हिदुस्थानातील पाऊस व झाडे/झाडांपासून इतर उपयोग

विकिस्रोत कडून



भाग ६ वा.
---------------
झाडांपासून इतर उपयोग.

 आतां, झाडांपासून आणखी काय काय फायदे आहेत, याजबद्दल विचार करूं.

दहिवर.

 आपल्या देशामध्ये दोन प्रकारची पिके होतात, हे सर्वांस ठाऊक आहेच. एक खरीपाचे पीक व दुसरें रबीचे पीक. खरीपाचे पिकाची पेरणी पावसाळ्याचे आरंभीं होऊन पिके निघण्याचा हंगाम दसऱ्याचे सुमारास असतो. अशा प्रकारची पिके म्हटली म्हणजे तांदूळ, बाजरी, ज्वारी, तुर वगैरे होतः रबीचे पिकाचा पेरणी हस्तचित्राचे वळिवाचे पावसाने होऊन माघ–फाल्गुनांत पिके निघण्याचा हंगाम असतो. गहू, हरबरा, वाटाणा, शाळू वगैरे पिके ह्या जातीचीं होत. खरीपाचे पिकास पाऊस जास्त लागतो. व मृगनक्षत्रांपासून जे झडीचे पाऊस लागतात, त्यांच्या योगानें ही पिकें होतात. रबीची पिके पाऊस पडून जमिनीमध्ये पेरण्यापुरता ओलावा झाला म्हणजे पेरतात. नंतर एकादा पाऊस झाला म्हणजे, अधिक पावसाचे पाण्याची जरूर लागत नाहीं. पिकाचे वाढीस ओलावा दहिंवरापासून मिळतो.

 बंगाल प्रांतामध्ये भाताचे उत्पन्न फार आहे. बाकी उत्तर

हिंदुस्तानात पंजाब, वायव्येकडील प्रांत, वगैरे बहुतेक ठिकाणीं रबी 
९३

चेच पीक जास्त होते. आपल्या ह्या दक्षिणेत कोंकणामध्ये, व मावळामध्ये खरीपाचीं पिकं होतात, व देशामध्यें रबीचीं पिके होतात. मद्रासेकडेही रबीचे पीक जास्त होते. खरीपाचे पिकापेक्षा रबीचेच पीक मोठे महत्त्वाचे व विपुल होय. खरीपाचीं पिकें कितीही चांगली आली तरी सर्व देशास त्यापासून धान्याचा पुरवठा होत नाही. आमच्या इकडे कोकणांत तर पीक नेहमी चांगले येते, व मावळांतही सहसा अवर्षण पडून नापीक होत नाहीं. इकडे दुष्काळ पडणें न पडणे हे सर्वथैव देशावरील रबीच्या पिकावर अवलंबून असते. हे रबीचे पीक इतक दांडगें असतें कीं, साधारण जरी पीक झाले, तरी त्यापासून लोकांस दोन वर्षे पुरवठा होण्यासारखा असतो. व चांगले पीक झाले, तर चार पांच वर्षेसुद्धा ते पुरण्यास हरकत नसते. खरीपाचीं पिके चांगली होऊनही रबीचीं पिकें न झाल्यामुळे आमच्या इकडे पुष्कळ दुष्काळ पडले आहेत. सारांश, रबीचीं पिके वाढविण्याविषयी आपणांस होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. रबीचे पिकाची वाढ विशषेकरून दहिंवरावर होते. म्हणून दहिंवर जास्त पडण्याकरितां आपणांस उपाय योजिले पाहिजेत.

 आपली ही अवश्यकता आपणांस झाडांपासून भागविता येते; ती कशी हे आतां पाहूं.

 दहिंवर पडण्यास दोन साधने लागतातः पाण्याची वाफ हे एक, व दुसरें थंडी. हवेमध्ये जी पाण्याची वाफ कमजास्त प्रमाणाने नेहमी

मिश्रित असते, तिजपासूनच दहिंवर प्राप्त होते. नैर्ऋत्येकडील 
९४

अगर वायव्येकडील नियतकालिक वाऱ्याच्या योगाने समुद्रावरील वाफ येऊन पाऊस पडण्यास जशी कारणीभूत होते, तशी वाफ दहिंवर पडण्यास जरूर नसते. जमिनीतील ओलावा, नद्या, तळीं, विहिरी वगैरे यांचे सतत बाष्पीभवनाने जी वाफ हवेमध्ये सांचते ती दहिंवर पडण्यास बस होते. ह्या वाफेचे पुनः पाणी होणे म्हणजे दहिंवर पडणे होय. हवेतील वाफेचे पाणी, थंडीच्या योगानं कसे होते हे मागे पावसाची उपपत्ति सांगतेवेळी सांगितलेच आहे. हवेमध्ये जास्त ओलावा आणण्यास व थंडी उत्पन्न करण्यास झाडे कशी कारणीभूत होतात ह्याचेही प्रतिपादन मागे केलेच आहे. थंडीचे मान सारखे असतां हवेमध्ये जितकी जास्त वाफ असेल तितकें दहिंवर जास्त पडेल. तसंच वाफेचे मान सारखे असता जितकी थंडी जास्त पडेल तितकें दहिंवर जास्त पडेल. मग वाफेचे मान व थंडीचे मान ही दोन्ही जास्त असल्यावर दहिवर पुष्कळच पडेल हे सांगणे नको.

 झाडांपासून थंडी व वाफ उत्पन्न होऊन ती दहिंवर पडण्यास कांहीं अंशी कारणीभूत होतात, परंतु ह्यांशिवाय झाडांमध्ये तिसरा एक गुण आहे. त्याच्या योगाने दहिंवर पडण्यास फारच साहाय्य होते. तो गुण कोणता ते आतां पाहूं.

 उन्हाळ्यामध्ये दहिंवर कां पडत नाहीं व हिंवाळ्यामध्येच का पडते ह्याविषयी प्रथमतः विचार करू. मागे पावसाची उपपत्ति सांगते वेळीं शामदानाचा प्रयोग करून सिद्ध करून दाखविलेच आहे

