करुणादेवी/दुःखी करुणा

विकिस्रोत कडून
दुः खी
क रु णा

♣ * * * * * * ♣







 शिरीष गेल्यापासून करुणा हसली नाही. तिचा चेहरा उदास असे, गंभीर असे. ती घरचे सारे काम करी. सासूसासऱ्यांची सेवा करी. रात्री अंथरुणावर पडली म्हणजे मात्र तिला रडू आल्याशिवाय राहात नसे.

 करुणा एकटी मळ्यात काम करी. परंतु तिच्याने कितीसे काम होणार ? पूर्वी दोघे होती, तेव्हा मळा चांगला पिके. आता पीक येत नसे. मजूरीने माणसे लावायला पैसे नसत. घरी नांगर ना बैल. कोणाचा बैल, कोणाचा नांगर मागावा ! कसे तरी करून करुणा गाडा हाकीत होती.

 परंतु हळूहळू कर्ज झाले. मळा गहाण पडला. शेवटी तो सावकाराच्या घशात गेला. आता कोठली बाग, कोठली फुले ? करुणा आता दुस-याकडे मोलमजूरी करी. कोणाच्या शेतात खपे. कोणाच्या घरी दळणकांडण, कोणाची धुणी करी आणि सासूसासऱ्यांचे पोषण करी. करुणेच्या जवळ आता काही नव्हते. सोन्याचांदीचा दागदागिना नव्हता. अंगावर फुटका मणीसुद्धा नव्हता. तिच्या नेसूच्या चिध्या असत. गरीब बिचारी ! परंतु स्वतःचे दु:ख उगाळीत बसायला तिला वेळ नसे. तिच्यावर जबाबदारी होती. पतीने सूर्यनारायणाची साक्ष घ्यायला लाविली होती. सासूसासऱ्यांचे पालन तिला करायचे होते. ती दिवसभर राब राब राबे. कधी रानात जाई व मोळी घेऊन येई. कधी रानात जाई. व करवंदे विकायला आणी. किंती कष्ट करी !

 परंतु कष्टाचे चीज होत नव्हते. सासूसासरे तिच्यावर रागावत. हीच पांढऱ्या पायांची अवदसा आहे, असे ती म्हणत. एके दिवशी नित्याप्रमाणे, करुणा सासूबाईंचे रात्री पाय चेपीत होती. सासू एकदम ओरडली “नको चेपू पाय. तुझे हात लावू नकोस. तू माझा मुलगा दवडलास. तू तुझे आईबाप लहानपणी खाल्लेस आणि आम्हाला छळायला आलीस. तुला मूळबाळही होईना. वांझोटी, म्हणून गेला माझा बाळ. वैतागून गेला. हो चालती, कर तोंड काळे. सेवा करण्याचे सोंग करते सटवी. रानात जाते मोळी आणायला. रानात चोरून खात असशील, कोणाला मिठ्या मारीत असशील, नीघ. रडते आहे. झाले काय रडायला ? सोंगे करता येतात.”

 सावित्रीसासू वाटेल ते बोलली. करुणा अश्रु ढाळीत होती. ती पुन्हा पाय चेपू लागला. तो त्या वृद्ध सासूने लाथ मारली. अरेरे!

 करुणेचे आचरण धुतल्या तांदळासारखे होते. तरीही सासू नाही नाही ते बोलत असे. इतर सारी बोलणी करुणा सहन करी. परंतु पातिव्रत्यावर, सतीत्वावर टीका तिला खपत नसे. त्या रात्री तिला झोप आली नाही.

 एके दिवशी तो प्रेमानंदाकडे गेली.

 “ काय करुणा, काय काम ?” त्याने विचारले.

 “तुम्ही शिरीषचे मित्र. तुम्ही मला प्रतिज्ञेतून मोकळे करता का ? तुम्ही त्या दिवशी साक्षी होतेत. अत:पर जगावे असे मला वाटत नाही. सासूसासऱ्यांची मी सेवा करीत होते. पतीची आज्ञा होती. परंतु सासूबाई वाटेल ते बोलतात. माझ्या निर्मळ, निर्दोष शीलावरही शितोडे उडवतात.प्रेमानंद, मी इतर सारे अपमान गिळीत होते. मारहाण सहन करीत होते. परंतु प्राणाहून प्रिय असे पातिव्रत्य त्याच्यावरच प्रहार झाला तर मी कशी जगू ? तुम्ही त्यांचे मित्र. तुम्ही सासूबाई व मामंजी ह्यांची काळजी घ्या. मला जाऊ दे जगातून. दळभद्री, कपाळकरंटी मी. कशाला जगू ? पतीला दिलेल्या शब्दासाठी जगत आहे. प्रतिज्ञापूतिसाठी, घेतलेल्या शपथेसाठी जगत आहे. सांगा, कृपा करा. मला मुक्त करा.”

