Jump to content

गांव-गाडा

विकिस्रोत कडून










गांव-गाडा.
Notes On
Rural Sociology & Village Problems
WITH
Special Reference to Agriculture


गांव-गाडा.
-----



रचणार,
त्रिंबक नारायण आत्रे, बी. ए., एल एल. बी.
-----


-----
सर्व हक्क स्वाधीन.
-----


आवृत्ति पहिली, प्रती २०००.
-----

इ. स. १९१५.
-----
किंमत सव्वा रुपाया.

हे पुस्तक कर्त्याकडे पोस्ट कर्जत, जिल्हा अहमदनगर येथे, अगर
पुणे येथे आर्यभूषण छापखान्यात मिळेल.









पुणें येथें,
आर्यभूषण’ छापखान्यांत नटेश अप्पाजी द्रविड यांनी
छापिलें व पुणें येथें ‘आर्यभूषण' छापखान्यांत
त्रिंबक नारायण आत्रे यांनीं
प्रसिद्ध केलें.






अर्पणपत्रिका
-----

नामदार सर रिचर्ड अँफ्लेट लँब साहेब बहादुर,
के. सी. एस. आय, सी. एस्. आय., सी. आय ई.,
आय सी. एस., सीनियर मेम्बर,
एक्झिक्यूटिव कौन्सिल,
ह्यांच्या सन १८९६ ते १९०२ पर्यंतच्या दुष्काळां
तल्या अत्यंत सहानुभूतिपर व लोकप्रिय
कारकीर्दीची आठवण म्हणून
ही आवृत्ति
आदरपूर्वक अर्पण केली असे.



ग्रंथकर्ता.
वंदन.

नमस्कार ! वाचकश्रेष्ठ !! महाराष्ट्रांतील गांव-गाडा लहानपणापासून पाहण्यांत येत असल्यामुळे त्याचे विचार फार दिवसांपासून मनांत घोळत; आणि हें नको ते पाहिजे असे वाटे. परंतु अमुक गोष्ट वाईट आहेशी वाटते ती खरोखरीच वाईट आहे किंवा आपल्याला ती चांगलीशी उमजली नाहीं स्हणून वाईट दिसते ही शंका राहून राहून येई व दटावून सांगे क ‘थांब,पुनः ती पहा व तिचा विचार कर. कविकुलगुरु कालिदासाने म्हटल्याप्रमाणं “विकारं खलु परमार्थतोऽज्ञात्वानारंभः प्रतीकारस्य.” ज्या ठिकाणीं व ज्या लोकांत सुधारणा करावयाच्या त्यांविषयी शक्य तितकी ऐतिहासिक, सामाजिकधार्मिक, सांपत्तिक, राजकीय वगैरे हरतऱ्हेची माहिती हस्तगत केल्यावांचून पूर्वग्रह, परंपरा व चालू वहिवाट ह्यांच्या बसल्या घडीवर उपायचिंतन कसें होईल ? अशा मार्गाने पहिले पहिले पुष्कळ विचार पालटत गेले; आणि विशेषतः गेल्या पंधरा वीस वर्षांच्या श्रवणाने अवलोकनाने, मननाने आणि अनुभवाने त्यांपैकीं जे मुकरर झाले, त्यांचे व्युत्पत्ति, इतिहास, समाजशास्त्र आणि म्हणीं वगैरेंवरून सुचणाऱ्या नानाप्रकारच्या प्रचलित समजुती इत्यादींच्या धोरणानं रेखाटलेले सोपपत्तिक शब्दप्रतिबिंब आपणाला सादर करीत आहें.

