करुणादेवी/यात्रेकरीण

विकिस्रोत कडून
या त्रे क री ण
♣ * * * * * * ♣







 एके दिवशी सकाळीच करुणा त्या समाधीजवळ गेली होती. हात जोडून डोळे मिटून ती तेथे बसली होती. मधून मधून तिच्या डोळ्यांतून अश्रू घळघळत होते.

 प्रेमानंद तेथे येऊन उभा होता. ते पवित्र व प्रेमळ, करुणगंभीर दृश्य तो पाहात होता. करुणेने डोळे उघडले. समोर प्रेमानंद होता. क्षणभर कोणी बोलले नाही.

 “ प्रेमानंद, बसा. उभे का ? परके थोडेच आहात ? शिरीषचे तुम्ही मित्र. बसा. केव्हा येईल तुमचा मित्र ? असा कसा तुमचा कठोर मित्र ?”

 “ करुणाताई, तुम्हाला एक विचार सांगायला मी आज आलो आहे.”

 “ सांगा. तुम्ही सांगाल ते कल्याणाचेच असेल.”

 “ करुणाताई, तुम्ही शिरीषला भेटायला जा. शिरीष मुख्य प्रधान झाला आहे. जा त्याचा शोध करीत. राजधानीला जा. तुमच्यावर भूमातेची कृपा आहे. सारे गोड होईल असे मला वाटते. येथले तुमचे सारे कर्तव्य संपले आहे. आता पतिव्रतेचे खरे कर्तव्य हाती घ्या, पतीच्या शोधार्थ बाहेर पडा.”

 “ त्या मोठ्या राजधानीत मी कशी जाऊ ? शिरीष प्रधान. मी खेडवळ. कशी तेथे जायला धजू? 'शिरीष,' म्हणून कशी हाक मारू ? शिरीष कोठे राहातो, म्हणून कोणाला कसे विचारू ? माझे नाते कसे सांगू ? सारी हसतील. वेडी आहे ही बाई असे म्हणतील. आणि मुक्तापूर राजधानी किती दूर? तेथे एकटी कशी जाऊ ? कशी पोचू ? वाटेत जंगले आहेत. मोठमोठ्या नद्या आहेत. कठीण आहे, प्रेमानंद. "  “ करुणे, समाधी बांधताना तू रात्री बेरात्री रानावनात हिंडत असस.तुला कशाची भीती वाटत नसे. अग, नागोबा व वाघोबा येऊन तुझे काम करतात. देवाची तुझ्यावर दया आहे. तुला वाटेत त्रास होणार नाही. नद्या तुला उतार देतील. जंगलातील श्वापदे तुला प्रेम देतील. वाघ वाट दाखवील. दमून तू झोपलीस तर नाग तुझ्यावर फणेचे छत्र धरील. जा, भिऊ नकोस. सती सावित्री पतीपाठोपाठ प्रत्यक्ष काळाबरोबर गेली. सतीला भय ना भीती. तू जा. शेवटी सारे चांगले होईल. माझा शिरीष तुझी वाट पाहात असेल. असेल तिचे प्रेम तर येईल, असे मनात म्हणत असेल. तो मोठा प्रधान आहे. तो इकडे आला तर ते बरे नाही दिसणार. तूच जा. तो तुझा स्वीकार करील. तुला राजधानीत कसे वागावे, काय करावे, ते सारे सुचेल. शिरीषच्या मातापित्यांच्या ह्या सुंदर समाधीजवळच त्यांच्या मुलाकडे जाण्याचा आज निश्वय कर.”

 “ प्रेमानंद, एकटी जाऊ ?”

 “ बरोबर एकतारी घे. गाणी गात जा. यात्रेकरीण होऊन जा. गळ्यात रुद्राक्षांची माळ घाल. धवल वस्त्र परिधान कर. प्राचीन काळातील तपस्विनी, महाश्वेता जणू बनून जा.”

 “ प्रेमानंद, शिरीषचे एक सुंदर चित्र घरी आहे. तुम्हाला माहीत आहे ? तेही बरोबर घेऊन जाईन. त्याचा उपयोग होईल.”

 “ होईल. जा. एकतारी व शिरीषची तसबीर घेऊन जा. प्रेमाची यात्रेकरीण होऊन जा. पातिव्रत्याच्या तीर्थयात्रेला नीघ. तुझ्या कर्तव्यमय जीवनाच्या मंदिरावर शेवटचा कळस उभार. ”

 समाधींची पूजा करून ती निघाली. प्रेमानंद आपल्या शेतावर गेला. करुणा घरी आली. तिने सर्व तयारी केली. घरदार, शेत, मळा, बाग तिने प्रेमानंदाच्या स्वाधीन केली. ‘समाधींची पूजा करीत जा,’ असे तिने त्याला सांगितले.

 करुणा जाणार, ही बातमी गावभर पसरली. सारा गाव तिच्या दारासमोर जमला. सुवासिनींनी तिला वंदन केले. करुणेने सर्वाना प्रणाम केला. सर्वांचे आशीर्वाद व सदिच्छा घेऊन ती बाहेर पडली. गावाच्या सीमेपर्यंत लोक आले आणि मागे वळले. प्रेमानंद आणखीही पुढे गेला.  "प्रेमानंद, किती येणार तुम्ही ? जा आता. जपा. तुम्ही मित्रप्रेमाचे कर्तव्य केलेत. नेहमी मदत केलीत. धीर दिलात. सल्ला दिलात. सत्पंथ दाखवलात. जा, किती याल ?”

