वैय्यक्तिक व सामाजिक/समाजकारणाची बचावती ढाल
'रत्नागिरीतील हे सामाजिक मतपरिवर्तन पाहून मी नि:शंकपणे सांगतो की येथे घडत असलेली सामाजिक क्रांती खरोखर अपूर्व आहे. रत्नागिरी- सारख्या रेल्वे-टेलिफोनचे तोंड न पाहिलेल्या सोवळ्याच्या बालेकिल्ल्यांत अस्पृश्यतेचे उच्चाटन करून आज जन्मजात जातिभेदाचेच उच्चाटन करण्यास तुम्ही सजला आहात, याचा मला इतका आनंद होत आहे की हे पाहण्यास मी जगलो हे ठीक झाले असे मला वाटते. मी कुणाचा भाट होऊ इच्छीत नाही. पण ज्या स्वातंत्र्यवीराने आपल्या अज्ञातवासाच्या अवघ्या सात वर्षांत ही अपूर्व सामाजिक क्रांती घडवून आणली त्या बॅ. सावरकरांचा किती गौरव करूं असे मला झाले आहे. त्यांनी चालविलेली सामाजिक क्रांतीची ही यशस्वी चळवळ पाहून मी इतका प्रसन्न झालो आहे की देवाने माझे उरलेले आयुष्य त्यांसच द्यावे ! कारण माझे अपुरे राहिलेले हेतू पुरवील तर हाच पुरवील असे मला वाटत आहे.' कर्मवीर महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे हे उद्गार आहेत.
१९३३ सालच्या महाशिवरात्रीच्या दिवशी रत्नागिरीस अस्पृश्यतेचा पुतळा जाहीर समारंभाने जाळण्यांत आला. कर्मवीर शिंदे हे त्या मंगल समारंभाचे अध्यक्ष होते. रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केवळ सात वर्षांत घडवून आणलेली सामाजिक क्रांती पाहून महर्षीचा आत्मा संतुष्ट झाला आणि त्यांनी त्यांच्या कार्याला वरीलप्रमाणे आशीर्वाद दिला.
सावरकरांनी रत्नागिरीस केलेले कार्य खरोखर अभूतपूर्व असेच आहे. भारताच्या इतिहासात पाच हजार वर्षांत अस्पृश्यता व जातिभेद यांचे असे तत्त्वज्ञानपूर्वक उच्चाटन कधीच झाले नव्हते. त्या चळवळीचा इतिहास वाचताना आजही हे आपण एखादे स्वप्न तर पहात नाही ना, अशी शंका येऊ लागते.
इतक्या दृढपणे आसनस्थ झालेला हा पर्वत, हा रत्नागिरी स्वा. वी. सावरकरांनी हलविला कसा, कोणच्या पुण्याईने त्यांना हे सामर्थ्य प्राप्त झाले हा मोठा विचारणीय प्रश्न आहे. क्रांतिकारक राजकारणांतली सावरकरांची अलौकिक देशसेवा, त्यांनी केलेला त्याग, अंदमानला भोगलेले कप्ट हीच पुण्याई येथे कारणीभूत झाली असावी असे वाटते. पूर्वीच्या काळी ऋषिमुनी अरण्यांत जाऊन बारा बारा वर्षे तपश्चर्या करीत आणि मग त्यांना दिव्य सामर्थ्य प्राप्त होई.
सावरकरांनी अंदमानमध्ये जातिभेदाचा, अस्पृश्यतेचा हा नरकासुर भस्म करून टाकता येईल असे सामर्थ्य आपणांस प्राप्त व्हावे म्हणूनच चवदा वर्षे जणू तपःसाधना केली आणि तीतून प्राप्त झालेली अमोघ शक्ती त्यांनी या असुरावर सोडली. अत्यंत अल्पावधीत त्याचे निर्दालन करण्यात त्यांना यश आले त्याचे हेच कारण होय. या संग्रामात त्यांनी इतर आयुधे, इतर शस्त्रास्त्रेही अनेक वापरली यात शंकाच नाही; पण ही अमोघ शक्ती हे त्यांचे प्रधान अस्त्र होय.
