Jump to content

हिदुस्थानातील पाऊस व झाडे/पाण्याचा संचय

विकिस्रोत कडून


भाग ५ वा.
---------------
पाण्याचा संचय.

 आतां, तिसरी अवश्यकता म्हणजे पडलेले पाणी साठवून ठेवणे ह्याविषयी विचार करूं.

पाटबंधारे.

 पडलेले पावसाचे पाणी अडवून ठेवणे हे महत्त्वाचे आहे, हे मागें सांगितलेंच आहे. व त्यांतही हे पाणी उच्च ठिकाणीं सांठून राहील तर जास्त उपयोगी आहे. पावसाचे अवश्यकतेविषयीं कोणास संशय आहे असे नाहीं; परंतु पाऊस पाडणें मनुष्याचे आधीन नाहीं. अशा समजुतीवर आजपावेतों ह्यासंबंधानें कोणीं कांहीं प्रयत्न केलेले नाहींत. अलीकडे हा विषय आपले सरकारास समजत चालला आहे व ते झाडांच्या वृद्धीस उत्तेजन देत आहे. तथापि, अद्यापपावेतों झाडांच्या योगाने पाऊस पडण्यास साहाय्य होते की काय, याजबद्दल वाद सुरू असल्यामुळे सरकारची या संबंधानें पूर्ण खात्री झालेली नाहीं. झाडांच्या वृद्धीपासून इतर फायदे कांहीं नसते, तर सरकारने ह्या कामांत हात घातला असता कीं नसता, ह्याबद्दलही संशयच वाटतो. असो; कोणत्याही समजुतीनें कां होईना, हे स्तुत्य कृत्य आपला परिणाम करणारच ही एक अभिनंदनीय गोष्ट आहे. पावसाची गोष्ट ह्याप्रमाणे आहे. परंतु तिसरी

अवश्यकता म्हणजे पाण्याचा संचय करून ठेवणे ही ह्या देशास 
८०
किती अवश्य आहे याबद्दल बऱ्याच प्राचीन काळापासून लोकांस

अगत्य वाटलें आहे असे दिसून येते. व ही अवश्यकता प्राप्त करून घेणे मनुष्याच्या बरेच अंशीं स्वाधीन आहे असे त्यांस वाटल्यामुळे ह्या गोष्टीबद्दल प्राचीन काळापासून प्रयत्न सुरू आहेत. मुसलमानी राज्याच्या आरंभीच भागीरथी नदीस कालवा बांधला. तसेंच, प्राचीन काळापासून मैसूर प्रांतांत तर जागजागीं पावसाचे पाणी सांठविण्यास तलाव बांधलेले आहेत व अशाच रीतीचे तलाव इतर ठिकाणही बांधलेले आढळतात. हल्लींचे अमलांत तर ह्या गोष्टीकडे म्हणजे कालवे बांधणे व तलाव बांधणे ह्याकडे सरकारने चांगलें लक्ष पुरविले आहे व ह्या संबंधाने कामे करण्याकरिता एका स्वतंत्र खात्याची स्थापना केली आहे. तलाव बांधण्याच्या संबंधानें कांहीं म्हणणे नाही. कारण, त्यांत थोडेफार पावसाचे पाणी सांठून राहतेच. परंतु कालवे बांधले असतां, अगर बांधणे झाल्यास वारंवार अशी अडचण येते की, कालव्यास पाण्याचा चांगला पुरवठा होत नाही. शिवाय, नद्यांस आडवे बांध घालून पाणी आडवून दुसरीकडे नेलें म्हणजे कित्येक ठिकाणी नदीकाठच्या लोकांस पाण्याची कमताई होते.

