हिदुस्थानातील पाऊस व झाडे/पाऊस

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchभाग ४ था.
---------------
पाऊस.

 आतां, दुसरी अवश्यकता पावसाची, त्याविषयी सविस्तर विचार करू.

ऋतु.

 प्रचारामध्ये आपण वर्षाचे *तीन काळ मानितों : उन्हाळा, पावसाळा व हिंवाळा. ह्यांसच ऋतु ही संज्ञा देता येईल. हिंदुस्तान देशापुरता विचार केला असतां हें ऋतुमान बरोबर आहे. परंतु सर्व भूगोलाचा विचार केला तर हे मान चुकीचे आहे. कारण, उन्हाळा व हिंवाळा हे ऋतु सर्व पृथ्वीवर नियमित काळीं नियमाने होतात; परंतु पावसाचा तसा नेम नाहीं. कित्येक देशांमध्ये पाऊस वर्षभर पडत असतो, कित्येक ठिकाणी नियमित काळी मात्र पडतो, व कांहीं ठिकाणी तर मुळीच पडत नाही. ह्यामुळे पावसाळा सर्वसाधारण स्वतंत्र ऋतु मानणे रास्त होणार नाहीं. वास्तविक ऋतु म्हटले म्हणजे दोन : उन्हाळा व हिंवाळा. पाऊस हा पुष्कळ गोष्टींवर अवलंबून असणारा स्वतंत्र सृष्टव्यापार आहे.

 हिंवाळा व उन्हाळा म्हणजे उष्णतेचे कमीअधिक प्रमाण होय. हे प्रमाण कमीअधिक होण्याचे कारण काय ? उष्णता सूर्यापासून

-----
 * इंग्लंड वगैरे थंड देशांत चार काळ मानण्याचा परिपाठ आहे, 
४७

प्राप्त होते हे उघड आहे. परंतु सूर्य व पृथ्वी जर कायम आहेत तर उष्णता कमी जास्त कां होते ?

 बुध, शुक्र, मंगळ, व गुरु वगैरे ग्रहांप्रमाणे पृथ्वी हा एक ग्रह आहे. सर्व ग्रह सूर्यासभोवती फिरत असतात; व त्यांस एक प्रदक्षिणा करण्यास नियमित काळ लागतो. ह्या सर्व ग्रहांच्या फिरण्याच्या कक्षा सूर्यापासून निरनिराळ्या अंतरावर आहेत. परंतु ह्या सर्वांच्या केंद्रस्थानीं सूर्य आहे. वास्तविक म्हटले असतां ह्या कक्षा वर्तुलाकार नाहींत, दीर्घवर्तुलाकार आहेत. दीर्घवर्तुलास दोन केंद्रे असतात, व त्याची आकृति बाजूस दाखविल्याप्रमाणे असते

हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf

त्या दोन केंद्रस्थानापैकीं एका केंद्रस्थानी सूर्य असतो. ग्रहांच्या कक्षा अशा असल्यामुळे ते आपआपले कक्षांमधून फिरावयास लागले असतां, काही दिवस सूर्यापासून दूर जातात, व कांहीं दिवस जवळ येतात. सूर्याजवळ आल्या वेळी सूर्याचे

आकारमान वाढलेले दिसते, व त्यापासून थोडीशी उष्णताही अ
४८

धिक प्राप्त होते. परंतु ग्रहांचे जवळ येणें व दूर जाणे ह्यामध्ये महदंतर नसल्याकारणाने, प्राप्त होणाऱ्या उष्णतेमध्ये विशेष अंतर अनुभवास येत नाही. असे असतां, आपणांस कमीजास्त उष्णता कशी प्राप्त होते ? उन्हाळ्यांतील व हिंवाळ्यांतील उष्णतेच्या मानामध्ये बराच फरक असतो. इतका फरक पृथ्वी सूर्याजवळ आल्यामुळे अगर दूर गेल्यामुळे पडतो असे नव्हे. तर मग, हिवाळा व उन्हाळा हे ऋतु होतात कसे ?

 पृथ्वी सूर्याचे भोंवती फिरतेवेळी आपले आंसाभोंवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. आतां पृथ्वीच्या आंसाचा तिच्या कक्षेशी जर काटकोन झाला असता, तर पृथ्वीवर ऋतु बिलकूल झाले नसते; व पृथ्वीच्या दैनंदिन गतीने दिवस व रात्र ह्यांशिवाय वर्षभर दुसरा कोणताही फेरफार झाला नसता. विषुववृत्तावर मात्र सूर्याची किरणें लंब पडली असती, व तेथे अतिशय उष्णता असती. विषुववृत्ताचे दक्षिणेस व उत्तरेस सूर्याचे किरण अधिकाधिक तिर्कस पडत जाऊन क्रमाक्रमाने उष्णता कमी कमी होत ध्रुवांजवळ अतिशय थंडी झाली असती, व हे उष्णतेचे मान सर्वकाळ सारखेच राहिले असते. आतां दीर्घवर्तुळाच्या ज्या केंद्रस्थानीं सूर्य असतो, त्याजवळ पृथ्वी आली म्हणजे थोडी जास्त उष्णता झाली पाहिजे, हे खरे आहे. परंतु, निरनिराळे ऋतु होण्यासारखा उष्णतेत कांहीं फरक होत नाही, म्हणून मागें सांगितलेंच आहे. ह्याप्रमाणे पृथ्वीच्या आंसाशी जर कक्षेचा काटकोन झालेला

असता, तर ऋतुमान झाले नसते; इतकेच नाही, तर पृथ्वीवरील 
४९

सर्व ठिकाणी दिवस व रात्र हीं सारख्याच मानाचीं म्हणजे बारा बारा तासांची झाली असती. परंतु, अशी स्थिति नाही, हे आपल्या अनुभवास येते.

 विषुववृत्ताचे दक्षिणेस हिंवाळा असला म्हणजे उत्तर गोलार्धातील लोकांस उन्हाळा असतो; व उत्तर गोलार्धात हिंवाळा असला म्हणजे दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. तसेच, उन्हाळा व हिंवाळा यांचा काळ सहा सहा महिनेपर्यंत असतो; म्हणजे प्रत्येक ठिकाणीं ऐन उन्हाळ्याचा मध्यभाग व ऐन हिंवाळ्याचा मध्यभाग यांमध्ये सहा महिन्यांचे अंतर असते. ह्याचप्रमाणे, उन्हाळा असला म्हणजे रात्रीपेक्षा दिवस मोठा असतो, व हिंवाळ्यांत दिवसापेक्षा रात्र मोठी असते.

 आतां, विषुववृत्ताचे उत्तरेस अगर दक्षिणेस ज्या वेळेस उन्हाळा असतो, त्या वेळी सहा महिनेपावेतों सर्व जागीं एकदम उष्णतेचे मान वाढते; व ज्या वेळी हिंवाळा असतो, त्या वेळी एकदम उष्णतेचे मान उतरते, असें नाहीं. आतां, उत्तर गोलार्धात उन्हाळा लागण्याचा काल आहे असे समजा. ह्या वेळी, प्रथमतः विषुववृत्ताच्या समीप उन्हाळा भासावयास लागतो, व उत्तरोत्तर अधिकाधिक उत्तर दिशेकडे उन्हाळा होत जातो. अशा रीतीने उत्तर गोलार्धात उन्हाळा होत चालला असतांना दक्षिण गोलार्धात अगदी दक्षिणेकडे थंडी भासमान होऊ लागते; व उत्तरोत्तर त्याच्या अलीकडे विषुववृत्ताचे बाजूस थंडी जास्त

जास्त पडत जाऊन दक्षिणेस तर फारच थंडी पडते. अशा रीतीनें कांहीं महिने लोट
५०

ल्यावर, उत्तर गोलार्धात उत्तरेकडे पुनः थोडथोडी उष्णता कमी होऊ लागते, व दक्षिणेस थोडी जास्त होऊ लागते. असाच क्रम दक्षिण गोलार्धात उन्हाळा लागेपर्यंत चालतो; नंतर पुनः हे रहाटगाडगे फिरते.

 वरील क्रम चालू असतांना जेथे जेथे उष्णता जास्त भासमान होत जाते, तेथे तेथे सूर्य डोकीवर येत असतो म्हणजे त्या त्या ठिकाणीं सूर्याची किरणें लंब रेषेने पडत जातात, व रात्रीपेक्षा दिवस मोठे होत जातात. लंब किरण पडल्यामुळे व दिवसरात्री लहानमोठ्या झाल्यामुळे उष्णतेचे मान कमीअधिक कसे होते हें आतां पाहूं.