ही शक्ती व इतर शस्त्रास्त्रे हाती घेऊन त्यांनी हा संग्राम कसा केला ते आता पाहावयाचे आहे. या संग्रामाची, या युद्धाची ही कथा खरोखरीच मोठी रम्य आहे.
हजारो वर्षे, निदान गेली हजार वर्षे जातिभेद व अस्पृश्यता यांमुळे हा हिंदुसमाज छिन्नविच्छिन्न होत आला आहे. प्राणज्योती नष्ट झाल्यावर एखादे प्रेत जसे सडत जाते, त्याचे अवयव विगलित होतात आणि शेवटी त्या मृत देहाचा कण न् कण फुटून निराळा होऊ लागतो तशी बुद्धिप्रामाण्य, विवेकनिष्ठा, प्रत्यक्ष व प्रयोगनिष्ठ शास्त्रावरची श्रद्धा नष्ट झाल्यामुळे या हिंदुसमाजाची स्थिती झाली होती. प्रथम इस्लामी आक्रमण आणि त्यानंतर पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज यांचे आक्रमण याना तो सहजासहजी बळी पडत गेला, याच्या अनेक कारणांपैकी हे एक प्रधान कारण आहे. अस्पृश्यता (स्पर्शबंदी) व जातिभेद (बेटीबंदी) यांतून अनेक प्रकारच्या बंदी कशा निर्माण झाल्या आणि त्यांमुळे कोणची अनर्थपरंपरा ओढवली याचे बॅ. सावरकरांनी फार उत्कृष्ट वर्णन केले आहे. त्रेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी (परदेशगमन- निषेध) शुद्धिबंदी (पतितांना परत स्वधर्मात घेण्याची मनाई), रोटीबंदी आणि बेटीबंदी यांना सावरकर सात स्वदेशी बेड्या, सात स्वदेशी शृंखला म्हणतात. म्लेच्छ, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज यांनी आपल्याला जिंकून आपल्या पायांत बेड्या घातल्या त्या परदेशी बेड्या होत. पण त्या बेड्या आपल्या पायांत पडल्या याचे मुख्य कारण हे की हे शत्रू येथे येण्यापूर्वी आपणच आपल्या पायांत या सात बेड्या ठोकून स्वतःच करंटेपणाने परतंत्र होऊन बसलो होतो. या सप्तशृंखला, पोथीजात जातिभेदाचे हे प्राणघातक विळखे आपण तोडून टाकले की त्या विदेशी बेड्या तोडण्यास आपणांस मुळीच अवधी लागणार नाही असा सावरकरांनी सिद्धान्त मांडला आहे. अमके राजकारण आणि अमके समाजकारण हा भेद त्यांच्या मते किती कृत्रिम आहे हे यावरून दिसून येईल. 'राजकारण ही एका हातातील चढती तलवार आणि समाजकारण ही दुसऱ्या हातातील बचावती ढाल' असे त्यांनी एका ठिकाणी या दोन 'कारणां'चे वर्णन केले आहे.
