वैय्यक्तिक व सामाजिक/ते समाजाला विचारा

विकिस्रोत कडून

डकऱ्यांच्या 'प्रेमसंन्यास' या नाटकातील द्रुमन ही एक तरुण विधवा आहे. कमलाकराच्या मोहजालात ती फसली व तिला दिवस गेले. मूल झाल्यावर बेअब्रू टाळण्यासाठी तिने मुलाचा गळा दाबून प्राण घेतला, पण ते उघडकीला आले. तिच्या खोलीत पोलिस आले आणि बाबासाहेबहि आले. तो सर्व प्रकार पाहून बाबासाहेबांना फार संताप आला. ते म्हणाले, "द्रुमन, राक्षसिणी, काय केलस हे ? हे अघोर कृत्य करायला तुझा हात कसा वाहवला?" यावर द्रुमन म्हणाली, "ते राक्षसी रूढीला विचारा, ते राक्षसी समाजाला विचारा."
 मुंबईच्या एका महाविद्यालयाचे एक प्राचार्य विद्यापीठाच्या सिडिकेटचे सभासदही होते. त्यांच्याकडे एकदा एक प्राध्यापक आपल्या एका विद्यार्थ्याचे प्रकरण घेऊन आले. त्या विद्यार्थ्याने परीक्षेत वाममार्गाचा अवलंब केला होता. म्हणून त्यासाठी नेमलेल्या समितीने त्याला तीन वर्षे निष्कासित केले होते. प्राचार्यांनी त्याच्यासाठी काही करावे असा प्राध्यापकांचा आग्रह होता. 'त्या विद्यार्थ्यावर चुकून आरोप आला आहे काय, तो प्रामाणिक असून काही गैरसमजामुळे त्याला शिक्षा झाली आहे काय ?' असे प्राचार्यांनी विचारले. तसे काही नव्हते. मुलगा अप्रामाणिक होता, त्याने फसवणूक निश्चित केली होती. पण प्राध्यापकांचे म्हणणे असे की, 'हा त्याचा दोष नाही. आपणच या विद्यापीठाच्या परीक्षांचे महत्त्व वाढवून ठेवले आहे. विद्यार्थ्यांचे सगळे भवितव्य समाजाने त्यावर अवलंबून ठेवले आहे. म्हणून त्यांना असा मोह होतो. यात त्यांचा दोष नाही. असला तर तो आपला आहे, समाजाचा आहे.' यावर थोडी चर्चा झाली. पण शेवटी प्राचार्यांनी प्राध्यापकांना सांगितले की, 'आपण बोलणे बंद केलेले बरे. कारण तुमची भाषा मला समजत नाही. तुमची विचारसरणी मला अनाकलनीय आहे.'
 मुंबईच्या प्राचार्यांनी ही विचारसरणी अगदी त्याज्य ठरविली असली तरी ती आज सर्वत्र मान्यता पावली आहे व आचरली जात आहे असे आपल्याला आढळून येईल. जाळपोळ, खून, बलात्कार असले गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना गुन्हेगार समजू नये तर त्यांना रोगी समजावे असे नवीन शास्त्र आहे. गेल्या पन्नास-साठ वर्षात गुन्हेगारीच्या शास्त्राचा खूपच विकास झाला असून अनेक शास्त्रज्ञांनी हे मत आग्रहाने मांडले आहे. मनुष्य हा काही जन्मत: गुन्हेगार नसतो. परिस्थितीमुळे तो गुन्हेगार होतो. त्याला खायला अन्न मिळत नसते, तो दारिद्र्याने गांजलेला असतो, त्याच्या वासना काही कारणाने अतृप्त राहतात, त्या तृप्त करावयास त्याला साधन नसते, संयमाचे शिक्षण त्याला मिळालेले नसते, घरची परिस्थिति मोठी उद्वेगजनक असते, त्याला कोणी- माता, पिता, गुरू- असा योग्य मार्गदर्शक मिळालेला नसतो, म्हणून तो गुन्ह्याला प्रवृत्त होतो. अशा वेळी त्याला शिक्षा न करता त्याला रुग्णालयात पाठविणे हेच इष्ट होय. काही शरीराचे रोगी तसे हे मनाचे रोगी. त्यांना मानसिक रोग्यांच्या आलयात पाठवावे, असे हे नवे मत आहे.
 ही विचारसरणी, हे नवे शास्त्र शिक्षणक्षेत्रात तर फारच मान्यता पावले आहे. विद्यार्थ्यांना काही शिक्षा करणे हे आता अगदी रानटीपणाचे मानले जाते. अनेक विद्यार्थी व्रात्य, खोडकर असतात. गुंड, मवाली असतात. अभ्यास करीत नाहीत. घरी दारी उद्धटपणा करतात; तरी त्यांना शिक्षा करणे हे योग्य नव्हे. अशा वेळी शिक्षकांनी त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहावे. त्यांच्या मनाचा सखोल अभ्यास करावा. त्यांच्या घरची परिस्थिति समजून घ्यावी. कोणाला आई नसते. कोणाला भाऊबहीण नसतात. हे नातेवाईक असले तरी ते त्याच्याशी प्रेमाने वागत नसतात. अशी एक ना अनेक कारणे विद्यार्थ्यांच्या या अपप्रवृत्तीच्या मागे असतात. म्हणून त्यांच्या अपकृत्यासाठी त्यांना जबाबदार धरताच येणार नाही ! त्यांच्या भोवतालची परिस्थिति हीच याला जबाबदार असते. तेव्हा ती सुधारण्याचा प्रयत्न करणे, तिच्यातील उणीवा भरून काढणे हे इष्ट आहे. शिक्षा करणे हे अगदी गर्ह्य होय. नवे शास्त्र असे आहे.
 बऱ्याच लोकांना अजून हे शास्त्र मानवत नाही असे दिसते. एलिझाबेथ मॅसि हिल या एका अमेरिकन स्त्रीची तक्रार पाहा. ती म्हणते, "माझी एक मैत्रीण आहे. तिच्या दिराने तिच्या सर्व धनाचा अपहार केला व तो पळून गेला. त्यामुळे ती फार संतापली होती. पण एका मानसशास्त्रज्ञाने तिला उपदेश केला की, 'दिराला दोषी धरून तू त्याच्यावर संतापू नको. आता, तो सधन आहे, त्याला काही कमी नाही हे खरे. पण लहानपणी त्याला केव्हा तरी पैशाची नड फार तीव्रपणे भासली असली पाहिजे. आणि त्या वेळची त्याची ती धनाची तीव्र वासना दडपली गेली असली पाहिजे. ती या रूपाने प्रकट झाली. यात त्याचा दोष काय ? त्याच्याकडे उदार मनाने, सहानुभूतीनेच पाहिले पाहिजे." पुढे तिच्या एका बहिणीची मैत्रीण तिच्या नवऱ्याबरोबर पळून गेली. यातही मानसशास्त्रदृष्टीने रागावण्याजोगे काही नाही. एकपत्नीत्व हे पुरुषाच्या दृष्टीने अनैसर्गिकच आहे. ते समाजाने त्याच्यावर लादले आहे. त्याला ते संभाळता येत नाही म्हणून तो या स्त्रीबरोबर पळून गेला. यासाठी त्याला जबाबदार कसे धरता येईल ? जाब विचारावयाचाच असेल तर समाजाला विचारा. त्या मैत्रिणीबद्दलही असेच धोरण असणे अवश्य आहे. कोणच्याही वस्तूची चोरी करणे- येथे तिने आपल्या मैत्रिणीचा नवरा चोरला होता- हे योग्य नाही, अशी लहानपणी योग्य वेळी तिला शिकवण दिली गेली नसली पाहिजे. म्हणून तिची अशी प्रवृत्ति झाली. यात तिचा दोष नाही. म्हणून त्या दोघांवरही रागावू नका. उलट त्यांना घरी जेवावयाला बोलवा आणि मुलांना त्या स्त्रीला मावशी म्हणायला शिकवा.
 आपल्या अनुभवांतल्या या दोन गोष्टी सांगून एलिझाबेथ हिल अत्यंत उद्वेगून लिहिते, प्रत्येक दुष्ट प्रवृत्तीचे, अपकृत्याचे मूळ लहानपणच्या शिक्षणातील वैगुण्यात शोधावे, किंवा शारीर वा मानसिक अधूपणात आहे असे मानावे, असे हल्ली शास्त्र आहे. व्यक्तीला बुद्धि असते, तिला देवाने अक्कल दिली आहे, तिच्या कृत्याबद्दल तिलाच जबाबदार धरावी, हे कोणाला मान्यच नाही. दर ठिकाणी औदार्य, मृदुता, क्षमा ! मला या उदारमनस्कतेची चीड आली आहे. या पद्धतीने आईबापांवर, परिस्थितीवर वाटेल ते ढकलता येईल ! त्यापेक्षा मुलाला स्वतःला अक्कल आहे असे समजून त्याच्याशी तसे वागणे हेच श्रेयस्कर होईल. तुमच्या या नव्या पद्धतीने समाजाची किंवा व्यक्तीची प्रगति झाली आहे काय ?
 १९२९ साली अब्दुल रशीद या मुसलमान तरुणाने स्वामी श्रद्धानंद यांचा खून केला. त्या वेळी गोहत्ती येथे काँग्रेसचे अधिवेशन चालू होते. त्या सभेत गांधीजी म्हणाले, 'मी अबदुल रशीदला माझा भाऊच मानतो. पुन्हा सांगतो, तो मला भावासारखा आहे. त्याला मी गुन्हेगार मानीतच नाही. हिंदु-मुसलमानांमध्ये वैर पेटवून ज्यांनी हा प्रक्षोभ घडविला तेच खरे गुन्हेगार आहेत. स्वामींच्या खुनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे, रशीदवर नाही.'
