वैय्यक्तिक व सामाजिक/मार्क्सचे भविष्यपुराण

विकिस्रोत कडून

 पले भविष्य जाणण्याची उत्सुकता हा मानवी मनाचा फार प्राचीन काळापासूनचा धर्म आहे. या उत्सुकतेबरोबरच ती पुरविण्याची, तृप्त करण्याची सिद्धता म्हणजेच भविष्य सांगण्याचे सामर्थ्य हेही फार प्राचीन काळापासून मानवाने प्राप्त करून घेतले आहे, असे जगातल्या सर्व देशांच्या प्राचीन इतिहासावरून दिसते. भविष्यज्ञान असणाऱ्या लोकांचे त्या काळी दोन वर्ग असत. रवि, बुध, शनि, मंगळ, गुरू, इ. आकाशस्थ ग्रहगोलांचा अभ्यास करून त्यावरून भविष्य वर्तविणारे फलज्योतिषशास्त्रज्ञ हा एक आणि दुसरा म्हणजे अंतर्ज्ञानी, त्रिकालज्ञानी साधुपुरुषांचा. यांना शनिमंगळांचा अभ्यास करण्याची आवश्यकता नव्हती. परमेश्वरी कृपेने त्यांना काही दैवी सामर्थ्य प्राप्त होत असे. आणि त्यामुळे भूतभविष्यवर्तमान या सर्वांचे त्यांना ज्ञान सहज होत असे. शंभर वर्षांपूर्वीपर्यंत भविष्यकाल जाणण्याचे व भविष्य वर्तविण्याचे सामर्थ्य असणारे हे दोनच वर्ग असत. मार्क्सवादाच्या उदयाबरोबर या सामर्थ्याने संपन्न असा तिसरा वर्ग जगात दिसू लागला. मात्र तोपर्यंतचे वर सांगितलेले जे दोन वर्ग त्यांना हे सामर्थ्य असते हे मार्क्सवादाला मान्य नाही. जगातील घडामोडींचे शास्त्रीय ज्ञान फक्त आपल्यालाच आहे, आपल्याच पद्धतीने फक्त ते मिळू शकते, म्हणून भविष्य सांगण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे असा या वर्गाचा दावा आहे. फलज्योतिषी किंवा अंतर्ज्ञानी हे मार्क्सच्या मते भोंदू, ढोंगी, समाजाला फसवून त्याला लुबाडणारे किंवा निदानपक्षी अज्ञ, भोळसट व अंध असे लोक आहेत. आपण मात्र पूर्ण तर्कनिष्ठ, शास्त्रपूत, बुद्धिवादी व सत्यनिष्ठ आहो असे मार्क्सवाद्यांचे मत आहे.
 जुन्या काळी पुष्कळसा भर वैयक्तिक जीवनातील भविष्य जाणण्यावरच असे. विवाह, पुत्रप्राप्ती, धनलाभ, सत्ता, राजकृपा यांची प्राप्ती यांचा आपल्या आयुष्यात योग केव्हा आहे, हे जाणण्याचीच माणसांची उत्सुकता जास्त असे. आणि ज्योतिषी त्याचाच अभ्यास जास्त करीत. पण एकंदर समाजाच्या भवितव्याचा अभ्यास मुळीच नसे असे मात्र नाही. पुढे कलियुग येईल, चातुर्वर्ण्याचा नाश होईल, लोक पापी होतील इ. सामाजिक भविष्येही मागे वर्तवीत असत. भविष्यपुराणात अशी भविष्यें सांगितलेली आहेत आणि शिवाय 'व्हिक्तूरिया, एडवर्डो यांचे राज्य होईल' यासारखी भविष्येहि वर्तविलेली आहेत. एके ठिकाणी 'राज्ञी च विकटावती' असा व्हिक्टोरियाचा उल्लेख आहे. अन्यत्र ॲडॅम आणि ईव्ह यांचाही 'आदमो नाम पुरुषो, राज्ञी हव्यवती तथा' असा उल्लेख आढळतो. म्हणजे एकंदर समाजाच्या भविष्याचेही ज्ञान तेव्हा शास्त्रज्ञांना होत असे, असे दिसून येईल. मार्क्सवाद मात्र फक्त सामाजिक भविष्येच सांगतो. क्रांती केव्हा होईल, भांडवलदारांचा नाश केव्हा होईल, कामगारांना राज्यलाभ होईल की नाही, सत्तेचा लाभ कोणाला होईल, या तऱ्हेचीच भविष्ये मार्क्सवादी वर्तवितात. विवाह, पुत्रलाभ, धनलाभ, नोकरी, व्यापारात बरकत इ. घटनांविषयी भविष्ये ते सांगत नाहीत. म्हणजे आज तरी सांगत नाहीत. पुढे ते काय करतील याचे भविष्य मला आज वर्तविता येणार नाही.
 आपल्या पंथाच्या संस्थापकांना व त्यांच्या अनुयायांना प्राप्त झालेल्या या सिद्धीविषयी अनेक मार्क्सवादी पंडितांनी सविस्तर लिहून ठेवलेले आहे. "भविष्यकाळातील इतिहासाच्या घडामोडी कशा होणार हे आधी जाणण्याचे शास्त्र निर्माण करणारा कार्ल मार्क्स हा आद्य पुरुष होय. त्याचा मित्र एंगल्स यालाही भविष्यकाळ अगदी बिनचूक व तपशिलासह जाणण्याची प्रज्ञा होती. लेनिनचीही प्रतिभा या शास्त्रात निरंकुश होती. मार्क्सची सर्व भविष्ये अगदी तंतोतंत बरोबर आलेली पाहून आपण आश्चर्याने थक्क होतो." अशी डिवॉरिन या लेखकाने साम्यवादातील श्रेष्ठ भाईची प्रशंसा केलेली आहे. (मार्क्सिझम अँड मॉडर्न थॉट- पृ. ९१- ९७) मार्क्सने भांडवलशाहीच्या विकासाचा सिद्धान्त शोधून काढला आणि त्यावरून तिच्याविषयी जे भविष्य वर्तविले ते आज पन्नास वर्षांनी अक्षरश: खरे ठरत आहे असे त्याच ग्रंथात टिमेनिव्ह या लेखकाने म्हटले आहे. (पृ. ३१६) निकोलाय बुखारिन हा सोव्हियेट रशियातील मोठा नेता. लेनिनचा सहकारी. 'हिस्टॉरिकल मटीरियालिझम्-' हा त्याचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यात तो म्हणतो की, ग्रहज्योतिषशास्त्रात सूर्य- चंद्राची ग्रहणे, ग्रहांच्या गती या जशा बिनचूक सांगता येतात तशीच मार्क्सवादात समाजस्थितीविषयी भविष्ये- (अमक्या लढाईच्या वेळी कोणचा पक्ष कसा वागेल, कोणचा वर्ग पुढाकार घेईल इ.) बिनचूक सांगता येतात. मार्क्सने सांगितलेली अनेक भविष्ये तशी खरी ठरली आहेत. (पृ. ४९, ५०) मात्र 'आम्हाला काळ निश्चित सांगता येत नाही. आम्ही गतीची दिशा सांगू शकतो पण वेग मात्र सांगू शकत नाही,' असे पुढे त्यानेच सांगून ठेविले आहे. 'गणितशास्त्रात मुळात दिलेल्या सिद्धान्तावरून पुढील निगमने जितक्या निश्चितपणे सांगता येतात तितक्याच निश्चयाने, भोवतालची परिस्थिती व अर्थशास्त्राची तत्त्वे यांचे सम्यक् ज्ञान झाले तर सामाजिक क्रांती वर्तविता येते' असे एंगल्सचे मत आहे.
 आपल्या भविष्यज्ञानाबद्दलचा मार्क्सवाद्यांचा हा आत्मविश्वास पाहिला म्हणजे यांना ही भविष्ये कशी सांगता येतात याविषयी आपल्याला कुतुहल वाटू लागते. फलज्योतिषामध्ये रवि, मंगळ, बुधादि आकाशस्थ ग्रहांची मानवी जीवनावर सत्ता आहे, तेच मानवाचे भवितव्य निश्चित करतात असा निश्चित सिद्धान्त आहे. त्यामुळे व्यक्तीच्या कुंडलीमधील या ग्रहांचा अभ्यास केला की भविष्य सांगणे सहज शक्य आहे, असे ते शास्त्र म्हणते. अंतर्ज्ञानी साधुपुरुषांचा दुसरा आधार होता. मनुष्य जन्मतो त्याच वेळी ब्रह्मदेव त्याचे सर्व भविष्य त्याच्या कपाळी लिहून ठेवितो असे त्यांचे मत आहे, तपश्चर्येने, परमेश्वरी कृपेने ते जाणण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले की भविष्यकथन सुलभ होते. अशा प्रकारचे कोणचे शास्त्र कम्युनिस्टांना लाभले आहे असा प्रश्न आपल्या मनात येतो. 'ऐतिहासिक जडवाद' हे ते शास्त्र होय. विरोधविकासवाद, ऐतिहासिक जडवाद, वर्गविग्रह व श्रममूल्यसिद्धान्त ही मार्क्सवादाची मूलतत्त्वे होत. त्यांत ऐतिहासिक जडवादाला फार महत्त्व आहे. कोठल्याही समाजाचे भवितव्य जाणता येते, त्याचे भविष्य वर्तविता येते ते याच शास्त्राच्या आधारे. असे असल्यामुळे या ऐतिहासिक जडवादाचे स्वरूप प्रथम आपणांस समजून घेतले पाहिजे; त्यावाचून मार्क्सच्या भविष्यपुराणाची आपल्याला कल्पना येणार नाही. म्हणून या तत्त्वाचे थोडे स्पष्टीकरण करू.
