वैय्यक्तिक व सामाजिक/आपल्या लोकशाहीवरील नवे संकट
या वर्षाच्या आरंभी लोकसभापती श्री. आयंगार यांचे चित्तूर येथे वकिलांच्या पुढे भाषण झाले. ते म्हणाले, "सध्या देशात गुंडगिरी, मवाली वृत्ती फार वाढत चालली आहे. तिला नियंत्रण घालावे म्हणून पुष्कळ कायदे केलेले आहेत पण त्यांचा काही उपयोग नाही. कारण कायदा आपले काही करू शकणार नाही ही गुंडांची खात्री आहे. असे का असावे याचेही कारण उघड आहे. आपली अंमलबजावणीची यंत्रणा भ्रष्ट झाली आहे. गुन्हेगार पकडून त्याच्यावर फिर्याद केली की ती काढून घ्यावी म्हणून दडपण येते. धमक्याही येतात. पुष्कळ वेळा फिर्याद नोंदण्याच्या आधीच धमक्या येतात. गुन्हेगारांना हे कळते कसे ? अर्थात् त्यांना पोलिसांचा पाठिंबा असतो. या सर्व प्रकारामुळे कायदा पाळणारे नागरिक निराश होतात." हे सर्व सांगून वकिलांनी गुंडांची बाजू घेऊ नये असा सभापतींनी त्यांना उपदेश केला.
मलबार- फेरोक या विभागात गुन्हेगारी वाढत आहे अशी तक्रार करून अर्थमंत्री सुब्रह्मण्यम् यांनी राजकीय पक्षांचा या गुन्हेगारीमागे हात असतो, राजकीय पक्ष गुंडांना पोशीत असतात असे सभागृहात सांगितले. ग्रामीण विभागात तर आपली उद्दिष्टे साधण्यासाठी गुंडांचा सर्रहा वापर केला जातो असे त्यांचे म्हणणे आहे : (सकाळ, ऑगस्ट १९५५)
बेळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवनगौडा पाटील यांनी मुंबईच्या मुख्य मंत्र्यांना पत्र पाठवून प्रार्थना केली की, कायद्यात त्वरेने दुरुस्ती करा. सध्या या भागात खुनी व दरवडेखोर यांनी धुमाकूळ घातला आहे. आणि वातावरण असे दहशतीचे आहे की पोलिसांना पुरावा जमविणे अशक्य आहे. (सकाळ, फेब्रुवारी १९५४)
बनारसच्या हिंदु विद्यापीठाविषयी मुदलियार कमिटीने राष्ट्रपतींना सादर केलेला अहवाल प्रसिद्धच आहे. वर्षानुवर्षे तेथील अधिकारी खोटे हिशेब, पैशाचा अपहार, सग्यासोयऱ्यांच्या नेमणुका, परीक्षेतील वशिलेबाजी इ. पापे बिनदिक्कत आचरीत आहेत. या गुन्हेगारीत तेथील प्राध्यापक, विद्यार्थी व इतर अधिकारी सर्व सारखेच सामील आहेत. डॉ. राधाकृष्णन्, अमरनाथ यांसारख्या थोर पुरुषांना तेथे सुधारणा तर करता आली नाहीच उलट त्यांनाच तेथून काढता पाय घ्यावा लागला.
आपल्याला स्वातंत्र्य मिळून आता ११ वर्षे पुरी झाली. एवढ्या अवधीत शील, चारित्र्य, सत्यनिष्ठा, यांची किती प्रगती झाली हे आपण पाहू लागलो तर मन कळंजून जाते. जिकडे पहावे तिकडे गुन्हेगारी, मवालीगिरी, गुंडगिरी, भ्रष्टता, अपहार, वशिलेबाजी, दरवडे, रक्तपात, खून! आणि यातून अमुक एक प्रदेश, अमुक वर्ग वा जाती वा समाज वा क्षेत्र मुक्त आहे असे नाही. सरकारच्या कोणत्याही खात्याविषयीचा ऑडिटरचा अहवाल पाहिला तर हेच दिसून येईल. अपहार, खोटे हिशेब, अफरातफर ! संरक्षण खात्याच्या एका अहवालात ३ कोटी १८ लक्ष रुपयांची रोकड नाहीशी झाली असा शेरा दिलेला आहे. प्रदेश काँग्रेस कमिट्यांच्या हिशोबाच्या वार्ता येणेप्रमाणेच आहेत. हिशेबाच्या वह्यांत हिशेबनीस शिरला की खंडीभर घाण बाहेर येतेच. मग अध्यक्ष पळून जातात. नंतर वरचे अधिकारी येऊन सारवासारव करून प्रकरणे मिटवून टाकतात. सर्वोदय केंद्रांना सरकारने दिलेल्या देणग्यांचे काय होते त्याची कथा आचार्य विनोबांना लोकांनी सांगितली ती प्रसिद्धच आहे. विमा कंपन्यांचा कारभार भ्रष्ट होऊ लागला म्हणून सरकारने त्यांचे राष्ट्रियीकरण केले. त्याबरोबर त्यातून मुंदडा प्रकरणे उत्पन्न होऊ लागली. केरळ विषबाधा प्रकरण ताजेच आहे. भाडे कमी पडावे म्हणून जालीम विषाच्या पेट्यांवर कंपनीने निराळीच नावे लिहिली. आणि त्यामुळे दीडदोनशे माणसाचे बळी पडले. आपल्या इस्पितळांची वर्णने याच मासल्याची आहेत. रोग्यांसाठी घेतलेली औषधे, उपकरणे त्यांच्यापर्यंत पोचतच नाहीत. मधल्यामधेच ती नाहीशी होतात. आणि परत बाजारात येतात. धरण बांधण्याच्या योजना सरकारी आहेत. तेथेही हीच तऱ्हा. तेथील अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलेले सीमेंट, लोखंडी सामान, चुना इ. सामग्री धरणापर्यंत पोचत नाही. भाक्रा-नानगलवरील अठ्ठावीस इंजिनियरांना यासाठी अटक झाल्याचे वृत्त मागे आलेच होते.
आणि यावर कळस म्हणजे सर्वांचे लाडके असलेले, देशाचे आधारस्तंभ म्हणून गणलेले शाळा-कॉलेजांतील विद्यार्थी. पेपर जरा अवघड वाटताच हे उठून धावत व्हाइस चॅन्सेलरच्या बंगल्यावर जाऊन निदर्शने करतात. परीक्षेत नापास केल्याबद्दल शिक्षकांना मारहाण करतात. शाळेची मोडतोड करतात; खेळाच्या मैदानावर, संमेलनाच्या समारंभात शिक्षक, मुख्याध्यापक, यांपैकी कोणाचीही मुर्वत न राखता बेफाम होऊन मारामाऱ्या करतात. मुलींच्या डब्यात बसणें, त्यांच्या वसतिगृहात शिरणे, केवळ बायकांच्यासाठी असलेल्या समारंभात घुसणे, हा ते आपला जन्मसिद्ध हक्कच समजतात. दिल्ली, लखनौ, कलकत्ता, औरंगाबाद, मद्रास, सांगली, अर्नाकुलम, सर्व ठिकाणांहून याच वार्ता येत आहेत. हे आता नित्याचे झाले आहे.
विद्यार्थ्यांचे अत्याचार म्हणजे सर्वांवर कळस आहे असे वर म्हटले खरे पण अजून याहीपलीकडे एक दुःखद घटना आहे. महात्माजींच्या सहवासात ज्यांनी हयात घालविली, पंडितजींच्या सान्निध्यात जे अनेक वर्षे होते अशा सज्जनांनी कोटीकोटीची जिंदगी केल्याचे उघडकीस येऊ लागले आहे.
हे सर्व पाहून आभाळ फाटल्यासारखे वाटते. आणि आपल्या समाजाचे पुढे काय होणार याची दारुण चिंता मनाला ग्रासून टाकते.
