करुणादेवी/समारोप

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
स मा रो प
♣ * * * * * * ♣

 “ शिरीष, सासूबाई व मामंजी ह्यांच्या समाधीवर फुले वाहायला जायचे ? " हेमाने विचारले.

 “ प्रेमानंदानेही बोलावले आहे. जन्मभूमीला विसरू नकोस, असा त्याचा संदेश आहे, ” करुणा म्हणाली.

 “ करुणे, मी जननीलाही विसरलो व जन्मभूमीलाही विसरलो. मी महान् पातकी आहे !” शिरीष दुःखाने म्हणाला.

 “ परंतु करुणेची पुण्याई आपला उद्धार करील. करुणा का निराळी आहे? आपल्या तिघांच्या पापपुण्याचा जमाखर्च एक करू. चालेल ना, करुणे ?” हेमा म्हणाली.

 “ हो, चालेल. तिघांच्या जीवनाचे प्रवाह एकत्र मिळू देत. त्रिवेणीसंगम होऊ दे. सर्वात पवित्र संगम. शिरीष, कधी जायचे धरी ?”

 “ राजाला विचारीन, मग निघू ”

 एके दिवशी राजाला शिरीषने आपल्या अंबर गावी जाण्याची परवानगी विचारली. राजाने आनंदाने दिली. राजा यशोधर आणखी म्हणाला, “ शिरीष, तुमच्या आईबापांच्या त्या समाध्या जेथे आहेत त्यांच्याजवळ एक प्रचंड स्तंभ उभारला जावा असे मला वाटते. तुम्ही तशी व्यवस्था करा. त्या स्तंभावर करुणेची कथा खोदवा.”

 राजाची आज्ञा घेऊन शिरीष घरी आला आणि थोड्याच दिवसांनी हेमा व करुणा ह्यांना संगे घेऊन तो आपल्या जन्मभूमीला अंबरला आला. सारा गाव त्यांच्या स्वागतार्थ सामोरा आला होता. ध्वजा, पताका, तोरणे ह्यांनी सर्व गाव शृंगारण्यात आला होता. प्रेमानंदाने तिघांच्या गळ्यांत हार घातले. मंगल वाद्ये वाजत होती. मिरवणूक निघाली. किती तरी वर्षांनी शिरीष आपल्या जुन्या घरी आला. लोक आता आपापल्या घरी गेले. शिरीषने प्रेमानंदाला मिठी मारली.

 “ शिरीष, किती वर्षानी भेटलास !”

 “ परंतु तू माझ्या हृदयात होतास. जेवताना एक घास तुझ्या नावाने मी घेत असे."

 शिरीषने हेमाला मळा, बाग सारे दाखविले आणि तिघे पूजापात्रे हाती घेऊन समाधींच्या दर्शनार्थ गेली. शिरीषने साष्टांग नमस्कार घातला. तो रडत होता. भूमातेवर अश्रूचा अभिषेक झाला. तो उठेना. तसाच दंडवत् पडून राहिला.

 “शिरीष, ऊठ आता. अश्रुंनी खळमळ धुऊन जाते ऊठ राजा !” करुणा म्हणाली.

 हेमाने त्याला उठविले. तिघे हात जोडून उभी होती. शिरीष म्हणाला “ आई, बाबा, क्षमा करा हो.”

 “ क्षमा ! ' आकाशवाणी झाली."

 तिघे परत आली. शिरीषने गावाला मिष्टान्नाचे भोजन दिले. त्याने कोणाला ददात ठेवली नाही. कोणाला घर बांधून दिले. कोणाला जमीन दिली. कोणाचे कर्ज फेडले.

 “ माझ्या जन्मभूमीत कोणी दुःखी नको !” तो म्हणाला.

 एके दिवशी हेमा, करुणा, प्रेमानंद व शिरीष अशी बसली होती.

 “ प्रेमानंद, मी सर्वांना काही तरी दिले. तुला काय देऊ?” शिरीषने विचारले

 “शिरीष, तू का निराळा आहेस ? तुझे ते माझेच आहे. तू मला प्रेम दिले आहेस. तू रोज आठवणपूर्वक एक घास मला देत होतास, त्यात सारे त्रिभुवन आले."

 एके दिवशी ती तिघे जायला निघाली. प्रधानाला फार दिवस दूर कसे राहाता घेईल ! सारा गाव पोचवीत आला, बोळवीत आला. प्रेमानंद साश्रू व सगद्गद असा उभा होता. रथ गेला. गावकरी स्तुतिस्तोत्रे गात परत आले. “ करुणादेवीचा हा सारा महिमा. तिच्या तपश्वर्येचे हे फळ !” ते म्हणत होते. प्रेमानंद मुकाट्याने घरी गेला.

 तिघे राजधानीत आली. पुन्हा प्रधानपदाचा कारभार सुरू झाला. दिवस आनंदात जात होते.आणि पुढे हेमा व करुणा दोघींना मुलगे झाले. जणू चंद्रसूर्यच पृथ्वीवर आले! राजधानीत शर्करा वाटल्या गेल्या. महोत्सव झाला. आदित्यनारायण ह्यांनी नातू पाहिला. त्यांना धन्य वाटले.

 बरेच दिवस संसार करून तो तिघे मरण पावली, देवाकडे गेली. किती तरी दिवस त्याच्या कथा लोक सांगत असत आणि करुणेचा महिमा तर त्या प्रांतात अद्याप सांगतात. ते मुक्तापूर आज नाही. ते अंबर गाव आज नाही. त्या समाध्या आज नाहीत. तो उंच स्तंभ आज तेथे नाही. तरीही करुणादेवीची गाणी त्या प्रांतात अजून म्हटली जातात. भिकारी म्हणतात. बायामाणसे ऐकतात. मुले मुली ऐकतात.

 “ आई, खरेच का ग अशी करुणादेवी झाली ?”

 मुले मग विचारतात.

 “ तर का खोटे आहे गाणे ? खरेच ही अशी करुणादेवी झाली. तिला मनात प्रणाम करा हो !” असे आई सांगते.

स मा प्त