 प्रत्येक समाजात भिन्न भिन्न काळी धननिर्मितीची काही विशिष्ट साधने माणूस वापरीत असतो. अगदी प्रारंभीच्या काळी मनुष्याला शेती माहीत नव्हती. त्या वेळी ससा, हरिण, डुक्कर, यांची शिकार करावी, मासे पकडावे व त्यांवर निर्वाह करावा अशी स्थिती होती. ससा, हरिण, मासा हेच त्या वेळचे धन व बाण किंवा कोयता ही त्याच्या प्राप्तीची साधने. पुढे जमीन हे धनसाधन मानवाला उपलब्ध झाले. नांगर, कुळव, दोरखंडे, बैल, घोडा ही त्याची त्या वेळी अर्थोत्पादनाची साधने होती. अरण्ये, खाणी, हीही धनसाधने पुढे उपलब्ध होत गेली. पुढे मग कोष्टी, चांभार, गवंडी, पाथरवट हे लोक भिन्न प्रकारचे धन-निर्वाहसाधन निर्माण करू लागले. पुढे व्यापार सुरू झाला. गिरण्या, कारखाने सुरू झाले. यंत्र, वाफ, वीज यांचा शोध लागून अनंत प्रकारची अवजारे धन निर्माण करू लागली. मोटार, आगगाडी, आगबोट ही वाहने यांचा या अवजारांत आणि म्हणून अर्थोत्पादनाच्या साधनांतच समावेश होतो. धनसाधने बदलतात तशी माणसाची अर्थविनिमयाची साधने व पद्धतीहि बदलतात. पूर्वी नाणी नव्हती. ऐन जिनसी व्यवहार होई. पुढे नाण्यांची पद्धती आली. पेढ्या, हुंडया यांचे अनंत प्रकार सुरू झाले. आणि अर्थविनिमय पहिल्यापेक्षा अगदी भिन्न प्रकारे होऊ लागला. म्हणजे अर्थोत्पादनाची साधने बदलली की विनिमयसाधनेही बदलतात. येथेच हे चक्र थांवत नाही. प्रत्येक प्रकारच्या अर्थसाधनांनी समाजातल्या भिन्न भिन्न गटांचे, वर्गांचे, जातींचे संबंधही निश्चित होत असतात, व त्यामुळे साधने बदलली की हे संबंधही बदलतात. शेतकरी व जमीनदार यांचे जे संबंध असतात त्यांहून मजूर व कारखानदार यांचे संबंध फार निराळे असतात हे आपण आज पाहतोच. गुलाम आणि धनी यांचे नाते त्याहीपेक्षा भिन्न असते हेही उघड आहे. ज्या समाजात वस्तूची देवघेव करणे एवढाच व्यापार असतो त्याहून जेथे मोठमोठे कारखाने महायंत्रोत्पादन करीत असतात त्या समाजातले भिन्न गटांचे परस्परसंबंध फार वेगळे असतात. आणि अर्थ व विनिमय यामुळे कुळ व सरंजामदार, मजूर व कारखानदार, गुलाम व धनी यांच्यातील संबंधच फक्त निश्चित होतात असे नव्हे तर त्या समाजातील राजा व प्रजा, सत्ताधारी व बहुजन, नेते व अनुयायी यांचेही संबंध या अर्थोत्पादन व्यवस्थेमुळेच ठरत असतात असे मार्क्सवादाचे म्हणणे आहे. पण मार्क्स एवढेच म्हणून थांबत नाही; तर धर्मव्यवस्था, कायदा, विद्या, विवाहसंस्था, स्त्रीपुरुषसंबंध, परमार्थविषयक मते, प्रवृत्ती, निवृत्ती म्हणजे एकंदर मानवी संस्कृतीच या अर्थोत्पादन-साधनामुळे निश्चित होत असते असे मार्क्सचे मत आहे, आणि त्यातूनच त्याचे भविप्यज्ञान निर्माण होत असल्यामुळे हा सिद्धान्त काय आहे ते जरा तपशिलाने पाहू.
 पूर्वी लढाईत जिंकलेल्या माणसांची सर्रहा कत्तल करीत असत. पुढे दया- धर्माचा उदय झाला. कोणातरी धर्मवेत्त्याने मानवाला, सेनापतीला, राजांना दया हा श्रेष्ठ धर्म आहे, मनुष्याची हिंसा करू नये असा उपदेश केला आणि म्हणून या कत्तली थांबल्या असे आपल्याला वाटते. पण मार्क्सवादी म्हणतात, तसे नाही. जिंकलेल्या लोकांना गुलाम करून त्यांना शेतीला वा इतर अन्य कामाला लावून त्यांच्यापासून धनोत्पादन करून घेण्याची व्यवस्था होत नव्हती तोपर्यंत जेते लोक जितांची कत्तल करीत. पुढे शेतीला माणूसबळ हवेसे झाले तेव्हा कत्तली थांबल्या. त्या वेळी दयाधर्माचा उपदेश, अहिंसेचा उपदेश, एखाद्या बुद्धाने केला असेल. पण त्या दयाधर्माचे याच वेळी स्फुरण झाले ते शेतीला कष्टकरी माणसांची आवश्यकता निर्माण झाली म्हणूनच. उत्पादनसाधनांत बदल झाला म्हणून दयेचे तत्त्व उदयास आले, व त्यामुळेच बुद्धाचा जन्म झाला. पुरुष हे एकापेक्षा जास्त बायका करू लागले त्याचेही कारण असेच आहे. त्यांची कामवासना हे कारण नव्हे. शेतीला हुकमी मनुष्यबळाची आवश्यकता भासू लागली की मग लोकांना अनेक लग्ने करण्याची बुद्धी होते. तोपर्यंत होत नाही. आणि झाली तरी तशी प्रथा यशस्वी होणार नाही. समुद्रगुप्त, हर्ष यांसारखे राजे इतर राजांची लहानलहान राज्ये नष्ट करून तेथे एकछत्री साम्राज्य स्थापतात. यापाठीमागे त्यांची साम्राज्यलालसा आहे, असे आपण म्हणू. पण ही मीमांसा मार्क्समते योग्य नाही. लहान लहान राज्ये असली की ते राजे आपसात सारखे लढत राहतात. कृषि, वाणिज्य इत्यादि व्यवसायांची हानी होते. मग त्यांची भरभराट व्हावी येवढ्यांसाठी एकछत्री राज्याची आवश्यकता निर्माण होते. मग कोणीतरी समुद्रगुप्त निर्माण होतोच. आणि उत्पादनसाधनांची भरभराट व्हावी अशी परिस्थिती म्हणजे एकछत्री साम्राज्य निर्माण करतो. संन्यास, प्रवृत्ती, निवृत्ती, व्यक्तिस्वातंत्र्य, एकपत्नी, बहुपत्नी ही सर्व तत्त्वे अशीच अर्थोत्पादन- साधनांवर अवलंबून आहेत. अर्थसाधनांचा विकास होण्यास व्यक्तिस्वातंत्र्य अनुकूल असेल तर ते प्रस्थापित होईल. नसेल तर होणार नाही. आणि झाल्यास टिकणार नाही. एकोणिसाव्या शतकात कारखानदारी व भांडवलशाही यांच्या वाढीला व्यक्तिस्वातंत्र्य अवश्य होते. लगेच पाश्चात्त्य देशांत त्याचा पुरस्कार करणारे तत्त्ववेत्ते निर्माण झाले. त्याचा प्रसार झाला. ते दृढमूल झाले. त्याआधी ते होणे शक्यच नव्हते. त्याआधी शेतीच्या विकासाला, सरंजामदारीला दासपद्धतीच अनुकूल होती. म्हणून ती अमलात आली, टिकून राहिली आणि तिचा उपदेश करणारी धर्मतत्त्वे साधुसंत सांगत राहिले. उपनिषत्काली संन्यास, वैराग्य यांचा उदय का झाला ? विश्वाच्या मूलकारणांचे चिंतन केल्यावर मोक्षसाधनाला संन्यास अवश्य असे, ऋषींना वाटले म्हणून त्यांनी तसा उपदेश केला, हे खोटे. गृहस्थधर्म, यज्ञधर्म झेपणे कठिण व्हावे अशी आर्थिक परिस्थिति निर्माण झाली म्हणून ऋषींना संन्यासधर्माचा उपदेश करण्याची बुद्धी झाली, हे खरे. म्हणजे तत्त्वज्ञानातून, मानवी विचारांमुळे परिस्थिती बदलते असे नसून परिस्थितिमुळे मानवी विचार, बुद्धी, तत्त्वज्ञान, संस्कृती ही बदलतात, निर्माण होतात, असे हे मत आहे. आणि ही परिस्थिती म्हणजे आर्थिक परिस्थिती. धनोत्पादनसाधने, विनिमयपद्धती, रस्ते, वाहने, त्या साधनांतून निर्माण झालेले वर्ग, त्यांचे परस्परसंबंध हे सर्व आर्थिक परिस्थितीत समाविष्ट होते. (यापुढे अर्थसंबंध या शब्दाने आपण त्याचा निर्देश करू.) या परिस्थितीच्या नियंत्रणांत सर्व घडामोडी असल्यामुळे तिचे ज्ञान असणाऱ्या मनुष्याला भविष्ये सांगता येतील हे उघडच आहे. शनि-मंगळाच्या नियंत्रणात मानव आहे असे ज्यांना वाटते ते त्यांच्या स्थितिगतीचा अभ्यास करतात आणि भविष्ये वर्तवितात. अर्थसबंध मानवाचे नियंत्रण करतात असे मत असणारे मार्क्सवादी त्याच्या अभ्यासाच्या आधारे भविष्य सांगतात.
 याविषयीचे आपले सिद्धान्त अनेक ठिकाणी मार्क्सवादी पंडितांनी सांगितलेले आहेत. प्रत्येक युगात उत्पादन व विनिमय यांच्या ज्या पद्धती अस्तित्वात असतात त्यांच्यामुळे जी अनिवार्य अशी समाजरचना झालेली असते तिच्या पायावरच सर्व राजकीय व बौद्धिक इतिहास उभा असतो, व या साधनांच्या आधारेच त्याचे रहस्य उकलता येते. (कम्युनिस्ट मॅनिफेस्टो).
