Jump to content

हिदुस्थानातील पाऊस व झाडे/थंडी

विकिस्रोत कडून



भाग ३ रा.
---------------
थंडी.

 मागील भागांत सांगितलेल्या अवश्यक गोष्टी म्हणजे थंडी, पाऊस व पाण्याचा संचय ह्यांपैकीं थंडी प्राप्त करून घेण्यास साधन काय ह्याविषयीं आतां आपण विचार करूं.

 थंडी उत्पन्न होण्यास आपणांस काय काय उपाय योजिले पाहिजेत ह्याविषयी विचार करू लागलों असतां, हा उद्देश सिद्धीस नेण्यास आपणांस *झाडांवांचून दुसरे साधन नाहीं, असे दिसून येईल. म्हणजे झाडांची संख्या ज्या ज्या मानाने अधिक असते तसतशी थंडीही अधिक उत्पन्न होते. एथे थंडी म्हणजे काय हें सांगितले पाहिजे. थंडी म्हणजे कांहीं निराळा पदार्थ नव्हे; उष्णतेचा अभाव म्हणजे थंडी होय. म्हणून थंडी उत्पन्न करणे म्हणजे उष्णता कमी करणे असे समजावे. आपणांस जी उष्णता मिळते, ती प्रत्यक्ष अगर परंपरेने सूर्याचे किरणांपासून प्राप्त होते. बहुतेक सर्व उष्णता प्रत्यक्षच प्राप्त होते व कांहीं थोडी मात्र ज्वलनापासून, रसायनसंयोगापासून व पदार्थांचे चलनवलनापासून प्राप्त होते. परंतु यासही मूळ कारण सूर्याची किरणेच आहेत. म्हणून मुख्यतः आ-

-----

 * 'झाड ' ह्या संज्ञेचा अर्थ साधारणपणे " लहानथोर सर्व

वनस्पति " असा समजावा. 
३०

पणांस सूर्याचे किरणांपासून मिळालेली उष्णता कमी करण्यास उपाय योजिले पाहिजेत. उष्णता कमी करण्याचे कार्य झाडे तीन रीतींनीं करितात : आपल्या अंगच्या रंगानें, रसायनव्यापाराने व बाष्पीभवनाने.

रंग.

 झाडांचा रंग काळसर म्हणजे हिरवट काळा असतो. आणि काळा रंग उष्णताग्राहक आहे. सूर्याच्या धवल तेजामध्ये सात रंगांचीं किरणे आहेत. ह्या सात रंगांचे मिश्रणापासून किरणास धवलता प्राप्त झाली आहे.

 पदार्थ जो आपणांस दिसतो त्याचे कारण त्यावर प्रकाशाचीं किरणे पडून त्या किरणांचे परावर्तन होऊन ती किरणें आपल्या डोळ्यांवर येऊन आपटतात हे होय. ह्यावरून, प्रकाश नसला तर आपणांस पदार्थ मुळीच दिसावयाचे नाहींत. आपण उजेडांत जरी असलों तरी पदार्थावर उजेड पडला नाहीं तर तो आपणांस दिसावयाचा नाहीं.

 आतां, दुसरा प्रश्न असा उद्भवतो कीं, पदार्थांवर धवल किरणें पडली असतां ते आपणांस निरनिराळ्या रंगाचे कां दिसतात ? तर याचे कारण असे की, प्रत्येक पदार्थाच्या अंगीं त्यावर जीं प्रकाशाची किरणें पडतात त्यांतील सप्त रंगांपैकी एक अगर अधिक रंग गिळून टाकून बाकीचे रंग परावर्तन करण्याचा धर्म असतो. तांबडे जे पदार्थ दिसतात, ते तांबड्या रंगाची किरणे खेरीजकरून

