वैय्यक्तिक व सामाजिक/श्रीछत्रपतींचे क्रांतिकार्य

विकिस्रोत कडून



आता अवधारा कथा गहन ।
जे कळा कौतुका जन्मस्थान ।
की अभिनव उद्यान । विवेक तरूंचे ।
ना तरी सकळ धर्माचे माहेर । सज्जनांचे जिव्हार, ।
लावण्यरत्न भांडार । शारदेचे ॥

श्रीशिवछत्रपतींच्या क्रांतिकार्याचा विचार करू लागताच ज्ञानेश्वरांच्या वरील ओव्या मनापुढे उभ्या राहतात. ज्ञानेश्वरांनी त्यांत महाभारताच्या वैभवाचे वर्णन केले आहे. आपण छत्रपतींच्या चरित्राचा अभ्यास केला तर शिवभारताच्या वर्णनातही ही शब्दश्री तितकीच सार्थ होईल हे आपल्या ध्यानी येईल. आणि पंधराव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची भव्य आकांक्षा चित्तामध्ये सामावून घेणाऱ्या महापुरुषाच्या चरित्राचे निरूपण करण्यास पंधराव्या वर्षीच भावार्थदीपिका रचणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या रसिक, अमृत अक्षराहून अन्य शब्द तरी कोठून आणावे ?
 'हिंदवी स्वराज्य' या महासंकल्पाचे जे स्फुरण महाराजांच्या चित्तात झाले त्यानेच सतराव्या शतकापासून पुढचा भारताचा सर्व इतिहास पालटून गेला. पूर्वीच्या काळी हिंदूंची अत्यंत विशाल अशी साम्राज्ये होती. चंद्रगुप्त, अशोक यांच्या साम्राज्यात बलुचिस्तान, अफगाणिस्तान व त्यालगतचा प्रदेश यांचा अंतर्भाव झालेला होता. पुढे शक, यवन, युएची, हूण यांचा पराभव करून त्यांची आक्रमणे मोडून काढणारे पुष्यमित्र, गौतमीपुत्र शातकर्णी, समुद्रगुप्त, श्रीहर्ष यांनीहि हिंदुस्थानात मोठमोठी साम्राज्ये स्थापन केली होती. त्यामुळेच भारतात त्या काळात सुवर्णयुग निर्माण झाले होते. आणि भारतीयांची कीर्ति दिगंत पसरली होती. या काळात हिंदूंच्या वैदिक धर्माच्या जोडीला बौद्ध व जैन हे धर्म भारतात नांदत होते. त्या धर्मांचे अनुयायी असलेले राजे आणि सम्राटहि भारतात अधिराज्य चालवीत होते. सम्राट् अशोक, कलिंगराज खारवेल, श्रीहर्ष, महानंदपाल हे बौद्ध सम्राट् होते. अमोघवर्ष हा जैन होता. चंद्रगुप्त मौर्य, शातवाहन राजे, मगधाचे चंद्रगुप्त हे सम्राट्, चालुक्य घराण्यातील पुलकेशी, विक्रमादित्य हे सर्व हिंदु असून वैदिक धर्मानुयायी होते, गोब्राह्मणप्रतिपालक होते, यज्ञकर्ते होते हे प्रसिद्धच आहे. पण आपले राज्य हिंदूंचे आहे, आर्यांचे आहे असा घोष त्यांनी कधीच केला नव्हता. त्यांना तसे करण्याचे कारणच नव्हते. कारण वर उल्लेखिलेले सर्व सम्राट् हे इतर धर्मांचा व त्यांच्या अनुयायांचा स्वधर्मीयांइतकाच प्रतिपाळ करीत व त्यात भूषण मानीत. राजे वैदिक असले तरी बौद्धांना विहार बांधून देणे, त्यांना वर्षासने देणे, त्यांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणे व सर्व प्रकारे त्यांची प्रतिष्ठा राखणे हे ते कटाक्षाने कर्तव्य म्हणून करीत. जैन व बौद्ध राज्यकर्त्यांचे धोरणहि असेच सहिष्णुतेचे होते. अशोकाने सहिष्णुतेचे व्रत चालविलेच पण शिवाय सर्वांनी परपंथीयांचा गौरव करावा, त्यात कमीपणा मानू नये असे एका शासनात त्याने सांगून ठेवले आहे. सम्राट् हर्ष दर पाच वर्षांनी आपल्या संपत्तीचा दानधर्म करी. या उत्सवात एक दिवस बुद्धाची, दुसरे दिवशी सूर्याची तर तिसऱ्या दिवशी शिवाची पूजा होई. या वेळी बौद्ध भिक्षूंप्रमाणेच वैदिक ब्राह्मणांचीही संभावना तो उदार मनाने व मुक्त हस्ताने करीत असे. अशा रीतीने सहिष्णुता व सहजीवन हे धोरण सर्व राज्यकर्त्यांनी अवलंबिले असल्यामुळे हे अमक्या धर्माचे राज्य आहे अशी द्वाही फिरविण्याची त्यांना आवश्यकताच भासली नाही.
 ग्रीक, शक, यवन, युएची, हूण यांची उल्लेखिलेली आक्रमणे झाली ती याच काळात. हे लोक सर्व बाह्य होते आणि यांची आक्रमणेही फार प्रचंड होती. या हजार-बाराशे वर्षांच्या काळात शक- यवन- हूणांच्या जमातीचे लाखो लोक हिंदुस्थानात आले आणि मगध, सौराष्ट्र, महाराष्ट्र येथपर्यंत घुसून तेथे स्थायिकही झाले. यावेळी आर्य व आर्येतर किंवा वैदिक व वैदिकेतर असा भेद प्रकर्षाने जाणवण्याचा संभव होता. पण या जमातींना स्वतःचा विशेष रूपास आलेला असा धर्म नव्हता. त्या लुटारू म्हणून येत, लूट, जाळपोळ, कत्तल, विध्वंस हे सर्व करीत. येथे राज्येही स्थापीत. पण वैदिक वा बौद्ध धर्माचा नाश करावा, त्या धर्माचे मठ, विहार, त्यांची मंदिरे, त्यांच्या मूर्ति, त्यांची विद्यालये, त्यांचे पूज्य ग्रंथ यांचा विध्वंस करावा असे त्यांचे धोरण नव्हते. उलट हळूहळू त्यांनीच हिंदू वा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. कोणी भागवत झाले, कोणी शैव झाले आणि कालांतराने हिंदूंनी या सर्वांना आत्मसात् करून टाकले. त्यांना चातुर्वर्ण्यात स्थाने देऊन- ब्राह्मण, क्षत्रिय अशी प्रतिष्ठेची स्थाने देऊन-येथल्या समाजाशी एकरूप करून टाकले. त्यांचा परकेपणा नष्ट झाला, भिन्नपणा लुप्त झाला. त्यामुळे हिंदू सम्राटांना आमचे राज्य हे 'हिंदवी राज्य' आहे असा घोष करण्याचे कारणच नव्हते.
 १००१ साली गझनीच्या महंमदाने अटक ओलांडून हिंदुस्थानवर स्वारी केली त्यावेळी हे कारण प्रथम निर्माण झाले आणि त्यानंतर उत्तरोत्तर असा घोष करण्याची आवश्यकता तीव्रतेने निर्माण होत होती, उत्कटतेने भासमान होत होती; पण दुर्दैव असे की, साडेसहाशे वर्षांत असा महाघोष भारतात कोणी केला नाही. तसे स्फुरण कोणाच्याहि चित्तात झाले नाही ! साडेसहाशे वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर, या तमोयुगानंतर शिवछत्रपतींच्या मुखाने भारतवर्षाने हा घोष केला. हिंदवी स्वराज्य !
 मुसलमानी आक्रमणापासून असा घोष करण्याची आवश्यकता उत्पन्न झाली याचे कारण अगदी उघड आहे. हिंदू धर्म, हिंदू संस्कृति, हिंदू परंपरा हिंदू जनता यांचा संपूर्ण नायनाट करण्याच्या प्रतिज्ञा करूनच इस्लामीयांनी भारतात पाऊल टाकले. गझनीच्या महंमुदानेच या भीषण हत्याकांडाला प्रारंभ केला. नगरकोट, स्थानेश्वर, मथुरा, कनोज, सोमनाथ येथील देवालये त्याने लुटली, मूर्ति फोडल्या, त्यांची विटंबना केली. लाखो हिंदूंच्या कत्तली केल्या, लाखोंना बाटविले. हाच भयानक प्रलय पुढे सातआठशे वर्षे चालू होता. आणि आजही इस्लामीयांची तीच वृत्ती कायम आहे याचा पाकिस्तानात हरघडी प्रत्यय येत आहे. महंमदानंतरच्या अनेक सुलतानांनी हिंदु-मुसलमानांना सहजीवन अशक्य आहे, हिंदूंचा नायनाटच केला पाहिजे, त्यांच्या धर्माचा नाश केला पाहिजे हेच धोरण, हेच ब्रीद मिरविले. त्यांनी हिंदूंवर जिझिया कर वसविला. त्यांची मंदिरे, विद्यालये, धर्मग्रंथ व स्त्रिया यांची विटंबना केली, मुसलमानी कायदा त्यांच्यावर लादला. मूर्तिपूजा हा गुन्हा ठरवून तो करणाऱ्यांना कित्येकदा जिवंत जाळले, इस्लामच्या अभिमानाने लाखो हिंदूंच्या कत्तली केल्या आणि हिंदूंना हिंदू म्हणून जगणे अशक्य करून टाकण्याचे सर्व प्रयत्न केले. हिंदवी स्वराज्याची आवश्यकता निर्माण झाली ती त्यासाठी. हिंदू धर्म, हिंदू संस्कृति, परंपरा, भाषा, विद्या- म्हणजे एकंदर अस्तित्वच टिकवावयाचे असेल तर इस्लामी साम्राज्य नष्ट करून भारतात हिंदवी स्वराज्य स्थापन झालेच पाहिजे, असे इतिहास आक्रंदून सांगू लागला. हिंदू, जैन, बौद्ध, यांची राज्ये झाली. पण दोघांपैकी एकालाच जगता येईल, दुसऱ्याचा नष्टांशच झाला पाहिजे अशी वृत्ती भारतात केव्हाच निर्माण झाली नव्हती. मुसलमानांच्या आक्रमणानंतर असा बिनतोड प्रसंग निर्माण झाला. ही भूमी निर्हिंदू झाली पाहिजे अशी भीषण मनीषा इस्लामीयांनी धरली होती.