याविषयीची चिंता समाजातले थोर थोर पंडित करीतच आहेत. गुन्हेगारीला मनुष्य का प्रवृत्त होतो, त्याच्या ठायी पापप्रवृत्ती कशामुळे निर्माण होते याची समाजशास्त्रज्ञ आज मोठ्या गंभीरपणे चिकित्सा करीत आहेत. पाश्चात्य देशांत तर अक्षरश: हजारो पंडित याचा अभ्यास करीत आहेत आणि नित्य नव्या उपपत्ती मांडीत आहेत. या सर्वांत प्रभावी ठरलेली एक उपपत्ती अशी आहे की गुन्हेगार हा मूलतःच जन्मतःच दुष्ट प्रवृत्तीचा, अधोगामी असतो हे मत चुकीचे असून त्याची तशी प्रवृत्ती होण्यास परिस्थिती ही कारण असते. मनुष्य परिस्थितीमुळे गुन्हा करण्यास प्रवृत्त होतो. दारिद्र्यामुळे, अन्नान्नदशा झाल्यामुळे, इतर वासना अतृप्त राहिल्यामुळे, कामक्रोधावरील संयम सुटल्यामुळे त्याच्या हातून गुन्हा घडतो. जन्मतः तो अधम असतो असे नाही. किंवा एकदा गुन्हा केल्यावर तो कायम बदमाषच राहील असे नाही. यासाठी त्याला बरी परिस्थिती निर्माण करून द्यावी, ज्या उणीवेमुळे, ज्या भुकेच्या अतृप्तीमुळे तो वाममार्गी झाला असेल ती भूक शमवावी म्हणजे पापी मनुष्य पुन्हा सज्जन होईल व भला नागरिक होईल, असे नवे शास्त्र आहे. डॉ. सिगमंड फ्रॉइड, जुंग, अडलर या मानसशास्त्रज्ञांच्या सिद्धान्तांच्या आधारे पाश्चात्त्य पंडितांनी ते तयार केले आहे. याविषयी विवेचन करताना हे पंडित असे सांगतात की पापकर्मी मनुष्याला गुन्हेगार न समजता रोगी समजावे, त्याला तुरुंगात न धाडता डॉक्टरकडे धाडावे; विशेषतः मानसोपचारी डॉक्टरकडे धाडावे. अर्थवादी पंडित थोडी निराळी उपपत्ती मांडतात. पण ते परिस्थितीवादीच असतात. दारिद्र्य, उपासमार, भूक ही सर्व पापकृत्यांच्या बुडाशी आहे आणि मनुष्याच्या गरजा तृप्त करण्याची व्यवस्था समाजाने केली की गुन्हेगारी कमी होईल, नष्ट होईल, अशी ते ग्वाही देतात.
हा सर्व विचार डोळ्यापुढे आला की मनुष्याच्या गुन्हेगार प्रवृत्तीचा फेरविचार करणे अवश्य आहे असे वाटते. तसे न करता नवे तत्त्वज्ञान आपण स्वीकारले तर आपल्या समाजात लवकरच प्रलयकालाची चिन्हे दिसू लागतील अशी भीती वाटते. परिस्थितीमुळे मनुष्य गुन्हेगार होतो म्हणजे काय ? माणूस दरिद्री असला, घरात खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही अशी त्याची स्थिती असली तर त्यामुळे तो पापवृत्त होईल हे समजू शकते. पण प्रारंभी जी दुष्कृत्ये सांगितली ती तशा प्रकारची आहेत काय ? अन्नवस्त्रादि प्राथमिक गरजा भागल्या की मनुष्य गुन्हेगारीकडे वळणार नाही असे वरील हकीकतीवरून दिसते काय ? पाचशे रुपये पगार असलेले इंजिनियर, डॉक्टर, प्राध्यापक यांच्या कोणच्या प्राथमिक वासना अतृप्त राहिल्या होत्या ? लाखांनी पैसे मिळविणारे कारखानदार, भांडवलदार, पेढीवाले, व्यापारी यांच्या पापकर्माची जबाबदारी कोणच्या परिस्थितीवर टाकता येईल ? राज्यसरकारची जी मंत्रिमंडळे आहेत त्यांत प्रत्येक प्रदेशात दुफळी झालेली आहे. आणि भांडणे तत्त्वासाठी नसून सत्तालोभ, धनलोभ यांतूनच उद्भवलेली आहेत. ती इतकी विकोपाला गेलेली आहेत की काँग्रेसचे अध्यक्ष ढेबरभाई यांनी ही संघटनाच मोडून टाकावी असे वैतागाने अनेक वेळा उद्गार काढले आहेत. या मंत्र्यांच्या कोणत्या प्राथमिक वासना अतृप्त राहिल्या आहेत ? डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, कारखानदार, भांडवलदार, पेढीवाले, व्यापारी, काँग्रेसचे मंत्री व काँग्रेस कमिट्यांचे अध्यक्ष व इतर सरकारी अधिकारी हे स्वार्थ, लोभ यांमुळेच पापे करतात यांत शंका नाही. त्यांच्या दुष्कृत्यांच्या बुडाशी वासनाच आहेत. पण हेही सर्व परिस्थितीमुळेच होते असे म्हणावयाचे काय ?
आपल्याकडच्या या सभ्य जनांच्या कहाणीपेक्षा अमेरिकेतील सभ्य जनांची कहाणी फार भयंकर आहे. ती आपल्याला उद्बोधक होईल म्हणून तिचा थोडा परामर्श घेऊ.
अमेरिका हा देश किती श्रीमंत आहे त्याची साधारण कल्पना आपल्याकडे सर्वांना आहेच. तेथली वर्णने वाचून स्वर्ग, कुबेरनगरी या पुराणांतल्या कल्पना साकार झाल्या आहेत असे वाटते. भारताच्या केंद्रसरकारचा अर्थसंकल्प ५०० कोटींचा असतो. त्यात प्रदेश सरकारचे संकल्प मिळवले तर हे १५०० कोटींपर्यंत जाईल. म्हणजे आमचा राष्ट्रीय अर्थसंकल्प १५०० कोटींचा होतो. अमेरिकेत दरसाल १६०० कोटींच्या सिगरेटस् खपतात. या आंकड्यांवरून आपल्याला बराच अदमास लागेल. हे जे अपार अनंत धन तेथे आहे त्याची वाटणी पूर्वी अत्यंत विषम होती. पण गेल्या वीस वर्षांत आता तीही तक्रार फारशी राहिलेली नाही. अन्नवस्त्राची ददात तेथे आता कोणालाच नाही. मनुष्य बेकार असला तरी त्याच्या कुटुंबाच्या पोषणाचा भार कायद्यानेच सरकारवर असतो. सामान्य मजुरांनाही तेथे महिन्याला ६००-७०० रु. पगार असतो. त्यामुळे अन्नवस्त्राची प्राथमिक भूक भागत नाही असा तेथे कोणीच नाही. कामवासनेच्या बाबतींत तर आपल्या तुलनेने तेथे निर्बंधच नाहीत असे म्हणावे लागेल. १६-१७ व्या वयापासूनच तरुण- तरुणींना तेथे परस्परांचा निकट सहवास आणि स्पर्शसुख लाभू शकते. स्त्रीच्या जीवनाचा संपूर्ण विकास होण्यास तेथे पूर्ण अवसर आहे. नाचणे, गाणे, खेळणे, अर्थार्जन करणे, स्वतंत्र विचार करणे, पति निवडणे, विद्या- कला यांत प्रगती करून घेणे या सर्व दृष्टींनी तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे. कोणच्याही बाबतीत वासना दडपून काही गंड तयार व्हावे अशी स्थिती तेथे नाही. कामगार, शेतकरी हा कष्टकरी वर्ग. त्याच्या वासना सर्वत्र अतृप्त असतात. पण अमेरिकेत ही गोष्ट इतिहासजमा झाली आहे. त्यांना आर्थिक सुस्थिती तर मिळतेच पण सामाजिक प्रतिष्ठा, सत्ता या त्यांच्या तृष्णाही आता तृप्त होत आहेत. चित्रपट, रेडिओ, टेलीव्हिजन यांमुळे अत्यंत श्रेष्ठ मनोरंजनही सर्वाना सुलभ झाले आहे.