 राजकीय, सामाजिक व धार्मिक जीवनाला उत्पादनसाधनांमुळेच विशिष्ट स्वरूप प्राप्त होते. माणसाच्या विवेकबुद्धीने परिस्थिती ठरत नसून परिस्थितीमुळेच माणसाच्या विवेकबुद्धीचे रूप निश्चित होत असते. (मार्क्स- क्रिटिक ऑफ पोलिटिकल इकॉनमी)
 सामाजिक व राजकीय क्रांतीची अंतिम कारणे माणसाच्या कर्तृत्वात नसून उत्पादन व विनिमय यांच्या साधनांत जो बदल होतो त्यात ती सापडतात. (एंगल्स- शास्त्रीय समाजवाद)
 मानवाच्या विचारांच्या प्रवाहाची दिशा भोवतालच्या जड परिस्थितीमुळे निश्चित होते. धर्म, कायदा, शासनसंस्था, भिन्न भिन्न गटांतील मानवांचा दर्जा यांचे स्वरूप त्या काळच्या उत्पादनसाधनांनीच निश्चित होत असते. (एंगल्स- मार्क्स मृत्यूनंतरचे भाषण.)
 या वचनांवरून ज्योतिषशास्त्रातील शनिमंगळांइतक्याच सामर्थ्याने व तितक्याच सूक्ष्मपणे नांगर, माग, मासे पकडण्याचे जाळे, गिरण्या- कारखाने, बँका ही अर्थसाधनेहि मानवी जीवनाचे नियंत्रण करतात असे मार्क्सवादी मानतात असे दिसून येईल. नाचणाऱ्या बायका नाचताना काही हातवारे करतात. ते सुद्धा वाटेल तसे होत नाहीत. गाजरे, बटाटे, मुळे इ. भाज्या जमिनीतून उपटताना आणि झाडावरची फळे तोडताना म्हणजे अन्नधान्य प्राप्त करून घेताना जसे कामकरी बायकांचे हात होतात तसेच त्या वेळच्या नृत्यात हातवारे होणार. अन्यप्रकारे होणे शक्य नाही असे प्लॅखेनॉव्ह हा रशियातील लेनिन- स्टॅलिनादि मार्क्सवाद्यांचा परात्पर गुरू म्हणतो. मानवी जीवनावर अर्थसंबंधाचे इतके सूक्ष्म नियंत्रण असताना भविष्ये सांगता येऊ नयेत ही खरोखरच नामुष्कीची गोष्ट आहे. मार्क्सने अर्थशास्त्रज्ञांची ही नामुष्की दूर करून त्यांचे लज्जारक्षण केले, यासाठी त्यांनी त्याला शतशः धन्यवाद दिले पाहिजेत.
 फल- ज्योतिषशास्त्राच्या तोडीचे किंवा त्यापेक्षाही जास्त सुनिश्चित असे जे जगप्रसिद्ध शास्त्र मार्क्सने निर्माण केले त्याच्या आधाराने मार्क्सने व त्याच्या अनुयायांनी भविष्ये तरी कोणची सांगितली आणि त्यांपैकी खरी किती झाली ते आता आपणास पहावयाचे आहे.
 पहिले भविष्य अर्थातच कम्युनिस्ट क्रांतिविषयीचे. कम्युनिस्ट क्रांती हा मार्क्सवादाचा आत्मा. त्या पंथाचे ते सर्वात मोठे वैभव ! तेव्हा त्याविषयीचे भविष्य कम्युनिस्ट पंडितांनी अगदी सूक्ष्म अभ्यासानेच वर्तविलेले असणार. आणि म्हणून त्याचे महत्त्वहि फार. यामुळेच त्याचा प्रथम विचार करू.
 भांडवलशाही ज्या देशात परिपक्व दशेस आली आहे त्याच देशांत प्रथम कम्युनिस्ट क्रांती होणार आणि अशा भांडवलशाही देशांचे अर्थव्यवहार परस्परात अत्यंत गुंतलेले असल्यामुळे अशा सर्व देशात ती क्रांती एकदमच होणार हे निश्चित, असे 'प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिझम्' या संवादरूप लेखात एंगल्सने म्हटले आहे. आणि तपशिलात शिरून त्याने असेही वर्तविले होते की कम्युनिस्ट क्रांती राष्ट्रीय म्हणजे एका राष्ट्रापुरती मर्यादित क्रांती होणार नाही. ती प्रगत भांडवली देशात म्हणजे ग्रेट ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स व जर्मनी या देशांत प्रथम एकदम होईल. त्यातही जेथे औद्योगिक प्रगती सर्वात जास्त, धनोत्पादन जेथे पराकोटीला गेलेले तेथे ती प्रथम होईल. या दृष्टीने ब्रिटनमध्ये ती सर्वात जास्त वेगाने होईल व जर्मनीत अगदी मंदगतीने होईल, असे त्याने लिहून ठेविले होते.
 मार्क्सवादाचे दुर्दैव असे की कम्युनिस्ट क्रांती ही यांपैकी कोणच्याहि प्रगत देशांत न होता औद्योगिक दृष्टीने अत्यंत मागासलेला असा देश जो रशिया तेथे झाली. सावित्रीचा पती सत्यवान् याचे प्राणहरण करताना यमाने चूकभूल केली. याचे कारण मोरोपंत असे देतात की "जे ब्रह्मलिखित बरे न वाची ते." यमाने ब्रह्मदेवाने सत्यवानाचा लिहिलेला ललाटलेख नीट वाचला नाही. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात क्रांतिदेवतेने अशीच चूकभूल केली. एंगल्सचा लेख तिने नीट वाचला नाही. तिने पूर्ण मागासलेल्या देशांत अवतार घेतला आणि पुन्हा एकाच देशापुरती ती मर्यादित राहिली. स्टॅलिनला १९२६ साली कम्युनिस्ट क्रांती ही जगव्यापक नसून एकराष्ट्रमर्यादितच आहे अशी घोषणा करावी लागली. म्हणजे तिने एंगल्सची दोन्ही भविष्ये सपशेल चुकविली. अर्थात् फलज्योतिषशास्त्रात ज्याप्रमाणे भविष्य सपशेल चुकलेले असताना ते पूर्ण बरोबर कसे आहे हे सांगणारे ज्योतिषी असतात तसेच ऐतिहासिक जडवाद या शास्त्रातही आहेत. बढती सांगितलेली असताना बडतर्फी झाली तरी ती बडतर्फी हीच कशी बढती होय हे स्पष्ट करणारे ज्योतिषी सर्वत्र आढळतात; त्याचप्रमाणे भांडवली दृष्टीने पूर्ण मागासलेल्या रशियात क्रांती झाली तरी भांडवलपरिपक्व देशांत ती प्रथम होणार हे मार्क्सवादाचे भविष्य कसे तंतोतंत बरोबर आले हे स्पष्ट करणारे अनेक कम्युनिस्ट आढळतात. त्यांचे लेखही प्रसिद्ध आहेत. (रशियन राज्यक्रांति- पां. वा. गाडगीळ- पृ. २६० पहा.) पण त्याचा विचार न करता एंगल्सच्या या महत्त्वाच्या भविष्याचा विचार प्रथम आपणांस पुरा केला पाहिजे.
 टाकचाव्ह नावाच्या एका पंडिताचे मत असे होते की रशियातच क्रांती प्रथम होणे जास्त शक्य आहे. जर्मन कामगारांसमोर भाषण करताना तो म्हणाला की, 'फ्रेड्रिक एंगल्स याला रशियाविषयी काही माहिती नाही. त्याला काही कळत नाही. रशियात कामगार नाहीत हे खरे पण तसे भांडवलदारही नाहीत. तेव्हा तेथील लढा सोपा आहे. इ.' यावर आपल्या एका लेखात कडक टीका करून एंगल्सने सांगितले की 'या टाकचॉव्हला सोशॅलिझम्चा ओनामा सुद्धा कळत नाही.' आणि नंतर त्या लेखात एंगल्सने रशिया हा मागासलेला आहे, समाजवादी क्रांती होण्यास भांडवलशाहीची परिणती झालेली असणे आवश्यक असते, तशी रशियात नाही. पाश्चात्त्य राष्ट्रांआधी रशियात क्रांती होईल. पण ती समाजवादी क्रांती असणार नाही, अशा तऱ्हेने विवेचन केले आहे. (ऑन सोशल रिलेशन्स इन् रशिया, सन १८७५)
 रशियात १९१७ साली जी क्रांती झाली ती समाजवादी क्रांतीच होय असे बहुतेक सर्व कम्युनिस्ट पंडितांचे मत आहे. मार्क्सवचन श्रुतीप्रमाणे मानणारे लेनिनचे काही सहकारी समाजवादी क्रांती रशियात होणे शक्य नाही, असे १९१७ साली झारशाही कोलमडून पडल्यावरही म्हणत होते. स्टॅलिन त्यातच होता. पण लेनिनने त्या सर्वांना खोडून काढले, व मार्क्समताच्या आधारेच रशियातील समाजवादी क्रांती घडवून आणली. तेव्हा मार्क्स- एंगल्सचे समाजवादी क्रांतिविषयीचे भविष्य कितपत खरे झाले ते यावरून स्पष्ट होईल. रशियातील क्रांती कोणच्या जातीची आहे याविषयी जरी वाद असला तरी समाजवादी क्रांती ब्रिटन, अमेरिका इ. भांडवली देशांत प्रथम होईल हे भविष्य फसले हे मान्य केलेच पाहिजे.
