Jump to content

लोकहितवादींची शतपत्रे/७. आमचे राजकारण व राज्यकर्ते

विकिस्रोत कडून









७. आमचे राजकारण व राज्यकर्ते










इंग्लिश लोकांच्या व्यक्तिमात्राच्या गैरसमजुतीविषयी

पत्र नंबर १ : १९ मार्च १८४८

 हल्ली अशी बातमी कळली आहे की, पुणे येथे राज्य बुडाल्यापासून फौजदार कोतवालीचे कामावर ठेवीत होते, त्यांपैकी जे ब्राह्मण फौजदार झाले, त्या सर्वांची बहुतकरून वहिवाट दुरुस्त नाही, असे अनुभवावरून कळले, व माजी फौजदार बळवंतराव गोविंद याजवर तर दरवड्याचे वगैरे अपराध स्पष्टपणे शाबीद होऊन त्यांस मोठी शिक्षा झाली. तेव्हा ब्राह्मण लोक अविश्वासू आहेत; याजकरिता येथील अधिकाऱ्यांनी असे मनात आणले आहे की, या कामावर पुनरपि ब्राह्मण नेमिता ख्रिस्तीयन धर्मातील मनुष्य नेमावा. त्यांस याविषयी मी थोडासा मजकूर आपल्यास लिहून पाठवितो, हा जर कृपा करून आपले पत्रद्वारे प्रसिद्ध होईल, तर ब्राह्मणांवरील दोष निवारण होईल, असे वाटते.
 ब्राह्मण लोकांनी वाईट वर्तणूक केली, असे अनुभवावरून जे दिसले ते खरे आहे; परंतु त्याचा दोष ब्राह्मणांकडे नाही. कारण चांगले-वाईट लोक सर्व जातीत असतातच. परंतु त्यांपैकी पक्का शोध करून चांगले, कुलीन, संभावित, नीतिमान असे असतील त्यांस अधिकारावर नेमावे. धर्मशास्त्री व्यवहार- मयूरवात प्रथमतः श्लोक आहे तो असा की,

व्यवहारन्नृपः पश्येद्विद्वद्भिर्ब्राह्मणैः सह ।
धर्मशास्त्रानुसारेण क्रोधलोभविवर्जितः ॥१॥
श्रुताध्ययनसंपन्ना धर्मज्ञाः सत्यवादिनः ।
राज्ञा सभासदः कार्या रिपौ मित्रे च ये समाः ॥२॥

 याप्रमाणे बहुत अध्ययन केलेले, बहुत ऐकलेले, धर्म जाणणारे, सत्य बोलणारे निःपक्षपती सभासद राजाने अधिकारावर नेमावे म्हणून आहे. याप्रमाणे जर ब्राह्मण लोक नेमले असते तर असे का होते? इंग्रजी राज्यात हे रयतेचे फार नुकसानास कारण व दुर्दैव आहे की, ज्या साहेब लोकांचे हाती मोठ्या नेमणुका द्यावयाच्या असतात, ते त्या देते वेळेस काही विचार पहात नाहीत. म्हणून अयोग्य लोक मोठमोठ्या कामावर मुकरर होऊन लाचेचे वगैरे मोठे बोभाट उठले आहेत. साहेब लोकांचे हाती राज्य गेले, परंतु ते इकडील लोकांप्रमाणे काम करण्यात माहितगार आहेत असे नाही. ते विद्वान, शहाणे व निःपक्षपाती आहेत हे खरे, पण देशाची व भाषेची माहिती नेटीव लोकांप्रमाणे त्यांस नाही. यामुळे नेटीव लोक जे त्यांचे हाताखाली आहेत यांचे हाती रयतेचे वाईट बरे करावयाचे पुष्कळ असते. गरीब लोकांस साहेबांची भेट किंवा त्याशी स्वस्थपणाचे भाषण होत नाही. तेव्हा त्यांस कामगार हेच साहेब असतात. आणि हे कामदार लोक वाईट चालीचे, आशाबद्ध व द्रव्यलोभी असतात. म्हणून लोकांस फार छळितात. त्यातून एखाद्याचे अपराध बाहेर दृष्टोत्पत्तीस येऊन त्यांस शासन होते, परंतु तसे सर्वांस होत नाही. नेटीव लोक महान धूर्त आहेत म्हणून त्यांचे अपराध सापडणेही फार कठीण आहे. साहेब लोक मोठे काम ज्यास देतात त्याची हुषारी मात्र पाहतात. परंतु कामगाराचे फक्त हुशारीचा उपयोग काय?. तीशिवाय दुसरे बहुत गुण त्यांस पाहिजेत. मनुष्य कृत्रिम अंतःकरणी व तोंडापुढे चांगले बोलणारा व इकडे तिकडे धावून आर्जवासाठी काम करणारा, तो समक्ष मेहनत घेतो, त्यामुळे इंग्रज लोकांस वाटते की, हा फार चांगला हुषार आहे, परंतु त्याचे अंतःकरण मलिन व त्यांस धर्मशास्त्र कळत नाही. त्याचा दुष्टपणा हृदयात असतो. तो साहेबाने तोंड मागे फिरविले की पुरे, लागलाच प्रगट होतो. तेव्हा असे प्रकारचे लोक अधिकारावर नेमल्यावर मग त्याचे सद्गुण ऐकावयाची आशा कोठून? परंतु तेणेकरून सर्व जातीस बट्टा लागला असे नाही. नेमणाऱ्यांचे अलक्ष यामुळे या गोष्टी घडतात. पुण्यात बहुत संभावित व कुलीन व सरंजामदार व पेन्शनवाले गृहस्थ आहेत. परंतु त्यातील चांगला मनुष्य आणि विद्वान आजपर्यंत कामावर कोठे ठेवला असे जाहले नाही. शाळेतील शिकलेले, कुलीन व विद्वान यांचेविषयी तर सरकारने बहुत वेळ हुकूम पाठविले आहेत. परंतु जिल्ह्यातील साहेब लोक या सर्वांस एकीकडे ठेवतात. आणि आपले कृपेतील एखादा मनुष्य त्याचे कुलशील चांगले नसले व अगदी कवडीचा माल असला, तरी त्यांस ठेवून 'रजाचा गज' करतात व याप्रमाणे कुलहीन लोक इंग्रजांचे दरबारात फार जमले आहेत. त्यामुळे ब्राह्मण लोकांची अब्रू कमतर दिसते, हे त्यांचे दुर्दैव म्हणावे, याची तजवीज कोणी मनात आणीत नाहीत. साहेब लोक मनास येईल तसा दोष ठेवतात हे ठीक नाही. राजाने खराब लोक सन्निध केले तर कारभार चांगला कसा होईल? मागे कारभार अशा रीतीने चालत नव्हता व माधवराव पेशव्यांचे वेळचे किती एक गोष्टी ऐकण्यात आहेत, त्याजवरून दिसते की, ब्राह्मण लोक सगळे वाईट आहेत असे नाही. बाजीरावाचे कारकीर्दीत बहुतेक ब्राह्मणांस नीचत्व येऊन ते दुर्गुणी झाले हे खरे आहे. तत्रापि अद्याप न्यायनिष्ठुर व योग्य असेही पुष्कळ आहेत. परंतु त्यांस परीक्षक मिळून जसे कवी म्हणतो काकः पिकः पिकः असे करणारे भेटतील, तेव्हा व्यवस्था नीट होईल. साहेब लोक भाषा वगैरे शिकण्याची मेहनत करतात. तशी जर मनुष्य निवडून काढण्याची मेहनत घेतील, तर लोकांचा फार फायदा होईल. बहुतेक ठिकाणी असे आहे की, एखादी जागा खाली झाली तर वेळेस जो उभा असेल त्यात ती देऊन आपली मेहनत चुकवतात. कारण जर बातमी फुटली तर कोणी शिफारशी आणतात व किती एक अर्जी पडतात. तेव्हा त्या वाचावयाची मेहनत कोण करतो? म्हणून तात्काळ भलत्याच एखाद्या शुंभास ती जागा देतात. तेव्हा चांगले लोक कोठून मिळणार? काही दिवस जागा खाली राहून किंवा परीक्षा घेऊन जितके उमेदवार जमतात, तितके जमू देऊन त्यांची नीट चौकशी करून जागा द्यावी. तसे करीत नाहीत. आणि जाग्याची सोडत काढतात. येणेकरून लोकांची अब्रू जाते आणि ठेवणारांचे बुद्धीची प्रशंसाही होत नाही. याचा बंदोबस्त लवकर होईल आणि उगेच कारणाशिवाय ब्राह्मणांचे अब्रूस दूषण लावणार नाहीत, अशी आशा आहे. इंग्रज लोक फार शोधक आहेत. म्हणून त्यांस अवघड नाही. कदाचित येविषयी सरकार लक्ष देईल तर बरे होईल. याजबाबत आणखी काही सूचना पुढे लिहून पाठविण्यात येतील.

♦ ♦


नेटीव अंमलदार

पत्र नंबर ९: ७ मे १८(६३)?

 आपले मागील पत्री 'एक हिंदु' या सहीचे पत्र छापले होते. त्यात बहुत करून बोभाटाचा मजकूर लिहिला होता. तो सर्व तथ्य नसला, तरी काही खरा आहे.
  नेटीव लोकांमध्ये विद्वान मुळी थोडे आणि जे वास्तविक विद्वान व गुणी आहेत, त्यांची प्रतिष्ठा इंग्रज सरकारात होते. एखादे वेळी विरुद्ध गोष्ट झाली म्हणून तेच प्रमाण धरू नये. सामान्यतः वहिवाट असेल ती लिहिली पाहिजे हे एक; दुसरे असे आहे की, इंग्रज शाळेत वगैरे जे लोक अभ्यास करतात, त्यात इंग्रजी लिहिणार असे नाव मिरविणारे पुष्कळ असतात. घरात काम करण्यात माहितगार आहेत असे नाही. ते विद्वान, शहाणे व निःपक्षपाती आहेत हे खरे, पण देशाची व भाषेची माहिती नेटीव लोकांप्रमाणे त्यांस नाही. यामुळे नेटीव लोक जे त्यांचे हाताखाली आहेत यांचे हाती रयतेचे वाईट बरे करावयाचे पुष्कळ असते. गरीब लोकांस साहेबांची भेट किंवा त्याशी स्वस्थपणाचे भाषण होत नाही. तेव्हा त्यांस कामगार हेच साहेब असतात. आणि हे कामदार लोक वाईट चालीचे, आशाबद्ध व द्रव्यलोभी असतात. म्हणून लोकांस फार छळितात. त्यातून एखाद्याचे अपराध बाहेर दृष्टोत्पत्तीस येऊन त्यांस शासन होते, परंतु तसे सर्वांस होत नाही. नेटीव लोक महान धूर्त आहेत म्हणून त्यांचे अपराध सापडणेही फार कठीण आहे. साहेब लोक मोठे काम ज्यास देतात त्याची हुषारी मात्र पाहतात. परंतु कामगाराचे फक्त हुशारीचा उपयोग काय?. तीशिवाय दुसरे बहुत गुण त्यांस पाहिजेत. मनुष्य कृत्रिम अंतःकरणी व तोंडापुढे चांगले बोलणारा व इकडे तिकडे धावून आर्जवासाठी काम करणारा, तो समक्ष मेहनत घेतो, त्यामुळे इंग्रज लोकांस वाटते की, हा फार चांगला हुषार आहे, परंतु त्याचे अंतःकरण मलिन व त्यांस धर्मशास्त्र कळत नाही. त्याचा दुष्टपणा हृदयात असतो. तो साहेबाने तोंड मागे फिरविले की पुरे, लागलाच प्रगट होतो. तेव्हा असे प्रकारचे लोक अधिकारावर नेमल्यावर मग त्याचे सद्गुण ऐकावयाची आशा कोठून? परंतु तेणेकरून सर्व जातीस बट्टा लागला असे नाही. नेमणाऱ्यांचे अलक्ष यामुळे या गोष्टी घडतात. पुण्यात बहुत संभावित ब कुलीन व सरंजामदार व पेन्शनवाले गृहस्थ आहेत. परंतु त्यातील चांगला मनुष्य आणि विद्वान आजपर्यंत कामावर कोठे ठेवला असे जाहले नाही. शाळेतील शिकलेले, कुलीन व विद्वान यांचेविषयी तर सरकारने बहुत वेळ हुकूम पाठविले आहेत. परंतु जिल्ह्यातील साहेब लोक या सर्वांस एकीकडे ठेवतात. आणि आपले कृपेतील एखादा मनुष्य त्याचे कुलशील चांगले नसले व अगदी कवडीचा माल असला, तरी त्यांस ठेवून 'रजाचा गज' करतात व याप्रमाणे कुलहीन लोक इंग्रजांचे दरबारात फार जमले आहेत. त्यामुळे ब्राह्मण लोकांची अब्रू कमतर दिसते, हे त्यांचे दुर्दैव म्हणावे, याची तजवीज कोणी मनात आणीत नाहीत. साहेब लोक मनास येईल तसा दोष ठेवतात हे ठीक नाही. राजाने खराब लोक सन्निध केले तर कारभार चांगला कसा होईल? मागे कारभार अशा रीतीने चालत नव्हता व माधवराव पेशव्यांचे वेळचे किती एक गोष्टी ऐकण्यात आहेत, त्याजवरून दिसते की, ब्राह्मण लोक सगळे वाईट आहेत असे नाही. बाजीरावाचे कारकीर्दीत बहुतेक ब्राह्मणांस नीचत्व येऊन ते दुर्गुणी झाले हे खरे आहे. तत्रापि अद्याप न्यायनिष्ठुर व योग्य असेही पुष्कळ आहेत. परंतु त्यांस परीक्षक मिळून जसे कवी म्हणतो काकः पिकः पिकः असे करणारे भेटतील, तेव्हा व्यवस्था नीट होईल. साहेब लोक भाषा वगैरे शिकण्याची मेहनत करतात. तशी जर मनुष्य निवडून काढण्याची मेहनत घेतील, तर लोकांचा फार फायदा होईल. बहुतेक ठिकाणी असे आहे की, एखादी जागा खाली झाली तर वेळेस जो उभा असेल त्यात ती देऊन आपली मेहनत चुकवतात. कारण जर बातमी फुटली तर कोणी शिफारशी आणतात व किती एक अर्जी पडतात. तेव्हा त्या वाचावयाची मेहनत कोण करतो? म्हणून तात्काळ भलत्याच एखाद्या शुंभास ती जागा देतात. तेव्हा चांगले लोक कोठून मिळणार? काही दिवस जागा खाली राहून किंवा परीक्षा घेऊन जितके उमेदवार जमतात, तितके जमू देऊन त्यांची नीट चौकशी करून जागा द्यावी. तसे करीत नाहीत. आणि जाग्याची सोडत काढतात. येणेकरून लोकांची अब्रू जाते आणि ठेवणारांचे बुद्धीची प्रशंसाही होत नाही. याचा बंदोबस्त लवकर होईल आणि उगेच कारणाशिवाय ब्राह्मणांचे अब्रूस दूषण लावणार नाहीत, अशी आशा आहे. इंग्रज लोक फार शोधक आहेत. म्हणून त्यांस अवघड नाही. कदाचित येविषयी सरकार लक्ष देईल तर बरे होईल. याजबाबत आणखी काही सूचना पुढे लिहून पाठविण्यात येतील.

♦ ♦


नेटीव अंमलदार

पत्र नंबर ९: ७ मे १८(६३)?

 आपले मागील पत्री 'एक हिंदु' या सहीचे पत्र छापले होते. त्यात बहुत करून बोभाटाचा मजकूर लिहिला होता. तो सर्व तथ्य नसला, तरी काही खरा आहे.
  नेटीव लोकांमध्ये विद्वान मुळी थोडे आणि जे वास्तविक विद्वान व गुणी आहेत, त्यांची प्रतिष्ठा इंग्रज सरकारात होते. एखादे वेळी विरुद्ध गोष्ट झाली म्हणून तेच प्रमाण धरू नये. सामान्यतः वहिवाट असेल ती लिहिली पाहिजे हे एक; दुसरे असे आहे की, इंग्रज शाळेत वगैरे जे लोक अभ्यास करतात, त्यात इंग्रजी लिहिणार असे नाव मिरविणारे पुष्कळ असतात. घरात खुर्ची, मेज, पिसे व बुके आली म्हणजे आईबाप व शेजारीपाजारी सर्व त्यांस इंग्रजी लिहिणार व शहाणा असे समजतात.
 परंतु वास्तविक पाहिले तर त्यांस वाचल्याचा अर्थही कळत नाही. आणि ग्रंथावलोकन केलेले नसते. इतिहास, विद्या, शास्त्रे यांचा अभ्यास नसतो. इंग्रजी विद्या समुद्रासारखी आहे. परंतु दोन बुके वाचातात आली व चार विरखुड्या आढता आल्या म्हणजे कानावर पागोटे, खिशात रुमाल आणि हातात सोटा असा वेश पुष्कळ घेतात. परंतु त्याने ते विद्वान होत नाहीत. शाळेत शिकलेले सर्व शहाणे आहेत असे नाही.
 "सहस्रेषु च पंडितः" असे कवीने म्हटले आहे. इंग्रज लोकांतील साधारण मनुष्य जरी असला, तरी हिंदू लोकांपेक्षा तो सहस्र गुणांनी श्रेष्ठ आहे व तुम्हास असेही वाटू देऊ नका की, विद्वान नेटीव पुष्कळ जहाले, तर त्यांस मोठ्या जागा मिळणार नाहीत. कारण की, विद्या शिकण्याचे बक्षीस विद्या हेच आहे व ज्ञान हीच शक्ति. मोठे धुरंधर विद्वान शे-दोनशे होऊ द्या आणि मग मोठ्या चाकऱ्या मिळतील किंवा नाही पहा! जर इंग्रज न देतील तर ते विद्वान हरएक प्रयत्ने करून त्या मिळवतील. एकमत हीच शक्ती आहे. शहाणपण असेल, तर पैक्यास तोटा नाही. एक विद्वान झाला असेल आणि त्यांस मोठी प्रतिष्ठा मिळाली नसेल, तर आश्चर्य नाही. कारण की, अशी परीक्षा होत नाही. हे प्रयत्नाचे काम आहे. काळेकरून याचा फायदा होतो. व इंग्रज लोकांस तरी इतबार आला पाहिजे, तेव्हा ते अधिकार देतील. आज नेटीव लोकांचा इतबार मोठा नाही. कारण की, शंभर नेटीव कामगारांस जर दिव्य दिले, तर पाच पार पडतील की नाही न कळे व परकी इंग्रज नेहमी ढेकणासारखे त्यांस चिरडतात. व किती एकाचा फडशा झाला आहे असे जरी आहे, तरी नेटीव कामगारांशी संबंध ठेवतात त्यांस त्यांची कर्मे विदित आहेत.
 नेटीव कामगार याजमध्ये चांगला गुण कोणचा असतो, हे तरी मनात आणा, ते बहुत करून अविद्वान, ढोंगी व लबाड असतात. कोणी मागल्या अवस्था पाहून काही दिवस नीट चालतात; परंतु मग त्याचे मनात असे येते की, आता मला काय भय आहे? मी आता श्रीमंती भोगावयास शिकतो. खर्च तरी कसा निभेल? असा विचार करून पाहिल्याने भयाने व लज्जेने खऱ्याकडून पैका घ्यावयास आरंभ करतात. व एकदा सवय पडली म्हणजे अंगवट्यास पडते. नंतर लिलाव सुरू करतात. म्हणजे जो अधिक बोलेल त्याचा फैसला होतो. अशा तर गोष्टी हमेशा पाहण्यात येतात. डौल करणारे हे लोक असे आहेत की, आपली योग्यता व थोरपणा काही जाणत नाहीत. यांनी कचेरीतून घरी जाताना रोज १५/२० शिपाई बरोबर नेत असावे आणि त्यामध्ये आपण झुलत झुलत मोठे डौलाने चालावे म्हणजे घरच्या बायका किंवा रांडा यांनी आपले यजमानास पाहून धन्य मानावे. अशाकरिता हे प्रयत्नाने शिपाई मिळवतात. व पुढे चालवतात. असे काही चमत्कारिक रिवाज या मूर्ख लोकांचे आहेत.
 त्यास असे वाटत नाही की, सरकारी चाकर हे विनाकारण मी आपल्या जवळ कशास ठेवावे? हे जर आपले कामावर जातील, तर किती एक लोकांची कामे आठ दिवसांनी व्हावयाची ती उद्या होतील. आपण कैदी नाही तर आपणाभोवते इतके शिपाई कशास पाहिजेत?
 परंतु मला वाटते की, पुढे जे होणार त्याचे ते चिन्ह दर्शवितात. तात्पर्य, सांप्रत नेटीव अंमलदार आहेत हे मूर्ख आहेत. यांस इंग्रज आता चाकऱ्या देतात, एवढ्याही देण्याची योग्यता याजमध्ये नाही, परंतु इंग्रज मेहेरबानी करतात. मी एकदा खेड्यात एका कुळंब्याचे तोंडाने ऐकिले की, साहेबांचे राज्य चांगले. साहेब न्याय इनसाफ चांगला करितो, पण ब्राह्मण लोक त्यांस शिकवून आमची घरे बुडवितात, आणि बहुतकरून सर्व रयतेची समजूत अशीच आहे आणि ती खरी आहे. हे हलकट लोक फार प्रळय करतात, आणि त्यांस आशा फार; म्हणून जोपर्यंत नेटीव लोक दुर्गुणी व लोभी आहेत, तोपर्यंत त्यांचा पक्षपात कोणी धरावा?

