वैय्यक्तिक व सामाजिक/वैयक्तिक पुण्य आणि सामाजिक पुण्य
महाभारत वाचीत असताना, विशेषतः त्यातील श्रीकृष्णाचे चरित्र व तत्त्वज्ञान अभ्यासीत असताना मनात एक विचार पुनः पुन्हा येत राहतो. या महापुरुषाने जो अत्यंत श्रेष्ठ असा व्यवहारधर्म सांगितला आहे, अभ्युदय व निःश्रेयस् या दोहोंवर समदृष्टी ठेवून प्रपंच यशस्वी करण्यासाठी त्याने जे तत्त्वज्ञान सांगितले आहे, त्याचे प्रत्यक्ष आचरण कोण करतो हे आपण पाहू लागलो तर असे दिसते की, अर्वाचीन काळच्या, गेल्या ४-५ शतकातल्या पाश्चात्त्य लोकांनीच श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान व्यवहारात आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. भीष्मांनी केलेले राजधर्माचे प्रवचन वाचू लागलो म्हणजे हेच मनात येते. धनाची महती, बलाची महती, दीर्घ उद्योगाची महती ही भीष्मांनी आणि महाभारतातील इतर कर्त्या पुरुषांनी पदोपदी गायिली आहे. असंतोष हे सर्व वैभवाचे मूळ आहे हाही विचार भारतात अनेक ठिकाणी आला आहे. उद्योग, पुरुष-प्रयत्न यांचे महत्त्व तर महाभारताच्या पानापानावर वर्णिलेले सापडेल. पण ते आमच्या मनावर ठसले नाही. आणि आपण भारतीय दैववादी बनलो. राजा कालाचा नियंता आहे, उत्कर्ष हा मानवी कर्तृत्वावर अवलंबून आहे, हे आम्हाला पटले नाही. आणि मानव कालवश आहे, कलियुगवश आहे हे तत्त्वज्ञान, हा धोंडा उराशी कवटाळून आज शेकडो वर्षे भारतीय जनता कालसमुद्रात खाली खाली जात आहे. 'कृण्वन्तो विश्वमार्यम्' ही प्रतिज्ञा भारतीयांनी चार हजार वर्षांपूर्वी केलेली आहे; पण विश्व दूर राहिले, आणि आर्यावर्तात राहणाऱ्या- गिरिवासी, वनवासी, शूद्र, अंत्यज- इ. सर्व जनांना आपल्या श्रेष्ठ वेदसंस्कारांनी पुनीत करून धर्मदीक्षा देणे हेसुद्धा आपल्याला जमले नाही. मग हे केले कोणी ? तर चार हजार मैलांवरून येणाऱ्या मिशनरी लोकांनी ! येथल्या नगरवासी लोकांची काळजी त्यांना वाटली. भारतीयांना वाटली नाही. त्यांनी ती वाहिली नाही.
युरोपातल्या गेल्या चारशेपाचशे वर्षांतल्या धर्मपंथांचा, धर्मसंघटनांचा इतिहास आपण पाहू लागलो म्हणजे पुन्हा महाराष्ट्रातील संतांच्या धर्मोपदेशाबद्दल हाच विचार मनात येतो. त्यांच्या तत्त्वाप्रमाणे आचरण कोणी केले ? त्यांचा धर्म व्यवहारात कोणी आणला ? युरोपातल्या या धर्मसंघटनांनी. या संघटनांच्या सभासदांनी थोर नीतितत्त्वांचा प्रसार करण्यासाठी विश्वप्रयत्न केले आहेत आणि चालविले आहेत, व त्यायोगे धर्म ही शक्ति जिवंत ठेवून ते समाजाची ऐहिक व पारलौकिक उन्नतीही साधीत आहेत. आणि आपण भारतीयांनी 'निधर्मी' शब्दाचा अत्यंत वेडगळ अर्थ करून आपले जीवन भकास, उजाड, धर्महीन करून टाकले आहे. तोंडाने आपणच खरे अध्यात्मवादी आहोत, युरोप हा जडवादी आहे असा नित्य जप करण्याचे व्रत मात्र आपण निष्ठेने चालविले आहे.
जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा । ज्यासि आपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी । तुका म्हणे सांगो किती । त्याचि भगवंताच्या मूर्ती ॥ यथासामर्थ्ये यथावित्ते । चित्ते, भावार्थे जीवितें । सुख द्यावे प्राणिमात्राते । हेचि निश्चित निजभजन । मुख्य पूजेचे आयतन प्राणिमात्रा सुखदान ॥ ही वचने आपल्याकडच्या संतांची आहेत. त्यांचा खरा अर्थ कोणी जाणला हें पहावयाचे आहे काय ? एलिझाबेथ फ्रायरचे चरित्र पहा.
एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस-तीस वर्षांत इंग्लंडमधील तुरुंगातील कैद्यांची काय स्थिति होती हे पाहिले की अंगावर काटा उभा राहतो. लहान-मोठी, सर्व वयाची सर्व माणसे एकाच मोठ्या कोठडीत कोंडलेली असत. स्त्रियांना, पुरुषांना भिन्न दालने नव्हती. सर्व एकत्रच. हवा, स्वच्छता यांचा कसलाही संबंध या कोठड्यांशी नसे. सर्वत्र घाण पसरलेली, अस्ताव्यस्त माणसे पडलेली. अंथरापांघरायला जी पटकुरे असतील ती. व्यवस्था अशी काहीच नसे. जमिनी ओल्या, छपरे गळकी, तुरुंगावरचे अधिकारी अत्यंत क्रूर, शुद्ध लांडगेच असत. अन्नपाण्यावाचून माणसे तडफडून मेली तरी त्यांना परवा नसे. मेलेल्यांची प्रेते चार चार दिवस पडून असत. त्या मृतांचे कपडे
काढून घेण्यासाठी कैद्यात मारामाऱ्या होत. मग वरचे पहारेकरी सर्वांनाच चेचून काढीत. अशा रीतीने उकिरड्यावर नासका- कुजका माल टाकून द्यावा आणि तेथे तो आणखी सडून सर्वत्र दुर्गंधी सुटावी तसा प्रकार समाजाने मानवी गुन्हेगारांचा केला होता. हे सर्व गुन्हेगार एकाच प्रकारचे, अट्टल, बदमाष, खुनी, दरोडेखोर असे असत असेही नाही. साध्या चार-दोन रुपयांच्या चोऱ्या करणारे, साथी मारामारी करणारे येथपासून बलात्कार, दरोडा, खून असले गुन्हे करणारे हे सर्व एकत्रच असत. वेडे त्यातच असत. कर्जबाजारी होऊन दिवाणी तुरुंगात पाठविलेले त्यातच असत. अशा या तुरुंगात उपासमार, घाणेरडे रोग, अधिकाऱ्यांचा क्रूरपणा यांनी पिसाळून गेलेले शेकडो हजारो कैदी असत. शरीरे गंजलेली, मने दुभंगलेली, भावना मेलेल्या अशी ती माणसे होत. नित्य भांडणे, मारामाऱ्या, अत्याचार, बलात्कार यांनी मानवतेचा अंशही त्यांच्या ठायी राहिलेला नसे. समाजाने त्यांना पशुहूनही हीन अशा स्थितीला नेऊन ठेवलेले होते.
अशा या तुरुंगातील स्त्रियांची स्थिति सुधारण्याचा निश्चय करून वीस- बावीस वर्षांची, अत्यंत श्रीमंत घराण्यातील एक तरुण स्त्री त्यांच्यात जाऊन मिसळते ही कल्पनाच अंगावर शहारे आणणारी आहे. पण एलिझाबेथ तेथे गेली, एवढेच नव्हे तर पुढे अनेक वर्षे ती तशीच जात राहिली. आणि आयुष्यांतील पुढील तीसचाळीस वर्षे या कामाला अर्पण करून तिने इंग्लंडमधल्याच नव्हे तर कॅनडा, अमेरिका, जर्मनी, रशिया येथल्याही तुरुंगात जमीन-अस्मान सुधारणा घडवून आणली. पहिल्या दिवशी तुरुंगात जाऊन त्या स्त्रियांपुढे ती उभी राहिली तो क्षण तिच्या आयुष्यात मोठा संस्मरणीय होता. त्या स्त्रिया म्हणजे मूर्तिमंत कैदासणी झाल्या होत्या. समाजानेच त्यांना तसे केले होते. नित्याप्रमाणे ही आपल्याला धर्मोपदेश करणार असे वाटून त्या चवताळून उठल्या होत्या. आणि एलिझाबेथच्या मुद्रेवर भीतीचे पुसट जरी लक्षण दिसले असते तरी त्यांनी तिला फाडून खाल्ले असते. पण एलिझाबेथ अविचलित राहिली. चटकन् पुढे होऊन तिने त्यांच्यापैकीच एकीच्या मुलाला जवळ घेतले आणि 'या बाळांच्यासाठी तरी तुम्ही शांत व्हा. त्यांचे पुढले आयुष्य असेच या कोठडीत जाऊ नये म्हणून तरी माझे ऐकून घ्या.' अशी त्यांच्या मातृत्वाला साद घातली. कोठे तरी त्यांच्या अंतरात माता जागी होती.
तिला ती हाक पोचली. आणि त्या एकदम शांत झाल्या, रडू लागल्या. तिच्याभोवती गोळा होऊन तिच्या पाया पडू लागल्या.
बाहेर येताच एलिझावेथने तुरुंगसुधारणेसाठी एक समिती स्थापन केली व कार्याला आरंभ केला. तिच्या सहकारी स्त्रियांनी लोकात जागृति केली, सरकारी अधिकाऱ्यांना वश केले, पार्लमेंटमध्ये ठराव आणले आणि शेवटी दीर्घ प्रयत्नाने शेकडो, हजारो, लक्षावधि हतभागी जीवांना मानवत्वाची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. १७ व्या वर्षी अमेरिकेतील विल्यम साव्हेरी नावाच्या एका धर्मगुरूच्या प्रवचनाने तिला स्फूर्ति प्राप्त झाली. आणि तेव्हापासून तिने तरुणपणाची छानछोकी सर्व टाकून दिली. विसाव्या वर्षी तिचे लग्न झाले आणि त्यानंतर ७-८ मुलांचा प्रपंच संभाळून तिने आपला देह या सर्वस्वी हीन, दीन, पतित स्त्रियांसाठी चंदनासारखा झिजविला. त्या अनाथ अपंगांना तिने हृदयाशी धरले आणि इतक्या हीन स्थितीला मानव पोचू नये अशी कायमची व्यवस्था केली.
ही शेवटची गोष्ट फार महत्त्वाची आहे. धर्मवचनांना हा सामाजिक अर्थ आपल्याकडे निर्माणच झाला नाही. एलिझाबेथच्या चित्ताला या आर्तांच्या दु:खाची जाणीव होताच तिने लगेच आपल्या निकटच्या दहाबारा स्त्रियांची एक समिति स्थापन केली, सर्व समाज हलवून सोडला, लोकसभेपर्यंत गाऱ्हाणे पोचविले आणि धर्मकार्यासाठी सामाजिक शक्ती निर्माण करून तिने लक्षावधी भ्रष्ट, पतित मानवांच्या जीवनांना आलेली अवकळा नष्ट केली. ते लक्षावधि मानव एकदा तुरुंगात गेल्यावर कायमचे पतित, हीन, धर्मशून्य राहिले असते. ही घोर आपत्ती तिने नाहीशी केली. आणि त्यांना धर्ममार्गावर आणून सोडले. भारतवर्षाच्या गेल्या हजारबाराशे वर्षांच्या इतिहासात या दृष्टीने एकही प्रयत्न झालेली दिसत नाही. संत उपदेश करीत होते. आणि लोक धर्मही करीत होते. पण ते धर्माचरण पुण्यासाठी होते, स्वतःच्या परलोकप्राप्तीसाठी, मोक्षासाठी होते. हतभागी मानवांचे जीवन पुढे कायमचे सुखी व्हावे आणि ज्या समाजव्यवस्थेमुळे लक्षावधी लोक मानवत्वापासून भ्रष्ट होतात, पतित होतात, म्हणजेच धर्मशून्य होतात ती व्यवस्थाच बदलून टाकावी यासाठी कसलेही प्रयत्न येथल्या नागरिकांनी केले नाहीत. वैयक्तिक धर्माचरण येथे होत असे ते पुण्यप्राप्तीसाठी होत असे. ज्या अनाथांना, अपंगांना आपण आज अन्न देत आहो, त्यांचे दैन्यच मुळात फिटून जावे ही दृष्टि येथे निर्माणच झाली नाही. आणि युरोपात ज्या ज्या धर्मसंघटना निर्माण झाल्या त्यांची हीच एकमेव दृष्टी होती. धर्मवचनांचा सामाजिक अर्थ तो हाच.