 अलीकडे इतिहास-विवेचन करताना आणि शिवकार्याचे विवरण करताना छत्रपतींच्या आधीच्या काळात महाराष्ट्रात व दक्षिणेत तरी निदान हिंदूंचा धार्मिक छळ होत नव्हता, हिंदु धर्माचा उच्छेद करणारी अशी राजसत्ता येथे नव्हती, राजदरबारी, लष्करामध्ये आणि सर्वत्र मराठा सरदारांचे प्राबल्य असल्यामुळे हिंदूंचा धार्मिक छळ होणे संभवनीयच नव्हते, असा सिद्धान्त मांडला जातो. आणि त्याला रानडे, राजवाडे, सरदेसाई, पारसनीस यांचे आधार दिले जातात. (धर्म की क्रांति - लालजी पेंडसे, पृ. १३, १४) या थोर पंडितांनी अशी वाक्ये लिहिली आहेत हे खरे. पण त्यांचे समग्र ग्रंथ वाचले म्हणजे त्यांचा अभिप्राय इतका एकांतिक नव्हता हे सहज कळून येईल. आणि प्रत्यक्ष इतिहास पाहिल्यावर या भ्रमाचा तत्काळ निरास होईल. १६३७ ते १६४० या तीन वर्षात विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार रणदुल्लाखान याने कर्नाटकावर तीन स्वाऱ्या केल्या. त्या अत्यंत यशस्वी झाल्या. या स्वारीत मुख्य पराक्रम शहाजी राजे यांनी केला. आणि त्याचे फलित काय ? तर 'आम्ही दक्षिणचे सर्व राजे-महाराजे जिंकले, मोठमोठी मंदिरे धुळीस मिळविली, आणि तीन वर्षांच्या अवधीत सेतुबंध रामेश्वराची भक्ती करणाऱ्या हिंदूंच्या शेंड्या कापून काफरांचे निर्मूलन केले.' असा सार्थ अभिमान आदिलशहाने मिरविला. मराठे सरदार मुसलमानांच्या लष्करात असल्याचा हा फायदा ! आणि ज्यांना दक्षिणेत मुसलमानांनी धर्मच्छल केला की नाही याविषयी शंका असेल त्यांनी सरदेसाई यांच्या 'मुसलमानी रियासत' (भाग १ ला) या ग्रंथातील 'गुजराथच्या इतिहासाचे पर्यालोचन' (पृ. २११), बहामनी राज्याचे समालोचन (पृ. २३८) आणि 'गतकालचे पर्यालोचन' (पृ. ३६०, ३६३, ३६६, ३६८, ३७२) ही प्रकरणे पाहावी. उत्तर हिंदुस्थानात हिंदू धर्म व हिंदू जाती यांचे जे भीषण शिरकाण झाले त्या मानाने दक्षिणेत कमी झाले इतकाच त्या थोर इतिहासपंडितांचा विधानांचा अर्थ घेतला पाहिजे. पण ते जे कमी प्रमाणाचे हत्याकांड होते तेच इतके भयंकर होते की हिंदवी स्वराज्याचा उद्घोष झाला नसता तर त्यानेच हिंदू जातीचे निर्मूलन झाले असते. दक्षिणेत हिंदुधर्माचा उच्छेद घडत नव्हता, धर्म या प्रकाराचे रक्षण करण्याची तीव्रता शिवाजीला भासावी अशी परिस्थितीच त्या काळी नव्हती, असे म्हणणे हे हिंदूंना मुस्लीम आक्रमणाचे स्वरूप अजूनहि कळलेले नाही, आणि बहुधा यापुढे कधीही त्याचे आकलन होण्याची शक्यता नाही याचे निदर्शक होय. शिवछत्रपतींचे अलौकिकत्व यात की त्यांनी त्या आक्रमणाचे स्वरूप बरोबर ओळखले होते. आणि 'हिंदवी स्वराज्य' हाच त्यावर उपाय होय हेही त्यांनी जाणले होते. म्हणून वयाच्या पंधराव्या वर्षीच या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा महासंकल्प त्यांनी चित्तात केला होता. 'श्रीरोहिरेश्वर तुमचे खोरियांतील आदि कुलदेव, तुमचा डोंगरमाथा शेंद्रीलगत स्वयंभू आहे. त्यांणी आम्हास यश दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे' असा आत्मविश्वास छत्रपतींनी वैशाख शु॥ प्रतिपदा शके १५६७ (इ. स. १६४५) या शुभदिनी दादाजी नरसप्रभु देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रात प्रगट केला आहे. येथून पुढे त्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीतून आणि पत्रातून हिंदुपदपातशाहीचा संकल्प पुनः पुन्हा प्रगट होत असल्याचे दिसून येते. लोकांनाहि महाराजांच्या ह्या संकल्पाची चांगली जाणीव झाली होती. मिर्झा राजे जयसिंह यांची त्या काळी एकाने प्रशस्ति रचली आहे तीत 'दिल्लीच्या सिंहासनाची आकांक्षा बाळगणाऱ्या शिवाजीला त्याने जिंकले' असा त्याचा गौरव केला आहे. छत्रपतींनी आपले बंधु व्यंकोजी यास लिहिलेल्या पत्रात त्यांचे मानस अगदी स्पष्ट दिसते. ते म्हणतात, 'तुम्ही असा विचार करावा होता (करावयास हवा होता) की श्रीदेवाची व श्रीची कृपा त्यावरी (शिवछत्रपतीवर) पूर्ण आहे. दुष्ट तुरुकाला ते मारितात. मग आपल्या (व्यंकोजीच्या) सैन्यात तुरुक लोकच असता जय कैसा होतो, आणि तुरुक लोक कैसे वाचू पाहातात, हा विचार करावा होता, आणि युद्धप्रसंग पाडावा नव्हता.' पुढे समेटाच्या कलमामध्यें दुष्ट, हिंदुद्वेषी यास आपले राज्यात ठेवू नये, विजापूरकरांची चाकरी करू नये, त्यास फार तर सैन्याची मदत करावी इ. कलमे छत्रपतींनी मुद्दाम घातली आहेत. औरंगजेबाने हिंदूंवर जिझिया कर बसविला त्यावेळी त्याची कडक शब्दात छत्रपतींनी निर्भर्त्सना केली. या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, 'पातशाही पुरातन हिंदूंची आहे. पातशाही तुमची नाही. गरीब, अनाथ (हिंदू) त्यास उपसर्ग करण्यात आपला मोठेपणा नाही. (शककर्ता शिवाजी- सरदेसाई, पृ. २०२. छत्रपतींच्या मनात हिंदुपदपातशाहीचा संकल्प कसा होता त्याचे विवेचन याच ग्रंथात सरदेसाई यांनी पृ. २२१ वर केले आहे.) सकल अवनिमंडल यवनमुक्त करावयाचे आहे ही आकांक्षा प्रारंभापासूनच छत्रपतींनी मराठ्यांच्या ठायी दृढमूल करून टाकिली होती यात शंकाच नाही. अत्यंत पडत्या काळातसुद्धा छत्रपति राजाराम यांच्या मनातील हे अनुसंधान सुटले नव्हते. त्यांच्या काही फौजा नर्मदा उतरून पलीकडे गेल्याही होत्या. हणमंतराव व कृष्णाजी घोरपडे यांना लिहिलेल्या पत्रात छत्रपति राजाराम म्हणतात- 'महाराष्ट्रधर्म पूर्ण रक्षावा, हा तुमचा संकल्प स्वामींनी जाणून तुम्हास सहा लक्ष होनांची नेमणूक चालविण्याचा निश्चय करून दिधला असे. पैकी रायगड प्रांत, विजापूर, भागानगर व औरंगाबाद हे चार प्रांत काबीज केल्यावर तीन लाख व बाकीचे तीन लाख प्रत्यक्ष दिल्ली काबीज केल्यावर द्यावयाचे, असा निश्चय केला आहे.' पुढल्या काळच्या पत्रातून तर हिंदुस्थानच्या पलीकडे काबूल, कंदाहार, इराण, तुराण, इस्तंबूल येथपर्यंत मराठ्यांच्या आकांक्षा धावत होत्या हे स्पष्ट दिसून येते. हे सर्व सविस्तर सांगण्यात हेतू हा की, मराठ्यांच्या यशाचे मर्म छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या या संकल्पात आहे हे ध्यानी यावे. तत्पूर्वीच्या लोकांनी पराक्रम केले, नाही असे नाही. पण त्यांचे संकल्पच लहान होते. त्यांची झेप अल्प होती. अखिल हिंदुस्थान यावनी सत्तेपासून मुक्त करण्यात त्या महापराक्रमी लोकांना यश आले नाही त्याचे हे प्रधान कारण आहे. इतर कारणे तितकीच बलवत्तर आहेत. छत्रपतींनी जी राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक- सर्वांगीण क्रांति घडवून आणली तिची त्यांना कल्पनाही नव्हती. आणि तिच्याविना भारतात नवी शक्ती निर्माण होण्याची शक्यताच नव्हती. यामुळे ते अपयशी झाले हे उघडच आहे. पण या क्रांतीची प्रेरणा त्यांना झाली नाही, याचे कारणहि माझ्या मते, विश्वव्यापी संकल्पाचा अभाव हे आहे. ते स्फुरण चित्तात झाले की त्याच्या सिद्धीचे मार्गही सुचू लागतात, दिसू लागतात. पण तेच जेथे नाही तेथे हे मार्ग दिसत नाहीत आणि तसे प्रयत्नही होत नाहीत. 'हिंदवी स्वराज्या'च्या संकल्पाचे असामान्य महत्त्व वाटते ते यासाठी.
 शिवछत्रपतींच्या पूर्वी इस्लामी आक्रमणाला तोंड देऊन त्याला पायबंद घालण्याचे, आणि हिंदूंचे स्वतंत्र राज्य स्थापण्याचे दोन फार मोठे प्रयत्न झाले. आणि ते अंशतः सफलही झाले. राजस्थान आणि विजयनगर यांनी आपल्या खड्गांचे अडसर इस्लामीयांच्या मार्गात आडवे केले नसते तर चवदाव्या शतकाच्या अखेरीलाच हिंदुस्थान निर्हिंदू झाला असता. रजपूत सतत आठशे वर्षे आणि कर्नाटकी अडीचशे वर्षे या आक्रमणाशी झुंजत राहिले हा त्यांचा अत्यंत मोठा पराक्रम होय यात शंका नाही. विजयनगरचे साम्राज्य तर एके काळी कृष्णेच्या खाली सर्व दक्षिणेत रामेश्वरापर्यंत पसरले होते. आणि राज्यलक्ष्मी आपल्या वैभवानिशी त्यावेळी या प्रदेशात प्रगट झाली होती याविषयी इतिहासवेत्त्यात दुमत नाही. पण इतके होऊनहि यावनी सत्तेचे सर्व भारतातून निर्मूलन करण्यात या दोन्ही शक्तींना यश आले नाही. उलट सोळाव्या शतकात इस्लामच्या चांदापुढे त्याच नामोहरम झाल्या. आणि १५६५ साली विजयनगर व १५६८ साली चितोड पडल्यावर भारतात पुन्हा असा काळ आला की, या महापराक्रमी लोकांचे कार्य जणु झालेच नाही. पुढच्या काळात मराठ्यांना जे यश आले ते राजस्थान व विजयनगर यांना आले नाही. ते का आले नाही याची मीमांसा प्रथम आपल्याला केली पाहिजे. या पार्श्वभूमीवाचून छत्रपतींच्या कार्याचे स्वरूप स्पष्ट होणार नाही.
 वरील अपयशाची कारणे शोधण्यासाठी आपण इतिहास पाहू लागलो आणि त्यांची चिकित्सा करू लागलो की, मन उद्वेगाने भरून जाते, बुद्धी मूढ होऊन जाते. अगदी वरवर पाहिले तरी मुसलमानी आक्रमणाचा हा इतिहास मुसलमानांच्या पराक्रमाचा नसून हिंदूंच्या नादानीचा, कमालीच्या नादानीचा आहे असे स्पष्ट दिसू लागते. इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकात परक्यांची आठदहा प्रचंड आक्रमणे आपल्या बाहुबलाने सहज लीलया मोडून काढून त्या परक्या हिंस्र जमातींना आपल्या अंतरात पचवून, आत्मसात् करून टाकणारे जे त्या वेळचे शौर्य-धैर्यसंपन्न हिंदू लोक त्यांचेच हे पुढच्या काळातले हिंदू वंशज आहेत का, असा प्रश्न मनापुढे उभा राहतो. त्यांचे ते अतुल रणपांडित्य, ती मुत्सद्देगिरी, ती सावधता, ती स्वधर्मनिष्ठा, ते संघटनाकौशल्य हे कोठे गेले आणि का गेले, या प्रश्नांनी मन कासावीस होते. विचार करता करता बुद्धी कुंठित होते, एक एवढा समर्थ समाज एकाएकी इतका पराक्रमहीन, विकल, दुर्बल आणि नादान होईल यावर विश्वास बसत नाही; पण इतिहासात तसे प्रत्यक्ष घडलेच आहे. तेव्हा त्याचा विचार करणे प्राप्त आहे.
 इ. स. १००० पासून भारतावर आलेले इस्लामीयांचे आक्रमण हिंदूंना भारी होते असे कोणच्याही अर्थाने म्हणता येणार नाही. सतराव्या शतकात इंग्रजांचे आक्रमण भारतावर आले. त्यावेळी इंग्रज हे अत्यंत संघटित व राष्ट्रनिष्ठ असे होते. त्यांच्या राज्यात बलिष्ठ अशी मध्यवर्ती सत्ता प्रस्थापित झाली होती. आणि ती आपल्या प्रजाजनांच्या निग्रहानुग्रहाला पूर्णपणे समर्थ होती. तसा कसलाहि प्रकार मुसलमानांच्या बाबतीत नव्हता. विघटनेची, दुहीची, यादवीची जी जी म्हणून कारणे असू शकतात, समाज विशीर्ण, भग्न होऊन जाण्यास जे जे भेद,- धर्मभेद पंथभेद, सामाजिक भेद, वांशिक भेद- कारणीभूत होतात ते ते सर्व मुसलमान समाजात होते. तुर्क, अफगाण, मोंगल, इराणी, हबशी, अरबी, हिंदी असे अनेक वंशांचे लोक इस्लामीयात होते. आणि त्यांच्यात आपसात नित्य घनघोर रणकंदने होऊन भयानक कत्तलीही होत असत. १२९५ पासून १३०५ पर्यंत अमीर दाऊद, त्याचा मुलगा कुतलघखान, तुर्घाय खान, आणि ऐबकखान या मोंगल सरदारांनी दिल्लीवर अनेक वेळा लाख लाख फौजा घेऊन स्वाऱ्या केल्या. अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याशी त्यांचे भीषण रणकंदन झाले. दर वेळी सुलतानास जय मिळाला. तरी प्रत्येक स्वारीच्या वेळी प्रारंभी बिकट प्रसंग आला होता. पण या वेळी आणि पुढे असल्या कोणच्याही वेळी या आलेल्या संधीचा फायदा हिंदूंनी घेतला नाही. गुलामवंश, घोरीवंश, खिलजी, मोगल, लोदी, सूरवंश यांच्या दिल्लीच्या स्वामित्वासाठी सारख्या लढाया चालू होत्या. दिल्लीची सत्ता स्थिर, दृढ, दुर्भेद्य अशी एवढ्या दीर्घ काळात फारच थोडा वेळ होती. कोणीही यावे आणि पहिल्या सुलतानाला हुसकून आपण राज्य वळकवावे अशी स्थिती अकबराच्या आधी नित्याची झाली होती. पण दिल्लीसाठी भांडणारे हे लोक कोणी सय्यद होते, लोदी होते; घोरी, खिलजी, तुर्क, मोंगल होते. हिंदू कधीही नव्हते. स्थानेश्वराच्या लढाईत एकदा ११९२ साली पराभूत झाल्यानंतर हिंदूंनी हस्तिनापूरच्या या सिंहासनासाठी प्रयत्न केलाच नाही. दिल्लीची सत्ता दीर्घकाळ डळमळत्या स्थितीत होती. ती राज्यलक्ष्मी यांना सहज वश झाली असती. पण हिंदू स्थितप्रज्ञच राहिले. तिच्याकडे डोळा उचलून पाहण्याचे पापसुद्धा त्यांनी केले नाही. मग मुसलमानांनी तेथे राज्य न करावे तर काय करावे !
