गांव-गाडा/सारासार

विकिस्रोत कडून



सारासार.
-----------

 विवेकें क्रिया आपुली पालटावी । अती आदरें शुद्ध क्रीया धरावी ||रामदास.

 वर्णाश्रमधर्म, जातिधर्म व वतन ही परंपरा आहे. वर्णाश्रमधर्मव्यवस्थेत व्यवसाय जन्मसिद्ध झाले, आणि तदितर व्यवसाय करण्याला लोक अधर्म मानूं लागले. वर्णाश्रम आतां नांवाला आहे, असे म्हटले तरी चालेल. व्यवसायांत बारीक बारीक पोटभेद पडून ते संकीर्णवर्ण, जाती, पोटजाती व आर्येतर जमाती ह्यांच्या गळ्यांत पडत गेले; आणि वर्णाश्रम-धर्माची सहस्रावधि शकलें जाति-धर्माच्या रूपाने दृष्टीस पडू लागली. ह्याप्रमाणे समाज अतिशय विभागला जाऊन, जो तो विभाग आपापल्या तोऱ्यांत राहून अमर्याद एककल्ली व एकधोरणी बनला. ह्याचा ढोबळ परिणाम असा झाला आहे की, हिंदु समाजाचा अष्टपैलूपणा गेला, आणि आत्मसंरक्षणाच्या कामीं तो लुला पडून त्याची स्वयंपूर्णता नष्ट झाली. आपला विशिष्ट व्यवसाय खेरीज करून बाकीच्या धंद्यास काही कांहीं जाती अजिबात आंचवल्या, आणि एकंदर हिंदु समाज काही धंद्यांना पूर्णपणे मुकून तो दररोजच्या व्यवहारांत देखील परधर्मीयांच्या कह्यांत गेला आहे. जो समाज हरहुन्नरी नाही, किंवा वेळ पडेल त्याप्रमाणे धंदा करण्याची ज्यांत सवड ठेविली नाहीं तो मृत-प्राय हीन दीन अवस्थेप्रत कधींना कधी पोंचलाच पाहिजे. ब्राह्मण तलवारीची परवा करीतनासे झाले, आणि क्षत्रिय तागडीला तुच्छ मानूं लागले. ऐटीत आल्यावर अजून सुद्धा मराठ-बिंडा म्हणतो पोकळ धोत्र्या ब्राह्मणाच्या लेखणीला किंवा ढेरपोट्या वाण्याच्या तागडीला कोण हाती धरतो ? आणि ब्राह्मण म्हणतो लेखणीपुढें तलवारीची काय मातब्बरी ? सर्व साक्षर व कलासंपन्न जातींत राकटपणा नाहींसारखा झाला आहे. शारीरिक श्रम पाहिजेत अशा सर्व धंद्यांत ह्या जातींना
माघार घ्यावी लागते. श्रमसहिष्णु जातींनी जर ह्यांचे किरकोळ साधे पण आंगमेहनतीचे काम टाकले तर ह्यांची मोठीच अडवणूक होते व होणार. खेड्यांतल्या कणखर जातींचे लोक मामळभटाच्या शरीरदौर्बल्याचे सोंग मोठ्या गमतीचे व बोधप्रद आणतात, आणि वर्णनहीं रसभरित करतात. शेत असून नांगर धरण्याची संवय नसल्यामुळे ब्राह्मणाला शेतीचे उत्पन्न भरपूर मिळत नाही. व्यापारी सद्गुणांचा त्यांच्याठायी लोप झाल्याने मारवाडी गुजराती त्यांना पातीत घेत नाहीत. मराठा व मुसलमान ह्यांखेरीज इतर दक्षिणी हिंदु जातींना सरकार पलटणीत नुसतें खोकू देत नाही. कारण त्यांतले लष्करी गुण झडून गेले आहेत. गुजरात खानदेशाकडे सावकार लोक गाय-तोंड्या हिंदूंपेक्षा अवसानबाज मुसलमान तगाद्याच्या कामासाठी जास्त पसंत करतात. चिकाटीच्या व धाकदडपीच्या धंद्यांत हिंदूपेक्षां मुसलमान व पार्शी अधिक यश संपादितात. ताशेवाले, गाडीवान, आतार, दरवेशी, बहुतेक मुसलमान आहेत. गायकसाई सर्व मुसलमान आहेत. वड्डर, कोल्हाटी, कैकाडी, भामटे वगैरे हिदु जाती डुकरें पाळतात, पण जातिधर्मामुळे त्यांचे मांस विकण्याचा किफायतशीर धंदा ख्रिस्ती लोकांच्या हातांत गेला आहे.

 हिंदुसमाजाचा अष्टपैलूपणा नाहीसा होऊन तो ऐहिक व्यवहारांत पाहुणा झाला, इतकेच नव्हे तर धार्मिक बाबतींतही तो पराधीन झाला आहे. आले वेडसर पाहुणे । ते तो जगाचे मेहुणे ॥ ह्या श्रीसमर्थउक्तीप्रमाणे जो उठला तो हिंदूनाच दोन गचांड्या देत सुटला, व तेही मागासलेल्या जातींतल्या मेहण्याप्रमाणे त्या सोशीत राहिले. हा दोष त्यांच्या युक्तायुक्तविवेकशून्यतेचा व धर्मभोळेपणाचा आहे. हिंदूच्या धर्मकृत्यांवर महमदीयांनी चदविलेले हक्क,आणि नाथ, अगाखानी, सुफी इत्यादि पंथ, उच्चरवाने सांगतात की धर्मातसुद्धां हिंदूंना स्वतःचे म्हणून काही निर्भेळ उरले नाही. हिंदू दैवतांना ( देवी, खंडोबा, बहिरोबा, जोतीबा) कंदोरी करावयाची असते. पण तत्प्रीत्यर्थ बकरें मारण्याला व त्याला फात्या देण्याला बहुतेक सर्व हिंदू जातींना मुसलमान मुजावर लागतो.
तेव्हां असा प्रश्न उद्भवतो की, आधी कोण? ही दैवतें कां मुजावर ? मुर्दाड मांस न खाण्याचे कारण मलीक (पीर ) तसे करूं देत नाही असें मांसाहारी हिंदू सांगतात; आणि पीर क्षोभतो म्हणून मुलान्याकडून जनावर हलाल न करवितां स्वतःच तें मारून खाणाऱ्या फांसपारध्यांसारख्या जातींना इतर लोक पांढरीत राहू देत नाहीत. हलक्या जातींच्या बहुतेक हिंदूंच्या देव्हाऱ्यांत पिराचे ठाणे आहे. भडोच, शहागड, उद्धपूर वगैरे पंच पिरांना मानभाव कुलस्वामी समजतात. गांवीं फकीर नसला तर हिंदू वर्गणीने परगांवचा फकीर आणून ताबूत करतात, व मोहरमांत फकीर होतात. ताबुतांला नवस करून त्यांच्याखाली पोरांचे नाक कान टोचणारे हिंदू वरिष्ठ जातींत सुद्धा आहेत. अशा वेळी सोनारांची नाहक्क पोळी पिकते. पिराला किंवा दर्ग्याला लोटांगण घालतांना मुसलमान दृष्टीस पडत नाही; परंतु दुखण्यांतून उठले म्हणजे हिंदू लांबवर पिराला दंडवत घेत जातात; व लग्नकार्य झाले म्हणजे ब्राह्मणांबरोबर फकिरांना दक्षिणा शिधा देतात, आणि पिराला ओहर-यात्रा करतात. (दंपत्यें वाजत गाजत जाऊन नैवेद्य करतात.) सर्व जाती पिराला मलिंदा ( नैवेद्य ) नेतात, व मुजावराचा त्यावर फात्या घेतात. काही ठिकाणी ब्राह्मण कुटुंबें सुद्धा दावलमलिकाला हांजल निघून काळें फडकें गुंडाळून हातांत फावडी घेऊन दोम दोम करीत घरोघर झोळी फिरवितात. ताबूत आणि पिरांचे नवस ह्या प्रसंगी सर्व जातींचे हिंदू फकीर जेवूं घालतात. हिंदु लोक देवाला नवसाने गाई, पोळ सोडतात; आणि त्यांनी शेतात किंवा बाजारांत कशांतही तोंड घातलें तरी त्यांना कोणी वारीत नाही. बकरी पिकांना फार अपाय करतात, त्याच्या तोंडचा ठोम म्हणून फुटत नाही. पिराच्या देव्हाऱ्याला हिंदूनी डोके लवविल्यापासून पोळांच्या जोडीला पिराचे बोकड मिळाले, आणि दोघेही बाजारांत व शिवारांत धुमाकूळ घालतात. वांद्र्याच्या खिस्तमातेला ख्रिस्ती लोक बहुधा नवस करीत नसावेत, परंतु हिंदूंचे मात्र येथें नारळ फुटतात. सारांश, सर्व व्यवहारांत एकमेकांतून बहुतांशी फुटुन निघालेल्या जातींची 'घाऱ्याला बोळा व दरवाजा मोकळा ' अशी स्थिति झाली. प्रत्येक जात, पोटजात व पंथ इतर जातींशी व्यवहार आंखडीत व बंद करीत जाऊन आपापली घारी झांकण्यांत गर्क झाले; पण सार्वजनिक दरवाजा मोकळा पडून त्याचा बंदोबस्त कोणालाही करतां आला नाही. स्वसमाजस्थैर्यासाठी इतर जातींशी फटकून राहण्याची जी चाल जातिभेद निर्माण करणारांनी धर्माच्या नांवावर पाडली ती हिंदुधर्म व त्यांतून निघालेले दुसरे आचारप्रधान धर्म ह्यांच्या अनुयायांच्या मुळावर आली. जी ती जात किंवा पोटजात आपापल्यापुरते पाहूं लागली. समाजाचे लहान लहान तुकडे पडून कालांतराने परस्परांचे संघट्टन जसजसें कमी होत गेले, तसतसे ते एकमेकांना दूर धरूं लागले; इतकेंच नव्हे तर दुसऱ्याचे काही झाले तरी माझें तात्पुरतें काम भागले म्हणजे बस्स, असा वीट येण्यासारखा आपपर भिन्नभाव सर्वत्र वाढत गेला. कातडी रंगवितांना घाण सुटते. ती रंगविण्याचे जागेबद्दल ढोर, चांभार व इतर जाती ह्यांच्या तक्रारी नेहमी चालूं असतात. हीच स्थिति कुंभार, लोणारी, परीट ह्यांच्या धंद्यासंबंधाने दृष्टीस पडते. मांग लोक केकताडाचा वाख करतात. त्यासाठी ते पाण्यात भिजू घालून सडवावें लागते. ते पाण्यात भिजू घातलें म्हणजे पाणी नासून त्याला दुर्गंधी येते, आणि असे ऐकिवांत आहे की जर ते विहिरीसारख्या कोंडपाण्यांत भिजत घातले तर तसलें पाणी पोटांत गेल्याने जनावरें दगावतात. लांब कोण जातो म्हणून मांग बेधडक एखाद्या कुणब्याच्या विहिरीत किवा पाणोथ्याला केकताड भिजूं घालतात. जीवदान देण्यांत हिंदू व जैन पुण्य मानतात आणि तत्प्रीत्यर्थ शक्त्यनुसार पैसा खर्चितात, म्हणून फांसपारधी पाखरे धरून आणून मुद्दाम हिंदू-जैनांकडे नेतात व आठ चार आणे उपटून ती सोडून देतात. सर्व जातींचे लोक मुद्दाम गबर जैन