 लंब किरणांपासून जितकी उष्णता प्राप्त होते, तितकी उष्णता तिर्कस किरणांपासून प्राप्त होत नाहीं. ह्याचे कारण इतकेच की, नियमित लंब किरणें जितकी जागा व्यापितात, त्यापेक्षां तितकीच तिर्कस किरणे जास्त जागा व्यापितात. अर्थात् , नियमित जागेवर कमी किरणे पडल्यामुळे त्या ठिकाणी उष्णताही कमी भासते. सकाळी आठ नऊ वाजण्याच्या वेळी एकाद्या झरोक्यांतून सूर्याची किरणे पडली असतील अशा ठिकाणीं एक लाकडाचा तक्ता अगदी सूर्याचे समोर म्हणजे किरणांशीं काटकोन होईल असा धरावा, आणि तक्त्यावर उष्णता व प्रकाश किती आहे, हे पहावे; नंतर तोच तक्ता ती किरणे जास्त जागा व्यापितील अशा रीतीने तिर्कस धरावा, म्हणजे प्रकाश व उष्णता कमी दिसतील. सकाळीं व

संध्याकाळीं आपणांस ऊन कमी लागते व मध्यान्हास फार लागते 
५१

ह्याचेही कारण हेच. सकाळी व संध्याकाळी किरणें तिर्कस पडतात ह्यामुळे थोडी किरणें पुष्कळ जागा व्यापितात म्हणून उष्णता कमी असते; व मध्यान्हास किरणें लंब पडतात म्हणून उष्णता अधिक असते.

 अशा रीतीने सूर्याची किरणें कर्कवृत्ताचे उत्तरेस व मकरवृत्ताचे दक्षिणेस लंब रेषेने कधीच पडत नाहींत. आतां, मकरवृत्तावर सूर्याची किरणें लंब रेषेने पडतात असा काल आला आहे असे समजा. हा काल आला म्हणजे प्रतिदिवसास सूर्याची किरणें उत्तरोत्तर उत्तरेकडील प्रदेशावर लंब लंब पडत जातात, व कर्कवृत्त आले म्हणजे तेथेच थांबतात. नंतर लागलीच तेथून पुनः दक्षिणेकडे मकरवृत्तापर्यंत लंब लंब रेषेने पडत जातात. जणू काय, सूर्यच मकरवृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत व कर्कवृत्तापासून मकरवृत्तापर्यंत खेपा घालीत असतो ! एका वर्षामध्ये एक खेप करून सूर्य परत स्वस्थानीं येतो. म्हणून मकर व कर्कवृत्त यांचे दरम्यान प्रत्येक ठिकाण सूर्य वर्षातून दोन वेळां डोकीवर येतो; ह्यामुळे सावलीही कधीं कधीं उत्तरेस पडते व कधी कधीं दक्षिणेस पडते. मकरवृत्ताचे दक्षिणेस सावली नेहमीं दक्षिणेकडे पडते, व त्याचप्रमाणे कर्कवृत्ताचे उत्तरेस सावली नेहमी उत्तरेस पडते. उदाहरणार्थ, काशीक्षेत्र कर्कवृत्ताचे उत्तरेस आहे; तेथे सूर्य कधीही डोकीवर येत नाहीं आणि सावली नेहमीं उत्तरेकडे पडलेली असते. हा जो सूर्य फिरतोसा दिसतो त्या मार्गाच्या बारा राशी व सत्तावीस नक्षत्रे कल्पिली आहेत. पृथ्वीच्याच वार्षिक गतीमुळे सूर्य निरनिराळ्या राशीवर

अथवा नक्षत्रांवर आल्यासारखा दिसतो. ह्या मार्गास क्रांतिवृत्त 
५२

म्हणतात. ह्याच्या अगदी दक्षिणेस मकर रास आहे, व अगदी उत्तरेस कर्करास आहे. ह्या राशींवरून त्या त्या वृत्तास त्यांची नावे पडली आहेत.

 अयनें:- ही जी सूर्याची दृश्य गति हिलाच दक्षिणायन व उत्तरायण म्हणतात. कर्कवृत्ताचे दक्षिणेस मकरवृत्ताकडे सूर्य जाऊं लागला म्हणजे त्यास दक्षिणायन म्हणतात; व मकरवृत्ताचे उत्तरेस कर्कवृत्ताकडे येऊ लागला म्हणजे त्यास उत्तरायण म्हणतात. दक्षिणायनाचे तीन महिने लोटल्यावर आपणांकडे थंडी सुरू होत, व उत्तरायण लागण्याचे वेळीं थंडीचा ऐन मध्य असतो. ह्याचप्रमाणे उत्तरायण अर्धे संपलें म्हणजे उन्हाळ्यास सुरुवात होते, व दक्षिणायन लागण्याचे वेळीं ऐन उन्हाळा असतो.

 आतां, वास्तविक म्हटलें म्हणजे सूर्य कांहीं फिरत नाहीं, तो स्थिर आहे; पृथ्वी मात्र फिरते. असे असतां अयने होण्याचे कारण काय ? तर ह्याचे कारण इतकेच कीं, पृथ्वीचे आंसाचा तिचे कक्षेशी काटकोन झाला नसून ६६/ ° अंशांचा कोन झाला आहे. त्यामुळे सहा महिनेपर्यंत उत्तरध्रुव सूर्याकडे कललेला असतो व सहा महिनेपर्यंत दक्षिणध्रुव सूर्याकडे कललेला असतो. दक्षिणध्रुव कललेला असतो त्या वेळीं दक्षिणेस सूर्याची किरणें लंब पडतात व उत्तरेस तिर्कस पडतात, ह्याच वेळीं दक्षिणायन असते. ह्याच्या उलट उत्तरध्रुव सूर्याकडे कललेला असतो, त्या वेळीं उत्तरायण असते.

 ह्या अयन गतींची दोन कार्ये होतातः पहिले, सूर्याची किरणें

निरनिराळे ठिकाणीं लंब पडणे. व दुसरे, दिवस व रात्री लहान 
५३

मोठ्या होणे. लंब किरणांपासून उष्णता जास्त प्राप्त होते हैं वर दाखविलेच आहे. उन्हाळ्यामध्ये रात्रीपेक्षा दिवस मोठे असतात; ह्यामुळे दिवसा जितकी उष्णता सूर्यापासून प्राप्त होते, तितकी रात्रीं परावर्तन पावून नाहीशी होत नाहीं; ह्यामुळे दिवसानुदिवस गरमा जास्त भासतो. ह्याचे उलट, हिंवाळ्यामध्ये रात्री मोठ्या असल्याकारणाने दिवसा जितकी उष्णता प्राप्त होते त्यापेक्षा जास्त उष्णता रात्री परावर्तन पावून नाहींशी होते; म्हणून उत्तरोत्तर थंडी जास्त जास्त पडू लागते. हीच कार्ये उन्हाळा व हिंवाळा होण्यास कारणीभूत आहेत, हे उघड झाले.

 अशा रीतीने पृथ्वीवर होणारे खरे ऋतु म्हटले म्हणजे दोन : एक उन्हाळा व दुसरा हिंवाळा. आतां, निरनिराळ्या ऋतूंचे परिणाम हवेवर काय होतात ते पाहूं.

नियतकालिक वारे.

 उष्णतेचे हवेवर मुख्य कार्य म्हणजे वारे उत्पन्न होणे हे होय. एथें, वारा म्हणजे काय हे सांगितले पाहिजे. पृथ्वीभोवती वायूचे वेष्टण आहे त्यास वातावरण म्हणतात. हे वातावरण स्थिर असलें म्हणजे आपणांस भासत नाही. परंतु त्यास गति प्राप्त झाली असता, ते वाऱ्याच्या रूपाने आपणांस भासमान होते. तर अशी गति उत्पन्न होण्यास अगर वारे उत्पन्न होण्यास कारण काय होते ? पदार्थांचे अंगीं असा एक गुण आहे की, त्यांस उष्णता लाविली असतां ते प्रसरण पावतात म्हणजे फुगतात. वायुरूप पदार्थ तर

थोड्या उष्णतेने फारच फुगतात. फुगलेला पदार्थ व मूळ पदार्थ 
५४

सारख्याच आकारमानाचे घेतले तर फुगलेला पदार्थ मूळ पदार्थापेक्षां हलका असलाच पाहिजे. वातावरणांतील हवेस ज्या ठिकाणी उष्णता लागते, तेथे ती फुगते; म्हणजे सभोवतालचे हवेपेक्षा पातळ व हलकी होते. पाण्याचे तळाशीं बूच ठेविलें, तर ते जसे आपोआप वर येते त्याप्रमाणे ही हलकी हवा आपोआप वर जाऊं लागते; व तिची रिकामी झालेली जागा सभोंवतालची थंड अर्थात् जड असलेली हवा भरून काढू लागते, ह्यामुळे हवेस गति उत्पन्न होते; व ह्या गतियुक्त हवेस वारा म्हणतात.

 जाड कागदाचा एक वर्तुलाकार तुकडा घेऊन तो सर्पाकृति कातरावा, व त्याचे मध्य एका सुईच्या अग्रावर ठेवावे म्हणजे तो बाजूस लिहिलेल्या आकृतींत दाखविल्याप्रमाणे दिसेल.

हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf

ह्याच्या खालीं एक जळती मेणबत्ती ठेवावी. मेणबत्तीच्या उष्णतेने हवा पातळ होऊन वर जाऊं लागेल व तिचा आघात कागदावर होऊन कागद गरगर फिरूं लागेल. अशीच क्रिया पृथ्वीवर मोठ्या प्रमाणाने चालत असते.

 पृथ्वीवर निरनिराळ्या वेळी निरनिराळे ऋतु होत असल्याकारणाने, उष्णतेचे मान निरनिराळ्या ठिकाणी कमी जास्त होते व

त्यामुळे वाऱ्याची उत्पत्ति होते. हे उष्णतेचे कार्य हवेवर सर्वत्र 
५५

सारखे होत नाहीं. समुद्रादि जलसमूहाचे, तसेच डोंगराचे सान्निध्यामुळेही हालचाल कमीजास्त होते; व त्यामुळे लहानमोठे वारे उत्पन्न होतात. परंतु ह्या स्थानिक वाऱ्यांंबद्दल आपणांस विचार कर्तव्य नाहीं. मुख्य मुख्य सार्वत्रिक वारे व त्यांतही ज्यांचा हिंदुस्तानाशी संबंध आहे त्यांचाच विचार करावयाचा आहे. असे वारे तीन प्रकारचे आहेतः १ वसंतऋतूंतले वारे. २ नैर्ऋत्येकडील नियतकालिक वारे. व ३ ईशान्येकडील नियतकालिक वारे. ह्यांचे आतां अनुक्रमें वर्णन करूं.

 वसंतऋतूतले वारे:-हे वारे म्हणजे एप्रिल व मे ह्या महिन्यांमध्ये जमीन व समुद्र यांवरून सुटणारे वारे होत; यांस मतलई व खारा वारा असे म्हणतात. ह्या वाऱ्यांंचा संबंध विशेषतः दक्षिणचे द्वीपकल्पाशी आहे. पाण्याचे अंगीं असा एक धर्म आहे की, तें लौकर तापत नाहीं, व एकदां तापलें म्हणजे लौकर निवतही नाहीं. सूर्योदय झाला म्हणजे जमीन भराभर तापू लागते व तिजवरील हवा गरम होऊन वर जाऊ लागते; व तिची रिकामी झालेली जागा समुद्रावरील थंड हवा भरून काढू लागते, ह्यामुळे समुद्राकडील वारा सुरू होतो. ही क्रिया तिसरा प्रहरपर्यंत चालते, नंतर जमीन भराभर थंड होऊ लागते, व तिजवरील थंड झालेली हवा समुद्राकडे जाऊ लागते; ह्यामुळे जमिनीवरील वारे सुरू होतात. ते सर्व रात्रभर चालू असतात.

 हे वारे वसंतऋतूंतील पाऊस आणणारे होत. उन्हाळा

असल्याकारणाने समुद्राचे पाण्याची वाफ विशेष होऊन हवेत मिस
५६

ळत असते व ही बाष्पमिश्रित हवा जमिनीवर येऊन तिसरा प्रहर झाला म्हणजे परतू लागते. व ह्याचमुळे ह्या दिवसांत तिसरे प्रहरानंतर वळिवाचे लहान लहान पाऊस पडतात. ह्या पावसांचे वर्षाचे सरासरी मान *५ इंचांपेक्षा जास्त नसते. व त्यांपासून शेतकीसही फारसा फायदा नसतो. म्हणून ह्या पावसांस फारसे महत्त्व नाहीं.

 नैर्ऋत्येकडील नियतकालिक वारे:–पाऊस आणणारे महत्त्वाचे वारे हेच होत. मार्च महिन्याचे १५ तारखेचे सुमारास सूर्य विषुववृत्तावर असतो. तो नंतर उत्तरेकडे येऊ लागला म्हणजे उत्तरगोलार्धात उन्हाळा होऊ लागतो. सूर्य मे महिन्याचे अखेरीस कर्कवृत्ताजवळ येतो व त्यामुळे उत्तर हिंदुस्तानांत त्या वेळीं उन्हाळा फारच कडक भासू लागतो. उत्तर हिंदुस्तानचे उत्तरेस हिमालयपर्वत असून त्याचे पलीकडे तिबेट देश, व नंतर मध्य एशियांतील विस्तीर्ण वाळवंटें आहेत. ह्या बाजूस समुद्र अगर इतर मोठे जलसमूह, तसेच झाडे वगैरे अंशतः उष्णता नाहीसे करणारे सृष्टपदार्थ नसल्याकारणाने उष्णता अतिशय होते. पंजाबांत तर उष्णतेची कमाल होते, व या वेळीं उत्तर हिंदुस्तानांत मोठी भट्टी पेटते असे म्हणण्याचा परिपाठ आहे. अशा रीतीने उष्णता अतिशय वाढल्या कारणाने उत्तरेकडील हवा गरम होऊन तिची जागा भरून काढण्यास दक्षिणेकडील थंड ( अर्थात् घन ) हवा येऊ लागते. व जून महिन्याचे सुरुवातीस वाऱ्याचा एक मोठा प्रवाह

-----
 *आसामांत ह्या पावसाचे मान २० पासून ५० इंच असते. 
५७

रात्रंदिवस सुरू होतो. हा प्रवाह थेट दक्षिणेकडून यावा, परंतु तसे होत नाहीं. तर नैऋत्य दिशेकडून येतो. ह्याचे कारण, पृथ्वीचे दैनंदिन गतीमुळे विषुववृत्तावरील पदार्थास जास्त जोराची गति आलेली असते, व विषुववृत्ताचे उत्तरेस अगर दक्षिणेस असलेल्या पदार्थांस उत्तरोत्तर कमी कमी गति प्राप्त झालेली असते. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, यामुळे विषुववृत्तावरील वाऱ्यास पूर्वेकडे जाण्याची गति प्राप्त झालेली असते. हा जास्त गतियुक्त वारा उत्तरेस जाऊ लागला म्हणजे तेथे पृथ्वीची गति कमी असल्याकारणाने हे वारे *नैऋत्येकडून आल्यासारखे होतात, व म्हणून यास नैर्ऋत्येकडील नियतकालिक वारा असे म्हणतात.

 जुलै महिन्याचे अखेरीस दक्षिणायन लागते व नंतर क्रमाक्रमाने सूर्य दक्षिणेस जाऊ लागतो. अशा रीतीनें सूर्य बराच दक्षिणेस जाईपावेतों, म्हणजे कर्कवृत्ताचे आसपास असेपावेतों ( सप्टेंबर महिन्याचे तारीख १५ पावेतों ) हे वारे सतत वाहात असतात.

 पहिल्या भागांत सांगितल्याप्रमाणे, हिंदुस्तानचे दक्षिणेस सर्व समुद्र असल्याकारणाने पाण्याचे धर्माप्रमाणे त्याचे बाष्पीभवन सतत होत असते. व त्यांतही हिंदुस्तानचे नजीक म्हणजे उत्तरगोलार्धात उन्हाळा असल्यामुळे हे बाष्पीभवन विशेष जोराने होत असते. ह्यापासून उत्पन्न झालेली वाफ समुद्रावरील हवेत मिसळत

-----

 * ह्या वाऱ्याची गति सर्व देशभर नैऋत्येकडील नसते. डोंगरांच्या रांगा व इतर स्वाभाविक कारणांनी ह्या गतीचा कांहीं कांहीं ठिकाणी

बदल होतो. 
५८

असते. व ही बाष्पमिश्रित हवा हिंदुस्तान देशांत येऊ लागली म्हणजे मुख्य पावसाळा सुरू होतो. मृगपंचक म्हणून पावसाळ्याचा जो महत्त्वाचा भाग तो हाच होय. ह्या नक्षत्रांमध्ये पडणारे पावसास झडीचा पाऊस म्हणतात. ह्याचे वार्षिक मान इतर पावसांपेक्षां पुष्कळ जास्त असते. परंतु ते निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे आहे. ह्याच पावसावर खरिपाचीं पिकें अवलंबून असतात.