विल्यम विल्वर फोर्स याचा जन्म १७५९ साली झाला. १७८४ साली 'धर्माचा उदय आणि प्रगति' हा ग्रंथ वाचून त्याची धर्मभावना जागृत झाली. लगेच तो इव्हँजेलिकल पंथाचा सभासद झाला. आणि थोड्याच दिवसात गुलामांचा व्यापार नष्ट करण्याचा त्याने दृढनिश्चय केला. क्वेकर पंथातील लोकांनी त्यासाठी याच्या आधीच एक समिती स्थापन केली होती. तिच्या साह्याने त्याने कार्य सुरू केले. तो स्वतः अत्यंत श्रीमंत होता व पार्लमेंटचा सभासद होता. त्याने या दुष्ट रूढीविरुद्ध तेथे प्रचार करण्यास प्रारंभ केला. समितीचे लोकही व्याख्याने, हस्तपत्रे, ग्रंथ या मार्गाने समाजजागृति करीत होते. हा झगडा वीस वर्षे चालला होता. शेवटी १८०७ साली पार्लमेंटमध्ये कायदा होऊन इंग्लंडमधून गुलामांचा व्यापार नष्ट झाला. इंग्लंडमध्ये प्रत्यक्ष गुलामगिरी चालू नव्हती. पण इंग्लंडचे हात या कायद्याने निष्कलंक झाले. आणि अशीच अनेकांची पुण्याई साठत जाऊन १८६५ साली अमेरिकेतून प्रत्यक्ष गुलामगिरीच नष्ट झाली. 'दया करणे जे पुत्रासी, तेच दासा आणि दासी' हे श्रीतुकाराममहाराजांचे वचन विल्वर फोर्स, अब्राहम लिंकन यांनी तेथे खरे करून दाखविले. आणि कोट्यवधि प्राणिमात्र त्यामुळे सुखी झाले. ही धर्मप्रेरणा फार निराळी आहे. येथे ज्ञानेश्वर, तुकाराम यांनी जो धर्म सांगितला तसाच धर्म युरोपमध्ये जीजस् ने, पॉल, पीटर यांनी व पुढे झालेल्या अनेक संतांनी सांगितला होता. दोघांची वचने ताडून पाहिली तर त्यात फारसा फरक दिसत नाही. पण पश्चिम युरोपच्या धर्मनिष्ठांनी त्या संतांच्या वचनांतून सामाजिक अर्थ निर्माण केला. तो महाराष्ट्रात किंबहुना हिंदुस्थानात ब्रिटिशांच्या पूर्वी येथे कोणीच केला नाही. त्यामुळे येथे धर्माला सामाजिक शक्तीचे स्वरूप प्राप्त झाले नाही. पाश्चात्त्य लोकांच्या धर्मभावना जागृत होताच ते लगेच मंडळ स्थापन करतात व या संघशक्तीच्या जोरावर समाजजागृति करून दुःखाच्या मुळावरच घाव घालतात. रस्त्यात भेटणाऱ्या गरिबाला वा आंधळ्याला ते पैसा देत नाहीत असे नाही. तेही चालूच असते. पण या निराधार लोकांना शिक्षण द्यावे, उद्योगधंदा द्यावा व कायमचा आधार निर्माण करून द्यावा या दृष्टीने तेथील लोक प्रयत्न करतात. विल्वर फोर्स यानेच रविवारच्या शाळांसाठी, गरिबांच्या मंडळांसाठी हजारो रुपयांच्या देणग्या दिलेल्या आहेत. पण त्यांतून त्याने संस्था निर्माण केल्या व ज्यांना साह्य द्यावयाचें त्यांना काही शाश्वत आधार मिळावा, ते स्वतंत्र व्हावे, त्यांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी अशी व्यवस्था त्याने केली. युरोपात जे अनेक धर्मपंथ आहेत त्यांचे कार्य या स्वरूपाचें आहे.
रुग्णसेवा हे परोपकाराचे केवढे क्षेत्र आहे. व्याधींनी ग्रस्त झालेल्या मनुष्याला तीतून मुक्त करणे यासारखा श्रेष्ठ धर्म नाही. दैवी संपत्तीची लक्षणे सांगताना ज्ञानेश्वरांनी हे त्यात एक प्रमुख लक्षण म्हणून समाविष्ट केले आहे. भला वैद्य जो आहे तो रोगावर उपचार करताना 'आपपरू न शोधी'-- शत्रुमित्र पहात नाही हे सात्त्विकतेचे खरे लक्षण होय. अशा या धर्माचरणाच्या बाबतीत पाश्चात्त्यांनी केवढे पुण्य संपादन केले आहे ते पाहिले आणि मग दृष्टी अंतर्मुख करून आपला ज्ञानेश्वरानंतरचा सहासातशे वर्षांचा इतिहास पाहिला म्हणजे आम्ही काही धर्माचरण करतो असे म्हणणे जरा जड जाईल. फॅन्सिस हा बाराव्या शतकाच्या अखेरीस इटालीत मोठा साधुपुरुष होऊन केला. तो श्रीमंताचा मुलगा होता. पण धर्मभावना जागृत होताच अंगावर एक पटकूर घेऊन तो बाहेर पडला. रस्त्यांत त्याला एक महारोगी दिसताच 'आर्ताचेनि वोरसे' त्याचे हृदय भरून आले. महारोग म्हणताच इतके दिवस त्याला धडकी भरत असे. आता सर्व पालटले व त्याने त्या रुग्णाला अक्षरश: मिठी मारली. इतके दिवस श्रीमंत सरदारांच्या सहवासांत तो सुखोपभोग घेत होता. आता दीन, दुःखी, वहिष्कृत यांसी आपुले म्हणविण्यात त्याला सुख लाभू लागले. तो त्या महारोग्याला म्हणाला, 'अरे तू माझा भाऊच आहेस. तुझे दुःख तेच माझे दुःख, तुझे सुख तेच माझे सुख.' असें म्हणून एक-दोन मित्रांसह तो या हतभागी प्राण्याच्या आळीतच राहू लागला व त्यांची सेवा-शुश्रूषा करू लागला. हळहळू त्याच्याभोवती अनुयायी जमू लागले. फ्रॅन्सिस्कन पंथाची स्थापना झाली. आणि या पंथाने जनसेवा हाच धर्म मानून युरोपात मोठमोठी कार्ये केली. दारिद्र्य आणि लोकसेवा हे त्या पंथाचे ब्रीदवाक्य होते.
१६ व्या शतकापासून ख्रिस्ती मिशनरी 'हे विश्वचि माझे घर' हे महावाक्य डोळ्यापुढे ठेवून जगभर संचार करीत आहेत आणि जेथे जातील तेथे रुग्णांना, व्याधिग्रस्ताना औषधे देऊन, त्यांच्यासाठी रुग्णालये स्थापून त्यांची अहोरात्र शुश्रूषा करून दीन दुःखितांचा भार हलका करीत आहेत हें प्रसिद्धच आहे. या बाबतींत त्यांना आपपरू ठावेच नाही असे दिसते. हिंदुस्थान, चीन, जपान, आफ्रिकेतील जंगले, अरबस्तानातील वाळवंटे, मध्य आशियातील डोंगरदऱ्या, पॅसिफिक महासागरातील बेटे, सर्वत्र ते हिंडतात. घरदार सोडून दीनदुःखित, अनाथ, अपंग, आंधळे, पांगळे, लुळे, यांच्यात राहतात. आणि त्यांची शुश्रूषा करून त्यांचा दुःखभार हलका करतात. त्यांच्या निराश, भग्न जीवनात काही सुखाचे क्षण निर्माण करतात.
हुवाई बेटातील होनोलुलूपासून २०० मैलांवर असलेली मोलोकाई नावाची जी महारोग्यांची वसाहत आहे तिचा इतिहास वाचला म्हणजे युरोपीय लोकांची धर्मसेवा व आपली पूर्वकाळची पुण्यकल्पना यातील महदंतर कळून येईल. १८३० च्या सुमारास या बेटात हा रोग आला. तो पसरू लागताच सरकारने कडक कायदे केले. आणि संसर्ग पसरू नये म्हणून महारोगाची चिन्हे दिसू लागलेल्या पंचवीस रोग्यांना उचलले, गाडीत घातले आणि मोलोकाईच्या जंगलात नेऊन चक्क सोडून दिले. त्यांची कसलीही वास्तपुस्त सरकारने पुढे केली नाही. त्या हतभाग्यांनी ६-७ वर्षे कसेतरी जीवन कंठले. नंतर बेल्जम- मधील धर्मगुरू फादर डामियन तेथे आले. आणि त्यांना आपंगिता मिळाला. आज मोलोकाई ही एक उत्तम वसाहत आहे. सुमारे ५०० रोगी तेथे राहतात. त्यांना उत्तम झोपड्या आहेत, रुग्णालय आहे, डॉक्टर आहेत, दाया आहेत, औषधे आहेत. पण एवढेच नाही. फादर डामियन यांनी व त्यांच्यामागून आलेले फ्रेंच डॉ. पीटर, डॉ. टटल् इत्यादींनी ती एक रम्य वसाहत केली आहे. तेथे बागा आहेत. क्रीडांगणे आहेत. उद्योगकेंद्रे आहेत. लोक कचेरीत काम करतात, दुकाने चालवितात. शाळा चालवितात. तेथे विजेचे दिवे आहेत, मोटारी आहेत. लोक स्वतंत्र घरे बांधतात. विवाह करतात. आणि संसारही चालवितात. 'विश्वचि माझे घर' 'मुख्य पूजेचे आयतन, प्राणिमात्रा सुखदान' या वचनांना काही अर्थ असेल तर तो हा आहे. आणि तो पाश्चात्त्य धर्मनिष्ठांनी प्रत्यक्षात आणला आहे. फादर डामियन यांना स्वतःलाच शेवटी महारोग जडला व त्यातच त्यांचा अंत झाला. पण त्यामुळे मिशनरी घाबरले नाहीत. फादर पीटर तेथे आलेच. त्यांनाही महारोग झाला. पण त्यातून ते बरे झाले. या वसाहतीत तीन-चतुर्थांश रोगी हवाईजनच आहेत. इतर जपानी, पोर्च्युगीज, चिनी, कोरियन असे आहेत. डॉक्टर मात्र बहुतेक पाश्चात्त्य आहेत. कोणी तेथे १० वर्षे आहेत, कोणी १५ तर कोणी ५० वर्षे आहेत. आज सत्तराव्या वर्षीहि डॉ. पीटर या दुःखितांची सेवा निष्ठेने करीत आहेत. या सर्व डॉक्टरांची वाणी अत्यंत गोड, स्वभाव अत्यंत प्रेमळ व धर्मनिष्ठा जाज्वल्य आहे.