बाकीच्या सर्व रंगांची किरणें गिळून तांबडी तेवढी मात्र किरणें परा
३१

वर्तन करितात. त्याचप्रमाणे हिरवे जे पदार्थ दिसतात ते हिरव्या रंगाची किरणें खेरीजकरून बाकीच्या सर्व रंगांची किरणें गिळून टाकितात व हिरवे मात्र किरण परावर्तन करितात. किंवा जे पदार्थ तांबडी मात्र किरणे परावर्तन करितात त्यांस आपण तांबडे म्हणतो, व जे पदार्थ हिरवीं मात्र किरणें परावर्तन करितात त्यांस आपण हिरवे म्हणतो, असे म्हटले तरी चालेल. पदार्थाचा रंग म्हणजे त्याचा अमुक एक प्रकारचे किरण परावर्तन करण्याचा धर्म होय. ह्यावरून अंधारांत पदार्थाला रंग नसतो हे उघड होते. आतां, जे पदार्थ सातही रंगांची किरणें परावर्तन करितात त्यांस आपण पांढरे म्हणतो. म्हणजे जो पांढरा रंग रंगसामान्याचा अभाव असा वाटतो तो वस्तुतः सर्व रंगांचा संकर होय. इंद्रधनुष्यामध्ये दिसणारे *सातही रंग कांहीं एका प्रमाणाने मिश्र केले असतां पांढरा रंग उत्पन्न होतो. एक भोंवरा घेऊन त्यावर कांहीं नियमित प्रमाणाने वर सांगितलेल्या सातही रंगांचे उभे पट्टे काढून तो भोंवरा जोराने फिरविला, तर तो पांढरा शुभ्र दिसेल. ह्या धर्माचे उलट जे पदार्थ सर्व रंगांची किरणें गिळून टाकतात त्यांस आपण काळे म्हणतों. प्रचारामध्ये जरी काळा हा एक रंग समजला जातो, तरी शास्त्ररीत्या काळा हा कांहीं रंग नव्हे, तो सर्व रंगांचा अभाव होय. ह्याप्रमाणे काळ्या पदार्थांमध्ये सर्व प्रकारची किरणें गिळून टाकण्याचा धर्म असल्यामुळे ते उष्णता ग्राहक आहेत, हे उघड झाले.

-----

 *इंद्रधनुष्यामध्ये जे सात रंग आहेत त्यांची नांवेंः-तांबडा, नारिंगी,

पिवळा, हिरवा, निळा, पारवा, व जांभळा. 
३२


काळा रंग उष्णताग्राहक आहे, ह्यास पुष्कळ प्रमाणे देता येतील. बाजूस लिहलेल्या आकृतीचे एक यंत्र असते. अ हे एक सुईचे अग्र आहे आणि ब ब ही एक त्या अग्रावर फिरतां येण्यासारखी अर्धवर्तुलाकर तार आहे; ह्या तारेच्या दोन्ही शेवटांस ड, क

हे टिनाचे लहान लहान पत्रे बसविलेले असतात; ह्या दोन्ही पत्र्यांची एक एक बाजू काळ्या रंगाने रंगविलेली असते, व दुसरी बाजू चकचकीत शुभ्रवर्ण असते; आणि ह्या सर्व यंत्रावर काचेचे एक झांकण घातलेले असते. काचेच्या झांकणाचा उपयोग इतकाच की, यंत्रास वाऱ्याची झुळूक लागू नये, किरणें मात्र आंत जावी. हे यंत्र अंधारांत ठेविलें तर वक्र तार बिलकूल फिरत नाही. परंतु ते थोडे उजेडात आणले तर ती लागलीच गरगर फिरू लागते. ह्याचे कारण इतकेच कीं, सूर्याची किरणे आंत शिरून टिनाचे पत्र्यावर पडतात त्या वेळी पत्र्यांस दिलेला काळा रंग सर्व किरणें गिळून टाकितो व पत्र्याच्या आंगचा एका बाजूस असलेला जो चकचकीत

पांढरा रंग त्याजवरील सर्व किरणें जोरानें परावर्तन करतो. त्याचा 
३३

आघात यंत्रावर बसून ते यंत्र फिरूं लागते. ह्या यंत्राचे पत्र्यांस काळा रंग न दिला तर ते फिरणार नाहीं.