 वंशभेदाप्रमाणे धर्मभेदही या आक्रमकात होते. शिया आणि सुनी पंथांच्या लोकात एकमेकांविषयी अगदी कडवा, जहरी द्वेष असे. दक्षिणेतील सर्व मुस्लिम राज्ये नष्ट करावी असा औरंगजेबाचा अट्टाहास चालला होता याचे कारण हेच की ती शियापंथी होती व औरंगजेब सुनी होता. बहामनी राज्यात दक्षिणी, व परदेशी असे तट होते. ते स्थानिक मुसलमान व इराण-अफगाणिस्थानातून आलेले अशा भेदामुळे होते. पण त्यांच्यात शिया-सुनी हा भेद होताच. या दोन पक्षात कधीही ऐक्य झाले नाही. दक्षिणेतल्या बहामनी राज्यांचा इतिहास या दक्षिणी व परदेशी लोकांच्या आपसातील लोकांच्या मारामाऱ्या, रक्तपात बंडाळ्या यांनी भरलेला आहे. काही काही दिवस राजधानीत वीस वीस दिवस रक्तपात चाले, त्यामुळे राजसत्ता किती दुवबळी होत असेल याची सहज कल्पना येईल. पण हिन्दूंना ही संधि साधता आली नाही. त्यांना इहलोकीचे ऐश्वर्यभोग नकोच होते.
 अकबराच्या आधी दिल्लीची मुस्लिम मध्यवर्ती सत्ता अत्यंत प्रबळ अशी बव्हंशी नव्हतीच. नंतरहि दूरच्या प्रांतांवरचे सुभेदार या मध्यवर्ती सत्तेला भीक घालीत नसत. अयोध्येचा नबाब, बंगालचा सुभेदार, हे जवळ जवळ स्वतंत्रच होते. दक्षिणेत बहामनी राज्य स्वतंत्र झाले आणि त्याची पुन्हा पाच शकले झाली हे प्रसिद्धच आहे. म्हणजे सर्वत्र अंदाधुंदी व बेबंदशाही होती. वायव्य सरहद्दीवर बंडाळ्यांना तर कधीच खळ पडला नाही. दिल्लीच्या सत्तेवर तिकडून धाड कोसळायची हा नियमच होता. यामुळेही सत्ता दुबळी होत असे. एक सुलतान मेला म्हणजे त्याच्या मुलात राज्यासाठी लढाया व्हावयाच्या, तो जिवंत असतानाही त्याच्या मुलांनी राज्यपदासाठी बंडे करावयाची, त्यांच्याशी बापाच्या लढाया व्हावयाच्या, ही परंपरा निरपवादपणे अविच्छिन्न चालू होती. मोठमोठे सरदार हे राज्याचे आधारस्तंभ असत. पण ते मोठे झाले की पातशहांना डोईजड वाटत. आणि त्यांचा नाश करून टाकण्याची कारस्थाने नित्य चालू असत. असा कित्येक सरदारांचा नाश दिल्लीच्या बादशहांनी व बहामनी सुलतानांनी केला आहे. त्यात हिंदू सरदारांचा केला तसा मुसलमानांचाही केला. या घातपातांमुळे राज्याचे बळ कितीतरी कमी होत असले पाहिजे. याचा अर्थ असा की, ज्या ज्या कारणामुळे सत्ता दुबळी होईल, समाजात विघटना माजेल, राज्यात दुही उद्भवून त्याला कमजोरी येईल ती सर्व कारणे मुस्लिम आक्रमक सत्तेमध्ये अखंड रुजून राहिली होती. त्यामुळे राजसत्ता अत्यंत कमजोर होऊन जात असे. आणि ती संधि साधून अनेक पराक्रमी पुरुष दिल्ली सहजासहजी खेळता खेळता जिंकून घेत असत. पण ते सर्व मुस्लिम होते. हिंदूंनी असा प्रयत्न केल्याचे सुद्धा इतिहासात नमूद नाही. हे कशाचे लक्षण ? असल्या आक्रमकांनासुद्धा हिंदूंना उलथून टाकता आले नाही एवढी घोर अवकळा या समाजाला आली तरी कशाने ? इतके निर्वीर्य, निःसत्त्व हे लोक झाले कशाने ? आणि शिवछत्रपतींनी असे काय केले की ज्यामुळे एकाएकी मन्वंतर होऊन मोगली सत्तेचे निर्मूलन करण्यास मराठे समर्थ झाले ?
 वर सांगितलेले दुहीचे, यादवीचे, अराजकाचे, बंडाळ्यांचे सर्व प्रकार अकबरानंतरही चालू होते, हे एका जहांगीरच्या इतिहासावरून स्पष्ट होईल. मोंगली राज्याची त्यावरून चांगली कल्पना येईल, म्हणून तो इतिहास थोडक्यात सांगतो. जहांगीर १६०५ साली राज्यावर आला व १६२७ साली मृत्यू पावला. त्याला मुलगे चार. खुश्रू, पर्वीज्ञ, खुर्रम् (शहाजहान) आणि शहर्यार. जहांगीर राज्यावर आल्यानंतर सहा महिन्यांच्या आतच खुश्रूने बंड केले. त्या वेळी दरबारात रजपूत व मुसलमान असे दोन तट उघड पडले होते. रजपूत पक्षाच्या साहाय्याने बापाला तख्तावरून काढून आपण राज्य घ्यावे असा खुश्रूचा विचार होता. पण त्याचा पराभव झाला. बादशहाने त्याला जीवदान दिले, पण त्याच्या पक्षाच्या हजारो लोकांना जिवंत जाळून, सोलून, बुडवून हाल हाल करून ठार मारिले. बेगम नूरजहान हिची पहिल्या नवऱ्यापासून झालेली एक मुलगी होती. तिला जो पत्करील त्याला गादी देऊन बाकीच्या तीन शहाजाद्यांचा नायनाट करावा असे तिचे कारस्थान चालू होते. आसफखान, खानखानान व महाबतखान हे बादशाहीचे तीन मातबर सरदार यांचे आपसात वैर होते. बादशहाच्या कानी लागून एकाने दुसऱ्यास कैदेत घालावे असे प्रकार नित्य चालत. आसफखानाचा जावई शहाजहान... खुश्रूनंतर त्याने बादशाही तख्तासाठी बंडाळी उभारली. त्याला मधून मधून वरीलपैकी कोणातरी सरदाराचे साह्य असेच. त्याने दक्षिणेत जाताना खुश्रून बरोबर नेऊन तिकडे त्याचा खून करविला. नंतर आग्र्याला असलेला बादशाही खजिनाच लुटावयाचा असे ठरवून त्याने किल्ल्यावर हल्ला केला. यात आसफखान त्याला सामील होता. बादशहा शहाजहानवर चालून आला. दिल्लीनजीक बापलेकांची निकराची लढाई झाली. बादशहा पकडला गेला होता, पण दैववशात् सुटला व शहाजहानला पळून जावे लागले. पुन्हा क्षमा मागावी, पुन्हा बंड करावे असे त्याचे नित्य चाले. महाबतखान या सरदारावर पुढे बादशहाची इतराजी झाली. जहांगीर अत्यंत व्यसनासक्त होता. सर्व कारभार नूरजहान पहात असे. यावर चिडून महाबतखानाने झेलमनजीक बादशाही छावणीवर हल्ला करून त्याला पकडले आणि नूरजहानलाही पकडले. बादशाने बाह्यतः गोडीने वागून आपली कशीतरी सुटका करून घेतली व महाबतखानाच्या नाशाचे उपाय तो योजू लागला. तेवढ्यात त्याचा अंत झाला. खुश्रूचा मुलगा बुलकी याला तख्त द्यावे असे त्याने मरताना सांगून ठेविले होते. त्याप्रमाणे आसफखानाने बुलकीला तख्तावर वसविले. लगेच त्याने चुलता शहर्यार यास पकडून त्याचे डोळे काढले. इकडे शहाजहान काही स्वस्थ बसला नव्हता. मोठ्या फौजा घेऊन तो लाहोरास आला. रजपुत सेनाही त्यास मिळाली, त्यामुळे बुलकीचा पराभव झाला. मग शहाजहानने आपली माणसे पाठवून बुलकी, शहर्यार यासकट राजघराण्यातील सर्व पुरुषांची कत्तल करविली. दानियल, मुराद, पर्वीझ यांचे मुलगे होते. त्यांचीही मुंडकी कापून आणली. अशा रीतीने सर्व निर्वेध झाल्यावर तो तख्तनशीन झाला. त्याच्या उत्तर आयुष्यात त्याच्या मुलांनी हेच केले. मोंगली राज्याचा इतिहास पाहिला तर ही कोणा एका सुलतानाची विकृती नसून त्या रियासतीची प्रकृतीच होती असे दिसेल. (मुसलमानी रियासत - गो. स. सरदेसाई) अशी बेबंदशाही प्रत्येक सुलतानाच्या वेळेस चालू असताना रजपुतांना मोगली आक्रमण पराभूत करता आले नाही याचे आश्चर्य वाटते. मधूनमधून काही लढायात रजपूत मोंगलांचा पराभव करीत. जहांगीरच्या फौजेचाच रजपुतांनी १६०८ साली दिनेर येथे, १६१० साली राणपूर येथे आणि नंतर खानमेर येथे असा तीनदा पराभव केला होता. पण अखेरीस ते हरले. आणि मेवाडच्या राण्याला शरणागती पतकरावी लागली.
 आणि हीच कथा याच्या आधी चालू होती. मधूनमधून हिंदू राजे, हिंदू सेनापती खूप पराक्रम करीत. पण आत्मसंरक्षणार्थ प्रत्येक समाजात लढाईची रग अखंड असावी लागते. ती हिंदूंच्यातून नष्ट होत चालली होती असे दिसते. सेनासंघटना, शौर्य, धैर्य, नाना प्रकारचे डावपेच असलेली युद्धकला, मुत्सद्देगिरी, सावधता, हे सर्व या हिंदुसमाजातून नष्ट होत चालले होते. गझनीचा महमूद येताच १०१८ साली कनोजचा राज्यपाल पळून गेला. १०२४ साली अजमीरचा राजा पळून गेला. तेथून महमूद तसाच अनहिलपट्टणवर गेला. तेथील राजा पळून गेला. महंमद घोरीचा सरदार बख्त्यार खिलजी हा बंगालवर स्वारी करून आला. राजधानी नदिया येथे तो येताच राजा लक्ष्मणसेन बायका- पोरांना सोडून पळून गेला. आणि पुढील आयुष्य त्याने देवसेवेत घालविले ! इतर अनेक लढायात राजे प्रथमच पळून गेले नाहीत. पण लढाईला तोंड लागल्यानंतर ते पळाले. जयपाळ, आनंदपाळ व इतर अनेक रजपूत राजे यांची ही कथा आहे. एकट्या एक मलिक काफूर या अल्लाउद्दीन खिलजीच्या सेनापतीने नर्मदेच्या दक्षिणचा सर्व हिंदुस्थान पंधरा वर्षात धुळीस मिळविला. यादव, चालुक्य, होयसळ, बल्लाळ सर्व सर्व राजे व त्यांची राज्ये त्याने चुरमुऱ्याच्या पोत्यासारखी आपटली आणि रामेश्वराला मशीद बांधून हिंदुधर्माचे थडगे रचले. हा मलिक काफूर मूळचा हिंदू होता, हलक्या कुळातला होता. गुलाम होता. हिंदूमधल्या थोर क्षात्रकुळातल्या राजांना जो पराक्रम करता आला नाही तो या हीन जातीयाने मुसलमान होताच करून दाखविला. ही घटना विशेष चिंतनीय आहे. कारण हा प्रकार नित्य घडत होता. मलिक काफूर हा मूळ हिंदू गुलाम. अल्लाउद्दीनच्या मागून दिल्लीचा सुलतान झालेला मलिक खुश्रू हा मूळचा गुजराथी अंत्यज होता. तो हिंदू राहिला असता तर कधीहि सुलतान झाला नसता. लोदी सुलतान शिकंदर, निजामशाहीचा संस्थापक निजाम उल्मुल्क बहिरी, गुजराथच्या राज्याचा संस्थापक मुजफरखान, इमादशाहीचा संस्थापक फत्तेउल्ला, फिरोझशहाचा वजीर मक्बुलखान, जहांगीरचा वर निर्देशिलेला सेनापति महाबतखान हे सर्व मूळचे हिंदू होते. त्यांना हिंदू असताना जे करता आले नाही ते त्यांनी मुसलमान झाल्यावर करून दाखविले. ते सेनापति झाले, सुलतान झाले. त्यांनी स्वतंत्र राज्ये स्थापिली. अनेक हिंदू राज्ये सहज धुळीस मिळविली. एवढेच नव्हे तर दिल्लीच्या सुलतानी सत्तेलाही पाणी पाजले. जे हिंदूमधल्या मोठ्या घराण्यातल्या चंद्रसूर्य, रामकृष्ण यांचा वारसा सांगणाऱ्या पुरुषांना करता आले नाही ते मुसलमान झाल्यानंतर कोणीही, अगदी कोणीही सहज करून दाखवीत असे. मोठमोठ्या सेना उभारणे, मोठेमोठे प्रदेश पादाक्रांत करणे, स्वतंत्र राज्ये स्थापणे, हिंदु व मुस्लिम राज्येहि सहज बुडविणे, दिल्ली हादरून टाकणे हा कर्त्या मुस्लीम पुरुषांचा नित्याचा खेळ होता. हिंदूंना हा खेळ कधीही खेळता आला नाही.