कीं, हवेमध्ये नियमित उष्णता असतां नियमितच वाफ राहू श
९५

कते. व विरण्याची परमावधीची स्थिती प्राप्त झालेल्या हवेला जास्त थंडी लागली असतां हवेमधील वाफेचे पाणी होते. पावसाळा संपल्यावर हवेमध्ये जी वाफ असते ती हवेची विरण्याची परमावधीची स्थिति करण्यास फारच कमती असते. उन्हाळ्यांत तर हवेतील उष्णता फारच जास्त असल्यामुळे हवेची तशी स्थिति होणे फारच दुरापास्त असते. मग थंडीच्या दिवसात तरी अशी स्थिति होते की काय ? थंडीच्या दिवसांतसुद्धा हवेची अशी स्थिति एकसहा क्वचितच होते. अशी स्थिति जर होईल तर मग थोडी जास्त थंडी पडली असतां पाऊसच पडेल. पण पावसाचे रूपाने हवेतील वाफेचे जे पाणी होते, त्यास आपण दहिंवर म्हणत नाहीं. तर मग पाऊस व दहिंवर यांत भेद काय ? विवक्षित स्थळीं बऱ्याच उंचीवरून एकसारखे जेव्हां पाण्याचे बिंदु खाली पडतात, तेव्हां त्यास आपण पाऊस म्हणतो. दहिंवर दोन तऱ्हेनें पडते. विवक्षित स्थळी हवेमध्ये वाफेचा संचय विशेष असून थंडी कडक पडली तर जमिनीशी सँँल्लग्न झालेली हवा कुंद होऊन वाफेचे दाट धुकें बनते व त्यामधून पाण्याचे फार बारीक तुषार मंद गतीने जमिनीवर पडतात, व विशिष्ट पदार्थांवर तर ते फारच पडतात. दुसरा प्रकार म्हणजे धुके बिलकुल नसतां, अगर असले तरी अगदी पातळ असून हवेमध्ये जलबिंदु न बनतां विवक्षित पदार्थावर मात्र ते उत्पन्न होतात हा होय. दोन्ही प्रकारांत पाण्याचे बिंदु उंचीवरून न पडतां जमिनीशी सँँल्लग्न झालेल्या हवेंतून उत्पन्न

होतात. दोहोंतही दंव पडण्याचे विशेष ठिकाण म्ह
९६

णजे विशिष्ट पदार्थ होत. ह्यावरून हे उघड होते की, दहिंवर पडण्यास वाफेची एकसहा विरण्याची परमावधीची स्थिति होण्याची जरूरी नाहीं; विवक्षित पदार्थांशी सँँल्लग्न असलेल्य हवेची तशी स्थिति झाली असतां पुरे आहे.

 चुलीवर कांहीं पदार्थ शिजतांना त्याजवर थंड भांडे झांकण घातले तर त्याचे बुडास जो घाम येतो, ते एक प्रकारचे दहिंवरच म्हणावयाचे. पदार्थ शिजतांना जी त्यांतून वाफ निघते ती वरील थंड भांड्यास लागून तिचे पाणी होते. तसेच दमट लाकडे चुलीमध्ये घालून वर पाणी तापविण्यास ठेविले असतां, आरंभीं भांड्याचे बुडापासून घामाचे थेंब पडून विस्तव अधिकाधिक विझतो, व त्या योगाने वरील भांडे गळते की काय असा संशय येतो, हेही एक प्रकारचे दहिंवरच म्हणावयाचे. दमट लाकडांतील ओलाव्याची वाफ होऊन ती वर जाते, व तिला थंड पाण्याचे भांड्याचा संसर्ग झाला म्हणजे तिचे पुनः पाणी होते. आरशावर अगर घासलेल्या चकचकीत भांड्यावर तोंडांतील वाफ टाकिली असता ती मंद दिसतात, याचेही कारण वर सांगितलेलेच होय.

 हिंवाळ्यामध्ये वाफेचा संचय नियमित असतो, म्हणून तिचे पाणी करणे झाल्यास थंडीचीच अवश्यकता आहे. स्वाभाविकपण इतकी थंडी प्राप्त होण्यास कांहीं ठिकाणे अगर पदार्थ यांतील उष्णतेचे परावर्तन होऊन ते आपोआप निवले पाहिजेत. ह्याशिवाय ही ठिकाणे व पदार्थ अधिक थंड होण्यास दुसरे साधन नाही.

उन्हाळ्यामध्ये सूर्यापासून उष्णता जास्त प्राप्त होते, व रात्रीपेक्षांं 
९७

दिवस मोठा असल्यामुळे दिवसां जितकी उष्णता सूर्यापासून आपणांस मिळते, तितकी उष्णता परावर्तन पावून रात्रीं नाहींशी होत नाहीं; म्हणजे पृथ्वी अगर पृथ्वीवरील पदार्थ जे दिवसां तापतात, ते रात्रीं निवून फार थंड होत नाहींत. म्हणून उन्हाळा लागला म्हणजे दिवसानुदिवस उष्णता जास्तच होते, यास्तव दहिंवर पडत नाहीं. तथापि, उन्हाळ्यांतसुद्धां कृतीने आपणांस दहिंवर पाडतां येते. एक काचेचा प्याला बाहेरून अगदी कोरडा करून आंत बर्फ घालून हवेमध्ये क्षणभर ठेविला असतां त्याच्या बाहेरच्या पृष्ठभागावर पाण्याचे बिंदु उत्पन्न होतील. ह्याचे कारण हेच कीं, बर्फाचे योगाने काचेच्या प्याल्याची उष्णता इतकी कमी होते की, प्याल्याशीं संसर्ग झालेल्या हवेची विरण्याची परमावधीची स्थिति होऊन तींतील वाफेचे पाणी होते. परंतु, स्वाभाविकरीत्या उन्हाळ्यांत इतकी थंडी उत्पन्न होत नाही, म्हणून उन्हाळ्यांत दहिंवर पडत नाहीं.

 हिंवाळ्याची स्थिति अगदी निराळी आहे. म्हणजे ह्या दिवसांमध्ये सूर्यापासून उष्णता इतकी प्राप्त होत नसून दिवसापेक्षा रात्र मोठी असते. म्हणून दिवसां जी थोडीशी उष्णता प्राप्त होते, तिला परावर्तन पावून नाहींशी होण्यास पुष्कळ अवधि सांपडतो. म्हणजे पृथ्वी अगर पृथ्वीवरील पदार्थ जे दिवसां थोडेसे तापतात, त्यांस निवण्यास रात्री पुष्कळ वेळ मिळाल्यामुळे ते पुष्कळच थंड होतात. मग हिंवाळ्यामध्ये सर्वच पदार्थांशी संसर्ग झालेल्या

हवेतील वाफेचे दहिंवर व्हावे, परंतु तशी स्थिति आपल्या दृष्टीस 
९८

पडत नाहीं; कांहीं पदार्थावर मात्र दहिंवर पडते, व कांहींवर बिलकुल पडत नाही. यावरून उघड होते की, हिंवाळ्यामध्ये सुद्धां दहिंवर पडण्याइतके सर्वच पदार्थ निवून थंड होत नाहींत. कांहीं विशिष्ट पदार्थ मात्र इतके थंड होतात की, त्यांजवर दहिंवर पडते.

 आतां, ज्या पदार्थांवर दहिंवर पडते असे पदार्थ कोणते तें पाहूं. कित्येक पदार्थ उष्णतेचे वाहक असतात व कित्येक उष्णतेचे अवाहक असतात. तथापि, जे पदार्थ अवाहक आहेत त्यांमधून उष्णता बिलकुल जात नाहीं असें नाहीं. इतकेच की, ती फार सावकाश जाते. व जे उष्णतावाहक पदार्थ आहेत, त्या सर्वांमधूनही उष्णता सारख्याच त्वरेनें जाते असे नाहीं. काही पदार्थांमधून लौकर जाते, व कांहींमधून त्यांपेक्षां सावकाश जाते. म्हणून पदार्थांचे शीघ्रवाहक व मंदवाहक असे दोन भेद मानिले तरी हरकत नाहीं.

