Jump to content

करुणादेवी/मीलन

विकिस्रोत कडून

मी ल न
♣ * * * * * * ♣







 शिरीषने घरी येताच हेमाला ती तसबीर दाखविली व तो म्हणाला, “ ही बघ माझी तसबीर !”

 “ कोठून आणलीस, शिरीष ?” तिने विचारले.

 “ एका भिकारणीची चोरली. पळवून आणली. आज मी चोर झालो"

 “ शिरीष, असे करू नये. "

 “ परंतु मला न विचारता माझे चित्र कोणी काढले? आणि ते का असे वाऱ्यावर टांगून ठेवायचे ? जणू फाशी दिलेला. आणले मी काढून.”

 “ शिरीष, काही तरी बोलतोस. हे तुझे चित्र पुष्कळ वर्षांपूर्वीचे आहे. तू तुझ्या गावी असशील, तेव्हाचे आहे. तुझ्या घरी होते हे चित्र ?”

 "होते."

 “ तेच असेल हे तुझे. आईबाप मेले, घरात कोणी नसेल. तुझे चित्र कोणी तरी लांबविले. परंतु त्या भिकारणीने त्याला माळ का घातलीं ? हे चित्र कोणाचे आहे हे का तिला माहीत होते ?”

 "मला नाही माहीत "

 “ शिरीष, ही तसबीर माझ्या महालात लावू, मी तिला रोज हार घालीत जाईन. दे."

 अशी पतिपत्नींची बोलणी चालली होती, तो राजाचे बोलावणे आले म्हणून शिरीष निघून गेला. हेमा ती तसबीर मांडीवर घेऊन बसली होती, तो बाहेर ती बाचाबाची झाली. भिकारीण भांडत होती. हेमाने भिकारणीस आत ओढले. करुणेने सर्व हकीगत सांगितली. शिरीष सोडून गेल्याषासूनचा इतिहास तिने सांगितला. हेमा शांतपणे ऐकत होती. मधूनमधून सद्गदित होत होती.

 “ करुणे, आता हे चित्र नको मागू. शिरीषच तुला देते. जिवंत मूर्ती घे. शिरीषने मला हे मागेच का बरे सांगितले नाही ? ही हेमा मत्सरी नाही. ”

 “ हेमा. रागावू नको. शिरीष मनाचा कोमल आहे. आपण दोघो भांडू असे त्याला बाटले असेल. जगात सवतीमत्सर फार वाईट. शिवाय येथून येण्याचीही अडचण. माझ्या शिरीषवर रागावू नका.”

 “ करुणे, किती थोर मनाची तू! किती तुझी श्रद्धा, किती विश्वास, किती प्रेम ! ऊठ. चल. मंगल स्नान कर. सुंदर वस्त्रे नेस. अलंकार घाल. शिरीष घरी येईल, त्याचे तू स्वागत कर. मी लपून राहीन शिरीषची गंमत करू. तो घाबरेल. बिचकेल. पळू लागेल. गंमत करू हा. ऊठ आता.”

 करुणा स्नानगृहात गेली. कढत कढत पाणी तिने घेतले. अंगाला उटणी लावली. केसांना सुगंधी तेल लावले. स्नानोत्तर ती रेशमी वस्त्र नेसली. मोत्यांचे हार धातले. प्रसन्नमुखी जणू देवता ती दिसत होती.

 दोघीजणी बोलत बसल्या. दोघींनी फलाहार केला. करुणेचे हृदय फुलले होते. आनंद उचंबळला होता. मध्येच हेमाच्या हाताचे ती प्रेमाने चुंबन घेई. शिरीषचा रथ आला. बाहेर ललकारी झाली. हेमा लपली. तेथे मंचकावर करुणा बसली होती. पवित्र, प्रेमळ, हसतमुखी करुणा. शिरीष आला. एकदम आत आला. करुणा उभी राहिली. शिरीष चपापला. आपण घर तर चुकलो नाही, असे त्याला वाटले. तो घाबरला.

 “ क्षमा करा हा !” असे म्हणून तो जाऊ लागला.

 “ अपराध्याला क्षमा नाही. अपराध करून सवरून आता पळून कोठे चालला ?”

 करुणेने शिरीषचा हात धरला. तो निसटून जाऊ लागला.

 “ हेमा, हेमा !' त्याने हाका मारल्या.

 “ ओ ” करून पलंगाखालून हेमा बाहेर आली. ती हसत होती.

 “ फजिती, राजाच्या मुख्य प्रधानाची फजिती. शिरीष, पळून काय जातोस ?"  “ हेमा, काही तरी काय बोलतेस ? मनुष्याने पापापासून पळावे, परस्त्रीपासून पळावे.”

 “ शिरीष, स्वस्त्रीपासून पळणे म्हणजे कां पुण्य ?”

 “ मी तुला कधी सोडले आहे का?”

 “ आणि करुणेला ? करुणेची करुणा तुला अद्याप का येत नाही ? तुझ्यासाठी ती भिकारीण बनली, तरी तुला दया येत नाही ? शिरीष बघ, ह्या सुंदर स्त्रीकडे बघ. माझी अनुज्ञा आहे. माझ्या आज्ञेने तिचा मुखचंद्र पाहा. बघ पटते का ओळख ?”

 “ करुणा, माझी करुणा !”

 शिरीषने करुणेचे पाय धरले. करुणा लाजली.

 “ हे काय शिरीष ? माझे पाय दुखत नाहीत हो. तुझेच यात्रेत हिंडून दमले असतील. भिकारणीला भेटायला आज भिकारी होऊन आला होतास वाटते ? शिरीष, बस. माझे सारे श्रम आज सफळ झाले.”

 “ शिरीष, करुणेला पूर्वीच रे का नाही आणलेस ? तिच्या संगतीत माझा उद्धार झाला असता.”

 “ माझाही !” शिरीष म्हणाला.

 “ काही तरी बोलू नका, ” करुणा म्हणाली.

 “ शिरीष, आम्ही भांडू असे का तुला वाटले ? अरे, श्रीकृष्णाच्या सोळा सहस्र नारी भांडत नसत. आम्ही दोन का भांडलो असतो ?”

  “श्रीकृष्ण सोळा सहस्र नारींना वागवू शकत होता, त्याची थोरवी आम्हा क्षुद्रांना कोठली ? आम्हाला एकीचेही चित्त सांभाळता येत नाही, तेथे दोघींचे कसे व्हायचे ?”

 “ शिरीष, असे नको बोलू. आता आनंदी राहा. आता नाही ना उदास राहाणार? करुणे, शिरीष इतक्या वर्षात मोकळेपणाने हसला असेल तर शपथ. ”

 “ करुणे, आपल्या विवाहाचा वाढदिवस लवकरच येईल. हेमा, आम्ही आमच्या विवाहाचा वाढदिवस साजरा करीत असू. एका वाढदिवसाच्या दिवशीच राजाचे दूत मला न्यायला आले.”
 “ शिरीष, आपल्या लग्नाचा वाढदिवस तू का बरे कधी केला नाहीस ?”

 “ मनात शल्य होते म्हणून. आता तुझ्या माझ्या लग्नाचाही दर वर्षी साजरा करू. परंतु दिवस आहे का लक्षात ?”

 "शिरीष, तो दिवस कधी तरी कोणी विसरेल का ?"

 “ आज यात्रेच्या दिवशी हे अपूर्व मीलन.”

 “ माझ्या प्रेमळ आईबापांचा हा आशीर्वाद.”

 “ माझ्या सासूसासऱ्यांचा आशीर्वाद.”