 कम्युनिस्ट (समाजवादी) क्रांती ही जागतिक क्रांतीच होणार. ती एकराष्ट्रीय असणार नाही हा वरील भविष्याचा उत्तरार्ध आहे तोही खरा ठरला नाही हे उघडच आहे. पण त्याविषयी थोडे आणखी सांगितले पाहिजे. १९१७ साली रशियात क्रांती होऊन लेनिन सत्ताधारी झाला. आपण समाजवादी क्रांती केली आहे अशी त्याची श्रद्धा होती आणि अजूनही त्याचा वरील भविष्याच्या उत्तरार्धावर विश्वास होता. त्यामुळे, रशियन क्रांती हा केवळ आरंभ आहे, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका येथे आता अशीच क्रांती होत जाणार, तशी न झाली तर आपला सर्वनाश होईल, आपल्या क्रांतीचा घात होईल, असे तो नित्य म्हणत असे. क्रांतीच्या अपेक्षेने त्याने आपले हस्तक या वरील देशांत पाठविले होते. पण कोठे काहीच झाले नाही. आणि मग हळूहळू ती आशा सोडून देऊन 'कम्युनिस्ट क्रांती एकराष्ट्रीय असू शकते' अशा घोषणा रशियन मार्क्सवादी करू लागले.
 लेनिन हा भविष्यज्ञानात मार्क्सइतकाच निपुण होता असे म्हणतात. १९१७ च्या आधी पंचवीस वर्षे ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, या देशांतील अर्थोत्पादन साधने, तेथील भांडवलशाही, कामगारवर्ग, तेथील पक्षोपपक्ष, इतर परिस्थिती यांचा तो अभ्यास करीत होता. तरी १९१७ साली सुद्धा त्याला त्यांच्याविषयी, त्या समाजाच्या पुढील दोन-तीन वर्षांतल्या भवितव्याविषयी काहीही कळू शकले नाही. तेथे समाजवादी क्रांती होणार असेच तो म्हणत होता. पण जर्मनी, फ्रान्समध्ये पुढील काळात झाले ते अगदीच उलट झाले !
 टाकचाव्हचे मत व त्यावरील एंगल्सची टीका वर दिली आहे. ती आणि लेनिनचे हे भविष्यज्ञान यांवरून समाजवादाचा ओनामा कोणाला कळला आहे हेच कळेनासे होते. एंगल्सच्या मते टाकचाव्हला तो कळलेला नव्हता. पण क्रांतीने टाकचाव्हला तो कळला असल्याचे सिद्ध केले. लेनिननेही ते मान्य केले. पण पुढल्या भविष्यज्ञानावरून त्याच्याबद्दलही तीच शंका येते. स्टॅलिनला खरे भविष्यज्ञान असते तर हिटलरचा जर्मनी पुढे आपल्यावर उलटणार आहे एवढे त्याच्या ध्यानात आले असते. कारण कोणचा पक्ष कोणच्या बाजूला जाईल, कोणाची काय तत्त्वनिष्ठा राहील हा तपशील ग्रहगोलांच्या गतीप्रमाणेच निश्चित सांगता येतो असे मार्क्समत आहे. तेव्हा स्टॅलिनचे भविष्यज्ञान व समाजवादाचे ज्ञान शंकास्पदच दिसते. आणि आजच्या रशियाच्या सत्ताधाऱ्यांना ते मान्य आहेच. या सगळ्यामुळे मोठी पंचाईत होते. तूर्त आपण मार्क्स व एंगल्स यांना समाजवादातले काही कळत होते, असे धरून पुढे जाऊ.
 क्रांतीचे स्वरूप, तिचा व्याप व तिचा कमीअधिक वेळ यांविषयीच्या मार्क्सच्या भविष्याचा विचार झाला. दुसरे भविष्य वर्गभेदाच्या तीव्रतेविषयीचे. मार्क्सचे मत असे होते की पश्चिम युरोपीय देशांत भांडवलशाही परिपक्व झाली आहे. तेथे उत्तरोत्तर संपत्तीची वाटणी अत्यंत विषम होत जाणार. कामगारवर्ग कमालीचा दरिद्री होणार आणि सर्व संपत्ती भांडवलदारांच्या हाती एकवटणार. आणि यातूनच मग भडका उडून कामगार लोक भांडवलशाही नष्ट करून कामगारसत्ता प्रस्थापित करणार. जगाच्या सुदैवाने हेही भविष्य असेच लटके झाले. संपत्तीची विषम वाटणी होत आहे असे पाहताच मार्क्सच्या डोळ्यादेखत बिस्मार्क, डिझरायली या नेत्यांनी कामगारहिताचे कायदे करून तिचा निचरा करण्यास प्रारंभ केला. १८८० च्या सुमारालाच हा उपक्रम झाला होता. त्याच्याआधीच जॉईंट स्टॉक कंपन्यांची पद्धत सुरू होऊन गिरण्या- कारखान्यांवरची धनिक सत्ता नष्ट होण्यास प्रारंभ होऊन धनामध्ये मध्यमवर्ग वाटेकरी होऊ लागला होता. त्या वेळचे लेसे फेअरचे म्हणजे अर्थक्षेत्रातील अनिर्बंधतेचे तत्त्वज्ञान नष्ट होऊन सरकारने अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवले पाहिजे, हे तत्त्वज्ञान दृढमूल होऊ लागले होते. या सर्व प्रेरणांमुळे कामगारवर्गाला हळूहळू सुस्थिती प्राप्त होऊ लागली, धनिकांच्या संपत्तीचा निचरा होऊ लागला आणि मार्क्सची भविष्यवाणी खोटी ठरू लागली. अमेरिका, ब्रिटन, पश्चिम जर्मनी येथे मार्क्समतान्वये समाजवादी क्रांती मुळीच झालेली नाही. रशियात ती झालेली आहे. तरी भांडवली देशातील कामगारांचे राहणीचे मान सोव्हिएट कामगारांच्यापेक्षा शतपटीने श्रेष्ठ आहे. या प्रगत देशांची गोष्ट सोडून दिली तरी मार्क्सच्या काळापासून पुढच्या काळात मार्क्स म्हणाला त्याप्रमाणे वर्गभेदाची तीव्रता कोणच्याच देशात वाढली नाही. नियंत्रणाचे तत्त्व सर्वच देशांनी मान्य केले होते. आणि कालांतराने कामगारवर्ग संघटित झाल्यामुळे त्याला भांडवली व्यवस्थेतच थोडे बरे दिवस येऊ लागले. पाश्चात्त्य देशांप्रमाणे त्याला सुस्थिती आली असे नव्हे. पण कालप्रवाह बदलून गेला हे निश्चित. समाजात वर्ग नष्ट होतील, मध्यमवर्ग समूळ नष्ट होईल, लहान कारखानदार हे भिकेस लागतील व शेवटी मजूर होतील आणि शेवटी एका बाजूला अत्यंत धनाढ्य, कमालीचा संपन्न असा भांडवलदार व दुसऱ्या बाजूला अन्नवस्त्रालाही महाग झालेला कामगार असे दोनच वर्ग राहतील हे मार्क्सचे भविष्य तर कोठल्याच देशात खरे झाले नाही. ज्या दिवशी त्याने ते वर्तविले त्या दिवसापासूनच ते खोटे ठरू लागले. किंबहुना त्याच्याआधीच कालप्रवाह बदलू लागला होता. मार्क्सला त्याचे ज्ञान झाले नाही एवढेच.
 मध्यमवर्ग व राष्ट्रनिष्ठा यांच्याविषयीचा भविष्याच्या असाच प्रकार झाला. राष्ट्रनिष्ठा ही धर्माप्रमाणेच अफू आहे असे मार्क्सचे मत होते. धर्माप्रमाणेच तेही तत्त्वज्ञान कामगारांना झुलविण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी निर्माण केले आहे, कामगारांना मातृभूमी, पितृभूमी, यांचे सोयरसुतक काही नाही, कामगार हा जगाचा नागरिक आहे, जगातील सर्व कामगार एक आहेत, जाती, धर्मपंथ, राष्ट्र हे भेद ते मानीत नाहीत, असे मार्क्स म्हणत असे. त्याचे अनुयायी अजूनही म्हणतात. (त्यांना तसे म्हणत राहिलेच पाहिजे.) राष्ट्रनिष्ठा ही कामगारांना त्याज्य असल्यामुळेच मार्क्सने त्यांची जी संस्था स्थापिली तिचे नाव 'फर्स्ट इंटरनॅशनल'- 'आंतरराष्ट्रीय सभा' असे ठेविले. ती मोडल्यावर १८८९ साली दुसरी स्थापन झाली तिचे नावहि तसेच 'दुसरी आंतरराष्ट्रीय सभा' असे ठेविले आणि अत्यंत आश्चर्याची गोष्ट अशी की क्रांतीनंतर रशिया पक्का राष्ट्रवादी झाल्यानंतर एकराष्ट्रीय समाजवादाची स्टॅलिनने घोषणा केल्यानंतर तिसऱ्या सभेचे नावही 'थर्ड इंटरनॅशनल' असेच राहिले. रशियाच्या दृष्टीने ते युक्तच होते. कारण जो सोव्हिएट रशियाशी एकनिष्ठ तोच खरा आंतरराष्ट्रवादी अशी व्हिशिन्स्किसारखे कम्युनिस्ट व्याख्या करतात. तरी जगातल्या सर्व देशातले कामगारनेते- हिंदुस्थानातले सुद्धा- अगदी वारकऱ्याच्या भक्तिभावाने या सोव्हिएट रशियांकित, रशियानिष्ठ अशा आंतरराष्ट्रीय सभेला उपस्थित राहतात. असो, एवढे खरे की राष्ट्र ही कल्पनाच पुढच्या काळात नष्ट होईल हे मार्क्सचे भविष्य क्रांतीच्या भविष्याइतकेच खोटे ठरले, हे पुन्हा एकदा सोव्हिएट रशियाने सिद्ध केले.