ते म्हणतात, 'शतवार सांगितले तरी पुन्हा सांगतो की, हिंदुराष्ट्राच्या अभ्युत्थानास्तव राजकारण व समाजकारण ही दोन्ही साधने अत्यावश्यक आहेत. यांपैकी कोणतेही एक दुसऱ्यावाचून पंगू आहे.' हिंदुराष्ट्रं प्रबळ व्हावयाचे तर हा समाज एकजीव, एकात्म व संघटित झाला पाहिजे. सोळाव्या शतकापासून मराठे भारतात राजकारण करीतच आहेत. पण त्याला समाजकारणाचा पाठिंबा न मिळाल्यामुळे, त्या सात स्वदेशी बेड्या पायांत तशाच ठेवून मराठे लढत असल्यामुळे, मोगली आक्रमण मोडून काढण्यास जरी त्यांना यश आले तरी पाश्चात्त्य संघटित, एकात्म राष्ट्रांशी गाठ पडताच ते नामोहरम झाले हे इतिहासात आपण पाहतच आहो. आजच्या राजकारणातही आपणास तेच दिसत आहे. गेल्या शंभर वर्षांच्या प्रयत्नाने त्या सात बेड्या काहीशा ढिल्या झाल्या म्हणून आपणांस स्वातंत्र्य मिळाले. पण त्या निखालस तोडून टाकण्यात आपल्याला अजूनही यश आलेले नाही. त्यामुळे आजचे राजकारण नासत चालले आहे; म्हणून 'राजकारण हे समाजकारणावाचून नेहमी पंगूच राहणार' हा स्वातंत्र्यवीरांचा सिद्धान्त आजही शिरोधार्यच वाटतो.
या सप्तशृंखला तोडून टाकण्यास सावरकरांच्या मते एकच घण उपयोगी पडेल आणि तो म्हणजे बुद्धिप्रामाण्य, प्रत्यक्षनिष्ठ व प्रयोगक्षम धर्म, विज्ञाननिष्ठा हा होय. रत्नागिरीला स्थानबद्ध असताना या घणाचेच घाव ते या स्वदेशी बेड्यांवर घालीत होते. जातिभेद, अस्पृश्यता आणि एकंदर जन्मजात उच्चनीचता यांच्या मुळाशी असलेल्या कल्पना किती वेडगळ, किती अशास्त्रीय, किती भ्रांत व अधर्म्य आहेत ते त्यांनी अनेक लेखांतून दाखवून देण्यास प्रथम प्रारंभ केला.
पूर्वीच्या काळी भारतात शेकडो वर्षे श्रुतिस्मृतींच्या आज्ञेनेच वर्णसंकर कसा चालू होता, अनुलोम विवाहपद्धतीने का होईना, पण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्यात सर्रास विवाह कसे होत होते, ब्राह्मणाची धर्मपत्नी म्हणून शूद्र स्त्री समानतेने एकाच घरात कशी नांदत होती आणि तिची मुले ब्राह्मणच कशी गणली जात होती ते सावरकरांनी 'मनुस्मृतींतील महिला,' 'जातिभेदाचे इष्टानिष्टत्व' या आपल्या लेखमालांतून दाखवून दिले आहे. त्यावरून पाहता 'वेदकालापासून आम्ही शुद्ध वंशाचे आहो,' असे भारतात वास्तविक कोणाही शुद्धीवर असलेल्या समाजाला म्हणता येणार नाही. जातिभेदाला धर्माचा सनातन आधार आहे हे म्हणणे क्षणमात्र टिकणार नाही. इतकेच नव्हे तर जातिभेद म्हणजे हिंदूंना (कोणच्याही अर्थाने का होईना) अत्यंत प्रिय असलेले जे चातुर्वर्ण्य त्याचा उच्छेद होय हे श्रुतिस्मृतींच्या वचनांनीच सावरकरांनी दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे संकराविषयीच्या भ्रांत कल्पनाही त्यांनी आपल्या धर्मग्रंथाच्या आधारेच निरस्त केल्या आहे. संकरज प्रजा कित्येक वेळा औरस प्रजेपेक्षाही प्रबळ व कर्तृत्वसंपन्न झाल्याची विदुर, वसिष्ठ, चंद्रगुप्त, विक्रमादित्य, महादजी इ. अनेक उदाहरणे देऊन संकर हा मुळीच अनर्थकारक नाही असे त्यांनी वारंवार सांगितले आहे. ज्या विवाहामुळे प्रजा नाकर्ती होते, दुबळी, कर्तृत्वहीन होते किंवा विवाहित स्त्री-पुरुष प्रजोत्पादनाला अक्षम ठरतात त्यालाच फक्त संकर म्हणावे असे सावरकरांचे मत आहे. या दृष्टीने पाहता आपले सर्व जातिभेद, वर्णभेद हे केवळ पोथीजात आहेत, त्या भिन्न जातींनी आपसांत विवाह केले तर तो संकर मुळीच होणार नाही असा सावरकरांचा ठाम सिद्धान्त आहे. आणि हा सिद्धान्त त्यांनी श्रुतिस्मृती, पुराणे व इतिहास यांच्या आधारेच मांडला आहे.