 “ शिरीषला प्रेमपूर्वक प्रणाम सांगा. म्हणावे, जन्मग्रामाला एकदा भेट दे. ”

 “ सांगेन. त्यांना घेऊन येईन. राजाजवळ वर मागेन."

 प्रेमानंद परतला. करुणा करुणापर अभंग आळवीत निघाली. एकतारीच्या नादावर ती गात होती. चालण्याचे श्रम तिला गाणी म्हणायला सांगत. ती म्हणे.

 मंदिरात ती स्वयंपाक करी. एक भाग गायीला काढून ठेवी बाकीचे जेवे. ‘ शिरीष, हा शेवटचा तुझा ही घास,' असे उठताना म्हणे. मंदिरातील ओवरीत ती भजन करीत बसे. जाणारे येणारे ऐकत. भक्तिमय होऊन माघारे जात.

 एकदा एक मोठया नदीतून ती नावेत बसून जात होती. परंतु नाव धारेत सापडली. नावाडी नवशिके होते ! लोक घाबरले.

 “ बाई, तुमच्या देवाला तरी आळवा !” लोक म्हणाले.

 “ माझी कोठे आहे पुण्याई ?” करुणा म्हणालीं.

 “ म्हणा तर खरा अभंग !” कोणी आग्रह केला आणि करुणेने धावा म्हटला.

 “ देवा, धाव रे धाव. आम्ही नाव लोटली आहे. तू सुकाणू हातात घे. तू नसशील तर आम्ही मरू, तू असशील तर तरू, ये ये ये.

 “ आम्ही अभिमान टाकला आहे. आळस झाडला आहे. आम्ही भांडणे मिटवली आहेत. स्पर्धा थांबविली आहे. आम्ही सारे वल्ही मारीत आहोत. एकोप्याने कार्य करीत आहोत. तुझा आशीर्वाद दे. तू मार्ग दाखव. ये ये ये."

 “ वारा जोराचा आहे. प्रवाह जोरदार आहे. आम्ही पराकाष्ठा करीत आहोत. प्रभू, तुझी कष्टाळू लेकरे. अंत नको पाहू. ये ये ये."

 “ तो पाहा प्रभु आला. त्याने सुकाणू हाती घेतले. वल्हवणाऱ्यांना स्फूर्ती आली. प्रवाहातून नाव बाहेर पडली. आले, तीर आले. प्रभूची कृपा झाल्यावर काय अशक्य आहे. म्हणून प्रयत्न करताना त्याला हाक मारा. त्याला विसरू नका. देवाला विसराल, तर फसाल. नावाड्यांनो त्याला ओळखाल व आठवाल तर तराल. श्रद्धेचा विजय असो."

 असा तो धावा होता. वल्हवणारे वल्ही मारीत होते, आणि बाकी सारे शांत होते. आणि खरेच नाव धारेच्या बाहेर पडली. जयजयकार झाले. “ तुमचा धावा देवाने ऐकला !” लोक म्हणाले.

 तुमच्याही प्रार्थना त्याने ऐकल्या." करुणा म्हणाली.

 प्रवासात असे अनेक अनुभव येत होते. करुणेची श्रद्धा वाढत होती.

 पुरे, पट्टणे, वने, उपवने ह्यांतून ती जात होती. जिकडे तिकडे राजा यशोधर व प्रधान शिरीष ह्यांची कीर्ती तिच्या कानांवर येई. तिला अपार आनंद होई.

 एकदा तर तिच्या कानावर बातमी आलो, की जवळच्या एका शहरी शिरीष आहेत. करुणेची धावपळ झाली. ती वायुवेगाने त्या शहराकडे निघाली. ती थकली, परंतु चालतच होती. मनाच्या वेगाने जाता आले असते तर ? वा-यावर बसता आले असते तर ? असे तिच्या मनात येई. त्या शहरी येऊन ती पोचली. परंतु ती बातमी खोटी होती. शिरीष नाही, कोणी नाही. ती निराश झाली.

 चार महिने ती प्रवास करीत होती. राजधानी जवळ येत होती. तिचे निधान जवळ जवळ येत होते. स्वर्ग जवळ जवळ येत होता. हळूहळू राजधानी दुरून दिसू लागली, करुणेने प्रणाम केला. मुक्तापूरला तिचे दैवत राहात होते.

 शीतला नदी आली. शुद्ध स्वच्छ शांत नदी. करुणेने मंगल स्नान केले. ती नवीन निर्मळ धवल वस्त्र नेसली. योगिनीप्रमाणे निघाली. सोमेश्वराचा कळस दिसू लागला. त्या मंदिराकडे ती वळली. मंदिराचे प्रशस्त आवार होते. तडी तापडी, साधु बैरागी ह्यांना राहाण्यासाठी तेथे ओऱ्या होत्या.

 करुणा एका ओरीत शिरली. तिने ती ओरी स्वच्छ केली. तिने कंबळ घातले. त्यावर ती बसली. डोळे मिटून तिने ध्यान केले. कोणाचे ध्यान ? सोमेश्वराचे की प्राणेश्वराचे ? का दोघांचे ?