 इ. स. १००० पासून साडेसहाशे वर्षाची भारताच्या इतिहासाची कहाणी ही अशी आहे. या काळात हिंदूंच्यावर आक्रमण न करील, त्यांना न लुटील, त्यांच्यावर अत्याचार न करील, त्यांच्या धर्माची, स्त्रियांची, मंदिरांची विटंबना न करील तो करंटा ! आरब, तुर्क, अफगाण, मोंगल, सिद्दी, पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज– कोणीही यावे आणि भारतातल्या कोणच्याही प्रदेशाची वाटेल ती धुळधाण करावी, लोकांना गुलाम म्हणून परदेशी नेऊन विकावे, त्यांच्या कत्तली कराव्या, घरादारांवरून नांगर फिरवावे, गावाची होळी करावी, नगरांची राखरांगोळी करावी ! दक्षिणेत, उत्तरेत, पूर्वेला, पश्चिमेला, वायव्येकडे, ईशान्येकडे, कोठेहि हा प्रलय विध्वंस करावा; आणि सत्ता बळकावून दीर्घकाल राज्य करावे. उदार, सहिष्णू, आतिथ्यशील हिंदूंनी हे सर्व सहन केले, चालू दिले, त्या अनर्थाला हातभारहि लावला.
 इतिहासातला हा खरोखर मोठा चमत्कार आहे. एके काळी महापराक्रमी असलेला एखादा समाज दुसऱ्या काळी इतका नादान होईल, इतका अधोगामी, पौरुषहीन, कर्तृत्वशून्य, स्वत्वशून्य होईल याच्यावर विश्वास ठेवणे सुद्धा कठिण जाते. पण प्रत्यक्ष हे घडलेले आहे. याच भूमीत घडले आहे. आणि आपलेच इतिहासकार हे वृत्त सांगत आहेत. तेव्हा त्याबद्दल नुसते खेदोद्गार काढण्यात काहीच अर्थ नाही. अर्थ आहे तो त्याची मीमांसा करण्यात, असे का घडले हे पाहण्यात, या दुर्दैवाची कारणमीमांसा करण्यात, त्यातून भविष्यकाळासाठी काही ऐतिहासिक सत्ये शोधून काढण्यात. तेच आता करावयाचे आहे.
 ही कारणमीमांसा एका वाक्यात सांगावयाची तर असे म्हणता येईल की या काळात हिंदूंच्या धर्मसंस्थेला अत्यंत अवकळा आली होती. हा धर्म अगदी हीन पातळीला आला होता. या धर्माला पराकाष्ठेची ग्लानी आली होती. 'धारणाद्धर्म इत्याहु: धर्मो धारयते प्रजाः ।' या वचनातील धर्म शब्दाचा अर्थ येथे अभिप्रेत आहे. समाजाचे धारण-पोषण करणे, त्याच्या योगक्षेमाची चिंता वाहणे, त्याला सामर्थ्य, समृद्धी, वैभव प्राप्त करून देणें, त्याला आत्मरक्षणाला व पराक्रमाला समर्थ करणे, हे धर्माचे कार्य आहे. नागरिकांच्या मनात थोर आकांक्षा, विजिगीषा जागृत करून त्यांना स्फूर्ती देणें, प्रेरणा देणें हे धर्माचे कार्य आहे. हिंदुधर्माला या काळात इतके हीन रूप प्राप्त झाले होते की, तो यातले काहीहि करू शकत नव्हता. उलट पराक्रम महत्त्वाकांक्षा, विजिगीषा यांची हत्या करतील अशीच तत्त्वे या धर्माने उराशी कवटाळली होती. इतिहास वरवर चाळला तरी कोणालाही हे स्पष्ट दिसेल की, मुसलमानांनी जो पराक्रम केला, आक्रमणे केली, राज्ये स्थापिली, येथे विध्वंस केला, कत्तली केल्या, हिंदूंना जुलमाने वाटविले, त्यांची मंदिरे लुटली, जाळली, विद्यापीठे धुळीला मिळविली, येथे जे जे केले त्याच्या मागे त्यांच्या धर्माची प्रेरणा होती. इस्लामी सुलतान आक्रमण करून येत ते लूट करण्यासाठी, राज्यासाठी, वैभवासाठी येत हे खरे. पण स्वधर्माचा प्रसार करावा हाही तितकाच प्रबळ हेतु त्यांच्या मनात असे आणि या भावनेने प्रत्येक मुसलमान शिपाई चेतलेला असे. म्हणजे प्रत्यक्षांत दिसणारी, प्रत्यक्ष हातात येणारी धनधान्य- स्त्रिया यांची लूट आणि धर्मकार्य, धर्मसेवा या दोन प्रेरणा एकत्र झाल्या आणि त्यातून एक महाभयंकर संहार- सामर्थ्य इस्लामी- यांच्या ठायी निर्माण झाले. काफरांच्या कत्तली, मंदिर, विध्वंस, त्यांच्या धर्मग्रंथाची, घरादारांची जाळपोळ हे धर्मकृत्य आहे, अशीच सर्व सुलतानांची व शिपायांची श्रद्धा होती. म्हणजे मुसलमानांच्या या कृत्यामागे वासनांची तृप्ती आणि ध्येयाची पूर्ती या प्रेरकशक्ती उभ्या असत. हा संयोग फार भयंकर आहे. यामुळे माणसे पिसाट होतात, त्यांच्या अंगात संचार होतो आणि या धुंदीतून, बेहोषीतून जी विध्वंसशक्ती निर्माण होते तिला तोंड देणें अशक्यप्राय होऊन वसते. आरब, तुर्क, मोगल, अफगाण हे येथे आले ते असले वादळी, झंझावाती, तुफान सामर्थ्य घेऊन आले. त्यांच्यापुढे उभे राहणारे जे हिंदू त्यांच्या ठायी हे धुंद सामर्थ्य, ही पिसाटशक्ती याच्या सहस्रांशाइतकीसुद्धा नव्हती! असे का ? असली शक्ती निर्माण करण्याचा हिंदुधर्माने प्रयत्न केला नव्हता. इतकेच नव्हे तर वैभव, समृद्धी, पराक्रम यांसाठी अवश्य असणाऱ्या सर्व प्रेरणांची अगदी टिपण घेऊन हत्या करण्याचा विक्रम मात्र अनेक शतके हदूंनी चालविला होता. हिंदूंच्या वर सांगितलेल्या, लांच्छनास्पद अपयशाची सर्व कारणे या धर्मनाशात आहेत, धर्मग्लानीत आहेत.
 इस्लामी धर्म आक्रमण, साम्राज्य, विश्वसंचार, जगज्जेतृत्व, शत्रूंचा संहार, यांची प्रेरणा देत होता, तर हिंदुधर्म या काळात मायावाद, निवृत्ती, संसाराचे क्षणभंगुरत्व यांचा उपदेश करून मनुष्याच्या मनातल्या या आकांक्षा समूळ नष्ट करण्याचा कसून प्रयत्न करीत होता. 'गीतारहस्या'च्या पहिल्या प्रकरणात लो. टिळकांनी या प्रयत्नाचा इतिहास दिला आहे. गीता हा हिंदुधर्माचा महाग्रंथ. त्याचा अर्थ श्रीशंकराचार्यांच्या पूर्वीच्या काळी भाष्यकारांनी महाभारतकारांप्रमाणे ज्ञानकर्मसमुच्चयात्मक म्हणजे ज्ञानाबरोबरच ज्ञानी मनुष्याने आमरणान्त स्वधर्मोक्त कर्म केले पाहिजे- असा प्रवृत्तिपर लावला होता, असे टिळक सांगतात. श्रीशंकराचार्यांपासून मात्र प्रकरण उलटले आणि तेथून पुढे श्रीरामानुजाचार्य (इ. स. १०१६), श्रीमध्वाचार्य (११९८), श्रीवल्लभाचार्य (१४७९), निंबार्क (११६२) या आचार्यांनी, एकजात सर्वांनी गीतेचा अर्थ केवळ निवृत्तिपर, आणि संन्यासपर लावला. त्यांच्यात जगाच्या मूलकारणाविषयी व मोक्षमार्गाविषयी मतभेद होते. पण निवृत्तिविषयी, संन्यासमार्गाच्या श्रेष्ठतेविषयी, संसार, राज्य, साम्राज्य, ऐहिक वैभव यांच्या क्षणभंगुरत्वाविषयी त्यांच्यात मतभेद नव्हता. त्यांनी केवळ गीतेचाच नव्हे, तर उपनिषदे, ब्रह्मसूत्रे यांचाहि अर्थ तसाच लावला आणि त्याच धर्माचा उपदेश करून हिंदूंना धन, वैभव, समृद्धी, स्वराज्य, भौज्य, वैराज्य, साम्राज्य यांची इतकेच नव्हे तर वैयक्तिक संसारातील स्त्रीपुत्रादिकांच्या उत्कर्षाची सुद्धा, अणुमात्र इच्छा राहूं नये असा अट्टाहास चालविला. गीता हा हिंदुधर्माचा प्राण आहे. जनमनावर त्याचे किती वर्चस्व आहे हे भारतीयांना सांगावयास नको. त्यातूनच भाष्यकारांनी हे कश्मल, अनार्यजुष्ट, अस्वर्ग्य असे हे तत्त्वज्ञान निर्माण केल्यावर समाजाचे काय होईल, त्याला किती दौर्बल्य येईल हे सांगावयास पाहिजे असे नाही. या भाष्यकारांच्या जोडीला दहाव्या-अकराव्या शतकापासून संतमंडळ आले आणि, मोक्षासाठी संसार सोडण्याची जरूर नाही असे म्हणत असताहि त्या संसाराची, स्त्री-पुत्र, धनवैभव, राज्य, साम्राज्य यांची इतकी हिडीस, ओंगळ चित्रे त्यांनी रंगविली, त्या संसाराविषयी उत्साह दाखविणांऱ्यांची इतकी निर्भर्त्सना केली की आचार्यांच्या संस्कृत ग्रंथांनी च प्रवचनांनी कर्तृत्वनाशाचे प्रारंभिलेले कार्य यांनी प्रांतिक भाषात ग्रंथ लिहून पुरे करून टाकले. शतकानुशतक समाजाला निवृत्तीचे, संन्यासधर्माचे, संसारनिंदेचे असे अखंड पाठ मिळत राहिल्यामुळे, स्वराज्य, साम्राज्य, समाजसंघटना, व्यापार, विद्येची, विज्ञानाची उपासना, जगप्रवास, याविषयीची भारतीयांच्या मनातली उभारीच नष्ट झाली. अशा स्थितीत परकी आक्रमणाला ते बळी पडत राहिले तर नवल काय ?
 ज्या धर्माला निवृत्तिप्रधान रूप येते तो धर्म समाजसंघटनेचे तत्त्व म्हणून उपयोगी पडू शकत नाही हे उघडच आहे. इस्लामी धर्म जसा अत्यंत प्रवृत्तिपर होता तसाच संघटकही होता. प्रारंभीची अनेक शतके तरी इस्लामी शिपाई परधर्मीयांच्या बाजूने दुसऱ्या इस्लामी शिपायाशी लढणार नाही एवढी धर्मनिष्ठा मुसलमानात जाज्वल्य स्वरूपात दिसून येत होती. सिंधच्या दाहीर राजाचा आरब सरदार आलाफी हा महंमद कासिमविरुद्ध लढला नाही. पण मोक्वा वसैया या हिंदूजवळ मात्र ही निष्ठा नव्हती. त्याने हिंदु राजा दाहीर याच्याविरुद्ध जाऊन महंमदाला होड्या, वाटाड्ये, इ. सर्व प्रकारचे साह्य केले. भारताचा पुढील इतिहास असल्याच उदाहरणांनी भरलेला आहे. (आणि आजही तो रिकामा झालेला नाही !) राष्ट्रनिष्ठा त्या काळात उदयास आली नव्हती. पण धर्मप्रेम हे तर लोकांच्या ठायी जगातल्या प्रत्येक देशात जागृत होते. त्याचा संघटनेसाठी उपयोग करून ज्यांनी समाजात ऐक्यभाव व कडवा आपपरभाव निर्माण केला त्यांना पराक्रम करता आला. हिंदूंमधल्या तत्त्ववेत्त्यांनी धर्माचा या दृष्टीने कधी विचारही केला नाही. आणि समाजसंघटनेचे दुसरेही कोणते तत्त्व निर्माण केले नाही. जेथले तत्त्ववेत्ते, म्हणजेच धर्मवेत्ते इतके दरिद्री, दृष्टिशून्य व कर्तृत्वहीन झाले तेथला समाज असंघटित नेभळा, दुबळा झाला आणि परकी आक्रमणाला शतकानुशतक बळी पडत राहिला तर त्यात नवल काय ?