प्रकृत पुस्तकाच्या अवघ्या विषयांचे आकलन साधारण मनुष्यानं करू म्हणणें म्हणजे थोडें फार वाऱ्याची मोट बांधण्याची आकांक्षा धरण्यासारखेच आहे. गांव-गाड्यांत काय एक येत नाहीं? त्या सर्वांचा यथाक्रम, यथाभाग व यथान्याय समावेश करणे मला तरी दुर्घट वाटले. त्यांतून गांव-गाडा प्राचीन कालीं जरी आंखून भरला असला तरी पुढे तो तसाच धुराड, उलाळ, एकार वगैरे न येतां आपल्या मूळच्या ढाळावर रेखला चालला आहे असें बिलकुल नाहीं. उलट जागा, प्रमाण, तोल इत्यादि न पाहतां जशी रीघ मिळाली तशी त्यांत भरती होतच गेली, आणि हा आज येथं तर उद्यां दुसरीकडे अशी ढकलाढ़कल, कोंबाकोंबी व चेंगराचेंगर सदैव चालू राहिली. ह्याप्रमाणें मूळ भरितांतच जर कालवाकालव व गोंधळ तर त्यावरील माझ्या टिपणांच्या मांडणुकींत तंतोतंत टापटीप अगर टीपबंद व्यवस्थितपणा दिसून न आल्यास त्याकडे आपण कानाडोळा करतील अशी आशा आहे.
 भरितापैकीं ज्या खुंटांनीं व वोजांनीं माझें मन वेधिलें, त्यांचा मीं स्थूल दृष्टीन पण चाळणीच्या रीतीनें समाचार घेतला आहे. कितीही कणदार व सफाईदार माल चाळणींत घातला तरी ती बापडी त्यांतला केर, कळणा, कोंडा, भूस एवढेंच घेऊन उठते. पण त्यावरून त्यामध्ये सत्वांश किंवा ग्राह्यांश मुळीच नसतो अशी जर कल्पना केली, तर ती निखालस चुकीची ठरेल. तेव्हां खेडींपाडी व न स्थिरावलेल्या जमाती ह्यांमध्यें येथून तेथवर त्याज्यांश भरला आहे, असा समज हें पुस्तक वाचून कोणीही करून घेऊं नये. जसा व्यक्तीच्या कुटाळीचा प्रश्नच येथें उपस्थित होत नाहीं तसा कोणत्याही जातीची नालस्ती करण्याचादेखील होत नाहीं. कारण जे कांहीं दोष म्हणून दाखविण्यांत आले आहेत ते व्यक्तींचे नसून कालोदधीत वाहत येतांना त्यांतील खडकांवर आदळतां आदळतां छिन्न विच्छिन्न व बेरूप झालेल्या संस्थांचे आहेत, आणि त्यांची जबाबदारीही ज्या त्या संस्थेवर आहे. संस्था व त्यांना आधारभूत जीं तत्वे त्यांची अथवा विशेषतः त्यांच्या विदीर्ण विकृत स्वरूपांची व उपाधींची ही सर्व लीला आहे. व्यक्ति व जाती-पोटजातीसारख्था संस्था ह्या बव्हंशी त्यांच्याच प्रेरणेनें नाचणाऱ्या बाहुल्या होत. संस्था व त्या स्थापन करणारे ह्यांच्यासंबंधानें मला बालाग्र अनादर नाही; आाणि तमाम जनता सहसा चुकत नसते, ह्या एडमंड बर्कच्या सिद्धांतावर माझी दृढ श्रध्दा आहे. प्राप्त परिस्थितीला योग्य अशा जनहितपोषक संस्था निर्माण करण्यांत मनुष्य आपले बुद्धिसर्वस्व प्रायः वेंचितो. तेव्हां भक्कम पुराव्याच्या अभावीं त्या व त्यांचे निर्माते ह्यांना दूर कालीं व देशीं नांवें ठेवण्याचा अधिकार कोणालाही सहसा पोंचत नाहीं; परंतु त्यांची छाननी वेळोवेळीं

