गांव-गाडा/बलुते-आलुतें

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchबलुतें-आलुतें.
----------

 पाटील-कुळकर्ण्यांपेक्षा हलक्या दर्जाचे गांवनोकर म्हटले म्हणजे महार जागले होत. त्यांना प्रांतपरत्वे निरनिराळ्या संज्ञा आहेत. त्यांची यादी 'गांव-मुकादमानी'त दिलीच आहे. सरकार उपयोगी वतनदार गांवनोकरांमध्ये आतां बलुतदार काय ते महार जागलेच राहिले आहेत, आणि रयत उपयोगी गांवनोकरांपेक्षा त्यांना बलुतें फार मिळते. त्यांची कांही कामें रयत उपयोगी मानतात, म्हणून महार-जागल्यांना सरकार-रयत-उपयोगी गांवनोकर असेंही म्हणतात. पाटील-कुळकर्ण्यांप्रमाणे त्यांची तपशीलवार वतन-रजिस्टरें पुष्कळ ठिकाणी होणे राहिली आहेत. जागल्याची नेमणूक बहुधा तहायात असते; ती पोलीस सुपरिटेंडेंट करतो, व तिला प्रांत मॅजिस्ट्रेटची मंजुरी लागते. त्यांच्या नेमणुकीचे काम सरकारांत गेल्यामुळे कोणच्या गांवाला किती जागले लागतात, ह्याची वेळोवेळी सरकारी अंमलदार चौकशी करतात, आणि जरूर तितक्याच जागल्यांची नेमणक करतात. ह्यामुळे सरकारने नेमलेल्या जागल्यांची संख्या गांवोगांव नियमित झाली आहे. परंतु गांवकामगार सदर संख्येपेक्षा जास्त जागले गांवकीवर लावून घेतात, किंवा कोठे कोठे ते स्वतःच कामावर उभे राहतात. अशा जागल्यांना सरकारांतून मुशाहिरा मिळत नाही, पण गांवकऱ्यांकडून बलुतें, हक्क वगैरे मिळतात. जागल्यांना कोठे कोठे इनाम जमिनी आहेत. सरकार नेमतें त्या जागल्यांना तें दरसाल पांच ते दहा रुपये रोख मुशाहिरा देते. गांवकामगार दरसाल मामूल वहिवाटीप्रमाणे गांवकीवरील महारांना नेमून घेतात. महारांची काठी कोठे अक्षयतृतीयेला, तर कोठे भावईच्या अमावास्येला बदलते. महारांना रोख मुशाहिरा नाही. बहुतेक गांवीं महारांना इनाम जमिनी आहेत, त्यांना 'हाडकी हाडोळा' म्हणतात. ज्या गांवीं महारांना इनाम नाहीं त्यांतल्या क्वचित् गांवांत त्यांना जागल्याप्रमाणे रोख पांच दहा रुपये सालीना मुशाहिरा सरकार देतें. अशा ठिकाणी महारांची संख्या जागल्यांप्रमाणे सरकारने नियमित केली आहे. तरी पण गांवकामगार तिजपेक्षा जास्त महार लावून घेतात. साधारणतः सर्वत्र पाडेवार महारांची संख्या प्राचीनपासून जी चालत आली आहे तितकीच सर्वत्र अद्याप कायम आहे. किंबहुना गांवकामगारांच्या चालढकलीने ती वाढली असे म्हटले तरी चालेल. गांवकीचे कामाबद्दलची जिम्मा नेमलेल्या महारांवरच आहे, असें सरकार, गांव व महार समजत नाहीत; ती समस्त महारांची समजली जाते. म्हणून, ज्या गांवीं गुरांना विषप्रयोग फार होतात, तेथले सबंध महार-वतन सरकार जप्त करते. महार-जागले ह्यांचे पोट सर्वस्वी रयतेकडून मिळणाऱ्या ऐन जिनसी बलुत्यावर चालते. त्यांच्या कामाबद्दल रयतेकडून मिळणाऱ्या बलुत्यांसबंधाने लढा पडला म्हणजे वतन आक्ट कलम १८ प्रमाणे कलेक्टर पंचायत नेमतो. तिचे दोन पंच गांवकरी व दोन पंच वतनदार महार जागले नेमतात, आणि सरपंच कलेक्टर नेमतो. पंचायतीच्या निवाड्याप्रमाणे वतनदार महार जागल्यांनी आपली कामें केली पाहिजेत, आणि रयतेने त्यांना हक्क दिले पाहिजेत. सरपंच नेमल्या तारखेपासून सात दिवसांत पंचायतीने निवाडा न दिला, तर कलेक्टर निकाल देतो, व त्याप्रमाणे अंमलबजावणी होते.