 विद्याजीवी किंवा बुद्धिजीवी मध्यमवर्गावर मार्क्सवादाचा फार कटाक्ष. हे लोक म्हणजे कामगारक्रांतीचे कट्टे शत्रू, भांडवलदारांचे गुलाम आणि प्रस्थापित सरकारचे लाचार दास होत, असे कम्युनिस्टांनी अनेक वेळा म्हटले आहे. भांडवलदार व कामगार यांहून इतर सर्व वर्ग नष्ट होणार असे मार्क्सचे भविष्य असल्याचे वर सांगितलेच आहे. अर्थात् मध्यमवर्गही नष्ट होणारच ! पण मार्क्सच्या या शापवाणीतून हा वर्ग सहीसलामत सुटला एवढेच नव्हे तर ज्या काळात त्याचा मार्क्सवादाच्या मते नष्टांश व्हावयाचा होता त्याच काळात तो अत्यंत प्रभावी झाला, व जगातल्या अधिराज्याची सूत्रे त्याने आपल्या हाती घेतली. १८५० ते १९५० या शतकाचा इतिहास पाहिला तर पाश्चात्त्य देशातच नव्हे तर हिंदुस्थान, चीन, जपान, तुर्कस्थान, इजिप्त, इ. मागासलेल्या देशांतसुद्धा विद्याजीवी मध्यमवर्गानेच सर्वत्र विज्ञानाचे, लोकशाहीचे व राष्ट्रनिष्ठेचे युग निर्माण केले आहे असे दिसून येईल. रानडे, विष्णुशास्त्री, आगरकर, टिळक, रवींद्रनाथ, जगदीशचंद्र, विवेकानंद, बिपिनचंद्र, अरविंद, लाला लजपतराय, महात्माजी, विठ्ठलभाई, वल्लभभाई हे सर्व विद्याजीवी पुरुष होते. अशीच परंपरा इतर देशांत गेल्या शतकात निर्माण झाली आणि तिने आपल्या देशात वर्चस्व प्रस्थापित केले. धन हे जसे एक सामर्थ्य आहे तसेच विद्या व चारित्र्य हेही एक सामर्थ्य आहे. ते धनशक्तीवरही मात करू शकते हे इतिहासाने अनेक वेळा दाखविले आहे. मार्क्सला व कम्युनिस्टांना हे जाणण्याची कुवत नाही, कारण अर्थशक्तीवाचून दुसरी स्वतंत्र बौद्धिक शक्ती असूच शकत नाही या तत्त्वाचे ते गुलाम आहेत. म्हणूनच मार्क्सची भविष्ये फलज्योतिषाइतकीसुद्धा खरी ठरली नाहीत. मार्क्स लिहीत होता, त्याच वेळी मागासलेल्या जगात जपान, चीन, हिंदुस्थान या देशांत-पाश्चात्त्य विद्येचा प्रसार होऊन हा विद्याजीवी वर्ग निर्माण होत होता, इतकेच नव्हे तर आपला प्रभाव दाखवू लागला होता. पण भविष्य जाणणाऱ्या मार्क्सला हे वर्तमानही कळले नाही !
 मार्क्सच्या सर्व भविष्यात विशेष कौतुक एका भविष्याचे होते. ते म्हणजे पहिल्या महायुद्धाविषयीचे त्याचे भविष्य. १८७० साली, पुढे (कधी ?) जर्मनी व रशिया यांच्यात युद्ध होईल, असे त्याने एका मित्राला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. १८८८ साली एंगल्सनेही जागतिक महायुद्धाचे भविष्य वर्तविले होते.
 हे पहिल्या जागतिक महायुद्धाचे भविष्य हा शुद्ध भोंगळपणा आहे. पहिली गोष्ट अशी की मार्क्स व एंगल्स हे आपल्या भविष्याचा काळ कधीच देत नाहीत. गणितशास्त्राइतक्या अचूक असणाऱ्या शास्त्रात काळ कधीच सांगितलेला नसतो लक्षात ठेवले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे या युद्धाची मार्क्सवादी लोकांनी दिलेली कारणमीमांसा. दोन राष्ट्रे आपापली साम्राज्ये वाढविण्याची खटपट करणार आणि त्यातून संघर्ष निर्माण होऊन युद्ध होणार अशी, मार्क्सवादाची कारणमीमांसा आहे. तीअन्वये अमेरिका व ब्रिटन यांच्यात युद्ध अटळ आहे असे अनेक कम्युनिस्टांनी भविष्य सांगितले होते. पण ते अजूनही घडलेले नाही व पुढे घडण्याची सध्या तरी चिन्हे नाहीत. आणि त्या कारणाने पाहिले तर जर्मनी व रशिया यांच्यात युद्ध मुळीच व्हावयास नको होते. कारण या दोन देशांच्या साम्राज्यविस्ताराचा संघर्ष कोठे आलाच नव्हता. इतकेच नव्हे तर काही पंडितांच्या मते जर्मनी व ब्रिटन यांचाही साम्राज्यासाठी संघर्ष येण्याचे कारण नव्हते. कारण १९१४ साली जर्मनी अतिशय भरभराटीच्या अवस्थेत होता. आणि त्याला विकण्यास पुष्कळ क्षेत्र मोकळे होते. व्यापाराचा व भांडवलशाहीचा विस्तार होत नाही, माल खपत नाही, धन मिळत नाही, त्यामुळे दारिद्र्य येत चालले आहे, कुचंबणा झाली आहे असा प्रसंग जर्मनीवर १९१४ साली मुळीच आलेला नव्हता. दुसरे असे की त्या वेळी फ्रान्स, जपान, ही राष्ट्रेही भांडवली क्षेत्रात येत होती. ब्रिटनशी साम्राज्यासाठी म्हणजे बाजारपेठेसाठी संघर्ष यावयाचा तर तो त्यांचा येणे अवश्य होते. पण ते तर त्या वेळी ब्रिटनच्या बाजूचे दोस्त होते. म्हणजे आर्थिक परिस्थिति किंवा अर्थसंबंध हा जो भविष्याचा मूलाधार त्याअन्वयेही भविष्ये खरी होतच नाहीत. पण मार्क्सच्या या भविष्याचे खरे दारिद्र्य पुढेच आहे. युद्ध होईल हा त्यातला पूर्वार्ध आहे. त्या युद्धाचा जो परिणाम तो भविष्यातला महत्त्वाचा भाग होय. तो परिणाम म्हणजे भांडवलशाहीचा नाश, कामगारांचा विजय व कामगारांच्या दंडसत्तेची प्रस्थापना. यांचा तर कोठे मागमूसही दिसत नाही. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान, इटली, तुर्कस्थान, इजिप्त, इराक, इराण, सिरिया, या अनेक देशांत पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात भयानक उलथापालथी झाल्या पण कामगारांची दंडसत्ता कोठेही प्रस्थापित झाली नाही. रशियात तशी झाली असे ४-५ वर्षांपूर्वीपर्यंत कम्युनिस्ट म्हणत. पण स्टॅलिन हा केवळ सुलतान होता असे आता क्रुश्चेव्हनेच सांगून टाकले आहे. क्रुश्चेव्ह्सारखे लोकही त्याच्यापुढे लाचार झाले होते असे तेच म्हणतात, मग कामगारांचे काय झाले असेल ते सांगणे नकोच. तेव्हा रशियात कामगारसत्ता तर नाहीच पण अत्यंत भयंकर अशी सुलतानशाही व साम्राज्यशाही आहे. पूर्वी भांडवली राज्ये असत. आता कम्मुनिस्ट साम्राज्ये निर्माण होऊ लागली आहेत. हंगेरी, पोलंड, बल्गेरिया, लॅटव्हिया इ. देशांवर रशियाचे साम्राज्य आहे. तिबेट, मांचूरिया इ. देशांवर चीनचे आहे. कामगारसत्ता कोठेच नाही.
 कार्ल मार्क्स व एंगल्स हे जे आद्य भाई, त्यांनी वर्तविलेल्या अनेक भविष्यांचा येथवर आपण विचार केला. त्यांच्या अनुयायांच्या मताने ती जरी खडान् खडा बरोबर आली असली तरी प्रत्यक्ष इतिहासात पाहता ती कुडमुड्या ज्योतिष्यापेक्षा काही निराळी नाहीत असे दिसते. पण याहून निराळे काही होणे शक्य नव्हते व नाही. कारण अर्थसंबंधामुळे मानवी संस्कृती निश्चित होते हे जे त्याचे आधारभूत तत्त्व तेच मुळी, भ्रामक व अशास्त्रीय आहे. ते कसे ते थोडक्यात पहावयाचे आहे. पण त्याच्याआधी या भविष्याकडे निराळ्या दृष्टिकोनातून पहाणारे मार्क्सचे अनुयायी आहेत. त्यांच्या मतांचा परामर्श घेऊन नंतर वरील विचार पाहू व समारोप करू.
 (डॉ. फ्रिट्झ् स्टर्नबर्ग या पंडिताचा 'कॅपिटॅलिझम् अँड सोशॅलिझम् ऑन् ट्रायल' या नावाचा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झाला आहे. स्विट्झरलंडमधील एक इतिहासकार हर्बर्ट लूथी याने त्याचे 'क्वेस्ट' या त्रैमासिकाच्या जानेवारी-मार्च १९५९ च्या अंकात परीक्षण करून काही विवेचन केले आहे. पुढील विवेचनाच्या अधिक अभ्यासासाठी जिज्ञासुंनी ते परीक्षण पहावे. पुढील विचार मी लूथीच्या आधारे मांडले आहेत.)