 आतां, ज्या पदार्थांमधून उष्णता लौकर जात नाहीं, ते लौकर तापतही नाहींत. लोकर, केंस, कापूस, लाकूड ही द्रव्ये अवाहक होत. म्हणून ह्यांस उष्णता लाविली असतां तीं लौकर तापत नाहींत. तसेच, सर्व धातु उष्णतेचे फार अवाहक आहेत. म्हणून त्यांस उष्णता लाविली असतां ते लौकर तापतात. लोखंडाच्या पळीचे एक टोंक चुलीमध्ये घातले असतां दुसरें शेवट लागलीच तापेल. परंतु चुलीमध्ये लाकडे जळत असतात, ती एका

बाजूने जरी जळत असतात, तरी जळत्या भागापासून जवळच 
९९

जरी हात लाविला, तरी ते लाकूड ऊन लागत नाहीं. लोखंडाची पळी ही उष्णतेची वाहक आहे, म्हणून तिजला उष्णता लाविली असतां ती लौकर तापते; आणि लाकूड अवाहक असल्यामुळे ते लौकर तापत नाहीं. आधणाच्या पाण्यामध्ये पळी व लाकूड हीं कांहीं वेळ ठेवावीं, नंतर त्यांस हात लावून पहावे; पळी इतकी तापते की, तिला हात लाववत सुद्धा नाहीं, परंतु लाकूड फारसे तापलेले नसून थोडेसे गरम मात्र लागते.

 कोणत्या वस्तु वाहक आहेत व कोणत्या अवाहक आहेत हें साधारणतः त्यांस हात लावून पाहिल्याने समजते. सकाळींच कित्येक वस्तूस हात लाविला असतां कांहीं फार गार लागतात, व कांहीं गरम लागतात. उदाहरणार्थ, धातूच्या भांड्यांस हात लाविला असतां तीं फार थंड लागतात, व लोकरीच्या वस्त्रांस हात लाविला असतां तीं गरम लागतात. वास्तविक पाहतां दोन्ही प्रकारच्या वस्तु थंडीमध्ये फार वेळ पडलेल्या असतात. तेव्हां एक वस्तु थंड व एक गरम होण्यास कांहींच कारण नाहीं. मग एक थंड कां व दुसरी गरम कां ? अमुक एक पदार्थ जास्त उष्ण किंवा जास्त थंड ह्याची खरी परीक्षा आमचे स्पर्शेद्रियास होत नाहीं. ही परीक्षा उष्णतामापकयंत्रानेच केली पाहिजे. वरील दोन्ही पदार्थांची उष्णता उष्णतामापकयंत्राने मोजिली असतां सारखीच भरेल. मग आपले हातास एक उष्ण व एक थंड असा कां भास व्हावा ? तर ह्याचे कारण इतकेंचे कीं, धातूच्या भांड्यास आपण

हात लाविला असतां धातु उष्णतेचे शीघ्रवाहक असल्यामुळे 
१००

आमच्या हातांतील उष्णता झटदिशीं ओढून घेतात, त्यामुळे आपणांस थंडीचा भास होतो. परंतु लोकरीवर हात ठेविला असतां,

ती अवाहक असल्यामुळे आमचे हातांतील उष्णता ओढून घेत 

नाहीं, म्हणून ती गरम आहे असे आपणांस वाटते.

 ह्याचप्रमाणे, जो पदार्थ उष्णतेचा वाहक असतो तो निवतोही लौकर व जो अवाहक असतो तो लौकर निवतही नाहीं. धातूचे भांडे तापतेही लौकर आणि ते तापून थोडा वेळ थंड हवेत ठेविलें कीं, लागलींच थंड होते. पाणी तापण्यासही फार उशीर लागतो; व ते तापवून थंड हवेत ठेविलें असतां, लौकर निवतही नाहीं. वाहक पदार्थ आहेत तेच थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी अवाहक पदार्थांपेक्षा जास्त निवतात, म्हणजे जास्त थंड होतात. अशा पदार्थांपैकी जे पदार्थ दंव पडण्याइतके थंड होतात, त्याजवर दंव पडते. झाडे हीं अशीं लौकर निवणारी आहेत. झाडांच्या ह्याच धर्मामुळे त्यांजवर दहिंवर जास्त पडते.

 आपण थंडीच्या दिवसांत नेहमी पाहतों कीं, लाकूड, धोंडे, माती यांवर दहिंवर सहसा पडलेले नसते. परंतु गवत, लहान झाडे व मोठमोठाली झाडांची पाने यांवर दहिंवर विपुल पडलेल असते. जंगलांत झाडे विपुल असल्यामुळे इतर ठिकाणांपेक्षां जंगलांत किती दहिंवर पडते हे कित्येकांस अनुभवावरून माहीत असेलच. ह्यावरून देशामध्ये झाडांची संख्या जितकी जास्त असेल

तितकें दहिंवर जास्त पडेल, हे उघड झाले. 
१०१
जमिनीचे बंधन

 झाडांपासून दुसरा एक महत्त्वाचा उपयोग आहे. तो हा की, नद्या, नाले ह्यांस पूर येऊन त्यापासून जे नुकसान होते, ते झाडे लाविल्याने बंद होते. एकाद्या उच्च जागेवर झाडे नसली म्हणजे त्या ठिकाणी पावसाचे जे पाणी पडते, त्यास कांहीं अटकाव न झाल्यामुळे त्यास त्या जागेमध्ये मुरण्यास अवधि न सांपडून ते एकदम सोसाट्याने वाहात लागलीच खाली येते. ह्यामुळे टेकड्या, डोंगर, पर्वत वगैरे उच्च जाग्यावर जी माती असते, तिला कांहीं आधार नसल्यामुळे पाण्याच्या जोरासरशीं तीही खालीं वाहात येते. अशा रीतीने उत्तरोत्तर डोंगरावरची माती नाहीशी होत जाऊन खडक इतका उघडा पडतो की, जमिनीमध्ये थोडेसुद्धां पाणी जिरण्यास मार्ग रहात नाहीं. ह्यामुळे तो डोंगर इतका नापीक होतो कीं, पुढे त्यावर गवतसुद्धा उगवत नाहीं. मग झाडझाडोऱ्याचें नांवसुद्धां घ्यावयास नको. बरें, हें पाणी डोंगराचेंच नुकसान करून राहते तरी कांहीं बरें; परंतु तसे होत नाहीं, तें आणखी नुकसान करिते. उच्च जागेवरून एकदम पाणी वाहून आलें म्हणजे नद्या, नाले, यांस मोठमोठाले पूर येऊन कित्येक पूल, रस्ते, घरेदारें, शेते यांची फारच नासाडी होते. तसेच, डोंगरावरून जी माती वाहून येते, तिच्या योगाने डोंगराचेंच नुकसान होते असे नाहीं; त्या मातीबरोबर डोंगरावरील लहानसहान धोंडेही खालीं वाहून येतात व मोठमोठाल्या धोंड्यांखालचीसुद्धा

माती वाहात जाऊन त्यांस धर नाहींसा होतो, व ते गडबडत 
१०२

खाली येतात. मग अशा उच्च स्थानाच्या पायथ्याशी जी शेते असतील त्यांची दशा कशास विचारावयास पाहिजे !! पिके जर असतील तर ती लागलीच दबलीं जाऊन दगडांची व मातीची वर भर पडावयाची. तसेंच, पाण्याच्या जोराच्या प्रवाहाने कित्येक ठिकाणी शेतांतील माती वाहून जाऊन मोठमोठाले चर पडावयाचे ! व थोडेच वर्षांत पूर्वी तेथे शेत होते की नाही ह्याचा पत्ता लागावयाचा नाहीं !! तसेच, त्या डोंगरावरचे पाणी एकाद्या तळ्यास जाऊन मिळावयाचे असल्यास, व तळे नजीक असेल तर त्यामध्ये ही वरील माती, रेती, धोंडे वाहात जाऊन तळ्याचा तास लौकर भरून जाईल. व कांहीं वर्षांपूर्वी ज्या तळ्यामध्ये विपुल पाणी रहात असे, ते राहण्यास जागा नसल्यामुळे ते तळे निरुपयोगी होईल. तसेच, नद्यांचे व नाल्यांचेही तास पहिल्यापेक्षा जास्त भरून जातील. खाड्यांचे तास अशा रीतीनें भरून गेले म्हणजे जेथपर्यंत पूर्वी मोठमोठालीं गलबते येत होती तेथे लहान होड्यासुद्धा येण्याची पंचाईत पडते. अशा तऱ्हेचा बोभाटा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वत्र ऐकू येतो. अशा रीतीनें डोंगरांवर झाडे नसली म्हणजे अनेक प्रकारचे नुकसान होते. तेच डोंगर जर झाडांनी आच्छादित असले तर हे वरील सर्व प्रकारेच नुकसान होण्याचे बंद होते. मुख्यतः हे सर्व नुकसान डोंगरावर पडलेले पाणी एकदम वाहून गेल्याने होते. परंतु डोंगरावर झाडे असतील, तर त्या योगाने डोंगर पोकळ होऊन

पडलेले पाणी पुष्कळ अंशीं जिरते. व जे पाणी वाहून जाते त्यास 
१०३

झाडांच्या बुंध्याचा अटकाव झाल्यामुळे ते एकदम सोसाट्याने वाहात जात नाहीं. मग अर्थातच डोंगरावरील माती व लहानमोठे दगड हेही वाहून जात नाहींत. शिवाय झाडांच्या मुळांच्या योगाने माती, धोंडे वगैरे जणू काय बांधली गेली असतात त्यामुळे तीं घसरून येत नाहींत.*

 नदी, नाले यांच्या कांठच्या जमिनी फार मूल्यवान् असतात. परंतु त्यांच्या कांठांवर झाडे नसली, तर जमिनी पाण्यांत ढांसळून वाहून जाण्याचा संभव असते. म्हणून किनाऱ्यावर झाडे लाविली असता त्यांच्या मुळांनी जमीन बांधली जाऊन नुकसान होण्याचे टळते.

वादळास प्रतिकार.

 झाडांच्या योगाने, दुसऱ्या एका प्रकाराने मोठमोठे पूर येऊन नुकसानी होण्याचे टळते. डोंगर, माळजमिनी वगैरेवर झाडी नसून ती अगदीं उघडी असतील व हवा साधारण रुक्ष

-----

 *फ्रान्स देशांत ऱ्होन नदीस वारंवार पूर येऊन फार नासाडी होते. याचे कारण जंगलाचा नाश होय, हे सर्वत्र प्रसिद्ध आहे. अशा तऱ्हेचे पूर येऊन नासाडी न होण्यास काय उपाय योजावे, म्हणून वाटाघाट चालून नदीच्या सर्व खोऱ्यांंस बांधारे घालावे असे ठरले. परंतु या कामास खर्च किती लागेल ह्याचा अंदाज करण्यासाठी फ्रेंच इंजिनियरांनी पतकर घेऊन पाहिले तों जगांतील सर्व पैसा खर्च केला तरी हे काम व्हावयाचे नाही, असे त्यांच्या नजरेस आले. नंतर त्या ठिकाणी झाडे

लावावी असे ठरून त्याप्रमाणे काम सुरू झाले. 
१०४

असेल, तर विद्युत् उत्पन्न होऊन ढगांच्या आंगीं एकाच जागी जमण्याचा कल येऊन वादळ होते. व त्या योगाने एकाच जागी अतिशय पाऊस पडून पूर येतात व त्यापासून वर सांगितल्याप्रमाणे नुकसान होते. अल्पवृष्टीचा जो दुसरा प्रदेश त्यांत अशी स्थिति वारंवार आढळण्यांत येते. असा प्रदेश झाडांनी आच्छादित असला म्हणजे त्यापासून हवेमध्यें चोहींकडे ओलावा मिसळून वरून ढग जाऊ लागले म्हणजे त्यांचे लागलीच पाणी होऊन ते हलके हलकें खाली पडते. ढग एकाच जागी पुष्कळ जमून राहण्यास त्यांना अवधि सांपडत नाहीं. व झाडांच्या योगाने पाऊस चोहींकडे सारखा वांटला जातो.

खताची उत्पत्ति

 खताची उत्पत्ति, हा झाडांपासून फार महत्त्वाचा उपयोग आहे. सर्व झाडांची पाने दर वर्षी एकदां सर्व गळून पडतात, व त्यांस नवीं पाने येतात. पाने गळून पडण्याच्या संबंधाने झाडांचे दोन वर्ग आहेत. कांहीं झाडांची पाने एकदम सर्व गळून पडतात व त्यामुळे झाडे कांहीं दिवसपर्यंत अगदी खराट्यासारखी दिसत असतात, व नंतर त्यांस नवी पालवी फुटते. दुसरीं कांहीं झाडे अशी आहेत की, त्यांची पानें थोडथोड़ीं गळून पडतात; व नवी पालवी येण्याचे कामही त्याबरोबरच चालू असते. यामुळे ही झाडे खराट्यासारखी झालेली कधीच दिसत नाहींत; सदोदीत पानांनी

युक्त अशीच दिसत असतात. परंतु सर्व पाने वर्षातून एकदां गळू 
१०५

न पडलीच पाहिजेत; तसेच, वर्षातून एक वेळां तरी झाडांस फुलें व फळे येऊन तीही गळून पडत असतात.

 झाडांच्या स्थूलमानाने पाहिले असता, त्यांची पाने व फळे हा त्यांचा बराच मोठा भाग आहे. आंब्यासारख्या कित्येक झाडांस फळे इतकीं येतात की, त्यांच्या योगानें फांद्या कित्येक वेळां मोडून पडतात. अशा रीतीने आपणांस झाडांपासून दर वर्षास त्यांच्या वजनाच्या मानाने बऱ्याच वजनाची पाने व फळे प्राप्त होतात. प्रत्येक मध्यम प्रतीच्या आंब्याच्या झाडाची पाने दर वर्षास पन्नास पौंड मिळतात असे धरूं, व दर एकरास सरासरीच्या मानाने १० झाडे धरूं. म्हणजे दर वर्षास एक एकर जमिनीमध्ये ५०x१०= ५०० पौंड वजनाचीं फक्त पानें निघतात.

 हीं पाने व फळे कुजून जे खत उत्पन्न होते ते उत्तम प्रतीचे होय. खनिज खतापेक्षा सेंद्रिय खताची मातब्बरी जास्त आहे. शिवाय झाडांच्या पानांमध्ये पोट्याश व सोडा ह्यांच्या क्षाराचेही प्रमाण पुष्कळ असते. आणि हे क्षार पिकांस फार जरूरीचे असतात. पानांमध्ये पोट्याश क्षाराचे प्रमाण इतके असतें कीं, पाने जाळून त्यांच्या राखेपासून पुष्कळ पोट्याश तयार करतात. झाडांच्या लाकडापासून खत तादृश प्राप्त होत नाही. कारण, लाकडामध्ये सेंद्रिय द्रव्ये फारच थोडी असतात, व कार्बन ( कोळसा ) याचेच विशेष प्रमाण असते. झाडे हा कार्बन जमिनीच्या द्वारे आपल्या पोषणास घेऊ शकत नाहींत. कार्बन जो झाडांस लागतो तो ती

हवेमधून घेतात. ह्याशिवाय लाकूड लौकर कुजत नसल्यामुळे 
१०६

त्याचे खत लवकर होत नाहीं; म्हणून ते जाळून त्याची राख खतास घातली पाहिजे. परंतु लाकडापासून राख फारच थोडी उत्पन्न होते. मुख्य खत उत्पन्न होण्यास पानेच उपयोगाची आहेत, व तीही विपुल उत्पन्न होत असतात.

 दुसरा असा एक चमत्कार दृष्टीस पडतो की, ज्या दिवसांमध्ये आपणांस खताची जरूर असते त्याच सुमारास बहुतेक झाडाची पाने गळून पडतात. आमची खरिपाचीं व रबीचीं सर्व पिके माघ मासीं बहुतकरून खलास होतात. व पुढील सालचे बरसातीकरितां लोक पुनः चैत्रवैशाख मास जमिनी नांगरून खते घालून तयार करून ठेवितात. झाडांची पानेही माघफाल्गुनमासी गळून पडत असतात. चैत्र महिन्यांत नवीन पालवी फुटत असते. तथापि, कित्येक झाडांची पानें चैत्रांतसुद्धां गळून पडत असतात. जणू काय, खतास उपयोगी पडावे म्हणूनच हंगामशीर थोडा अगोदर झाडे आपली पाने टाकून देतात. झाडांची पाने वर्षातून जीं एक वेळां गळून पडतात ती खतास उपयोगी पडावे म्हणून पडतात, असा सृष्टिनियमच दिसतो.

 हीं जीं पाने आपणांस मिळतात ती आपणांस व्याजादाखल मिळत असतात. मुद्दल जी झाडे ती कायमच असतात. गवत व लहान लहान झाडें कुजूनसुद्धा चांगले खत उत्पन्न होते. परंतु त्यापेक्षाही मोठाल्या झाडांच्या पानांचे खत उत्तम असते. कारण, गवताच्या व लहान लहान झाडांच्या मुळ्या जमिनीच्या

पृष्ठभागापासून फार खोल उतरत नाहींत; म्हणून त्यांच्या पोषणास 
१०७

जी द्रव्ये लागतात, ती जमिनीमधून उत्तरोत्तर कमी कमी होत जातात. मग अर्थातच अशा जमिनीवर गवत व इतर लहान झाडे चांगलीं पोसत नाहींत व पोसली तरी त्यांमध्ये पोषक द्रव्ये फार कमी प्रमाणाने असतात. आतां, ही गोष्ट खरी कीं, गवत व इतर लहान झाडे कुजून जागच्या जागीच राहिली तर त्या जमिनीवर पुनः गवत व तशाच प्रकारची झाडे चांगली उगवण्यास व्यत्यय येणार नाही. मोठाल्या झाडांची गोष्ट अगदी भिन्न आहे. ह्या झाडांच्या मुळ्या जमिनीमध्ये पुष्कळच खोल जातात. व जमिनीमध्ये खोल जीं पोषक द्रव्ये असतात ती आपल्या मुळ्यांंच्या द्वारे वर आणितात. अशा प्रकारे जमिनीच्या पोटामधील पोषक द्रव्यें पृष्ठभागावर आणण्यास झाडांवांचून दुसरे साधन नाहीं. शेतामध्ये आपण आज हजारों वर्षे तीच तीच धान्ये पेरीत आलो आहों. त्या धान्याचा दाणा व वैरण हीं उत्पन्न होण्यास जी द्रव्यें अवश्य आहेत ती सर्व आपणांस जमिनींतून प्राप्त होतात. ही द्रव्यें हजारों वर्षे जर आपण जमिनींतून काढीत आलो आहों, तर ती उत्तरोत्तर नाहींतशी होत गेली पाहिजेत. ज्या मातींतील कस ( म्हणजे हीं पोषक द्रव्यें ) नाहींसा झाला आहे अशी माती दूर करून तिचे जागी नवी माती घालावयाची हा नांगरण्याचा मुख्य हेतु आहे. परंतु फार चांगल्या नांगरानेसुद्धा एक हातापेक्षा जास्त खोल माती खालींवर केली जात नाहीं. सारांश, पृष्ठभागापासून एक हातापर्यंतची खोल

माती कांहीं वर्षांनीं तरी निस्सत्त्व झाली पाहिजे. म्हणून धान्य पेरून 
१०८

कडबाकाडी व दाणा ह्या रूपाने आपण जी द्रव्ये जमिनींतून काढितो त्या योगाने जमीन दिवसानुदिवस अधिकाधिक निस्सत्त्व होत जाते. ह्याकरितां, जी कडबाकाडी निघते ती होईल तितकी कुजवून पुनः शेतास घालावी, असा कृषिकर्मशास्त्रांतील नियम आहे. परंतु, तसे केले तरी दाण्यांच्या द्वारा आपण जी पोषाक द्रव्ये काढून घेतों तीं उत्तरोत्तर जमिनीतून कमी झालीच पाहिजेत. व कडबाकाडी अशा रीतीने कुजवून शेतास घातली तर गुरास चाऱ्याची पंचाईत येऊन पडेल, म्हणून अशा थोड्याफार निस्सत्त्व झालेल्या जमिनीत पोषक द्रव्ये अधिक खोल जमिनीतून काढून घालणे झाडांवांचून इतर सुलभ रीतीनें करितां येत नाहीं. हा झाडांपासून शेतकीस मोठा फायदा आहे.

 खोल जमिनींतील पोषक द्रव्ये पानांच्या द्वारा वर आणून टाकणे ह्या धर्माने व झाडे आपल्या मुळ्यांच्या यांत्रिक शक्तीनें, जंगलांतील जमीन उत्तरोत्तर अधिक पोषक द्रव्यांनी युक्त करीत असतात, व मातीची उत्पत्ति करून ती वाढवीत असतात. ज्या डोंगरावर अगर खडकावर माती विशेष नाहीं, अशा जागेवर लहान लहान झाडे व गवत हीं पाहिल्याने लाविल्याने पाऊस व हवा ह्यांच्या व्यापाराने खडकाचे यांत्रिक पृथक्करण होऊन त्याचे बारीक बारीक कण सुटून जी माती तयार होते ती झाडे व गवत आपल्या मुळ्यांच्या योगाने बांधून ठेवितात. व झाडांची मुळे ही भक्ष्याच्या शोधार्थ फिरत असतां, खडकाचे यांत्रिक पृथक्करण थोडे अंशी करीत असतात.

अशा रीतीने मातीची वाढ होऊन ती जमीन मोठाल्या 
१०९

झाडांच्या उत्पत्तीस लायक होते. व तिच्यावर मोठी झाडे उत्पन्न झाली म्हणजे त्यांची पाने दर वर्षी गळून पडून तीं व बारीकसारीक वनस्पति ही दोन्ही मिळून कुजून जंगलांतील जमिनीवर थरांचे थर बसत असतात. जंगलचे जमिनींत झाडांची पानें कुजून उत्तम खत होते ही गोष्ट आपले लोकांस चांगली माहीत आहे. कोंकणामध्ये डोंगराचे पायथ्याशीं ज्या भातजमिनी असतात त्यांमध्ये आरंभीचे पावसाने डोंगरावरील मळी वाहून येऊन बसते व तिजमुळे त्या ठिकाणीं भात उत्तम पिकते हें सुप्रसिद्ध आहे.

 झाडे परंपरेनेही शेतास जास्त खत मिळण्यास कारणीभूत होतात. शेतास निरिंद्रिय खतांपेक्षां सेंद्रिय खते चांगलीं. व त्यांतही जमिनींतून ज्या जातीची द्रव्ये आपण काढून घेतों त्या जातीची द्रव्ये ज्यां खतांत आहेत ती द्रव्ये उत्तम. धान्याचे काडकडब्यांत असणारी द्रव्ये पुष्कळ अंशीं गुरांचे शेणांत असतात; म्हणून शेण हे उत्तम खतांपैकी एक खत होय. परंतु कित्येक प्रांतांमध्ये जळाऊ लाकडांची कमताई असल्यामुळे, लोक निरुपायास्तव शेणाच्या गोवऱ्या करून सर्पणाचे ऐवजी जाळतात व त्या योगाने शेतास जे एक उत्तम खत मिळावयाचें तें नाहींसें होतें. ही स्थिति बहुतकरून आपल्याकडे देशांत आहे. इकडे झाडे पुष्कळ झाली असतां लोकांस स्वस्त सर्पण मिळून शेणाचा खताकडे सहज

उपयोग होईल. 
११०
हवेची शुद्धि.

 हवेची शुद्धि हा झाडांपासून आणखी एक उपयोग आहे. हवा ही मुख्यत्वें दोन वायूंची झालेली आहे. ऑक्सिजन व नैत्रोजन हे दोन वायु हवेमध्यें यांत्रिक रीतीने नियमित प्रमाणानें मिसळलेले असतात. नैत्रोजन हा निर्व्यापार वायु आहे. ऑक्सिजन हाच काय तो उपयोगी वायु आहे. हा वायु घाणीचा नाशक आहे. हा फार तीव्र असल्यामुळे घाणींतील सेंद्रिय द्रव्यांशी रसायनरीत्या संयोग पावून त्या द्रव्यांचे ऑक्साईड बनवितो. व हे ऑक्साईड निरुपद्रवी असतात.

 विहिरीच्या पाण्यापेक्षां नदीनाल्यांचे पाणी पिण्यास चांगले म्हणून जी आपणांत म्हण आहे, त्याचे कारण हेच की, विहीरीच्या पाण्याशीं सेंद्रिय द्रव्ये मिश्र असतात. त्यांचे शुद्धीकरण करण्यास पुरेसा ऑक्सिजन त्या पाण्यास मिळत नाही. कारण, विहिरीचे पाणी स्तब्ध असून त्याचा थोडाच भाग ऑक्सिजन वायूशी सँलग्न असतो. त्यामुळे पृष्ठभागाच्या पाण्याचे मात्र शुद्धीकरण होतें, परंतु बाकीचे पाणी तसेच अशुद्ध राहते. नदीनाल्यांच्या पाण्याचा पुष्कळ पृष्ठभाग हवेशी संलग्न असतो व शिवाय पाणी नेहमीं वाहात असल्यामुळे वरचेवर निरनिराळा पृष्ठभाग हवेशी संलग्न होतो. त्यामुळे सर्व पाण्याशीं वायूचा संपर्क होऊन पाणी शुद्ध होते. शिवाय विहिरीवरची हवा कोंडलेली असल्यामुळे तिजमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण कमी असते. व नदीनाल्यांवरची हवा उघडी असल्यामुळे

तिजमध्ये ह्या वायूचे प्रमाण जास्त असते. 
१११

 ऑक्सिजन वायूच्या ह्या धर्मानें प्राण्याचे शरिरांतील रक्ताची शुद्धि नेहमी होत असते. आपल्या शरिरांतील रक्ताचे शुद्धीकरण करणे हा श्वासोच्छवास करण्याचा आपला उद्देश होय. प्रत्येक श्वास आंत घेण्याचे वेळी आपण जी हवा ओढून घेतों ती आपल्या फुप्फुसामध्यें जाते, व रक्ताभिसरणाने काळजामध्यें जें अशुद्ध काळे रक्त येते त्याबरोबर हवेतील ऑक्सिजन वायु रसायनरीत्या संयोग पावून ते रक्त शुद्ध करितो. व हे शुद्ध झालेले रक्त शरीरपोषणार्थ पुनः शरिरामध्यें जाते. रक्ताची शुद्धि करीत असतांना अशुद्ध रक्तातील कार्बन द्रव्याशीं ऑक्सिजन वायु संयोग पावून कार्बानिक आसिड वायु तयार होतो. आणि हा वायु आपण उच्छवासाचे वेळीं-म्हणजे श्वास बाहेर टाकण्याचे वेळीं-बाहेर टाकितो. ही रक्तशुद्धाची क्रिया आपल्या प्रत्येक श्वासोच्छवासाचे वेळीं चाललेली असते. म्हणून श्वासोच्छवास करण्यास आपणांस शुद्ध हवा पाहिजे आहे. शुद्ध हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते, म्हणून अशा हवेनें रक्ताची शुद्धि चांगली होते. एकाद्या अगदी कोंडलेल्या खोलीमध्ये आपण पुष्कळ वेळ बसलो तर त्या खोलींतील हवेतला ऑक्सिजन वायु प्रत्येक श्वासोच्छासाचे वेळीं कमी कमी होत जाऊन कार्बनिक आसिड वायूचे प्रमाण वाढत जाईल. ह्या योगाने श्वासाबरोबर आपण जी हवा फुप्फुसांत वेतों तिजमध्ये ऑक्सिजन वायु फार थोडा राहील व रक्ताची शुद्धि चांगली होणार नाही.

कार्बनिक आसिड वायूचे प्रमाण हवेमध्ये वाढत चालले 
११२
म्हणजे फक्त रक्ताची शुद्धी होत नाहीं इतकेच नव्हे, तर हा वायु

विषकारक असल्यामुळे शरिरास अपायकारक होतो. कोट्यवधि प्राणी उच्छासाबरोबर जो कार्बानिक आसिड वायु बाहेर टाकितात तो जर हवेमध्ये तसाच राहील, तर कोंडलेल्या खोलींतील हवेच्या स्थितीप्रमाणेच पृथ्वीवरील सर्व हवेची स्थिति होईल, व प्राण्यांच्या रक्ताची शुद्धि होणार नाहीं. इतकेच नव्हे, तर १०० भाग हवेत पांच भागपर्यंत कार्बानिक आसिड वायूचे प्रमाण वाढले म्हणजे असल्या हवेत कोणताही प्राणी जगणार नाहीं.

 वरील विवरणावरून हवा शुद्ध असणे हें, किती महत्त्वाचे आहे. हे दिसून येईल. शुद्ध हवा म्हणजे तिजमध्ये कार्बानिक आसिड वायूचे प्रमाण अगदी कमी व ऑक्सिजन वायूचे फार. कार्बानिक आसिड वायु हा कार्बन व ऑक्सिजन ह्यांचा बनलेला असता. ह्या वायूमधून ऑक्सिजन वायु मोकळा करण्याची क्रिया झाडे सूर्याच्या तेजाच्या साह्याने करीत असतात. तीं कार्बनिक वायु आपले पोषणास घेऊन ऑक्सिजन वायु मुक्त करीत असतात. ह्यामुळे हवेतील ऑक्सिजन वायूचे प्रमाण पूर्ववत् होत असते. अशा रीतीने झाडे हवेची शुद्धता करीत असतात.

 हवेच्या शुद्धीकरणाची क्रिया झाडे दिवसां मात्र करीत असतात. रात्रीं तीं थोडा ऑक्सिजन वायु हवेतून ओढून घेऊन कार्बानिक आसिड वायु बाहेर टाकतात. त्यामुळे रात्री झाडांजवळील हवेमध्ये ह्या वायूचे प्रमाण जास्त असल्यामुळे हवा अशुद्ध असतें. झाडाखालीं रात्रीं निजू नये, म्हणून जी आपल्यांत म्हण आहे ती

याच कारणामुळे पडली असावी असे वाटते. 
११३

झाडे आणखी एका रीतीनें शुद्धीकरणाची क्रिया करीत असतात. मनुष्यांची वस्ती जेथे जेथे आहे, तेथे तेथे अनेक कारणांनी घाणीचे पदार्थ पडलेले असतात. ह्या पदार्थांवर पाणी पडले असतां घाण पाण्यामध्ये विरून ती जमिनीमध्ये मुरते; व आसपास तळीं, विहिरी असतात त्यांत झिरपून जाऊन त्यांतील पाणी अपायकारक करिते. परंतु अशा जागेवर झाडे असल्यास तीं वरील द्रव्ये आपल्या पोषणास शोषून घेऊन जमिनीत मुरलेले पाणी शुद्ध करितात.

 प्राण्यांच्या श्वासोच्छवास-क्रियेने हवेमध्ये उत्पन्न झालेल्या कार्बानिक आसिड वायूचे पृथक्करण करून झाडे हवा शुद्ध करितात. ह्या क्रियेवरून झाडांचा व प्राण्यांचा विलक्षण संबंध आहे असे दिसते. प्राण्यांचे उत्सृष्ट पदार्थ म्हणजे मलमूत्र, कार्बानिक आसिड वायु हे झाडांचे खाद्य होत. व झाडांचे उत्कृष्ट पदार्थ जे पाने, फळे फुलें, बिया व ऑक्सिजन वायु हे प्राण्यांचे खाद्य होत. मनुष्यांचे मलापासून जें सोनखत उत्पन्न करितात, ते भाजीपाल्यास व फळझाडांस उत्तम खत आहे हे सर्वांस माहीत आहेच. गुरांचे शेण हेही उत्तम खत आहे. प्राण्यांपासून जो कार्बानिक आसिड वायु उत्पन्न होता, त्यामधील कार्बन झाडे आपल्या पोषणास घेतात. व त्या योगानें जो ऑक्सिजन वायु उत्पन्न होतो तो प्राण्यांचे रक्ताचे शुद्धीस लागतो. सर्व प्राणी प्रत्यक्ष अगर परंपरेनें वनस्पतींवर उपजीवन करितात, हे उघड आहे. कित्येक प्राणी इतर प्राण्यांवर उपजीवन करितात हे खरे. परंतु हे दुसरे प्राणी प्रत्यक्ष

अगर परंपरेनें वनस्पतींवर पोसलेले असतात. सारांश, झाडे प्रा
११४

ण्यांकरिता किंवा प्राणी झाडांकरितां उत्पन्न केले आहेत ह्याचा निश्चय करणे फार कठीण आहे.

 हवा जास्त सुखकारक व हितकारक करण्यास झाडे आणखी एका रीतीने कारणीभूत होतात. आपणांस फार रुक्ष हवा उपयोगी नाहीं. रुक्ष हवेपासून आपणांस त्रास होतो. सोलापूर, नगर, विजापूर वगैरे जिल्ह्यांत पाऊस कमी पडतो, व झाडोराही कमी असल्यामुळे हवा फार रुक्ष असते. व उन्हाळ्यांत तर इतकी रुक्ष होते की, ती अगदीं असह्य वाटते. अशा दिवसांमध्ये एकाद्या बागेमध्यें अगर राईमध्ये गेलो असतां आपणांस फार आराम वाटतो. याचे कारण तेथे झाडांच्या योगानें थोडासा थंडावा असतो हें एक. परंतु, मुख्य कारण झाडांच्या व पाण्याच्या योगाने तेथील हवेमध्ये ओलावा असतो. ह्याकरिता आपल्या उष्ण देशामध्ये हवेत थोडासा ओलावा असला, तर ती आपणांस सुखावह वाटते. उन्हाळ्यामध्ये आपल्याकडील हवा फार रुक्ष असते व तिजपासून आपणांस फार त्रास होतो. मृग नक्षत्र लागण्याच्या सुमारास पश्चिम समुद्राकडून हवेचा प्रवाह वाहू लागतो, व तिजमध्ये थोडा बहुत ओलावा असल्यामुळे पाऊस जरी पडला नाहीं, तरी ह्या हवेपासून पुष्कळ आराम वाटतो. व अशी बाष्पयुक्त हवा वाहूं लागली म्हणजे लोक मृगशीतलाई पडली असे म्हणतात.