 "अलीकडे पावसाविषयी जे शोध चालले आहेत, त्यांवरून असे आढळते की, आमच्या हिंवाळ्याच्या दिवसांत केप ऑफ गुदहोपाकडे पावसाची सुरुवात होते. तेथून हळू हळू सूर्य जसा हिंदुस्तानाकडे येऊ लागतो तसा हिंदुस्तानचे पश्चिम किनाऱ्यावर एप्रिल महिना संपण्याचे सुमारास येऊन पोहोचतो. परंतु त्या ठिकाणीं सह्याद्रीची रांग मध्ये आड आल्यामुळे थोपून राहतो. आणि त्या पावसाचे लाटेचा एक भाग, त्यास मध्यें आडकाठी नसल्यामुळे बंगालचे उपसागरांत पुढे सरून ब्रह्मदेश व सयाम एथे उंच प्रदेश या लाटेचे आड येतात म्हणून तिचा प्रवाह उत्तरेकडे वळून, बंगाल प्रांतावर येऊन, पुढे हिमालयाचा अडथळा आल्यामुळे, भागीरथीच्या सखल मैदानांतून थेट पेशावरपर्यंत पाऊस पडत जातो. इकडे सह्याद्रीच्या अडथळ्यामुळे अरबी समुद्रामध्ये जो पाऊस थोपून राहिलेला असतो तो मे महिन्याच्या अखेर सह्याद्रीपर्यंत येऊन पोहोचतो. ह्यावरून तुमच्या असे लक्षात येईल की, ज्या वेळेस कोकणांत पावसास आरंभ होतो, त्याच सुमारास बंगालच्या

उपसागराचा दुसरा फांटा भागीरथीचे सपाट मैदानांत ये
५९

ऊन पोहोंचतो; आणि सह्याद्रि उल्लंघून जाणारा जो पावसाचा प्रवाह तो घाटावर आल्यावर समोर मद्रासकिनाऱ्यावर जावयाचा तो भागीरथी नदीच्या मैदानांतील पावसाच्या प्रवाहाच्या जोरामुळे उत्तर हिंदुस्तानाकडे वळला जाऊन मद्रासेकडचा किनारा कोरडा राहतो."

 ईशान्येकडील नियतकालिक वारे :--ह्याचप्रमाणे सूर्य कर्क- वृत्तापासून दक्षिणेस मकरवृत्ताकडे जाऊ लागला म्हणजे दक्षिणेकडे उष्णता जास्त होऊ लागते, व तिकडील हवा उष्ण होऊन मागे सांगितल्याप्रमाणे वर जाऊं लागते, व तिच्या जागीं उत्तरेकडील थंड हवा येऊ लागते. पृथ्वीच्या दैनंदिन गतीमुळे उत्तरेकडील हवेस पूर्वेस जाण्याची जी गति प्राप्त झालेली असते ती दक्षिणेकडील म्हणजे विषुववृत्ताकडील हवेच्या गतीपेक्षा कमी असल्या कारणाने ह्या वाऱ्याचे प्रवाहास थेट उत्तरेकडची गति न मिळतां नैर्ऋत्येकडील गति प्राप्त होते. अशा रीतीनें ईशान्येचे बाजूचा वारा वाहू लागतो. ह्यासच ईशान्येकडील नियतकालिक वारा असे म्हणतात.

 हेही वारे पाऊस आणणारे आहेत. पूर्वीच्या नैर्ऋत्येकडील नियतकालिक वाऱ्याबरोबर समुद्राच्या पाण्याची वाफ उत्तरेकडे गेलेली असते, त्यापैकी जी वाफ पर्जन्यरूपानें खालीं न आल्यामुळे शेष राहिली असते ती ह्या वाऱ्याबरोबर परत येऊ लागते. ह्या वाफेस आणखी वाफेचा पुरवठा करण्यास उत्तरेस समुद्र नसल्यामुळे

आरंभीं आरंभीं मात्र ह्या वाऱ्यामध्ये वाफ असते व ह्या वाफेपासून 
६०

 *मघापंचकाचे वळिवाचे पाऊस सप्टेंबर महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत पडतात. पुढे ही वाफ संपून गेल्यानंतर फक्त कोरडा वारा फार वाहात असतो. ह्या पावसाचे वर्षाचे सरासरी मान ५ पासून २० इंच असते व ह्यावरच रबीची पिके होतात.

 वरील विवेचनावरून वर्षाकाल जून महिन्यापासून आक्टोबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत कां असतो हे स्पष्ट झाले.

पर्जन्यवृष्टि

 आतां, हवेमध्ये असलेल्या वाफपासून पाऊस कसा पडतो, ह्याविषयी विचार करूं.

 हवेतील वाफेचे पुनः पाणी होऊन पडणे ह्यास पाऊस म्हणतात. वाफेचें पुनः पाणी कसे होते, हे पुढील वर्णनावरून स्पष्ट कळेल. हवेच्या आंगीं पाण्याची कांहीं एक वाफ अदृश्य रूपाने धरण्याची शक्ति आहे. अमुक हवेमध्ये पाण्याची किती वाफ राहूं शकते याचे प्रमाण हवेच्या उष्णतेवर अवलंबून असते. जसजशी हवेची उष्णता जास्त तसतशी तिजमध्ये वाफ अदृश्य रूपाने राहण्याची शक्ति जास्त. अमुक उष्णतेच्या हवेमध्ये अमुकच वाफ अदृश्य रूपाने राहू शकते, त्यापेक्षा जास्त वाफ तिजमध्ये घालण्याचा प्रयत्न केला असता, ती तिजमध्ये न राहतां, पाण्याचे रूपानें खाली पडते. अशी हवेची स्थिति झाली म्हणजे तीस विरण्याची परमावधि झालेली हवा म्हणतात. परंतु त्याच हवेची उ-

-----

 * मघा नक्षत्र उत्तर हिंदुस्तानांत वळिवाच्या पावसाचे असते; परंतु

दक्षिणेस साधारणतः ते झडीच्याच पावसाचे असते. 
३०

ष्णता जर वाढविली, तर तीमध्ये आणखी वाफ राहू शकते. व तिजमध्ये तशीच आणखी कांहीं वाफ घालीत गेलें म्हणजे तीसही विरण्याची परमावधि झालेली स्थिति प्राप्त होते. नंतर तिजमध्ये जास्त वाफ राहू शकत नाहीं. जास्त वाफ घातली, तर ती पाण्याचे रूपाने खाली पडते. ह्याचेच उलट स्थिति हवेची उष्णत कमी केल्याने होते.

हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf

 प्रयोगार्थ एक काचेचे लहान शामदान घ्यावे, व त्याजमध्ये अगदी कोरडी हवा भरावी. कोरडी हवा भरण्यास फार श्रम नलगे. शामदानामध्यें हवा असतेच. त्याजमध्ये सल्फ्यूरिक आसिड सारखा एकादा जलशोषक पदार्थ ठेविला म्हणजे तो हवेतील सर्व वाफ शोषून घेऊन हवा कोरडी करितो. नंतर, ते शामदान एका रबराच्या पोळीवर पालथे ठेवावे, म्हणजे नळींतील हवेमध्ये बाहेरील हवेतून ओलावा शिरत नाहीं. नंतर त्या शामदानामध्ये एका रबराच्या नळीनें वाफ घालावी. नळींतील हवेची उष्णता ५०° आहे असे समजा. इतक्या उष्णतेच्या हवेमध्ये अमुकच वाफ राहू शकते, तितकी वाफ त्या शामदानामध्ये गेल्यावर तिला विरण्याची परमावधीची स्थिति

प्राप्त होते. ही स्थिति प्राप्त झाल्यावर त्या हवेमध्ये जास्त वाफ 
६२

रहात नाहीं. जर जोरानेच घालू लागले, तर त्या वाफेचे पाणी होते; व ते आंतले बाजूने शामदानाचे पृष्ठभागावर दंवासारखे स्पष्ट दिसू लागते. नंतर त्या शामदानास उष्णता लावून आतील हवेची उष्णता वाढवावी. म्हणजे त्याच हवेमध्ये अधिक वाफ राहूं शकते. आणि जास्त वाफ घालण्याचा क्रम तसाच चालू ठेविला असतां, कांहीं वेळाने तिलाही विरण्याची परमावधीची स्थिति प्राप्त होते. नंतर तिजमध्ये जास्त वाफ राहू शकत नाहीं. जास्त वाफ घातल्यास तिचे पाणी होते. अशीच गोष्ट आणखी हवेची उष्णता वाढविली असतां होते.

 आतां, अशा रीतीने हवेची उष्णता २१२° फा० वर आणून तीस विरण्याच्या परमावधीची स्थिति प्राप्त केली असे समजा. नंतर त्या हवेची उष्णता कमी करू लागलो तर काय होईल? जास्त उष्णता केल्यामुळे जितकी जास्त वाफ त्या हवेमध्ये राहिली होती, तितकी वाफ जलरूपाने नळीच्या बाजूवर दंवासारखी दिसू लागेल. कारण, हवेचा धर्म असा आहे की, तिजमध्ये नियमित उष्णता असल्या वेळीं नियमितच वाफ राहू शकते, जास्त राहू शकत नाहीं; म्हणून जास्त असलेल्या वाफेचे पाणी झालेच पाहिजे.