 स्टर्नबर्गसारख्या अनेक मार्क्सवादी पंडितांना मार्क्सची भविष्ये चुकली असे वाटते. पण त्यांना मार्क्सचे ऐतिहासिक जडवादाचे शास्त्र व भविष्यकथनाची पद्धत चुकली असे वाटत नाही. आणि भविष्ये चुकली हे मान्य असले तरी तसे ते म्हणत नाहीत. ते 'डेव्हिएशन' किंवा 'वक्रीभवन' असा शब्द वापरतात. शनि-मंगळादिकांच्या गती देताना पंचांगात कोठे कोठे वक्री शनिः, वक्री गुरुः, असे दिलेले असते, व नंतर काही दिवसांनी मार्गी शनिः, मार्गी गुरु: असे म्हटलेले असते. याचा अर्थ असा की शनि- गुरू यांचे मार्ग निश्चित ठरलेले आहेत. पण मध्येच ते हे मार्ग टाकून जरा वाकडे जातात. पण काही झाले तरी पुन्हा मार्गावर येतातच. त्याचे हे जे अल्पकाळ मार्ग सोडून जाणे त्याला वक्रीभवन असे म्हणतात. तसाच प्रकार मार्क्सने ज्यांची गती वर्तविली त्या देशांचा आहे. ते थोडा वेळ त्याने आखून दिलेल्या मार्गापासून च्युत झाले पण अल्पकाळातच पुन्हा मार्गावर आले. हा अल्पकाळ म्हणजे शंभर वर्षाचा होय. येथे आपण लक्षात ठेवले पाहिजे की प्रारंभापासूनच हे देश वक्री चालू लागले आहेत. स्टर्नबर्गच्या पुस्तकात गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासाची मीमांसा आहे. मार्क्सने भविष्य वर्तविल्याला इतकीच वर्षे झाली आहेत. म्हणजे आतापर्यंत या देशांचा अधिकांश प्रवास वक्रीच झालेला आहे, हे या पंडितांनाही मान्य आहे. पण मूळ शास्त्र चुकले असे त्यांना वाटत नाही. म्हणून त्यांच्या ग्रंथात हे वक्रीभवन का झाले ते सांगण्यावर व मार्क्स कसा चुकला नाही ते दाखविण्यावर भर असतो.
 मार्क्स लेखन करीत होता त्याच वेळी त्यांच्या मते भांडवलशाही परिपक्व झाली होती. एका बाजूला अफाट संपत्ती व दुसऱ्या बाजूला दारिद्र्याचा नरक अशी तीव्र विषमता त्याच वेळी झाली होती. यालाच भांडवलशाहीचा अंगभूत विरोध, अंतर्विरोध असे म्हणतात. आता हा अंतर्विरोध तीव्र झाला म्हणजे भांडवलशाहीचा नाश ठेवलेलाच आहे, असा मार्क्सचा सिद्धान्त आहे. असे असताना भांडवलशाहीला आणखी शंभर वर्षे जीवदान कसे मिळाले, मार्क्सने आखून दिलेल्या विनाशाच्या मार्गाने ती का गेली नाही ? उलट तिचा उत्कर्षच का झाला ? असा प्रश्न येतो.
 साम्राज्यशाही, साम्राज्यविस्तार, वसाहतवाद हे त्याचे उत्तर आहे. भांडवलशाहीचा अंत होणारच होता. पण तिने याच सुमारास साम्राज्यवादाचा आश्रय केला. वसाहती जिंकल्या. या वसाहतींतून व जित देशांतून धनाचे ओघ भांडवली देशात येऊ लागले म्हणून कामगारांना भांडवलशहा जरा बरा पगार देऊ शकले. त्यामुळे त्यांचा तीव्र संतापाग्नी जरा शमला आणि आजचे मरण उद्यावर गेले. पण इतकेच. ते टळले असे मात्र नाही. साम्राज्यशाही हे भांडवलशाहीचे परिणत रूप होय असा लेनिनने सिद्धान्त सांगितला आणि त्यामुळेच हे 'डेव्हिएशन', हे वक्रीभवन झाले असा विचार त्याने मांडला. स्टर्नबर्गने भांडवली देशांच्या मार्गच्युतीचे कारण साम्राज्यशाही हेच दिले आहे. पण त्याचे विवेचन जरा निराळे आहे. तो म्हणतो की मार्क्सने विचार मांडला तो शुद्ध भांडवली अर्थसंबंधाचा. इतर सामाजिक घटक त्याने लक्षात घेतलेच नाहीत. तेव्हा जगात प्रत्येक देशात जेव्हा पूर्ण भांडवलशाही परिपक्व होईल तेव्हा त्याचे भविष्य खरे ठरणार. तोपर्यंत नाही. आतापर्यंत वक्रीभवन झाले ते यामुळेच. ज्या परिस्थितीत मार्क्सचे भविष्य खरे ठरावयाचे ती परिस्थिती आलेलीच नाही. त्याला तो काय करणार ?
 मार्क्सचे भविष्य फसण्याचे साम्राज्यशाही हे जे कारण त्याचे अनुयायी देतात ते पाहून मोठा अचंबा वाटतो. मार्क्स ग्रंथ लिहीत असतानाच साम्राज्यशाही विस्तारत होती. इंग्रजांनी हिंदुस्थान जिंकला होता. चीनवर युरोपीयांचे आक्रमण झाले होते. याचा काहीहि उमग मार्क्सला झाला नाही ? चालू अर्थसंबंध पाहून पुढे काय घटना घडणार, युद्धे कोणात होणार, क्रांती प्रथम कोणच्या देशात होणार, हे ज्याला सांगता येते त्याला परिणत होत चाललेली भांडवलशाहीची पुढची अवस्था जी साम्राज्यशाही तिचे रूप जाणता येऊ नये, आणि त्यामुळे त्याचे भविष्य चुकावे हे त्याच्या भविष्यज्ञानाचे द्योतकच ठरते काय ? आणि ज्या ऐतिहासिक जडवादाच्या आधारावर हे सांगावयाचे त्याच्या जनकानेच इतके अज्ञान दर्शविल्यावर त्या जडवादाला अजूनही गणितासारखे सत्यशास्त्रच समजावयाचे काय ? आणि साम्राज्यशाहीचा विस्तार डोळ्याने पाहून लेनिनने जे भविष्य सांगितले त्याचे तरी काय झाले ? पहिले महायुद्ध झाले, दुसरे झाले तरी त्यातून निर्माण होणारी कामगारसत्ता अजून जन्मालाही आलेली नाही. स्टर्नबर्गच्या मते लेनिनला मार्क्सवादाचे व साम्राज्यशाहीचे मर्म कळले नव्हते. स्वकालीन युरोपातील भांडवलशाहीचे सामर्थ्य त्याला मुळीच आकळता आले नाही. कामगार कमालीचे दरिद्री झाले आहेत, स्वतःच्या संतापाग्नीत भांडवलशाहीचा बळी देण्यास ते अगदी सिद्ध आहेत असे त्याला वाटले. हा त्याचा फार मोठा भ्रम होता. त्याला सत्यज्ञान झाले असते तर त्याने रशियात 'ऑक्टोबर क्रांती' केलीच नसती. आणि स्टर्नबर्गच्या मते झाली ती समाजवादी क्रांती मुळीच नाही. पण ते काही असले तरी स्वतः स्टर्नबर्गच्या स्पष्टीकरणात तरी काय अर्थ आहे ? वर सांगितल्याप्रमाणे ती मार्गी झाल्याची कसलीही चिन्हे अजून तरी दिसत नाहीत.
 मार्क्सने वर्तविलेली भविष्ये कोणची, त्यांचे स्वरूप काय, ती कितपत सत्य ठरली आणि त्याचे अनुयायी त्याच्या सत्यासत्यतेचे समर्थन कसे करतात ते येथेवर आपण पाहिले. आता त्याच्या भविष्यकथनाला शास्त्राचे रूप येण्याऐवजी वर दर्शविल्याप्रमाणे पुराणाचे रूप का आले त्याचा विचार करावयाचा आहे.
 ज्या ऐतिहासिक जडवादाच्या आधाराने ही भविष्ये वर्तविली जातात त्यांतच वरील अपयशाचे कारण आपणांस सापडेल. मानवी मन, मानवाची बुद्धी, प्रज्ञा ही केवळ त्याच्या काळच्या अर्थसंबंधामुळेच निश्चित होत असते, मानवी बुद्धी अर्थोत्पादन- साधनांमुळे सर्वस्वी नियंत्रित होत असते हा जो जडवादाचा सिद्धान्त तो अगदी भ्रामक आहे. मानवी मनाची घडण अनेक घटकांमुळे होत असते. अनुवंश, धर्मसंस्कार, राष्ट्रनिष्ठा, शिक्षण, भूगोल, इतर परिस्थिती, समाजाच्या व घराण्याच्या परंपरा, मानवाच्या वासना इ. अनेक कारणांनी तिचे रूप निश्चित होत असते. आणि त्यातही महत्त्वाची गोष्ट अशी की यातील कोणचे कारण कमीजास्त प्रभावी ठरेल हे सांगता येत नाही. कोणचेही ठरेल, कोणचेहि अजिबात कारणरूप होणार नाही, आणि आज धर्मसंस्कार महत्त्वाचे ठरतील तर उद्या काममोह निर्णायक ठरेल. मानवी मन स्वतंत्र आहे म्हणतात ते याच अर्थाने. वरील सर्व घटकांतून ते निर्माण होते हे खरे पण कोणच्या घटकाचे प्रमाण किती, कोणाचा प्रभाव किती आणि कोणच्या वेळी कोणच्या प्रसंगी किती हे काहीही निश्चित सांगता येत नाही. म्हणूनच या सर्व घटकांपलीकडे व्यक्तीचे 'स्व' म्हणून काही निराळे आहे आणि त्याच्या तंत्राप्रमाणे हे घडत असते असे शास्त्रज्ञ सांगतात. मानवी बुद्धी स्वतंत्र आहे याचा अर्थ असा आहे. मार्क्सने हे सर्वच अमान्य केले आहे. मानवी बुद्धी केवळ अर्थसाधनांनी नियंत्रित आहे असे तो म्हणतो. आणि ती सुद्धा इतकी की तिच्यावर याचे केव्हा कोठे व कसे परिणाम होतील हे निश्चित सांगता येते असे त्याच्या ऐतिहासिक जडवादाचे तात्पर्य आहे. अध्यात्मशास्त्रात 'बुद्धिः कर्मानुसारिणी' असे तत्त्व आहे. माणूस मागल्या जन्मीच्या कर्माने बद्ध असतो. त्याचे सर्व भवितव्य त्यामुळे ठरत असते. तो काही निराळे करू म्हणेल पण तशी बुद्धी होणे त्याच्या हातचे नाही. तीही पूर्वकर्मानी बद्ध असते, असे हे तत्त्व आहे. मार्क्सचे जडवादाचे तत्त्व असेच आहे. पूर्वकर्माऐवजी अर्थसंबंध असा शब्द घातला की झाले. म्हणजे मार्क्सने मानवी मनाच्या घडणीत अनुवंश, परंपरा इ. घटकांचा विचार केला नाही. केवळ अर्थसाधनांमुळेच ते नियंत्रित असते असे मानले हे एक आणि ते सर्वस्वी नियंत्रित मानले, त्याची स्वतंत्रता अगदी अमान्य केली हे दुसरे. या गृहीतांवर त्याने आपली भविष्ये उभारली असल्यामुळे ती पूर्ण उभी राहण्याच्या आधीच कोसळू लागली.