 इरिगेशन खात्याचे दोन हेतु आहेतः पावसाचे पाणी साठवून धरणे, व त्या योगाने उच्च प्रदेशी जामिनीस पाण्याचा पुरवठा करणे. म्हणजे आमची जी तिसरी अवश्यकता तीच पुरविण्याचा ह्या खात्याचा उद्देश आहे. हा उद्देश स्तुत्य आहे, आणि त्यापासून

देशाचे फारच हित झाले आहे व होतही आहे. इतकेच की, 
८१
पाण्याचा पुरवठा कमी असल्यामुळे कांहीं कांहीं ठिकाणी ह्या

उद्योगापासून जितका फायदा व्हावा तितका होत नाहीं. व दुसरा गोष्ट अशी की, इरिगेशनपेक्षा कमी खर्चाने कांहीं कांहीं ठिकाणी झाडे लाविल्याने हा हेतु सिद्धीस जाणार आहे.*

झरे.

 आतां, आपल्या नद्यांस, ओढ्यांस, तळ्यांस व विहिरींस पाणी कोठून येते ते पाहू. विहिरींस तर झऱ्यांंपासून पाणी येते हे सर्वांस माहीत आहेच. तळीं मात्र दोन प्रकारची असतातः कित्येक तळ्यांस फक्त सांठलेले पाणी असते व कित्येकांस झरे असूनही सांठलेले पाणी राहते. ह्यांपैकी दुसऱ्याच प्रकारची तळीं चांगलीं. कारण, त्यांपासून पाण्याचा चांगला पुरवठा होण्यासारखा असतो. ओढे

-----

 * इ० स० १८०२ मध्ये अलेक्झांडर व्हान् हंबोल्ट साहेब हे वेनेजु- एला देशामध्य अॅॅराग्युवा नदीचा खोरा पाहण्यास गेले होते. त्या ठिकाणी सभोवतालच्या टेकड्यांपासून पाणी मिळून एक सरोवर झाले होते, व ह्या सरोवरांतील माशांवर तेथील लोकांचा उदरनिर्वाह होत असे. हंबोल्ट साहेब येण्याच्या पूर्वीच या टेकड्यांवरील जंगलाचा नाश केला होता, व त्यामुळे तळ्यास पाण्याचा पुरवठा कमी होऊन त्यांतील मासे कमी झाल्यामुळे लोक फार फिकिरीत होते. झाडांचा नाश झाल्यामुळे अशी स्थिति घडून आली हे हंबोल्ट साहेबांचे तेव्हांच लक्षात आले. पुढे इ० स० १८२५ मध्ये बुसिन्कोल्ट साहेब त्याच ठिकाणी जाऊन पाहतात तो जंगल पुनः वाढू लागले होते, व त्यामुळे तळ्यांतील पाणीही वाढू

लागले होते. 
८२

हे मोठमोठे वाहाणारे झरेच होत. नद्यांस जे पाणी असते ते झऱ्यांंपासून प्राप्त होत नाही असे सकृद्दर्शनी वाटते; परंतु नदीचा उगम हा एक झराच असतो; व तीस जे ओढे, नाले येऊन मिळतात त्यांसही पाणी झऱ्यांंपासूनच मिळते. म्हणजे नद्याचेही एकंदर पाणी प्रत्यक्ष अगर परंपरेने झऱ्यांंपासूनच प्राप्त झालेले असते.

 आतां, झरे कसे होतात ते पाहूं. झरे सुटण्यास पाण्याचा सांठा उंच जागेवर पाहिजे. एकाद्या उंच भांड्यांत पाणी भरून ठेविलें, व त्यास मध्यभागी फार बारीक बारीक छिद्रे पाडिली, तर त्यांमधून पाणी पाझरूं लागेल. हा एक प्रकारचा झराच म्हणावयाचा. एक प्रकारचा म्हणण्याचे कारण इतकेच की, भांड्यांतून जे पाणी झिरपते त्यास झरा ही संज्ञा नाहीं. जमिनींतून जे पाणी पाझरते त्यासच झरे म्हणतात. तथापि, ही दोन्ही पाझरणीं एकसारखीच होत. दोहींसही पाण्याचा सांठा उंच जागेवर असून मध्यंतरी छिद्रे पाहिजेत. उंच जागेतील पाण्याचा सांठा छिद्रांच्या खाली आल्यावर पाणी छिद्रांतून पाझरणार नाहीं हे उघड आहे. म्हणून जमिनींतून पाझर फुटण्यास जवळ अगर दूर कोठेतरी त्या जमिनीपेक्षा उंच जमीन असून तिजमध्ये पाणी साठलेले असले पाहिजे. जमिनीच्या पोटामध्ये खडकांचे थर आहेत, त्यांच्या फटींतून उंच जागेतील पाणी वाहात येते; व त्यास बाहेर पडण्यास जेथे छिद्र सांपडते, तेथून ते बाहेर पडते. अशा रीतीने बाहेर पडलेल्या