 आतां, असे समजा कीं, कांहीं एक उष्णतेच्या हवेमध्ये थोडीशी वाफ आहे; परंतु तितक्या उष्ण हवेस विरण्याच्या परमावधीच्या स्थितीस आणण्याइतकी नाहीं. असल्या हवेची उष्णता कमी

करूं लागलों, तर काय होईल ? उष्णता कमी करूं लागल्याबरो
६३
बर वाफेचे पाणी होणार नाहीं. तितक्याच हवेला तितक्याच

वाफेने विरण्याची परमावधीची स्थिति आणण्यास नियमित उष्णमान लागते. म्हणून उष्णता कमी कमी करितां वर सांगितलेल्या उष्णमानास उष्णता येऊन पोहोंचेपर्यंत त्या वाफेचे पाणी होणार नाहीं. ह्या पुढे मात्र उष्णता कमी केली असतां वाफेचे पाणी होऊ लागेल; व जितकी जास्त उष्णता कमी करावी, तितकें जास्त वाफेचे पाणी होईल. ह्याचप्रमाणे तसल्याच म्हणजे विरण्याची परमावधीची स्थिति प्राप्त न झालेल्या हवेमध्ये जास्त वाफ घालू लागलो, तर काय होईल ? हवेस ती स्थिति प्राप्त होईपर्यंत त्या हवेमध्ये जास्त वाफ मावेल. परंतु ती स्थिति प्राप्त झाल्यावर जितकी जास्त वाफ घालावी, तितकीचे पाणी होईल. ह्यावरून असे सिद्ध होते की, हवेमध्ये असलेल्या वाफेचे आपणांस पाणी करावयाचे झाल्यास त्या हवेची उष्णता कमी केली पाहिजे; अगर त्या हवेमध्ये आणखी वाफ घातली पाहिजे; अगर ह्या दोन्ही क्रिया एकदम केल्या पाहिजेत.*

 नैर्ऋत्येच्या नियतकालिक वाऱ्यामध्ये वाफ बहुतेक विरण्याच्या परमावधीच्या स्थितीस प्राप्त झालेली असते. ती जामिनीकडे येऊ लागल्याबरोबर तिची समुद्राचे पृष्ठभागावर जितकी उष्णता असते, तिजपेक्षा कमी उष्णता जमिनीवर लागल्यामुळे, तसेच तिज-

-----

 * हवेतील रजःकण व विद्युत् ही पाऊस पडण्यास कांहीं अंशी कारणीभूत होतात म्हणून अलीकडे समजले आहे. परंतु ह्या गोष्टीचे ज्ञान

अद्यापि अपुरे आहे. 
६४

मध्ये जमिनीवरील वाफ मिसळल्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे हवेंतील वाफेचे पाणी होऊन पर्जन्यरूपाने जमिनीवर पडते.

झाडे व पाऊस ह्यांचा अन्योन्य संबंध.

 आपल्या देशांत पाऊस येतो कोठून ह्याबद्दल वर स्पष्टीकारण झालंच. व ते पडण्यास अवश्य कारणे कोणतीं ह्या विषयींही दिग्दर्शन वर केलेच आहे. आतां, ह्या दुसऱ्या गोष्टीविषयी विशेष विचार करूं.

 समुद्रावरील वाऱ्यातील वाफेस जमिनीवर येतांक्षणींच जास्त थंडी लागण्याचे कारण काय ? पदार्थविज्ञानशास्त्राचा असा एक नियम आहे की, समुद्राचे पृष्ठभागापासून जितकें जितके उंच जावें, तितकी तितकी थंडी जास्त. समुद्राचे पृष्ठभागाचे वर जास्त थंडी कां असते, ह्यास अनेक कारणे आहेत. त्यांत मुख्य दोन आहेत: पहिले कारण असे की, घन हवेपेक्षां विरल हवा तापण्यास जास्त उष्णता लागते. पृथ्वीचे पृष्ठभागाशी हवेवर दाब जास्त असतो, ह्यामुळे तेथील हवा जास्त घन असते. पृष्ठभागापासून उंच उंच जाऊं लागलें असतां दाब कमी कमी होत गेल्यामुळे हवा जास्त विरल होत जाते. दुसरे कारण असे की, सूर्याची किरणें परावर्तन पावून जाऊं लागली म्हणजे ती पृष्ठभागाजवळ घोटाळतात, त्यामुळे तेथे उष्णता जास्त भासते. उच्च स्थानी थंडी जास्त असते, हे आपल्या नेहमी पाहण्यांत येते. हिमालय पर्वताच्या शिखरांवर अक्षय्य बर्फ असते, ह्याचे कारण ती शिखरें फारच उंच असल्या कारणामुळे तेथे अतिशय

थंडी असते. आपल्या इकडे माथेरान, महाबळेश्वर एथील हवा अति
६५

शय थंड असल्या कारणाने साहेब लोक उन्हाळ्यामध्ये तेथे येऊन राहतात. वरील दोन्ही जागा सह्याद्रीची शिखरे असल्यामुळे समुद्राचे पृष्ठभागापासून बऱ्याच उंचीवर आहेत; म्हणून तेथे थंडी अधिक असते. फार कशाला, एकाद्या बऱ्याच उंच डोंगरावर आपण चढलों असतां, वर किती थंडगार वारा लागतो ! ह्याचेही कारण वरीलच होय. बेळगांव जिल्ह्यामध्ये बेळगांव शहरची हवा गोकाकपेक्षां पुष्कळ थंड आहे; कारण, गोकाकपक्षां बेळगांव पुष्कळ उंच आहे. ह्यावरून, उंच उंच गेले असतां थंडी अधिक अधिक असते, हे स्पष्ट झाले. किती उंच गेले असतां किती थंडी जास्त असते, ह्यास प्रमाण असे आहे की, समुद्राचे पृष्ठभागावर : एकादें स्थळ ३३० फूट उंच असले म्हणजे ते स्थळ ज्या अक्षांशावर आहे, त्या अक्षांशाच्या पलीकडे एका अधिक अक्षांशावर असल्याप्रमाणे होय. म्हणजे ते स्थान एका अक्षांशावर पलीकडे असते, तर तेथें जितकी थंडी असती, तितकी थंडी तितक्या उंचीवर असते. किंवा प्रत्येक ३०० फूट उंचीस १°फा० कमी उष्णता होते, असे म्हटले तरी चालेल. समुद्राचे सपाटीपेक्षां जमीन कांहीतरी जास्त उंच असतेच; व डोंगर, पर्वत हे तर पुष्कळच उंच असतात. म्हणून जमिनीवर समुद्राचे पृष्ठभागापेक्षां पुष्कळ उष्णता कमी असते. सह्याद्रीची उंची सरासरी ४००० फूट धरिली, तर वर सांगितलेल्या मानाने समुद्राचे पृष्ठभागापेक्षा त्यावर १३° उष्णता कमी झाली पाहिजे. ह्याचप्रमाणे इतर ठिकाणची गोष्ट.

 आतां, उंची हे एक उष्णता कमी होण्यास कारण झाले. ह्या 
६६

शिवाय जमिनीवर थंडी कमी करण्यास जी इतर कारणे आहेत, त्यांमध्ये झाडे हीं फार महत्त्वाची आहेत. झाडे उष्णता कशी कमी करितात, हे मागें स्पष्टपणे सांगितलेंच आहे. सारख्याच उंचीच्या दोन स्थानांपैकी एकावर झाडे असलीं, व एकावर ती नसलीं, तर झाडे असलेले स्थान अधिक थंड असते. म्हणून समुद्राचे पृष्ठभागापेक्षा जमिनीवर उष्णता कमी असण्यास जमिनीचा उंचपणा व झाडे हीं कारणीभूत होतात. व पाऊस पडण्यास थंडी हे जे एक अवश्यक कारण ते जमिनीवर स्वभावतःच असल्यामुळे पाऊस पडतो.

 आतां, पाऊस पडण्यास जे दुसरें अवश्यक कारण म्हणजे वाफ असलेल्या हवेमध्ये आणखी वाफ घालणे तेही जमिनीवर बरेच असते. नदी, नाले, तळीं, विहिरी ह्यांच्या पाण्याचे व मनुष्ये जे पाणी खर्चितात त्याचे नेहमीं बाष्पीभवन होत असते; व ती वाफ जमिनीवरील हवेमध्ये नेहमी मिसळलेली असते, व ती पाऊस पाडण्यास कारणीभूत होते.

 त्याचप्रमाणे, एकदां पाऊस पडण्यास सुरुवात झाली म्हणजे त्या पावसापासून जो थंडावा उत्पन्न होतो, व पडलेल्या पावसाचे जे बाष्पीभवन होते, तेही आणखी पाऊस पडण्यास कारण होते. परंतु, ह्या सर्वांपेक्षा वाफेचा विशेष पुरवठा म्हटला म्हणजे झाडांपासून आहे. मागें, एके ठिकाणी सांगितलेच आहे की, झाडे आपल्या पानांच्या पृष्ठभागाचे द्वारे नेहमीं बाष्पीभवन करीत असतात.