करूं नये, अथवा त्यांचे विकार व उपाधि ह्यांचा छडा काढूंं नये असें मात्र नाहीं. ह्याच प्रकारचा प्रस्तुत अल्पसा प्रयत्न आहे. तो कितपत साधला आहे हें अजमावण्यासारखी माझ्या तरी मनाची स्थिति नाही. खेड्यांतील स्थाईक व भटकणाऱ्या लोकसमुदायाशीं बोलतां चालतांना त्यांचा तो आनंद, परोपकार, आदरातिथ्य, मायाळूपणा, मनमोकळेपणा, तळमळीचा अभाव, आणि आहे त्यांत संतोष मानण्याची मनाची खंबीर तयारी ह्यांची गारीगार करण्यासारखी आठवण झाली कीं, मन भारल्यासारखें होऊन तदाकार बनतें; आणि ह्यांना काय कमी आहे ह्याचें भान रहात नाहीं. त्यांपैकीं बहुतेकांमध्यें ठसकदार भाषण व निरक्षर शहाणपण इतकं दिसून आलें कीं, त्यांच्या सहवासांत माझें मन अनेक वेळीं दंग होऊन जाई. त्या सुखाची आठवण झाली म्हणजे ह्या बांधवांचें कौतुक किती करावें व उपकार किती मानावेत असें होतें; आणि बुचकळा पडतो कीं, ह्या लोकांमध्यें ज्या सुधारणा व्हाव्या असें आपणांला वाटतें त्या कल्याणपरिणामी होतील ना ? का त्या जांवईशोध किंवा उंटावरील शहाण्याची युक्तिं होतील ? कांहीं असो, इतकें मात्र खास कीं,त्यांनीं जसा मनोभावानें मजजवळ पोटउकाला केला,तसा मीही त्यांच्या सुखांत भर पडावी, आणि त्यांचे-निदान कुणब्याचें तरी-एका पैशाचें काम अधेल्यांत व्हावें, म्हणून मायेनें हा कडूनिंब पुढें केला आहे. तिच्या भरांत जर कोण्या संस्थेसंबंधानें, वर्गासंबंधानें, किंवा व्यक्तीसबंधानें उणें उत्तर निघून गेलें असलें तर तें सर्वानीं मोठया मनानें पोटांत घालावें अशी हात जोडून प्रार्थना आहे.  ‘कन्या सासऱ्यासी जाये । मागें परतोनी पाहे' ॥ अशाप्रकारें पूर्वी खेड्या-शहरांचें नातें होतें. विद्याव्यासंगी, क्षत्रिय व वैश्य वर्गामधील पुष्कळ जण उद्योगासाठीं खेडयांतून शहरांत जात,परंतु त्यांचें मन आपल्या वतनावरील घरीं व आप्त-स्वकीयांच्या आणि नाना प्रकारच्या जातींच्या लोकांच्या ठिकाणीं गुंतून राही. त्यांशीं ते अत्यंत सलगीनें वागत. त्या मुळे त्यांना खेड्यापाड्यांची राहाटी, रीतिरिवाज, जनस्वभाव, गुणदोष, वगेरे सर्व उत्कृष्ट अवगत असे, तें इतकें कीं पाऊल, पोषाख, शब्द इत्यादींवरून लांबून येणारा-जाणाराची जात देखील गेल्या पिढीपर्यंत पुष्कळ लोक नक्की सांगत. विद्यापीठे व उद्योगधंदे शहरांत फैलावल्यापासून बरेच लोक तेथेंच स्थाईक होतात, निदान खेड्यांत क्वचित जातात; आणि गेले तरी अनेक कारणांमुळे बायका-पोरांना फारसे बरोबर नेत नाहींत. म्हणून अलीकडील पिढीचा बहुतेक काळ शहरांत जातो आणि गांवढयाच्या खांचाखोंचांशीं त्यांचा फार बेताबाताचा परिचय होतो. मी जरी पुष्कळदा स्वतःच्या व आप्तांच्या गांवीं जाई, तरी मुलकी खात्यांत शिरकाव झाल्यावर, आणि त्यांतले त्यांत जाती-जातींच्या चालीरीतींची माहिती कशी गोळा करावी ह्याचें वळण मे. एंथोवेन साहेब बहादूर सुपरिंटेंडंट एथ्नॉंग्राफिकल सव्हें इलाखा मुंबई ह्यांनीं घालून दिल्यावर व तें दोन तीन वेळां गिरवून घेतल्यावर खेड्यापाड्यांनीं मुकाम पडून लोकांशीं सुखदुःखाच्या गोष्टी करतांना अनेक बाबींची परंपरा कानावर येऊं लागली, व दृष्टि अन्तर्मुख होऊं लागलीसें वाटून खेड्यांचें अंतरंग तिजवर थोडेसें उमटल्याचा भास झाला. खेडयांचा अनुभव फारसा नसेल अशा गृहस्थांना खेडीं व फिरस्ते ह्यांची बरीच कानी न पडलेली माहिती होतां होईल तों त्यांच्याच भाषण-संप्रदायांत प्रस्तुत पुस्तकामध्ये मिळेल; आणि तें लिहिण्याचा हा एक हेतु आहे, पण तो प्रधान नव्हे. सुधारणेच्या सर्व योजना शहरांत सुरकुंड्या मारतात व खेड्यांंच्या गावकुसाबाहेर थबकतात, पण वेशीच्या आंत म्हणून फडकत नाहीत, असे म्हटलें तर वस्तुस्थितीचा विपर्यास खात्रीनें होणार नाहीं. पहाडात व किर्र जंगलांत अकोलें तालुक्यांतील फोपसंडीसारखीं कित्येक खेडी अशीं आहेत कीं त्यांत दोन प्रहरापर्यंत भगवान् सहस्ररश्मीचा प्रवेश होत नाही, तर मग युगेच्या युर्गे जन-मानस-प्रकाशित करणाऱ्या ज्ञानरश्मीला अवसर कोठून मिळणार ? खेड्यापाड्यांनीं, पालाझापांनीं, दऱ्याखोऱ्यानीं; तीर्थक्षेत्रांनीं, मंदीरदर्ग्यानीं सर्व प्रकारच्या व दर्जाच्या सुधारकांना व संशोधकांना किती काम आहे, आणि तें पडून राहिलें तर देशसुधारणा

