गांव-गाडा/वाट-चाल

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchवाट-चाल.
----------

 एकमेकां साह्य करूं । अवघे धरूं सुपंथ ॥ तुकाराम.

 गांव-गाडा मूळ भरणारा कुणबी आणि वहाणाराही पण कुणबीच आहे. जसजशी राजकीय, सामाजिक, धार्मिक कामाकाजांत त्याला इतरांच्या साह्याची गरज पडली, किंवा त्याची व त्याच्या साथीदारांची लहर लागली; तसतशी भरितांची संख्या भडकतच चालली. जो आला तो कुणब्याच्या जागेतून जागा काढून बसला. जोपर्यंत कुणबी अकलेने व मेहनतीनें सावध आणि तो व आंगतुक असे दोघेही सारखे गरजू होते, तोपर्यंत ही भरती दोघांनाही उपकारक झाली, आणि कुणबी व कारूनारू ह्यांचे गोवत्साचे नातें चालू राहिले. कारूनारूंच्या संघांसारखे लहान लहान जनसमुदाय बहुधा अल्पप्रयत्नाने व अल्पकाळांत एकदिल होतात. परंतु कुणब्यासारखा विखरलेला जनसमाज आळेबंद राहत नाही, व त्याचा व्यवसाय लोकसंमर्दापासून फार तुटक असल्यामुळे तो चौकोनी न राहतां लोकव्यवहारांत अगदी लुळा पडत जातो. इतरांची मिळकत जशी झांकून तशी कुणब्याची उघडी असते. त्याचे पिकलेले शेत, सुडी व रास, सर्वांना पटकन दिसतात. त्यामुळे ज्याची त्याची प्रवृत्ति त्यांतून आपणाला जितके मिळेल तितके काढण्याकडे झाली, आणि कोणीही त्याला पारठे पडू देईना. जातिधर्म व जात-कसब ह्यांचे बंड माजत गेल्यामुळे कारूंच्या व्यवसायाला स्थिरता आली; इतकेच नव्हे तर ज्या त्या जातीची आपापल्या कसबाच्या कामांत इतरांवर कुरघोडी सुरू झाली. एक जात दुसरीच्या कामांत हात घालीनाशी झाली. ह्याचा परिणाम असा झाला की, जातकसब सोडून दिले तर प्रत्येक जात प्रपंचास जरूर अशा परजातीच्या कामांत गैरवाकबदार व परावलंबी झाली; आणि अमुक जात पोट जात किंवा पंथ नसला तर आपलें अमुक अमुक काम अडेल, ते कोणी करणार नाही, असा एकमेकांबद्दल भीतिभाव सर्वत्र उत्पन्न झाला. राजानुशासनाचा संबंध नसतांनाही असल्या सामाजिक व धार्मिक स्थितीमुळे गांवगाड्यांत रेटारेटी सुरू झाली; आणि बहुतेक भार कुणब्यावर पडून कारूंची सोय होणार असल्यामुळे कुणबी नको म्हणत असला तरी इतरांनी त्याचे म्हणणे मोडून काढून वतनदारांच्या भरतीला वरचेवर उत्तेजनच दिले. तिला विरोध करण्याइतकें तेज त्यामध्ये न उरल्यामुळे म्हणा, किंवा आपण किती भार उचलतों ह्याचा उमज त्याला न पडल्यामुळे म्हणा, किंवा माझ्यांत सर्व दुनियेचा वाटा आहे ह्या धर्मसमजुतीने म्हणा, कुणबी हटतच गेला. अशा रीतीने गांव-गाड्यांत कारूंना नारू येऊन मिळाले आणि दोघांचेही लटांबर उमाप फुगून तो कुणब्याच्या बाजूनें पार एकारला. ह्या सबंध खोगीरभरतीवरून नजर फिरविली तर काळीच्या उत्पन्नाच्या वाटणीसंबधाने कुणबी गाय आणि कारूनारू तिला झालेली खऱ्या कळकळीची वासरे हे नाते नांवाला मात्र राहिले, आणि सर्व अडाणी कुणब्याला तोडण्याच्या कामी एक होऊन त्याला हात आंखडू देईनातसे झाले. कुणब्याचा समाज अफाट आणि पांगलेला असल्यामुळे त्याला अडाण्यांना प्रतिरोध करितां येईना; इतकेच नव्हे, तर त्यांजकडून जें आपलें काम करून घ्यावयाचें तें सुद्धां चोख व वक्तशीर करून घेण्याची ताकद व जूट त्यांत राहिली नाही, आणि तो एकसारखा चेंगरत गेला. 'तोबऱ्याला पुढे व लगामाला मागें' असे होऊन कुणब्याच्या कामाची अडाणी टंगळमंगळ करूं लागले, तरी त्याला त्यांचे हक्क पुरे-नव्हे वाढत्या प्रमाणांत-चुकते करावे लागतात. कुणबिकीवर ताव मारण्याला जरी सर्व अडाणी एक होत; तरी जातिभेदामळे एका जातीचे वतनदार दुसऱ्या जातीच्या वतनदारांपासून अलग राहिले, व एकंदर गांवाच्या सामान्य हिताकडे न पाहतां आपापल्या विशिष्ट हितावर नजर देऊ लागले.जातकसबामुळे एका घरीं केणे येऊन एकमेकांना एकमेकांची मनें सदैव राखणे दुरापास्त झाले. तेव्हां जरी सर्वजण गांवगाड्यांत शिरले तरी त्यांचे हितसंबंध एक राहिले नाहीत, एवढेच नव्हे तर अनेक बाबतीत हितविरोध व मत्सरही सुरू झाला. आणि त्याच्या सर्वांग डागडुजीकडे कोणाचेच लक्ष नसल्यामुळे तो खिळखिळा झाला. कोणत्याही कारणानें कोणाचे उत्पन्न वाढले, म्हणजे दुसरा त्याच्याकडे पाहून हाय हाय करतो. महारांनी गांवच्या ढोरांनाच कातडें विकलें तर समस्त गांवाला कातडी काम स्वस्तांत पडेल. स्वहितासाठी महार तें व्यापाऱ्यांना विकतात, आणि रगड पैसे मिळवितात. ते महाग झाल्यामुळे चांभारांना कूस कमी राहते, आणि ते कुंथत बसतात की, महारांसारखे दैववान कोण आहे, चांभाराचे जिणे फार वाईट. असो. सामान्य हिताविषयी बेपरवाई आणि एकमेकांचा हितविरोध निर्माण झाल्यामुळे गांवगाड्यांत जरी पुष्कळ भरती झाली, तरी तो धडधाकट ठेवण्याची कळकळ, व त्याच्या उट्या काढण्याची खटपट व ताकद त्याच्या भरितांतून व्यक्तिशः व समुच्चयाने नाहीशी झाली. पाटलाच्या पोटांत शिरून शेटजी त्याच्या पडवीत दुकान लावून अखेर पाटीलगढीचा धनी कसा होतो, ह्याचे हृदयंगम वर्णन लोक गांवोगांव करतात. व्यापाऱ्यांना सवलतीने व सच्चेपणाने व्यापार करण्याचे भाग पाडण्याइतकी जूट, अक्कल, नेट व प्रामाणिकपणा, गांवकऱ्यांत नसल्यामुळे दक्षिणेतली पुष्कळ गांवें सावकारांच्या घशांत उतरली. आणि त्यांचाही करडा अमल कुणबिकीवर गाजू लागला. 'बळी तो कान पिळी, ' ह्या न्यायाने सर्व थोतांडी व गुन्हेगार लोक व जमाती ह्यांनाही मोकळे रान सांपडून त्यांनी गांवगाड्याची विचकाविचक, व मोडतोड केली. आज जे दुराचारी व शिरजोर स्वधर्मी परधर्मी भिक्षुक हिंदु गांवकऱ्यांकडून हक्काने उकाळा करतात, आणि ज्या अनेक आडदांड चोरट्या, स्थाईक अगर फिरत्या जमाती हक्काने खळी उकळतात, त्याचे कारण असें आहे की, त्यांच्या अपहारास बंदी करण्याचे सामर्थ्य समाजांत, धर्माधिकाऱ्यांत, व पूर्वीच्या राजेरजवाड्यांत नव्हते. तेव्हां एकंदर हिंदु समाजाची गांवापुरती चिमणीशी पण सर्वांग प्रतिमा जो गांव-गाडा त्यामध्ये पूर्वोक्त व्यक्ति व जमाती ह्यांना तोंड देण्याइतकी सत्ता कोठून येणार ? ह्याप्रमाणे घरचे, दारचे, पै, पाहुणे, कामकरी, आयतखाऊ, भले, बुरे, सर्वच गांव-वतनदार बनले; आणि अगोदरच खिळखिळा
झालेला, मोडकळीस आलेला, आणि ठालाठेल भरलेला गांवगाडा सफई फसला. तो आतां रिचवून उलगडून पुनः वेठल्याशवाय चालणार नाही.