जमिनीतील ओलावा मुळांचे योगाने शोषून घेऊन पानांच्या द्वाराने 
६७

हवेमध्ये सोडण्याची क्रिया झाडे सदोदीत करीत असतात. म्हणून ज्या ज्या ठिकाणी झाडांचा समूह जास्त, त्या त्या ठिकाणी हवेमध्ये वाफेचा संचयही जास्त. म्हणून असल्या ठिकाणावरून अशा प्रकारची हवा जाऊ लागली म्हणजे पुष्कळच पाऊस पडला पाहिजे. कारण, एक तर झाडांच्या योगाने तेथे थंडी जास्त असते. व दुसरे, झाडांच्या योगाने त्या ठिकाणी वाफही हवेमध्ये पुष्कळ उत्पन्न झालेली असते. म्हणून पाऊस पड़ण्यास लागणारी जी दोन अवश्यक कारणे, ती दोन्हीही झाडांपासून मिळतात. असलेले स्थान जास्त उंच करणे हे आपल्या आधीन नाहीं. परंतु, त्याच स्थानावर असलेली झाडे कायम ठेवणे किंवा नसतील तेथे ती लावणे, हे आपल्या आधीन आहे. एकादें स्थान उंच करण्याची जरी आपणांमध्ये शक्ति असती, तरी देखील तें स्थान उंच करण्याचे भरीस न पडतां, त्या ठिकाणी झाडे लावणे हेच उत्तम झाले असते. कारण, जमीन उंच केल्याने फक्त थंडीच उत्पन्न होते; परंतु, झाडे लावण्याने थंडी उत्पन्न होऊन आणखी वाफही उत्पन्न होते. ह्यावरून, पाऊस पडण्यास झाडांपासून किती साहाय्य होते, हे स्पष्ट झाले.

पर्जन्यव्याप्ति

 आतां, हिंदुस्तानांत निरनिराळ्या ठिकाणी किती पाऊस पडतो,

व त्या ठिकाणीं तितका कां पडतो, ह्याविषयी थोडेसे विवरण करू. 
६८

 पावसाचे संबंधाने हिंदुस्तानाचे४भाग कल्पितां येतातः १* अतिवृष्टीचा प्रदेश. २ * अनावृष्टीचा प्रदेश. ३ * अधिक वृष्टीचा प्रदेश. व ४ *अल्पवृष्टीचा प्रदेश. १५ इंचपर्यंत ज्या ज्या ठिकाणी पावसाचे मान आहे, त्या त्या ठिकाणास अनावृष्टीचा प्रदेश म्हणावें. ज्या ठिकाणी १५ पासून ३० इंचपर्यंत पावसाचे मान असते, त्यास अल्पवृष्टीचा प्रदेश म्हणावें. ज्या ठिकाणी ३० पासून ७० इंचपर्यंत पावसाचे मान आहे, त्यास अधिक वृष्टीचा प्रदेश म्हणावें. व ज्या ठिकाणी ७० इंचांपेक्षा जास्त पावसाचे मान आहे, त्यास अतिवृष्टीचा प्रदेश म्हणावें. निरनिराळ्या ठिकाणी असे पावसाचे मान कां बदलते ते आतां पाहू.

 अतिवृष्टीचा प्रदेश–सह्याद्रीच्या खालीं कोंकण, गोवे, कांची, त्रिवेंद्रम इत्यादि प्रांत बहुतकरून समुद्राचे सपाटीबरोबरच आहेत. हा प्रदेश कोठे कोठे म्हणजे मुंबईचे सुमारास १५ किंवा २० मैलपर्यंत रुंद आहे, आणि कित्येक ठिकाणी म्हणजे काननूर वगैरेचे सुमारास फारच अरुंद आहे. ह्या प्रदेशांत ज्या ठिकाणी सह्याद्रि अगदी समुद्राजवळ येतो त्या ठिकाणीं, नैर्ऋत्येचा वारा सुरू झाला म्हणजे पुष्कळच पाऊस पडतो असे दिसते. परंतु, उत्तरेकडे जसजसे यावें तसतसे पर्वतही आंत दूर जातात; आणि किना-यावर पाऊसही कमी कमी होत जातो. तुम्हीच पहा

-----
 * ह्यांस इंग्रजीत अनुक्रमें Area of excessive rainfall, Area of no rain-full, Area of moderate rain-fall, & Area of precarious rain-fall, अशी नावे आहेत. 
६९

की, मुंबई बंदरांत दर वर्षाचे पावसाचे मान ८९ इंच आहे. रत्नागिरीस ९७ इंच, आणखी दक्षिणेस वेंगुर्लास १०५ इंच, कारवारास ११९ इंच, मंगलुरास १३० इंच, काननुरास १३२ इंच. परंतु, ह्या ठिकाणांपासून खाली जाऊ लागलें म्हणजे पर्वत थोडथोडे आंत जाऊ लागतात, आणि किनाऱ्यावर पाऊस कमी कमी पडू लागतो. कालिकत ह्या ठिकाणी पावसाचे वर्षाचे मान ११२ इंच आहे; त्याचे खालीं कांची एथे १०७ इंच आहे. पुढे समुद्र ओलांडून सिंहलद्वीपांत गेले असतां, पश्चिम किनाऱ्यावर कोलंबो एथे पावसाचे मान ७८ इंच म्हणजे मुंबई इतकेंच सरासरी आहे. पुनः मुंबई सोडून उत्तरेकडे जाऊ लागले, तर सुरतेस ४० इंच, भडोचास ४२, आणि ढिसा एथे २४ इंच ह्याप्रमाणे कमी होत जाते. घाटमाथ्यावर तर पावसाची शिकस्तच होते. महाबळेश्वरास पावसाचे मान २०० पासून ३०० इंच आहे. अशा तऱ्हेने दक्षिणेस त्रिवेंद्रमपासून उत्तरेस दमण बंदरापर्यंत व समुद्रकिनाऱ्यापासून पूर्वेस घाटमाथ्यापर्यंत अतिवृष्टीचा एक प्रदेश होय. तेथे अतिवृष्टि होण्याचे कारण समुद्र लगत असून सह्याद्रि मध्ये आड आल्यामुळे पाऊस थोपून राहतो, व मागील वाफेचा प्रवाह एकसारखा सुरू असल्यामुळे कोंकणांत अतिवृष्टि होते. त्याचप्रमाणे, खालचे ढग घाटमाथ्यावर चढून जाण्यास चालक शक्ति म्हणजे उष्णता पाहिजे ती ढग आपल्यामधूनच खर्च करितात; म्हणजे त्यांच्यांतील उष्णता घाटमाथ्यावर गेल्यावर आपोआपच कमी होते, म्हणूनच

तेथे पुष्कळ पाऊस पडतो. 
७०

 दुसरा अतिवृष्टीचा प्रदेश गंगेच्या मुखापासून सुरू होऊन पुढे ब्रह्मपुत्र नदाचे प्रदेशांतून उत्तरेकडे आसामचे पश्चिम प्रांतांतून हिमालयपर्वतापर्यंत जाऊन नंतर तसाच त्याचे पायथ्याने बहुतेक काश्मीरपर्यंत पोहोचतो. इकडे अतिवृष्टि होण्याचे कारण पावसाचा प्रवाह जो बंगालचे उपसागरांतून उत्तरेकडे सरतो, त्यास ब्रह्मदेश व आसाम एथील उच्च प्रदेश आड येऊन त्याचा प्रवाह उत्तरेकडे वळून बंगाल प्रांतावर येऊन पुढे हिमालयाचा अडथळा आल्यामुळे भागीरथीच्या सखल मैदानांतून थेट पेशावरपर्यंत पाऊस पडत *जातो; व हिमालय पर्वताच्या अडथळ्यामुळे हवेतील बहुतेक वाफ पर्जन्यरूपाने खाली येते, म्हणून एथे अतिवृष्टि होते.

 अनावृष्टीचा प्रदेश:--हा बहुतेक कच्छ प्रांत, सिंध प्रांत, राजपुतान्याचा पश्चिम भाग, व नैर्ऋत्येकडचा पंजाब हा होय. ह्या भागाचे एके बाजूस मात्र थोडासा समुद्र आहे. परंतु तोही एका फांट्याचे शेवट आहे. बाकीचा भाग बलुचिस्तान, अफगाणिस्तान वगैरे प्रांतांच्या जमिनीने वेष्टित असल्यामुळे पावसास अवश्य लागणारी पाण्याची वाफ एथपर्यंत येऊन पोहोचण्यास पुरत नाहीं.

-----

 * ह्याचप्रमाणे स्थिति आसाम व ब्रह्मदेश यांचे दरम्यान क्याशिया म्हणून ४००० । ५००० फूट उंचीचे डोंगर आहेत तेथे होते. त्यांमध्ये चिरपुंजी म्हणून एक ठिकाण आहे, तेथे तर पावसाचे वर्षाचे मान कधीं कधीं ६०० इंचांपेक्षा जास्त असते. इतका पाऊस पृथ्वीवर दुसरे कोठेही पडत असलेला आढळत नाहीं. इ० स०१८६९ साली तर तेथे ८०५ इंच पाऊस

पडला असे म्हणतात! 
७१

बंगालचे उपसागरांतून वायव्येकडे जो पावसाचा प्रवाह जातो, तो एथपर्यंत येईपावेतो बहुतेक कोरडा होतो. शिवाय, हे प्रांत बहुतेक वाळूचे असून रुक्ष असल्यामुळे त्या ठिकाणीही पाण्याची वाफ नसते; म्हणून पाऊस पडण्यास साहाय्य होत नाहीं.