अनुवंशाच्या कल्पनेचा आधार जातिभेदाच्या व अस्पृश्यतेच्या समर्थनार्थ नेहमी घेतला जातो. त्याचाही सावरकरांनी असाच धुरळा करून टाकला आहे. आज हिंदू समाजात असलेल्या शेकडो जाती, पोटजाती या रक्तातल्या तितक्या भिन्न गुणांमुळे निर्माण झाल्या हे म्हणणे किती हास्यास्पद आहे हे वरवर पाहतासुद्धा दिसणार आहे. पण सावरकरांनी तेवढ्यावर ते ठेवले नाही. त्यांनी अनेक जातींचे इतिहास देऊन अत्यंत क्षुद्र कारणांनी, वेडगळ कारणांनी त्या कशा निर्माण झाल्या आहेत ते दाखविले आहे. गंध लावण्याच्या मानापमानावरून कचोळे फेकून कोणी एकाने दुसऱ्यास मारले, तेवढ्यावरून तेढ माजली, बहिष्कार पडला आणि बहिष्कृतांची निराळी 'कंचोळे प्रभु' ही जात झाली. ओसवाल जातीतल्या एका लहान मुलाचा पाय चिमणीच्या अंड्यावर पडला. तेवढ्यावरून माळव्यातील अहिंसानिष्ठ जैन समाजात भांडणे माजली, बहिष्कार पडला आणि निराळी जात निर्माण झाली. हा प्रकार १९३१ साली माळव्यात घडलेला आहे. मागल्या काळी भक्ष्याभक्ष्य, पेयापेय, शिवाशिव, अग्रपूजेचे मान, यांवरून किती मारामाऱ्या होत असत आणि जरा खुट्ट होताच ग्रामण्ये, बहिष्कार यांचे सत्र कसे सुरू होत असे याची ज्याला कल्पना आहे त्याला एका जातीच्या कालांतराने शेकडो पोटजाती कशा होत असतील याची सहज कल्पना येईल आणि मग पाश्चात्त्य शास्त्रज्ञांचे आधार घेऊन या एवढ्या जाती-पोटजातींचे समर्थन करणारे आजचे पंडित आपल्या विद्वत्तेचा कसा दुष्ट विक्रय करीत आहेत, हिंदुधर्माचे व हिंदुराष्ट्राचे तेच कसे खरे शत्रु आहेत हे ध्यानात येण्यास उशीर लागणार नाही. परंपरेने आलेले विशेष गुण कायमचे जतन करून ठेवणे व पुढच्या पिढीत तेच संक्रान्त होतील याची काळजी वाहणे या हेतूने अनुवंशाचे शास्त्र पंडितांनी सांगितले आहे. पण त्याअन्वये पाहता हिंदू समाजातील वर्णांचा वा जातींचा अर्थाअर्थी अनुवंशाशी कसलाही संबंध नाही हे सावरकरांनी ठायी ठायी दाखवून दिले आहे. शेकडो वर्षे पिढ्यानुपिढ्या सुतारी, लोहारी, शिवणकाम, वेदपठण करीत आलेल्या घराण्यात व जातीत पुढील संतती त्या त्या कर्मात निपुण होतेच असे नाही. आणि ज्या जातीत एकही पिढी तो व्यवसाय कोणी केला नाही त्या जातीत पिढीजात तो व्यवसाय करणाऱ्यांच्या संततीपेक्षा त्या कर्मात जास्त निपुण असलेले पुरुष उत्पन्न होतात हे मागल्या इतिहासातून शेकडो उदाहरणांवरून दाखवून देता येईल. तसे दाखवून अनुवंशाच्या आधारावर पोथीजात उच्चनीचतेचे, त्या मात स्वदेशी शृंखलांचे, समर्थन करणे हे विवेकबुद्धीचे दिवाळे निघाल्याचे लक्षण आहे असे स्पष्ट मत सावरकरांनी मांडलेले आहे.