अशा या अमेरिकेत आतापर्यंत जगाच्या कोणच्याच देशात नसेल इतके गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पंचवीस-तीस वर्षांतील अमेरिकेतील गुन्हेगारीचा इतिहास वाचून जगाच्या प्रगतीबद्दलची आशा जळून खाक होते. अमेरिकेतल्या या गुन्हेगारीला 'व्हाइट कॉलर क्राइम' असे तेथील शास्त्रज्ञ संबोधितात. याचा अर्थ असा की दारिद्र्य, अतृप्ती, मनोविकृति यांमुळे हे गुन्हे घडलेले नसून सभ्य, प्रतिष्ठित, सज्जन गणलेल्या लोकांचीच ही कृत्ये आहेत. या गुन्हेगारीचे पहिले विपरीत लक्षण म्हणजे ती सर्व संघटित गुन्हेगारी आहे. व्यापार, कारखानदारी, वाहतूक यांसाठी जशा कंपन्या, कॉर्पोरेशनस्, सिंडिकेट्स् स्थापलेली असतात तशीच ही 'क्राइम सिंडिकेट्स्' असतात. चेअरमन, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ही सर्व व्यवस्था त्यांच्यातही असते. आणि न्यूयॉर्क, शिकॅगो, वॉशिंग्टन या शहरात ज्या भागात मोठेमोठे भांडवलदार, पेढीवाले, व्यापारी, कारखानदार यांच्या कचेऱ्या असतात त्याच भागात, त्यांच्या शेजारीच या प्रतिष्ठित ठग-पेंढाऱ्यांच्याही कचेऱ्या असतात. आता गुन्हेगारी ही दरिद्री वस्तीत, लहान बोळात किंवा गावाबाहेरच्या हीन वस्तीत राहात नाही. ती राजवाड्याजवळच्या प्रासादांत राहते. 'रॅकेटिअरिंग' हा शब्द या संबंधांत नेहमी वापरला जातो. हा उद्योग पुढीलप्रमाणे चालतो. हे ठगांचे संघ क्रमाने एकेका व्यवसायाकडे लक्ष पुरवितात. कोणातरी प्रतिष्ठित, श्रीमंत कापडवाल्याच्या दुकानात यांचे प्रतिनिधी जातील आणि 'तुमचे संरक्षण आम्ही करू, दरमहा ५०० डॉलर देत चला अशी प्रथम सूचना करतील. शेटजींना प्रथम काहीच कल्पना नसल्यामुळे ते साहजिकच मागणी नाकारतात. पण पुढील दहा-पंधरा दिवसांत 'संरक्षण' घेणे आवश्यक आहे हे त्याच्या ध्यानात येते. त्याच्या गुदामाला आग लागते, मोटारीला अपघात होतो, कापडाचे ट्रक नाहीसे होऊ लागतात. पाहून घाबरून जाऊन ते महिना ५०० डॉलर्स चालू करतात. नंतर थोड्याच दिवसांत बहुसंख्य कापडवाले असे संरक्षण घेतात. मग ही संक्रांत इतर धंद्यांकडे वळते. बँकांवर दरोडे ही अमेरिकन जीवनातील नित्याची बाब झाली आहे. दरमाल सुमारे १२० कोटी रुपयांपर्यंत यातून लूट होत असते. मोटारीच्या चोऱ्या हीही दैनंदिन गोष्टच आहे. या धंद्यातील संघटना इतकी कार्यक्षम आहे की मोटार चोरल्यापासून एक-दोन दिवसांच्या आत तिचे सुटे भाग निरनिराळ्या दहा शहरांत पोचविले जातात. आणि त्यातून नव्या मोटारी तयार होऊन विकल्या जातात. अमेरिकेत १९४९ साली १६ लक्ष ८६ हजार गुन्हे झाले. दर १८ सेकंदाला एक असे हे साधारण प्रमाण आहे. दर दिवशी ३६ खून, १५० दरोडे, व २५५ बलात्कार झाले. आणि हे प्रमाण उत्तरोत्तर वाढतच आहे असे त्या क्षेत्रातले शास्त्रज्ञ सांगतात. अमेरिकेत सर्वत्र दहशतीचे वातावरण होऊन बसले आहे, असे आजचे तज्ज्ञ सांगत आहेत.
आपल्याला असे वाटते की यांना आळा घालण्याचा काहीच प्रयत्न होत नाही काय ? अमेरिकेतील दक्ष, कार्यक्षम, जनसेवातत्पर पोलीस काय करीत आहेत ? तेथे कायद्याचे राज्य आहे की नाही ? याचे उत्तरही शास्त्रज्ञांनी दिले आहे. वाचकांनी त्याचे नीट मनन करावे. म्हणजे भारताच्या भवितव्यात काय वाढून ठेविले आहे त्याची त्यांना कल्पना येईल. (वर दिलेली, व पुढे येणारी माहिती हॅलरी एल्मर वार्नेस यांच्या 'सोसायटी इन् ट्रॅन्झिशन' या ग्रंथांतून घेतलेली आहे. दुसरी आवृत्ती १९५२- न्यूयॉर्क. या विषयावरचा हा फार मोठा ग्रंथ असून शेकडो समाजशास्त्रज्ञांच्या ग्रंथांचे संदर्भ व त्यांतील उतारे लेखकाने दिले आहेत. याच्या जोडीला 'ब्रास चेक' हा अप्टन सिंक्लेअर या जगविख्यात कादंबरीकाराचा ग्रंथही पहावा.)
गुन्हेगारी भयानक स्वरूपात व तितक्याच भयानक वेगाने सारखी पसरत असताना, अब्जावधी डॉलरांची लूट व त्यापायी शेकडो खून दरसाल पडत असताना अमेरिकनांसारखे प्रगत व कार्यक्षम लोक या प्रकाराला आळा का घालू शकत नाहीत यांचे उत्तर बार्नेस याने पुढीलप्रमाणे दिले आहे. पहिली गोष्ट अशी– ज्यांनी या अधम कृत्यांना आळा घालायचा त्यांचे चारित्र्य अगदी निष्कलंक असले पाहिजे. ते स्वतः निःस्वार्थी, त्यागी व धैर्यशील असणे अवश्य आहे. असे दहावीस लोक एकत्र जमून त्यांनी या उद्योगाला प्रारंभ केलाच तर त्यांना काय अनुभव येईल ? बार्नेस म्हणतो, हे लोक गुन्ह्याची वार्ता कळताच प्रथम पोलीसाकडे जातात. पण पोलीस हे या सभ्य पेंढाऱ्यांच्या पैशाने बांधलेले असतात. त्यांना दरमहा पगार चालू असतो. त्यातूनही एखादा लहान पोलीस अधिकारी कामाला लागलाच तर वरिष्ठ अधिकारी ताबडतोब त्याची बदली करतात किंवा त्याला बडतर्फ करतात. जेम्स हा ठगांचा बादशहा होता. त्याला पोलिसांनी एकदा पकडले व त्याच्यावर खटला भरला. त्या वेळी काही पोलिसांनी प्रामाणिकपणे काम केले. तेव्हा ठगमंडळाने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रारी करून त्यांच्या भराभर बदल्या करून घेतल्या. हे पोलिसांचे झाले. तेथे निराश होऊन आपला पापनिर्दालनसंघ पब्लिक प्रॉसीक्यूटरकडे जाईल. त्याचीही तीच स्थिती असते. त्याला ठग- पेंढाऱ्यांकडून पगार चालू असतो. किंवा पुष्कळ वेळा तोच त्यांच्या कंपनीत असतो. थॉमस ई. ड्यूईसारखा निःस्पृह प्रॉसीक्यूटर एकतर विरळा असतो, आणि तो काही धाडस करील अशी शंका येताच त्याला बढती देऊन वाटेतून दूर करण्यात येते. पूर्वी दरोडा घातल्यावर पोलिसांनी पकडले म्हणजे मग दरोडेखोर वकिलाकडे जात. आता सभ्य ठग पेंढाऱ्यांनी कायदेशीर सल्लागारांची मंडळेच स्थापन केलेली आहेत. त्यांतील वकील, बॅरिस्टर, प्रॉसीक्यूटर यांच्या सल्ल्यानेच दरोड्यांची किंवा रॅकेटची योजना सध्या आखली जाते.
प्रॉसीक्यूटर बधत नाही असे पाहून आपले ध्येयवादी मंडळ ग्रँड ज्यूरीकडे जाईल. पण या ज्यूरीत कोण असते ? राजकारणी लोक ! सीनेटर ! तेही संबंधितच असतात. पक्षनिष्ठ राजकारण चालविण्यासाठी ठग-पेंढाऱ्यांची सेना अत्यंत अवश्य असते. त्या बादशहांना दुखविले तर निवडणुका हरतील हे राजकारणी लोकांना पक्के माहीत असते. १९५० साली शिकागोच्या निवडणुकीत याच कारणामुळे डेमोक्रॅटिक पक्षांचा पराभव झाला. तेव्हा राजकारणी लोक पुढील निवडणुकीवर नजर ठेवून या गुन्हेगार जगाला संभाळण्यातच गर्क असतात. ते या सज्जनांकडे कसे लक्ष देणार ? तेथून तुम्ही न्यायालयाकडे जाल. तेही यातून मुक्त नसतात. तेथून स्टेटच्या गव्हर्नराकडे जाल. त्याबद्दल बार्नेस म्हणतो की गव्हर्नर हे पूर्वीच्या कोठल्या तरी पक्षातलेच असतात. आणि ज्याचे पूर्वचरित्र अगदी निष्कलंक आहे असा गव्हर्नर अमेरिकेत दुर्मिळ आहे. सध्याच्या राजकीय पक्षाची यंत्रणाच अशी आहे की तिची चाके व तिचे आरे या ठगांनीच घडविलेले असतात. हे ध्यानात आल्यावर तुम्ही ॲटर्नी जनरलकडे आणि तेथून प्रेसिडेंटकडे जाल. पण तेथेही तुमची निराशाच होईल. कारण पक्ष, निवडणुकी, त्यांची यंत्रणा आणि तिचे आधारस्तंभ या पाशातून तेही मुक्त होऊ शकत नाहीत.