 महार-जागले हे पाटील-कुळकर्ण्याचे हरकामे शिपाई होत. सरकारी कामानिमित्त ज्या इसमाची त्यांना गरज लागते त्याला बोलावणे; गांवांत कोणी परकी मनुष्य आला, जनन, मरण किंवा गुन्हा झाला, काळीपांढरीतली सरकारी मालमत्ता, झाडें, हद्दनिशाण्या यांचा बिघाड झाला किंवा सरकारी जागेवर कोणी अतिक्रमण केलें, तर त्याबद्दलची बातमी पाटील-कुळकर्ण्याना देणे; गांव स्वच्छ ठेवणे; गस्त घालणे; पाटील-कुळकर्ण्याबरोबर काळी-पांढरीत व परगांवाला सरकारी कामानिमित्त जाणे; गांवचा वसूल, कागदपत्र व सरकारी सामान ठाण्यात किंवा परगांवीं पोचविणे; पलटणचा बंदोबस्त, सरकारी अंमलदारांची सरबराई, गाड्या धरणे वगैरे कामांत पाटील-कुळकर्ण्याना मदत करणे; इत्यादि कामें महार जागले करतात. जागले वतन हे अवलच्या महार वतनाचा एक पोटभाग असल्याने अमके काम महाराचे व अमकें जागल्याचे असा स्पष्ट भेद करतां येत नाही. तथापि, महार मुलकीकडील व जागले पोलीसकडील नौकर असल्याने वरील कामांपैकी जी मुलकी अंमलदारांकडून चालतात ती महार करतात व जी पोलीसाकडून चालतात ती जागले करतात. राज्यव्यवस्थेची सुधारणा होत गेली तसे पाटील-कुळकर्ण्यांचे काम वाढले, पण महार जागल्यांचे मात्र कमी होत गेले. त्यांचे सर्व काम पायपिटीचे असल्यामुळे त्यांत त्यांना चुकवाचुकव करण्याला फार फावतें. शिवाय, ते पूर्वीच्या झोटिंगपादशाहीत पुरे कसून निघाल्यामुळे कामचुकारपणा हा त्यांचा व्यवसायधर्मच होऊन बसला आहे. सरकार-रयतेच्या दृष्टीने पूर्वीचे महारांचे मोठे भरंवशाचे काम म्हटलें म्हणजे शेताच्या बांधउरुळ्या, भाऊ वाटण्या व वहिवाट ध्यानांत धरणे हे होय. पैमाष खात्याने काळी-पांढरीचे नकाशे तयार करवून सर्व्हे नंबर, पोट नंबर ह्यांच्या हद्दनिशाण्या कायम केल्या, तेव्हांच महारांची ही कामगिरी लोपली. शिवाय स्थावरचे कागद नोंदले जातात; आणि पीकपहाणी, बागाईत पत्रके, खानेसुमारी वगैरे मुलकी खात्यांकडून तयार होणाऱ्या कागदांत स्थावरच्या हक्कांचा पुष्कळ चांगला पुरावा रयतेला मिळतो. आतां हक्कनोंदणीच्या पत्रकाने सर्वांवर कडी करून बटाईपासून ता खरेदी, वांटणी, कबजापर्यंत जमिनीवरील सर्व हक्क नोंदण्याची तजवीज लावली आहे. पाटील-कुळकर्णी, सर्कलइन्स्पेक्टर तों रेव्हेन्यु कमिशनरपर्यंत अंमलदारांची हद्दनिशाण्या, अतिक्रमण वगैरेंवर नजर व तपासणी आहे. गांवचे नकाशे व इतर सरकारी दप्तरचे कागद पाहून तेव्हांच अतिक्रमण हुडकून काढतां येते. हद्दनिशाण्या मोडल्याबद्दल पन्नास रुपयेपर्यंत दंड व त्यांतला निमा बातमीदाराला द्यावा, असें लँड रेव्हेन्यू कोडने ठरविले आहे. तरी आजपर्यंत महारांनी अतिक्रमणाचे किंवा बांधउरूळ्यांचे खटले बहुतेक दिले नाहीत, असे म्हटले तरी चालेल. सबब, बांधउरुळ्यांच्या कामांत सरकारला व रयतेला महारांचा व इतर बलुतदारांचा बिलकुल उपयोग उरला
नाही. नकाशे झाल्यामुळे, सडका झाल्यामुळे, व शिपाई लोकांस वाटा माहीत असल्यामुळे अंमलदारांना महार वाटाड्या काढण्याचा प्रसंग कचित् येतो. ठाण्यापासून पांच मैलांवरच्या गांवांच्या कुळकर्ण्याना सर्व्हिस तिकिटें सरकारने दिली आहेत. त्यामुळे गांवीं पोष्ट नसल्यास फार तर पोष्टाच्या गावापर्यंत महारांना सरकारी लखोटे पोचवावे लागतात. वसुलाचे बाबतींत पूर्वीचे तगादे, धरणे वगैरे बंद आहे. वसूल न दिला तर व्याज, चौथाई दंड वगैरे शिक्षा लँडरेव्हेन्यू कोडने ठरविल्या आहेत. वसुलाची मुख्य जबाबदारी पाटील-कुळकर्ण्यांवर असते. तो वक्तशीर न झाल्याबद्दल महारांना कोठेही शिक्षा झाल्याचे ऐकिवांत नाही. म्हणून, कुळाला चावडीवर बोलावणे, दौंडी देणे वगैरेपेक्षां या कामांत जास्त मेहनत महार जागल्यांना पडत नाही. मनिऑर्डरीनें पट्टी पाठविण्याची सोय झाल्यामुळे पाटील-कुळकर्ण्यांचे लिहिणे वाढले, आणि महार जागव्यांचे हेलपाटे कमी झाले. दरोडे बंडाच्या भीतीमुळे गांवाला कूस करून वेशी ठेवीत, व त्या वेसकर राखीत. आतां हवा खेळती करण्यासाठी गांवकूस पाडतात, आणि वेसही कोणी बंद करीत नाही. बहुतेक ठिकाणी त्या मोडून गेल्या आहेत. तेव्हां वेसकराचे काम उडालेच म्हणावयाचें. फार बोभाटा न होईल इतक्या बेताने महार-जागले गांवांत गस्त घालतात. आणि ह्या कामांत फिरतीवरील पोलीसाकडून त्यांची थोडी फार सोडवणूक होते. सडका, रेल्वे, तारायंत्रे झाल्यापासून गुन्ह्यांचे व गुन्हेगारांचे स्वरूप बदलले आहे. आतां या मुलखांतला इसम त्या मुलखांत गुन्हे करतो. त्यांच्या पद्धती व कसब ओळखणे हे गांवपोलिसाच्या वकूबापलीकडचे आहे. म्हणून गुन्ह्यांसंबंधी बहुतेक कामकाज सरकारच्या पगारी पोलीसाला करावे लागते. चोर व जंगली जनावरे ह्यांपासून उभी पिकें, व खळी राखण्याचे काम महार जागल्यांनी अजिबात टाकून दिले आहे; आणि पूर्वीप्रमाणे ते जंगलाची गस्तही करीत नाहीत, व चोरवाटा, माऱ्याच्या जागा, घाट ह्यांवर पहाराही करीत नाहीत. इतकेच नव्हे तर ते स्वतः गुन्हेगार जातीतले असल्यामुळे गुन्हे करतात, अगर पर ठिकाणच्या गुन्हे-
 गारांना बातमी देऊन बोलावतात, आणि त्यांचे बेमालुम सारथ्य करतात. कारण, पूर्वीचे राज्यांत गांवाच्याबाहेर माग निघाला नाही, तर जागल्याला चोरी भरून द्यावी लागत असे. ही वेसण आतां नाहीशी झाली आहे. सन १८२७ च्या १२ व्या रेग्युलेशनचे ३७वें कलम असें आहे की. एखाद्या गांवांत जबरीची चोरी झाली, किंवा त्या गावाला चोरट्यांचा माग निघाला, आणि ती गांवपोलिसांच्या अगर गावकऱ्यांच्या कसुरीमुळे किंवा फुसलतीमुळे झाली असें निष्पन्न झाले, तर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा सबडिव्हिजनल मॅजिस्ट्रेटला चोरीच्या ऐवजाची किंमत गांवपोलीस किंवा गांवकरी ह्यांजपासून दंड म्हणून वसूल करण्याचा व ज्याची चोरी झाली असेल त्याला ती आदा करण्याचा आधिकार आहे. पण ह्या कायद्याचा अंमल झाल्याचे ऐकिवात नाही. सरकारी मालमत्ता, झाडे, जंगल वगैरे सांभाळणे, गुन्हे, अपमृत्यु ह्यांची खबर ठेवणे व पोलीसला देणे वगैरेंची मुख्य जबाबदारी पाटील-कुळकर्ण्यांवर आहे. त्यांनी काळी-पांढरीत चक्कर दिले पाहिजे, व सर्वत्र नजर ठेविली पाहिजे असा निर्बंध आहे. बलुत्याच्या मिंधेपणामुळे या कामांतील महार जागल्यांचा कानाडोळा किंवा आळसाची हयगय पुराव्यानिशी शाबीत करणे दुरापास्त पडते. त्यामुळे पाटील-कुळकर्ण्यांनाच हे काम ओढावे लागते. गांव स्वच्छ ठेवण्याचे काम मामूलपासून महारांकडे आहे. हे काम खासगी नसून सरकारी आहे, आणि तें घरकीचे आहे अशी महारांची समजूत होऊ देऊ नये, असें तारीख २८ जून सन १८८८ च्या सरकारी ठराव नंबर ४२७३ मध्ये फर्माविलें आहे. मेलेलें जनावर महार ओढून नेतात, आणि जवळच नाल्यांत अगर खोंगळीत टाकतात. गांवचे रस्ते झाडण्याचे ते साफ नाकारतात. कोणी मोठा अंमलदार गांवीं येणार असला म्हणजे ते गावकऱ्यांच्या मागें जिकडे तिकडे साफसूफ करण्याची निकड लावतात, आणि आपण फारतर चावडीपुढे व काही ठिकाणी येण्याजाण्याच्या रस्त्यावर खराटा फिरवितात. ज्याचे हद्दीत घाण असेल त्याचेवर फौजदारी खटला होतो, त्यामुळे स्वतः राबून किंवा महारमांगांना मोल देऊन
जो तो आपली जागा साफ करतो. देशांत जसजशी दुकानदारी वाढली, सडका, रहदारी बंगले झाले, तसतशी सरबराईच्या कामांतील महारजागल्यांची पायपीट कमी झाली. हव्या त्या जिनसा दुकानांत मिळू शकतात: आणि सरकारी सामान व्यवस्थेने लावणं, ते सांभाळणे, गाड्या ठरविणे इत्यादि कामांसाठी अंमलदारांबरोबर सरकारी खासगी नोकर असतात. सरबराईच्या कामांत महार जागल्यांना चांगली पैदास असते. त्यांना फिरती अंमलदार दोन ते आठ दहा रुपयेपर्यंत पोस्त देतात. मामलेदारापर्यंत सरकारी सामानाचे गाडीभाडे मिळते, त्यामुळे महारांची सरकारी बिगारही कमी झाली. मनुष्याचे वजन पडण्याला हिंदीस्तानांत तरी संपत्ति किंवा अधिकार लागतो. पाटील-कुळकर्ण्यांची दोन्ही अंगें उणी पडल्यामुळे त्यांना महारजागल्यांकडून सक्तीने काम घेतां येत नाही. पाटील-कुळकर्ण्यांनी दिलेले सरकारी कागद महारजागल्यांनी ठाण्यांत न आणतां टपालांत टाकले, ते नाटपेड झाले, आणि त्यांचे पाटील-कुळकर्ण्यांनी भरलेलें हांशील महारजागल्यांनी दिले नाही, असे कित्येक वेळां पाहण्यांत येते. महार-जागले पूर्वीइतके पाटील-कुळकर्ण्यांबरोबर गांवांत व परगांवीं जात नाहीत. शंकुसाखळी घेऊन सर्कल इन्स्पेक्टरबरोबर शिवारांत जाण्यासाठी महार काढणे झाल्यास पुष्कळ पाटलांना महारवाड्यांत हेलपाटे घालावे लागतात; नंतर कोणाची बारी आहे याची विचारपूस सुरू होते, आणि बारीवाला घरी नाहीं अशी तास अर्धातास खळखळ चालून कसातरी महार मिळतो. लोकस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण करणाऱ्या परशराम कवीने केव्हांच भाकीत केलें,

पाटीलकुळकर्णी नांव उगीच घालून दमले येरझारा ।
सत्ता साहेबी अगदी बुडाली महाराचा त्यांहूनी तोरा ॥

 स्वराज्यांत गांवकऱ्यांचे वित्त व जीवित ह्यांचे नेहमीचे रक्षण सरकाराकडून होत नसे. म्हणून गांवगाड्याने महार-जागल्यांचे एक लहानसें लष्कर तयार केलें; आणि दरोडखोर व बंडखोर ह्यांशी झुंजणे व गांवमुकादमानीतली जातिपरत्वे कामें, ह्यांचा ठोकळ अंदाज पाहून गांवाने त्यांची संख्या ठरविली. पूर्वीच्या भोपळसुती अमदानीत जसजसें फावलें तसतशी ती
फुगत गेली असावी असे वाटते. आतां दंगेधोपे नामशेष आहेत, आणि क्वचित् झाल्यास ते मोडण्याला आणि गुन्ह्याचा बंदोबस्त करण्याला सरकारचें लष्कर व पोलीस आहेच. सरकारच्या निरनिराळ्या खात्यांनी व सुधारणांनी महार-जागल्यांचें काम किती कमी केलें आहे, आणि त्यांतलेंही ते कसे चुकवितात ह्याचे दिग्दर्शन वर केले आहे. तरी पण कामाच्या मानानें पाटील-कुळकर्ण्यांची संख्या ज्याप्रमाणे सरकारने उतरविली, तशी महारजागल्यांची उतरविली नाही. जरूरीपेक्षा जास्त कामकरी असले म्हणजे खेळणी चालून काम बिघडते,आणि खर्च मात्र अधिक येतो. 'रिकामा न्हावी आणि भिंतीला तुमड्या लावी,' हा सर्वानुभव महार-जागल्यांच्या संख्येला लागू करणे अत्यंत आवश्यक आहे. नगर जिल्ह्यांत सुमारे चार हजार वस्तीच्या पारनेर गांवाला महार-जागल्यांचे राजरोष लष्कर ५० आहे. ते असें:-३२ महार, ४ वेसकर, ८ रामोशी जागले, २ सोनार व २ मुसलमान जागले ऊर्फ हावालदार आणि एक दोन नायकवाडी. इतके लोक तेथे शिवारांत व बाजारांत हक्क बेधडक उकळतात. सरसकट २५० चौरस मैल क्षेत्र व पाऊणलाख लोकवस्ती असणाऱ्या तालुक्याला १५।१६ मुलकी शिपाई व ३०।३५ पोलीस शिपाई पुरतात, तर खेड्याच्या कामाच्या मानाने प्रत्येकी किती महार-जागले लागतील हे मुकरर करणे फारसें कठीण नाही. दुष्काळाच्या दिवसांत लोकांत चलबिचल व हालचाल जास्त असते, गुन्ह्यांचे प्रमाण चढते, आणि तपासणीअंमलदारांची संख्या वाढून त्यांचा गांवगन्नां मुक्कामही अधिक होतो. म्हणून सुबत्तेपेक्षां दुष्काळांत गांवकीचे कागदी व पायपिटीचे काम रगड माजते, आणि त्यांतच महार-जागले पोटामागें गांव सोडून जाण्याचा संभव अधिक असतो. अशा स्थितीत गांवचे किती महार-जागले डोलांत ( सरकार दुष्काळांत महार-