 समाजातल्या घडामोडींवर जागरूकपणे नजर ठेवणारा, समाजावर कोसळणाऱ्या आपत्तींचा विचार करणारा, समाजरचनेची तत्त्वे फलदायी होत आहेत की त्यांना विपरीत फले येत आहेत याचा सतत अभ्यास करणारा, समाजाचा अपकर्ष होत असेल तर त्याची कारणे शोधून काढून समाजाला नवा धर्म सांगणारा, असा एक तत्त्ववेत्त्यांचा, धर्मप्रवक्त्यांचा, ग्रंथकारांचा, स्मृतिकारांचा वर्ग समाजात असावा लागतो. दुर्दैवाने हा वर्ग भारतातून नष्ट झाला होता. जे धर्मवेत्ते होते ते ऐहिक प्रपंचाविषयी उदासीन होते आणि तसे सर्वांनी व्हावे, असा उपदेश करीत होते. आठव्या शतकापर्यंत आपल्या समाजात नव्या नव्या स्मृतींची रचना होत होती आणि पुढे ती बंद पडली हे त्याचेच लक्षण होय. देवलस्मृतीची रचना इ. स. ७३२ च्या सुमारास झाली. महंमद कासीमाने हजारो हिंदूंची कत्तल केली आणि हजारो बाटविले. या आपत्तींतून समाजाला सोडविण्यासाठीच या स्मृतीची रचना झाली होती हे तिच्या प्रस्तावनेवरून स्पष्ट दिसते. ऋषींनी देवलमुनींना, म्लेंच्छांनी धर्मभ्रष्ट केलेल्या ब्राह्मण- क्षत्रियादि चातुर्वर्णीयांना शुद्ध कसे करून घ्यावे याबद्दल प्रश्न विचारला, असा देवलस्मृतीच्या प्रस्तावनेत उल्लेख आहे आणि प्रत्यक्ष स्मृतीमध्ये निरनिराळ्या लोकांसाठी अनेक प्रकारची प्रायश्चित्ते सांगितली आहेत. ही जागरूकता पुढे नष्ट झाली. धर्मवेत्ता ग्रंथकार हा समाजाचा कर्णधार आहे. तोच नष्ट झाल्यामुळे ही समाजनौका महासागरात वाटेल त्या दिशेला लोटली जाऊ लागली आणि दर वेळी खडकावर आपटून भग्न होऊ लागली. समाजाच्या ऐहिक हिताविषयीचे औदासीन्य हेच त्याच्या बुडाशी आहे. पुढल्या धर्ममार्तंडांनी स्वतः समाजचिंतन तर केले नाहीच, पण मागल्या धर्मवेत्त्यांनी समाजहिताची जी तत्त्वें सांगितली होती ती कलिवर्ज्य- प्रकरण निर्माण करून नष्ट करून टाकली. पतितशुद्धी हे त्यांपैकी एक आहे. शिवछत्रपतींनी पतितांच्या शुद्धीचे देवलप्रणीत तत्त्व पुन्हा अंगिकारले. यावरून समाजधुरीणाला अवश्य जागरूकता त्यांच्या ठायी कशी होती ते दिसून येईल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्या महापुरुषाने रूढ तत्त्वज्ञान उलथून टाकून नवधर्मतत्त्व प्रस्थापिले हेच त्याचे महान् क्रांतिकार्य होय. पण त्या कार्याचे स्वरूप नीट आकळण्यास शिवपूर्वं धर्मवेत्त्यांनी धर्माला अत्यंत घातक रूप कसे दिले होते ते पाहणे अवश्य आहे.
 यो यच्छ्रद्धः स एव सः । असें भगवद्वचन आहे. जशी ज्याची श्रद्धा तसे त्याचे भवितव्य असा त्याचा अर्थ आहे. समाज जो धर्म किंवा जे तत्त्वज्ञान स्वीकारतो त्याप्रमाणे त्याचे नशीब ठरत असते. भारतीयांनी या काळात कलियुगाचे तत्त्वज्ञान स्वीकारले होते. सत्ययुगात उन्नती होत जाते आणि कलियुगात अधःपातच व्हावयाचा, अशी श्रद्धा त्या वेळी समाजमनात घर करून राहिली होती आणि त्या वेळचे धर्मप्रवक्ते ती दृढमूल करून टाकीत होते. त्यामुळे मुसलमानी आक्रमणाला तोंड द्यावे, ते मोडून काढावे ही उभारी जनमनातून नाहीशी होत चालली होती. कारण आता म्लेंच्छांचाच जय व्हावयाचा, त्यांचेच राज्य चालावयाचे, आपल्या प्रयत्नाला यश येणार नाही हीच हीन भावना लोकांच्या मनात रुतून बसली होती. महाराष्ट्रातून हिंदूराज्ये नष्ट झाली याविषयी महिकावतीची बखर लिहिणारा लेखक म्हणतो, 'कलियुगात असा प्रकार होणार अशी भाक लक्ष्मीनारायणाने कलीस दिली होती. ती शके १२७० त (इ. स. १३४८) खरी ठरली. हरिहर गुप्त झाले. ऋषि बदरिकाश्रमी गेले, वसिष्ठहि गेले. सूर्यवंशी, चंद्रवंशी क्षत्रिय यांची शस्त्रविद्या लुप्त झाली.' विश्वाचें त्राते जे देव आणि ऋषि यांनीच पाठ फिरविली आणि हिंदूंना कलीच्या स्वाधीन केले ! मग आपल्याला जय मिळेल असा आत्मविश्वास त्यांनी कशाच्या बळावर धरावा ? मल्हारराव रामराव चिटणीस यांनी शिवाजीमहाराजांचे सप्तप्रकरणात्मक चरित्र लिहिले आहे. त्यात कलियुगकल्पना छत्रपतींनी कशी हेटाळून टाकिली त्याचे वर्णन केले आहे. महाराजांनी विचार केला, 'आपण हिंदु, सर्व दक्षण देश म्लेंच्छांनी ग्रासिला. धर्म बुडविला. हा रक्षणार्थं प्राणहि वेचून धर्म रक्षू व आपले पराक्रमाने नवीन दौलत संपादूं. नवे साधावे हे या कुलात जन्मल्याचे सार्थक' असे ठरवून महाराजांनी दादोजी कोंडदेव यास सल्ला विचारला. त्यांनी उत्तर केले, 'आपण म्हणता परंतु याचा शेवट लागणे परम दुर्घट आहे. साहेब मनात आणतात याचा विचार म्हणता तरी हे युग विपरीत. तेव्हा दिवसें- दिवस धर्म क्षयास जाणार, तेव्हा हे घडणे दुरासाद.' गुरुजींचा असा नाउमेदकारक सल्ला मिळाला तरी 'धर्म वृद्धिंगत करण्यासाठी प्राण दौलत गेली तरी जावो. प्रयत्न करावा.' असेच महाराजांनी ठरविले. 'पुरुषप्रयत्न बलवत्तर, दैव पंगू आहे, यास्तव प्रयत्ने अलबल करावे, त्यास दैव जसजसे सहाय होईल तसतसे अधिक करीत जावे. देव परिणामास नेणार समर्थ आहे.' अशी छत्रपतींची श्रद्धा होती. देव आपल्याला साह्य करणार नाही, परमेश्वरानेच पाठ फिरविली आहे, अशी अत्यंत घातक श्रद्धा हिंदू मनात रुजली होती. महाराजांनी प्रथम ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. थोर पुरुषांचे हेच वैशिष्ट्य आहे. ते प्रथम धर्मक्रांति करतात. लोकांच्या श्रद्धा, लोकांचे तत्त्वज्ञान यात प्रथम परिवर्तन घडवितात. कारण सामर्थ्य तेथे आहे हे त्यांना कळलेले असते. परमेश्वर आपणास प्रतिकूल आहे ही अमंगल कल्पना नाहीशी करण्याचा महाराजांचा प्रयत्न जागोजाग दिसून येतो. दादाजी नरस प्रभूला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, 'हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे. श्रीरोहिरेश्वराने आम्हास यश दिले. तोच सर्व मनोरथ, हिंदवी स्वराज्य करून, पुरविणार आहे.' प्रारंभीच्या दिवसांत स्वतःस राजे म्हणविण्याचा अधिकार कोणास आहे हा वाद निघाला असता आम्हास पादशहाने राजे किताब मेहेरबान होऊन दिधले.' असे रावराजे मोरे यांनी महाराजांना लिहिले. महाराजांची श्रद्धा अशी की, 'आम्हास श्रीशंभूने राज्य दिधले आहे.'
 कलियुग कल्पनेप्रमाणेच हिंदुधर्मीयात इतरहि अनेक आत्मघातकी कल्पना शिरल्या होत्या. 'कलावाद्यन्तयोः स्थितिः' आणि 'नदान्तं क्षत्रियकुलम् ।' ही त्यापैकीच विपरीत कल्पना होय. या वचनांमुळे कलियुगात आदि- ब्राह्मण व अन्त-शूद्र येवढेच वर्ण शिल्लक आहेत, पुराणातील नन्दवंशाबरोबरच क्षत्रियकुले- एकंदर क्षत्रियवर्णच नष्ट झाला, त्यामुळे, हिंदूंमध्ये राजा होण्यास कोणीच पात्र नाही, असा समज सर्वत्र रूढ होऊ लागला. शब्दप्रामाण्यबुद्धीने समाजाचा केवढा नाश होतो हे यावरून दिसेल. ज्यांनी ही वचने रूढ केली त्यांनी क्षणभर समाजाचे प्रत्यक्ष अवलोकन केले असते तरी यातील वेडगळपणा त्यांच्या ध्यानी आला असता. नन्दांच्यानंतर शातवाहन, वाकाटक, गुप्त, राष्ट्रकूट, चालुक्य, गोहिलोत, ही केवढाली क्षत्रियकुले पराक्रम करीत होती. राज्ये स्थापित होती. अश्वमेध करून सार्वभौमत्वाची ग्वाही फिरवीत होती. नंदपूर्व क्षत्रियांपेक्षा यांचे पराक्रम अणुमात्र कमी नव्हते. पण समाजातील घडामोडी पाहून काही निर्णय करावा ही ऐपतच येथील तत्त्ववेत्त्यात राहिली नव्हती. ही वचने ब्राह्मणांनी लिहिली आणि त्यापेक्षाहि वाईट म्हणजे क्षत्रियांनी त्यावर श्रद्धा ठेवली. वास्तविक भारतात तत्त्वज्ञान व धर्म सांगण्याचा क्षत्रियांचा अधिकार ब्राह्मणांइतकाच मोठा आहे. श्रीकृष्ण भीष्म, गौतमबुद्ध, महावीर, मनु हे सर्व क्षत्रिय होते. उपनिषदकार ऋषींमध्ये अनेक क्षत्रिय होते. मध्यंतरीच्या काळात ललितादित्य, भोज, भर्तृहरी, श्रीहर्ष, मुंज हे क्षत्रिय राजे चांगले विद्वान् होते, शास्त्रज्ञ होते. पण खरे जीवन पाहून प्रत्यक्ष सामाजिक प्रपंच पाहून, समाजाच्या उत्कर्षापकर्षाचे चिंतन करून धर्मप्रवचन करण्याची क्षत्रियांची परंपराहि पुढे नष्ट झाली. आणि सर्व महापराक्रमी क्षत्रिय वीर परक्यांची राज्ये वाढवीत बसले, इस्लामी साम्राज्यांचा विस्तार करीत राहिले. महंमदशहा सूर यांचा सेनापति हिमू, अकबराचे सेनापति भगवानदास व मानसिंग, औरंगजेबाचे सेनापति मिर्झाराजे जयसिंग व जसवंतसिंग, सवाई जयसिंग, शहाजी, मुरार जगदेव हे सर्व महापराक्रमी सरदार होते. मोगल, अफगाण, तुर्क यांच्या मोठ्या मोठ्या सेनांना यांनी धूळ चारिली आहे. इस्लामी सुलतानाच्या राज्याचा विस्तार मध्य आशियापासून दक्षिणेत रामेश्वरापर्यंत करण्यास यांचेच प्रयत्न कारणीभूत झाले आहेत. पण या पराक्रमी पुरुषांनी स्वतःचे राज्य स्थापिले नाही, हिंदवी स्वराज्याचे स्फुरणच त्यांना झाले नाही. या यवनसेवेत धर्महानि नाही, हिंदुधर्म कलियुगात क्षयासच जाणार, स्वतंत्र राज्याचा अधिकार आपणास नाही असल्या कल्पनांनी या कर्त्या पुरुषांना स्वत्वहीन करून टाकले होते. मुसलमानाप्रमाणे धर्म व राजकारण यांची सांगड क्षत्रियांनी घातली असती, स्वराज्य, साम्राज्य, शत्रूंचा निःपात, आक्रमकांची कत्तल, ही धर्मकृत्येच आहेत, अशी श्रद्धा त्यांनी जोपासली असती तर त्यांना स्वराज्य स्थापता आले असते. ते शिवछत्रपतींच्या इतकेच शूर होते, रणनिपुण होते. पण छत्रपतींनी ती श्रद्धा जोपासली आणि 'नदान्तं क्षत्रियकुलम्' 'कलावाद्यन्तयोः स्थितिः' या महामूर्ख वचनांना हेटाळून क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपति' अशी पदवी धारण केली. आणि स्वतःचा शक सुरू केला. दुर्दैवाने त्या वेळच्या मोहिते, घोरपडे, मोरे, सावंत, दळवी, सुर्वे, निंबाळकर आदि सरदारांना ही कल्पना झेपली नाही. या सिंहासनाधीश्वराला ते कायम विरोध करीत राहिले. त्याच्याशी लढत राहिले. प्रत्यक्ष छत्रपतींचा भाऊ आणि त्यांचा युवराज यांनाहि या धर्मक्रांतीचा अर्थ समजला नाही, हे केवढे दुर्दैव होय ! छत्रपतींनी घडविली ती राज्यक्रांती होतीच. पण त्याच्या आधी ती धर्मक्रांती होती. वर सांगितलेल्या धर्मकल्पना केल्यावाचून राज्यक्रांती होणेच शक्य नव्हते. त्या घातकी कल्पना नष्ट करण्याचे मनःसामर्थ्य साडेसहाशे वर्षांच्या काळात कोणाहि धर्मवेत्त्याच्या ठायी- ब्राह्मणाच्या वा क्षत्रियाच्या ठायी- निर्माण झाले नाही. यामुळेच हिंदुसमाज कमालीचा दुबळा, नेभळा, दरिद्री व निःसत्त्व होऊन गेला. पण मला यापेक्षा जास्त मोठे दुर्दैव वाटते ते हे की, छत्रपतींनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जी क्रांति घडविली तिचा अर्थ आकळून, त्यातून तत्त्वज्ञान निर्माण करून समाजाला ते शिकविणारा ग्रंथकार कोणी झाला नाही! गौरव करणारे बखरकार, शाहीर झाले हे तरी नशीबच. पण एवढ्याने भागत नाही. शिवप्रभूंनी निर्माण केलेला नवा धर्म त्यावेळच्या किंवा नंतरच्या पंडितांनी ग्रंथनिविष्ट करावयास हवा होता. पण ते दुसऱ्या उद्योगात होते. धर्मसिंधु, निर्णयसिंधु हे ग्रंथ पाहिले म्हणजे त्या वेळचे शास्त्री- पंडित कशात गुंतले होते, त्यांच्या मताने धर्माचे महत्त्वाचे घटक कोणते होते, हे कळून येईल. श्राद्धपक्ष, प्रायश्चित्त, ग्रहणातील आचार, वर्षातल्या २४ एकादश्यांचे पृथक् माहात्म्य, महिन्यातील प्रत्येक तिथीला काय खावे याबद्दलचे विधिनिषेध, हे सर्व कर्मकांड हाच त्यांच्या मते धर्माचा आत्मा होता. आणि दुर्दैव असे की, हीच विचारपरंपरा त्यापूर्वी ४।