♦ ♦


हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा विचार

पत्र नंबर १२: २१ मे १८४८

 क्रमांक ११ च्या पत्रात 'प्रवासी' या सहीचे पत्र छापले, त्याचा अभिप्राय पहाता इंग्रजांचे राज्यात प्रजेस सुख नाही असा आहे, सबब याविषयी आम्हास काही विचार सुचला आहे तो लिहितो. म्हणजे त्यावरून लोकांस न्याय करिता येईल.
 ईश्वर सर्व गोष्टीचा नियंता आहे व पृथ्वीवर आणि सर्व ब्रह्मांडात ज्या गोष्टी घडतात त्याजवर त्याची सत्ता आहे. तसेच ईश्वर सर्वज्ञ आहे. तो असा की जसे जसे योजावयाचे तसे तो योजतो. त्याने क्षुधा केली आहे; तर अन्नही तो उत्पन्न करतो व सूक्ष्म आणि स्थूळ पदार्थांचे नियंतृत्व त्याजकडे आहे, म्हणून एक राज्य जाते व दुसरे होते. अशा मोठाल्या घालमेली होतात, त्या भगवंताचे प्रेरणेशिवाय घडत नाहीत. तेव्हा हिंदू लोकांचे मूळचे राज्य मुसलमानांनी घेतले, व याजकडे चार-पाचशे वर्षे राहून आता सर्व भारतखंड इंग्रजांचे अमलात गेले. या गोष्टी ईश्वराचे चांगलेपणाकरिता योजिल्या असे मला वाटते.
 कारण ईश्वर स्वतः कोणास शहाणपणा शिकवीत नाही. एक भिकारी होतो. दुसरा मातबर होतो, तद्वत एका देशाची सुधारणा तो देश दुसऱ्या देशाचे अमलात गेल्याशिवाय होत नाही. असे तर चराचर चालत आले आहे. पूर्वी हिंदू लोक शहाणे होते. त्यांचे शहाणपण मिश्र देशांत व यवन देशांत गेले व ते देश रूमचे अमलात गेले. तेव्हा रूमचे लोक शहाणे झाले. रूम टोपकर लोकांचे अमलात गेले तेव्हा त्यांचे शहाणपण टोपकर लोकांस आले; परंतु घालमेली मूळचे हिंदूचे शहाणपण राहिले नाही. ते मुद्दल. परंतु त्याची चक्रवाढ दर एक ठिकाणी होता होता सांप्रत इंग्रज लोक हिंदू लोकांपेक्षा शंभरपट शहाणे झाले आहेत व ते शहाणपण हिंदू लोकांस प्राप्त व्हावे एतदर्थी ईश्वराने हा मुलुख त्यांचे ताब्यात दिला आहे. हे स्पष्ट दिसत आहे. तुम्ही विचार करून पहा की, इंग्रज लोकांमध्ये सांप्रत शहाणपण व शहाणे मनुष्य आहेत, त्यांचा शंभरावा हिस्सा तरी हिंदू लोकांत आहे काय?
 पहा की, इंग्रज लोक अखबारी वगैरे वाचतात; त्यांस आपले लोक असे म्हणतात की, यात काय आहे? हे व्यर्थ काम आहे? आताच्या चाली व रीती-प्रकरणी कोणी संभाषण केले, तर ते म्हणतात की, 'छि:, या रिकाम्याकथा कशास काढतात?' किती एक लोक विद्येचे व ज्ञानाचे परम शत्रू आहेत बरे? असे मूर्ख लोकांमध्ये मला वाटते की, असेच परकी राज्य चांगले. कारण की, विलायतेत लोकसत्तात्मक राज्य आहे व दुसरे टोपकर लोकांचे मुलखात तसेच प्रकारची राज्ये आहेत, तसले राज्य जर हिंदुस्थानात असले, तर घटकाभर तरी चालेल काय? तसले राज्य जर येथे झाले व जर त्यात ब्राह्मण लोकांचा हात शिरला, तर लागलीच लक्ष भोजने व कोटि होम मात्र चालू करतील, परंतु लोकांच्या हिताच्या गोष्टी किंवा ज्ञान व जगात काय व्यवस्था आहेत, याचा शोध लावण्याचा उद्योग करणार नाहीत. व याचे एकमत राहणार नाही. ब्राह्मण म्हणतील की, हाडखाऊ कुळंबी हे कामात कशास पाहिजेत. व कुळंबी म्हणतील की, हे बामण माजलेले पोळ यांचा उपयोग काय? परभू म्हणतील, सोनार कशास पाहिजेत; वाणी म्हणतील की, तेली कशास पाहिजे, असा घोटाळा होईल की नाही? हिंदू लोक हल्ली ज्या स्थितीत आहेत तीप्रमाणे त्यांचे नाकात वेसण घालून चालविणारा एक दांडगा राजा पाहिजे, यांस मोकळीक देऊन उपयोग नाही. जसे इस्पितळातले रोगी आणि वेडे यांस स्वसत्ता दिली तर काय उपयोग? तद्वत् हे आपले लोक आहेत. यांस काही तरी ठाऊक आहे काय? गर्व मात्र यांचे जवळ राहिला आहे. यांची एकत्र ठिकाणी नांदणूक क्षणभरही होणार नाही.
 पहा, पेशवे, शिंदे, होळकर, भोसले यांच्या आपसांत लढाया किती झाल्या? वाकडे किती पडले? मारामाऱ्या आणि द्वेष किती झाले? नाना फडणिसास कैदेत बसविले की, नाही? व शेवटी राज्य बुडाले की, नाही? जर सर्व एकमत असते, तर असे न होते. पेशवे यांचे राज्य शंभर वर्षे होते, त्या शंभर वर्षांत कोणती सुधारणा झाली आहे पहा? आणि इंग्रजांनी शंभर वर्षेच राज्य केले; पण त्यात किती सुधारणा झाली? लोकांस किती शहाणपण आले? व पुढे किती येणार? मागील लोक इंग्रजांचे राज्याचे फायदे जाणत नाहीत. ते म्हणतात की, आम्ही सर्वस्वी भिकार झालो, पैसा गेला, पेशवाईत थोडे शहाणपणाने पैसा मिळत होता; परंतु आता तो प्रसंग नाही. म्हणून फार शहाणपण पाहिजे. द्रव्याचे व भोजनाचे एकीकडे ठेवा. आणि फक्त शहाणपणाचाच विचार करा. शहाणपणाचे अंती सर्व आहे. आठ दिवस खाल्ले नंतर महिनाभर अजीर्ण झाले ते बरे, किंवा नित्य थोडे थोडे खावे आणि अजीर्ण न होऊ द्यावे ते बरे? तद्वत पेशवाईतील द्रव्य पुष्कळ अनुभविले खरे, परंतु त्याचा परिणाम मूर्खपणाचाच झाला. आता शंभर वर्षे सुख भोगिले. आणि तेव्हा काही ज्ञानसंपादनाचा व आपले राज्य नीट चालविण्याचा यत्न केला नाही म्हणून आता ५०० वर्षे इंग्रजांचे अमलात रहावे लागेल. आणि आता ५०० वर्षांत जे शहाणपण मिळवू ते दोन हजार वर्षेपर्यंत पुरेल. कधी राज्य दुसऱ्याचे हाती जाऊ देणार नाही. तेव्हा याजवरून इंग्रजांचे राज्य पेशव्यापेक्षा बरे.
 कारण गीतेत सांगितले आहे की, जे परिणामी चांगले तेच चांगले. आदौ थोडे दिवस चांगले व पुढे फजिती, त्यांस चांगले म्हणू नये. तेव्हा आपले लोक जेवणाचे व द्रव्याचे आशेने काय स्तुती करतील ती करोत. परंतु इंग्रजांचा अंमल हा हंगाम बरा आहे. कोकणस्थ पूर्वी भिकारी होते. व पेशव्यांचे राज्यात कोणी काही सुख भोगिले. परंतु विचार केला नाही. खाल्ले मात्र, शेवटी दुसऱ्याने तोंडात मारून नेले, तेव्हा डोळे उघडले. तस्मात्, इंग्रजांचे अमलाचा परिणाम चांगला व लोक शहाणे होण्यास खुशी नाहीत, तरी ईश्वर जबरीने करवितो आहे. तुम्ही नको म्हणाल तरी तो ऐकणार नाही. ही त्याची दया मानावी. असा प्रसंग कोठून येणार? ईश्वर दयाळू आहे.

♦ ♦


राज्यसुधारणा


पत्र नंबर १४: २८ मे १८४८

 सांप्रत युरोप खंडातील बातमीपत्रे आली, त्यात मुख्य वर्तमान असे आले की, फरासिसांचे मुलखात राज्यसुधारणा झाली. त्यांस फ्रेंच रिवोल्युशन असे इंग्रजीत म्हणतात, व त्याचा अर्थ राज्यसुधारणा असा होतो.
 लोकांमध्ये दंगा, बंड इत्यादी शब्देकरून ते प्रकरण समजतात ही चूक आहे. कारण की, ते काही बंड नव्हे. हिंदुस्थानातील लोकांस स्वैर राज्याचे ताब्यात रहाण्याची सवय आहे. व दुसरे रीतीने राज्य ठाऊक नाही. यास्तव राज्यसुधारणा यांचा अर्थ त्यांस समजत नाही. याजकरिता त्याजविषयी मी थोडासा मजकूर लिहितो.
 एशिया खंडातील देशांत बहुधा एक राजा स्वैर असून अंमल करितो. त्याची रयत याचे गुलामाप्रमाणे व तिचा नाश नफा करण्याविषयी संपूर्ण मुखत्यारी स्व-इच्छे राजास असती. अशा राज्यात बंदोबस्त कमी असल्यामुळे चार दुष्ट लोक जमा होतात, आणि गरीब रयतेस लुटण्याकरिता व आपले दुसमान यांचा सूड घेण्याकरिता ते जागोजाग हल्ले करतात. त्याचे नाव बंड. या प्रकारची बंडे व तोतये हिंदुस्थानात पुष्कळ झाले आहेत. मागे पेशवाईत भाऊसाहेबांचा व यशोदाबाईंचा तोतया आणि चतुरशिंग राजा, उमाजी रामोशी, राघु भांग्ऱ्या, पेंढारी, शिंद्यांच्या बाया व तेलणी यांचे दंगे झाले, ती बंडे म्हणावी कारण की, तो चोर व लबाड लोकांचा समुदाय व त्यांचा हेतू रयतेस सुख देण्याचा नव्हता. दरिद्राने त्रासलेले किंवा काही एक कारणामुळे चवताळलेले लोक उगेच जमून लोकांचे नाश करतात. मग अर्थातच लोक त्यांचा द्वेष करून त्यांस मारतात व फाशी देतात.
 परंतु राज्यसुधारणा हे या रीतीचे बंड नव्हे. व हिंदुस्थानसारख्या देशांत ते व्हावयाचेही नाही. ज्या देशांत लोक शहाणे व ज्ञानी व एकमेकांचे सहोदर बंधूप्रमाणे हित पहाणारे असे आहेत, त्या देशांत मात्र अशी राज्यसुधारणा होते. सांप्रत टोपकर लोक शहाणे आहेत व त्यांच्यामध्ये किती एक हितावह व चांगल्या गोष्टी आहेत. त्या आपले लोकांस अद्याप माहीत नाहीत. आपले देशाचे हित करावे हा मुख्य धर्म, असे युरोपात समजतात. आणि जर काही अपाय किंवा वाईट वर्तणूक राजाकडून किंवा त्याचे प्रधानाकडून होईल तर लोक त्यांस बडतर्फ करतात.
 ही गोष्ट आपले इकडील लोकांस फार अशक्य व चमत्कारिक वाटेल. कारण की, इकडील लोकांस राजा म्हणजे विष्णूचा अवतार व प्रधान म्हणजे ब्रह्मदेव वाटतो. त्यांनी अन्याय केला तरी म्हणतात की,

"राजा हरति सर्वस्वं तत्र का परिदेवना"
 असे आहे, तेव्हा या लोकांस सुधारणा माहीत नाही, परंतु ज्यास ज्ञान संपादन करण्याची इच्छा असेल त्याने इंग्लंड देशाचा वृत्तान्त काढून पहावा म्हणजे जान राजा म्हणून होता, त्याजकडून अन्याय झाला; याजमुळे सर्व रयतेने त्याजवर उठून त्याजपासून करार करून घेतला. तो करार हल्लीपर्यंत चालू आहे हे समजेल. सर्व कायद्यांचे मूळ तेच आहे. पुढे राजा चार्लस याने पुनरपि अन्याय केले, तेव्हा त्यांस रयतेने धरून आणून कैदेत ठेवले. आणि त्यांस त्याचे वडिलांचा करारनामा दाखविला आणि मोठी न्यायसभा भरून तेथे त्याचा न्याय केला. तेव्हा राजाने अन्याय व लोकांचे अनहित केले असे शाबीत झाले. नंतर त्यांस शिरच्छेद करण्याची सजा झाली. तसाच राजा जेम्स याने जुलूम केल्यावरून त्यांस पदच्युत करून परदेशास हाकून दिला. अशा गोष्टी तिकडे घडतात. त्या इकडे अनश्रुत आहेत.
 जशी राजसुधारणा होते तशीच धर्मसुधारणाही होते. म्हणजे धर्माची व्यवस्था करून वाईट प्रकरणे बंद करतात. अशा गोष्टी हिंदुस्थानातही घडल्या आहेत. जेव्हा जैनमत झाले होते तेव्हा कुमारिलभटाने ते मोडून हिंदू धर्म स्थापिला व किती एक शास्त्रार्थ रद्द करून नवे चालू केले. त्याचे नाव धर्मसुधारणा. परंतु राज्यसुधारणा अद्यापि हिंदुस्थानचे इतिहासात आढळलेली नाही. कोणी कदाचित शिवाजी राजाच्या प्रकरणास राज्यसुधारणा म्हणतील व मलाही वाटते की, ते राज्यसुधारणाच होय; कारण जरी केवळ राज्यसुधारणेच्या हेतूने शिवाजीने मोगलांशी युद्ध करण्यास आरंभ केला नाही, तरी त्याचे स्वाभाविक कृत्य त्या स्थितीवर गेले. व मराठ्यांचे व सर्व हिंदू लोकांचे राज्यासंबंधी माहात्म्य सरासरी पाचशे वर्षेपर्यंत मुसलमानांनी बळकावले होते ते पुनरपि हिंदू लोकांचे हिंदू लोकांकडे शिवाजीचे कृत्यामुळे आले. तस्मात् ती 'रिवोल्युशन' म्हणावी. त्यानंतर मग शिवाजीचे पाठीमागे तसा सद्बुद्धिवान पुरुष न झाल्यामुळे ते कार्य तसेच राहिले, व मुलूखही इंग्रजांचे हाती गेला. तथापि शिवाजी राज्यसुधारक म्हणावयास योग्य आहे, यात संशय नाही. असो.
 आता फराशिसांचे मुलुखात असे झाले की, राजा रयतेस पीडा करू लागला व विनाकारण खर्च करून रयतेकडून नाना प्रकारचे कर वगैरे बसवून पैका घेऊ लागला, तेव्हा पारीस म्हणून फ्रेंचांची राजधानी आहे व तेथे मोठमोठे विद्वान लोक आहेत. त्यांनी संपूर्ण रयतेस त्रास आला आहे, असे जाणून तेथे एक युद्धविद्या शिकविण्याची शाळा आहे, तेथील विद्यार्थी वगैरे लोक मिळवून राजवाड्यावर गेले व तेथे फौजफाटा होता त्यांस सांगितले की, आम्ही राज्याची सुधारणा करावी व आपल्यास स्व-इच्छे राजापासून सुख होत नाही, यास्तव लोकसत्तात्मक राज्य करावे यासाठी झटतो. आमचा हेतू इतकाच की, सर्व लोकांस सुख व्हावे व ज्याचे त्याचे हक्क कायम रहावे; आम्ही लुटणारे नव्हत; व आम्हास काही नको. हे ऐकून ती फौज त्यांस वश झाली आणि त्यांचेबरोबर गेली. मग ते सर्व लुईस फिलीप राजास हस्तगत करणार तो तो स्त्रीसहित धाकाने पळून गेला. मग मागे शहरचे लोकांनी वाडा घेऊन सभा भरवली व असे ठरविले की, आजपासून रयतेचे राज्य रयतेने करावे. व त्याप्रमाणे नऊशे आसामी सभेस बसण्यास मुकरर केले. आणि राजाचे असबाबास काही हात लाविला नाही. राजाचे खोलीत जे मोहोर केलेले लखोटे सापडले तेही ज्यांचे नावावर होते त्यांजकडे पाठवून दिले. असे मर्यादेने ते लोक चालले. हल्ली फ्रेंचांचे राज्यात लोक राज्य करतात, हे पाहून दुसरे टोपकराचे मुलूख म्हणजे अमेरिका व सुइजरलंड वगैरे यांनीही आपले देशांत लोकांचे राज्य स्थापन केले. फ्रेंचांचे देशांत ज्या वेळेस राजास काढून टाकिले तेव्हा फौजेमध्ये बोनापार्ट म्हणून एक नामांकित सरदार होता. त्याने जय पुष्कळ मिळविले व त्यांस राज्याचा लोभ उत्पन्न होऊन त्याने राज्य बळकावले, तेव्हा इंग्रजांनी वेलसलीसाहेब म्हणजे ड्यूक वेलिंग्टन यांस पाठवून त्यांस कैद करून टाकले आणि पूर्वीचे राजाचा वंशज बसविला; परंतु हल्ली फ्रेंचांचे राज्यात हात घालू नये असा निश्चय इंग्रजांनी केला आहे; कारण संपूर्ण लोकांचा एकोपा ठरला की, राजा नसावा आणि प्रजा एकत्र होऊन राज्य चालवितात व इंग्रजांशी स्पर्धाही करीत नाहीत. त्यापेक्षा आपल्यास बोलण्यास काहीच जरूर नाही. असे इंग्रजांनी ठरविले आहे व इंग्रजांचे काही जिल्ह्यांत दंगे झाले आहेत; परंतु ते मोठे नाहीत. किती एक मोडले, त्यांचेही कारण हेच की, राजाकडून काही जुलूम जास्ती होऊन लोक त्रासले असे पाहून पुन्हा त्याचे शांतवन करतात व वाईट कायदे व कर बंद करतात, म्हणजे बंदोबस्त होतो. असे त्यांनी अद्याप शहाणपणाने राज्य चालविले आहे.