पाण्यास झरा म्हणतात. 
८३

कित्येक ठिकाणी आजूबाजूस कोठे उंच प्रदेश नसून एकाद्या उंच जागेवर झरा आढळतो; याचे कारण असे की, जवळपास उंच प्रदेश नसला, तरी तो दूर कोठे तरी असलाच पाहिजे. पाण्याच्या अंगी असा एक धर्म आहे की, ते नेहमी आपली उंची सारख्याच पातळीत ठेविते. म्हणजे एकादा उंच पाण्याचा सांठा बांधून त्यामध्ये पाणी भरून ते नळीने कितीही दूर नेले, तरी त्या सांठ्यांतील पाण्याचे उंची इतके ते उंच चढते.

बाजूस दाखविलेली

आकृति पहा. अ हे एक मोठे पात्र आहे; ब ही एक वांकडी नळी त्याचे बुडापासून निघून त्याचेच उंची इतकी उंच गेली आहे व तिचे शेवटास फनेल ( नरसाळे ) आहे. आता, या फनेलामधून पाणी घालू लागलों असतां, ब नळींतील पाण्याची उंची व अ भांड्यांतील पाण्याची उंची नेहमी सारखीच राहील. दोन्ही- कडील पात्रांचे आकारमान कितीही लहानमोठं असो; पाणी आपला धर्म सोडीत नाहीं. जमिनीमध्येही वरील पात्राप्रमाणे कांहीं कांहीं ठिकाणी स्थिति असते. म्हणजे अ पात्राप्रमाणे एकादी उंच जमीन असते,व जमिनीच्या पोटांतील खडकाच्या थरांमधील फटी ब नळीप्रमाणे असतात. ह्याकरितां, त्या उंच जमिनीतील

पाणी दूर पुनः तितक्याच उंचीवर येऊन वाहू लागते. अशा 
८४

रीतीने झरे वाहाण्यास उच्च उच्च प्रदेशामध्ये पाण्याचा संचय असला पाहिजे. पाण्याचा पुरवठा पावसापासून होतो. म्हणून उंच प्रदेशावर पडलेले पावसाचे पाणी वाहून न जाऊ देतां, जितकें मुरून जाईल तितकें मुरविण्याकरितां अवश्य उपाय योजिले पाहिजेत.

झाडांच्या क्रिया.

 आतां, हा हेतु झाडे लाविल्यापासून कसा सिद्धीस जातो हें पाहूं. पर्वतावर, डोंगरावर, किंवा उंच जमिनीवर पावसाचे पाणी पडले असतां मुरून न जातां वाहून जाते. ह्याचे कारण इतकेच कीं, डोंगर सच्छिद्र नसला व त्यावर माती नसली म्हणजे त्यांचा पृष्ठभाग जलशोषक होत नाहीं; व जमीन खडकाळ असल्यामुळे तिजवर जे पाणी पडते ते सर्व सोसाट्याने वाहून खाली येते, व समुद्रास जाऊन मिळते. ह्याशिवाय, खडकामध्ये जरी कांहीं काही आंगच्या फटी किंवा छिद्रे असली, तरी वर पडलेल्या पाण्यास काहीं अटकाव न झाल्यामुळे ते इतके लौकर वाहून जाते की, वरील फटींमध्ये व छिद्रांमध्ये मुरण्यास त्यास अवधि सांपडत नाहीं; व जरी मुरले, तरी फारच थोडे मुरते. ह्याकरितां, डोंगरावर पडलेले पाणी तेथल्या तेथेच मुरून जाण्यास तो डोंगर छिद्रे, फटी ह्यांनीं जितका अधिक पोकळ झाला असेल तितका चांगला. शिवाय, डोंगरावर जलशोषणास माती असली पाहिजे; व एकदम पाणी वाहून न जावे, म्हणून त्याचे प्रवाहास अटकाव करण्यास कांहींतरी साधन पाहिजे. ही सर्व कार्ये त्या डोंगरावर झाडे