कशी खुंटून बसणार आहे इकडे बोट दाखविण्याचा ह्या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. तें सांगोपांग, परिपूर्ण व बिनचूक उतरनें आहे, अशी घमेंड मला मुळीच नाहीं. त्यांतले विषय वाढत्या अंगाचे आहेत, आणि चौकस व चिकित्सक विद्वान् त्यांत जसजसें मन घालतील तसतसे ते वाढी लागून स्पष्टही होतील. माझी माहिती व अनुमानें चुकीचीं ठरलीं तरी खेड्यापाडयांकडे आणि रान-डोंगरांकडे सुज्ञांचें लक्ष्य गेलें हें पाहून माझ्या श्रमांचें चीज झालें व मी मोठा भाग्यशाली आहें असें मी समजेन.  अमुक एक ग्रंथावरून प्रस्तुत पुस्तकाची रचना केली असें मुळीच नाहीं. त्याचा मुख्य पाया जातीजातींच्या आबालवृद्ध स्त्रीपुरुषांशीं प्रसंगानुसार झालेले संवाद व त्यांनीं दिलेली माहिती हीं आहेत. तरी माझ्या विनंतीस मान देऊन ज्या स्थाईक व फिरस्त्या जातींच्या बंधुभगिनींनीं आपला वेळ मोडून आडपडदा न ठेवतां मला माहिती सांगितली त्यांकडे ह्या पुस्तकासंबंधानें आद्य महत्त्व येतें, आणि हें साहित्य पुरविल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहें. ज्या जमेदारांनी आपल्या दप्तरचे जुने कागदपत्र मला दाखविले व त्यांतील माहितीचा उपयोग करण्याची परवानगी थोर मनानें दिली, त्यांचाही मजवर फार मोठा अनुग्रह झाला आहे. पुस्तकांतील अनुमानांबद्दल व सिद्धांतांबद्दलही उभय वर्गातील मंडळींनीं मजवर थोडे फार उपकार केले आहेत. परंतु त्या बाबतींत मला अधिक साह्य देशी-परदेशी ग्रंथकारांचें झालें. त्यांत प्रमुखत्वें मे. स्पेन्सर, मेन, मोलस्वर्थ, बेडन पॅॉवेल, ग्रँडडफ,लिवार्नर, नेर्न, एंथोव्हेन, ऑर, मॅॅक्नील, सेडन ( माजी दिवाण बडोदें ), कीटींग, सिमकॉक्स, केनडी, फडनीस, दांडेकर, मुजुमदार, पारसनीस, काथवटे (श्री. वि.) इत्यादि सरस्वतीभक्त; गॅझेटिअर्स, खानेसुमारीसारखे रिपोर्ट, एथ्नॉंग्रफिकल सर्व्हेचे मोनोग्राफ्स आणि इतर सरकारी, खासगी, प्रसिद्ध झालेलीं पुस्तकें, व लेख ह्यांची गणना होते. ह्या सर्व विद्वच्चमूला मी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद समर्पण करतों. रा.रा. वामन गोविंद् काळे एम. ए. इतिहास व अर्थशास्त्र ह्यांचे प्रोफेसर, फर्ग्युसन कॉलेज पुणे, ह्यांनी पुस्तकाची हस्तलिखित प्रत तपासून अनेक उपयुक्त सूचना केल्या त्यांबद्दल मी त्यांचा फार आभारी आहें. उपरिनिर्दिष्ट सारस्वतांचा व माझा सर्वस्वीं एकाशय आहे असें नाहीं. त्यांचा व माझा अनेक बाबतींत मतभेद आहें. सबब पुस्तकांतील मजकुराची जबाबदारी पूर्णपणें माझी आहे. युरोपांतील संग्रामाच्या ऐन धांदलींत आर्यभूषण छापखाना पुस्तक छापण्याला सज्ज झाला ह्मणून त्याचीही प्रशंसा केली पाहिजे. तें छापतांना ज्या चुक्या राहिल्या त्यांतल्या ठळक चुकांचें शुद्धीपत्र जोडलें आहे.