५ शे वर्षे चालू होती. हेमाद्रीने 'चतुर्वर्गचिंतामणि' हा ग्रंथ लिहिला त्यात हाच विचार आहे. या सर्व ग्रंथांतून इतकी व्रते- वैकल्यै सांगितली आहेत आणि इतके विधिनिषेध, इतकी प्रायश्चित्ते आहेत की, ती आचरताना मनुष्याला समाजसेवा, समाजावर येणाऱ्या आपत्ती, राष्ट्रात निर्माण होणारे भेद, दुही, अराजक, धर्मावर येणाऱ्या आपत्ती, परचक्र, समाजरक्षण, भौतिक विद्या, यांचा विचार करण्यास क्षणभरहि वेळ सापडणार नाही. पण त्याहिपेक्षा मोठी हानि म्हणजे असल्या कर्मकांडात्मक जड आचारधर्मालाच लोक खरा धर्म मानतात ही होय. समाजाचा घात झाला तो यामुळेच. हे आचार पाळले की यवनांची सेवा, फितुरी, स्वजनद्रोह यातले काहीहि केले तरी अधर्म होत नाही, त्यांचा धर्माशी काही संबंध नाही, असा अत्यंत घातकी समज लोकांच्या मनात रूढ झाला. आचारकांडावर संतांनी खप टीका केली आहे. पण तोच धर्म होय, हा समाजाचा भ्रम कधीच नष्ट झाला नाही. आणि यामुळे हिंदुधर्मामध्ये व्रते-वैकल्ये, सोवळे-ओवळे, टिळे- टोपी, तिथिवार नक्षत्रांचे विधिनिषेध, प्रायश्चित्ते यांनाच प्राधान्य मिळून त्याला अत्यंत हीन व अमंगळ रूप प्राप्त झाले. त्याचे गमक हेच की, या धर्माने राष्ट्रीय प्रपंचाची, समाजाच्या उत्कर्षापकर्षाची, त्याच्या योगक्षेमाची, त्याच्या रक्षणाची, पारतंत्र्यस्वातंत्र्याची या काळात पूर्वीसारखी कधीच दखल घेतली नाही. हरिहर पाठमोरे झाले, ऋषी निघून गेले, असे त्या वेळी लोक म्हणत होते. खरा अर्थ असा की लोक धर्माला पाठमोरे झाले होते. आणि म्हणूनच देवहि पाठमोरे झाले; लोक गुलाम झाले म्हणून त्यांचे देवहि गुलाम झाले. सोमनाथ, नगरकोट, मथुरा, कनोज येथील देवांचे उपासक नतद्रष्ट, दळभद्रे, भेकड, धर्महीन झाले म्हणून तेथील देवांना मृत्यु आला. लोक मात्र देवांना मृत्यु आला म्हणून आपला ऱ्हास झाला असा समज करून घेऊन, दळे होऊन, दैववादी होऊन स्वस्थ बसले होते. आपण देवांचे व धर्माचे रक्षण केले पाहिजे, म्हणजे धर्म आपले रक्षण करितो,' 'धर्मो रक्षति रक्षितः।' या महावाक्याचा त्यांना विसर पडला. 'धर्म वृद्धिंगत करण्यासाठी प्राण दौलत गेली तरी जावो, प्रयत्न करावा' हा विचार महाराजांच्या मनात ज्या दिवशी आला त्या दिवशी भारतात धर्मक्रांतीची आणि पर्यायाने राज्यक्रांतीची बीजे रोवली गेली.
 शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना, धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक सर्व प्रकारची क्रांती केली, म्हणूनच त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन मराठ्यांना पुढे मोगली सत्तेची पाळेमुळे भारतातून खणून टाकण्यात यश आले, हा या निबंधाचा प्रतिपाद्य विषय आहे. शिवछत्रपतींनी ही जी क्रांती घडविली ती कृतींनी घडविली, ग्रंथाने, तत्त्वज्ञानाने नव्हे. त्यांच्यामागे समर्थ रामदासांच्यासारखा एकटा एक ग्रंथकार उभा होता. पण त्यांचीही परंपरा पुढे चालली नाही. त्यांच्याबरोवर ती समाप्त झाली. छत्रपतींच्या प्रत्येक कृतीचे रहस्य जाणून तीत समाजाच्या सर्वांगीण क्रांतीची बीजे कशी आहेत, ते स्पष्ट करून क्रांतीचे तत्त्वज्ञान सांगणारे अनेक ग्रंथकार त्या वेळी होणे अवश्य होते. पण तसे झाले नाहीत हे या देशाचे दुर्दैव होय. युरोपात याच काळात असे ग्रंथकार झाले, शेकड्यांनी झाले म्हणून तेथला समाज प्रगत झाला, समर्थ झाला. धर्म आणि भौतिक विद्या या दोन्हींची जोपासना करून जग जिंकण्याइतके बल त्याला प्राप्त झाले. भारतात हे झाले नाही. येथे ग्रंथकार झाले नाहीत असे नाही. पण श्राद्ध, पक्ष, प्रायश्चित्ते, शेंडी, हजामत, ग्रहणांची फले त्यांचे हे विषय होते. निवृत्ती, संसाराची असारता, भेसुरता, मोक्ष हे त्यांचे विषय होते. समाज, राष्ट्र, संघटना, स्वराज्य, साम्राज्य यांसाठी अवश्य तो धर्म, ते तत्त्वज्ञान हा कोणाचाच विषय नव्हता. इतक्या दीर्ख कालखंडात असा धर्मप्रवक्ता, असा स्मृतिकार भारतात होऊ नये, हे मोठे आश्चर्य आहे. पण भारतात शंकराचार्यांपासून पुढे शतकानुशतक दृढमूल होत गेलेला निवृत्तिवाद हेच याचे प्रधान कारण होय. त्याचा विचार मागे केलाच आहे. आता निवृत्तिवादातून 'अदृष्टफल-प्रधान' असा जो अत्यंत घातकी धर्म पोसला जातो त्याचे रूप पाहावयाचे आहे.
 आपण जी धर्मतत्त्वे स्वीकारतो ती योग्य की अयोग्य हे प्रत्यक्षात त्याची फळे काय मिळतात, ते पाहून ठरविले पाहिजे, असा एक पक्ष आहे. दुसऱ्या पक्षाला हे मान्य नाही. त्याच्या मते धर्माची फळे स्वर्गात, परलोकात मिळावयाची असतात. ती अदृष्ट असतात. तेव्हा फलप्राप्ती पाहून धर्मतत्त्वांची पारख करणे हे योग्य नाही. तसा मनुष्याला अधिकारच नाही. त्याने श्रुति- स्मृतीत सांगितलेले धर्माचरण करीत राहावे. फळ पाहून, श्रुतिस्मृतिप्रणीत धर्माचे यशापयश मोजणे हे सर्वथा गर्ह्य होय. या दुसऱ्या म्हणजे अदृष्टफलधर्माचा स्वीकार समाजाने केला की त्याचा नाश ठरलेलाच आहे. नवव्या- दहाव्या शतकात भारतातल्या शास्त्री-पंडितांनी, ब्राह्मण-क्षत्रियांनी आणि एकंदर समाजाने या अनर्थकारी धर्माचा स्वीकार केला हे इतिहासावरून स्पष्ट दिसते. परदेशगमनाचीच गोष्ट पहा. कलिवर्ज्य प्रकरणात द्विजांना समुद्रगमनाला बंदी केलेली आहे. पूर्वीच्या काळात १०।१२ शतके भारतीय लोक व्यापारासाठी व दिग्विजयासाठी विश्वसंचार करीत आणि त्यात भूषण मानीत. असे असताना कोणातरी शास्त्रीपंडितांच्या कुजलेल्या मेंदूत समुद्रयानाला हिंदूंना बंदी करावी असा विचार आला. यामुळे व्यापार बुडाला, विजिगीषा नष्ट झाली आणि हिंदू लोक घोर अंधारात पडले. पण ही सर्व फले होत. ती पाहून म्हणजे प्रत्यक्ष समाजाचा हानिलाभ पाहून धर्मनियम ठरविण्याची प्रथा असती तर पुढल्या कोणातरी धर्मशास्त्रज्ञाने या सिंधुबंदीचा निषेध केला असता. पण या काळात अदृष्टफल-धर्मावर भारतीयांनी श्रद्धा ठेविली म्हणून त्यांचा नाश झाला. आक्रमक जो मुसलमान तो सर्व जग हिंडलेला, अनेक देश पाहिलेला आणि म्हणूनच चतुरस्र व हुषार असा होता. अकबर- जहांगीर यांच्या दरबारी रोमहून, बगदादहून, तुर्कस्थानातून लोक येत. त्यांपैकी कित्येक येथेच राहत आणि आपल्या जगाच्या अवलोकनाचा फायदा मुसलमानांना देत. आणि हिंदूंना तर एका नियमाअन्वये, अंग, वंग (बंगाल) कलिंग (आंध्र), सौराष्ट्र, मगध या प्रांतात सुद्धा जाण्यास बंदी होती. समुद्रपर्यटनास तर होतीच होती. समाजाचा जेवढा नाश करता येईल, त्याला जेवढा नेभळा, बावळा, निःसत्त्व बनविता येईल तेवढा बनवावयाचा अशी प्रतिज्ञा करूनच त्या वेळचे शास्त्री-पंडित धर्मशास्त्र सांगत होते, असे दिसते. राजाने लढाई केलीच पाहिजे आणि ब्राह्मणाने प्रवास केलाच पाहिजे असा महाभारतात कटाक्ष दिसतो. त्यांनी हे कर्तव्य न केले तर त्या दोघांना गळ्यात मोठा धोंडा बांधून पाण्यात बुडवावे असे महाभारतकार सांगतात. (द्वावभसि निवेष्टव्यौ गले वध्वा दृढां शिलाम् । राजानं च अयोद्धारं ब्राह्मणं च अप्रवासिनम् ।) ही दृष्टि कोठे आणि आत्मघातकी सिंधुबंदी घालणाऱ्या, अदृष्ट-फलवादी शास्त्रीपंडितांची दृष्टि कोठे ? (तर्कतीर्थ कोकजे यांनी अदृष्ट-फल-धर्माचे विवेचन आपल्या 'धर्मस्वरूपनिर्णय' या ग्रंथात विस्ताराने केले आहे.)
 श्रीधरशास्त्री पाठक, पंडित सातवळेकर, चिंतामणराव वैद्य यांच्या मते हिंदुसमाजाला घातक असे अनेकविध धर्मनियम नवव्या-दहाव्या शतकातच जारी करण्यात आले. जातीजातीत पूर्वी अनुलोम तरी विवाह होत. शूद्राच्या हातचा स्वैपाक खाण्यास व त्याच्या पंक्तीस बसण्यास ब्राह्मणांना बंदी नसे. बालविवाह, विधवाविवाह-निषेध या घातकी रूढी पूर्वी नव्हत्या. जातीजातींची खाण्यापिण्याची, सोवळ्या ओवळ्याची बंधने याच सुमाराला कडक करण्यात आली. त्यामुळे समाज अत्यंत छिन्नभिन्न झाला. वर्ण व जाति एकमेकांपासून पूर्वीपेक्षा जास्त दुरावल्या आणि नित्य उपेक्षा होत राहिल्याने बहुसंख्य समाज व स्त्रिया समाजउत्कर्षाविषयी हळू हळू उदासीन होऊ लागल्या. राजकारण, देशातले राष्ट्रीय व्यवहार यांविषयी कमालीचे औदासीन्य हा त्या काळच्या हिंदुसमाजातला अत्यंत घातक असा दोष होय. निवृत्तिधर्माने तो प्रथम निर्माण झाला, कलियुग- कल्पनेने तो पोसला गेला आणि कडक जातिबंधनामुळे- रोटीबंदी, बेटीबंदीमुळे- सर्व समाजात तो रोगबीजासारखा पसरला. ('अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ'- श्रीधरशास्त्री पाठक, 'मध्ययुगीन भारत, ३ रा खंड'- चि. वि. वैद्य, 'स्पर्शास्पर्श'- पं. सातवळेकर). समाजात आपल्या उन्नतीला अवसर नाही असे ज्या जमातीला वाटते ती राष्ट्रीय प्रपंचाविपयी उदासीन होणारच. चांडाळ स्त्रीपासून झालेला पराशर, कोळणीपासून झालेला व्यास, गणिकेपासून झालेला वसिष्ठ हे सर्व मागल्या काळात उच्चपदाला जाऊ शकत होते. तसा त्या वेळी धर्म होता. तसे शास्त्र होते. म्हणूनच समाजहिताविषयी त्या जमाती त्या काळी उदासीन नसत. स्त्रियांच्याविषयी हाच विचार ध्यानी घेतला पाहिजे. बालविवाहाने आणि विधवाविवाह-निषेधाने स्त्रीला या अदृष्ट फलधर्माने प्रपंचातून उठविल्यासारखेच केले. स्वतःचे जीवनच जिला भारभूत झाले ती समाजहितचिंतन काय करणार ? अशा रीतीने शास्त्री पंडितांनी जो अमंगल कर्मकांडात्मक, जड, अंध, अज्ञानात्मक धर्म भारतात प्रसृत केला त्यामुळे बहुसंख्य समाज राजकारण, सामाजिक प्रपंच, त्याचा उत्कर्षापकर्ष याविषयी पराकाष्ठेचा उदासीन आणि म्हणून कर्तृत्वशून्य झाला. याला जागृत केल्यावाचून कोणत्याहि परकी आक्रमणास तोंड देण्यास, ते मोडून काढण्यास हा हिंदुसमाज समर्थ झाला नसता.