 अधिक वृष्टिचा प्रदेश :–पुढे अल्पवृष्टीचे दोन प्रदेश सांगितले आहेत, तेवढे खेरीजकरून बाकीच्या राहिलेल्या सर्व प्रांतांत अधिक वृष्टि होते. घाटमाथ्याच्या लगत पूर्वेस थोडा अधिक वृष्टीचा प्रदेश आहे. एथे अधिक पाऊस पडण्याचे कारण, उघडच आहे. घाटमाथ्यावर पावसाची शिकस्त होत असल्यामुळे त्याच्या लगत अधिक पाऊस पडलाच पाहिजे. कर्नाटकामध्ये पाऊस अधिक पडण्याचे कारण तेथे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर ह्या दोन्ही ठिकाणांपासून पावसाचा पुरवठा होतो, व शिवाय मद्रासच्या किना-यावर ईशान्येच्या नियतकालिक वाऱ्याचाही विशेष जोर असतो. अतिवृष्टीचे नजीक आधिक वृष्टि होणे साहजिक आहे, हे वर सांगितलेच आहे. म्हणून हिमालयाच्या अतिवृष्टीनजीक अधिक वृष्टि होते. तसेच बंगाल, बहार, ओरिसा, अयोध्या, मध्य हिंदुस्तान ह्या ठिकाणी पावसाचे दोन प्रवाहांचा अम्मल असतो. एक मोठा प्रवाह, बंगालचे उपसागरांतून येतो; व दुसरा, तापी व नर्मदा ह्यांच्या मुखांच्या बाजूने येतो; ह्यामुळे जास्त पाऊस पडतो.

 सातपुड्याचे डोंगराळ प्रदेश, जोधपूरचे पठार, बहुतेक सेंट्रल

प्राव्हिन्सेस, व मध्य हिंदुस्तानांतील एतद्देशीय संस्थानांचा कांहीं 
७२

भाग ह्या प्रांतांमध्ये अधिक वृष्टि तर असतेच. परंतु एथील पाऊस फार निश्चित असतो. ह्याचे कारण हा प्रांत डोंगराळ असून जंगलयुक्त आहे, हे एक; परंतु ह्याशिवाय नैऋत्येकडून अरबी समुद्राचा प्रवाह व पूर्वेकडून बंगालचे उपसागराचा प्रवाह वाहात असल्यामुळे त्या दोन्ही वाऱ्यांंच्या कलहाचा हा प्रांत आहे, ह्यामुळे एथें पाऊस हटकून विपुल पडतो. ( ह्या भागांतील, विशेषेकरून एतद्देशीय संस्थानांतील महत्त्वाच्या जंगलांचा अलीकडे बराच नाश झाला आहे. )

 अल्पवृष्टीचा प्रदेश :--- हे प्रदेश दोन आहेत. ह्यांपैकी पहिला काठेवाड, गुजराथचा पश्चिम भाग, राजपुतान्याचा पूर्वभाग, पंजाबचा अतिवृष्टि व अनावृष्टि ह्या प्रदेशांमधील भाग, व वायव्येकडील प्रांताचा पुष्कळ भाग म्हणजे आग्र्यापासून अलहाबादे- पर्यंत सुमारे अर्धा प्रांत हा होय. दुसरा जो अल्पवृष्टीचा प्रदेश आहे त्याचे वर्णन पुढे येईल. वर सांगितलेल्या ठिकाणीं अल्पवृष्टि होण्याचे कारण असे की, ह्या भागाचे पश्चिमेस अनावृष्टीचा प्रदेश आहे. अरबी समुद्राकडून जो पावसाचा प्रवाह येतो तो खंबायतचे आखातांतून मध्य हिंदुस्तानाकडे वळला जातो. हा प्रवाह उत्तरेकडे न जातां पूर्व दिशेकडे वळण्याचे कारण, ह्या वेळेस व ह्याचे पूर्वीही काठेवाड, कच्छ, सिंध व राजपुतान्याचा पश्चिमभाग ह्या ठिकाणी वायव्येकडील वारा वाहात असतो; व हा वारा अरबस्तान, इराण, व बलुचिस्तान वगैरे रुक्ष प्रदेशांकडून येत असल्यामुळे कोरडा असतो;

व नैऋत्येकडच्या नियतकालिक वाऱ्यास पुढे जाण्यास अड
७३

थळा कारतो हे होय. दुसरा प्रवाह जो बंगालचे उपसागराकडून येतो तो पडत पडत एथपर्यंत आल्यामुळे त्यांतील वाफेचा संचय कमी होऊन ह्या प्रदेशामध्ये पाऊस थोडाच पडतो.

 दुसरा अल्पवृष्टीचा प्रदेश–पश्चिम घाटाच्या पूर्वेस नजीकच सुरू होतो, आणि शंभर किंवा दीडशे मैलांच्या रुंदीने थेट दक्षिणच्या उच्च प् रदेशाच्या दक्षिणेपर्यंत आढळतो. म्हणजे हा प्रदेश साधारपणे चौकोनी असून ह्याचे चार कोनांस आग्नेयीस चितूर, नैऋत्येस मैसूर, वायव्येस धुळे, व ईशान्येस उमरावती एणेप्रमाणे शहरे आहेत. ह्या प्रदेशामध्ये वऱ्हाडचा पश्चिम भाग, दक्षिण हैदराबाद संस्थानचा पश्चिम भाग, मद्रास इलाख्याचा वायव्येकडील भाग, बहुतेक मैसूर प्रांत, व आपल्या मुंबई इलाख्यापैकीं कांहीं थोडासा पश्चिमेकडील भाग सोडून पुढील जिल्ह्यांचा म्हणजे खानदेश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, बेळगांव, विजापूर, धारवाड ह्या जिल्ह्यांचा आणि कोल्हापूर, सांगली, कुरुंदवाड वगैरे कांहीं संस्थाने ह्यांचा समावेश होता. एथील पावसाचे मान पहा-धुळे शहरामध्ये २२ इंच, मालेगांवास २२ इंच, नाशिकास २९ इंच, पुण्यास ३२ इंच, कोल्हापुरास ४४ इंच, सोलापुरास २६ इंच, विजापुरास २४ इंच, बेळगांवास ५२इंच, मैसुरास ३०इंच, कोइमतुरास २३ इंच, मधु- रास ३२ इंच, तुतिकोरीन एथे १७ इंच ह्याप्रमाणे आहे. अल्प- वृष्टीचा प्रदेश सोडून आणखी पूर्वेस गेलें म्हणजे, पावसाचे मान फिरून वाढलेले दृष्टीस पडते, म्हणजे अधिक वृष्टीचा प्रदेश लाग-

तो. सह्याद्रि मध्ये आड आल्यामुळे कोकणांत पाऊस पुष्कळ, 
७४

घाटमाथ्यावर पावसाची शिकस्त, पुढे कांहीं प्रदेशांत अल्पवृष्टि, आणि त्याच्यापुढे पुनः अधिक अशीं माने झालीच पाहिजेत. मोटेच्या पाण्याचे प्रवाहांत आपण आपला हात जर प्रतिबंधासारखा ठेविला, तर त्या प्रतिबंधाचे अलीकडे पाणी थोपून राहून प्रतिबंधावरून जोराने झुगारून दिल्यासारखे होऊन ते लांब जाऊन पडते. ह्याप्रमाणेंच, पावसाचे ढगांचा प्रवाह समुद्राकडून जमिनीकडे येत असतो, त्यास मध्ये घाटाचा प्रतिबंध झाल्यामुळे कोकणपट्टींत पुष्कळ आणि घाटमाथ्यावर अतिशय असा पाऊस आढळतो. परंतु ह्या प्रतिबंधाने आणि मागील वाऱ्याच्या जोराने जे ढग उडवून दिल्यासारखे होतात, ते घाटापासून खालीं फार दूर अंतरावर येतात. ह्यामुळे घाटमाथ्याच्या शेजारी पाऊस फार कमी असतो आणि पुढे जास्त वाढत जातो. तथापि, ह्या वाढीस बंगालचे उपसागराचा प्रवाह मुख्यतः कारणीभूत होतो, हे ध्यानांत ठेविले पाहिजे. नागपुरास पावसाचे वर्षाचे मान ४२ इंच, चंद्रपुरास ६० इंच, रायचुरास ५० इंच, संबळपुरास ५४ इंच, कटक एथे ६७ इंच ह्याप्रमाणे पूर्वेकडे पावसाचे मान वाढत जाते.

उपसंहार.