 गांव-गाड्याच्या सांठीच्याही वर गेलेले हे भरताड आपेआप ओसरेल किंवा हां हां म्हणतां आपलें ठाणे सोडील अशी आशा करण्यांत अर्थ नाही. नवें नवें करणा-या सुशिक्षित पाश्चात्य समाजांत देखील खात्री पटवूनही लोक लवकर जागचे हालत नाहीत व नवीन सुधारणा पत्करीत नाहीत, तर आमच्या रूढिबद्ध आशिक्षित व एकलकोंड्या समाजास सर्व बाजूंनी चलन मिळण्याला पुष्कळच काळ लोटला पाहिजे. तरी पण हे इष्ट स्थित्यंतर घडवून आणण्याला जितक्या तातडीने आपण लागू तितकें बरें. गांव-गाड्यांत आतां अव्वलचा जोम राहिला नाही, तरी 'गांव करील तें रावाच्याने होत नाही' असें कांहीं काही गोष्टींत अजूनही दिसन येतें'. गांवकऱ्यांचा एक विचार झाला तर सध्यांच्या कायदेकानूनी जे काही थोडे फार स्वातंत्र्य गांव-गाड्यांत ठेविलें आहे ते त्याने कामी आणण्याला बिलकुल कचरूं नये. गांवकऱ्यांना स्वतःच्या कर्तुकीवर करता येण्यासारखें जे आहे त्यांत अग्रस्थान फिरस्त्यांच्या गमजा चालू न देणे ह्या कृत्याला दिले पाहिजे.

 परमेश्वर कोणत्या रूपाने येऊन सत्त्व घेऊन जाईल ह्याचा नियम नाही; 'माय मरो पण आस न मरो'; बहुभाग्याने मिळते म्हणून

-----

 १ अहमदनगर जिल्ह्यांत आकोले तालक्यांत बेलापूर गांव आहे. तेथले शेतकरी इतके दक्ष आणि आळेबंद आढळले की, आजूबाजूच्या आलुत्याबलुत्याचा धारा काहीही असेना, त्यांनी आपला आदा व त्यांच्या कामाचें हल्लींचे मान पाहून त्यांत छाटाछाट केली, वाणी लोकांशी उधारीचा व्यवहार बंद केला, आणि गुरवासारख्या पुजारी कारूच्या गळ्यांत चावडी झाडणे, सारवणे व आल्यागेल्या प्रतिष्ठित गांवपाहुण्याची खिजमत करणे इत्यादि कामें घातली. त्यांच्या दक्षतेमुळे गांव इतका सुधारला की, दुष्काळात सुद्धा तो बेबाक राहिला, त्याने १९०६ पर्यंत तगाईचा छदाम उचलला नाही, आणि तेथले कुणबी दोन पैसे बाळगून एकमेकांच्या गरजा वारणारे दिसले. गाड्याचा माग फांसाट्याने तरी काढला पाहिजे, आणि कोणी आला तर त्याला विन्मुख न परतवितां घांसांतून घांस काढून दिला पाहिजे; असल्या भोळ्याची तळी भरली पाहिजे. ज्याने त्याने आंग झिजवावें व खावें, हा ईश्वरी संकेत आहे. चोरट्या, भिकार व इराण्यांसारख्या दंडेल जाती ह्यांना गांवकऱ्यांनी निर्भिडपणाने एक मुसंडीने तोंड द्यावें, आणि ज्याचा माल त्याचे हाल होऊ देऊ नयेत. निश्चयाचे बळ असल्यावर चार पांच वर्षांत त्यांना फळ मिळेल, आणि त्यांचा हात थोडा फार तरी चालेल. गोसावी, बैरागी, फकीर, मानभाव, वारकरी, वासुदेव, पांगुळ, जोशी, तिरमल, देवीचे नाना पंथांचे भगत, खोटे-नाटे आंधळेपांगळे, विकल वगैरे जे बऱ्हाणी अशिक्षित भिक्षुक असतील, त्यांना मुळींच भिक्षा घालू नये. कोणी उपाशींच मरूं लागला तर ज्याच्या त्याच्या माफक काम देऊन पराकाष्ठा तर सढळ रोजंदारी द्यावी. फिरस्त्यांपैकी जे हुन्नरी असतील त्यांच्या कामाबद्दल किंवा मालाबद्दल रोकड मोबदला द्यावा, धान्य भाकरी वगैरे देऊ नये; कारण त्यांत श्रम व कसर फार जाते. त्यांचे सर्व काम गांवचे कारूनारू व दुकानें ह्यांजकडून भागण्यासारखे आहे, व त्यांच्या फेऱ्यांचे काही प्रयोजन उरलें नाही. पण त्यांना येण्याजाण्याची मनाई करणार कोण ? ह्यासाठी स्वस्त असेल तरच ह्या बिछाइत्यांशी सौदा करावा, आणि काही झाले तरी फिरस्त्यांनी व त्यांच्या जनावरांनी कोणालाही उपसर्ग लावतां कामा नये.