-----

 १-चोपडें येथे श्रीमंत व्यापारी आहेत. सन १९०७ साली त्यांच्या उपवासाचे दहा दिवसांत गावांत हत्त्या होऊ नये, म्हणून त्यांनी हिंदु धीवरांना पंचवीस रुपये आणि मुसलमान खाटकांना सातशें रुपये दिले. १९०८ सालीं खाटकांनी सदरहू दिवसांत जनावरें न मारण्यासाठी सदरहू लोकांजवळ हजार रुपये मागितले !!
किंवा हिंदू गांठून कसाबाला गाय विकण्याची हूल दाखवितात आणि तसे न करण्यासाठी त्यांजवळून पैसे घेऊन अखेर करावयाचें तेंच करतात. कायदा न मोडतां ज्याला जो धंदा करतां येतो, तो तो करणारच. त्यापासून त्याला पराङ्मुख करण्यासाठी इतर त्याची मूठ कोठवर दाबणार ? ह्याप्रमाणे सार्वजनिक हित व एकमेकांचा परामर्ष ह्यांविषयी बेपरवाई वाढत गेली; आणि वीत वीत टीच टीच जमातींनी भरलेला राष्ट्रपुरुष आत्महत्त्येच्या पंथास लागला. पायाजवळ पाहून प्रत्येक जात शाबूत ठेवण्याच्या भरांत सर्व समाजाची मजबुती अंतरली, व अखेर सर्वांना सर्वांचे एकदिल साह्याचे नेट न पोंचून सर्वच संघ मोडकळीला आले, आणि समाजाच्या हितानहितावर नजर पुरविण्याइतकी दीर्घदृष्टि व समाजाला सर्व बाजूंनी सांवरून धरण्याचा आवाका कोणा एकाही समाजविभागांत उरला नाही.

 वतनपद्धति ही जातिधर्माच्या अपार कुंडाचा गांवापुरता एक लहानसा हौद आहे. तिने जसें वतनदारांना व्यक्तिशः व समुच्चयाने तुटक, स्वार्थी, व कमजोर करून एकंदर गांवगाड्याचा विचका केला, तीच गति जातिधर्मानें एकंदर हिंदुसमाजाची केली. जे आडांत तेंच पोहऱ्यांंत येणार. जे धंदे ज्या जातीच्या हाती पडले ते तिच्या बाहेर जाऊं नयेत, ह्या धोरणाने जातधंदे धर्माच्या पदवीस चढविले. धंदेवाल्या जातींतील व्यक्तींचा लोभ वाढून त्यांना असे वाटू लागले की, कांहीं प्रदेशापुरता का होईना जातधंदा आपल्या विवक्षित कुळांच्या बाहेर जाऊ देऊ नये. त्यांच्या ह्या आपमतलबी धोरणाने वतन निर्माण केलें. वतनांत राजाधिकाराचा अंश प्रमुख व जातिधर्मात धर्माधिकाराचा अंश प्रमुख असतो; तथापि दोघांनाही समाजाचे पाठबळ लागते व होतेंही. ज्या कारणांनी वतनी धंदे खालावले आणि अव्वल वतनदारांच्या हातून गेले, त्याच कारणांनी अव्वलच्या जातधंद्यांची तटबंदी ढासळली.जात-धंदा आणि वतन ह्या संस्था लोकसंग्रहाच्या आटोपसर बाल्यावस्थेमध्ये समाजस्थिति कशीबशी सांवरून धरण्याला कितीही उपकारक असल्या तरी त्या
जातीजातींमध्ये व व्यक्तीव्यक्तींमध्ये सामाजिक जबाबदारी समतोल वांटून देण्याला, व्यक्तिगुणपोषणाला,आणि त्याच्या द्वारे समुच्चयाने सर्व प्रकारच्या कौशल्यवृद्धीला पूर्णपणें असमर्थ आहेत. वतनदारीपेक्षा जातिधर्माचा व्याप फार मोठा असल्यामुळे त्याचे परिणामही फार खोल व दूरवर गेले आहेत. धंद्यांत जे धर्माचे वारे शिरले, त्याचा फायदा घेऊन जी ती जात आपल्या धंद्यांतला गलिच्छ किंवा कंटाळवाणा भाग तोडून टाकू लागली; इतकेच नव्हे तर त्याला निषिद्धत्वाचा डाग देण्यास देखील धीटावली, आणि असली कामें करणारांच्या स्वतंत्र पण कमी दर्जाच्या जाती बनल्या. धंद्याची प्रतिष्ठा सर्वत्र आहे, आणि जगांत जोपर्यंत हाताची पांच बोटें लहानमोठी असणार म्हणजे मनुष्याच्या कर्तुकीत तफावत पडणार तोपर्यंत माणसांबरोबर धंद्यांचीही प्रतिष्ठा राहणार. धंदा करण्यास आवश्यक अशा शारीरिक, मानसिक व नैतिक गुणांवर त्याची प्रतिष्ठा साधारणतः अवलंबून असते, आणि ती त्याच्या उपयुक्ततेवर टिकते. उपयुक्तता देशकालपरत्वें बदलत जाते. तेंव्हा गुण व उपयुक्तता ह्या दुहेरी कसाने धंद्यांच्या शेजेंत चढ-उतार होत गेला, तर तो समाजशाश्वतीस फायदेशीर होतो. एक धंदा दुसऱ्यापेक्षा प्रतिष्ठित ठरला तरी जर एक इसम त्यांना पुरून उरण्यासारखा असला तर तो ते दोन्ही हातचे जाऊ देत नाही. ते दोन्ही एकट्याला करता येणे अशक्य झाले किंवा दोन्ही करण्यापेक्षा एक करण्यातच त्याचा अधिक फायदा असला, तर तो ते दोन्ही धंदे करण्याच्या भरास पडत नाही आणि श्रमविभागाच्या तत्वाने एकाच धंद्याला हात घालतो. आपल्या देशांत धंद्यांचे सिद्ध व निषिद्ध हे विभाग आणि पोट-जातीपरत्वे दिसून येणारे पोट धंदे हे गुण व उपयुक्तता किंवा श्रमविभाग ह्यांपेक्षा सोवळ्याओवळ्यावर बसविले आहेत, असे वर वर कबूल करावे लागेल. कामाला बाट नाही, हात बाटत नसतात, हे सत्य आम्ही केव्हांच झुगारून दिले आणि भरपूर काम असो वा नसो अमकें काम निषिद्ध म्हणून झोंकून देऊन रूढीने ठरविलेले सूक्त तेवढे करून
राहिला वेळ हातपाय जोडून बसत आलो. ठोंब्या ब्राह्मणाला कोळ्याप्रमाणे टोणग्यावर पखाली वाहून पैसे मिळविता येईनात किंवा चलाख महाराला लेखणी चालवून डोके काढतां येईना. ह्याप्रमाणे कोणालाच आपापल्या मगदुराप्रमाणे परजातीचा धंदा करता येईना. धंदा करणारांच्या बायकांना सुद्धां धंद्याचे काम पडूं लागले म्हणजे त्या धंद्यांतले काम वाढले असें म्हणता येईल. ह्या मापाने मोजूं गेलें तर महाराष्ट्रांत तरी तशी स्थिति बरीच शतकें नसावी. 'सगळी बायको साळ्याची, अर्धी बायको माळ्याची आणि ऋणकरी बायको ब्राह्मणाची' ही म्हण फार जुनी आहे; आणि ती असे सांगते की, विणकाम व बागाईत शेती ह्या दोन धंद्यांतील लोकांपेक्षा इतरांना भरपूर काम पडत नव्हते. श्रमविभाग झाला पाहिजे; पण तो तोंडाकडील भाग पवित्र व शेपटाकडील अपवित्र, म्हणून वरिष्ठ जातीने तोंडांकडून व कनिष्ठ जातीने शेपटाकडून निमानिम करावा असला नसावा. आमच्यांतील पुष्कळ एक हाती होण्यासारखी कामें जातधंद्यांनी विभागून दिल्यामुळे तिकसतिंगा झाला आहे. सबंध सनंग एक हाती किंवा एकतंत्री म्हणजे एकापायाळूच्या ( दर्दी ) नजरेखाली तयार झाले तर त्याचे सर्व भाग प्रमाणशीर करून ते सर्वांग बळकट व उपयुक्त बनविण्याकडे कारखानदाराला लक्ष्य देतां येतें. जातधर्माने ही घडी मोडली, आणि जाती व पोट जाती परस्परावलंबी धंद्यांत गैरवाकब राहून त्यांची एकहाती दोरी सुटली. परदेशगमनाला अटकाव करून पुढे प्रांताप्रांतांचे दळणवळण जातिभेदाने संपुष्टांत आणिलें. सिद्ध-निषिद्धता व स्थानिक रूढि ह्यांच्या चरकांत कसब सांपडून अनुकूलता असतांनाही एक जात दुसरीचा धंदा करीनाशी झाली, इतकेच नव्हे तर अरूढ पद्धतीने तो करणाराला वाळीत टाकण्यापर्यंत जातगंगा छळू लागली. अशा रीतीने आमच्यांत व्यक्तिस्वातंत्र्य, व्यक्तिवैचित्र्य, चढाओढ ही पार जिरून गेली, व संघटनाशक्ति लुप्तप्राय झाली; आणि जो देश एका काली सर्व प्रकारच्या ज्ञानांत, कलांत व सुधारणांत अग्रगण्य होता, त्याचे वैभव इतिहासांतर्गत झाले. लोकांत धंद्यांची संख्या घटली, व जे हुन्नर जातिधर्माच्या गाळणीतून राहिले ते गचांड्या खात खात बहुतेक तळपायरीवर येऊन पडले आहेत. गेल्या खानेसुमारीत असें प्रमाण निघालें आहे की आधुनिक सुधारणेने जरी वाटेल तितक्या नवीन धंद्यांना जन्म दिला आहे, तरी आमच्यांत शेकडा ९० लोक शेती व तिच्या भोंवतालच्या खेड्यापाड्यांतून दृष्टीस पडणाऱ्या सोप्या व रासवट अशा अवघ्या सव्वीस धंद्यांत काय ते गुरफटून राहिले आहेत.

 धंद्यांची जातवार परोपरी वाटणी झाल्यामुळे लहानशा कामासाठी सुद्धा दहा घरी जोडे फाडावे लागतात, व तितक्यांची बोळवण करावी लागते. म्हणून एकंदर खर्चही अधिक येतो, आणि कधी कधी कामाच्या निषिद्धत्वामुळे काम अडून पडते, व अतोनात गैरसोय होते. हल्ली जी ती जात नीच मानलेली कामें टाकून देण्याच्या विचारांत आहे. जात म्हणून ती कामें करण्याला तिला भाग पाडणे हे सध्यांच्या समतेच्या युगांत कोणालाच उचित नाही. बरें, दुसऱ्या जातीच्या इसमानें तें केलं तर त्याला त्याची जात वांकडे लावते. महारमांग गांवोगांव रस्ते साफ करण्याचे सोडून देत आहेत. भंग्यांचा पुरवठा मुबलक नाही. शिक्षण व किफायतशीर धंदे ह्यांचा प्रसार जों जो अधिक होईल तो तों आजपर्यंत गदळ, ओंगळ, म्हणून नीच मानलेले धंदे करणाऱ्या जाती आपली पिढीजाद कामें सोडून आपल्या पसंतीच्या धंद्यांत पडतील, आणि समजाची आवश्यक कामें पुरातन जातधंद्याच्या व्यवस्थेवर पुढे चालविण्यास बेसुमार खर्च येऊन वेळेला कामकरीही मिळणार नाहीत.