♦ ♦


राज्यसुधारणा


पत्र नंबर २५

 सांप्रत हिंदुस्थानातील लोकांस अज्ञानदशा आहे यामुळे राजा कोण आहे व व्यवस्था कशी आहे, ते कळत नाही. ज्यांस खावयास आहे त्यांस आपल्यासारखे सर्व श्रीमंत आहेत असे वाटते. पटवर्धन जहागीरदार यांचे प्रांतांत जे रहातात, त्यांस असे वाटते की, पृथ्वी चक्रवर्ती राजे पटवर्धनच आहेत व ते चिरकाल नांदतील. शिंद्याचे राज्यांत आहेत, त्यांसही असेच वाटते. जे पेशव्यांचे अंमलात पुण्यात रहात होते, त्यांस असेच वाटत होते आणि एक एक राज्य जात चालले, त्याचा कोणास ठिकाण नाही. सर्व आपले ठिकाणी धुंद आहेत.
 इंग्रज कोठून आले आहेत व ते आपल्यावर राज्य कोणत्या रीतीने करतात व त्यांचे मुलखात राज्य कसे चालते हे कोणास ठाऊक नाही. लोक मूर्खपणात राहून भिकारी होत चालले व अज्ञान - रोगाने ग्रस्त होऊन मरावयास टेकले. त्यांस औषधे कशाची? स्वदेशीय राजधानीतील लोकांस आम्ही काही म्हणत नाही, कारण त्यांची निद्रा कुंभकर्णासारखी आहे. जरी आम्ही त्यांचे कानाशी नौबती वाजविल्या तरी ते जागृत होणार नाहीत, घोरत असतील व जेव्हा त्यांस कोणी येऊन लाथ मारील, तेव्हा ते जागे होतील. असो. परंतु गतश्री जे लोक झाले आहेत, त्यांस सांप्रतकाळचे राज्यामुळे अडचणी किती आहेत, याची माहिती असेल. पुण्यासारखी बुडती शहरे व तुच्छ मानलेली जात ब्राह्मणासारखी, त्यांतील लोकांस माहिती असेल की आपला देश निर्धन होत चालला आहे. याचा विचार करणे सर्वांस उचित आहे. आणि मुलखाचे दरिद्र काढावयाचा उपाय करणे, तर आधी राज्य सुधारले पाहिजे. उत्तम रीतीने राज्य चालावे. अशी काही तरी युक्ती निघाली पाहिजे.
 मी जाणतो की, लोक मूर्ख आहेत याजमुळे त्यांस याचा विचार करण्यास शक्ती नाही, तत्रापि काही उपाय मला सुचला आहे, तो मी लिहून प्रकट करतो. हल्ली हिंदुस्थानात बहुतेक राज्य कंपनी- सरकारकडे आहे व लोकांस राज्यात काही अखत्यार नाही. इंग्रजांचे स्वदेशीय राज्यात पाहिले तर तसे नाही. तेथील लोकांस राज्यात हात घालण्याचा व कायदे करण्याचा अधिकार आहे. विलायतेतील राजा जडजाचे नाझराप्रमाणे आहे. जेव्हा लोकांची सभा म्हणजे पार्लमेंट हे कायदे फर्मावितात, तेव्हा राजा त्याबरहुकूम वहिवाट करतो. दर वर्षास राजाचे खर्चास पैसा पाहिजे. तो लोकांस मागील सालचा हिशेब देऊन पुढे वसूल करण्याची परवानगी घेतल्यावर त्यांचे हुकमाप्रमाणे कर व धारे बसून वसूल होतो. येणेकरून जसे लोकांस पाहिजे तसे राज्य चालते. एक राजा स्वइच्छेने राज्य करतो, त्यापेक्षा ही युक्ती बरी आहे व याप्रमाणे हिंदुस्थानात राज्य चालेल, तर फार चांगले होईल, जे सुज्ञ लोक असतील, त्यांस मोठे जाग्यावर व अधिकारावर नेमता येईल. असे इकडे राज्य असावे.
 सन १८३४ साली कंपनीची सनद २० वर्षांची बाहाल झाली. त्या समयी या गोष्टीचा विचार पडला होता. किती एक विलायतेतील दयाळू लोक यांनी सांगितले की, इंग्रज लोकांचे राज्य ज्या रीतीने चालते त्याप्रमाणे हिंदू लोकांचे चालावे; तेव्हा कंपनी सरकारने अशी शाबिती केली की, हिंदू लोक मूर्ख आहेत, त्यांस पार्लमेंट म्हणजे काय हे ठाऊक नाही. याजमुळे तेथे असे राज्य बसविल्याने बखेडा मात्र होईल आणि सर्व बेबंद होईल. पार्लमेंटात बसणारे लोक मोठे शहाणे पाहिजेत. त्यांचे मनात लोकांचे हित नेहमी वागले पाहिजे. तेव्हाच ती सभा नीट चालेल. त्याप्रमाणे पार्लमेंटात बसावयास सर्व हिंदुस्थानात एकही योग्य मनुष्य मिळावयाचा नाही, ही मोठी अडचण आहे. याजमुळे विलायतेतील बादशहाने कंपनी- सरकारची सनद कबूल करून वीस वर्षेपर्यंत कमाविशी कायम केली.
 ती वीस वर्षे सन १८५४ त भरतात. तेव्हा अजून ६ वर्षांचा अवकाश आहे. इतक्यात किती एक लोक शहाणे होतील व हल्ली किती एक शहाणे सापडतील; याजकरिता आजपासून सर्व गरिबांनी व श्रीमंतांनी एकत्र होऊन विलायतेतील राणीसाहेबांस तपशीलवार एक अर्ज करावा की, हल्ली राज्यपद्धती आहे, तीपासून आमचा फायदा नाही व आमचे राज्यासंबंधी हक्क चालत नाहीत व हिंदू लोक जसे, तसे इंग्रज लोक मनुष्ये आहेत, याजकरिता इनसाफ बरोबर होण्याकरिता सर्व इंग्रज व नेटीव लोक यामध्ये सांप्रत मोठा भेद आहे, तो मोडून एकसारखे होण्याकरिता हिंदुस्थानचे देशांत पार्लमेंट ठेवावे व ही मोठी सभा मुंबईस भरावी. आणि तेथे दरएक शहरातून व दरएक जिल्ह्यातून दोन दोन आसामी घेऊन त्या सर्वांस कौंसलांत बसवून गवरनराने त्यात मुख्य असावे व जे लोक दर जिल्ह्यातून आणावयाचे ते सर्व जातीतील सारखे असावे. दर जिल्ह्याचे माजिस्ट्रेट साहेबांकडून दवंडी पिटवावी की, राज्याचा विचार चांगले रीतीने होण्याकरिता संपूर्ण लोकांनी विचार करून दोन शहाणे मुखत्यार नेमावे व त्याप्रमाणे नेमिलेले सर्व लोकांनी हजर व्हावे. हे लोक बोलणारे, चतुर व मुच्छदगिरी केलेले असावे; कारण हे राज्याचे हिस्सेदार आहेत. केवळ शिरस्तेदार, मुनसफ व मामलेदार नव्हत व या लोकांत भट, गृहस्थ, शास्त्री, परभू, कुळंबी, मुसलमान, इंग्रज इत्यादी जे शहाणे दिसतील, ते नेमावे व त्यांनी राज्य चालवावे, म्हणजे लोकांचा फार फायदा होईल.
 याप्रमाणे अर्जी करून, विलायतेस दहापाच आसामी प्रयत्न करण्याकरिता नेमून, त्याजबरोबर ती पाठवावी म्हणजे आपले लोकांचा काही उदयकाळ होईल. नाही तर हे असेच किती एक वर्षेपर्यंत रहातील, यास्तव जे लोकांचे हित पाहणारे आहेत, त्यांनी हा बेत केला पाहिजे. म्हणजे दरिद्र वगैरे बोभाट लोक सांगतात, हे त्वरित दूर होतील. आणि इंग्रज लोक इकडील लोकांस मूर्ख असे समजतात, तेही मत मोडेल आणि राज्याची उत्तम प्रकारची सुधारणा होऊन एके राजाचे अंमलात सुख काय व लोकसत्तात्मक राज्यात सुख काय, हे सहज दृष्टोत्पत्तीस येईल. असे सरकार झाल्याने मग शिंद्यांचे किंवा हैदराबादचे राज्य चांगले की काय हे त्वरित ध्यानात येऊन चांगले राज्य चालविण्याचे रीतीची माहितगिरी सर्व लोकांस होऊन बहुधा हे उदाहरण पाहून सर्व दुसरी राज्येही याचप्रमाणे होतील व येणेकरून एका राजाचे ताब्यात राहून त्याचा जुलूम सोसावयाची खोड हिंदू लोकांस लागली आहे, ती ते विसरून जातील. राज्य करण्यास गरीब व मातबर नीच जातीचे उंच जातीचे लोक समान मानावे, हे सर्वांस कळू लागेल. अशा सभेत जातीविषयी निवड नको, हे वर सांगितलेच आहे. जे फार विद्वान व चांगले चालीचे लोक आहेत, तेच नेमले पाहिजेत. मग त्यांची कोणतीही जात असो, परंतु ब्राह्मणांस गर्विष्ठपणा फार आहे, याजकरिता ती जात फार थोडी असली पाहिजे.
 सदाशिवराव भाऊ पेशवे हे स्वारीस गेले, तेव्हा लढाईचा विचार करण्याकरिता मराठे, मुसलमान व ब्राह्मण सरदार बसत; परंतु ते इतरांस तुच्छ मानीत. शेवटी त्यांच्या गर्विष्ठपणाचा त्रास होऊन होळकर म्हणू लागला की, या बामणाचा गर्व हरण झाला तर बरे होईल. शेवटी अशानेच सदाशिवराव भाऊंनी सर्व फौज बुडविली व आपणही बुडाले.
 याप्रमाणे नाना फडणीस यांचा स्वभाव सर्वांस माहीत असेलच, त्यांनी आपले गर्विष्ठपणानेच इतर लोकांस तुच्छ मानिले. यांचे पुराणात वगैरे ब्राह्मण म्हणजे देव, असे म्हटले आहे, त्या समजुतीवर ते जातात. त्यांस अद्याप इतर लोक व आपण सारखेच आहो, हे कळले नाही. ईश्वरेच्छेने लवकरच कळेल.

♦ ♦


लाच


पत्र नंबर ३२: २२ आक्टोबर १८४८

 इंग्रज लोक हल्ली हिंदुस्थानात राज्य करतात. हे सामान्यतः इकडील लोकांपेक्षा शहाणे, विद्वान, ज्ञानी, माहितगार व निष्कपटी आहेत. परंतु शेकडा पाच या सुमाराने त्यात वाईटही असतात. तसेच, जे चांगले आहेत, ते तरी सर्व कामे करू शकत नाहीत. कारण एकटा मनुष्य; त्यांस दोन हात. तेव्हा त्याने कितीही काम केले तरी ते थोडेच करील आणि त्यांचे पाठीस डोळे नसतात. यामुळे त्यांचे हाताखालचे लोक चांगले सज्जन असल्याखेरीज सर्व कामे चांगली चालणार नाहीत व इकडील लोक लबाड म्हणून जरी प्रसिद्ध आहेत, तरी ते इंग्रजास राजकीय कारणास्तव आणि अडचणीमुळे पुष्कळ ठेवावे लागतात. या लोकांची वर्तणूक फार वाईट म्हणून लोकांचे फार नाश होतात. दिवसानुदिवस त्यावर भरवसा कमी राहतो.
 हिंदू लोक लाच खातात, याचा संशय नाही. कंपनी सरकारचे चाकरात हजारांत लाच न खाणारा व ईश्वरास भिऊन चालणारा क्वचित असतो. बाकी सर्व शिपायापासून प्रिन्सिपाल सदर अमीनपर्यंत शपथेचा व्यभिचार करतात. याचे कारण असे की, या लोकांस ज्ञान आणि धर्म नाही हे एक; आणि दुसरे इंग्रज लोकांस हिंदू लोकांची परीक्षा करिता येत नाही. याजमुळे कोणत्याही कामावर यथायोग्य गुणाने योजना होत नाही. हिंदू लोक जरी मूर्ख आहेत, तरी त्यांत निवड केली, तर चांगले शहाणे व ईश्वरास भिणारे असे काही सापडतील; परंतु सरसकट नेमणुका करतात; याजमुळे वाईट लोक पुष्कळ अधिकारावर येतात. जर असा ठराव केला की, इंग्रजी विद्या शिकलेले लोकांस कामावर नेमावे, तर लाचाचा काही बंदोबस्त होईल, मोठे शास्त्री जरी असले, तरी त्याचाही उपयोग नाही. कारण मी एका शास्त्र्यास प्रश्न केला की, 'लाच घ्यावा किंवा नाही?' त्याने सांगितले की लाच खाणे हा न्यायाधीशाचा धर्म आहे. परंतु खरा असेल त्याजपासून घ्यावा असे शास्त्र आहे.' तेव्हा हिंदू लोकांचे शास्त्राचा या गोष्टीस काही प्रतिबंध करतो; परंतु कायदा चुकविण्याचे सोपे आहे. ज्या पुरुषाचे मनात ईश्वराज्ञेचा निर्धार नाही त्यांस कायदा दिला तरी तो लाच खाल्ल्यावाचून राहणार नाही. तेव्हा हिंदू लोकांचे मनच फिरले पाहिजे. ही गोष्ट वाईट, असे त्यांस पक्के समजल्यावाचून लाचाचा प्रतिबंध होणार नाही.
 जरी इंग्रजांनी भगीरथ प्रयत्न केला, तरी हे लोक अडून अडून लाच खातात. हे जगप्रसिद्ध आहे. आणि वास्तविक पाहिले, तर जो मनुष्य मुनसफाचे काम करितो, तो वेतना इतका खर्च ठेवून पाच वर्षांत दहा हजार रुपये जवळ करतो. तसेच शिरस्तेदार आपले सर्व वेतनाइतका किंबहुना जास्तीच खर्च करून सालात पाच हजार रुपये जवळ करतात. तसाच नाझरही सालाचे पाच हजार रुपये मिळवितो. सामान्य कारकूनही दहा वर्षे काम करतो, तर तो दोन हजार रुपये जवळ करितो. तसेच चपराशी पगाराचे दुप्पट मिळवितात. फौजदार व मामलेदारही याजप्रमाणे; जर बारीक शोध केला, तर ही सर्व बातमी लागते आणि जरी जड्ज किंवा कलेक्टरसाहेब प्रमुख असतात; तरी त्यांचा इलाज चालत नाही. पहा! एक मनुष्याने हुकूमनामा बजावण्यास नेला, तर पहिल्याने शिरस्तेदाराचे आर्जव करावे लागते. त्याशिवाय साहेब काही करीत नाही. तेव्हा लोक त्याची पूजा करून नंतर हुकूम घेतात. तो बार करणार कारकून याजवळ देतात. तेव्हा शिरस्तेदार व कारकून एका मताचेच सिद्ध साधक असतात. ते त्यांस तसदी देत नाही की, अमक्याचे काम जरूर करावे. जेव्हा त्या कारकुनास चार आणे द्यावे तेव्हा तो बार करून मालकाजवळ देतो. मग मालक नाझराकडे जातो. तेव्हा नाझर म्हणातो की, 'आता मजजवळ शिपाई नाही, जा, पाहिजे तर साहेबास सांगा.'
 तेव्हा सावकार तर एक वेळ खर्च करून साहेबाकडून आला असता, तो पुन्हा जाईल, तर दाद लागणार नाही. आणि जर नाझरावर फिर्याद करील तर साहेब म्हणतो की, "अरे, अमलदारावर हा फिर्याद करतो! त्याची शपथ घ्या आणि बसवून ठेवा." अशी त्याची तिकडे शोभा होते. तेव्हा काही खर्च पडेल तो करावा हे ठीक असे समजून नाझराची मूठ भरतो. नंतर सर्वांची पंचोपचार पूजा करून शेवटी शिपाई जप्तीस मिळतो. तो मिळाला की म्हणतो, 'दादा, रामराम. आपणाकडे नेमणूक झाली. देवाने केले, असे कूळ मिळाले म्हणजे आपल्यास काय कमी?' आठचार आणे त्यांस द्यावे. तेव्हा तो बरोबर काम करतो. नाही तर कुळाकडे जाऊन अगोदर बातमी लावून माल पळवितो. पुढे माल जप्त केला, तो लिलाव होईपर्यंत याचप्रमाणे खर्च पडतो. शेवटी रुपये आले म्हणजे तरी लवकर पदरी पडत नाहीत. नाझर म्हणतो, 'जाऊ द्या. या पहिल्या तारखेस.' तेव्हा उत्तरपूजा करावी लागते. शेवटी पन्नास रुपयांचा दावा असला तर चाळीस रुपये खर्च होतो. मग त्या सावकाराने म्हणावे, अरे, रुपये नाही आले तर नाही, बुडाले; परंतु कूळ पैसा देत नव्हते. त्याची तर खोड मोडली? ' एवढा मात्र आनंद मानून बसतात.
 तेव्हा या रीतीने रयतेची किती खराबी होईल बरे? या प्रकारे इंग्रजांच्या दरबारात न्याय चालला आहे. छापी कागद, वकील, मुनसफ लूट करतात. हुकूमनामा झाला, तरी सदरी लिहिल्याप्रमाणे व्यवस्था होते. कित्येक लोक असे आहेत की, शंभर रुपयांची फिर्याद करतात. तीत चारशे रुपये खर्च करतात व शिवाय आर्जवे व नित्य खेपा, आपला रोजगारधंदा सोडून कज्जाचे पाठीस लागतात. याजमुळे बेजार झाले आहेत, असा अनर्थ सरकारी कामदार करतात. या तऱ्हेने पैसा काढून आपला नफा करतात, रयतेची दया किंवा ईश्वराचे भय किंवा धर्माचा प्रतिबंध किंवा मनाची लज्जा किंवा परलोकाची काळजी किंवा अब्रू हे काही एक मनात आणीत नाहीत. तेव्हा व्यापार आणि व्यवहार व देणेघेणे कसे नीट चालेल? इंग्रज तर या गोष्टीस वाकब असे थोडेच आहेत? काही काही पुरते आहेत; परंतु त्यांचा तरी उपाय चालत नाही.
 यांस एवढाच उपाय आहे की, चांगले लोक पाहून अधिकारावर ठेवावे अधिकारावर ठेवणे याची फार चौकशी करून लोकांची निवड करावी व त्यांचे गुणांचा विचार करावा. आणि लाच न खाणारे आणि इंग्रजी जाणणारे आहेत व जे फार विद्वान आणि विचारशील आहेत त्यांस ठेवावे; तरच त्यांचा बंदोबस्त होईल, नाही तर कदापि होणार नाही. मोठा शहाणा साहेब असला, तरी काय करतील? मराठी अर्जी असली तरी ती वाचावयाला शिरस्तेदार पाहिजे. हुकूमनामा बजावण्यास नाझर पाहिजे. शिपाई, कारकून पाहिजेत. अव्वल कज्जे फैसला करण्यास मुनसफ पाहिजेत. त्याशिवाय चालणार नाही. परंतु त्यांची वाईट वर्तणूक असली तरी साहेब काय करतील?
 हल्ली लोकांस असे वाटते की, इंग्रजांचा रोजगार करून पैशास जय नाही व बरकत नाही. म्हणजे उघड लाच घेता येत नाही; परंतु वास्तविक पाहिले तर बरकत असेल कशी? "हपापाचा माल गपापा जातो," अशी म्हण आहे. हे लोक शपथ खाऊन पैसा मिळवितात. तो पैसा राहील कसा? त्यांनीच शिक्षा पावून तुरुंगात शृंखळाबंधनात असावे, ही त्यांची योग्यता असते, परंतु कित्येक लोकांची ही अप्रतिष्ठा चुकते, हेच त्यांचे पुण्य म्हणावे. त्यांचे कल्याण होईल कसे? जरी कोणी म्हणवितो की, मी पन्नास वर्षे व चाळीस वर्षे व तीस वर्षे व वीस वर्षे चाकरी केली; माझी सरकारने प्रतिष्ठा वाढवावी; पण त्यांनी आपल्या मनात विचार करून पाहिला तर समजेल की, कोणत्या धर्माने आम्ही चाकरी केली? सरकारास फसविले. रयतेस लुटले. लबाड्या केल्या. त्यांत कोणाचे मी चांगले केले? ज्यांस शिक्षा होते, तो तुरुंगात जातो. जे राहतात ते म्हणतात की, आमची योग्यता हीच आहे; परंतु चालेल तितके दिवस करून घ्या. पुढे काय होईल ते पाहू! असेही लोक म्हणतात, परंतु त्यांची वास्तविक योग्यता पाहिली, तर जे लाचाकरिता तुरुंगात आहेत, त्या कैदीची योग्यता आणि जे कोर्टात मोठे अब्रूचे लोक म्हणून बसून न्याय करतात, अंमलदारी करतात, त्यांची योग्यता यांत काय अंतर आहे? ज्या दिवशी सापडतील त्या दिवशी यांचीही गत तीच होणार. याजमुळे सरकारी अंमलदाराची योग्यताही लोकांत नसते. ते कामावर असतात, याजमुळे चार लोकांस त्याजजवळ जाणे जरूर पडते; परंतु त्यांची योग्यता प्रसिद्ध असते.
 जरी हिंदू लोक हुशार आहेत, तरी या दुर्गुणाने त्यांची माती झाली व अब्रू गेली, याची कोण लाज बाळगीत नाही. कामावरून गेले म्हणजे त्यांचेकडे कोणी पहात देखील नाही. कारण की त्यांची योग्यता सर्वांस ठाऊक असते. जर पुरुषास खरी प्रतिष्ठा असली, तर ती त्याची चाकरी गेल्याने कमी होत नाही व द्रव्य आले गेले, तरी त्याने त्याची अब्रू कमी होत नाही. ती शाश्वत अब्रू; परंतु हे लबाड लोक जी अब्रू मिळवितात, ती मुलाम्यासारखी; ही टिकावयाची नाही. जे लोक लाच देतात, ते तरी मूर्खच असतात. जर सर्वांनी कट केला की, सरकारचे अंमलदारास लाच द्यावयाचा नाही, तर त्यांची खोड जाईल; पण असे चांगले कट करण्यापुरते शहाणपण जर या लोकांत असते, तर मग राज्य का जाते बरे?
 हे लोक फार मूर्ख आहेत. याजमुळे असे प्रकार यांजमध्ये आहेत व इंग्रज तर पक्के लोक आहेत. ते म्हणतात की, आपआपल्यांत हे लोक लुटून खातील. तर आमचे काय गेले? आमची तितकी चांगलेपणाची प्रशंसा वाढेल. हेही खरे की, साहेबलोकांस लोक चांगले म्हणतात व नेटीव कामगारास बहुधा वाईट म्हणतात; परंतु आता सुधारलेले लोक व सुशिक्षित सरसावत चालले आहे. ते इंग्रजांची बरोबरी करतील, यांत संशय नाही.