 व्यक्ति ही स्वतःच्या अपकृत्याला स्वतः जबाबदार नाही, परिस्थितीमुळे तिच्या ठायी पापप्रवृत्ती गुन्हेगारी वृत्ती निर्माण होते, आणि ती परिस्थिति समाजाने निर्माण केलेली असते, म्हणून अंती व्यक्तीच्या गुन्ह्यांची, तिने केलेले खून, बलात्कार या गुन्ह्यांची जबाबदारी समाजावर आहे. अशी ही अद्ययावत् विचारसरणी आहे. असे हे मानसशास्त्र आहे. आणि मुलांचे गृहशिक्षण, शालेय शिक्षण, गुन्हेगारांचे न्यायदान, त्यांचा तुरुंगवास या सर्व क्षेत्रात या मानसशास्त्राचा प्रभाव आता पडलेला दिसत आहे. भारतानेही सर्व क्षेत्रात या उदार धोरणाचाच अवलंब केला आहे. पण गेल्या बारा-पंधरा वर्षात सर्व क्षेत्रात गुन्हेगारी मात्र भयानक प्रमाणात वाढत आहे. तेव्हा याचा समाजधुरीणांनी जिव्हाळ्याने विचार केला पाहिजे, असे वाटते.
 गेल्या शतकाच्या अखेरीपर्यंत युरोपात स्वतःच्या बऱ्यावाईट अवस्थेला, उत्कर्षाला, भवितव्याला व्यक्ति ही संपूर्णपणे, सर्वस्वी स्वतःच जवाबदार आहे, असे तत्त्वज्ञान रूढ होते. १७७६ च्या सुमारास ॲडम स्मिथ या थोर इंग्रज अर्थकोविदाचा 'वेल्थ ऑफ नेशन्स्' हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. आणि तेथून पुढे इंग्लंड-अमेरिकेतील जीवनावर स्मिथच्या आर्थिक सिद्धान्तांचे शंभरसव्वाशे वर्षे अप्रतिहत वर्चस्व चालू होते. व्यक्तिवादी अर्थशास्त्र म्हणून हे शास्त्र प्रसिद्ध आहे. त्यातील इतर अंगोपांगांशी आपल्याला या ठिकाणी काही कर्तव्य नाही. आपल्याला त्यातला लक्षणीय सिद्धान्त एकच. आणि तो म्हणजे व्यक्तीच्या उत्तरदायित्वाविषयीचा ! वर निर्देशिलेली आजची जी शास्त्रपूत विचारसरणी तिच्या बरोबर उलट तो सिद्धान्त आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत व्यक्तीची जी बरीवाईट परिस्थिति असेल, तिला जे दारिद्र्य वा श्रीमंती प्राप्त झाली असेल, समाजात तिला जो हीन वा श्रेष्ठ दर्जा प्राप्त झाला असेल त्याला तीच सर्वस्वी उत्तरदायी आहे, त्याशी समाजाचा वा परिस्थितीचा काही संबंध नाही असे मत सर्वत्र रूढ होते. कामगारांचे त्या काळात भयंकर हाल होत असत. त्यांचे जीवन म्हणजे नरकवास होता. पण समाजाचे त्या बाबतीत काही कर्तव्य आहे हे व्यक्तिवादी अर्थशास्त्राला मान्यच नव्हते. 'ज्याचा तो' हे त्याचे तत्त्व होते. यावर गेल्या शतकाच्या उत्तरार्धात चौफेर हल्ले होत होते हे खरे आहे. कार्ल मार्क्स, रस्किन, कार्लाइल यांनी आपापल्या परी त्याच्यावर भडिमार चालविला होता. इंग्लंडमध्ये व जर्मनीत कामगारांच्या कल्याणाचे काही कायदे सरकारने केलेही होते. पण अजून व्यक्तिवादी तत्त्वज्ञान जोर करूनच होते. डार्विनच्या 'नैसर्गिक निवडी'च्या व '-जीवनकलहा-'च्या सिद्धान्तांनी त्याला काही काळ पाठिंबाच मिळाला. त्यामुळे व्यक्ती अगदी असहाय व निराधार होऊन समाजात अनर्थ घडत होते. यालाच उद्देशून रस्किनने आपला 'अर्थशास्त्र की अनर्थशास्त्र ?' हा ग्रंथ लिहिला होता. तरी त्या वेळी त्याचा प्रभाव पडला नाही. उलट त्यालाच पंडितांनी प्रतिगामी ठरविले.
 पण हळूहळू व्यक्ती आपल्या स्थितीला, उन्नति- अवनतीला सर्वस्वी जबाबदार नाही, तिचे भवितव्य बरेचसे सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असते, हे मत प्रभावी होऊ लागले आणि आता लंबकाला जबरदस्त हेलकावा बसलेला असून तो दुसऱ्या टोकाला गेला आहे, असे आपल्याला दिसत आहे. प्रारंभी दिलेली उदाहरणे व वचने त्याचीच निदर्शक आहेत. ती पाहता आज आपण दुसऱ्या अनर्थयुगात प्रविष्ट झालो आहोत असे वाटू लागते.
 या दुसऱ्या अनर्थयुगाला प्रामुख्याने मार्क्स व फ्रॉईड यांचे तत्त्वज्ञान कारणीभूत झालेले आहे. मार्क्सचा आर्थिक नियतिवाद प्रसिद्धच आहे. समाजात जी अर्थोत्पादनसाधने असतात, अर्थाच्या, वाटपाच्या व विनिमयाच्या ज्या पद्धती समाजाने रूढ केलेल्या असतात, त्यांवर त्या समाजाची सर्व संस्कृती अवलंबून असते, असा मार्क्सचा सिद्धान्त आहे. जुन्या काळी परमेश्वर सूत्रधार असून मानव म्हणजे त्याच्या हातातील कळसूत्री बाहुली आहेत, असे मत बहुतेक सर्व धर्मग्रंथांत सांगितलेले असे. मार्क्सचा हा आर्थिक नियतिवाद त्याहून फारसा निराळा नाही. मानवाचे कर्तृत्वच मार्क्सवाद अमान्य करतो असे नाही. पण ते कर्तृत्व कसे घडावयाचे, त्याचे स्वरूप काय, यशापयश काय, हे सर्व त्याच्या आर्थिक परिस्थितीने निश्चित होते, असे मार्क्स सांगतो. शेतकरी, कामकरी, बुद्धिजीवी, व्यापारी, भांडवलदार, कारखानदार असे मार्क्सने समाजातील लोकांचे आर्थिक दृष्टीने भिन्न वर्ग कल्पिले आहेत. आणि जुन्या चातुर्वर्ण्यातील जन्मसिद्ध गुणांप्रमाणेच यांचेही वर्गसिद्ध गुण सांगून टाकले आहेत. कामकरी हाच क्रांतीला अवश्य असणाऱ्या गुणांनी संपन्न असावयाचा, बुद्धिजीवी वर्ग हा नेहमी भांडवलदार- कारखानदारांचा दास, गुलाम असावयाचा, भांडवलदार, जमीनदार हे नेहमी क्रांतीचे विरोधक असावयाचे, असा गुणनिश्चय त्याने एकदाच करून टाकला आहे. चातुर्वर्ण्य- व्यवस्थेत ज्याप्रमाणे जन्माने मनुष्याची गुणसंपदा व त्यामुळे नियती निश्चित होते त्याचप्रमाणे साम्यवादी व्यवस्थेत वर्गाने मनुष्याची नियती निश्चित होते असे मार्क्सवाद मानतो. अवतारकल्पनाही मार्क्सला मान्य आहे. पृथ्वीला पापकृत्यांचा फार भार झाला की परमेश्वर साधूंच्या परित्राणासाठी व दुष्कृतांच्या विनाशासाठी अवतार घेतो अशी भारतीयांची श्रद्धा आहे. मार्क्सवादीचीही आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने न्यूटन, नेपोलियन, गॅलिलिओ, गांधी यांसारख्या विशिष्ट कर्तृत्वाच्या पुरुषांची ऐतिहासिक आवश्यकता निर्माण झाली की ते त्या त्या देशात निर्माण होतात व आपापले ऐतिहासिक कार्य करून निघून जातात अशी श्रद्धा आहे. या सगळ्याचा अर्थ असा की, मानवाच्या हातून जे काही बरेवाईट कार्य घडते ते त्याच्या विशिष्ट वर्गामुळे, आणि त्या वेळच्या ऐतिहासिक परिस्थितीमुळे घडते; त्याची स्वतंत्र इच्छाशक्ती अशी काही नसते, किंवा असलीच तर ती संपूर्णपणे बद्ध अशी असते; त्यामुळे अर्थातच त्याच्या हातून घडलेल्या कृत्यांचे जे बरेवाईट परिणाम त्यांना तो जबाबदार नसतो.