 “ करुणे, जग काही म्हणो, आपले मन शुद्ध असले म्हणजे झाले. आपलेच मन जर आपणास खात असेल तर गोष्ट निराळी. तू आपली शपथ पाळ. सूर्यनारायणाला डोळे आहेत. तो तुझ्या चारित्र्याकडे पाहात आहे. मानवांना घेऊ दे शंका, प्रभू घेणार नाही. समजलीस ? जा. सेवा चाकरी करीत आहेस तशीच कर. देव तुझ्यावर प्रसन्न होईल. तुझी तपश्वर्या फळेल. तू सुखी होशील. जा, नको रडू. मी सुखदेव व सावित्रीबाई ह्यांना सांगेन हो.”

 करुणा रानात गेली. मोळी तोडून दमली. एका ठिकाणी रडत बसली. तेथे तला झोप लागली. मोळीवरच डोके ठेवून ती निजली. तिला एक सुंदर स्वप्न पडले. शिरीष आपले अश्रू पुशीत आहे, केसात फूल खोवीत आहे. ‘ उगी, रडू नको, आता हस, ’ असे सांगत आहे असे तिने पाहिले, ऐकले. गोड मधुर स्वप्नात हसत होती. इतक्यात पाखरांचा एकदम किलबिलाट झाला. करुणा जागी झाली. पाखरांचा कलकलाट सुरू होता. काय झाले ? का घाबरली ती पाखरे ? कोणी पारधी तर नाही ना आला ? कोणी शिकारी तर नाही ना आला ? का त्या पाखरांना सर्प दिसला ? काय झाले ?

 तिला काही समजेना. तिने इकडे तिकडे पाहिले. नव्हता शिकारी, नव्हता साप. ती उठली. मोळी डोक्यावर घेऊन निघाली. ऊन मी म्हणत होते. तिचे पाय चट चट भाजत होते. तिने पळसाची पाने पायांना बांधली. मोळी घेऊन ती गावात आली. परंतु तिची मोळी कोणी विकत घेईना.

 “ करुणे, ये, तुझी मोळी मी विकत घेतो.”

 प्रेमानंदाचे ते शब्द होते. त्याने तिला दोन शेर दाणे दिले. मोळी टाकून करुणा घरी गेली.

 “ करुणे, आम्हाला का उपाशी मारणार आहेस तू ? किती उशीर !” सासू म्हणाली.

 “ सासूबाई, घरात दाणे नव्हते. तुम्हाला खायला तरी काय देऊ ? मी मोळी घेऊन आल्ये. परंतु कोणी विकतही घेईना. गावात हिंड हिंड हिंडले. शेवटी मोळी विकून हे दोन शेर दाणे आणले. आता दळते व देत्ये हो भाकरी करून. रागावू नका. भूक लागली असेल तुम्हाला. परंतु मी तरी काय करू ?"

 करुणेने दाणे पाखडले. ती दळायला बसली. ती थकलेली होती, परंतु तिला कोठला विसावा ? दोघांपुरते पीठ दळून ती उठली. तिने चूल पेटविली. म्हाताऱ्यास कढत कढत भाकर तिने वाढली. नंतर थोडा तुकडा खाल्ला.

 सासूबाई अलीकडे फार बोलत नसत. जणू त्यांनी मौन धरले. पूर्वी, शिव्याशाप, आता अबोला. परंतु करुणेला आता सर्व सवय झाली होती. सारे अंगवळणी पडले होते. येईल दिवस तो काढायचा असा तिने निश्चय केला होता.

 परंतु त्या वर्षी दुष्काळ आला. कित्येक वर्षात असा दुष्काळ पडला नव्हता. राजा यशोधराने ठायी ठायी असलेली सरकारी कोठारे मोकळी केली. लोकांना धान्य वाटले जाऊ लागले. राजाच्या धान्यागाराजवळ भाणसांची मुंग्यांसारखी राग लागे.