 पांखरा-जनावरांसंबंधानेंही ज्या भोळवट धर्मसमजुती आहेत, त्यांना खो मिळाला पाहिजे. हौसेसाठी, उपयुक्ततेसाठी अगर भूतदयेसाठी पांखरें जनावरें पोसणे वेगळे; आणि धर्मभयाने त्यांना पोसणे किंवा जीवदान देणे वेगळे. दुसऱ्या प्रकारांत शिरजोरपणा वाढून लफंगपणास उत्तेजन मिळतें. जान्या ( देवाच्या नावाने सोडलेल्या ) गाई, पोळ, टोणगे. बोकड इतके उन्मत्त होतात की ते शेतांत घुसून पिकांची अतोनात नासाडी करतात; बाजारांत चारा, दाणा, फळे वाटेल तितकी खातात, व माणसाजनावरांच्या अंगावर जाऊन त्यांना जायबंदी करतात, नव्हे वेळेवर ठार करतात. चांगली जोपें निपजण्याकरितां रगदार
जनावरें पाहिजेत हे खरे; पण खाल्लेलें जिरविण्यास प्रमाणशीर काम मुळींच नसल्यामुळे त्या कामालाही ही मस्त जनावरें थोडक्या अवधीत निरुपयोगी होतात, आणि मरेपर्यंत त्यांचा धिंगाणा मात्र सोसावा लागतो; असा खडतर अनुभव येतो. दुभत्या गाईम्हशींना माफक काम दिलें तर त्या दुधाला चढतात, असा पाश्चात्यांचा अनुभव आहे. सरकार ज्याप्रमाणे वळू घोडे किंवा पोळ ठेवून कोणाला उपद्रव न होता त्यांजकडून काम घेते, त्याप्रमाणेच आपण केले पाहिजे. राखण-खावटीचा अंदाज करून एखाद्याने पोळ ठेवावा, आणि माफक फळणावळ घेऊन तिच्यांतून त्याचा खर्च काढावा. तेव्हां 'धर्मावर सोमवार' म्हणून देवांच्या नांवानें जनावरे सोडण्याच्या विरुद्ध व अशा जनावरांकडून आवश्यक तितकें काम घेण्याला अनुकूल असें लोकमत जागृत झाले पाहिजे, म्हणजे ती किफायतशीर रीतीने बाळगण्यास लोक तयार होतील व त्यांची तोषीस सबंध गांवाला लागणार नाही. जणों काय गांवावर पोळ सुटला, हा भाषणसंप्रदाय आतां बंद झाला पाहिजे. जसा देवाला वाहिलेल्या माणसांचा अधर्म पाहून वीट येतो तसाच देवांच्या नांवाने सोडलेल्या जनावरांची स्थिति व उपद्रव पाहून येतो. गाईला लोक पूज्य मानतात आणि तिने कशांतही तोंड घातलें तरी तिला कोणी मारीत नाही. ह्या धर्मसमजुतीचा फायदा घेऊन सर्व जातींचे लोक गाईना शेतांत व दाणाचाऱ्याच्या बाजारांत मोकार सोडतात. आणि त्या तेथें जोगावतात. कसायाच्या हातून गाई सोडविणे पुण्य आहे. ह्या धर्मसमजुतीचा फायदा घेऊन वऊन पुष्कळ ढोंगी लोक धर्मशील हिंदू-जैनांकडून पैसे उपटतात. त्यांना हा एक रोजगार झाला आहे. हे खरें गोरक्षण आहे काय, ह्याचा शांत मनानें विचार करावा. ज्याला ऐपत नाही त्याने लोकांच्या जिवावर गाई का बाळगाव्यात,आणि असले धंदेवाले आज पैसे घेऊन उद्या पुन्हा कसाबाला जनावर विकणार नाहीत कशावरून? त्यांना बाजारभावापेक्षा जास्त पैसे देऊन त्यांच्या लुच्चेगिरीस उत्तेजन देण्यांत काय पुण्य आहे ? जोपर्यंत लोक गोमांस भक्षितात तोपर्यंत गोरक्षणाचे असले प्रयत्न करणे म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे. गोरक्षण अत्यंत उपयोगी आहे आणि तें फलप्रद मार्गानी झालेही पाहिजे. परंतु परस्पर गाईचा खर्च काढणाऱ्यांना तो तसा काढू देऊ नये, आणि परधर्मीयांशी ह्या कामी हिंदू-जैनांनी वितंडवाद घालू नये, व आपला पैसाही दवडू नये. संघटित प्रयत्नांनी हाच वायां जाणारा पैसा चांगली खिल्लारे तयार करवून जनावरांची पैदास व संख्या, आणि त्यांच्या द्वारें दुधातुपाचा पुरवठा सुधारण्यांत खर्च पडला तर खरें गोरक्षण होईल. जातां जातां भूतदयेचे एक दोन अपवादास्पद प्रकार सांगतो. गाईंना व कुत्र्यांना भाकरी चारण्याचा पुष्कळ लोकांचा परिपाठ आहे. मारवाडी गुजराती बहुधां रोज गाईकुत्र्यांना भाकरीचा तुकडा टाकतात. त्यामुळे मालकांना आंच लागत नाही, रोडकी जनावरें व मोकार मांजरें कुत्रीं गल्लोगल्ली मैला खातांना दृष्टीस पडतात, आणि जनावरांची अवलाद दिवसेंदिवस हलकी होत चाललेली आहे. गाढवेंही मोकार सुटत असल्याने हाच प्रकार दृष्टीस पडतो. अशा जनावरांचा व्हावा तितका उपयोग होत नाही, आणि 'एक धड ना भाराभर त्या चिंध्या' मात्र वाढतात. दारसुन्या कुत्र्यांमध्ये पिसाळलेल्यांची संख्या वाढून अतिच त्रास होतो, आणि असा काळ आला आहे की, त्यांना खच्ची करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्ध्याकोर भाकरीने अगर उकिरडा घोळण्याने गाई, मांजर, कुत्री किंवा गाढवे ह्यांचे पोषण होते असे नाही; मात्र त्यांना वर्षानुवर्षे उपवासांत काढावी लागतात. तरी वाई येथील गोशाळेच्या धर्तीवर ह्या दानधर्माला व्यवस्थित स्वरूप दिले तर चांगली जनावरें पैदा होण्याला व पोसण्याला मदत पोचेल, आणि हालांत राहणाऱ्या मरतुकड्या जनावरांची संख्या कमी होईल. गाढवांप्रमाणे डुकरेंही मोकार असल्यामुळे पिकांची खराबी करतात. फांस-पारधी, व क्वचित् मुसलमान पांखरे धरून अहिंसाधर्माच्या अनुयायांकडून पैसे उकळतात. त्यांना हा रोजगार झाला आहे. प्रज्ञायुक्त धर्मकल्पनांचा प्रसार झाला तर असल्या अनाचारास खात्रीने चांगले वळण लागेल. मोकार पशुपक्ष्यांना अन्न घालण्यापेक्षा ऐपतीप्रमाणे ते बाळगून हौस अगर धंदा करण्याची प्रवृत्ती बळावेल तर मोकार जनावरांकडन होत असलेली लोकपीडा दूर होऊन शेतीचा आनुषंगिक असा एक पशुपक्षीविक्रीचा धंदा कुणब्याला किफायतशीर रीतीने करता येईल.