 काळा रंग उष्णताग्राहक आहे, ह्याचा अनुभव प्रचारांतील पुष्कळ उदाहरणांवरून दृष्टोत्पत्तीस येतो. नुसत्या काळ्या कापडाची छत्री आपण उन्हांतून घेऊन जाऊ लागलों तर तेव्हांच छत्री तापते व छत्री घेणारास गरमा होऊ लागतो. ह्या करितांच छत्रीवर पांढरा अभ्रा घालीत असतात. पांढरा रंग सर्व रंगांची किरणे परावर्तन करतो, म्हणून तो अभ्रा तापत नाहीं. काळ्या छत्रीस पांढरा अभ्रा घालून ती छत्री घेऊन कांहीं वेळ उन्हांतून चालावे, आणि नंतर छत्रीस हात लावून पहावा, म्हणजे अभ्रा थंड लागतो व आंतील कापड गरम लागते. छत्रीवर जीं सूर्याची किरणे पडतात ती सर्व परावर्तन पावल्यामुळे अभ्रा थंड राहतो. आंतील कापडामध्ये जी उष्णता येते ती सूर्याच्या प्रत्यक्ष किरणांपासून फारशी येत नाहीं; परंतु इतर पदार्थांवर पडलेली किरणें परावर्तन पावून ती काळ्या कापडावर पडतात. त्या वेळी ते कापड उष्णता ग्रहण करिते. थंडीच्या दिवसांत आपण काळ्या रंगाचे कपडे वापरले असतां ते जास्त उबदार भासतात ह्याचे कारण हेच. आपण काळ्या रंगाचा अंगरखा घालून उन्हांत गेलो असतां आंगरखा तेव्हांच तापून गरमा व्हावयास लागतो; परंतु तोच जर पांढऱ्या कापडाचा आंगरखा घातला तर कितीही उन्हांत फिरलें तरी तापत नाहीं. खोलीला चुना लाविलेला असला म्हणजे ती विशेष

थंड असते, हे नेहमी आपल्या अनुभवास येते; व ह्याच्या उलट ह्मणजे 
३४

भिंती काळसर असल्या तर ती विशेष गरम असते, हेही आपल्या अनुभवास येते. एकाच धातूची दोन सारखी सारखी भांडी घेऊन एकास काळा व दुसऱ्यास पांढरा रंग लावून ती सारखा वेळ उन्हांत ठेवावीं; नंतर त्यांस हात लावून पहावें तो काळे भांडे पांढऱ्या भांड्यापेक्षां विशेष कढत लागेल. वाफेच्या इंजिनामधील उष्णता परावर्तन पावून कमी होऊ नये, म्हणून त्या इंजिनास बाहेरून काळा रंग दिलेला असतो. एकादा पांढरा शुभ्र पदार्थ उन्हामध्ये डोळ्यांसमोर धरिला तर डोळे दिपतात; परंतु एकादा हिरवा पदार्थ पाहिला तर मनाला किती समाधान वाटते ! ह्याचे कारण हेच की, पांढरा पदार्थ सर्व किरणें परावर्तन करितो व तीं किरणें आपल्या डोळ्यांवर येऊन आपटतात, त्यामुळे आपल्या डोळ्यांस त्रास होतो; परंतु हिरवा पदार्थ बहुतेक किरणें गिळून टाकितो, त्यामुळे त्यांजपासून त्रास होत नाहीं. एकाद्या गर्द झाडांच्या बागेकडे अगर एकाद्या दाट पाने असलेल्या वृक्षाकडे पाहिले असतां आपणांस किती आनंद होतो हे प्रत्यहीं आपल्या अनुभवास येते. ह्या सर्व उदाहरणांवरून काळा रंग हा उष्णताग्राहक आहे, हे अगदी स्पष्ट झाले. झाडांचाही रंग काळसर असतो, म्हणून झाडे आपल्या रंगाच्या योगाने उष्णता नाहींशी करण्यास साधनीभूत होतात, अर्थात् थंडी उत्पन्न करितात, हे सिद्ध झाले.

रसायनव्यापार.