 मार्क्सने धर्म, अनुवंश इ. इतर घटनांचा विचार केला नाही, आणि मानवी बुद्धी तो सर्वस्वी परतंत्र मानतो असे कोणी म्हटले तर त्याच्यावर अत्यंत संतापण्याची मार्क्सवादी लोकांची चाल आहे. हा मार्क्समताचा विपर्यास आहे, तुम्हाला मार्क्सवाद कळला नाही, तुम्ही भांडवलशाहीचे हुजरे आहात असे भाषण ते एकदम म्हणू लागतात. (भांडवलशाहीचे हुजरे ही मार्क्सवादातली अत्यंत लाडकी शिवी आहे. प्रत्येक कम्युनिस्टाला ती एकदा तरी म्हणावीच लागते.) पण वस्तुस्थिती तशीच आहे. याविषयी फ्रेडरिक एंगल्सने केलेले विवेचन पुढे देतो. त्यावरून वाचकांना स्वतः निर्णय करता येईल.
 "केवळ आर्थिक स्थिती हीच मानवी भवितव्याची निर्णायक आहे, असा आमच्या प्रतिपादनातून काही लोक जो भावार्थ काढतात त्याला अंशतः आम्हीच (मार्क्स व मी) जबाबदार आहो" असे एंगल्सने एके ठिकाणी म्हटले आहे. (जे. ब्लॉक याला एंगल्सचे पत्र, २१- ९- १८९०) याचे कारण देताना तो म्हणतो, "आर्थिक घटक अमान्य करणाऱ्या प्रतिपक्षीयांना आम्हांला खोडून काढावयाचे होते. त्यामुळे आम्ही त्याच्यावरच भर दिला आणि इतर घटकांचे महत्त्व सांगण्यास आम्हांला वेळ आणि संधी नेहमी मिळेच असे नाही." एंगल्सच्या या म्हणण्याचा कोणालाही विस्मय वाटेल. नवे शास्त्र निर्माण करणारे हे दोन तत्त्ववेत्ते यांना चाळीस वर्षात अर्थेतर घटकांचे महत्त्व वाटत असूनही त्यांचे विवरण करण्यास वेळ मिळाला नाही ! पण त्यांना महत्त्व वाटत नव्हते हेच खरे आहे. याच पत्रात आरंभी परंपरा, अनुवंश, धर्म इ. घटकांचे महत्त्व सांगताना दर वेळी एंगल्स म्हणतो की त्यांचे महत्त्व आहेच, ते नाकारणे हास्यास्पद आहे, पण त्यांना निर्णायक सामर्थ्य नाही. निरनिराळ्या शक्तींमुळे घटना घडतात हे खरे. पण अंतिम फल आर्थिक शक्तीनेच निर्णित व्हावयाचे आणि हे दर वेळी ! अंतिम निर्णय घडविण्याचे सामर्थ्य इतर घटकांना केव्हाही नाही. आता इतर घटक केवळ अलंकाराप्रमाणे होत असा याचा अर्थ नव्हे काय ? पण याहीपेक्षा आणखी एका पत्रात एंगल्सने जे विवरण केले आहे त्यावरून त्याच्या मनातील भाव अगदी स्पष्ट होईल. तो म्हणतो, "धार्मिक, राजकीय, वाङ्मयीन इ. सर्व घटक महत्त्वाचे आहेतच. आर्थिक घटकांवरही त्यांचे परिणाम घडतात. आणि या दृष्टीने मानव स्वतंत्र आहे, तो स्वतःचा इतिहास स्वतःच घडवितो हे खरे; तरी आर्थिक घटक हेच निर्णायक ठरतात. माणसाचे कर्तृत्व त्यांच्या आधीन असते. (असे ते स्वतंत्र आहे !)" हे सांगून एंगल्सने पुढे ऐतिहासिक आवश्यकतेचे विवरण केले आहे. मार्क्सवादाचे मत असे की इतिहासाच्या विशिष्ट आर्थिक परिस्थितीत अर्थसाधनांच्या विकासाची आवश्यकता निर्माण होते. व्यापाराची प्रगती होईनाशी झाली की सर्व सरंजामदार नाहीसे करून टाकून एकछत्री सत्ता स्थापन होण्याची आवश्यकता निर्माण होते. आणि त्या वेळी नेपोलियन किंवा तत्सम पुरुष निर्माण होतोच. भांडवलदारांना गिरणीकारखान्यात पुरेसे मजूर पाहिजेत. पण शेतीवरच्या कुळांना शेती सोडून जाण्याचे स्वातंत्र्य नव्हते. पण भांडवलासाठी मजुरांची आवश्यकता निर्माण होताच व्यक्तिस्वातंत्र्याचा पुकारा करणारा तत्त्ववेत्ता ब्लॉक, नंतर रूसो, नंतर व्होल्टेर हे निर्माण झालेच पाहिजेत. शास्त्रज्ञ, कवी, तत्त्ववेत्ते यांना आपण महापुरुष म्हणतो. पण मार्क्सवादी लोक त्यांना तथाकथित महापुरुष म्हणतात. वाफ, वीज, यंत्र, यांची अर्थविकासाला आवश्यकता निर्माण झाली की त्यांचा शोध लावणारा शास्त्रज्ञ निर्माण झालाच पाहिजे. आणि त्याने तेच कार्य केले पाहिजे; दुसरे त्याच्या हातून होणार नाही. असेच कवी, धर्मवेत्ता, तत्त्ववेत्ता यांचे आहे. अर्थसाधनांच्या प्रगतीला शिवाजी, रामदास, क्रॉमवेल, विवेकानंद, कार्ल मार्क्स, लेनिन यांची गरज लागली की ते जन्म घेतात आणि जरूर तेच कार्य करण्याची, तत्त्वज्ञान सांगण्याची बुद्धी त्यांना होते. इतर होणार नाही. नेपोलियनचे उदाहरण सांगून एंगल्स म्हणतो की, एखादे वेळी असा नेपोलियन जन्माला येऊनही काही अपघाताने तो मरेल हे शक्य आहे. पण तो मेला तर दुसरा निश्चित निर्माण होईल व इतिहासनियत कार्य करून जाईल. इतिहासात प्रत्येक वेळी असा मनुष्य निर्माण झाला आहे असे दिसते. (एंगल्सचे स्टार्कनबर्ग यास पत्र : २५-१-१८९४).
 मार्क्सवाद अर्थेतर घटकांचा विचार किती करतो, त्यांना महत्त्व किती देतो आणि पुरुषबुद्धीला त्याच्या मते किती स्वातंत्र्य आहे हे यावरून कळून येईल आणि मार्क्सवाद स्वतःला जडवादी म्हणवीत असला तरी तो पूर्ण अध्यात्मवादी आहे असे अनेक टीकाकार का म्हणतात तेही कळून येईल. भूमीला दुष्टांचा भार झाला म्हणजे परमात्मा अवतार घेतो असे म्हणणारे गोपाळभट वा गोविंदभट आणि अर्थविकास अडून राहताच तो पुढे चालू करून देणारा शास्त्रज्ञ वा तत्त्ववेत्ता निर्माण होतोच असे म्हणणारे मार्क्सभट वा एंगल्सभट यांच्यात कसलाही फरक नाही. अर्थविकास अडून राहिला आहे हे जाणणे व त्यावर उपाय योजून शास्त्रज्ञ वा तत्त्ववेत्ता जन्माला आणणे हे मानवेतर दैवी चित्- शक्तीचे कार्य आहे; ती चित्-शक्ती न मानणे म्हणजे जडवाद. पण ती नाही तर हे कार्य कसे होते या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. 'ऐतिहासिक आवश्यकता- हिस्टॉरिकल नेसेसिटी- हे मार्क्सचे उत्तर आहे. याचा अर्थ इतकाच की त्याने परमेश्वराचे नाव बदलले आहे. कोणी सत्य म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात; कोणी हिस्टॉरिकल नेसेसिटी म्हणतात. पण भटजीपणात यामुळे फरक होत नाही. एंगल्सच्या इतिहासवाचनातही तोच भटजीपणा, तीच पुराणवृत्ती दिसून येते. आवश्यकता निर्माण झाली की योग्य तो पुरुष अवतरतोच असे इतिहासाने सिद्ध होते असे तो म्हणतो ! कोणचा इतिहास त्याने वाचला होता ? स्पेन व पोलंड या देशांत १४ व्या १५ व्या शतकांत इंग्लंडसारखी प्रगती दिसूं लागली होती. पण अंध धर्मकल्पनांच्या वर्चस्वामुळे ते देश चारशे वर्षे कुजत पडले. त्या वेळी अर्थविकासाची, औद्योगिक क्रांती होण्याची तेथे आवश्यकता नव्हती काय ? १८५४ च्या आधी शेकडो कवाडे बंद करून जपान स्वस्थ पडला होता. त्या काळात यादवी चाल वर्षे होती. अर्थव्यवस्था कुजून गेली होती. तेथे विकासाची आवश्यकता नव्हती काय ? महाराष्ट्र, बंगाल, गुजराथ इ. हिंदुस्थानातील प्रांतांची इंग्रज येण्यापूर्वी सहाशेसातशे वर्षे अर्थव्यवस्था काय होती ? कृषी, वाणिज्य कोणच्या हीन स्थितीला गेले होते ? अर्थसंबंधाचा विकास करणारे पुरुष तेथे का निर्माण झाले नाहीत ? महाराष्ट्रांत स्वराज्य आले तरी व्यापार वाढला नाही. कृषिसुधारणा झाली नाही. त्या वेळी ऐतिहासिक आवश्यकता काय करीत होती ?