 अनुभवाअंती सरकाराने जे कारूनारू निरुपयोगी ठरवून सरकारच्या व गांवच्या नोकरीतून वजा केले, त्यांना काळी-पांढरीत काहीएक हक्क देऊ नये. कालमानाप्रमाणे सर्व नारू व तिसऱ्या ओळीचे कारू-भट, गुरव, कोळी, सोनार, रामोशी, जंगम, मुलाना, ह्यांचे गावकीचे काम बहुतेक नाहीसे झाल्यासारखे आहे. दुसऱ्या ओळीचे कारू-कुंभार, परीट, न्हावी, मांग ह्यांनाही म्हणण्यासारखें गांवकीचे काम पडत नाhही. भराडी,गोंधळी, कार्याच्या वेळी गोंधळ व वाघ्ये, मुरळ्या,जागरण घालतात. सणाच्या दिवशी तांबोळी दमडीटोलीची विड्याची पाने देतो आणि गुरव दोन चार पत्रावळी टाकतो, पण त्याच्या वीस पंचवीस पट किंमतीचे वाढणेंं त्याच दिवशी दोघेही घेऊन जातात. अलीकडच्या फिरलेल्या काळात भट, जंगम, सोनार वगैरेंचे कामही फार जुजबी पडतें. मडकी, स्वस्त टिन व एनामेल वगैरेंची भांडी, साबण, दोरखंडे रोखीने मिळू लागली तशी कुंभार, परीट, मांग ह्यांच्या कामाला आटण कळा आली आहें. कुणब्याची हजामत सरासरीने पंधरा दिवस तें एक महिन्याने होतें, व मोठ्या माणसांच्या हजामतीस पाव अर्धा आणा पडतो. बरेच लोक डोकें ठेवू लागल्यापासून, व कांहीं कांहींनी स्वतः दाढी करण्याला सुरुवात केल्यापासून न्हाव्याचे काम पुष्कळ कमी होत चालले आहे. तेव्हा सर्व नारू आणि दुसऱ्या व तिसऱ्या ओळींचे कारू ह्यांची जरूर पडेल तेंव्हा त्यांना मेहनताना द्यावा. त्यांनी तो कितीही जास्त मागितला तरी वर्षानुवर्षे आलुतें बलुतें, वाणगी आणि सणावारांची वाढणी व पोस्त ह्यांपेक्षा तो खात्रीने कमी पडेल. पहिल्या ओळीपैकी चांभाराची गरज बागाईत शेतकऱ्यांना जास्त लागते. बहुतेक चांभारकाम विकत पडतें. तेंव्हा चांभारांचे सुद्धां बलुते काढून त्याला रोख मेहनताना देण्याचा परिपाठ घातल्यास वावगें नाही. लांकूड दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. लोखंड लांकडापेक्षां काम चांगलें देते. टाटांच्या कारखान्यांतून लोखंड मुबलक बाहेर पडूं लागलें तर शेतकामाकडे लांकडापेक्षा लोखंडाचा उपयोग अधिक होणार आहे, हे लक्षात आणून सुताराची ओळ बदलणे व्यवहार्य दिसते. महार जागले ह्यांच्या कामांत जी सरकारची व रयतेची सरकत आहे ती तुटली पाहिजे; आणि दुकानदारांनी दुकानामागें दोन चार आणे व कुणब्यांनी पट्टीत रुपयामागें पै दोन पै देऊन त्यांना रोख नेमणूक करून देण्याचे लोकलबोर्डमार्फत सरकाराकडे सोपवावें. त्याशिवाय त्यांची पीडा दूर होणार नाही. बलुतेंआलुते हे कारूनारूंचा मुशाहिरा होय. तो देशपरत्वें खाण्याच्या मुख्य धान्याच्या रूपाने द्यावयाचा असतो. दुसरें धान्य केल्यामुळे अगर इतर कारणामुळे जर मुख्य धान्य देणे शक्य नसेल, तर त्याचा मोबदला दुसऱ्या पिकानें किंवा रोकडीने भरून काढावयाचा असतो. हा मूळ कयास आतां राहिला नाही. त्यामळे कारूनारूंच्या मागणींत पहिल्याने मोहबत व भीक आणि पुढे अडवणुक शिरून ती विनाकारण फाजील फुगली आहे. त्यांना जमिनी नसल्या तरी ते बी-भरण घेतात, मुख्य आयाखेरीज शेतांत पिकेल त्याची वाणगी उपटतात व चोऱ्या करतात; आणि रयतवारी पद्धति, अधिकारविभागात्मक राज्यसुधारणा व व्यापारवृद्धि ह्यांमुळे त्यांची मामूल कामें सुटली किंवा हलकी झाली, तरी रयत-घेण्यांत ते यत्किंचित् मुजरा घालीत नाहीत. हा अन्याय-नव्हे-जुलूम आहे. आज कारूनारू कुणब्याजवळ शेतमाल मागतात, तेव्हां असें म्हणत नाहीत की 'इतके काम केले व त्याची मजुरी इतकी होते;' तर 'माझा प्रपंच एवढा मोठा आहे आणि एवढ्यांत माझें कसें भागावें !! जणों काय काम करो किंवा न करो व त्याची किंमत काही असो, कुणब्याने सर्वांचा प्रपंच चालविण्याचा वांटाच उचलला आहे . क्वचित् ठिकाणी मोठ्या जमीनदारांनी आपल्या गड्यांना सुतारकाम, लोहारकाम शिकविलें आहे; व तें त्यांना बलुत्यापेक्षां फार स्वस्तांत पडतें सबब पहिल्या ओळीचे कारू आज निव्वळ कुणबिकींचें काम (ह्यांत इतर कारूनारूंच्या व गांवकीच्या कामांचा समावेश अगदीं करूं नये.) किती करतात, ते कोणत्या प्रतीचे करतात व ढळत्या अंदाजाने त्याची मजुरी काय होते, ह्याचा हिशेब करावा; आणि त्या निरखाबरहुकूम कुणब्याने बलुतें द्यावे, अशी स्थिति निर्माण केली पाहिजे. गांवकऱ्यांना शेतकी सभांनी ह्या कामांत समज व मदत दिल्यास त्यांचे डोळे उघडून ते आपला फायदा करून घेतील. ह्या ठरावाव्यतिरिक्त कुणब्याने एक चुई कारूंना देतां उपयोगी नाही. ह्याप्रमाणे 'चाकरी आणि भाकरी' ह्यांची हिशेबी सांगड घालून दिली म्हणजे आज जें महार, मांग, भील, रामोशी ह्यांचें पेंढार आणि कामांपेक्षा सुतार, लोहार, चांभार ह्यांचे संख्याधिक्य गांवोगांव दृष्टीस पडतें ते ओसरेल, आणि कामाच्या मानानें कामकरी राहिले म्हणजे सर्वाना भरपूर काम व पोटभर दाम मिळून कुणब्याच्या मागचे जंजाल तुटल्यासारखे होईल.

 रात्र फार झाली व कथळ्याचा निकाल लागला नाही, ह्मणजे काही काही जंगली जाती तो पाटीखाली झांकन ठेवतात; व दुसऱ्या दिवशी फिरून पंचायत जमली ह्मणजे पाटी उघडून तो अपुरा राहिलेला वाद पुनः सुरू करतात. तशी अवस्था वरील योजनेने होणार आहे. कुणबी आणि कारूनारू ह्यांचा व्यवहार रोकडीचा झाल्याशिवाय तो चोख हाणार नाही. जे कुणबी रोकड पैसा देऊन बलुत्यांकडून कामें करून घेतात, ती त्यांना मनस्वी स्वस्त पडतात. तेव्हां ज्यांना शक्य त्यांनी ताबडतोब रोकडीने बलुत्यांची कामें घेण्यास सुरुवात करावी. ऐनजिनसी बलुत्यापेक्षा शेतमालाचे टक्के करून जर कुणबी कारूनारूंना देईल तर पैसा मोडण्याची पाळी आल्याने तो जास्त चौकस होईल. खेड्यांत पैसा दृष्टीस पडल्यामुळे कारूनारू काम जास्त आस्थेनें करतील. 'कमी आलें जास्त गेलें' अशी दोघांचीही तक्रार उरणार नाही, आणि आलुत्याबलुत्यांना शेतमालाची किंमत नसल्याने तो ते वाटेल तसा वाण्याला घालतात व त्यामुळे धान्याचे भाव उतरून कुणब्याचे जें नुकसान होतें ते होणार नाही. ह्याप्रमाणे रोकडीचा व्यवहार झाला तरी त्यांतली उधारी मोडल्याशिवाय खेडी सांवरणे अशक्य आहे. रोकडीने कुणबी व कारूनारू ह्यांची जखडबंदी सैलावेल इतकेंच. पण 'हा दाम व हें काम' अशी रोखी सुरू झाली तर मात्र कुणबी व कारूनारू हिशेबी बनतील, उभयपक्षी खरी पोट-तिडक लागेल, आणि 'उधारीचे खातें सवा हात रितें' ही खेड्यांतली रड-कथा पुष्कळ कमी होईल. फिरस्त्यांच्या दाभाडांतून सुटून कुणबी कारूनारूंशी 'रोख भाई ठोक' असा व्यवहार करूं लागला म्हणजे तो आपला बाजारही रोखीने करण्यास शिकेल, आणि त्याचा खात्रीने फायदा होईल. सध्या यात्राच यात्रा बोकाळल्या आहेत. त्यांत गांवकरी फुकट खर्चाच्या भरीस सालोसाल पडतात, आणि लुच्चे, सोदे दुकानदार गिऱ्हाइकांना बुडवितात. ह्यासाठी यात्रांची संख्या कमी झाली पाहिजे, म्हणजे त्याबरोबरच परधर्मातले देव, उत्सव व त्यांचे भक्त हेही हटतील. ख्यालीखुशाली, अन्नसंतर्पण ह्यांसाठी पूर्वीचे राजे यात्रांना नेमणुका देत होते. आतांचे सरकार ज्ञानार्जनासाठी काय ती मदत देते. तिचा फायदा घेऊन कलोत्तेजन, ज्ञानसंपादन, व मनोरंजन ह्यांची पीठे यात्रा कशा करतां येतील यासंबंधानें दुकानदारी ह्या प्रकरणांमध्ये सूचना केल्या आहेत, त्यांचा जरूर तो विचार व्हावा.