 आतां, रसायनव्यापाराने झाडे उष्णता कशी कमी करितात तें

पाहूं. रसायनशास्त्रांतील असा एक नियम आहे की, दोन पदार्थ 
३५

रसायनरीतीने संयोग पावू लागले असतां उष्णता उत्पन्न झालीच पाहिजे. हे अनेक शास्त्रीय प्रयोगांवरून सिद्ध करून दाखवितां येते. परंतु तसे प्रयोग एथे सांगितले असतां फार विस्तार होईल. प्रचारांतही ह्या गोष्टीचे समर्थनार्थ पुष्कळ उदाहरणे आहेत, त्यांपैकी कांहीं सांगतो. चुनकळी घेऊन तिच्यावर पाणी घातले असतां चुनकळी व पाणी यांचा संयोग होऊं लागून चुना उत्पन्न होतो व ह्या रसायनसंयोगापासून उष्णता उत्पन्न होते; व ज्या पात्रांत तो चुना असतो ते इतकें कढत होते की, त्यास हात लाववत सुद्धा नाहीं. ज्वलनापासून म्हणजे लाकूड, तेल वगैरे जाळलें असतां जी उष्णता प्राप्त होते तीही रसायनव्यापारापासूनच होय. लाकडांतील व तेलांतील हैड्रोजन (जलज) व कार्बन ( अंगार ) ह्यांचा हवेतील ऑक्सिजन ( प्राणिज ) वायूशीं रसायनसंयोग होऊन त्यापासून पाणी व कार्बानिक आसिड वायु उत्पन्न होतात, व ह्या व्यापारापासून उष्णता उत्पन्न होते. पुष्कळ दिवस गुरांच्या शेणाची रास एकाच जागी पडलेली असली म्हणजे त्या राशीमध्ये रसायनव्यापार सुरू होऊन त्यापासून उष्णता उत्पन्न होते, व ती रास गरम होऊन तिजपासून वाफा निघू लागतात. तसेच, भट्टींत तयार केलेल्या कोळशांची रास कांहीं दिवसपर्यंत एकेच ठिकाणी राहिली असतां कधी कधी ती आपोआप पेट घेते. ह्याचे कारण असे की, कोळशामध्ये बारीक बारीक छिद्रे असतात त्यांमध्ये ऑक्सिजन वायु कोंडून राहतो; त्या वायूचा कोळशांशीं संयोग

होऊं लागून जी उष्णता उत्पन्न होते त्यामुळे कोळसे पेट घेतात 
३६

दुधामध्ये बेताचे विरजण पडले म्हणजे दुधाचे दहीं लौकर होऊ लागते, व ज्या भांड्यांत ते दहीं असते ते बरेच गरम होते. ह्याचे कारण दुधाचे दहीं होणे ही एक रसायनसंयोगक्रिया आहे व त्यामुळे उष्णता उत्पन्न होते. अशी दुसरी अनेक उदाहरणे सांगता येतील. ह्यावरून रसायनसंयोगापासून उष्णता उत्पन्न होते हे स्पष्ट झाले.

 ह्याच्याच उलट म्हणजे एका पदार्थाचे रसायन पृथक्करण करणे झाल्यास म्हणजे तो पदार्थ ज्या मूळ दोन अगर अधिक द्रव्यांपासून झाला असेल ती द्रव्ये निरनिराळी काढणे झाल्यास त्यास उष्णता दिली पाहिजे. चुनकळी व पाणी यांचे संयोगापासून जो चुना उत्पन्न झालेला असता त्या चुन्यापासून पुनः चुनकळी व पाणी हे निरनिराळे करावयाचे झाल्यास त्यांपासून पूर्वी प्राप्त झालेली उष्णता त्यांस पुनः परत दिली पाहिजे. ह्याचप्रमाणे, लाकूड अगर तेल आणि ऑक्सिजन यांपासून जो कार्बनिक आसिड नांवाचा वायु तयार होतो त्या वायूपासून पुनः ऑक्सिजन आणि तेल किंवा लाकूड पृथक् पृथक् करणे झाल्यास पूर्वी उत्पन्न झालेली उप्णता त्यास दिली पाहिजे. अशी दुसरीही पुष्कळ उदाहरणे आहेत. वरील सर्व उदाहरणांवरून हे सिद्ध होते की, दोन पदार्थांचा रसायनसंयोग होऊ लागला असतां उष्णता उत्पन्न होऊ लागते; व ह्याचेच उलट ह्मणजे रसायनपृथक्करण करणे झाल्यास उष्णता खर्च करावी लागते. ज्या ठिकाणीं रसायनपृथक्करण आपोआप होते त्या ठिकाणी आजूबाजूस असलेली उप्णता नाहीशी होते.

