गांव-गाडा/कुणबी

विकिस्रोत कडून



कुणबी.
----------

 कुणबिकीची अवजारे, जनावरे, खताचे प्रकार, शेतकुंपणे, कुणबी पोशीत असलेले बलुत्येआलुत्ये व भटक्ये यांची संख्या इत्यादींचा विचार केला ह्मणजे आमची कुणबीक उमाप रानाच्या उदंड भरंशावर थाटली असावी अशी पाकळी बसते. “जातीजातींचे चाळे" वर्णन करितांना तुकोबांनी “ हेकड कुणबी वाटा मोडी" असे म्हटले आहे. अव्वल इंग्रजीतल्या मराठी शाळेत शिकलेल्या एका ऐंशी उलटलेल्या गृहस्थाने त्या वेळचा नीतिपाठ म्हणून दाखविला; तेव्हां 'ज्याने त्याने आपली जमीन वहीत करावी, आपल्या जमिनीबाहेर वहीत करूं नये,' अशी त्यांतील एक नीति त्याने म्हणून दाखविली. यावरून हे उघड होतें की, पडितांत तर कुणबी नांगर फिरवीच पण वाटा मोडून देखील तो कोठेही रान काढून वहीत करी. मुसलमानी व मराठी अमलांत जरी गांवची पहाणी होऊन मिरासदार, उपरी व त्यांच्या जमिनी ठरून गेल्या होत्या,तरी सुद्धा कमाल आकार बांधून काळी-पांढरी गांवचे दिमतीस दिल्यामुळे गांवांतल्या एखाद्या कुणब्याला काळी आजिबात नसली किंवा त्याच्या खटल्याला निपुर आली तर गांवकरी दुसऱ्याच्या शेतांतून त्याला हरप्रयत्नाने जमीन मिळवून देत आणि त्याची व त्याच्या मुलाबाळांची बेबुदी करीत. पूर्वीच्या राजवटीत दर्याची व जंगलची अटक सैल होती, आणि समुद्र व रान ह्यांवर सरकारी जाबता नव्हता असे म्हटले तरी चालेल. नांगरापासून तो उसाच्या चरकापर्यंत बहुतेक शेतीची हत्यारें व सनगें लांकडी आहेत, आणि ती नवीन किंवा दुरुस्त करितांना कुणब्याला सुतारलोहारांला लांकूडसरपण पुरवावें लागते. कारूनारूंच्या हत्यारांतही इतर जिनसांपेक्षा लांकडाचा खप अधिक दिसून येतो. तेव्हा सर्वांनाच लाकडाचा पुरवठा पुष्कळ आणि थोडक्यांत मिळण्याची सोय असली पाहिजे. सर्वत्र मुख्य खत गोव-
राचे आहे. शेणकुराचे मुबलक खत मिळण्याला पुष्कळ लक्ष्मी उर्फ गुरें बाळगली पाहिजेत. ती सर्व शेताच्या मालावर जोगवणे अशक्य. "घरचा चारा आणि रानचा वारा" बरोबर नाहीत असें म्हणतात. इतक्या गुराढोरांना तोंड घालण्याला मोकळे जंगलच पाहिजे. शेतीला कुंपण कांटेरी झुडपांचे असते. ती सर्व वहिती जमिनीत मिळत नाहीत. ती जंगलांतून आणिली पाहिजेत. जंगलाशिवाय पुरेसें सरपण कोठे सांपडणार ? महारांचे काम जमेदारांना जळण पुरविण्याचे होतें, व त्याबद्दल त्यांना भाकर किंवा जेवण मिळे. गुऱ्हाळांत चुलांगणाला महाराने सरपण पुरवावें व त्याबद्दल त्याला ऊस, दोन ढेपा गूळ व शेवटचे आधण मिळते. हे सरपण जर मालकाच्या शेताचेच असते तर महाराचा हक्क इतका मोठा नसता. अर्थात् महारांना काय आणि इतरांना काय जंगलांतून सरपण घेण्याची मनाई नव्हती. वारली, कातकरी वगैरे जंगली जाती ‘जंगलांत जाऊन सरपण, गवत आणणे, जंगलांतील कंदमुळे खाणे' असा आपला धंदा अजून सांगतात. त्याचप्रमाणे आजमितीला पहाडाचे आसपासचे शेतकरी व मजूर आपले घरांतला दाणा वाढला ( संपला ) म्हणजे जंगलांत जातात; व झाडपाला, फळे, कंद आणून खातात. रासमाथ्याला बलुत्येआलुत्ये आणि अठरापगड भिकार हक्क म्हणा की भीक म्हणा मागून आज हजारों वर्षे आपली सालबेगमी करून ठेवीत आहेत. कुणब्याला जर काळी इतकी कमी असती की, तिच्यांतून त्याची स्वत:ची सालबेगमी निघणे दुरापास्त, तर ह्या वहिवाटीला काही तरी आळा घालण्याचा प्रयत्न तो करता. भिकाऱ्यांच्या टोळधाडीमुळे आपल्या पोटावर पाय पडतो असें बलत्याआलुत्यांना आढळते तर निदान ते तरी त्यांना आडवे होते. ह्या सर्व गोष्टींवरून असे स्पष्ट होते की, कुणबी थोडा व काळी फार असल्यामुळे बळीराजानें दुनियेचा भार उचलला. त्याने वाटेल तेथे वाटेल तितकी काळी काढावी व पिकवावी, तिच्यासाठी लागेल तो रानमाल उपसावा आणि हवी तितकी लक्ष्मी बाळगावी,
इतरांनीही वाटेल तसा रानपसारा आणि मीठ घ्यावे व कुणब्याच्या पोटांत पोट आणि घांसांत घांस काढावा; परंतु कोणीही—माणूस काय किंवा जनावर काय-उपाशी मरूं नये अशी व्यवस्था ठरली. अव्वल इंग्रजीतही काळी फार व कुणबी थोडा अशी स्थिति होती, आणि हे आंधळं गारूड पूर्वीप्रमाणेच चालले होते. जमिनीची पैमाष झाली, मीठखाते निघाले आणि सरकाराने जंगल ताब्यात घेतले, तेव्हांपासूनं कुणब्याचे व त्याजवर अवलंबून राहणाऱ्या शेकडों जंगली व भटकणाऱ्या जातींचे हात पाय आंखडले. प्रपंच भागत नाही म्हणून वाटेल तेथे फुकटफाकट किंवा वेळेला पैसे देऊनही वहीत करीन; आऊतकाठी, कुपाटी, राब, ताली, विहिरी, घरे वगैरेसाठी जंगलांतून लांकूडफाटी, ढाळ्या, पाचोळा, गाटागोटा बिनपरवानगीनें अगर कर न देतां आणीन; किंवा मर्जीप्रमाणे जंगलांत गुरे चारीन असे कुणबी आज म्हणेल तर चालत नाही. समुद्रकाठच्या किंवा जंगली जमाती म्हणतील की, मीठ किंवा रानमाल वाटेल तसा विकून पैसे करूं तर सोय नाही. पाश्चात्य कलावृद्धीमुळे पुरातन धंदे बहुतेक मोडले आणि जो उठला तो कुणबी बनला. शिवाय प्रजाही वाढली. त्यामुळे लागण करण्याजोगी बहुतेक नाकीर्दसार जमीन वहीत झाली आहे. तेव्हां हवी तितकी काळी, खारी आणि मोकळे रान हा जो आमच्या आडमापी कुणबिकीचा अनादि धर तो सुटला.

 समुद्राची व जंगलाची बंदी झाल्यापासून त्यांची सर्व वर्दळ लागण जमिनीवर लोटली. सरपण हजारों वर्ष फुकट मिळत असल्यामुळे त्याच्या खर्चाचा सुमार कोणालाच राहिला नाही. आपल्या धंद्यासाठी व प्रपंचासाठी कुणबी आपापल्या शेतांतली झाडे तोडूं लागले. जळण विकत घेण्याची संवय नसल्यामुळे तमाम गांवकरी कुणब्याजवळून तें मोहबतीने मागून आणूं लागले. झाडे कमी होत होत गेली आणि त्या मानाने नवीन लागवड झाली नाही. त्यामुळे सरपणाला किंमत येऊ लागली. भील, रामोशी, महार, मांग वगैरे
परपिंडलोलुपांना फुकट तोडून आणिलेलें सरपण विकण्याचा एक रोजगार झाला. होतां होतां गोवऱ्यांचा उपयोग खताकडे करण्याच्याऐवजी कुणबी त्या जाळू लागले, आणि सर्व जाती कुणब्यांची गुरें सुटली की त्यांच्यामागे शेण धरण्याला आणि रानांत गोवऱ्या वेंचण्याला जाऊ लागल्या. शेत कुपाटी व चाऱ्याचीही हीच कथा. खेड्याच्या सरकारी बंगल्याच्या कंपौंडांतील झाडांचा व गवताचा, सरकारी जागेवरील तरवडाचा व शेण्यांचा देखील लिलाव होतो. पण, कुणब्याच्या तरवड केकताडावर महारमांग ताव मारतात, व त्याच्या शेतांत झुडूप दिसले किंवा गवताचा ठोम उगवला की महारपोर व भिकार तें नेतें. वास्तविकपणे गायरानें, गांवचारण, शेताच्या बाजूच्या रस्त्याच्या कडा ह्यांवर कुणब्याचा अग्र हक्क; परंतु गांवचे सर्व अडाणी व भटकणारे लोक आपली जनावरें मोकार सोडतात, आणि कुणब्यांच्या जनावरांच्या वाट्याला तेथील गवत येऊ देत नाहीत. पट्टी भरतो कुणबी आणि वरिष्ठ जाती शिवाय करून सर्व बलुत्येआलुत्ये व भटक्ये त्याच्या शेतांतलें गवत-बाटूक काढतात, रात्री चोरतात, आणि त्यावर आपली गुरे पोसतात किंवा त्याचे टक्के करितात. गाढवा-डुकरांना कधी दावे नसते, व त्यांना उचलून चारा कोणी टाकीत नाही. त्यामुळे परीट, कुंभार, पाथरट, वैदु वगैरेंची गाढवें आणि वडार. कोल्हाटी यांची डुकरें ह्यांची शेतांना नेहमी वर्दळ लागते. तेव्हां आज स्थिति अशी आहे की, कुणबी ओरडतो माझे बैल उपाशी मरतात, १०-२० रुपये शेंकड्याप्रमाणे मला कडबा विकत घ्यावा लागतो. दोन दोन कोस पायपीट केली तरी कुऱ्हाडीच्या दांड्याजोगें सरळ किंवा हळसाजोगें बांकदार लाकूड भेटत नाही; आणि बाकी सर्व दुनिया शेतांतील चारा, तरवड, केकताड, फांटी, फुकट म्हणून बेसुमार लुटते, नव्हे कनिष्ठ जाती त्याचे पैसे करतात, आणि हा कपाळ झोडतो की, चाऱ्यासरपणाचा दुकाळ पडला. मुलकी खात्याचा ठराव नंबर ५ तारीख २-१-१९१३ अन्वये मुंबईसरकार लोकांना सवलती