 वाचकश्रेष्ठ ! इतकें निवेदन करून गांव-गाडा आपल्या पदरांत टाकतों, आणि सादरपणें अशी याचना करतों कीं, त्यांत जीं व्यंगें दिसतील ती कृपा करून मला खुलासेवार कळवावीत, म्हणजे द्वितीयावृत्ती काढण्याचा सुप्रसंग आला तर त्यांचा अगत्यपूर्वक विचार करीन. नियतकालिककर्त्यांना खाशी विनंती केली पाहिजे. ती ही कीं, ज्या अंकांत आभिप्राय प्रसिद्ध होईल तो अंक निदान त्यांतला अभिप्रायापुरता उतारा त्यांनीं मेहरबाननें मजकडे पाठवावा. कारण एक तर मी राहतों त्या खेडयाचे वस्तींत तीं सर्वच येतांत असें नाहीं; आणि दुसरें असें कीं, पुस्तक पाठविल्यापासून इतके दिवसांत इतक्याव्या अंकांत अभिप्राय येईलच अशी खात्री नसल्यामुळे तोंपर्यंत हावरेपणानें अथपासून इतिपर्यंत सर्व मजकूर चाळण्याची गरज पडणार नाही. प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकें वरीलपैकीं दुसरा मार्ग स्वीकारतात. पण आमच्याकडे नांवालौकिकाची अनेक नियतकालिकें दोहोंपैकी एकाचाही अवलंब करीत नसल्यामुळे ही खास विनंति नाइलाजानें करीत आहं. खेड्यांतल्या संभाविताकडे वाणगी ह्मणून खरवसासाठीं कोवळे दूध पाठविलें, तर तें भांडें रिकामें परत न करतां त्यांत कांहीं तरी तांदूळ, गहूं, बाजरी, ज्वारी घालून तें परत केलें पाहिजे अशी जुनाट रीत आहे; आणि ती नागरिकांनाही साजेल ! नमस्कार !!