रुग्णांची शुश्रूषा करणे, त्यांच्या औषधपाण्याची व्यवस्था करणे, त्यांच्यासाठी रुग्णालये बांधून तेथे त्यांची राहण्याची सोय करणे हे फार मोठे धर्मकार्य आहे अशा तऱ्हेचा उपदेश आणि त्याचा प्रत्यक्ष व्यवहार हे युरोपात १४ व्या शतकापासून चालू आहे. प्रत्येक गोष्टीसाठी संघटना उभारून सामाजिक दुःखाचे मूलच्छेदन करणे हीहि वृत्ति युरोपात तेव्हापासून दिसते. इटालीतील मिलन, व्हेनिस या शहरी १३०५ सालापासून रुग्णालयें असल्याचा पुरावा मिळतो. पंधराव्या शतकात फ्लॉरेन्स या एका शहरात ३५ रुग्णालये होती. आणि ती सरकारी व धनिकांच्या देणग्यांवर चालत असत. लूथर हा जुन्या कॅथॉलिक धर्माचा द्वेष्टा होता. पण कॅथॉलिकांनी चालविलेल्या रुग्णालयांचे त्याने प्रसन्न मनाने वर्णन करून ठेविले आहे. या रुग्णालयात रोग्यांना उत्तम औषधोपचार होत, वैद्य कुशल असत व रोग्यांना चांगले अन्न देण्याचीहि व्यवस्था असे असे तो म्हणतो. सर्व इटलीभर या काळात रुग्णालये, अनाथगृहे, अन्नछत्रे व शाळा दिसून येत. या सर्व संस्था धर्मार्थ असून त्या धर्मगुरूंनी चालविलेल्या होत्या. मृत्युपत्रात रुग्णालयांसाठी देणग्या देण्याची व्यवस्था करून ठेवणे ही पद्धत त्यावेळी रूढच होती. फ्रॅन्सिस्कन, डॉमिनिकन या धर्मपंथांचे लोक अशा संस्थात अहोरात्र सेवेसाठी तयार असत. सेंट बर्नाडिनो (जन्म १३८०) व सेंट कॅथॉराइन ही या पंथातील संतांची नावे त्यावेळी प्रसिद्ध होती. त्यावेळी इटलीभर भयंकर साथी येत. त्या साथीत यांनी रात्रंदिवस रोग्यांची शुश्रूषा करण्याचेच व्रत घेतले. (स्टोरी ऑफ सिव्हिलिझेशन- विल्ड्युरेन्ट- खंड ५ वा, प्रकरणे १९ व २०) हीच वृत्ति युरोपात पुढे परिणत होत गेली. वैद्यकशास्त्रात पाश्चर, रोनाल्ड रॉस यांसारखे जे मोठेमोठे संशोधक होऊन गेले त्यांची मूळ प्रेरणा आर्तांचे दुःखनिवारण हीच होती. त्यांनी स्वतः व त्यांच्या चरित्रकारांनी हे स्पष्टपणे
लिहून ठेविले आहे. पाश्चर नेहमी म्हणे, 'मला जगात प्रत्येक गोष्ट म्हणजे अनंताचा आविष्कार आहे असे वाटते. माझी दैवी शक्तीवर नितांत श्रद्धा आहे. प्रत्येकाच्या हृदयात ती असतेच. ज्ञानविज्ञानाची मला लालसा आहे. विश्वातील गूढ शक्तीने दिलेली ही प्रेरणा आहे असें मला वाटते.-' तो आपल्या प्रयोगशाळेत प्रयोग करी तेव्हा बायबलच्या उपदेशाचेच आपण आचरण करीत आहो, अशी त्याची श्रद्धा असे. (वन् हंड्रेड ग्रेट लाइव्हज्, पृ. १०६, १०७). मलेरियाच्या जंतूंचा शोध लावणारा विख्यात डॉ. रोनाल्ड रॉस हा हिंदुस्थानातील ब्रिटिश लष्करातला नोकर. प्रथम ललित वाङमय, गणित यांच्या अभ्यासात तो आपला रिकामा वेळ घालवी. पण एक दिवस त्याचा विवेक जागृत झाला. हिंदुस्थानातील ती भयंकर रोगराई पाहून त्याचे हृदय दुभंगून गेले. आपण या मानवी दुःखाचा परिहार करण्यासाठी आतापर्यंत काहीच केले नाही, ही टोचणी त्याच्या मनाला लागली. म्हणून मग त्याने काय केले ? काय करावयाचे ते युरोपीय मनाचे ठरलेले आहे. सामाजिक अन्यायाने होरपळून निघालेला माणूस पाहिला तर त्याला थोडे द्रव्यदान करावे, त्या एका माणसाचें दुःख कमी करून, तेवढ्यावर आत्मसंतोष प्राप्त करून घ्यावा ही पाश्चात्त्य धर्मनिष्ठ पुरुषांची वृत्ति नाही. ते त्या सामाजिक दुःखाच्या मुळावर घाव घालतात हे वर सांगितलेच आहे. रोनाल्ड रॉसने तेच केले. व्याधीने पीडलेली माणसे त्याने पाहिली, त्याची धर्मबुद्धि जागृत झाली. आणि त्याने जंतुशास्त्राच्या अभ्यासास प्रारंभ केला ! व सतत आठदहा वर्षे तपश्चर्या करून मानवजातीच्या शत्रूला- मलेरियाच्या जंतूला- त्याने जिंकले. या जंतूचा शोध लागताच त्याने आपली उपकरणे बाजूला ठेविली व एक स्तोत्र रचले. 'परमेश्वरी योजनेमुळे आज माझ्या हातून एक विलक्षण शोध लागला आहे. त्याच्या कृपेने लक्ष- लक्ष जीवांचा संहार करणाऱ्या यमदूतांची काळी कृत्ये मला उमगली आहेत. यांमुळे आता अनंत जीव वाचतील. यमराजा, आता तुझे पाश व्यर्थ होत !' (सिक्स ग्रेट डॉक्टर्स- क्रोथर.)
आजहि पाश्चात्त्य जगात, विज्ञानवादी, बुद्धिवादी, जडवादी, पाश्चात्त्य जगात हीच धर्मप्रेरणा लोकांना कशी कार्यप्रवृत्त करीत आहे ते डॉ. थॉमस डूले, एम्. डी., यांच्या चरित्रावरून दिसून येईल. फ्रेंच इंडोचायनामध्ये लढाई
होऊन व्हिएटनाममध्ये उत्तर व्हिएटनाम व दक्षिण व्हिएटनाम असे दोन विभाग झाले. उत्तर व्हिएटनाम कम्युनिस्टांच्या ताब्यात गेले. काही काळ दोन्ही विभागातील लोकांना कोणाच्याही विभागात जाऊन स्थायिक होण्यास मुभा देण्यात आली. त्यावेळी उत्तरेस कम्युनिस्टांचे भयानक अत्याचार सुरू झाले. तेव्हा तेथून दक्षिणेत हजारो, लाखो निर्वासित येऊ लागले. त्यांची व्यवस्था लावण्यासाठी अमेरिकन आरमाराने हाइफांग येथे छावण्या उभारल्या होत्या. आणि डॉ. डूले यांना तेथे आरोग्याधिकारी नेमले होते. कम्युनिस्ट अत्याचारांना बळी पडलेल्या व उपासमार, हालअपेष्टा, चिंता यांमुळे अनेक रोगांनी ग्रस्त झालेल्या त्या हजारो रोग्यांना पाहून डॉ. डूले यांचे काळीज फाटून जाई. यांच्या शुश्रूषेचे अपार कष्ट, अतिमानुष कष्ट आपल्याच्याने होणार नाहीत असे कित्येकदा त्यांच्या मनात येई. तेथे राहण्याचे त्यांच्यावर बंधन नव्हते. ते अमेरिकन आरमारातले डॉक्टर होते. कोणाच्याहि क्षणी त्यांना घरी परत जाता आले असते. तेथे गेल्यावर त्यांचा व्यवसाय उत्तम प्रकारे सुरू झाला असता. आणि धनदौलत मिळवून ते प्रपंच करून सुखी झाले असते. पण ते परत गेले नाहीत. जवळ जवळ ६ लाख निर्वासित उत्तरेतून दक्षिणेत आले. तेवढे सगळे हाइफांग छावणीतून सुखरूप जाईपर्यंत ते तेथेच त्यांची शुश्रूषा करीत राहिले. कशासाठी ? प्रारंभी रोज त्यांच्या मनात प्रश्न येई. आपण कशासाठी येथे राहात आहो ? येथे आपले कोण आहे ? यावेळी लहानपणी ते जे स्तोत्र म्हणत त्याची त्यांना आठवण होई. 'देवा, आम्हाला दुःखमुक्त कर, आम्हाला संकटातून सोडव.' या लक्षावधि अपंगांना दुःखमुक्त करणे आपले कर्तव्य आहे असा त्यांच्या मनाचा निश्चय झाला व ते शेवटपर्यंत तेथेच राहिले. दीन, दरिद्री, अनाथ, अपंग असे हे निर्वासित होते. अडाणी होते. अस्वच्छ, घाणेरडे होते. कित्येकांचे पाय कम्युनिस्टांनी तोडले होते, डोळे फोडलेले होते. कित्येकांना ठेचून काढले होते. असे हे अत्यंत भयभीत, भग्न, लोक हजारांनी छावणीत येत. ते दृश्य नुसते पाहूनच सामान्य माणूस खचून गेला असता. अशा लोकांची शुश्रूषा डॉ. डूले शेवटपर्यंत करीत राहिले. कित्येक वेळा ते लोक चवताळून जात. डॉक्टरांना मारहाण करीत. एकदा डूले यांची अशा मारामुळे दोन हाडे मोडली. पण त्यांनी कार्य सोडले नाही. शेवटी त्यांना मलेरिया लागला. आतडी बिघडून गेली. तरी त्यांनी छावणी सोडली नाही.
काम संपले तेव्हाच ते घरी अमेरिकेला परत आले. पण खरे आश्चर्य ते पुढेच आहे. प्रकृति सुदृढ होताच पुन्हा अशाच तऱ्हेचे कार्य करण्यासाठी ते घर सोडून लाओसमध्ये गेले. तेथे जाण्यात त्यांचा हाच हेतु होता. उज्ज्वल भवितव्य व सुखी संसाराची स्वप्ने, सोडून हा तीस वर्षांचा तरुण, आपल्या पाच-सहा सहकाऱ्यांसह आशियातल्या त्या अडाणी, मागासलेल्या, हजारो मैल दूर असलेल्या अर्धरानटी प्रदेशात कशाला गेला ? पूर्व-पश्चिमेतले अंतर कमी करण्यासाठी, जगातल्या लोकांचा दुःखभार कमी करण्यासाठी ! विश्वबंधुत्व यावयाचे असेल तर याच मार्गाने येईल अशी डॉ. डूले यांची श्रद्धा आहे. अमेरिका परराष्ट्राना साह्य करते ते रुग्णसेवेच्याच मार्गाने करावे असे त्यांचे मत आहे. आरोग्यदान हे सर्वांत श्रेष्ठ दान होय. ते राष्ट्राच्या अंतरात्म्याला जाऊन भिडते. आरोग्यदान म्हणजे साक्षात् परमेश्वराची, जीजस् ची कृपादृष्टीच होय, असे डूले यांना वाटते. आणि याच श्रद्धेने घरदार सोडून ते पूर्ण परकीय अशा समाजाच्या सेवेला वाहून घेतात. 'हे विश्वचि माझे घर' या तत्त्वाचे हेच खरे आचरण नव्हे काय ?
