हिंदुस्तान देशास फारच अव
श्यक आहे. ह्या विषयाची वाटाघाट होऊन झाडांचे वृद्धीची

अवश्यकता जितकी लोकांचे मनांत बिंबेल तितके आपल्या देशाचे कल्याण आहे. हे पुस्तक वाचून ज्यांना ज्यांना म्हणून मालकीची जमीन आहे, त्यांना त्यांना आपल्या जमिनीवर झाडे लावावी अशी इच्छा उत्पन्न झाल्यास, मी आपल्या श्रमाचे सार्थक्य झाले असे समजेन.

 ह्या बाबतीत सरकारही आपले कर्तव्य करीत आहे. झाडांची वृद्धि करण्याकरितां, आणि जी झाडे आहेत त्यांचे संरक्षण करण्याकरितां सरकाराने जंगलखात्याची योजना केली आहे. ह्या खात्याचा उद्देश फार स्तुत्य आहे. आणि सरकारचे हेतु योग्य रीतीने सिद्धीस गेल्यास आपल्या देशाचा फार फायदा होण्याचा संभव आहे. असे असून ह्या खात्यासंबंधाने लोकांचे अज्ञान फार आहे व त्यांचा गैरसमजही फार झालेला आहे. ह्यामुळे जंगलखाते हें सरकारने आपल्या कल्याणाकरितां काढिले आहे असे लोकांस न वाटतां, ते ह्या खात्यास जितका अडथळा करवेल तितका करीत आहेत. हा गैरसमज दूर करण्याबद्दल यथाशक्ते प्रयत्न करावा हाही हे पुस्तक लिहिण्याचा हेतु आहे.

 ह्या पुस्तकाचा विषय शास्त्रीय असल्यामुळे हे पुस्तक सर्वांस सारखें समजण्याचा संभव कमी. अर्वाचीन मुख्य मुख्य शास्त्रांची मूलतत्त्वें ज्यांस अवगत आहेत त्यांस हे पुस्तक सहज समजेल. ज्यांचा मराठी सातवे इयत्तेपर्यंत अभ्यास झाला आहे व क्रमिक पुस्तकांतील शास्त्रीय विषयांवरील धडे ज्यांनी लक्षपूर्वक वाचले आहेत, त्यांस हा विषय समजण्यास हरकत पडेल असे वाटत नाही. साधारण समजुतीच्या मनुष्याससुद्धां हा विषय समजावा ह्या हेतूनें, ज्या ठिकाणी शास्त्रीय तत्त्वे सांगण्याचा प्रसंग आला आहे, त्या ठिकाणी ती तत्वें प्रचारांतील अगदी साधी उदाहरणे देऊन स्पष्ट व सुबोध करण्याचा विशेषतः प्रयत्न केला आहे. ज्यांत

यंत्रोपकरणाची जरूर आहे असे शास्त्रीय प्रयोग सांगण्याचे होईल तितकें 
टाळले आहे. तीन चार प्रयोग, जे अगदी सुलभ व विषयाचे समजुतीस

अत्यवश्यक असे वाटले, तेवढे मात्र सांगितले आहेत. विषय होईल तितका सुबोध करण्याचा प्रयत्न केला आहे. तो कितपत सिद्धीस गेला आहे, ह्याचा निर्णय करणे मी वाचकांवरच सोंपवितों.

 ज्यांस अर्वाचीन मुख्य मुख्य शास्त्रांची मूलतत्त्वें माहीत नाहीत, त्यांस ह्या पुस्तकाच्या वाचनाने कित्येक तत्त्वें सहजीं समजतील, व प्रचारांतील कित्येक गोष्टींची उपपत्ति सहज समजेल असा भरंवसा आहे.

 पुस्तक लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. याकरितां भाषेच्या संबंधाने यांत बरेच दोष दिसून येतील, तरी त्याबद्दल सुज्ञ वाचक मला माफी करतील अशी मी आशा करितो, ह्या पुस्तकामध्ये जे जे दोष आढळतील व विषयाचे विवेचनाचे बाबतींत ज्या ज्या कांहीं सूचना कराव्याशा वाटतील त्या त्या, त्यांनी मेहरबानीने मला कळविल्यास, मी त्यांचा फार आभारी होईन, व कदाचित् ह्या पुस्तकाची दुसरी आवृत्ति काढण्याचा योग आला, तर मी त्यांबद्दल अवश्य विचार करीन.

    पुणे,

  ता० १८ माहे फेब्रु० सन १९०९इ०     ब० ग० देशपांडे
             ग्रंथकर्ता.


--------------------


अनुक्रमणिका.
----------
पृष्ठें.
भाग १ ला. १-१६
 हिंदुस्थानचे भूगोलवर्णन व हवामान.
  भूगोलवर्णन. १-१२.
  हवामान. १२-१६.
भाग २ रा. १७-२७.
 हिंदुस्थान देशाच्या स्वाभाविक अवश्यकता.
  थंडी. १७-२१.
  पाऊस. २१-२४.
  पाण्याचा संचय. २४-२७.
भाग ३ रा. २९-४५.
 थंडी.
  रंग. ३०-३४
  रसायनव्यापार. ३४-३९
  बाष्पीभवन. ३९-४५
भाग ४ था. ४६-७८.
 पाऊस.
  ऋतु. ४६-५३
  नियतकालिक वारे. ५३-६०
  पर्जन्यवृष्टि. ६०-६४
  झाडे व पाऊस ह्यांचा अन्योन्य संबंध. ६४-६७  पर्जन्यव्याप्ति. ६७-७४
  उपसंहार. ७४-७८
भाग ५ वा. ७९-९१
 पाण्याचा संचय.
  पाटबांधारे. ७९-८१
  झरे. ८१-८४
  झाडांच्या क्रिया. ८४-९१
भाग ६ वा. ९२-११७
 झाडांपासून इतर उपयोग.
  दहिंवर. ९२-१००
  जमिनीचे बंधन. १०१-१०३
  वादळास प्रतिकार. १०३-१०४
  खताची उत्पत्ति. १०४-१०९
  हवेची शुद्धि. ११०-११५
  वाऱ्यास प्रतिबंध. ११५-११६
  उद्योगधंद्यांची वाढ वगैरे. ११६-११७
भाग ७ वा. ११८-१३४
 जंगलसंरक्षण.
  भूगर्भशास्त्रकाल. ११८-११८
  भूगर्भशास्त्रानंतरचा काल. ११८-१२०
  वेदकाल. १२०-१२१
  पौराणिक काल. १२२-१२२
  ऐतिहासिक काल. १२३-१२९
  झाडे लावण्यास योग्य स्थलें. १२९-१३४
--------------------
हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf
हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf