करुणादेवी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
रा जा
य शो ध र

♣ * * * * * * ♣
 फार प्राचीन काळची गोष्ट आहे. यशोधर नावाचा एक राजा होता. त्याच्या राजधानीचे नाव होते मुक्तापूर. मुक्तापूर खरोखरच फार सुंदर शहर होते. मोत्याप्रमाणे शोभत होते. शीतला नदीच्या काठी ते वसलेले होते. नदीमुळे शहराला फारच शोभा आली होती. हंसांप्रमाणे शेकडो नावा नदीच्या पात्रातून ये-जा करताना दिसत. नदीतीरावर सोमेश्वराचे एक फार प्राचीन मंदीर होते. त्या मंदिरात एके काळी एक गरिब जोडपे राहात होते. त्यांना एक मुलगा होता; परंतु तो अकस्मात मरण पावला. आईबापांचा तो एकुलता एक मुलगा होता. तो मुलगा त्यांचे सर्वस्व होता. तो त्यांचे धन, तो त्यांचा देव. मृतपुत्र मातेच्या मांडीवर होता. ती त्याच्याकडे पाहात होती. मुलांचे मिटलेले डोळे उघडावे म्हणून तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा सुटत होत्या. परंतु मुलाचे डोळे उघडले नाहीत आणि त्याचे डोळे उघडत ना म्हणून त्या मातेचे डोळेही मिटले आणि जवळच बसलेला पिता, त्याचेही प्राण निघून गेले! मुलावर त्या मायबापांचे किती हे प्रेम! त्या सोमेश्वराजवळ दर वर्षी तेव्हापासून यात्रा भरत असे. आईबापांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सारे शहर तेथे लोटे. जवळचे, दूरचे लाखो लोक येत. ज्यांचे आईबाप मेलेले असतील ते मृतांसाठी कृतज्ञता दाखवायला येत. ज्यांचे आईबाप जिवंत असतील ते जिवंत असणाऱ्यांविषयी कृतज्ञता दाखवायला येत. मातृपितृप्रेमाची ती अपूर्व यात्रा असे.

मुक्तापूर राजधानी सोमेश्वराच्या ह्या यात्रेसाठी प्राचीन काळापासून प्रसिद्ध होती आणि आता यशोधर राजाच्या प्रजावात्सल्यामुळेही तिचे नाव सर्वांच्या तोंडी झाले होते. मुक्तापूरची प्रचंड मंदिरे, भव्य राजवाडे, रुंद सुंदर रस्ते, तेथील भव्य बाजारपेठ, तेथील विद्यापीठ, तेथील न्यायमंदिर, सारे पाहाण्यासारखे होते. परंतु यशोधर राजाचे दर्शन व्हावे म्हणून लोक येत. तो पुण्यश्लोक राजा होता.

 यशोधराला एकच चिता रात्रंदिवस असे. प्रजा सुखी कशी होईल, हीच ती चिंता. एके दिवशी सुंदर सजलेल्या नावेतून तो शीतला नदीच्या शांत गंभीर प्रवाहावर विहार करीत होता. बरोबर मुख्य मंत्री आदित्यनारायण हा होता. एक वाद्यविशारद एक मधुर तंतुवाद्य वाजवीत होता. परंतु राजा यशोधर प्रसन्न नव्हता.

 “ महाराज, आज उदासीन का आपली चर्या ? सारी प्रजा सुखी आहे. मग का चिता ?” प्रधानाने विचारले.

 “ आदित्यनारायण, आपला राज्यकारभार दिवसेंदिवस अधिक चांगला व्हावा असे मला वाटते. राजा कितीही चांगला असला तरी त्याला जर अधिकारी चांगले मिळाले नाहीत, तर काय उपयोग? कायदा शेवटी कागदावरच राहातो. ठायी ठायी चांगली माणसे काम करण्यासाठी कशी मिळतील हा मुख्य प्रश्न आहे. प्रत्येक गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला योग्य माणसे निवडली जातील, योग्य माणसे नेमली जातील म्हणून काय करावे ?”

 "परंतु हल्लीचे अधिकारी आहेत ते चांगलेच आहेत. तक्रार कोठून येत नाही.”

 “ माझ्या मनात एक योजना आहे. त्या त्या तालुक्यात जी बुद्धिमान, सद्गुणी अशी मुले असतील, त्या सर्वांना राजधानीत बोलवावे. त्यांना येथे वर्षभर शिक्षण देऊन त्यांची परीक्षा घ्यावी. केवळ बौद्धिकच परीक्षा नाही, तर इतरही अनेक अंगांची. आणि जी मुले जास्त योग्य ठरतील ती ठिकठिक्राणी नेमावीत,"

 “ परंतु त्या त्या ठिकाणची हुशार, शहाणी मुले मिळणार कशी ? समजायचा काय मार्ग ? ??

 “ त्या त्या गावच्या लोकांना माहीत असते. अमक्या अमक्याचा मुलगा फार हुशार आहे, फार शूर आहे, फार परोपकारी आहे, असे गावात म्हणत असतात. त्या त्या गावच्या अधिकाच्यांनी अशी नोंद करून पाठवावी. आपण त्यातून निवड करून बोलावून घ्यावी. त्यांची परीक्षा घ्यावी. करून तर पाहू या.”

 “ करून पाहायला काहीच हरकत नाही. पुढील राजांसाठी ही उत्कृष्ट परंपरा राहील. खरोखरच आपण धन्य आहात. किती सारखा विचार करीत असता !"

 “ राजा होणे म्हणजे मोठी जोखीम. कोट्यावधी लोकांची सुखे राजावर अवलंबून असतात. एका कुटुंबाचा संसार नीट चालावा म्हणून त्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाला किती दक्ष राहावे लागते. मग ज्याच्यावर लाखो संसार अवलंबून, त्या राजाने किती बरे दक्ष राहिले पाहिजे ? मघा ते वाद्य वाजत होते. माझ्या मनात विचार येई, की किती कुटुंबांतून सुखाचे संगीत नांदत असेल ? कोठे हाय हाय तर नसेल ना ? अन्याय नसेल ना ? जुलूम नसेल ना ? अन्नान्नदशा नसेल ना ? भांडणे, विरोध नसतील ना ? घरी-दारी सर्वत्र माझ्या राज्यात सर्वाचे संबंध प्रेममय व सहकार्याचे असतील का ? सर्वाचे भिन्नभिन्न सूर असूनही त्यांतून गुण्यागोविंदाचे संगीत निर्माण होत असेल का ? आदित्यनारायण, मी जेव्हा चांदीच्या ताटातून अमृतासारखे अन्न खातो, तेव्हा माझी प्रजा मला आठवते. मी सोन्याच्या पलंगावर परांच्या गाद्यांवर झोपतो, तेव्हा माझी प्रजा माझ्या डोळ्यांसमोर असते. मी जेव्हा माझा विशाल ग्रंथशाळेत हिंडतो, तेव्हा माझी प्रजा माझ्या डोळ्यांसमोर असते. मी मनोरम राजवाड्यातून वावरतो, तेव्हा, माझी प्रजा माझ्या डोळ्यांसमोर असते. प्रजेला अन्न, वस्र, घरदार, ज्ञान सारे असेल का, हा विचार रात्रंदिवस माझ्या डोळ्यांसमोर असतो. मी सुखात असता माझी प्रजा दुःखात असेल, तर देवाघरी मी गुन्हेगार ठरेन. एखादे वेळेस वाटते, की सोडावे राज्य, व्हावे संन्यासी व निघून जावे. परंतु अंगावरची जबाबदारी अशी सोडून जाणे, तेही पाप. म्हणून मी शक्य ती काळजी घेऊन हे प्रजापालनकर्तव्य पार पाडायचे असे ठरवले आहे. आपल्या बागेत जशी सुंदर सुगंधी फुले फुललेली असतात, तशी माझ्या प्रजेची जीवने फुलावी, त्यांच्या जीवनात रस व गंध उत्पन्न व्हावा असे वाटते. आपण माणसे शेवटी अपूर्ण आहोत, परंतु जितके निर्दोष होता येईल तितके होण्यासाठी प्रयत्न करावयाचे. ”

 इतक्यात एका बगळ्याने झडप घालून एक मासा पकडला. यशोधराचे लक्ष तिकडे गेले.

 “ पाहिलात ना तो प्रकार ?” तो म्हणाला.

 “होय महाराज, ” आदित्यनारायण म्हणाले. “ माझे अधिकारी असे नसोत. दिसायला गीरेगोमटे ; वरून गोड गोड बोलणारे; परंतु मनात घाणेरडे. खरे नाणे पाहिजे. अस्सल हवे. नक्कल नको. खरे ना ?”

 “ होय महाराज !” सोमेश्वराच्या मंदिरात घंटा वाजत होत्या. सायंकाळ जवळ आली. नाव माघारी वळली. यशोधर उतरला. शेकडो लोकांचे जयजयकार ऐकत व प्रणाम घेत तो राजवाड्यात गेला. असा राजा असावा असे म्हणत लोक घरी गेले.

करुणादेवी.djvu

शि री ष
♣ * * * * * * ♣ अंबर गावी सुखदेव म्हणून एक गृहस्थ राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव सावित्री. बरेच दिवस मूलबाळ होईना. सावित्रीने पुष्कळ व्रते-वैकल्ये केली, नवस-सायास केले. ती निराश झाली. परंतु आता मूल होणार नाही, असे वाटल्यावर तिला मुलगा झाला. नक्षत्रासारखा मुलगा होता. त्याचे नाव शिरीष ठेवण्यात आले.

 सुखदेवाला फुलांचा फार नाद. घरात मूलबाळ नव्हते, तेव्हा तो बागेत फुले फुलवी. फुलांकडे पाही. फुलांचे मुके घेई. मला मुले असती. तर त्यांचे असे मुके मी घेतले असते व त्या मुलांनी माझ्या गळ्याला मिठी मारली असती, असे तो म्हणे. त्याची पुष्पोपासना पाहून जणू परमेश्वराने त्याच्या संसारवृक्षाला शेवटी फुलवले. शिरीषचे सुंदर फूल लागले. शिरीष फूल किती सुकुमार असते ! बाळ शिरीषही तसाच सुकुमार होता.

 शिरीष वाढला. गावशाळेत शिकायला जाऊ लागला. सुखदेवही त्याला घरी शिकवायचे. आई सावित्री पुराणातील कथा-गोष्टी सांगायची. शिरीषची स्मरणशक्ती अपूर्वं होती तो खरोखर एकपाठी होता. पंतोजी त्याचे कौतुक करीत. शेजारी त्याची स्तुती करीत. आईबापांना तर अपार आनंद होई.

 शिरीषचे शाळेतील शिक्षण संपले. तो आता हळूहळू वृद्ध आईबापांस मदत करू लागला. त्यांचे लहानसे शेत होते. शिरीष तेथे खपे. शेत पिकवी. आईबापांची सेवा करी.

 गावाचे तो भूषण होता. भांडण कोठे असले तर तो न्याय देई, कोठे संकट असले तर तो धावून जाई. एकदा एका विहिरीत एक मूल पडले. शिरीषने एकदम उडी घेतली. त्याने ते मूल वाचविले. उदार, प्रेमळ. शूर, बुद्धिमान असा हा आदर्श तरुण होता.

 त्याचे आता लग्न झाले. एका पोरक्या मुलीबरोबर लग्न. त्या मुलीचे लग्न ठरत नव्हते. ती गरीब होती. चुलत्याकडे ती होती.

 “ तुझे लग्न कसे होणार? कोण तुला करणार? मी गरीब, कोठे तुला देऊ ?” चुलता एके दिवशी तिला म्हणाला.

 “ शिरीष लावील माझ्याबरोबर लग्न. त्याला गरिबांची काळजी. अनाथ मुलीचे. नशीब तो फुलवील.” ती म्हणाली.

 “वेडी आहेस तू. असा सुंदर नवरा मिळायला साता जन्माची पुण्याई हवी."

 “ मी का पापी आहे ?”

 “ पापी नसतीस तर पोरकी कशाला होतीस ?”

  “ ईश्वरावर ज्याची श्रद्धा आहे तो कधी पोरका होत नाही. जगातले आईबाप गेले तरी तो मायबाप सदैव आहेच.”

 “ करुणे, तुझे बोलणे थोरामोठ्यांसही लाजवील.”

करुणा त्या मुलीचे नाव. किती गोड नाव. खरोखरीच ती मूर्तिमंत करुणा होती. ती गायीगुरांना मारीत नसे. पाखरास दाणे टाकील, मांजरास दहीभात घालील. करुणा सर्वांची करुणा करी. परंतु तिची करुणा कोण करणार? तिची दया कोणाला येणार? नाही का तिचे लग्न होणार? नाही का कोणी योग्य वर मिळणार? नाही का शिरीष मिळणार? करुणेचे चुलत्याजवळचे बोलणे सर्वत्र पसरले. शिरीषच्याही ते कानावर आले आणि खरेच त्याने करुणेशी लग्न लावले. सुखदेव व सावित्री ह्यांना वाटत होते, की एखाद्या श्रीमंताची मुलगी आपल्या मुलाला मिळावी. परंतु मुलाच्या इच्छेविरुद्ध ती गेली नाहीत.

 शिरीष व करुणा परस्परांस अनुरूप होती. त्यांच्या लहानशा संसारात आता आनंदाला तोटा नव्हता शिरीषबरोबर करुणाही शेतात काम करी. फुलांना पाणी घाली. ती पहाटे उठे. गोड गोड ओव्या म्हणत जात्यावर दळी. सासूसासच्यांची ती सेवा करी. त्यांची धुणी धुवी. त्यांचे पाय चेपी. गोड बोलून पतीलाही सुखवी, हसवी.  दरवर्षी आपल्या विवाहाचा वाढदिवस शिरीष व करुणा साजरा करीत. वसंत ऋतूंत त्यांचे लग्न झाले होते. वाढदिवस वसंत ऋतूत येई. सारी सृष्टी त्या वेळेस सुंदर असे. वृक्षवेलींना नवीन पल्लव फुटलेले असत. झाडांना मोहोर असे. पक्षी गोड गाणी गोत असत. प्रसन्न वारा वाहात असे. आणि अशा प्रसन्न वातावरणात हा विवाह-वाढदिवस साजरा होत असे.

 अद्याप त्यांना मूलबाळ झाले नव्हते. सुखदेव व सावित्री ह्यांना नातवाचे तोंड कधी दिसेल असे झाले होते.

 “बाबा, तुम्हाला मी म्हातारपणी झाली तसे आम्हालाही म्हातारपणी मूल होईल !” हसून शिरीष म्हणे.

 “ परंतु त्या वेळेस आम्ही जिवंत नसू.”

 “ सोमेश्वराच्या यात्रेत बाळाला घेऊन आम्ही येऊ. तेथे तुमचे आत्मे बाळाला पाहातील.”

 “ सोमेश्वराला मला कधीही जाता आले नाही. किती तरी लांब. तू तरी कसा जाशील ?"

 “ इच्छा असली म्हणजे जाता येईल !” असे संवाद चालत.

  परंतु यशोधर राजाच्या नवीन आज्ञेची राज्यात सर्वत्र दवंडी देण्यात आली. सर्व बुद्धिमान तरुणांची यादी करण्याचे ठरले. आईबाप आपापल्या हुशार मुलांची नावे आनंदाने देऊ लागले.

 “ सुखदेव, तुमच्या शिरीषचे नाव दिलेत की नाही ? त्याच्यासारखा हुशार कोण आहे ? त्याच्यासारखा गुणी कोण आहे ? सवं राज्यात तो पहिला येईल. राजाचा मुख्य प्रधान होईल. तुमच्या भाग्याला मग काय तोटा ?"

 “ नको ते भाग्य. शिरीषचा वियोग मला क्षणभरही सहन होत नाही. मुक्तापूर राजधानी किती दूर. तेथे जायचे. वर्षभर शिकायचे. मग परीक्षा. नकोच ते. एक क्षणही शिरीष जवळ नसेल, तर मी कावराबावरा होतो. मग वर्षभर त्याच्याशिवाय कसा राहू? नको ते प्रधानपद. हे लहानसे घर, ही छोटीशी बाग, हा लहान मळा पुरे. मी नाही शिरीषचे नाव देणार."  “ परंतु शिरीष आपल्या गावचे भूषण आहे हे सर्वांना माहीत आहे. अधिकाच्यांना माहीत आहे. मागे शिरीषने एका भांडणात दिलेला न्याय ऐकून प्रांताधिकारी प्रसन्न झाला होता. तुम्ही शिरीषचे नाव नाही दिले तरी ते राजाच्या कानांवर गेल्याशिवाय राहाणार नाही.”

 शेजारी व सुखदेव ह्यांचे बोलणे चालले होते. तो शिरीष तेथे आला.

 “ बाबा, सचिंत का ?”

 “ शिरीष, तू मला सोडून जाशील ?” पित्याने विचारले.

  “ शिरीष, राजाचे बोलावणे आले तर जाशील की नाही ? राजाची आज्ञा पाळणे हाही धर्मच आहे !” शेजारी म्हणाला.

 “परंतु ती आज्ञा योग्य असेल तर,” शिरीष म्हणाला.

 “ राजा यशोधर कधीही अन्याय्य गोष्ट करणार नाही.” शेजाऱ्याने सांगितले.

 “ आईबापांपासून एकुलता मुलगा घेऊन जाणे म्हणजे अन्याय नव्हे का ?” सुखदेव म्हणाले.

 “ परंतु सर्व प्रजेचे कल्याण व्हावे म्हणून आईबापांनी आपल्या एकुलत्या मुलासही नको का द्यायला ? एकट्याच्या संसारापेक्षा राज्यातील सर्वांचे संसार सुखाचे होणे अधिक श्रेयस्कर नाही का ?” शेजाऱ्याने उत्तर दिले.

 “ बाबा, ते काही असो. मी जाणार नाही. तुम्ही माझे नाव देऊ नका. मीही देणार नाही.” शिरीषने ग्वाही दिली.

 “ अरे, तुझे नाव आधीच सर्वत्र गेले आहे.”

 असे म्हणून तो शेजारी निघून गेला. दुःखी पित्याची समजूत शिरीषने घातली.

 एके दिवशी शिरीष व करुणा शेतात होती. झाडावर एक पक्षी करुण आवाज काढीत होता.

 “ मादीचा नर गेला वाटते कोठे ?”

 “ का नर मादीला हाक मारीत आहे?”

 " किती करुण आवाज !"  “शिरीष, तू नाही ना मला असाच सोडून जाणार? राजाचे मंत्रिपद तुला मोह नाही ना पाडणार? तू गेलास तर मी अशीच ओरडत बसेन. तुझी करुणा रडत बसेल. नको हो जाऊ.”

 “ नाही जाणार. तुम्हाला कोणालाही सोडून मी जाणार नाही.”

 “ शिरीष, लवकरच आपल्या विवाहाचा वाढदिवस येईल.”

 “ यंदा थाटाने साजरा करू. शेजारच्या गावचे गवई बोलावू.”

 आणि लग्नाचा वाढदिवस आला. बागेत तयारी करण्यात आली. सुंदर फुले फुलली होती. मध्ये गालिचा होता. रात्री मुख्य जेवण झाले. सुखदेव व सावित्री, शिरीष व करुणा तेथे होती. शिरीषचा मित्र प्रेमानंद तोही तेथे होता. गायनवादन सुरू झाले. आकाशात चंद्र होता. मंद वारा ཧवाहात होता. फुलांचा परिमळ सुटला होता. आनंदाला भरती आली होती.

 “ करुणा, तू म्हण तुझे आवडते गाणे.” शिरीष म्हणाला.

 “ माझा गळा चांगला नाही.” ती म्हणाली.

 “ तुझा गळा मला गोड वाटतो. म्हण !”

 आणि करुणेने आढेवेढे न घेता ते गाणे म्हटले

  “ कर्तव्याचा जीवनात सुगंध ”

  सत्प्रेमाचा जीवनात आनंद ॥ ध्रु० ॥

   चिता नाहीं मातें

   सेवा होई हातें

  मुक्त आहे जरी संसार-बंध ॥ कर्त० ॥

   भाग्य माझे थोर

   नाही कसला घोर

  प्रभु पुरवी माझे सारे संच्छंद ॥ कर्त० ॥”

  परंतु ही कसलो तिकडे गडबड ! घोडेस्वार दौडत आहेत. टापटाप आवाज येत आहेत. सारे घाबरले. गाणे संपले. आनंद अस्तास गेला. तो पाहा एक दिवा मालवला, आणि चंद्रही खाली वळला. अंधार होणार वाटते !

 “ काय रे शिरीष, काय आहे ?” पित्याने विचारले.
करुणादेवी.djvu
 “ राजाचे दूत आहेत. प्रांताधिपतीकडून आले आहैत. हे पाहा आदेशपत्र. ”

 सुखदेवाने ते आदेशपत्र वाचले. शिरीषची मागणी करण्यात आली होती. राजाच्या कानावर शिरीषचे नाव गेले होते. प्रांताधिपतीने शिरीषला पाठवले नाही, म्हणूनं राजा यशोधर रागावला होता. प्रांताधिपतीने ताबडतोब शिरीषला आणण्यासाठी घोडेस्वार पाठविले होते.

 “ चला निघा !” आलेला नायक म्हणाला.

  “ एकुलता एक मुलगा नेऊ नका.” पिता म्हणाला.

 “ आम्ही पिकली पाने झाली. नका नेऊ म्हाताच्यांची काठी !” सावित्रीआई म्हणाली.

 “ त्यांना न्याल तर मी कोठे जाऊ!” करुणा म्हणाली.

 “ तुम्ही सारी रडता का ? तुमचे दैव थोर आहे. ह्या शिरीषला राजा प्रधान करील. वेडी दिसता तुम्ही !” तो नायक हसून म्हणाला.

 “ आजची रात्र तरी नका नेऊ. आज शिरीषच्या विवाहाचा वाढदिवस साजरा होत आहे. आजची रात्र तरी आनंदात जाऊ दे. उद्या न्या. म्हाताऱ्याचे ऐका.” सुखदेव रडत म्हणाला.

 “ बरे, सकाळी नेऊ. सकाळी मात्र आढेवेढे चालणार नाहीत. बऱ्याबोलाने शिरीष येणार नसेल, तर मुसक्या बांधून त्याला न्यावे लागेल. तुम्ही त्याचे नाव लपवून ठेवलेत. प्रांताधिपती चिडला आहे. आता तरी तुम्ही मूर्खपणा करू नका.”

 असे म्हणून तो नायक घोडेस्वारांसह निघून गेला. समारंभ संपला. आईबापांसह व पत्नीसह शिरीष घरी आला. चौघे खिन्न होऊन बसली.

 “ बाळ, नको रे तू जाऊस. काय व्हायचे असेल ते होईल !” आई

 “ अग, असे करून कसे चालेल ? त्याला बांधून ते नेणारच. आणि शिवाय असे बघ, नाहीतरी आपण म्हातारीच झाली. बाळाचे दैव उदयास येत आहे. आपण कशाला आड यावे ? जाऊ दे त्याला राजधानीला. होऊ दे प्रधान. शेतात कष्ट करायला नकोत. राजवाड्यात राहील. हत्तीवर बसेल. जाऊ दे त्याला. आपण मायाममतेने आंधळी होऊन त्याच्या भविष्याचे का वाटोळे करावे? मनुष्याने दूरचे पहावे. जा हो शिरीष. आम्ही आमचे दुःख गिळू. तू मोठा हो. तुझी कीर्ती दिगंतरात जाऊ दे."

 "बाबा मला कीर्ती नको, वैभव नको. शेतात काम करण्याचा मला कंटाळा नाही. मी शेतात काम करीत असतो, त्या वेळेस सूर्य आशिर्वाद देतो. वारे वारा घालतात. पक्षी गाणी गातात. तहान लागली तर नद्या पाणी देतात आणि भूमाता प्रसन्नपणे हसते. मला शेतात काम करायला खरेच आवडते. नको ते मंत्रिपद, नकोत ते राजवाडे."

 "बाळ परंतु हट्ट चालणार नाही. ते तुझ्या मुसक्या बांधुन नेतील."

 "तसे कराल तर मी प्राण देईन."

 "नको असे नको करूस. कोठेही अस, परंतु सुखरूप अस. माझे तुम्ही ऐका. शिरीषला जाऊ दे."

 "जा हो, बाळ," माता म्हणाली.

 "करुणे, जाऊ का?" शिरीषने विचारले, परंतु करुणा एकदम हुंदका देऊन निघून गेली.

करुणादेवी.djvu
शि री ष चे
प्र या ण

♣ * * * * * * ♣ शिरीष करुणेची समजूत घालीत होता. परंतु तिचे अश्रू थांबत ना. “करुणे, किती रडशील ! जाण्याशिवाय गत्यन्तर नाही. पुढे मी तुला नेईन. सुखी करीन.”

 “ पुढे काय होईल, कोणास माहीत ? मोठ्या शहरात मोह असतात. शिरीष, मी खेडवळ. मी तुला मग आवडणार नाही. मुख्य प्रधानाची बायको मी शोभणार नाही. माझ्यामुळे तुला कमीपणा येईल. मला न्यायची तुला लाज वाटेल.”

 “ माझ्यावर तुझा विश्वास नाही का ? तुझे प्रेम का मी विसरेन ? तुझे प्रेम बळकट असेल तर ते मला ओढून आणील. ते आपली ताटातूट करणार नाही. उगी. आता उजाडेल. चल, आपण बागेत जरा फिरू. ”

 दोघे बागेत गेली. एक सुगंधी फूल तोडून करुणेने शिरीषला दिले आणि शिरीषने एक फूल तोडून तिच्या केसात खोवले. इतक्यात मित्र प्रेमानंद आला.

 “ ये; प्रेमा, ये.” शिरीष म्हणाला.

 “ शिरीषला नका हो जाऊ देऊ. तुम्ही त्याचे मित्र. शिरीष माझे ऐकत नाही. परंतु तुमचे ऐकेल. सांगा त्याला.” करुणा केविलबाणे म्हणाली.

 “ पत्नीपेक्षा का मित्राचे प्रेम अधिक असते ?” प्रेमानंद हसून म्हणाला.

 “ हो. मित्र सर्वाहून जवळचा.” ती म्हणाली.

 “ करुणे, तू खुळी आहेस. ” शिरीष म्हणाला.  “ खुळ्या बायकोला तू कशाला उद्या नेशील? खरे ना हो, प्रेमानंद ? प्रधान झाल्यावर शिरीष मला नेईल का ?”

 “ नेईल. त्याने न नेले तर तुम्ही जा.”

 “ त्याने घालवले तर ?”

 “ राजाजवळ दाद मागा.”

 “ पतिपत्नीची ताटातूट करणारा राजा न्याय थोडाच देईल ?”

 “ करुणे, राजा यशोधर थोर आहे. पुण्यश्लोक राजाला नावे नको ठेवूस.”

 “ प्रेमानंद, मी तर आता जाईन. माझ्या वृद्ध आईबापांची तू काळजी घे. करुणा आहेच. ती त्यांचा सांभाळ करील.परंतु तुझेही लक्ष असू दे. तुम्ही दोघे आहात. म्हणून मला चिंता नाही. करुणे, त्या उगवत्या सूर्यनारायणास साक्षी ठेवून शपथ घे, की सासूसासऱ्यांची मी सेवा करीन.”

 “ शिरीष, शपथ रे कशाला? तुझा शब्द मला वेदवाक्य. आणि मी कधी तरी त्यांची अवज्ञा केली आहे का ?”

  “ तरीही शपथ घे.”

 “ घेते हो. ‘उगवत्या सूर्यनारायणा, तू जसा कधी उगवायचा चुकत नाहीस, त्याप्रमाणे मी सासूसासऱ्यांची सेवा करायला कधी चुकणार नाही. तुझी शपथ. जर मी शपथभ्रष्ट झाल्ये तर तू माझे भस्म कर !' झाले ना शिरीष समाधान ? ”

 इतक्यात घोडेस्वार आले. शिरीष करुणेसह घरी आला. प्रेमानंद बरोबर होता.आईबाप रडू लागली.

 “ आई, नको रडू. बाबा रडू नका. करुणा तुमची काळजी घेईल. सारे मंगल होईल.” शिरीष म्हणाला.

 “ बाळ, पुन्हा कधी रे भेटशील ? कधी दिसशील ?” माता म्हणाली

 “ सुखदेव, सावित्रीबाई रडू नका.शिरीष मोठा होईल. प्रधान होईल. आपल्या गावाचे नाव होईल. शिरीष, प्रधान झाल्यावर गावाला विसरू नकोस हो !” शेजारी म्हणाले.

 “ नाही विसरणार. माझ्या आईबापांना सांभाळा, करुणेला मदत करा. ” तो म्हणाला.  “ काळजी नको करू.” लोक म्हणाले.

 आईबापांच्या पाया पडून व करुणेचा आणि प्रेमानंदाचा निरोप घेऊन शिरीष निघाला. तो घोड्यावर बसला. गेले घोड़े. शिरीष मागे वळून पाहात होता. गेले घोडे. वाऱ्यासारखे गेले. लोक आपापल्या घरी गेले. सुखदेव व सावित्री घरात आली. करुणा घरात आली. ती रडत होती.

 “ करुणे, रडू नकोस.” प्रेमानंद म्हणाला.

 “ मी एकंदरीत दुर्दैवीच आहे !” ती म्हणाली.

 “ करुणे, अशुभ मनात आणू नये.” तो म्हणाला.

 “ परंतु येते त्याला काय करू ?” ती म्हणाली.

 “ कर्तव्य करणे एवढे आपले काम.” असे म्हणून प्रेमानंद निघून गेला.करुणादेवी.djvu
रा ज धा नी त
♣ * * * * * * ♣  “हेमा,येतेस ना?” आदित्यनारायणांनी विचारले. “ मी नाही येत !” ती म्हणाली.

 “ साऱ्या राज्यातील तरुण येथे जमले आहेत. तुला कोणता पसंत पडतो बघ. हेमा, तू आमची एकुलती एक मुलगी. तुझे सुख ते आमचे. तू नेहमी लग्न नको असे का म्हणतेस ? तू अशी विरक्त का ?”

 “ तुमच्यावर प्रेम आहे म्हणून. उद्या माझे लग्न झाले, म्हणजे मला येथे थोडेच राहाता येणार आहे? तुमचा तर माझ्यावर जीव.”

 “ परंतु तुझ्या पतीला घरजावई करीन.”

 " त्यांना न आवडले तर ? त्धांना त्यात मिधेपणा वाटला तर ?"

  “ तुझ्या पतीला येथे मोठी नोकरी लावून देईन.”

 “ परंतु त्यांना नको असली तर नोकरी ? येथे राहाणे नको असेल तर ?"

 “ हेमा. येथे जे तरुण आले आहेत, ते उगीच नाही आले. महत्त्वाकांक्षेने आले आहेत. त्यांना राजधानीत मोठी नोकरी मिळाली, तर का आवडणार नाही ? बुद्धिमान लोक महत्त्वाकांक्षी असतात. आपल्या बुद्धीची प्रभा सर्वत्र फाकावी असे त्यांना वाटते. मी तुला एक विचारू ?”

 "काय?"

  “ह्या जमलेल्या तरुणांत जो पहिला येईल त्याच्याशी तू करशील का लग्न ? जो पहिला येईल त्याला राजा प्रधान करील. म्हणजे मग तूही येथेच राहाशील. तुझी व आमची नेहमी भेट होत जाईल. चालेल का ?”  "तुम्ही सांगाल ते मला मान्य आहे. तुमच्या सुखासाठी मो सारे करीन."

 " मग नाही येत माझ्याबरोबर?"

 "नको. एखाद्या तरुणावर, समजा, माझे प्रेम जडले आणि तो बुद्धिमान नसला तर? त्याला मग थोडेच येथे राहाता येईल? ते नंकोच. तुम्ही ज्याच्याशी लग्न लावाल त्याच्याशी मी आनंदाने संसार करीन.”

 "हेमा, मुलगी असावी तर तुझ्यासारखी. धन्य आहेस तू !"

 असे म्हणून आदित्यनारायण निघून गेले.

 विद्यापोठाच्या वसतिगृहात राज्यातील वेचक तरुणांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांचा विशिष्ट अभ्यास चालला होता. आदित्यनारायण मधून मधून ह्या वसतिगृहात येत व वरसंशोधन करीत असत.

 आज ते वसतिगृहात आले, तो काही तरी तेथे गडबड होती.

 "काय आहे ? काय आहे ?" आदित्यनारायण विचारत होते.

 "रस्त्यात एक लहान मूल होते. तिकडून एक मस्त हेला शिगे उगारून येत होता. परंतु येथील एक विद्यार्थी, शिरीष, विजेप्रमाणे धावत गेला व त्या मुलाला त्याने वाचवले. सारे त्याची स्तुती करीत आहेत." चालक म्हणाले.

 "कोठे आहे तो तरुण ?"

 " तो पाहा."

 शिरीषला तेथे बोलावण्यात आले. सुंदर सुकुमार शिरीष तेथे नम्रपणे उभा होता. तो सुकुमार असून वीर होता. फुलाप्रमाणे दिसत होता, परंतु वज्रवृत्तीचाही होता.

 "शाबास तुमची. महाराजांच्या कानांवर घातले पाहिजे.” आदित्यनारायण म्हणाले.

 "महाराजांच्या कानावर ह्यांची कीर्ती आधीच गेली आहे. ज्यांना खास दूत पाठवून आणण्यात आले, तेच हे शिरीष !” चालकांनी सांगितले.

 आदित्यनारायण निघून गेले आणि थोड्या वेळाने त्यांची मुलगी हेमा त्या वसतिगृहाकडे आली. सुवर्णासारखी तिची कांती होती. रेशमी बहुमोल वस्त्र ती नेसली होती. मोत्यांचे अलंकार तिच्या अंगावर होते. सारे तरुण तिच्याकडे पाहू लागले.

 चालक सामोरे आले.

 “ माझे बाबा इकडे आले होते ना ?” तिने विचारले.

  “ ते तर गेले.”

 “ इतक्यात कसे गेले ? ह्या तरुणांची परीक्षा घ्यायला ते आले होते ना ?”

 “ तसे काही बोलले नाहीत.”

  “ बरे, मी जात्ये.”

 “ थांबा. नोकर गेला आहे. माळ्याकडून फुले आणायला गेला आहे. फुलांची भेट घेऊन जा.”

 “ हे येथे इतके विद्यार्थी आहेत. त्यांना मी एक प्रश्न विचारू ?”

 "विचारा.”

 “तुम्ही सारे मोठी नोकरी मिळावी म्हणूनच आला आहात का ?”

 “हो, हो !” सारे म्हणाले.

 “ मला नको नोकरी !” एक आवाज आला.

 “ कोण म्हणतो, नको नोकरी ?” तिने विचारले.

 “ हा शिरीष !” सारे हसून म्हणाले.

 “ तुम्हाला नको नोकरी ?” तिने गंभीरपणे प्रश्न केला.

 "नको !” तो म्हणाला.

 “ का ?”

 “ मला खेड्यातच राहू दे. तेथे आईबापांची सेवा करू दे.”

 "आईबापांना येथे आणा“

 “परंतु नकोच. नोकरी नकोच.” हेमा निघून गेली.

 ते सारे तरुण विद्यार्थी शिरीषची थट्टा करू लागले.

 “ शिरीष, थोर आहे राजा तुझे नशीब.”

 “ राजाचा प्रधान होशील.”

 “ प्रधानाचा जाबई होशील.”

 अशी थट्टा चालली होती. परंतु शिरीष तेथे थांबला नाही. का नाही?  एके दिवशी हेमा शीतला नदीच्या तीरी मैत्रिणीसह हिंडत होती. शिरीषही नदीतीरी होता. शेकडो लोकांची जा- ये सुरू होती. शिरीष एकटाच तीरातीराने गेला व एका झाडाखाली बसला. तो शून्य दृष्टीने कोठे तरी पाहात होता ! त्माला का आईबापांची आठवण येत होती ? करुणेची आठवण येत होती ?

 ती पहा हेमा पळत पळत येत आहे.

 " काय झाले ? का पळता ?” शिरीषने विचारले.

 “ तुमच्याजवळ दोन शब्द बोलावे म्हणून.”

 “ त्यासाठी पळत येण्याची काय जरूरी ?"

 “ मैत्रिणींना चुकवण्यासाठी. हं, बोला. दोन शब्द बोला.”

 “ दहा शब्द झाले, ” तो म्हणाला.

 “ शब्दात पकडणे बरे नव्हे.”

 "मग कशात पकडाचे ?"

 “ प्रेमात पकडावे."

 “ मला काही समजत नाही.”

 “ तुम्ही तर सर्वात हुशार असे सारे म्हणतात.”

 "म्हणोत बिचारे, ”

  “ तुम्ही दु:खी का ? तुम्हाला घरची आठवण येते ? आईबापांची येते. होय ना ?”

 " होय."

  “ आणखी कोणाची ?”

 “ काय सांगू ? त्या पाहा तुमच्या मैत्रिणी आल्या."

 “ हे घ्या तुम्हाला फूल, कसले आहे ओळखा.”

 " माझ्या नावाचे."

  “ तुमचे नाव शिरीष वाटते?”

  “ विचारता कशाला ? तुम्हाला माहीतच आहे.”

  “ कोण म्हणतो माहीत आहे?”

 “ मी म्हणतो. माझे नाव माहीत नसते, तर हे फूल तुम्ही आणलेच नसतेत. आणि त्या दिवशी वसतिगृहात माझे नाव तुम्ही ऐकले होते.”
करुणादेवी.djvu"शब्दात पकडणे बरे नव्हे"

 “ एकदा ऐकल्याने नाव थोडेच लक्षात राहाते !”

 “ त्या पाड़ा मैत्रिणी आल्या. झाडाआड लपा. गंमत होईल. लपा. ”

 “ तुमच्याआड लपते.”

 “ मी जातो. तुम्ही येथे लपा. ”

 तो गेला. हेमा तेथे लपून राहिली. मैत्रिणी पाहात पाहात येत होत्या.

 “ तुम्हाला इकडे मुख्य प्रधानांची मुलगी दिसली का ?” एकीने विचारले.

 “ मी माझ्या विचारात होतो. माझे लक्ष नव्हते. त्या हरवल्या वाटते?” त्याने विचारले.

 " इकडे ती पळत आली."

 “ उडी नाही ना घेतली नदीत ?” त्याने गंभीरपणे म्हटले.

 “ तुम्ही पाहा हो आमच्यासाठी, ” मैत्रिणी म्हणाल्या.

  “ शोधतो हा.”

 शिरीष मागे वळला. इकडे तिकडे खोटेच शोधू लागला. आणि तो त्या झाडाजवळ आला. त्याने टाळ्या वाजवल्या. मैत्रिणी धावतच आल्या.

 “ आहे का हो ?”

 “ ह्याच का, बघा. ”

 “ अहो हीच. हेमा, किती बाई शोधायचे तुला. हे होते म्हणून सापडलीस."

 “ जातो मी. ?"

 “ आभारी आहोत आम्ही.”

 शिरोष निघून गेला. हेमा पुन्हा पळणार होती, परंतु मैत्रिणींनी तिला बळकट धरले.

 “ धरता काय ? त्यांना काही द्यायला नको का ? मी रस्ता चुकून घाबरून उभी होत्ये. त्यांनी तुमची व माझी भेट करून दिली. त्यांना काही द्यायला नकी का ?"

 "काय द्यायचे ?"

 “ ही आंगठी देऊ ?”

 “ वेडी आहेस तू. चल आता घरी. ”  हेमा एकदम मुकी झाली. मैत्रिणींबरोबर ती घरी आली. हेमा अलीकडे देवीच्या देवळात जाऊ लागली. फुलांचे हार नेई. देवीच्या गळ्यात घाली. हात जोडून मनोभावाने प्रार्थना करी. कसली प्रार्थना ? तिला काय कमी होते ?

 वर्ष संपत आले. त्या सर्व तरुण विद्याथ्र्याची परीक्षा झाली आणि परीक्षेत शिरीष पहिला आला. आपण उत्तीर्ण होऊ नये असे त्याला पूर्वी वाटे. आपण वेडीवाकडी उत्तरे देऊ असे त्याला पूर्वी वाटे, परंतु अलीकडे बाटत नसे. तो हुशार होताच. त्याने अभ्यास केला. त्याला फळ मिळाले.

 एके दिवशी पदवीदान-समारंभ झाला. स्वतः राजा यशोधर आला होता. त्याने उत्तीर्ण विद्याथ्याँस पदव्या दिल्या.शिरीषला त्याने सुवर्णपदक दिले. राजाने सर्व उत्तीर्ण विद्याथ्यास उद्देशून उपदेशपर भाषण केले :

 “ उत्तीर्ण तरुणांनो, देशातील बुद्धिमत्ता हाती यावी, देशातील सद्गुण दाती यावेत म्हणून ही परीक्षा होती. तुम्ही वर्षभर येथे होतात. तुमची वागणूक, तुमचे चारित्र्य येथे पाहिले जात होते. बौद्धिक गुणांबरोबरच तुमच्या हृदयाच्या गुणांचीही येथे पारख केली जात होती. अनेकांचे डोळे तुमच्या वतंनाकडे येथे होते. जे. तुम्ही उत्तीर्ण झाला आहात, त्यांना निरनिराळ्या कामावर हळूहळू नेमले जाईल. लक्षात ठेवा, की तुम्हाला प्रजेजी सेवा करायची आहे. जनता तुम्हाला पगार देणार, तुम्हास पोसणार. जनता तुम्हाला मान देईल, परंतु तुम्ही जनतेला मान द्या. ईश्वरासमोर एक दिवस झाडा द्यायचा आहे हे विसरू नका.”

 समारंभ संपला. उत्तीर्ण तरुण आनंदात होते. राजधानीतील सुखे भोगीत होते. इकडे तिकडे हिंडत होते, फिरत होते, परंतु शिरीष कोठे आहे ?

 तो शीतला नदीच्या तीरी बसला होता.

  ती पाहा हेमा आली.

 “ तुम्ही पहिले आलेत, होय ना ?”

 “ हो, आलो, ”

 “ तुम्हाला त्याचा आनंद नाही होत ?”

 “ माझ्या आईबापांना खरा आनंद होईल. ”  “ आणखी कोणाला होईल ?”

 “ आणखी कोणाला होईल ?”

 “ मला होईल. तुम्ही पहिले यावे म्हणून मी जगदंबेची रोज पूजा करीत होते. ”

 “ तुमचा माझा काय संबंध ?”

 “ दुस-याचे कल्याण का इच्छू नये ?”

 “ परंतु मीच पहिले यावे म्हणून का तुमचा नवस ? इतर कोणासाठी का केला नाहीत ?”

 “ मला नाही सांगता येत. मी जाते.”

 “ मी तुमच्या नवसाने पहिला आलो, की माझ्या बुद्धिमतेने ?”

 “ आणि स्वतःच्या बुद्धिमतेने आला असला, तरी ती कोणाची देणगी ? त्याची ऐट तुम्हाला कशाला ? बुद्धी हीसुद्धा देवाचीच देणगी आहे."

 “ खरे आहे. मी एक क्षुद्र जीव आहे.”

 “ परंतु क्षुद्र जीवही कोणाचा तरी देव असतो. "

 " हो, असेल, "

 “ मी जाते. आज रात्री राजधानीत दीपोत्सव आहे. तुम्ही रात्री पाहायला जाल ?”

 “ हृदयात अंधार असेल तर बाहेरचे दिवे काय कामाचे ?”

 “ तुम्ही तुमच्या हृदयात दिवा लावा. जगात सर्वत्र प्रकाश असता तुम्ही स्वतःच्या हृदयाची दारे बंद का करता ? आणि मग प्रकाश नाही म्हणून रडता का ? आपणच दिवा विझवायचा व पुन्हा अंधार आहे म्इणून रडायचे, हे बरे नव्हे. ”

 “ तुम्ही किती सुंदर बोलता ? परंतु माझ्यासाठी नवस का केलात ते सांगा."

 “ तुम्हाला नाही त्याचे उत्तर देता येत ?”

 “ नाही.”

 “ तिकडे पहिले आलेत; परंतु येथे हरलेत.”

 “ हो हरलो. सांगा ना, का केलात नवस ?”  “ तुम्हाला माहीत आहे. मी जाते. मैत्रिणी शोधीत येतील. आज रात्री जा हा दीपोत्सव पाहायला. आमच्या घराजवळही या. आमच्या घरावरही आज शेकडो, हजारो दीप लागतील. तुम्ही तुमच्या हृदयातही लावा. माझ्या घराजवळ तरी लावा. लावाल ना ?”

 "बघेन. ?"

 "मी जाते."

 ती गेली. शिरीष तेथेच होता. रात्र झाली. आकाशात लाखो दीप लागले, आणि मुक्तापूर राजधानीतही आज लाखो दीप पाजळत होते. वसतिगृहातील विद्यार्थी दीप-शोभा पाहाण्यासाठी हिंडत होते. आसपासच्या खेडेगावांतून हजारो स्त्रीपुरुष आले होते. मुकापूर राजधानीने हजारो हिरेमाणकांच्या माळाच जणू काय गळ्यात घातल्या होत्या. सुंदर प्रसन्न देखावा !

 हेमा आपल्या प्रासादाच्या पायच्यावर उभी होती. ती अलंकारांनी नटलेली होती. जणू देवतेप्रमाणे तेथे ती दिसत होतं. गर्दी येत जात होती. हेमा कोणाची वाट पाहात होती ?

 ती पाहा शिरीष आला. हा पाहा एक दिवा विझला. हेमा दिवा लावू लागली. परंतु दिवा लागेना. तिने शिरीषकडे पाहिले.

 “ शिरोष, ये. आपण दिवा लावू. ”

 “ दे, मी लावतो.”

 “ शिरोषने दिवा लावला व तो जाऊ लागला.

 “ शिरीष, दिवा विझू नको हो देऊ. राजधानीतील दिवे उद्या दिसणार नाहीत, परंतु हृदयात लागलेला दिवा कधी विझू नये....." ती म्हणाली.

करुणादेवी.djvu

शि री ष
 हे मा

♣ * * * * * * ♣ शिरीष ब हेमा ह्यांचे लग्न लागले. शिरीष आता एक प्रधान झाला होता. राहायला मोठा राजवाडा होता. सुखाला तोटा नव्हता. परंतु शिरीष सुखी होता का? आपला पती दु:खी आहे. ही गोष्ट हेमाच्या लक्षात आल्यावाचून राहिली नाही. प्रेमाला ताबडतोब सारे कळते. प्रेमाचे क्ष किरण हृदयापर्यंत जाऊन पोचतात व तेथे काय चालले आहे ते त्यांना समजून येते. प्रेमाला जशी नाडी कळते, तशी जगात कोणालाही कळत नाही.

 हेमाने एके दिवशी पतीला सर्व विचारण्याचे ठरविले. घोड्याच्या गाडीतून दोघे फिरायला गेली होती. नदीकडील रस्त्याने गाडी जात होती. एके ठिकाणी गाडी थांबवून खाली उतरून दोघे पायीच फिरत निघाली. परंतु कोणी बोलत नव्हते.

 “ शिरीष, बोलत रे का नाहीस ?”

 “ काय रोज उठून बोलायचे तरी ? ”

 “ तुला काही तरी दु:ख आहे.”

  “ आणि ते काय आहे, ते तुला माहीत आहे."

 “ शिरीष, आपण आईबाबांना अंबरगावाहून येथे आणू. ती तेथे आनंदात राहतील. त्यांना पुत्राचा उत्कर्ष पाहून अभिमान वाटेल. का नाही तू त्यांना घेऊन येत ?”

 “ हेमा, अडचणी आहेत. त्या तुला सांगता येत नाहीत. तू व मी खेड्यातच जाऊ, चल. तू आपल्या वडिलांना गळ घाल, नको ही प्रधानकी, मला माझ्या आईबापांकडे जाऊ दे, ती माझी वाट पाहात असतील. हेमा, तू दूर जाऊ नयेस असे ज्याप्रमाणे तुझ्या आईबापांस वाटते, तसे मी दूर जाऊ नये म्हणून माझ्या आईबापांस नसेल का वाटत ? तू तुझ्या आईबापांची एकटी, तसा मीही माझ्या आईबापांचा एकुलता. तू काही कर. परंतु पित्याकडून राजाला गळ घालच. माझी प्रधानकी रद्द करव. मला मुक्त कर. मी येथे कैदी आहे, दुःखी आहे.”

 “ परंतु सासूबाईंना व मामंजींना इकडे का नाही आणीत ?”

 “ तिकडे माझे मित्र आहेत. प्रेमानंद आहे. आणि.....”

 “ आणि कोण ?”

 “ असे पुष्कळ मित्र आहेत. नको विचारू.”

 “ मी विचारीन हो बाबांना.”

 “ विचार ”

 दोघे परतली. गाडीत बसून आपल्या निवासस्थानी आली. भोजन झाले आणि हेमा रात्री माहेरी गेली.

 “ बाबा, शिरीष दुःखी आहेत.”

 “ कोणते दुःख ?”

 “ ही प्रधानकी नको असे त्यांना वाटते. त्यांना खेड्यात जाऊन राहावे असे वाटते. त्याचे वृद्ध आईबाप तिकडे आहेत. ”

 “ त्यांना इकडे का नाही आणीत ?”

 “ काही अडचणी आहेत. ”

 “ कोणत्या ?"

 “ त्या ते सांगत नाहीत. ”

 “ हेमा, तुलासुद्धा येथून जावे असे वाटते का ?”

 “ शिरीषचे सुख ते माझे येथून जाण्याने त्यांना सुख होत असेल, तर मोही जाईन. मी गेलेच पाहिजे. ”

 “ मला सोडून जाणार?”

 “ बाबा, नदी पर्वताला व सागराला दोघांना कशी सुखवू शकेल? नदी सागराकडेच जावयाची. त्यातच तिची पूर्णता. ती डोंगराजवळ राहील तर तिचे जीवन होईलं का विशाल ?”  “ हेमा, तुझ्या पित्याने इतकी वर्षे तुला वाढवले, ते का फुकट ? तुझा प्रती तुला कालं परवा मिळाला. त्यांच सुख ते एकंदम तुझं सुख झाले आणि मी ? हेमा, तू नेहमी भेटावीस, दिसावीस म्हणून मी अधीर असतो. तू गेलीस तर मी दु:खी होइन.”

 " बाबा, तुम्हीही चला ना आमच्याबराबर."

 “ हेमा, कर्तव्ये अनेक असतात. कौटुबिक कर्तव्ये तशी सामाजिक. मी जुना मंत्री आहे. एकदम कसा येऊ ? आणि शिरीषनं जाणेही योग्य नाही. राजाने त्याला प्रधान केले, ते का उगीच ? प्रजेचे कल्याण नको का व्हायला ? ज्याच्या ठिकाणी जों गुण आहे ती त्याने समाजासाठी दिला पाहिजे. हेमा, तू गेलीस तर मी दु:खी कष्टी होईन. परंतु मी येथेचं राहीन. मोठे कर्तव्य करीत राहीन. आणि शिरीषविषयी मी महाराजांस विचारणार नाही ! शिरीषला प्रधानकीपासून मुंक्त करा, असे मी कसे सांगू ? हेमा, तू शिरीषची समजूत घाल. म्हणावे वृद्धांना इकडे घेऊन ये, तसे नसेल करता येत तर इलाज नाही. परंतु प्रधानपद सोडून जाण्याचा हट्टकरू नकोस.”

 हेमा दु:खीकष्टी झाली. ती जायला निधाली.

 "आता उशीर झाला आहे हेमा. येथेच नीज. ”

 “ शिरीष वाट पाहील.”

 “ अग, तू का कोठे रानात आहेस ? इतकी काय एकमेकांची वेडी बनलीत ?"

 “ बरे हो बाबा, येथे झोपते.”

 हेमा आज माहेरीच झोपली. परंतु तिला झोप येईना. तिकडे शिरीषही तळमळत होता. “ आईबापांना कसे आणू ? त्यांना आणायचे म्हणजे करुणेला नको का आणायला ? माझे लग्नं झाले आहे ही गोष्ट मी कोणाला सांगितली नाही. का बरे नाही सांगितली ? मी हेमाला फसविले. परंतु तिच्यावर माझे प्रेम आहे. आणि करुणेवर का नाही ? करुणेलाही मी विसरू शकत नाही. हेमा समोर असली, म्हणजे करुणा मनातून दूर होते. परंतु हेमा दूर जाताच करुणा सिंहासन पुन्हा बळकावते. करुणा तिकडे रडत असेल. कोण आहे तिला ? आई ना बाप. किती कोमल, प्रेमळ तिचे मन. परंतु ती कर्तव्य करीत असेल. माझ्या म्हाताऱ्या आईबापांची सेवा करीत असेल.? आणि मी ? काय करावे समजत नाही. ”

 अंथरुणावर शिरीष तळमळत होता. पहाटे त्याला झोप लागली. बाहेर उजाडले. हेमा लवकर उठून घरी आली. परंतु शिरीष झोपलेलाच होता ती शिरीषच्या बिछान्याजवळ उभी होती. पतीचे सुकलेले तोंड पाहून तिला वाईट वाटले. रात्रभर शिरीष तळमळत असेल असे तिने ताडले.

 शिरीषने डोळे उघडले, तो समोर हेमा रडत होती.

 “ ये, हेमा ये. रडू नको.”

 “शिरीष, तू जोपर्यंत दुःखी आहेस, तोपर्यंत मी रडू नको तर काय कृरू ?"

 “ परंत् मी आजपासून हसायचे ठरविले आहे. तुला सुखी ठेवणे हे माझे कर्तव्य. आईबाबा तिकड़े सुखात असतील. माझे मित्र त्यांची काळजी घेत असतील. बघतेस काय ? मी खरेच सांगत आहे.”

 “ शिरीष, माझ्यासाठी तुला त्रास”

 “ परंतु तू स्वत:चे सर्वस्व मला दिले आहेस. माझ्यासाठी त् जगदंबेची प्रार्थना करीत असस. तुझ्या प्रेमाचा:उतराई मला होऊ दे."

 “ शिरीष, माझ्या प्रेमाचा तुला का बोजा वाटतो? तुझ्यावर प्रेम केल्यावाचून मला राहावत नाही. त् मला सोडून गेलास, तरीही मी तुझ्यावर प्रेम करीन. माझे प्रेम मोबदल्याची अपेक्षा नाही करणार. शिरीष, माझ्या प्रेमाची फुले वाहायला तुझी मूर्ती मिळाली. मी कृतार्थ झाले.”

 “ उठू आता !”

 “ झोप येत असेल तर पडून राहा.”

 “ प्रजेची सेवा करणायाने निजता कामा नये. त्याने रात्रदिवस जागृत राहिले पाहिजे. उठू दे मला.”

 शिरीष उठला. आज तो उल्हसित होता. दुपारी कचेरीत गेला. शिरीषचे मुखकमल प्रसन्न पाहून आदित्यनारायणास आनंद झाला.

 “ शिरीष, बरे आहे ना ?”

 “ आनंद आहे. आजपासून मी प्रजेच्या कामात सव शक्ति ओतणार आहे."  “ शाबास, असेच कर्तव्यपरायण व्हा.”

 शिरीष आता नेहमी आनंदी असे. त्याचे दुःख दूर झाले. हेमाही आनंदली. शिरीष का आईबापांना विसरला? तो करुणेला का विसरला ? का शिरीषला वैभवाची चटक लागली ? का हेमासाठी तो वरवर हसत होता, परंतु अंतरी जळत होता ? काय होते खरे ?

 शिरीषची सर्वत्र वाहवा होऊ लागली. राजा यशोधराचे त्याच्यावर प्रेम जडले. राजधानीतील लोक शिरीषची मूर्ती दृष्टीस पडताच प्रणाम करीत: पतीची कीर्ती ऐकून हेमाचे पोट भरून येई.

 “ शिरीष जिकडे तिकडे तुझे नाव. परंतु माझे कोठेच नाही !” ती हसून म्हणाली.

 “ परंतु माझ्या ओठांवर तुझे नाव असते. लोक माझी पूजा करतात. परंतु मी तुझी करतो. खरे ना !” तो म्हणाला.


करुणादेवी.djvu
दुः खी
क रु णा

♣ * * * * * * ♣ शिरीष गेल्यापासून करुणा हसली नाही. तिचा चेहरा उदास असे, गंभीर असे. ती घरचे सारे काम करी. सासूसासऱ्यांची सेवा करी. रात्री अंथरुणावर पडली म्हणजे मात्र तिला रडू आल्याशिवाय राहात नसे.

 करुणा एकटी मळ्यात काम करी. परंतु तिच्याने कितीसे काम होणार ? पूर्वी दोघे होती, तेव्हा मळा चांगला पिके. आता पीक येत नसे. मजूरीने माणसे लावायला पैसे नसत. घरी नांगर ना बैल. कोणाचा बैल, कोणाचा नांगर मागावा ! कसे तरी करून करुणा गाडा हाकीत होती.

 परंतु हळूहळू कर्ज झाले. मळा गहाण पडला. शेवटी तो सावकाराच्या घशात गेला. आता कोठली बाग, कोठली फुले ? करुणा आता दुस-याकडे मोलमजूरी करी. कोणाच्या शेतात खपे. कोणाच्या घरी दळणकांडण, कोणाची धुणी करी आणि सासूसासऱ्यांचे पोषण करी. करुणेच्या जवळ आता काही नव्हते. सोन्याचांदीचा दागदागिना नव्हता. अंगावर फुटका मणीसुद्धा नव्हता. तिच्या नेसूच्या चिध्या असत. गरीब बिचारी ! परंतु स्वतःचे दु:ख उगाळीत बसायला तिला वेळ नसे. तिच्यावर जबाबदारी होती. पतीने सूर्यनारायणाची साक्ष घ्यायला लाविली होती. सासूसासऱ्यांचे पालन तिला करायचे होते. ती दिवसभर राब राब राबे. कधी रानात जाई व मोळी घेऊन येई. कधी रानात जाई. व करवंदे विकायला आणी. किंती कष्ट करी !

 परंतु कष्टाचे चीज होत नव्हते. सासूसासरे तिच्यावर रागावत. हीच पांढऱ्या पायांची अवदसा आहे, असे ती म्हणत. एके दिवशी नित्याप्रमाणे, करुणा सासूबाईंचे रात्री पाय चेपीत होती. सासू एकदम ओरडली “नको चेपू पाय. तुझे हात लावू नकोस. तू माझा मुलगा दवडलास. तू तुझे आईबाप लहानपणी खाल्लेस आणि आम्हाला छळायला आलीस. तुला मूळबाळही होईना. वांझोटी, म्हणून गेला माझा बाळ. वैतागून गेला. हो चालती, कर तोंड काळे. सेवा करण्याचे सोंग करते सटवी. रानात जाते मोळी आणायला. रानात चोरून खात असशील, कोणाला मिठ्या मारीत असशील, नीघ. रडते आहे. झाले काय रडायला ? सोंगे करता येतात.”

 सावित्रीसासू वाटेल ते बोलली. करुणा अश्रु ढाळीत होती. ती पुन्हा पाय चेपू लागला. तो त्या वृद्ध सासूने लाथ मारली. अरेरे!

 करुणेचे आचरण धुतल्या तांदळासारखे होते. तरीही सासू नाही नाही ते बोलत असे. इतर सारी बोलणी करुणा सहन करी. परंतु पातिव्रत्यावर, सतीत्वावर टीका तिला खपत नसे. त्या रात्री तिला झोप आली नाही.

 एके दिवशी तो प्रेमानंदाकडे गेली.

 “ काय करुणा, काय काम ?” त्याने विचारले.

 “तुम्ही शिरीषचे मित्र. तुम्ही मला प्रतिज्ञेतून मोकळे करता का ? तुम्ही त्या दिवशी साक्षी होतेत. अत:पर जगावे असे मला वाटत नाही. सासूसासऱ्यांची मी सेवा करीत होते. पतीची आज्ञा होती. परंतु सासूबाई वाटेल ते बोलतात. माझ्या निर्मळ, निर्दोष शीलावरही शितोडे उडवतात.प्रेमानंद, मी इतर सारे अपमान गिळीत होते. मारहाण सहन करीत होते. परंतु प्राणाहून प्रिय असे पातिव्रत्य त्याच्यावरच प्रहार झाला तर मी कशी जगू ? तुम्ही त्यांचे मित्र. तुम्ही सासूबाई व मामंजी ह्यांची काळजी घ्या. मला जाऊ दे जगातून. दळभद्री, कपाळकरंटी मी. कशाला जगू ? पतीला दिलेल्या शब्दासाठी जगत आहे. प्रतिज्ञापूतिसाठी, घेतलेल्या शपथेसाठी जगत आहे. सांगा, कृपा करा. मला मुक्त करा.”

 “ करुणे, जग काही म्हणो, आपले मन शुद्ध असले म्हणजे झाले. आपलेच मन जर आपणास खात असेल तर गोष्ट निराळी. तू आपली शपथ पाळ. सूर्यनारायणाला डोळे आहेत. तो तुझ्या चारित्र्याकडे पाहात आहे. मानवांना घेऊ दे शंका, प्रभू घेणार नाही. समजलीस ? जा. सेवा चाकरी करीत आहेस तशीच कर. देव तुझ्यावर प्रसन्न होईल. तुझी तपश्वर्या फळेल. तू सुखी होशील. जा, नको रडू. मी सुखदेव व सावित्रीबाई ह्यांना सांगेन हो.”

 करुणा रानात गेली. मोळी तोडून दमली. एका ठिकाणी रडत बसली. तेथे तला झोप लागली. मोळीवरच डोके ठेवून ती निजली. तिला एक सुंदर स्वप्न पडले. शिरीष आपले अश्रू पुशीत आहे, केसात फूल खोवीत आहे. ‘ उगी, रडू नको, आता हस, ’ असे सांगत आहे असे तिने पाहिले, ऐकले. गोड मधुर स्वप्नात हसत होती. इतक्यात पाखरांचा एकदम किलबिलाट झाला. करुणा जागी झाली. पाखरांचा कलकलाट सुरू होता. काय झाले ? का घाबरली ती पाखरे ? कोणी पारधी तर नाही ना आला ? कोणी शिकारी तर नाही ना आला ? का त्या पाखरांना सर्प दिसला ? काय झाले ?

 तिला काही समजेना. तिने इकडे तिकडे पाहिले. नव्हता शिकारी, नव्हता साप. ती उठली. मोळी डोक्यावर घेऊन निघाली. ऊन मी म्हणत होते. तिचे पाय चट चट भाजत होते. तिने पळसाची पाने पायांना बांधली. मोळी घेऊन ती गावात आली. परंतु तिची मोळी कोणी विकत घेईना.

 “ करुणे, ये, तुझी मोळी मी विकत घेतो.”

 प्रेमानंदाचे ते शब्द होते. त्याने तिला दोन शेर दाणे दिले. मोळी टाकून करुणा घरी गेली.

 “ करुणे, आम्हाला का उपाशी मारणार आहेस तू ? किती उशीर !” सासू म्हणाली.

 “ सासूबाई, घरात दाणे नव्हते. तुम्हाला खायला तरी काय देऊ ? मी मोळी घेऊन आल्ये. परंतु कोणी विकतही घेईना. गावात हिंड हिंड हिंडले. शेवटी मोळी विकून हे दोन शेर दाणे आणले. आता दळते व देत्ये हो भाकरी करून. रागावू नका. भूक लागली असेल तुम्हाला. परंतु मी तरी काय करू ?"

 करुणेने दाणे पाखडले. ती दळायला बसली. ती थकलेली होती, परंतु तिला कोठला विसावा ? दोघांपुरते पीठ दळून ती उठली. तिने चूल पेटविली. म्हाताऱ्यास कढत कढत भाकर तिने वाढली. नंतर थोडा तुकडा खाल्ला.

 सासूबाई अलीकडे फार बोलत नसत. जणू त्यांनी मौन धरले. पूर्वी, शिव्याशाप, आता अबोला. परंतु करुणेला आता सर्व सवय झाली होती. सारे अंगवळणी पडले होते. येईल दिवस तो काढायचा असा तिने निश्चय केला होता.

 परंतु त्या वर्षी दुष्काळ आला. कित्येक वर्षात असा दुष्काळ पडला नव्हता. राजा यशोधराने ठायी ठायी असलेली सरकारी कोठारे मोकळी केली. लोकांना धान्य वाटले जाऊ लागले. राजाच्या धान्यागाराजवळ भाणसांची मुंग्यांसारखी राग लागे.

 गावोगावची पेवे उपसली गेली. सावकार, जमीनदार ह्यांनी कोठारे मोकळी केली. एकमेकांस जगवू असे सारे म्हणत होते. मोठी कठीण दशा. गायीगुरे तडफडून मरण पावू लागली. गुराना ना चारा ना पाणी. नद्या आटल्या. तळी आटली. लोक म्हणत समुद्रसुद्धा आटेल.

अंबर गावापासून कोसावर एक मोठा विहीर होती. तिला फक्त पाणी होते. अपरंपार पाणी. मुसळासारखे त्या विहिरीला झरे होते. तेथे माणसांची झुंबड होई. माणसे, गायीगुरे, पशुपक्षी ह्यांची गर्दी तेथे असे. करुणा लांबून घडा भरून घरी आणी.

 एकदा करुणा घडा घेऊन येत होती. वाटेत एक गाय पडली होती. तिला चालवत नव्हत. ती तहानली होती. त्या गोमातेने करुणेकडे पाहिले. करुणा कळवळलली, ती आपला घडा घेऊन गायीजवळ गेली. परंतु गायीचे तोंड घड्यात जाईना. इतक्यात करुणेला युक्ती सुचली. तिने एक दगड घेऊन हळूच वरचा भाग फोडला आणि रुंद तोंडाचा तो धडा गायीसमोर ठेवला. गाय पाणी प्यायली. शेवटचे पाणी. करुणेकडे प्रेमाने ब कृतज्ञतेने पाहात गोमातेने प्राण सोडले !

 “ घडा कसा फोडलास ?” सासूने विचारले.

 “ गायीला पाणी पाजण्यासाठी. ” तिने सांगितले.

 “ आम्ही इकडे पाण्यासाठी तडफडत होतो. तुला गायी-म्हशी आमच्याहून प्रिय. आम्हाला मारून तरी टाक. आणि तो घडा जुना  होता. किती तरी वर्षांचा. तो का फोडायचा ?” सासू बोलत होती. करुणेने दुसरा घडा घेतला व लांबून त्या विहिरीवरून तिने भरून आणला. तिने सासूसासऱ्याना पाणी पाजले. नित्याप्रमाणे तिने त्यांची सारी सेवा केली.

 धान्य आता मुळीच मिळेनासे झाले. करुणा कोठून तरी, काही तरी आणी व सासूसासऱ्यास दोन तुकडे देई. ती कोठून कोंडा आणी, कण्या आणी. रानातून कधी ओला पाला आणी. काहीतरी करी व सासूसासयांना जगवी.

 “ करुणा, कसली ही भाकरी ! घाणेरडा कोंडा, हा का खायला घालणार आम्हाला ? तू मागून जेवतेस. तुझ्यासाठी चांगली करीत असशील भाकरी, म्हणन तर टुणटुणीत आहेस. बाळ शिरीष कोठे रे आहेस तू ? परंतु ही कैदाशीण घरात आहे, तोपर्यंत तू नाही येणार. अस, बाळ. कोठेही सुखात अस !” असे सासू बोलत होती.

 करुणेचे डोळे घळघळू लागले. खरोखर, दोन दोन दिवसांत तिला घास मिळत नसे. जे काही मिळे, ते आधी ती सासूसासऱ्यास देई. तरी ही अशी बोलणी. तिची सत्त्वपरीक्षा चालली होती.

 एके दिवशी सरकारी दुकानावर करुणा गेली होती. तिथे अपार गर्दी. केव्हा येणार तिची पाळी ? आणि ही काय गडबड ? अरेरे ! ती पाहा एक गरीब स्त्री ! तिचे दिवस भरले होते वाटते ! अरेरे ! गर्दीत धक्काबुक्की होऊन ती तेथेच बसली आणि प्रसूत झाली ! दुष्काळात बाळ जन्माला आले. कशाला आले ?

 करुणेने त्या भगिनीची व्यवस्था केली. तिला सावरले. तिला एका झोपडीत तिने पोचविले. ती परत आली. रात्र होत आली. दुकान बंद होत होते.

 “ मला द्या हो दाणे. मी त्या बहिणीला पोचवायला गेल्ये होत्ये. द्या हो दादा.”

 “ आता उद्या ये. आम्ही थकलो.”

 “ सासूसासरे उपाशी आहेत. द्या. मी एकटीच आहे येथे आता. गर्दी नाही. राजा यशोधराच्या राज्यात का दया उरलीच नाही ?”  “ यशोधर गादीवर आहेत, म्हणून तर इतकी व्यवस्था. सर्वत्र दुष्काळ, ते तरी काय करतील ? प्रधान शिरीष ह्यांनी दुस-या देशांतूनही धान्य आणण्यासाठी हजारो बैलगाड्या पाठवल्या आहेत. स्वतः यशोधरमहाराज एकदा चार घास खातात. प्रजा पोटभर जेवेल. त्या दिवशी मी पोटभर जेवेन असे त्यांनी राजधानीत जाहीर केले. राजधानीतील मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्याही घरी दोन चार दिवसांना पुरेल इतकेच धान्य असते. महाराजांचे थोर उदाहरण सर्वासमोर आहे. तरी त्यांना तू नावे ठेवतेस ? पातकी आहेस !” तो अधिकारी म्हणाला.

 “ कृपा करा दादा. दुःखामुळे मी बोलल्ये. महाराज यशोधर पोटच्या पोराप्रमाणे प्रजेला जपतात. आणि म्हणून तर तुमच्यासमोर मी पदर पसरत्ये. तुम्ही महाराजांचे सत्त्व जाऊ देऊ नका. त्यांच्या नावास कलंक लावू नका. मी तुमची अनाथ मुलगी आहे.”

 लावलेले दुकान पुन्हा उघडून करुणेला चार पायल्या धान्य मिळाले. त्यांना दुवा देत ती निघाली. चार पायल्या धान्य मिळाल्यामुळे तिला आनंद झाला होता. तिच्या दुबळ्या पायांत त्या आनंदामुळे शक्ती आली होती. रस्त्यात अंधार होता. परंतु कर्तव्याचा प्रकाश तिला पंथ दाखवीत होता.

 परंतु कोण येत आहे ते अंधारातून ? चोर की काय ? होय. तो चोरच होता. त्याने एकदम करुणेच्या डोक्यावरचे पोते ओढले. करुणा चमकली. पोत्याची ओढाताण सुरू झाली. चोर ते घेऊन पळून गेला. करुणेची सारी शक्ती गेली. आता घरी त्या म्हाताच्यांना तोंड कसे दाखवायचे ? परंतु ती उठली. अंधारात तशीच निराशेने निघाली. घरी आली. ती दोन पिकली पाने फटकुरावर पडलेली होती.

 “ करुणे, मिळाले का काही ?” सासयाने विचारले. तिने सारी कथा सांगितली. त्या म्हाताऱ्याने सुस्कारे सोडले. तिने त्यांना घोटघोट पाणी पाजले. तीहीं पाणी पिऊन पडली.

 दुस-या दिवशी सकाळी ती प्रेमानंदाकडे गेली.

 “ काय करुणे, म्हातारी कशी आहेत ?” “ प्रेमानंद चार दिवसांत घासभरही अन्न मिळाले नाही. काल मला रात्री धान्य मिळाले. मी येत होते. चोरांनी ते लुटले. मी काय करू ? तुम्ही त्यांचे मित्र. काही मदत करा. तुमच्याजवळ मागायला संकोच वाटतो. परंतु इलाज नाही. माझे प्राण त्यांना खायला घालता आले असते, तर घातले असते. परंतु बोलून काय उपयोग ?”

 “ करुणे, हे घे थोडे धान्य. आत खूप कोंडा आहे. तो पाखड. निघतील चार मुठी दाणे. ते त्या म्हाताऱ्याना शिजवून घाल हो. काळ कठीण आहे खरा. एकमेकांना शक्य तो जगवायचे. ”

 ते भुसकट घेऊन करुणा घरी आली. पडवीत सूप घेऊन ते भुसकट ती पाखडू लागली. कोंडा उडत होता. दाणा मागे राहात होता. दाणे पाखडता पाखडता ती गाणे म्हणू लागली.

  “ फटकं फटक फटक !"

 सुपाचा आवाज होत आहे. कोंडा उडत आहे. निःसत्त्व क्षुद्र कोंडा उकिरड्यावर फेकण्याच्या लायकीचा कोंडा.

  " फटक फटक फटकं !"

 “ मीही ह्या कोंड्यासारखी आहे. दैव मला पाखडीत आहे. उकिरड्यावर मला फेकीत आहे. मी निराश आहे. मी दु:खी आहे. मी दुबळी, नि:सत्त्व आहे. मी कोणालाही नको. आईबाप मला सोडून गेले, पती मला सोडून गेला. सासूसासरे नावे ठेवतात. कोण आहे मला ? कोंडा, कोंडा. कोंड्यासारखे माझे जीवन. फुकट, फुकट.”