-----

१ धांदरफळ तालुके संगमनेर जि.नगर येथे लोकसंख्या सुमारे १६२५ वसूल सुमारे ३७०० रुपये असून तेथे महार १६, वेसकर ४, आणि जागले ३ आहेत. ठाकुर पिंपळगांव तालुका शेवगांव जि.नगर येथें गांवाची लोकसंख्या ८०० असून गांवाला ८ महार व 2 कां 3 जागले आहेतं.
जागल्यांना रोकड किंवा धान्य खावटी देते त्याला डोल म्हणतात.) घालावे याचा सरकारने खाली लिहिल्याप्रमाणे निर्बंध केला आहे.

लोकसंख्या   महार   जागल्या
१ ते ५००      
५०१ ते १०००      

आणि पुढे दर १००० लोकसंख्येला १ महार व १ जागल्या. यावरून एवढें खास की, हे प्रमाण एरवींच्या दिवसांत फारच सढळ होईल. तेव्हां महार-जागल्यांसंबंधाने अगदी निकडीची सुधारणा ह्मटली ह्मणजे कामाच्या मानाने गावाप्रत त्यांची संख्या ठरविणे, नेमणुकीच्या महार-जागल्यांखेरीज इतरांना काळी-पांढरीत हक्क उकळण्याची सक्त मनाई करणे, आणि त्यांचे वतन रजिष्टर करणे ही होय. सरकारच्या सर्व खात्यांत वेळोवेळी छाटाछाट होत असतांना महार-जागल्यांच्या संख्येला धरबंध असू नये आणि या पेंढाराने सरकारच्या नांवावर बेसुमार चरावें ही नैतिक व सांपत्तिक पिछेहाट होय !

 शेतांतील वहिवाट,वांटण्या, विहीर, पाट यांचे पाणी घेण्याच्या पाळ्या इत्यादि कामी महार-जागल्यांच्या तोंडी पुराव्याचा रयतेला उपयोग होत नाही. पिकाचें, फळांचे व गुरांचे रक्षण कुणब्यांना जातीने किंवा राखणदार ठेवून करावे लागते. भडोच जिल्ह्यांतील झाडेश्वर गांवीं असे समजले की, सुमारे १०।१२ वर्षांपासून शेती सांभाळण्यासाठी कुणब्यांना अजमासें ६०० सिंधी लोक दरसाल पगार देऊन ठेवावे लागतात. नगर जिल्ह्यांतील शेवगांव तालुक्यांतील मुंगी व लाखेफळ गांवीं कुणब्यांनी अनुक्रमें ५ ते ७ व २ खंडी धान्य दरसाल देण्याच्या कराराने कोल्हाटी लोक पिकें राखोळीसाठी ठेवल्याचे पाहण्यात आले. रानडुकरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी कांहीं ठिकाणी कुणबी शेतांत पिकाभोंवतीं खोल व रुंद खंदक खणतात, आणि कित्येक ठिकाणी कोल्हाटी, वड्डर वगैरे मोलाने ठेवतात. ह्याप्रमाणे ह्या कामांतही कुणब्यांना महार जागल्यांचा उपयोग होत नाही. गावकऱ्याने स्वतःसाठी किंवा पाहूण्यासाठी महार-जागल्यांपैकी वाटाड्या
काढला तर त्याला भाकर, धान्य किंवा तीन चार आणे रोज द्यावा लागतो. खानदेशांत आग्रा रोडवर भिल्लांच्या चौक्या पहाण्यांत आल्या. त्या कोणी बसविल्या हे समजले नाही. त्यांवरील भिल्ल वाटेच्या गाड्यांबरोबर पुढील चौकापर्यंत जाऊन आणा अर्धा आणा रहदारी (दस्तुरी) घेतात. गांवांत घोडे, गाडी रात्री मुक्कामाला राहिली तर महार जागले आणा अर्धा आणा जागलकी घेतात. पूर्वी लोक गांव सोडून धंद्याला देखील लांबवर जात नसत, आणि सोयरसंबंधही दूर गांवी करीत नसत. त्यामुळे चिठीचपाटी, निरोप-पडताळा, मुऱ्हाळकी या कामी महारांचा उपयोग होई. आतां हे सर्व पालटले आहे. त्यामुळे व टपालखात्याचे जाळें सर्व देशभर पसरल्यामुळे महारांची जासुदकी सुटली. गांव झाडून साफ करण्याचे काम पाडेवार महार टाकवेल तितकें अंगाबाहेर टाकतात. ह्याप्रमाणे महारजागल्यांच्या सार्वजनिक अथवा गांवकीच्या कामाची कहाणी झाली. घरकी कामाबद्दलही तेंच किंवा त्याहून अधिक रडगाणे आहे असें हमटलें तरी चालेल. तोंड पाहून गांवांतल्या कर्त्या लोकांची, पाटीलकुलकर्णी, देशमुख-देशपांड्ये, किंवा श्रीमंत कुणबी ह्यांची मात्र थोडी फार घरकी कामें महार करतात; पण ती सुद्धा पुष्कळ बोलावणी पाठवून गांठ पडल्यास करतात. नाही तर 'पाटील मी घरी नव्हतों, मला कळलें नाहीं' वगैरे थाप मारून चाळवतात. गरीब कुणब्यांना त्यांच्याकडे हेलपाटे घालण्याला, त्यांची वाट पाहण्याला व त्यांशी हुजत घालीत बसण्याला सवड नसते. कुणब्याचे गोठे साफ करतांना आतांशा महार आढळत नाहीत. काही ठिकाणी घरांपुढें झाडण्याला महारणी फुरसतीने येताना दिसतात. नांगर, कुळव, बी वगैरे ओझें ज्या त्या कुणब्याला स्वतःच घरून शेतांत न्यावे लागते. बोलावलें तर 'येतों जातो' अशी महारांची टंगळमंगळ चालते. ही कामें निकडीची असतात. त्यामुळे शेकडा एका कुणब्याचे सुद्धा-आऊतकाठी, मोट, बी, सर्पण वगैरे ओझें महारांच्या वाट्याला येत नाही. फॉरेस्ट झाल्यामुळे व ओहोळ-खोळ वगैरे ठिकाणांची झाडे सरकारच्या मालकीची असल्यामुळे महारांचे सर्पण पुरविण्याचे काम आयतेंच सुटले. स्थलपरत्वें, कालपरत्वे आणि जातिपरत्वे महारकी वतनांत जागलकी, वेसकरकी इत्यादि फोड झाली, आणि महार-मांगांनी आपापली कांही मूळची कामें टाकून दिली, व ती दुसऱ्या जातींनी उचलली. त्यामुळे महार-मांगांचे काम हलकें झालें, आणि रयतेवरील बलुत्याचा बोजा मात्र वाढला. गुजराथेत धेड फक्त मेलेलें ढोर उचलतात, व मेलेली कुत्री, मांजरें भंगी उचलतात. केरसुण्या, शिंकी, कासरे, नाडे, आटणे ( त्यांसाठी ताग आंबाडीचे वाख, दोरखंड, कुणबी आपल्या पदरचे पुरवितात. ), जुंपण्या, वेल्हें, वेठण, मोऱ्हक्या, पिछाड्या, प्रेताची सुतळी, डफ वाजविणे, मरेआईची पूजा, फांशी देणे वगैरे कामें जातिधर्म म्हणन मांग करतात. त्यांतलीही काही कामें उदाहरणार्थ-साळ्यांच्या कुंच्या, शिंकी, कासरे, जुंपण्या, हातळी, पिछाड्या, मोऱ्हक्या वगैरे मांगाने सोडून कंजार, माकडवाले वगैरे जातींच्या गळ्यांत घातली; आणि प्रेताची सुतळी तर बाजारांतून विकत आणावी लागते.