♦ ♦


वेळेचा व्यर्थ खर्च


पत्र नंबर ३४: १२ नोव्हेंबर १८४८

 आपले लोक वेळेची किंमत समजत नाहीत. वास्तविक म्हटले तर मनुष्यास ईश्वरी दत्त आयुष्य हेच धन आहे, जे या धनाचा अविचाराने व्यय करतात, ते उपाशी मरतात आणि जे या विचाराने व्यय करतात, ते स्वच्छपणाने सुख भोगितात.
  सांप्रत हिंदू लोकांस अशी खोड आहे की, वेळ व्यर्थ घालवावा. आमचे पाहण्यात असे लोक आले आहेत की, आपले घरून उठून लोकांचे घरी जावे आणि त्यांचा व आपला वेळ गोष्टीत घालवावा. त्यांचे रिकामे गोष्टीवर सर्व ध्यान असते. जेवणदेखील ते विसरून गोष्टी सांगत बसतात. बरे, गोष्टी सांगतात त्या तरी उपयोगी, विचाराच्या व ज्ञानवृद्धी व्हावी अशा प्रकारच्या असाव्या, तर तेही नाही. मनुष्य उत्तम प्रकारचे भाषण करील तर त्यांस व श्रोत्यांस ज्ञान होईल. परंतु हिंदू लोकांमध्ये जे गोष्टी सांगणारे आहेत यांचा वेळ शहाणपणाचे गोष्टीत जात नाही. व्यर्थ मूर्खपणाच्या गोष्टींत जातो. त्यांचा काही उपयोग नाही. बहुधा भट लोकांच्या जेवणाच्या गोष्टी. हे आम्ही फार खाल्ले, थोडे खाल्ले, यजमानाने असे वाढले, इत्यादी मूर्खपणाच्या आणि अधाशीपणाच्या गोष्टी सांगत बसतात. त्यांचा मुख्य विषय बोलण्याचा काय तो जेवण हा असतो.
 त्याचप्रमाणे कुळंबी लोक व मराठे सरदार वगैरे आपल्या बढाईच्या गोष्टी सांगतात. काम काही करीत नाहीत. त्याचप्रमाणे गृहस्थ लोकांत कोणी निद्रेने, कोणी दुर्व्यसनाने काळ काढतात. खाणे, पिणे, लेणे याहून दुसरा सुखाचा अनुभव काही त्यांस नसतो. माझे पाहण्यात लक्षावधी लोक आले आहेत. त्यांस पुसले तर ते म्हणतात, 'आम्ही काही करीत नाही. सरकारातून इनाम आहे, तेवढ्यावर निर्वाह करून घरी सुखरूप असतो.' त्यांचे आयुष्याचा हिशेब जर त्यांस पुसला तर जन्मापासून मरणापर्यंत त्यांचे आयुष्यात अशी एकही गोष्ट सापडावयाची नाही की, ती कागदावर लिहिण्यास योग्य व ऐकण्यास योग्य. अशा रीतीने ते काळ घालवितात. भटही असेच असतात. जर त्यांस म्हटले की, तुम्ही काय करीत असता, तर ते म्हणतील की, स्नानसंध्या करून गंगातीरी स्वस्थ असतो. मोगलाकडून इनाम आहे, तितक्यावर चरितार्थ चालतो. तसेच मराठे लोकांस पुसले तरी ते म्हणतात की, सातारच्या राजाचे पदरी असतो, काम काही नाही; पंक्तीचे ताट, मानकऱ्यांमध्ये असामी व महाराजांबरोबर फिरावे. असे लोक मोठ्या राजधानीत आढळतात.
 जेथे हिंदू लोकांचे राज्य आहे, तेथे सर्वत्र न्यायाचा अंधकार असतो; एवढेच नाही, परंतु विद्येचा व विचारांचाही असतो. बाहेर होते काय व जाते काय, याचा काही एक विचार नसतो. ज्याचे त्याचे ज्ञान आपलेपुरते व आपले घरापुरते असते. त्यांस दुसरे काही ठाऊक नसते. कोणी म्हणतील की, थोर लोकांच्या पदरी भिक्षुक, भट, शास्त्री, पंडित असतात. परंतु ते लोक निरुपयोगी असतात, शास्त्री जे आहेत, त्यांस मागील हजारो वर्षांचे ग्रंथ उलटतानाच पुरे होते, कारण संस्कृत भाषेचे कुलपात ते असतात. तेव्हा प्रथम ते कुलूप उघडावयास म्हणजे भाषा शिकण्यास पाच दहा वर्षे लागतात. मग पुढे काही ज्ञान व्हावे, तो लोक 'शास्त्रीबोवा' असे म्हणू लागतात. मग अंगावर शालजोडी घेऊन मिरवतानाच पुरेसे होते. मग विद्या कशाची? अलीकडे पाच हजार वर्षांत झाले काय, याचा पत्ता कोणास नाहीच. शास्त्री, पुराणिक द्वापारयुगापर्यंत गोष्टी सांगू शकतात. परंतु पुढे अलीकडील अनेक देशचे वर्तमान, व नवीन कला व विद्या वगैरे उत्पन्न झाल्या आहेत याविषयी खबर नसते. जे संस्कृतात देश लिहिलेच नाहीत ते आता आहेत. त्यांचे वर्तमान त्यांस ठाऊक नाही.
 हल्लीचे सरकारची व्यवस्था ठाऊक असल्यास उपयोग अधिक पडेल. परंतु हे ते समजत नाहीत. तस्मात् शास्त्री यांचे ज्ञान अपुर्ते आहे, जसे घरात पन्नास असामी, वृद्ध, ज्यांस जाग्यावरून उठवत नाही असे आहेत, तर त्या लोकांचा उपयोग काय? काही तरुण यामध्ये असतील तरच त्यांचा निभाव लागेल. आणि अलीकडील इतिहास व विद्या जाणून मग प्राचीन राजाचे इतिहास ठाऊक असले तर चांगलेच आहे. परंतु अलीकडील सोडून मागील राजांच्या कथा जन्मपर्यंत वाचल्या तरी उपयोग काय? मागील युगात मनुष्ये ताडभर उंच होती व दहा हजार वर्षे जगत होती आणि सोन्याची भूमी होती, अशा गोष्टी खऱ्या असोत-नसोत, परंतु त्यांचा मुळीच काही उपयोग नाही, यांत संशय नाही. भागवताची हजार पारायणे केली व रामायण नित्य वाचले, तरी हिंदुस्थानात इंग्रज कसे आले, हे समजणार नाही. तसे जन्मपर्यंत जुन्या गोष्टी सांगितल्या आणि सांप्रतचे विचार केले नाहीत तर त्यांचा उपयोग काय?
 परंतु हे शास्त्री व भट संपूर्ण हिंदू लोक अजून मागल्या गोष्टींचे भरात आहेत. त्यांस अजून सांप्रतचे काही सुचत नाही. याजमुळे कित्येक लोक पोरासारखे बोलतात की, विलायतेत बेट लहान, दोन चार कोसांचे आहे. कोणी म्हणतो टोपकर हे पाण्यातले राहणारे! कोणी म्हणतो, रूमशामचे राज्य मोठे. कोणी म्हणतो, सात लाख घोडे तेथे आहेत, कोणी म्हणतो, पंधरा लाख पायदळ तेथे आहे. कोणी म्हणतो, कंपनी सरकार बायको आहे. अशा नाना प्रकारच्या गैर माहितीच्या गोष्टी सांगतात. इंग्रजांस राज्य करू लागल्यास दोनशे वर्षे झाली आणि या लोकांच्या डोकीवरचे केसदेखील त्यांनी मोजले. परंतु या लोकांस त्यांचे डोळेही ठाऊक नाहीत, हा केवढा चमत्कार! भट लोक हे तर या पृथ्वीवर जन्मास आले, व न आले सारखेच आहेत. यांचा काहीच उपयोग नाही. अन्नास मात्र खर्च, लोकांस उपद्रव, भीक मागणे, व्यर्थ वेळ घालविणे, हीच त्यांची वृत्ती. कोणी काही करील, तर यांचा कर त्यावर आहेच. याचा काहीच उपयोग लोकांस नाही. परंतु यांचा सन्मान ठेवणारे गृहस्थ पुष्कळ आहेत. येणेकरून द्रव्याचा व्यय होऊन विद्याशून्य लोकांचा प्रतिपाल होतो आणि मूर्खपणा वाढतो. या लोकांस काही तरी काम शिकविले तर बरे.
 ब्राह्मण लोक शिंपी वगैरे यांचा रोजगार करतील तर अब्रूने पोट भरतील. भिक्षुकी करावी आणि निर्लज्जपणाने दुसऱ्याचे दारी उभे रहावे, त्यापेक्षा धंदा करून वेळ आणि आपली शक्ती उपयोगास लावून पोटे भरावी ते बरे नाही काय? हे लोक जर आपले आयुष्याची किंमत करतील आणि व्यर्थ दिवस घालविणार नाहीत, तर यांचे फार कल्याण होईल.

♦ ♦


इंग्रजी राज्यापासून लाभ

पत्र नंबर ३८: १० डिसेंबर १८४८

 सांप्रत किती एक लोक असे म्हणतात की, इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानातून जाईल तर चांगले; परंतु आम्हास वाटते की, इंग्रजांचे राज्यापासून बहुत लाभ आहेत.
 प्रथम लोकांचे मत असे आहे की, या सरकारात कोणास बहुमानाची जागा मिळत नाही, हे तर सामान्यतः खरे आहे; परंतु ही गोष्ट स्वाभाविक उत्पन्न जहाली आहे. परकी लोकांवर भरवसा कमी; परंतु उभयतांचे तर्फे अधिक माहिती होईल तेव्हा विश्वास पटेल. व्यापाराचे बाबतीत इंग्रज लोक इकडील लोकांपेक्षा विशेष शहाणे आहेत, तेव्हा पदार्थ करून ते इकडे स्वस्त विकावयास आणितात. तेव्हा याचा शब्द त्यांजकडे नाही; परंतु काही दिवसांनी हेच लोक त्यांच्या विद्या घेऊन त्यांचेप्रमाणे माल उत्पन्न करतील व काचा, घड्याळे, सुऱ्या, कातऱ्या, कापडे वगैरे जिन्नस इकडे न होतील, असे नाही.
 परंतु प्रस्तुत लोक आळशी, याजमुळे देश भिकारी जाहला हे खरे. दुसरा उपाय असा की, जर या लोकांस परदेशांत जाण्याचा अटकाव नसता, तर आजपर्यंत यांनी किती एक देश व किती एक ठिकाणे पाहून तेथील ज्ञान, शहाणपण, रीती, कलाकौशल्या इत्यादी इकडे आणले असते. परंतु लिहिणारे- वाचणारे जे ब्राह्मण त्यांची नजर उत्सव, समाराधना, जेवणावळी याजवर; कारण "ब्राह्मणो भोजनप्रियः" तेव्हा घरात आळस, बाहेर मनाई, अशा दोहोकडून यांस अडचणी, तेव्हा याचा दोष कोणावर बरे? बरे, मोठ्या मोठ्या जागा इकडील लोकांस आता नाहीत. असा अभिप्राय बहुत लोकांचा आहे. त्यांस पहा बरे, इंग्रज लोक इकडे आले, त्यांचे देशचे हजारो लोक इकडे लढाईत मेले. व इतके दुरून ते तेथे आले त्यांस लाभ कोणता असावा? जर त्यांनी आपले लोकांचे महत्त्व राखू नये, तर मग त्यांस लाभ काय? कोणी काही काम करतो, त्यांत लाभ पाहतो, दुनयेची रीती अशीच आहे. जर हिंदू लोक शहाणे असून, धैर्य करून परकी देशांत राज्य संपादन करते. तर असेच करते किंवा याहून अधिक करते, याचा विचार करावा. म्हणजे इंग्रजांची वर्तणूक कशी आहे, हे ध्यानात येईल.
 जेव्हा मराठे लोक शिंदे, होळकर, परमुलखात (म्हणजे त्यांचे समजुतीप्रमाणे परमुलूख, परंतु वास्तविक पाहिले तर मुलूख एकच) गेले, तेव्हा त्यांची वर्तणूक कशी होती? किती गाव ते जाळीत होते? दरसाल ते खंडणी किती घेत होते? शहरे व सावकार किती लुटीत होते? या गोष्टीचे स्मरण ठेविले, तर इंग्रज बरे आहेत असे लक्षात येईल. हे लोक सुधारून मूर्खपणाचे शृंखलेपासून मुक्त व्हावे. याजकरिता त्यांचा उद्योग बहुत चालला आहे. आपली विद्या ते पसरीत आहेत. शिकणारास उत्तेजन देतात.
 जे लोक इंग्रजांशी संबंध ठेवतात त्यांस बहुधा ठाऊक असेल की, इंग्रज साधारणतः इकडील लोकांपेक्षा अधिक काम करणारे, मेहनती, शहाणे, हुशार, खरे व प्रामाणिक आहेत. इकडील लोक त्याप्रमाणे नाहीत. शंभर इंग्रजांत पाच लबाड असतात; परंतु १०० हिंदू लोकांत पाच प्रामाणिक असतात. तेव्हा याजकडे मोठे अधिकार दिले तर लोकांची स्थिती नीट राहणार नाही. जे गुण राज्यकर्त्यांमध्ये असावे ते हिंदू लोकांमध्ये नाहीत. राज्याची पद्धती त्यांस ठाऊक नाही. आजपर्यंत ब्राह्मण लोकांनी राज्य कधी केले नाही. हा एवढाच १०० वर्षे पेशवाईत काय तो दिवा लागला. तद्वत् मराठे. त्यांनी कधी राज्य केले नाही.
 पूर्वी क्षत्रिय लोक राज्य करीत होते. ते तर आता नाहीत. तेव्हा राज्यकर्त्यांची शहाणपणे या लोकांस आल्याखेरीज काही उपयोग नाही. हे लहान पदवीधर आहेत, हेच बरे! कारण जेव्हा शिंदे व होळकर लक्ष्मीचे अंधकारात होते, तेव्हा त्यांनी ५०,००० पेंढारी लुटायचे कामावर ठेविले होते. त्यांचे निर्मूळ इंग्रजांनी केले. जे राज्य करतात तेच लुटारू लोकांस बाळगतात. हे कधी कोणी ऐकले होते काय? जे राजे चोरांचे रक्षण करतात आणि लुटारू लोकांस बाळगतात, त्यांचे वर्णन काय करावे? तद्वत् दक्षणेत रामोशी व भिल्ल वगैरे वाटपाडे लोक होते. त्यांस राजेच सामील होते व लोकांत लूट करण्यास त्यांस परवानगी देत होते. परंतु या राजांनी त्या लोकांस सुधारावयाचा यत्न कधीच केला नाही. ब्राह्मण लोक हे स्वहिततत्पर, गर्विष्ठ व कृत्रिमी आहेत, असे दिसते; कारण ते लोक नीच आहेत त्यांचे सुधारणेस यत्न करीत नाहीत.
 त्यांस असे वाटते की, आम्हास ईश्वराने निर्माण केले आणि दुसऱ्यास ईश्वराने नीच निर्माण केले आहे; परंतु हे मत खोटे आहे; कारण ईश्वराने सर्व मनुष्ये सारखी निर्माण केली आहेत. तेव्हा ईश्वरकृपेने किंवा काळगतीने जे थोरपणास चढतील, त्यांनी आपल्याहुन जे नीच त्यांस सन्मार्गास लावण्याचा प्रयत्न करावा, हीच सद्धर्म आहे, परंतु ब्राह्मणांचे समजुतीस हे विरुद्ध आहे. जर ब्राह्मणांनी कैकाडी, कामाठी, रामोशी इत्यादी लोक पाहिले, तर त्यांचा द्वेष करतात. हलालखोर पाहिला तर त्याची निंदा करतात; परंतु त्यांस असे वाटत नाही की, प्रत्येक माणूस आपला आपणच हलालखोर आहे की नाही? जेव्हा जे काम जो मनुष्य आपले आपण करतो, तेच जो मनुष्य फार वेळ करतो, तर तेवढ्यातच तो त्यापेक्षा नीच कसा? वास्तविक विचार पाहिला तर हे अभिमान आहेत इतकेच. वास्तविक पाहिले तर कैकाडी लोक हे सुधारल्याच्या अंगी ब्राह्मणांसारखे शहाणे होतील, हे खचित आहे. परंतु त्यांस नीच मानून अगदी टाकावे, त्यांची दया करू नये, हे योग्य नाही. त्यांस मनुष्य समजून, ब्राह्मण आंधळा अथवा नीच जातीचा आंधळा असला, तरी धर्मास सारखाच आहे.
 ब्राह्मण विद्येने थोर तर त्याप्रमाणे जे ब्राह्मण वेद अर्थसहित पढतील, त्याचा मान करणे योग्य आहे; परंतु हे आतासारखे 'पोपटभट' कैकाड्यासारखेच ज्ञानशून्य आहेत. यांत काही संशय नाही. इंग्रज लोकांनी हिंदू लोकांस स्थितीवर आणण्याचा बहुत यत्न चालविला आहे व देशांत स्वस्थता केली. चोर, लुटारू नाहीसे केले. हे त्यांचे मोठे उपकार आहेत. किती काळ जरी ब्राह्मणी राज्य चालते, तरी सतीबंदी होती ना, पेंढार मोडते ना व बालहत्या बुडती ना. पहा बरे, पोरे बेलाशक मारीत होते. कोणी नवसाची पोरे टाकीत होते. कोणी मारून टाकीत होते. या प्रकारच्या चाली होत्या, कोणी स्त्रियांस जाळून टाकीत. कोणी जिवंत पुरीत, कोणी गळ्यात दगड बांधून बुडवीत. हे सर्व मूर्खपण कधी तरी हिदु लोकांच्याने बंद करवले असते काय? नाही.
 अद्यापि पुनर्विवाहाविषयी किती एक प्रयत्न करतात; परंतु पहा, कोणी त्याच स्वीकार करीत नाही. जो तो भितो. ज्यांच्या पोरी बुडतात त्यांचे जिवास खाते; परंतु धैर्याने ही चाल बुडवून टाकण्यास कोणी उभे रहात नाहीत. तर पोरे मारल्याप्रमाणेच हे नव्हे काय? रानात पोर सोडल्याप्रमाणे पोरी सोडतात. त्यांस कोणी त्राता नाही. हे जर सरकार मनावर घेईल तरच सिद्धीस जाईल, नाही तर काही उपाय दिसत नाही. किंवा हिंदू लोक तरी काळेकरून शहाणे होतील तेव्हा होईल. अशा वगैरे बहुत कामांस इंग्रजांचे राज्य हितावह आहे.