देऊन झाडे लावण्यास उत्तेजन देत आहे. चाऱ्याचा संचय कसा करावा हे कोडें उकलण्यांत सरकार व लोक गुंतले आहेत. परंतु जोंपर्यंत कुणब्याच्या मागचे हे भुंगे तोडून काढले नाहीत, तोपर्यंत सरकारच्या व लोकांच्या प्रयत्नाला ह्या कामी यश येणार नाही. यावें कसे ? जमिनीच्या बाहेर अंकुर येण्याचा उशीर की तो खुडलाच. मना करावें तर जाळ सुद्धी, मार जनावर असल्या नुकसानीला पाचारण करावें. जोपर्यंत अशी स्थिति आहे तोपर्यंत कुणब्याने तरी काय करावे ? आणि चाऱ्याचा व जनावरांचा संग्रह कसा करावा व त्यांचा विमा उतरण्याला तरी कोणी पुढे यावें ! आतां काळी आंखली आहे, आणि वाटेल तेथें रान काढण्याला कुणब्याला मार्ग नाही. वांटणीमुळे शेताच्या चिंधोट्या चिंधोट्या झालेल्या आहेत. तेव्हां सबंध दुनियेच्या पोषणाचे ओझें कुणब्याला झेंपेनासे झाले आहे. आणि “ एक बळी हजार छळी” असें तो पाण्याच्या दर घोटास कुरकुरतो. पाटील-कुळकण्यांचे ऐन जिनसी हक्क वजा केले, तसे महारजागल्यांचे सरकारने केले नाहीत. त्यामुळे कुणब्यांना सबंध महारवाडा, रामोसवाडा, भिलाटी, कोळवण, मांगवण पोसावे लागते. आम्ही सरकारचे काम करितों असें, म्हणून कुणब्याच्या बोकांडी बसून हे लोक त्याला लोळवितात. तसेच दरसाल हजारों भिकार सहपरिवार कुणब्याला पोसावे लागते. समुद्र, जंगल सुटें होतें, हत्यारांची मनाई नव्हती, तेव्हां हे लोक व भटक्ये जंगलावर, शिकारीवर व मिठावर थोडे फार पोट काढीत आणि पिकांना व ढोरांना उपद्रव करणाऱ्या पाखराजनावरांचा संहार करीत. जंगलकाळी आंखून कुणब्याला डांभले त्याच वेळेला ह्या सर्वांना डांभून टाकावयास पाहिजे होते. तसे न झाल्याने कुणब्याच्या आयातीला मात्र बांध पडला; परंतु निर्गत कायम-नव्हे-जास्त वाढली. कुणबी म्हणत असतो की, पृथ्वीचा एक कोपरा पिकला आणि तीन खकाण राहिले म्हणजे सगळ्या भोरड्या पिकलेल्या भागावर आदळतात. तशी त्याची गति झाली आहे, आणि माणसांजनावरांची सर्व खाती-तोंडे शेतांवर येऊन पडली आहेत. अलुतदार-बलुतदार नुसतें कुणब्यांचेच काम करितात असें नाहीं, तर ते सर्व नारभाऊ-कारभावांचे जातिविशिष्ट काम फुकट म्हणजे पैसा अगर धान्य न घेतां करतात. तसेंच गांवची जबाबदारी वतनदारांत समाईक असल्यामुळे गांवांत कायम वस्तीला किंवा थोडा वेळ मुक्कामाला आलेल्यांची कामेही त्यांना फुकट करावी लागत व लागतात. जमीन अगर वतनी काम नसलेल्या मुसलमान रहिवाशांची व अतिथि-अभ्यागतांची कामें लोहार, सुतार, परीट,न्हावी, चांभार, आज मित्तीला सुद्धा फुकट करतात. पूर्वीच्या अमदानींत परगणेवतनदारांचे व ग्रामाधिकाऱ्यांचे कारूनारूंवर हक्क असत, आणि सरकारी कामगारांचीही त्यांना पुष्कळ वर्दळ लागे. तेव्हां कुणबी, कारूनारू, पै-पाहुणा आणि हक्कदार ह्या सर्वांची करावी लागणारी खासगी व गांवकांची कामें व द्यावे लागणारे हक्क हे सर्व जमेंत धरून आलुत्याबलुत्याचा निरख ठरला; आणि सगळे अडाणी मोकळे राहून समस्तांच्या योगक्षेमासाठी तो एकट्या कुणब्याने पुरा पाडण्याचा जो एकदां भार उचलला तो अद्यापि बिचारा वाहत आहे. पृथ्वी व समुद्र मोकळा आणि जंगल मिठाची सवलत, काळी मुबलक व नवट आणि कुणबी थोडा, अशा वेळी हा धारा पडला. धारण स्वस्ती आणि सर्वांना पोटभर खाण्याइतका गांवोगांव दाणा शिल्लक असे, म्हणून आजपर्यंत कोणीही बलुत्येआलुत्ये व त्यांची कामे ह्यांचा हिशेब चुकून केला नाही. तशांत कुणबी मायाळू आणि भिडस्त व इतर सर्व काढू पडले. ह्या व असल्या अनेक कारणांनी ह्या अगोदरच्या जड बोजांत आणखी भर पडली. आतां कारूनारूंच्या डोक्यावरील जमेदारी हक्क गेले; सरकारच्या सर्व खात्यांत सुधारणा होऊन त्यांची कामें हलकी झाली, व कित्येक कामें अजिबात वजा पडली. रयतवारी पद्धतीमुळे खातेदार किंवा कबजेदार कुणबी कारूनारूंच्या गांवकी कामाबद्दल सरकारला किंवा गांवाला जबाबदार नाही. व्यापारवृद्धामुळे बरीच हत्यारे व जिनसा आयत्या मिळतात, किंवा कारूंच्या अडाणीपणामुळे विकत घ्याव्या लागतात. दाम सुकाळामुळे एनामेल, तांबे, पितळ, वगैरेंची भांडी जास्त प्रचारांत आली आहेत.
जंगलबंदीमुळे असाम्यांना महार सरपण पुरविण्यास व मांग केरसुण्या, दोरखंड पुरविण्यास असमर्थ झाले आहेत. सुताराला व लोहाराला काम होऊन उरलेले सरपण ठेवू देणे नुकसानीचे झाले आहे. धान्याचे, चाऱ्याचे व लांकडाचे भाव कडकले आहेत. असे सर्व प्रकारे मन्वंतर झाले आहे. तरी सर्व कारूनारू आपले हक्क पूर्वीप्रमाणे उकळतात, इतकेंच नव्हे तर जास्तही उपटतात, आणि कुणब्याचा आडवा नाडा पङल्यामुळे तो चुंबित सर्वांची भरती करतो. कुणबिकीचे उत्पन्न उघडे असल्यामुळे आणि तोच प्रधान धंदा असल्यामुळे बळीराजा सर्वांचा पोशिंदा जो एकदां कधी काळी ठरला तो आतां ज्येष्ठ-आषाढांतील बैलाप्रमाणे उठवणी आला आहे तरी त्याची झटें कमी होत नाहीत. कुणबी व कारूनारू ह्यांजवळ तपास करतां असें समजतें की बलुते, आणि आलुतें मिळून राशीचा शेकडा २२ ते २५ मुख्य धान्य जाते. याखेरीज किरकोळ धान्य, भाजीपाला, गवत, काडी, सणवार, शिधा, वाढणी, पंक्तीचा ठाव वगैरे. कुणब्याचा हात नेहमी वर असतो, असे म्हणतात. ही माहिती मिळवितांना बहुतेक कुणबी ती देण्याचे नाकारीत आणि दिलदारपणाने म्हणत की, 'आपल्या हाताने दिलें मग त्याचा उच्चार कशाला पाहिजे !' यावरून असे वाटते की, ते देतात त्यापेक्षा कमी सांगतात. कारूनारू तर खात्रीने कमी सांगावयाचे. अशी ही दुहेरी छपवाछपव ध्यानांत आणली म्हणजे असा अंदाज बांधण्यास हरकत नाही की, आलुत्येबलुत्ये व भिकार कुणब्याचे देखत किंवा हातून त्याच्या उत्पनाचा कमकसर तिसरा हिस्सा घेऊन जात असावें, व चोरट्यांची तस्करगिरीची कमाई ह्या खेरीज असावी.