 हिंदुस्थानांत सध्या अजमासाने शेकडा ९४ लोक निरक्षर आहेत, आणि शाळेत जाण्याजोग्या शंभर मुलांपैकी सुमारे १७।१८ काय ते शाळेत जातात. जोपर्यंत कुणब्यांना व अडाण्यांना तिसरा डोळा नाही, तोपर्यंत ग्राम-सुधारणा हा विषय निव्वळ मनोराज्यांत वावरणार. सरकाराने आजपर्यंत मिळविलेल्या व प्रत्यही मिळवीत असलेल्या नानाविध माहितीवरून आमचा समाज सुधारणेच्या कोणत्या पायरीवर आहे ही गोष्ट बहुजनापेक्षां सरकारला जास्त स्पष्ट झाली आहे. सरकाराने चलन दिल्याशिवाय लोक आपापली इष्ट सुधारणा करतील असे म्हटले तर बहुतेक कपाळाला हात लावून कालक्रीडेकडे टकमक पहात बसण्याची पाळी येणार आहे. तेव्हां वरील योजना अमलांत येण्यासाठी सरकाराने आमचा पांगुळगाडा हाकला पाहिजे. सर्व धंदे जातिधर्म होऊन बसल्यामुळे एका जातीच्या इसमाला दुसरीच्या धंद्यांत प्रवेश करण्यास पुष्कळ अडचणी येतात. सबंध इलाख्यांत कलाभुवनें हाताने मोजण्याइतकी देखील नाहीत ! आणि त्यांतही नियमित विद्यार्थ्यांना प्रवेश !! धंदा शिकण्याला सुतार, लोहार, चांभाराकडे तदितराने जावें तर ते म्हणणार की 'तुम्ही आपला वडिलार्जित धंदा करा, आमचा धंदा हिरावून घेऊन आम्हांला भीक मागावयाला लावणार की काय? ब्राह्मणाला सुतार-कारकुनाचे बरें वाटत नाही, कुणब्याला ब्राह्मण-नांगऱ्या खपत नाही, शिंप्याला सोनारशिंपी पहावत नाहीं; फार काय खिस्ती झालेले महारसुद्धां मांगांना गुरें ओढूं किंवा फाडूं देत नाहीत ! ह्याप्रमाणे कोणीही आपलें कसब इतरांला दाखवीत नाही. जोपर्यंत वाटेल त्याला वाटेल तो धंदा शिकण्याला साधनें मुबलक नाहीत, तोपर्यंत लोक जातधंदा सोडीत नाहीत ह्याबद्दल त्यांना दोष देतां येणार नाही. सरकाराने शाळा काढून कारकुनी धंद्यात ब्राह्मणेतर जातींचा शिरकाव होण्याची तरतूद केली आहे.परंतु तीही अद्यापि यशस्वी झाली नाही. शाळेत मुलें घालणे हे आपल्या पिढीजाद धंद्यापेक्षा जास्त किफायतशीर असेल तरच ब्राह्मणेतर आपली मुले शाळेत घालतील. तशी किफायत होण्याला त्यांच्या डोळ्यांसमोर जे साधन दिसतें तें सरकारी नोकरी होय. ती मिळण्याइतकें शिक्षण देणाऱ्या शाळा सबंध तालुक्यांत फार तर दोन क्वचित् तीन असतात. तेव्हां पुरतें लिहिणे येणे आपल्या आटोक्याबाहेर आहे असे म्हणून निरक्षर जाती आपली मुले शाळेत घालण्याच्या भरीस पडत नाहीत. पुष्कळांचा असा अनुभव आहे की, दिवसांतून पांच सहा तास शाळेच्या सावलीत बसल्यामुळे रानांत हिंडणाऱ्या मुलांपेक्षां शाळेत जाणारा नरम पडतो, त्याला ऊन्ह-वाऱ्यांत, थंडी-पावसांत काम करण्याचा सराव लागत नाही, अंगमेहनत करण्याची लाज वाटते, व त्याची मिजास वाढते. इकडे लिहिणे पुरे झाले नाही म्हणून नोकरी मिळत नाही, तिकडे मळखाऊ शेतकाम, सुतारकी, मजूरी, पायपीट वगैरे होत नाही, व खर्च मात्र अधिक करावासा वाटतो, आणि त्याच्या निरक्षर बंधूंचा प्रपंच त्याच्यापेक्षा चांगला चालतो. सबब निराक्षरापेक्षां साक्षरांचा संसार जास्त सुरेख चालतो, अशी खातरजमा झाल्याशिवाय शाळांत ब्राह्मणेतरांच्या मुलांची गर्दी होणें व प्राथमिकापेक्षां दुय्यम प्रतीचेंच शिक्षण जास्त फैलावतें ही तक्रार दूर होणें दुर्घट दिसतें. सन १८९१ तें १९११ पर्यंत दुय्यम शिक्षणाच्या शाळांतील विद्यार्थी दुपटीहून वाढले, पण प्राथमिक शाळांतील काय ते शेंकडा ६७ नींच वाढले. मिशनऱ्यांच्या गांवोगांव फुकट शुाळा व त्यांमधील परोपरीची आकर्षकें असूनही त्यांनीं हातीं धरलेल्या निकृष्ट वर्गात शिक्षणाचा प्रसार होत नाहीं ह्याचें वर्म तरी हेंच आहे. लिहिण्यावाचण्याला 'तिसरा डोळा ' म्हणतात. दोन जाऊन जर तिसरा येत असला तर तो हवा असें कोणीही म्हणणार नाही. पोटाची दोन कामें येऊन जर साक्षरतेचा लाभ झाला तर खरें कल्याण आहे. तेव्हां प्राथमिक शाळेचा तरी अभ्यासक्रम व वेळ असा ठेविला पाहिजे कीं, विद्यार्थ्यांना लिहिणें शिकून आपला पिढीजाद किंवा दुसरा धंदा हस्तगत करण्याला सवड सांपडेल. ओबडधोबड आऊतकाठी तयार किंवा दुरुस्त करण्यासाठीं कुणब्याला आपल्या उत्पन्नाच्या चौथ्या वांटयावर बलुतें द्यावें लागतें. ह्यास्तव प्राथमिक शाळांतून जर सुतारकी, लोहारकी, चांभारकी वगैरे विषयांचें शिक्षण देण्याची सोय झाली तर शाळेत मुलें घातल्यापासून फायदा आहे असें लोकांच्या अनुभवाला फार थोड्या अवधींत येईल. शाळेत धंदेशिक्षण घेऊन जे कुणबी बाहेर पडतील ते आपलीं बलुत-कामें घरच्या घरीं करतील. अशा रीतीनें त्यांची कामें वेळच्या वेळीं होऊन त्यांसाठीं खर्च होणारा पैसा व वेळ वांचला तर इतरांनाही आपलीं मुळे शाळेत घालण्याची उमेद येईल. मि. कीटिंग साहेबांच्या अंदाजाप्रमाणें दक्षिणेंतील शेतकऱ्यांना शेतकाम फार तर सहा महिने पुरतें. तर मग शेतकाम संभाळून त्यांना कारू-नारूंचें काम करण्याला पुष्कळ फुरसत आहे. तिच्यांत त्यांनीं कांहीं आऊतें केलीं तर तों त्यांना विकताही येतील, आणि आपल्या उत्पन्नांत भर टाकतां येईल. सध्यां जातिधर्माप्रमाणें कुणबिकीच्या आउतपैकी एक एक जातीचा कारू करतो, दुसरें दुसरीचा, एवढेंच नव्हे तर सनगाचे वेगवेगळाले भाग वेगवेगळाले कारू बनवितात. तेव्हां हत्यारे किंवा त्यांचे भाग बनविणारा एक, जोडणारा दुसरा, आणि वापरणारा कुणबी तिसरा असली तऱ्हा होते. त्यामुळे त्यांतली वर्मे एकमेकांच्या ध्यानात येत नाहीत व सर्वच आउतें अगदी निकृष्ट अवस्थेप्रत पोचली आहेत. परस्परावलंबी धंदे शाळेंत शिकविले तर हत्यारे एकाच्या देखरेखीखाली तयार होऊन ती सुधारतील, आणि सध्यां नजरेस पडणारे तुटपुंजे कारखाने बसून त्यांच्या जागी मोठ्या प्रमाणावर धंदे काढण्याची व चालविण्याची अनुकूलता कारागिरांना येईल. जोडा कोठे लागतो हे वापरणाराला तेव्हांच कळते. ह्या न्यायानें आउतें वापरणाऱ्या कुणब्याला जर त्यांतली नजर आली तर तो त्यांतले दोष काढून टाकण्यासाठी शक्य तितके प्रयोग करून पाहील, आणि सुधारलेली हत्यारे तयार करील. जातिबाह्य धंद्यांचे शिक्षण सर्व जातींच्या मुलांना सर्रास प्राथमिक शाळांतून मिळू लागले तर जातिधर्माची अथवा जातधंद्याची कांटेरी कुपाटी नाहीशी होईल, हा सर्वात मोठा फायदा आहे.