लाविल्यापासून घडून येतात. 
८५

कित्येक जातीच्या झाडांच्या मुळ्या आपल्या भक्ष्यशोधनार्थ जमिनीमध्ये नीट खोल गेलेल्या असतात. ह्या मुळ्यांस मोठमोठ्या फांद्या फुटत नाहींत. अशा मुळीस सोटमुळी म्हणतात. बाभूळ हे वरील प्रकारचे सोटमुळीचे झाड आहे; म्हणजे ह्याची मुळी जमिनीमध्ये नीट खोल जाते, व तिला मोठाले फांटे फुटत नाहींत. ह्याच कारणामुळे बाभळीची झाडे काळ्या जमिनीमध्ये चांगलीं पोसतात. काळ्या जमिनीमध्ये माती पोकळ असून पुष्कळ खोलपर्यंत असते, व अशा जमिनीमध्ये बहुतकरून पाणीही पुष्कळ खोल गेलेले असते. म्हणून बाभळीची झाडे अशा जमिनीमध्ये लाविली असतां त्याची मुळे ओलावा शोषून घेण्याकरितां जमिनीमध्ये खोल जातात. व म्हणून बाभळीच्या सारखीं सोटमुळीची झाडे डोंगरावर असली म्हणजे तो डोंगर सच्छिद्र होतो. तसेच, दुसऱ्या प्रकारची कांहीं झाडे असतात, त्यांच्या मुळ्या जमिनींत विशेष खोल जात नाहींत; परंतु त्यांस असंख्य फांटे फुटून जाळ्याप्रमाणे सर्व जमिनीमध्ये पसरलेल्या असतात. वड, पिंपळ वगैरे झाडे अशा प्रकारची होत. अशा प्रकारची झाडे डोंगरावर असली, तर डोंगर पोकळ होतो. डोंगरावर झाडे असल्यापासून पृष्ठभागावरील मातीही वाढत जाते. पाऊस, वारा ह्यांच्या व्यापाराने खडकाचे पृष्ठभागाचे कण मोकळे होऊन त्यांची माती बनत असते. व ही माती झाडांच्या मुळ्या, मुळे व बुडखे यांचेमुळे वाहून न जाता तेथेच राहते. असा क्रम नेहमी चाललेला असतो. ह्याशिवाय, ह्या मातीवर प्रतिवर्षी

झाडांची पाने पडून ती कुजून त्यांचाही थर झालेला असतो, 
८६

त्यामुळे जमिनीचा पृष्ठभाग स्पंजासारखा पोकळ व चिवट होतो. व असल्या जमिनीवर पाणी पडले म्हणजे ते तिजमध्ये मुरते; शिवाय, ज्या जमिनीवर झाडे असतात तीवर त्या झाडांच्या पानांचे आच्छादन असल्यामुळे सूर्याचे किरणांचा आंत फारसा रिघाव होत नाहीं; व त्यामुळे जमिनीचा ओलावा बाष्पीभवनाच्या योगाने इतका नाहीसा होत नाही. जर उघड्या जमिनीवर कांहीं काळामध्ये १००भाग पाणी बाष्पीभवन होऊन जाते असे धरले, तर ज्या जमिनीवर मोठाली झाडे आहेत, अशा जमिनीपासून ३८ भाग पाणी बाप्पीभवन होईल; व ज्या जमिनीवर लहान झाडांचे गर्द आच्छादन आहे, तिच्यामधून फक्त १५भाग होईल. ह्यावरून, झाडे जमिनीमध्ये ओलावा राखण्यास किती कारणीभूत होतात, हे उघड आहे.