 ह्या राज्यापूर्वी मिरासदार उपऱ्यांची स्थिति कशी होती, तिच्यांत काय फेरबदल झाला आहे, उदमी हळकरी कुणब्याला कसे लुबाडतात, त्याला आपला माल बाजारांत कां विकता येत नाही, इत्यादींचे वर्णन पूर्वी आलेच आहे. ह्या ठोकरींचा व त्यामुळे मागे लागलेल्या भगभगीचा परिणाम त्याच्या सांपत्तिक स्थितीवरच नव्हे तर देहस्वभावावरही झाला
आहे. आमच्यांत जे धनवान् झाले ते कुणबिकीवर झाले नाहीत. रोजगारधंदा, व्याजबट्टा, व्यापार करूनच त्यांनी धनसंचय केला. 'दर्याची माती दर्याला आटते' 'बासा न राहे और कुत्ता न खाये,' असे कुणबी आजवर म्हणत आला आहे; आणि ओढगस्तपणाच्या दुर्गुणांना तो बळी पडला आहे. 'कुणबीका बेटा और गहूंका आटा, पिटा उतना मिठा,' असे सर्वांच्या अनुभवास येते. ज्या कारूनारूंवांचून नडतें, अथवा जे कारूनारू अगर भिकार लोक बळजोरी किंवा नुकसान करतील अशी भीति असते, त्यांची भरती कुणबी मनसोक्त करतो. जेथें चाळ्याचिपळ्या करून निभण्यासारखे आहे, किंवा ज्यांचे भय बाळगण्याचे कारण नाहीं अशा हक्कदाराचे काम घेऊनही त्याच्या तोंडाला पाने पुसण्याला तो कमी करीत नाही. त्याने कधीही सावकाराचा धाक धरला नाही, व देण्याची पर्वा केली नाही. त्यामुळे देणे देण्याच्या कामी कुणबी हातचा फार जड झाला आहे. कुणब्याकडून सारा वेळेवर येण्याची खात्री असती, तर शेतमाल किफायतीने कुणबी विकीपर्यंत सरकार थांबतें, आणि पट्टीच्या हप्त्याच्या तारखा त्यापूर्वी नेमतेंना. कुणब्याशी व्यवहार निर्भीड मारवाड्यांनीच करावा असें म्हणून दक्षिणी सावकारांनी तोंड फिरविलें, व मारवाडी आतां म्हणतात की, कडव्या रोहिल्यांची सावकारी खरी. जसें ज्याचें नेट किंवा लुच्चेगिरी तसा कुणब्याजवळून पैसा निघतो. थापडवाईक सावकाराला किंवा जमीनदाराला कुणबी कुळे चांगलाच झोका देतात. रोख खंड कबूल न करता त्यांच्या जमिनी ते बटाईने ( वांट्याने ) घेतात. 'बटाई म्हणजे लुटाई.' शक्य तितकी मेहनत ते आपल्या स्वतःच्या शेतांत करून फावला वेळ बटाईच्या शेताकडे लावतात, आणि स्वतःच्या शेतावरीलसुद्धा खर्चाच्या सर्व बाबी दुसऱ्याच्या शेतावर घालतात. उदाहरणार्थ, बटाईच्या शेतांत गुरे चारण्यासाठी पडीत जास्त टाकावयाचे, त्यांत कोंब फुटल्यापासून तो पार खळें संपेपर्यंत आपले बैल चारावयाचे, धान्य हुरड्यावर आले की, घरच्या सर्व माणसांचं व पै-पाहुण्यांचे पोट त्यावर काढावयाचें; बलुत्ये, भिकार वगैरे सर्व हक्क, दानधर्म त्यावर भागवावयाचे, आउत काठी, सरपण यांसाठी त्यांतील झाडे तोडावयाची, आपल्या शेताचें राखण खंबीर करण्यासाठी वेळ पडल्यास बटाईचे शेत मोकळे टाकावयाचे, व इतक्यावरही ताण म्हणजे आपण बायकापोरांनिशीं चोरवेल तितकें धान्य चोरावयाचे आणि अखेर मालाचा मोधळा (जाड ठोसर धान्य ) मालकाच्या हाती लागू न देतां अकणनिकण कालवून बटाईचे किंवा मक्त्याचे धान्य त्याच्या माथीं मारावयाचें ! कुळाचे नाते आहे तोपर्यंत गरिबी गाऊन आणि पहिल्यापहिल्याने भलाई दाखवून कुणबी आपल्या सावकार जमीनदाराकडून पुष्कळ रोखीची व धान्याची उचल करतात. अशा रीतीने कुणब्याशी पालथा रोजगार करून तोंडघशी पडलेले पेन्शनर बरेच दिसून येतात. 'गोगल गाय आणि पोटांत पाय.' कुणब्याच्या शब्दावर किती भरंवसा ठेवावयाचा, त्याची खरी खोटी नड कोणती, तो कशांत गोता देतो व त्याजकडे रुतलेला पैसा कसा काढावयाचा हें एक भलें मोठे शास्त्र आहे, व ते अनुभवाने येते. पुष्कळांना त्याचा गंध नसतो. शेतीत भांडवल गुंतवून शेकडा ३।४ टक्केसुद्धां व्याज सुटत नाही, उलट सारा पदरचा द्यावा लागतो असें अहमदनगर जिल्ह्यांतले पुष्कळ नव्या थळीचे पांढरपेशे लोक कुरकुरतात. ह्यामुळे मोहबतीच्या लोकांचे हलक्या व्याजाचं भांडवल शेतीतून दुसरीकडे जातें, व गांवांतली सधन लोकांची वस्ती उठते, हे कुणब्याला उमजेल तो सुदिन समजावयाचा ! दक्षिणी सावकाराशी जर कुणबी इमानाने वागता व 'खाटकाला शेळी धारजिणी' हा न्याय खोटा करून दाखविता, आणि दक्षिणी सावकारही देशकालवर्तमान पाहून आपल्या परप्रांतीय व्यापारबंधूंजवळून आत्मसंरक्षणापुरते व्यापारी कसब शिकते तर मारवाडी-गुजराती-रोहिल्यांच्या व्यवहारावर दाब राहता; आणि कुणबीही इतका कर्जबाजारी झाला नसता. कुणब्यांंमध्ये दिवाळखोरी इतकी वाढली आहे की, खळ्यांतून सबंध बर्षाचा चंदी फार थोड्यांच्या घरी येते. सुमारे चार सहा महिन्यांची चंदी वागविणारे कुणबी बरेच आहेत. अगदी महिन्या दोन महिन्यांची खावटी उरते असे कुणबी कशी बशी पाळीगोपाळी घालून शेत कोणा आप्तांच्या
माथी मारून पोटासाठी शहरांत जातात; व खळ्याच्या सुमाराला परतात, आणि खळें उलगडले की परत शहरचा रस्ता सुधरतात. पावसाचा वर्ष दोन वर्षांनी ठेवलेला टाळा आणि शहरचा ताजा रोजगार ह्यांमुळे ह्या शेवटल्या वर्गाची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. परंतु हे लोक चांगले बी घरून ठेवीत नाहीत, त्यांजवळ चांगली गुरे नसतात आणि ते जमिनीची मशागत करावी तशी करीत नाहीत, ही मोठी काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. ह्याप्रमाणे दुसरीकडे पोट भरण्याचा मगदूर असणारे लोक खेडी सोडून गेले म्हणजे खेड्यांत शेतीच्या वाट्याला बहुतेक सर्व प्रकारे टाकाऊ गचाळ लोक काय ते उरतात. ही दुसरी काळजी करण्याजोगी गोष्ट आहे. मोलकरीण ह्या शब्दाला प्रति-शब्द 'कुणबीण' हा आहे; ह्यावरून मजुरी हा कुणब्याचा उपव्यवसाय ठरतो. खरेवरे अंग मोडून राबण्याची संवय अडाण्यांपेक्षां कुणब्यांनाच झालेली असते. म्हणून मजुरांतही कुणब्यांचाच अनुक्रम सर्वांच्या वर लागतो. त्यांच्या नेहमीच्या भगभगीमुळे त्यांला अंग राखून काम करून मजुरी फुगविण्याची सोड जडली आहे. 'भाड्याचे घोडे आणि तरवडाचा फोंक' अशी म्हण आहे. खानदेशांत कपाशीवरील कुणबी मजूर शेतांत जाण्याला प्रहर दिवसाच्या आंत घर सोडीत नाहीत. रोजंदार कधीही वेळेवर कामाला लागत नाहीत, मुंगीच्या पावलाने चालतात, आणि मालकाची नजर चुकवून यथास्थित गमतात. उक्ते काम तेच इसम रोजंदारीच्या पांच ते सातपट आधिक करतात. परंतु अंगावर काम दिले तर ते ते खोटें करतात. ह्यामुळे मालकाचे तर नुकसान होतेच पण कुणब्याचेही कायमचे नुकसान झाले आहे. त्याची पत म्हणून राहिली नाहीं; आणि हर प्रकारची बूड हिशेबांत धरून मजुरीचे दर हलके झाले. आतां जरी मजुरांची चणचण आहे आणि मजुरीचे दर वाढले आहेत तरी कुणबी खरे कष्ट करील तर ते ह्यापेक्षाही वाढतील. मागें सतत लकडा नसला तर तो काम करणार नाही, आणि मिळतो तोपर्यंत दुसऱ्याचा माल उपसण्यांत कमी करणार नाही. ह्यासच तो कसब समजतो, आणि मागचा पुढचा
व्यापारी पोंच बिलकूल धरीत नाही. इमानेइतबारें काम करून आपणही खावें, आणि शेतधन्याचा अंश बिनबोभाट न मागतां त्याला पोहोचवावा अशी दानत फार थोड्या कुणब्यांची असते. 'असेल मालक शेती तर शेती, नाही तर माती' असें म्हणतात, त्याचा अर्थ असा आहे की, कुणब्यावर जर खंबीर राखण ठेवलें नाहीं तर शेत काहीएक हाती लागावयाचे नाही. कुणबी शेतांत काय करतो, काय चोरतो, वेळेवर पाळी घालतो किंवा नाहीं, मोट धरतो किंवा नाहीं, राखण करितो किंवा नाहीं, सारांश पत्करलेलें काम करतो किंवा नाही, यासाठी मालकाला नेहमी त्याच्या पायावर पाय देऊन उभे रहावे लागते, आणि रात्रींच्या रात्री खळ्यांत पडावे लागते. हीच अवस्था सर्व प्रकारच्या मजुरीबद्दल आहे. खुरपणी-वेचणीला जे मजूर लावावेत ते चापून मजुरी घेऊन शेतमाल घोळांत, पदरांत, भाकरीच्या पाटींत किंवा पिण्याच्या भांड्यांत चोरून आणितात. तो विकत घेण्यासाठी मिठाई, खारीक, खोबरें, सुपारी, खजूर घेऊन भिकार दुकानदार हंगामाच्या दिवसांत संध्याकाळच्या सुमारास शेतवाटांवर बसलेले असतात. धन्याचे हे श्रम आणि नुकसान वांचविले तर त्याचा मोबदला कोणीही आनंदाने देईल, आणि कुणब्याची राजरोष किफायत वाढेल. गिरण्यांसारख्या कारखान्यांत बहुतेक मजूर कुणबी वर्गातले आहेत, ते तेथे काम कुचराईने करतात. यूरोप-अमेरिकेच्या मजुरांच्या कामाचा पांचवा महावा हिस्साही हिंदी मजुराचे काम पडत नाही अशी ओरड आहे. ही का? तिचे कारण इतकेंच की, कामचोरपणा हा गुण आमच्या सर्वांच्या अंगी खिळला आहे. यूरोपियन जमीनदार, खाणीवाले व कारखानदार ह्यांनी हिंदी मजुरांना सक्तीने काम करण्याला भाग पाडण्याचे कायदे करून घेतले ते ह्या अवगुणांमुळे तर नसतीलना ? अर्थात् ह्या कायद्यांची तरफदारी करण्याचा हेतु नाही; फक्त आमचे अवगुण आम्हांला कसे नडतात हे दाखविण्याचा आहे. कामकुचरपणा व लबाडी ह्यांच्या मागोमाग येणारा दुर्गुण म्हणजे एकमेकांचा पहिल्याने अपहार, नंतर अदावती करण्याची बुद्धि धरणे हा होय. एकमेकांच्या शेतांत गुरे सोडणे, ती चोरून चारणे, सुड्या स्वतः किंवा इतरांकडून पेटविणे, गुरांना महारामांगाकडून विषप्रयोग करविणे, लुच्चेलफंग्यांना बगलेत मारून शेतांत चोऱ्या करणे किंवा करविणे, चोरलेल्या शेतमालाची ठेव ठेवणे किंवा तो स्वस्त्या भावाने खरेदी करणे, इत्यादि बळीराजाच्या पदवीला कमीपणा आणणारे पुष्कळ अवगुण कुणब्यांत संचरले आहेत. छोटेखानी गिरासिये, पाटीदार, कुणबी, शेतमाल चोरणाराला पाठीशी घालितात. हे पाहून एका डिस्ट्रिक्ट पोलीस सुपरिटेन्डेंट साहेबांना सखेदाश्चर्य वाटले, आणि ते हळहळून उद्गारले की, हातांत दिवटी घेऊन जर कुणबी विहिरीत उडी घालीत आहे तर त्याला इतरांनी तरी कसे वांचवावें ? मोलकऱ्यांमधील जे दोष येथवर वर्णन केले आहेत ते एकट्या कुणब्यांत आहेत आणि तदितर जातींचे मजुरांत नाहीत असें नाहीं. जातिस्वभावानुसार ते कमी किंवा अधिक-बहुधा अधिक-सर्व कामकऱ्यांत आहेत; आणि मजुरांत कुणब्यांची संख्या श्रेष्ठ असल्यामुळे 'हत्तीच्या पायांत सर्वांचे पाय' या न्यायाने ते जातिपरत्वे सांगत बसण्याची गरज नाही.