 ओढून नेलेल्या जनावरांची फाड जेथें होते तेथेच त्यांची हाडके पडावयाची. ढोर ओढणे हे महारकीचे मुख्य काम आहे, आणि त्याची फाड महार इनामांत व्हावयाची; म्हणून महार इनामांना हाडकी-हाडोळा ही संज्ञा प्राप्त झाली, व हाडारक्ताचे खत त्यांना अनायासे मिळू लागले. हाडकी-हाडोळ्याच्या जमिनी, व असतील तेथील जागले–इनाम, महार-जागले स्वतः करीत नाहीत. ते त्या कोणातरी कुणब्याला बटाईने लावतात, व काही ठिकाणी त्या गहाण पडलेल्याही दृष्टीस पडतात. हाडकी-हाडोळ्याच्या जमिनी बहुधा फार सरस असतात. तरी महारजागल्यांना इनामाचे उत्पन्न आहे आहे नाहीं नाहीं अशांतले आहे. जागले नेमतांना तालुका पोलीस कुणब्यांकडून लेखी कबुलायत करून घेतात की, मामुलमाणे दर जागल्यास एक शेर तें एक पायली धान्य देत जाऊ. ह्याचप्रमाणे दुकानदारही सालींना प्रत्येकी काही पैसे देण्याचे कबूल करतात. कोठे कोठे दर कुळामागे दरसाल एक रुपया व पेठेतील दुकानामागें आठ आणे रामोसपट्टी ह्मणून जागल्यांना देण्याचा प्रघात आहे. ही वहिवाट पाडण्याच्या व
चालविण्याच्या कामांत त्यांना गांवकामगारांचे विशेषतः पोलीस पाटलाचे अंग असते. महार दर शेतांत बलुतें उकळतात, त्याला स्थानपरत्वें पेंढी, शेर, पसा अशी नावे आहेत. प्रांतपरत्वें बलुत्याचे दर, प्रकार व धान्ये निरनिराळी आहेत. कोठे दोन बैलांच्या नांगरामागें शंभर पेंढ्या तर कोठे अर्ध मण धान्य, कोठे भात नागली, तर कोठे ज्वारी बाजरी, ह्याप्रमाणे बलुतें देतात. एका गांवच्या इसमाने दुसऱ्या गांवचे शेत केले तर त्याला 'ओवांड्याने' शेत केलें असें ह्मणतात. गांवकऱ्यांपेक्षा ओवांडदारांकडून महार जागले दिढीनें बलुतें घेतात. शेतमाल तयार होऊन खळे लागले, व धान्याची राशि पडूं लागली म्हणजे त्या सरईला 'खळवट' ‘रासमाथा' "सुगी' किंवा 'हंगाम' म्हणतात. ज्या प्रदेशांत जे खाण्याचे मुख्य धान्य असेल त्याचे बलुतें कुणब्याने रासमाथ्याला द्यावयाचे असते. कुणब्याने जर तें पेरलें नाहीं तर तारतम्याने त्याचा मोबदला त्याने जें पेरलें असेल त्या धान्याच्या किंवा रोकड पैशाच्या रूपाने तो देतो. कुणब्याजवळून बलुत्याखेरीज बीबियाणे घेण्याची सर्व कारूनारूंची वहिवाट आहे. कारूनारूंना आपल्या जमिनी पेरण्यास कोणतीही अडचण येऊ नये, हा बीं पुरविण्याचा हेतु असावा. कामगार महार जागले मामूल शिरस्त्याप्रमाणे व्यक्तिशः बलुतें नेतातच, पण त्याखेरीज समस्त महार व समस्त जागले म्हणून तिसऱ्या किंवा धाकट्या ओळीचा हक्क मागण्याला सबंध महारवाडा व महार, मांग, भिल्ल, कोळी, रामोशी वगैरे ज्या जातीचे जागले असतील, तिचे सर्व पुरुष एकमेळानें शिवारांत जातात. महार जागले खळे मागण्याला एकट दुकट कधीही जात नाहीत. जमावाने गेले म्हणजे आळवणी, दाबादाब, कटकट व धमकी चालते आणि कुणबी गाय होतो. हक्कापेक्षा जास्त मागण्याची इच्छा झाली म्हणजे मोहबत पाडावी लागते. मोहबतीची मिळकत म्हणजे प्रतिष्ठित भिक्षा होय. मोहबतीपेक्षाही अधिक मागण्याची इच्छा झाली म्हणजे निलाजरेपणाने गरिबी गाऊन हात पसरला पाहिजे. भीक घालण्यास दाता नाखूष दिसला तर त्याची फाजील स्तुति, त्याला आशि-
र्वाद, शाप देणे वगैरे प्रकारचा लोंचटपणा करून कार्य साधले पाहिजे. आणि इतक्याने होणाऱ्या प्राप्तीनें जर तृप्ति झाली नाही तर पुढचा मार्ग म्हटला म्हणजे चोरी. सारांश हक्क, मोहबत, भीक, लोंचटपणा व चोरी ही जपमाळेच्या मण्यांप्रमाणे एकामागून एक येतात. असो. गांवांत जें मुख्य धान्य पिकतें त्याचे शेकडा ४ ते ६ महारांना व शेकडा २ ते ४ जागल्यांना प्राप्त होतात. नांगरामागे महारांना शेर दोन शेर व जागल्यांना शेर अच्छेर बी मिळते; आणि जमीन असो वा नसो व ती ते करोत वा न करोत, कुणब्यांजवळून ते चोपून सालोसाल बीं घेतात वर जीं मांगांची जातकामें सांगितली त्यांबद्दल मांगांना जागल्याच्या उत्पन्नाचा आठवा भाग स्वतंत्रपणे मिळतो. शिवाय शेत पेरण्यापुर्वी महूर्ताने विडा सुपारी घालून बिंयानें मांगिणीची भरभक्कम ओटी भरावी लागते. जोंधळा उपटण्यापूर्वी 'पाटा' ( दहा तिफणी इतका भाग ) सोडतात. तेथे कोरभर भाकरी व एक तांब्या पाणी टाकून गळ्यांत पागोट्याचा वेढा घेऊन कुणबी पाया पडतो, त्याला 'सीतादेवी' ची पूजा म्हणतात. ह्याप्रमाणे सोडलेल्या शेत-भागांतील पीक व पूजेची भाकर महार नेतात. हा झाला कसा तरी हक्क-भिकेचा पसा. येथून पुढे दंडेली, लोचटपणा व चोरी लागते.

 धान्य उफणतांना 'उडती पाटी' महार जागले घेतात. वेटाळणी किंवा सोंगणी झाल्यावर जी कणसें खाली पडतात, अथवा भुईमूग, रताळी, बटाटे, मिरच्या, कांदे वगैरे काढून नेल्यावर जें कांही कोठे शिल्लक राहते, त्याला 'सर्वा' ह्मणतात. जिराईत पिकाच्या सर्व्याला जिराईत सर्वा व बागाईत पिकाच्या सर्व्याला बागाईत सर्वा ह्मणतात. महार, मांग, भिल्ल, रामोशी हे सर्वा हक्काने काढून नेतात. सुडी रचतांना कुणबी उत्तम गुडाचे 'कोचुळे' रचतात, त्यांतील मधला थर शेलका असतो. त्यावर महार गोळा होऊन पडतात, आणि काही दिल्याशिवाय कुणब्याला हालूं देत नाहीत. कठण, मठण, तीळ, करडई, गहूं, हरभरा, कपाशी, भोपळे, बटाटे, कोबी, मेथी, कोथिंबीर, ऊस, भुईमूग, रताळी, घास, कडवळ, आंबे, पेरू, डाळिंबे, बोरे, संत्री वगैरे कोणताही उदीम कुणबी करोत; त्याची वाणगी सर्व कारूनारू, अलबत्ये गलबत्ये धर्म म्हणून मागून नेतात; आणि त्यांना नाही म्हणण्याची सोय नसते. सारांश, पेरणीला शेतांत पाय ठेवल्यापासून तो शेतांतलें तण, झुडपें खांदून काढीपर्यंत व बियांपासून तो थेट 'काशा' ( गवताच्या मुळ्या ) पर्यंत शेतांत मागणारे उभेच. त्यांतले त्यांत रिकामटेकडे म्हणून महार-मांगांचे झट विशेष असते. महार जागल्यांच्या जातींची संख्या सरासरी गांवच्या वस्तीच्या मानाने शेकडा १०-१२ असते; म्हणजे कुणब्यांना शेकडा १० वर लोक फुकट पोसावे लागतात. ही झाली महार जागल्यांच्या जातीची उघड उघड प्राप्ति. ह्याशिवाय ते कुणब्याच्या मालावर यथेच्छ आडून ताव मारतात तो वेगळाच. महार, मांग, भिल्ल, रामोशी वगैरे जातींचे पुरुष, स्त्रिया आणि मुले गवत, सरपण, तरवड, बेलाशक कुणब्यांदेखत त्यांच्या शेतांतून काढतात, किंवा चोरतात आणि विकतात. मांगांचा डोळा केकताङ अगर घायपातावर विशेष असतो. ते ते तसेंच किंवा चोरून नेतात व तुरळक विकत घेतात. केकताडाची चऱ्हांटे होतात व त्याचे कृत्रिम रेशीम बनते, म्हणून त्याला भावही चांगला असतो. राखणदार नसला किंवा पहाटेस गुंगला म्हणजे ह्यांचे चांगलें बनतें. बाजारांत बहुतेक गवत, सरपण चोरीचे येते. अहमदनगर जिल्ह्यांत राहुरी संगमनेरकडे संत्री, डाळिंबांचे बाग आहेत. त्यांतली फळे महार, मांग, भिल्ल, रामोशी चोरून नेतात, असा फार बोभाटा आहे. गवता-सरपणासाठी येतांना हे लोक भलतीच कुपाटी काढून चोरवाट पाडून