उष्णता नाहीशी होणे म्हणजे थंडी उत्पन्न होणे. 
३७

 आतां, झाडे कोणत्या रसायनपृथक्करणाने थंडी उत्पन्न करितात ते पाहू. झाडाचे मुख्य शरीर लाकूड होय. त्या लाकडामध्यें शेकडा २५ भाग कोळसा असतो. बाकी नैट्रोजन, पाणी, पोट्याश वगैरे पदार्थ असतात. झाडे आपल्या पोषणास लागणारे पदार्थोपैकीं कार्बन खेरीजकरून बाकीचे सर्व पदार्थ जमिनीच्या द्वारें शोषण करितात, व कार्बन ( कोळसा ) मात्र हवेमधून घेतात. हवेमध्ये हरहमेशा १००० स ४ भाग कार्बनिक आसिड वायु असतो. ज्या ठिकाणीं ज्वलनादि क्रिया चाललेल्या असतात व मनुष्यसमूह पुष्कळ असतो, त्या ठिकाणी ह्या वायूचे प्रमाण जास्त असते. कारण, ज्वलनापासून व प्राण्यांच्या श्वासोच्छवासापासून नेहमी हा वायु उत्पन्न होत असतो. ह्या वायूचे घटकावयव कार्बन व ऑक्सिजन असे आहेत. सूर्यकिरणांचे साहाय्याने झाडे ह्या वायूचे पृथक्करण करून कार्बन आपले पोषणास शोषून घेतात, व ऑक्सिजन वायु मोकळा करितात. झाडांची ही क्रिया दिवसां सतत चालू असते.

 झाडांची ही क्रिया चांगली स्पष्टपणे कळण्यास एक लहानसा प्रयोग आहे, व तो पाहिजे त्यास करितां येण्यासारखा आहे. खडूवर सल्फ्यूरिक अगर दुसरें एकादें आसिड ओतून त्यापासून कार्बनिक आसिड वायु उत्पन्न करावां. हा वायु पाण्याच्या आकारमानाइतका त्यांत विरतो. वायु उत्पन्न करण्याची व तो

विरवण्याची कृति खालीं लिहिल्याप्रमाणे करावी. 
३८

 बाजूस लिहिलेल्या आकृतीत दाखविल्याप्रमाणे अ एक मोठ्या

तोंडाची बाटली घ्यावी, व तींत चॉकाचे तुकडे व पाणी घालून ठेवावें; तोंडामध्ये एका बाजूस फनेल चांगले घट्ट बसवून त्याचे एक शेवट पाण्यामध्ये बुडेल असे करावे; दुसऱ्या बाजूला एक रबराची नळी बसवावी; क हे एक लाकडाचे अगर धातूचे पात्र घेऊन त्यांत पाणी भरावे; ब हे एक हंडीसारखे काचेचे पात्र घेऊन तेही पाण्याने भरावें, व त्याचे तोंड पाण्यांत असतांच उपडे करून तोंड पाण्यांत बुडे अशा रीतीने त्या पात्रांत ठेवावे, म्हणजे बाहेरील हवेच्या दाबाने पाणी त्या हंडीमध्ये वर राहील. फनेलांतून आसिड ओतू लागले म्हणजे वायु उत्पन्न होऊन नळीवाटे हंडीत शिरेल, व हंडींतील पाण्यात विरेल. जास्त वायु विरेनासा झाला म्हणजे नळी काढून घ्यावी व त्या हंडीमध्ये कांहीं हिरव्या पानांची लहान लहान झाडे घालून ती हंडी बुडाच्या पात्रासह उन्हामध्ये ठेवावी. उन्हाच्या उष्णतेच्या योगाने झाडे त्या वायूचे ( ग्यासाचे ) पृथ- करण करूं लागून कार्बन आपले पोषणास घेऊन ऑक्सिजन

वायु निराळा करितात. हे पात्र उन्हांत ठेविलें म्हणजे थोड्याच 
३९

वेळाने झाडांच्या पानांवर ऑक्सिजन वायूचे बुडबुडे दिसू लागतात. हे पात्र कांहीं वेळ उन्हांत तसेच राहू दिले असतां बराच ऑक्सिजन वायु त्या पात्राचे वरचे बाजूस जमतो.

 आतां, हा ऑक्सिजनवायुच आहे किंवा दुसरा कोणता वायु आहे याची परीक्षा करणे झाल्यास एकादी बारीक लाकडाची धलपी विस्तव असलेली घेऊन त्या वायूमध्यें धरावी म्हणजे एकदम पेट घेईल, व फारच सतेज जळू लागेल. ऑक्सिजन वायूमध्ये ज्वालाग्राही पदार्थ फारच सतेज जळतात. म्हणून उत्पन्न झालेला वायु ऑक्सिजनच आहे हे उघड झाले. वर सांगितलेले पात्र जर अंधारामध्ये नेऊन ठेविलें, तर कार्बनिक आसिड वायूचे पृथक्करण बिलकूल होत नाहीं. ह्या पृथक्करणास उष्णता पाहिजे, व ती झाडे उजेडांत असतांना नेहमी हवेमधून घेतात. अर्थातच मग हवेमध्ये थंडी उत्पन्न होते.*