 ह्याचप्रमाणे, झाडांचे बुडखे पाण्याचा प्रवाह खाली वाहून जातो त्यास अटकाव करितात, त्यामुळे डोंगरामध्ये पाणी मुरण्यास त्यास सवड सांपडते. दुसरें, पाऊस पडावयास लागला म्हणजे प्रथमतः झाडावर पडून मग पानांवरून खाली पडून टिबकतो. त्या योगाने तो जमिनीमध्ये पुष्कळ मुरतो. कारण, उतरणीवरून पाणी वाहून खाली येऊ लागले असता त्यास मुरण्यास जितकी सवड सांपडते, त्यापेक्षा ते पाणी जमिनीवर लंब रेषेने पडले असता जास्त मुरले पाहिजे. डोंगरावर झाडे लाविलीं म्हणजे पडलेले पाणी त्यामध्ये अशा रीतीने सांठून राहते, व जमिनीच्या पोटामध्ये खडकाचे थर असतात, त्यांच्या फटींमधून पाणी झिरपून

जाऊन जवळ अगर दूर बाहेर पडते. 
८७

 पावसाचे पडलेले पाणी साठून कसे राहतें हें वर केलेल्या विवरणावरून स्पष्ट झालेच. अशा रीतीने उच्च प्रदेशी पाणी सांठले गेल्याने, झऱ्यांंस पाण्याचा पुरवठा जास्त होऊन पाणीही पुष्कळ दिवस टिकते. नद्या, ओढे, तळी, विहिरी ह्या सर्वांस प्रत्यक्ष अगर परंपरेनें झऱ्यांंपासून पाणी प्राप्त होते, हे वर निर्दिष्ट केले आहे. म्हणून झऱ्यांंस पाण्याचा पुरवठा पुष्कळ झाला, म्हणजे त्याबरोबर नद्या, ओढे, तळीं, विहिरी ह्यांसही पाण्याचा पुरवठा जास्त झाला पाहिजे; व ती पावसाळा संपल्यावर पुष्कळ दिवसपर्यंत वाहती राहिली पाहिजेत. पाण्याचा पुरवठा विपुल झाला म्हणजे बागाईत करण्यास मार्ग झाला. म्हणून इरिगेशन खात्याचा उद्देश तो कित्येक जागेमध्ये फारच स्वल्प उपायाने म्हणजे उच्च प्रदेशी झाडे लाविल्याने सिद्धीस जातो.

 दुसरें, इरिगेशन खात्याकडून नद्या वगैरे ह्यांस आडवे बांध घालून जे पाणी आडवले गेले असते, त्यास वारंवार पाण्याचा पुरवठा कमी पडल्यामुळे कालव्यापासून जितका फायदा व्हावा, म्हणजे जितकी जास्त जमीन भिजावी तितकी भिजत नाहीं. म्हणून वर सांगितल्याप्रमाणे झाडे लाविली असतां इरिगेशन खात्यासही मदत होणार आहे. सारांश, पावसाचे पाणी सांठून राहणे ह्याची आपणांस किती अवश्यकता आहे, हे मागें एक वेळा सांगितलेंच आहे. ही अवश्यकता झाडांच्या वृद्धीपासून आपणांस साध्य करून घेता येते.

 ह्या आपल्या उष्ण देशांत जेथे नियमित काळीं मात्र पाऊस 
८८

पडतो त्या ठिकाणीं टेंकड्या, डोंगर, पर्वत वगैरे उच्च स्थाने असल्यापासून किती फायदे आहेत, हे सांगणे नको. आमचा देश डोंगराळ नसून सपाट असता, तर पावसाचे पडलेले सर्व पाणी वाहून गेले असते, किंवा जमिनीमध्ये मुरून खोल गेले असते. मग ते आम्हांस झऱ्याच्या रूपाने जमिनीवर मिळाले नसते, विहिरी खणून पाणी लागले असते. परंतु विहिरीसुद्धा अतिशय खोल खणाव्या लागल्या असत्या. अतिशय खोल विहिरी बागाइतास अगदीं निरुपयोगी होत. अशाच प्रकारची स्थिति आपल्याकडे देशामध्ये कांहीं कांहीं ठिकाणी आहे. विजापूर जिल्ह्यामध्ये व धारवाडचे पूर्व बाजूस पाण्याचा वारंवार दुप्काळ पडतो व विहिरी फार खोल असल्यामुळे एक घागरभर पाणी काढावयाचे झाले, तर दोर उचलण्यास आणखी एक मनुष्य बरोबर न्यावा लागतो. अशी स्थिति मध्य हिंदुस्थानांतील वाळवंटामध्ये म्हणजे मारवाडामध्ये आहे. वाळूचा प्रदेश सपाट व भुसभुशीत असल्यामुळे पडलेले पाणी फार खोल जाते, म्हणून विहिरी फार खोल खणाव्या लागतात.