पण मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या आरोग्यसंवर्धनासाठी सर्वस्व अर्पण करावे, प्राणहि वेचावे ही वृत्ति पाश्चात्त्य समाजात किती दिसून येते याचे वरच्यापेक्षाही विलक्षण असे एक उदाहरण सांगतो. ते वाचून तशा तऱ्हेचा उपदेश संतांनी केला असूनही आपल्या इतिहासात तशी उदाहरणे का सापडू नयेत याचा वाचकांनी विचार करावा. कॅन्सर हा रोग किती भयंकर आहे व दिवसेदिवस तो जगाला कसा ग्रासीत चालला आहे, हे सर्वांना माहीतच आहे. त्या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी अमेरिकन डॉक्टरांचे सतत प्रयत्न चालू आहेत. अशाच डॉक्टरांपैकी डॉ. चेस्टर साऊदॅम हे एक आहेत. त्यांना लसीचे प्रयोग करण्यासाठी काही माणसे हवी होती. स्वतःच्या दण्डात कॅन्सरचे जंतू टोचून घेणारे लोक हवे होते. असे लोक कोठे मिळणार ? त्यांनी ओहिओ संस्थानातील कोलंबस या नगरच्या तुरुंगावरच्या अधिकाऱ्यांना लिहिले की जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांपैकी यासाठी कोणी तयार असल्यास चौकशी करावी. अधिकाऱ्यांनी तुरुंगातील फलकावर तशी नोटीस लावली. आणि आश्चर्य असे की पंचवीस लोक हवे अशी नोटीस लावलेली असताना १३० जन्मठेपीच्या कैद्यांनी अर्ज केले. डॉक्टर चेस्टर अगदी चकित झाले. कॅन्सर
म्हणजे यमयातना आहेत, तो जिवंत मृत्यु आहे हे त्यांनी त्या कैद्यांना पुन्हा नीट समजावून दिले. पण एकानेही नाव मागे घेतले नाही. त्यापैकी काहीना डॉक्टरांनी विचारले, 'हया मरणयातना सोसायला तुम्ही का तयार होता ?' एकाने उत्तर दिले, 'माझे वडील कॅन्सरने गेले. तेव्हा त्यासाठी काही सेवा करायला मिळाली तर मी स्वतःला भाग्यवान् समजेन.' दुसरा म्हणाला, 'येथे तुरुंगात मी इस्पितळात काम करतो. तेथे मी कॅन्सरच्या यातना पाहिल्या आहेत. तो दुःखभार हलका व्हावा म्हणून मला हे केलेच पाहिजे.' तिसरा म्हणाला, 'इतके दिवस मी पाप केले. आता काही सेवा घडली तर बरेच होईल.' (रीडर्स डायजेस्ट, जून १९५८)
धर्माच्या कोणच्याही क्षेत्रात आपण नजर टाकली तरी आपल्याला असेच दिसेल की ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यांनी अत्यंत उदार व उदात्त असा उपदेश केला असूनही त्यातून सामाजिक धर्माची प्रेरणा कोणी घेतलीच नाही. धनाचे दान हे धर्मदृष्टीने केवढे पुण्य आहे ? श्रीमंतांनी गरिबांना दान द्यावे असा उपदेश पावलोपावली संतांनी केला आहे. पण येथल्या श्रीमंतांनी दाने कशी दिली ? त्यांनी मंदिरे बांधली, घाट बांधले, त्यांच्या व्यवस्थेसाठी जमिनी दिल्या. ब्राह्मणांसाठी अन्नछत्रे घातली. त्यांसाठी उत्पन्न नेमून दिले. पण रुग्णालयासाठी, पाटबंधाऱ्यासाठी, शेतीसुधारणेसाठी, तुरुंगसुधारणेसाठी, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कोणी दाने दिली नाहीत. याचा अर्थ असा होतो की स्वतःच्या पारलौकिक कल्याणासाठी, पुण्यासाठी ही दाने दिली जात. त्या लोकांना दीनांची दया येत नसे असे नाही. पण त्या दीनांची कायमची उन्नति व्हावी, या क्षणाला कळवळा येऊन आपण त्याला थोडे द्रव्य देण्याने त्याचा प्रश्न सुटत नाही, तो सोडविण्याचा कांही प्रयत्न केला पाहिजे अशी भावनाच कोणाच्या चित्तात येथे उदित झाली नाही. ती झाली असती तर येथे आमूलाग्र क्रांति झाली असती. पाश्चात्त्य समाज उत्कर्ष पावला तो त्या समाजाच्या धर्मबुद्धीला हे वळण मिळाले म्हणून. रॉकफेलर हे नाव आता जगप्रसिद्ध झाले आहे. त्याने केलेले दान या प्रकारचे आहे. नवकोटनारायण हा शब्द त्याच्या वर्णनाला थिटा पडेल. अपार, अगणित संपत्ति येवढेच म्हणता येईल. आणि तरीही त्या संपत्तीची कल्पना येणार नाही. या संपत्तीचे काय करावे असा प्रश्न येताच जॉन रॉकफेलर तरुण वयातच सर्व व्यवसायातून
निवृत्त झाला. आणि आयुष्याची पुढली ४५ वर्षे त्याने संपत्ति दान करण्यातच खर्च केली. रुग्णालये, वैद्यकीय संशोधन, शास्त्रीय संशोधन, ग्रंथालये, सार्वजनिक इमारती, शांततेसाठी प्रयत्न करणारी मंडळे, धर्मसंस्था या सर्वांना त्याने कोटिकोटि रुपयांचे दान केले. या दानांमध्ये मानवजातीचे कल्याण हा एकच हेतु होता. 'अखिल विश्वातला मानव' हे त्याचे लक्ष्य होते. जगातल्या ९३ देशांत वरच्यासारख्या संस्था स्थापण्यासाठी त्याने निधि दिलेला आहे. आणि त्याने ठेवलेल्या निधीतून अजूनही जगातल्या अनेक देशांना साह्य मिळत आहे. रॉकफेलरचा चरित्रकार रेमंड फॉसडिक म्हणतो की, सर्व रॉकफेलर घराणे अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. जॉन रॉकफेलरचे वडील अत्यंत दानशूर व संयमी होते. त्याच्या आईची शिस्त अत्यंत कडक होती. तमाखू, मद्य, नृत्य हे सर्व तिने मुलांना वर्ज्य केले होते. मुलांनी पण तिच्या आज्ञा शिरसावंद्य मानल्या. अशा या धर्मशिक्षणामुळेच जॉन रॉकफेलरच्या मनातून 'भेदाभेद भ्रम अमंगळ' सर्व नष्ट झाला होता. फ्रेडरिक गेट्स् हा रॉकफेलरच्या वडिलांचामित्र. तो त्याला नित्य सांगे की, अरे तुझ्या अपार संपत्तीची तू काही व्यवस्था केली नाहीस तर ही महाशक्ती तुझ्यामागे कोणाच्या तरी हाती जाईल. आणि मग त्याचा आणि समाजाचाहि घात होईल. म्हणून आपल्या हयातीतच तू अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी सामाजिक दृष्टीने दानधर्म होत जाईल अशी या धनाची काहीतरी शाश्वतची व्यवस्था करून ठेव. हा उपदेश रॉकफेलरला मानवला आणि म्हणून ३६ व्या वर्षीच तो निवृत्त झाला व अनेक पंडित, कार्यकर्ते, संशोधक, समाजधुरीण यांच्या साह्याने त्याने तशी व्यवस्था करून टाकली. त्याचे वडील त्याला नेहमी सांगत की, 'जॉन, आपल्याजवळ धन आहे. पण कर्तबगार, कल्पक, सच्चरित व धीमान् लोक शोधून काढून त्यांच्याजवळ ते दिले पाहिजे. नाहीतर मानवहिताच्या दृष्टीने ते शून्यवत् होईल.' समाजाची ऐहिक उन्नति ज्याला साधावयाची आहे त्याला दान देताना ही चिंता वहावी लागते. वैयक्तिक पुण्यसंपादनासाठी जे दान द्यावयाचे ते देताना अशी काळजी करावी लागत नाही. दुसऱ्याच्या दुःखहरणापेक्षा तेथे स्वतःच्या पुण्याकडे दृष्टी जास्त असते. त्यामुळे धर्म ही त्या समाजात राष्ट्रीय प्रपंचातली एक शक्ति ठरत नाही. त्या वैयक्तिक पुण्यातून सामाजिक पुण्य निर्माण होत नाही. आणि मग वैयक्तिक पुण्यालाहि हळूहळू अनिष्ट असे वळण लागते. पंधराव्या
सोळाव्या शतकात रोमचे पोप लोकांना असलीच पुण्यदृष्टी शिकवीत असत. त्याचा परिणाम काय झाला ते इतिहास सांगतोच आहे.
धर्माला सामाजिक अर्थ प्राप्त करून दिल्यामुळे, मानवाचे इहलोकीचे सुख हेहि धर्माचे एक प्रधान कार्य आहे ही दृष्टि ठेविल्यामुळे पाश्चात्त्य समाजांना केवढे सामर्थ्य प्राप्त झाले त्याचा आपण विचार केला तर आज आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी त्याच मार्गाचा अवलंब केला पाहिजे हे आपल्याला सहज पटेल, असे वाटते. पाश्चात्त्य राष्ट्रात आजही धर्म ही एक अत्यंत प्रभावी शक्ती आहे. विज्ञानयुग निर्माण झाले तेव्हा प्रथम धर्म हा पराभूत होऊ लागला. पण त्याचे कारण असें की त्या वेळच्या धर्मधुरीणांनीच धर्माला अवकळा आणली होती. एक तर हे धर्मधुरीण अत्यंत भ्रष्ट होते आणि दुसरे म्हणजे त्यांनी धर्माला कर्मकांडाचे रूप देऊन शब्दप्रामाण्य, निवृत्ति, संन्यासधर्म यांचे स्तोम माजविले होते. शास्त्रीय सत्याशी त्या आंधळ्या धर्मवेत्त्यांनी वृथा संघर्ष केला. त्यामुळेच त्यांच्या धर्माला हीन, अमंगल रूप प्राप्त झाले. पण लवकरच ख्रिस्तीधर्माचे अनुयायी सावध झाले. आणि धर्म ही प्रामुख्याने समाजसेवा आहे हे ध्यानी घेऊन त्यानी धर्मामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. त्यामुळे विज्ञानयुगातहि धर्मश्रद्धा टिकून राहिली आणि मुख्य म्हणजे तरुण लोक धर्मासाठी म्हणजेच समाजसेवेसाठी रंजल्यागांजल्यांच्या अनाथ- अपंगांच्या सेवेसाठी सज्ज झाले. राष्ट्रावरची फार मोठी आपत्ति त्यामुळे टळली. धर्म ही केवळ वैयक्तिक पुण्याची व म्हणूनच पारलौकिक कल्याणाची बाब आहे असे जेथे ठरते तेथे तरुण रक्त त्याकडे वळत नाही, कारण तो म्हातारपणचा उद्योग आहे अशी त्यांची खात्री झालेली असते. आपल्या समाजात शेकडो वर्षे हीच भावना रूढ झालेली होती. लो. टिळकांच्या मनाला ही गोष्ट अतिशय लागून राहिली असली पाहिजे. 'गीतारहस्या'च्या प्रस्तावनेत त्यांनी मुद्दाम असे सांगितले आहे की, "निव्वळ स्वार्थपरायण बुद्धीने संसार करून थकल्या-भागलेल्या लोकांच्या कालक्रमणार्थ, किंवा संसार सोडून देण्याची तयारी म्हणूनही, गीता सांगितली नसून संसारच मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे व मनुष्यमात्राचे संसारातले खरे कर्तव्य काय, याचा तात्त्विक दृष्ट्या उपदेश करण्यासाठी गीताशास्त्राची प्रवृत्ति झाली आहे. म्हणून पूर्ववयातच गृहस्थाश्रमाचे हे प्राचीन शास्त्र प्रत्येकाने समजून घ्यावे. "
लेखाच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे पाश्चात्त्यांनी हे शास्त्र पूर्वीच समजून घेऊन गीतेचा लोकसंग्रहाचा संदेश प्रत्यक्षातहि आणला होता. भारतीयांनी मात्र शंकराचार्यांच्या काळापासून टिळकांच्या काळापर्यंत गीता म्हातारपणी वाचण्याचा निश्चय केला होता. संसार सोडण्याची तयारी म्हणून धर्माकडे वळावयाचे असेच येथे ठरून गेले होते. तरुण वयात येथे परमार्थाकडे कोण वळणार ? तर 'संसारदुःखे दुखावले, त्रिविध तापे पोळले, तेचि अधिकारी झाले, परमार्थाचे.' संसारात जे यशस्वी होत असतील त्यांचा व परमार्थाचा, धर्माचा काही संबंध नाही असाच समज येथे रूढ होता. धर्मसेवेसाठी आत्मार्पण करणे ही वृत्तीच येथे निर्माण झाली नाही. कारण धर्म हे परलोकप्राप्तीचे साधन होते. मोक्षाचे साधन होते. पण धर्माला सामाजिक अर्थ प्राप्त होताच सर्व दृष्टिकोनच पालटून जातो. दीन-दलितांच्या दुःखाला कारण होणाऱ्या ज्या सामाजिक रूढी, जी सामाजिक बंधने ती नष्ट करावयाची आहेत, त्यासाठी सत्ताधाऱ्यांशी झगडा करावयाचा आहे हा धर्माचा संदेश म्हणजे तरुणांना आव्हानच आहे. हे कार्य राष्ट्रसेवेचे आहे, विज्ञानाशी, बुद्धीशी त्याचा विरोध नाही, हे पहाताच समाजातील तरुण शक्ति तिकडे आकर्षिली जाते. हे कार्य तरुणपणचे आहे हे तिला पटते. यातल्या उदात्त ध्येयवादामुळे तिचा उत्साह द्विगुणित होतो. आणि त्यामुळे समाज समर्थ होतो. कारण ध्येयवादी तरुण हे राष्ट्राचे मोठे सामर्थ्य आहे.