या संबंधात विवेचन करताना वार्नेस याने अमेरिकेतील दारूबंदीची माहिती दिली आहे. हा प्रयोग अत्यंत उदात्त होता पण त्याची प्रेरणा बहुधा सैतानाकडूनच मिळाली असावी. कारण या दारूबंदीच्या काळात कोट्यवधी लोक दारू पीत असत. आणि ही बेकायदा दारू पुरविण्यासाठी ठगांच्या ज्या टोळया त्या वेळी निर्माण झाल्या त्या म्हणजे गुन्हेगारीच्या शाळाच ठरल्या. दारूबंदी पुढे रद्द झाली. पण या शाळांचे कार्य चालूच राहिले. अल कॅपोन हा या काळातला सर्वांत मोठा पेंढारी होता. त्याचे महिन्याचे उत्पन्न १२ कोटी रुपयांचे होते. त्यातून तो दोन कोट रुपये पोलिसांपासून प्रॉसीक्युटर, न्यायाधीश, सीनेटर येथपर्यंत पोचवीत असे. ज्या चार स्टेट्समध्ये त्याचा धंदा चालत असे ती त्याने 'संरक्षित' करून घेतली होती. हे ठगाचे अधिराज्य याच पद्धतीने दारूबंदी रद्द झाल्यावर पुढेही चालू राहिले. या प्रतिष्ठित- व्हाइट कॉलर- ठगांनी फेडरल जज्जापर्यंतचे लोक दावणीला बांधलेले असतात. अगोदर पैशाचा मोह कठिण. दरमहा मिळणारे हजारो लाखो डॉलर सोडून देणे फार कठिण आहे. तो कोणी जिंकलाच तर बदनामी, मुले पळविणे किंवा खून या भीतीने माणूस वाकतो आणि त्यातून सुटलाच तर पक्षीय राजकारणी लोकांचे दडपण, पुढील निवडणुकांतील अपयश हा मोठा प्रश्न असतो. या मर्मावर आघात करूनच ठगांच्या बादशहांनी आपली निर्वेध सत्ता अमेरिकेत प्रस्थापित केली आहे. एका प्रख्यात गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेला २१ न्यायाधीश, ९ वकील, अनेक स्थानिक अधिकारी व केन्द्रसरकारचे अनेक अधिकारी उपस्थित राहिले होते. अशा काही प्रसंगांचे वर्णन देऊन वार्नेस म्हणतो की अशा वेळी उपस्थित राहण्याची फर्माने सुटलेली असतात त्या बादशाही फर्मानांचा अवमान करणे कोणालाही शक्य नसते.
गुन्हेगारीच्या या वाढीची कारणमीमांसा करताना बार्नेसने कारणे दिली आहेत. कुटुंबसंस्थेची विघटना हे एक फार मोठे कारण आहे. परकीय लोकांची आवक व त्याने अमेरिकन समाजाला आलेली विरूपता वा बकालीपणा हेही तसेच एक महत्त्वाचे कारण आहे. पण तज्ज्ञांच्या मते सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भांडवलशाहीची व सट्टेबाजीची अतिरिक्त वाढ हे होय. कष्टाविना पैसा ही वृत्ती यामुळे गेली शंभर वर्षे सारखी पोसत आलेली आहे. ठग-पेंढाऱ्यांनी केलेली लूट व व्यापारी, भांडवलदार, कारखानदार यांनी केलेली लूट यात एक बेकायदेशीर व दुसरी कायदेशीर आहे इतकाच फरक. नैतिक दृष्टीने दोन्ही प्रकार लुटीचे होत. 'ब्रास चेक' हे वर सांगितलेले पुस्तक अमेरिकेतील वृत्तपत्रसंस्थेविषयी आहे पण त्यात अमेरिकन भांडवलशाहीचे यथार्थ चित्र पाहावयास मिळते. 'ब्रास चेक' हा मूळ कुंटणखान्यातला शब्द आहे. तोच अप्टन सिंक्लेअर याने अमेरिकन भांडवलशाहीने चालविलेल्या वृत्तसंस्थेला लावला आहे. त्याच्या मते अमेरिकन वर्तमानपत्रे व एकंदर वृत्तसंस्था ही भांडवलशाहीची बटीक आहे. आणि अपार धन व अपार वृत्तसामर्थ्य या शक्तींच्या साह्याने त्यांनी अमेरिकेतील विधानसभा आपल्या दासी करून टाकल्या आहेत. भांडवलदारीची परिणती म्हणजे फायनॅन्स कॅपिटॅलिझम्. (पहिली व्यापारी भांडवलशाही, दुसरी औद्योगिक आणि तिसरी ही आर्थिक). गिरण्या, कारखाने, खाणी, आगगाडी, जंगले या व्यवसायांत भांडवलदारांनाही अपार कष्ट करावे लागतात. पण फायनॅन्स कॅपिटॅलिझम् हा कागदांचा खेळ आहे. बसल्या जागेवरून हा सहज खेळता येतो. याच्या जोडीला यातून निर्माण झालेली सट्टेबाजी. यामुळे पैसा व कष्ट यांची फारकत झाली. लक्ष्मी व नीति यांचाही संबंध संपला. अमेरिकन नागरिक हा गेली पन्नास वर्षे हे पाहत आहे. बँका, गिरण्या, कारखाने यांतून खोट्या कंपन्या उभारणे, दिवाळी काढणे, खोटे दस्तऐवज करणे, खोटी कंत्राटे देणे, घेणे, भांडवलदारांचे संघ उभारणे यांमुळे जनतेच्या कोट्यवधी डॉलरांची कशी लूट केली जाते हे त्याच्या ध्यानात येत आहे. त्यामुळे श्रमाविना पैसा ही वृत्ती बळावत गेली. आणि धनसाधनांच्या अभावी त्याने साहस, धैर्य, बेडर वृत्ती व संघटनाकुशलता या शक्तींच्या साह्याने भांडवलदार व त्यांचे सगे जे राजकारणी लोक यांच्या तोडीस तोड अशी ठग-पेंढाऱ्यांची जमात उभी केली व तिच्या आधारे राजकारण व सरकारी सत्ता आपल्या ताब्यात घेतली. यामुळे अमेरिकन समाज अगदी भ्रष्ट होऊन गेला आहे. बार्नेसच्या ग्रंथात त्याने अनेक समाज- शास्त्रज्ञांची अवतरणे दिली आहेत. त्यांना आपल्या समाजाच्या भवितव्याची केवढी घोर चिंता लागून राहिली आहे ते त्यावरून स्पष्ट दिसते. अलीकडे तरुण स्त्री-पुरुषांत ही पापवृत्ती फार बळावत आहे. यामुळे ते फारच चिंतातुर झाले आहेत. एकट्या न्यूयॉर्क शहरात तरुण स्त्रीपुरुषांच्या दीडशे ते दोनशे लुटारू टोळ्या आहेत !
या वर्णनावरून ही नवी प्रतिष्ठित गुन्हेगारी गरीबीतून, अतृप्तीतून निर्माण झालेली नसून श्रीमंतीतून, अतितृप्तीतून निर्माण झालेली आहे हे स्पष्ट दिसून येईल. क्रोडोपती भांडवलदार, साहसी सुशिक्षित दरवडेखोर व राजकारणी नेते या त्रयीच्या धनलोभातून, सत्तालोभातून, नीतिभ्रष्टतेतून ही गुन्हेगारी निर्माण झालेली आहे. त्याच्यापुढे जुनी चोरी, घरफोडी ही गुन्हेगारी काहीच नव्हे. क्लरेन्स डॅरो या अमेरिकन समाजशास्त्रज्ञाने म्हटले आहे की आज अमेरिकेतील सर्व तुरुंगांची कवाडे खोलून सर्व गुन्हेगार कैदी मोकळे सोडून दिले तरी समाजनीतीत फारसा फरक पडणार नाही. कारण त्याच्यापेक्षा दसपट, शतपट गुन्हेगार तुरुंगाच्या बाहेरच आहेत. गेल्या पन्नास- साठ वर्षांत फ्रॉइड, जुंग, ॲडलर इ. मानसशास्त्रज्ञांनी व इतर समाज- शास्त्रज्ञांनी गुन्हेगार हा रोगी असतो, त्याला तुरुंगापेक्षा इस्पितळाची जरूर आहे, तो मनाने विकृत, दुबळा असतो, त्याला सुधारणे हे काम पोलिसाचे नसून डॉक्टरचे आहे इ. सिद्धान्त प्रस्थापित केले होते. नव्या गुंड, मवाल्यांनी, प्रतिष्ठित पेंढाऱ्यांनी हे सिद्धान्त धुरळ्यासारखे उधळून लावले आहेत. हे गुन्हेगार अत्यंत बुद्धिमान्, कणखर, पाताळयंत्री व दूरदर्शी असतात. मनोदौर्बल्यामुळे ते गुन्हेगार झाले असे कोणी शास्त्रज्ञ म्हणू लागला तर त्याच्याच मनाची तपासणी करावी लागेल. नवी गुन्हेगारी मनोदौर्बल्य किंवा भूक यातून निर्माण झालेलीच नाही. भांडवली समाजरचना आणि भ्रष्ट लोकशाही यांतून ही निर्माण झालेली आहे. म्हणून ती नष्ट करावयाची असेल तर आपली अर्थव्यवस्था आणि आपली राज्यपद्धती यांचे स्वरूप आमूलाग्र बदलले पाहिजे. जुन्या काळी राजाच्या व त्याच्या सरदारांच्या हाती अनियंत्रित सत्ता असे. ते उन्मत्त मदांध झाले की प्रजेचा अनन्वित छळ करीत. नुसती लूटमार करीत. ही अनियंत्रित सत्ता नको म्हणून विचारवंतांनी, लोकसत्तेची प्रस्थापना केली. पण भांडवलशाहीच्या अनियंत्रित सत्तेमुळे नव्या राज्यव्यवस्थेला, लोकशाही समाजव्यवस्थेला अत्यंत हिडीस स्वरूप प्राप्त झाले आहे. आणि मागल्यापेक्षा जनतेचा अनेक पटींनी जास्त रक्तशोष चालू आहे. म्हणून सध्याची आर्थिक व राजकीय घडी बदलून समाजाची पुनर्घटना केली पाहिजे.
