गांव-गाडा/दुकानदारी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchदुकानदारी.
----------

 पूर्वीच्या अमदानीत राजे लोक कलासंपन्न लोकांना राजधानीत खुषीने किंवा जबरदस्तीने नेत, त्यामुळे कौशल्याची कामें राजधान्यांत विशेष नजरेस पडत. राजधान्यांप्रमाणे मोठाल्या यात्रांच्या ठिकाणीही लोक पुष्कळ जमत आणि तेथें मालाची देवघेव फार चाले व अजूनही चालते. आपल्या जग-विख्यात कवींनी आपली नाटकें यात्राप्रसंगांनी प्रथम लोकांपुढे मांडली ही गोष्ट सर्वश्रुत आहे. इंग्रजी अमलापासून मनु पालटला, आणि हुन्नरी लोकांना राजधानीत जाऊन राहण्याची तसदी नाही. ज्याचें, जेथे पोट भरेल तेथे त्याने खुशाल जावें आणि सुखाने नांदावे, अशी सर्वांस मुभा आहे. हिचा परिणाम असा झाला आहे की, व्यापाराच्या सोयीमुळे जी शहरें पुढे आली आहेत, त्यांत हुन्नरी लोक राजधान्यांपेक्षांही अधिक राहतात, आणि मोठ्या यात्रांपेक्षा देखील तेथें माल अधिक उठतो. जरी पूर्वीपेक्षा प्रवासाची साधने व वित्ताची सुरक्षितता वाढली आहे तरी खेड्यांत उदमी व कसबी लोकांची वस्ती जुजबी, गिऱ्हाईक कमी, व चढाओढ पूज्य अशी स्थिति असल्यामुळे त्यांमध्ये दुकानदारी यथातथाच आहे. म्हणून खेड्याचें गिऱ्हाईक रोजच्या बाजारासाठी आसपासच्या पेठेत किंवा शहरांत जातें, यात्रांच्या दिवसांत यात्रांला लोटते, आणि थांबण्याला सवड नसल्यास गांवच्या उदम्यांवरही गरज भागवून नेते. ह्यांशिवाय हाळीपाळी करणारे किरकोळ दुकानदार आपला माल खेड्यांनी नेऊन विकतात. खेड्यांत नाण्याची हलकीशी गरज भागते. मोठी गरज वारण्यासारखे सराफ खेड्यांत दुर्मिळ. ते कसब्यांत, पेठेत किंवा शहरांत राहतात, आणि तेथून आपल्या वळणांतल्या गांवांना कर्ज पुरवितात. ह्याप्रमाणे खेड्यांतली दुकानदारी जागेवर, यात्रांत व आसपासच्या कसब्यांत, पेठेत किंवा शहरांत चालते. शेतीचा हंगाम सोडून बाकी वर्षभर मंदीच असते. नाही म्हणावयाला
लग्रसराईत किंवा सणावारांला खेड्यांतल्या लोकांची दुकानांवर बरीच गदीँ नजरेस पडते.

 सालउधारी आणि दामदुकाळ हीं खेड्यांतील दुकानदारीचीं प्रधान अंगे आहेत.खेड्यात कमकसर सर्व वस्ती कुणबी आणि त्याकडून शेतमाल पावणारे ह्यांची असते. रोख पदरमोड करणारांची वस्ती इतकी जुजबी असते कीं, ती जमेंत धरण्यासारखी नाहीं. कुणबी व त्यावर जीव धरून राहणारे कारूनारू आणि फिरस्ते ह्यांचा हात उभ्या सालांत एकदां म्हणजे खळवटीला काय तो चालतो. खासगी नोकरींत महिन्यापेक्षां साल बांधून देण्याचा जास्त देशरिवाज आहे. खेड्यात महिनदार नोकर फार कमी. तथापि मजुरीचे दर वाढल्यापासून आतांशा मात्र रोजंदार होण्याकडे मुजुरांची जास्त प्रवृत्ति दिसून येते, आणि ती विशेषतः शेतकऱ्यांना नडते. पूर्वीच्या राज्यांत इनामदार, वतनदार ह्यांच्या नेमणुका वर्षीतून एकदाच खर्ची पडत, आणि इंग्रजीत सुद्धां त्या सालांतून एकदांच खचीं घालतात. मात्र २५ रुपयांवरील पाटीलकुलकर्ण्याची पोटगी सहामाही आदा होते. ह्याचा परिणाम असा झाला आहे कीं, वर्षभर वाण्यानें वाणसौदा, चाटयानें कापड, सावकाराने खावटी किंवा पैसा पुरवावा आणि गांवकऱ्यांनीं सालाअखेर खातें चुकवावें, असा धारा जो पडून गेला तो अजूनही चालू आहे. स्वराज्यांतील नेमणुकांचा बहुतेक भाग ऐनजिनसी मिळत असल्या मुळे, आणि कुणबी, कारूनारू, व फिरस्ते ह्यांचें नाणें बोलून चालून दाणे असल्यामुळे ह्या उधारीची बहुतेक फेड ऐनजिनसी ही असे, व अजूनही तशीच होते. सबब नाण्याची उलथापालथ आमच्याकडे कमी होऊन दाम-दुष्काळ सुरू झाला. तो इतका कीं, स्वराज्यांत जो कमाविसदार हिशोबीयेण्यापेक्षा जास्त वसूल पाठवी, त्याला दरबार शेंकडा दोन टक्के मनेोती व सालीना बारा टक्के व्याज मजुरा देई. धर्मकृत्यांत सुद्धां अनेक धान्यें, हळद, खारका, नारळ सुपारी, फळे, वस्त्र, जोडा, काठी, गाईपासून हत्तीपर्यंत जनावरें वगैरेंच्या दानाचें प्रमाण
हिरण्यापेक्षा फार अधिक आहे. रोकड नाण्याची किंमत कोठल्या कोठे जाऊन बसली हे चार आण्यांत गोप्रदान होते- म्हणजे प्राचीन काळी रोख पावलीपेक्षां गाय मिळणे सोपें होतें-ह्या एका गोष्टीवरून सिद्ध होते. मोठ्या शास्त्रीपंडितांच्या घरांत वेळेला शालजोड्या निघत, व इनामदाराच्या घरांत सोनें जडजवाहीर निघे; पण रोजच्या व्यवहारापुरती सुद्धां रोकड निघण्याची मारामार पडे. शेतमाल झाला किंवा कोणताही विकण्याजोगा जिन्नस हाती आला, तर तो विकून त्याची रोकड करून ठेवू आणि रोखीने प्रपंच चालवू असे कोणीही मनांत वागविलें नाही. अर्थात् रोकड ही एक अनावर शक्ति होऊन बसली, आणि ज्याचेजवळ रोकड त्याला नुसता मनमानेल तितका नफा मिळू लागला इतकेच नव्हे तर त्याचा गांवावर मोठा अंमल गाजू लागला. सरकारला तर लोक मायबाप समजतातच. पण त्याच्या खालोखाल दुकानदारांनाही मायबाप समजू लागले; आणि त्याची अशी दृढ भावना झाली की धान्य झाल्यावर सरकारने किंवा दुकानदारांनी त्यांतून हवें तितकें न्यावें, मात्र आमचा प्रपंच खंडूं देऊं नये, आणि आम्हांला उपाशी मरण्याची पाळी आणू नये. अशा रीतीनें दुकानदार आणि गिऱ्हाईक ह्यांमध्ये सेव्यसेवक भाव निर्माण झाला. सावकारांशी भांडतांना पुष्कळ कुणबी त्याला विचारतात की, 'शेत पिकलें नाहीं,तुला दाणे मागितले तेव्हां तूं चिमुटभर तरी दाणे दिलेस का ? आणि आतां आला तीन टोल्यांचे चिठोरें ( रोखा) घेऊन पैसा मागावयाला किंवा फिर्याद करावयाला!' दुष्काळांत दुकानदार गल्लाचारा परगांवीं विक्रीला रवाना करूं लागले म्हणजे गांवकरी त्यांना आडवे होतात, आणि म्हणतात की, 'आम्हांला उपाशी मारतां काय?' उधारी आणि नाण्यांचा अभाव ह्यांमुळे खेड्यांतले दुकानदार अत्यंत स्वार्थी व काढू, आणि गिऱ्हाईक आशाळू व परावलंबी होऊन 'देरे वाण्या आणि खारे प्राण्या' अशी सामान्य दैनावस्था फार दिवसांपासून प्राप्त झाली आहे.