तरुणांना ध्येयवादाची स्फूर्ति देणारी धर्म ही फार मोठी शक्ति आहे. राष्ट्रनिष्ठा, समाजवाद हीही तत्त्वे प्रभावी आहेत. त्याहि शक्ति आहेत. पण धर्माच्या तुलनेने त्या शक्ती दुबळ्याच ठरतात असा इतिहासाचा निर्वाळा आहे. मात्र हा धर्म केवळ मोक्षधर्म असता कामा नये. तो अभ्युदयवादी, इहवादी धर्म असला पाहिजे. समाजकल्याण हे त्याचे उद्दिष्ट असले पाहिजे. संसार, प्रपंच, ऐहिक आकांक्षा यांशी त्याचा विरोध असता कामा नये. विज्ञान, बुद्धिनिष्ठा यांची त्याने अवहेलना करता कामा नये आणि तरुण रक्ताला चेतवील असा दलितांच्या उद्धारार्थ अवश्य असलेल्या संग्रामाचा संदेश त्याने दिला पाहिजे.
क्वेकर पंथाचा संस्थापक जॉर्ज फॉक्स (१६२४ ते १६९१) याने नेमका असाच धर्म स्वजनांना सांगितला. इंग्लंडमध्ये चार्ल्स् राजाने अनन्वित जुलूम
मांडिला होता. प्रजेची अतोनात पिळवणूक करून त्याने तिचा रक्तशोष चालविला होता. राजकारणाशी ज्यांचा कसलाहि संबंध नाही अशा लोकांनाहि पकडून तो त्यांना वाटेल त्या शिक्षा देत असे. अनेक लोकांचा शिरच्छेद करून त्यांची मुंडकी तो रस्त्यात टांगून ठेवीत असे. एका प्रसंगी सरकारी लांडग्यांनी एका घरात शिरून एका लहान बालकापुढे आईने ठेवलेले अन्नाचे घासच हिरावून नेले. युरोपभर सर्व देशात असाच जुलूम चालू होता. धर्मगुरू व राजे हे जुलूम करण्यात, प्रजेला पिळून काढण्यात एकमेकाशी स्पर्धा करीत होते. हे सर्व भयानक अत्याचार, दलितांचे ते अपार दुःख फॉक्स याला पाहवेना. म्हणून कामधंदा सोडून त्याने देशभर भ्रमण सुरू केले. नंतर चार वर्षे एकान्ती जाऊन त्याने तपश्चर्या केली, अंतर्मुख होऊन अवलोकन केले आणि ईश्वरी प्रसादाची प्राप्ती करून घेतली आणि मग तो संचारार्थ निघाला. ख्रिस्ती म्हणविणाऱ्या देशांना ख्रिस्ताची तत्त्वे मुळीच कळलेली नाहीत आणि त्यामुळे सत्ताधारी व धर्मगुरू सर्व क्रूर व मगरूर झाले आहेत आणि जनता फारच दीन झाली आहे असे प्रतिपादन करण्यास त्याने प्रारंभ केला. अन्यायाचा प्रतिकार करण्याचा संदेश मिळताच शेकडो तरुण त्याच्याभोवती गोळा झाले व दर ठिकाणी खेड्यात, शहरात, सरदारांच्या किल्लेकोटात, राजांच्या राजवाड्यात जाऊन निर्भयपणे अन्यायाला वाचा फोडू लागले, लोकांना जागृत करू लागले. इतिहासकार सांगतात की सतराव्या शतकात या क्वेकर लोकाइतके शूर व धर्मनिष्ठ लोक दुसरे कोणीच नव्हते. सत्ताधारी लोकांनी सर्व शक्ति खेचून त्याना ठेचून टाकण्याचा प्रयत्न केला पण क्वेकरांचा पंथ वाढतच गेला. त्यावेळचे तुरुंग कसे असत याचे वर्णन वर दिलेच आहे. अशा तुरुंगात क्वेकरपंथीयांना वर्षानुवर्ष यमयातना भोगीत पडावे लागे. स्वतः जॉर्ज फॉक्स याला साठ वेळा शिक्षा झाली. त्याचे निम्मे आयुष्य या नरकवासातच गेले. अर्थातच त्यामुळे त्यांचे शरीर विकल झाले. पण त्याने माघार घेतली नाही. त्या अंधाऱ्या तुरुंगातच त्याने मानवी स्वातंत्र्याचा नंदादीप प्रज्वलित केला, व त्याच्या हजारो अनुयायांनी तो आत्मबलिदान करून तेवत ठेविला.
राजेमहाराजांच्या समोरहि क्वेकर कधी वाकत नसत, टोपी काढून अभिवादन करीत नसत. कारण प्रत्येक मानवामध्ये ईश्वरी अंश असल्यामुळे सर्व
मानव सारखे आहेत, कोणी कोणापुढे वाकण्याचे कारण नाही असे त्यांचे मत होते. यामुळे त्यांना शिक्षा होत, मार खावा लागे, फटके खावे लागत. सभेतहि गुंड लोक त्यांच्यावर हल्ले चढवीत व त्यांना रक्तबंबाळ करीत. पण क्वेकर हे शांततावादी, अहिंसावादी, सत्याग्रही होते. त्यांनी शत्रूंवर कधीही हात उचलला नाही. पण त्यांच्या अन्यायावर भडिमार करण्याचे व्रतही त्यांनी कधी सोडले नाही. सभेत लाठ्याकाठ्यांच्या माराने डोके फुटल्यावरहि जॉर्ज तसाच उठे, रक्त पुसून पुन्हा भाषणास सुरुवात करी. गुंडावर खटले भरावे असे त्याच्या मित्रांनी त्याला सांगितले; पण तो म्हणाला, 'परमेश्वराने क्षमेचे व्रत स्वीकारले असताना मी ते मोडणे उचित नाही. मी बुद्धीच्या शस्त्राने लढणार आहे. इतर शस्त्रे मला त्याज्य वाटतात.' त्यावेळी अमेरिकेतहि त्याला अनुयायी मिळाले होते. तेथे त्यांचा अनन्वित छळ होत होता. ते ऐकताच तो एका साध्या फुटक्या नावेतून अमेरिकेला गेला. क्वेकरांना तेथे सहज उचलून फाशी देत असत. त्यांना कोणी कपभर दूध दिले तर तेवढ्यावरून देणाऱ्याला तुरुंगात टाकीत. तीन क्वेकर स्त्रियांना गाडीला बांधून बर्फाच्या रस्त्यातून फरफटत नेण्याची शिक्षा अधिकाऱ्यांनी दिली. शिवाय दर चौकात त्यांना दहा-दहा फटकेही मारले. अशा या जळत्या खाईत जॉर्ज फॉक्स गेला. आणि स्वतःच्या अनुयायांना त्याने धीर दिला. त्यांचा छळ कमी झाला नाही. पण तो सोसण्यास याच्या शब्दामुळे तेथील क्वेकरांना धीर आला. आणि केवळ क्वेकर पंथ स्वीकारल्यामुळे जेथे इतका अमानुष छळ भोगावा लागे त्या अमेरिकेत १६७० साली जॉर्ज फॉक्सने निग्रो गुलामांच्या बंधमुक्ततेचा जाहीरनामा काढला. हे धाडस, ही निर्भयता खरोखर अतुल आहे. ही निर्भयता, हे नीतिधैर्य काही एक-दोन नेत्यांतच होते असे नाही. संचारार्थ बाहेर पडल्यापासून ८-१० वर्षांतच फॉक्सला ५०,००० अनुयायी निळाले. आणि पुढे हा पंथ वाढतच गेला. येवढ्या लोकाच्या ठायी हे धैर्य कोठून आले ? जिवंतपणीच रौरव यातना सोसण्याचे त्यांना सामर्थ्य कसे प्राप्त झाले ? त्यांच्या जाज्वल्य धर्मानिष्ठेमुळे ! दीनदलितांना पाहून त्यांच्या चित्तात जे कारुण्य निर्माण झाले त्यामुळे. कार्लाइलने आपल्या 'सॉर्टर रिसार्टस' या ग्रंथात पुढील शब्दांत जॉर्ज फॉक्सचे वर्णन केले आहे. "इतिहासकार ऑस्टरलिझ् किंवा वॉटर्लू असल्या लढायांना महत्त्व देतात. पण जॉर्ज फॉक्सचा क्वेकर पंथ
ही त्यापेक्षाहि महत्त्वाची घटना होय. जॉर्ज फॉक्स हा विश्वातल्या दैवी तत्त्वाचा प्रत्यक्ष आविष्कारच होय. या चर्मकाराचे दुकान हे पोपच्या निवासापेक्षा जास्त पवित्र होते. तेथे त्याने टाकलेला प्रत्येक टाका हा गुलामगिरी, धनसत्ता यांच्या काळजात शिरत होता." त्या वेळी सर्व युरोपात स्वतंत्र पुरुष असा एकच होता व तो म्हणजे जॉर्ज फॉक्स हा होय. पश्चिम युरोपात राष्ट्रनिष्ठा, लोकशाही ही तत्त्वे जनमनात रुजून पुढे विकसित झाली त्याचे इतर राजकीय, सामाजिक चळवळींना जितके श्रेय आहे तितकेच या धार्मिक चळवळींनाहि आहे. अन्यायाचा प्रतिकार हा मानवी सामर्थ्याचा सर्वश्रेष्ठ आविष्कार होय. त्यामुळेच इतिहास घडत असतो, युगपरिवर्तन होत असते. जॉर्ज फॉक्सने क्वेकर पंथाची स्थापना करून प्रतिकाराची शिकवण दिली. त्याचे अनुयायी मदांध, उन्मत्त मालकवर्गाकडे जाऊन, गुलामांना मुक्त करा, असे त्यांना बजावीत, भ्रष्टाचारी धर्मगुरूंच्या समोर जाऊन त्यांच्या मग्रूरीची निर्भर्त्सना करीत आणि लाचार न्यायाधीशापुढे जाऊन त्यांनी केलेल्या अन्यायाचा जाब विचारीत. आणि यामुळे होणारी फटके, तुरुंग, शिरच्छेद, फाशी ही शिक्षा आनंदाने सोशीत. निर्भय सत्याग्रहात जनताजागृतीचे केवढे सामर्थ्य असते हे महात्मा गांधींनी जगाला दाखविलेच आहे. हे सामर्थ्य युरोपातल्या धर्मपंथांनी सतराव्या शतकातच युरोपला दिले होते.