पण याहीपेक्षा जातिभेदाने या देशात गेल्या हजार वर्षांत प्रत्यक्ष अनर्थ काय घडले त्याचे जे चित्रण सावरकरांनी केले आहे ते पाहून या सप्तशृंखलांवर घण घालणे हाच खरा धर्म होय, हेच थोर राष्ट्रकार्य होय, हे कोणाही देशहिताची चिंता वाहणाऱ्या नागरिकाला पटल्यावाचून राहणार नाही. जातिभेद म्हणजे धर्मरक्षण असे सनातनी लोक मानतात. पण या जातिभेदानेच आपली धर्महानी झाली आणि त्यामुळेच पुढे व्यापार, साम्राज्य व शेवटी स्वराज्य यांची हानी झाली हे लक्षात घेतले तर स्वतःला सनातनी म्हणविणाऱ्या लोकांनी हिंदुराष्ट्राचा केवढा घात केला आहे हे ध्यानात येईल. मागे हिंदू लोक व्यापारासाठी, साम्राज्यासाठी व धर्मप्रसारासाठी तिन्ही खंडांत जात होते. पण जातिभेदाच्या कल्पना तीव्र झाल्या तेव्हा परदेशी गेल्यास इतर जातींशी अन्नोदक संबंध घडेल, स्पर्शास्पर्श-विचार पाळता येणार नाहीत, अभक्ष्यभक्षण- अपेयपान करावे लागेल आणि मग जातिबहिष्कृत व्हावे लागेल अशी भीती सर्वत्र निर्माण झाली आणि म्हणून समुद्रगमन, परदेशगमन निषिद्ध झाले. म्हणजे बेटीबंदीतून ही सिंधुबंदी निघाली. आणि हा सारा समाज करंटा होऊन गेला. मलरबारच्या राजास आपल्या काही लोकांनी दर्यावरील व्यापारात प्रवीण व्हावे अशी इच्छा झाली. तेव्हा त्या वेळच्या प्रौढ पोक्त हिंदूंनी असे ठरविले की प्रत्येक कुटुंबातील एका पुरुषाने मुसलमान व्हावे ! समुद्र ओलांडला तर जात जाईल. त्यापेक्षा जात घालविणारा धर्मच सोडावा हे बरे. जातिभेद हे धर्मरक्षणासाठी आहेत. पण समुद्रगमनाच्या ते आड येतात म्हणून उपाय काय ? तर धर्मत्याग !