 "फटक फटक्त फटक्र ! "

 अशा अर्थाचे ते गाणे होते. करुण करुण गाणे. दाणे पाखडून झाले. ते तिने दळले. तिने त्या पिठाची पातळसर लापशी केली. सासूसासऱ्यास पाजली. त्यांनी प्रेमाने व कृतज्ञतेने तिच्याकडे पाहिले. किती तरी दिवसांनी इतक्या मायाममतेने त्या वृद्धांनी सुनेकडे पाहिले !

 “ करुणे, धन्य आहे तुझी. तुझे ते गाणे ऐकून दगडालाही पाझर फुटेल. आम्ही तर माणसे आहोत. करुणे, तू कोंडा नाहीस. तू टपोरे मोती आहेस. मोलवान् पृथ्वीमोलाचे मोती. आम्हाला तुझी पारख झाली नाही. कोंबड्यांना कोंडा कळतो. मोती काय कळणार ? तुला आम्ही वाटेल ते बोललो. तुला छळले. तू सारे सहन केलेस. तुझ्या पवित्र पातिव्रत्यावरही शितोडे उडवले. अरेरे ! झडो माझी जीभ. करुणे, तू किती कष्ट करतेस. सारे आमच्यासाठी. तू रानावनात जात असस. पायांना तुझ्या फोड येत. हातांना लाकडे तोडून घट्टे पडत आणि वाटेल ते बोलून तुझ्या हृदयासही आम्ही घरे पाडीत असू. तू उपाशी राहून आम्हाला जगवीत होतीस. तू कोंडा खाऊन आम्हास चांगले देत होतीस. तरी मी तुला उलट म्हणत असे, की तूच चांगले खातेस, आमची उपासमार करतेस. मुली ! क्षमा कर आम्हाला. पुत्रवियोगाच्या दुःखामुळे तुला बोलत असू. आमचा बाळ गेला. आम्हाला विसरला. तूच आता आमचा मुलगा. तूच आधार. ये अशी जवळ ये. तुझ्या डोक्यावरून हात फिरवू दे. तुझे अश्रूपुसू दे. ये, ये हो जवळ, ”

 आणि त्या वृद्ध दुर्बळ सासूने सुनेला जवळ ओढून घेतले. करुणेने सावित्रीबाईच्या वक्षःस्थलावर डोके ठेवले. तिला हुंदके आवरत ना.

 “ उगी. नको हो रडू बाळ. उगी उगी. तुझे सारे चांगले होईल. शिरीष तुला भेटेल. आमचे आशीर्वाद आहेत हो तुला. तू सुखी होशील. अमावास्येची पौर्णिमा होईल. दुर्दैव जाऊन सुदैव फुलेल हो,"

 किती तरी दिवसांनी अशी प्रेमळ, अमृतमय वाणी करुणेच्या कानी आज पडत होती. धान्यपाण्याचा दुष्काळ ह्या वर्षी होता; परंतु शिरीष गेल्यापासून करुणेच्या जीवनात प्रेमाचा, सहानुभूतीचा, सदैव दुष्काळच होता. तिला एक थेंबही मिळत नव्हता. ती किती तरी दिवस प्रेम व सहानुभूती ह्यांची भुकेली होती. आज तो दुष्काळ संपला. बाहेरचा दुष्काळ अद्याप होता. पाऊस अजून पडायचा होता. मेघ यायचे होते. परंतु करुणेच्या जीवनात आज प्रेमाचे दोन मेघ आले. सासूबाईंनी तिला प्रेम पाजले. तिने त्यांना पेज दिली, परंतु त्यांनी तिला माया ममता दिली इतक्या वर्षाचे श्रम सफल झाले. सासूसासच्यांनी वाहवा केली. प्रेमाने पाठीवरून हात फिरविला. दुःखी करुणा प्रसन्न झाली. 
सा सू सा स ऱ्यां ची
स मा धी

♣ * * * * * * ♣ दुष्काळ संपला होता. देवाला करुणा आली. आकाश भरभरून आले. पाऊस मुसळधार पडला. तहानेलेली पृथ्वी भरपूर पिऊ लागली. नद्या नाले भरले. वापी तडाग भरले. लोकांची हृदयेही आनंदाने भरली.

 राजा यशोधराने दुसच्या देशांतून बैल वगैरे आणून गावागावांना मोफत बी-बियाणे पुरविले. पृथ्वी हिरवी दिसू लागली. गायीगुरे चरू लागली. परागंदा पाखरे पुन्हा येऊ लागली. गाऊ लागली. शेतकरी शेतात दिसू लागले. लवकर येणारे धान्य पेरले गेले. बाजरी, मकई बरीच पेरली गेली.

 सुबत्ता आली. धान्य पिकले. करुणा सासूसासऱ्यास आता पोटभर जेवण वाढी. त्यांचे पाय चेपी. तिने आपल्या मजुरीतून दोन नवीन घोंगड्या विकत घेतल्या. एक मामंजीच्या खाली तिने घातली. एक सासूबाईंच्या. ती म्हाताऱ्यांची दाई बनली, आई बनली.

 परंतु ती पिकली पाने आता गळणार असे दिसू लागले. सासूबाई एके दिवशी आंग धुऊन येत होत्या. तो त्या धपकन् पडल्या. करुणा त्या वेळेस घरात नव्हती. सासऱ्यानेच उठून सावित्रीबाईस घरात आणले, परंतु सावित्रीबाईस शुद्ध येईना.

 दुपारी करुणा घरी आली, तो हा प्रकार. ती धावत प्रेमानंदाकडे गेली. प्रेमानंद कसली तरी मुळी घेऊन आला. एक मात्रा घेऊन आला. परंतु कशाचा उपयोग नव्हता. सासूबाई देवाघरी निघून गेल्या होत्या.

 आता वृद्ध सुखदेव राहिले. तेही जणू आपली वाट पाहात होते.  “ ती गेली. आता मलाही बोलावणे येईल. करुणे, तू जा. तुला देव आहे. शिरीष तुला भेटेल. निराश नको होऊ. मरणोन्मुख माणसाचा मनापासून दिलेला आशीर्वाद खोटा नाही होणार.” ते करुणेला म्हणत.

 एके दिवशी सकाळी उठून सूर्यनारायणाला नमस्कार करताना सुखदेवांचे प्राण देवाघरी निघून गेले. जरा छातीत कळ आली आणि स्रारे खलास.

 सासूसासरे, दोघे गेली. करुणा एकटी राहिली. ती कर्तव्यातून मुक्त झाली होती. जी शपथ तिने घेतली होती, ती तिने अक्षरशः पाळली होती. परंतु अद्याप एक कर्तव्य राहिले होते. शेवटचे कर्तव्य.

 त्या काळात मृतांच्या अस्थीवर लहानशी चार दगडांची समाधी बांधण्याची प्रथा होती. राजे-महाराजे प्रचंड समाध्या बांधीत. गोरगरीब चार दगड तरी उभारीत. जेथे मृतांना जाळले, पुरले, त्या जागेवर पाय पडू नयेत म्हणून ही व्यवस्था ! गावोगाव अशा लहानमोठ्या समाध्या दिसत असत. चबुतरे दिसत असत. कृतज्ञतेच्या त्या कोमल पवित्र खुणा होत्या.

 परंतु करुणा कशा बांधणार समाध्या? ती गरीब होती. राहाते घरही गहाण होते. कोठून मिळणार कर्ज ? मोलमजुरीतून कितीसे उरणार? ते किती पुरणार? अश्रूची बांधता आली असती, तर अमर समाधी तिने बांधली असती. मोत्यांसारखे अश्रू. परंतु त्यांची कशी बांधणार समाधी? अश्रूची आरसपानी समाधी हृदयांगणात बांधता येईल. परंतु जगाच्या आंगणात दगडाधोंड्यांचीच समाधी हवी.

 करुणेने निश्वय केला. दगडाधोंड्यांची समाधी बांधण्याचा तिने निर्धार केला. दिवसभर ती पोटासाठी काम करी. परंतु रात्री ती मोकळी असे. ती रात्री उठे, जंगलातून, रानातून हिंडे, सुरेख दगड गोळा करीत हिंडे. गुळगुळीत चपटे दगड. तिला भीती वाटत नसे. अस्वलालांडग्याची, तरसावाघाची तिला भीती वाटत नसे. भुताखेताची, खवीससमंधाची तिला भीती वाटत नसे.

 एखादा सुरेखसा दगड सापडला, की तिला आनंद होई. कधी कधी चांदणे असावे आणि त्या चांदण्यात करुणा दगड वेचीत हिंडे. थकून भागून चांदण्यातच उशाला दगड घेऊन ती रानात निजे. चंद्र तिच्यावर अमृतमय किरणांची वृष्टी करी. वृक्ष तिच्यावर सुगंधी पुष्पांची वृष्टी करीत. आणि पहाटे वनदेवता मग हळूच तिच्या डोळ्यांना दवबिंदूंचे पाणी लावून तिला उठवी. पाखरे गाणी गात आणि करुणा माघारी जाई.

 दगड बरेच जमा झाले. दोन लहानसे चबुतरे आता बांधता येतील, असे करुणेला वाटले. तिने एके दिवशी माती खणली. गारा तयार करण्यात आला. तिने माती तुडविली. मातीत भाताचा भुसा वगैरे तिने घातला होता. गारा पक्का होऊ दे.

 आज रात्री समाधी बांधण्याचा आरंभ ती करणार होती. दोन्ही समाधींचा एकदम आरंभ. ती एक दगड सासऱ्याच्या समाधीसाठी लावी. दुसरा सासूच्या. दोन्ही समाध्या एकदम पुऱ्या झाल्या पाहिजेत. तोंडाने गाणे म्हणत होती. तन्मय झाली होती.

 एका रात्रीत ते काम थोडेच पुरे होणार ! दोन तीन रात्री गेल्या. अद्याप समाध्या अपुऱ्या होत्या. दगड कमी पडणार वाटते ?

 त्या रात्री करुणा सारखे ते बांधकाम करीत होती. दगड संपले. आज काम पुरे करायचेच, असे तिने ठरविले होते. ती दगड धुंडीत निघाली. सापडला की आणीत होती. परंतु थकली. त्या अपूर्ण समाधीजवळ ती घेरी घेऊन पडली ! कर्तव्यपरायण करुणा !

 ती गाढ झोपेत होती, की बेशुद्ध अवस्थेत होती ! बेशुद्ध नाही. झोप आहे. श्वास चालला आहे. झोप हो, करुणे ! भूमातेच्या मांडीवर जरा झोप. धरित्रीआई तुझे काम पुरे करील. ती धावून येईल.

 आणि खरेच धरित्रीमाता आली. मुलीच्या मदतीला आली. सीतादेवीला पोटाशी धरणारी धरित्रीमाता आली. करुणेच्या स्वप्नात धरित्रीमाता आली व म्हणाली, “ मुली, थकलीस हो तू. धन्य आहेस तू. तुझ्यासारखी कर्तव्यपरायण मुलगी मी पाहिली नाही. किती आजपर्यंत श्रमलीस, कष्टलीस. झोप हो तू, तुझ्या समाध्या मी पुऱ्या करविते. मी नागोबा व वाघोबा ह्यांना सांगते, की जा रे त्या समाध्या नीट बांधा. सुंदर बांधा. करुणे, तु सकाळी उठशील तो समाध्या बांधलेल्या असतील. चिंता नको करू. झोप जरा. माझ्या मांडीवर झोप.”  आणि खरेच नागोबा व वाघोबा आले. त्या दोन्ही समाध्या ते बांधू लागले. वाघाने दगडांवर आंग घासून घासून ते आरशासारखे गुळगुळीत केले. नागोबा लांब होई, मोज माप करी, अंगाचा गुण्या करी.

 “ नागोबा, कशा आकाराच्या बांधाव्या रे ?”

 “ वाघोबा, कमळाकृती बांधाव्या. अष्टपत्री बांधाव्या. जणू भूमातेच्या पोटातून वर आलेली सुंदर पाषाणमय कमळे.”

 मनोहर अशा दोन कमळाकार समाध्या बांधून नागोबा व वाघोबा गेले. त्या समाधींची वृक्षवेलींनी पूजा केली. वाऱ्याने स्तुतिस्तोत्रे म्हटली. त्या समाधींची निसर्गाने पहिली पूजा केली.

 उजाडले. दिशा फाकल्या. सूर्याचे प्रेमळ किरण अंगास लागून करुणा जागी झाली. जणू प्रेमळ पित्याने जागे केले. करुणा उठली. जणू स्वप्नसृष्टीतून उठली. तिचे हृदय आनंदाने, सुखाने भरून आले होते. जणू ती माहेरून आली होती. आईचा हात अंगावर फिरून आली होती.

 ती समोर पाहू लागली, तो त्या सुंदर समाध्या पूर्ण झालेल्या ! आजूबाजूस इवलीही घाण नाही. दगडधोंडा उरलेला नाही. मातीचा गारा पडलेला नाही. सारे स्वच्छ व सुंदर, ती अनिमिष नेत्रांनी समाध्यांकडे पाहात होती. खरेच का भूमातेने ह्या पुऱ्या केल्या ? तिने त्या समाधींस हात लाविला. तो त्या खऱ्या होत्या. स्वप्न नाही. भ्रम नाही.

 तिने त्या समाधीस प्रदक्षिणा घातल्या, आणखी रानफुले घेऊन आली. पिवळी, निळी, पांढरी फुले. वेलींच्या दोरात ती फुले गुंफून तिने माळा केल्या. त्या समाधीवर तिने त्या रमणीय माळा घातल्या. तिने भक्तिमय प्रणाम केला, आणि ती निघाली.

तिचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते. तिचे जीवन आनंदाने ओसंडत होते. कोणाला सांगू हा आनंद ? कोणाला दाखवू? हा आनंद मी एकटी कशी भोगू? शिरीष, कोठे रे आहेस तू? ये, ये. तुझा हात धरून तुला तिकडे नेते. परंतु शिरीष लांब लांब शेकडो कोस दूर होता.

 परंतु शिरीषचा मित्र आहे. प्रेमानंद आहे. करुणा प्रेमानंदाकडे प्रसन्न वदनाने निघाली. दु:खी कष्टी करुणा आज इतकी आनंदी का ते लोकांस कळेना. खी-पुरुष तिच्याकडे पाहात होते.  “ प्रेमानंद, ” करुणेने हाका मारल्या.

 “ काय करुणे ?”

 “ प्रेमानंद, आनंदाची वार्ता. मी त्या दोन समाध्या बांधीत होते ना. त्या अकस्मात रात्री पुऱ्या झाल्या. मला रात्री तेथे झोप लागली. स्वप्नात भूमाता आली व म्हणाली ‘रडू नको, नीज. माझे नागोबा व वाघोबा तुझे काम पुरे करतील.' प्रेमानंद, खरेच त्या पुऱ्या झाल्या आहेत. सुंदर समाध्या. येता बघायला ? चला."

 प्रेमानंद निघाला. गावात सर्वत्र ही बातमी गेली. सारा गाव निघाला, स्त्री-पुरुष, लहान-थोर सर्व निघाले. जणू यात्राच,होती. जणू मोठा उत्सवच होता. सर्व मंडळी त्या ठिकाणी आली. त्या सुंदर समाध्या पाहून सर्वांनी हात जोडले. सर्वांनी त्या समाध्यांवर फुलं उधळली.

 “ धन्य आहे ही करुणा, " असे सारे म्हणाले. करुणेचे कौतुक करीत गाव माघारा गेला. करुणा एकटीच हळूहळू धरी आली. ती एकटी बसली होती. आया-बाया आल्या. तिच्याभोवती जमल्या. तिची स्तुती करू लागल्या. ज्याच्यावर देवाची कृपा होते त्याच्यावर जगाची होते.

 करुणेला आता काही कमी पडत नसे. सावकाराने तिचे घर तिला दिले. मळा ज्याने घेतला होता त्याने तो परत दिला, कोणी तिला सुंदर रेशमी वस्त्रे भेट म्हणून आणून देत. कोणी अलंकार अर्पीत. कोणी बायका आपली मुले आणीत व तिच्या पायांवर घालीत. करुणा अंबरगावची जणू देवता बनली.

 परंतु देवता दुःखीच होती. देवतेचा देव कोठे होता ? शिरीष ! कोठे आहे शिरीष ? जुन्या बागेतील शिरीष वृक्षाची फुले घेऊन करुणा म्हणे, “फुलांना, सांगा रे शिरीष कोठे आहे तो. तुमच्यासारखाच तो सुकुमार आहे. प्रेमळ व कोमल आहे. परंतु आज का तो दगडासारखा झाला, लोखंडासारखा झाला ? शिरीष, ने रे मला. भेट मला. तू मला म्हणाला होतास, की तुझे प्रेम मला खेचून आणील. का बरे माझे प्रेम शिरीषला खेचून आणीत नाही ? माझे प्रेम कमी का पडते ? शिरीषाच्या फुलांनो,
करुणादेवी.djvu
तुम्ही मला प्रिय आहात. कारण शिरीषचे नाव तुम्हाला आहे. त्याने "हया केसात शिरीष फूलच जाताना खोवले होते.”

 एके दिवशी रात्री एकटीच करुणा त्या समाधींजवळ वसली होती.विचारात रंगली होती. तिने शेवटी त्या समाधींना प्रार्थना केली :

 "पवित्र आत्म्यांनो, प्रेमळ आत्म्यांनो ! मी जर तुमची मनोभावे सेवा केली असेल, कधी कंटाळल्ये नसेन, कर्तव्यात टंगळमंगळ केली नसेल तर माझा पती मला परत भेटवा. शिरीष जेथे असेल तेथे त्याला स्वप्नात सांगा की जा, करुणा रडत आहे. तिला जाऊन भेट. पवित्र आत्म्यांनो, ह्या मुलीची ही प्रार्थना पुरी करा.”

 समाधीना फुले वाहून ती घरी आली. ती अंथरुणावर पडली. शांत झोपली. जणू आपली प्रार्थना ऐकली जाईल ह्या विश्वासाने ती झोपली होती. आज तिला लवकर जाग आली नाही. किती तरी दिवसात अशी शांत झोप तिला लागली नव्हती. आणि पहाटे पहाटे स्वप्न पडले. सासूसासरे शिरीषला हाताला धरून आणीत आहेत, असे तिने पाहिले. ती लाजली आणि स्वप्न भंगले. प्रेमात गलेले स्वप्न भंगले. परंतु पहाटेची स्वप्ने खरी ना होतात ?