बाष्पीभवन

 आतां, बाप्पीभवनाने थंडी कशी उत्पन्न होते, ह्याविषयी विचार करणे राहिले. झाडे पाणी जमिनीतून शोषून घेऊन त्याचे पानांच्या पृष्ठभागाच्या द्वारे हवेमध्ये नेहमी बाप्पीभवन करीत अस-

-----

 *झाडे कार्बानिक आसिड वायूचे पृथक्करणास जी उष्णता घेतात, ती अगदीं नाहींशी होते असे नाही. ती झाडांमध्ये अदृश्यरूपाने असते व आपणांस पाहिजे तेव्हां पुनः ती उत्पन्न करितां येते. लाकडे अगर कोळसे जाळले असतां जी उष्णता उत्पन्न होते ती झाडांचे पोषण होऊन लाकूड

बनण्यामध्ये अदृश्य झालेली उष्णता होय. 
४०

तात. बाष्पीभवन करण्यास उष्णता अवश्य आहे. चुलीवर एका भांड्यांत पाणी ठेवून त्याची सर्व वाफ करावयाची झाल्यास चुलीखालीं लाकडे लाविली पाहिजेत. पाण्याची वाफ होण्यास जितकी उष्णता अवश्य पाहिजे असे आपणांस सकृद्दर्शनीं वाटते त्यापेक्षा पुष्कळ जास्त उष्णता त्यास लागते. पाण्यास आधण आले म्हणजे झाले, मग ते पाणी न निवू देण्याइतकी उप्णता त्या पाण्यास दिली, तर सर्व पाण्याची वाफ होईल, असे आपणांस साधारणपणे वाटते परंतु तशी गोष्ट नाही. पाण्यास आधण येण्यास, त्या पाण्याची उष्णता समुद्राचे सपाटीवर २१२° फा० असली पाहिजे. आतां, एक भांडेभर पाण्यास आधण आणण्यास जितकी उष्णता लागते, तिच्या ५/ पट उप्णता त्या पाण्याची वाफ करण्यास लागते. एका भांड्यामध्ये पाणी घालून ते चुलीवर ठेवावे, व त्यास आधण आणण्यास किती सर्पण लावावे लागते ते पहावे. नंतर, पुढे त्या सर्व पाण्याची वाफ होण्यास आणखी किती सर्पण लावावे लागते ते पहावें. आणखी सुमारे ५ पट अधिक सर्पण लाविल्याशिवाय त्या पाण्याची सर्व वाफ होऊन जाणार नाही. पण पाण्यास आधण आल्या वेळीं, जी त्याची उष्णता असते, तितकीच त्या वाफेची उष्णता असते, म्हणजे:२१२° फा० असते. तर मग, वर सांगितलेली पांचपट उष्णता जाते कोठे ? नाहीशी होते की काय ? उष्णता नाहींशी कधीं होत नसते; उष्णतेचे रूपांतर होते, परंतु ती कधीही नाहीशी होत नाही. प्रकृत उदाहरणामध्ये ती वाफेमध्ये गुप्त रूपाने