समाज संघटित, एकात्म व बलशाली करणे हे धर्माचे अंतिम ध्येय असते. समाज विघटित व बलहीन आणि म्हणूनच परतंत्र करून टाकणाऱ्या सप्तशृंखलांवर घण घालून त्या तोडून टाकण्यात सावरकरांनी तेच ध्येय साधले आहे. स्वातंत्र्यवीर रत्नागिरीस गेले तेव्हा महारांच्या सावलीचाही विटाळ मानण्याची शेकडो वर्षांची दुष्ट व घातक रुढी तेथे दृढपणे पाळली जात होती. या पायरीवरून स्पृश्यांनी अस्पृश्य वस्तीत जाऊन भजने म्हणणे, अस्पृश्यांनी स्पृश्य वस्तीत भजनासाठी येणे, शाळेत स्पृश्य व अस्पृश्य मुलांनी सरमिसळ बसणें, हळूहळू देवळात अस्पृश्यांना सर्वाच्या बरोबर प्रवेश देणे, स्त्रियांचे हळदीकुंकू समारंभ सरमिसळ करणे आणि शेवटी सर्रास सर्वानी एका पंक्तीला बसणे या पायरीपर्यंत सावरकरांनी हिंदुसमाजाला नेले हा फार मोठा विक्रम आहे. त्रावणकोरच्या राजाने अशाच सुधारणा आपल्या राज्यात घडवुन आणल्या होत्या, पण तेथेही अस्पृश्यांतील पालुवा व पारिया या जातींना प्रवेश दिलेला नाही. आणि भंग्यांना तर मुळीच नाही. रत्नागिरीच्या पतितपावनमंदिरात यच्चयावत् हिंदुमात्राला प्रवेश मिळतो, एवढेच नव्हे तर हे सर्वं पूर्वास्पृश्य वेदोक्ताने त्या मंदिरात देवाची पूजा करू शकतात. तो अधिकार त्रावणकोरात मंदिरात प्रवेश मिळालेल्या एझुवा जातीच्या अस्पृश्यांनाही नाही. बॅ. सावरकरांच्या पुण्याईची यावरून आपल्याला सहज कल्पना येईल. त्रावणकोरात राजशासनाला जे करता आले नाही ते रत्नागिरीस सरकारी अवकृपेत वावरणाऱ्या स्थानबद्ध अशा एका व्यक्तीने करून दाखविले.
जातिभेदाचे सावरकरांनी तात्त्विक खंडन केले, व त्यामुळे झालेले व भविष्यात होणारे अनर्थही वर्णून सांगितले. उपायाच्या चिंतनास आरंभ करताना पहिली गोष्ट त्यांनी स्पष्ट केली आहे की या अनर्थाला भारतातील एकच एक अशी कोणतीच जात किंवा वर्ण जबाबदार धरता येणार नाही. ब्राह्मण व क्षत्रिय जतकी अस्पृश्यता चांभार- महारांविषयी पाळतात, तितकीच अस्पृश्यता चांभार-महार हे धेड-भंग्यांविषयी पाळतात. त्रावणकोरात पालुवा व पारिया जातींना मंदिरप्रवेश देण्यास एझुवा या अस्पृश्य जातीचाच विरोध आहे. आपल्याला ब्राह्मण-क्षत्रियादि वरिष्ठ मानलेल्या जातींनी बरोबरीचा मान द्यावा अशी महारांची मागणी आहे. पण तीच मांग-भंगी यांची मागणी त्यांना मान्य होत नाही. ही प्रत्येक जातीची दुःखद कहाणी असताना आज त्या पापाचे खापर एका जातीने दुसरीच्या माथी फोडण्यात काय अर्थ आहे ? सावरकर म्हणतात, 'जी जी शिवी अस्पृश्य स्पृश्यांना देतात ती ती त्या अस्पृश्यांना स्वतःलाही दिली जाते हे त्यांनी विसरू नये.' तेव्हा सर्वच या महाअनर्थाला जबाबदार आहेत, सारेच दोषी आहोत हे जाणून सर्वांनी मिळून तो दोष दूर करावा हे उचित. मद्रासमधील अस्पृश्य जातींची माहिती देताना, नि त्रावणकोरच्या सुधारणांचे विवेचन करताना आणि अन्यत्रही त्यांनी अनेक ठिकाणी हा विचार आवर्जून मांडला आहे. याचा अर्थच असा की उपाय योजावयाचे ते सर्वांनीच योजले पाहिजेत. कारण भारतीय राष्ट्र-पुरुषाच्या पायांत या स्वदेशी श्रृंखला ठोकून बसविण्याच्या कामात लोहाराचे काम सर्वानीच केले आहे !