 स्वतः मार्क्स व त्याचे अनुयायी यांची या सिद्धान्तांवर इतकी दृढ श्रद्धा आहे आहे की ते ज्योतिष्याप्रमाणे भविष्यही वर्तवितात आणि कोणत्या देशात केव्हा कशा प्रकारची क्रांती घडेल, कोठे घडणार नाही, कोठे परागति होईल हे आपण अचूक सांगू शकतो असे त्यांचे मत आहे. माणूस जेव्हा भविष्य वर्तवितो तेव्हा भावी घटनांच्या मागच्या मानवासुद्धा सर्व प्रेरक शक्ती या नियतिबद्ध आहेत, त्यांना स्वातंत्र्य म्हणून कसलेही नाही हे त्याने गृहीत धरले असलेच पाहिजे. त्यावाचून मानवी इतिहासाविषयी रविचंद्रांचे अस्तोदय, ग्रहणे यांच्याइतकी निश्चित भविष्ये वर्तविण्याचा विचारहि त्याला करता येणार नाही. आणि मार्क्सवाद भविष्ये वर्तवितो हे सर्वश्रुत आहे. कम्युनिस्ट क्रांती प्रथम ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स या औद्यागिक दृष्टीने प्रगत असलेल्या देशात घडेल असे भविष्य मार्क्स एंजल्स यांनी वर्तविले होते हे प्रसिद्धच आहे. मानवाच्या ठायी काही स्वतंत्र शक्ती आहे, त्याच्या अंगी अज्ञात, अनाकलनीय, तर्कसिद्ध कार्यकारणात न बसणारे असे काही सामर्थ्य असू शकते, त्याच्या जोरावर तो परिस्थितीला एकदम हवी ती कलाटणी देऊ शकतो, अनपेक्षित, अपूर्वज्ञात असे काही घडवू शकतो, हे मार्क्सला मान्य नाही हे यावरून उघड दिसते. तसे नसते तर भविष्य वर्तविण्याचे धैर्य त्याला झाले नसते.
 मनुष्याने वाममार्गाचा अवलंब केला, गुन्हा केला, खून केला तरी त्याला गुन्हेगार मानू नये, परिस्थितीमुळे त्याच्या हातून ते कृत्य घडले, त्याला तो जबाबदार नाही, असे मानून त्याला सहानुभूतीने वागवावे, भाई म्हणावे, आपल्या हातून भ्रूणहत्येसारखे पाप घडले आणि त्यासाठी आपल्याला कोणी जाब विचारला तर, 'ते समाजाला विचारा' असे उत्तर त्याला द्यावे, यामागे जी विचारसरणी आहे ती समाजमनात दृढमूल होण्यास मार्क्सवाद कसा जबाबदार आहे हे यावरून कळून येईल. मनुष्याला काही स्वतंत्र अशी मनःशक्ती नाही, जडाप्रमाणे त्याची बुद्धी अगदी तर्कसिद्ध, कार्यकारणबद्ध आहे, त्याला आत्मस्वातंत्र्य म्हणून काही नाही हा पक्ष एकदा स्वीकारल्यानंतर 'ते समाजाला विचारा' ही विचारसरणी क्रमप्राप्तच आहे.
 मनुष्याला सर्वस्वी परतंत्र करून टाकण्यास, त्याचे आत्मस्वातंत्र्य हिरावून घेण्यास मार्क्सवाद जसा कारणीभूत झाला आहे त्याचप्रमाणे अर्वाचीन काळातले मानसशास्त्रातले दोन पंथ कारणीभूत झाले आहेत. ते पंथ म्हणजे डॉ. वॉटसन यांचा वर्तनवाद व डॉ. फ्रॉइड यांचा मनोविश्लेषणवाद. वर्तनवादाचा प्रवर्तक डॉ. वॉटसन हा मनाचे अस्तित्वच मानण्यास तयार नाही; विचार, कल्पना, स्मृती, रागद्वेष इ. भावना या सर्व शरीरप्रकृती होत, असे त्यांचे मत आहे. रुधिराभिसरण, काही ग्रंथींचे चलनवलन, मेंदूतील व इतर अवयवांतील नसांची व धमन्यांची हालचाल यांची ही केवळ निदर्शके होत, हे स्वतंत्र असे मनोव्यापार नव्हत, असे वर्तनवाद मानतो. त्यामुळे लाकूड, लोखंड, माती यांचे रूप व स्थिती ही ज्याप्रमाणे बाहेरून आपण त्यांवर जे संस्कार करू त्यावर अवलंबून असतात त्याप्रमाणे मानवांचे सर्व भवितव्य त्याच्यावर जे बाह्य संस्कार होतील त्यांवर अवलंबून असते, त्याचे निराळे स्वत्व, त्याची अंतःशक्ती असे काही नसते, असा या पंथाचा सिद्धान्त आहे. हे मत डॉ. वॉटसनने इतक्या टोकाला नेले आहे की कोणत्याही व्यक्तीवर इष्ट ते संस्कार करून तिचे जीवन वाटेल त्या नमुन्याप्रमाणे घडविता येईल अशी तो ग्वाही देतो. 'मला एक डझन निरोगी मुले आणि त्यांचे योग्य व इष्ट ते संगोपन करण्यासाठी आवश्यक ती परिस्थिति व सामग्री द्या. मी तुम्हाला त्या मुलांतून वाटेल त्या प्रकारचा मनुष्य- वैद्य, वकील, शास्त्रज्ञ, व्यापारी, भिकारी, चोर, गुन्हेगार निर्माण करून दाखवीन,' असे आव्हानाचे उद्गार त्याने काढले आहेत. याचा अर्थ असा की न्यूटन, नेल्सन, टिळक, गांधी यांच्यासारखे थोर पुरुष किंवा टाटा-बिर्ला यांसारखे कारखानदार, किंवा भूपत, डिलिंजरसारखे दरोडेखोर हुकमी निर्माण करणे समाजाच्या हाती आहे. हा परिस्थितिवाद मार्क्सवादापेक्षाही जास्त धाडसी आहे. अमक्या परिस्थितीमुळे अमका मनुष्य निर्माण होणारच असे मार्क्सवाद म्हणतो, तर वाटेल त्या कर्तृत्वाचा मनुष्य, भोवती इष्ट ती परिस्थिती कायम राखून, इच्छेप्रमाणे निर्माण करता येईल असा वर्तनवादाचा विश्वास आहे. जगाच्या सुदैवाने किंवा दुर्दैवाने इष्ट तो मनुष्य निर्मिण्याचा हा प्रयोग अजून वर्तनवादी लोकांनी केलेला नाही. एवढे सामर्थ्य आपल्या ठायी आहे असा आत्मविश्वास असूनहि डॉ. वॉटसन याने मानसशास्त्राचा व्यवसायच पुढे सोडून दिला आणि तो व्यापारात शिरला. त्याच्या अनुयायांनीही हे विधात्याचे कार्य पुढे कघी करण्याचे मनात आणले नाही. कारण आपल्याला मन आहे हेच त्यांना मान्य नव्हते.
 गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याच्या जबाबदारीतून मुक्त करणारा दुसरा मानसशास्त्रातला पंथ म्हणजे फ्रॉइडचा पंथ होय. डॉ. वॉटसनचा वर्तनवाद एकेकाळी बराच गाजला असला तरी लोकमतावर त्याचा फारसा प्रभाव कधी पडला नाही. कारण प्रत्येकाला स्वानुभूतीने जाणवणारे मन अस्तित्वातच नाही, असा विचित्र दावा त्याने मांडला होता. डॉ. फ्रॉइडच्या मनोविश्लेपणपंथाचे मात्र तसे नाही; आज मार्क्सवादाइतकेच याचे जगावर वर्चस्व आहे. वॉटसन मन नाहीच असे मानतो, आणि फ्रॉइड मनच सर्व आहे असे मानतो. पण आत्मस्वातंत्र्याच्या, मनुष्याच्या स्वतंत्र इच्छाशक्तीच्या दृष्टीने दोन्ही सारखेच नियतिवादी आहेत. गुन्हेगारांना रोगी मानावे हे तत्त्व जगाने फ्रॉइडच्या सांगण्यावरून स्वीकारले आहे आणि प्रत्यक्ष आचरणांत आणले आहे.