 श्रीशिवछत्रपतींनी नेमके हेच जाणले आणि 'मराठा तेवढा मेळवावा,' सर्व समाज हिंदवी स्वराज्याच्या आकांक्षेने चेतवून द्यावा, ती महान् शक्ती आपल्या पाठीशी उभी करावी, यासाठी प्रयत्नाची शर्थ केली. याविषयी प्रत्यक्ष कागदोपत्री पुरावे थोडे उपलब्ध आहेत. पण त्यांची मुळीच जरूर नाही. छत्रपतींच्या भोवती उदयास आलेल्या कर्त्या माणसांची नुसती नावे पाहिली तर क्रांतीमुळे नव्या सामाजिक थरातून, आजपर्यंत ओसाड पडलेल्या जमिनीतून, नवीन कर्तृत्व कसे उदयास येते हे सहज कळून येईल. जेधे, मालुसरे, पालकर, कंक, नरसाळा, पानसंबळ, डबीर, कोरडे, हणमंते, गुजर, मोहिते पिंगळे, रांझेकर, लोहकरे, काकडे, नाईक, चिटणीस, प्रभु, भंडारी अशी कर्त्या पुरुषांची घराणीच्या घराणी आपल्याला त्या काळी राजकारणोन्मुख झालेली दिसतात. हे लोक पूर्वी वतनासाठी भांडत बसले होते, शेती करून गुजारा करीत होते, पातशाही नोकरी करून पोट जाळीत होते. ते राष्ट्रीय प्रपंचाविषयी सर्वस्वी उदासीन होते. छत्रपतींनी त्यांना धर्माचा नवा अर्थ सांगितला. 'यवन, दुष्ट तुरुक याचे कृत्यास अनुकूल होणे हा अधर्म होय,' 'धर्मरक्षणार्थ प्राणही अर्पावा,' 'गोरगरीब, अनाथ यांचा अभिमान धरावा,' 'हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी' हा संदेश त्यांना दिला. त्याबरोबर हे लोक आक्रमकाशी प्रणपणाने झुंजू लागले. मोठमोठ्या मोहिमा यशस्वी करू लागले, गड-किल्ले घेऊ लागले, आरमार बांधू लागले, शत्रूंच्या फौजांची लांडगेतोड करू लागले, त्याचा मुलूख उद्ध्वस्त करू लागले, आणि दिल्ली हस्तगत करण्याची स्वप्ने पाहू लागले. मुसलमानांच्या फौजेपुढे हिंदू जसे पूर्वी हाय खात तसे आता मुसलमान मराठ्यांपुढे हाय खाऊ लागले. कोप्पल ताब्यात घेण्यासाठी हुसेन मियाना याशी हंबीररावाची लढाई झाली. त्या वेळी 'हंबीररावाने हत्यार चालविताच शेकडो मनुष्य जाता येता मारले, खान नामोहरम होऊन पळू लागले, त्यास धरून आणले, मग चहूकडून लांडगेतोड करून बेजार केले. त्यामुळे 'पुनः मराठ्यांच्या लढाईची गाठ ईश्वरा घालू नको' असेच ते लोक म्हणू लागले. खासा औरंगजेब दक्षिणेत सर्व सरंजामानिशी, सर्व इस्लामी सामर्थ्य पणास लावून, २५ वर्षे मराठ्यांना चिरडून टाकण्याची कसम खाऊन महाराष्ट्रात उतरला होता. कनोज, नगरकोट, सोमनाथ येथल्या पूर्वीच्या लढायात एकेका दिवसात अफाट हिंदू फौजांना आक्रमकांनी धुळीस मिळविल्याचे आपण वाचतो. सिंधू, मुलतान, गुजराथ, बंगाल, बिहार हे प्रांत एकदोन महिन्यांच्या अवधीत, काहीतर दोनचार दिवसात म्लेंछांनी कब्ज केले. मलिक काफुराने सगळी दक्षिण दहाबारा वर्षात धुळीस मिळविली. आणि आता ? पंचवीस वर्षे सर्व सेनापती, सर्व फौज, सर्व सल्तनत घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात राहिला होता. पण मराठ्यांनी हा सर्व सरंजाम दस्त केला, गारद केला, धुळीस मिळविला. या वेळी त्यांना राजा नव्हता, सेनापति नव्हता, नेता नव्हता. पण त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या चित्तात छत्रपति होते. नवा धर्म होता. हे लोक राजकारणाविषयी उदासीन असते तर दोनचार महिन्यात, फारतर दोनचार वर्षात महाराष्ट्र पडला असता. तसे तर झाले नाहीच, उलट याच मराठ्यांनी मोगली सत्तेची पाळेमुळे भारतातून थोड्याच अवधीत खणून काढली. छत्रपतींनी जी धर्मक्रांती घडविली, राजकारणामागे जी धर्मशक्ति उभी केली, समाजाचे सर्व थर हलवून तेथून कर्तृत्व निर्माण करून जी सामाजिक क्रांति केली, तिची ही फळे आहेत.
 पण जनशक्ती आपल्या पाठीशी उभी करण्यासाठी, अखिल महाराष्ट्रसमाज स्वराज्यवादी, स्वातंत्र्योन्मुख करण्यासाठी छत्रपतींनी आणखी एक फार मोठी क्रांती केली. आणि ती म्हणजे सरंजामदारीचा नाश ही होय. इस्लामी सत्ता महाराष्ट्रात प्रस्थापित होताच त्या सुलतानांनी मनसबदार, तर्फदार किंवा वतनदार यांचा एक मोठा वर्ग निर्माण केला आणि गरीब रयत त्यांच्या स्वाधीन करून टाकली. हे मनसबदार म्हणजे लहान लहान राजेच असत. आणि दिवाणी, मुलकी, फौजदारी व लष्करी वगैरे सर्व अनियंत्रित अधिकार त्यांजकडे असत. त्यांना रोकड वेतन नसे, जहागिरी असत. आणि त्या त्या परगण्याचा ठराविक वसूल बादशहाकडे दिला की मग त्यांची जबाबदारी संपली, अशी व्यवस्था असे. प्रजेला त्यांनी कसे वागविले हे बादशहा कधीच पाहत नसत. याचा परिणाम काय होत असेल त्याची कल्पना करणे अवघड नाही. महसूल दहा हजार असला तरं हे मनसबदार एक लाख सहजच उकळणार. त्यांना विचारता कोणी नव्हता. पुन्हा बादशहा, जो जास्त महसूल देईल त्याला, वतन देण्याविषयी दक्ष असत. त्यामुळे रयतेला पिळून काढणे यात मनसबदारांची अहमहमिका लागत असल्यास नवल नाही. इस्लामी राज्यापूर्वी महाराष्ट्रात व भारतातही अशी रक्तपिपासू राक्षसी सुलतानी केव्हाच नव्हती. अर्थातच शेतकरी, कुणबी यांना शेत कसण्यात कसलाहि उत्साह राहिला नव्हता. त्यामुळे गावेच्या गावे ओसाड पडत, रयत परागंदा होई ! त्यात लढाया, जाळपोळ, लूट, अत्याचार हे नित्याचेच होते. त्यामुळे सर्व देश उजाड होऊन गेला होता. देशाला ही अवकळा मुसलमानी राज्यामुळे आली हे खरे पण अनेक वतनदार हिंदू होते, मराठे होते. त्यांची रीत कोणत्याही प्रकारे निराळी नव्हती. त्यामुळे रयतेला सर्व सारखेच झाले होते. आपल्या राज्यात काही निराळे होईल ही आशा करण्यास तिला जागाच नव्हती. मग तिने हिंदवी स्वराज्यासाठी का झटावे ? अशा रीतीने जनता ही महाशक्तिच स्वातंत्र्याविषयी उदासीन होती. मग इस्लामी सत्तेला विरोध करावयाचा कोणी आणि का ?
 छत्रपतींनी याचे उत्तर दिले यातच त्यांची असामान्यता, त्यांचा समाजव्यापी आलोक, त्यांचा द्रष्टेपणा दिसून येतो. त्यांनी मध्यस्थ असलेली ही वतनदारी सफाई नष्ट केली आणि राजसत्ता व प्रत्यक्ष जमीन कसणारा शेतकरी, कष्ट करणारी रयत यांचा संबंध जोडला आणि हिंदवी स्वराज्यासाठी ही महाशक्ती प्रसन्न करून घेतली. शिवछत्रपतींचे गुरुजी दादोजी कोंडदेव यांनी पुण्याला येताच ही पद्धत सुरू केली. प्रतिवर्षी जमिनीची पाहणी करून उत्पन्नाप्रमाणे वसूल घेण्याची पद्धत त्यांनी रूढ केली. पीक बुडाले असेल तर दादोजी वसूल घेत नसत. त्यामुळे लोक भराभर लागवड करू लागले. केल्या कष्टाचे फळ मिळेल हे कुणब्याला दिसू लागाताच त्याने पुण्याभोवती दहा वर्षात नंदनवन निर्माण केले. हे करीत असताना जे वतनदार आडवे येत त्यांना रयतेच्या साह्याने दादोजींनी भरडून काढले. शिवछत्रपति बालवयांत हा अद्भुत प्रयोग, ही अलौकिक क्रांती पहात होते. ती पहात असताना हा शेतकरी, हा कुणबी, म्हणजे राष्ट्राचा खरा कणा आहे हे त्यांच्या ध्यानी आले आणि हाती सूत्रे येताच गुरुजींच्याच पावलावर पावले टाकून, सर्व मनसबदारी, सर्व मक्तेबाजी नष्ट करून 'लोक' ही अमोघ शक्ती हिंदवी स्वराज्याच्यासाठी त्यांनी सिद्ध केली. महाराजांची जी काही पत्रे प्रसिद्ध झाली आहेत त्यातून या कुणब्याची ते अहोरात्र कशी चिंता वाहात असत ते स्पष्ट दिसून येते. लष्कराचे लोक चढेल असतात, ते कुणब्यापासून भाजी, पाला, गवत, फाटी घेतात आणि पैसे देत नाहीत, हे जाणून महाराजांनी सक्त ताकीद दिलेली असे की, प्रत्येक वस्तु विकतच घेतली पाहिजे. नाहीतर काय अनर्थ झाला असता ? 'गरीब कुणबी आहेत त्यास असे होईल की मोगल मुलकात आले त्याहून अधिक तुम्ही!' त्या सुलतानी सत्तेहून हे राज्य निराळे आहे, येथे केल्या कष्टाचे चीज होते, राजा प्रजेच्या योगक्षेमाची काळजी वाहतो, हे रयतेच्या निदर्शनास आले तरच तिला हिंदवी स्वराज्याचा अर्थ कळेल आणि मग ती त्यासाठी झुंज घेण्यास सिद्ध होईल हे महाराजांनी जाणले आणि सरंजामशाहीचा, वतनदारीचा नाश हे आपले पहिले उद्दिष्ट ठेवून अल्पावधीतच ते सिद्धीस नेले. छत्रपतींना घाटगे, खंडागळे, घोरपडे, मोहिते, निंबाळकर, मोरे, सावंत, सुर्वे, खोपडे, कोकणचे देसाई, मावळचे देशमुख यांनी कडवा विरोध केला तो या कारणासाठी. ते सर्व पातशाही सरदार होते आणि वर सांगितल्याप्रमाणे त्यांच्या जहागिरी म्हणजे लहान लहान स्वतंत्र राज्ये होती. तेथे त्यांची सत्ता अनियंत्रित होती. ही सत्ता व तिच्यापासून प्राप्त होणारे धनैश्वर्य याला ते स्वराज्यांत मुकणार होते. छत्रपतींच्या उज्ज्वल चारित्र्याचा परिणाम होऊन त्यांच्यातील काही मिरासदार महाराजांना वश झाले. पण बव्हंशी मिरासदारांनी छत्रपतींना शेवटपर्यंत विरोधच केला. पण या क्रांतीमुळे ज्याचे कल्याण होणार होते त्या समाजातून हजारो कर्ते पुरुष निर्माण झाले व प्रारंभापासून या तरुण राजाच्या पाठीशी उभे राहून त्यांनी स्वराज्याच्या शपथा घेतल्या. मोगली सत्तेच्या अस्मानी सुलतानीला पराभूत करण्यासाठी महाराजांनी तितकीच समर्थ अशी शक्ती निर्माण केली तिचे रहस्य हे आहे. (छत्रपतींनी केलेल्या या क्रांतीचे विस्तृत आणि अतिशय सुगम वर्णन श्री. लालजी पेंडसे यांनी आपल्या 'धर्म की क्रांति' या पुस्तकात केले आहे.)