उपायचिंतनाच्या प्रारंभीच भूमिका अशी स्पष्ट करून घेतल्यानंतर स्वातंत्र्यवीरानी धर्मांतराच्या उपायाचा विचार केला आहे आणि तो मार्ग सर्वस्वी त्याज्य होय असे आपले मत दिले आहे. 'धर्मांतराच्या प्रश्नाविषयी महारबंधूंशी मनमोकळा विचार' या शीर्षकाखाली त्यांनी तीन लेख लिहिले आहेत. आणि धर्मांतराने कोणते अनर्थ होणार आहेत ते त्यांत सांगितले आहेत. स्वातंत्र्यवीरांचे म्हणणे असे की, सर्वच्या सर्व महार जाती धर्मांतर करणे कधीही शक्य नसल्यामुळे या धर्मांतरामुळे एक नवीनच जात निर्माण होईल. शिवाय धर्मांतर केलेल्यांची अस्पृश्यता जाईल व केवळ धर्मांतरामुळे त्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त होईल असे नाही. दुसरे असे की महार जातीतील हजारोंनी बौद्ध धर्म स्वीकारला असला तरी न स्वीकारणारांची संख्या किती तरी मोठी आहे. आणि यामुळे त्यांच्यात्यांच्यात उभा दावा निर्माण झाला आहे. इतर अस्पृश्य जाती तर धर्मांतरास मुळीच तयार नाहीत. त्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्न धर्मांतराने सुटणार आहे असे स्वप्नात सुद्धा मानता येणार नाही. यांसारखे अनेक युक्तिवाद सावरकरांनी या व अन्य लेखांत मांडले आहेत. पण त्यांचा सर्वात प्रभावी युक्तिवाद अगदी निराळा आहे. ते म्हणतात की हा हिंदुधर्म काय केवळ स्पृश्यांचा आहे ? त्याच्या रक्षणार्थ आजवर अस्पृश्यांनी काय रक्त सांडलेले नाही ? त्याच्या तत्त्वज्ञानात रोहिदास, चोखा, सजन, तिरूवल्लुवर यांनी काहीच भर घातलेली नाही ? असे असताना आजच्या काही वरिष्ठ वर्गांनी अन्याय केला तर त्यांच्याशी झगडून आपल्या स्वत्वाचे प्राणपणाने रक्षण करण्याचे सोडून तो स्वतःचा धर्मच टाकून देणे हे सावरकरांच्या मते नेभळेपणाचे लक्षण होय, 'हिंदुधर्म ही काही स्पृश्यांच्या बापाची मत्ता नाही; आमचाही तिच्यावर त्यांच्याइतकाच हक्क आहे' असे अस्पृश्यांनी सडेतोडपणाने सांगून त्यांच्याशी झुंजून आपले न्याय्य स्वत्व मिळवावे असे सावरकरांनी अस्पृश्यांना आणि विशेषतः महारबंधूंना आवाहन केले आहे. 'हिंदुधर्मावरील अस्पृश्यतेचा कलंक वेळ पडली तर आम्ही आपल्या रक्ताने धुऊन काढू' ही आंबेडकरांची प्रतिज्ञा सावरकरांना अत्यंत योग्य व खऱ्या हिंदूस शोभण्यासारखी वाटली. त्यामुळे त्यांचा सत्याग्रह त्यांना न्याय्यच वाटला. महाड, पुणे (पर्वती) येथील सत्याग्रहाचे सावरकरांनी जोरदार भाषेत समर्थन केले आहे. पण धर्मांतर हा उपाय मात्र त्यांना अगदी मान्य नाही. त्यामुळे अस्पृश्यांचाच अधःपात होईल असे त्यांचे मत आहे.