करुणादेवी.djvu

स चिं त
शि री ष

♣ * * * * * * ♣ शिरीषची सर्वत्र स्तुती होत होती. दुष्काळात त्याने फारच मेहनत घेतली. राजा यशोधराने खास दरबार भरवून शिरीषचा सन्मान केला. अधिकारी असावेत तर असे असावेत, असे राजा म्हणाला.

 आदित्यनारायण आता वृद्ध झाले होते. त्यानी आता मंत्रीपद सोडण्याचे ठरविले. एके दिवशी ते राजाकडे गेले व प्रणाम करून म्हणाले, “ महाराज, आता काम होत नाही. नवीन तरुण मंडळीस वाव द्यावा. मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मोकळे करावे.”

 “ आदित्यनारायण, तुम्ही पुष्कळ वर्षे सेवा केलीत. तुम्हाला आता विश्रांती हवी. मी तुम्हाला मुक्त करतो. परंतु आम्हाला वेळप्रसंगी पोक्त सल्लामसलत देत जा. तुम्ही अनुभवी थोर माणसे.”

 “ मी केव्हाही सेवेस सिद्धच आहे.”

 “ परंतु तुमची जागा कोणाला द्यावी ? शिरीषांना दिली तर बरे होईल का ?”

 “ महाराज, शिरीष माझे जावई. तेव्हा मी काय सांगू ? परंतु मी खरेच सांगतो, त्यांच्यासारखा कर्तव्यदक्ष मंत्री मिळणार नाही रात्रंदिवस ते प्रजेची चिता वाहातात. दुष्काळात ते एकदाच खात. एकदा. हेमाने घरात काही गोड केले. परंतु ते रागावले. त्यांनी स्पर्श केला नाही. लोक अन्नान्न करून मरत असता मी का गोड खात बसू ? आधी प्रजा पोटभर जेवू दे. मग मी जेवेन,’ असे ते म्हणाले. असा मंत्री कोठे मिळणार ?"  " खरेच आहे. शिरीष म्हणजे एक रत्न आहे. त्यांनाच मी मुख्य प्रधान करतो. "

 काही दिवसांनी शिरीषला पंतप्रधानकीची वस्त्रे मिळाली. मोठा सत्कार झाला. राजधानीतही अनेक ठिकाणी सत्कार झाले.परंतु शिरीषला त्याचे काही वाटले नाही. तो नेहमीप्रमाणे गंभीर व उदास असे.

 “ शिरीष, तुम्ही मुख्य मंत्री झालेत म्हणून साऱ्या जगाला आनंद होत आहे. परंतु तुम्ही का दु:खी ? तुम्ही माझ्याजवळ मोकळेपणाने वागत नाही. मी का वाईट आहे ? काय माझा अपराध ? सांगा ना !”

 “ काय सांगू हेमा ! आईबापांची आठवण येते.”

 “ मग त्यांना तुम्ही येथे आणीत का नाही ? त्यांना भेटायला का जात नाही ? मी इतकी वर्षे सांगत आहे. परंतु तुमचा हट्ट कायम. येता भेटायला ? घेता रजा ? आपण दोघे जाऊ. ”

 “ आईबाप आता भेटणार नाहीत.”

  "कशावरून ? "

  “ ते ह्या जगात नाहीत. ”

 “ कोणी आणली ही दुष्ट वार्ता ?”

 “ मला स्वप्न पडले. त्यात आईबाप दूर गेलेले मी पाहिले. आणि अधिकाऱ्यांकडूनही खुलासा मागवून घेतला. माझे आईबाप गेले. अरेरे !”

 “ आपण त्यांच्या समाध्या बांधू.”

 “ त्यांना जिवंतपणी भेटलो नाही. आता मेल्यावर समाध्या काय कामाच्या ? आता अश्रूंची समाधी रोज बांधीत जाईन.”

 “ शिरीष, तुम्ही आनंदी राहा. ज्या गोष्टी आपल्या हातच्या नाहीत त्यासाठी रडून काय उपयोग ?”

 “ परंतु ज्या हातच्या असतात, त्या तरी माणसाने नकोत का करायला ?"

 “ ते तुम्ही करीतच आहात. साऱ्या राज्याची चिंता वाहात आहात. फक्त माझी चिंता तुम्हाला नाही. साऱ्या जगाला तुम्ही सुखविता आणि हेमाला मात्र रडवता. शिरीष, असे रे का ? माझ्याजवळच तू उदासीन का होतोस ?” .  “ वेडी आहेस तू. हसून दाखवू ?”

 “ शिरीष, जीवन म्हणजे का नाटक ?”

 “ थोडेसे नाटकच. आपापले शोक, पश्चात्ताप, दुःखे सारे गिळून जगात वावरावे लागते. आपले खरे स्वरूप जगाला संपूर्णपणे दाखवता येत नसते. ते दाखवणे बरेही नव्हे. आपल्यालाही स्वत:चे संपूर्ण स्वरूप पाहायचा धीर होत नसतो. हे जग म्हणजे परमेश्वराचे मोठे नाटक. ह्या मोठ्या नाटकात आपण आपापली लहान लहान नाटके करीत असतो "

 “ शिरीष, तू आहेस मुख्य प्रधान. मला नाही समजत असली गहन गंभीर गूढे.”

 “ तू मुख्य प्रधानाची मुलगी आहेस. तू मागे एकदा मला अनुतीर्ण केले होतेस. तू माझ्यासाठीच देवीला नवस का केलास ते मला सांगता आले नव्हते.”

 “ शिरीष, तुला मी एक विचारू ?”

 " विचार."

 “ तू रागावशील. ”

 “ हेमा, मी तुझ्यावर एकदाच रागावलो होतो. दुष्काळात खीर केलौस म्हणून. एरवी कधी रागावलो होतो का? खरे सांग. तू मात्रः अनेकदा रागावली आहेस.”

 “ शिरीष, बायकांचा राग खरा का असतो ? पुरुषांच्या रागाची जशी भीती वाटते, तशी बायकांच्या रागाची वाटते का ? बरे, ते जाऊ दे. तुला एक विचारते हा.”

 “ विचार."

 “ मला अद्याप मूलबाळ नाही, म्हणून का तू दुःखी आहेस ? खरे सांग. होय ना ? पण मी काय करू ? शिरीष, तू दुसरे लग्न करतोस ? मला वाईट नाही वाटणार. मी पाहू तुझ्यासाठी सुंदरशी मुलगी ? हे काय ? रागावलास ?”

 “ काही तरी विचारतेस.”  “ काही तरी नाही. पुत्र नसेल तर सद्गती नाही. पितरांचा उद्धार होत नाही. कुळपरंपरा कोण चालवणार? तुमचे सेनाव्रत कोण चालवील ? तुमचे गुण का तुमच्याबरोबर मरू देणार ?”

 “ हेमा, मुले आपल्याचसारखी होतात असे थोडेच आहे ? कैकेयीच्या पोटी भरत येतो, हिरण्यकशिपूला प्रल्हाद होतो. नेमानेमाच्या गोष्टी. आपले चारित्र्य आपल्या पाठीमागून राहील. आपले गुण राहातील, आपल्या कृती राहातील; दुस-यांच्या जीवनात त्यांचा उपयोग होईल. आपण पुत्ररूपाने जगतो त्यापेक्षाही अधिक आपण आपल्या सत्कृत्यांनी मरणोत्तर जगत असतो. तू उगीच मनात आणू नकोस वेडे. वेडे आणि तुला एक सांगू का, मी माझ्या बाबांना उतारवयातच झालो ; कदाचित् देव अजूनही तुझ्या मांडीवर मूल देईल. कष्टी नको होऊ.”

 “ शिरीष, तुला एक गोष्ट सांगू ? ऐक. मधून मधून स्वप्नात मला बाळ दिसते. मी धावत त्याला उचलायला जाते इतक्यात एक सुंदर स्त्री तेथे येते व ती त्या बाळाला हात लावू देत नाही. ती स्वतःही ते उचलीत नाही व मलाही उचलू देत नाही. ते बाळ मग अदृश्य होते. कितीदा तरी असे स्वप्न पडते. काय रे ह्याचा अर्थ ? मी एका भविष्यवेत्त्यास विचारले. तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला मूल होईल. शिरीष, आम्ही बायका हो. आम्हास आई होण्याहून अधिक आनंदाचे काय ?”

 “म्हणून तू माझे दुसरे लग्न लावीत होतीस वाटते ? सवत आल्यावर मूल होईल ह्या आशेने माझे दुसरे लग्न. होय ना हेमा ? इतकी त शिकलेली तरी ह्या भविष्यवेत्त्या कुडबुड्यांच्या शब्दांवर विश्वास कसा ठेवतेस ?"

 “ शिरीष, कधी कधी गोष्टी होतातही ख-या. ह्या दृश्य जगाहून खरे जग अनंत आहे. अनंत शक्ती, अनंत जीव ह्या विश्वब्रह्मांडात स्थूल नि सूक्ष्म रूपाने हिंडत आहेत. सर्वांचा एकमेकांवर परिणाम होत आहे.”

 “ आता मात्र पांडित्य दाखवू लागलीस खरी. मला व्यवहारी माणसाला हे तुझे गहन गूढ काही समजत नाही. ”   “ शिरीष, जाऊ देत ही बोलणी. तू आनंदी राहा, हस, म्हणजे मी सुखी होईन, दुसरे काय सांगू ?”  असे दिवस जात होते. हेमा आपल्याकडून शिरीषला आनंद व्हावा म्हणून सारखी झटे. तिने एक सुंदर पक्षी पाळला. सोनेरी पिंज-यात तो असे. त्याला ताजी रसाळ फळे घाली. त्या पाखराला तिने बोलायला शिकविले. काय शिकविले ?

 “ हसा हसा. रडू नका, रुसू नका, हसा, हसा. शिरीष, हस. हेमा, हस, सारी हसा. आनंदी राहा. देवाच्या राज्यात सुखी राहा.”

 शिरीष आला म्हणजे हेमा त्या पाखराला म्हणे, “ पाखरा, पाखरा, बोल, बोल.” की ते पाखरू बोलू लागे आणि शिरीषला खरेच हसू येई, हेमाही हसे.

 “ हेमा, तू सांगून कंटाळलीस म्हणून वाटते पाखराकडून मला सांगवतेस ?"

 “ परंतु पाखराचे तू ऐकतोस, हसतोस. मी किती सांगितले तरी तू हसत नाहीस.”

 “ हेमा, पाखरू मला हसवते परंतु ते रडत असेल.”

 “ का ?"

 “ ते कैदी आहे. पिंजऱ्यात आहे. ज्याने अनंत आकाशात उडावे त्याला ह्या एवढ्याशा पिंजयात पंख फडफडावे लागतात. त्याच्या पंखांची शक्ती मेली असेल. आता सोडलेस तरी त्याला उडवणार नाही. फार तर खुंटीवर बसेल. आणि पुन्हा पिंजऱ्यात येईल. अरेरे !”

 “ परंतु येथे त्याला संरक्षण आहे. रानात हजारो शत्रू.”

 “हेमा, परंतु बाहेर स्त्रातंत्र्य आहे. दुसऱ्याच्या संरक्षणाखाली सुरक्षित असे गुलाम म्हणून जगण्यापेक्षा ज्यात धोका आहे असे स्वातंत्र्य सहस्त्रपटीने बरे. पाखरा, माझ्यासाठी तू बंधनात पडलास.”

 “ सोडू का ह्याला ?”

 “ नको सोडू. इतर पक्षी त्याला मारतील. गुलामगिरीत जो जगला, गुलामगिरीत जो पेरू डाळिबे खात बसला, तो त्या स्वतंत्र पक्ष्यांना आवडत नाही. त्याची अवलाद वाढू नये, त्याने गुलामगिरीचे जंतू आणू नयेत म्हणून ते त्याला ठार करतात. आता राहू दे पिंजऱ्यात. एकदा गुलाम तो कायमचा गुलाम. पाखरा, डोके आपटून प्राण का नाही दिलास ? अनशन व्रत का नाही घेतलेस ? गुलाम म्हणून बंधनात जगण्यापेक्षा उपवास करून मेला का नाहीस ? तसा मरतास, तर हुतात्मा झाला असतास. लाखो स्वातंत्र्यप्रेमी विहंगांनी तुझी स्तुतिस्तोत्रे म्हटली असती. वृक्षवेलींनी तुझ्या मृत शरीरावर फले उधळली असती. परंतु भुललास, गुलामगिरीच्या गोंडस वंचनेला भाळलास. आता पिंजऱ्यातच बस. तेथेच नाच व खा. "

 “ शिरीष, तुझ्या सुखासाठी जे जे म्हणून मी करावे ते ते तुला त्रासदायकच वाटते."

 “ हेमा, सुख हे स्वतःच्या जीवनातून शेवटी झऱ्याप्रमाणे बाहेर पडले पाहिजे. बाहेरची लिंपालिंपी काय कामाची ? तू कष्टी नको होऊ. लवकरच आपण सुखी होऊ. अभ्रे नेहमी टिकत नाहीत. जातातच.”

 एके दिवशी शिरीष झोपला होता. परंतु झोपेत काही तरी बोलत होता. हेमा जागी झाली. ते बोलणे ती ऐकत होती. काय बोलत होता शिरीष ?

 “ करुणे, रडू नकोस. ये, इकडे ये, करुणे !” पुन्हा शांत.“ करुणा, केविलवाणी करुणा? अरेरे !” पुन्हा शांत. शिरीष एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळला. घोरू लागला. हेमा विचार करीत होती. करुणा ? कोण ही करुणा ? ईश्वराची का करुणा ? कोणाची करुणा ? करुणा का कोणाचे नाव आहे ? कोणा स्त्रीचे ? हेमा अस्वस्थ झाली.

 दुस-या दिवशी फिरायला गेली असता दोघे त्या पूर्वीच्या वृक्षाखाली बसली.

 “ हेमा, येथे तू लपली होतीस.”

 “ आणि करुणा कोठे लपली आहे?” "

 " देवाजवळ."

 “ शिरीष, करुणा कोण? तू काल झोपेत ‘ करुणे, करुणे, ये, रडू नकोस, ’ असे म्हणत होतास. ही कोण करुणा ? कोणाची ? काय पडले स्वप्न ? काय आहे हे सारे ?”

 “ हेमा, असंबद्ध स्वप्नात का काही अर्थ असतो ? पडलेल्या पाऱ्याचे कण जुळवणे कठीण, त्या प्रमाणे भंगलेल्या स्वप्नातून अर्थ काढणे कठीण.”  “परंतु काहीतरी अर्थ असतो. स्वप्न म्हणजे आपल्याच गतजीवनातील प्रसंगांचे चित्रण. आपल्याच दाबून ठेवलेल्या वृत्तीचे प्रकटीकरण. ज्या व्यक्तींना आपण बाहेर प्रकटपणे भेटू शकत नाही त्यांना स्वप्नात भेटतो. स्वप्न म्हृणजे परिस्थितीवर विजय.”

 “ हेमा, लहानपणचे मी स्वप्न पाहात होतो. आमच्या गावात एक मुलगी होती. तिचे नाव करुणा. तिचे आईबाप लहानपणीच वारले, ती दु:खीकष्टी असे. एकदा ती रडत होती. तिचे अश्रू मी पुसले होते. तिला खाऊ दिला होता. पुन्हा एकदा ती अशीच रडत जात होती; मी तिला हाका मारल्या. ती आली नाही. मोठी अभिमानी होती ती, जरी पोरकी होती. किती वर्षाची आठवण ! आपल्या जीवनाच्या तळाशी अनेक गोष्टी जाऊन बसलेल्या असतात. कधी वादळ आले तर हा सर्व जीवनसागर बहुळला जातो. तळाशी बसलेले प्रकार वर येतात, वरचे प्रकार खाली जातात. मानवी जीवन म्हणजे चमत्कार आहे. हे मन म्हणजे महान् विश्व आहे.”

 “ करुणेचे पुढे काय झाले ?”

 “ कोणाला माहीत.”

 "तिचे लग्न झाले ? "

 “ म्हणतात झाले म्हणून.”

 “शिरीष, तुला तिची काही माहिती नाही ?”

 “आज तरी नाही. इतकी वर्षे मी राजधानीत आहे. आता लहानपणच्या गोष्टींची कोण करतो आठवण ? हेमा, ते पाहा सुंदर ढग.”

 “ खरेच किती छान. एखादे वेळेस आकाशातील देखावे किंती मनोहर दिसतात ! ”

 “ आपल्याही जीवनात एखादे वेळेस केवढी उदात्तता प्रकट होते, नाही ?”

 “शिरीष, परंतु हे मनोरम देखावे काळ्या ढगांतून निर्माण झाले आहेत. भिंती खरवडल्या तर खाली क्षुद्र मातीच दिसते. वरून झिलई, वरून रंग, असे नाही ?”  “ असे नाही ह्याचा अर्थ. ह्याचा अर्थ असा; की जे क्षुद्र आहे तेही सुंदर होईल. जे घाणेरडे आहे तेही मंगल होईल. सौंदर्याचे ब मांगल्याचे कोंब अणुरेणूत आहेत. प्रत्येक परमाणू परमसौंदर्याने नटलेला आहे. त्या परमेश्वराची कला कणाकणांत खच्चून भरलेली आहे. केव्हा ना केव्हा ती प्रकट होतेच होते.”

 “ केव्हा होते प्रकट? ”

 “ प्रभूची करुणा होते तेव्हा !”

 “ शिरीष, प्रभूची करुणा तुझ्याकडे का नाही येत ? तुला का नाही आनंदवीत ? तुझ्या रोमरोमांतून प्रसन्नता का नाही फुलवीत ? तुझ्या जीवनातील प्रभूची कला कधी फुलेल ? तू आनंदी कधी होशील ?”

 “ लवकरच होईन. लवकरच प्रभूच्या करुणेचा अमृतस्पर्श होईल व माझे जीवन शतरंगांनी खुलेल.”

 “शिरीष, चला जाऊ. आकाशातील कला मावळू लागली. धर माझा हात. चल !” हेमा म्हणाली.

 दोघे मुकी मुकी घरी गेली.करुणादेवी.djvu
या त्रे क री ण
♣ * * * * * * ♣ एके दिवशी सकाळीच करुणा त्या समाधीजवळ गेली होती. हात जोडून डोळे मिटून ती तेथे बसली होती. मधून मधून तिच्या डोळ्यांतून अश्रू घळघळत होते.

 प्रेमानंद तेथे येऊन उभा होता. ते पवित्र व प्रेमळ, करुणगंभीर दृश्य तो पाहात होता. करुणेने डोळे उघडले. समोर प्रेमानंद होता. क्षणभर कोणी बोलले नाही.