 दुसरी गोष्ट अशी की, अगदीं रुक्ष हवा असेल, तर तिजमध्ये कोणत्याच प्रकारची झाडे चांगली होत नाहींत. हवेमध्ये जितका

ओलावा जास्त असेल तितकी झाडे चांगली होतात. उष्ण देश 
११५

झाडांच्या वाढीस फारच उत्तम. व त्यांतही उष्ण देशांत ज्या ज्या ठिकाणीं हवा अतिशय सर्द असेल ती स्थळे अति उत्तम असतात. झाडे आपल्या पानांच्या द्वारे बाष्पीभवन करून हवेमध्ये नेहमी ओलावा उत्पन्न करीत असतात, व शिवाय झाडांच्या योगाने अनेक रीतीने पाण्याची वृद्धि होते. त्या पाण्याचे योगानेही हवेमध्ये ओलावा उत्पन्न होत असतो. अशा रीतीने झाडेच झाडांचे वृद्धीस कारणीभूत होतात. एवढे मात्र खरे आहे कीं, हवेमध्ये अतिशय ओलावा उत्पन्न झाला असला म्हणजे ती फारच सर्द होते. मग मात्र ती मनुष्यांचे प्रकृतीस हितावह होत नाहीं. ओलावा नियमित असला पाहिजे.

वाऱ्यास प्रतिबंध.

 वाऱ्यास अडथळा होणे, हा झाडांपासून आणखी एक फायदा आहे. एकाद्या ओल्या जमिनीवर स्तब्ध हवा असेल, तर त्या जमिनीपासून विशेष बाष्पीभवन होत नाही. कारण, बाष्पीभवन होऊन जी वाफ उत्पन्न होते ती जमिनीच्या पृष्ठभागाजवळ हवेमध्ये तशीच राहते. ह्यामुळे ती हवा आर्द्र होऊन तिजमध्ये बाष्पीभवन करण्याची शक्ति उत्तरोत्तर कमीकमी होत जाते. परंतु, अशा जमिनीवरून रुक्ष हवा वाहात राहील, तर बाष्पीभवनाने उत्पन्न झालेली वाफ वाऱ्याबरोबर वाहून जाऊन प्रत्येक वेळीं नवी रुक्ष हवा तिजवर येऊन बाष्पीभवन करीत जाईल. ह्या योगाने ती जमीन तेव्हांच वाळून जाईल. ह्याचप्रमाणे तळ्यांची स्थिति असते.

जर त्यांवरून नेहमीं रुक्ष हवा वाहात राहील तर तीं लौकरच 
११६

आटून जातील. ह्याकरितां तळ्यांसभोंवतीं झाडे लाविली, तर त्यांपासून वाऱ्यास अडथळा होऊन बाष्पीभवन फार जलद होत नाहीं.

उद्योगधंद्यांची वाढ वगैरे.

 झाडांपासून व्यवहारामध्ये उपयोगी असे अनेक पदार्थ उत्पन्न होतात, हे सांगणे नको. इमारतींस, आगगाड्यांस, नौकांस व इतर अनेक तऱ्हेच्या वाहनांस, तसेच मेज, खुर्च्या वगैरे सामानांस जे इमारती लाकूड लागते ते सर्व झाडांपासून मिळते. अग्नीपासून व्यवहारामध्ये लहानमोठे किती फायदे आहेत, हे एथे निराळे सांगावयास पाहिजे असे नाहीं. अग्नि जर नसता, तर आमचा सर्व व्यवहार अगदी बंद पडला असता. तो अग्नि मिळण्यास सर्पण झाडांच्या लाकडांपासून प्राप्त होते. आगगाडी वगैरे वाफेचीं यंत्रे चालविण्यास अग्नि दगडी कोळशांपासून उत्पन्न करतात. परंतु, हा कोळसाही मूलतः झाडांपासूनच झालेला आहे. निरनिराळी तेले व चरब्या वगैरे बहुतेक ज्वालाग्राही पदार्थ प्रत्यक्ष अगर परंपरेने झाडांपासूनच उत्पन्न झालेले आहेत. धान्य, फळे, मुळे, गवत वगैरे सर्व खाद्य पदार्थ प्राण्यांस प्रत्यक्ष अगर परंपरेने झाडांपासूनच प्राप्त होतात. आपल्या बहुतेक औषधी झाडांपासूनच उत्पन्न होतात. झाडांची पानेही अनेक उपयोगांस येतात. हिरड्यांसारखी कित्येक झाडांची फळे कित्येक प्रकारच्या रंगांचे उपयोगी पडतात. बाभूळ, तरवड वगैरे झाडांच्या साली चांबडी रंगविण्यास उपयोगी पडतात. सारांश, झाडांची फुले, फळे, पाने,

मुळे, लाकूड वगैरे हरएक उत्पन्न कांहींना कांहीतरी उपयोगी 
११७

पडते. ह्या सर्वांचे सविस्तर वर्णन करू लागलो तर निराळा ग्रंथच होईल.

 मनुष्यांस व जनावरांस झाडांच्या सावलीपासून आश्रय मिळतो हाही एक झाडांपासून फायदा आहे. आगगाडी व इतर रस्ते यांवर उन्हाचा ताप निवारण होण्यास तेथे झाडे पाहिजेतच. तसेच, शेते वगैरे ठिकाणीही मनुष्यांस आश्रयास झाडे पाहिजेत.

 झाडांची समृद्धि जेथे पुष्कळ आहे, तेथे अनेक प्रकारचे धंदे चालू असतात, व नवे नवे उत्पन्न होत असतात. ह्या सर्वांचे वर्णन करावे तितकें थोडे आहे. आपल्या ह्या मुंबई इलाख्यांतील कारवार, बेळगांव, कुलाबा, ठाणे ह्या जिल्ह्यांकडे पहा ! एथे इमारती लाकडांच्या व्यापारावर हजारों मजूर आपलीं पोटें भरीत आहेत, व कित्येक व्यापारी सधन होऊन बसले आहेत. हिरडे जमविण्याच्या कामावर, जळाऊ लाकडे तोडण्याच्या व नेण्याच्या कामावर, गवत कापण्याच्या कामावर, हजारों मजूर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु तीच स्थिति सोलापूर, नगर, विजापूर ह्या जिल्ह्यांकडे पहा. इकडे जंगल म्हणण्यासारखे नसल्यामुळे वरील जिल्ह्यांमध्ये जे उपजीविकेचे साधन ते इकडे नाही. म्हणून झाडांची वृद्धि झाल्यापासून पुष्कळ लोकांस उपजीविकेचे नवीन साधन प्राप्त होणार आहे.