 अतिवृष्टीचा प्रदेश आहे तेथे दुष्काळ पडण्याची बिलकूल भीति नाहीं. परशुरामक्षेत्र ( काकण ) ह्या ठिकाणी दुष्काळ कधीही पडणार नाही, म्हणून जो वर आहे तो सुप्रसिद्धच आहे. अधिक

वृष्टीच्या ठिकाणी दुष्काळ बहुतकरून पडत नाहीं. अनावृष्टि 
७५

तर बोलूनचालून अवर्षणच. परंतु, ज्या प्रांतांमध्ये अनावृष्टि आहे तेथेही दुष्काळ पडण्याची सुदैवाने भीति नाहीं; कारण, जमीन कालव्याचे पाण्यावर अवलंबून असते, पावसाचे पाण्यावर बिलकूल अवलंबून नसते म्हणून वर सांगितलेंच आहे. ह्याकारतां तेथील काळजी वाहणें नलगे. नेहमीं दुष्काळ पडण्याचे स्थान म्हटले म्हणजे अल्पवृष्टीचा प्रदेश होय. हिंदुस्तानांत बहुतेक पडलेले दुष्काळ एथेचे पडले आहेत. म्हणून विशेषेकरून ह्याच प्रांतांत पावसाचे मान होता होईल तितके जास्त वाढविण्याचा प्रयत्न करणे अवश्य आहे. व हा हेतु झाडे लावून बऱ्याच अंशीं साधतां येण्यासारखा आहे, हें पुनः सांगावयास नको.

 वर सांगितलेले अल्पवृष्टीचे जे दोन प्रदेश त्यांपैकी दक्षिणेस जो आहे त्याबद्दल विशेष विचार केला पाहिजे. कारण, ह्या प्रदेशाशी आपला निकट संबंध आहे हे एक, व दुसरे महत्त्वाचे कारण हें कीं, उत्तर हिंदुस्तानामध्ये जो अल्पवृष्टीचा प्रदेश आहे तो अनावृष्टि व अधिक वृष्टि ह्यांच्या दरम्यान आहे. म्हणजे अधिक वृष्टीच्या प्रदेशांतून जो पाऊस पडत पडत येतो, त्या योगाने कमी कमी हात पुढे अल्पवृष्टि होते व त्याच्यापुढे अनावृष्टि होते. म्हणजे इकडे समुद्राचे वाफेचा जो पुरवठा असतो, तोच नाहींसा होत जातो, म्हणून अल्पवृष्टि होते. ह्या ठिकाणी पुष्कळ पाऊस पडेल असे करण्यास अगोदर बंगालचे उपसागरांतून जो वाफेचा पुरवठा होतो, तो वाढविला पाहिजे. परंतु, ती गोष्ट

असाध्य आहे. म्हणून ह्या प्रांतामध्ये फक्त पावसाचेच संबंधाने 
७६

विचार केला असतां झाडांची वृद्धि केल्यापासून फारसा फायदा होईल, असे म्हणता येत नाहीं; तथापि, अगदीच होणार नाहीं असे मात्र समजू नये. झाडांपासून थोडी बाष्पोत्पत्ति होतेच, व त्या योगाने अंशतः तरी पावसामध्ये फरक होण्याचा संभव आहे. इतकेच की, दक्षिणेमध्यें झाडे लाविल्यापासून जितका उपयोग होणार आहे तितका तेथे होणार नाहीं.

 दक्षिणेकडील अल्पवृष्टीचे प्रांताची स्वतःसिद्ध रचना अशी कांहीं विलक्षण आहे कीं, एथे झाडे लाविल्यापासून अतोनात फायदा होण्यासारखा आहे. म्हणजे ह्या प्रांताच्या पश्चिमेकडून अरबी समुद्रांतून एकसारखा सपाट्याने वाफेचा पुरवठा होत असतो. त्यामुळे घाटमाथ्यावर तर पावसाची शिकस्तच होते. व पुढे पूर्वेस पर्वताच्या उतरणीवर अधिक वृष्टि होते. याचे पूर्वेस अल्पवृष्टीच्या प्रदेशावरून वाफेचा मोठा प्रवाह एकसारखा वाहात असून पुष्कळ दूर जाऊन पुनः अधिक वृष्टि होते. म्हणजे, उत्तर हिंदुस्तानांतील अल्पवृष्टीच्या प्रदेशाप्रमाणे एथे वाफेचा पुरवठा न संपतां पश्चिम बाजूस पावसाची शिकस्त होत असल्यामुळे वाफेचा पुरवठा साधारण बराच असतो. इतकेच की, तो पावसाचे रूपाने जितका खालीं यावा तितका येत नाहीं; म्हणून ह्या ठिकाणी झाडांची वृद्धि केली असतां तो हेतु साधणार आहे.

 जंगलवृद्धीपासून पावसाचे मान वाढते हा विषय अद्यापपावेतों बराच वादग्रस्त आहे. जंगलापासून पावसाचे मान वाढते हें प्रतिपादन

करणारे पुष्कळ विद्वान् व शास्त्रज्ञ लोक आहेत; व फ्रान्स 
७७

वगैरे देशांत प्रयोगाने ही गोष्ट दृष्टोत्पत्तीस आली आहे. विरुद्ध पक्षाचेही बरेच लोक आहेत. जंगलाचा व पावसाचा संबंध काय आहे, याजबद्दल वर शास्त्रीय नियमानुसार प्रतिपादन केले आहे. ह्याकरिता त्या प्रतिपादनावर कोणास आक्षेप काढितां येईल असे वाटत नाहीं, यावर विरुद्धपक्षीयांचा एक मोठा आक्षेप हा आहे की, जंगलाचे योगाने जर पावसाचे मान वाढत असेल तर एक वर्षी कमी व एक वर्षी जास्त असा पाऊस पडू नये. जंगलाचा उत्तरोत्तर ऱ्हास होत चालला आहे अशी जरी कल्पना केली, तरी उत्तरोत्तर पाऊस कमी कमी होत जावा; पण तस होत नाहीं. कधी कधी विपुल पाऊस पडतो, व कधी कधी तर अवर्षणच पडते. म्हणून जंगलाचा व पावसाचा कांहीं संबंध नाही असे त्यांचे म्हणणे आहे. आणि ह्याकरितां ते ह्या देशामध्ये नियमित पाऊस न पडण्याची कारणे इतर ठिकाणीं शोधीत आहेत. काही जण सूर्याचे पृष्ठभागावर जे डाग आहेत त्या योगाने पावसाचें मान कमीजास्त होते असे प्रतिपादन कारतात. त्यांचे म्हणणे असे आहे की, ज्या वर्षी सूर्याचे डाग फार कमी असतात त्या वर्षी सूर्यापासून पृथ्वीवर जास्त उष्णता प्राप्त होते. जास्त उष्णतेच्या योगानें बाष्पोत्पात जास्त होते व त्यामुळे पाऊसही जास्त पडतो. ज्या वर्षी डाग फार असतात त्या वर्षी उष्णता कमी असते, आणि त्यामुळे वाफ कमी उत्पन्न होऊन पाऊसही कमी पडतो. ह्या सर्वांस उत्तर हेच की, जंगलामुळेच पाऊस पडतो असे बिलकूल म्हणणें नाहीं. पाऊस

पडण्यास दुसरी अनेक कारणे आहेत, त्यांपैकींच झाडे हें एक म
७८

हत्त्वाचे कारण आहे. पाऊस पडण्यास, हवेतील उष्णता कमी करणे आणि हवेत बाष्पोत्पत्ति करणे ह्या ज्या अत्यवश्यक गोष्टी त्या झाडांच्या योगानें अंशतः तरी कशा साध्य होतात, हे वर सांगितलेच आहे. म्हणून पाऊस पडण्यास अनेक कारणे आहेत त्यांपैकी झाडे हे एक महत्त्वाचे कारण समजले पाहिजे. सूर्याचे डागाची कल्पनाही वादग्रस्तच आहे. कारण, ती खरी असती, तर हिंदुस्तानामध्यें अवर्षण पडते त्या वेळी सर्व पृथ्वीवर पाऊस कमी पडावा; परंतु, तसे होत नाही. तथापि, हे डागाचे कारण खरे आहे, असे जरी एक वेळ गृहीत धरून चाललो तरीसुद्धा ही कल्पना झाडांचा व पावसाचा जो संबंध वर दाखविला आहे त्याच्या आड येते असे नाहीं. म्हणण्याचा भाग इतकाच कीं, जी कमी- जास्ती वाफ प्रतिवर्षी समुद्रांतून आपल्या देशावर येते, तीपैकीं होईल तितकी वाफ पर्जन्यरूपाने जमिनीवर आली पाहिजे. सृष्टिनियमानुसार इतर कारणे आपआपला व्यापार करीत आहेतच. ह्यांमध्येच झाडेही पाऊस पाडण्यास कांहीं अंशीं तरी कारणीभूत होतात, हे निर्विवाद आहे.*

--------------------


-----

 *दिवसानुदिवस पाऊस कमी होत चालला आहे, म्हणून जे आमच्या जुन्या लोकांचे म्हणणे आहे ते जंगलनाशाचे कार्य असावे.