 मानवाच्या स्वाभाविक प्रवृत्ती या समाजविघातक आहेत. पण समाजात राहावयाचे तर त्या प्रवृत्ती मानवाला नियंत्रित कराव्या लागतात, दडपून टाकाव्या लागतात. यांतल्या काही अपप्रवृत्तींचे उन्नयन होते आणि त्यामुळे व्यक्ती श्रेष्ठपदाला जाते व समाजाचीही प्रगति होते. पण बऱ्याचशा प्रवृत्ती राखेखाली अग्नि राहावा तशा सुप्त अवस्थेत राहतात, आणि अनेक मार्गांनी मनुष्याचे वर्तन नियत करतात असे थोडक्यात फ्रॉइडचे मानसशास्त्र आहे. 'सायकोपॅथॉलजी ऑफ एव्हरी-डे लाइफ' असा एक ग्रंथ त्याने लिहिला आहे. त्यात आपल्या दैनंदिन व्यवहारातील नाव विसरणे, काम विसरणे, वाचताना शब्द चुकणे, लिहिताना तो चुकीचा लिहिणे, एखाद्या विशिष्ट आकड्याकडे विशेष कल असणे, मनात एक विचार असून नकळत कृती दुसरीच होणे, या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण लहानपणी दडपलेल्या भावना, आकांक्षा अप्रीती यांच्या संदर्भातून त्याने दिले आहे. तीन हा आकडा तुम्ही विसरला तर लहानपणी तीन नंबरच्या बहिणीशी तुमचे भांडण होत असे हे त्याचे कारण. केळी आणायची असून तुम्ही आणली नाहीत तर लहानपणी केव्हा तरी वडिलांच्या हातचा केळ्यावरून तुम्ही मार खाल्ला असावा, किंवा केळ्यावरून तुम्ही घसरून पडला असावा हे त्याचे कारण. सावली हा शब्द लिहिताना तुम्ही चुकलात तर लहानपणी अस्पृश्यांची सावली घेऊं नये हा विचार तुमच्या मनावर ठसविला गेला होता, हे त्याचे कारण. असे प्रत्येक कृतीचे मूळ कारण या निरुद्ध भावनात असते हेच त्याने या सर्व ग्रंथात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक वाचीत असताना, ते लिहिताना लेखक शुद्धीवर नसावा अशी शंका येते. एरवी ती बोलून दाखविण्याचे धैर्य मला झाले नसते. पण अनेक मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी याच शब्दांत त्याची संभावना केली आहे. प्रा. जोसेफ जॉस्ट्रो यांनी फ्रॉइडने मानवी मनाच्या अभ्यासाची एक नवी दिशा दाखविली हे मान्य करूनहि त्याची स्वप्नांची व दैनंदिन व्यवहारातील चुकांची शेकडो स्पष्टीकरणे केवळ हास्यास्पद व वेडगळ आहेत असे म्हटले आहे. या तर्कप्रणालीने वाटेल ते सिद्ध करता येईल आणि त्यामुळे अनेक अनर्थ घडतील हे त्यांनी दाखवून दिले आहे. ते म्हणतात की, ज्यामुळे काहीही सिद्ध होते, त्याने काहीही सिद्ध होत नाही, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. शेवटी फ्रॉइडचा नियतिवाद हा प्रत्यक्ष अनुभवाच्या कसोटीला टिकणे शक्य नाही, त्याच्यावर फ्रॉइडने टाकलेला भार पेलण्यास तो असमर्थ आहे असा त्यांनी निर्णय दिला आहे. (फ्रॉइड- हिज ड्रीम अँड सेक्स थिअरीज्- प्रकरण ७ वे) 'लिमिटेशन्स् ऑफ सायन्स' या आपल्या ग्रंथात फ्रॉइडविषयी चर्चा करताना प्रख्यात शास्त्रज्ञ जे. डब्ल्यू. एन्. सुलिव्हान म्हणतात की, 'मनुष्याच्या अत्यंत विविध प्रकारच्या कृति, त्याच्या वागणुकीतल्या सर्व लहानमोठ्या गोष्टी या कामगंडाने प्रेरित आहेत असे म्हणणे आणि त्या परमेश्वरप्रेरित आहेत असे म्हणणे एकच आहे. ज्या स्पष्टीकरणाने प्रत्येक गोष्ट स्पष्ट होते त्याने काहीच स्पष्ट होत नाही.-' (पृ. २०१).
 फ्रॉइडमताविषयीचा हा अभिप्राय फार महत्त्वाचा आहे. मानवी जीवन संपूर्णपणे कधीच उलगडून दाखविता येणार नाही. जडसृष्टीप्रमाणे शास्त्रीय नियमांच्या किवा कार्यकारणांच्या कैचीत ते बसवून दाखविणे हे अगदी अशक्य आहे, असा त्याचा अर्थ आहे. अशा स्थितीत कोणी तसा प्रयत्न केला तर जुन्या काळच्या परमेश्वराचाच त्यांना आश्रय करावा लागतो. हे शास्त्रज्ञ त्याला प्रत्यक्ष परमेश्वर म्हणणार नाहीत हे खरे. आपण काही शास्त्र सांगत आहो अशीच प्रौढी ते मिरवीत राहणार. पण त्यांनी मानलेली प्रेरकशक्ती ही सर्वंकष आहे, प्रत्येक गोष्ट तिने स्पष्ट करता येते, हे दाखविण्यासाठी ते जी ओढाताण करतात, वाटेल तसे धागेदोरे जोडतात, जे कार्यकारणसंबंध जुळवितात, ते पाहिले की, धर्मभोळे लोक प्रत्येक गोष्ट परमेश्वराशी नेऊन भिडविताना जी ओढाताण करतात ती व ही एकच आहे असे दिसू लागते. मार्क्सची ऐतिहासिक आवश्यकता ही अशीच अंबाभवानीसारखी आहे. ती सर्वव्यापी, सर्वसमर्थ, सर्वसाक्षी आहे. आर्थिक प्रगति खुंटताच ती अवतार घेते आणि जळी स्थळी, काष्ठी, पाषाणी भक्तांना दर्शन देते. शास्त्रज्ञांचा अभिप्राय असा की मानवी जीवनाच्या संबंधात अशी शक्ती मानणे आणि परमेश्वर मानणे यात फरक नाही.
 या दोघाही थोर शास्त्रज्ञांनी मानसशास्त्र हे शास्त्र नव्हे असे तर सांगितले आहेच. पण शिवाय जडशास्त्रांच्या ज्ञानालाहि आज मर्यादा पडत आहेत आणि अनेक घटना शास्त्रीय कक्षेत येण्याचे नाकारीत आहेत, शास्त्र त्यांच्यापुढे हतबुद्ध होऊन बसले आहे, हे ते जगाच्या निदर्शनाला आणीत आहेत. यावरून आपण हे जाणले पाहिजे की मानवी मन अजून बव्हंशी अज्ञात आहे. कार्यकारणाच्या कैचीत ते कधीही बसणार नाही. आणि याचाच अर्थ असा की व्यक्तीला आत्मस्वातंत्र्य आहे. व्यक्तीच्या मनावर अनुवंश, भौगोलिक परिस्थिति, घर, शाळा, धर्मपीठ येथे होणारे विविध संस्कार या सर्वांचा परिणाम होत असतो. पण त्याच्याही पलीकडे मनुष्याचे मन म्हणून काही राहतेच. कारण या सर्व संस्कारांच्या अगदी विरुद्धही अनेक वेळा त्याची ठेवण झालेली असते, हे व्यवहारांत पदोपदी आपल्या अनुभवास येते. अमकी परिस्थिति म्हणजे असा मनुष्य, हे मुळीच ठरलेले नाही. धनाच्या साह्याने काही माणसे श्रेष्ठपदी जातात, काहींचा अधःपात होतो. संकटातच काही माणसांचे कर्तृत्व उमलून येते तर काहींचे संकटाने करपून जाते. यावरून असे स्पष्ट दिसते की परिस्थितीला उलट सुलट कलाटण्या देणारी, तिच्या निरपेक्ष मानवी भवितव्याला वळण लावणारी अशी मनुष्याच्या ठायी एक अंतस्थ शक्ती आहे. आणि कोणत्याहि नियमात ती बसत नसल्यामुळे ती स्वतंत्र आहे हे मान्य करावेच लागते.
 हे मान्य करताच, मनुष्याच्या बऱ्यावाईट कृत्यांच्या परिणामांना तो जबाबदार नाही, परिस्थिति जबाबदार आहे, तेव्हा गुन्हेगारांना गुन्हेगार न मानता रुग्ण मानावे व त्यांना शिक्षा न करता त्यांच्यावर मानसोपचार करावे, या सगळ्या अर्वाचीन कल्पना म्हणजे वाऱ्यावरच्या वावड्या आहेत, त्यांना शास्त्रीय आधार कसलाहि नाही, हे आपल्या ध्यानात येईल.
 ही सर्व शास्त्रीय चर्चा झाली. मनुष्य स्वतःच्या बऱ्यावाईट कृत्यांच्या परिणामांना जबाबदार आहे की नाही हा केवळ तात्त्विक चर्चेचा विषय असता तर त्याचा एवढा खल करण्याचे कारणही पडले नसते. पण तसे नाही. हा विषय समाजाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. कारण समाजाचा उत्कर्षापकर्ष, यांपैकी कोणते मत लोक स्वीकारतात, त्यावर फार मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. भारताने अनेक शतके कर्मतत्त्वाचा स्वीकार केला होता. पूर्वजन्मीच्या कर्माने मनुष्य बद्ध आहे. त्यातून मुक्त होणे त्याला जवळ जवळ अशक्य आहे, असे मत येथे हजारो वर्षे रूढ आहे. परमेश्वर जगाचा सूत्रधार आहे आणि सर्व मानवप्राणी तो लीलानाटक बाहुल्याप्रमाणे खेळवीत असतो, त्यांना स्वातंत्र्य असे काही नसते हेही मत वरच्याप्रमाणेच येथे दृढमूल झालेले आहे. किंबहुना ही दोन्ही मते एकच आहेत असे पुष्कळ लोक मानतात.

ईश्वरः सर्व भूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति
भ्रामयन् सर्व भूतानि यंत्रारूढानि मायया - गीता १८.६१

 ईश्वर हा सर्व प्राणिमात्रांना यंत्रावर चढवून आपल्या मायेने त्यांना फिरवीत असतो, असे गीता सांगते. परमेश्वराची ही माया म्हणजेच कर्म होय. या कर्माने मनुष्य बद्ध आहे. परमेश्वराची त्याने भक्ती केली तर त्यातून तो मुक्त होईल. पण भक्ति करावी ही बुद्धी होणे न होणं हे सुद्धा कर्मावर अवलंबून आहे. कारण 'बुद्धिः कर्मानुसारिणी !' केवळ मानवच या कर्माने बद्ध आहे असे नव्हे तर ब्रह्मा, विष्णु, शंकर, सूर्य, इन्द्र इ. सर्व देवहि या चक्रात सापडलेले आहेत, अशा अर्थाची अनेक वचने संस्कृतात आहेत. भर्तृहरीने तर म्हटले आहे की, सर्व देव असे कर्मवश असल्यामुळे त्यांना नमस्कार करण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा कर्माला करावा हे बरे.