♦ ♦


लाचेचा गुन्हा

पत्र नंबर ४०: २४ डिसेंबर १८४८

 धर्मशास्त्रांत लाचेचा गुन्हा नाही. लोभिष्टपणा नसावा असे आहे; परंतु ही गोष्ट लाचेच्या गुन्हाविषयी नाही. या वचनाचे लाचेवर ओढून चंद्रबळ आणिले तर न कळे.
 पेशवाईत रामशास्त्री न्यायाधीश होते व ते धर्मशास्त्राप्रमाणे चालत होते. त्यांचा आचार असा होता की, सरकारचे वेतन देखील घ्यावयाचे नाही. कोणाचा विडा किंवा पाणीदेखील प्यावयाचे नाही व धन संपादन मुळीच करावयाचे नाही. हा शास्त्राचा प्रतिबंध खरा; परंतु सामान्यतः लोभ घराण्याविषयी मात्र जहाले; तथापि न्यायकर्त्यांने आपले नेमले वेतन घ्यावे. त्यात द्रव्य जमले तरी जमवावे आणि जे आपलेकडे न्याय करण्यास येतात, त्याजपासून त्याचे कार्य जाहले या कारणाने सत्पक्षाचे अथवा असत्पक्षाचे धन किंवा काही मोलवान वस्तु घेऊ नये; घेतली असता त्या कर्माचे नाव अमुक व त्यांस शासन अमुक, असा निषेध शास्त्रात कोठे स्पष्ट नाही. केवळ लोभनिषेधावरून ही गोष्ट स्पष्ट होत नाही. मला तर स्पष्ट वचन कोठे आढळले नाही. इंग्रजी भाषेत "ब्रैब," फारशी भाषेत "रिश्वत" त्या अनुरोधाने लोभार्थी शब्द मूळचा हिंदुस्थानी असून, हल्ली महाराष्ट्रभाषेत 'लाच' हा योजिला आहे. या दोघांचा अन्वर्थक शब्द संस्कृत भाषेत नाही. मला वाटते की, लाचेचा गुन्हा आणि त्यांस शासन हा प्रकार प्रथमच या देशात इंग्रजांनी चालू केला. याचे पूर्वी कधी प्रसिद्ध नव्हता.
 यास्तव कवीने म्हटले आहे की,

रिक्तहस्तं न गन्तव्यं राजानं देवतां गुरुम् ।

 याजवरून लोकांमध्ये काय अभिप्राय आहे, हे समजते. लोभाचा निषेध बहुत ठिकाणी सापडेल; पण लाचेचा सापडणार नाही. जर कोणी दुसऱ्याचा न्याय वास्तविक करील आणि वास्तविक पक्षकाराने स्वइच्छेने काही न्यायकर्त्यास दिले तर ते घ्यावे किंवा नाही, याचे उत्तर शास्त्रात कोठे नाही. लोभाच्या वचनावरून इतकेच होते की, न्यायकर्त्याजवळ काही असू नये. त्याने निर्वाहापुरते घ्यावे. स्वतंत्र असावे. त्यांचा संसार फकिराप्रमाणे असावा, असा शास्त्राचा हेतू दिसतो.
 ब्राह्मणांनी न्याय करीत जावा, असे शास्त्रमत आहे आणि ब्राह्मणाजवळ द्रव्य कोणतेही प्रकारे राहू नये, त्यांनी द्रव्याचा धिक्कार करावा आणि भिक्षा मागून रहावे, हे धर्मशास्त्रात पुष्कळ सापडतील. जर ब्राह्मणाने काही दान घेतले तर त्याने अमुक प्रायश्चित्त करावे असे आहे व श्राद्धास बसला, तर अमुक प्रायश्चित्त करावे असे आहे, याचे कारण दानाने व श्राद्धाने दक्षिणेने जे त्यांस प्राप्त जहाले, ते पंधरा दिवस घरी बसवून किंवा त्यांस काही दुसरा खर्च घालून ते सरवावयाचे आणि ब्राह्मणास पुन्हा कफल्लक करून ठेवावयाचे, हा हेतू शास्त्राचा आहे. एकास दान केले असता पुण्य व दुसऱ्यास दान घेतले असता पाप, असे शास्त्र सांगते. याचा हेतू दुसरा काही दिसत नाही.
 धर्मशास्त्रांत न्याय करण्याचे मार्ग पुष्कळ आहेत आणि त्यातील नेम किती एक चांगले आहेत खरे; परंतु त्यातील किती एक धर्म आहेत, ते पाच हजार, दहा हजार वर्षांमागील लोक जे होते त्यांसच योग्य. सांप्रत काळी ते विलक्षण दिसतात. हिंदू लोकांची समजूत मुसलमानांचे समजुतीसारखी आहे की, धर्मशास्त्रात जे काही ज्ञान आहे, ते संपूर्ण आहे. मुसलमान लोक म्हणतात की, सर्व शास्त्राचे आणि विद्येचे मूळ किमयासुद्धा कुराणात आहे; परंतु हे म्हणणे अविचाराचे आहे, मागील प्राचीन काळचे पदार्थाची स्तुती करण्याची चाल पडून गेली आहे, ती चूक आहे. सांप्रत काळी राज्याच्या रीती लोकसत्तात्मक इत्यादीक ज्या निघाल्या आहेत, त्या धर्मशास्त्रांत सापडणार नाहीत. धर्मशास्त्राप्रमाणे राजा स्वच्छंदी आहे. तो म्हणेल ती पूर्व दिशा व करील तो विधी; परंतु हे सांप्रत काळी चालणार नाही व त्याचा काही उपयोग नाही. हल्ली स्वतंत्र राजे असल्यामुळे जागोजाग, देशोदेशी अनर्थ जहाले आहेत, ते मनात आणावे.
 आजच्या काळी यथास्थित उत्तम राज्य अमेरिकेतील युनायटेड स्टेट येथे आहे. त्याचेखाली विलायतेतील मिश्र राज्य व त्याचे खाली इतर राज्ये, एशिया खंडातील राज्ये तर फारच दुष्ट. तेथे लोकांस पीडा फार. यास्तव राज्यात सुख होण्याकरिता लोकसत्तात्मक राज्य जरूर असले पाहिजे. ज्या देशात कायदे होतात, त्या देशातील लोकांची संमती त्यांस असावी आणि कायद्याप्रमाणे राज्य चालवण्यास लाचाचा बंदोबस्त मुख्यत्वेकरून जहाला पाहिजे. पूर्वीप्रमाणे आता धर्मशास्त्र चालवू म्हटले, तर चालणार नाही. ही गोष्ट अशक्य आहे. आता ब्राह्मण राज्यकारभारात, शिपाईपणात व व्यापारात पडून सर्व धंदे करतात. इतक्यात भिकारी करून कंदमुळे खावयास लावून तपश्चर्या करविणे, ही गोष्ट कोणी बरी असे म्हणणार नाही.
 तेव्हा आता लोक आहेत त्याचा प्रतिबंध सांप्रत काळी कसा करावा, हा विचार केला पाहिजे. यास्तव पूर्वीचे ब्राह्मण कसेही असोत, तसे आता होऊ शकत नाही. आणि पूर्वीप्रमाणे करण्याविषयी जे आग्रह धरतील ते मूर्ख आहेत. ते वृद्धास तरुण करण्यास इच्छितात. ते कालमान पहात नाहीत. जे कालमान पाहतात आणि त्याप्रमाणे वर्तणूक करतात. तेच उत्तम शहाणे. म्हातारे लोक म्हणतात की इंग्रज लोकांच्या विद्या पुष्कळ आहेत; पण आम्हांस त्याचे काय करावयाचे आहे? आमचा आजपर्यंत काळ गेला की नाही? मागले पुरुष शहाणे होते की नाही? परंतु हे म्हणणे केवळ अज्ञानाचे. मागले काही पुरुष मागले काळीचे अज्ञानी लोकांत शहाणे होते, म्हणून ते आता शहाणे आहेत असे नाही. परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय केली; पण भीष्म असताना काही झाले नाही, तसे, जोपर्यंत इंग्रजांसारखे शहाणे लोक इकडे येत नव्हते, त्याच काळी हे लोक शहाणे, बुद्धिवान व विद्वान होते; कारण वरिष्ठांचा अभाव होता.
 परंतु आता नवीन युद्धादिकांच्या युक्ती इंग्रजांनी आणल्या आहेत. त्यापुढे कोणताही हिंदू राजा जय पावला नाही; कारण शहाण्यापाशी वेडा टिकत नाही. हे केवळ प्रारब्ध नाही, पण शहाणपणच आहे, परंतु अज्ञानाने आपले लोक आपला पूर्वीचा थोरपणा राखण्याकरिता इंग्रज शहाणे व त्यामध्ये विद्या विशेष हे कबूल करीत नाहीत. असो.
 तात्पर्य, लाचेचा गुन्हा शास्त्रात कोठे नाही आणि याविषयी कोणी जाणता मनुष्य प्रमाण दाखवील, तर आम्ही स्वीकारावयास आळस करणार नाही.

♦ ♦


नाना फडणिसाचे शहाणपण

पत्र नंबर ४१: ३१ डिसेंबर १८४८

 सांप्रत मराठे लोकांत अशी म्हण आहे की, नाना फडणिसासारखा कोणी शहाणा नाही. परंतु मला वाटते की, आता इंग्रजांमध्ये सहस्रशः नानापेक्षा शहाणे आहेत. नाना फडणिसाचे शहाणपण वर्णन करण्याजोगे सर्वोत्कृष्ट नव्हते. त्या लोकांमध्ये त्याची कीर्ती होण्याचे कारण इतकेच की, मूर्खाचे सभेत थोडासा कोणी शहाणा असला, म्हणजे त्याची ख्याती होते. आणि गांवढा जोशी गावढ्यांत पंडित असतो; कारण की, त्या गावचे लोक जितके ज्ञानी असतात. त्याहून त्यांस विद्वानपणा अधिक असतो.
 वास्तविक पाहिले तर नाना फडणीस काही विद्वान नव्हता व त्यांस दूरदृष्टी नव्हती. जन्मापासून त्याने कारभार केला, याजमुळे त्याची बुद्धी बरीच होती व मराठे दरबारचा बंदोबस्त त्याला चांगला करता येत होता; परंतु मेंढक्या मेंढ्या वळता आल्या, म्हणून तो काही घोडेस्वार होत नाही. इंग्रज लोकांतील कारभारी यांची बुद्धी विशाल, मसलत खोल, अनेक देशीचे वृत्तान्त त्यांस माहीत व त्यांचे आपसात एकमत असे. नाना फडणिसाचे ठायी हे नव्हते. तो जुन्या चालीचा ब्राह्मण; त्याची माहिती कमी व आपसांत दुष्टपणा फार होता.
 पहा बरे, नाना फडणिसाचे हाती सर्व राज्यकारभार होता; परंतु त्याने काही राज्यात अधिकाऱ्यांची रचना व पदव्या हे ठरविले नाही. इंग्रजीत एक मेला, म्हणजे दुसरा तयार असतो. हा क्रम मराठी राज्यात नव्हता. कायदे काही नव्हते. बरे, त्याचे समीप इंग्रज होते, त्यांचा शोध तरी त्याने काही. करावा. तेही काही नाही. इंग्रजांनी मात्र सर्व लोकांच्या डोक्यावरचे केस मोजून ठेवले; परंतु मराठे लोकांस इंग्रजांविषयी काही माहीत नाही. त्यांचा देश व नावगाव काही एक ठाऊक नाही. नानाचे वेळचे पत्रात कोठे इंग्रजांस जलचर, कोठे कलकत्तेकर असे म्हटले आहे. याजवरून त्यांचे ज्ञान समजते. टिपूशी लढाई केली, तेव्हा लॉर्ड कॉर्नवालीस तेथे गेले होते. व त्याजबरोबर परशुरामभाऊ वगैरे सरदार पेशव्यांकडून गेले होते. परंतु त्याजपैकी एक जणासही ते कोण होते, हे ठाऊक नाही. व कोठून आले, हे माहीत नव्हते. इंग्रजांचा वकील पुण्यात होता. त्याची मात्र त्यांस ओळख होती, परंतु त्याचा शेंडाबुंधा किंवा हिंदुस्थानात इंग्रज कोठे कोठे आहेत व फरांशीस कोठे आहेत व फिरंगी कोठे आहेत, याचा काही शोध लागत नाही.
 नाना फडणिसाची बातमी फार होती, असे म्हणतात; परंतु ती बातमी फुसक्या गोष्टींची होती. शिखाचे व नेपाळ वगैरे संस्थान दूरवर होते; त्याचा त्यांस ठिकाण नव्हता. व राज्यात टपाल वगैरे नव्हते. नानाची बातमी इतकीच होती की, आपले ओळखीचे लोकांतील कोण कोठे गेला, कोण काय जेवला, ही मात्र बातमी तो चित्त देऊन काढीत असे. एवढ्यावरून मूर्ख लोकांस असे वाटते की, आम्ही काल अमुक करीत होतो, ते नानास ठाऊक कसे झाले? परंतु या बातमीचा उपयोग काय? बातमी म्हणजे संपूर्ण जगात कोणती राष्ट्र आहेत, कोणते मुलूख मोठे आहेत, हे समजावे. तळेगावास इंग्रज आले होते. तेव्हा मराठे लोकांनी एकावर हजार जाऊन त्यांचा पराभव केला. या गोष्टीचे मराठे लोक मोठे वर्णन करतात; परंतु असली गोष्ट काही मोठी नव्हे. व त्यात काही शहाणपण नाही. घोडे मनुष्यास मारील यात काय आश्चर्य आहे? परंतु त्यामुळे घोडा शहाणा व मनुष्य वेडा, असे म्हणू नये. ती गोष्ट एखादे वेळेस झाली, म्हणून वारंवार होणार नाही. नेहमी मनुष्य घोड्यावर बसतात; तद्वत् इंग्रजांचा पराभव मराठे लोकांनी केला; पण त्याजमुळे इंग्रज नाहीसे झाले नाहीत. आणि इंग्रज लोक शहाणे, ते इकडे आल्यावर त्यांनी त्या लोकांच्या सर्व माहितगाऱ्या काढल्या आणि मग त्यांस जिंकण्यास उशीर लागला नाही. अशी मराठ्यांनी इंग्रजांची माहितगारी का काढली नाही?
 नाना फडणिसास ही गोष्ट करण्यास अनुकूल होते. परंतु त्यांस हे काही ठाऊकच नाही. त्याच्या समजुती अशा होत्या की, पृथ्वी काय ती एवढीच; व सर्व जग इतकेच आहे. याशिवाय कोठे काही नाही, इंग्रज हे कोणत्या बेटातून आले आणि प्रथम दहा वीस जण, नंतर शे-दोनशे असे इतके दूर येऊन एवढे राज्य जमविले. ही कृती विश्वकर्म्यासारखी नव्हे काय? परभाषा, परमुलूख, परजात, परधर्म, तत्रापि वरिष्ठता पावले, हे केवढे शहाणपण बरे? इंग्रज कोण हे वर्तमान ठाऊक नाही, हा केवढा मूर्खपणा आहे? आपले लोक पेशवाईत मूर्ख होते यात संशय नाही. त्यांस काहीच कळत नव्हते. बरे, आणखी नाना फडणीस यांस काही आपले देशाचा अभिमान नव्हता व शौर्यही नव्हते. तो स्वभावाने कुत्सित होता व हलके मनचा होता. सर्व देशाचे कल्याण करण्याचे त्याचे मनात क्षणभर देखील येत नव्हते. परंतु त्याची आतून बहुत सरदारांशी वाकडी मात्र होती.
 त्याने सर्वांस एक कायदा लावून देऊन सर्वांस एकत्र जमविण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. आपले घरापर्यंत व आपले राज्यापर्यंत मात्र नजर ठेविली. लोकांच्या सुधारणेचा प्रयत्न केला नाही. श्रीकाशीक्षेत्रास जाणे तरी बरोबर दोनशे लोक लागत. तेव्हा मनुष्ये माघारी येत होती. नाही तर भिल्ल, रामोशी, पेंढारी वगैरे चोरटे लोक लुटीत होते. त्यांचा बंदोबस्त त्याच्याने झाला नाही. काशीही आपलेकडे इंग्रजांकडून घेवविली नाही. व त्यांस आपले राज्याबाहेर कोण अंमल करितो, याची खबर बिलकुल नव्हती. या लोकांचे कोणतेही कल्याण त्याचे हातून झाले नाही. मग त्यांस कोणत्या प्रकाराने लोक शहाणा म्हणतात, हे काही कळत नाही.
 नीति, सुधारणा किंवा विद्येची वृद्धी त्याने केली नाही. व कलाकौशल्येही वाढविली नाहीत. नशिबाने राज्य चालले, नाही तर असे लोकांचे हातात राज्य क्षणभरदेखील असू नये. परंतु काळाच्या योगाने इंग्रज त्या वेळेस इकडे फारसे आले नाहीत. याजमुळे हे राज्य चालले; नाही तर असे लुटारू, अडाणी लोकांचे बेकायदा राज्य निभू नये, परंतु ईश्वरसत्तेने ते झाले.
 तात्पर्य, नाना फडणिसाविषयी जो अभिप्राय लोकांचा आहे, तो खोटा आहे. आता जर नाना फडणीस असता, तर त्याजला लोक वेडा म्हणू लागते. आणि तो पळूनही जाता, यात संशय नाही.