आपल्याकडे महाराष्ट्रात साधारण याच काळात, 'आम्ही विष्णुदास मेणाहुनि मऊ असलो तरी वज्राला भेदून टाकण्याइतके कठिण आहो, आम्ही नाठाळाच्या माथी काठी मारल्यावाचून रहाणार नाही' असा वीरवाणीचा संदेश तुकोबांनी दिला होता. पण येथला वारकरी अखेरपर्यंत दीनदुबळा, नेभळा, प्रतिकारशून्य असाच राहिला. सामाजिक वा धार्मिक अन्यायाचा प्रतिकार करण्याचे व्रत घेऊन तशी धर्मसंघटना येथे कोणी केलीच नाही. वारकरी पंथात अस्पृश्यांचा समावेश संतांनी आग्रहाने करून घेतला. पण त्यामुळे त्यांना मोक्षमार्ग खुला झाला इतकेच. तेथे जी समता संतानी प्रतिपादिली तिला सामाजिक अर्थ कोणी प्राप्त करून दिला नाही. वर सांगितलेच आहे की मोक्षधर्माला सामाजिक अर्थ, ऐहिक उन्नतीचा भाव प्राप्त झाला नाही तर त्याला तेज चढत नाही. त्यातून सामर्थ्य निर्माण होत नाही. जो धर्म इहलोकी होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार हे आपले ब्रीद मानीत नाही तो धर्म कालांतराने निष्प्रभ होतो. वारकरी पंथाचे तेच झाले. त्यांनी तुकोबांचे निवृत्तीचे बोलच खरे मानले व त्यावरच भर दिला. 'जेथे अन्याय होतो, जेथे गुंड सज्जनांना मारीत असताना त्यांचे कोणी निवारण करीत नाही, जेथे अविचारी सत्ताधारी प्रजेला बुडवीत असतात, अशा गावी भल्या माणसाने राहूं नये; त्यापेक्षा सुखाने गिरिकंदरांत जाऊन रहावे,' असे तुकोबांनी एका अभंगात सांगितले आहे. (जोग गाथा - ३२२०). वारकऱ्यांनी एवढेच लक्षात ठेविले. 'नाठाळांच्या काठी हाणू माथा' हे मात्र ते विसरून गेले. महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास फारसा उपलब्ध नाही पण वाङमयाच्या इतिहासावरून जो थोडासा सामाजिक इतिहास दिसतो त्यात अन्याय झाला, आपत्ति आली की संसाराला विटून, विरक्त होऊन निवृत्त होणाऱ्यांची कितीतरी उदाहरणे सांपडतात. दासोपंतांच्या वडिलांना सरकार-देणे नीट देता आले नाही म्हणून यवन पादशहाने त्यांच्या मुलाला, दासोपंतांना पकडून नेले व त्यांना बाटविण्याची धमकी दिली. पुढे ती आपत्ति टळली. पण येवढ्या तडाख्याने दासोपंत संसारदुःखें दुखावले व परमार्थाचे अधिकारी झाले. त्यांचे समकालीन जनी जनार्दन यांची कथा अशीच आहे. सर्वत्र हीच कहाणी आहे. संकट आले तर त्याला तोंड देऊन त्याच्यावर स्वार व्हावे व समाजशक्ति जागृत करून निर्भयपणे आक्रमणाला तोंड द्यावे ही वृत्ती येथे निर्माण झालीच नाही. छत्रपतींच्या व समर्थांच्या काळी राजकीय क्षेत्रात ती निर्माण झाली. आणि तेवढ्या शक्तीने मोगल सामाज्य नष्ट झाले. पण, नीतिधैर्याची जोपासना करून सामाजिक अन्यायावर प्रहार करावा, दीन, दलित, अनाथ, अपंग यांच्यावर जुलूम करणाऱ्यांना जाब विचारावा आणि त्यासाठी होतील त्या क्रूर शिक्षा भोगून पुन्हा प्रतिकारार्थ सिद्ध व्हावे ही क्वेकरांची वृत्ती येथे भारतात कधीच निर्माण झाली नाही. प्रतिकारावाचून अन्याय, विषमता, जुलूम हा कधी दूर होत नाही. अस्पृश्यांना ही प्रतिकाराची चेतावणी त्याच काळात दिली गेली असती तर त्याच वेळी त्यांचे जीवन उजळून जाऊन आपला समाज संघटित व समर्थ झाला असता.
सतराव्या अठराव्या शतकांत युरोपात जे धार्मिक पुनरुज्जीवन झाले त्याने हेच कार्य साधले. क्वेकर, मेथॉडिस्ट, इव्हँजेलिकल, जेसुइट, साल्व्हेशन आर्मी हे आणि असे इतर अनेक पंथ दीन-दलितांच्या जीवनात खरा धर्म निर्माण करण्यासाठी निर्माण झाले होते. या धर्मात श्रद्धा, ईश्वरभक्ति यांना स्थान होतेच. भगवंताचे अधिष्ठान हा त्यांचा आत्माच होता. पण या अनाथ अपंगांच्या ऐहिक जीवनात प्रतिष्ठा निर्माण करणे याला त्यांच्या दृष्टीने इतकेच महत्त्व होते. साल्व्हेशन आर्मीचा- मुक्तिफौजेचा- संस्थापक विल्यम बूथ म्हणतच असे की 'उपाशी पोटावर धर्मोपदेश याला अर्थच नाही.' म्हणून हे धर्मपंथ प्रथम भुकेलेल्यांना अन्न देण्याची व्यवस्था करीत. आणि ही व्यवस्था केवळ तात्कालिक नव्हती. तशी अन्नछत्रे ते उघडीतच. पण ती शाश्वतची व्यवस्था व्हावी म्हणून दलितांच्या बाजूने ते मालकवर्गाशी संग्रामच मांडीत. किंबहुना त्यांच्या चळवळीचे स्वरूपच असे होते की त्यातून हा संग्राम निर्माण होणे अपरिहार्य होते. यामुळेच या पंथांना सत्ताधाऱ्यांकडून कडवा विरोध होत असे. मेथॉडिस्ट पंथाचा संस्थापक वेसले याने धर्मोपदेशाला प्रारंभ केला तो किंग्जवूड येथील खाणीकामगारांच्यापासून. त्यांना हा स्वर्गच भूवर आला असे भासले. कारण त्यांच्याशी एकजीव होऊन राहणारा धर्मगुरू त्यांनी पाहिलाच नव्हता. तेथून प्रारंभ करून मग खेड्या- पाड्यातून वेसले हिंडू लागला. लवकरच हजारो लोकांनी या धर्मपंथाची दीक्षा घेतली व इंग्लंड, आयर्लंड, वेल्स येथे सर्वत्र त्यांनी मंडळे स्थापन केली. कोणासाठी ? असहाय, भग्न, जीवितांसाठी ! चोर, दरोडेखोर, दारुडे, मवाली यांच्यात मेथॉडिस्ट मिसळले आणि त्यांचे नैतिक परिवर्तन त्यांनी घडवून आणले. असल्या लोकांना, इतक्या हीन पातळीवरच्या हजारो लोकांना, जीवनांत पुन्हा सुप्रतिष्ठित करणे ही केवढी देशसेवा आहे ! पाश्चात्त्य देशात लोकशाहीचा पाया घातला गेला तो यामुळेच. तुरुंगाच्या रौरवात पिचत पडलेले, गुलामगिरीमुळे पशुवत् झालेले, व्यसनाधीनतेमुळे माणुसकी नष्ट झालेले, नीतिभ्रष्ट झालेले, राजे, भांडवलदार, धर्मगुरू यांच्या जुलमाने दीन झालेले- अशा लोकांच्या जीविताला व्यक्तित्वाची प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे कार्य या धर्मपंथांनी केल्यामुळेच तेथील समाज लोकशाही पेलण्यास समर्थ झाला. भारतातल्या धर्मधुरीणांनी हे कार्य केले नाही. त्यामुळे येथे प्रजेचे व्यक्तित्व विकसित झाले नाही. आणि लोकशाहीला लागणारा मूलाधारच येथे निर्माण झाला नाही.
विल्यम बूथने स्थापिलेल्या व त्याची कन्या इव्हँजेलाइन बूथ (जन्म १८६५) हिने जगभर प्रसृत केलेल्या मुक्तिफौजेचा इतिहास असाच आहे. दीन, क्षुधित, भ्रष्ट, पापी, भग्न, निराश, पराभूत, बहिष्कृत, असहाय, यांना दैन्यातून, पशुतेतून मुक्त करण्यासाठी ही फौज उभी होती. आरंभी यांचाहि क्वेकर लोकांप्रमाणेच छळ झाला. विल्यम बूथच्या सभा पोलीस उधळून लावीत, गुंड-मवाली त्याला मारहाण करीत, दारूबंदीचा तो प्रचार करीत असल्यामुळे कलाल लोक संगनमत करून त्याला तुरुंगात धाडीत. पण त्याने माघार घेतली नाही. सतराव्या अठराव्या वर्षी त्याच्या कन्येने त्याची धुरा खांद्यावर घेतली आणि मग त्या धर्मसंघटनेला तेज चढले. तिच्या व तिच्या अनुयायांच्या आत्मक्लेशामुळे जनता जागृत झाली. इंग्लिश नागरिकांना तिच्या कार्याचा अर्थ कळू लागला. त्यांच्या हे ध्यानात आले की भुकेलेल्यांच्या अन्नवस्त्राची सोय करण्यासाठी पार्लमेंटमध्ये नुसते वादविवाद चालू आहेत. पण मुक्तिफौजेने तीस लाखांची सोय करीत आणली आहे. त्यामुळे मग श्रीमंतांनी आपल्या तिजोऱ्या उघडल्या व मुक्तिफौजेला अमाप पैसा मिळू लागला. धर्मसंघटनेतील सामाजिक पुण्याची दृष्टी ती हीच. एखादुसऱ्या धनिकाने पुण्यप्राप्तीसाठी केवळ ब्राह्मणांसाठी अन्नछत्र घालणे निराळे आणि लाखो भुकेल्या लोकांची जबाबदारी आपल्यावर आहे हे जाणून सर्व समाजाने धन देणे निराळे. युरोपातल्या धर्मसंघटनांनी हे कार्य घडवून आणले. आणि दीनदलितांना जागृत करून, त्यांना प्रतिकाराला सिद्ध करून, त्यांच्या जीविताची प्रतिष्ठा वाढवून, घडवून आणले. धर्म ही सामाजिक उत्कर्षाची अजूनही युरोप-अमेरिकेत एक मोठी जिवंत शक्ती आहे याचे कारण हेच आहे. भारतात ब्रिटिशांच्या आगमनानंतर, पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारानंतर स्थापन झालेल्या आर्यसमाज, ब्राह्मसमाज, रामकृष्ण मिशन यांच्या कार्याकडे पाहिले तर याची काहीशी कल्पना येऊ शकेल. या संस्थांकडे एकदम तरुण शक्ती आकृष्ट झाली व समाजसेवेचे व्रत तिने घेतले हे आपण पहातच आहो. धर्म ही जिवंत शक्ती असणे याचा हाच अर्थ आहे. तरुणांना आत्मार्पणाची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य असणे हेच जिवंतपणाचे लक्षण. आणि दीनदलितांचा ऐहिक उद्धार हे कार्य डोळ्यासमोर असले, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी लढा देण्याचे आवाहन असले, की धर्माला हे सामर्थ्य प्राप्त होते. मुक्तिफौजेच्या यशाचे हेच रहस्य आहे. तुरुंगातील कैदी, कुमारी माता, रुग्ण, दलित यांच्या सेवेसाठी इव्हँजेलाइन बूथने भराभर मंडळे स्थापन केली. ते कार्य पाहून मुक्तिफौजेला अमेरिकन नागरिक भराभर येऊन मिळू लागले. त्यांच्या हे ध्यानात आले की केवळ कायद्याने समाजाचे रक्षण होत नसते. त्याच्यामागे धर्मशक्ति असली तरच कायदा हा प्रभावी होतो. आणि ही धर्मशक्ती ईव्हा बूथ मुक्तिफौजेच्या रूपाने उभी करीत होती. अमेरिकेत असे यश मिळाल्यानंतर ईव्हा जगभर संचार करू लागली आणि तिने फ्रान्स, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, जपान, हिंदुस्थान, या देशांत मुक्तिफौजेच्या शाखा स्थापन केल्या. आपल्या यशाचे रहस्य सांगतांना ती म्हणाली, 'संग्राम, लढा ही मनुष्याची सहजप्रवृत्ती आहे. ती नष्ट करू नका. मात्र त्याचे खरे शत्रू त्याला दाखवून द्या. संघटना करावयाची ती प्रपंचाच्या उत्कर्षासाठी करा. अशा रीतीने धर्मनिष्ठेने केलेला जो लढा असेल त्यातूनच एक दिवस सत्ययुग निर्माण होईल.'