 कर्जत, जि. नगर,

 आषाढ शु. १ शके १८३७     त्रिंबक नारायण आत्रे. 
अनुक्रमणिका.
----------

प्रकरण-१- भरित-काळी पांढरी पडाळ मजरे खेडे मौजे कसबा पेठे

शहर-कुणबी अडाणी,मिरासदार उपरी,जुन्यानव्या शतींचे खातेदार- कारू नारू ऊर्फ बलुतदार आलुतदार ओळ कांस वतनदार गांवकी भरित-गांवगाडयाचा दर्जा.
पाने १-१९.

प्रकरण २-वतन-वृत्ति-वर्ण जाती पोटजातीं जातधंदे जाति-धर्म-जात

कामगार, उदाहरणे जात पाटील जात चौगुला ह्यांचीं कामें-वतनी कामगार, इनाम सनदी गांवनिसबत, गेिरासाये ठोके इत्यादि.
पानें २०-४१.

प्रकरण ३-गांव-मुकादमानी-स्वराज्यांतील राज्याविभाग देशाधिकारी

ग्रामाधिकारी बाजेवतनदार, सरकार उपयोगी रयत उपयोगी व दोघांनाही निरुपयोगी वतनदारांची यादी-गांव पाटील कुलकर्णी महार जागल्या गांव चौगुला पोतदार ह्यांचीं कामें मुशाहिरा-चावडी- गांवखर्च-राज्यपद्धति मुलकी दिवाणी फौजदारी, मक्त्याच्या मामलती-देशमुख देशपांडये व पाटील कुळकर्णी यांच्या हक्क अंमलांचीं टिपणें
पानें ४२-६६.

प्रकारण ४-वतन-वेतन-इंग्रजीतील राज्यविभाग वेतनी चाकरी जिल्हा-

धिकारी तालुकाधिकारी व त्यांचीं कामें-मानाचीं २        अनुक्रमणिका.
कामें, म्युनिसिपालट्या,जिल्हा लोकलबोर्ड,तालुका बोर्ड, सानेटरी बोर्ड सानेटरी कमेटी—वतनी चाकरी गांव कामगार,पाटील कुळकर्णी, मुशाहिरा, कामें, गुणदोष.
पानें ६७-८८.

प्रकरण ५-बलुते-आलुतें-महार,मांग,जागल्या-हाडकी, हाडोळा,इनाम

इतर उत्पन्न, कामें, संख्या, गुणदोष-सोनार सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, परीट, गुरव, ग्रामजोशी, मुलाना, कोळी, गोंधळी, भाट, वगैरे कारू-नारू-कामें व उत्पन्न.
पानें ८९-११५.

प्रकरण ६ -फिरस्ते-फिरत्या जमाती, प्रकार, कामें, भीक, चोरी-गुन्हेगार

जाती, व्यभिचारी जमाती-साधू विकल समाजिक, ऐतिहासिक, धार्मिक माहितीची साधनें-डि.पो. अॅॅक्ट, गुन्हेगार जातींचा कायदा वगैरे.
पानें ११६-१४१.

प्रकरण ७-दुकानदारी-सालउधारी व दामदुकाळ-कुणब्याचा सालखर्च,

पीक खरेदीचे अगाऊ सट्टे-हाळकरी, आठवडा बाजार, यात्रा-पेठ खोटा माल-व्यापाराकडे दक्षिणात्यांचें दुर्लक्ष्य-सावकारी-शेतकरी कायदा-अवल इंग्रजीतले अरब-रोहीले पंजाबी ह्यांचा प्रस्तुत व्यापार.
पानें १४२-१६९.