 तत्वतः कुणब्याच्या अवगुणांचे प्रमुख कारण सर्वांकडून त्याची होत असलेली कुतरओढ हे होय. तिच्यामुळे तो माशा पिल्याप्रमाणे गुंग होतो, आणि खऱ्याखोट्या देण्याची निवड करणे, व्यर्थ खर्च कमी करून बचतींतून आपली स्थिति सुधारणे इत्यादि काहीएक त्याला सुचेनासे होते. काळीत जे पिकतें त्याची लूट किंवा खैरात कमी होऊ लागली आणि तिचे उत्पन्न वाढले, तर कुणबी सर्व प्रकारे विशेषतः नैतिक व सांपत्तिकदृष्ट्या सुधरेल यात शंका नाही. पिनलकोड कमिशनरांनी असा अभिप्राय दिला की, ह्या देशांतील लोक आपण होऊन जुलमाचा प्रतीकार करणारे नाहीत, व त्यांचा टोलेखाऊपणा पाहून मन उदास होतें. ही स्थिति आज वाढली पण कमी झाली नसावी. तेव्हां महार, जागले व भिकार वगैरे खट्याळांचा व आडमुठ्यांचा बंदोबस्त करणे सर्वस्वी सरकारावर अवलंबून आहे. शेताचे सर्व उत्पन्न हाती लागण्याला शेताचे राखण चांगले झाले पाहिजे. ही गोष्ट सरकारलाही फार इष्ट आहे, आणि म्हणून मुंबईसरकारच्या जमीनमहसुलाच्या कायद्याच्या ६५ व्या कलमान्वये त्यांनी अशी सवलत दिली आहे की, शेतकऱ्याने रहाण्यासाठी किंवा शेतीच्या उपयोगासाठी जर शेतांत इमला बांधला तर सरकार त्याजबद्दल जास्त पट्टी आकारणार नाही. अशा कामासाठी शेतांतले गाटेगोटे, माती शेतकऱ्याला मोफत मिळते. फलत्यवेक्षिता स्वर्ण दैन्यं सैवानवेक्षिता । कृषिः कृषिपुराणज्ञ इत्युवाच पराशरः !! रानांत राहिले ह्मणजे कोटकल्याण होतें ही गोष्ट कुणब्यालाही ऋषिकालापासून उमजतें. गांवांतून शेतांत आणि शेतांतून गांवांत ज्या माणसांच्या व जनावरांच्या येरझारा होतात त्या वांचतात, ताजे-तवानेपणी माणसांजनावरांना काम करावयाला सांपडते, व हेलपाट्यांचा वेळ वांचून कामही जास्त उठतें. माणसें जनावरें रानांत राहिल्याने गावांतली घाण नाहीशी होऊन सर्व खतमूत शेतांत मुरतें. गांवांत उकिरडा सांचविल्याने खताचा सर्व कस उकिरड्याचे खांचेंत जिरतो, व अगदी निकस खत शेतांत जातें, आणि ते चांगला चटका घेत नाही. म्हणून खताची वाहतूक अंगावर पडून ताज्या खतापेक्षा खतही जास्त लागते. 'राखील त्याचे शेत.' शेतांत राहिल्याने राखणाचा खर्च कमी येतो किंवा तो आजिबात वाचतो, आणि राखणही वेळच्यावेळी व सावधगिरीचे होते. परंतु रानांत राहणें निर्धोक केल्याशिवाय वरील फायदे कुणब्याच्या पदरांत पडावेत कसे ? गुन्हे करणारे लोक चोरून का होईना पण हत्यारे मिळवितात. त्यामुळे गांवांत सुद्धा त्यांचा प्रतीकार करून दरोडा परतविण्याची सोय नसते, मग रानांतली अवस्था काय विचारावी ? हिंस्र पशु व सर्प ह्यांपासूनही रानांत जिवाला धास्ती असते. ब्रिटिश हिंदुस्थानांत सन १९१२ साली २०६६ लोक हिंस्र पशूंनी मारले. आणि २१४६१ लोक सर्पदंशानें मेले. त्याचप्रमाणे सदर सालांत ९४८७३ गुरेढोरे रानटी पशूंनी मारली आणि १०३०१ ढोरें सर्पदंश होऊन मेली. गुराढोरांना एक नवीन विघ्न उद्भवलें तेही जातां जातां सांगितले पाहिजे. ते हे की, अनेक रेल्वेना कोणत्याही प्रकारचे कुंपण नसल्यामुळे गुरे आगगाड्यांखाली चिरडून मरतात. समर्थाशी टक्कर घेण्याची लोकांना ऐपत नसल्याने रेल्वेकंपन्यांना लोकांचे नुकसान भरून देण्याची पाळी येत नाही, आणि लोक मात्र नाहक बुडतात. दरी, डोंगर, ओहोळांनजीकच्या चांगल्या चांगल्या जमिनींची किंमत घटत चालली आहे. कारण विचारतां असे सांगतात की, त्या बाजूला हरणाडुकरांचा फार त्रास होतो. झांवळ झांवळ असतांच कोल्हेहुक गांवकुसापाशी ऐकू येते, व हरणे इतकी धीट झाली आहेत की, ढवळ्या दिवसा राखणदाराच्या उशाशी येऊन पीक खातात, आणि ओरडले, धोंडे फेंकले तरी हालत नाहीत. राखणाच्या दिवसांत कुणब्याला आपल्या आईच्या दुधाची हरघडी आठवण होत असावी. दिवसभर गोफण चालवून दंड भरून येतात, आणि हर्र हुर्र, हांआं करतां करतां घसा कोरडा पडून अखेर बसतो, तरी पांखरें जनावरें दाद देत नाहीत. पुन्हां चांदणी निघाली की लागलीच गोफण, आरडाओरड, टिनचे डबे बडवून आवाज काढणे जें सुरू होतें तें फटफटेपर्यंत. जरा विसंबले की सबंध शेत थोटें होऊन जावयाचें. हा काळाचा व मनुष्यशक्तीचा किती प्रचंड खर्च आहे ? एका वयोवृद्ध पाटलाने असे सांगितले की पूर्वी घोड्यावर माणूस पाहिला की, हरिणे लांब पळत, ती आतां बेधडक घोड्याजवळून जातात. देवाने पोटापुरतें ज्ञान सर्वांना दिले आहे. एका शिकारी पारशी गृहस्थाने सांगितले की मी स्वतः जंगलांतून पिस्तुलाशिवाय चाललों तरी हरणे धूम पळतात, तीच शिकार न करणारा शिपाई गोळ्या बंदूक घेऊन चालला तरी त्याला न भितां जरा दूरवर मात्र उभी राहतात. हरणासारखी काळजी कोणी करीत नाही म्हणून 'हरिण-काळजी' शब्दप्रयोग प्रचारांत आला. परंतु आतां पहावें तो “ विश्वासोपगमादभिन्नगतयः शब्दंं सहन्ते मृगाः " हा ऋषींच्या आश्रमाचा देखावा शिवारभर नजरेस पडतो. ज्याजवळ बंदुक असते त्याला बार काढण्यास बोलवावे तर
तो गांवचा संभावित मनुष्य असतो. पैसे घेऊन बार काढण्याला त्याला शरम वाटते, आणि दर बाराला दोन चार आणे खर्च येतो म्हणून तो टाळाटाळी करतो. वाघाची भीति नाहींशी झाल्यामुळे कोल्हे, रानडुकरें व हरणे यांची वीण फार झाली आहे; आणि ऊस, भुइमुगासारख्या किफायतदार उदिमाचा धुव्वा उडतो. लांडग्यांचा, तरसांचा, वनगाईचा उपद्रवही बराच आहे. रानटी जनावरांप्रमाणे पांखरांच्याही झुंडी पूर्वीपेक्षां पिकावर जास्त येतात व भीत नाहीत. असे सांगतात की, पूर्वी होला नांवाचा पक्षी कडे प्रांतांत सीनानदीच्या अलीकडे येत नव्हता, व तो कावळ्याप्रमाणे जमिनीवरचा दाणा वेंची पण कणसावर कधीं बसत नसे. आतां ही दोन्ही पांखरे सदर प्रांतांत बेधडक कणसावर बसून दाणा खातात. वटवाघुळे फळांचा फन्ना पाडतात. सरकारी जंगलांत दडण चांगलें सांपडते, आणि लोक नि:शस्त्र झाल्यामुळे संहार होत नाही. शिकारी साहेब लोक तरी कितीसे कामाला येणार ? तेव्हां येथे हत्यारांचा प्रश्न उपस्थित होतो. तो राजकीय महत्वाचा असल्यामुळे सरकाराला लोकांचा दिलभरवसा आल्याशिवाय व त्यांच्या सद्धेतूची पूर्ण खात्री पटल्याशिवाय त्याची वासलात समाधानकारक लागणार नाही. तथापि चर्चा सुरू होण्याला काही तरी आधार पाहिजे म्हणून खाली लिहिल्याप्रमाणे सुचवितों. प्रत्येक गांवांतल्या किंवा चार सहा गांवें मिळून त्यांतल्या संपत्तिमान अबूदार पंचांनी अशी हमी घ्यावी की, हत्यारे पंचांच्या ताब्यांत राहतील; कायदेशीर रीतीने वित्त किंवा जीवित ह्यांच्या संरक्षणाखेरीज इतर कामी त्यांचा उययोग करणार नाही किंवा होऊ देणार नाहीं; शेतकऱ्यांचे अर्जावरून त्यांचा उपयोग करूं तेव्हां खर्ची पडलेल्या दारूची व परिणामाची नोंद करूं; बेकायदेशीर उपयोग केल्यास अमुक गुन्हेगारी किंवा जामिनकी भरूं; आणि सरकार नेमील त्या अधिकाऱ्यांना हत्यारे व त्याबद्दलचे कागदपत्र वेळोवेळी दाखवू. ह्याप्रमाणे योग्य निर्बंध घालून जरूर त्या गांवाच्या शेतकऱ्यांच्या उपयोगाकरितां हत्याराचे परवाने दिले तर 'गाढवाने शेत खाल्लें पाप ना पुण्य' अशी जी अनेक ठिकाणी पिकाची नासाडी होते ती टळेल. ह्या प्रकारचे हत्याराचे परवाने देण्याचा अधिकार प्रांत मॅजिस्ट्रेटला दिला तर रयतेची सोय पुष्कळ वाढेल. हत्यारांच्या खालोखाल शेतकऱ्यांची दुसरी तक्रार कुंपणाबद्दल आहे. जंगलामुळे कुपाटीला फांटी मिळत नाहीत असें कुणबी कण्हतात. निवडुंगाचे कुंपण करावें तर त्याचा कांटा विषारी असून त्याखाली विंचू, साप राहतात, त्याला आग फार असते व त्याच्या वसव्यामुळे ५/१० हात जमिनीत पीक येत नाही. शेराचे कुंपण करावें तर त्याला आग असून त्याला जनावर खेटले म्हणजे अपाय होतो. एका शेताभोंवतीं १०।१२ हात रुंद व ६|७ हात खोल असा खंदक रानडुकरांसाठी केलेला दिसला. इतकी जमीन दरसाल अडविणे फायदेशीर नसले पाहिजे. जें झाड एका ठिकाणी उगवतें तें तेथून बारा कोसांवर उगवेल की नाही हे सांगता येत नाही. तेव्हां बोरी, बोऱ्हाटी, हेकळ, करवंदी, खैर, करंजी वगैरे झाडाझुडपांचे कुंपण करणे झाल्यास अल्पखर्चाने फार जागा न अडविता आणि वसवा न पाडतां कोणतें कुंपण घालता येईल ह्या प्रश्नाचे सर्वसाधारण उत्तर देतां येणार नाही. सबब हा प्रश्न शेतकीसभेने हाती घ्यावा, आणि वाकबगार शेतकऱ्यांकडून त्याची शहानिशा करवून फायदेशीर कुंपणे ठरवावीत. कुंपण नसल्याने माणसें जाणून बुजून शेतमालाची चोरी करतात, व गवत किंवा धान्य उगवले की रस्त्याने जाणारी येणारी जनावरें शेतांत तोंड घालतात. असल्या जनावरांमध्ये देवा-पिरांला वाहिलेली जनावरें अति उपद्रव देतात. खेड्यांत मोकार जनावरे सोडण्याची सर्रास चाल आहे, ती अजिबात बंद झाली पाहिजे. पहातां पहातां ओघाने आले म्हणून येथे हेही सांगितले पाहिजे की, हलक्या जातींचे वतनदार व फिरस्ते नुसते शेतमाल व जनावरांवरच ताव मारून राहतात असें नाहीं तर ते कुणबिकीचे अनेक पोटधंदे कुणब्याला किफायतशीर होऊ देत नाहीत. इंग्लंडमध्ये निम्मी जमीन चारण राखतात, व आपल्याकडे शेकडा सतरा जमीन सुद्धां चारा-पेरीला ठेवीत नाहीत. सुमारे पावहिस्सा
रान जर ज्याने त्याने चाऱ्यासाठी ठेविलें तर गुरेढोरें, शेळ्यामेंढ्या, घोडी बाळगून त्यांची पैदास व हेड करणे हा धंदा कुणब्याला बसल्याजागी साधण्याजोगा आहे. पण तसे करण्याला कुणब्याला खर्च येतो, आणि आयतखाऊंना येत नाही. ते आपलें व जनावरांचे पोट बाहेर काढतात. त्यामुळे बिन चोरलेली जनावरें, कोंबड्यासुद्धा त्यांना स्वस्त विकणे परवडते, आणि त्या मानाने कुणब्याचा धंदा नाहक्क बुडतो. तेव्हां ह्याही दृष्टीने विचार करतां अशी स्थिति निर्माण केली पाहिजे की, ज्याला जनावरें पोसण्याचे सामर्थ्य नाही त्याने ती बाळगू नयेत, व कुणब्याचा हक्काचा धंदा फुकटफाकट बुडवू नये.