 खेड्यांतला मुख्य धंदा शेतकी. तेव्हां कुणबी हा खेड्यांतला प्रधान घटक आणि कुणब्यासाठी इतर हे नाते लक्षात आणून खेड्याखेड्यांनी शाळा काढल्या पाहिजेत. शेतकामाच्या हंगामास धरून शाळेचे तास व सुट्या असाव्यात, शेतकाम नसेल अशा दिवसांत शाळा दुवक्त असावी, तें बेताचे असेल त्या वेळी एकवक्त, आणि त्याचा भर असेल त्या वेळी विद्यार्थी शिकविलेलें न बोळवतील इतक्या बेताने म्हणजे सुमारे एक दोन तास शाळा भरवावी. शाळेंत शारीरिक बलवृद्धीला महत्त्व दिलं पाहिजें; आणि अभ्यासक्रम इतकाच असावा की, शिकणाराला बाजारांत अडचण पडूं नये, सावकाराशी तोंड देतां यावे आणि आपल्या धंद्याचे ज्ञान वाढवतां यावे; म्हणजे व्यवहार्य व प्रोद्दीपक शिक्षणाची तरतूद केली पाहिजें. लिहितां वाचतां येणे, पाहिलेली व ऐकलेली वस्तु व हकीगत मजकूर जुळवून सांगतां व लिहितां येणे, उजळणी, देशी चालीची कोष्टकें, (ज्याला परदेशी कोष्टकांचे कारण पडेल ती तो जरुरीप्रमाणे पुढे शिकेल. ) तोंडचे हिशेब, जमाखर्च, पंचराशिक,  व्यवहारी अपूर्णांक, क्षेत्रमापन, व्याज, काळ-काम-वेग वगैरेंची साधीं उदाहरणे, आणि बेताची चित्रकला हे विषय मेहनतीने शिकविले पाहिजेत; म्हणजे आज बहुतेक तात्यापंतोजीच्या शिक्षणक्रमावर भागेल. ह्याशिवाय व्यापार, प्रांतापुरती राज्यव्यवस्था, इतिहास, सृष्टिसौंदर्य ह्यांच्या अनुरोधानें इलाख्याचा भूगोल विद्यार्थ्यांचे हातांत पुस्तक न देतां नकाशावरून शिकवावा; आणि हिंदुस्थानचा भूगोलही व्यापारी बातम्या व वर्तमानपत्रे समजण्याइतका नकाशावरून शिकवावा. इतिहास शिक्षकानें वाचून अगर व्याख्यान-रूपाने शिकवावा. चित्रे व नकाशे काढण्याचे तांत्रिक ज्ञानही मुलांना मिळाले पाहिजे. ह्यांखेरीज सर्वसामान्य ज्ञानावरील पाठ शिक्षकांनी मुलांना वाचून दाखवावेत, आणि दर्शनी ज्ञानाने म्हणजे शक्य तितक्या वस्तु व प्रयोग दाखवून प्रत्यक्ष ज्ञान देण्याची खबरदारी बाळगली पाहिजे. सामान्य ज्ञानाचे शिक्षण जितके जास्त मिळेल तितका आमचा हास्यास्पद देवभोळेपणा नाहीसा होईल. दुष्काळ, प्लेग, पटकी वगैरेंचे सुद्धा आदिकारण देवापेक्षा नैसर्गिक नियमांकडे जास्त येते, ह्या व असल्या गोष्टी लोकांना कळू लागल्या तर भोंदूंचे बंड कमी होऊन जनता योग्य मार्गाने जाईल. सर्वसामान्य ज्ञान ह्या विषयामध्ये माणसा-जनावरांचे आरोग्यशास्त्र, शारीरशास्त्र, हवा, पाणी, स्वच्छता, वनस्पतिशास्त्र, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र, खगोल, पदार्थविज्ञानशास्त्र, यंत्रशास्त्र, वगैरेंच्या रोजच्या व्यवहारांत लागणाऱ्या शास्त्रीय माहितीचे सोपे पाठ असावेत. तसेंच शेतकी व तिला जरूर अशी दुसरी माहिती ह्यांचाही त्यांत अंतर्भाव व्हावा. या ज्ञानाचा मुख्य हेतु हा की, पदार्थ अगर वस्तुस्थिति पाहून तिच्यामध्ये सुधारणा करण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्याच्या आंगी यावें. उदाहरणार्थ, बीं गोमूत्रांत का भिजवितात, कोयत्याचे पातें अगर कुऱ्हाडीचा दांडा लांब किंवा आंखूड कां असावा, मोटेला कणा कशाला पाहिजे, गाड्यांची चाक उंच किंवा ठेंगणी असावीत की काय, इत्यादि ज्या गोष्टी लोक पाहतात व करतात, त्या सुधारण्याबद्दलचे विचार व प्रयोग करण्याची पात्रता विद्यार्थ्यांच्या आंगी आणिली पाहिजे, म्हणजे शाळेतील अभ्यासाच्या साह्याने ते आपले ज्ञान पुढील आयुष्यक्रमांत वाढवू शकतील, आणि आपली कल्पना चालवून नवीन सुधारणा अगर शोध करू शकतील. शाळेमध्ये हात, पाय, डोळे, बुद्धि ही सर्व उपयोगांत आणण्यास शिकविले पाहिजे; म्हणून सामान्य ज्ञानाचे प्रयोग विद्यार्थ्यांच्या हातून करून घ्यावेत, आणि त्यांना सुतारकी वगैरेंची हत्यारे फुकट व मनमुराद वापरण्यास मिळावीत. हा इतका शिक्षणक्रम फार तर तीन चार वर्षांत वांटून द्यावा; आणि त्याचे वाङ्मयात्मक शिक्षण (ह्यांत सामान्य ज्ञानाच्या सप्रयोग शिक्षणाचा अंतर्भाव होत नाही. ) शाळेंत सुमारे रोज तीन तास एकसांज द्यावे, म्हणजे मुलांना एकसांज आपल्या आईबापांना शेतांत किवा दुसरीकडे मदत करण्यास व आपला पिढीजाद धंदा प्रत्यक्ष काम करून शिकण्यास वेळ सांपडेल. असले शिक्षण समजण्याला विद्यार्थ्यांचें वय अगदीच लहान असतां उपयोगी नाही. तें निदान गुराखी पोराइतकें म्हणजे ८ ते १२ वर्षांचे असावें. रोथामस्टेड पद्धतीने शेती शिकविली तर फार थोड्या जमिनीवर काम भागतें. पूर्व प्रशियामधील मारग्राबोवा येथील शाळेत १५९ विद्यार्थ्यांना शेतीचे शिक्षण देण्यास सुमारे एक एकर जमीन बस्स होते. प्रत्येक शाळेला एक शेत द्यावें, आणि त्याची सर्व कुणबीक मुलांकडून करवून घ्यावी, इतकेच नव्हे तर त्यांतील माल विकण्याला देखील मुलांना बाजाराला पाठवावें. त्याचप्रमाणे डागडुजीपुरती सुतारकी, लोहारकी, चांभारकी, मुलांना शिकविण्याची तजवीज व्हावी. हें शिक्षण देणारे शिक्षक तयार होईपर्यंत निरक्षर पण वाकबगार शेतकरी, सुतार, लोहार वगैरे गांवचे जातकसबी इत्यादिकांकडून ते देण्याची सोय झाली तरी देखील आडला गाडा पुढे ढकलल्यासारखे होईल. ह्या कारूना व्याख्या वगैरे न आल्या म्हणजे पुस्तकी ज्ञान नसले तरी ते आपले कसब काम कामाचा गुरु ह्या प्राच्य शिक्षण-पद्धतीने नामी शिकवितील. लिहिणे वगैरे एकसांज आणि कुणबीक व तिच्या अंगभूत धंदे ह्यांचं शिक्षण दुसरी सांज ह्याप्रमाणे अभ्यासाची वाटणी करावी. शेतकीसुधारणेसंबंधानें सरकारी व खाजगी रीतीने प्रसिद्ध होणारी माहिती वगैरेंची ओळख विद्यार्थ्यांस तसेंच गांवकऱ्यांस शिक्षकाने करून द्यावी, आणि शेतकी खात्याची त्यावर देखरेख असावी. शेती सुधारण्यासाठी सर सासून डेव्हिड ह्यांनी सरकारापाशी टोलेजंग देणगी दिली आहे. वर दर्शित केलेल्या नमुन्यावर शाळा काढण्याकडे जर तिचा उपयोग केला तर किती तरी बहार होईल!