 मृगसाल हे कुणबिकीचें साल होय. बरसात लागली म्हणजे शेतीचा
हंगाम सुरू होतो. सुसमृद्ध शेतकऱ्यांनासुद्धां ज्येष्ठ, आषाढ, श्रावण हे महिने विवंचनेत जातात. कुणब्यांमध्ये “आखाडी” हा दुष्काळाला प्रतिशब्द आहे. 'सोळा वर्षांपूर्वी पहिली आखाडी पडली तेव्हां मी खडीवर गेलों ' असें गांवढेकरी बोलतात. ह्यावरून आषाढाचा महिना कुणब्यांना नेहमी जाचत असावा, असें अनुमान करण्यास हरकत नाही. जवळ दाणा चारा व रगदार बैल असले तर बरें, नाही तर सर्वच चिंता. ह्यावेळी कुणबी बहुधा खावटीसाठी वाढीने धान्य आणतात, आणि दुकानदार जुनें किडलें धान्य त्यांच्या माथीं मारून रासमाथ्याला एकदाणीं नवें धान्य दिढीनें क्वचित् दुणीने परत घेतात. ज्यांच्याजवळ वैरण व बैल नसतात, ते कमीत कमी दोहोत्रा व्याजाने कर्ज काढून बैलवैरण घेतात. कर्ज मिळण्याइतकी पत नसली किंवा कर्ज न काढतां निभण्यासारखे असले तर ते दुसऱ्या कुणब्यांशी 'खांदोडी' करतात. त्यायोगाने त्यांला बैल उसनवार मिळून त्याबद्दल बैलांच्या मालकाला धान्य, पैसे किंवा आपले बैल परत उसनवार द्यावे लागतात. अशा रीतीने कित्येक कुणबी जमिनींना पाळी-गोपाळी घालतात. खांदोड करण्याला ऐपत नसली तर ते "इरजिकी" ने पाळी घालतात, पेरतात व काढणी-मळणी करतात. पाळी, पेर, काढणी, मळणीला जे कुणबी मदत येतात त्यांना सकाळी न्याहारी, दुपारी जेवण,व संध्याकाळचे मोठे जेवण द्यावे लागते. अशा प्रकारच्या कामाला व त्याच्या ह्या अन्नमय मोबदल्याला इरजिक म्हणतात. महार, मांग वगैरे इरजिकीला बोलावीत नाहीत, कारण ते आपल्याबरोबर आपली मुलेंमाणसें जेवणाला आणतात आणि अन्नही मागून व चोरून नेतात, त्यामुळे निपूर येण्याची भीति असते. इरजिकेचे वेळी मांग डफ वाजवीत रहातो, आणि कामकरी “शाबासरे वाघा भलारे दादा" हे कडवें उच्च स्वरानें गातात. असो. जमीन तयार झाल्यावर दुसरी काळजी बियाची. जातिवंत बी धरून ठेवणारे कुणबी बहुतेक नामशेष झाले आहेत. तरी असेही थोडे आढळतात की, जे अर्धपोटी राहतील पण बी जतन करतील. असल्या कुणब्यांचा निर्वाह सर्वस्वी शेतीवर असतो व
ते शेत टाकून उद्योगधंद्यासाठी गांव सोडून दुसरीकडे जात नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांना बी विकत आणावे लागते. ते ते कुणब्यांजवळून अगर वाण्यांजवळून आणतात. कुणब्यांजवळचे बी असले तर ते एकदाणी तरी मिळते. वाण्याजवळचे बी भेसळीचे असते. बी अर्थातच धान्यापेक्षा दुप्पट तिप्पट क्वचित् चौप्पटही महाग मिळते. बी रोखीने किंवा दुणीने विकतात. पीक तयार होतें न होते तोंच पट्टीचा हप्ता येऊन धडकतो, आणि व्यापारीही आपलें देणे वसूल करण्यासाठी व धान्याचा सट्टा करण्यासाठी टपलेले असतात. अनेक युरोपियन व्यापारीमंडळेसुद्धा शेतकऱ्यांना आगाऊ पैसे देऊन कपाशी-गळितासारखें अमुकच पीक करावयाला लावतात, व उभी पिकें खंडून घेतात. शेतकरी नडलेले व निरक्षर असतात. त्यांना बाजारभाव माहीत नसतो. वजनामापांची गुंतागुंत उकलणे त्यांच्याच काय पण शिकल्यासंवरल्यांच्याही आवाक्याबाहेर असते. शिवाय ज्यांना माल विकावयाचा, त्यांचा विसार त्यांनी घेतलेला असतो किंवा त्यांच्याशी वर्षभर देवघेव करावयाची असते. व्यापारी व त्यांचे दलाल नोकर अति स्वार्थी, व्यवहारदक्ष, व रंग दिसेल त्याप्रमाणे वागण्यांत तरबेज असल्यामुळे नुसत्या भावांत शेतकऱ्यांचा कमीत कमी शेकडा २५ तोटा होतो. ह्याखेरीज हिशेबांत, वजनामापांत, वर्ताळ्यांत, व्याजांत, कसरींत, मनोतींत, भोळ्यांत आणि नोकरदलालांच्या बहालीबक्षिशीत कुणबी पुष्कळ खराबीला येतो तें वेगळेच. मूळ ठिकाणावर हे खेडवळ वजनामापांत चकतातच; परंतु जेव्हां मोठ्या व्यापारी कंपन्या रेल्वेवर माल चढविण्याची बोली त्यांशी करतात, तेव्हां त्यांच्या फसवणुकीला व नागवणुकीला पारावार नसतो. कारण त्यांला रेल्वेच्या कांट्यावरील वजन कळत नसते, आणि स्टेशनावर हुंडेकऱ्यापासन तो बहुतेक सर्व रेल्वेनोकर एकाचे एक असतात. रेल्वेवर कशी हुल्लड चालते याचे एक उदाहरण पुरे होईल. तें असें:-कार्तिक महिन्यापासून शेवंतीच्या फुलांचा बहर असतो. त्यांना पुणे-मुंबईस चांगला भाव येतो, म्हणून धोंड मनमाड रेल्वेच्या शेजारच्या गांवांच्या मळ्यांत लोक
शेवंती लावू लागले. काहींना स्टेशनच्या फसकींत इतका चट्टा बसूं लागला की, अखेर त्यांना ती मोडावी लागली. साऱ्याच्या हप्त्यांच्या वेळी व त्यांचे मागून होणाऱ्या रासमाथ्यावर धान्य स्वस्त मिळतें; आणि एकदां कां दाणा वाण्याच्या घरी गेला म्हणजे तो सोयीवार मिळत नाही, हा अनुभव आबालवृद्धांस आहे. धान्य वाण्याच्या घरी थांबते तर कदाचित आतांइतकें महाग झाले नसते. हंगामावर गांवचा शेतमाल ( दाणा, चारा, भाजीपाला ) शहर पहातो, आणि टंचाईचे वेळी तोच पुनः शहरांतून खेड्यांत आणावा लागतो; ह्यामुळे व्यापाऱ्यांचा नफा व वहातूक ह्यांचा दुहेरी बोजा हातावर पोट असणाऱ्या गांवढेकऱ्यांवर पडतो. पूर्वी जेथला माल तेथेच ठरे, व लोकांच्या गरजा साध्या व अल्प असत; तेव्हां खेड्यांत पोटापाण्याची ददात म्हणून कशी ती ठाऊक नव्हती. १८९६ चे दुष्काळापूर्वी दाणा चारा, तेल, तूप, गूळ वगैरे जिनसा खेड्यांत स्वस्त्या आणि शहरांत महाग मिळत. तें गाडें आतां फिरलें व ह्या जिनसा खेड्यांतल्या गिऱ्हाइकाला सदैव महाग मिळतात, असा खडतर अनुभव येऊ लागला आहे; आणि खेड्यांतली राहणी शहरांपेक्षां गैरसोयीचीच नव्हे तर महागही होऊन बसली आहे.

 ही झाली शेतमालाची ठोक विल्हेवाट. शेतमाल हे बहुतेक सर्व गांवढेकऱ्यांचें व विशेषतः कुणब्यांचे मुख्य नाणे असते. म्हणून घे पदरांत शेतमाल, आणि आण लागेल ती जिन्नस, असा बाराही मास त्यांचा व्यवहार चालतो. कुणब्यांचे राहणें गांवांत फारसें पडत नसल्यामुळे बाजार बहुधा कुणबिणी करतात, आणि ह्या कामांत कुणबिणीचे अनुकरण तिच्या ब्राह्मणेतर भगिनींनी केले आहे. अनेक वेळां असें दिसून येते की कारभाऱ्याला नेसावयाला धोतर घ्यावयाचे असते, पण दुकानांत त्याच्यापेक्षा कारभारीणच हडसून खडसून बोलते. वरिष्ठ म्हणविणाऱ्या जातींत बायकांना दारचे वारें माहीत नसल्यामुळे वैधव्यदशेत जशी त्यांची बुडवणूक होते आणि मध्यस्थांची पोळी पिकते, तशी मागासलेल्या जातींच्या बायकांची स्थिति होत नाही. पूर्वीची समाजबंधनें तुटलेल्या
हल्लीच्या काळांत बायका जाणत्या असणे किती अवश्य आहे, हे मागासलेल्या जातींच्या उदाहरणावरून कोणाच्याही लक्षात येईल. असो. शेतें उभी आहेत तेव्हांपासून तो खळे उलगडीपर्यंत गांवीं दुकानें असली, तरी हाळकऱ्यांची सारखी पायपीट चाललेली असते. ते बहुधा वाणसौदा, तेल, मीठ, कुंकू, दारशिणा, बांगड्या, पोत, सुईदोरा, मिठाई, कापड, शिवलेले कपडे, भांडीकुंडी घेऊन गांवोगांव फिरतात. हाळकरी बहुधा मारवाडी, लिंगायत, तेली, शिंपी, कासार, कोमटी, मुसलमान वगैरे जातींचे असतात. शेतांत किंवा गांवांत धान्य घालून बायका त्यांजवळून माल खरेदी करतात, आणि धान्याच्या व विकत घेतलेल्या मालाच्या भावांच्या त्यांच्या अज्ञानामुळे, चोरमाप-चोरकाट्यामुळे, हाळकरी चांगलाच ताव मारतात. गांवच्या दुकानांतही तोच धंदा चालतो. पुष्कळ वेळां असें पाहण्यांत येते की, गिऱ्हाईक पदरांत अंदाजाने धान्य आणतें, उदमी तें आपल्या मापाने मोजतो आणि हिशेबापेक्षां अदपाव-पावशेरापर्यंतही वर धान्य भरलें, तर तो तें तसेंच घेतो; किंवा त्याबद्दल एखादी खारीक, सुपारी, खोबऱ्याची वाटी अगर एकदोन विड्यांची तंबाखू देतो. डांगाणांत पहावें तो खुशाल मापी अच्छेर हिरड्यांना अच्छेर नागली घेऊन गिऱ्हाईक आपल्या घरी जाते. रानपसारा आहे तोंच घिसाडी, पाथरट, कंजारी, कैकाडी, वगैरे भटकणाऱ्या हुन्नरी जाति आपापला माल खपवितात. ह्या जाति बारा गांवचे पाणी प्यालेल्या असल्यामुळे त्या कुणब्यांना चांगलेच फांदाडतात, व त्या वाटसरू असल्यामुळे त्यांना माल काढण्याला दम नसतो. आयतखाऊ जातींना शेतमाल फुकट अनायासाने मिळतो. त्या तो अवाचे सवा स्वस्त देतात; आणि तोच जर चोरून आणलेला असला तर मग दुकानदाराचे दुणावलेंच समजा. दुकानदार किंवा हाळकरी मागेल त्या भावानें तो त्याला ह्या सर्व लोकांकडून मिळतो, आणि हा पडीचा भाव कुणब्यांना जाचतो.

 गांवोगांव आठवडाबाजार भरत असतात, आणि त्यांत बराच माल उठतो. आठवडाबाजारांत हाळकरी आणि आसपासच्या गांवचे व्यापारी
व शेतकरी दुकानें मांडतात. त्यामुळे थोडीशी चढाओड व पडताळा पाहण्याला जागा असते, आणि एरवींपेक्षां माल व भावही बरा असतो. तरी पण तो विशेष चांगला असतो किंवा वजनेंमापें खरी असतांत असें बहुधा घडत नाही. गिऱ्हाईक आसपासच्या खेड्यांहून येते. त्याच्या अज्ञानाचा व धांदलीचा घेववेल तितका फायदा घेण्यास दुकानदार कमी करीत नाहीत. बाजाराकडे मुकाट्याने थोडा वेळ टक लावली तर असे दिसून येईल की, "धिटाई खाई मिठाई आणि गरीब खाई लाथा," हा न्याय जसा आमच्या एकंदर व्यवहारास लागू पडतो, तसा बाजारच्या दुकानदार-गिऱ्हाइकांनाही लागू पडतो. कुणबी रानगडी पडल्यामुळे चौचाल नसतो, व त्याला मागते पुष्कळ असल्यामुळे त्याचा स्वभाव भिडस्त बनतो. तो स्वतःचा माल बाजारांत मांडतो, तेव्हां त्याच्याशी गिऱ्हाईक धिटाई करतें, व इतरांइतके दाम त्याचे पदरांत पडत नाहीत. म्हणून पुष्कळदां असें होतें की, कुणबी बाजारांत दुकान न लावतां आपला माल घाउकीनं दुसऱ्याला घालतात, आणि तो त्याच बाजारांत त्यांच्या देखत त्यावर जास्त नफा मिळवितो. विड्याची पाने, भुईमुगाच्या शेंगा, ऊस, खरबुजे, टरबुजें, फळफळावळ, वगैरेसारखा “ माकडमेवा " मालक स्वतः विकण्यास धजत नाही. असला माल खेडवळाजवळ पाहिला की संभावित दिसणारे लोक सुद्धा त्याच्या भोवती गराडा घालून त्याला भांबावून सोडतात, आणि गडबडीत कित्येकजण किंमत न देतां तो घेऊन निसटतात. बरे, एकाद्याला पकडले तर त्याचे मागे जातां येत नाहीं; कारण मागें दुकान कोणी संभाळावें, ह्याची अडचण पडते. ह्यामुळे कुणबी तो तांबोळी बागवान ह्यांना विकतो. अहमदनगर येथे

-----

 १ वऱ्हाडांतील मलकापूर गांवीं आठवडाबाजारांत माकडमेवा खेडवळांजवळून अडवून घेऊन स्वतः विकण्याला काही लोक, विशेषतः मुसलमान, असे सोकलेले दिसले की, एखाद्या खेडवळाने दुकान लावलें तर गर्दी करून माल लुटण्यापर्यंत त्यांची मजल जाते.
वळूघोड्यांना घास शेतकरी स्वतः पुरवीत नाहीत, तो ते वाणी व मुसलमान अडत्यांमार्फत विकतात, आणि अडत्यांना विशेष तकलीफ न पडतां शेकडा ४० - ५० अडत मिळते, अशा मतलबाचा पत्रव्यवहार शेतकरी मासिक पुस्तकांत प्रसिद्ध झाला आहे. आठवडाबाजारांत महारजागले, फकीर, गोसावी, बैरागी, वाघे, मुरळ्या, हिजडे वगैरेंची बेहद्द लूट चालते, आणि तिचा मारा कुणबी दुकानदारांवर जबर पडतो. ह्यांशी कटकट घालीत बसावे, तर गर्दी पाहून गिऱ्हाईक दुसरीकडे जातें, आपला माल पडून राहतो, परत घरीं अगर गांवी जाण्याला उशीर होतो, आणि गांवची सोबत निघून जाते; इत्यादि विचार दुकानदारांच्या मनांत येतात. जितका दुकानदार दुर्बल व दिवाभीत तितका त्याला त्रास व तोटा अधिक. बाजारांतल्या दुकानांना प्रशस्त जागा वांटून दिल्या, दोन दुकानांमध्ये जरूर तितकी मोकळी जागा राहिली, आयतखाऊ व आडदांड लोकांवर सक्त नजर ठेवली, आणि हक्क म्हणन बाजार उकळणे महार-जागले व भिकारांना बंद केले, तर थोडक्या काळांत कुणबी दुकानदार बनेल; आणि शेतमालाचे भाव तेजीचे असून ज्या रास्त नफ्याला आज तो आंचवतो तो त्याला मिळेल. आठवडाबाजार व यात्रा भरविण्यासंबंधाने मुंबईसरकाराने सन १८६२ सालचा आक्ट ४ पास केला आहे. त्याअन्वयें नवीन यात्रा किंवा बाजार भरविण्यास जिल्हा मॅजिस्ट्रेची परवानगी लागते. आपल्या सोयीसाठी व व्यापारवृद्धीसाठी लोकांनी आपले जरुरीप्रमाणे नवीन बाजार भरविण्यास हरकत नाही.

 गांवढेकऱ्यांचा बराच बाजार व करमणूक गांवोगांव भरणाऱ्या यात्रांत होते. पावसाळा संपला म्हणजे यात्रांचा हंगाम सुरू होतो. आपल्या गांवीं नवीन बाजार भरविणे झाल्यास, गांवचे लोक वर्गणी जमा करून आसपासच्या सर्व प्रकारच्या दुकानदारांना चिठ्या पाठवितात, आणि त्यांना शिधा, चारा देऊन वर पागोटीही बांधतात. बाजार दर आठवड्यास भरणारा असल्यामुळे दुकानदारांचा पाहुणचार थोडक्याच मुदतींत बंद होतो. पण ही गोष्ट यात्रांना लागू पडत नाही. अमुक एका
देवाच्या किंवा सत्पुरुषाच्या उत्सवानिमित्त यात्रा असली आणि देवालयाचा अधिपति ऐपतदार असला, तर यात्रेला जे दुकानदार येतात त्याना त्याला शिधा दाणाचारा पोंचवावा लागतो, जेवावयास बोलवावें लागतं, आणि त्यांचा कांहीं मान ठरलेला असला तर त्याप्रमाणे नारळ, धोतरजोडा, पागोटे किंवा रोकड देऊन त्यांची मानसंभावना करावी लागते आणि जे वारकरी, गोसावी, बैरागी, साधू, फकीर विकल वगैरे भिक्षुक येतात त्यांचाही ह्याप्रमाणे समाचार घेऊन खेरीज दक्षिणा, तंबाखू, गांजा, अफू, द्यावी लागते; व हे संतही कैफ हक्कानें धर्म म्हणून मागतात. यात्रेचे आधिपत्य सबंध गांवाकडे असले, तर गांवकरी आपापसांत वर्गणी करून वरील खर्च भागवितात. ह्याप्रमाणे वहिवाट वर्षानुवर्ष चालू आहे. गांवाकडे आधिपत्य आहे अशाच यात्रांची संख्या फार असल्यामुळे, आणि गांवकऱ्यांच्या पाहुणचाराबद्दल त्यांना परस्थांपेक्षा दुकानदार ढळत्या भावाने माल देत नसल्यामुळे, पुष्कळ गांवांना पोकळ मोठेपणाशिवाय दुसरा तादृश फायदा नसून यात्रांमुळे बराच चट्टा मात्र लागतो. पूर्वीच्या स्वस्ताईच्या व बिगर-अबकारी काळांत यात्रांसंबंधानें दाणाचारा उपसून देणे, व तलफा पुरविणे फारसें जाणवलें नाहीं; परंतु आतां तें सर्वांना जड जातें. शिवाय पूर्वी व्यापार संकुचित आणि प्रवास धोक्याचा व अडचणीचा असल्यामुळे यात्रेच्या दुकानदारांप्रीत्यर्थ गांवाला जो खर्च येई त्यांत जागच्या जागी माल मिळाला हा एक फायदाच झाला असे लोकांना वाटे पूर्वी यात्रा म्हणजे कलाकुसरीच्या मालाचे किंवा कलावान लोकांच्या कौशल्याचे प्रदर्शन असे. आता ह्या गोष्टी यात्रांपेक्षा किती तरी व्यवस्थितपणाने फार झाले तर १० - २० कोसांच्या आंतील कसब्यांत किंवा शहरांत पाहण्यास मिळतात. व्यापार वाढल्यामुळे आतां गांवोगांव दुकाने झाली आहेत; आणि सडका, पोलीस वगैरे व्यवस्था झाल्यामुळे वाटेल तेथून माल आणणे कठीण नाही. तेव्हां यात्रेच्या दुकानदारांच्या बोळवणीचे ओझें गांवाने उचलण्याचे कारण आज घटकेला उरले नाही; आणि भिक्षुकी संत-विकलांचे पोट व निशाबाजी चालविणे म्हणजे शुद्ध
अजागळपणा आहे. त्यांतले त्यांत कानगोष्ट अशी आहे की, यात्रेची वर्गणी गोळा करणारे इसम बहुधा गांवचे पुंड असतात. आपसांतलें खासगी वांकडे उगविण्याला आणि लोकांच्या पैशावर हौस पुरविण्याला यात्रा ही संधि चांगली असते. वर्गणी देण्याला आढेवेढे घेणे म्हणजे चारचौघांत मानखंडणा करून घेणे असे लोकांना वाटते. म्हणून ज्याला माणूसबळ व द्रव्यबळ कमी अशा लोकांना, विशेषतः बायाबापड्यांना, आपल्या ऐपतीबाहेर यात्रेची वर्गणी द्यावी लागते, आणि पुढाईत पुंड व त्यांच्या पुठ्यांतील मंडळी अजिबात कोरी राहते, किंवा अल्पस्वल्प वर्गणीवर सुटते. जमलेल्या वर्गणीत हे उजळ ठक मौज मारतात, आणि बचत तोंडात टाकतात. त्यामुळे हे गावकऱ्यांना चढ देतात, आणि नव्यानव्या यात्रा भरवितात. काढ हुडकून जुनें देवींचे किंवा खंडोबाबहिरोबाचे देऊळ, किंवा दरगा, अगर मशीद; अथवा एखाद्या बुवाची समाधि किंवा फकिराचे थडगें; किंवा बसीव आणून एखादा नवा साधु आणि भरीव यात्रा; व उकळ वर्गणी, हा ह्यांचा रोजगार. कोठे बसा कलभंडाशी झगडत, असा विचार करून भिडस्त गांवकरी भिण्याभावे किंवा भक्तिभावें यात्रा भरविण्याला होकार भरतात. ह्याचा परिणाम असा झाला आहे की, घाटावरील गांवांत यात्राच यात्रा बोकाळल्या आहेत.

 आठवडाबाजारांपेक्षां यात्रांमध्ये लांबलांबचे दुकानदार येतात, आणि ते टाकाऊ, भेसळीचा माल आणतात, व कसरीची वजनें, मापें वापरतात. आठवडाबाजारांतले दुकानदार व गिऱ्हाईक ह्यांची ओळख असल्यामुळे एका बाजाराला फसविल्यास दुसऱ्या बाजाराला ती गोष्ट गिऱ्हाईकाला दुकानदारांच्या आंगीं लावता येते. यात्रांमध्ये तशी स्थिति नसते. यात्रा करणाऱ्या दुकानदारांत हलकटांची संख्या अधिक असते. इमानेइतबारें सालभर मेहनत करणे ज्यांना आवडत नाही, असे लफंगे लोक काही तरी वेडावांकडा माल, मिठाई, कपडे, यात्रांत विकून आपली सालचंदी काढतात. दंडेल, ठोकेभाई व आसमंतांतील हक्कदार यात्रांत फार लोटतात. बिचारा कुणबी म्हणेल की, मी आपला माल
यात्रांत विकावयाला काढीन तर सोय नसते. कां नसते ह्याची कारणे मागे आली आहेत. आठवडाबाजारांपेक्षां यात्रांत चोरटे, भामटे पुष्कळ जास्त येतात; आणि त्यांत बायकापोरांची गर्दी अधिक असल्यामुळे त्यांच्या हातचलाखीस वाव अधिक सांपडतो. उचलेगिरीतलें प्राथमिक शिक्षण मिळण्याला आडवळणी गांवांतल्या यात्रेसारखी शाळा क्वचितच आढळेल. पुष्कळ यात्रांतून अनेक तऱ्हेचा जुगारही चालू असतो. खऱ्याखोट्या भिकाऱ्यांची सर्व यात्रांत झिंबड असते, आणि त्यांचा उपसर्ग दुकानदारांना व गिऱ्हाइकांना फार लागतो. ते उघडपणे याचना व त्रागा आणि लपून छपून चोऱ्या करतात. लोक जिकडे तिकडे पांगलेले व बावरलेले असल्यामुळे चोरीचा पत्ता बहुधा लागत नाही. व्याधिग्रस्त, मुरळ्या, कोल्हाटणी, हरदासिणी यात्रांतून रोग व आचरटपणा यांचा प्रसार करतात. नाच, तमाशे चालू असल्यामुळे स्थानिक आधिकाऱ्यांना यात्रांतील अनिष्ट प्रकारांकडे लक्ष देण्यास फुरसत मिळत नाही ! गांव-कामगार व हलक्या दर्जाचे पोलीस ह्यांना यात्रा म्हणजे केवळ हक्काच्या करमणुकीची स्थाने होत, असे म्हटले असतां अतिशयोक्ति होणार नाहीं ! देवदर्शन, नवस फेडणे, करमणूक, आपापसांतल्या भेटी वगैरे कामांमुळे यात्रेकरूंची धांदलपट्टी चालते, आणि बहुतेक बोलून चालून मजेखातर आलेले असतात. वरील कारणांस्तव खेड्यांतले लोक यात्रांमधील सौद्यांत अतिशय ठकतात, व त्यांच्या चोऱ्याही पुष्कळ होतात. गांवोगांव आणि त्यांतही एकाच मित्तीला अनेक गांवीं यात्रा असल्यामुळे यात्रांचा नीट बंदोबस्त करण्यास पोलीसला अडचण पडते, व देखरेखीसाठी पुरेसे अंमलदार पाठविता येत नाही. वर वर्णन केलेल्या अनिष्ट प्रकारांसाठी यात्रा जितक्या कमी होतील, तितकें बरे असे वाटते. फार तर तालुक्याप्रत एकाद्या मध्यवर्ती मोठ्या गांवीं यात्रा भरवावी, आणि तेथें दुकानदार, मल्ल व खेळये जमावेत; म्हणजे विक्रीच्या मालावर भरपूर देखरेख राहील, दुकानदारांच्या लबाडीला आळा पडेल, स्वतंत्र यात्रा भरविण्याचा गांवचा खर्च वाचेल, आणि चढाओढीने गुणाची
पारख नीट होऊन, गुणी जनांना बक्षिसेंही खेड्यांपेक्षा अधिक देण्याला सवड सांपडेल. गुणोत्कर्षासाठी सबंध तालुक्याने वर्गणी करून शेतकाम, गुरेढोरें, तालुक्यांत होणारी कौशल्याची कामे ह्यांच्या प्रदर्शनाची अशा यात्रेला जोड दिली तर सिव्हिल व्हेटर्नरी ( गुरांचे वैद्यक), शेतकी, पतपेढ्या, ह्यांसारखी लोकोपयोगी खाती लोकांना जरूर ते ज्ञान देण्यासाठी तेथें विद्वान् व अनुभवशीर लोक पाठवितील, आणि यात्रेचे आद्य हेतु उत्कृष्ट रीतीनें सफळ होतील.

 दिवाळी-शिमग्यांसारखे सण आणि लग्नदिवसांसारखी कार्ये इत्यादि प्रसंगांचा बाजार करण्याला खेड्यांतले लोक बहुधा आपल्या गांवच्या किंवा आसपासच्या पेठेच्या मोठ्या दुकानी जातात. त्यांचा सर्व व्यवहार उधारीचा असतो,व दुकानदारांना आपल्या बाक्या येण्याला पुष्कळ वाट पहावी लागते. पावसाने लागोपाठ टाळा दिला तर सर्व बाकी वसूल होणे दुरापास्त होते, इतकेच नव्हे तर कधी कधी तिची आशाही सोडावी लागते. तेव्हां गांवढेकऱ्यांना स्वस्त दराने माल मिळणे एकीकडेच राहिले, पण आत्मसंरक्षणासाठी दुकानदार वेळेवर मालाच्या किंमतीच्या दुपटीच्याही रकमा नांवे मांडून ठेवतात. घी नो पैसा आणि पैशानु घी, हा अनुभव खेड्यांत सर्वत्र आहे. माल मिळतो तोपर्यंत आपल्या खात्याची स्थिति काय आहे ह्याचा विचार करणारे लोक खेड्यांतील लिहितां वाचतां येणाऱ्यांमध्ये देखील विरळा. मग निरक्षरांचे नांव कशाला ? त्यांनी आठवण ठेविली तरी एक लिखा आणि दस बका, अशी अवस्था होऊन शेटजीच्या वहीपुढे गप्प बसावे लागते. शेटजीचा एकच मंत्र 'नीट आठवण कर. हे लिहिलें तें खोटें का? दाखीव कोणालाही वही'. असल्या बोलाचालींत दुकानांत जमलेले लोक गिऱ्हाइकालाच फजीत करतात. खात्यांत वाटेल त्या रकमा व भाव घुसडण्यांत आणि दिलेला वसूल तोंडांत टाकण्यांत दुकानदाराचे इमानच काय त्याच्या लेखणीच्या आड येईल तेवढें. दुकानदार शेकडा पंचवीसच्या कमी नफ्याने माल मुळांत विकीत नाहीत, आणि त्यावर हे हिशेबाचे भोळे असते. ह्याचा
परिणाम असा घडून येतो की, गांवढेकऱ्यांचे खातें पिढ्यानपिढ्या बेबाक होत नाही. मोठे दुकानदार किरकोळ दुकानदारांप्रमाणे अधीर होत नाहीत, आणि गिऱ्हाइकांची नड जाणून ती वेळेवर भागवितात. ह्यामुळे गिऱ्हाइकावर त्यांची छाप चांगली असते. एकंदरीत हिंग बोजवार विकणाऱ्यांपेक्षां भरण्याचे दुकानदार गिऱ्हाइकांशी वागण्यांत जरी प्रतिष्ठित असले तरी सचोटीने वागून गिऱ्हाइकाचा फायदा करावा अशी भावना त्यांमध्ये कचित् आढळून येते.

 तांब्याशिवाय चांदी नाद धरीत नाही, तशी खोट्याशिवाय दुकानदारी चालत नाही अशी आमच्या वैश्यांची जुनाट समजूत आहे. म्हणून आमचे दुकानदार गिऱ्हाइकांच्या डोळ्यांत धूळ टाकण्याला फार दिवसांपासून वहिवाटीने बांधले गेले आहेत!! बनिया मिंतर बेसा सती। बगळा भगत कागा जती। ही उक्ति प्राचीन काळापासून लोकांच्या तोंडी आहे. तरी पण सरडाची धांव अति झाली तर कुंपणापर्यंत असते. स्वराज्यांत कसब्यांचे व व्यापाऱ्यांचे दळणवळण दूरदेशी बेताबाताचे असल्यामुळे बहुतेक व्यापार स्थानिक असे; आणि हुन्नरी, व्यापारी व गिऱ्हाईक हे एकमेकांची ओळख व मोहबत धरीत. त्या भोळ्या काळांत खऱ्याखोट्याची भीति व अब्रूची चाड लोक अधिक बाळगीत. एकदां का कानफाट्या नांव पडले म्हणजे गिऱ्हाईक लागणार नाही, व उपाशी मरण्याची पाळी येणार; निदान चहूंकडे नाचक्की होणार, हे हुन्नरी व दुकानदार जाणून होते; आणि देशांतरीं माल नेण्याची साधने नसल्यामुळे हुन्नरी व व्यापारी लोकांना गिऱ्हाइकी जतन करणे भाग पडे. खोट्याचें बेमालूम खरे करून दाखविणारे, व नाना प्रकारच्या मिश्रणांची संपादणूक शक्य करणारे शास्त्रीय शोध आमच्या कसबी लोकांना ठाऊक नसल्यामुळे त्यांना मोठीशी व भानगडीची भेसळ किंवा लबाडी पचविण्याची आक्रमशक्ति नव्हती. फारतर खोबऱ्याच्या तेलांत थोडेंसें करडी तेल, करडीच्या तेलांत थोडेसे शेंगादाण्याचे तेल मिसळणे; गांवच्याच चार दोन राशींचे गहूं, जोंधळे कालविणे; केशरांत
 करड फूल घालणें, डिंकाला हिंगाचें पाणी देणें, नागवेलीच्या शेंगा पिंपळी म्हणून, बाळहिरडे सुरवर हिरडे म्हणून, काकवी मध म्हणून विकणें; वगैरे साधलें म्हणजे ते तृप्त असत. त्यांचें तांबे पितळ तेव्हांच बाहेर पडे. ह्या सर्व कारणांस्तव बाजारांत तकलादी जिन्नस, खोटा कुपथ्यकर व डौली माल कचितू येत होता; आणि बहुतेक किंमतीही पिढ्यानुपिढ्या कायम सारख्या होऊन बसल्या होत्या. धान्य स्वस्त, लोकांच्या गरजा अल्प, व दुकानदारही थोडे, म्हणून मालाचा उठाव बेताबातानें होई; आणि बाजारांत नाणें फारसें खेळत नसे. परंतु पाश्चात्य व्यापाराला हिंदीस्तान मोकळे झाल्यापासून ही स्थिति पालटली. एकछत्री राज्य, आगगाडी व तार ह्यांनीं व्यापाराला वेग दिला, व त्याचें स्थानिक स्वरूप जाऊन तो जगत्संचारी झाला; आणि माल व नाणें ह्यांची उलथापालथ वाढली. शेतमालाची विल्हेवाट वरचेवर लागते, आणि तो खेड्याच्या किरकोळ गिऱ्हाइकाला महाग मिळतो, इतकेंच नव्हे तर त्यांतला नामांकित माल जागेवरच्या गिऱ्हाइकाला मिळत देखील नाहीं. ज्याला शहरांत गिऱ्हाईक फार असा चांगला दाणा, चारा, फळफळावळ व शाकभाजी शहरांत जाते; आणि बटाटे पिकतात त्या गांवच्या लोकांना ते हवे असले म्हणजे ते परत शहरांतून आणण्याची पाळी येऊं लागली आहे. अशा रीतीनें शहरांत जों माल टाकाऊ ठरतो तो खेड्यांच्या पदरांत बांधला जातो. शहरच्या बेढंग्यांप्रमाणें तो परततांना जातां येतां वाटेवरच्या सर्व व्यापाऱ्यांचा नफा, भेसळ, लुच्चेगिरी यांसह खेड्यांत उतरतो. ह्यांमुळे तो नुसता महागच पडतो असें नाहीं, तर अनोळखी देशी परदेशी व्यापाऱ्यांना आपल्या हातचलाखीच्या आणि आधुनिक पाश्चात्य शोधांच्या व युक्त यांच्या साहाय्यानें तो जितका बेगडी करत येऊन गिन्हाइकाला लुबाडतां येईल तितका खोटा व भपकेदार बनून खेड्यांच्या दुकानांत घुसतो. ह्यामुळे खेड्यांत कुजकें कापड, किडका कमकस दाणाचारा, नासका भाजीपाला, राखेवजा साखर, पुनः पुनः पाणी शिंपलेला खजूर, विरी गेलेला चहा, खौट मसाला, साबण,
घाणेरडे तूप, दांतवण, धडधडीत घासलेट मिसळलेले गोडे तेल वगैरे धूमधडाका खपत आहे. घासलेट स्वस्तेंं म्हणून गांवढेकरी तें वापरतात, परंतु तें अत्यंत कनिष्ठ प्रतीचे असते. साफ धूर घालविणारे दिवे घेण्याची बहुतेकांना ऐपत नसते. सबब लोक उघड्या चिमण्या वापरतात, व घासलेटचा धूर सर्वांच्या घशांत भरतो. तालुक्याच्या पेठांत सुद्धां, राकेलचें मिश्रण नाहीं असें खोबरेल मिळत नाही. शहरचे व्यापारी बटलरांजवळून उकळलेला चहा घेऊन तो वाळवून पूट देऊन विकतात, हे सर्वश्रुत आहे. नानाशास्त्रकलासंपन्न युरोपियन व्यापारी वाटेल ती मिसळ सफाईने करतात, आणि मालाचें हिडीस स्वरूप झांकण्याच्या युक्तया योजतात. त्यापुढे देशी माल आंधळा दाखवितो. द्रव्यलोभाने अमेरिकन व्यापारी वाईट मांसांचे डबे निवळ भपक्यावर खपवीत, असा बोभाटा होऊन त्याबद्दल युरोपियन लोक चिडल्याचे पुष्कळांच्या वाचनांत असेलच. 'खेडें तेथून वेडे'. अगोदर त्यांना ज्ञान कमी आणि एकजुटीने वागण्याची धमक त्याहून कमी. ज्यांना गांवच्या दुकानदारांच्या वस्तादगिरीला तोंड देता येत नाही, ते युरोप-अमेरिकेच्या द्रव्यलोभाने निर्माण केलेला खोटा माल खपविण्याच्या युक्त्यांपासून आपला बचाव काय करणार ? गोरे लोक उपजत व्यापारी व स्वावलंबी असल्यामुळे युरोपअमेरिकेचा खोटा माल त्यांमध्ये खपत नाही. शहरांत लोक छट, दुकाने मुबलक, व बाजारावर देखरेखही बरीच असते. खेड्यांत सर्व काही ह्याच्या उलट. ती बिचारी व्यापारी चढाओढीच्या भोवऱ्यांत सांपडून पुरे गोते खात आहेत, आणि जगांतल्या सर्व सोद्या व्यापायांच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. हाळकऱ्यापासून तो पेठकऱ्यांपर्यंत सर्व उदमी उघडाउघड खोटा, अपायकारक, व वाईट माल खेड्यांच्या लोकांना पाजीत आहेत. अशा स्थितींत खेड्याचे लोक पैशानें व शरिरानें खराबीस आले, तर त्यांत नवल काय ? घासलेटमिश्रित

-----

 १ हॅरोडस स्टोअर्सने एक रुपया चौदा आण्याला हिरव्या रंगाच्या दोन फण्या मिस एडिथ हिल्टन नांवाच्या नटीला विकल्या. त्यांचा रंग उतरून तिच्या केंसाला काळे डाग पडले. त्याबद्दल वेस्ट लंडन कौंटी कोर्टने तिला ११२५ रुपये नुकसानी देवविली. हे आमच्या खेड्यांत कोठून आणावें !
खोबरेल बायजाबाई पाटलिणीच्या अंगावर उतले किंवा त्यायोगें तिच्या डोक्याचे केश पार झडले, अगर भिमसेन महाराला खराब घासलेटच्या धुराने कफक्षय झाला, तर मुंबईच्या लक्षाधीश शेटचे किंवा युरोप-अमेरिकेच्या कोट्याधीश व्यापारी कंपनीचे काय जाते ? 'अर्थातुराणां न पिता न बंधुः।' पैशासाठी हपापलेल्या व्यापाऱ्यांच्या तावडीतून खेड्यांतले लोक वांचविणे अत्यंत अवश्य झाले आहे. ते खेड्यांच्या लोकांच्या माथीं जो खाण्यापिण्याचा लेण्यानेसण्याचा अपायकारक माल मारतात, त्याकडे पाहून असे उद्गार निघतात की, 'बाबांनो द्रव्यदंड घ्या पण देहदंड तरी घेऊ नका'. मुलगी देऊन जावयाला आणि ऋण देऊन कुळाला आयुष्य चिंतावे अशी आपली जुनी वहिवाट होती. ती जर आमचे व्यापारी चालविते, आणि गिऱ्हाइकाला टिकाऊ पथ्यकर माल पुरवून ते तगते व धडधाकट ठेवणे, व पेठेला सचोटीचें व परिणामी हितकर वळण लावणे, ह्याची वैश्यवर्णावरील जबाबदारी जर ते ओळखते, तर खेड्यांची दुकाने म्हणजे शहरचे उकिरडे अशी स्थिति होतीना. वजनामापांत, भावाटावांत, हिशोबांत खेड्यांतलें गिऱ्हाईक सर्वस्वी दुकानदारांच्या मांडीवर मान टाकतें. तेव्हां व्यापाऱ्यांचा निर्धार झाला की खोटा माल म्हणून आणावयाचा नाही, तर शेर अच्छेर मालासाठी किंवा १०।२० हात कापडासाठी गिऱ्हाईक मुंबई पाहून खोटा पण स्वस्ता माल घेऊन येईल, आणि त्यामुळे आपले नुकसान होईल, अशी भीति बाळगण्याचे कारण नाही. माल खरा पण महाग मिळू लागला म्हणजे फार तर गिऱ्हाईक तो कमी घेईल, आणि मितव्ययी होईल, इतकेंच. पण तें गांवचे दुकान सोडून जाईल असें सहसा होणार नाही. गिऱ्हाईक मितव्ययी झाले तर व्यापाऱ्यांचा कायमचा फायदा आहे. दुसरी गोष्ट अशी की, वाईट माल पैदा करणाऱ्या देशी परदेशी व्यापाऱ्यांची स्थिति कैफी माणसाप्रमाणे झाली आहे. जो जो वाईट माल खपतो तों तों तो अधिक अधिक वाईट पण स्वस्ता कसा बनवितां येईल ह्या विचारांत ते चूर होऊन गेले आहेत, व उत्तरोत्तर जास्त जास्त
वाईट मालाचा बाजारांत पाऊस पाडीत आहेत, आणि अनाथ खेडवळांच्या पैशाचा व आरोग्याचा बळी घेत आहेत. खेड्यांच्या व्यापाऱ्यांनी आपसांत व्यापारी सभा स्थापून दुकानांत वाईट माल ठेवावयाचा नाही, असा आळा घातला तर शहरच्या उजळ ठकांच्या गमजा बंद पडतील, व त्यांना वाममार्गातून सोडविल्याचे श्रेय मिळवून आपल्या पिढीजाद अन्नदात्या गिऱ्हाइकाशी इमानेइतबारें वागल्याचे पुण्यही त्यांच्या पदरीं पडेल. खेड्यांत परप्रांतस्थ व्यापारी थोड्या भांडवलावर थोडक्या काळांत हवेल्या बांधतात, डागडागिना करतात; आणि पोटापाण्याचा उद्योग मिळत नाही म्हणून वरिष्ठ कनिष्ठ जातींतले लिहिणारे सवरणारे गांवकरी इकडे माशा मारीत बसतात. त्यांनी जर दुकानदारीत मन घातले तर ते स्वत: पोटभर खातील, आणि चोख माल चोख हिशेब ह्यांचा फायदा स्वकीयांना देतील. फायदेशीर रीतीने कोणता माल कोठे मिळतो, ह्याची माहिती पाहिजे असल्यास सेक्रेटरी इंडियन मर्चेट्स चेंबर ऑफ कॉमर्स मुंबई, ह्यांच्यांशी पत्रव्यवहार करावा म्हणजे ती बसल्या जागी मिळेल. सरकारनेही खेड्यांच्या बाजारांतील मालावर पूर्ण नजर ठेवून मुक्या आंधळ्या पांगळ्या खेडवळांना व्यापारी स्वातंत्र्याच्या स्वैर व स्वार्थी दुरुपयोगापासून वाचवावें, आणि आई ना बाप अशी जी खेडवळ गिऱ्हाइकांची दैना झाली आहे, ती नाहीशी करावी.

 खेड्यांतील सावकारीला उचापतीच्या खात्यापासून आरंभ होतो. खावटीचे धान्य, कडबा, बैल, बी, प्रपंचाच्या नेहमींच्या नडी वगैरे संबंधाने जी उचापत होते ती सांचूं लागली म्हणजे हिशेब करून दस्तैवज करून देणे प्राप्त होते. ज्याच्याकडून कर्ज येण्यासारखे असते त्याला त्याच्या पतीप्रमाणे कर्जरोख्यावर दरसाल दरशेकडा ६ ते ३६ पर्यत व्याजाने कर्ज मिळते. त्यांतले त्यांत दोहोत्र्याचे दस्तैवज जास्त नजरेस येतात. शेतकऱ्यांना बिनव्याजी हप्तेबंदी मिळते, अशा समजुतीवर काहीं सावकार भरण्याच्या दुपटीचा दस्तैवज करून घेतात. हातावरील सावकारी फार करून संपुष्टांत आली आहे, असे म्हटले तरी
चालेल. शेतकन्यांकडील बिनतारणाचे कर्ज वसूल होण्याला फार जिकीर पडते, म्हणून बहुधा स्थावर तारण घेऊन सावकार त्यांना कर्ज देतात. खात्याच्या हिशेबाची व फेडीची जी अवस्था तीच दस्तैवजी देण्याच्या हिशेबाची व फेडीची. फुगलेला भरणा, जबर व्याज, 'माघ, फाल्गुुन, शिमगा, होळी, चैत्र एकूण महिने पांच ' असला हिशेब, आणि दिलेल्या वसुलाची नाकबुली-मिळून सर्व प्रकारे कुळाचें घर घेण्याला बाताबेताच्या भांडवलाचे सावकार सदैव तत्पर असतात. ह्याला अपवाद फार थोडे. ह्यामुळे प्रपंचाच्या व धंद्याच्या चालू खर्चासाठी काढलेल्या कर्जाखालीच गांवढेकरी दडपून जातात. तेव्हां धंदा वाढविण्यासाठी कर्ज काढून त्यांत नवीन भांडवल घालण्याचे अवसान त्यांना कोठून सांपडणार ? शेतीशिवाय तर धंदे खेड्यांत फारसे नसल्यामुळे अडाण्यांचे दस्तैवज बहुतेक प्रापंचिक खर्चासाठी झालेले असतात. कुणब्यांचे दस्तैवज मात्र धंद्यासाठी (उदाहरणार्थ बैल, बी, शेत घेणे, विहिरी, ताली करणे, इत्यादि) काढलेल्या कर्जाचे दिसून येतात. परंतु ज्याप्रमाणे रजिष्टरपुढे भरणा पदरांत घेऊन कचेरीच्या बाहेर ती रक्कम कूळ सावकाराला परत देते, त्याप्रमाणे कज्जा जिंकण्यासाठी वरील प्रकारची कारणे दस्तैवजांत फडकतात आणि शेकडा ६० व्यवहारांत ही कारणे वास्तविक नसतात. गरजवंताला अक्कल नसते. ऋणको म्हणतो कांहीही लिही पण माझी आजची नड वार. धनको म्हणतो मला कोर्टात ददात पडणार नाही असा दस्तैवज करून दे. खेड्यांत सावकारी करणारांचे साधारणतः पांच सहा वर्ग पडतील. थोड्याशा भांडवलावर व्याजबट्टा करणारे 'अडाणी' व सधन कुणबी, खेड्यांतील उदमी, मोठ्या भांडवलाचे सराफ, पिकें खंडून घेणारे एतद्देशी व परदेशी व्यापारी आणि अलीकडे गांवोगांव पैसा कापड वगैरे पेरणारे पठाण किंवा पंजाबी व्यापारी.

 थोड्याशा भांडवलावर व्याजबट्टा करणारे अडाणी बहुधा आशेखोर असतात, पण नेटदार नसतात. हे जातीने ब्राह्मण, सोनार, सुतार वगैरे असतात. व्याजाच्या आशेने ते लहानसान रकमा कर्जाऊ देतात,
पण त्या परत येणें आतांशा मुष्कील असते. त्यांनीं जमिनी गहाण घेतल्या तर ते त्या गहाणदारांना किंवा इतरांना बटाईनें अगर खंडानें लावतात. मारुतीचे शपथेवर कर्ज, खंड, किंवा बटाई येत असे अशा काळांत व्याजबट्ट्यापासून जो धान्याच्या व कुळाच्या सेवेच्या रूपानें नफा मिळे, त्याच्या दंतकथा ऐकून हे लोक अजूनही कर्जदारांच्या थापांना भुलतात. परंतु कोळी, ठाकर, भिल्ल, वगैरे जंगली म्हणून कमी चौचाल जाति किंवा वऱ्हाड, खानदेशसारखे सुसंपन्न कुणबी ह्यांची वस्ती सोडून बाकीच्या ठिकाणीं किरकोळ अडाणी सावकार साफ फसतात. त्रागा करून, शिव्याशाप देऊन त्यांचें कर्ज वसूल होत नाही, व शेतमालही कुणबी त्यांच्या हातीं लागू देत नाहीं. कांहीं दिवस अंदर बट्टा सोसून हे लोक बहुधा मुद्दल रुपयांचे सहा तें बारा आण्यांवर आपले रोखे वाण्यांला बेचन करून देतात. हा वर्ग आता नामशेष होत चालला आहे. धान्याच्या वाढत्या किमतींनी हात दिल्यापासून तुरळक कुणबी व्याजबट्टा करूं लागले आहेत. त्यांचें कर्ज येण्याला खळखळ पडते, आणि बोलीप्रमाणें भरपूर वसूल त्यांना क्वचित मिळतो. व्यवसायधर्मीनुसार त्यांचा डोळा जमिनीवर असतो, म्हणून ते जमिनी गहाण घेतात आणि त्या घरी कसतात. कुणबीकींतले ते पोटकिडे असल्यामुळे त्यांना रोकड व्याजापेक्षां शेतवांट्यांत जास्त नफा भेटतो. कर्ज फुगवून कुळाची जमीन तोंडांत टाकावी अशी त्यांची मनांतून इच्छा असते. परंतु त्यांचा व्यवहार नात्यागोत्यांतल्या माणसांत बहुतेक झालेला असतो. तेव्हां मुरवतीखातर हातीं आलेली जमीन त्यांना सोडावी लागते. कुणबी तेथून जबरदस्त भिडस्त. एखादा बेमुरवत निघाला, तरी लिहिण्यावाचण्याचे अंग नसल्यानें, व कचेरीकोटांचे अडाखे माहीत नसल्यानें, त्याला जमीन जिंकणें कठीण पडतें. 'ज्या गांवच्या बोरी त्याच गांवच्या बाभळी.' तेव्हां असें हमेष घडतें कीं, वेळेला ह्या दोन्ही वर्गाच्या सावकारांवर कुळे कुरघोडी करतात; आणि त्यांचें व्याज दिसतांना जरी जबर दिसलें तरी
कुळे तितकें देत नाहीत, व तेही भांडणाचे तोंड काळे म्हणून माघार घेतात. दोन्ही वर्गांची संख्या इतकी अल्प आहे की ती जमेंत धरण्यासारखी नाही. कारण पुष्कळ दिवसांपासून दाक्षिणात्यांचा वैश्यवृत्तीकडे बहुतेक ओढा नाही म्हटले तरी चालेल. गेल्या हजार पांचशे वर्षांत विद्वान् व्हावें, राज्यकारभार हांकावा, जमेदार बनावें, स्थावर संपादावें, ह्या व ह्यांसारख्या उद्योगाची दक्षिणेत अतोनात चहादारी झाली; आणि तागडी-माप हाती धरावें व एकाचे दोन करावे, असल्या वाणिज्याला लोक तुच्छ मानूं लागले. ब्राह्मण किंवा क्षात्रधर्माना काय तो मान मिळू लागला; आणि वैश्यवृत्ति मानहीन झाली. हे दोन्ही रोजगार ताजे नव्हत. त्यांच्या उत्पन्नांचा झरा नसतो, पूर असतो. शेती, इनाम, वतनें, सालचाकरी वगैरेंचे उत्पन्न वर्षातून एकदा हातीं चढावयाचे. म्हणून इकडे नेहमी दाम दुष्काळ राहून, देणे घेणे व व्यापार परप्रांतियांचे हाती गेला; आणि गुजरात वगैरेच्या मानाने व्याजाचा दर नेहमीं जडीप राहिला. परंतु जिन्नसांच्या विशेषतः शेतमालाच्या व गांवहुन्नराच्या किंमती स्वस्त्या रहात गेल्या व जनता द्रव्यहीन राहिली, तरी वतनाचा मान ढळला नाही. अजूनसुद्धां खेड्यांत चार मंडळी जमली तर मानाची जागा, पानसुपारी अगोदर ब्राह्मणाला, साधूंना व वतनदारांना मिळते, मग ते दोन प्रहराला कां महाग असेनात; आणि त्यांच्या मागून शेटसावकारांना मान मिळतो. गांवपंचायतींत चांभार, महारांना बोलावलें नाही तर ते रुसतात. पण असला हक्क त्यांवर कर्ज असणाऱ्या शेटजींना सांगता येत नाही. असल्या सामाजिक कल्पनांमुळे आमच्या लोकांनी पूर्वीपासून व्यापारांत मन घातलें नाहीं, व नाण्याचे प्राबल्य ओळखिलें नाही. तरी पण सराफी करणारे काही ब्राह्मण नाईक होते; आणि सावकारी, दुकानदारी करणारी थोडी फार इतर जातींची घराणी होती. ह्या लोकांच्या पिढ्यानपिढ्या गांवांत झाल्यामुळे व त्यांना कमी अधीक वतनवाडी असल्यामुळे ते गांवच्या वतनदारांत मोडत, आणि कुळे शाबूत ठेवून त्यांना आपला धंदा करावा लागे. कुणब्याच्या भिडस्त-
पणाने त्यांनाही व्यापिलें. त्यामुळे त्यांना कुळांची भीड पडे, आणि पाण्यांत राहून माशांशी वैर करावें की नाही ह्याचा विचारच पडे. मागच्या राज्यांत चाललें तसें पुढेही चालेल, ह्या भिस्तीवर ते बसले, आणि समयानुरूप नवीन व्यापारी कसब ते शिकले नाहीत. दक्षिणी लोक परधारजिणी असल्यामुळे आणि मारवाड्यागुजरात्यांइतकी हिंमत, आंगमेहनत, व्यवहारदक्षता, बेमुरवत, काटकसर, व पोटांत शिरून आपला मतलब जाऊ न देण्याची शिताफी त्यांना नसल्यामुळे मारवाडी, गजराती व्यापाऱ्यांनी पथारी पसरल्याबरोबर खास दक्षिणी सावकारांना व दुकानदारांना आपला गाशा गुंडाळावा लागला. दाक्षिणात्यांची जी दुकानदारीची घडी मोडली ती मोडलीच; आणि आतां दक्षिणी सावकार व दुकानदार बियाला सुद्धा उरले नाहीत.

 खेड्यांतले उदमी व मोठ्या भांडवलाचे सराफ हे आतां बहुतेक ठिकाणी मारवाडी, गुजराती व कित्येक ठिकाणी लिंगायत आहेत. परदेशी व इतर जातींचे दुकानदारही क्वचित् आढळतात. बहुतेक दुकानदार मालाच्या खरेदी-विक्रीबरोबर व्याजबट्टाही करतात. त्यांच्या दुकानदारीचें व सावकारीचे वर्णन वर आलेच आहे. भावांत, वजनांत, हिशेबांत, सारांश जेथें गिऱ्हाईक गांठेल तेथे त्याला हे चेपतात. दुकानचे खाते फुगले म्हणजे हे व्याजमुद्दलासुद्धा रकमेचे कर्जरोखे किंवा गहाणरोखे करून घेतात, आणि गहाणाची बाकीही चढली म्हणजे कायमची किंवा नामधारी खरेदीखतें करून घेतात. स्थावराशिवाय लोकांत मान नाही. ह्यामुळे ह्यांची नजरही स्थावर संपादण्याकडे असते, आणि मण सहा पायल्या खावटीवारी किंवा चाळीस पन्नास रुपयांच्या खात्या अगर कर्जावारी वाण्यांनी मोठाल्या जमिनी, हवेल्या काबीज केल्याची उदाहरणे पुष्कळ सांपडतात. गहाणव्यवहाराची खरेदीखतें घेऊन हे जमिनीचा भाडेपट्टा तिऱ्हाइताच्या नांवाने करून घेतात. त्यामुळे कुळाला खरा व्यवहार शाबीद करण्याची पंचाईत पडते. हे जागेवर असतात, तेव्हां त्यांना कुळांना वेळच्या वेळी तगादा करण्याला किंवा रास होत अस-
तांना खळ्यावर जाण्याला सांपडतें. ह्यांचे तोंड फार मोठे असते. ते इतकें की, वेळेवर हे रुपयाला रुपया देखील व्याज किंवा नफा मारतात. त्यामुळे कमी भांडवल असले तरी थोड्याच अवकाशांत त्यांची पथारी वाढून ते मोठ्या दुकानदारांत किंवा सराफांत मोडूं लागतात. दक्षिणेत कायमची घरेदारें करीपर्यंत मारवाडी गुजरात्यांनी मारवाङ-गुजरातेकडे डोळे ठेवून, इकडील लोकांच्या हितानहिताकडे लक्ष न देतां धंदा केला; आणि लोकांचा भोळेपणा, अदूरदर्शित्व व सरकारी कायदे ह्यांचा रेलचेल फायदा घेतला. ह्याचा सर्व दोष वाण्यांवरच लादतां येत नाही. कारण आमच्यासारखे घमेंडी, धौताल, व कूपमंडूक गिऱ्हाईक मिळाल्यावर कोणीही काटकसरी व व्यापारी नजरेचे लोक असते, तरी त्यांनी आपलाच मतलब साधला असता. आतां हे लोक दक्षिणेत स्थाईक झाल्यामुळे गिऱ्हाईक कायम ठेवण्याची व तें फारसें असंतुष्ट न करण्याची प्रवृत्ति त्यांच्यामध्ये निर्माण होणे साहजिक आहे. मोठाले सावकार गहाण जमिनी परत कुळांनाच लावतात, आणि खंड किंवा व्याज येतें तोंपर्यंत कुळांना कोर्टात ओढीत नाहीत. शेतकी कायद्याचे कलम ६४ व ६७ प्रमाणे कुळांना पावत्या दिल्या पाहिजेत, सालअखेर खातेंउतारा दिला पाहिजे, आणि खातें-वही देऊन तिच्यांत जमाखर्च टिपून दिला पाहिजे. असें न केले तर १०० रुपयेपर्यंत दंड होतो. ह्याप्रमाणे चालणारा हजारांत एक सांपडणे दुरापास्त होते, आणि हा कायदा पास होऊन तीन तपें झाली तरी 'मागील भरणा, पुष्कळ वसूल, पावती नाही. ' इत्यादि कुळांच्या पूर्वीच्याच तक्रारी अजून कायम आहेत. अंधेरांत देणे घेणे करणाऱ्या अब्रुदार कुळांची संख्या फारशी नाही. तेव्हां चावडीत चारचौघांसमक्ष देणे घेणे केले, आणि कुळ-पावतीसारखी वही करून तिजवर सरकारी वसुलाप्रमाणे गांवकामगारांकडून वसूल मांडून घेतला, व त्यावर सावकाराची सही घेतली, तर खेड्यांतील कुळे बुडणार नाहीत. पैसा किंवा माल उचलतांना कूळ नडलेले असते, हे कबूल केले तरी वसूल देतांना तें नडलेले नसते. मग पोंच मांडून
घेतल्याशिवाय त्याने वसूल कां द्यावा ? खेड्यांतील उदमी म्हणजे लोकांचे सराफ, आडत्ये आणि आप्त होत. लोकांचें सुखदुःख, गरिबीहरिपी समजणे जितके त्यांना शक्य आहे तितकें बिछाइत्यांना नाही. दोन प्रहर रात्रीला कोणाला गरज लागली तर त्यांच्याकडेच गेले पाहिजे. आपला माल दूर देशी नेऊन विकणे खेडवळांना शक्य नसते. तो ते बहुतेक गांवचे वाण्यांनाच घालतात. खेड्यांतले बहुतेक लोक त्यांचे देणेदार असतात. हे सर्व मनांत आणून ते जर फुंकून खातील तर त्यांचाही धंदा चालेल, आणि लोकांनाही तकवा राहील. देशांत व्यापारवृद्धि झाल्यामुळे अलीकडे खेड्यांतील मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांशी व्यवहार आंखडता घेतला आहे; आणि ते आपलें भांडवल, आडत, जवाहीर, गिरण्या वगैरे सारख्या व्यापारांत घालूं लागले आहेत. परंतु झटपट श्रीमंत होण्याची हांव जर उदमी आंवरून धरतील, आणि रास्त नफा ठेवून धंदा करतील, तर खेड्यांची स्थिति सुधारून त्यांच्या भराभटीचे तेही वांटेकरी होतील. लोक सधन झाले म्हणजे दुकानदारी वाढते व त्यांची संपत्ति अनंतरूपांनी व्यापाऱ्यांच्या घरांत शिरते. तसेच हे लोक जर चोख हिशेब ठेवतील, तर त्याच्या व्यवहारासंबंधानें जिकडे तिकडे जे संशयाचें काहूर उठले आहे ते खात्रीने कमी होईल. पिके खंडून घेणाऱ्या देशी, परदेशी व्यापाऱ्यांच्या व्यवहाराबद्दल जरूर विचार केला पाहिजे. ह्यांना द्रव्यबल व माणूसबल असल्यामुळे ह्यांच्या केवळ फूत्काराने शेतकऱ्यांना कमीत कमी चौथाईला मुकावे लागते. ही गोष्ट काही लहानसान नव्हे. ह्याबद्दल लोकांत विचारजागृति होऊ लागली आहे, आणि हे व्यापारी प्रतिष्ठित असल्यामुळे ह्या बाबतींत उभयतांमध्ये फायदेशीर व सरळपणाचा मार्ग निघण्याची आशा आहे. पण ज्यांकडे डोळेझांक करणे आत्मघाती आहे, अशा पठाण व पंजाबी व्यापाऱ्यांबद्दल काळजीपूर्वक विचार चालू असल्याचे ऐकिवात नाही.