 “ प्रेमानंद, बसा. उभे का ? परके थोडेच आहात ? शिरीषचे तुम्ही मित्र. बसा. केव्हा येईल तुमचा मित्र ? असा कसा तुमचा कठोर मित्र ?”

 “ करुणाताई, तुम्हाला एक विचार सांगायला मी आज आलो आहे.”

 “ सांगा. तुम्ही सांगाल ते कल्याणाचेच असेल.”

 “ करुणाताई, तुम्ही शिरीषला भेटायला जा. शिरीष मुख्य प्रधान झाला आहे. जा त्याचा शोध करीत. राजधानीला जा. तुमच्यावर भूमातेची कृपा आहे. सारे गोड होईल असे मला वाटते. येथले तुमचे सारे कर्तव्य संपले आहे. आता पतिव्रतेचे खरे कर्तव्य हाती घ्या, पतीच्या शोधार्थ बाहेर पडा.”

 “ त्या मोठ्या राजधानीत मी कशी जाऊ ? शिरीष प्रधान. मी खेडवळ. कशी तेथे जायला धजू? 'शिरीष,' म्हणून कशी हाक मारू ? शिरीष कोठे राहातो, म्हणून कोणाला कसे विचारू ? माझे नाते कसे सांगू ? सारी हसतील. वेडी आहे ही बाई असे म्हणतील. आणि मुक्तापूर राजधानी किती दूर? तेथे एकटी कशी जाऊ ? कशी पोचू ? वाटेत जंगले आहेत. मोठमोठ्या नद्या आहेत. कठीण आहे, प्रेमानंद. "  “ करुणे, समाधी बांधताना तू रात्री बेरात्री रानावनात हिंडत असस.तुला कशाची भीती वाटत नसे. अग, नागोबा व वाघोबा येऊन तुझे काम करतात. देवाची तुझ्यावर दया आहे. तुला वाटेत त्रास होणार नाही. नद्या तुला उतार देतील. जंगलातील श्वापदे तुला प्रेम देतील. वाघ वाट दाखवील. दमून तू झोपलीस तर नाग तुझ्यावर फणेचे छत्र धरील. जा, भिऊ नकोस. सती सावित्री पतीपाठोपाठ प्रत्यक्ष काळाबरोबर गेली. सतीला भय ना भीती. तू जा. शेवटी सारे चांगले होईल. माझा शिरीष तुझी वाट पाहात असेल. असेल तिचे प्रेम तर येईल, असे मनात म्हणत असेल. तो मोठा प्रधान आहे. तो इकडे आला तर ते बरे नाही दिसणार. तूच जा. तो तुझा स्वीकार करील. तुला राजधानीत कसे वागावे, काय करावे, ते सारे सुचेल. शिरीषच्या मातापित्यांच्या ह्या सुंदर समाधीजवळच त्यांच्या मुलाकडे जाण्याचा आज निश्वय कर.”

 “ प्रेमानंद, एकटी जाऊ ?”

 “ बरोबर एकतारी घे. गाणी गात जा. यात्रेकरीण होऊन जा. गळ्यात रुद्राक्षांची माळ घाल. धवल वस्त्र परिधान कर. प्राचीन काळातील तपस्विनी, महाश्वेता जणू बनून जा.”

 “ प्रेमानंद, शिरीषचे एक सुंदर चित्र घरी आहे. तुम्हाला माहीत आहे ? तेही बरोबर घेऊन जाईन. त्याचा उपयोग होईल.”

 “ होईल. जा. एकतारी व शिरीषची तसबीर घेऊन जा. प्रेमाची यात्रेकरीण होऊन जा. पातिव्रत्याच्या तीर्थयात्रेला नीघ. तुझ्या कर्तव्यमय जीवनाच्या मंदिरावर शेवटचा कळस उभार. ”

 समाधींची पूजा करून ती निघाली. प्रेमानंद आपल्या शेतावर गेला. करुणा घरी आली. तिने सर्व तयारी केली. घरदार, शेत, मळा, बाग तिने प्रेमानंदाच्या स्वाधीन केली. ‘समाधींची पूजा करीत जा,’ असे तिने त्याला सांगितले.

 करुणा जाणार, ही बातमी गावभर पसरली. सारा गाव तिच्या दारासमोर जमला. सुवासिनींनी तिला वंदन केले. करुणेने सर्वाना प्रणाम केला. सर्वांचे आशीर्वाद व सदिच्छा घेऊन ती बाहेर पडली. गावाच्या सीमेपर्यंत लोक आले आणि मागे वळले. प्रेमानंद आणखीही पुढे गेला.  "प्रेमानंद, किती येणार तुम्ही ? जा आता. जपा. तुम्ही मित्रप्रेमाचे कर्तव्य केलेत. नेहमी मदत केलीत. धीर दिलात. सल्ला दिलात. सत्पंथ दाखवलात. जा, किती याल ?”

 “ शिरीषला प्रेमपूर्वक प्रणाम सांगा. म्हणावे, जन्मग्रामाला एकदा भेट दे. ”

 “ सांगेन. त्यांना घेऊन येईन. राजाजवळ वर मागेन."

 प्रेमानंद परतला. करुणा करुणापर अभंग आळवीत निघाली. एकतारीच्या नादावर ती गात होती. चालण्याचे श्रम तिला गाणी म्हणायला सांगत. ती म्हणे.

 मंदिरात ती स्वयंपाक करी. एक भाग गायीला काढून ठेवी बाकीचे जेवे. ‘ शिरीष, हा शेवटचा तुझा ही घास,' असे उठताना म्हणे. मंदिरातील ओवरीत ती भजन करीत बसे. जाणारे येणारे ऐकत. भक्तिमय होऊन माघारे जात.

 एकदा एक मोठया नदीतून ती नावेत बसून जात होती. परंतु नाव धारेत सापडली. नावाडी नवशिके होते ! लोक घाबरले.

 “ बाई, तुमच्या देवाला तरी आळवा !” लोक म्हणाले.

 “ माझी कोठे आहे पुण्याई ?” करुणा म्हणालीं.

 “ म्हणा तर खरा अभंग !” कोणी आग्रह केला आणि करुणेने धावा म्हटला.

 “ देवा, धाव रे धाव. आम्ही नाव लोटली आहे. तू सुकाणू हातात घे. तू नसशील तर आम्ही मरू, तू असशील तर तरू, ये ये ये.

 “ आम्ही अभिमान टाकला आहे. आळस झाडला आहे. आम्ही भांडणे मिटवली आहेत. स्पर्धा थांबविली आहे. आम्ही सारे वल्ही मारीत आहोत. एकोप्याने कार्य करीत आहोत. तुझा आशीर्वाद दे. तू मार्ग दाखव. ये ये ये."

 “ वारा जोराचा आहे. प्रवाह जोरदार आहे. आम्ही पराकाष्ठा करीत आहोत. प्रभू, तुझी कष्टाळू लेकरे. अंत नको पाहू. ये ये ये."

 “ तो पाहा प्रभु आला. त्याने सुकाणू हाती घेतले. वल्हवणाऱ्यांना स्फूर्ती आली. प्रवाहातून नाव बाहेर पडली. आले, तीर आले. प्रभूची कृपा झाल्यावर काय अशक्य आहे. म्हणून प्रयत्न करताना त्याला हाक मारा. त्याला विसरू नका. देवाला विसराल, तर फसाल. नावाड्यांनो त्याला ओळखाल व आठवाल तर तराल. श्रद्धेचा विजय असो."

 असा तो धावा होता. वल्हवणारे वल्ही मारीत होते, आणि बाकी सारे शांत होते. आणि खरेच नाव धारेच्या बाहेर पडली. जयजयकार झाले. “ तुमचा धावा देवाने ऐकला !” लोक म्हणाले.

 तुमच्याही प्रार्थना त्याने ऐकल्या." करुणा म्हणाली.

 प्रवासात असे अनेक अनुभव येत होते. करुणेची श्रद्धा वाढत होती.

 पुरे, पट्टणे, वने, उपवने ह्यांतून ती जात होती. जिकडे तिकडे राजा यशोधर व प्रधान शिरीष ह्यांची कीर्ती तिच्या कानांवर येई. तिला अपार आनंद होई.

 एकदा तर तिच्या कानावर बातमी आलो, की जवळच्या एका शहरी शिरीष आहेत. करुणेची धावपळ झाली. ती वायुवेगाने त्या शहराकडे निघाली. ती थकली, परंतु चालतच होती. मनाच्या वेगाने जाता आले असते तर ? वा-यावर बसता आले असते तर ? असे तिच्या मनात येई. त्या शहरी येऊन ती पोचली. परंतु ती बातमी खोटी होती. शिरीष नाही, कोणी नाही. ती निराश झाली.

 चार महिने ती प्रवास करीत होती. राजधानी जवळ येत होती. तिचे निधान जवळ जवळ येत होते. स्वर्ग जवळ जवळ येत होता. हळूहळू राजधानी दुरून दिसू लागली, करुणेने प्रणाम केला. मुक्तापूरला तिचे दैवत राहात होते.

 शीतला नदी आली. शुद्ध स्वच्छ शांत नदी. करुणेने मंगल स्नान केले. ती नवीन निर्मळ धवल वस्त्र नेसली. योगिनीप्रमाणे निघाली. सोमेश्वराचा कळस दिसू लागला. त्या मंदिराकडे ती वळली. मंदिराचे प्रशस्त आवार होते. तडी तापडी, साधु बैरागी ह्यांना राहाण्यासाठी तेथे ओऱ्या होत्या.

 करुणा एका ओरीत शिरली. तिने ती ओरी स्वच्छ केली. तिने कंबळ घातले. त्यावर ती बसली. डोळे मिटून तिने ध्यान केले. कोणाचे ध्यान ? सोमेश्वराचे की प्राणेश्वराचे ? का दोघांचे ? 
मी चो र ना ही
तु म्ही चो र आ हा त

♣ * * * * * * ♣ करुणा प्रात:काळी उठे. शीतलेच्या शीतल पाण्यात स्नान करी. नंतर सोमेश्वराचे दर्शन घेऊन ती आपल्या ओरीत एकतारीवर भजन करीत बसे. घटकाभर दिवस वर आला, म्हणजे ती राजधानीत भिक्षा मागे. तिला एकटीला कितीशी भिक्षा लागणार? तिची गोड भजने ऐकून लोक तल्लीन होत. मुले-मुली ओंजळी भरभरून तिला भिक्षा घालीत. करुणा स्वत:पुरती भिक्षा ठेवून उरलेली बाकीच्या अनाथ-पंगुंस देऊन टाकी.

 राजधानीत ती हिंडे. रोज निरनिराळ्या रस्त्यांना जाई. परंतु राजाच्या राजवाड्याकडे, प्रधानाच्या प्रासादाकडे जाण्याचे तिला धैर्य होत नसे. कोठे तरी पती दृष्टीस पडावा म्हणून तिचे डोळे तहानले होते. ओरीत शिरीषचे चित्र हृदयाशी धरून ती बसे. पुन्हा ते चित्र ती ठेवून देई. खरोखरच शिरीष कधी भेटेल ? खरेच कधी भेटेल ?

 वसंत ऋतू आला. सृष्टी सजली. वृक्षांना पल्लव फुटले. कोकिळा कूऊ करू लागली. करुणेला वाढदिवस आठवला. विवाहाचा वाढदिवस. किती तरी वर्षांत तो साजरा झाला नव्हता. यंदा होईल का ? माझ्या जीवनात वसंत केव्हा येईल ? माझ्या शुष्क संसाराला पल्लव केव्हा फुटतील ? माझ्या भावना पुन्हा मंजुळ गाणी केव्हा म्हणून लागतील ? जीवनाचे नंदनवन केव्हा बहरेल, आनंदाने गजबजेल ? यंदा येईल का वसंत ?

 सोमेश्वराच्या मंदिरातील ती प्रख्यात यात्रा वसंत ऋतूतच असे. यात्रेचे दिवस जवळ आले. मंदिराला सुंदर रंग दिला गेला. शेकडो ठिकाणची दुकाने आली. यात्रा म्हणजे कलाकौशल्य, उद्योग, व्यापार, सर्वांचे प्रदर्शन. देशातील साऱ्या वस्तू तेथे यावयाच्या. मालाची देवघेव, विचाराची देवघेव. व्यापारी व कीर्तनकार, प्रवचनकार, मल्ल, नाटकमंडळ्या, नकलाकार, पोवाडेवाले सर्वांची तेथे हजेरी असायची.

 सोमेश्वराच्या आसपासचे प्रचंड मैदान गजबजून गेले. दुकानदारांना जागा आखून देण्यात आली. पाले लागली. ह्या बाजूस कापडाची दुकाने, इकडे किराणा माल. मजाच मजा. हलवायांची गर्दी विचारूच नका.

 राजधानीतील लोक यात्रा पाहायला येऊ लागले. मुले मुली येत. वृद्ध येत. श्रीमंत गरीब सारे येत. यात्रेचा मुख्य दिवस जवळ येत चालला. सोमेश्वराच्या आवारात त्या वत्सल प्रेमळ मातापित्यांची समाधी होती. तिचे दर्शन घेण्यासाठी, कृतज्ञता प्रकट करण्यासाठी हजारो नारीनर शेकडो ठिकाणांहून येत होते. रथांतून येत होते. हतीवरून येत होते. उंटांवरून येत होते. कोणाचे मेणे, कोणाच्या पालख्या. सारी वाहने तेथे दिसत होती.

 यात्रेचा मुख्य दिवस आला. करुणेचे हृदय आशेने उचंबळले होते. आज शिरीष येथे आल्याशिवाय राहाणार नाही. हातात एकतारी घेऊन ती बाहेर पडली. आज माझा देव मला भेटणार असे तिला वाटत होते. हृदय का प्रतारणा करील ?

 त्या बाजूला सारे भिकारी होते. जो जो येई, तो पै पैसा टाकायला इकडेही येई. शिरीष इकडे आल्याशिवाय राहाणार नाही, असे करुणेला वाटले. ती त्याच भिकाऱ्यांच्यात एके ठिकाणी भजन करीत बसली.

 आणि तिने काय केले ऐका. तिने ते शिरीषचे चित्र काढले. तिने तेथे एक बांबूची काठी पुरली. त्या काठीला तिने ती तसबीर अडकवली. त्या तसबिरीला तिने सुंदर घवघवीत हार घातला होता.

 “ बाई, कोणाची ही तसबीर ?”

 “एका थोर महात्म्याची.”

 हजारो लोक येत जात होते. समाधीवर फुले वाहून जात होते. आईबापांविषयी कृतज्ञता शिकून जात होते. आईबाप मुलांवर प्रेम करावे, असे शिकून जात होते. मुले आईबापांविषयी कृतज्ञ राहावे, असे शिकून  “ हेमा, मी एकटाच जातो दर्शनास. आज मी साध्या भिकाऱ्याच्या वेषाने बाहेर पडणार आहे. साध्या शिरीषला आईबापांचे आत्मे भेटतील. वैभवात लोळणाच्या अहंकारी शिरीषला भेटणार नाहीत. मला नम्र होऊन आज आईकडे जाऊ दे. बाबांकडे जाऊ दे. तू तुझ्या आईबापांबरोबर यात्रेला जा. मी एकटाच जाईन.”

 “ शिरीष, परत ये हो. जाऊ नको हो वैतागून. तू राजाचा मुख्य मंत्री आहेस. हेमाचा प्राण आहेस. येशील ना परत ?”

 “ येईन. दरवर्षी मी यात्रेला जातो. गेलो का तुला सोडून ?”

 “ परंतु भिकाऱ्यासारखा आजपर्यंत कधी गेला नाहीस. आपण सारी बरोबर जात असू. खरे की नार्हृी ? ”

 “ परंतु आज एकटाच जातो. रागावू नकोस.”

 शिरीष वेष बदलून हळूच बाहेर पडला. अंधार पडला होता. यात्रेत लाखो दीप लागले होते. जणू आकाशातील अनंत तारे पृथ्वीवर अवतरले. करुणेची आशा संपत आली. नाही का येणार शिरीष ? येईल. रात्रभर लोक येतच राहाणार आणि मोठे लोक रात्रीसच येतील.

 शिरीषचे चित्र वाऱ्यावर नाचत होते. करुणेचे चित्त आशानिराशांवर नाचत होते. हजारो दिव्यांच्या ज्योती नाचत होत्या. धडपडणाच्या जीवांप्रमाणे नाचत होत्या.

 तो पाहा एक मनुष्य आला. भिकाच्यांच्या बाजूला आला. पै पैसा टाकीत आहे. करुणा भजनात रंगली आहे. डोळे मिटलेले आहेत. कोणते गाणे ती म्हणत होती ? जे गाणे विवाहाच्या वाढदिवशी तिने म्हटले होते तेच. कर्तव्याच्या आनंदाचे गाणे ती म्हणत होती. एकतारी वाजत होती. हृदयाची तार लागली होती. तो मनुष्य तेथे उभा राहिला.

 आणि त्याला ते चित्र दिसले ! वाऱ्यावर नाचणारे चित्र. त्या माणसाने गाणे म्हणणाच्या त्या भिकारणीकडे पाहिले. त्या चित्राकडे पाहिले. ते चित्र पटकन् त्याने उचलले, घेतले व तो पुढे चालला.

 करुणेने डोळे उघडले, तो चित्र नाही. कोठे गेले चित्र ?कोणी नेले चित्र ? वाऱ्याने का उडाले? अरेरे !  “ कोणी नेले चित्र ? तुम्ही पाहिले का ?” जवळच्या भिकाऱ्यांना तिने विचारले. "

 “ आम्हाला काय माहीत ? आमचे लक्ष तुमच्या चित्राकडे थोडेच होते ? आमचे चित्त समोरच्या फडक्यावर काय पडते त्यावर होते, ” ते म्हणाले.

 “ येथे कोणी आले होते ?”

 “ एक मनुष्य उभा होता. आताच गेला.”

 " कोणत्या दिशेने ? ”

 ती एकदम निघाली. तो चित्र पळवणारा एके ठिकाणी दिव्याजवळ उभा होता. त्या चित्राकडे तो पाहात होता. करुणेचे एकदम लक्ष गेले. त्या माणसाने इकडे पाहिले. तो वेगाने निघाला. करुणेने चोर ओळखला. तीही त्याच्या पाठोपाठ निघाली.