-----

 १ एथं एक हरदासी गोष्ट मनोरंजक आहे, म्हणून सांगतो. मारवाड देशामध्ये पाण्याचा दुष्काळ व विहिरी अतिशय खोल असतात. म्हणून कोणी मनुष्य प्रवासास निघाला म्हणजे प्रवासाची प्रथम सामुग्री म्हणजे एक लोटा व सुताची एक लांब रसी ही होय. ह्याप्रमाणे सामुग्री घेऊन एक जण प्रवासास निघाला. ऊन झाल्यामुळे व हवा रुक्ष असल्यामुळे त्यास तहान लागली व तो पाण्याचा शोध करू लागला. कर्मधर्मसंयोगाने लौकरच एक विहीर त्याच्या दृष्टीस पडली. तिकडच्या विहिरी खोल

व आंत अंधारगुडुप ! यामुळे विहिरीमध्ये पाणी आहे किंवा नाहीं हें 
८९

पांचपन्नास वर्षांपलीकडे ज्या झऱ्यांंस पाण्याचा विपुल पुरवठा होता, त्यांपैकी कित्येक झरे हल्ली अगदी आटले आहेत. व कित्येकांस

-----
( मागील पृष्ठावरून पुढे चालू ).

लोटा सोडून पाहिल्याशिवाय समजावयाचें नाहीं. ह्याप्रमाणे त्याने पाहिले तो विहीर कोरडी ! थोडीशी निराशा होऊन तसाच पुढे चालू लागला, ते दुसरी विहीर दृष्टीस पडली. तिजमध्ये लोटा सोडून पाहतो तो तीही विहीर कोरडी !! अशा आणखीही कांहीं विहिरी लागल्या, परंतु सर्वांची स्थिति एकच !! दोन प्रहरची वेळ झाली, तहानेने जीव व्याकुल होऊ लागला व त्यांत निराशेची भर पडली !! मग काय विचारावें ! परंतु करतो काय ! तसाच पुढे चालला तों आणखी एक विहीर दृष्टीस पडली. ह्या विहिरीजवळ मात्र थोडी जागा ओली झाली होती, व तिजवर थोडे हिरवें गवतही उगवले होते. ह्या विहिरीमध्ये खास पाणी आहे म्हणून आशा वाटून त्याने मोठ्या उत्सुकतेने लोटा सोडला. परंतु तींतही पाण्याचा ठणठणाठ !! आता मात्र त्याची कंबर बसली, व मरण जवळ आले असे समजून तो ढळढळां रडू लागला. इतक्यांत त्या वाटेने तिकडचा माहितगार असा एक इसम जात होता तो तेथे आला व त्यास रडण्याचे कारण विचारू लागला. तेव्हां--

 पहिला प्रवासी:- मी तहानेने व्याकुल झाला आहे; परंतु मी किती कमनशिबी आहे पहा ! कालपर्यंत ह्या विहिरीस पाणी असून माझ्या दुर्दैवाने ते आजच आटलें !

 इसमः--कालपर्यंत पाणी होते म्हणून कशावरून तू म्हणतेस ?

 प्रवासी:--हे पहा, एथे थोडी जमीन भिजली आहे व तिजवर थोडे हिरवे गवतही उगवले आहे.