 गावोगावची पेवे उपसली गेली. सावकार, जमीनदार ह्यांनी कोठारे मोकळी केली. एकमेकांस जगवू असे सारे म्हणत होते. मोठी कठीण दशा. गायीगुरे तडफडून मरण पावू लागली. गुराना ना चारा ना पाणी. नद्या आटल्या. तळी आटली. लोक म्हणत समुद्रसुद्धा आटेल.

अंबर गावापासून कोसावर एक मोठा विहीर होती. तिला फक्त पाणी होते. अपरंपार पाणी. मुसळासारखे त्या विहिरीला झरे होते. तेथे माणसांची झुंबड होई. माणसे, गायीगुरे, पशुपक्षी ह्यांची गर्दी तेथे असे. करुणा लांबून घडा भरून घरी आणी.

 एकदा करुणा घडा घेऊन येत होती. वाटेत एक गाय पडली होती. तिला चालवत नव्हत. ती तहानली होती. त्या गोमातेने करुणेकडे पाहिले. करुणा कळवळलली, ती आपला घडा घेऊन गायीजवळ गेली. परंतु गायीचे तोंड घड्यात जाईना. इतक्यात करुणेला युक्ती सुचली. तिने एक दगड घेऊन हळूच वरचा भाग फोडला आणि रुंद तोंडाचा तो धडा गायीसमोर ठेवला. गाय पाणी प्यायली. शेवटचे पाणी. करुणेकडे प्रेमाने ब कृतज्ञतेने पाहात गोमातेने प्राण सोडले !

 “ घडा कसा फोडलास ?” सासूने विचारले.

 “ गायीला पाणी पाजण्यासाठी. ” तिने सांगितले.

 “ आम्ही इकडे पाण्यासाठी तडफडत होतो. तुला गायी-म्हशी आमच्याहून प्रिय. आम्हाला मारून तरी टाक. आणि तो घडा जुना  होता. किती तरी वर्षांचा. तो का फोडायचा ?” सासू बोलत होती. करुणेने दुसरा घडा घेतला व लांबून त्या विहिरीवरून तिने भरून आणला. तिने सासूसासऱ्याना पाणी पाजले. नित्याप्रमाणे तिने त्यांची सारी सेवा केली.

 धान्य आता मुळीच मिळेनासे झाले. करुणा कोठून तरी, काही तरी आणी व सासूसासऱ्यास दोन तुकडे देई. ती कोठून कोंडा आणी, कण्या आणी. रानातून कधी ओला पाला आणी. काहीतरी करी व सासूसासयांना जगवी.

 “ करुणा, कसली ही भाकरी ! घाणेरडा कोंडा, हा का खायला घालणार आम्हाला ? तू मागून जेवतेस. तुझ्यासाठी चांगली करीत असशील भाकरी, म्हणन तर टुणटुणीत आहेस. बाळ शिरीष कोठे रे आहेस तू ? परंतु ही कैदाशीण घरात आहे, तोपर्यंत तू नाही येणार. अस, बाळ. कोठेही सुखात अस !” असे सासू बोलत होती.

 करुणेचे डोळे घळघळू लागले. खरोखर, दोन दोन दिवसांत तिला घास मिळत नसे. जे काही मिळे, ते आधी ती सासूसासऱ्यास देई. तरी ही अशी बोलणी. तिची सत्त्वपरीक्षा चालली होती.

 एके दिवशी सरकारी दुकानावर करुणा गेली होती. तिथे अपार गर्दी. केव्हा येणार तिची पाळी ? आणि ही काय गडबड ? अरेरे ! ती पाहा एक गरीब स्त्री ! तिचे दिवस भरले होते वाटते ! अरेरे ! गर्दीत धक्काबुक्की होऊन ती तेथेच बसली आणि प्रसूत झाली ! दुष्काळात बाळ जन्माला आले. कशाला आले ?

 करुणेने त्या भगिनीची व्यवस्था केली. तिला सावरले. तिला एका झोपडीत तिने पोचविले. ती परत आली. रात्र होत आली. दुकान बंद होत होते.

 “ मला द्या हो दाणे. मी त्या बहिणीला पोचवायला गेल्ये होत्ये. द्या हो दादा.”

 “ आता उद्या ये. आम्ही थकलो.”