 मनुष्य कर्माने बद्ध आहे याचाच अर्थ असा की त्याला इच्छा-स्वातंत्र्य किंवा प्रवृत्ति-स्वातंत्र्य नाही. आणि मग अर्थातच त्याच्या भवितव्याला तो जबाबदार नाही. हे मत आपल्या समाजात रूढ झाल्यामुळे या देशाला सात आठ शतके कोणची दुर्गती प्राप्त झाली होती हे इतिहास सांगतोच आहे. कर्मतत्त्वावरील श्रद्धेमुळे माणसे दैववादी होतात आणि त्यांच्या ठायीचे सर्व कर्तृत्व नष्ट होते. यातूनच निवृत्तिवाद निर्माण होऊन त्याने सर्व समाजाला एकदा ग्रासले की तमोयुग निर्माण होऊन समाज शतकानुशतके अज्ञान, दारिद्र्य, पारतंत्र्य या नरकवासात खितपत पडतो. ब्रिटिश येथे येण्यापूर्वी सात आठ शतके भारत असाच तमोयुगात निश्चेष्ट होऊन पडला होता, त्याचे कारण हेच आहे. मानव बद्ध आहे, त्याला प्रवृत्तिस्वातंत्र्य नाही या तत्त्वावरील श्रद्धा !
 येथे एक खुलासा करणे अवश्य आहे. भारतातल्या कर्मतत्त्वाचा असा अर्थ आहे की नाही याविषयी मतभेद असणे शक्य आहे, नव्हे तसे आहेतच. तसेच मार्क्सचे ऐतिहासिक आवश्यकतेचे तत्त्व व फ्रॉइडचे (लिबिडो) कामगंडाचे तत्त्व याबद्दलहि मतभेद आहेत. वर या दोन तत्त्ववेत्त्यांच्या मतांचे जे अर्थ केले आहेत तसे ते नाहीत आणि त्यामुळे त्यातून जर काही अनर्थ झाले असतील तर त्याला ते मुळीच जबाबदार नाहीत, असे अनेक पंडितांचे मत आहे. आपल्या प्रस्तुत विवेचनाच्या दृष्टीने याला महत्त्व नाही. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा समाजाने काय अर्थ केला, याला महत्त्व आहे. कारण मूळ तत्त्व कसेही असले तरी समाज त्याचा अर्थ व आचार काय करील यावर त्याचा उत्कर्षापकर्ष अवलंबून राहणार हे उघड आहे. गीतेच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होईल. श्रीकृष्णाच्या मनात गीतातत्त्वाचा एकच अर्थ असेल. पण आज गीतेचे अनेक तऱ्हांनी अर्थ लावले जातात. गीता निवृत्तिपर आहे की प्रवृत्तिपर हा मोठाच वाद आहे. आणि मूळ गीतेची जेव्हा चर्चा करावयाची असेल तेव्हा त्याला फारच महत्त्व आहे. प्रस्तुत विचाराच्या दृष्टीने कोणच्या काळी समाजाने त्याचा कोणता अर्थ केला आणि त्याचे परिणाम काय झाले एवढ्याच प्रश्नाला महत्त्व आहे. 'जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले', 'मुख्य पूजेचे आयतन प्राणिमात्रा सुखदान', 'दया करणे जे पुत्रासि तेचि दासा आणि दासी' अशी अनेक वचने आपल्या संतवाङ्मयात आहेत. तशी धर्मग्रंथातही आहेत. पण आपण फक्त वैयक्तिक पुण्याच्या दृष्टीनेच त्यांचा विचार केला आणि युरोपीय लोकांनी, सामाजिक पुण्याच्या दृष्टीने त्यांचा अर्थ लावला. त्यामुळे त्यांच्या व आपल्या वैभवात जमीनअस्मानाचे अंतर पडले. ते सर्व जगाचे जेते झाले व आपण सर्व जगाचे दास झालो. तेव्हा मूळ तत्त्वज्ञानाचा कोणता अर्थ समाजात रूढ होतो त्यालाच फक्त प्रस्तुतच्या विवेचनाच्या दृष्टीने महत्त्व आहे, हे ध्यानी घ्यावे.
 त्या दृष्टीने पाहता पूर्वकर्म ही नियती आहे, मनुष्य स्वतःचे भवितव्य ठरविण्यास असमर्थ आहे, त्याला कसलेहि इच्छास्वातंत्र्य नाही, कर्माच्या रहाटगाडग्यात सापडल्यावर गाडग्याप्रमाणे वरखाली फिरत राहणे एवढेच मनुष्याच्या हाती आहे, हे तत्त्वज्ञान भारतात आणि एकंदर पूर्वेकडच्या बहुतेक देशात अनेक शतके रूढ झाले होते आणि त्यामुळेच हे देश या काळात जीवहीन, चैतन्यहीन होऊन गेले होते, हे कोणालाही मान्य करावे लागेल असे वाटते. या काळात मधूनमधून काही पराक्रमी महापुरुष निर्माण झाले हे खरे; पण त्यांनी हे कर्मतत्त्व, ती निवृत्ती, ती कालवशता, ती जन्मवशता, हे सर्व उधळून दिले होते असे इतिहास सांगतो. त्यांच्या हातून पराक्रम झाले आणि काही काल त्यांचा समाज उत्कर्ष पावला याचे कारण हेच आहे. पण सामान्यतः या देशात या दीर्घकालखंडात 'आपण बद्ध आहो, पराधीन आहो, दैवायत्त आहो, प्रवाहपतित आहो, प्राक्तनात असेल तसे होणार आहे, विधिलिखित चुकत नाही', हेच तत्त्वज्ञान जनमानसात दृढमूल झाले होते, याविषयी दुमत होईलसे वाटत नाही.
 आपण परिस्थितिवश आहो, आपल्या हाती काही नाही, आपल्या अपकर्षाची जबाबदारी आपल्यावर नाही, आपला उत्कर्ष साधणे आपल्या हाती नाही हे तत्त्वज्ञान ज्या समाजाने पत्करले त्याचा कसा अध:पात होतो, तो कसा कर्तृत्वहीन होतो हे पाहण्यासाठी अगदी नजीकचे उदाहरण घ्या. ते म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर समाजाचे. १८५० पासून या समाजाने असले तत्त्वज्ञान पत्करले आहे. आपल्या नाशाला, अधःपाताला दरवेळी ब्राह्मण कारणीभूत झाले आहेत, असे हा समाज आज शंभर वर्षे मानीत आला आहे आणि अजूनही मानीत आहे. कौरवपांडवांपासून आज हजारो वर्षे क्षत्रिय राजे आपसात लढत आहेत व स्वतःचा नाश करून घेत आहेत. पण महात्मा फुले व त्यांचे अनुयायी यांचे मत असे की क्षत्रिय लढले ते ब्राह्मणांच्या चिथावणीमुळे लढले. लढू नये हे त्यांना कळत होते. पण ब्राह्मणांनी त्यांच्यात कलह लावून दिला. दशरथाने रामाला वनात हाकलून दिले व रामाने पुढे सीतात्याग केला हे सर्व ब्राह्मणांनी घडवून आणले. आपल्या समाजात अस्पृश्यता आहे. जातिभेद आहे. चातुर्वर्ण्य आहे. या सगळ्यांचे सर्व क्षत्रिय राजांनी अट्टाहासाने रक्षण केले आहे. म्हणजे समाजातील या विषमतेला क्षत्रिय फार जबाबदार आहेत. पण ब्राह्मणेतर पंडितांचे म्हणणे आहे की ब्राह्मणांनी हा विषमतेचा धर्म लिहिला व मग त्यांच्यावर कृपा म्हणून क्षत्रियराजांनी त्याला पाठिंबा दिला ! तेव्हा त्यातून जी अनर्थपरंपरा ओढवली तिला आम्ही जबाबदार नाही. ते अपश्रेय ब्राह्मणांचे आहे. अनेक क्षत्रिय राजे, सरदार स्वामिद्रोही झाले. देशद्रोही झाले. पण ते ब्राह्मणांचेच कारस्थान. क्षत्रिय भोळे असतात, ब्राह्मण त्यांना सहज फसवितात. तेव्हा स्वामिद्रोहाची, देशद्रोहाची जबाबदारी त्यांच्यावर येत नाही. (या विषयाचे सविस्तर विवेचन 'भारतीय लोकसत्ता" या माझ्या ग्रंथात 'ब्राह्मण-ब्राह्मणेतरवाद' या प्रकरणात केलेले आहे.) मागल्या काळाविषयी असे लिहून ब्राह्मणेतर पंडित थांबले नाहीत. १८५० च्या नंतरच्या काळातहि मराठा समाज व इतर ब्राह्मणेतर समाज मागासलेला राहिला, त्याला कारणहि त्यांच्या मते ब्राह्मणच. ब्राह्मणांनी त्यांना शिक्षण घेऊ दिले नाही. सावकारी करून त्यांना छळले व भारताचे कल्याणकर्ते जे इंग्रज त्यांच्या राज्याला विरोध केला. वास्तविक ब्राह्मणेतरांना शिक्षण देणे न देणे हे या काळात ब्राह्मणांच्या हाती मुळीच नव्हते. महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठीसुद्धा शाळा काढली होती, त्यावरून हे स्पष्ट आहे. राजर्षी शाहू, सयाजीराव गायकवाड, ग्वाल्हेरचे शिंदे यांनी, मराठ्यांनी शिकावे यासाठी फार प्रयत्न केले. पण त्या समाजाला त्याचे महत्त्व वाटले नाही. त्याने शिकावयाचे ठरविले असते तर त्याला अडविणे