 इसमः--बाबा, तूं कमनशिबी आहेस असें नाहीं; ही विहीर अशीच सर्वांस फसविते. जमीन ओली झालेली आहे व गवत उगवले आहे ते विहिरीच्या पाण्याने नव्हे; तर तुझ्यासारख्या प्रवाशांनी एथे अश्रू ढाळले

आहेत त्याने !! 
९०

पाण्याचा पुरवठा अगदी कमी झाला आहे, म्हणून जिकडे तिकडे हल्लीं जो बोभाटा कानीं येतो, त्याचे मुख्य कारण, उच्च प्रदेशावरील झाडोऱ्याचा नाश हे होय. अलीकडे पाऊसही कमी पडतो व त्यामुळे पूर्वीप्रमाणे जमिनीवर पाणीही विपुल पडत नाहीं. ह्यामुळेही झऱ्यांंस पाण्याचा पुरवठा थोडा कमी पडण्याचा संभव आहे असे वाटते खरे. परंतु हल्ली जितका पाऊस पडतो, त्यापैकी थोडा भाग जरी सांठून राहिला, तरी झऱ्यांंस पाण्याचा पुरवठा कमी होण्याचा बिलकुल संभव नाहीं. पावसापासून आपणांस पाणी किती प्राप्त होते, ह्याची कल्पना खाली लिहिलेल्या उदाहरणावरून करितां येईल.

 आपल्या सह्याद्रीच्या माथ्यावर सरासरीने २५० इंच पाऊस पडतो, असे धरूं. ह्या मानाने एक एकर जमिनीवर एक वर्षामध्ये किती पाणी साचून राहते ते पाहू. एक एकर जमीन म्हणजे ४८४० चौरस यार्ड होय. व एका चौरस यार्डात ९ चौरस फूट असतात. म्हणून एका एकराचे ४८४० x ९=४३५६० चौरस फूट झाले. आतां २५० इंच पाऊस पडणे म्हणजे त्या जागेवरील पाणी वाहून गेले नसते, तर २५० इंच खोल पाणी साठून राहणे होय. २५० इंच म्हणजे २५०/१२ फूट होत. म्हणजे प्रत्येक चौरस फूट जमिनीवर २५०/१२ फूट पाणी साचते. एका एकरामध्ये ४३५६० फूट असतात. म्हणून एक एकर जमिनीवर ४३५६० x २५०/१२ =९०७५०० घनफूट पाणी पडते. एक घनफूट पाण्याचे वजन ६२.५ पौंड असते.

म्हणून ९०७५०० घनफूट पाण्याचे वजन ५६७१८७५० इतके 
९१

पौंड होईल. एका एकरावर जर इतके पाणी पडते, तर अशा हजारों एकरांवर किती पाणी पडत असेल ह्याची कल्पना करितां येते. म्हणून इतक्या पाण्यापैकी, थोडे जरी पाणी मुरून राहिले, तरी पुरे आहे.

 आपल्या ह्या दक्षिणेमध्ये सह्याद्रि व त्याच्या असंख्य शाखा हे फारच महत्त्वाचे पाण्याचे सांठे आहेत. ह्यांपासून पश्चिमेस अनेक नद्या निघून अरबी समुद्रास मिळतात व पूर्वेसही मोठमोठ्या नद्या निघून पूर्वेस वाहात जाऊन बंगालचे उपसागरास मिळतात. ह्या पर्वतावर पावसाचे पाणी किती पडते, हे वरील उदाहरणावरून स्पष्ट झालेच आहे. हे पाणी बऱ्याच अंशीं मुरून राहिले असता किती फायदा होणार आहे !! पाणी मुरून राहण्यास झाडांवांचून दुसरा सुलभ मार्ग नाहीं. ह्याकरितां, ह्या सर्व अफाट प्रदेशावर झाडे लाविली पाहिजेत, व जीं आहेत तीं राखली पाहिजेत.

 आपल्या देशाच्या ज्या तीन मुख्य अवश्यकता म्हणजे थंडी उत्पन्न करणे, पाऊस पाडणे, व पावसाचे पाणी सांठवून ठेवणे त्या, झाडांपासून कशा प्राप्त करून घेता येतात ह्याचे इत्थंभूत वर्णन वर केलेच आहे. त्यावरून आपल्या ह्या उष्ण देशांत झाडे किती महत्त्वाची आहेत, हे स्पष्ट होते.

--------------------