 “ सासूसासरे उपाशी आहेत. द्या. मी एकटीच आहे येथे आता. गर्दी नाही. राजा यशोधराच्या राज्यात का दया उरलीच नाही ?”  “ यशोधर गादीवर आहेत, म्हणून तर इतकी व्यवस्था. सर्वत्र दुष्काळ, ते तरी काय करतील ? प्रधान शिरीष ह्यांनी दुस-या देशांतूनही धान्य आणण्यासाठी हजारो बैलगाड्या पाठवल्या आहेत. स्वतः यशोधरमहाराज एकदा चार घास खातात. प्रजा पोटभर जेवेल. त्या दिवशी मी पोटभर जेवेन असे त्यांनी राजधानीत जाहीर केले. राजधानीतील मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्याही घरी दोन चार दिवसांना पुरेल इतकेच धान्य असते. महाराजांचे थोर उदाहरण सर्वासमोर आहे. तरी त्यांना तू नावे ठेवतेस ? पातकी आहेस !” तो अधिकारी म्हणाला.

 “ कृपा करा दादा. दुःखामुळे मी बोलल्ये. महाराज यशोधर पोटच्या पोराप्रमाणे प्रजेला जपतात. आणि म्हणून तर तुमच्यासमोर मी पदर पसरत्ये. तुम्ही महाराजांचे सत्त्व जाऊ देऊ नका. त्यांच्या नावास कलंक लावू नका. मी तुमची अनाथ मुलगी आहे.”

 लावलेले दुकान पुन्हा उघडून करुणेला चार पायल्या धान्य मिळाले. त्यांना दुवा देत ती निघाली. चार पायल्या धान्य मिळाल्यामुळे तिला आनंद झाला होता. तिच्या दुबळ्या पायांत त्या आनंदामुळे शक्ती आली होती. रस्त्यात अंधार होता. परंतु कर्तव्याचा प्रकाश तिला पंथ दाखवीत होता.

 परंतु कोण येत आहे ते अंधारातून ? चोर की काय ? होय. तो चोरच होता. त्याने एकदम करुणेच्या डोक्यावरचे पोते ओढले. करुणा चमकली. पोत्याची ओढाताण सुरू झाली. चोर ते घेऊन पळून गेला. करुणेची सारी शक्ती गेली. आता घरी त्या म्हाताच्यांना तोंड कसे दाखवायचे ? परंतु ती उठली. अंधारात तशीच निराशेने निघाली. घरी आली. ती दोन पिकली पाने फटकुरावर पडलेली होती.

 “ करुणे, मिळाले का काही ?” सासयाने विचारले. तिने सारी कथा सांगितली. त्या म्हाताऱ्याने सुस्कारे सोडले. तिने त्यांना घोटघोट पाणी पाजले. तीहीं पाणी पिऊन पडली.

 दुस-या दिवशी सकाळी ती प्रेमानंदाकडे गेली.

 “ काय करुणे, म्हातारी कशी आहेत ?” “ प्रेमानंद चार दिवसांत घासभरही अन्न मिळाले नाही. काल मला रात्री धान्य मिळाले. मी येत होते. चोरांनी ते लुटले. मी काय करू ? तुम्ही त्यांचे मित्र. काही मदत करा. तुमच्याजवळ मागायला संकोच वाटतो. परंतु इलाज नाही. माझे प्राण त्यांना खायला घालता आले असते, तर घातले असते. परंतु बोलून काय उपयोग ?”

 “ करुणे, हे घे थोडे धान्य. आत खूप कोंडा आहे. तो पाखड. निघतील चार मुठी दाणे. ते त्या म्हाताऱ्याना शिजवून घाल हो. काळ कठीण आहे खरा. एकमेकांना शक्य तो जगवायचे. ”

 ते भुसकट घेऊन करुणा घरी आली. पडवीत सूप घेऊन ते भुसकट ती पाखडू लागली. कोंडा उडत होता. दाणा मागे राहात होता. दाणे पाखडता पाखडता ती गाणे म्हणू लागली.

  “ फटकं फटक फटक !"

 सुपाचा आवाज होत आहे. कोंडा उडत आहे. निःसत्त्व क्षुद्र कोंडा उकिरड्यावर फेकण्याच्या लायकीचा कोंडा.

  " फटक फटक फटकं !"