अमेरिकेतील वाढती नीतिभ्रष्टता, वाढती गुन्हेगारी यांचे वर्णन वर दिले आहे. तज्ज्ञांनी तिची केलेली कारणमीमांसा आणि सुचविलेले उपाय हेही वर दिले आहेत. त्याच्या आधी प्रारंभी आपल्या देशातील आयंगार, सुब्रह्मण्यम्, शिवन्गौडा, मुदलियार यांनी आपल्या देशातल्या गुन्हेगारीची केलेली वर्णने व मीमांसाहि दिली आहे. यावरून अमेरिकेतल्या प्रतिष्ठित ठग- पेंढारशाहीचा व येथल्या गुन्हेगारीचा तोंडवळा बराच सारखा आहे असे दिसून येईल. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत व विशेषतः गेल्या दहाबारा वर्षांत म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण अमेरिकेच्याच दिशेने वाटचाल करीत आहोत, हे दोहोंची तुलना करून पाहणाऱ्याच्या सहज लक्षात येईल. आणि मग आपल्या देशावर नजीकच्या भविष्यकाळात केवढी भयानक आपत्ती कोसळणार आहे याची त्याला कल्पना येईल.
गेल्या वर्षी 'केसरी' च्या दिवाळी अंकात 'दुसरे आव्हान' हा लेख मी लिहिला होता. त्या वेळी औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आपल्या देशाची स्थिती अमेरिका व रशिया यांहून अगदी निराळी कशी आहे ते सांगितले होते. अमेरिकेत औद्योगिक विकास झाला तेव्हा लोकशाही विकसित झालेली नव्हती. त्यामुळे पोटाला घासभर अन्न देऊन किंवा तेही न देता कारखानदार १८-१८ तास मजुरांच्याकडून काम करून घेत. कामगार त्या वेळी जागृत नव्हते, संघटित नव्हते, बलशाली नव्हते म्हणून हे शक्य झाले. रशियात औद्योगिक विकास सध्या चालू आहे. पण तेथे लोकशाहीचा गंधही नाही. स्टॅलिनने हजारो लाखो शेतकऱ्या- कामकऱ्यांचे काय अनन्वित हाल केले, केवढा भयानक जुलूम केला, त्याचे वर्णन तेथला नवा स्टॅलिन क्रुश्चेव्ह यानेच केले आहे. हिंदुस्थानात यातले काहीच शक्य नाही. म्हणून एक विचित्र समस्या आपल्यापुढे टाकून काळाने आपल्याला आव्हान दिले आहे असे त्या लेखात सांगितले आहे. प्रतिष्ठित पेंढारशाही- व्हाइट कॉलर क्राइम- हीही तशीच दुसरी समस्या - पहिली पेक्षाही घोरतर अशी समस्या- त्याच परिस्थितीमुळे आपल्यापुढे उभी आहे.
अमेरिकेत फार मोठी लूटमार चालू आहे. जनतेचे भयंकर शोषण चालू आहे. पण तेथे धनसंपदाच इतकी विपुल आहे की हे शोषण सहन करण्याचे सामर्थ्य थोडेतरी जनतेत आहे. या पेंढारशाहीला आळा घालण्याचे नवे नवे उपाय शोधून काढण्यात मधून मधून तेथे लोक यशस्वी होतात. गुन्हेगारीच्या शोधासाठी, तिच्या बंदोबस्तासाठी, तुरुंग, पोलीस, गुप्तपोलीस, न्यायालये, सरकारी वकील यांसाठी अमेरिकेत दरसाल १५ शे कोटी- म्हणजे सर्व भारताच्या अर्थसंकल्पाइतके– रुपये खर्च होतात. तेथे एका जनरल मोटर्स या कंपनीचे भांडवलच भारताच्या राष्ट्रीय अर्थसंकल्पाएवढे आहे. म्हणून प्रतिष्ठित मवालीगिरीने केलेली लूटमार काही काळ तरी तेथे जनतेला सोसणे शक्य आहे. हेही दिवसेंदिवस फारच कठीण होत चालले आहे हे खरे. आपल्याला माहित आहे की अमेरिकेत वेड्या माणसांचे प्रमाण फार झपाट्याने वाढत आहे. या पेंढारशाहीमुळे अनेक ठिकाणी समाजरचना उद्ध्वस्त होत आहे; लोकांच्या मनावर निराशेचा, विफलतेचा पगडा बसत आहे आणि त्यामुळे मनोदौर्बल्य कमालीच्या वेगाने वाढत आहे. १९५१ साली अमेरिकेत १ लक्ष ७० हजार वेडे वा मनोभ्रंश झालेले लोक होते व बार्नेसने दिलेल्या माहितीप्रमाणे ही संख्या शे. ४ या प्रमाणात वाढत आहे. आज जी १५ वर्षांची मुले आहेत त्यांच्यातून दर विसांपैकी १ वेडा होणार असे तज्ज्ञांचे भविष्य आहे. अमेरिकेत विवाहसंस्थाही भग्न होत आहे. दर तीन विवाहांपैकी एकाचा तेथे विच्छेद होतो. आणि पुढील १०।२० वर्षांत ते प्रमाण एकास एक असे होईल अशी समाजशास्त्रज्ञांना भीति आहे. याला अनेक कारणे आहेत. पण गुंडमवाल्यांची चलती- त्यांची सत्ता- त्यांचे अधिराज्य हे एक निश्चित आहे. प्रतिष्ठित ठगांच्या अनेक धंद्यांपैकी जुगारी हा फार मोठा धंदा आहे. अमेरिकेत कारखानदारी चालत नसेल इतक्या मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय चालतो. याच्याही मोठमोठ्या कंपन्या, कॉर्पोरेशन्स, सिंडिकेट्स आहेत. त्यांचेही कारभार मागे सांगितल्याप्रमाणे शहराच्या श्रीमंत भागातून चालतात. याचा संसारावर, कुटुंबव्यवस्थेवर व विवाहसंस्थेवर केवढा परिणाम होत असेल हे सहज ध्यानात येईल. शेकडो संसार यामुळे क्षणाक्षणाला उद्ध्वस्त होत असतात. आणि त्यामुळे पुन्हा गुन्हेगारी आणि मनोदौर्बल्य वाढत जाते. विवाहसंस्था व वैवाहिक नीती खालावत चालली म्हणजे सिफिलिस, गनोरिया अशा गुप्तरोगांचे प्रमाण वाढत जाते. कार्ल वॉरन् या पंडिताच्या मते अमेरिकेत या रोगांनी दोन कोटी लोक ग्रस्त आहेत. आश्चर्य असे की १९४० सालापासून या रोगांवर रामबाण औषधे सापडली आहेत. पण हा रोग उत्तरोत्तर वाढतच आहे. या रोग्यांतील शेकडा ६० लोक १५ ते २५ या वयाचे असतात. तरुण स्त्रीपुरुषांच्या आरोग्यावर याचा काय परिणाम होत असेल हे सांगणे नकोच. अमेरिकेत मादकद्रव्यसेवनाचे प्रमाण वाढत आहे. तरुणांत ते प्रमाण इतके वाढत आहे की ते पाहून समाजशास्त्रज्ञांना धक्का बसतो. अमेरिकेत अफू, कोकेन व इतर मादक द्रव्यांवर (यांत मद्य नाही. ते निराळेच आहे.) १४०० कोटी रुपये दरसाल खर्च होतात. या व्यसनाबरोबर अमेरिकेत आत्महत्येचेही प्रमाण असेच वाढत आहे. यामुळे अमेरिकेतही या सर्व आपत्तींना तोंड देणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. मग आपल्याकडे काय होईल, सध्याच काय होत असेल याची कल्पना करता येईल. युद्धाची जशी सर्व आधुनिक शस्त्रास्त्रे अमेरिकेत सिद्ध आहेत आणि त्यासाठी लागणारे धनही आहे त्याचप्रमाणे या आपत्तींशी लढा देण्यास लागणारी साधनसामुग्री, पैसा हाही तेथे आहे. पण आपल्याजवळ त्यातले काहीच नाही. आणि या घोर आपत्ती मात्र आपल्याकडे वेगाने चालून येत आहेत.