बॅ. सावरकरांच्या मते अस्पृश्यता म्हणजे स्पर्शबंदी आणि तसल्याच इतर सप्त-बंदी म्हणजे बेड्या तोडण्यास विज्ञानाचा प्रसार हा एकच उपाय आहे. पोथीजात उच्चनीचतेचे सर्व तत्त्वज्ञान अत्यंत भ्रांतिमूलक अशा सिद्धान्तावर आधारलेले आहे. विज्ञानाने निर्माण केलेल्या शास्त्रापुढे, नव्या तत्त्वज्ञानापुढे, ते क्षणमात्र टिकू शकणार नाही. तेव्हा या विज्ञाननिष्ठेचा प्रसार हेच या शृंखला तोडण्याचे खरे हत्यार होय. युरोपने याच मार्गाने आपली प्रगती करून घेतली हे अनेक लेखांमधून त्यांनी पुनः पुन्हा दाखविले आहे. हिंदूंपैकी सनातन धर्माचा कैवार घेणारे लोक मुसलमानांच्या पोथीनिष्ठ कट्टरपणाकडे बोट दाखवून कित्येक वेळा सांगतात की त्या कट्टरपणामुळेच मुसलमान सर्वत्र विजयी झाले व होत आहेत. तेव्हा आपणही तसेच पोथीनिष्ठ नि कट्टर झाले पाहिजे. पण हा भ्रम सावरकरांनी 'विज्ञानबळ' या आपल्या लेखात समूळ उच्छेदून टाकला आहे. मराठ्यांचा उदय झाला तेव्हा मुसलमान तितकेच कट्टर होते. पण त्यांचे साम्राज्य मराठ्यांनी सहज धुळीस मिळविले. युरोपात तेच झाले. विज्ञानाचा उदय युरोपात झाला नव्हता तेव्हा काही ठिकाणी मुस्लिमांना जय मिळाले. पण युरोप विज्ञाननिष्ठ होताच मुस्लिम सत्ता त्यांच्यापुढे उभ्यासुद्धा राहू शकल्या नाहीत. तुर्कस्तान हा त्याला अपवाद आहे पण त्याला हे सामर्थ्य प्राप्त झाले ते विज्ञानबळामुळेच होय, अंध अविवेकामुळे नव्हे हे स्वातंत्र्यवीरांनी सप्रमाण दाखवून दिले आहे.
शब्दप्रामाण्य, पोथीनिष्ठ, श्रुतिस्मृति-पुराणोक्त व अपरिवर्तनीयता, यांतून आपल्या सात स्वदेशी बेड्या निर्माण झाल्या आहेत. तेव्हा त्यांचा उच्छेद करावयाचा तर त्या शब्दप्रामाण्यादि रूढींचा प्रथम उच्छेद केला पाहिजे. या सर्व शृंखला मानसिक असल्यामुळे बुद्धिप्रामाण्य, प्रत्यक्षनिष्ठ व प्रयोगक्षम विज्ञान, आणि विवेकी वृत्ती या शस्त्रांनीच त्या तोडता येतील.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दिव्य जीवनाचा विचार करता त्यातले अनेक रोमहर्षक प्रसंग आपल्या डोळ्यापुढे उभे राहतात. त्यांना हिंदुस्थानात घेऊन येणाऱ्या बोटीतून त्यांनी फ्रान्सच्या सागरात उडी फेकली तो प्रसंग त्या सर्वांत अत्यंत अद्भुतरसपूर्ण होय. पण माझ्या मते रत्नागिरीस त्यांनी जे सीमोल्लंघन केले ते त्यांचे हिंदुसमाजाला सर्वांत मोठे देणे होय. पहिल्या विक्रमाने त्यांनी पारतंत्र्याच्या शृंखलेवर घण घातला. पण दुसऱ्या विक्रमाने भारताच्या कपाळी ज्या शृंखलेमुळे पुन्हा पुन्हा पारतंत्र्य येत होते तिच्यावर घण घातला; आणि ती छिनून टाकली. पहिल्या विक्रमाने स्वातंत्र्यवीर स्वतः मृत्युंजय झाले, दुसऱ्याने हा हिंदुसमाजच मृत्युंजय होईल अशी आशा वाटते.