 “ मीही ह्या कोंड्यासारखी आहे. दैव मला पाखडीत आहे. उकिरड्यावर मला फेकीत आहे. मी निराश आहे. मी दु:खी आहे. मी दुबळी, नि:सत्त्व आहे. मी कोणालाही नको. आईबाप मला सोडून गेले, पती मला सोडून गेला. सासूसासरे नावे ठेवतात. कोण आहे मला ? कोंडा, कोंडा. कोंड्यासारखे माझे जीवन. फुकट, फुकट.”

 "फटक फटक्त फटक्र ! "

 अशा अर्थाचे ते गाणे होते. करुण करुण गाणे. दाणे पाखडून झाले. ते तिने दळले. तिने त्या पिठाची पातळसर लापशी केली. सासूसासऱ्यास पाजली. त्यांनी प्रेमाने व कृतज्ञतेने तिच्याकडे पाहिले. किती तरी दिवसांनी इतक्या मायाममतेने त्या वृद्धांनी सुनेकडे पाहिले !

 “ करुणे, धन्य आहे तुझी. तुझे ते गाणे ऐकून दगडालाही पाझर फुटेल. आम्ही तर माणसे आहोत. करुणे, तू कोंडा नाहीस. तू टपोरे मोती आहेस. मोलवान् पृथ्वीमोलाचे मोती. आम्हाला तुझी पारख झाली नाही. कोंबड्यांना कोंडा कळतो. मोती काय कळणार ? तुला आम्ही वाटेल ते बोललो. तुला छळले. तू सारे सहन केलेस. तुझ्या पवित्र पातिव्रत्यावरही शितोडे उडवले. अरेरे ! झडो माझी जीभ. करुणे, तू किती कष्ट करतेस. सारे आमच्यासाठी. तू रानावनात जात असस. पायांना तुझ्या फोड येत. हातांना लाकडे तोडून घट्टे पडत आणि वाटेल ते बोलून तुझ्या हृदयासही आम्ही घरे पाडीत असू. तू उपाशी राहून आम्हाला जगवीत होतीस. तू कोंडा खाऊन आम्हास चांगले देत होतीस. तरी मी तुला उलट म्हणत असे, की तूच चांगले खातेस, आमची उपासमार करतेस. मुली ! क्षमा कर आम्हाला. पुत्रवियोगाच्या दुःखामुळे तुला बोलत असू. आमचा बाळ गेला. आम्हाला विसरला. तूच आता आमचा मुलगा. तूच आधार. ये अशी जवळ ये. तुझ्या डोक्यावरून हात फिरवू दे. तुझे अश्रूपुसू दे. ये, ये हो जवळ, ”

 आणि त्या वृद्ध दुर्बळ सासूने सुनेला जवळ ओढून घेतले. करुणेने सावित्रीबाईच्या वक्षःस्थलावर डोके ठेवले. तिला हुंदके आवरत ना.

 “ उगी. नको हो रडू बाळ. उगी उगी. तुझे सारे चांगले होईल. शिरीष तुला भेटेल. आमचे आशीर्वाद आहेत हो तुला. तू सुखी होशील. अमावास्येची पौर्णिमा होईल. दुर्दैव जाऊन सुदैव फुलेल हो,"

 किती तरी दिवसांनी अशी प्रेमळ, अमृतमय वाणी करुणेच्या कानी आज पडत होती. धान्यपाण्याचा दुष्काळ ह्या वर्षी होता; परंतु शिरीष गेल्यापासून करुणेच्या जीवनात प्रेमाचा, सहानुभूतीचा, सदैव दुष्काळच होता. तिला एक थेंबही मिळत नव्हता. ती किती तरी दिवस प्रेम व सहानुभूती ह्यांची भुकेली होती. आज तो दुष्काळ संपला. बाहेरचा दुष्काळ अद्याप होता. पाऊस अजून पडायचा होता. मेघ यायचे होते. परंतु करुणेच्या जीवनात आज प्रेमाचे दोन मेघ आले. सासूबाईंनी तिला प्रेम पाजले. तिने त्यांना पेज दिली, परंतु त्यांनी तिला माया ममता दिली इतक्या वर्षाचे श्रम सफल झाले. सासूसासच्यांनी वाहवा केली. प्रेमाने पाठीवरून हात फिरविला. दुःखी करुणा प्रसन्न झाली.