-----

 १ पारनेर येथे १९१०-११ साली पुजारी आडनांवाच्या कुणब्याच्या शेतांत रताळ्याना खांदणी लागली: तेव्हां १०-१५ महार एकदम संध्याकाळी शेतावर आले, व प्रत्येकी तीन चार शेर रताळी घेऊन गेले. सदर साली पिकावरून हीव गेलें होतें. सन १९१२ साली कडबा २०-२५ रुपये शेकडा विकत होता. आणि भर उन्हाळ्यांत १५-२० महारांनी औट्याच्या शेतांतून रताळ्यांच्या पाल्याच्या मोटा व कडवळाचे भारे आपल्या जनावरांसाठी आणिले.
ठेवतात, गवत उपटतांना पिके तुडवितात, तेथें जें कांहीं खाण्यासारखें असेल त्याने तोबरा भरतात, आणि डोळा चुकवून ओटींत कणसें, फळं कोंबतात. एखादा कुणबी रागें भरूं लागला तर हे लोक त्यालाच विचारतात की, बळीराजा, आम्ही तुमचे पायपोस ! आम्ही पोट कशावर भरावें? इतक्यावर तो उमजला नाही तर हे लोक 'बरें बरें, असे आहे का ?' वगैरे खुणेचे व माजोरे शब्द उच्चारतात, म्हणजे कुणबी दचकतो की चोरी करून, आग लावून, किंवा जनावरांना विषप्रयोग करून हे वचपा काढणार. मग त्यांनी घेतले असेल, ते त्यांना नेऊ देण्यास बिचारा मुकाट्याने तयार होतो. कारण ‘दुर्जनं प्रथमं वन्दे' असें वाडवडील म्हणत आले आहेत. शेतात चरावयास झाले की, हे लोक चालले रात्री त्यांत आपली गुरे चारण्याला, कणसें आलीं की चालले ती खुडण्याला, सडी रचली की चालले ती फोडण्याला, आणि मळणी चालली की चालले रास उपसण्याला ! कोंडवाड्यांतील जनावरांचे लिलाव बहुशा महार मांग घेतात, कारण ती त्यांना फुकट चारावयास आणि नफ्याने विकावयास फावते. ज्या कुणब्याचें राखण जबरदस्त असते त्याचा कसाबसा बचाव होतो. पण ज्याचें राखण कमी किंवा कुतंगळ, त्याचें शेत गतकुळींं असा प्रकार आहे. महार जागल्यांची वस्ति तुटक व घाण असल्यामुळे तेथे जाण्याला तदितर कसकसतात. त्यामुळे शेत-मालाची चोरी झांकणे, व तिची विल्हेवाट लावणे, त्यांना फारसें जड जात नाही. चोरलेली कणसें कुटून त्यांचे धान्य दुसऱ्या धान्यांत मिसळले म्हणजे मुद्दा मोडतो. शेतमालाचा मुद्याचा चोर धरणे फार कठीण आहे, आणि धरला तरी चोरी शाबीत करणे त्याहून कठीण आहे. चावडी कचेरीत हेलपाटे घालण्याला कुणब्याला वेळ नसतो, व गाऱ्हाणे करणाराला लोक हलकट ठरवितात. त्यांतून कुणब्याचा पडला आडवा नाडा. दिवसां फिर्याद द्यावी, आणि रातोरात चोराचे आप्तांनी पीक कापावें, अगर जाळावे किंवा दावण बसवावी, ही जरब केवढी असेल ह्याचा ज्याचा त्यानेच विचार करावा.
गांवांत पेंव फोडलें म्हणजे पेंवगुड मागण्याला महार जागले जातात. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ घरोघर वेसकरांना भाकरी मिळते. ह्याखेरीज झाडणार महार-महारणी दररोज भाकरी मागतात. साल बदलून नवे महार कामावर आले म्हणजे ते “भावईचे चेले दह्या दुधाने न्हाले । वर्षानुवर्षा पाऊस पाणी घेऊन आले" ॥ हे गाणे म्हणून घरोघर शेर मागतात. ते भाद्रपदांत पितरें मागतात, व आश्विनांत दसरा मागतात. कठीण दिवस म्हणून कुणब्याने पितराला एखाददुसरा जातिबांधव सांगितला तरी दारापुढे महारांचे कडे पडते, आणि बहुतेक भरती त्यांचीच करावी लागते. ह्यांखेरीज बारा सण, दिवस, व लग्नकार्य इत्यादि निमित्ताने जेव्हा जेव्हां गांवकऱ्यांच्या घरीं चार पाने टाकतात तेव्हां तेव्हां महार जागले व सर्व कारूनारू ह्यांना वाढणी द्यावी लागतात; आणि तो ऐपतदार असला तर लग्न, दिवस वगैरे प्रसंगी सर्व कारूनारु पंक्तीचा ठाव म्हणजे जेवण मागतात. वरवर पाहणाराला असे वाटते की, खेडवळ विशेषतः कुणबी लग्न दिवसाला उगीच जेवते गण गोळा करून बुडतो. पण आंतली गोम अशी आहे की, वऱ्हाडी व जातभाईपेक्षां कारूनारूंना जास्त अन्न जाते; आणि ते ते हक्काने काढतात. त्यांना नाही म्हणून चालावयाचें नाही. कमी पडले की नुकसान झालेच समजा. म्हणून सर्वजण निमूटपणे उरावर धोंडा ठेऊन ह्या पेंढारांची पोटपुजा करतात. अन्न उकळण्याचे कामी महार मांगांची सर्वांवर ताण असते. महार जागल्यांशिवाय इतर कारूनारू बहुधा आपापल्या असाम्यांकडेच वाढणे किंवा जेवण मागतात. परंतु महार जागले व त्यांचे जातभाई हे सर्व मिळून प्रत्येक गांवकऱ्याच्या घरी वाढणे मागण्यास जातात, व त्यांना शेर दोन शेर अन्न सहज लागते. महार मांग व हलालखोर हे मुसलमानासुद्धा सर्व जातीचे उष्टें खातात,

-----

१ ह्याचा अनुभव युरोपियन मिशनऱ्यानाही आहे. संगमनेर येथें रोमनकॅथॉलिक बिशपसाहेब आले, तेव्हां बोलावल्याच्या दिढीदुपटीने महारमांग ख्रिस्ती गोळा झाले, आणि त्यांनी फादर वायझेंप साहेबांना नवीन दळण घालावयास व चुली पेटवावयास लावले, तेव्हां कशी तरी पंगत उठली !
त्यामुळे हरघडी उष्ट्याचें नांव पुढे करून ते अन्न मागत सुटतात. दिवाळीला सर्व कारूनारू ओवाळणी मागतात. त्यावेळी त्यांना चोळीचे खण व पैसे द्यावे लागतात. लग्नामध्ये वराचा शेला महाराला मिळतो. ग्रहणाचे वेळी महार मांग धान्य, वस्त्र व पैसे मागतात. अमावास्या व मरेआईची पूजा मांगाकडे आहे. कोठे कोठे महारही हे काम करतात. मांगांना दर अमावास्येच्या दिवशी 'सतका मतका ' (उडिदांची डाळ, राळे अगर इतर धान्य, पीठ, मीठ, मिरच्या, तेल इत्यादि जिनसा) घरोघर मिळतो. आषाढांत व विशेषतः पटकी सुरू झाली म्हणजे हे मरेआईचे पुजारी दर मंगळवार शुक्रवार दौंडी देऊन घरोघरचा नैवेद्य मागवितात. नैवेद्याबरोबर नारळ, पैसा सुपारी, बांगड्या, खण वगैरे असतात. बहुतेक ठिकाणी मरेआईसाठी सवा मण किंवा अधिक भाताचा बळी काढतात, मांगिणीला हिरवें लुगडे चोळी बांगड्या देतात, आणि मिरवणुकीचे वेळी खूप नारळ फोडतात व लिंबे कापतात. मरेआईचे उत्पन्न किती होत असावें ह्याचा खालील गोष्टीवरून अंदाज होईल. कर्जत जिल्हा नगर येथे सन १९१२ साली गांवकऱ्यांनी महारांकडून मरेआईची पूजा करविली, आणि सुमारे २५० रु. वर्गणी करून बळी काढला. मांगांनी एका मुसलमानाला शंभर सवाशें रुपये देऊन त्याच्या बायकोच्या अंगांत मरेआई आणविली, आणि तिजकडून असें वदविलें की, मला महाराची पूजा पावली नाही, मांगांची पाहिजे ! ख्रिस्ती झालेले महार मांग सुद्धा तेवढ्या पुरते मरेआईचे भगत बनून आपली तुंबडी भरून घेतात!! प्रेताचे सरण वाहण्याबद्दल वतनदारांकडून महार प्रेतावरील वस्त्र, विसाव्याचे जागेचा पैसा व दिवसाचे जेवण घेतात: आणि इतरांपासून पांच आणे ते सवारुपया-प्लेग-पटकीचे दिवसांत दोन रुपयेपर्यंत-मजुरी घेतात. बलुत्यांतच पूर्वी महार जनावरें ओढून नेत आणि त्यांची माती हाडकें घेऊन मिरासदारांना कातडे आणून देत. उपऱ्या जवळून ते दोन ते सहा पायली धान्य अगर आठ आणे तें रुपया घेऊन त्यांनाही कातडे परत देत; अशी स्थिति असावी. जनावर ओढण्यासाठी जे धान्य महारांना देतात त्याला 'घाटा'
किंवा ' हातधुलाई' म्हणतात, व हिरव्या सबंध कातड्याला "आघोड ' म्हणतात. आघोड परत आले म्हणजे लोक तें ढोराला अगर चांभाराला देऊन त्याचे जोडे, चाबूक, नाडे वगैरे करून घेत. आतां महार सर्रास सर्वांजवळून दोन शेर तें तीन चार पायली पर्यंत घाटा घेतात, पण दांडामुडपा करून आघोड आपणच उपटून बसतात. कोठे कोठे देशमुख, पाटील ह्यांना मात्र ते अघोड देतात असें ऐकतों. महर्गतेवरील रिपोर्टांत मि० दत्त ह्यांनी असे सिद्ध केले आहे की, १८९० ते १९१२ पर्यंत कातड्याची किंमत सरासरी दुपटीने वाढली आहे. हाडका कातड्यांना जशी किंमत चढली तसें महारांनी आखडतें घेतलें, व ते चांगले पैसे करूं लागले. अशी लौकिक समजूत आहे की, महारांजवळ बेमालूम विषप्रयोगाची औषधे व त्यांचा उतारा आहे; त्यामुळे त्यांनी जनावरांना केलेले विषप्रयोग सिद्ध करता येत नाहीत, आणि विष घातलेल्या जनावरांची माती त्यांनी खाल्ली तरी ती त्यांना बाधत नाही.