 मराठशाहीतल्या पडत्या काळांत जिकडे तिकडे गृहकलह माजला. आणि संस्थानिक व सरदार ह्यांस आप्तांचा देखील भरंसा येईनासा झाला;
तेव्हां स्वसंरक्षणार्थ त्यांच्यामध्ये अरब लोकांना शिपाईवेषाने चाकरीस ठेवण्याचा प्रघात पडला. त्यांचा पगार मोठा, आणि खर्च कंजूषपणाचा असल्यामुळे ते अल्पावधीत व्याजबट्टा करूं लागले. खानदेशांतील त्यांच्या व्यवहारासंबंधानें क्याप्टन ब्रिग्ज ह्यांचा रिपोर्ट मनन करण्यासारखा आहे. थाळनेर, बेटावद, सिंधखेड, सोनगीर, सुलतानपूर, आणि नंदुरबार ह्या परगण्यांत खेड्याखेड्यांनी दोन अगर तीन अरबांचे ठाणे असे; आणि पुष्कळ दिवसांपूर्वी दिलेले कर्जाबद्दल ते दरमहा दरशेकडा ८|१० टक्के व्याज घेत. दुबळ्या खेडवळांवर जुलूम करण्यांत आणि त्यांचेकडून सोनेनाणे, जडजवाहीर जबरीने काढण्यांत ते आपलें शौर्य व शक्ति खची घालीत. त्यांच्या पेंढारीपणास कंटाळून अखेर कंपनी सरकारने त्या सर्वाला खानदेशांतून सुरतेस नेले, आणि जहाजांत घालून अरबस्तानांत रवाना केलें. ही कुलकथा सांगण्याचे कारण इतकेंच की, शंभर वर्षांपूर्वी अरबांनी ज्याप्रमाणे गांवढेकऱ्यांना हैराण केले तसेंच आज पठाण व पंजाबी व्यापारी दक्षिणप्रांती करीत आहेत पठाणांना रोहिले, काबुली, पेशावरी, खान, अफगाण, कंदाहारी, पशतुनी, पेशनी म्हणतात. ते आणि पंजाबी व्यापारी हे विशेषतः रोहिले, काबुली, भरेकरी किंवा दमकोंडे, ह्या नांवांनी प्रसिद्ध आहेत. असाम्यांकडे हे लोक पैसे मागावयाला गेले, आणि त्यांनी म्हटले दम धर म्हणजे ते थोडा वेळ नाक दाबून धरतात; म्हणून दमकोंडे हे त्यांचे नांव पडले. ते लालबुंद, सुरेख, पिळदार, सशक्त, सतेज, पुष्ट, उग्र व उंचे पुरे असतात. डांगाणांतले कोळी ठाकर म्हणतात की, ते साहेब लोकांचे कोणी तरी असावेत, आणि त्यांना सरकारचा हुकूम असावा; त्याशिवाय ते मारपीट करून देणे वसूल करतेना. असो. ते इकडील लोकांना कस्पटाप्रमाणे लेखतात, आणि लोकही त्यांच्या शीघ्रकोपी व क्रूर स्वभावाला आणि शरीरसामर्थ्याला भिऊन त्यांच्यापासून जरा लांबच राहतात. मराठी म्हण अशी आहे की, 'सावकाराचे उरावरून आणि सरकारचे पाठीमागून जावें.' पण दमकोंड्याचे
संबंधाने मात्र ही म्हण उफराठी दिसते. कोठे कोठे सावकार लोक ह्यांना रखवालीसाठी किंवा तगाद्यासाठी चाकरीस ठेवितात. हे लोक बहुधा व्याजबट्ट्याचा धंदा करितात, आणि काही उधारीने कापड, सुऱ्या, चाकू, कात्री, सुरमा, औषधी, खोटे दागिने, खडे, नोटा वगैरे विकतात. मेंढवाड्यांत जसा लांडगा उतरावा तसा इकडील लोकांत पठाण, अशी स्थिति आहे. ज्याला कोठेही कर्ज किंवा उधार माल मिळत नाही, तें पठाणांचें गिऱ्हाईक. परंतु अलीकडे बरे म्हणविणारे शेतकरी व किरकोळ उदमीही त्यांजपासून कर्ज घेऊ लागले आहेत. ते तारण किंवा दस्तैवज घेत नाहीत, आणि हंगामापर्यंत वाट पाहण्याचे कबूल करतात. त्यांमुळे गिऱ्हाइकाला बरे वाटते, आणि मग रुपयाला दरमहा एक ते चार आणे सुद्धां व्याज किंवा नफा देण्याचें तें कबूल करतें. सरासरीने त्यांचे व्याज दरमहा दर रुपयाला दोन आणे पडते. यदाकदाचित् त्यांनी दस्तैवज करून घेतला तर ते त्यांत कर्जाचे तिप्पट रकमेचा भरणा दाखवितात, आणि स्टँपाचा खर्च, मनोती, महिन्याचे व्याज, धर्मफंड अगाऊ कापून घेऊन बाकी रक्कम कुळाच्या पदरांत टाकतात, असा चहूंकडे बोभाटा आहे. एका रोहिल्याने कोर्टापुढे साक्षींत सांगितले की, मुसलमानांजवळून व्याज घेणे निषिद्ध असल्यामुळे आम्ही मुसलमानांकडून व्याज घेत नाही. इकडील मुसलमानांना ही ढील मिळते हे त्यांतले त्यांत बरे आहे. पण तिचा सर्व वचपा ते हिंदूंवर काढतात. उगवणीसाठी त्यांना स्टँँप, रजिष्टरकचेरी, किंवा कोर्ट यांची गरज लागत नाही. वायदा भरला की, दोन तीन जवान पलटणीतल्या शिपायासारखा पोषाक करून चाबूक सोटे घेऊन निघतात, आणि तांबडे फुटले नाही तोच ते आक्राळ विक्राळ स्वरूपानें कुळाच्या दारांत दत्त म्हणून उभे राहतात. फिरून ये म्हटले की, आपल्याभोवती चक्कर देऊन तेथेंच उभे, दम धर म्हटले की नाक दाबलेंच. कुळाला उसासा म्हणून ते टाकू देत नाहीत, व बायकांना पाण्याला किंवा पुरुषाला कामाला देखील घराबाहेर निघू देत
नाहींत. वेळेवर ते त्यांना गैरकायदा अटक किंवा मारपीट करतात, बायकांची अब्रू घेण्याची किंवा तोंडांत थुंकून धर्म बाटविण्याची अगर गांवच्या मारुतीला उपटून बांधून नेण्याची दहशत घालतात. कोणत्याही लोकांत बायका आणि धर्म ह्या बाबी किंती नाजूक आहेत आणि त्यांप्रीत्यर्थ लोक जिवाचीसुद्धां पर्वा करत नाहींत हें नव्यानें सांगितलें पाहिजे असें नाहीं. तेव्हां बायकाधर्मावर मजल येऊन बेतली म्हणजे वेळेला गांवचा तिऱ्हाईत पैसा भरतो, आणि पठाणांचे मगरमिठीतून देणेदाराला सोडविण्याचे पुण्य जोडतो. त्यांची जरब इतकी बसली आहे कीं, लोक हें सर्व निमूटपणें सहन करितात, हूं का चूं करीत नाहींत, किंवा फिर्याद देण्याला अगर त्यांचेविरुद्ध पुरावा करण्याला धजत नाहीत. त्यांच्या छळाच्या व अब्रू घेण्याच्या भीतीनें कोठें कोठें भेकड गांवढेकरी परागंदा झाल्याचीसुद्धां जनवार्ता आहे. हे एका वर्षाचे आंत रुपयाला रुपाया काढतात. त्यावरून लोक किती बुडत असतील ह्याची अटकळ कोणालाही येण्यासारखी आहे. यांच्यासंबंधानें दुसरी गोष्ट अशी आहे कीं, ह्यांतले पुष्कळ पक्के गुन्हेगार असतात. ते उचलेगिरी करतात, दरोडे घालतात, जुवा खेळतात, गैरकायदा दारू व अफू विकतात, खोटे दागिने, खडे, व नोटा चालवितात, आणि धन्यापाशीं पहिल्यानें साक वाढवून पुढें त्याचे तगाद्याचे पैसे गट्ट करतात. गांवच्या लुच्यासोद्यांची व ह्यांची चांगली दोस्ती असते. सडेफटिंग असल्यामुळे ते व्यभिचार करतात, व डांगाणाचे जंगलांत ते दारूही गाळतात. सारांश, दमकोंड्यांचा व्यापार जळजळाटाचा आणि चालरीत लबाडीची आहे. ह्या मुलखांत ते पापपुण्याची भीति

-----

 १ असाम्यांना छळून ठोकून त्यांनीं पैसे काढून घेतल्याचीं उदाहरणें वाटेल तितकीं मिळतील. परंतु पैशासाठीं ते कोठवर गळ टाकतात याचा एक चमत्कारिक मासला खानदेशांत चोपडें येथें १९०८ सालीं पहाण्याला मिळाला. तेथील पठाणांनीं एका कुट्टीनीमार्फत एका बारा तेरा वर्षांच्या हरदासणीच्या बापाला १५० रुपये देऊन तिच्याकडून नवऱ्याला काडी मोडून देवविली, आणि असा सौदा केला कीं, तिला लेणें, खाणें, पिणें द्यावें व तिनें कसब करून सर्व कमाई त्यांना द्यावी !
न धरितां निव्वळ पैसे कमावण्याला आले आहेत. माल किंवा पैसा पेरण्यापुरती मुशाफरी करावी, व मुलखाला जावे आणि सुगीचे दिवसांत परतून गच्च तुंबडी भरून पुन्हां घरचा रस्ता सुधारावा, हा त्यांचा सध्याचा क्रम आहे. ही तैमुरलंगी किती दिवस चालू ठेवावयाची ह्याचा निकाल लावण्याचे सामर्थ्य लोकांपेक्षा सरकारला आहे.


गांव-गाडा.pdf