 अशी शेकडो उदाहरणे देता येतील. पण आपल्याला अनुकूल तेवढाच इतिहास वाचण्याची मार्क्सवाद्यांची पद्धत आहे. त्यांना त्यांचा काय उपयोग ? आपल्याकडच्या समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, पुलकेशी, हर्ष यांच्या एकछत्री साम्राज्याची मीमांसा करताना इकडील कम्यनिस्ट भटजी म्हणतात, "राजन्य वर्ग आपसात सारखा लढत राहिल्यामुळे कृषी, शिल्प, वाणिज्य इ. व्यवसायांना भरभराट येत नव्हती. एकछत्री साम्राज्याची त्याकरिता आवश्यकता उत्पन्न झाली." ही खरोखर आसुरी मीमांसा आहे ! कृषी, वाणिज्य यांची भरभराट न झाली तरी चालेल असा एखादा कालखंड असतो काय ? एकछत्री साम्राज्य नसले की सरदार, सरंजाम तर नित्य लढत राहणारच. त्यामुळे शेती, व्यापार यांचा ऱ्हास होणारच. तेव्हा त्यांच्या भरभराटीसाठी एकछत्री साम्राज्य नेहमीच अवश्य आहे. पण या कम्युनिस्ट भटजीबोवांच्या मते विशिष्ट कालीच ती आवश्यकता निर्माण होते. म्हणजे शेती, व्यापार यांचे वाटोळे झाले तरी चालेल असा कालखंड ते मनाने कल्पू शकतात. याच त्यांच्या वृत्तीला अनुसरून सिडने हूक याने, ही भयानक राक्षसी वृत्ती आहे, असे म्हटले आहे. आणि इतका दुष्टपणाचा आरोप ज्यांना करावासा वाटत नाही ते टीकाकार त्यांना आध्यात्मिक वृत्तीचे, अंधश्रद्ध किंवा भटजीबोवा म्हणतात. मॅक्स ईस्टमन हा अमेरिकन टीकाकार हेच म्हणाला: "जगाच्या विकासाची आपल्या मनातली योजना ही विश्वरचनेतच अंतर्भूत आहे आणि सृष्टीचे गूढ नियम हे आपण मानलेल्या ध्येयाच्या सिद्धतेसाठी प्रयत्नशील झाले आहेत असे मानणे हे भोळ्या धर्मश्रद्धेचे लक्षण होय."
 माणूस पूर्वकर्माने बद्ध असतो असे अध्यात्मवादी लोक मानतात. पण त्यांनीही माणूस त्रिगुणांच्या पलीकडे गेला म्हणजे कर्मबंध तुटून पडतात असे मानले आहे. म्हणजे काही दृष्टींनी तरी मानव स्वतंत्र आहे. मार्क्सने तेही स्वातंत्र्य मानवाला दिलेले नाही. अर्थसाधनांनी मागणी केली की त्याने जन्माला आलेच पाहिजे व नियत कार्य केलेच पाहिजे. मध्येच तो मेला तर दुसरा निर्माण होईल असे मार्क्सवादी म्हणतात. त्यावरून निदान मरण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे असे दिसते. आवश्यकता निर्माण होताच माणूस निर्माण होतो म्हणून महापुरुष हा केवळ तथाकथित नाममात्र महापुरुष होय असे मार्क्सचे मत होते आणि त्याच्या शास्त्रीय समाजवादातील सर्व अशास्त्रीयता यातच आहे. महापुरुष असा हुकमी निर्माण झाला असता तर जगाला आणखी काय हवे होते ? शिवछत्रपती महाराष्ट्रांत निर्माण झाले त्याच्याआधी शेकडो वर्षे बंगाल, पंजाब, सिंध येथे त्यांची आवश्यकता होती. पण ते अवतरले नाहीत. वायक्लिफ, लूथर, गॅलिलिओ, न्यूटन, बेकन, जॉन हस, लॉक, रूसो यांच्यासारखे पुरुष भारतात निर्माण झाले असते तर धर्मस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, विज्ञान, लोकसत्ता ही तत्त्वे येथे उदयास येऊन ही भूमि बलाढ्य झाली असती. येथल्या अर्थसाधनांच्या विकासाला त्यांची निश्चित आवश्यकता होती. आठव्या शतकात आरबांनी स्पेन जिंकला आणि त्याच वेळी फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड इकडे त्यांनी मोहरा वळविला होता, पण चार्ल्स मार्टलने त्यांचा पराभव करून त्यांच्या आक्रमणास कायमचा पायबंद घातला. हे टळले ते चार्ल्स मार्टलमुळे; तो नसता तर पश्चिम युरोप आज रूमानिया, बल्गेरिया, इजिप्त, यांच्यासारखाच झाला असता. स्पेन तसा झालाच. मार्टलची फ्रान्स, जर्मनीतच आवश्यकता होती आणि या इतर देशांत नव्हती काय ? पण तो झाला नाही; आणि महापुरुष असे हुकमी निर्माण होतच नाहीत. म्हणून तर मानवाचे भवितव्य सर्व अनिश्चित आहे, अज्ञात आहे. मार्क्सवादाला नेमके हेच कळत नाही.
 मार्क्सची भविष्यकल्पना काय आहे, त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी कोणची भविष्ये सांगितली, ती कितपत खरी ठरली, त्याची त्याच्या अनुयायांत पुढील काळात काय प्रतिक्रिया झाली हे सांगून मार्क्सचा भविष्यविचार शास्त्र न ठरता पुराण का ठरला याची येथवर चिकित्सा केली. आता युरोपातल्या दोन थोर पंडितांची या विषयावरची मते सांगून समारोप करतो. 'फ्रीडम् अँड ऑर्गनायझेशन' हा रसेल याचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. १८१४ ते १९१४ या शतकातील युरोपीय इतिहासाची त्यात मीमांसा केली आहे. त्याच्या प्रस्तावनेत रसेल म्हणतो, 'या शतकात जी अनेक स्थित्यंतरे झाली त्यांच्या बुडाशी माझ्या मते तीन कारणे आहेत. आर्थिक यंत्रणा, राजकीय तत्त्वज्ञान (राष्ट्रवाद, राजनिष्ठा, समाजवाद इ०) आणि थोर प्रभावी पुरुष. यांतील एकही कारण दुर्लक्षून चालणार नाही. तीनही स्वतंत्र आहेत. एकामुळे दुसरे उद्भवले असे कोणाच्याही बाबतीत म्हणता येणार नाही. व्यक्तीला जे महत्त्व त्याचा कार्लाइलने अतिरेक केला. पण आता आपण दुसऱ्या टोकाला जात आहो. माझ्या मते बिस्मार्क नसता तर जर्मनीचा इतिहास बदलला असता. आणि हेच इतर पुरुषांविषयी. याचा अर्थ असा की इतिहास हे शास्त्र नाही. ज्यांचा तसा आग्रह आहे त्यांना सत्यापलाप करावा लागतो आणि प्रतिकूल प्रमाणे गाळून टाकावी लागतात--' एच्. ए. एल्. फिशर हा एक फार मोठा इतिहासपंडित आहे. 'युरोपचा इतिहास' या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्याने हाच भावार्थ व्यक्त केला आहे. तो म्हणतो, "मी निओलिथिक युगापासून स्टॅलिन- हिटलर- पर्यंत इतिहास दिला आहे. त्यात अनेक स्थित्यंतरे, उलथापालथी यांचे वर्णन आहे. पण एक बौद्धिक दृष्टी दुर्दैवाने मला प्राप्त झालेली नाही. माझ्यापेक्षा जास्त विद्वान् व प्रज्ञावंत पुरुषांना इतिहासात काही सूत्रबद्धता, काही योजना दिसते. पण या सुसंगतीचा अवगम मला झालेला नाही. सागरावर लाटांमागून लाटा येतात. तशा इतिहासात एकामागून एक घटना घडतात. सर्वाना बांधील असा नियम, असा साधारण सिद्धान्त त्यांत दिसत नाही. मानवाच्या भवितव्याचा विचार करताना अनाकलनीय, आकस्मिक, योगायोगवश असे काही गृहीत धरलेच पाहिजे. मानवाची प्रगती झालीच नाही असे मी म्हणत नाही. पण तो इतिहासाचा नियम नाही."
 मानवी इतिहासाचे शास्त्र का होऊ शकत नाही हे यावरून ध्यानात येईल. मानवी मन, त्याची बुद्धी, प्रज्ञा, त्याच्या वासना, यांचे पुरेसे ज्ञान अजून आपल्याला प्राप्त झालेले नाही. आणि जो जो अभ्यास वाढत आहे तो तो हे मन जास्तच गूढ व अनाकलनीय होत चालले आहे. मानवाचे शरीरव्यापारही अजून अज्ञात आहेत आणि एकंदर मानवच अज्ञात आहे असे अलेक्सिस कॅरेलसारखे नोबेल प्राइझ मिळविणारे आयुर्विद्याविशारदही म्हणत आहेत. जडसृष्टीच्या शास्त्रांची निश्चितता सुद्धा गेल्या शतकात होती तितकी आता राहिलेली नाही असे सुलिव्हान ('लिमिटेशन्स् ऑफ सायन्स' या ग्रंथाचे लेखक) सारखे पंडित सांगत आहेत. अशा स्थितीत मानवाच्या घडा- मोडीचे ग्रहज्योतिषाइतके सुनिश्चित शास्त्र कोणी करू पाहील तर त्याला अनेक प्रतिकूल घटना गाळाव्या लागतील, अनेक घटनांचा विपर्यास करावा लागेल, अनेक ठिकाणी असत्याचा आश्रय करावा लागेल. मार्क्सवादाने तसे केले आहे. म्हणूनच ऐतिहासिक जडवाद हे त्याचे शास्त्र ग्रहज्योतिष न होता फलज्योतिष झाले, भविष्यशास्त्र न होता भविष्यपुराण झाले.