 गुन्हेगार जातींची मुलें व भल्या जातींतील अल्पवयी गुन्हेगार ह्यांचा प्रश्न फार बिकट आहे. 'बीज तसा अंकुर' आणि 'बाळा तें जन्म काळा' हे सिद्धांत पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांच्याही अनुभवास उतरले आहेत. पूर्वजांचे गुणदोष मुलांत वंशपरंपरेनें उतरतात; आणि लहानपणी ज्या खोडी लागतात, त्या मरेपर्यंत सुटत नाहीत. तेव्हां निर्ढावलेल्या गुन्हेगारांपासून अल्पवयी गुन्हेगार दूर ठेवणे जितकें जरूर आहे तितकीच गुन्हेगार जातींच्या मुलांची व त्यांच्या आईबापांची थान-तोडही जरूर आहे. व्हिक्टर ह्यूगोनें असें गणित बसविलें आहे की, एखाद्याला सुधारणे झाल्यास त्याच्या आजापासून सुरुवात केली पाहिजे; म्हणजे आनुवंशिक गुणदोष निदान तीन पिढ्या तरी राहतात. गुन्हेगार संतान निपजू नये म्हणून निसवलेल्या गुन्हेगारांना खच्ची करण्याचा प्रयोग अमेरिकेंत चालू आहे. ह्या विषयाचें महत्त्व ओळखून सरकार गुन्हेगार जातींच्या मुलांच्या स्वतंत्र शाळा काढीत आहे. भल्या जातींतल्या ज्या अल्पवयी तरुणांच्या हातून संगतिदोषाने किंवा अप्रबुद्धपणाने गुन्हा घडला असेल त्यांना निर्ढावलेल्या गुन्हेगारांचा संपर्क लागू देता कामा नाही. अशा अल्पवयी गुन्हेगारांसाठी सरकारने थोड्या फार शाळा घातल्या आहेत, आणि त्याबद्दल तें धारवाड येथे बोर्स्टल पद्धतीने मोठ्या प्रमाणावर प्रयोग करून पाहात आहे. गुन्हेगार जातींच्या मुलांच्या व अल्पवयी गुन्हेगारांच्या शाळांचा एक मोठा उपयोग करून घेता येईल. येवले, भिंगार, पाथर्डी, संगमनेर, पैठण अशा ठिकाणी विणकामाचा धंदा जोरांत आहे; तेव्हां तेथल्या प्राथमिक शाळांत ह्या धंद्यांचे ज्ञान दिले तर चांगले. शेतीव्यतिरिक्त दुसरा धंदा भरभराटीत असलेली गांवें फार थोडी आहेत. म्हणून कुणबीक हा प्रधान धंदा धरून खेड्यांतल्या शाळांचा शिक्षणक्रम मुक्रर केला पाहिजे. असली अटक गुन्हेगारांच्या शाळांना नाही. गुन्हेगार जातींना प्रतिष्ठित जातकसब मुळीच नाही. नवट जमिनीमध्ये वाटेल ती सोय व उदीम काढतां येतात. सुधारलेल्या आउतांचा कुणब्यांमध्ये प्रसार होण्याला मुख्य अडचण ही आहे की, त्यांचा एक खिळा निघाला किंवा टांचा उसवला तर गांवच्या सुतार-लोहार-चांभारांना तें काम नीट करता येत नाही. सुधारलेली हत्यारे नवीन व दुरुस्त करणाऱ्या कसब्यांचा गांवोगांव भरपूर पुरवठा करण्याची सोय झाल्यावांचून आमची शेती व दुसरे धंदे ह्यांची उन्नति होणार नाही. ह्या शिक्षणाची सोय गांवगन्नाच्या शाळेत होणे आज तरी अशक्य दिसते. निदान ते अशक्य नसले तरी मनस्वी खर्चाचे आहे, आणि इतका खर्च करण्याला लोकलबोर्ड-म्युनिसिपालिट्यांसारख्या संस्थांना आज सवड आहे असे दिसत नाही. गुन्हेगारांच्या शाळांत जर हें शिक्षण मुख्यत्वे दिले तर अशा शिक्षितांना पटापट काम मिळून चांगली पैदास होईल, व गुन्हा करण्याची हुक्की फारशी येणार नाही; आणि कुणब्यांचीही अडचण व गैरसोय दूर होईल. कामकुचरपणा, उद्यांची पर्वा न करणे, दुसऱ्यावर विसंबणे, कामाचा बाट धरणे, उत्कृष्ट कामकरी बनण्याच्या महत्वाकांक्षेचा अभाव वगैरे जे दोष आमच्या मजुरांत दिसतात, ते घालविण्याचा प्रयत्नही ह्या शाळांत नेटाने झाला पाहिजे. दिलेल्या चित्रांत दुरस्ती करणे आणि कोऱ्या कागदावर नवीन चित्र काढणे ह्यांत जें अंतर आहे, तेंच विवक्षित परिस्थितींत वाढणाऱ्या मुलांचे शिक्षण आणि मनांत आणूं ती परिस्थिति निर्माण करूं अशा स्थितीत वाढणाऱ्या मुलांचे शिक्षण ह्यांत आहे. तेव्हां ह्या वहिमी मुलांच्या शाळा देशाला जितक्या प्रकारे उपकारक होतील तितक्या कराव्या अशी सरकारास नम्र विनंति आहे.