♦ ♦


हिंदुस्थानच्या पराधीनतेची कारणे


पत्र नंबर ४५: २८ जानेवारी १८४९

 इंग्रज लोकांनी हिंदुस्थानचे राज्य घेतले, या गोष्टीविषयी लोकांस भृगूळ वाटते आणि ब्राह्मण लोक म्हणतात की, त्यांची सद्दी आहे. ब्राह्मणाहून कुळंबी वगैरे लोक यांस तर राज्य कोण करितो, याची खबरच नाही. याविषयी लोकांस काही वर्तमान कळले असता फार उपयोग जाणून मी संक्षेपेकरून लिहितो.
 प्रथम मला हिंदुस्थानचे लोकांचे स्थितीचे वर्णन केले पाहिजे, म्हणजे त्याजवरून इंग्रज लोकांचे इकडे पाय रोवले कसे, याची कारणे स्पष्ट होतील. मला वाटते की, हिंदू लोकांचे माहात्म्य सृष्टी उत्पन्न जहाल्यापासून काय असेल ते असो; परंतु पांडवांचे वेळेस हिंदू लोक मोठे ऐश्वर्यास आले आणि विद्या वगैरे त्यांनी फार चित्त लावून शोधून काढिल्या. मोठेमोठे विद्वान व बुद्धिमान म्हणजे व्यास, वाल्मीक हे कवी, नारदासारिखे गायनशास्त्री, कपिलासारिखे शास्त्रज्ञ, अर्जुनासारिखे युद्धकर्ते, धर्मासारिखे सत्यवक्ते इत्यादी प्रकारचे उत्तम लोक त्या काळी होऊन गेले आणि असे विद्वान विचारशील लोक ज्या देशांत असतील, त्या देशांत काही न्यून पडेल हेही अशक्य आहे. परंतु त्या समयी संपूर्ण जगात ऐश्वर्यवान प्रदेश एवढाच होता. याजमुळे हिंदू लोकांनी आपले देशाचे व आपले भाषेचे व आपले विद्येचे पराकाष्ठेचे वर्णन केले आणि हे काही आश्चर्य नाही. सांप्रत इंग्रज लोक तसे करतात.
 परंतु हिंदू लोकांनी पृथ्वीचे स्वरूप त्या काळी कसे आहे व देश कोणते कोठे आहेत, येविषयी विशेष शोध केला नाही आणि करण्याचे कारणही नव्हते, कारण हे लोक स्वस्थ बसून आपले देशात जे निष्पन्न होईल, ते खाऊन स्वराज्य यथास्थित करीत होते. लोकही चांगले व राजेही चांगले होते, प्रजेस पीडा वगैरे काही होत नव्हती. तेव्हा परदेशात जाणे किंवा व्यापार करणे, समुद्रातून नौकारूढ होणे हे विषय पहाण्याचा प्रसंग त्यांस नव्हता. येणेकरून ते लोक जसे आईबापांचे द्रव्य पुष्कळ असते आणि घरात मुलगा ते खाऊन वाढतो, त्यांस दरवाज्याबाहेर काय आहे, हे ठाऊक नसते तसे ते लोक अभोवाळ वाढले. नंतर काळेकरून त्यांनी विद्या जास्त वाढविण्याची सोडून दिली; कारण की त्यांस आपले महत्त्वाचा आणि सुखाचा अनुभव फार आला.
 तेव्हा पांडवांपासून अलीकडे दोन हजार वर्षे सुमारे तरी त्यांनी विद्येवर चित्त बरेच ठेविले होते, असे त्या वेळेस ज्योतिषशास्त्रावर व लीलावती वगैरे ग्रंथ जहाले त्यांजवरून दिसते व काही पुराणे व माहात्म्येही पुढे लिहिली गेली आहेत. पुढे काळेकरून संस्कृत भाषा सुटोन प्राकृत भाषा जाहल्या. तेव्हा असा भ्रम पडला की, प्राकृत भाषण बोलावे आणि ज्यास विद्या पाहिजे, त्याने संस्कृत पढून विद्या शिकाव्या; कारण की, प्राकृत भाषेत ग्रंथ नाहीत, हे एक कारण.
 दुसरे असे की, जो जो प्राकृत भाषा वाढत गेली, तो तो संस्कृताचा अंधार जहाला. विद्या जास्ती वाढविणे राहिले आणि लोकांची अशी समजूत पडली की, ज्यांनी संस्कृतात ग्रंथ लिहिले ते देव होते आणि तसे ग्रंथ लिहिणे हे काही मनुष्याचे काम नव्हे, हे दुसरे कारण. तिसरे कारण असे आहे की, त्यांस असे भय राहिले नाहीच की, मूर्खपणामुळे नीचत्व येईल, त्यांस असे वाटू लागले की, माझा जन्म ब्राह्मण कुळात आहे, मग ती विद्या शिकलो काय, नाही काय? एकच आहे. माझा ब्राह्मणपणा कोणी नेत नाही. मला इतर लोक कुळामुळे पूज्य म्हणतील आणि माझे पायाचे तीर्थ घेतील, यात संशय नाही.
 चवथे कारण असे दिसते की, देशात राहणे वगैरे जे प्रतिबंध पूर्वीचे शास्त्रकारांनी केले; त्याचे हेतू न जाणून त्यांस धर्म म्हणू लागले, पाचवे कारण असे दिसते की, कलियुग निघाले आहे, याजमुळे लोकांचा नाश व दुर्गुणप्रवृत्ती व्हावी हा ईश्वरसंकेत आहे, असे भय शास्त्रकाराने लिहिले आहे. तरी त्याचा हेतू न जाणून लोक ते यथातथ्य मानू लागले. सहावे, प्रारब्धवाद म्हणून जे घडते ते पूर्वीच ईश्वर लिहितो, ते कोणत्याही उद्योगाने फिरावयाचे नाही. सातवे, पूर्वीचे लोक ऋषी व देव होते, मनुष्य नव्हेत. यास्तव जे वडील करीत आले, तेच करावयाचे, नवीन मार्ग काढावयाचा नाही. आठवे कारण ज्या ज्या गोष्टी, चालीरीती लोकांमध्ये आहेत, त्या सर्व धर्मच. व्यवहार धर्म; ईश्वरभक्तीही धर्म, पागोटे, धोतर, अंगरखा घालावा, हे सर्व धर्मामध्ये मोडू लागले. ही समजूत विलक्षण लोकांची पडली.
 या आठ कारणांचे नाव मी 'हिंदुनाशाष्टक' ठेविले आहे. या कारणांनी लोकांनी विद्या वगैरे सर्व सोडून देऊन स्वस्थ घरात बसले आणि परकी लोक त्या काळी अगदी मूर्ख अवस्थेत होते, याजमुळे त्यांचा शोध किंवा वार्ता यांनी काही काढली नाही. आणि त्या सर्वांस एक म्लेंच्छ म्हणून नाव देऊन टाकले. याप्रमाणे या देशात वर्तणूक जहाली. हिंदू लोकांत काही किंचित जागृती व्यासापर्यंत होतीच त्यापुढे जी दृढ झोप लागली, ती आजपर्यंत तशी आहे, ती अशी की, या लोकांमध्ये एकचित्त नाही. आपले देशात कोण राज्य करतो, याची खबर नाही. जो कोणी राज्य करील तो विष्णूचा अवतार, ही एक मूर्खपणाची समजूत पडली. पिठोरा राजा हस्तिनापुरी क्षत्रियवंशी शेवटचा जहाला. त्यांस मुसलमानांनी मारून राज्य घेतले, त्यांस आठशे वर्षे जहाली; परंतु त्या गोष्टींचे वाईट कोणास वाटले नाही. शास्त्री, पंडित, भट हे मुसलमानाचेच आर्जवे करून पोट भरू लागले. ब्राह्मण कारकूनपणा, शिलेदारी, सरदारी स्वीकारून चाकऱ्या करू लागले. तेव्हा विद्येचा अंधकार फार माजला.
 कारण की, ब्राह्मणांनी युक्तीने आपले स्वाधीन विद्या ठेविली व इतरांस शिकवू नये, असा धर्म लावून दिला. आणि आपण शूद्राचे कर्म अंगीकारिले. तेव्हा मग विद्या कशाने राहील? विद्येबरोबर सर्व ऐश्वर्य गेले व शूरत्व गेले. देशाभिमान नाहीसा जहाला. जशी पुष्ठ बकरी व्याघ्रास सापडतात, तसे हे लोक मुसलमानास सापडले. पूर्व काळी यवनादीक मुसलमान म्हणजे यवन इकडे आले, असे ग्रंथांतरी आहे; परंतु ते इकडे राहिले नाहीत, हा त्यांचा मूर्खपणा होय. अलीकडे यवन लोक पहिल्या मूर्खपणातून निघाले आणि हुशार जहाले. त्यांनी आता केवळ स्वारी करून परत जावे, तसे केले नाही व हस्तिनापूरच सिंहासनारूढ होऊन बसले.
 परंतु ब्राह्मण लोक हे आपले घरी आले म्हणजे सोवळे करतात व यवनाचा विटाळ जहाला म्हणून म्हणतात. तथापि त्यांस राज्य करावयास त्यांनी हरकत केली नाही व किती एक लोक मुसलमानांवर इतके फिदा जहाले की, राज्य करणे व शूरत्व करणे हे काम मुसलमानांचे होय, इतरांस यावयाचे नाही, असे म्हणू लागले; परंतु त्या मूर्खांस असे समजत नाही की, आठशे वर्षांपूर्वी हिंदू राजे जहालेले पांडव, राम, परशुराम हे मुसलमान होत की काय? आणि त्या मूर्खपणाचे बीज मनात ठेवून त्याच स्थितीत हिंदू लोक राहिले. त्यांस परदेशाची किंवा स्वदेशाची लांबीरुंदीदेखील ठाऊक नाही. हिंदुस्थानचे लोकांस दक्षण ठाऊक नाही. दक्षणेत 'नेपाळ' ठाऊक नाही. कोणी म्हणतात ती पुण्यभूमी, कोणी म्हणतात ती राक्षसभूमी व त्या गोष्टीस शास्त्री मान डोलवितात. त्यांचा मूर्खपणा किती आहे? त्यांस असे काही वाटत नाही की, आपले देशात हे यवन लोक आले ते कोठले, यांस इकडे वस्ती करू द्यावी कशाकरिता व यांस हाकून देण्यास आम्हास काही शक्ती नाही की काय?
 सर्व हिंदू लोक निर्बळ व अपौरुष आहेत की काय? परंतु ही गोष्ट विसरले आणि सोवळे घरात आले. देश सोवळा राखावयाचा विसरले व जो तो आपला स्वार्थ पाहू लागला. अशा अवस्थेत असता मुसलमानी राज्य घेतले. ते राज्य मुसलमान लोकांचे मूर्खपणाने बुडवावयाची संधी आली. तो इंग्रजाचा प्रवेश जहाला. त्यांनी तर हेच लोक चाकरीस ठेवून याच लोकांच्या तोंडात मारल्या; परंतु हिंदू लोकांचा असा मूर्खपणा आहे की, इंग्रज आले कधी, कोठले, कोण हे त्यांस अद्याप माहीत नाही. पेशव्यांचे वेळेस कोणते राजाने याचा विचार केला नाही. आता मात्र दक्षिणेत इंग्रज ठाऊक जहाले. तसेच आता कोणत्याही हिंदू लोकांच्या संस्थानात जाऊन पहावे तरी हीच वृत्ती लोकांची आढळते. भट जेवणापुरती काळजी करतात, आणि सरदार गृहस्थ पैका मिळविण्यापुरती काळजी करतात आणि स्वस्थ बसतात. मग असे होईल हे काय आश्चर्य आहे?

♦ ♦


इंग्लिश राज्याची आवश्यकता

पत्र नंबर ४६: ४ फेब्रुवारी १८४९

 मागील पत्राचा विषय आणखी लिहिण्याचा आहे तो असा की, इंग्रज लोक यांनी इकडे राज्य संपादन केले, याचे कारण काय? याचा विचार करता दिसते की, हिंदू लोकांमध्ये मूर्खपणा वाढला, तो दूर होण्याकरिताच हे गुरू दूर देशातून इकडे ईश्वराने पाठविले आहेत. पहा, हिंदू लोकांस हा मोठा लाभ आहे की, इंग्रज लोकांच्या राज्यामुळे हिंदू लोकांस जागृती जहाली व पृथ्वीवर काय काय आहे, हे कळू लागले. ज्यास कोकणापासून पुण्यापर्यंत प्रदेश ठाऊक, त्यांस पूर्वीचे लोक मोठा माहितगार असे म्हणत; पण आता बहुतांस इंग्रजाचा देश इंग्लंड व अमेरिका माहीत झाली. हे सर्व इंग्रजांमुळे झाले. ईश्वराने ही शहाणपणानेच योजना केली आहे. लोकांची झोप जाण्यास दुसरा इलाज नव्हता. सती जाणे, जलसमाधी घेणे, पोरे मारणे, प्रयागास करवत घेणे, जगन्नाथास रथ उरावर घेणे व हिमालयात स्वर्गास जाणे इत्यादी अघोरी व लज्जास्पद चालींमुळे ईश्वराचा क्षोभ अत्यंत जहाला. तेव्हा दुष्ट लोकांस ताळ्यावर आणण्यास ईश्वराने इंग्रज सरकारची योजना केली.
 परंतु त्यांनी न्यायाने राज्य मिळविले किंवा कसे, याविषयी कोणास अंदेशा वाटेल, म्हणून त्यांचे इकडे राज्य स्थापन जहाले, त्याचा इतिहास पाहिला, त्याजवरून माझे असे मत झाले आहे की इंग्रजांनी यथान्याय वर्तणुकीने राज्य घेतले आणि ईश्वराने त्यांस हे राज्य अशा प्रकाराने दिले की, त्यांस कोणी दोष ठेवणार नाही. पहा, प्रथम हिंदुस्थानात मुसलमान लोकांचा अंमल होता व त्यांनी संपूर्ण देश व्याप्त केला होता. त्यांचे राज्य मोडावयाचे संधीस इंग्रज येथे आले; तेव्हा जागोजागचे नबाब व नियम वगैरे हे आपले यजमानास सोडून आपले ठिकाणी अंमल हाती लागेल, तितका बळकावून बसले होते. तेव्हा इंग्रजांस ठीक संधी सापडली. आणि ते प्रथम इकडे आले, तेव्हा त्यांनी दुकानास जागा घेतली, ती मुसलमानांचे परवानगीवरून सुरतेस व कलकत्त्यास घेतली. पुढे तेथे ते व्यापार करून स्वस्थ होते; परंतु त्यांस हे लोक चैन पडू देईनात. इंग्रज लोकांचा मूळचा असा संकेत होता की, इकडे राज्य घेऊ नये, फक्त व्यापार मात्र करावा.
 परंतु हे लोक त्यांस राहू देईनात. कधी त्यांची दुकाने लुटीत, कधी खंडणी मागत. तेव्हा ते तह करू लागले; तरी ते तह सोडून वर्तणूक करू लागले. इकडील देशचे लोकांत वचनाचा प्रामाणिकपणा, खरेपणा, शूरत्व कमी आणि द्रव्याचा लोभ फार. याजमुळे दौलत वाढवावी हा हेतू फार; परंतु कशी वाढवावी ते व न्यायमनसुबीचा बंदोबस्त ठेवून धारा कमी करून प्रजा सुखी ठेवण्याचे ज्ञान नाही. सन १७५७ साली १३० गोरे लोकांस कलकत्त्याचे नबाबाने खोलीत कोंडल्यामुळे ते ठार झाले; तेव्हा इंग्रज लोकांस लढाई करणे प्राप्त जहाली आणि त्यांस जयही मिळाला. तेव्हा आपल्या ठिकाणाचे रक्षण करण्याकरिता सभोवताल मुलुख आपलेकडे घ्यावा लागला. एक वेळ मनुष्याचे तोंड दुधाने भाजले म्हणजे ताक फुंकतात, तद्वत् इंग्रज लोकांनी इकडील लोकांचा भरवसा सोडून दिला; कारण त्यांचे त्यांस काहीच प्रमाण वाटेना आणि दहावीस कोसपर्यंत त्यांस हद्द करून दिली की, इतक्या आत तुम्ही येऊ नका. तत्रापि तोही करार मोडला. तेव्हा मुलूख हस्तगत करून राज्य घ्यावे लागले.
 याप्रमाणेच दक्षिणेची अवस्था झाली. बाजीराव स. १८०२त पळून जाऊन आपले बापाचे स्नेही इंग्रज यांचे पाठीस पडला आणि त्यांची प्रार्थना केली की, होळकराने माझे शहर लुटिले व शिंदे, होळकर, भोसले माझ्याशी वितुष्ट करतात. तेव्हा पुन्हा गादीवर माझे स्थापन करणार समर्थ तुम्ही आहा. तेव्हा तह जहाला व मुलूख देण्याचा वगैरे करार जाहला. नंतर इंग्रजांनी त्यांस मदत करून गादीवर बसविले; परंतु कराराप्रमाणे त्यांस मुलूख देईनात, तरी त्यांनी युद्धास प्रारंभ केला नाही. पुढे १८१७ त विश्वासघात करून बाजीरावाने लढाई आरंभली, तेव्हा तो शासनपात्र जहाला; आणि पेशवे यांचा अंमलही वाजवी नव्हता. त्यांनी सातारचे राजापासून बळकावलेला अधिकार होता व बाजीरावाचे कर्म चांगले नव्हते. भट व भटवे मात्र त्याची स्तुती करीत. दुसरे सर्व त्यांस कंटाळून राहिले होते. इंग्रजांस सर्व वश होते. तेव्हा इंग्रजांनी मुलूक घेतला.
 असे रीतीने त्यांस मुलूख प्राप्त जाहला. तो त्यांनी घ्यावा किंवा न घ्यावा, असे कोणी विचारील तर त्याचे उत्तर असे आहे की, अलपिष्टन साहेब (मौंट स्टुअर्ट एलफिन्स्टन) यांस जे मानपत्र राजे वगैरेनी दिलेले, त्यात स्पष्ट लिहिले आहे की, तुम्ही राज्य घेतले, हे बरे जहाले. राज्यातील लोक मूर्ख त्यांस शहाणे करणे जरूर आहे. अशा लोकांस सोडून देणे व पुन्हा बाजीरावासारख्या मूर्खाचे हाती देणे, हे काम वाईट व अधर्म आहे. असे आंधळ्याला रस्त्यात पावसात सोडावे, तद्वत् होते. यास्तव इंग्रजांनी दक्षण घेतली हे वाजवी व न्यायाप्रमाणे आहे. जर त्यांनी हा मुलूख लोक शहाणे होत तोपर्यंत सोडला. तर ते गुन्हेगार होतील. परंतु त्यांनी इकडील लोकांस त्वरित शहाणे करून, जसे मुलास वाढवावे व वाढले म्हणजे सोडावे, तद्वत् करणे योग्य आहे.
 इंग्रज सरकारचा या देशात मोठा धर्म हाच आहे की, त्यांनी विद्या वाढवून या लोकांस शहाणे करावे आणि जेव्हा स्वदेशाचे राज्य करण्याचे व्यावहारिक ज्ञान यांस येईल आणि हे पृथ्वीवरची हकीकत सर्व जाणतील आणि दुर्गुण सोडतील तेव्हा हे राज्य त्यांनी त्यांचे हवाली करावे. परंतु जर हल्ली या लोकांचे अधीन राज्य होईल, तर पहिल्यापेक्षा अनर्थ फार होतील; कारण की आपले लोक फार भ्रष्ट आहेत व त्यांची अंतःकरणे फार मळीन, ते द्रव्याकरिता दुराचार करतात.
 पहा की, कोणी अंमलदार या देशाचा असला, म्हणजे तो फार जळजळाट करतो व आपला अधिकार प्रकट करण्याकरिता व लाच खाण्याकरिता छळितो. म्हणून रयत त्यांस राजी नसत्ये. इंग्रज लोकांवर रयत राजी असते, याचे हेच कारण आहे. आपले लोक कधीही नीट वागत नाहीत व आपले लोकांचा आपसांत मत्सर, द्वेष इत्यादी फार असतो. तेव्हा असे मूर्ख लोकांचे हाती राज्य असणे हे दुर्भाग्य आहे. स्वदेशीय राज्ये हल्ली आहेत, त्यात काय गर्दी आहे ती पहावी, म्हणजे बाजीरावाचे मूर्तिमंत राज्य डोळ्यांपुढे उभे रहाते. मक्ते मामलेदार चढ करून रयत लुटतात. जमा येते ती रांडा, गोंधळी, भट, आर्जवी, ढोंगी वगैरे खाऊन जातात. हेच बाजीरावाने केले व अद्याप मराठी राज्यात हेच आहे. पहा म्हणजे खातरी होईल. उजाडले किंवा मावळले याची त्यांस खबर नसत्ये, फक्त जनावराप्रमाणे खाणे, निजणे एवढ्यापुरती त्यांस काळजी. तिसरी गोष्ट ते पहात नाहीत व सामान्यतः ब्राह्मण वगैरे हिंदू लोक यांची समजूत अशी आहे की, सर्व उद्योग व विद्या पोटाकरिता, दुसरा अर्थ काही नाही. यामुळे लोकहिताचे उद्योग, विद्या, ज्ञान ही वाढविण्याची मेहनत त्यांस होत नाही.