 श्रीशिवछत्रपतींनी फार मोठी धर्मक्रांती केली असे आरंभापासून वर सांगितले आहे, त्याचा अर्थ आता स्पष्ट होईल. महाराजांनी कलियुगकल्पना नष्ट केली, हरिहर हिंदूंना पाठमोरे झाले आहेत, आपले देवच मुस्लीमांना वश आहेत हा घातकी समज जनमनातून समूळ काढून टाकला. त्याचप्रमाणे अदृष्ट फलप्रधान धर्म उच्छिन्न करून टाकून पतितांची शुद्धी, परदेशगमन, समुद्र- प्रवास हे नवे धर्माचार सुरू केले. आरमार बांधून स्वतः वेदनूरवर समुद्रमार्गे स्वारी करून शतकाशतकांची सिंधुबंदी रद्द केली. तिच्यामुळे समाजाचा घात होतो हे त्यांनी प्रत्यक्ष लोकव्यवहार पाहून जाणले. हिंदूंचे अवलोकन करून निर्णय काढण्याचे सामर्थ्यच शास्त्रीपंडितांच्या अदृष्टफल-धर्माने नष्ट करून टाकले होते. महाराजांनी ते तत्त्वच झुगारून दिले. ब्राह्मण. मराठे हे जन्मतःच श्रेष्ठ या कल्पना छत्रपतींनी हेटाळून टाकल्या. जो लढेल तो क्षत्रिय, जो विद्वान् असेल तो ब्राह्मण ही कल्पना त्यांनी आदरिली. त्यामुळेच मागे सांगितल्याप्रमाणे सर्व जातीजमातीतून कर्तृत्व फुलारून वर आले. जिवाजी विनायक सुभेदार यांना लिहिलेल्या पत्रात, 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो ? ऐशा चाकरास ठाकठीक केले पाहिजे' असे महाराजांनी बजाविले; त्याचप्रमाणे 'ज्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल त्या मराठीयाची तो इज्जत वाचणार नाही' असे कडक धोरण त्यांनी ठेवले होते. इतकेच नव्हे तर चिंचवडच्या देवांना सुद्धा मिठावरचा कर घेण्याबद्दल जरब बसविण्यास छत्रपतींनी कमी केले नाही. धर्माचा व राजकारणाचा, स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा संबंध जोडून देणे व धर्मनिष्ठेची शक्ती स्वातंत्र्याच्या कार्याच्या मागे उभी करणे ही तर सर्वात मोठी क्रांती होय. 'बाजी घोरपडे मुधोळकर याणी स्वधर्मसाधनता सोडून यवन दुष्ट तुरुक याचे कृत्यास अनुकूल झाले. त्यामुळे जो प्रसंग गुजरला तो श्री तुमचा मनोरथ सिद्धीस नेणे व स्वधर्म व राज्यवृद्धी करणे म्हणोन पार पडला' असा उपदेश प्रत्यक्ष जिजामाताच महाराजांना करीत होती. यवन सेवा हा अधर्म होय आणि स्वधर्म व राज्यवृद्धी ही अभिन्न आहेत हा या पत्रातील आशय उघड आहे. मुसलमानी आक्रमणामागे वर सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या लुटीच्या, जाळपोळीच्या, कत्तलीच्या, विध्वंसाच्याही मागे त्यांची जळती धर्मभावना त्यांच्या सुलतानांनी नित्य उभी ठेवली होती, या महाशक्तीचे स्वरूप महाराजांनी जाणले आणि धर्म म्हणजे मोक्ष, धर्म म्हणजे परलोक, धर्म म्हणजे मायावाद, निवृत्ति, धर्म म्हणजे स्वातंत्र्यधनाविषयीची उदासीनता या अनर्थकारक कल्पनेचे निर्मूलन करून टाकले. अंध, जड धर्माच्या जनमतावरच्या शृंखला याप्रमाणे तुटून पडताच जनतेच्या सुप्त शक्ती जागृत झाल्या, नव्या आकांक्षा व नवी सामर्थ्ये तिच्या ठायी उदित झाली आणि त्यामुळे मुस्लिम आक्रमण तोडून काढून स्वराज्याची व पुढे साम्राज्याची स्थापना करणे ही दुर्घट वाटणारी गोष्ट मराठ्यांना सहज साध्य झाली. मराठ्यांच्या पूर्वी मुस्लिम आक्रमणाला तोंड देण्याचे प्रयत्न राजपूत व कर्नाटकी यांनी केले पण त्यांनी अशी धार्मिक व सामाजिक क्रांती करून जनतेची शक्ती आपल्या पाठीशी उभी करण्याचे प्रयत्न मुळीच केले नाहीत. म्हणून त्यांनी काही काळ अत्यंत गौरवास्पद असे जरी यश मिळविले तरी अखिल हिंदुस्थान यवनमुक्त करण्यात त्यांना यश आले नाही; इतकेच नव्हे तर आपले स्वतःचे स्वातंत्र्य व प्रतिष्ठाही टिकविता आली नाही. मोठी कार्ये साधावयाची तर समाजात मोठी निष्ठा, मोठे संघटन-तत्त्व दृढमूल करणे अवश्य असते, हे त्या पराक्रमी लोकांनी जाणले नाही. शिवछत्रपतींनी हे जाणले होते. एके प्रसंगी प्रत्यक्ष शहाजी राजे याविषयी बोलताना त्यांनी हा विचार व्यक्त केला आहे. 'आमुचे वडील शहाजी राजे परमशूर आणि योगवंतहि. त्यानी केली कामे ही निर्मल मने करून केली; परंतु त्यात थोडा भाव सुचतो. तो असा की, ते प्रथम निजामशाहीच्या संगतीत होते. ते अल्ली अदलशहाचे बोलावण्यावरून त्याच्याकडे गेले. परतून निजामशहांनी बलाविताच त्याकडे गेले. पुनः अल्ली यदलशहाकडेहि आले. ऐशा दोन तीन येरझारा जाल्या. थोर मनुष्यांनी येकाची संगति धरिल्यावरी त्याशी बिडताच नये, हे तो नीति प्रसिद्ध आहे.'
 छत्रपतींनी जी क्रांती केली ती आणि तिची फले पाहता समर्थांनी 'शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा साक्षेप, शिवरायाचा आठवावा प्रताप भूमंडळी ! शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाची सलगी देणें, कैसी असे' असे म्हटले ते किती यथार्थ आहे ते आपणांस सहज कळून येईल आणि स्वामींचा तो उपदेश आजही हृदयावर कोरून ठेवून आजही आपण अहोरात्र 'शिवरायाचे रूप' आठवणे किती अवश्य आहे हे ध्यानी येईल. आजही आपला ओढा अदृष्टफलधर्माकडे कसा आहे ते महशूर आहे. राष्ट्रविकास योजनेसाठी कोटी रुपये खर्चावयाचे ठरल्यावर सरकारी अधिकारी वर्षअखेर तेवढे खर्च झाले की नाही एवढेच पाहतात आणि ते झाले की धन्यता मानतात. यामुळे समाजाला प्रत्यक्ष उपयोग किती झाला, शेतीचे पीक किती वाढले, ग्रामजनांच्या काही सुखसोयी झाल्या की नाही, याविषयी ते सर्वथा उदासीन असतात. नियोजन सुरू होऊन दहा वर्षे झाली. पण त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात जी वाढ झाली ती कोठे गेली, तिचा उपयोग काय झाला, हे पाहण्याचे इतक्या वर्षांत कोणाला सुचलेच नाही. कारण फलाविषयी आपण बेफिकीर आहो. भूदान यज्ञवाले तर आता पूर्ण अदृष्टफलधर्मवादी झाले आहेत. जमिनीच्या वाटणीचे परिणाम काय झाले, जमिनीचा कस सुधारला काय, शेत-मजुरांना किती जमिनी मिळाल्या, ग्रामीण बेकारी हटली काय, हे प्रश्न त्यांचे नव्हतच. त्यांना एकामागोमाग एक नवीन स्वर्गीय कल्पना सुचत आहेत. भूदान, संपत्तिदान, श्रमदान, जीवनदान (जीवनदान दोन प्रकारचे एक म्हणजे लोकांनी चळवळीसाठी जीवनदान करावयाचे आणि दुसरे म्हणजे आचार्य विनोबांनी डाकू, खुनी, लुटारू यांना फासावरून उतरून त्यांना जीवनदान द्यावयाचे), सर्व प्रकारचे दान ! हे सर्व कार्य लवकरच हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणीतील दानखंडासारखे होणार असा रंग दिसतो. शिक्षणाच्या, दारूबंदीच्या, सर्वच बाबतीत हेच चालले आहे. फलाची आसक्ती आपल्याला नाही. ते सर्व परलोकात मिळेल अशी आपली श्रद्धा आहे.
 दुसरे असे की, त्या मागल्या काळाप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात मनसबदारी, वतनदारी, मिरासदारी निर्माण झाली आहे, आणि आपल्या सत्ताधीशांनी जनतेला या मिरासदारांच्या स्वाधीन केले आहे. कापडवाले, कागदवाले, साखरवाले, रॉकेलवाले यांना सरकार एक आणा भाववाढ करण्यास परवानगी देते. ते एक रुपया वाढवितात. मोगली सुलतानांचे मिरासदार हेच करीत. 'जे गावी दोनशे तीनशे होन खंडणी सरकारास द्यावी, ते गावी मिरासदारांनी दीड दोन हजार होन घ्यावे.' (सभासद बखर) सध्या असेच चालू आहे. अप्रत्यक्ष करांची सरकार भरमसाट वाढ करणार आहे. अजून करण्यास खूप अवसर आहे अशी त्याची श्रद्धा आहे, याचा हाच अर्थ होतो. तो कर वसूल करणारे मध्यस्थ हे व्यापारी, उद्योगपती, कारखानदार हे असतात. सरकारने एक पैसा कर ठेवला तर ते चार आणे घेतात. मग सरकार मध्ये पडून दोन आण्यांवर तडजोड करून प्रजेचे कल्याण साधते. पण त्यामुळे गरीब रयतेस वाटते की, 'इंग्रेज मुलकात आले त्याहूनहि हे अधिक.'
 आपल्याला परकीय आक्रमणाचे स्वरूप ओळखण्याचे सामर्थ्य नाही. आक्रमण येणार आहे याची आपल्याला आगाऊ कल्पना येऊ शकत नाही. रामदेवरावांची देवगिरी संपत्तीने तुडुंब भरलेली होती. सातशे मैलांवरून अल्लाउद्दीन खिलजीला तिचा वास आला. आणि तो ती लुटण्यासाठी निघाला. पण रामदेवरावाला मात्र ही टोळधाड किल्ल्याच्या तटावर येऊन धडकेपर्यंत तिची कल्पना नव्हती. आजही चीन आक्रमण करील असे आपल्याला वाटले नव्हते. आक्रमण झाल्यावरही ते क्षुद्र आहे अशीच आपली श्रद्धा होती. त्याचे स्वरूप अजूनही आपण ओळखू शकलेलो नाही. दर वेळी आपण अजून विस्मितच होत आहो. जुने कागदपत्र काढून त्यांच्या आधाराने, पुराव्याने, प्रमाणाने, हिंदभूमीवरचा आपला हक्क आपण शाबीत करताच चीनला माघार घ्यावी लागेल याविषयी आपल्याला शंका नाही.
 धर्मनिष्ठा व राष्ट्रनिष्ठा या शक्ती आपण आज राजकारणातून काढूनच टाकल्या आहेत. चिनी आक्रमक आले आहेत ते मागल्या मोगल शिपायांप्रमाणे पिसाट संहारशक्तीने प्रेरित झालेले आहेत. आक्रमण करणे, लूट, जाळ पोळ, अत्याचार हा त्यांचा राष्ट्रधर्म आहे. त्यांच्यापुढे आम्ही भारतीय पंचशील, अहिंसा, सत्य, विश्वशांती ही श्रेष्ठ धर्मतत्त्वे उभी करीत आहोत. आक्रमक राष्ट्रधर्माला तितक्याच कडव्या, जहरी, जळत्या राष्ट्रधर्माने उत्तर दिले पाहिजे हे आपल्या नेत्यांना मान्यच नाही. आमचे राज्य निधर्मी आहे, आम्ही मानवतेचे पुजारी आहो यातच ते समाधान आणि भूषण मानीत आहेत. त्यामुळे मागल्याप्रमाणेच भारतावर आक्रमणे होऊ लागली आहेत. पाकिस्तानचे आक्रमण आले, चीनचे आले. त्यांच्यापुढेच नव्हे तर नागांच्यापुढेसुद्धा आपण हतबल ठरणार असा रंग दिसत आहे. भारतावर विमाने तर कोणाकोणाची येऊन जातात त्याचा आपल्याला पत्ताच लागत नाही. हे असेच चालले तर आणखीही नेपाळ, सीलोन, यांची अशीच आक्रमणे येतील यात शंकाच नाही. यामुळे मागल्या अकराव्या शतकातील इतिहासाची पुनरावृत्ती होईल की काय अशी शंका येते. म्हणून या वेळी सतराव्या शतकातील पुनरावृत्ती त्वरेने घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे आणि त्या प्रयत्नांना यश यावे अशी इच्छा असेल तर आपण अहोरात्र मंत्र जपला पाहिजे की, 'शिवरायाचे आठवावे रूप । शिवरायाचा आठवावा साक्षेप । शिव- रायाचा आठवावा प्रताप । भूमंडळीं ॥'