 क्वचित् असे घडते की, गुन्हेगार जातींच्या लोकांनी प्रामाणिकपणाने उद्योग करण्याचे मनांत आणिलें तरी त्यांना कोणी जवळ करीत नाही. ते गुन्हा करतील आणि आपल्याला प्रायश्चित्त द्यावे लागेल, अशी लोकांना भीति वाटते. कानफाट्या नांव पडल्यामुळे कोठे कांही गुन्हा झाला की ह्यांना पोलीसचे बोलावणे यावयाचे. ते गेले म्हणजे कामाची खोटी होते, ही त्यांना कामावर ठेवण्यांत दुसरी अडचण होय. पूर्वी गुन्हेगार जातींच्या मागें हजरी असे, व तिजमुळे त्यांना उद्योग पत्करणे कठीण जाई. मुसलमानांच्या मागें हजरी नाही म्हणून ती चुकविण्यासाठी हजेरीतला एक भील मुसलमान झाला व त्याने नांव बदललें असें एका गावी आढळलें. गुन्हेगार जातींच्या लोकांप्रमाणे शिक्षा भोगलेल्या भल्या जातींच्या लोकांनाही कोणी कामावर ठेवीत नाहीत. असले इसम बेकार होऊन उपाशी मरण्यापेक्षा तुरुंगांत जाऊन पोट भरण्याचा हेतु धरून मुद्दाम गुन्हे करतात. कामधंदे मिळवून देऊन गुन्हेगारांना समाजाचे उपयुक्त घटक बनवावें, व पुन्हा गुन्हा करण्याकडे त्यांची प्रवृत्ति होऊ नये म्हणून त्यांना मदत करण्यासाठी सरकारच्या आश्रयाने एक संस्था मुंबईस निघाली आहे. भरपर लोकाश्रय मिळून तिची फत्ते होवो ! ह्या कामी आज गांठचा पैसा जातो असें जरी कोणाला वाटले तरी दूरदृष्टीने पहातां हे कोणालाही अंदाजतां येईल की, गुन्हेगारांना प्रामाणिक कामगार बनविण्यांत खर्च होणारा पैसा त्यांच्या चोऱ्यादरोड्यांच्या ऐवजाच्या मानानें कांहींच नाही, व त्यांचे पिदीजाद गुन्हे बंद होण्यांतच सर्वाचे शाश्वत हित आहे. पार्शी कर्ण टाटाशेट ह्यांनी लक्षावधि रुपये देऊन मुक्तिफौजेमार्फत गुन्हेगार जातींच्या वसाहती करण्यास सुरुवात केली आहे, व सरकारही प्रांतोप्रांती सदर संस्थेला ढळत्या हाताने पैसे पुरवीत आहे. हिंदू, मुसलमान, आर्य, ब्रह्मो वगैरे धर्मानी पुढे सरसावून ह्या पुण्य कृत्याला कंबर बांधली तर त्यांना ह्या कामीं मुक्तिफौजेपेक्षाही सत्वर व परिणामकारक यश येईल. सरकारने कैकाडी लोकांना सोलापूर जिल्ह्यांत निरनिराळ्या गांवी जमिनी देऊन बैलांसाठी तगाईही दिली. तथापि एकमेकांना भेटण्याच्या बहाण्याने ते गांवोगांव चोऱ्या माऱ्या करीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार होती. विजापूर जिल्ह्यांत गुन्हेगारांची एक नवीन वसाहत सरकाराने काढली आहे, आणि ती यशस्वी होण्याचा संभव आहे. अशा रीतीने वसाहतींत किंवा शाळांत अगर अन्य तऱ्हेने जे गुन्हेगार किंवा गुन्हेगारजातींचे लोक भरंवशालायक कामकरी ठरतील,त्यांना पहिल्याने स्वतंत्र पण योग्य बंदोबस्तांत काम मिळाले आणि तेथे त्यांच्या चालचलणुकीचा बोभाटा झाला नाही, म्हणजे इतर लोकांप्रमाणे त्यांनाही हलके हलके खाजगी काम मिळून इमाने इतबारे पोट भरतां येईल. अशा प्रकारे काम मिळू लागेपर्यंत केवळ पोटासाठी अथवा अल्पस्वल्प दिखाऊ फायद्यासाठी लांडीलबाडी करण्याचा मोह त्यांना पडणार नाही ह्याबद्दल सरकार व सार्वजनिक संस्था ह्यांनी खबरदारी ठेविली पाहिजे. 'गप्प बसण्याचे काय घेशील' या तत्त्वाप्रमाणे त्यांना सार्वजनिक पैशाने पोसलेले पत्करलें, पण त्यांचे गुन्हे नकोत. कारण गुन्हेगारांना शिक्षा देण्यापेक्षा गुन्हा होऊ न देण्याचे शिक्षणप्रसारासारख्या योजनेला खर्च व खटपट कमी पडते, असें लॉर्ड मेकॉले ह्यांनी आपल्या शिक्षणावरील भाषणांत सिद्ध करून दाखविले. मुदतबंदीच्या कराराने जे मजूर नेण्यांत येतात त्यांमध्ये जर गुन्हेगारजातींच्या लोकांची भरती केली तर स्वार्थ व परार्थ दोन्ही साधतील. अशा मजुरांच्या धन्यांना कायद्याने ज्या विशेष सवलती दिल्या आहेत, त्यांचा मोबदला म्हणून वहिमी मजूर पत्करणे हे 'देवाण घेवाण' अशांतले होईल. हे लोक शरीराने सुदृढ व अकलेनें चलाख असतात, आणि थोड्या बंदोबस्ताने ते आपल्या धन्याचे कोट कल्याण करून देतील ह्यांत शंका नाही. कोणाचा आधार नसल्यामुळे पर ठिकाणी त्यांना चांगले वर्तन ठेवावे लागेल आणि कामही भरपूर करावे लागेल. अशा रीतीने वठणीस येऊन व लायक कामकरी बनून जर ते आपापल्या मुलखांत परतले, तर मजुरांच्या तुटवड्याचा प्रश्न सोडविण्यास बरीच मदत होईल.

 चालत्या गांवगाड्यांतलें पुष्कळ भरित ह्या बोलत्या गांव-गाड्याबाहेर उरले आहे; आणि ते कोठें गांवांत तर कोठे वनपर्वतांत पांगले आहे. आपल्या ह्या बंधूंना निरक्षर म्हणून मागासलेले गणण्याची चाल पडली आहे. पण गंजाखाली पाणीदार पोलादही निमूटपणे दिवस कंठतें, हे विसरता कामा नये. हे लोक अनादि कालापासून बिकट परिस्थितीशीं झगडून संसारयात्रा करीत असल्यामुळे नानातऱ्हेचे-विशेषतः शेती, वनस्पति, मनुष्य-पशु-पक्षी-वैद्यक इत्यादींचें-ज्ञानभांडार त्यांच्या तोंडांत व दिल-दप्तरांत नुसते खेळत आहे. जर साक्षर मंडळी नमते घेऊन त्यांच्याच सुतासुताने घेतील तर ह्या वस्तुस्थितीविषयी त्यांची बालंबाल खात्री झाल्यावांचून राहणार नाही. तसेच मानापमान गुंडाळून ठेवून जर संशोधक व सुधारक रानोमाळ हिंडून त्यांच्यामध्ये मिसळतील तर नानाविध सामाजिक, धार्मिक व ऐतिहासिक माहितीची किती तरी मनोरम व बिनमोल लेणी ह्या नैरक्षर्य-पर्वताच्या उदरांत दडून राहिली आहेत, हे त्यांना कळून येऊन विलक्षण ज्ञानानंदाचा अपूर्व आस्वाद लाभेल ह्यांत संशय नाही. तेव्हां ह्या बाहेर राहिलेल्या भरिताचाही थांग व व्यवस्था लावणे त्वरित व देशहितास्तवच नव्हे तर मानवधर्मपालनास्तवहीं अत्यंत इष्ट आणि अवश्य आहे. ठिकठिकाणच्या लोकाग्रणींनी मनावर घेतले तर एक दोन तपांत बाताबेताच्या खर्चाने हे काम बरेंच उठेल; आणि ते त्याला हातभार लावतील अशी उमेद बाळगण्यापुरतीं सुचिन्हें क्षितिजावर स्पष्ट दिसत आहेत. कारण आपल्या समाजांतले अनेक भाग चहूंकडून खडबडून जागे झाले आहेत, आणि कित्येक तर फुंकून रस्ताही चालू लागले आहेत. तरी गांव-गाड्याने धरलेली वाट बरोबर आहे किंवा नाही ? नसल्यास कोठे व कशी दिशाभूल झाली, ह्याचा निर्णय देण्यासाठी अधिकारी मार्गोपदेशकांना नम्रतेने फूल लावून त्यांचा शकुन मिळेपर्यंत तूर्त येथेच तो सोडू या.

गांव-गाडा.pdf