 एक जात दुसरीच्या धंद्याला निव्वळ पारखी झाल्याने जातकसबाचा बाऊ होऊन बसला आहे. तो इतका की, परजातीचा धंदा आपल्याला काही केल्या येणार नाही असे सर्वांना वाटू लागले आहे, एवढेच नव्हे तर तो त्यांना त्याज्यही वाटू लागला आहे. पहाडांत राहणाऱ्या शकूर जातीचा माणूस मेला म्हणजे जात जमते आणि प्रेताला म्हणते, 'ब्राह्मणाचे जन्माला जाशील तर लिहूं लिहूं मरशील, वाण्याच्या ज न्माला जाशील तर तोलूं तोलूं मरशील इत्यादि; पण ठाकराच्या जन्माला जाशील तर जंगलचा राजा होशील." आणि जंगलचे राज्य कोणते म्हणाल तर ना अन्न ना वस्त्र; जंगलांतले कंद आणावेत व खावेत. सोप्या हुन्नरांविषयीं सुद्धा लोक म्हणतात 'जेनो काम तेनो थाय बिजा करे तो गोता खाय'. दिवसभर ढोरासारखी मेहनत करणारा कुणबी म्हणतो 'छे, घडीभर बसलें तर कमरेला टिपरूं लागते आणि हातापायाला कळा लागतात. बसून बसून माणूस उबून जाऊन फटफटीत पडावयाचें. ब्राह्मणांनींच प्रहरानुप्रहर मान वांकवून लिहीत बसावें.' कोल्हाट्या उड्या, दोरावर चालणे वगैरे कसरतीची कामें करणासऱ्या कोल्हाटणी म्हणतात 'घटकाभर तमाशा करून आम्ही दिवसभर बसून खायाला सोंकलों, तेव्हां आमच्याने दळणकांडण, खुरपणीमोडणी, कसची होते ?' परीट म्हणतात की दिवसभर भट्टीजवळ बसून रक्त जाळणे आमच्याने होणार नाही, आणि सुतार म्हणतात की बसून बसून चांभाराच्या टिऱ्या कशा डेऱ्यासारख्या होतात त्या पहा. हुन्नरी जाती परजातींच्या धंद्याबद्दल तरी नालायकी कबूल करतात. परंतु आयतखाऊ कारूनारू, भिकारजाती, रातोरात ५०-६० मैलांवर दरोडा मारून परत येणाऱ्या चोरट्या जाती साफ म्हणतात की, आमच्याच्याने हुन्नर किंवा धंद्याचे कष्ट होते तर देवाने ज्याचा जन्म त्याला कशाला लावला असता ? धंद्याची पात्रता

-----

 १ एंजिनियर खात्याच्या हमेषच्या दुष्काळी कामावर महार, मांग, भिल्ल, रामोशी वगेरे उडाणटप्पू जातीचे काम मापांत भरपूर पडडून त्यांना पगारही चांगला सुटतो. सन १९०६ सालच्या मे महिन्याच्या सुमारास विसापूर तलावाच्या दुष्काळी कामानजीकच्या एका गांवांत सुमारें ५०|७५ मांगगारोड्यांची एक टोळी उतरली. काळीपांढरीत हे लोक भीक मागण्याला आले, तर त्यांना काही दाणाचारा देऊं नये अशी आसपासच्या गांवकऱ्याना समज मिळतांच त्यांनी त्याप्रमाणे केलें व दुष्काळी अधिकाऱ्याने दररोज दुसांज पालांत जाऊन हटकणी लावली की, तुम्ही कामावर

[ पुढील पान पहा.]
कांहीं जन्मसिद्ध नाही. जातधंद्यांची जातींत कोंडी होऊन त्यांतली कूस इतरांना न कळल्यामुळे 'हातचं सोडून पळत्याच्या मागें' जाण्याचे नादास इतर जाती लागत नसाव्या. पण ह्या आंधळे गारुडाचा परिणाम असा झाला की, धंद्यांना ऊर्जित दशेस नेण्यासाठी नव्या जोमाची माणसे मिळाली नाहीत, आणि ते सांचलेल्या डबकाप्रमाणे नासून व आटून गेले. सर्व जाती परजातींच्या धंद्यांस अंतरल्या, आणि कर्तुकीच्या माणसांना हातपाय हलवायाला व पसरावयाला जागा राहिली नाही, व मिळेल तें जातधंद्यांत मिळवून ओली कोरडी भाकर खाऊन हरि हरि म्हणत बसावे लागते. आणि कोणत्याही धंद्यांत माणसें जास्त
-----
[ मागील पानावरून.]

आलां तर दुष्काळी कानूप्रमाणे सर्वांना काम मिळेल, आणि लहान मुलें थकली भागली माणसें, दुखणाईत व बाळंतिणी यांना फुकट भाकरी व औषधपाणीही मिळेल. त्यांच्याजवळची सावटी तिसऱ्या दिवशी संपली, आणि तो दिवस कसाबसा काढून चवथ्या दिवशी ते कामावर आले. हे लोक केस वाढवितात. त्यामुळे डोक्यावर घमेल्यांतून ओझें न नेतां पहिल्यापहिल्याने घोंगड्यांत बांधून पाठीवर नेत. लवकरच त्यांना कामाचा सराव होऊन सर्वांनी सप्टेंबरपर्यंत आनंदाने काम केले. त्या वेळेचे नगरचे कलेक्टर नामदार मि.जे.पी.ऑर ह्यांच्या प्रगमनशील व सहानुभूतिपूर्ण कारकीर्दीकडे ह्या प्रयोगाचे श्रेय प्रामुख्याने आहे. १९०७ साली तिरमल्यांच्या एका टोळीला गांवकऱ्यांनि अशी अट घातली की, निमी माणसें जर गांवचा निवडुंग काढतील तर बाकीच्यांना खळीं मागूं देऊं. याप्रमाणे त्यांनी तीन दिवस चांगला निवडुंग काढला, व गांवावर निवडंगपट्टी बसली होती, तिचा अंक कमी करावा लागला. ह्याचा दुसरा इष्ट परिणाम असा झाला की, भिकाऱ्यांच्या मागे झेंगट लागते, अशी आवई ऐकून आसपास भिकार येणे काही दिवस बंद पडले. एका मामलेदारांनी भिल्लांचे खावटीसाठी वर्गणीने धान्य जमा करून त्यांना पडीत नंबर लावणीस देवविले व पहिले साली इर्जिक घातली. त्यामुळ शेतचोऱ्या कमी होऊन कुणब्यांचा इतका फायदा झाला की, ते दुसऱ्या सालीही वर्गणी घेऊन भिल्लांच्या बंदोबस्ताचा तगादा करूं लागले.
असोत कां कमी होवोत, त्या वधघटीचा फायदा एकंदर जनतेला मुळीच मिळाला नाही.

 आपल्या समाजांत रूढीचे प्राबल्य फार असल्यामुळे एखाद्या धंद्याची उपयुक्तता वाढली तरी त्याचा व तो करणारांचा दर्जा व प्रतिष्ठा वाढण्यास मारामार पडते. वतनदारांच्या ओळींप्रमाणे जातिधर्मानें निरनिराळ्या धंद्यांच्या किंवा त्यांतील पोटधंद्यांच्या प्रती लावल्या आहेत. त्यामुळे जातींना व धंद्यांना कृत्रिम महत्त्व आले, आणि देशकालमानाने अव्वलच्या प्रतिष्ठित धंद्यांची उपयुक्तता हटली तरी लोकांचा ओघ उपयुक्त धंद्यांपेक्षां प्रतिष्ठित धंद्यांकडे जास्त वळतो. आमच्यांत ब्राह्मणी धंदे, विशेषतः उपाध्यायपण व कारकुनी, मानाई गणले आहेत. ग्रामजोशी हा तिसऱ्या ओळीचा बलुतदार असून त्याला लोहार-चांभारांपेक्षां उत्पन्न कमी मिळते. ही स्थिति डोळ्यांनी पहात असतांही उपाध्यायपण पटकावण्याकडे जितका ब्राह्मणेतरांचा ओढा दिसतो, तितका जास्त उपयुक्त व किफायतशीर पण कमी प्रतिष्ठित गणलेल्या हुन्नरांकडे दिसत नाही. सुतार, गवंड्याला १-१|.रोज पडतो; आणि त्यांची हजरी टिपणाऱ्या कारकुनांना σ४-σ५आणे रोज पडतो. तरी कारकुनी मिळविण्यास ब्राह्मण जितके आतुर दिसतात, तितके सुतार गवंडी कामाला दिसत नाहीत. शारीरिक दौर्बल्य हेही ह्याचे कारण असेल, पण तें मुख्य खास नाही. विहिरी बांधण्यांत कुशल म्हणून ४००-५०० रुपये साल पाडणाऱ्या एका महाराचा ख्रिस्ती धर्म स्विकारलेला मुलगा ६-७ रुपयांच्या मास्तरकीवर खूष दिसला. कारण मास्तरचा मान गवंड्याला नाही. एका काळी अप्रतिष्ठित मानलेल्या धंद्यांची उपयुक्तता व पैदास वाढली असूनही ते धंदे करणारांची समाजांत निष्कारण मानखंडना होतें; त्यामुळे सध्यां सदर धंदे करणाऱ्या व प्रतिष्ठित पण कुचकामाचे धंद करणाऱ्या जाती ह्यांच्यामध्ये विनाकारण जळफळाट वाढतो, आणि प्रतिष्ठित धंद्यांत दाटी व उपयुक्त धंद्यांत पैस, अशी स्थिति उत्पन्न होऊन एकंदर समाजाचें सांपत्तिक व बौद्धिक नुकसान होत आहे.
 ढोर , चांभार, महार, होलार, मांग, हलालखोर, मांगगारोडी वगैरे जाती प्रमुखत्वें अस्पृश्य गणल्या आहेत. ह्यांखेरीज इतर कांहीं जाती अस्पृश्य समजत, पण त्यांचा विटाळ पुष्कळ कमी झाल्यामुळे त्यांचा नामनिर्देश करीत नाही. हिंदुस्थानांत अस्पृश्य जातींची लोकसंख्या जवळ जवळ सात कोटी आहे. ह्या जातींतले लोक ख्रिस्ती किंवा मुसलमान झाले म्हणजे त्यांचा विटाळ उडतो; व वरिष्ठ जातींचे लोक त्यांना आपल्या घरांत वागू देतात. परंतु जोपर्यंत ते हिंदू असतात तोपर्यंत त्यांना ते शिवत नाहीत, व दाराबाहेर उभे करतात. स्पृश्य पर जातींच्या हातचे पाणी ज्यांना आंघोळीला खपत नाही, त्यांना देखील अतिशूद्र मानलेल्या जातींच्या लोकांनी पाणी भरलेल्या बाटल्यांतले सोडावाटर पिण्याला चालतें. अस्पृश्य जातींत स्पृश्य जातींची बहुतेक आडनांवें व देवकें आढळतात; इतकेच नव्हे तर पंडीत, साठे, दळवी, काळे, गोरे, भांगरे, पानसरे,पाटणकर,भालेराव वगैरे ब्राह्मणांची आडनावेही त्यांमध्ये आढळतात व सर्वांचे एकत्व नसले तरी ममत्व व्यक्त करतात. स्पर्शास्पर्शदोषाचें वास्तविक मूळ कांहीं असलं तरी तो आतां चालू ठेवणे उभयपक्षीं अनिष्ट आहे. त्यामुळे अस्पृश्य जातींचा निरंतरचा पाणउतारा होतो, त्यांना आपल्या शारीरिक व मानसिक पात्रतेप्रमाणे सर्व धंद्यांत पडतां येत नाही,