ब्राह्मणांना कालत्रयी शक्य झाले नसते. पण आपल्या मागासलेपणाला ब्राह्मणच जबाबदार आहेत, असे या पंडितांनी कायमचे ठरवून टाकले आहे. आणि दुर्दैव असे की या दुरवस्थेतून आपण आपल्या हिमतीवर सुटू शकणार नाही, इंग्रजच आपल्याला सोडवू शकतील हाही विचार त्यांनी बहुजनसमाजात दृढमूल करून टाकला. या एवढ्या काळात ब्राह्मण सावकार व गुजराती वाणी खेड्यातल्या कुणब्याला नागवीत होता हे खरेच आहे. पण हा अनर्थ टाळण्यासाठी मराठा सावकार, मराठा दुकानदार निर्माण करण्याचा प्रयत्न ब्राह्मणेतर धुरीणांनी मुळीच केला नाही. विज्ञानाच्या अभावामुळे, सृष्टिघटनांच्या अज्ञानामुळे, लोकभ्रमामुळे, बुद्धिवादाच्या अभावामुळे, गरीब जनता पुरोहितवर्गाच्या वर्चस्वाखाली येते. त्यातून तिला सोडविण्यासाठी भौतिक ज्ञानाचा प्रसार करणे हा एकमेव उपाय आहे. पण ब्राह्मणेतरांनी हा प्रयत्न मुळीच केला नाही. तरीपण आपल्या अधःपाताला आपण जबाबदार आहो असे त्यांना वाटत नाही. त्यामुळे या समाजातून ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी जसे कर्तृत्वशाली पुरुष निर्माण झाले तसे गेल्या शंभर वर्षात झाले नाहीत. भारतातील इतर प्रांतातून महात्माजी, वल्लभभाई, विठ्ठलभाई, स्वामी विवेकानंद, स्वामी श्रद्धानंद, लजपतराय, डॉ. राजेंद्रप्रसाद हे जसे अखिल भारताचे नेतृत्व करण्यास समर्थ असलेले पुरुष ब्राह्मणेतर समाजात निर्माण झाले तसे महाराष्ट्रात झाले नाहीत. इतिहासकार, तत्त्ववेत्ते, वक्ते, कवी, नाटककार, गणितज्ञ, अर्थवेत्ते हेही त्या समाजातून उदयास आले नाहीत. १९३० नंतर, इंग्रज आपले त्राते, ही भावना या समाजातून गेली. पण अजूनही हा समाज अंतर्मुख होऊन आत्मसंशोधन करीत नाही. आपल्या अधःपाताला आपण जबाबदार आहो ही जाणीव स्वतःला व स्वसमाजाला करून देण्यास तो अजूनही सिद्ध नाही. हे नाही तोपर्यंत वरील वैभवशाली कर्तृत्व तो निर्माण करू शकणार नाही.
 सुदैवाने डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाला हे महनीय तत्त्व पटवून देण्याची शिकस्त केली आहे. सर्व समाज व विशेषतः ब्राह्मण यांच्यावर ते भडिमार करतात, आग पाखडतात. आणि ते करणे योग्यच आहे. कारण अस्पृश्यांच्या हीनावस्थेला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे त्रैवणिक निश्चितच जबाबदार आहेत. पण काही झाले तरी अंती स्वतःच्या उत्कर्षापकर्षाला ज्याचा तोच जबाबदार असतो, अंतिम जबाबदारी त्याचीच असते, हा कटु पण सत्य विचार आंबेडकर अस्पृश्यांच्या मनावर ठसवीत असत. त्या समाजापुढे बोलताना शत्रू वापरणार नाही, अशा कटु आणि मर्मभेदक शब्दात ते लोकांना बोलत. सवर्ण समाजाने खूप छळले पण तुम्ही ते का सोसले, तुम्ही अन्यायाचा प्रतिकार करताना मरून का गेला नाहीत ? असा सवाल ते करीत; आणि त्यांच्यापुढे जगायचे असेल तर वाघ म्हणून, नेते म्हणून जगा, शेळी म्हणून, गुलाम म्हणून, जगू नका, असा उपदेश करीत.
 विष्णुशास्त्री, टिळक, आगरकर पदोपदी इंग्रजी राज्यामुळे भारतात कसे अनर्थ होत आहेत, हे भारतीय जनतेला समजावून देत असत. टिळकांनी तर त्या ब्रिटिश राज्याविरुद्ध भारतात असंतोष निर्माण केला. येथल्या दारिद्र्याला, येथल्या विघटनेला आणि भारताच्या हरएक प्रकारच्या विपन्नावस्थेला ब्रिटिशच जबाबदार आहेत असे या धुरीणांचे निश्चित मत होते. पण असे असले तर अंती आपल्या पारतंत्र्याला, दैन्याला, दुबळेपणाला आपले आपणच कारण आहो या विचाराचा त्यांना कधीही विसर पडला नव्हता. इंग्रजांवर त्यांनी एकपट टीका केली असली तर स्वसमाजावर दसपट केली आहे. आपले अज्ञान, आपली देशाभिमानशून्यता, कूपमंडूक वृत्ती, आपल्या रक्तात भिनलेली निवृत्ती, आपली विषम समाजरचना, शास्त्रज्ञानाचा अभाव, हे आपले दुर्गुणच सर्व अनर्थाच्या वुडाशी आहेत हे ते कंठरवाने सांगत असत. हा दृष्टिकोनच समाजाचा उदय घडवून आणीत असतो. आपल्या सर्व अधःपाताचे खापर ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या माथी फोडून ते थोर पुरुष स्वस्थ बसले असते, तर शतकानुशतके आपण पारतंत्र्यातच राहिलो असतो. केमालपाशा नेहमी म्हणत असे की, जगात जुलूम चालतो, किंवा जुलूम करणारे लोक असतात, हे मला मान्यच नाही. मला एकच सत्य माहीत आहे. जगात जुलमापुढे मान वाकविणारे, भेकडपणे अन्याय सोसणारे लोक फक्त असतात !
 जे समाजाच्या बाबतीत तेच व्यक्तीच्या बाबतीत खरे आहे. कोणत्याही कारणाने व्यक्तीने परिस्थितिवाद स्वीकारला, आपल्या अधःपाताचे उत्तरदायित्व आपल्याकडे नाही, अशी समजूत करून घेतली, 'ते समाजाला विचारा' अशी वृत्ति स्वीकारली की, तिला व म्हणूनच समाजाला झपाट्याने अवकळा येऊ लागते. याबाबत अमेरिकेचे उदाहरण अत्यंत उद्बोधक आहे. नवी तत्त्वज्ञाने अंधपणे स्वीकारण्यापूर्वी भारताने सध्याच्या अमेरिकन समाजाचा फार बारकाईने अभ्यास करणे अवश्य आहे.
 अमेरिकेत आज गुन्हेगारी किती वाढली आहे याची सहजासहजी आपल्याला कल्पना येणार नाही. पण आपला समाज सर्वनाशाच्या कडेवर येऊन ठेपला आहे, असे तेथले विचारवंत आज सांगू लागले आहेत. दर १९ सेकंदाला तेथे एक गुन्हा घडतो. म्हणजे वर्षाला १६ लक्ष गुन्हे होतात. त्यात १२९६० खून असतात. दिवसाला तेथे ३६ खून होतात ! हे आकडे १९४९ सालचे आहेत. आता हे प्रमाण दुपटीवर सहज गेले असेल. वेड्या माणसांचे प्रमाण तेथे असेच वाढत आहे. १८८० साली दर लाखात ६४ माणसे वेडी असत. १९४६ साली हे प्रमाण ३७५ वर आले आहे. चोरी, सुरामारी, बलात्कार, दरोडेखोरी याला तेथे सीमाच राहिली नाही. त्या समाजाचा हा भयानक अधःपात कशामुळे झाला आहे ?
 आज पन्नाससाठ वर्षे अमेरिका नवे अर्थशास्त्र, नवे मानसशास्त्र, नवे गुन्हेगारीचे शास्त्र यांच्या आधारे समाजावर उपचार करीत आहे. शिवाय गुन्हा अपरिहार्य करून टाकणारी परिस्थिति तर तेथे आता मुळीच नाही. दारिद्र्य, अन्नान्न दशा, बेकारी, उपासमार यांमुळे मनुष्य गुन्ह्याला प्रवृत्त होतो असे पूर्वी रूढ मत होते; पण सध्या अमेरिकेत ऋद्धीसिद्धी पाणी भरीत आहेत. कामगारांना ४०० रु. महिना हे किमान वेतन आहे. अमुक एक सुखसोय तेथल्या जीवनात नाही, असे नाहीच. कामवासनेच्या तृप्तीचा तेथे प्रश्नच उद्भवत नाही. तारुण्यात पदार्पण करताच, किंवा त्याच्या आधीच तरुण- तरुणींना एकमेकांचा सहवास, अगदी निकट सहवास लाभतो. सत्तेपासून वंचित असा समाज, असा वर्ग तेथे नाही. प्रत्येक व्यवहार लोकायत्त असल्यामुळे आणि हजारो सार्वजनिक संस्था प्रत्येक प्रांतात असल्यामुळे आपल्या अहंगंडाची तृप्ती प्रत्येकाला करून घेता येते. खेळ, नाट्य, नृत्य, काव्य, यातून वासनांचे उन्नयन व निचरा करण्याची संधि जगात कोठे नसेल इतकी तेथे आहे. असे असूनही तेथे दरसाल गुन्हेगारांची, बालगुन्हेगारांची, घटस्फोटांची, वेड्यांची, भ्रष्टांची, पतितांची, अफीणांची, जुगाऱ्यांची संख्या वाढतच आहे.