ब्रिटिशपूर्व काळात सतराव्या शतकात समर्थांनी समाजोन्नतीचे हेच मर्म जाणून आपली संघटना उभारली होती. धर्माला त्यानी 'मराठा तेवढा मेळवावा,' असे सांगून सामाजिक दृष्टि दिली होती. आणि सामाजिक संकटाचा परिहार समाजशक्तीने करावयाचा हे धोरण आखले होते. आणि हे सर्व ईश्वराचे अधिष्ठान कायम ठेवून. एवढ्यामुळे महाराष्ट्रात केवढे सामर्थ्य निर्माण झाले होते ते आपल्याला माहीतच आहे. दुर्दैवाने समर्थांच्यासारखा हे धर्मस्वरूप जाणणारा एकही पुरुष त्यांच्या पश्चात् निर्माण झाला नाही. त्यामुळे आपला धर्म हा विकलांगच राहिला. मोक्षधर्म, हेच त्याचे रूप राहिले. संसार सोडून देण्याची तयारी म्हणूनच गीता किंवा ज्ञानेश्वरी आणि दासबोध सुद्धा वाचावयाचा, कारण संसाराच्या यशाचा व धर्माचा काही संबंध नाही, असेच लोकांनी ठरवून टाकले होते. त्यामुळे अभ्युदयवादी धर्मसंघटना ही समाजोन्नतीसाठी अवश्य असणारी जी महाशक्ति तिला आपण पारखेच राहिलो.
धर्मनिष्ठा ही आजहि, या विज्ञानयुगातहि, पाश्चात्त्य देशात कशी जिवंत आहे ते सांगून हे विवेचन आता संपवावयाचे आहे. विल्यम कॅमेरोन टाऊनशेंड ऊर्फ अंकल कॅम हे एक मिशनरी आहेत. आज त्यांचे वय ६३ आहे. १९१७ साली वयाच्या एकविसाव्या वर्षी ते ग्वाटेमालामध्ये धर्मप्रसारार्थ गेले. आणि कॅचिक्वेल या रानटी जमातीमध्ये त्यांनी कामाला प्रारंभ केला. त्यांचे कार्य स्पॅनिश भाषेत चाले. पण त्या जमातीला ती भाषा येत नव्हती. एक दिवस तेथला एक मनुष्य त्यांना म्हणाला की, 'तुमचा देव जर सर्वज्ञ आहे तर त्याला आमची भाषा कशी येत नाही ?' या प्रश्नाने अंकल कॅम अस्वस्थ झाले. त्यांनी बायबलपुराण लगेच बंद केले आणि त्या जमातीत राहून प्रथम त्यांनी त्यांच्या भाषेचा अभ्यास केला. मग त्यांनी तिला लिपि लावून दिली, तिचे व्याकरण तयार केले, कोश केला आणि मग त्या कॅचिक्वेल भाषेत बायबल छापून त्या लोकांना साक्षर करून त्यांना जीजस् च्या धर्माची दीक्षा दिली. यात पंधरा वर्षे गेली. १९३२ साली त्यांना क्षय झाल्यामुळे ते परत अमेरिकेत गेले. तेथे ते रुग्णावस्थेत असताना त्यांचा एक जुना मिशनरी मित्र त्यांना म्हणाला, की, 'तुम्ही एका भाषेसाठी केले ते दक्षिण अमेरिकेतील गहन जंगलात ज्या शेकडो रानटी जमाती आहे त्यांच्या भाषेसाठी का करू नये ?' ही झेप फारच मोठी होती. पण हे कार्य अंगीकारावयाचे असा त्या दोघा मित्रांनी निश्चय केला. क्षयातून मुक्त होताच कॅम यांनी १९३४ साली 'समर इन्स्टिट्यूट ऑफ लिंग्विस्टिक्स' या संस्थेची स्थापना केली. दक्षिण अमेरिकेतील हजार दोन हजार भाषांचा अभ्यास करून वरील प्रकारे त्यांची लिपि, व्याकरण व कोश तयार करून त्यांच्यापर्यंत बायबलचा संदेश पोचवावयाचा, व त्यांना श्रेष्ठ धर्माचा उपदेश करून सुसंस्कृत करावयाचे हा त्या संस्थेचा उद्देश आहे. आज ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांत या संस्थेच्या शाखा आहेत. त्यांतून दरसाल पाचशे तरुण विद्यार्थी बाहेर पडतात. आणि ब्राझिल, मेक्सिको, पेरू, अलास्का येथील घनदाट अरण्यातील रानटी जमातीत जाऊन राहतात. त्यांच्या भाषेचा अभ्यास करून त्यात बायबलची भाषांतरे करतात आणि जीजस् च्या अमृतवाणीचा लाभ त्यांना करून देतात. भाषाशास्त्राच्या अभ्यासाबरोबरच त्या तरुणांना जंगलच्या राहणीचा अभ्यास व सरावहि करावा लागतो. झाडाच्या फांद्या तोडून टहाळे आणून झोपडी बांधणे, वाटेल त्या हवेत रहाणे, उत्तम प्रकारे पोहणे व सुसरी-मगरीशी झुंज घेणे, सर्व प्रकारच्या विषारी सापांची माहिती करून घेणे, जमिनीवर उघड्यावर निजणे, मिळेल त्या अन्नावर निर्वाह करणे हा सराव त्यांना करावा लागतो; कारण त्यांचे पुढले सर्व आयुष्य दण्डकारण्यासारख्या गहन अरण्यात जावयाचे असते. असे हे खडतर जीवन पुढे दिसत असूनहि शेकडो तरुण विद्यार्थी व विद्यार्थिनी या संघटनेत सामील होत आहेत. आज या संस्थेचे ४००० तरुण मिशनरी निरनिराळ्या २५ देशांतील जमातीत काम करीत आहेत. त्यांत शेकडो तरुण विद्यार्थिनी पण आहेत. मारिआना स्लोकम या मुलीच्या प्रियकराला त्यांच्या विवाहाच्या आदल्या दिवशीच दुर्दैवाने मृत्यू आला. पण तिने घेतलेले व्रत सोडले नाही. ती तशीच चिआपास प्रदेशातील झेलताल या जमातीत जाऊन १६ वर्षे राहिली आणि शाळा स्थापून, पुस्तके लिहून तिने ५००० झेलताल लोकांना ख्रिस्ती धर्मात आणले, आणि पाश्चात्त्य जगातल्या सर्व अर्वाचीन सुधारणा त्यांच्यात रूढ केल्या. तेथले काम संपल्यावर १९५७ च्या डिसेंबरात ती दुसऱ्या जमातीत रहावयास गेली. मारिआनासारख्या शेकडो कॉलेज- विद्यार्थिनी दक्षिण अमेरिकेच्या गहन अरण्यात आज ख्रिस्ती धर्मप्रसाराचे कार्य तनमनधन अर्पून करीत आहेत.
अशा या धर्म-प्रसाराच्या प्रयत्नातच जानेवारी १९५६ मध्ये इक्वोडॉरच्या जंगलात पाच प्रोटेस्टंट तरुणानी जीजस् च्या कार्यासाठी आत्मबलिदान केल्याची रोमहर्षक घटना घडली. या इक्वेडोरच्या जंगलात मिशनऱ्यांचे अनेक मठ आहेत. अनेक जमातीत त्यांचे कार्य चालू आहे. औका इंडियन ही जमात अजून तशीच राहिलेली आहे. हे औका अत्यंत क्रूर व हिंस्र आहेत. परका माणूस दृष्टीस पडताच ते विषारी बाणांनी त्याला ठार मारतात, त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याचे धाडस कोणाला होत नव्हते. पण नॅथनल सेंट, जिम इलियट, पीटर फ्लेमिंग, एड मॅककुली इ. तरुणांनी हे आव्हान स्वीकारावयाचे ठरविले. हे सर्व विद्यापीठातले तरुण होते. एक वैमानिक होता. एक कुस्तीगीर होता. एक फुटबॉल खेळाडू होता. अत्यंत बुद्धिमान म्हणून कॉलेजात त्याची कीर्ती होती. त्यांनी या कार्यासाठी आत्मार्पण करावयाचे ठरविले. जीजस् चा धर्म पोचला नाही अशी एकादी जमात पृथ्वीवर असू शकते याची त्यांना नामुष्की वाटू लागली. या सर्वांची लग्ने झाली होती. आपल्या तरुण स्त्रियांना बरोबर घेऊन ते इक्वेडोर जंगलात एका मिशनरी मठात येऊन राहिले. हळूहळू विमानातून टेहेळणी करून त्यांनी औका जमातीचा निवास शोधून काढला. त्यांच्याशी थोडी बोलणीचालणी करून त्यांना विमानातून भेटीदाखल काहीतरी वस्तु टाकून त्यांच्याशी थोडा परिचय करून घेतला. आणि मग त्यांच्या शेजारी झोपडी बांधून रहावयाचे या तरुणांनी ठरविले. हे साहस फार मोठे होते. औका उलटले तर ? मृत्यु निश्चित होता. तरीहि कार्यावरची त्यांची निष्ठ चळली नाही. एक दिवस आपापल्या तरुण स्त्रियांचा निरोप घेऊन हे पाचहि वीर पुरुष जीजस् ची प्रार्थना मुखाने गात तिकडे निघाले. आणि तीच त्यांची शेवटची भेट ठरली. कारण त्या सर्वांचा औकांनी क्रूरपणे संध्याकाळच्या आतच वध करून टाकला. मठात ही बातमी पोचली तेव्हा एकच हाहाकार झाला. पण या स्त्रियांनी परमेश्वराला दोष दिला नाही. उलट, आम्हालाहि असेच मरण येऊ दे म्हणून प्रार्थना केली. अमेरिकेत ही बातमी पोचताच एक हजार तरुण लोकांनी औका जमातीत जाऊन राहण्यासाठी नावे नोंदविली !