प्रकरण ८-कुणबी- एक बळी हजार छळी ! समुद्र जंगलांची बंदी-बटाई,

मजुरी-राखील त्याचें शेत-रानांतील वस्तीच्या अडचणी, चोरचिलट व जंगली जनावरें, हत्यारें, कुंपणशेतकीं खातें, कृषिविद्या, नमुन्याचीं शेतें, गोशाळा, 
अनुक्रमणिका.       


शेतकीच्या माहितीचीं पुस्तकें व पत्रकें, प्रात्याक्षिकें, प्रदर्शनें, अग्रीकलचर इंजिनियर, व्हेटरनरी खातें, गुरांचे दवाखाने, शेतकी सभा, शेत-शेतकरी मासिक पुस्तक, शेतकीकायदा, तगाई,परस्पर साह्यकारी मंडळ्या व पतपेढ्या.
पानें १७०-२००.

प्रकरण ९-फसगत- एकत्र कुटुंब व्यवस्था. गांव-गाडा हें गांवचें

एकत्र कुटुंब-वतनदारांचे हातून गेलेलीं कामें व हक्क, वतन आणि गुणोत्कर्ष ह्यांचा विरोध, वतनपद्धति महाग जुलमी व फुकटखाऊ, आणि वतनदारांचें समुच्चयानें व व्यक्तिशः नुकसान करणारी.
पानें २०१-२२७.

प्रकरण १०-सारासार-हिंदूचें परावलंबन-जाती-जातींची परस्परांविषयीं

बेपर्वाई-वतनपद्धतीचें मूळ जातिधर्म-धंद्यांतील सोंवळे ओंवळे व त्यानें वाढविलेली गैरसेाय व खर्च-जात-कसबाचा बाऊ-धंद्याची कृत्रिम प्रतिष्ठा-अस्पृश्य जाती, प्रत्यवाय-जातिधर्माचें कटु फळ, गुन्हेगार व व्यभिचारी जाती अव्यभिचारी भक्ति,व्रात्यस्तोम-उमाप सण-भिक्षुक व हक्कदार-कामाला वाट नाहीं-वैश्य युगाची वतनाकडून वेतनाकडे धांव.
पानें २२८-२५७.

प्रकरण ११-वाट-चाल-फिरस्त्यांची बंदी, अतिथि, पांखरें जनावरें ह्यां-

संबंधानें अपायकारक भोळेपणा नाहींसा करणें-चाकरी तशी भाकरी, हा हिशेब कारू ४        अनुक्रमणिका.


नारूंना लावणें-कुणब्याचा व्यवहार रोकडीचा व रोखीचा झाला पाहिजे-खेड्यांतील शिक्षण. मुरलेल्या व नवशिक्या गुन्हेगारांचें शिक्षण, आणि शिक्षा-मुक्त गुन्हेगारांना मदत-पुढील काम.
पानें २५८-२७८.

पुरवणी-महायात्रा-प्रयागवाळ-गंगापुत्र-गयावाळ ह्यांचे त्रिकूट-यात्रा

दलाल-दाक्षिणात्य व गंगापुत्र ह्यांचा बेबनाव-तीर्थोपाध्याय वतनवृत्तीचें नासकं फळ-तीर्थाची आरोग्यनाशक स्थिति-भिक्षुकीचा अतिरेक-रेल्वेवरील त्रास, हमालांचा अधाशीपणा-उतारूंच्या पळत्या पिकावर सर्वांचा डोळा-कुपथ्यकर व महाग शिधा-उपाय.
पानें २७९-२९५.


शुद्धिपत्रक
----------
पान ओळ अशुद्ध शुद्ध
१९ दहा हजार एक लाख
२९ वगैरे वगैरे नांवे पडली
३७ १६ राजाकडून राजाकडून
५९ रांगेने रगेने
६० १३ साख्य सौख्य
१६६ वेषाने पेषाने
१७२ ताब्यात घेतलें राखून ठेवले
----------