 मुबलक भांडवल, साक्षरता आणि प्रवासजन्य ज्ञान ह्यांच्या अभावाचें जबरदस्त लोढणे गळ्यांत वागवून आमच्या एकलपायी कुणब्याने जातिधर्म व आनुवंशिक संस्कार ह्यांच्या जोरावर कुणबीक जितकी पूर्णत्वाला नेणे शक्य होते तितकी नेली असें यूरोपिअन पंडितांचे बहुमत आहे. त्याला शास्त्रीय व्याख्या किंवा उपपत्ति तोंडाने सांगता येत नसेल; परंतु कोणत्या जमिनींत कोणते पीक काढावें, त्यांच्या पाळ्या कशा असाव्यात, बीं कसें धरावें, मावा चिकटा कानी वगैरे कीड कशी मारावी, खत कोणते योग्य, जनावर कसे तयार ठेवावें, त्यांचे औषधपाणी वगैरे सर्व कामें तो बापआजाची पाहून खाशी नामी करीत आला आहे. आतां मालकीची जमीन नसली तर कुणबी ती काळजीकाट्याने करीत नाही, व कांहीं कुणबी इतके दरिद्री झाले आहेत की, त्यांना शेताची उस्तवार करण्याची ऐपत नसते, अशांची गोष्ट वेगळी. हे वगळले तरी आमच्या कुणबिकींत सर्व प्रकारे सुधारणा करण्यास अतिशय जागा आहे हे पाश्चात्य कुणबिकीवरून सिद्ध होते. ह्या सुधारणा कशा करतां येतील ह्याबद्दल सरकाराने शेतकी खातें स्थापून आटोकाट प्रयत्न चालविले आहेत. पुसा येथे सर्वात मोठे शेतकी कॉलेज काढून त्याला प्रयोगशाळा जोडली आहे. तेथें कृषिकर्मशास्त्राचे शोध चालू आहेत. हे शोधाचें काम रयतेच्या आवाक्याबाहेर आहे; म्हणून कृषिशास्त्राच्या शोधाचें
काम सरकार करील तितकें थोडेच आहे. इलाखानिहाय शेतकीची कॉलेजें आहेत. त्यांत शिकून तयार झालेल्या लोकांना सरकार शेतीखात्यांत घेते, आणि त्यांच्याद्वारे कुणबिक्रीच्या ज्ञानाचा प्रसार करतें. मुंबई इलाख्याचे शेतकी कॉलेज पुणे येथे आहे. तेथेही शेतकीसंबंधानें प्रयोग व शोध चालू असून त्यांच्या माहितीचा प्रसार करण्याचे काम चालले आहे. सदर कॉलेजामध्ये थोड्या दिवसांत संपणाऱ्या अभ्यासक्रमाचे वर्ग आहेत, आणि देशी भाषांतून उसाची लागवड शिकविण्याचा वर्ग आहे. लोणी काळभर, जांभूळ (ठाणे), देवीहोसूर (धारवाड ), गोध्रा व मिरपुरखास (सिंध ) येथें देशी भाषांत कृषिविद्या शिकविणाऱ्या शाळा स्थापन झाल्यासारख्या आहेत. श्री० सरदार बिवलकर ह्यांनी अलीबागेस स्वतःच्या खर्चाने शेतकी शाळा चालविली आहे, आणि तिचा लोकांना पुष्कळ उपयोग होत आहे. शेतकी शाळा स्थापन करण्यासाठी चोपडे तालुक्याच्या लोकांनी वर्गणी जमविली आहे. सरकाराने अलीबाग, रत्नागिरी, धुळे, जळगांव, अहमदनगर, पुणे, मांजरी, नडियाद, सुरत, दोहद, धारवाड, गोकाक, गदग वगैरे ठिकाणी नमुन्याची शेतें स्थापिली आहेत. जनावरांच्या जोपासनेचा व त्यांची पैदास सुधारण्याचा बोध होण्यासाठी सरकारने दावणी घातल्या आहेत; त्यांत मुख्य गुजरातेतील नार्थकोट गोशाळा होय. सबंध इलाख्यांत शेतकी प्रयोगांची ठाणी वीस असून पोटठाणी एकोणीस आहेत. ह्या सर्व ठिकाणी जे शोध उपयुक्त ठरतात त्यांचे ज्ञान शेतकऱ्याला मिळावे म्हणून सरकार देशी भाषेत पुस्तकें पत्रके प्रसिद्ध करून गांवोगांव वाटीत आहे. त्यांमध्ये जमिनींची व बियांची निवड, कोणती नवीन पिकें कोठे काढता येतील, कोणती नवीन आउतें ( जसे वाफेचा नांगर ) इकडे उपयोगांत आणितां येतील, धान्य आणि जनावरांचे रोग व त्यांवरील उपाय, उत्तम खतें, उदीमांवरील कीड घालविण्याचे उपाय, दुभत्याच्या जनावरांची जोपासना, मलई काढण्याचे यंत्र वगैरेंबद्दल माहिती असते. ह्या सर्वांचे सप्रयोग ज्ञान देण्यासाठी ठिकठिकाणी प्रात्याक्षिके व प्रदर्शनही भरविण्यांत येतात. कातड्याच्या मोटा महाग होत आहेत, म्हणून पंप ऑईल एंजिन वगैरेकडून यांत्रिक शक्तीने पाणी काढण्याचे ज्ञान लोकांना देण्याची व पहारीने थोड्या खर्चात विहिरींना पाणी कसे लागेल ह्याची माहिती देण्याची खटपट अॅग्रिकल्चरल एंजिनीअर करतात. ह्यासंबंधानें व्यवहार्य योजना सादर करण्यासाठी सरकारने एक कमिटी नेमिली आहे. कुणब्याच्या दृष्टीने जमिनीच्या इतकेच महत्वाचे भांडवल गुरेढोरें होत; म्हणूनच तो जमिनीला आई आणि गुरांना लक्ष्मी म्हणतो. गेल्या तीस वर्षांत जनावरांची किंमत दुपटीवर गेली, आणि साठ रुपयांच्या खाली चांगला बैल मिळत नाही. जनावरांचे रोग बरे करण्यासाठी लोकल बोर्डे व म्युनिसिपालिट्या ह्यांनी ५० दवाखाने स्थापिले आहेत; आणि अद्यापि जरी ते तालुकानिहाय झाले नाहीत तरी त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे व त्यांवरील डॉक्टर सवडीप्रमाणे गांवोगांव फिरतात. सरकारच्या सिव्हिल व्हेटर्नरी खात्याची त्यांवर देखरेख आहे. शेतकी खात्याप्रमाणे या खात्याचाही शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा; आणि आपली जनावरें चालढकलीने जायबंदी किंवा ठार होऊ देऊ नयेत. शेतीची व इतर जनावरे ह्यांची सुधारणा करण्याचे कामही ह्याच खात्याकडे सोपविले आहे. ठिकठिकाणी शेतकीसभा स्थापन करण्याला सरकार उत्तेजन देत आहे. त्या शेतकऱ्यांच्या हरप्रकारच्या अडचणी कशा दर करता येतील ह्याची वाटाघाट करतात. अशा सभा आपल्या इलाख्यांत सुमारे पन्नास आहेत. पुण्याची शेतकीसभा ‘शेत शेतकरी' नांवाचे कुणबिकीच्या माहितीने भरलेले मासिक पुस्तक प्रसिद्ध करते. नागपुरकडे 'किरसानी समाचार' नांवाचे असेच मासिक प्रसिद्ध होते. ही जी तोंडाशी गंगा आली आहे. तिचा लाभ सर्वांनी अवश्य करून घ्यावा; आणि ह्याखेरीज शेतीसंबंधाने लागेल ती माहिती जिल्ह्याचे अॅग्रिकल्चरल ओव्हरसियर ह्यांना विचारावी म्हणजे ते योग्य तो सल्ला देतील.