असते, म्हणजे ती वाफेमध्ये आहे म्हणून जरी आपल्या इंद्रियांस 
४१

गोचर होत नाहीं, तरी पाहिजे असल्यास ती उष्णता वाफेपासून आपणांस पुनः उत्पन्न करितां येते. एका भांड्यामध्ये पांच पंचपात्र्या पाणी घ्यावे व त्या भांड्यामध्ये रबराचे नळीने दुसऱ्या भांड्यांतून वाफ आणून सोडावी. पाणी बर्फाइतके थंड म्हणजे ३२° फा० असावे; व वाफ २१२° फा० उष्णतेची असावी. रबराचे नळींतून वाफ पाण्यात मिसळून तिचेही पाणी होईल, व त्या पाण्याची उष्णता वाढू लागेल. क्रमाक्रमानें भांड्यांतील पाण्याची उष्णता २१२° फा० वाढेल. व इतकी उष्णता वाढल्यावर मग वाफेचे थिजून पाणी न होता ती तशीच निघून जाऊं लागेल. इतके झाल्यावर पूर्वीचें पांच पंचपात्र्या पाणी होते ते मोजून पहावे. आतां असे आढळून येईल की, पूर्वी जे पांच पंचपात्र्या पाणी होते तें हल्ली सहा पंचपात्र्या झाले आहे, म्हणजे एक पंचपात्र पाणी वाढले आहे. हे वाढलेले पाणी कोठून आलें ? वाफ थिजून हे पाणी उत्पन्न झाले. परंतु एकच पंचपात्रभर ( बाष्परूपी ) पाण्याने पांच पंचपात्र्या पाण्याची उष्णता ३२° पासून २१२ पर्यंत वाढविली. परंतु त्या वाफेची उष्णता २१२° पेक्षा जास्त नव्हती. म्हणून एक पंचपात्रीभर पाणी होण्यापुरत्या वाफेमध्ये पांच पंचपात्री थंड पाणी आधण आणण्यास पुरे इतकी उष्णता अदृश्य रूपाने होती. ह्यावरून पाण्याची वाफ होतांना ते अतिशय उष्णता अदृश्य करिते हे उघड झाले.*

-----

 *वर सांगितलेल्या प्रयोगाप्रमाणेच स्थिति दारूच्या भट्यांमध्ये ( डिं-

स्टिलरीमध्यें ) होत असते. चुलीवर जो हंडा असतो, त्यामधून दारूची 
४२

 पाण्याची वाफ होऊ लागली असतां उष्णता अदृश्य होते, म्हणजे थंडी उत्पन्न होते. ह्याचे प्रत्यंतरास प्रचारामध्ये अनेक उदाहरणे आहेत. पाण्याचा असा एक धर्म आहे कीं, हवेची उष्णता कितीही कमी असो, त्याच्या पृष्ठभागापासून नेहमीं बाष्पीभवन होत असते; व ह्या बाष्पीभवनास अवश्य लागणारी उष्णता तें सभोंवतीं असणाऱ्या पदार्थांमधून घेत असते. एका उथळ पितळीसारख्या भांड्यामध्ये पाणी घालून रात्रभर ठेविलें असतां ते पाणी अगदीं गार होते. पितळीसारखे भांडे घेण्याचा उद्देश इतकाच की, पाण्याला पुष्कळ पृष्ठभाग मिळावा. ह्या पाण्याचे बाष्पीभवन स्वभावतःच चालू असल्यामुळे त्यास लागणारी उष्णता पाण्यामधूनच घेतली जाते, त्यामुळे पाणी थंड होते. उन्हाळ्यामध्ये आपणांस पाणी थंड करावयाचे असल्यास आपण भांड्यास वरून फडके गुंडाळून ठेवितों, व फडके नेहमीं ओले ठेवीत गेलों म्हणजे भांड्यांतील पाणी थंड होते. ओले फडके लावण्याचा इतकाच उद्देश कीं, भांड्याच्या सर्व बाजूंनी बाष्पीभवन व्हावे. बाष्पीभवन होण्यास उष्णता पाहिजे; ती उष्णता भांड्यांतील पाण्यामधूनच

-----

( मागील पृष्ठावरून पुढे चालू. )

वाफ निघत असते; व ती वाफ एका नागमोडी नळीच्या द्वारे एका थंड पाण्याच्या पिपांतून जाते, व तिचे पाणी होऊन ते बाटल्यांमध्ये भरून ठेवितात. वाफेचे पाणी होत असतांना त्यामधून इतकी उष्णता उत्पन्न होते की, पिपांतील पाणी अतिशय उष्ण होते, व ते काढून त्याच्या जागी

एकसारखे थंड पाणी येण्याजोगी तजवीज केलेली असते. 
४३

प्राप्त होते; त्यामुळे पाणी थंड होते. खोज्यामध्ये अगर मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेविलें असतां थंड होते ह्याचेही कारण हेच होय. खोज्यास व मातीच्या भांड्यास जी अनेक छिद्रे असतात, त्यांमधून पाणी झिरपून भांड्याच्या पृष्ठभागांवर येते, व त्याचे बाप्पीभवन होत असतांना ते भांड्यांतील पाण्यामधूनच उष्णता घेते; ह्यामुळे त्या पात्रांतील पाणी थंड होते. उन्हाळ्यामध्ये कपडे पाण्यात भिजवून सावलीमध्ये थोडा वेळ ठेविले असतां थंड होतात, ह्याचेही कारण हेच.