या सर्व आपत्तींना तोंड देण्यासाठी, या प्रतिष्ठित पेंढारवृत्तीला आळा घालण्यासाठी अमेरिकन शास्त्रज्ञ कोणचा उपाय सुचवितात ? चारित्र्य ! समाजातील तरुणांना नीतीचे, चारित्र्याचे, उदात्त ध्येयवादाचे, मनोनिग्रहाचे शिक्षण दिले पाहिजे. यालाच जुन्या काळी धर्म असे म्हणत. पण धर्मसंस्था ज्यांच्या हाती होत्या आणि आहेत त्यांनी धर्माला अत्यंत जड, कर्मठ, विपरीत व ओंगळ रूप आणून ठेविले आहे. म्हणून अलीकडे तो शब्द चटकन् कोणी वापरीत नाही. वास्तविक मनोनिग्रह, त्याग, जनसेवा, नीतिधैर्य, ध्येयवाद, सत्यनिष्ठा, परमेश्वरावरील श्रद्धा, कुटुंबनीति, हाच खरा धर्म होय. आणि हा धर्म म्हणजेच- नव्या भाषेत ही मूल्ये अमेरिकेतून नष्ट होत चालली आहेत. फायनॅन्स कॅपिटॅलिझम्, प्रतिष्ठित ठगपेंढारशाही, व कुटिल नीतिभ्रष्ट राजकारण यांतूनच निर्माण झाले आहे हे खरे. पण याचाही सूक्ष्म विचार केला तर हा वाद बीज आणि वृक्ष यांच्यासारखा आहे असे दिसेल. भांडवलशाहीचा अतिरेक तरी स्वार्थाच्या अतिरेकामुळेच होतो. माणूस संयमी असला, म्हणजे वरील अर्थाने धर्मनिष्ठ असला, त्याची नीतिमूल्ये दृढ असली तर हा अतिरेक होत नाही. समाजात काही प्रमाणात जरी अशी निःस्पृह माणसे असली तरी ही आपत्ती टळते. इंग्लंडने ही किती तरी प्रमाणात टाळली आहे. बार्नेसनेच ही तुलना केली आहे. तो म्हणतो, "कायदा पाळण्याची ब्रिटिश जनतेची वृत्ती प्रशंसनीय आहे. त्यामुळे लोकमत तेथे जास्त प्रभावी आहे. म्हणजेच राजकारणी लोक इतके भ्रष्ट नाहीत. अमेरिकेच्या तुलनेने सट्टेबाजीचा रोग ब्रिटनमध्ये फार कमी आहे. स्वार्थाला धनिक लोक तेथे काही तरी आळा घालू शकतात असा याचा अर्थ आहे. गेल्या दोनशे वर्षांत इंग्लंडमध्ये बँका गडगडल्याचे उदाहरण नाही. असले तर अगदी तुरळक. याचा अर्थ काय ? सट्टेबाजीचा, हरामाच्या पैशाचा मोह इंग्लंडमधले लोक जिंकू शकतात हा त्याचा अर्थ आहे. सामाजिक वा आर्थिक परिस्थितीला महत्त्व नाही असे मला मुळीच म्हणावयाचे नाही. पण मानवाची चारित्र्यशक्ती, मानवाचा धर्म हाच अंतिम निर्णायक आहे हे आपण विसरून चालणार नाही. गेल्या तीनशे वर्षांत इंग्लंडमध्ये रक्तपाती क्रांती झाली नाही आणि सर्व प्रकारची आर्थिक समता मात्र बऱ्याच अंशाने प्रस्थापित झाली आहे. हे तरी फल कशाचे ? तेथील सत्ताधिकारी, तेथील धनशहा हे विवेकी आहेत, बुद्धिवश आहेत, सत्ता व धन यांचा लोभ मर्यादित केला पाहिजे हे ते जाणतात आणि तसा करू शकतात यामुळेच हे अनर्थ टळले आहेत. मानव स्वभावतःच सत्प्रवृत्त वा पापप्रवृत्त असतो यांपैकी कोणतेच मत इतिहाससिद्ध नाही. पण त्याच्या पापाची सर्व जिम्मेदारी परिस्थितीवर ढकलणे हे अगदी आत्मघातकीपणाचे आहे. पण अलीकडे आपल्याकडे हे मत प्रबळ होत आहे असे वाटते. नाटक, कादंबरी, लघुकथा या ललितसाहित्यात तर चोर, दरोडेखोर, खुनी, यांना मोठ्या नाट्यमय पद्धतीने पापाच्या जबाबदारीतून मुक्त केलेले असते. या गुन्हेगाराला पकडले आणि 'तू वाममार्गी का झालास ?' असे विचारले तर 'ते समाजाला विचारा' असे तो मोठ्या रुबाबात उत्तर देतो. परिस्थिती वा समाज पापप्रवृत्तीला जबाबदार आहे असे शास्त्रज्ञांनी म्हणणे निराळे आणि गुन्हेगाराने म्हणणे निराळे. अंतःस्थ निग्रहशक्ती, संयम, विवेक ही मानवाच्या हातची अमोघ शक्ती आहे. त्या शक्तीच्या जोरावर तो परिस्थितीवर मात करू शकतो. व्यक्ती स्वतःच आपली पापे परिस्थितीवर लादू लागली तर मानव हे एक जडयंत्र आहे, तो अचेतन आहे, त्याला सद्असद् विवेकशक्ती नाही असे म्हटल्यासारखे होईल. ही मानवजातीची हत्या आहे. मानव मोह जिंकू शकतो यातच त्याचे मानवत्व आहे. म्हणूनच सध्याच्या समाजातले श्रमाविना पैसा, हरामी पैसा हे तत्त्वज्ञान खणून काढून नव्या पिढीला चारित्र्याचे शिक्षण दिले पाहिजे असे अमेरिकन शास्त्रज्ञ सांगत आहेत. अर्थव्यवस्था नीतीच्या अधीन असली तरच त्या गुन्हेगारीला नियंत्रित करता येईल असे त्यांना वाटते.
आपल्याकडे ही अद्ययावत् गुन्हेगारी हळूहळू वाढत आहे याविषयी कोणाचे दुमत आहे असे दिसत नाही. खेडेगावातील ग्रामपंचायतीपासून प्रदेशातील विधान- सभेपर्यंत सर्वत्र 'दादांचे' राज्य सध्या चालू आहे, असे सर्व पक्षाचे लोक, अपक्ष लोक, विद्वान्, अविद्वान् सर्वच म्हणत आहेत. उत्तर प्रदेशात काँग्रेसपक्षातील लोकांनी स्वतःच्याच मंत्रिमंडळाला हैराण करण्याचा डाव मांडला आहे. सरकारने मांडलेल्या ठरावाला आम्ही विरोध करू, असे त्यांनी मुख्य मंत्र्याला बजावले आहे. यामागे मागल्या निवडणुकांत पडलेल्या मोठ्या दादांचा हात आहे असे जाहीरपणे सांगितले जात आहे. पंजाब, कर्नाटक, ओरिसा येथल्या मंत्रिमंडळांतील गटबाजीचे वर्णन काँग्रेसश्रेष्ठीच नित्य करीत आहेत. गटबाजीचा अर्थ एकच होतो. राज्यकारभारात तत्त्वनिष्ठेचा संबंध राहिला नसून, कारस्थानी, पाताळयंत्री, बळदंड माणसांचे तेथे राज्य आहे असा तो अर्थ होय. यातून पुढले सगळे अर्थ उद्भवत असतात. पब्लिक अकौंट्स कमिटी, गोरावालासारखे सरकारने नेमलेले तपासनीस यांनी सादर केलेल्या अहवालावरून हे अनर्थ कोणच्या सीमेपर्यंत गेले आहेत याची कल्पना येते. जनतेच्या पैशाचा अपहार करण्याच्या या वृत्तीतूनच पुढे गुंडराज्य निर्माण होते. कारण सुखासुखी हा अपहार कोणीच पचू देत नाही. यासाठी मग ठग- पेंढाऱ्यांच्या सेना तयार ठेवाव्या लागतात आणि हळूहळू मग तेही आपली संघटना निर्माण करून राजकारण व राजकारणी यांना ताब्यात घेतात. पक्षनिष्ठ राजकारणामुळे दोन्ही पक्षांना ठग पेंढाऱ्यांचे साह्य घ्यावे लागते. भारतात काँग्रेसशी सामना देईल असा पक्ष नसल्यामुळे इतके दिवस याला थोडा आळा पडला होता. पण आता काँग्रेसमध्येच प्रत्येक प्रदेशराज्यात तट पडल्यामुळे आणि ते तट एकमेकांशी भिन्नपक्षांच्या अहिनकुल- न्यायानेच वागत असल्यामुळे अधोगतीला फारसा वेळ लागणार नाही.