 सहानुभूतिविरहित अशा परप्रांतीय सावकारांच्या द्रव्यलोभाने आणि स्वतःच्या गैरसावधपणाने कुणबी कफल्लक झाला असें सरकारच्या नजरेस येऊन हिंदुस्थान सरकारने त्याला सांवरण्याकरितां दक्षिणेतील शेतकऱ्यांस ऋणमुक्त करण्याचा कायदा सन १८७९ सालीं पास केला; आणि सरकारांतून त्याला कर्जाऊ रकमा देण्यासाठी सन १८८३ सालचा १९ व १८८४ चा १२ असे आणखी दोन कायदे पास केले. शेतकरी कायद्यामुळे सावकाराच्या घेण्याचा हिशोब पाहून त्यावर योग्य व्याज आकारून त्याचे फेडीबद्दल कोर्टाला हप्तेबंदी करितां येते. तसेंच, खरेदीचा व्यवहार गहाणाचा आहे की काय हे पहातां येतें. सावकारांनी कुळाला हिशेब, पावत्या दिल्या पाहिजेत असें सदर कायद्याने फर्माविले आहे. वर सांगितलेला शेतकी कायदा रद्द करून सरकार दुसरा कायदा करीत आहे. त्यांत विशेष हा आहे की, शेतकऱ्यांशी घेणे देणे करणारांनी जमाखर्च ठेवून त्याची नक्कल कुळांना दिली पाहिजे. पंप, विहिरी वगैरे पाण्याची कामें, नापेर अगर दलदलीची जमीन वहितीत आणणे, संरक्षक कामें, इत्यादीसाठी जमीन तारण घेऊन लांब मुदतीचें भारी कर्ज सन १८८३ सालच्या जमीन सुधारण्याच्या कायद्याप्रमाणे मिळते; आणि ह्या कर्जानें केलेल्या सुधारणेनें जर जमिनीची किंमत वाढली, तर तिजवर सरकार जास्त आकार बसवीत नाही. सन १८८४ सालच्या कायद्याला शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा कायदा म्हणतात. त्याच्या आधाराने बैल, बी, चारा, खावटी वगैरेसाठी थोड्या मुदतीचे हलकें कर्ज सरकार शेतकऱ्यांना जमिनी अगर जामिनाचे तारण घेऊन देते. या कर्जावर पूर्वी दरसाल दरशेकडा ५ टक्के व्याज पडे. अलीकडे व्याजाचा दर शेकडा ६। टक्के झाला आहे. कित्येक गांवांला पोळासाठी सरकारने तगाई दिली आहे. सरकार शेती सुधारण्यासाठी याप्रमाणे जें कर्ज देते त्याला तगाई, तकावी, किंवा तकवाई असे म्हणतात. राजांनी शेतकऱ्यांना मदत म्हणून कर्ज देण्याचा प्रघात हिंदुस्थानांत प्राचीन काळापासून आहे, ह्या कर्जाला ते तगाई म्हणत. इंग्रज सरकारनें तोच प्रघात आणि तेंच नांव चालविले. तगाई हा मोठा अर्थपूर्ण शब्द आहे. तगणे म्हणजे कष्टाने जीव धरून राहणे. थकवा आल्यावर जी थोडीशी हुषारी येते तिचे नांव तकवा. कुतंगळ कुळाला तकवा आणण्यासाठी जें कर्ज सरकार देतें तें तगाई. हा अर्थ लक्षात आणून जर कुळे आपल्या गरजेपुरतें कर्ज काढतील तरच सरकारचा हेतु सफल होईल. पण लोक ओढगस्त असल्यामुळे ज्या कामासाठी कायद्याने तगाई देतां येत नाही त्यासाठी पैसे लागले तरी पाटीलकुळकर्ण्यांच्या मदतीने कायदेशीर कारण दाखवून तगाई काढतात, आणि त्यामुळे तगाईनें शेतसुधारणा किंवा शेतीचे कामाला मदत होण्याचे एकीकडेच राहून कर्जबाजारीपणा मात्र पुष्कळ ठिकाणी वाढला आहे. असली फसवाफसवी करून आपण मोठी चूक करतो, असे लोकांना मनापासून वाटत नाही. कुणब्याला वाटते की, आली गरज भागविली पाहिजे, आज थोड्या व्याजाने रक्कम मिळते ती घेऊ, आणि बरा दिवस आला म्हणजे फेडून टाकू; ती मिळण्याकरितां खोटे बोलावे लागले आणि लांचलुचपतही यावी लागली तरी त्यांत मोठेसें कांही गैर नाही. कोणाचीही गरज भागविण्याला मदत करणे पुण्य आहे, शिवाय वेळेवर उपयोग केल्याचा उपकार कुळांवर होतो, तेव्हां तेवढ्यासाठी थोडेसें लबाड बोललें म्हणजे पाप लागेल असें नाहीं असें पाटीलकुळकर्ण्यांला, कुळाचे जामीनदारांला, किंवा त्याच्या शेताचा व कल्पित शेत-सुधारणेचा कयास करणाऱ्या पंचांना वाटते. आपले मदतीशिवाय तगाई मिळत नाही हे ध्यानात आणून हे लोक आपली कसर जाऊं देत नाहीत; निदान तगाईचे कागद करण्यासाठी अगर जाबजबाबासाठी ठाण्यांत किंवा अंमलदारांच्या स्वारीत, पाटील, कुळकर्णी, जामीनदार, पंच वगैरेंना जाणे पडले तर सर्वांचा वाटखर्च व भोजनखर्च तरी कुळांवर बसतोच बसतो. तगाई वाटण्याचे दिवसांत तालुक्याच्या ठाण्यांत हलवायाची भट्टी पेटलेली असते; कारण सोकावलेल्या मंडळींना ओल्या कोरड्या दशम्या भाकरी जात नाहीत, मिठाई लागते. कुणब्याला असे
होते की कोणीकडून तरी पैसा गाठू या, मागे पुढे पाहण्यांत हंशील नाही. पूर्वी सरकारचे कर्ज काढण्याला लोक कचरत; आपणांकडून वेळेवर हप्ते जाणार नाहीत, आणि जमिनीचा लिलांव होईल असे त्यांना वाटे. परंतु सन १८९६ च्या दुष्काळानंतर तगाई रगड वाटली. तेव्हांपासून बेधडक तगाई घेऊ लागले. पहिल्या पहिल्याने तरी पुष्कळांनी ती वाजवी कामांकरितां काढली नाहीं, अगर वाजवी कामांकडे लाविली नाही. आपला दाम खोटा असें ते ओळखून होते, म्हणून त्यांनी लांचलुचपतीची खैरात केली असली पाहिजे. त्यांनी जी वाट पाडली तिच्यामुळे वाजवी कामांसाठी ज्यांना तगाई पाहिजे होती, अशा लोकांनासुद्धा तगाईसाठी भूयसी द्यावी लागली. मिशनरींच्या अनुकूलतेने ख्रिस्ती शेतकऱ्यांना मात्र दक्षिणेशिवाय तगाई मिळाली. पण ह्या लोकांनी सुद्धा ती वाजवी कामाकडे खर्च केली की नाही याबद्दल जबरदस्त शंका आहे. कारण त्यांच्याकडेही पुष्कळ तगाई थकली आहे, आणि त्यांपैकी बरेच जण इतर कुणब्यांप्रमाणेच पावसाच्या नांवानें खडे फोडतात. सरकारच्या नजरेला वरील दोष येऊन तगाई देण्याच्या पद्धतीत आतां पुष्कळ सुधारणा झाली आहे, व लांचलुचपत न होऊ देण्याविषयी सर्व अंमलदार दक्ष असतात. जुजबी जमीनदाराला तगाई देण्यांत हात आंखडावा असेंही धोरण अलीकडे अमलांत येऊ लागले आहे. इतर सावकारांप्रमाणे सरकारचे भांडवल मर्यादित नसल्यामुळे सरकारला हवी तितकी रक्कम तगाई देतां येते. जसें तारण आणि शेत-सुधारण्याचे काम तशी तगाईची रक्कम मिळते, आणि तिची फेड हप्त्याहप्त्यांनी होते. तगाईला स्टांप व नोंदणीच्या खर्चाचीही सवलत आहे. सावकारी कर्जाप्रमाणे वसुलांत व हिशेबांत घोटाळा असण्याचे कारण नाही. कुणब्याला सालोसाल खाते-उतारा सरकारने दिला तर तो बराच जागा राहील. तेव्हां जर कुणब्यांनी वाजवी कामासाठी जरूर तितकी तगाई काढली, आणि तिचा यथातथ्य उपयोग केला, व वायद्याप्रमाणे हप्ते भरले तर सावकाराकडून पैसे काढण्यापेक्षा तगाईनें पैसे काढण्यांत त्यांचा कमीत कमी दुपटीचा तरी फायदा खात्रीने आहे, आणि त्यांनी तो अवश्य करून घ्यावा.

 तगाईपेक्षा शेतकऱ्यांंना सर्वतोपरी उपकारक अशी सरकारी योजना म्हटली म्हणजे ठिकठिकाणी स्थापन होत असलेल्या परस्परसाह्यकारक मंडळ्या किंवा पतपेढ्या होत. ह्यांसंबंधाने हिंदुस्थान सरकारने सन १९१२ चा कायदा अंक २ पास केला आहे. शेतकरी, कारागीर थोड्या उत्पन्नाचे लोक ह्यांच्यामध्ये काटकसर व स्वावलंबन वाढावें हा ह्या कायद्याचा उद्देश आहे, आणि त्याप्रमाणे सहकारी मंडळ्या चालवून उपरिनिर्दिष्ट लोकांनी तो सफल केल्यास त्यांत त्यांचे निरंतरचे कल्याण आहे. खेड्याच्या दुकानदारीकडे वर वर पहाणाराला सुद्धां हे कळून येईल की, शेतकऱ्याचा सर्व प्रपंच उधारीने चालला आहे, आणि त्याला हरहमेष किरकोळ कर्ज काढावे लागते. ही उधारी आणि हे कर्ज रासमाथ्याला चुकतें करण्याची तो बोली करतो, ह्मणजे त्याला थोड्या मुदतीपर्यंत थोडे थोडे कर्ज लागत असते. अहमदनगर जिल्ह्यांत साधारण तपासाअंती असे समजते की, बरे म्हणविणाऱ्या कुणब्यांंमध्ये शेकडा २५ जणांना बियाण्यासाठी, १० ना जनावरांसाठी, १७|१८ ना शेतसाऱ्यासाठी व शेतीच्या आउतासाठी, आणि १०।१२ ना कपडालत्ता,धान्य वगैरेसाठीं सालोसाल कर्ज काढावे लागते. अलीकडे मजुरीचा दर फार वाढल्याने खुरपणी-कापणीच्या वेळी बऱ्याच शेतकऱ्यांना पैसा उचलावा लागतो. ह्या व अशा प्रकारच्या नडींसाठी लागणारे थोड्या मदतीचें किरकोळ कर्ज हलक्या व्याजाने मिळाले आणि त्यांना रोखीनें माल घेतां आला, तर सावकारांना द्यावे लागणारें जडीप व्याज वांचून त्यांचा पुष्कळ फायदा होईल, आणि ते ऋणमुक्ततेचा मार्ग चालूं लागतील. हाच नियम साळी, कोष्टी, चांभार, ढोर वगैरे कारागीर, कारखान्यांतले मजूर, भंग्यांसारखे धंदेवाले ह्यांना लागू पडतो. रोकड जवळ असणारे शेतकरी, कारागीर व मजूर फार थोडे ही गोष्ट खरी, पण सुदैवाने ती ज्यांच्याजवळ असेल त्यांनी पतपेढी स्थापून,