-----

 १ कार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून लग्नमंडपाच्या मुहूर्त-मेढीला अगर देवघरांत देवक बांधण्याचा किंवा ठेवण्याचा कुलाचार महाराष्ट्रकर्नाटकात ब्राह्मणांंमध्ये तुरळक व ब्राम्हणेतरांमध्ये सार्वत्रिक आहे. तो काही काही गुजराती जातीतही आढळतो. उपजीविकेची इत्यारे सनंगें, पशुपक्षी, पाणी, मासे इत्यादीचे देवक असते. जी वस्तू ज्या कुळीची देवक असते तिला ती कुळी देवाप्रमाणे भजते, तिचा उपमर्द होईल असे कोणतेही कृत्य करीत नाही, आणि लग्नकार्यात देवप्रतिष्ठेपासून तो मांडवपरतण्यापर्यंत पूजते. गोत्र व देवक ह्यांचा उपयोग सारखाच आहे. सगोत्रांयांचे जसें लग्न होत नाही, तसें ज्या दोन कुळ्यांंचे देवक एकच असते, त्या आपणांला भाऊबंद समजून प्रायः एकमेकांशी शरीरसंबंध करीत नाहींत.
आणि कामाची कोंडी होते. अस्पृश्य जातींतही एक जात दुसरीचा विटाळ धरते. चांभार महाराचे पाणोथ्याला जात नाहीत, महार मांगाच्याला जात नाहीत, इत्यादि. स्पर्शास्पर्श दोष कमी होऊ लागल्याला शेकडो वर्षे झाली. इर्जिकींत डफ वाजविणा-या मांगाचा विटाळ कुणबी धरीत नाहीत. बाजारांत, आगगाडींत किंवा जेथें हजारों मजूर जमतात, अशा एंजिनियरी कामावर ब्राह्मण पुरुष व ब्राह्मणेतर स्त्रीपुरुष शिवताशीव धरीत नाहीत. ब्राह्मण स्त्रिया मात्र ब्राह्मणेतर सर्व जातींचा विटाळ धरतात, परंतु पातळे चिटें वगैरेंनी तो संपुष्टांत आणिला आहे. स्पर्शास्पर्शतेचा दोष धर्मभयाने वाढविला तसा कमीही केला आहे. देवीचे भक्त, आराधी पोतराज, महार-मांग असले तरी ब्राह्मणेतर स्त्रीपुरुष त्यांना शिवतात, कुंकू लावतात, आणि हाताला हात लावून एकत्र देवीची गाणी म्हणतात. कारण विचारतां ते असे सांगतात की, देवी विटाळ धरूं देत नाही. शाक्तांत मांगिणीची पूजा आहे. कित्येक ठिकाणी ब्राह्मणेतर हिंदू ताबुतांत फकीर होऊन मुसलमानांच्या हातची कच्ची रसई खातात; आणि अहमदनगराकडे मढी, जानपिराची यवलवाडी येथे हिंदूमुसलमानांची एक पंगत होते. जीवनकलह व शिक्षणप्रसार ह्या दोहोंच्या माऱ्यामळें स्पर्शास्पर्शभाव व्यवहारांत दिवसेंदिवस कमी होत चालला आहे, आणि तो अजीबात नाहीसा होण्याची सुचिन्हें दिसत आहेत. तर हीच भवितव्यता आपण होऊन लवकर घडवून आणली तर आपली आणि आपल्या मानवबंधूंची दिलजमाई होऊन हिंदुसमाज सत्वर एकजीव हाण्याच्या मार्गाला लागेल. स्पर्शास्पर्शतेच्या स्तोमानें अस्पृश्य जातींना काही कामांची

-----

 १ दुष्काळांत गांवोगांव पिण्याचे पाणी आटले म्हणजे चांभार, महार, मांग ख्रिस्ती वगैरे प्रत्येक जमात पहिल्याने निरनिराळी विहीर मागून पहाते. त्यांपैकी उंच म्हणविणाऱ्या जातीने आपला एक माणूस विहिरीवर ठेवावा, व त्याने सर्वांना पाणी उपवून घालावे, अशा दुमट्यात ते सांपडले म्हणजे वाटेवर येतात, व पृथक् विहिराची मागणी सोडून देऊन एकाच विहिरीवर पाणी भरूं लागतात !
मनाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या उद्योगधंद्याचे क्षेत्र कमी झालें, व इतर जातींना एका कामकऱ्याच्या ऐवजी अनेक लावावे लागतात; अशी उभयपक्षी नाहक बुडवणूक होत आहे. ह्याखेरीज कामाच्या कोंडीमुळे वेळेला दाम देऊनहीं काम होत नाही, ते वेगळेच. तेव्हां स्वच्छता व शुचिर्भूतपणा ह्यांच्या अनुरोधाने अस्पृश्य जातींच्या मार्गांतली स्पर्शास्पर्शतेची उटी काढून टाकून त्यांना बारा वाटा मोकळ्या केल्याशिवाय आतां गत्यंतर नाही. स्पर्शास्पर्शाचा छाप ज्या जातींवर बसला आहे त्यांपकी बहुतेकांचा जातधंदा असा आहे की, त्यांत सडकून अहोरात्र मेहनत करण्याचे प्रयोजन नाही. बाळमित्र भाग १ पान २०९ 'थोरांचे हृदय' ह्या गोष्टीतील पुढे दिलेला संवाद त्यांच्या सद्यःस्थितीला पूर्णपणे लागू पडतो. “ गणोजी-नंतर त्याने माझे बेंडूस आपल्या मांडीवर बसविलें, आणि तो मला पुसतो तुमची मुलें काय करीत असतात. मी म्हटले काय करतील ? कोठे झाडाखाली जाऊन फुलें जमा करून आणतात, आणि त्यांचे तुरे करून विकतात. नाही त्या वेळेस काटक्या जमा करतात. तेही नाही त्या वेळेस भीक मागतात. तो म्हणाला छी छी! हे ठीक नाही. अशांत जीव नाही. ह्यांत ती आळशी आणि स्वच्छंदी मात्र होतील. तुम्ही मुलांस काही तरी एखादा धंदा शिकवा आणि मुलींस कोठे चाकरीस ठेवा.” सर्व धर्माच्या व जातींच्या मुलांच्या परीक्षा घेतल्या, तेव्हां असें दिसून आले की, अस्पृश्य जातींतल्या मुलांचे पासाचे प्रमाण इतरांहून जास्त पडते व काहींचा नंबरही पुष्कळ वर येतो. ह्या जाती स्वभावतः ताकददार व वस्ताद असतात. ह्या गुणांचा योग्य उपयोग करण्यासारखा रोजगार त्यांना नसल्यामुळे त्या बेलगामी, उधळमाणक्या व स्वाभिमानशून्य झाल्या आहेत. त्यांना काम दिले तर त्या गमतात, व तें मन लावून करीत नाहीत. भिल्लरामोशांसारख्यासुद्धां स्पृश्य जातीतले लोक एकेक दिवस उपवास पडल्यावर मासे किंवा शिकार धरण्याला जातात. नियमित व पुरसे काम करण्याचा त्यांना सराव असता तर त्यांची अशी अवस्था होतीना. असो. तेव्हां स्पृश्यास्पृश्य जातींच्या लोकांना पुरेसें काम मिळण्याची सोय झाल्यावांचून त्यांचा व एकंदर समाजाचा व्यवहार सुरळीतपणाने चालणार नाही.

 सर्व समाज परप्रज्ञ व रूढिबद्ध बनल्यामुळे फारा दिवसांच्या वहिवाटीने जातिजातींच्या गैरसोयी व दोष सर्वांच्या अंगवळणी पडत जाऊन त्यांचे त्याज्य स्वरूप कोणालाही दिसेनासे झाले आहे. रुपयाला दोन मणांची धारण होती अशा काळांत जन्मास आलेल्या तेहतीस कोटी देव-देवतांचे सण उत्सव व कुलधर्म, आणि अठरा पगड स्वधर्मी व परधर्मी भिक्षकांचे हक्क सध्यांच्या काळी चालविण्यात आपण विनाकारण खोरीस येतों, आणि ऋण करून सण केल्याने पुण्य लाभत नाही, असे कोणाही हिंदूला वाटेनासे झाले आहे. जातिधर्म, कुलधर्म ह्यांनी निर्माण केलेल्या व अजूनही निर्माण करीत असलेल्या प्रतिषेधांनी तर एकंदर हिंदु समाजाला भंडावून सोडले आहे. त्यामुळे अनेक अडचणी सोसाव्या लागतात, आद्याची तोंडबंदी होते, आणि ढोंगीपणा व लपंडाव वाढतात, हे बहुजनसमाजाच्या मनांत सुद्धा येत नाही. महारमांगांखेरीज कोणत्याही जातीने वड, पिंपळ जाळतां कामा नये; त्यामुळे वसवा एकाला आणि सरपण दुसऱ्याला अशी स्थिति होऊन महार, मांग, मुसलमान ह्यांना फुकटफाकट सरपण मिळतें. ब्राह्मणाने स्नेह विकू नये ह्या आडकाठीमुळे घरीं खिल्लार असले तरी हा कोरडा राहतो. गिरण्यांमध्ये तयार झालेलें रंगी-बेरंगी बुंदक्यांचे पातळ अगर हव्या त्या रंगाचें चीट ह्यांना रंगीत सुताच्या लुगड्यापेक्षां विटाळ कमी धरतात; त्यामुळे गरीब साळ्याकोष्ट्यांची गिऱ्हाइकी नाहक घटते. वैदूंनी कंदुरीसाठी बकर मारले तर त्याचे कातडे विकू नये, तें विकणाराला विभूति लावून जातीबाहेर टाकतात; ह्यामुळे महार कसई ह्यांची चंगळ उडते. खुटेकर धनगरांना जाते, कंजारणीला सूप, फांसेपारध्यांना दिवा व जोडा, अशा अनेक अनेगा आहेत. शेवगांव तालुक्यांतील मढीच्या कान्होबाला तेल ( चुना) लावले म्हणजे मढी, निवडुंगें वगैरे गांवीं रानांत नांगर फिरत नाही, बाळंतिणी देखील बाजेवर निजत नाहीत. अशा प्रकारच्या प्रत्यवायांनीं
धर्माचा अर्थाअर्थी संबंध नाही अशा अनेक बाबतींत जातिजातींची व गांवांची हानि व गैरसोय केली आहे. जातिजातींच्या दोषांचे ओंगळ स्वरूप कसें दिसनासे झाले आहे ते पहा. महार, मांग, हलालखोर वगैरेंना व त्यांच्या पदरांत उष्टया पत्रावळी टाकणारांना त्याबद्दल कांहींच दिक्कत वाटत नाही. उलट उष्ट्यासाठी वरील जाती धरणे घेतात. कशानेही ढोर मरो महारमांग त्याची 'माती' खातात; कोणी दिली नाहीं तर आम्ही उपाशी मेलों अशी ओरड करतात, व ह्या हक्कासाठी थेट सरकारापर्यंत भांडतात. व्यक्तिशः खाणाराच्या आणि एकंदर जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अनाचार किती घातक आहेत बरें ? ख्रिस्ती झालेले महार मांग सुद्धा वरील अनाचार सोडीत नाहीत; व ह्या कामांत मिशनऱ्यांची सर्व विद्या व मंत्र लटपटतात, हे पाहून उमेद खचते. नानाधर्मांचे व पंथांचे शंख व सोट भिक्षुक आपले आयुष्य भंगडपणांत, फुकटखाऊपणांत घालवितात. देवाची चाकरी करण्याला फुरसत सांपडावी म्हणून आपण भिक्षा मागतों, ही त्यांची समजूत खोटी आहे. भिक्षेलाच हे लोक धर्म आणि वतन समजतात. तसेच अनेक देवदेवतांचे ब्राह्मणेतर भिक्षक म्हणतात की, आमचे उपास्यदैवत आम्हांला भिक्षेशिवाय दुसरा धंदा सुखासमाधानाने करूं देत नाहीं, व लोकही ते खरे मानतात. हा उभयपक्षी केवढा भ्रम आहे !