 ह्या बाष्पीभवनापासून इतकी थंडी उत्पन्न करितां येते की, ज्या पाण्याचे बाष्पीभवन होते तेच पाणी थिजून त्याचे बर्फ होते. अशा रीतीनें बर्फ करण्याची रीति फार सोपी आहे; परंतु त्यास यंत्राचे साहाय्य लागते. पाण्याचा आणखी एक असा धर्म आहे की, त्याच्या पृष्ठभागावरील हवेचा दाब जसजसा कमी करावा तसतसे त्यास कमी उष्णतेनें आधण येते, म्हणजे तसतसे त्याचे फार बाष्पीभवन होऊ लागते. एका काचेच्या भांड्यामध्ये (एका वाटीत) पाणी भरून ठेवावे, व त्या वाटीशेजारीच सल्फ्यूरिक आसिड सारखा एकादा जलशोषक पदार्थ ठेवावा; व त्या भांड्यांतील हवा वाताकर्षक यंत्राने काढून टाकू लागावे; म्हणजे अर्थातच वाटीवरील हवेचा दाब कमी होऊ लागतो, व त्या पाण्याचे बाष्पीभवन फार झपाट्याने होऊ लागते. अशा रीतीने उत्पन्न झालेली वाफ सल्फ्यूरिक आसिड लागलीच शोषून घेते, व ह्यामुळे पाण्याची

आणखी वाफ होऊ लागते. या बाप्पीभवनाने पाण्याची उष्णता 
४४

इतकी नाहीशी होते कीं, थोड्याच वेळांत अवशेष पाणी थिजून त्याचें बर्फ होते.

 वरील उदाहरणावरून पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागले म्हणजे पुष्कळ थंडी उत्पन्न होते हें अगदीं उघड आहे. व झाडांच्या पानांपासून नेहमी वाफ निघत असते म्हणून झाडे बाष्पीभवनाने पुष्कळ थंडी उत्पन्न करितात हे सिद्ध झाले. मि० चार्लस बेन्सन मद्रास सैदापेठ फार्मचे सुपरिंटेंडंट हे म्हणतातः इंग्लंडांत असा अदमास केला आहे की, झाडाचा एक रत्तल जडांश म्हणजे लाकूड उत्पन्न होण्यास २०० रत्तल पाणी त्या झाडांतून अभिसरण पावून त्याचे बाष्परूपाने विसर्जन व्हावे लागते. तसेच, एक -रत्तल क्षारांश ( राख ) उत्पन्न होण्यास २००० रत्तल पाणी झाडांतून फिरावे लागते. ह्यावरून झाडे बाप्पीभवनाने किती थंडी उत्पन्न करितात याचे अनुमान करितां येईल.

 आपल्या देशाची पहिली अवश्यकता जी थंडी ती, झाडे आपल्या काळ्या रंगानें, कार्बनिक आसिड वायूचे पृथक्करण करणे ह्या रसायन व्यापाराने, व पानांच्या द्वारे बाष्पीभवन करणे ह्या तीन रीतींनी उत्पन्न करितात, हे वर स्पष्टपणे दाखविले आहे. परंतु हे लक्षात ठेविले पाहिजे की, एक साधारण मोठे झाड वरील तिन्ही रीतांनी मिळून जरी बरीच थंडी उत्पन्न करिते, तरी आपुल्या ह्या अफाट उष्ण देशामध्ये सूर्यापासून जी उष्णता येते तिच्याशी तुलना केली असतां ती सागरामध्ये जसा जलबिंदु त्याप्रमाणे आहे.

ह्याकरिता आपल्या ह्या देशामध्ये एथे कांहीं तेथे कांहीं अशी झाडे 
४५

लाविल्याने हवेमध्ये फारसा फरक होण्याचा संभव नाहीं. जिकडे तिकडे सर्व देशभर कोट्यवधि झाडे पाहिजे आहेत. तरच कांहीं इच्छित हेतु सिद्धीस जाण्याचा संभव आहे. ह्याकरितां, सरकार व रयत यांनी शक्य तितकी झाडे लावण्याविषयी प्रयत्न केला असतां, ह्या देशाचे मोठे कल्याण केल्यासारखे होणार आहे.


--------------------