तिच्यांत ती गुंतविली तर तिच्यावरचे व्याज पदरांत पडून वेळी अवेळी स्वतःलाही हलक्या व्याजाने कर्ज काढता येईल. अमुक रकमेपर्यंत एकंदर कर्ज द्यावयाचे असा ठराव पास करून विलायतेंत स्कॉबी अग्रिकलचरल क्रेडिट सोसायटीने ज्याप्रमाणे आपली जोखीम नियमित केली, त्याप्रमाणे इकडील सहकारी मंडळ्यांनाही करता येईल; आणि अनियमित जबाबदारीचा जो कित्येकांना बागुलबुआ वाटतो तो नाहीसा होईल. तेव्हां एक अगर एकाहून अधिक गांवच्या अब्रूदार, सत्यवादी, निग्रही ह्मणजे वायदा टळू न देणारे आणि हे माझं हे लोकांचे अशी प्रतारणा नसणारे शेतकरी, कारागीर अगर मजूर ह्यांनी एकचित्त व्हावे, आपले शकत्यनुसार भांडवल जमवावे आणि सहकारी मंडळी स्थापन करावी. प्रवेश-फी, देणग्या, ठेवी, व दुसऱ्या सहकारी मंडळ्या व पेढ्यांकडून कर्ज इत्यादि साधनांनी सहकारी मंडळ्यांना भांडवल गोळा करता येते. पतपेढी स्थापन करण्यासंबंधाचे सर्वसाधारण नियम सरकारने प्रसिद्ध केले आहेत. त्याबद्दलची माहिती तालुक्याचे मामलेदार सांगतील. शिवाय या कामांत सल्लामसलत देणारे गृहस्थ अनेक जिल्ह्यांत आहेत, तेही योग्य ती मदत देतील. प्रथम छापलेले नियम मागवावेत, मग लहानशी सभा भरवून त्यांत त्यांची चर्चा करावी व पेढीचा व्यवहार कशा रीतीने चालवावयाचा हे मुक्रर करावें, आणि बहुमतानुरोधाने स्थानिक स्थितीला योग्य ते फेरफार करून त्यांवर बारा इसमांनी सह्या करून मे. रजिष्ट्रारसाहेब कोआपरेटिव्ह सोसायटी, पुणे, यांजकडे सदर सहकारी मंडळी नोंदविण्याबद्दल अर्ज करावा. मंडळी नोंदल्यानंतर अर्जदारांनी व त्यांखेरीज मंडळींत येऊ इच्छिणाऱ्या लायक गृहस्थांनी सभा भरवावी, आणि तिच्यांतून व्यवस्थापक मंडळी, अध्यक्ष, कागदपत्र व हिशेब ठेविण्यासाठी एक सेक्रेटरी व त्याचा पगार वगैरेसंबंधाने ठराव करून कामास सुरुवात करावी. मंडळीची शिल्लक पोस्टाचे सेव्हिंग ब्यांकेंत राहते. किरकोळ खर्चासाठी ह्मणून सेक्रेटरीजवळ १० रुपये
असतात. मंडळीच्या पेढीवर जे ठेवी ठेवितात, त्यांना चालू ठेवीवर दरसाल दरशेकडा १σ९ आणे, सहा महिने मुदतीच्या ठेवीवर ३σ२ आणे,आणि वर्षावरील मुदतीच्या ठेवीवर ६σ४ व्याज मिळते. जे सभासद पेढीवर कर्ज काढतात, त्यांना दरसाल दर शेकडा ९।१० टक्के व्याज पडतें. मंडळीचे हिशेब दरसाल सरकारचे हिशेबनीस तपासतात; शिवाय त्यांजवर लहानमोठ्या सर्व अमलदारांची नजर व तपासणी असते. मंडळीचे दस्तैवजांस स्टॅप व नोंदणीफी सरकारने माफ केली आहे, आणि कोर्टमार्फत व पंचायतमार्फत घेणं उगविण्याच्या कामींही विशेष सवलती दिल्यामुळे मंडळीचे कर्जवसुलाचे काम साधारण सावकारी दाव्यांप्रमाणे दिवसगतीवर न पडतां तडकाफडकी होते. हिंदुस्थानांत सन १९१३ सालपर्यंत १२३२४ अशा मंडळ्या झाल्या असून सदर सालांत त्यांचे सभासद ५७३५३६ व भांडवल पांच कोटी रुपयांवर होते. ह्याचा फायदा सुमारे साठ लक्ष लोकांनी घेतला आणि हलके व्याज व सचोटीचा हिशेब ह्यांमुळे त्यांची एका वर्षांत वीस लाख रुपयांची बचत झाली. गेले साली मंडळ्यांची संख्या १५६७३ झाली, व भांडवल सात कोटी एकाहत्तर लक्षांवर जाऊन त्यांस सुमारे २५ लक्ष ४७ हजार नफा मिळून सालअखेर त्यांजवळ साडे पसतीस लाख शिल्लक उरली. गुदस्तसालपर्यंत मुंबई इलाख्यांत ६९८ मंडळ्या स्थापन झाल्या, त्यांचे भांडवल रु.६६१३१३५ म्हणजे अर्धकोटीवर असून त्यांत सभासद ६६७०४ होते; आणि त्यांना दरसाल शेकडा सहा टक्के व्याज सुटले. त्यांपैकी शेतकऱ्यांच्या सहकारी मंडळ्या ५६८, सभासद ३८६२१ व भांडवल रु. २८०३८४९ आणि विणकराच्या मंडळ्या २९ व भांडवल रु. १०६४९० होतें. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून असें समजते की, १९१५ चे मार्चअखेर मंबई इलाख्यांत अशा मंडळ्यांची संख्या ८१७ पर्यंत गेली आहे. त्यांची फोड येणेप्रमाणे आहे. शेतकऱ्यांच्या मंडळ्या ६३१, बिनशेतकऱ्यांच्या १०३, कोष्ट्यांच्याच्या २९, शेतकी सरंजाम पुरविणाऱ्या २३, धान्यभांडारे २५, सेंट्रल बँका ५, व फिडरेशन १.  परस्परसहकारी मंडळ्यांचा मुख्य फायदा हा की, कुणबी, हलके धंदेवाले व मजूर ह्यांना सावकारापेक्षा हलक्या व्याजाने कर्ज मिळतें, जमाखर्चात भोळें राहत नाही, व लुच्चेगिरी होत नाही. सावकारी कर्जाचें व्याज सावकार आणि तगाईचे व्याज सरकार घेते. ते काही परत गांवकऱ्यांच्या घरांत जात नाही. पतपेढीच्या व्याजाची गोष्ट तशी नाही. तें सहकारी मंडळीच्या सभासदांच्या म्हणजे रयतेच्या पदरांत पडते. तिची संपत्ति वाढते म्हणजे कर्ज मिळाल्याने गरज भागते आणि पुन्हा त्याचा नफाही खावयास सांपडतो. तगाई मिळण्यास पाटील-कुळकर्णी, जामीनदार यांचे जाबजबाब, मुलकी अधिकाऱ्यांची चौकशी वगैरे गोष्टींमुळे कालावधि लागतो. त्वरित पैसा पाहिजे असल्यास तगाईने वेळ मारून नेतां येत नाही. पुष्कळ प्रसंगी वेळ निघून गेल्यावर तगाई भेटते. पैसा पाहिजे असतो आज व तगाई मिळणार महिना पंधरा दिवसांनी. तेव्हां कित्येक वेळां भारी व्याज कबूल करून लोक पैसा काढतात, आणि तगाई मिळाल्याबरोबर तो चुकवितात. पतपेढीचा पैसा मिळण्यास इतकी दिरंगाई लागत नाही. तगाई कोणत्या कामांसाठी घ्यावयाची ती कामें ठरली आहेत. त्यांखेरीज इतर कामासाठी तगाई मिळत नाही. पतपेढीची गोष्ट तशी नव्हे. ज्या कामासाठी तगाई मिळत नाही अशा अनेक योग्य कामांसाठी पतपेढीला आपल्या सभासदांना कर्ज देतां येते. पुरातन काळापासून सावकार आणि कुळे ह्यांचे नाते सेव्य-सेवकाचें होऊन बसले आहे. त्यामुळे सावकारांत अरेरावी व जुलम, कुळांमध्ये मिधेपणा व गुलामगिरी, आणि दोघांमध्येही कपटाचरण शिरले आहे. दुसरे असे की, जो तो आपल्या पायापुरतें पाहतो, एकंदर गांवाच्या किंवा समाजाच्या हिताकडे लक्ष देऊन वर्तन करीत नाही. त्यामुळे 'हलवायाच्या घरावर तुळशीपत्र' ठेवण्याची बेजबाबदार खोड आपल्या लोकांना लागली आहे. एकाद्याला जर कोणाकडे कर्ज काढावयाचं असलें आणि कर्ज देणाराने जर विचारले की, असामी कशी आहे, तर कर्ज घेणारा वाईट असला तरी आपले शब्दाने त्याचे काम होत अस-
ल्यास हा खुशाल त्याची शिफारस करणार. त्यांतून ह्याने जर कां कर्ज घेणारापासून पानसुपारी खाल्ली असली अगर तो ह्याच्या नात्यांतला असला तर मग शिफारस म्हणजे सोळा आणे उतरावयाची. समाजाच्या ह्या वर्तनानें सावकारांना फाजील दक्ष रहावे लागते, आणि आपल्या पैशासाठी शिकस्तीची मजबुती करून ठेवावी लागते. व्याजाचे दर भारी होण्यास किंवा सावकारी हिशेबांत खोटेपणा शिरण्यास आमच्यांतली नेकीची वाण हे एक कारण असावें. जेव्हां पैसा एकट दुकट सावकाराचा नसतो आणि जनसमूहाचा समाईक म्हणजे सार्वजनिक असतो, तेव्हां तो वाटेल तसा वेडावांकडा खर्च करण्याची लोकांना दिक्कत वाटत नाही. त्यांत कोणी कासाविशी करूं लागला तर त्याला धडधडीत म्हणतात की, 'वाहत्या गंगेत हात धुवून घे, खर्चणाराचे खचते आणि कोठवळ्याचें कां पोट दुखतें ?' ह्याचा अर्थ इतकाच की, पैसा स्वतःचा नसला म्हणजे त्याच्या योग्यायोग्य खर्चाकडे कोणी प्रामाणिकपणाने व बारकाईने पाहूं नये. म्हणूनच आमच्या सार्वजनिक व्यवहारांत ठोकरी बसतात. ही खेदजनक स्थिति नाहीशी करण्याला पतपेढी ही उत्कृष्ट दवा आहे. तिचें वर्मच हे की, उच्चनीच भाव न धरितां एकमेकांस नडीच्या वेळी कर्ज देऊन साह्य करावयाचे, आणि बोलीप्रमाणे पैसा बिनतक्रार परत करावयाचा, म्हणजे सर्वांनी बंधुत्वाने समसमान वागावयाचें. कळाची लायकी, ऐपत ह्यांचा विचार कर्ज देतांना किंवा वसूल करतांना न केला तर स्वतःचे भांडवलाला धक्का बसणार. तेव्हां मिंधेपणा, कोडगेपणा आणि परवित्ताविषयीं औदासीन्य वगैरे जे वैयक्तिक व सामाजिक दुर्गुण आमच्या बहुजनसमाजाच्या हाडांमासांत खिळले आहेत ते पतपेढ्यांमुळे नाहीसे होऊन लोक स्वाभिमानी, दक्ष आणि जरूरीप्रमाणे स्पष्टवक्ते व नेटदार झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी उमेद धरण्यास पुष्कळ जागा आहे.