 रस्ते ओलांडीत तो मनुष्य ज्या बाजूला राजवाडे होते, प्रासाद होते तिकडे वळला. जरा अंतरावरून करुणा येत होती. शिरीषचा प्रासाद आला. तो मनुष्य एकदम त्या प्रासादात शिरला. करुणा पाहात होती. किती तरी वेळ त्या प्रासादाकडे पाहात होती. शिरावे का त्या प्रासादात ?

 काही वेळ गेला. इतक्यात राजाकडून रथ आला. शिरीषला बोलावणे आले होते. शिरीष पोषाख करून रथात बसला. धावत जावे व शिरीषला हृदयाशी धरावे, त्याच्या खांद्यावर मान ठेवून रडावे, असे करुणेला वाटले परंतु पाय जागचा हालेना.

 रथ दृष्टीआड झाला. करुणेने एकदम काही तरी मनात ठरविले. ती त्या प्रासादाकडे वळली. पायच्या चढू लागली.

 “ कोठे जाता आत ?” पहारेकयाने हटकले.

 “ मी भिकारीण आहे.”

 “ भिकारीण का राजवाड्यात शिरते ? हो बाहेर.”

 “ मी आत जाणार.”

  “ हो बाहेरं, दिसतेस बैरागीण, परंतु चोर तर नाहीस ?  “ चोर मी नाही. तुम्ही सारे चोर आहात. तुमचे मालक चोर आहेत. तुमचा धनी माझी वस्तू चोरून घेऊन आला. ह्या भिकारणीची संपत्ती तुमच्या धन्याने चोरली.”

 “ वेडी तर नाहीस ?”

 तेथे गर्दी जमली. स्त्रीवर हात कोण टाकणार? हेमा बाहेर आली.

 “ काय पाहिजे बाई ?"

 " माझी वस्तू."

 “ कोणती वस्तू?”

 “ माझे चित्र द्या नाहीतर माझे प्राण घ्या. चित्र, माझे चित्र. ते चोर आहेत. त्यांनी ते चोरून आणले.”

 “ बाई, रागावू नका, आत या. मला सारे नीट समजून सांगा. या आत."

 हेमा त्या भिकारणीला, शिरीषच्या त्या करुणेला आत घेऊन गेली. पहारेकरी पाहातच राहिले !


करुणादेवी.djvu

मी ल न
♣ * * * * * * ♣ शिरीषने घरी येताच हेमाला ती तसबीर दाखविली व तो म्हणाला, “ ही बघ माझी तसबीर !”

 “ कोठून आणलीस, शिरीष ?” तिने विचारले.

 “ एका भिकारणीची चोरली. पळवून आणली. आज मी चोर झालो"

 “ शिरीष, असे करू नये. "

 “ परंतु मला न विचारता माझे चित्र कोणी काढले? आणि ते का असे वाऱ्यावर टांगून ठेवायचे ? जणू फाशी दिलेला. आणले मी काढून.”

 “ शिरीष, काही तरी बोलतोस. हे तुझे चित्र पुष्कळ वर्षांपूर्वीचे आहे. तू तुझ्या गावी असशील, तेव्हाचे आहे. तुझ्या घरी होते हे चित्र ?”

 "होते."

 “ तेच असेल हे तुझे. आईबाप मेले, घरात कोणी नसेल. तुझे चित्र कोणी तरी लांबविले. परंतु त्या भिकारणीने त्याला माळ का घातलीं ? हे चित्र कोणाचे आहे हे का तिला माहीत होते ?”

 "मला नाही माहीत "

 “ शिरीष, ही तसबीर माझ्या महालात लावू, मी तिला रोज हार घालीत जाईन. दे."

 अशी पतिपत्नींची बोलणी चालली होती, तो राजाचे बोलावणे आले म्हणून शिरीष निघून गेला. हेमा ती तसबीर मांडीवर घेऊन बसली होती, तो बाहेर ती बाचाबाची झाली. भिकारीण भांडत होती. हेमाने भिकारणीस आत ओढले. करुणेने सर्व हकीगत सांगितली. शिरीष सोडून गेल्याषासूनचा इतिहास तिने सांगितला. हेमा शांतपणे ऐकत होती. मधूनमधून सद्गदित होत होती.

 “ करुणे, आता हे चित्र नको मागू. शिरीषच तुला देते. जिवंत मूर्ती घे. शिरीषने मला हे मागेच का बरे सांगितले नाही ? ही हेमा मत्सरी नाही. ”

 “ हेमा. रागावू नको. शिरीष मनाचा कोमल आहे. आपण दोघो भांडू असे त्याला बाटले असेल. जगात सवतीमत्सर फार वाईट. शिवाय येथून येण्याचीही अडचण. माझ्या शिरीषवर रागावू नका.”

 “ करुणे, किती थोर मनाची तू! किती तुझी श्रद्धा, किती विश्वास, किती प्रेम ! ऊठ. चल. मंगल स्नान कर. सुंदर वस्त्रे नेस. अलंकार घाल. शिरीष घरी येईल, त्याचे तू स्वागत कर. मी लपून राहीन शिरीषची गंमत करू. तो घाबरेल. बिचकेल. पळू लागेल. गंमत करू हा. ऊठ आता.”

 करुणा स्नानगृहात गेली. कढत कढत पाणी तिने घेतले. अंगाला उटणी लावली. केसांना सुगंधी तेल लावले. स्नानोत्तर ती रेशमी वस्त्र नेसली. मोत्यांचे हार धातले. प्रसन्नमुखी जणू देवता ती दिसत होती.

 दोघीजणी बोलत बसल्या. दोघींनी फलाहार केला. करुणेचे हृदय फुलले होते. आनंद उचंबळला होता. मध्येच हेमाच्या हाताचे ती प्रेमाने चुंबन घेई. शिरीषचा रथ आला. बाहेर ललकारी झाली. हेमा लपली. तेथे मंचकावर करुणा बसली होती. पवित्र, प्रेमळ, हसतमुखी करुणा. शिरीष आला. एकदम आत आला. करुणा उभी राहिली. शिरीष चपापला. आपण घर तर चुकलो नाही, असे त्याला वाटले. तो घाबरला.

 “ क्षमा करा हा !” असे म्हणून तो जाऊ लागला.

 “ अपराध्याला क्षमा नाही. अपराध करून सवरून आता पळून कोठे चालला ?”

 करुणेने शिरीषचा हात धरला. तो निसटून जाऊ लागला.

 “ हेमा, हेमा !' त्याने हाका मारल्या.

 “ ओ ” करून पलंगाखालून हेमा बाहेर आली. ती हसत होती.

 “ फजिती, राजाच्या मुख्य प्रधानाची फजिती. शिरीष, पळून काय जातोस ?"  “ हेमा, काही तरी काय बोलतेस ? मनुष्याने पापापासून पळावे, परस्त्रीपासून पळावे.”

 “ शिरीष, स्वस्त्रीपासून पळणे म्हणजे कां पुण्य ?”

 “ मी तुला कधी सोडले आहे का?”

 “ आणि करुणेला ? करुणेची करुणा तुला अद्याप का येत नाही ? तुझ्यासाठी ती भिकारीण बनली, तरी तुला दया येत नाही ? शिरीष बघ, ह्या सुंदर स्त्रीकडे बघ. माझी अनुज्ञा आहे. माझ्या आज्ञेने तिचा मुखचंद्र पाहा. बघ पटते का ओळख ?”

 “ करुणा, माझी करुणा !”

 शिरीषने करुणेचे पाय धरले. करुणा लाजली.

 “ हे काय शिरीष ? माझे पाय दुखत नाहीत हो. तुझेच यात्रेत हिंडून दमले असतील. भिकारणीला भेटायला आज भिकारी होऊन आला होतास वाटते ? शिरीष, बस. माझे सारे श्रम आज सफळ झाले.”

 “ शिरीष, करुणेला पूर्वीच रे का नाही आणलेस ? तिच्या संगतीत माझा उद्धार झाला असता.”

 “ माझाही !” शिरीष म्हणाला.

 “ काही तरी बोलू नका, ” करुणा म्हणाली.

 “ शिरीष, आम्ही भांडू असे का तुला वाटले ? अरे, श्रीकृष्णाच्या सोळा सहस्र नारी भांडत नसत. आम्ही दोन का भांडलो असतो ?”

  “श्रीकृष्ण सोळा सहस्र नारींना वागवू शकत होता, त्याची थोरवी आम्हा क्षुद्रांना कोठली ? आम्हाला एकीचेही चित्त सांभाळता येत नाही, तेथे दोघींचे कसे व्हायचे ?”

 “ शिरीष, असे नको बोलू. आता आनंदी राहा. आता नाही ना उदास राहाणार? करुणे, शिरीष इतक्या वर्षात मोकळेपणाने हसला असेल तर शपथ. ”

 “ करुणे, आपल्या विवाहाचा वाढदिवस लवकरच येईल. हेमा, आम्ही आमच्या विवाहाचा वाढदिवस साजरा करीत असू. एका वाढदिवसाच्या दिवशीच राजाचे दूत मला न्यायला आले.”
करुणादेवी.djvu
 “ शिरीष, आपल्या लग्नाचा वाढदिवस तू का बरे कधी केला नाहीस ?”

 “ मनात शल्य होते म्हणून. आता तुझ्या माझ्या लग्नाचाही दर वर्षी साजरा करू. परंतु दिवस आहे का लक्षात ?”

 "शिरीष, तो दिवस कधी तरी कोणी विसरेल का ?"

 “ आज यात्रेच्या दिवशी हे अपूर्व मीलन.”

 “ माझ्या प्रेमळ आईबापांचा हा आशीर्वाद.”

 “ माझ्या सासूसासऱ्यांचा आशीर्वाद.”करुणादेवी.djvu

रा जा क डू न
स त्का र

♣ * * * * * * ♣ शिरीषने राजा यशोधरास सर्व वाता निवेदली. करुणेची कथा ऐकून राजा कृतार्थ झाला. तो म्हणाला, “ शिरीष, तुम्ही धन्य आहात. भूमातेची जिच्यावर कृपा, अशी पत्नी तुम्हास मिळाली आहे. कसे कर्तव्यपालन, किती निश्चय, कसे पातिव्रत्य ! शिरीष, करुणादेवीचा मी सत्कार करीन. माझ्या राज्यात अशी रत्ने आहेत, हीच खरी राज्याची शोभा. अशी पवित्र सुंदर जीवनेच समाजाला सांभाळतात, मार्ग दर्शवितात. करुणादेवीची मला पूजा करू दे. पूज्याची पूजा जर केली नाही तर कल्याण होत नाही."

 शिरीष निघून गेला. राजा यशोधराने एक दिवस ठरविला. त्या दिवशी मोठा समारंभ झाला. एका बाजूस हजारो नारी बसल्या होत्या. एका बाजूला हजारो पुरुष होते. सारे जुने नवे प्रधान होते. अधिकारी होते. राजघराण्यातील सर्व मंडळी होती. विद्यापीठातील आचार्य होते. राजधानीतील सर्व मंडळी होती.

 राजा यशोधरने करुणादेवीस आसनावर बसविले. त्याने तिचा सत्कार केला. तिला बहुमोल वस्त्रेभूषणे दिली. राजाने भक्तिप्रेमाने करुणेच्या चरणांस वंदन केले. त्या वेळेस टाळ्यांचा कडकडाट झाली. “ साधू साधू” असे जयध्वनी झाले. राजाने करुणेची दिव्य कथा आपल्या प्रासादिक वाणीने सांगितली. कर्तव्यपालनाचा दिव्य महिमा त्याने वर्णिला. करुणेने सासूसासऱ्यांची सेवा कशी केली, त्यांच्या समाध्या कशा बांधल्या ; पतीसाठी शेकडो कोस चालत ती कशी आली, ते सारे सांगितले. त्याने हेमाचीही स्तुती केली. सवतीमत्सर तिला कसा नाही ते त्याने वर्णिले. आदित्यनारायण व शिरीष ह्यांनी आपली कौटुंबिक दुःखे मनातच ठेवून, कौटुंबिक अडचणी दूर ठेवून प्रजेच्या कल्याणार्थ कसे तनमनधन दिले, सारे सारे त्याने वर्णन . केले. ' प्रत्येक जण जर नियुक्त कर्तव्य नीट पार पाडील, तर जशी भूमाता करुणेला प्रसन्न झाली, तशी तुम्हाआम्हासही ती होईल, ’ असे तो म्हणाला.

 राजा यशोधराचे भाषण झाले. आणि करुणा काय बोलणार ! तो नुसती उभी राहिली. तिने वाकून सर्वांना प्रणाम केला. सर्वांनी तिला केला.

 समारंभ संपला. हेमा व करुणा ह्यांसहवर्तमान रथात बसून शिरीष घरी आला.
स मा रो प
♣ * * * * * * ♣

 “ शिरीष, सासूबाई व मामंजी ह्यांच्या समाधीवर फुले वाहायला जायचे ? " हेमाने विचारले.

 “ प्रेमानंदानेही बोलावले आहे. जन्मभूमीला विसरू नकोस, असा त्याचा संदेश आहे, ” करुणा म्हणाली.

 “ करुणे, मी जननीलाही विसरलो व जन्मभूमीलाही विसरलो. मी महान् पातकी आहे !” शिरीष दुःखाने म्हणाला.

 “ परंतु करुणेची पुण्याई आपला उद्धार करील. करुणा का निराळी आहे? आपल्या तिघांच्या पापपुण्याचा जमाखर्च एक करू. चालेल ना, करुणे ?” हेमा म्हणाली.

 “ हो, चालेल. तिघांच्या जीवनाचे प्रवाह एकत्र मिळू देत. त्रिवेणीसंगम होऊ दे. सर्वात पवित्र संगम. शिरीष, कधी जायचे धरी ?”

 “ राजाला विचारीन, मग निघू ”

 एके दिवशी राजाला शिरीषने आपल्या अंबर गावी जाण्याची परवानगी विचारली. राजाने आनंदाने दिली. राजा यशोधर आणखी म्हणाला, “ शिरीष, तुमच्या आईबापांच्या त्या समाध्या जेथे आहेत त्यांच्याजवळ एक प्रचंड स्तंभ उभारला जावा असे मला वाटते. तुम्ही तशी व्यवस्था करा. त्या स्तंभावर करुणेची कथा खोदवा.”

 राजाची आज्ञा घेऊन शिरीष घरी आला आणि थोड्याच दिवसांनी हेमा व करुणा ह्यांना संगे घेऊन तो आपल्या जन्मभूमीला अंबरला आला. सारा गाव त्यांच्या स्वागतार्थ सामोरा आला होता. ध्वजा, पताका, तोरणे ह्यांनी सर्व गाव शृंगारण्यात आला होता. प्रेमानंदाने तिघांच्या गळ्यांत हार घातले. मंगल वाद्ये वाजत होती. मिरवणूक निघाली. किती तरी वर्षांनी शिरीष आपल्या जुन्या घरी आला. लोक आता आपापल्या घरी गेले. शिरीषने प्रेमानंदाला मिठी मारली.

 “ शिरीष, किती वर्षानी भेटलास !”

 “ परंतु तू माझ्या हृदयात होतास. जेवताना एक घास तुझ्या नावाने मी घेत असे."

 शिरीषने हेमाला मळा, बाग सारे दाखविले आणि तिघे पूजापात्रे हाती घेऊन समाधींच्या दर्शनार्थ गेली. शिरीषने साष्टांग नमस्कार घातला. तो रडत होता. भूमातेवर अश्रूचा अभिषेक झाला. तो उठेना. तसाच दंडवत् पडून राहिला.

 “शिरीष, ऊठ आता. अश्रुंनी खळमळ धुऊन जाते ऊठ राजा !” करुणा म्हणाली.

 हेमाने त्याला उठविले. तिघे हात जोडून उभी होती. शिरीष म्हणाला “ आई, बाबा, क्षमा करा हो.”

 “ क्षमा ! ' आकाशवाणी झाली."

 तिघे परत आली. शिरीषने गावाला मिष्टान्नाचे भोजन दिले. त्याने कोणाला ददात ठेवली नाही. कोणाला घर बांधून दिले. कोणाला जमीन दिली. कोणाचे कर्ज फेडले.

 “ माझ्या जन्मभूमीत कोणी दुःखी नको !” तो म्हणाला.

 एके दिवशी हेमा, करुणा, प्रेमानंद व शिरीष अशी बसली होती.

 “ प्रेमानंद, मी सर्वांना काही तरी दिले. तुला काय देऊ?” शिरीषने विचारले

 “शिरीष, तू का निराळा आहेस ? तुझे ते माझेच आहे. तू मला प्रेम दिले आहेस. तू रोज आठवणपूर्वक एक घास मला देत होतास, त्यात सारे त्रिभुवन आले."

 एके दिवशी ती तिघे जायला निघाली. प्रधानाला फार दिवस दूर कसे राहाता घेईल ! सारा गाव पोचवीत आला, बोळवीत आला. प्रेमानंद साश्रू व सगद्गद असा उभा होता. रथ गेला. गावकरी स्तुतिस्तोत्रे गात परत आले. “ करुणादेवीचा हा सारा महिमा. तिच्या तपश्वर्येचे हे फळ !” ते म्हणत होते. प्रेमानंद मुकाट्याने घरी गेला.

 तिघे राजधानीत आली. पुन्हा प्रधानपदाचा कारभार सुरू झाला. दिवस आनंदात जात होते.आणि पुढे हेमा व करुणा दोघींना मुलगे झाले. जणू चंद्रसूर्यच पृथ्वीवर आले! राजधानीत शर्करा वाटल्या गेल्या. महोत्सव झाला. आदित्यनारायण ह्यांनी नातू पाहिला. त्यांना धन्य वाटले.

 बरेच दिवस संसार करून तो तिघे मरण पावली, देवाकडे गेली. किती तरी दिवस त्याच्या कथा लोक सांगत असत आणि करुणेचा महिमा तर त्या प्रांतात अद्याप सांगतात. ते मुक्तापूर आज नाही. ते अंबर गाव आज नाही. त्या समाध्या आज नाहीत. तो उंच स्तंभ आज तेथे नाही. तरीही करुणादेवीची गाणी त्या प्रांतात अजून म्हटली जातात. भिकारी म्हणतात. बायामाणसे ऐकतात. मुले मुली ऐकतात.

 “ आई, खरेच का ग अशी करुणादेवी झाली ?”

 मुले मग विचारतात.

 “ तर का खोटे आहे गाणे ? खरेच ही अशी करुणादेवी झाली. तिला मनात प्रणाम करा हो !” असे आई सांगते.

करुणादेवी.djvu

स मा प्त