 सन १८३९ चा आक्ट २० अन्वयें सरकारने सर्वांना बाजार उकळण्याची मनाई केली आहे. परंतु पाडेवार महार, जागले व ज्यांची कामें सरकारनें वजा केली आहेत, असे हवालदार, नाईकवाडी, पोतदार ह्यांचे वंशज, आणि फकीर, गोसावी, बैरागी व अठरापगड ब्राह्मणेतर भिक्षुक रोजच्या व आठवड्याच्या बाजारांत उकाळा, फसकी, शेव इ. उकळतात. गवत, कडबा, सरपण, भाजीपाला, फळफळावळ, तेल, धान्य, पानसुपारी, तंबाखू , विड्या, इत्यादि काहीही बाजारांत आले की त्यावर ही टोळधाड पडलीच. दुकानदार आळम टाळम करूं लागला तर हे लोक मालांत हात घालून तो उपसतात, आणि वेळेवर मारामारीही करतात. पाटील व हलके पोलीस ह्यांचा ओढा महारजागल्यांकडे असल्यामुळे तालुक्याच्या ठाण्यांत देखील त्यांची ही लूटमार बेलाशक चालते; आणि असा

-----

१ पारनेरच्या आठवडे बाजारांत १९१७ चे फेब्रुआरी महिन्यांत रायतळ्याच्या एका कुणब्याने उसाची गाडी आणली, त्यांतले कांहीं ऊस पाऊण

(पृष्ठ १०६ पहा.)

बळकट संशय येतो की फळफळावळ, ऊस, शेंगा वगैरे उकाळ्यांतील कांही अंश ग्रामप्रभूकडे जात असावा. ह्यांशिवाय ह्या सर्व लोकांची जनावरें बाजारावर मोकार सोडलेली असतात, व ती बेधडक चारा-दाण्यांत तोंडे पालतात. कनिष्ठ स्थितीतले शेतकरी आपला माल खेड्याच्या बाजारांत आणतात, म्हणून वरील शोचनीय स्थिति बंद करण्यासाठी तांतडीचे उपाय योजिले पाहिजेत. बाजारकऱ्यांना काय आणि एकंदर जनतेला काय, कायदेशीर दाद मागण्याचे किंवा आत्मसंरक्षणाचे अवसान नसते, हे जसे कुणब्या-वाण्यांच्या भांडणांत दिवाणी कोर्टात नजरेस येते तसें फौजदारी कोर्टातही येते.

 महार जागल्यांना किती किफायत आहे ह्याची अटकळ येण्यासाठी एक दोन गोष्टी सांगतो. लाखे फळ तालुका शेवगांव जिल्हा अहमदनगर येथे महारांचा आणि गांवाचा लढा पडला. गांवची घरे १२५, लोकवस्ती सुमारे ८००, आणि महारांची लोकसंख्या सुमारे २०० असून काळीत सुमारे १०० नांगर चालत होते. लोक महारांना नांगरामागें चार पायल्या धान्य व रोजची भाकर देण्याला कबूल होते. महारांचे म्हणणे असे पडले की, गांवाला आठ महार लागतात तर आम्हांला रोज दर घरची एक भाकर, सणावाराला सर्व महारवाड्याला वाढणे, पड्याची माती व कातडे, आणि शेतांत पिकेल त्याचा दहावा हिस्सा बलुतें याप्रमाणे मिळाले पाहिजे. शेरांत चार भाकरी होतात व एक वेळच लोक भाकरी घालतात, असें मानिले तर महारांना सवाशें घरांच्या रोजच्या आठ पायल्या म्हणजे सालाच्या बारा खंडींच्या भाकरी होतात; आणि नांगरामागें चार पायल्यांप्रमाणे सालाचे पावणे दोन खंडी धान्य होतेः

-----
(मागील पृष्ठावरून समाप्त.)

आणा व कांहीं एक आणा या दरांनी गेले. त्यांतले उत्तम चार ऊंस महारांनी, दोन जागल्यांनी, व एक नाईकवाडीने शेव म्हणून नेला. नाईकवाडीला कुणबी फुकट ऊंस देईना. तेव्हां त्यानं त्याच्या मुसकाडीत मारली. त्याच महिन्यांत ढवळपुरीच्या मारवाड्याने ऊस आणिले व त्यालाही वरीलप्रमाणे चट्टा बसला
म्हणजे ८०० वस्तीच्या गांव-महारांना दरसाल सुमारे ८५० रुपयांचे चौदा खंडी धान्य देण्याला गांव कबूल असतांही महार नाखूष. ह्या रकमेत सणावाराची वाढणी,ओंवाळणी, दानें,शेतांतलें गवत, सरपण, जनावरांची माती, कातडे वगैरे मिळविलें तर महारांची दोन ते तीन रुपये डोईपट्टी गांवावर बसते, असें भीत भीत म्हणावे लागते; ह्याखेरीज चोरी चपाटी. दोन वागत्या पाटलांचा असा स्पष्ट अभिप्राय आहे की, जितका गांवचा वसूल तितक्या किंमतीचा हरजिनसी माल महार जागले उकळतात. चार आणे रोज देऊन सुद्धा ते शेतमजुरीला का मिळत नाहीत ह्याचा उलगडा हा अभिप्राय प्रमाण मानला म्हणजे होतो. सन १९०५ साली महार-जागल्यांच्या वतनासंबंधाने चौकशी चालू होती तेव्हां ते स्वच्छ म्हणत की, आम्हांला माणसी दहा रुपये दरमहा दिला तरी परवडणार, नाहीं. टाकळीभान तालुका नेवासे येथील महारांना पांच वर्ष सस्पिंड केलें; तेव्हां पुनः कामावर रुजू करून घेण्याच्या खटपटीसाठी ते गांवकऱ्यांना हजार रुपये देण्याला तयार झाले असे सांगतात. सन १९१२ साली पारनेर तालुक्यांतील वडनेर बुद्रुक ह्या गांवीं निजामशाहीतील एक महार आला, आणि त्याने एकाचे दोन रुपये चवथ्या दिवशी देण्याचा धंदा सुरू केला. ह्या धंद्यांत सदर गांवच्या महारांनी ६००-७०० रुपये घातले. असो. गांवच्या कामाच्या मानाने महार जागल्यांच्या संख्येत नुसती छाटाछाट करून हा कुणब्याचे मागचा ससेमिरा सुटणार नाही. महार जागल्यांच्या पोटगींत सरकारने जी रयतेशी सांवड किंवा सरकत केली आहे, तीच मुळी पायाशुद्ध नाही. समसमान बलाबल असलं तर खरीखरी पाती. कोणीकडे सर्व शक्तिमान कसरी सरकार आणि कोणीकडे रानांत गांठलेला गैर-हिशेबी लंगोट्या ? सरकारचे काम कसेंही होऊन निघते. तें महार जागल्यांनी केले नाही तर पाटील-कुलकर्णी धाकानें अंगमोड किंवा पदरमोड करून त्याचा बोभाटा होऊ देत नाहीत. हे सामर्थ्य रानगड्याने कोठून आणावें ? राक्षस आणि ढंग ह्यांच्या संगतीप्रमाणे ही सांवड कुणब्याच्या जिवावरचीच आहे. तेव्हां
महार जागल्यांचे ऐनजिनसी हक्क व बलुतें बंद झाले पाहिजे व त्यांना रोख मुशाहिरा देण्याची तजवीज झाली पाहिजे. त्यांचे वतन इनाम खालसा करून त्यांतून त्यांचा पगार भागत नसल्यास लोकांनी तत्प्रीत्यर्थ अल्पसा कर देण्याचे कबूल करावें. सबंध महारवाडा, मांगवण, कोळवण, रामोसवाडा, भिलाटी अंधेरांत पोसण्यापेक्षां नियमित संख्येचा उघड्या डोळ्यांनी व मोकळ्या हातांनी पगार देणे खात्रीने फायदेशीर होईल. निमगांव तालुका शेवगांव जि. नगर येथे महारांचा व गांवचा बेबनाव झाल्यावर गांवानें पांच रुपये दरमहावर एक कोळी ठेऊन त्याजकडून गांवकीचे काम घेतलें, तेव्हां काम अति उत्तम होऊन एकंदर गांवची पुष्कळ बचत झाली. ह्या अनुभवाची शीक इतरांनी घेतल्यास परिणामी उभयपक्षी कल्याण होईल.

 टांकसाळ झाल्यापासून सोनाराची पोतदारी सुटली. तो आतां बलुत्यांत कुणब्यांचे व आलुत्या-बलुत्यांचे रुप्याचे किरकोळ व ठोसर डाग घडतो. उदाहरणार्थ-टांक, कान टोचणे, आंगठ्या, कडी, गोठ इ. कलाकुसरीच्या व श्रमाच्या दागिन्यांबद्दल तो मजुरी घेतो. काही ठिकाणी पाटीलकुळकर्णी त्याला गाड्या बैल धरणे, लोक बोलावणे वगैरे जागलिकीची कामें सांगतात; तेव्हां तो सरकारने नेमलेल्या जागल्याप्रमाणे बलुतें वसूल करतो. एरवीं सोनाराला महार जागल्यांच्या दहावा हिस्सा बलुतें मिळते. याखेरीज शेतांत असेल त्या उदिमाची जातां येतां वाणगी, सणावाराला वाढणे किंवा शिधा, दिवाळीची ओवाळणी, पोस्त वगैरे सर्व कारूनारूंना मिळते; हे येथे एकदां सांगून ठेविलें म्हणजे दर कारूनारूच्या हकीकतीत सदरहु मिळकतीचा पुनरुच्चार करण्याचे प्रयोजन नाही.