 धर्मविधि म्हणून ठग द्रव्यापहार व प्राणापहार करीत, हे सर्वांना माहीत आहेच. व्यभिचारी आणि गुन्हेगार पंथ व जाती ह्या जातिधर्माच्या अतिरेकाचे अत्यंत कटु फल होत. व्यभिचारी पंथांत प्रमुखत्वे वाघ्ये, मुरळ्या, हिजडे, जोगतिणी, भाविणी येतात. अल्लडपणीं जरी त्यांना खाण्यापिण्याची व लेण्यानेसण्याची चंगळ वाटून आपल्या पंथांत काही गैर दिसत नाही, तरी प्रौढपणी कित्येकांना आपल्या जिण्याचा वीट येतो. ह्या विषयाकडे सरकारचे लक्ष लागले आहे, आणि लहानपणी मुलें देवाला वाहण्याच्या घातक संप्रदायाचे निर्दलन होईल अशी खात्री वाटते. व्यभिचारी जातींत कोल्हाटी, हरदास, रामजानी, कसबी
गैरे जाती येतात. व्यभिचारी व गुन्हेगार जाती परजातीतली मुलें लहानपणी विकत घेऊन आपापल्या जातींची भरती करतात. वरिष्ठ जातींतल्या कुमारिकेचे किंवा विधवेचें वांकडे पाऊल पडले तर ह्या जाती तिचं बाळंतपण चोरून करतात, तिला चोळीबांगडी करून वाटे लावतात. आणि मूल ठेवून घेतात. व्यभिचारी जातींत जी मुलगी वाणढाळ असते तिचे लग्न करतात, आणि जी रूपवती असते तिला नायकीण करतात. सदरहु जातींतील पुरुषांचा हा केवढा स्वार्थत्याग आहे बरे? अशी बोलवा आहे की, बहुतेक फिरतें भिकार बदफैली आहे; पण त्यांचे कसब 'मांडी आड' (चोरून) चालतें. जातिधर्म व जातधंदा म्हणून व्यभिचारी जातींतल्या स्त्रिया चव्हाट्यावर पाल ठोकतात; आणि त्यांचे आईबाप चक्क सांगतात की, आमचे वतन कसब व आमची काळी आमच्या मुली. कुटुंबांत जसा एक कर्ता निघाला की त्याला सर्व कुटुंब पोसावे लागते, तसें नायकिणीला आपले आईबाप, भाऊ-भावजया वगैरे पुष्कळ आयतखाऊ गोत पोसावे लागते, व तिचा घरीदारी मोठा बडेजाव असतो. एक कोल्हाटीण म्हणाली की, मी जर धंदा सोडला तर म्हातारपणी आईबाप कोठे जातील व भावांची लग्नकार्यें कशी होतील ?' धंदा अब्रूदार असता तर या मायाळूपणाला मोल नाही. अस्पृश्य जाती व गाढवगोतेशिवाय करून दुसऱ्या कोणत्याही जातींशी वरील जातींच्या नायकिणी धंदा करतात. अशा स्थितीत त्यांना दुर्धर रोग होण्याची, तो पिढ्यानपिढ्या अंगांत मुरण्याची व लोकांत पसरण्याची किती भीति आहे हे आजमावणे कठीण नाही. व्यभिचारी जातींप्रमाणे आमच्यांत सुमारे ६०|७० गुन्हेगार जाती ठरलेल्या आहेत, आणि त्या सर्व जातधर्म व जातधंदा म्हणून हक्कानें गुन्हे करतात. इतर जातींत संपत्तीवर किंवा विद्येवर लग्ने होतात. गुन्हेगार जातींत गुन्हे करण्यांत आणि त्यांप्रीत्यर्थ नाना प्रकारच्या यातना सोसण्यांत जशी ज्याची परीक्षा उतरते, तसा तो नांवालौकिकाला चढतो व त्याप्रमाणे त्याचे लग्न लवकर किंवा उशीरां होतें. 'मनमे चंगा तो काथवटमे गंगा ?' ज्याचें मन ग्वाही देतें की मजकडे बिलकुल गुन्हेगारी नाही, त्याला तुरुंगांत टाकले तरी त्याच्या मनाला काडीइतका धक्का बसत नाही. व्यभिचारी व गुन्हेगार जाती व पंथ ह्यांतील लोकांच्या मनाची स्थिति अशीच असते. त्यांना वाटते की आपला जातधंदा देवानेच आपल्याला लावला आहे, आपले आचरण जातिधर्म, कुलधर्म व संप्रदाय ह्या सर्वांना तंतोतंत धरून आहे, आणि वाडवडिलांचा धंदा आम्ही पुढे चालविला आहे; तो आपण केला नाही तर आपण कुलांगार निपजलों असें होऊन वडिलांचे नांव बुडवून आपल्या बेचाळीस कुळ्या नरकांत घातल्याचे पाप आपणाला लागेल. शाकुन्तलमध्ये धीवर लख्ख उत्तर करतो की-'सहजं किल यद्वीनिन्दितं न खलु तत्कर्म विवर्जनीयम् ' |. जातिधर्माप्रमाणे व्यभिचार किंवा गुन्हे कांहीं दिवस केले नाहीत, आणि जर एखादें आरिष्ट ओढवलें तर आपला धर्म आपण सोडला म्हणून देव व पितर कोपले नसतील ना ? असें व्यभिचारी व गुन्हेगार जातींच्या लोकांच्या मनांत सहाजिकपणे यावयाचे. सरकार भलें कां तुरुंगांत घालीना ! शिक्षेमुळे किंवा रोग भरल्यामुळे त्यांच्या जमातींत तर त्यांची नाचक्की होत नाहीच, पण इतर समाजांतही त्यांना नाळ पडत नाही !! आपल्या घरी चाल बिघडली, किंवा चोरी झाली, सुडी जळाली किंवा जनावर मारले, तर तेवढ्यापुरती इतर जातींच्या पोळलेल्या व्यक्तींच्याच डोळ्यांना काय ती त्यांच्या दुष्कर्माबद्दल टिपे येतात. परंतु असला जातिधर्म समाजविध्वंसक आहे, असे कोणालाही चुकून वाटत नाहीं; मग त्यासाठी कष्टी होण्याचें नांव कशाला ? ह्या जातीकडून दुसऱ्याची आगळीक झाली तर तदितर शिष्टाई करतात की, 'चाललेच आहे, त्यांच्या जातींचें तें कसबच आहे, त्यांनी पोट कशा-

-----

 १ मुंबई पुणे येथे १८९३|४ साली हिंदूमुसलमानांचे दंगे झाल्यावर डोल्यांना भजावयाचे नाही असे काही हिंदूनी ठरविले. परंतु एक दोन वर्षात प्रापंचिक संकटें आली, तेव्हां डोले क्षोभले व त्यांनी आपणांला शासन केले असे त्यांच्या मनाने घेऊन ते पूर्ववत फकीर होऊ लागले, आणि डोल्यांना नवससायास करूं लागले.
वर भरावें, त्याबद्दल त्यांचे घर उन्हांत बांधून कसे चालेल?' इत्यादि. गोंडणीने चोळी घातली तर तिची जात तिला वाळीत टाकील, व इतर लोकांची ती कटाक्षविषय होईल. व्यभिचारी व गुन्हेगार जमातींच्या लोकांच्या मनाची व शरीराची व्यक्तिशः स्थिति, आणि त्यांच्या कृत्यांच्या शुभाशुभपणाबद्दल त्यांची व एकंदर समाजाची भावना ह्या दोन्ही गोष्टी त्यांचे अनाचार व दुराचार निरंतर चालू ठेवण्यास अनुकूल अशाच आहेत. व्यभिचारी व गुन्हेगार जातींचे लोक आपापल्यापरी लहानपणापासून आपल्या धंद्यासाठी योग्य असें शरीर बनविण्याची तयारी करतात. पुढे हातावर मेखा सोसतां याव्या म्हणून उचले आपल्या पोरांना नित्यनियमानें बडवतात; हल्ला परतवतां यावा म्हणून अंगावर चालून येणारावर पळतां पळतां पायांच्या बोटांनी धोंडे भिरकिवण्याची विद्या कैकाडी बाळपणींच शिकवितात; दरोडेखोरांच्या घोड्यांनादेखील चोरपाऊल असते; आणि बाजारबसव्या जाती लहानपणापासून आपल्या मुलींना नखरे, व मुंढे हिजड्यांना चाळे शिकवितात. हे लोक ज्या समाजांत वाढतात, ते त्यांचे दुष्कृत्य कुलाचार व जातिधर्म आहे, अशी त्यांची बाळपणीच समजूत घालून देतात; आणि त्यांत त्यांचे जसजसें पाऊल पुढे पडते तसतसे त्यांचे जातभाई त्यांना जास्त मान देतात. इतर समाजांच्याही नाकाची घाण मरत जाते, आणि अखेर त्यांना आपल्यांतल्या ह्या धर्मबंधूंची व त्यांबरोबर आपली अधोगति होते, असे मुळीच वाटत नाहींसें झालें आहे. उलट त्यांतले लाखों भाबडे लोक ह्या अनातिमान् जातकसबाबद्दलही सकौतुक आदर दाखवितात. एखाद्या घरचा किंवा गांवाचा किंवा जातीचा एखादा दुसरा मनुष्य दुर्वर्तनी निघणे व सबंध

-----

 १ करमाळ्याकडे मांगाचे वडगांव म्हणून एक गांव आहे अशी दंतकथा आहे की, पूर्वी तेथें एक मांग अवतारी पुरुष होऊन गेला. त्याला शेगूडचा (शिव-गड ) खंडोबा इतका प्रसन्न होता की, त्याने पैज मारुन तुळजापरची देवी लुटली आणि आगाऊ जागे करून चौकीपहाऱ्यांतून तिचा मुगुट चोरुन आणला! तो लोकांच्या नवसाला पावतो !!!
घर, गांव किंवा जात एकदिलाने धर्म ह्मणून दुराचार करणारी निघणे ह्यांत महदंतर आहे. पहिली स्थिति वैयक्तिक असून ती सुधारण्याला राजशासन किंवा समाजशासन उपयोगी पडते. परंतु दुसरी समाजधर्म बनून बिनतोड होते, व ती सुधारण्यास कशाचाही उपयोग होत नाही. बहुजनसमाजाचे अवगुणांना अवगुण समजत नाहीत, ते गुणांच्या व्यासपीठावर जाऊन बसतात. जेथें दुराचरणाला समाजाची अनुकूलता आहे, तेथें राजशासन फिक्के व लुले पडते. ही झाली ज्या त्या जातीची अवस्था. भामट्यांना चोरीच्या मालाची विल्हेवाट लावण्यास्तव सोनार सराफ पाहिजे, आणि कसबी जातींचा व्यभिचार सर्व जातींशी चालतो. अशा प्रकारे ह्या जातींच्या अनीतीत इतर जाती सतत व उघड उघड पडतात आणि त्या निर्लेप सोवळ्या न राहता त्यांतल्या हजारों व्यक्ती धूमधडाका दुराचारी निघतात. शेजारच्या वाईट जागेतली दूषित हवा जर आपल्या घरांत व पोटांत शिरते तर हरवक्त संबंध येणाऱ्या व्यभिचारी व गुन्हेगार जातींचे गुणावगुण इतर संबंधी समाजांना थोडे फार पछाडल्याशिवाय कसे राहतील ? जातिभेदाचा तट ओलांडून ते परजातीता घुसणार नाहीत, असे मानणे समाजशास्त्रज्ञांच्या अनुभवाविरुद्ध आहे. हिंदुस्थानांत गुन्हेगार जातींची लोकसंख्या अजमासे ५० लक्ष आणि भिकार जाती व पंथ ह्यांची लोकसंख्या ५२ लक्ष आहे. ह्या जमाती पराकाष्ठेच्या चलाख,कल्पक,धाडसी चिकाटीच्या व श्रमसहिष्णु आहेत. इतक्या लोकांच्या

-----

 १ 'कारकुनी' ह्या लांचेच्या समानार्थक शब्दावरून हा दुर्गुण कारकुनी पेशा बाहेर गेला नसावा असे वाटेल पण भिक्षुकीप्रमाणे तोही सर्व जातीत कसा पांगला तें पहाः दुष्काळी कामावरील फैलांवरचे मुकादम झाडून मागासलेल्या जातीतले असून त्यांत शेकडा नव्याण्णवांना सहीसुद्धां करता येत नव्हती. तरी सर्व जातींच्या मजूर बायका उभ्या रस्त्याने दिमाखनें त्यांना मेळ्यानें गाणे गात की:
   सांगून धाडतें चाट्याला । नखीचें धोतर माझ्या मुकादमाला ॥
  सांगून धाडतें कलालाला । दारूची बाटली माझ्या मुकादमाला ॥ इत्यादि.
असल्या गुणांचा समाजाला उपयोग होऊ नये ह्यापरतें ह्या जातींवर, त्यांतील लोकांवर व आमच्या एकंदर समाजावर दुर्दैव ते कोणते ओढवणार !!!

 पूर्वीच्या राजवटींत जातिजातींची व गांवकीची बंधने फार कडक असल्यामुळे आणि कायद्यांचा इतका कीस काढीत नसल्यामुळे जातिजातींच्या उपद्व्यापांवर एकंदर जनतेचा बराच सक्त दाब असे. व्यभिचारी जातींनी घरंदाज कुटुंबांतली बाई काढून नेली तर वेळेला गांवकरी सबंध जातीला ठोकून काढावयाचे, त्यांची पालें जाळावयाचे, व पुनः त्यांना गांवांत पाऊल घालूं द्यावयाचे नाहीत. 'मारक्या म्हशीच्या माथां घाव', ह्या न्यायाने गांवमुकादमानीत वहिमी दरोडेखोरांना सुळावर चढविण्यांत पुराव्याची कमतरता आड येत नसे. म्हणून सर्व गुन्हेगारांना अलोट जरब असे. गुन्हेगार व व्यभिचारी जाती पुष्कळ ठिकाणी वतनदार होत्या. दळणवळण जुजबी असल्यामुळे सर्वच समाजांत एकमेकांना एकमेकांची मुरवत असे, अपराध दडविण्यास सवड नसे, आणि गुन्ह्यांचा बोभाटा तेव्हांच होई. पूर्वी खर्चाच्या व चैनीच्या बाबीही थोड्या असत, व मादक पदार्थांची आतांप्रमाणे बंदी नसे. त्यामुळे पेंढार, बंडखोर सोडले तर गुन्हेगार जातींची भूक खाण्यापिण्याच्या किंवा थोड्याफार कपड्यांच्या व पैशाच्या नडीपलीकडे नसे. त्यामुळे बहुतेक गुन्हे पोटासाठी होत. आतां सर्वच बदलले, आणि गुन्ह्यांना व्यापारी स्वरूप आले आहे. पूर्वी महार फार झाले तर मांसासाठी, जोड्यापुरत्या कातड्यासाठी, किंवा किरकोळ अदावतीने एकाददुसरे जनावर मारीत. व्यापारानिमित्त हिंदुस्थानांत दरवर्षी सुमारे सवाकोट जनावरें मरतात, पैकी अर्धलाख मुंबई इलाख्यांत मारली जातात, आणि त्यांची किंमत पंधरा वीस लाख रुपये येते. हल्ली कातडी व हाडकें मिळून दरसाल सवा दीड लाख मण माल परदेशी जातो. बहुतेक कातडें अमेरिका व जर्मनीत जातें, आणि त्याला भावही चांगला येतो. त्यामुळे गुरे मारणे हा एक रोजगार झाला आहे, आणि हाडकाकातड्यांचे व्यापारी महारमांगांना पैसे चारून
गुरे मारवितात. खानदेशांत भिल्ल पूर्वी स्वतःपुरती दारू गाळीत, व खाण्यापिण्यापुरत्या लहानसान चोऱ्या करीत. वाणी लोक त्यांच्यामध्ये रहावयास आल्यानंतर ते मोठाले गुन्हे करूं लागले, आणि चोरीचा माल बहुतेक फुकटांत मिळून वाणी मात्र गबर झाले, व भिल्ल पूर्वीप्रमाणेच अन्नाला महाग दिसतात. हीच स्थिति सर्वत्र असणार. कांहीं व्यापाऱ्यांनी गुन्हेगार चाकरीस ठेवल्याचा बोभाटा आहे. ते गुन्ह्यांत सांपडले तर खटला चालविण्यासाठी सदर व्यापारी त्यांच्यातर्फे वकील देतात, आणि ते तुरुंगांत गेले तर त्यांच्यामागे त्यांची बायकापोरें पोसतात. आपलपोट्या, अकलवान् समाजाचा अक्कलमंद समाजाशी संबंध जडला म्हणजे अक्कलमंदाची अधिक अवनति होते, हा समाजशास्त्राचा सिद्धांत आहे. हल्लींच्या मन्वंतरांत गुन्हे छपविण्याची साधनें वाढली आहेत. नानाप्रकारच्या विलासाच्या व चैनीच्या चिजांनी बाजार फुलले आहेत, व त्या पैशानें प्राप्त होतात. दुसऱ्याचे हितानहिताचा विचार न करता पैसा पैसा करणारांची संख्या उमाप वाढत आहे, व दुराचारी जातींचा संबंध अनेक तऱ्हांंच्या सज्जनदुर्जन देशी परदेशी व्यापाऱ्यांशी आला आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला असतां सबंध जातींच्या जाती दुराचरणी ठेवणे म्हणजे न विचारतां चोराला वाट सांगत सुटणे आहे की नाही हे ज्याचे त्याने आपल्या अन्तर्यामी शोधावें.

 ज्या त्या वस्तूमध्ये व कृत्यामध्ये धर्म घुसडल्यामुळे हिंदु लोकांमध्ये धर्मभोळेपणा वाढत जाऊन हिंदु समाजाचा कोंडमारा झाला आहे,आणि धर्माच्या बाबींच्या अनेक प्रकारच्या भाराखालीं तो पार गुदमरून चेंगरून गेला

-----

 १ निजामशाहीतल्या एका वरिष्ठ गोऱ्या पोलीस अंमलदाराने असें सांगितले की, एकदा त्यांच्या स्वारीतल्या गाडीची मोठी बैलजोडी महारांनी मारली; आणि तपासाअंती जमाखर्चावरून असे कळले की, त्यागांवचे महार ज्या खाटकाची कुळे होती त्याने त्या सालांत हाडकाकातड्याची वीस हजार रुपयांची उलथापालथ केली. आपोआप मेलेली जनावरे ह्यांत कांही असतील, पण मुद्दाम मारलेलीही पुष्कळ असावींंत असा अंदेशा घेण्यास चांगलाच जागा आहे.
आहे. तेव्हां पहिल्याने त्याच्यावरील बोजे एकाकडे सारले पाहिजेत. सारासारीला बाहेरून शेज लावावयाचे म्हटले ह्मणजे ना हिंदू ना मुसलमान, ही जी वटवाघुळासारखी आमची अवस्था झाली, ती नाहींशी केली पाहिजे. तेहतीस कोटी देवांच्या भगतांनी पिरापुढे ऊद जाळण्यांत किंवा पैसा, सुपारी, नारळ, खारीक, ठेवण्यांत, ताबुदांत हैदोस घालण्यांत, दहापांच फकीर जेऊ घालण्यांत, हिजड्यांना किंवा सवागी फकिरांना दक्षिणा देण्यांत, महमदी धर्म वाढतो, किंवा एकंदर मुसलमान समाजाला मोठेसें द्रव्यसाह्य मिळते असे नाही. होत असल्यास त्यांत महमदीयांची धर्महानिच होते, असे प्रांजलपणे कबूल करावे लागेल. पण असल्या ओढाळपणानें हिंदूंचे मात्र सर्व प्रकारे नुकसान होत आहे. धर्म एका विशिष्ट लोकसमुदायासाठी केलेला नसून सबंध चराचर जगासाठी आहे, व कोणत्याही धर्मातील ग्राह्यांश कोणत्याही धर्मानुयायांनी पत्करावा. त्याप्रमाणे आमच्या दावल मलिकी हिंदूनी कांहीं पत्करला आहे काय ? त्यांनी फक्त 'पिरगोबा ! सुनेने माझ्या मुलाला मोहिनी घातली, तो जर माझ्याशी धरलेला अबोला सोडील तर लोटांगणाचे पांच गुरुवार करीन;' असला भाग पत्करला आहे. तेवढ्यापुरते हे पिरा-फकिरांना नमणार. मद्यमांसाचा नैवेद्य लागणाऱ्या आदिशक्तीला सुद्धां बकरें शुद्ध करण्यासाठी मुलान्याचा फात्या लागतो, इतकी ती पराधीन कां व्हावी ? हिंदु खाटकांना बकरें मारण्याची कोणत्या हिंदु देवाने मनाई केली आहे ? हत्या करणे पाप असेल तर मुलाना अधिकारी करणे म्हणजे उपाध्याचे हातून साप मारविण्याइतकेंच भेकड स्वार्थाचे लक्षण नव्हे काय ? आपला देव आपले मनोरथ पूर्ण करील असा भरंवसा हिंदूंना नाही. त्यांमध्ये सत्यधर्माचं अज्ञान पसरले आहे. त्याचेच फळ ही अश्रद्धा होय. तेव्हां धर्माधिकाऱ्यांनी व समाजसुधारकांनी हिंदूंना ह्या बावळट अश्रद्धेतून मुक्त करून त्यांचा स्वधर्मावर विश्वास दृढ केला पाहिजे. परधर्मावरील व्यभिचारी भक्ति गेली म्हणजे स्वधर्मावरील भक्ति अव्यभिचारी होते. असें झाले म्हणजे हिंदुधर्माचे स्वरूप तेजस्वी होऊन इस्लामीधर्माचाही डाख
निघेल आणि स्वधर्मी भिक्षकांना दक्षिणा देऊन हिंदूंना जी परधर्मीयांना खेरीज द्यावी लागते, ती वाचेल. ती वाचविण्यापेक्षा जास्त मोठा फायदा म्हटला म्हणजे रिकामटेकड्या भिक्षुकांची संख्या थोड्याने का होईना पण कमी होईल; आणि समाजहितवर्धनास आवश्यक गुण-आपलेपणा, आत्मश्रद्धा, आत्मप्रेम हे जे हिंदूतून समूळ नाहीसे झाले आहेत, ते दुसऱ्यांशी विरोध न करतां परत येतील. सारांश, परधर्मी भिक्षुकांच्या साह्यावांचून प्रत्येक धर्मानुयायाला आपली धर्मकृत्ये निःशंकपणे करतां आल्याशिवाय कोणताही समाज स्वयंपूर्ण, स्वावलंबी, स्वाधीनोपाय, व कर्तबगार होत नाही ही गोष्ट जीवीं धरून वागले पाहिजे.