 या सर्वाला कारण नवा परिस्थितिवाद, नवे मानसशास्त्र, हे आहे असे अमेरिकेतील विचारवंतच आता सांगू लागले आहेत. 'ते समाजाला विचारा' ही वृत्ती या अनर्थाला कारण झालेली आहे. 'नॅशनल शेरीफ असोसिएशन-' पुढे बोलताना डॉ. रूथ अलेक्झांडर यांनी हेच विचार मांडले आहेत. "बाल गुन्हेगारांना मायाळूपणे वागवावे, त्यांना गुन्हेगार न मानता रोगी मानावे, त्यांच्या मनोव्यापाराचे मानसशास्त्रीय अवागाहन करावे, या विचारसरणीतून हे अनर्थ निर्माण झाले आहेत. याचा परिणाम असा झाला की आपल्याला कसलीही शिक्षा होत नाही हे ध्यानात आल्यामुळे बाळांच्या मनातला दैवी अंश जागा होण्याऐवजी सैतान फक्त जागा झाला आहे," असे त्या म्हणतात. न्यायमूर्ति विल्फ्रेड वॉल्टमेड यांच्या मते या गुन्हेगारीच्या वाढीला सध्याची शिक्षणपद्धति म्हणजे तेथले मानसशास्त्र हे कारण आहे. मुलांना स्वातंत्र्य द्यावे, त्यांचे मानसशास्त्र पाहावे, त्यांचा आत्माविष्कार होऊ द्यावा, हे जे थोतांड माजले आहे त्याचे हे परिणाम आहेत. घरी, दारी, शाळेत, कोठेही मुलांच्यात अपप्रवृत्ती दिसताच त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, असे त्यांचे मत आहे. यावरून मुलांना त्यांच्या गुन्ह्याबद्दल जबाबदार धरावे असे न्यायमूर्तीचे मत आहे हे स्पष्ट दिसते. जेन व्हाईट ब्रेड या बाईंनी नव्या मानसशास्त्राने अमेरिकन घरात काय अनर्थ घडविला आहे त्याचे सविस्तर वर्णन केले आहे. मुलांना दटावावे, काही गोष्टी त्यांना मना कराव्या, हे कोठे राहिलेच नाही. कारण त्यांच्या वासना दडपल्या जातील; आणि मग त्यांच्या नेणीवेत अनिष्ट गंड तयार होतील ! माझा मुलगा जिम याला त्या अमक्या चित्रपटाला जायचे आहे. तो चित्रपट घाणेरडा आहे हे आम्हाला- त्याच्या मातापित्यांना- माहीत आहे. पण आपल्या मनाईने त्याची इच्छा दडपणे योग्य नव्हे म्हणून आम्ही गप्प बसतो व जिम त्या घाणेरड्या चित्रपटाला जातो. सॅली चार वर्षांची आहे. धाकट्या बाळाला दूध पाजू लागताच ती रोज बाटली हिसकून घेते. मग आईने काय करावे ? ती बाहेर गेल्यावर बाळाला बाटली द्यावयाची ! कारण सॅलीला रागावले तर बहिणीबद्दल तिला वाटणारा मत्सर दडपला जाईल ! एका स्त्रीचा १० वर्षांचा मुलगा फिलिप घरात चोऱ्या करू लागला. त्याने वडिलांच्या खिशातील नोटा लांबविल्या. पुढे चोरी उघडकीला आल्यावर आईने त्याला जाब विचारला. तो म्हणाला, 'मला निष्णात चोरी करता येते की नाही हे पहावयाचे होते.' त्याला शिक्षा करण्याचे धैर्य आईला झाले नाही. कारण ती व्हिक्टोरियन युगातली ठरली असती ! ही उदाहरणे सांगून, आम्हा मातापित्यांच्या दुबळेपणाला फ्रॉईडचे मानसशास्त्र कारणीभूत आहे, असे जेन व्हाइट ब्रेडने म्हटले आहे.
 अलेक्सिस कॅरेल या थोर शास्त्रज्ञाने हेच मत दिले आहे. त्याने सर्वच परिस्थितिवादी पंथांचा विचार केला आहे. तो म्हणतो की, अर्थवादी लोकांनी हे ध्यानात घ्यावे, की रोजगार, अन्न, विश्रांती यांखेरीज आणखीही कशाची तरी मनुष्याला गरज असते. शरीर-गरजांप्रमाणेच आत्मिक गरजाहि मनुष्याला असतात. आणि आर्थिक आपत्तींना नैतिक व वैचारिक कारणेही असू शकतात. मनुष्याला अर्थबद्ध यंत्र मानणे हे जसे घातक तसेच, तो केवळ मनोगंडाधीन आहे असे मानणे हेही घातक आहे, हा विचार सांगून कॅरेल म्हणतो की, फ्रॉइडने जडवादी लोकांपेक्षाही समाजाचा घात केला आहे. (मॅन दि अन्नोन, पृ. २५८) अमेरिकन पंडित हळूहळू भ्रामक परिस्थितिवादातून बाहेर पडत आहेत असे दिसत आहे. 'सोसायटी इन ट्रँझिशन' या आपल्या ग्रंथात हॅरी बार्नेस याने सविस्तर विवेचन केले आहे. तो म्हणतो की, मनोदौर्बल्यामुळे गुन्हे घडतात किंवा गरिबीमुळे मनुष्याची तिकडे प्रवृत्ती होते हे मत आता मागे पडत आहे. कारण वस्तुस्थिती त्याला आधार देत नाही. बहुतेक गुन्हेगार चांगले बुद्धिमान व धूर्त असतात. आणि अमेरिकेतील संघटित गुन्हेगारीचा व गरिबीचा काहीच संबंध नाही. बहुतेक गुन्हेगार चांगले प्रतिष्ठित व सुस्थित असे असतात (पृ. ७२०).
 अर्वाचीन काळात लोकायत्त देशात शास्त्राच्या आधाराने मानवाच्या मानवत्वाचा, त्याच्या व्यक्तित्वाचा, त्याच्या इच्छास्वातंत्र्याचा, प्रवृत्तिस्वातंत्र्याचा जो समाजाने अवमान केला आहे, त्याचे हे सर्व दुष्परिणाम आहेत. जुन्या कर्मतत्त्वाचीच ही नवी रूपे आहेत. नियतीच्या, कर्माच्या हातचे मनुष्य हे बाहुले आहे, असे सनातन पंडित मानीत. आता आर्थिक परिस्थितीच्या किंवा सुप्त मनोगंडांच्या हातचे ते बाहुले आहे, असे नवे पंडित सांगतात. दोन्हींचा तात्पर्यार्थ एकच होतो. मानवाला आत्मस्वातंत्र्य नाही ! वास्तविक मानवाच्या जीवनाची सर्व प्रतिष्ठा त्याच्या आत्मस्वातंत्र्यात आहे. आणि मानवी जीवनाची प्रतिष्ठा हा तर लोकशाहीचा पाया मानला जातो. तरी सर्वात पुढारलेल्या लोकायत्त देशांनी ती प्रतिष्ठा धुळीस मिळवावी यापरता दैवदुर्विलास कोणता ? मानवाला त्याच्या कृत्याबद्दल जबाबदार धरणे, यातच खरोखर त्याची प्रतिष्ठा राखली जाते. नाहीतर त्याच्यात आणि दगडात फरक तरी कोणता ? त्याच्यावर परिस्थितीचे परिणाम होत नाहीत असे कोणीच म्हणत नाही. वर सांगितलेच आहे की, आनुवंश, भौगोलिक परिस्थिती, शिक्षणसंस्कार, सर्व सर्व गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होत असतो. पण जडवस्तूप्रमाणे अमक्या संस्काराचा अमुक परिणाम, अमक्या परिस्थितीचे हे फल असे मुळीच सांगता येत नाही. यावरून मानवाच्या अंतरात बाह्य संस्कारांच्या परिणामाचे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वाटेल ते रसायन तयार करणारी अशी एक स्वतंत्र शक्ती आहे हे उघड दिसते. या शक्तीच्या आधारावरच धर्म, नीति, या निष्ठा आजपर्यंत जगत आल्या आहेत. आता या नव्या शास्त्रांनी त्यांचा तो आधार काढून घेतला आहे. म्हणून मानवाचे चारित्र्य, त्याची नीति, त्याचा धर्म हे सर्व निराधार झाले आहे.