 सुतारकामासाठी कुणब्यांना सुताराला लाकूड पुरवावे लागते, आणि त्याच्या हाताखाली गडी द्यावा लागतो. बहुतेक काम तो आपल्या घरी 'सुतार पिढ्या' वर किंवा 'नेटा' वर करतो. मोटेचे वडवान बसविणे वगैरे सारखें काम तो जरूरीप्रमाणे शेतांत जाऊन करतो. मजूरी न घेतां बलुत्यांत खाली लिहिलेली कुणबिकीची व कारभावांची कामें तो करतो. नांगर, हाळस, मोघड, फराट, वावडी, पाभर, कुळव, कोळपें,
शिवळटी, रुमणे, दांताळे, जू, वडवान, मोटेचे सुळे, डुबे, मोगरी, फावडी, मेखा, दांडे, खुंटे, मुठी, लोहार व सोनार ह्यांच्या ऐरणीचे खोड, घन व हातोड्यांचे दांडे; चांभाराची फरांडी ( ज्यावर कातडे कापतात तें चापट लांकूड ), कुंभाराच्या चाकाचे तळ, आंबा घडण्याचे फळे; परटाची मोगरी; व सर्व आलुत्याबलुत्यांच्या मेखा, दांडे वगैरे. नवीन नांगर, पाभर, तिफण किंवा गाडा भरणे झाल्यास तो मजुरी घेतो. नांगर दोन तीन व पाभर तिफण पांच सहा वर्षे टिकतात. बाकीच्या आऊतकाठीची डागडुजी नेहमी करावी लागते. नवीन मोघड करतात त्या सालीं सुताराला चार शेर व एरवीं आच्छेर तें तीन शेर पर्यंत बीं कुणबी देतात, आणि रासमाथ्याला शेकडा २ प्रमाणे बलुतें देतात. सुतार कामासाठी कुणबी व इतर लोक जें लाकूड आणतात त्याच्या ढलप्या सुतारच ठेवतो आणि विकतो. जळण महाग झाल्यामुळे त्यांत त्याला चांगला नफा मिळतो.

 लोहारकामासाठी लोहाराला लोखंड व सरपण, कोळसे, गोवऱ्या, ही पदरची पुरवावी लागतात; आणि त्याच्या हाताखालीं गडी द्यावा लागतो. लोहारकाम बहुतेक त्याच्या भट्टीवर चालते. तो बलुत्यामध्ये खाली

-----

 १ साधारणपणे लाकूड देऊन सुतारकामांची रोख मजुरी पडते ती अशी-

 किंमत   सनंग   किती वर्षे टिकतें.
 रु. १   नांगर   ३,४
    वखर   
    पाभर   
 σ ८   कोळपें मोठे   
 σ ६   कोळपें लहान   
 σ ४   आऊताची जूसर   

बलुतदार सुतार दोन बैलांच्या आऊतामागे दरसाल सुमारे ३ σ ८ रुपयांचे नुसतें धान्य घेतो, याशिवाय वरकड किफायत, असे कुणबी सांगतात.
लिहिलेली कामें करतो-नांगराचा फाळ व वसु, कुळवाचे वसु, पाभरीचे फारोळे, कोळप्यांच्या गोल्या, मोटेचे कडे, कण्याच्या आऱ्या, लहान कुऱ्हाड, कुदळ, खुरपें, विळा, उलथणे, विळी, जात्याचे खुंटे, विड्या, इत्यादि; सुताराचें वांकस, किंकरें, सामते; सोनाराची ऐरण, सांडस,

-----

 १ लोखंड देऊन लोहारकामाची मजुरी साधारणतः खाली लिहिल्याप्रमाणे पडते.

 सनंग किती वर्षे टिकतें नवीन करण्याची मजुरी शेवटणावळ
 कुसा    σ ८ σ २
 फांस    σ ८ σ ३
 मोठे कोळपें    σ ४ σ१ σ ६
 लहान कोळपें    σ ३ σ १
 विळा    σ३ σσ६
 कुदळ  २,३  σ८ σσ६
 कुऱ्हाड  २,३  σ८ σσ६
 फावड़ें    σ८ σσ६
 विळे,खुरपें    σ१ σσ३

 मौजे चापडगांव तालुके शेवगांव जि. नगर येथील रा. रा. राणू माळी यांनी असे सांगितले की, मी पूर्वी लोहाराला ५०० गुड देत होतों; अलीकडे तें बंद करून दीड दोन रुपयांत लोहाराकडून सालभर काम घेतों. १०० गुडाला कमीत कमी एक मण धान्य निघते, यावरून हिशेब करावा.

 प्रसिद्ध रणभूमि खर्डे येथील घिसाड्यांनी माहिती दिली ती अशीः मालकानें लोखंड कोळसे वगैरे दिल्यास

 फाळ σ८ ते σ१२, पास σ४, तिफणीचे फारोळे σ४, कुदळ σ४.

 मालकाने लोखंड व कोळसे न दिल्यास उक्ते फाळ १σ२ ते १σ४, फारोळ σ१०, कोळप्याच्या गोलया σ१०, पोलादी खुरपें σ२, लोखंडी खुरपें σσ६, विळी σ६, विळा σ२, उचटणे σ१, पळी σσ६ ते σ१, झारे σ१ ते σ२.
चिमटे, हातोडे नवे करणे व जुन्यांना तोंडे घालणे; चांभाराच्या आऱ्या, राप्या; कुंभाराची कुदळ, खोरें, खुरपें; मुलान्याच्या सुऱ्या; आणि सर्व वस्तीचे वरील प्रकारचे नवे काम, व जुन्याची शेवटणी वगैरे प्रकारची डागडुजी; कुळवाचा फांस, गाडीचा आंख, धांव वगैरेबद्दल तो रोख मजुरी घेतो. दरवर्षी लोखंडाचा घांस दिला तर फाळ पांच सहा वर्षे टिकतो. कुऱ्हाड, खुरपी वगैरे वर्ष सहा महिन्यांनी शेवटावी लागतात. लोहाराला अच्छेर तें दीडशेर बी व रासमाथ्याला शेंकडा पावणेदोन प्रमाणे बलुतें कुणबी देतात.

 चांभार बलुत्यामध्ये कामें करतो ती येणें प्रमाणे:-मोट शिवणे, तिला ठिगळ लावणे, गोफणीला टवळे लावणे, जुना जोडा, आसूड सांधणे; सारांश गोठभर वाघी लागेल इतके कुणब्यांचे व आलुत्याबलुत्यांचे काम करणे. नवीन जोडा, आसूड, मोट वगैरेंबद्दल रोख पैसे पडतात. चांभाराला कुणबी दोन शेर बी व शेंकडा सवा दोन बलुतें देतात.

 कुंभार घागरी, दुधाणे, ताकाचा डेरा, सुगडें, वेळण्या, पंथ्या, चिटकी ( कोरड्यासाची ) वगैरे बलुत्यांत देतो; व रांजण, कोथळी वगैरे मोठ्या जिनसा रोखीने विकतो. कुणबी कुंभाराला शेर अच्छेर बी व शेकडा सवा बलुते देतात. न्हाव्यांला लहानथोर दर डोकीमागे दोन ते चार पायल्या बलुतें व हजामतीचे दिवशी एक भाकरी असें मिळते. ते करगोटा घालणाऱ्याला हिशेबांत धरतात. कुणब्याची हजामत महिन्या-तीनवारां होते, आणि खेड्यांत हजामतीला पाव आणा अर्धा आणा पडतो. ह्या हिशेबाने फार तर आठ दहा आणे होतात. चौल, शेंडी राखणे, वगैरे प्रसंगी न्हाव्यांना खण, शिधा, ओटी व कांहीं रोकड अशी जास्त किफायत होते. काहीं ठिकाणी वरीलप्रमाणे धान्य न देतां उत्पन्नाचे शेकडा पावणेदोन बलुतें देतात. परीट लग्नकार्य, सोयर, सुतक वगैरे प्रसंगी गांवकऱ्यांचे धुणे धुतो. तो लग्नांत नवरानवरी ह्यांच्यावर चांदवा धरतो, व पायघड्या घालतो. गांवांत सधन व मराठमोळ्यांच्या घरांचे धुणे परटाकडे असते, त्याबद्दल त्याला रोज भाकर देतात. परटाला शेर अच्छेर बी व न्हाव्याच्या तिसरा हिस्सा बलुते मिळते. परीट आणि कुंभार ह्यांची कुणब्याला मोठी वर्दळ लागते. 'कुंभारतळे,' 'गाढवलोळी' अशी जमिनींची नांवें गांवोगांव ऐकू येतात; व त्या जमिनी बहुधा गांवानजिक असतात. पूर्वी ह्या जमिनी कुंभार, परीट यांस इनाम असाव्यात व त्यांत गाढवें सुटत असावीत. आता त्या सर्व वहित झाल्या आहेत, आणि कुंभार, परीट तर बाराही महिने आपलीं गाढवें मोकळी सोडतात. ती गांवकऱ्यांच्या गवताची व पिकांची धुळधाण करतात.