♦ ♦


सरदार लोक

पत्र नंबर ४९: २५ फेब्रुवारी १८४९

 दक्षिणेतील सरदार लोक, याविषयी कोणास काही मजकूर ठाऊक नसेल म्हणून मी त्यांचे अवस्थेचे व समजुतीचे थोडे वर्णन करतो. पेशवाईत हे सर्वजण बाजीरावास कंटाळून इंग्रजांकडे मिळाले. यांस अशी आशा होती की, पेशव्यांचे पदरी राहून आम्हास खावयास मिळते, परंतु चाकरी करावी लागत्ये; तेव्हा आता इंग्रजांच्या पक्षात मिळाले म्हणजे खावयास फुकट मिळेल व आमची जहागीर वगैरे सरंजाम सर्व आम्हांकडे चालतील; आणि घरी बसून राहू. हे ब्राह्मण लोक भटबुद्धि, यांस हा मोठा फायदा वाटला की, चाकरी केल्याशिवाय आम्हास इंग्रज खावयास देतात, मग पेशव्यांची ताबेदारी कशास पाहिजे? हा विचार करून त्यांनी इंग्रजांचे बंदोबस्त कबूल केले व पुढे आता कायद्याप्रमाणे जप्त होऊ लागले, तेव्हा त्यांस असे वाटते की, अरे, हे काय? आम्ही केले काय? आणि झाले काय? त्यांचे मुखात आता दुसरी गोष्ट नाही.
 सरदार लोकांजवळ बसले म्हणजे प्रथम पेनशनाची गोष्ट. आता जप्ती जहाली, कसे करावे? इंग्रजांचे राज्य फार वाईट. कारण आमचा सरंजाम गेला. कोणी म्हणतो माझे पेनशन गेले! आम्हास पहिले वाटत होते की, पुस्त दर पुस्त चालवतील; परंतु आता कायदे फार वाईट निघाले. आता सरदार लोकांस दुसरी काळजी नाही. फक्त तेवढ्या गोष्टी असतात. कोणी आहेत त्यांस मुले नाहीत. कोणी परघरातील मुले आणून दत्तक बसविली आहेत. किती एक बाजीरावाचे समयातील आहेत; किती एक जुने आहेत, पण आता त्यांचे वारस आहेत, ते काही शहाणे नाहीत व नेहमी अर्जा करतात की, दत्तकास आमचा सरंजाम चालवावा. आम्हास दत्तक घेण्याची परवानगी असावी; आणि आमचच्या गावचा फौजदारी आणि दिवाणी अमल आम्हाकडे असावा; आणि वसुलास आम्हास मदत द्यावी. म्हणजे रयतेस बुडवून पैसा घेऊन खर्च पाहिजे तसा करू; परंतु इतके सरदार आहेत यांपैकी एक जणास आणून पाहिले की, हा गृहस्थ कोणत्या उपयोगी पडेल? तर मला वाटते की, या पृथ्वीवर कोणतेही काम त्याचे लायक सापडावयाचे नाही.
 कारण की, पंचवीस वर्षांपासून त्याचे वृद्धापकाळास आरंभ होतो आणि क्षयरोगाने व्याप्त होऊन तो जिवंत मात्र राहिलेला असतो. किती एक इतके अशक्त आहेत की, त्यांस घोड्यावर बसून दहा पावले जाववत नाही. किती एकांस चाळिसावे वर्षी दुसरे लोक धरावयास लागत. स्वतः लिहिणे, पुसणे तर कोणासही येत नाही. सर्वांस वकील व कारभारी पाहिजेत. ज्यास वकील कारभारी नाहीत, त्यांनी दरबारात जाण्याचे दिवशी एकादा मजूरदार करून तरी बरोबर नेला पाहिजे. यजमानास बोलावयाचे माहीत नाही, मग कारकून याने यजमानास बरोबर नेऊन येथे बसा म्हणून सांगावे. यजमानास स्वता काही ज्ञान नाही. मग कारकुनांनी त्या मूर्ख यजमानास जसा पिसे लावून कावळा करतात, तसा करून एजंटास भेटवावा; हे आमके म्हणून सांगावे; परंतु खासे पाहिले तर नंदी किंवा शुद्ध नर्मदेतले बाण. लिहिता येत नाही, बोलता येत नाही. वेड्यासारखे दिसतात. त्यांस दिवाणजीनी आपले पोटाकरता सजवून दरबारात आणावे. महाराजांस उठा म्हणून देखील सांगितले पाहिजे, तेव्हाच ते उठावयाचे, नाही तर उठावे केव्हा हेही ठाऊक नाही. मग घरी येऊन म्हणावे, 'वाहवा! आज दरबारात गेलो होतो, फार श्रम झाले.' कारकुनाने पोटार्थाकरिता पुढे यावे आणि म्हणावे की, 'महाराज, आज साहेब फार खूष होता. आपल्यापाशी फार बोलला. इतके कोणापाशी बोलत नाही.' मग यजमानांनी म्हणावे, 'वा, आमचा दिवाणजी हुशार आहे.' याप्रमाणे यांची अवस्था आहे.
 सरकारास या लोकांशी राजकारणार्थ सलूखा राखण्याची जरूर आहे. म्हणून मात्र या लोकांचा मानपान ते करतात. नाही तर या लोकांसारखे अप्रयोजक कोणी नाहीत; यांचे हातून कोणतेही काम व्हावयाचे नाही. घरात व्यवस्था पाहिली तर दरबारापेक्षा अधिक. वाण्याची उचापत आणि सराफाचे कर्ज, त्यांस व्याज शेकडा २५ रुपये. जे खत कारकून लिहून आणील त्याजवर सही करतात. एखादे दिवशी मेले म्हणजे सर्व सरकारात जप्त होते व सावकार बुडतात.
 याप्रमाणे हे कारकून लोक व दिवाणजी यजमानास फसवितात. त्यांचे वडिलांनी मिळविले असते, ते सर्व चोरांचे हाती जाते. एके दिवशी मेजवानी करावी, सरकारचे कामगारास जेवावयास बोलवावे, आणि यजमानास सांगावे की, "महाराज, आपले सर्व काम दरबारात असते, तेथे साहेब लोकांस काय समजते? सर्व काम कामगारांचे हाती; याजकरिता त्यांचे आर्जव संपादन केले पाहिजे." मग यजमानाने पुसावे, की, 'ते आपल्या घरी येतील काय?'
 'होय महाराज. मी प्रयत्न करतो. मी दरबारची मंडळी अशी वश ठेवली आहे की आपले कृपेने आपले सेवकावर ते सर्व लोभ करतात.'
 याप्रमाणे गोष्टी सांगून छमछमाट करावे.
 'महाराज, कामगार असे म्हणतात की, दोन हजार रुपये पाहिजेत. त्यापैकी एक हजार आपले घरी व एक हजार कामगारांचे घरी टाकून सरासरी यजमानास लुटून खातात. किती एक कामगार सरदाराचे येथे देव्हाऱ्यातील देवाप्रमाणे पूजन करण्यास योग्य असतात. यजमानास कारकुनाने सांगितले की, महाराज, आपण यांस साष्टांग नमस्कार घातला पाहिजे. म्हणजे यजमान उठले!
 याप्रमाणे कामगार व कारकून हे लोक सरदारांस बुडवितात. यांचे घरचे वाद वाढवितात. स्त्रियांचे व पुरुषांचेही वितुष्ट पाडितात. म्हणजे आपले पोट भरते व पैसा उधळावयास सापडतो. यजमान मूर्ख, त्यांस आईपासून फितवितात, बापाशी वितुष्ट करवितात व स्त्रियांसही बिघडवितात. याप्रमाणे दुर्गुणी करतात. आणि त्यांस वीस वर्षे झाली नाहीत, तो रोगिष्ट व दुर्गुणी करून त्यांचे घरावर पन्नास जप्त्या एकामागून एक बसवून ठेवतात. मग यजमान भीतीत पडतो. यांस असे वाटते की माझा कारभारी माहितगार आहे, त्यांस सोडावे तर वाईट; अशा अडचणीत तो सापडला म्हणजे त्याची मालमिळकत खातात. मग जे काय नेमून देतील ते खावे आणि बसावे. याप्रमाणे सरदार लोकांची व्यवस्था आहे. त्यांस उजाडल्या- मावळल्याची खबर नाही, व योग्यता काही नाही. व्यापाराच्या कामात उपयोगी नाही. विद्वान नाहीत. चाकरी करण्यास बळकट नाहीत. सरासरी जिवंत मात्र असतात.
 परंतु असे हे लोक जे जिवंत रहातात, त्यांचे जिणे फार वाईट आणि लज्जेचे आहे. मला वाटते की, यांनी आता सरंजामाची आणि पेनशनाची आशा सोडावी. आपले सुधारणुकीकडे लागावे. शहाणपण शिकावे. मुलास तयार करावे. त्याची लवकर लग्ने करू नयेत, त्यांस चांगले हुशार करावे, दत्तक घेऊ नये. दत्तक घेण्याचे कारण, तो आपले श्राद्ध पक्ष करील, हे लोकांस मुख्य वाटते; पण हा मूर्खपणा आहे. जर अजून सरदार लोकांनी सावधगिरी केली तर ते माणसात येतील. मराठी ग्रंथ वाचून शोध करावे. आजपर्यंत जहाले ते जहाले. आपला मूर्खपणा पदरी घ्यावा. अजून तरी बंदोबस्त करून कारकुनास घालवावे. तंटे करू नयेत. वाद सांगू नये. म्हणजे कामगारांचे आर्जव नकोत, आणि अब्रूने रहावे; यात शोभा आहे. नाही तर आणखी फजितीस कारण होईल.

उद्याचा विचार

पत्र नंबर ५२: १८ मार्च १८४९

 माझ्या पाहण्यात हिंदू लोकांचा स्वभाव एक विलक्षण आला आहे. तो असा की, हे लोक उद्याचा विचार करीत नाहीत. कितीएक लोक असे म्हणतात की, ही गोष्ट बोलून काय उपयोग? आमचे डोकीस हे कार्य घडत नाही, मग कशास प्रयत्न करावा? ही समजूत लहानापासून थोरांपर्यंत आहे.
 राजा म्हणतो आपण मेल्यावर कसे का होईना; याजमुळे तो काही कायदाकानू किंवा नेम, आपल्यामागे राज्य कसे चालावे, याविषयी करीत नाही. आणि आपले मरणापर्यंत मात्र आशा बाळगतो. आपण आहो तेथपर्यंत चाललेच आहे. पाठीमागे कसेही होऊ, याजमुळे हे लोक अगदी बुडाले. जी काही गोष्ट पन्नास वर्षांनी फळास यावयाची असते, ती जर या लोकांमध्ये काढली, तर ते मनापासून हसतात आणि म्हणतात पन्नास वर्षे कोणी पाहिली? उद्याचा भरवसा नाही. ईश्वर काय करील ते कोणास ठाऊक? पन्नास वर्षे कोणीकडे? आपला आताचा आतापुरता विचार पहावा! इतक्या दूरच्या खबरा पाहिजेत कशास? या प्रकारची भाषणे करतात.
 परंतु या मूर्खास असे कळत नाही की, (थोडेसे स्पष्ट उदाहरण देतो) जर पेशवे सरकारने व बाजीरावाने उद्याचा विचार पाहिला असता, तर राज्य बुडते? जर इंग्रज पहिल्याने आले, तेव्हा हिंदू लोक सावध असते, आणि समजते की, हे लोक आज थोडे दिसतात. उदमाकरता आले आहेत. परंतु त्यांचे पाठीमागे पेंडें फार लांब आहे, यांस फार जपले पाहिजे. व यांस फौज वगैरे ठेवू देऊ नये, कारण की हे उद्या राज्य बळकावतील. असा जर आमचे वडील, आजे, पणजे यांनी उद्याचा विचार पाहिला असता, तर आज हे लोक इंग्रजांच्या अमलात दीनवाणे का फिरते? परंतु उद्याचा विचार केला नाही, त्याचे फळ आम्ही भोगितो. असाच जर आम्ही उद्याचा विचार केला नाही तर आमचे नातू, पणतू दुःखाविष्ट होतील, हे लक्षांत कसे येईल?
 इंग्रज लोक हे या देशात ईश्वराने गुरू पाठविले आहेत. त्याजकडे पाहिले, म्हणजे ते उद्याचा विचार करतात, हे समजते. जर नाना फडणिसासारखा आपल्यापुरता विचार ते करते, तर त्याजमध्ये पराक्रम नसता. परंतु ते सर्व एकमताने पाचशे वर्षांपुढे होणार ते आज पाहतात. कल्पना वाढवितात आणि बंदोबस्त करतात. आपल्याच्याने एकही गोष्ट घडत नाही, तितकीच ठेवतात. पुढे येतो तो तेच करतो. याप्रमाणे पन्नास जणांचे हात लागतात, तेव्हा १०० वर्षांनी ती गोष्ट सिद्धीस जाते. जर इंग्रज लोक मुळी व्यापाराच्या निमित्ताने या देशात यावयास धजते ना, तर आज त्यांचे इकडे एकछत्री राज्य झाले नसते.
 लाखो इंग्रज अमीरासारखे इकडे येऊन रोजगार करतात. आणि हिंदू लोक दीनवाणे मूर्खासारिखे तोंडाकडे पाहतात व त्यांनी केलेल्या रस्त्यावर चालतात व त्यांनी केलेली वस्त्रे नेसतात, असे होते काय? हे सर्व उद्याचा विचार केला म्हणून झाले की नाही? यास्तव ही समजूत लोकांनी सोडावी. इंग्रज उद्याचा विचार आज करतात. जर हिंदू लोकांनी एक कंपनी केली असती आणि विलायतेत व्यापार करण्यास गेले असते आणि तेथे किल्ले बांधिते व शिपाई ठेविते तर या घटकेस हाकून देते. हे लोक इकडे दंगा करण्यास आले आहेत, असे म्हणते. असे ते सावधपणाने आपले देशात वागतात. व एक दिशेच्या कोपऱ्यावर काय होते, ते सर्व मुलखातील लोकांस समजते आणि पत्ता लावतात हे कोण? कोठचे? येथे यांचे येण्याचे प्रयोजन काय? याचा तपास करतील. सुस्ती करणार नाहीत.
 परंतु तुम्ही मनात आणा की, जेव्हा इकडे इंग्रज, फराशीस, पोर्तुगीज, मुसलमान इत्यादी लोक आले तेव्हा हिंदू लोक किती अंधारात होते! मुसलमान लोक सातशे वर्षे राज्य हिंदुस्थानात करीत होते तरी कोणास ठाऊक नाही. दक्षिणेत लोक निद्रिस्त होते. तसेच पोतुगीज लोकांनी गोवे घेतले, परंतु हिंदुस्थानाचे लोकांस काही खबर नाही व आजपर्यंत देखील किती एकांस ठाऊक नसेल. याप्रमाणे हे लोक झोपेत आहेत. ज्यास स्वदेशाचे ज्ञान नाही ते परदेशास जाऊन काय पराक्रम करतील बरे? हे तर अर्थातच आहे.
 परंतु जर कोणास पुसले, तर आम्ही अज्ञान आहो, असे म्हणणार नाहीत व ब्राह्मण तर कधीच कबूल करणार नाहीत. ते म्हणतील की, प्रारब्ध, देवाची मर्जी, ईश्वरी संकेत, त्यांस काय उपाय? परंतु यांनी उपाय केले असते, तर आम्ही ईश्वरी संकेत म्हटला असता; परंतु ज्यांनी उद्योग केला नाही ते मूर्ख समजावे.
 तात्पर्य, या लोकांची स्थिती जसे एखादे जनावराचे प्रेत पडते आणि ते कुजते म्हणजे, त्याचा एक एक केस वेगळा होतो; तद्वत हिंदू लोक मूर्ख होऊन कुजून गेले आहेत. याजमुळे त्यांची प्रत्येकाची चित्ते पृथक् आहेत. पेशवे म्हणतात टिपू बुडवावा; होळकर म्हणतात शिंद्यास मारावा; व गायकवाड म्हणतात पवारास मारावे. असे आपलेमध्ये कज्जे करता करता परकी लोकांचे काम झाले. आणि हे गमावून बसले. याचे कारण या लोकांस विद्या नाही. मोठे लोक आहेत, त्यांस तर विद्येविषयी त्यांच्या बापाची शपथ आहे. त्यांचे हातास कधी ग्रंथाचा स्पर्श झाला नाही. व वडिलांपासून तो संस्कारच नाही. कोणी भीष्माचार्य वृद्ध असतील ते गीताबीता वाचतात; परंतु फळ काय? त्याचा अर्थ समजेल तर शपथ! हे विद्येचे व ज्ञानाचे वैरी लोक आहेत, म्हणून यांची अशी दशा आहे.

♦ ♦


इंग्लिश राज्यापासून फळ

पत्र नंबर ५४: १ एप्रिल १८४९

 सांप्रत हिंदू लोक एकत्र बसले, म्हणजे सहज गोष्टी निघतात की, हिंदुस्थानची पुढे गत कशी होईल? लोक अगदी भिकारी होत चालले. व्यापार, धंदा, रोजगार ही कामे नाहीशी झाली. ब्राह्मणांस अन्न नाही. घरे ओसाड पडत चालली. माणसे स्वस्थ झाली. पदार्थांच्या किंमती उतरल्या. पैसा नाहीसा झाला. इंग्रज लोक एक पाठीमागे एक आपली राज्ये, संस्थाने, जहागिरी, पेनशने घेत चालले. कोणी शिपाई राहिला नाही व लोक दरिद्री झाले. तेव्हा पुढे या प्रजेची गत कशी होईल? याप्रमाणे ब्राह्मणांचा हाहाकार ईश्वराचे कानावर कधी जाईल?
 अशा तऱ्हेचे विस्मययुक्त प्रश्न करतात. त्यात मग कोणी बहुत शहाणा, जुने काळचा असला म्हणजे तो म्हणतो, "अहो बाबा, मागे यादव कसे मेले? रावणाने प्रळय थोडा केला होता का? सर्व देव बंदीस घातले होते. नंतर रामाने वानराकडून लंका घेतली की नाही? पाण्यावर दगड तरले की नाही? तसेच इंग्रज कधी तरी बुडतील, धर्मसंस्थापना होईल. ब्राह्मण लोक सुखी होतील व इतर लोकही आपले वर्णाश्रमधर्मे करून वागू लागतील." अशा प्रकारची संभाषणे चार ब्राह्मण एकत्र बसले म्हणजे होतात.
 आमचे ऐकण्यात हे पुष्कळ आले आहे. याविषयी आम्हास काय वाटते, ते लोकांस कळवावे म्हणून आम्ही आपले मत लिहितो. मुख्य आमचे बोलण्याचा येथून आरंभ आहे की, ज्या गोष्टी ईश्वर घडून आणतो, त्या वाइटाकरिता नसतात. जरी त्या वाईट असा प्रथम मनुष्याचे ज्ञान थोडे म्हणून भास होतो, तरी शेवटी त्याजपासून मोठा उपयोग असतो. ही गोष्ट खचित आहे. तेव्हा हिंदुस्थानचे लोक हे फार मूर्ख व धर्मकर्म सोडून अनाचारास प्रवर्तले, ते असे की, सती जाण्याची चाल, मुले मारावयाची चाल, तीन वर्णांची नीच स्थिती, ब्राह्मणांचे महात्म्य, विद्या क्षणिक, अतिशय गर्व, संपूर्ण देशचे लोक आम्हापुढे तुच्छ व आम्ही श्रेष्ठ. तेव्हा हा भाव हिंदू लोकांचा मोडण्यास व त्यांस ताळ्यावर आणण्यास परदेशातील सुधारलेले लोक यांची गाठ घालून देण्यापेक्षा उत्तम उपाय दुसरा काही आहे, असे वाटत नाही. यास्तव ईश्वराने या देशात इंग्रजांची प्रेरणा केली आहे.
 आता हिंदू लोकांनी उघड पहावे की, आम्ही श्रेष्ठ की दुसऱ्या देशचे लोक श्रेष्ठ. ग्रंथावरून पहावे आणि लोकांचे तोंडून ऐकावे. त्यापेक्षा समक्ष अशी भेट झाली तर चांगले की नाही? याचा विचार पहावा. तेव्हा या साक्षात शहाणे लोकांची गाठ पडून, हिंदू लोकांच्या वाईट चाली बहुत सुटल्या व आणखीही किती एक सुटतील. आणि यांची मने शुद्ध होऊन यांस राज्यकारभार, व्यापार-धंदा कसा कसा करावा, हे ज्ञान येईल. देशसुधारणा क्षणात होत नाही. तीस पुष्कळ विलंब लागतो. लहान मुलास हुशार होण्यास दहावीस वर्षे लागतात, मग देश चांगला होण्यास अर्थातच दोनशे-चारशे वर्षे लागतील. तोपर्यंत या लोकांस दुःख आहे; परंतु त्यांस उपाय नाही. जशी शाळेमध्ये मुलांनी शिक्षा घेतली पाहिजे, तद्वत् हे आहे. यापासून उत्तम फळ पुढे होईल. या देशचे लोकांनी वर्णसंकर होईल व धर्म बुडेल, हे काही भय बाळगू नये. वर्णसंकर होत नाही व धर्म बुडत नाही; परंतु मूर्खपणा मात्र बुडेल आणि धर्मामध्ये अधर्म मिसळ झाला आहे; त्यांस लोक धर्म म्हणतात, ते मात्र ज्ञानचक्षू आल्यावर जाईल.
 वर्ण जे आहेत ते स्वाभाविक सृष्टीत आहेत; म्हणजे कोणतेही देशात वर्ण नाहीत असे नाही, वर्ण म्हणजे इतकेच की, चार प्रकारचे व्यापार. जसे ब्राह्मण हे धर्म रक्षणारे व विद्या वाढविणारे, क्षत्रिय शिपाईगिरी करणारे, वैश्य व्यापार करणारे आणि शूद्र शेत करणारे. हे धर्म सर्वत्र आहेत व ते जलप्रलय होईपर्यंत पृथ्वीवर रहातील; परंतु लोकांच्या अडाणी समजुती म्हणजे ब्राह्मण विद्वान चांगला असला तरी सिंधू नदी उतरून पलीकडे गेला म्हणजे किंवा त्याने कांदा खाल्ला म्हणजे त्याचे ब्राह्मण्य गेले. हे कसे गेले? म्हणून म्हणाल तर याचे उत्तर कोणास देता येणार नाही. त्यांस जी विद्या येते, ती तो विसरत नाही. त्याचा धर्म आहे. तो त्याने सोडला नाही. त्याचे काही नुकसान झाले नाही. मग कांदा खाताच ब्राह्मणपणा गेला कसा? केवळ मनाची ही कल्पना आहे. वास्तविक काही नाही. या मूर्ख समजुती जातील आणि हल्ली जो वर्णसंकर आहे, म्हणजे वास्तविक ब्राह्मण नसता ब्राह्मण म्हणवितात, व शूद्र असता ब्राह्मण म्हणवितात व ब्राह्मण असता ब्राह्मण म्हणत नाहीत. हा वर्णसंकर मात्र जाईल आणि व्यवस्थित होतील.
 या लोकांच्या पायातील शृंखला सुटतील, हे चहो देशांत जाऊन व्यापार करू लागतील, विद्वान होतील व आपले देशात कापड वगैरे जिन्नस तयार करावयास शिकतील तेव्हा सुखी होतील. लोक शहाणे झाले म्हणजे हळूच इंग्रजांजवळ म्हणतील की, आम्हास तुमच्या देशात आहे तसे पार्लमेंट द्या. नंतर आपले लोक त्यामध्ये बसू लागले म्हणजे हळूच म्हणतील की, तुम्हासारखे आम्ही शहाणे आहो मग आम्हास अधिकार का नसावे? मग हिंदू लोकांचे बहुत मत असे पडले, म्हणजे सरकारास देणे अगत्य आहे. इकडील लोक राज्याचे कारभार वगैरे चांगले करू लागले, लाच खावयाचे सोडून दिले, म्हणजे बहुतकरून मोठाली कामे गवरनरीचीसुद्धा यांचे हाती येतील आणि मग अर्थातच इंग्रज फक्त व्यापार मात्र करून राहतील. म्हणजे जसे हिंदुस्थानात प्रथम इंग्रज आले, त्या स्थितीवर येतील आणि आपले लोक पार्लमेंट व स्वराज्य भोगतील, राज्यकारभारात व व्यापारात त्यांस महत्त्व प्राप्त होईल आणि मग परदेशाशीदेखील व्यापार करतील.
 असे हे लोक प्रबळ झाले, म्हणजे इंग्रजांस काही दिवसपर्यंत आभारी मानतील; कारण की त्यांचे योगाने हे ज्ञानी झाले; परंतु ज्या काळी इंग्रज गडबगड करू लागतील किंवा काही नवीन कानू बसवावयाचा आग्रह करतील, त्या काळी अमेरिकेत झाले तसे होऊन हे लोक आपल्यास स्वतंत्र करून घेतील आणि इंग्रजांस सांगतील की, तुम्ही आपले देशास जावे. आता आमचे देशाचा कारभार आम्हास चांगला करता येतो. तुमचे गुरुत्व नको. तुम्ही पाहिजे तर व्यापारापुरते इकडे येत जा. आमचे प्रजेचे जसे आम्ही रक्षण करतो, तद्वत् तुमचेही करू; परंतु तुमचे वर्चस्व नको. याप्रमाणे या देशाची गती होईल आणि नवीन राज्यस्थिती चांगले रीतीची होईल, पहिले अज्ञान अगदी नाहीसे होईल. यांस दोनशे वर्षे तरी पाहिजेत. परंतु असे होईल यात संशय नाही. अशी मागले इतिहासावरून कल्पना होते. आणि हे तथ्य आहे, अशी खातरजमा आहे.