आपल्या देशावर नजीकच्या भविष्यकाळात ओढवणारे हे जे भयंकर संकट त्याची जाणीव पुष्कळ विचारवंतांना झालेली असल्यामुळे ते आपापल्या- परीने त्यावर उपायही सुचवीत आहेत. आचार्य विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांच्या मते पक्षपद्धतीच अजिबात नष्ट केली म्हणजे तिच्यामुळे उद्भवलेले अनर्थही टळतील. पण एकतर पद्धती नष्ट करून तिच्या जागी दुसरी कोणची आणावयाची याचे व्यावहारिक भूमिकेवरून या दोघांपैकी कोणीच उत्तर दिलेले नाही आणि दुसरे म्हणजे जोपर्यंत कोणचीही पद्धती शेवटी मनुष्याच्याच हातात राहणार आहे तोपर्यंत नुसत्या पद्धतीत बदल करून काहीच उपयोग होणार नाही. स्वार्थी, हृदयशून्य, चारित्र्यहीन मनुष्य कोणच्याही शासनपद्धतीतून, कोणच्याही समाजरचनेतून वाटेल ते अनर्थ घडवू शकतो हे इतिहासात पावलोपावली आपल्याला दिसून येत आहे तोपर्यंत या दोन थोर नेत्यांच्या सूचनेचा विचारसुद्धा करता येणार नाही. ठग- पेंढारशाही पक्षनिष्ठ राजकारणाशी निगडित आहे तशीच ती भांडवलशाहीशी निगडित आहे. तेव्हा भांडवलशाही नष्ट करावी म्हणजे सगळया अनर्थाचे मूळच नष्ट होईल असे म्हणणारा एक पक्ष आहे. आणि हा पक्ष फारच मोठा आहे. त्याचे मत असे की भांडवलाने उभारलेल्या सर्व उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण करून टाकावे म्हणजे पुढील अनर्थपरंपरा टळतील. पण हाही विचार वरच्यासारखाच भोळा व सात्त्विक आहे. राष्ट्रीयीकरण म्हणजे उद्योगधंदे राष्ट्राच्या ताब्यात देणे. म्हणजे कोणाच्या ? तर सरकारच्या. आणि सरकारच्या म्हणजे कोणाच्या ? तर निवडून दिलेले जे मंत्री त्यांच्या. त्यांच्याच कारभारावर पब्लिक अकौंट्स कमिटी व इतर तपासनीस कसा प्रकाश टाकीत आहेत हे वर सांगितलेच आहे. आणि विमाकंपन्यांच्या राष्ट्रीयीकरणाने वर सांगितलेल्या विचाराचा आदर्श पाठ आपल्याला दिलाच आहे. तेव्हा याचाही निष्कर्ष हाच की नुसती जडयंत्रणा बदलणे याला काहीच अर्थ नाही. धरणयोजना, ग्रामविकासयोजना, कृषि- पुनर्घटना, राष्ट्रविकास योजना, वनमहोत्सव या सगळ्या सरकारीच योजना आहेत. म्हणजे त्यांचे राष्ट्रीयीकरणच झाले आहे. त्यांची काय अवस्था आहे ते आपण पाहातच आहो. तीच अवस्था सर्वं उद्योगधंद्याच्या राष्ट्रीयीकरणामुळे प्राप्त झाल्याखेरीज राहणार नाही. मानवाची नीती व चारित्र्य यांची पातळी वाढली नाही तोपर्यंत राष्ट्रीयीकरण ही फारच मोठी आपत्ती आहे हे आपण कधीही विसरू नये.
तेव्हा चारित्र्यधनाची वाढ करणे हा एकच उपाय सर्व आपत्तींवर आहे. आणि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या धनाला ओहोटी लागून आपली गंगाजळी आता जवळजवळ रिती झालेली आहे. १९४९ च्या बंगलोरच्या भाषणात सरदार वल्लभभाई पटेलांनी अत्यंत तीव्र शब्दांत काँग्रेसजनांना हेच कटु सत्य सांगितले होते. 'स्वातंत्र्यापूर्वी आपण ध्येयवादी होतो, त्यागी होतो. पण आता आपली नीती फारच खालावली आहे. इतरांप्रमाणेच काँग्रेसजनही भ्रष्ट झाले आहेत,' असे ते म्हणाले; त्याच साली मद्रासला केलेल्या भाषणात अतिशय निराशेने ते म्हणाले होते, 'आपल्याला आता बाहेरून संकट येणार नाही. आले तर ते आतूनच येणार आहे. आपण इतके चारित्र्यभ्रष्ट आहोत की, लवकरच याचे आपल्याला भयंकर परिणाम भोगावे लागतील.' दुर्दैवाने सरदारजींची भीती आज खरी ठरली आहे. आणि यापेक्षाही दुसरे जास्त भयंकर सत्य यातून स्पष्ट झाले आहे. ते हे की या देशाला ध्येयवाद शिकवील, नीतिमार्गावर आणील, चारित्र्यसंपन्न करील असा सामर्थ्य संपन्न एकही पुरुष येथे आता नाही. पंडित नेहरू, राजेंद्रबाबू, पंत यांसारखे थोर नेते आज दहा वर्षे जनतेला व काँग्रेसजनांना नीत्युपदेश करीत आहेत. पट्टाभि, ढेबरभाई यांसारखे काँग्रेसचे अध्यक्ष कंठरवाने तेच सांगत आहेत. पण देशाच्या चारित्र्याची पातळी वर न जाता खालीच चालली आहे.
आपल्यापुढची समस्या किती बिकट आहे याची काहीशी कल्पना वाचकांना आली असेल. चारित्र्यधन जर आपण आता प्राप्त करून घेतले नाही तर अमेरिकेप्रमाणे येथे ठग-पेंढारशाही सुरू होईल. आणि तिने केलेला रक्तशोष सोसण्याचे सामर्थ्य आपल्या ठायी मुळीच नाही. चारित्र्यधन हे इतर धनाप्रमाणे आयात करता येत नाही. ते मानवाच्या चित्तांतच प्रगट व्हावे लागते. आणि ही भूमी तर सध्या येथे अगदी नापीक झाली आहे. ! काँग्रेसकडे देशाचे नेतृत्व आहे. तिची काय स्थिती आहे ते वर सांगितलेच. विरोधी पक्षाचे या बाबतीतले दारिद्र्य तर जास्तच केविलवाणे आहे. त्यांच्यातील हेवेदावे, गटबाजी, फुटीरपणा, क्षुद्र कारणावरून होणारी लाथाळी ही सर्व अगदी घृणास्पद आहे. ध्येयवाद, चारित्र्य, सच्छील शिकविण्याचा मूळ अधिकार विद्यापीठांचा; तेथील प्राध्यापकांचा आणि एकंदर शिक्षकवर्गाचा ! पण बनारस, शांतिनिकेन, आग्रा, मुंबई या विद्यापीठांची कहाणी नुकतीच वर्तमानपत्रांतून आली आहे. त्यावरून स्वतःच चारित्र्यशून्य असलेली ही विद्यापीठे विद्यार्थ्यांना कोणचे वळण लावणार हे दिसतेच आहे. अनेक वेळा या सर्वांना बाजूस सारून स्वतः विद्यार्थीवर्गच आत्मस्फूर्तीने स्वतःच्या ठायी स्वतःच ध्येयवादाचे, थोर आकांक्षांचे, श्रद्धांचे बीजारोपण करू शकतो. पण तीही आशा भारतातील विद्यार्थ्यांकडून धरता येत नाही. त्यांचे काय चरित्र आहे याचे वर्णन आरंभी केलेच आहे. अशा रीतीने येथे सर्व शून्याकार आहे. आणि व्यापार, कारखानदारी, धरणयोजना, विकासयोजना यांसाठी तूट पडली तर अवश्य ते भांडवल परक्या देशांतून आणता येते तसे हे चारित्र्यरूप भांडवल आणता येत नसल्यामुळे आपली समस्या अगदी बिनतोड होऊन वसली आहे.
चारित्र्यसंवर्धनाचा ऐतिहासिक दृष्टीने आपण विचार केला तर आपली ही समस्या दिसते यापेक्षा शतपट विकट आहे हे आपल्या ध्यानात येईल. जगातल्या कोणच्याही देशाचा इतिहास पाहिला तर असे दिसते की ज्यात प्राणपणाने लढणे अवश्य आहे असा घोर समरप्रसंग जेव्हा लोकांच्या डोळ्यापुढे असतो तेव्हाच ते त्यागाला, शारीरिक वा मानसिक यातना सोसण्याला, देहदंडाला, आत्मबलिदानाला सिद्ध होतात. राष्ट्रीय स्वातंत्र्याचा प्रश्न आहे, युद्धाचा प्रसंग आहे, अन्य राष्ट्रीय लढ्याचा प्रसंग आहे अशा वेळी सामान्य जनांचेही धैर्यशौर्यादि गुण, त्याग हे प्रगट होतात, विकसित होतात. शांततेच्या काळी लोकांमध्ये ध्येयवाद टिकवून धरणे, त्यांना त्यागाला प्रवृत्त करणे, सुखभोगापासून परावृत्त करणे ही गोष्ट फार कठिण; कल्पनेच्या बाहेर कठिण आहे. ही गोष्ट इंग्लंडलाच आजपर्यंतच्या इतिहासात जमली आहे. अन्यत्र नाही. गेल्या शतकात जर्मनी, इटली, जपान, चीन या देशांत राष्ट्रसंघटना झाली. या सर्व संघटना राष्ट्रीय आपत्तीच्या काळी, त्या वेळी झालेल्या युद्धाच्या आगीतून निर्माण झालेल्या आहेत. त्याच्या आधीच्या शतकात नेपोलियने फ्रान्सचे वैभव वाढविले, वॉशिंग्टनने अमेरिकेचे कर्तृत्व उदयास आणले ते सर्व क्रांतीच्या संग्रामातून निर्माण झालेल्या अग्निज्वाळांच्या साहाय्याने. त्याच्या आधी मोठमोठे धर्मसंग्राम होत. त्या वेळी माणसे जिवंत होत. पराक्रम करीत. त्यांचे कर्तृत्व बहरून येई. ज्यांनी धर्मासाठी, सामाजिक व राजकीय क्रांतीसाठी किंवा राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी संग्राम केले नाहीत ते समाज लोकांचे चारित्र्य संवर्धन करू शकले नाहीत. समाजाला ध्येयवाद, त्याग, मनोनिग्रह शिकवू शकले नाहीत. शांततेच्या काळी मनुष्याला स्वार्थाचा, सुखाविलासाचा, क्षुद्र आपपरभावाचा त्याग करण्यास शिकविण्याची किमया अजून फारशी कोणाला साधलेली नाही.