भारतात ब्रिटिशांचे राज्य प्रस्थापित होऊन पाश्चात्त्य विद्येचा प्रसार होऊ लागला तसतसा धर्माचा सामाजिक अर्थ आम्हाला प्रतीत होऊ लागला. आणि ब्राह्मोसमाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज, रामकृष्ण मठ या धर्मसंघटना हिंदुस्थानात निर्माण झाल्या. गेल्या शंभर वर्षात त्यांनी समाजाचे परिवर्तन घडविण्यात फार मोठे कार्य केले यात शंकाच नाही. शब्दप्रामाण्य जाऊन बुद्धिप्रामाण्य आले आणि विज्ञानाचा प्रसार होऊन जुन्या श्रद्धा ढासळून गेल्या. त्यावेळी धर्माचे पुनरुज्जीवन करून या संस्थांनी तरुण मनाला पुन्हा धर्माकडे आकृष्ट करून घेण्यात मोठेच यश मिळविले. पण भारताचा एकंदर विस्तार आणि त्याच्यापुढच्या समस्या पाहिल्या तर प्रयत्न अगदीच थिटे पडतात असे दिसते. हिंदुत्ववादी संघटनांचा विचार केला तर असे दिसते की अजूनहि पाश्चात्त्य मिशनरी येथले गिरिवासी, वनवासी, अस्पृश्य, दलित, यांच्यात मिसळून जे कार्य करीत आहेत त्याच्या शतांशही आपल्या हातून होत नाही. हिंदुस्थानाबाहेर तर नाहीच पण हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात जाऊन जेथे जेथे रानटी जमाती राहत आहेत तेथपर्यंत धर्म व संस्कृतीचा संदेश पोचविण्याचे कार्य करील अशी एकहि धर्मसंघटना भारतात नाही. आज भारतात सरकारने देशाच्या उत्कर्षासाठी किती तरी योजना आखल्या आहेत. पण सरकारी अहवालावरून असे दिसते की ही कामे सर्व भाडोत्री लोकांच्या हाती आहेत. 'मोले घातले रडाया, नाही आसू आणि माया' अशी त्यांची स्थिति आहे. अशा वेळी क्वेकर, मेथॉडिस्ट अशांसारख्या धर्मसंघटना स्थापन होऊन किंवा आर्यसमाज, रामकृष्ण मठ, प्रार्थनासमाज या जुन्याच संस्थांनी याकडे लक्ष वळवून या योजनातून जेथे भ्रष्टता, अन्याय, जुलूम, हलगर्जीपणा, अनास्था दिसेल, तेथे तेथे तिच्यावर समाजशक्तीच्या साह्याने घाव घालण्यास प्रारंभ केला तर आपल्या समाजाला सध्या आलेली अवकळा नष्ट होईल आणि ध्येयवादी तरुण राष्ट्राला मिळतील. सध्या हे राष्ट्र अगदी वृद्ध होऊन गेले आहे. कारण तरुणांना आकृष्ट करणारा धर्मच येथे नाही. अमेरिका हे विज्ञानवाद, भौतिक आकांक्षा, सुखसमृद्धि या सर्व गोष्टींनी जगातले अग्रेसर राष्ट्र आहे, तरी पण धर्म ही शक्ती जिवंत ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न तेथे केले जात आहेत. तेथील शिक्षणसंस्थांपैकी दोन- तृतीयांश संस्था धर्मसंघटनांच्या ताब्यात आहेत. आणि प्रत्येक धर्मसंघटना हे एक लहानसे विश्व आहे. या संघटना फक्त बौद्धिक शिक्षण देऊन थांबत नाहीत तर आपल्या सभासदांच्या सर्व प्रकारच्या उन्नतीची चिंता त्या वाहातात. प्रत्येक संस्थेची धर्ममंदिरे आहेत. आणि हजारो सभासद नित्य- नियमाने तेथे जातात. आपल्याकडे अजूनहि धर्ममंदिरे ही म्हाताऱ्यांच्यासाठी, बायकांच्यासाठी, संसार सोडून देण्याची तयारी करणारांच्यासाठीच असावी असे त्यांचे स्वरूप आहे. त्यामुळे धर्माचे संस्कार तरुण मनावर करण्याची कसलीहि सोय या धर्मभूमीत नाही. कोणते तरी आचार, कोणती तरी व्रते यांनी मानव बद्ध असणे अवश्य असते. आपल्या समाजातून जुन्या आचाराचे उच्चाटन झाले आहे. जुनी व्रते नष्ट झाली आहेत. म्हणजे त्यांवरची श्रद्धा गेली आहे. पण नवे आचार, नवी व्रते त्या ठिकाणी मुळीच आलेली नाहीत. पाश्चात्त्य देशात नवी व्रते, नवे आचार यांनी जीवन बद्ध करण्याचे कार्य या धर्मसंघटना करीत असतात. आणि या संघटना समाजाला नवी ध्येये, नवी क्षितिजे नित्य दाखवीत असल्यामुळे, व विज्ञान बुद्धिवाद, राष्ट्रीय प्रपंचाची प्रगति याला ते सर्व पोषक असल्यामुळे नवी पिढीहि अतिशय हौसेने, जुन्या निष्ठेने व श्रद्धेने नव्या आचारधर्माचे पालन करीत असते. यामुळे धर्मकार्यासाठी आत्मलिदान करणारे शेकडो-हजारो तरुण स्त्री-पुरुष तेथे कसे निर्माण होतात ते वर सांगितलेच आहे.
लो. टिळकांनी धार्मिक महोत्सवांचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, "या उत्सवांचा आपण लोकशिक्षणासाठी उपयोग केला पाहिजे. आपली परिस्थिति काय आहे ते अशा उत्सवात जाऊन लोकांना सुशिक्षितांनी समजावून दिले पाहिजे. सरकार करीत असलेल्या जुलमांची आठवण त्या वेळी लोकांना या शहाणे म्हणविणाऱ्या मंडळींनी का करू नये ? लोकात धर्मबुद्धी जागृत करून आमच्या राष्ट्रीयत्वास बळकटी का आणू नये ? आमची धर्मबुद्धी जागृत ठेवण्याचे काम जर शिकलेल्या मंडळींच्या हातून पार पडत नाही तर ही सुशिक्षित मंडळी निष्कारण जिवंत राहिली असेच म्हणावे लागते." यातील भावार्थ हाच आहे की जुन्या धर्माला काळास योग्य असे रूप देऊन धर्म ही महाशक्ती आपण जिवंत ठेविली पाहिजे. राष्ट्र, लोकसत्ता, समाजवाद, मानवता, या निष्ठा आपापल्याला परीने अत्यंत श्रेष्ठ आहेत. त्याहि मोठ्या शक्ती आहेत. पण वर एके ठिकाणी सांगितल्याप्रमाणे या शक्तीशी त्यांची तुलना होणार नाही. धर्मभक्ति ही मानवाच्या रोमारोमात जाऊन भिनलेली आहे. आणि जगात जोपर्यंत अन्याय, अत्याचार, विषमता या मानवी आपत्ती व रोगांच्या साथी, अवर्षण, महापूर, भूकंप आणि मृत्यू या नैसर्गिक आपत्ती आहेत तोपर्यंत तरी या सर्वांतून मुक्त करणाऱ्या शक्तीची उपासना मानव करीत राहणारच. शिवाय मानवी मनाला आत्मार्पणाची, सर्वस्वदानाची एक फार प्रबळ आस असते. तिची तृप्ति धर्मभावनेवाचून कधीच होणार नाही. याहीपलीकडे एक गोष्ट आहे. मानवाला अमरत्वाची, अनंतत्वाची मृत्युंजयत्वाची अत्यंत उत्कट अशी आर्ति असते. आणि प्रत्येक धर्मात जन्ममरणातीत, दिक्कालातीत, अव्यय, अविनाशी अशा ईशरूपाचे वर्णन केलेले असते ते यासाठीच. मानवी जीवनाला जी प्रफुल्लता, जे सौंदर्य, जी माधुरी आलेली असते ती धर्माने दिलेल्या या त्रिविध तृप्तीमुळेच होय. तिच्या अभावी या जीवनाला स्मशानकळा आल्याखेरीज राहणार नाही. ती अवकळा सध्या आपल्या देशाला येऊ पहात आहे. कारण आपण निधर्मी झालो आहो.
ही घोर आपत्ति टाळावयाची असेल तर वैयक्तिक पुण्य एवढाच जो धर्माचा संकुचित अर्थ येथे रूढ झाला आहे तो सोडून थोर सामाजिक पुण्य असा विशाल अर्थ आपण त्याला प्राप्त करून दिला पाहिजे. आज या देशात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरहि पूर्वीप्रमाणेच अन्याय, अत्याचार, जुलूम हे चालू आहेत. त्यांचा प्रतिकार करणे हे धर्मसंघटनांचे कार्य आहे हे नव्या धर्मवेत्त्यांनी जाणले तरच तरुण मने धर्माकडे आकृष्ट होतील व धर्म ही महाशक्ती जिवंत होईल. अन्यायाचा प्रतिकार येथे काहीसा चालू आहे पण तो पक्षीय दृष्टीने केला जातो. पक्षहित साधत नाही असे दिसले की नेत्यांची प्रतिकारबुद्धि पांगुळते. म्हणूनच अशा वेळी पक्षातीत धर्मसंघटनांची आवश्यकता असते. क्वेकर, मेथॉडिस्ट, साल्व्हेशन आर्मी या अशा संघटना होत्या. साल्व्हेशन आर्मीच्या इव्हँजेलाइन बूथने तर 'संग्राम, लढा ही मनुष्याची सहजप्रवृत्ति आहे ती जागृत करून हा धर्मसंग्राम चालू ठेवा' असाच शेवटचा संदेश दिला हे वर सांगितलेच आहे. समाज कितीही सुधारला, प्रगत झाला तरी अन्याय, विषमता, जुलूम, अत्याचार हे सर्व चालू राहणारच. म्हणूनच यांचे निर्मूलन करण्यासाठी धर्मसंघटनांचीही आवश्यकता नेहमी राहणार. म्हणूनच पाश्चात्त्य राष्ट्रांप्रमाणे धर्माचा नंदादीप आपण नित्य पाजळत ठेवला पाहिजे. लोकांचे अज्ञान, सत्ताधाऱ्यांचे स्वार्थ, धनिकांचा लोभ यांनी या दीपावर नित्य काजळी येत राहणार हे खरे आहे. म्हणूनच बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा यांच्या प्रकाशात आपण नित्य शोध घेत राहिले पाहिजे. अशी दृष्टि ठेवून धर्माचे पुनरुज्जीवन करणाऱ्या धर्मसंघटना येथे स्थापन झाल्या तरच ध्येयवाद, त्याग, संयम, निग्रह, आत्मार्पण वृत्ति हे मानवतेचे श्रेष्ठ सद्गुण येथे विकसित होतील आणि लोकायत्त समाज निर्माण करण्याचे आपले ध्येय साध्य होईल. त्यायोगेच 'त्रैलोक्य चालिल्या फौजा । सौख्यबंध विमोचने । मोहीम मांडली मोठी आनंदवनभूवनी ।।' हे समर्थांचे स्वप्न खरे होईल.