 अलेक्सिस कॅरेलच्या मते पाश्चात्त्य संस्कृतीचा, अमेरिकन संस्कृतीचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. आणि जडसृष्टीचे नियम मानवाला लावणे हे त्याचे त्याच्या मते प्रधान कारण आहे. गणिताने, फूटपट्टीने, तराजूने जे मोजता येत नाही, ज्याचा काटेकोर हिशेब करता येत नाही, ज्याचे बिनचूक मापन करता येत नाही, ते गौण होय, त्याला महत्त्व नाही असे शास्त्रज्ञ मानतात. कोणी कोणी त्याचे अस्तित्वच नाकारतात. कॅरेलच्या मते विज्ञानाने हा अत्यंत मोठा प्रमाद केला आहे. मानवाच्या बाबतीत तर जे मापनीय आहे, गण्य आहे, त्याच्यापेक्षा जे अमापनीय, अगण्य आहे तेच जास्त महत्त्वाचे आहे. आणि मानवाची धर्मनिष्ठा, नीतिनिष्ठा, त्याच्या भावना, त्याची सुखदुःखे, त्याची ज्ञानलालसा, सौंदर्याभिरुची हे सर्व अगण्य असे आहे. याची अवहेलना केल्यामुळे मानवाचा अधःपात होत आहे.
 या अगण्य अशा अंतःशक्तीच्या बळावरच मानव हा मानव झाला आहे. आणि तिच्यामुळे स्वतःच्या अंतःसृष्टीवर व बाह्यसृष्टीवर मनुष्याने प्रभुत्व प्रस्थापित केले आहे. असे असताना, माझा मी प्रभु नाही, माझ्या हातून जे घडले त्याला मी जबाबदार नाही, ही भूमिका मानवाने घेणे हा त्याचा कमालीचा अधःपात आहे. परिस्थिति म्हणजे तरी काय ? अन्य मानवांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर ठरवलेले कायदे, प्रसृत केलेले विचार, दृढमूल केलेल्या रूढी आणि रूढविलेली समाजाची रचना. हे सर्व जर वाईट असले तर दुसऱ्या मानवांनी आपल्या इच्छाशक्तीने ते हाणून पाडणे, बदलणे, हाच त्यावर उपाय आहे. परिस्थिति म्हणजे दुसऱ्या कोणाची तरी इच्छाशक्तीच असते. आणि ती सुधारण्यास दुसरी इच्छाशक्तीच अवश्य असते. अशा स्थितीत एखाद्याची इच्छाशक्ती कमजोर झाली आणि तो परिस्थितीला बळी पडला तर त्याच्याविषयी सहानुभूती दाखविणे, त्याला साह्य करणे योग्य ठरेल इतकेच. पण त्याचे समर्थन करणे म्हणजे मानवत्वाचा पायाच उखडून टाकणे होय. गडकऱ्यांची द्रुमन ही अबला आहे. असहाय आहे. तिला संयम, मनोनिग्रह साधला नाही. ती दुष्टाच्या कारस्थानाला बळी पडली. तिच्याबद्दल अनुकंपा वाटणे, तिला जवळ घेणे सर्वथैव योग्य आहे. पण ती असहाय स्त्री बळी पडली म्हणून ही सहानुभूती आहे. पण ती जर 'ते समाजाला विचारा' 'ते राक्षसी रूढीला विचारा' असे म्हणून आपले समर्थन करू लागली तर तितकी अनुकंपा वाटणार नाही. कारण संयम करणे, निग्रह करणे याचें आत्म-स्वातंत्र्य असलेली ती एक मानव-व्यक्ती आहे, याच कल्पनेला त्यामुळे धक्का बसतो. तरी तिच्या बाबतीत सर्वच क्षम्य वाटणे हे शक्य आहे. पण परीक्षेत वाममार्गाचा विद्यार्थ्याने अवलंब केला आणि त्यात त्याचा दोष नाही, असे त्याचे प्राध्यापक म्हणू लागले तर ते दोघेही गुन्हेगार आहेत असे म्हणावे लागेल. कारण तेथे मनुष्याला त्यांनी लाकडाचा ओंडका मानले, असे होते. परीक्षेला महत्त्व आहे तर जास्त अभ्यास करणे, कसून मेहनत करणे आणि परिस्थितीवर मात करणे हे सामर्थ्य मानवाच्या ठायी आहे. असे असताना परिस्थितीला दोषी ठरवून त्या विद्यार्थ्याला दोषमुक्त करणे म्हणजे मानवाचे मानवत्वच नाकारणे होय. महात्माजींनी केलेले अबदुल रशीदचे समर्थन तर अत्यंत विपरीत आणि तितकेच समाजघातक आहे. महात्माजी म्हणाले की, तो गुन्हेगार नाही. तर ज्यांनी प्रक्षोभ माजविला ते गुन्हेगार ! ते तरी गुन्हेगार काय म्हणून ? प्रक्षोभ माजवावा अशी त्यांना बुद्धी झाली. हाही दुसऱ्या परिस्थितीचा परिणामच होय. किंवा त्यांच्या मनातल्या पूर्वीच्या सुप्त गंडांनी त्यांना प्रेरित केले असेल; म्हणून ते गुन्हेगार नाहीत. आणि महात्माजी मोठ्या औदार्याने त्याला भाई म्हणाले हाही त्यांच्या ठायीच्या कोठल्या तरी सुप्त अहंगंडाचा परिणाम होय असे म्हणावें लागेल. एका खून करणाऱ्या मानवाला जबाबदारीतून मुक्त करून भागणार नाही. सर्वांनाच ओंडके करून टाकावे लागेल. म्हणजे त्यांना आत्मस्वातंत्र्य नाही असे म्हणावे लागेल. अमेरिकेचा अधःपात या नव्या उदार दृष्टीमुळेच झाला आहे असे अलेक्सिस कॅरेलचे म्हणणे आहे. (मॅन दि अन्नोन, पृ. २५०)
 सध्या स्वतंत्र अवलोकन व शास्त्राभ्यास यांचा भारतात अभाव असल्यामुळे आपणही अमेरिकेतले औदार्याचे प्रयोग करीत आहोत. शाळेत मुलांना शिक्षा करावयाची नाही, घरी धाक दाखवावयाचा नाही, आणि समाजात, सभा-संमेलनात, युवक- महोत्सवात त्यांचा आत्माविष्कार होऊ द्यावयाचा. याचा परिणाम काय होतो आहे ते दिसतेच आहे. विद्यार्थी शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे बंद पाडीत आहेत. संमेलने, युवकमहोत्सव उधळून लावीत आहेत. आणि समाजाचे धुरीण मानसशास्त्रात याचे मूळ शोधीत आहेत ! गुन्हेगारांवरही मानवतेचे महान् प्रयोग चालू आहेत. आटपाडीजवळ मध्यंतरी काही खुनी माणसांची मुक्त वसाहत केली होती. त्यांना जमिनी दिल्या होत्या. 'मानवतेचा महान् प्रयोग' म्हणून त्याचा वृत्तपत्रात गौरव झाला. आचार्य विनोबांनी मध्यप्रांतातील खुनी, दरोडेखोर यांच्यावर असेच मानवतेचे प्रयोग केले. वास्तविक हृदयपरिवर्तनाचे कसब आपल्या ठायी आहे असे विनोबांना वाटत होते तर काळा बाजारवाले, प्राप्तिकर चुकविणारे, दारूभट्ट्या चालविणारे, लाच खाणारे सरकारी अधिकारी, भारतातल्या सर्व सरकारी रुग्णालयातले डॉक्टर, परिचारिका, गडी यांच्यावर, त्यांनी प्रयोग करावयाचा होता. तो तरी महागात पडला नसता. पण त्यांनी खुनी दरोडेखोर यांच्याकडे आपल्या सहानुभूतीचा ओघ वळविला आणि मध्यप्रदेशातली गुन्हेगारी वाढवून ठेवली. सध्या आपला हाच उद्योग चालू आहे ! तुरुंगात आपण गुन्हेगारांना मायेने वागवून त्यांचे जिणे सुसह्य करीत आहोत. त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे आणि जनतेला मात्र जिणे असह्य होत आहे. भारताला सामान्य व्यवहाराच्या पातळीवर राहणे कधीच आवडत नाही, हे त्याचे मुख्य दुर्दैव आहे. राजकारणात राष्ट्रीय पातळीवरून विचार न करता आपण नेहमी आंतरराष्ट्रीय पातळीवरून बोलतो. त्याचप्रमाणे हृदयपरिवर्तन, मानसशास्त्र या मार्गांनी मानवातला परमेश्वर जागा करण्याचा आपल्याला कायमचा हव्यास लागला आहे. प्रत्यक्षात मात्र शिक्षेचे भय नाहीसे झाल्यामुळे त्याच्यातला पशु जागा होत आहे. अमेरिकेतल्या मानसशास्त्रीय प्रयोगामुळे हेच घडत आहे, हे डॉ. रुथ अलेक्झांडर यांचे मत वर दिलेच आहे. मला वाटते आपण हे महान् आणि भव्य प्रयोग बंद करून मानवातला मानवच जागा करण्याचा प्रयत्न केला तर बरे होईल. तसे करावयाचे म्हणजे मानवाचे प्रवृत्तिस्वातंत्र्य किंवा आत्मस्वातंत्र्य मान्य केले पाहिजे. कारण तेच मानवत्वाचे मुख्य लक्षण आहे. सध्या भारतात कोणावरही कसलीही जबाबदारी नाही. वाटेल ते अनर्थ येथे घडत आहेत. पण त्याला जबाबदार कोणीही नाही. प्रत्येक जण 'ते समाजाला विचारा' असे म्हणत आहे. आत्मस्वातंत्र्याचे महत्त्व आपल्याला कळले तर 'ते मला विचारा' असें म्हणण्याचा कणखरपणा आपल्या ठायी निर्माण होईल; आणि त्यातच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली आहे.