 हिंदूंमध्ये समाविष्ट असून ज्या हिंदु जातींना हिंदु समाज परधर्मीयांपेक्षाही दूर धरतो, त्यांची मुक्तता करणे अति महत्त्वाचे आहे. ज्यांच्या शास्त्रांनी नरदेहाची एवढी थोरवी गायली आहे की, जीव शिव एक आहेत, 'नर करनी करे तो नरका नारायण होय,' त्याच लोकांमध्ये सुमारे अर्ध कोट लोकांनी जातिधर्म म्हणून तस्करबाजी करावी; अर्धकोट लोकांनी पंथ किंवा संप्रदाय म्हणून दारसुन्या कुत्र्याप्रमाणे गांवोगांव भीक मागत हिंडून आळसांत, व्यसनांत किंवा गुन्हे करण्यांत दिवस घालवावेत; सहा सात कोटी लोकांना अस्पृश्यतेचा डाग लागावा; आणि ह्या सर्व वर्गांच्या एकंदर सात आठ कोटी लोकांच्या जन्माचे मातेरें व्हावे, ह्यापेक्षां पढतमूर्खपणाचे दुसरें शोचनीय उदाहरण कोणते असूं शकेल ? उपयुक्त धंदे करणारांत जर सुमारें एक कोटीवर राकट हिमती व हिकमती भिकार आणि गुन्हेगार व व्यभिचारी जमाती येऊन पडल्या, तर त्यांना पोसण्यासाठी सर्व हिंदोस्तानाला सुमारे ४० कोटी रुपयांचा भूर्दंड द्यावा लागतो तो वांचेल, आणि कमीत कमी त्या पन्नास कोटी रुपये कमावतील. त्यांच्या उद्धाराने ह्याप्रमाणे देशाचे दरसाल अब्ज रुपयांचे हित होईल. हे मोठे देशकार्य होईल खरे; पण ह्या हितापेक्षा माणसांतून वाहवलेले एक कोट लोक पुनः माणसांत येऊन बसले तर त्यांचे व तदितरांचे केवढे कल्याण होईल.आणि तें सर्वांना किती श्रेयस्कर होईल !!
आजचे घटकेला धर्माचार्यांना व समाजनायकांना सर्वांत श्रेष्ठ असें पुण्यकार्य एकदिलाने करावयाचे असेल तर ते हे आहे. ते वाट पहात आहे की,व्रात्य-स्तोमाला(आर्य-बाह्यांना आर्य धर्माची दीक्षा देतांना शुद्धीकरणार्थ जो यज्ञ करीत तो.) आरंभ केव्हां होतो, आणि कोट्यवधि दिशाभूल झालेले अंधपरंपरेचे गुलाम माणुसकीत केव्हां येऊन बसतात. तरी परमेश्वराला स्मरा, आपल्या जबाबदारीला जागा, आणि कोट्यवधि माणसांचा परमेश्वराने दिलेला मनुष्यजन्म धर्माच्या नांवावर विफल व दुरुपयोगी होऊ देऊ नका. त्यांच्या घरकुल्यांनी, झोपड्यांनी व पालापालांनी जाऊन त्यांना धर्मशास्त्रांतील बोधामृत पाजा, त्यांचा आचार निषिद्ध आहे अशी त्यांची समजूत घाला, आणि त्यांना हातीं धरून सन्मार्गावर आणा. महाराष्ट्रांत संतमंडळीने (विष्णुदास उर्फ वारकरीपंथाने) निकृष्ट जाती सुधारण्याचे बरेच काम केले. रोहिदास, चोखोबाराया यांनी चांभार, महार, मांग ह्यांची दानत पुष्कळ सुधारली. स्वामी नारायण पंथ व नुकताच उदयास आलेला दादुराम धाराळा ह्यांनी गुजरातेतील कोळी वगैरे जातींतले पुष्कळ गुन्हेगार सुधारले. आर्यब्राह्म-प्रार्थनासमाज ह्यांनीही निकृष्ट जाती सुधारण्याचे काम हाती धरले आहे. पंथसंख्या न वाढवितां हे काम होईल तर ते जास्त उपकारक व टिकाऊ होईल. सुमारे सहासात कोटी लोक हिंदु आहेत, तोपर्यंत अस्पृश्य असतात, आणि तेच मुसलमान अथवा खिस्ती झाले म्हणजे स्पृश्य होतात ! ' पानी तेरा रंग कैसा तों जिसमे मिलाय वैसा. ' किंवा “माथा समर्थाचा शिक्का । धाक पडे ब्रह्मादिका ॥' असल्या शास्त्राला म्हणावे तरी काय ? रानांत हिंडले तर लाकूड मिळत नाही, आणि सोन्यासारखी माणसें शेजारीपाजारी रहात असून त्यांना असें डावलावावयाचे हे पुण्य आहे काय ? हा कलंक ह्या लोकांना आहे असें म्हणण्यापेक्षा सबंध हिंदु समाजाला आहे, असे म्हटले तरी चालेल. तर तो धुवून टाका. म्हणजे दोन धंदे जास्त करण्याला त्यांनाही मोकळीक होईल; आणि इतरांनाही दोन माणसांचे काम एकावर भागवितां येईल.
 प्रत्यवाय, देवतोत्सव,आणि जातिजातींचे वतनदार गुरु, मेहत्रे, व मागत्ये ह्यांनी हिंदु समाजाला सतावून टाकले आहे हे मागे सांगितले आहे, व प्रत्यवायांची उदाहरणेही दिली आहेत. वड्डर व गोंड ह्या जातींच्या बायकांनी चोळी घालूं नये; मांग गारोडी, फांसपारधी वगैरे जातींनी केस मुळीच काढू नयेत, असले अनेक प्रत्यवाय जातधर्म व कुलधर्म होऊन बसले आहेत. त्यांची धर्माचार्यांनी व समाजसुधारकांनी चौकशी करून, जे धर्माचें नांव बद्दू करतात, आणि ज्यांचा धर्माशी अर्थाअर्थी संबंध नाहीं असले प्रत्यवाय आचारकांडांतून हुसकून लावले पाहिजेत. तेवढ्यासाठी जातिजातींची नीट समजूतही पण घातली पाहिजे. हिंदुसमाजाचे सूक्ष्म निरीक्षण केले, तर त्याच्या मागें देवपितरांचे सणवार इतके लागले आहेत की, साधारण मध्यम स्थितींतील लोक सुद्धा बेजार झाले आहेत असें दिसेल. चैत्रांत वर्षप्रतिपदा, रामनवमी, हनुमानजयंती व पौर्णिमेचा कुलाचार; वैशाखांत अक्षयतृतीया, नृसिंहजयंती, भावुका ( पांडवांची अमावास्या ); ज्येष्ठांत दशहरा, वटसावित्री; आषाढांत दोन एकादशा, द्वादशा, व्यासपूजा, दिव्याची अमावास्या; श्रावणांत सोमवार महादेवाचा, मंगळ-शुक्रवार देवीचे, बुधवार-गुरुवार बुध-बृहस्पतीचे, शनिवार नागनरसोबाचा, आदितवार सूर्यनारायणाचा, इत्यादि वांटणी होऊन शिवाय नागपंचमी, सक्रोबा, नारळीपौर्णिमा, गोकुळअष्टमी, पिठोरी अमावास्या-पाळा; भाद्रपदात हरतालिका, गौरी, गणपती, ऋषिपंचमी, वामनद्वादशी, अनंतव्रत, महालय; अश्विनांत नवरात्र, दसरा, कोजागिरी, दिवाळी; कार्तिकांत दिवाळी, दोन एकादशा, द्वादशा, तुलशीविवाह, वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरी पौर्णिमा; मार्गशीर्षांत चंपाषष्ठीचें नवरात्र, नागदिवें, दत्तजयंती, पौषांत संक्रांति; माघांत वसंतपंचमी, रथसप्तमी, पौर्णिमेचा कुलाचार, महाशिवरात्र; फाल्गुनांत शिमगा, तखतराव, खेरीज मोहरम नाताळ असे सणच बोकाळले आहेत. ह्या सामान्य सणांखेरीज अनेक पंथांचे व गांवांचे अनेक विशेष सण, यात्रा, उरुस व उत्सव आहेत. सण कुलधर्म, व जातिजातींचे आणि गांवोगांवचे गुरु मागत्ये भिक्षुक ह्यांची संभावना,
यांचा इतका सुळसुळाट झाला आहे की, शेजाऱ्यापाजाऱ्यांंत लघुत्व न येतां आला दिवस कसा साजरा करावा याची घर चालविणाराला पंचाईत पडते, व घरच्यादारच्यांपैकी कोणाला कांहीं कमी पडलें कीं टोले ठोसरे खावे लागतात. चारचौघांत वागावयाचे असते, तेव्हां शेजाऱ्यापाजाऱ्यांंच्या घरी सण झाला आणि आपण न केला तर आपल्या पोराबाळांना वाईट वाटतें. सबब सालांतून नित्यनैमित्तिक म्हणून शेपाऊणशे सण छातीचा कोट करून करणे भाग पडतें. शिमग्या-दिवाळीसारखे सलग सण पुरवले; पण एकट दुकट सणाचा खर्च जास्त येतो, आणि दर सणाला महार मांग हक्कदार ह्यांचा सशेमिरा कांही केल्या चुकत नाही. तरी समाजाच्या सध्यांच्या निष्कांचन स्थितींत हे इतके सण, उत्सव त्याला झेंपण्यासारखे आहेत कीं नाहीत, हे धर्माचार्यांनी ठरवून त्यांची संख्या हटवावी. जर सणांची व उत्सवांची संख्या हटविली तर पुष्कळांचा उपासमार व तानापाजणी वांचेल. तसेच ‘ एकमेवाद्वितीयं’ ची उच्चतम ध्वजा जगभर फडकविणाऱ्यांंच्या शिष्यांनीं मरेआईच्या पूजेसाठीं पांच-पांचशे रुपयांना खोरीस यावें, ख्रिस्ती मांगांकडून तिला तुष्ट करण्याची मोघाशा धरावी, ग्रहण अमावास्येला महारांमांगांना दाने करावीत, वासुदेव, पांगूळ, तिरमल, वाघ्ये, मुरळ्या, पोतराज,हिजडे, गोंधळी, तेंलंगीकोळी, इत्यादिकांना देवदेवतांचे आडत्ये किंवा लाडके समजावें; हें शोभतें काय ह्याचाही विचार झाला पाहिजे. श्रेष्ठांच्याठायीं ईश्वरी अंश आहे असें भगवंतानें सांगितले आहे. परंतु हिजडे, रक्तदोषाचे रोगी, देवीचे भक्त म्हणून,आणि असेच इतर विकल, कृपण, मेंद कोण्याना कोण्या देवाचे, पिराचे भक्त म्हणून, हक्कानें दक्षिणा मागतांना पाहिले म्हणजे असें मनांत येतें की, ज्याप्रमाणे बहुजनसमाजामध्ये देवपूजनाच्या पंक्तीला पिशाचपूजन येऊन बसले, त्याप्रमाणे दात्यागृही त्याच्या अज्ञानानें विकलानुकंपेचें विकलाराधन होऊन तें श्रेष्ठाराधनाच्या पंक्तीला येऊन बसलें; आणि विद्वान् साधु, संत तसे विकल, मंद सुद्धां हक्कानें दान मागते झाले. असो. हिंदुधर्माचीं तत्वें इतकीं उदात्त असतांना हजारों देव आणि
त्याचे उत्सव व योग्यायोग्य भगत ह्यांपायीं समाज किती दिवस बुडूं द्यावयाचा ? हे बंड मोडणें कालावधीचे काम आहे हे कबूल आहे. पण ते मोडण्याच्या उद्योगाला धर्माचार्य लागले आहेत असे दिसत नाही. आपापल्या कळपांच्या कमी-अधिक भाराबद्दल ख्रिस्ती मिशनरी जसे दक्ष असतात, त्याप्रमाणे आमचे धर्माचार्य चालत्याबोलत्या देवांची देवळे म्हणजे रंजल्या-गांजलेल्यांच्या झोपड्या-पाले पाहतील, आणि त्यांच्या धार्मिक उन्नतीचा प्रयत्न करतील तर काय एक होणार नाही ? वृथा जात्याभिमानाला न पेटतां जर जातिजातींचे मेहत्रे, गुरु, मागत्ये, पाटील चौगुले ह्यांनी 'असून अडथळा आणि नसून खोळंबा' व 'शेळीचें शेपूट अब्रूही झांकीना आणि माशाही वारीना' अशाप्रकारचे वतनी मानपान आणि हक्क सोडले तर रूढीचें फाजील बंड मोडेल, किरकोळ कामांत वायफट वेळ जाणार नाही, त्यांचा सांपत्तिक फायदा होईल, आणि जातिजातींचा पुष्कळ कामांतला बेबनाव नाहीसा होईल.