 व्यापारी कसबाकडे आमच्या लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे आमची निष्कांचन स्थिति झाली आहे. ज्या वर्गाची व्यापारी दृष्टि समूळ नाहींशी
झाली आहे, त्यांत कुणबी हा अग्रगण्य आहे. तेव्हां जसजशा सहकारी मंडळ्या जास्त निघतील तसतसा एकंदर लोकांत विशेषतः कुणब्यांत व्यापारी शिक्षणाचा व कौशल्याचा जास्त फैलाव होईल. आणि हे शिक्षण जगांत जे आज शंभर नंबरी व्यापारी इंग्रज लोक त्यांच्याकडून प्रत्यक्ष मिळणार आहे ही गोष्ट ध्यानात ठेविली, म्हणजे आम्ही जितक्या अशा मंडळ्या लवकर काढू तितकें इष्टच आहे. ह्या मंडळया स्थापन झाल्याने त्यांच्या सभासदांचा फायदा होईलच होईल. पण त्यांच्या उदाहरणाने एकंदर जनतेचा फायदा झाल्यावांचून राहणार नाही. दक्षिणेतले कुणबी काय आणि इतर जाती काय, कोणालाही व्यापारी पोंच किंवा पेंच बिलकुल नाहीत. चांगल्या षटशास्त्रांच्या प्रपंचाची हातोटी पाहिली तरी 'आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खातें' अशांतलीच. बाजार कसा काय आहे, पेठेत जिनसांचे भाव काय आहेत, आपल्या गांवचा उदमी काय दराने विकतो, ह्याबद्दल माहिती मिळविण्याची खटपट न करतां फार तर गांवचे गांवांत पडताळा पाहून माल घ्यावयाचा, व खाते मांडून द्यावयाचं, आणि पैसा अगर शेतमाल हाती येईल तेव्हां तो देऊन खातें चुकतें करावयाचे ही पद्धति वेदविद्येत किंवा कारकुनी कसबांत निपुण अशा पुष्कळ ब्राह्मणांची दिसून येते. खातें फुगले म्हणजे चांगले वैदिक, गोसावी, पुराणिक मुलुखगिरीला निघत, हजार पांचशे मिळवून आणीत व वाण्याच्या घरी तसेंच गांठोडें रिचवीत, आणि पुन्हां खातें सुरू करीत; असा परिपाठ बऱ्याच ठिकाणी नजरेस आला. कुळकर्णी वगैरे लोकांचीही सर्रास हीच वहिवाट आहे, हे त्यांच्या मुशाहिऱ्याच्या वेळी मामलेदार कचेरीच्या आजूबाजूला घिरट्या घालणाऱ्या उदम्यांना पाहून कोणालाही ताडता येईल. कलम बहाद्दर ब्राह्मणसमाजाची ही परवड तर मग इतर निरक्षर समाजांची काय अवस्था असते हे प्रत्यक्ष शब्दांनींच वर्णिले पाहिजे असे नाही. व्यापारपटु गुजराती, मारवाडी, लिंगायत वगैरे समाज आमचेमध्ये शेकडों वर्ष राहत असून ' सोन्याचा गुण सवागीला' बिलकुल लागला नाही. त्यांचा व्यवहार, धूर्तपणा, मितव्यय बगैरे आमच्यांत काहीएक आला नाही, आणि व्यापारी कलेत आम्ही अजून अगदी वन्यावस्थेत राहिलो. त्यांनी आम्हांला भिकारी केलें म्हणण्यापेक्षा श्रीमंत कसे व्हावें, संपत्ति कशी जतन करावी व वाढवावी हे आम्ही त्यांच्या मूर्तिमंत उदाहरणाने देखील शिकलो नाही, असे म्हटले तरी चालेल. हा आमचा दोष आहे. एक तर व्यापाराकडे आमचें आनुवंशिक दुर्लक्ष आणि दुसरे असे की, पाण्यांत पडल्याशिवाय पोहतां येत नाही. आम्हीही आपण होऊन व्यापारांत पडलों नाही, आणि परप्रांतीय व्यापाऱ्यांनीही आम्हांला बोलावून आपले गोटांत घेतले नाही. व्यापारांत पडण्याची जी संधि आजवर आली नाही ती पतपेढी आज आमच्या मुठीत आणून देत आहे.

 शिल्लक टाकण्याला प्रपंचाची पुष्कळ ओढाताण करावी लागते. सहकारी मंडळींत भांडवल घालावे असा निर्धार केला म्हणजे काही तरी शिल्लक पडावयाचीच. निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेंचि फळ ॥ ही साधूक्ति त्रिकाली खोटी होणार नाही. तेव्हां पैसे सांचविण्याला शिकणे हा पहिला धडा सहकारी मंडळीपासून शिकता येईल. शिल्लक पडलीच तर ती सुरक्षित व किफायतशीर ठेवण्याला जागा नाही. पोस्टाच्या बँकेत ठेवावी तर व्याज कमी मिळते, आणि पोस्टें तरी गांवोगांव आहेत कोठे ? दागिन्यांत गुंतलेल्या पैशाला व्याज नाहीं, व ते झिजतात, आणि विकण्याच्या वेळी आडवून कोणी त्यांची पुरी किंमत देत नाही. ह्या सर्व गोष्टी थोड्या फार कानावरून गेल्या असल्या तरी देखील लोक दागदागिने करतात. ह्याचे कारण असे की, अडचणीच्या प्रसंगी रक्कम उभी राहते. पतपेढीवर ठेविलेली रक्कम जर चालू ठेवींत असली तर तीही अशीच वाटेल तेव्हां मिळेल, व शिवाय तिजवर थोडेसें व्याजही मिळतें. व्याज मिळविण्याची गोडी एकदां लागली, म्हणजे मनुष्य ओघाओघाने व्याजाच्या आशेनें काटकसरी बनून शिल्लक टाकू लागतो. व्याज खाणे म्हणजे काय ? हे पिढ्यान् पिढ्या ज्या लोकांना माहीत नाही अशांना व्याजाची चटक सहकारी मंडळीने लावली तर हा केवढा मोठा लाभ आहे
बरें ? कोणता इसम वायदा चुकविणारा नाही, शब्दाचा धड कोण नाहीं, थापाथुपीवर पैसा मिळविणारा कोण आहे, पैसा बुडविणारा कोण आहे, केव्हां तगादा केला असतां पैसे निघतील, पैसे काढण्यास काय काय उपाय योजावेत इत्यादि गोष्टींकडे सहकारी मंडळीच्या सभासदांना अतिशय बारीक नजरेने पाहिले पाहिजे. अशी नजर गुजराती, मारवाडी ह्यांना असल्यामुळे ते तरले आणि ती दक्षिणी मंडळीत नसल्यामुळे त्यांची दुकानें बसली. गुजराती-मारवाड्यांच्या पोटांत शिरून आम्ही ह्या गोष्टी शिकावयास पाहिजे होत्या, पण पोकळ घमेंडीमुळे शिकलों नाही. आतां सरकारचे देखरेखी व शिकवणीखाली सहकारी मंडळीच्या सभासदांना त्या आयत्या शिकायला सांपडतील व स्वतःचे पैसे बुडण्याची भीति असल्यामुळे सभासद त्या लवकर शिकतील. तसेंच, सार्वजनिक पैशाच्या व्ययाकडे कानाडोळा करण्याची जी दुर्बुद्धि आमच्यांत शिरली, ती केवळ स्वहितामुळे लयास जाईल, आणि चारचौघांनी मिळून मिसळून एकमेकांचे हित कसे साधावें ह्याचेही उत्तम वळण लागेल. वेळच्यावेळी पैसे भरण्याची संवय आम्हांला नसल्यामुळे आम्हांला व्याजही जास्त पडते आणि आमची ही संवय हिशेबांत धरूनच व्यापारी पुष्कळसा नफा घेतात. आपली नापत होईल, नुकसान होईल, या भीतीने पतपेढीचे कर्जदार सभासद आपले हप्ते वेळच्या वेळी भरतील आणि मंडळीही स्वहितरक्षणासाठी त्याजबद्दल खबरदारी घेईल. सहकारी मंडळी म्हणजे गांवांत नीतिमान् स्त्रीपुरुष बनविणारा एक परीस होईल, व तिच्याजवळ गांवच्या नैतिक गणतीचा आंकडा चटकन मिळेल. तिच्यामुळे आमच्या भोपळसुती स्वभावाला आळा पडेल. तिच्यापासून दुसरा कोणताही नफा झाला नाही, आणि वायदा टळू न देण्याची संवय जरी तिने आम्हांला लाविली तरी देखील आमचें कोटकल्याण तिने केले, असे समजण्याला हरकत नाही.

 सहकारी मंडळीने देण्याघेण्याखेरीज एक गोष्ट ताबडतोब हाती घेण्यासारखी आहे. कुणबी आपला माल एक सट्टा न विकता जशी गरज पडेल तसा त्याचा मोबदला करतो. तसेंच खरेदीही तो एकदम न करतां तात्कालिक जरूरीप्रमाणे करतो. आज अमुक जिन्नस लागला, उपस कणगींतील धान्य आणि घे तो, दुकानदाराचा किंवा सावकाराचा तगादा आला तर घाल त्याला धान्य, आज एका धान्याचे बीं आणिलें, उद्यां खत आणिलें, परवां घोंगडी घेतली, असा त्याचा क्रम चालतो. ह्यामळे तो विकतो त्या मालाला भरपूर किंमत येत नाही व घेतो त्याला मात्र अडून जबर किंमत द्यावी लागते. ह्यापेक्षां गांवचे कुणबी मिळून सर्वांचा माल एकदम विकण्यास काढतील, आणि आपल्याला सर्वसाधारणपणे लागणारे जिन्नस जर घाऊक खरेदी करतील तर त्यांना त्यांच्या मालाची भर किंमत मिळेल, आणि खरेदी जिनसाही पुष्कळ नफ्यानं मिळतील. एक सट्टा माल खरेदीला थेट मोठ्या पेठेचें गिऱ्हाईक गांवीं येऊन उतरेल, आणि पुष्कळ माल मिळतो म्हणून देववेल तितकी जास्त किंमत चढाओढीने देईल. तसेंच, कुणब्यांना एकदम पुष्कळ जिनसा घेणे असल्या म्हणजे मोठे गिऱ्हाईक म्हणून व्यापारीही सवलतीने माल देतील. त्यामुळे खेड्यांतील लोक आणि पेठ ह्यांच्यामध्ये व्यापार करणाऱ्यांंच्या ज्या अनेक पायऱ्या आहेत, त्या मोडून त्यांचा नफा कुणबी व कसबी ह्यांच्या पदरांत पडेल. कुणबी गांवचा वाणी अगर हळकरी ह्यांच्या आड, तो पेठेच्या उदम्याच्या आड, तो शहरच्या उदम्याच्या आड,तो मुंबईच्या व्यापाऱ्याच्या आड,असें ह्याच्या आड तो त्याच्या आड हा चरत चरत सर्व लोणी उडते, आणि अखेर कुणब्याला अगर कसब्याला घट्ट ताकसुद्धा राहत नाही. व्यापार कितीही वाढला तरी हा आपला बिचारा. . 'ज्याचे त्याला आणि गाढव ओझ्याला ' अशी त्याची अवस्था दिसून येते; त्याच्या लंगोटीच्या जागी पंचासुद्धा येत नाही. तेव्हां ठिकठीकाणचे व्यापारी व आडत्ये जो अघर फायदा घेतात, तो कुणब्यांच्या आणि कसब्यांच्या हाती पडल्यास ते सुसंपन्न कां होणार नाहीत ? घाऊक मालाची विक्री-खरदी करून खेड्यांतल्या सहकारी मंडळ्यांना हा नफा थोड्या श्रमानें मिळेल, व त्याकडे त्यांनी अवश्य लक्ष द्यावें.

-----

 १ संगमनेर येथें पतपेढीच्या दुकानांतून साळ्यांना सूत पुष्कळ पटीने भावांत स्वस्त व गुणांत सरल मिळू लागले आहे.