संग्रामकालात मनुष्य जो त्याग करतो तो भावनेच्या भरात काही एका आवेगात आणि थोड्या बेभान अवस्थेतच करतो. रक्त तापलेले आहे, राग- द्वेष उत्कट झालेले आहेत, मनाचा प्रक्षोभ झालेला आहे, अशा वेळी मनुष्य यातना सोसू शकतो. स्वतःची क्षुद्रता विसरून क्षणभर तो उदात्त भूमीवर आरोहण करतो आणि त्यामुळे देहदंड आनंदाने सोसण्याची त्याच्या मनाची तयारी झालेली असते. शांततेच्या काळात या प्रेरणा नष्ट झालेल्या असतात. शांततेच्या काळची ध्येये वास्तविक तितकीच उदात्त असतात. सर्व राष्ट्राला पुरेसे अन्नधान्य निर्माण करणे, प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, घर, आणि शिक्षण हक्काने मिळण्याची सोय करणे, अस्पृश्यता, जातीयता नष्ट करून सर्वत्र समता प्रथापित करणे, अमाप धन निर्माण करून प्रत्येकाला साहित्य, संगीत, नाट्य, नृत्य, शिल्प इ. कलांचा आस्वाद घेण्याची संधी मिळवून देणे ही ध्येये खरोखरी फार उदात्त आहेत. राष्ट्रीय संग्राम करावयाचे ते यासाठीच करावयाचे असतात. पण ही ध्येये बुद्धिगम्य आहेत. भावनांना त्वरित आवाहन करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी नाही. ती रक्तात प्रक्षोभ निर्माण करीत नाहीत आणि भावनांच्या ठायी मनुष्याला कार्यप्रवण करण्याची शक्ती असते तशी बुद्धीच्या ठायी नसते. बुद्धी हिशेब करीत असते आणि हिशेबातून त्यागाची प्रेरणा कधीच निर्माण होत नाही. म्हणूनच क्रान्तीचा, संग्रामाचा ताण ढिला पडला की माणसे गळाठतात. त्यांचे रक्त थंड होते आणि मग वासनांवर जय मिळवण्याची त्यांच्या ठायी काही काळ आलेली शक्ती नष्ट होते. सामान्य माणसांप्रमाणेच नेत्यांचेही असेच अवस्थांतर होते. क्रान्ती होईपर्यंत नेते क्रांतिकारक वृत्तीचे असतात. पण ती संपताच ते सत्तारूढ झाल्यामुळे सनातनी आणि प्रतिगामी होतात. (इंग्लिश इतिहासकार ट्रिव्हेलियन याने क्रॉमवेलच्या चरित्राची मीमांसा करताना या सिद्धान्ताचे सुरेख विवेचन केले आहे.) त्यामुळे ज्या जळत्या नंदादीपापासून लोकांनी आपल्या ठायीच्या ज्योती प्रदीप्त करावयाच्या तोच विझला असे होऊन सर्वत्र अंधार पडतो, आणि लोक खालच्या पातळीवर घसरतात. भारतामध्ये टिळक, महात्माजी यांनी पेटविलेला वन्ही स्वातंत्र्यप्राप्तीबरोवर विझून गेला. नियमाप्रमाणे सत्तारूढ नेते सनातनी झाले आणि जनतेचे रक्त थंड झाले.
पण आपण लोकशाही प्रस्थापित केलेली आहे. मानवतेचे हक्क प्रत्येकाला मिळाले पाहिजेत असा आपला आग्रह आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचे श्रेष्ठ सुख प्रत्येकाला प्राप्त करून देऊ अशी आपली प्रतिज्ञा आहे. तिची पूर्ती आपणास करायची तर रक्त थंड असतानाच त्याग करण्याची शिकवण आपण स्वतःला दिली पाहिजे. शांततेच्या काळची ध्येये नाट्यमय, तेजाने झगझगणारी, विद्युल्लतेप्रमाणे लखलखणारी अशी नसतात हे खरे आहे. पण केवळ संग्रामातील विजयांनी मानवी जीवनाची परिपूर्ती होत नसते हे जाणण्याची रसिकता आपल्या ठायी आपण निर्मिली पाहिजे. सर्वांना अन्नवस्त्र मिळाले तरच 'मानवता' या शब्दाला अर्थ आहे. सर्वांना शिक्षण मिळाले तरच मनोविकास, मतस्वातंत्र्य, व्यक्तित्व या कल्पना साकार होतात. हे जाणण्याइतकी बुद्धीची प्रगल्भता आपल्या समाजात आली पाहिजे आणि मुख्य म्हणजे बुद्धीने, विवेकाने दिलेली प्रेरणा आपल्याला त्यागाला प्रवृत्त करण्यास समर्थ होईल अशी आपली मनोवृत्ती झाली पाहिजे. जीवांच्या संहारापेक्षा जीवांचा प्रतिपाल हे ध्येय जास्त रम्य, जास्त विलोभनीय वाटण्याइतकी श्रेष्ठ अभिरुची आपण जोपासिली तरच आपली लोकशाही यशस्वी होईल. नाहीतर लवकरच या भूमीत जुगारीच्या अड्डयांचे प्रमुख, चोरट्या दारूच्या व्यापाराचे बादशहा, सट्टेबाजीत पारंगत झालेले थैलीशहा, मोठी संघटना करून बँका, पेढ्या भर दिवसा लुटणारे प्रतिष्ठित पेंढारी यांचे साम्राज्य प्रस्थापित होईल.
येवढ्या मोठ्या पाशवी शक्तीशी संग्राम करण्याइतके समर्थ चारित्र्य निर्माण करणे ही गोष्ट दुष्कर तर खरीच. पण एका दृष्टीने ती सुकर आहे. धनधान्य, भांडवल परदेशातून आणता येते हे खरे, पण ते काही झाले तरी परावलंबनच होय. चारित्र्याचे धन हे स्वायत्त आहे, मदायत्त आहे. कोणच्याही परिस्थितीत अंतरात्म्याला आवाहन करून हे धन प्राप्त करून घेता येते. हे मानवाला मिळालेले सर्वात मोठे वरप्रदान होय. मानवाचे मानवत्वच मुळी यात आहे. मनोनिग्रह, संयम हा स्वतःचा स्वतःला शिकवता येतो. ध्येयवाद अंगीकारणे ही स्वाधीन कला आहे. ही स्वाधीन धनदौलत आहे. आणि हे धन प्रत्यक्ष भांडवलापेक्षा श्रेष्ठ आहे. चारित्र्य या धनातून आर्थिक भांडवल सहज निर्माण होते. पण ते जर नसेल तर आर्थिक भांडवल कितीही असले तरी ते नष्ट होते. वेदव्यास म्हणतात,
अर्थानामीश्वरो यः स्यादिंद्रियाणामनीश्वरः ।
इंद्रियाणामनैश्वर्याद् ऐश्वर्याद् भ्रश्यते हि सः ॥
'जो मनुष्य धनाचा स्वामी असून इंद्रियांचा दास असतो तो त्या इंद्रियांच्या दावामुळे धनैश्वर्यापासून भ्रष्ट होतो.' (महाभारत ५.३४.६३)
भारताच्या तरुण पिढीने या व्यासवचनाचे चांगले अध्ययन केले तर स्वाधीन असलेले इंद्रियांचे स्वामित्व- म्हणजेच त्याग, ध्येयवाद किंवा चारित्र्य त्यांना प्राप्त होईल आणि मग धनाचे, समृद्धीचे स्वामित्वहि सुलभ होऊन या भूमीवर येऊ घातलेले भयंकर संकट आपल्याला सहज टाळता येईल. व्यक्तित्व, स्वातंत्र्य, यांची अभिरुची आमच्या विद्यार्थ्यांच्या अंगी कितपत आहे यावर हे सर्व अवलंबून आहे. ही अभिरुची असली तर आपल्या अधःपाताची सर्व जबाबदारी परिस्थितीवर टाकून ते मोकळे होणार नाहीत आणि 'स्वाधीन' होण्याचा मार्ग स्वीकारतील असे वाटते.