 कामाला बाट नाहीं, ह्या तत्त्वाचे साम्राज्य झाले पाहिजे. त्याशिवाय हा धंदा सोंवळा आणि तो धंदा ओंवळा, हे काम सिद्ध आणि तें निषिद्ध असले भेद नाहीसे होत नाहीत; आणि काम व कामकरी ह्यांची फुकटाफुकट अडवणूक व बुडवणूक होतां राहत नाहीं, ब्राह्मण डॉक्टर गुरामाणसांचे कातडें शिवतो, प्रेत फाडतो, पण तो बाटत नाही. मग मेलेलें जनावर महारांखेरीज इतरांनी पुरणे धर्मबाह्य कां मानावें ? तबला मढविल्याने जर कोणी बाटत नाही, तर कुणब्यानें मोटेला टांचा कां मारूं नये? अघोर पातकें व गुन्हे करण्याने जात बाटत नाही, आणि पोटासाठी हलके किंवा गदळ काम इमाने इतबारे करण्याने ती का बाटावी? असली चमत्कारिक स्थिति बदलली पाहिजे. हे जर पटत असेल तर धंद्यांतील सोवळ्याओंवळ्याचे हास्यास्पद प्रकार ताबडतोब बंद झाले पाहिजेत. त्याशिवाय कारखाने एकतंत्री चालणार नाहीत, आणि सर्वांना भरपूर काम लागून हुन्नर ऊर्जित दशेला येणार नाहीत. अमुक धंदा पत्करला तर अमुक आचरण करणे हा धर्म किंवा ईश्वरी
नियम असूं शकेल; जसें, क्षत्रियाचा धंदा पतकरला तर रणांत बापाची देखील भीड धरूं नये. परंतु वैयक्तिक गुणांचा उपयोग न करतां अमुक कुडीत जन्मास आला म्हणून अमुक धंदा केला पाहिजे, अशी ईश्वरा इच्छा नसावी. कारण कोणताही देव असे सांगणार नाही की, मांगाच्या पोरांनी चोऱ्या कराव्यात, अगर कोल्हाटणीने व्यभिचार करावा. आईबापांचा प्रामाणिक धंदा करण्यांत आईबापांचा व मुलांचा पुष्कळ फायदा असतो, म्हणून पिढीजाद धंदे व जातधंदे आस्तित्वात आले; आणि त्यांवर मारुतीच्या शेंदराप्रमाणे धर्माचे कवच चढले. परंतु पिढीजाद धंदा मुलाला साध्य होण्यासारखा किंवा किफायतशीर नसला तर त्याला दुसरा धंदा पाहतां येऊं नये हा शुद्ध जुलूम आहे. तसेच, नैसर्गिक किंवा संपादित गुणांमुळे एखाद्याने एखादा धंदा धरणे किंवा सोडणे निराळे, आणि अमुक आईबापांच्या पोटी जन्मास आलों म्हणून त्यांचा धंदा देवाने आपल्याला लावला, दुसरा धंदा आपल्याच्याने होणार नाही, अशा धर्मोपदेशावर वडिलोपार्जित धंद्याहून इतर धंद्यासबंधाने शारीरिक, मानसिक व नैतिक अपात्रता व्यर्थ कबूल करणें निराळे. तेव्हां व्यवसायाला जातधर्माचे बंधन नको. ज्या त्या व्यक्तीला आपापल्या शारीरिक, मानसिक, आणि सांपत्तिक अनुकूलतेप्रमाणे योग्य तो धंदा करण्याची पूर्ण मुभा पाहिजे. त्याशिवाय धंद्यांमध्ये हल्ली जी कामकऱ्यांची विषम वांटणी दिसून येते ती नाहीशी होणार नाही. सुधारणेची सर्व मदार व्यक्तिस्वातंत्र्यावर असते. ते ज्या समाजांत नाही त्याच्या चलनवलनाचे क्षेत्र आंत आंत येत जाऊन अखेर तो नामशेष होतो हे प्रमाणसिद्ध आहे. व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे समाजहितवर्धनास जरूर तितकी निर्बंधने पाळून वागण्याची मोकळीक. असो. ह्याप्रमाणे जात आणि धंदा ह्यांची फारकत झाली म्हणजे जातिधर्माचं स्तोम पुष्कळ कमी होईल, बऱ्हाणी जातींना भरपूर उद्योग भेटेल आणि धर्माच्या नांवावर चालत असलेले अनेक अनाचार व दुराचार ह्यांनी बंदीत टाकलेल्या अनेक अज्ञजनांची मुक्तता होईल.

 सध्यां जातिपरिषदा व संमेलनें भरत आहेत. त्यांनी मनावर घेतल्यास वर सुचविलेल्या सुधारणांपैकी पुष्कळ त्यांना धर्माचार्यांच्या तोंडाकडे न पाहतां करता येण्यासारख्या आहेत. आपापल्या जातीचे प्रत्यवाय,धर्मभोळेपणा व सांपत्तिक स्थिति त्यांना लवकर उमजेल, आणि त्यांत सारासार करण्याला कोठे जागा आहे हेही त्यांना अल्पायासाने ठरवितां येईल. तेव्हां जातिसंस्थांचा असा उपयोग करून घेतला तर जातिधर्म व त्याचा परिवार वतन ह्यांना हटविण्याचा पुढील मार्ग पुष्कळ सोपा होईल. जात आणि गांव हे भूलोकचे तुटक भाग राहिले नसून त्यांचा सर्वांग संबंध सबंध दुनयेशी आला आहे, आणि वैश्ययुगाला केव्हांच आरंभ झाला आहे. ह्या युगाची संक्रांत हरिणवेगानें मोघम व उधारी वतनाकडून 'रोख भाई ठोक' वेतनाकडे दौडत आहे. वतनांची व धंद्यांची गल्लत मुसलमानी अंमलांत थोडी झाली, पण ती तत्त्वतः न होतां घरांत वतन येते किंवा घरांतून वतन जातें, ह्या स्वार्थी दृष्टीने झाली. जातधंदे व वतनदारी ह्या दोन्ही संस्था समाजाला कूपमंडुक बनवितात आणि त्यांतील व्यक्तींचें पौरुष व दळणवळण कमी करून त्याची वाढ खुंटवितात, हे मुसलमान राज्यकर्त्यांनी ओळखलेंसें दिसत नाही. सदर राज्यांत पूर्वीची वतनें राहिली इतकेच नव्हे तर त्यांमध्ये महमदीयांच्या धार्मिक व सामाजिक समजुतीनी मुलाना, हिजडे, मुंढे वगैरेसारख्या वतनांची आणखी भर घातली. सुधारणेचा ओघ मुग्ध जात-धंद्याकडून खडखडीत करारमदाराकडे धोधो वाहत आहे, हे महातत्त्व इंग्रजांच्या मनांत पूर्णपणे बिंबलें आहे, आणि त्यांच्या नेहमीच्या सावधपणाने त्यांनी धंद्यांची गल्लत आरंभून धिम्मेपणाने चालविली आहे. समाजाची अनुकूलता असती तर हे काम बरेंच तडीस गेले असते. तेव्हां जातधंदे ऊर्फ जातिधर्म व वतन ह्यांचे दोष ज्यांना समजले असतील त्यांनी आपल्या देशबांधवांची समजूत घालून सरकार करीत असलेल्या गल्लतीस विरोध करू नये. ह्या सामाजिक संस्था जगाच्या आरंभापासून अखेरपर्यंत जशाच्या तशा कशा राहतील! त्या कांही सनातन मोक्षधर्म नव्हत. देशकालानुरूप त्यांत बदल नको का व्हावयाला ? सडली, भाकरी कां करपली आणि घोडा कां आडला ह्या तिन्ही प्रश्नाचे उत्तर एक आह. फिरविणे झाले नाही म्हणून. समाजालाही हाच नियम लागतो.

----------