 गुरव देवपूजा, देवळाची झाडलोट व दिवा बत्ती करतो; आणि सणावाराच्या दिवशी काही ठिकाणी घर पाहून २ ते १० पत्रावळी देतो, सरकारी झाडांशिवाय शिवारांत पान राहिले नाही, म्हणून पत्रावळीला पाने मिळत नाहीत; अशी सबब सांगून बहुतेक ठिकाणी पत्रावळी देण्याचे त्यांनी सोडून दिले आहे. ते कथाकीर्तनाला बोलावणे करतात; व मृदंग वाजवितात, त्याबद्दल त्यांना आरतीची ओवाळणी मिळतें. मृदंग वाजविला नाही तरी गांवगुरव आरतीचे पैसे सोडीत नाहीत. रोकड पैसे व कांहीं हक्क घेऊन गुरव वाजंत्रीपणा करतात. देवपरत्वे देवपूजा गुरवाकडून निघून वाघ्या, भुत्या, भराडी, गोंधळी, जोगी, गोसावी, बैरागी,महार, मांग, व फकीर ह्यांच्याकडे गेली. ज्या मानाने ज्या देवाचा नवसाला पावण्याचा लौकिक त्या मानाने त्याच्या पुजाऱ्याला कुणब्यांकडून पेंढी काडी मिळते. कोठे महादेवाच्या गुरवाला किंवा जंगमाला जास्त तर कोठे खंडोबाच्या वाघ्याला जास्त; कोठे बहिरोबाच्या किंवा देवीच्या भगताला जास्त तर कोठे गोसाव्या बैराग्याला, मानभावाला किंवा तक्यांतल्या फकीराला जास्त; ह्याप्रमाणे गांवोगांव वैचित्र्य दिसून येते. गुरव व त्यासारखे इतर ग्रामदेवतांचे पुजारी ह्यांना कुणब्यांकडून उत्पन्नाच्या शेंकडा एकच्या आंतबाहेर पेंढी मिळते. खेराज नैवेद्य, देवापुढील हमेषचे उत्पन्न, यात्रांचे उत्पन्न, व नवस इत्यादि किफायत होते. पंचांग सांगणे, लग्न लावणे, अंत्यविधि चालविणे, श्राद्ध, पक्ष, देवदेव वगैरे विधि, संस्कार व तिथि-पर्वणी इत्यादि प्रसंगी ग्रामजोशी उपाध्येपणा
करतो. काही ठिकाणी त्याच्याकडे ग्रामदेवतेची पूजा-अर्चा असते. ज्योतिषाचे प्रश्न पाहणे, गांवकऱ्यांची पत्रे लिहिणे, ब्राह्मणेतरांना ब्राह्मण घालणे झाल्यास स्वैपाक करणे वगैरे काही तो करतो. ग्रामजोशी बहुधा ब्राह्मण असतो. काही जाती ब्राह्मणाला लग्नादि संस्काराला बोलवीत नाहीत. वड्डर, कैकाडी, कोल्हाटी, कुंचेवाले वगैरे जातीत लग्ने जातपंच लावतात. जिल्हा नगर तालुका आकोले येथील ब्राह्मणवाडे नांवाच्या गांवांत माहारांची लग्ने महार-भाट लावतात. ग्रामजोशाला कुणब्यांकडून सरासरी उत्पन्नाच्या शेकडा एकच्या आंत बाहेर पेंढी मिळते; शिवाय पंचांगाचे धान्य, व नैमित्तिकाचा शिधा, दक्षिणा मिळते. त्याच्याकडे कुलकर्ण नसले तर पेंढी वगैरे कमी मिळते. मुलान्याचे काम बकरें लावणे हे होय. त्याने फात्या न दिला तर ते मुरदाड राहते, म्हणजे ते हलाल (शुद्ध)होत नाहीं; व ह्या कामासाठी तो अच्छेर मांसाची शेरणी व दोन बैलांचे नांगरामागें तीन पायल्या धान्य घेतो. दर मांसाहारी घरी वर्षांतून फार तर तीन चार वेळां बकरें पडण्याचा प्रसंग येतो. मुलान्याला खळ्यावर सुमारे शेकडा एक तें पावणे दोन बलुतें मिळतें. बकरें मारण्याबद्दल उपऱ्याकडून तो एक आणा घेतो. गांवांत फकीर नसला तर गांवचा ताबूत मुलाना करतो. कोळी पखालीने पाणी भरतात, व भांडी घांसतात. मराठमोळ्याच्या घरी ही कामें ते दररोज करतात, व त्यांबद्दल त्यांना भाकरी मिळते. शिवाय त्यांना शेकडा एकच्या आंत बलुतें मिळतें.

 गोंधळी, भराडी, मुरळ्या, वाघे हें लग्न-कायांत गोंधळ किंवा जागरण घालतात, व देवाच्या उत्सवांत आपापली कामें करतात. कलावंतीण उत्सवांत, यात्रांत नृत्य-गायन करते. भाट, ठाकूर, लग्नांत बाण्या म्हणतात. गुजराती मारवाडी भाट मुऱ्हाळकी करतात व ऐवज पोंचवितात. तांबोळी सणावाराला पांच दहा पानांचा विडा घरोघर देतो. हाळकरी हाळ भरतो. वऱ्हाडांत गारपगार पाऊस सांगतात. मद्रासेकडे पाट साफ ठेवणारे आलुत्ये आहेत. भोई, डोलीवाले, शिंपी, तेली, माळी, कासार, बुरूड, जिनगर, शिकलकर, बेलदार, गवंडी, पिंजारी, नावाडी
हलालखोर आपापली जातकामें करतात. वाघे, मुरळ्या, गोंधळी, जोगतिणी, भगत, पोतराज, मानभाव, फकीर वगैरेंच्या अंगांत वाररें येते. लिंगायतांचे धर्मसंस्कार जंगम करतात. मुसलमानांचे धर्मसंस्कार काजी, मुजावर, मुलाना, फकीर वगैरे करतात. फकीर मुजावर मशिदीत, दर्ग्यांत दिवाबत्ती व झाडलोट करतात. पुष्कळ हिंदू पिरांना व ताबुतांना भजत असल्यामुळे महंमदी उपाध्यायाची गरज लागते. ह्या व इतर नारूंना त्यांच्या स्थानिक महत्त्वाप्रमाणे कमी जास्त उत्पन्न मिळतें, ते सरासरी शेकडा .२५ ते .८ असते.

 वरील यादीपैकी सर्व कारूनारू सर्व गांवांत आहेत,आणि ते नसल्याने गांवचे कांहीं काम खुंटून राहिले आहे असें नाही. तथापि ते जेथे आहेत त्या गांवांत व त्याच्या आसपास पुरातन धाऱ्याप्रमाणे ते आपले हक्क

-----

१ कारू-नारूंचा रट्टा कसा चालतो हे गुऱ्हाळ घरच्या खर्चावरून लक्षात येईल. भट, न्हावी, सुतार, चांभार, लोहार, महार, मांग हे पांच ऊंस, पांच पेरी, शेरभर गूळ, आणि दर तीन दिवसांनी घागरभर रस नेतात. शिवाय देवाला पांच शेर गूळ आणि जो गांवचा परगांवचा व कोणत्याही जातीचा इसम येईल त्याला पोटभर रस, कढईतील गूळ, काकवी व ऊस असें द्यावे लागते, असे एका कुणब्यानें सांगितले. पिंपळगांव पिसा तालुके श्रीगोंदे येथील रा रा. कृष्णाजी व श्रीपतराव पाटील यांनी माहिती सांगितली ती:--सुतारानें चरक, लोहाराने दोन विळे, चांभाराने आठ वाध्या व चरक हांकण्याचे थोपटणे, व कुंभाराने मडकी करून द्यावीत; आणि महाराने चुलवण्यासाठी सरपणाचे भारे आणावेत. सुतारास व कुंभारास पहिल्या दिवशी २५ ऊस, पुढे दररोज पांच ऊस, आणि दर आठवड्यास एक ढेप व शेरणीवट्ठल २ शेर गूळ द्यावा लागतो. चांभाराला रोज २॥ ऊस, आठ दिवसाला शेरणी २ शेर गूळ, व पंधरा दिवसाला एक ढेप यावी लागते. लोहारास आठवड्याची शेरणी व शेवटी एक ढेप द्यावी लागते. महाराला दोन ढेपा व शेवटचे आधण; गुरवाला दररोज अच्छेर गूळ, आणि ब्राह्मण, रामोशी, मांग वगैरना आठ दिवसांनी शेरणी द्यावी लागते. आधणावरील मळई कोठे महार तर कोठे मांग घेतात. ह्याखेरीज गुऱ्हाळ घरी जो येईल त्याला ऊंस, रस, गूळ, काकवी द्यावी लागते. कोणालाही विन्मुख लावतां कामा नये, कारण कोणी नाखूष झाला तर अदावतीने अचाट नुकसान होण्याची भीति असते.
उकळतात. गांवांत जे सर्व प्रकारचे भिक्षेकरी असतात, त्यांनाही नित्य नियमानें कोणाला पीठ, कोणाला भाकर वगैरे भिक्षा वाढून गांवकरी पोसतात. गांव जसा सुखी असेल, किंवा जसा ज्यांचा धागा पोचेल तशी भिक्षेकऱ्यांची वस्ती वाढते. त्यांच्या प्रकारांचा विचार विस्ताराने येथे न करतां फिरस्त्यांच्या प्रकरणांत करूं, कारण स्थाईक व फिरत्या भिक्षेकऱ्यांचे पोट भरण्याचे मार्ग बहुतेक सारखेच असतात.

गांव-गाडा.pdf