♦ ♦


हिंदू लोकांनी काय करावे?


पत्र नंबर ६०: १३ मे १८४९

 पुण्यात मागे एक साहेब आला होता व त्यांस कारकून ठेवावयाचे होते. हे वर्तमान बाहेर फुटताच दोन हजार उमेदवार त्याचे येथे आले.
 मग त्याने निवडून निवडून त्यातून थोडेसे ठेविले आणि म्हणू लागला की, हे फार आश्चर्य आहे. जर एक न्हावी किंवा शिंपी ठेवू लागलो तर मिळत नाही. आणि चांगले कारकून बोलावल्याखेरीज हजारो येतात. कारकुनीचा धंदा हिंदू लोकांमध्ये इतका स्वस्त आणि इतर धंदे स्वस्त नाहीत; याजवरून विचार करता मला वाटते की, ही गोष्ट खरी आहे. पुण्यात आज पाहिले तर दोन हजार ब्राह्मण उमेदवार चांगले लिहिणारे आहेत. परंतु त्यांस रोजगार नाही. कित्येक दहा दहा वर्षे कचेरीत जाऊन मेहनतीने लिहितात. फुकट चाकरी करतात. परंतु पाच रुपयेदेखील कोणास मिळत नाहीत. तसेच भट हजार आहेत; कित्येक जन्मपर्यंत वेद पाठ करण्याची मेहनत करतात. परंतु आगांतुकी करावयास लागतील. याजकरिता मी या भटांस व उमेदवार कारकुनास फार उत्कंठेने बोध करतो की, "तुम्ही दुसरा काही व्यापार करीत जा." यावर ते म्हणतात की, "पेशवाईत आमचे यथास्थित चालत होते. आता चालत नाही. हे इंग्रजांचे पायगुणाने झाले." असो.
 या गोष्टीचे उत्तर देणे जरूर नाही. ते कशानेही असो, पेशवे चांगले असोत अगर इंग्रज वाईट असोत, जे प्राप्त झाले आहे ते खरे. सांप्रत ब्राह्मण लोकांची हलाखी आहे, हे सर्व कबूल करतील. बरे, जे इंग्रजी राज्यास नावे ठेवतात व मनात चुरमुरतात, त्यांनी व्यर्थ काळजी करू नये. कारण पेशव्याचे किंवा दुसरे कोणाचे चांगले त्यांस पाहिजे तसे राज्य त्यांच्याने स्थापवत नाही. व इंग्रजांसही सध्या जा किंवा अमुक रीतीने चाला, हे म्हणण्याचीही या भटांची व कारकुनांची प्राप्ती नाही.
 यास्तव जे आपणांस कर्तव्य, त्यावर विचार मात्र आपण करावा. तो कोणता म्हणाल, तर ऐका. सांप्रत काळी जे दरिद्र प्राप्त झाले आहे, हे मोडावे कसे, याचा विचार पडला आहे. वास्तविक पाहिले तर ब्राह्मण लोकांचे अज्ञान व मूर्खपणा पराकाष्ठेचा आहे. त्यांस दरिद्र फार आले आहे. कारण इंग्रजांचे राज्यात न्हावी, परीट, मोची इत्यादिक जे मजुरीने पोट भरणारे, त्यांचा रोजगार कायम आहे; आणि ब्राह्मण लोक व मोठे सरदार, मराठे कुलीन हे तेव्हा मजुरीने पोट भरीत नव्हते, ते आता विलायतेस जसे लॉर्ड आहेत, तसे ते होते व मोठाली कामे आणि सरदाऱ्या करीत होते. हे लोक आता इंग्रजांच्या उपयोगी नाहीत.
 कारण या देशात जे लाभ म्हणजे मोठ्या जागा व अधिकार ते ते सर्व आपल्या लोकांस देतात व फक्त मजुरीचे रोजगार इकडील लोकांस शिल्लक राहिले आहेत. याजमुळे फार दरिद्र व मोठ्या लोकांस लज्जा प्राप्त झाली आहे. ही दूर होण्यास हे लोक थोडेसे शहाणे झाले म्हणजे उपाय सुचतील. ते असे की, विलायतेत पार्लमेंट आहे. परंतु ते इकडील देशाचा काही विचार करीत नाही. कारण त्यांस स्वदेशाचा कारभार फार आहे. पहा, सातारच्या राजाने किती प्रयत्न केला, परंतु पार्लमेंटाच्याने काही झाले नाही. सर्व मेहनत व्यर्थ केली व शेवटी कंपनी सरकारने केले ते बहाल झाले.
 तात्पर्य, विलायतेतील पार्लमेंट यांस हा देश कसा वाटतो की, जसा आपले घरी गडी आहे. त्याने एकादा व्यापार केला व त्यात त्याने अन्याय केला तरी आपण ते मनास आणीत नाही. कारण आपण आपले घरचे काम टाकून गड्याचा घरचा कारभार कशाला पाहू? तद्वत् पार्लमेंट म्हणजे की, आमचे देशातील सावकार लोक यांनी परदेशातून मुलूख घेतला; तेथील न्यायमनसुबी आम्ही पाहण्यास काय गरज? आमचे देशातील आम्हास काय थोडे आहे? याप्रमाणे आहे. सवतीचे मुलाची काळजी कोण करितो?
 तेव्हा आमचे लोकांनी एकत्र होऊन पार्लमेंट मागावे आणि मुंबई, कलकत्ता अशा ठिकाणी ते नेमून तेथे काही इंग्रज व आपले सर्व जातीचे शहाणे शहाणे लोक त्यात ठेवावे आणि त्यांचे हुकुमाने कारभार करावा. म्हणजे विलायतचे बादशाहज्यादीसही नाही म्हणवणार नाही. कारण की विलायतेत पार्लमेंट असावे व येथे नसावे अशी आम्ही काही चोरी केली नाही. हा एक मोठा उपाय साध्य व्हावयाजोगा आहे.
 दुसरा तूर्त दरिद्र मोडण्यास उपाय असा आहे की, ब्राह्मण लोकांनी आपल्या मूर्खपणाचा समजुती सोडाव्या व केवळ कारकून आणि भट हे दोनच रोजगार आम्ही करू, असे म्हणू नये. या देशात आणखी पुष्कळ रोजगार आहेत व तेही आता दिवसेंदिवस इंग्रज घेत चालले. सावकारी, शेतकी वगैरे इंग्रज करू लागले. हेच रोजगार आपले लोकांनी करावे, कोणते म्हणाल तर काच, कापड, सुरी, लाकडी सामान, घड्याळे, चाबूक, यंत्रे इत्यादी पुष्कळ इकडे इंग्रज खपवितात. ही सर्व आपले लोकांनी करावयास शिकावे व येथे जो माल खपणार नाही तो दुसऱ्या देशास घेऊन जावा, आणि तेथे विकावा. पुष्कळ देश आहेत. या गोष्टीचा शोध करावा. व इंग्रज देशचे सामान बंद करावे किंबहुना आपले सामान त्यांस द्यावे. परंतु त्याचे आपण घेऊ नये. जो इकडे उत्पन्न होईल तितका माल द्यावा. विलायती कापड घेऊ नये. यास्तव आपल्यास जाडी, मोठी नेसावयास लागली तर काय चिंता आहे? परंतु आपले देशाचे रक्षण करावे. असे झाले म्हणजे बहुत रोजगार राहतील.
 परंतु हे लोकांस सुचत नाही. यांस असे वाटते की, आम्ही आजपर्यंत केले नाही, ते करणार नाही, व भलताच रोजगार करणार नाहीं. दहाबरोबर मरण लग्नासमान आहे, असे ते मानितात. आणि उपाशी मरतात. भट पन्नास हजार खेपा घालतात. तेव्हा एक श्राद्धाचे आमंत्रण येते. तसेच शंभर धक्के कोंडीत खातात, तेव्हा दोन पैसे दक्षिणा मिळवितात. चोरा-लबाडाची स्तुती करतात, तेव्हा चार पैसे काढतात. दारू पिणाराने शुद्ध व्हावयास पैसा दिला म्हणजे त्यांस शुद्ध करतात. तात्पर्य, सांप्रत ब्राह्मण पैशाकरिता कसलेही दुष्कर्म करावयास सोडीत नाहीत. तसेच उमेदवार, कारकून दोनशे खेपा घालतील, तेव्हा दप्तरदाराची भेट, पाचशे खेपा घालतील, तेव्हा तो 'या' म्हणतो. मग पंचवीस वर्षे गावात भीक मागून त्याच घरात काम करावे. चाकरी क्वचित कोठे येणार व ती तो आपल्या सोयऱ्याधायऱ्यास प्रथम देणार; म्हणजे सर्व उमेदवारांनी हात आपटीत असावे. असे त्यांचे हाल होतात व माणसे अशी जिकिरीस येतात, ती पहावत नाहीत.
 यास्तव त्यांनी स्वस्थपणाने दुसरे रोजगार करावे. म्हणजे इंग्रज लोकांचा, शिरस्तेदाराचा शिव्या, भटांचा अपमान हे काही सोसावयास नको. याचप्रमाणे अलीकडे इंग्रजी लिहिण्याची अवस्था आहे. जो तो इंग्रजी शिकतो. परंतु इतक्यांची गरज नाही. याजमुळे दीनवाणी फिरतात. या गोष्टीचा विचार केला असता बरे पडेल.

♦ ♦


सरकारी कामदार


पत्र नंबर ६६: १ जुलाई १८४९

 आपले लोकांमध्ये अशी चाल पडून गेली आहे की, त्यांनी उडवे असावे म्हणजे त्यांनी मनास येईल तितके कर्ज करावे, सावधगिरी करू नये. हे लक्षण सरदारांचे असे लोक समजतात.
 दुसरे, सराफ लोक, हे सावध असतात. म्हणजे त्यांनी कवडीपासून मिळवावे. कधी गैरशिस्तपणे पैका जाऊ देऊ नये. कारकून यांनी ठकपणाने संसार करावा. हा शिरस्ता आहे. आणि सरकार हे लुटारू असावे व सरकारने पाहिजे तसे वागावे. खंडण्या घ्याव्या, लूट करावी, हा धर्म सरकारचा, असे लोक समजतात आणि तसेच आचरण करतात. याजमुळे पुष्कळ अनर्थ होतात.
 गृहस्थ आहेत ते म्हणतात की, आमचा द्रव्य मिळविण्याचा धर्म; भट म्हणतात आमचा भीक मागण्याचा धर्म. भटाजवळ पन्नास हजार रुपये असले, तरी आणखी भीक मागतोच व गृहस्थास दोनशे रुपये महिना असला तरी तो लाच खातोच, चोऱ्या करतो आणि पैका मिळवितो. आपले लोकांपैकी कामगार सरकार चाकरीस आहेत, त्यांपैकी शेकडो या लाच खाण्याबद्दल वगैरे तुरुंगात गेले; परंतु अद्याप ते खोड टाकीत नाहीत. याचे कारण असे आहे की, त्यांस ती सवय पडून गेली आहे हे एक; दुसरे त्यांस ईश्वराचे भय नाही, विद्या नाही व शहाणपण नाही; याजुमळे नीती समजत नाही; तिसरे कारण इंग्रज लोक जे विलयतेतून इकडे येतात, ते शुद्ध टोणपे असतात, त्यांस काही कळत नाही. मग शिरस्तेदारावर वगैरे भरवसा ठेवतात व शिरस्तेदार जे सांगेल त्याप्रमाणे करतात याजमुळे शिरस्तेदार जडजाचे काम स्वतः करीत असतो. म्हणून तो लाच खातो. चौथे पगार फार कमी. साहेब लोक मूर्ख असतात; परंतु दोन हजार, तीन हजार रुपये वगैरे पगार खातात आणि त्याचे हाताखालील कामगारास शेपन्नास रुपये दरमहा देतात आणि सर्व काम तो करितो, हेही कारण आहे. पाचवे कारण असे आहे की, इंग्रज लोकांस या देशातील लोक निवडता येत नाहीत. लुच्चे, सोदे आणि भले हे एकसारखे या राज्यात झाले आहेत.
 ज्या लोकांची योग्यता पाच रुपये मिळविण्याची असते, त्यांस १०० रुपये देतात. आणि ज्यांची पाचशे रुपयांची योग्यता त्यांस पाचदेखील देत नाहीत. सरासरी आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते, अशी वर्तणूक आहे. यामुळे इकडचे लोक म्हणतात की, कसेही केले तरी इंग्रजांस निवाडा समजत नाही. निभेल तितके दिवस निभेल, मग खावयास तरी कशाला कमी करावे? जितके दिवस जातील, तितके जातील. पुढे पहातच आहोत, अशी समजूत आहे. ब्राह्मण लोक राज्याचे व अधिकाराचे उपयोगी नाहीत, हे स्पष्टपणे आज दिसते आहे. जेव्हा ब्राह्मणांच्याने शेपन्नास रुपयांच्या जागा व लहान लहान अधिकार नीट चालवत नाहीत, तेव्हा ते पुढे करणार काय? याचे हाती राज्य दिले, तर हे दिवसास लुटतील, हे उघड आहे. कोणी म्हणतात, इंग्रज जे कामगार ठेवतात, ते अगदी लबाडाचे अर्क, असे जाणून ठेवीत नाहीत; परंतु अज्ञानाने तसे घडते. तथापि फळ एकच आहे. हे जर कुलीन, लोकांस ठेवतील, तर असे कधी होणार नाही. याजकरिता विद्वान, चांगले कुलीन, मोठ्या योग्यतेचे लोक ठेवावे. छचोर, लबाड व हलके लोक जे आता भरले आहेत, यांचे हातून वर्तणूक कशी चांगली होईल? परंतु असे साहेब लोकांच्या हातून घडणे कठीण.
 कारण त्यांचे अज्ञान या देशाविषयी पुष्कळ आहे. अब्रूदार कोण, कसा हे त्यांस कळत नाही. सकट घोडे आणि बारा टक्के मानतात. मला वाटते की, हे इंग्रज हल्ली सरकारातून नेमणूक होऊन जे इकडे येतात, त्यांचे तीन वर्ग आहेत. शंभर सिविलीयन असले, तर त्यात पंचाण्णव असे असतात की, त्यांचे चित्त पैका मिळवून घरास जावे. ते दुसरे काही पहात नाहीत, फक्त पिशवीवर नजर ठेवतात. व शिरस्तेदाराने कागद पुढे मांडले, म्हणजे सह्या करतात. अर्जी कोणाकडे पडो, तरी फैसल करतात, व इकडे तिकडे न पाहता घरी जातात.
 दुसरे दिवशी पुन्हा तोच क्रम. ते आपले दिवस मोजितात. याप्रमाणे उदास असतात. आणि शेकडा चार मध्यम प्रतीचे असतात, म्हणजे ते चित्त लावून काम करतात. हाताखालचे माणसांचे काम, त्यांची वर्तणूक व वहिवाट पाहतात. विदुरनीतीत राजास विदुर सांगतो, राजाचा धर्म असा आहे की, बातमीदार ठेवून वर्तमान पहात जावे. तो नेम इकडील लोकांस फार लागू आहे. ज्यास अधिकार करणे त्याने आपल्या लोकांची वर्तणूक पहावी, म्हणजे त्यांस भय वाटते; परंतु असे करणारे साहेब लोक शेकडा चार असतात; व शंभरात एक उत्तम प्रतीचा असतो. त्याचे मनात आपण नीट काम करावे, हे तर काय, परंतु आपले जिल्ह्यातील सर्व लोकांचे कल्याण असावे, अशी त्यांची इच्छा असते. त्यांस वाटते की आम्ही या लोकांचा दरमहा खातो, हा त्यांचा माल घेतो व हे लोक अज्ञानात फार आहेत. याजकरिता यांस सुधारावे व विद्यावृद्धी करावी अशी प्रजेची काळजी करणारा क्वचित याप्रमाणे आहे. तेव्हा अशा उदासीन राजांचे हातून राज्य कसे चांगले होईल?
 ते आपले हिताकडे पाहतात. लोक मेले तर मरेनात? यांस काय त्याचे सुतक यावयाचे आहे? आपले लोक आतापासून सुधारले आणि जरा अक्कलहुशारीत आले व लाच खाणे वगैरे दोष टाकले म्हणजे खचित साहेब लोकांचे शंभरपट काम चांगले करतील. यांस प्रथम भाषा चांगली कळेल. साहेब लोकांचे मुळी प्रथम तेच व्यंग असते व स्वदेशातील लोक राज्य करण्यास योग्य होण्यास अवकाश आहे, तत्रापि जर विद्वान लोकांस मोठाल्या जागा देऊ लागले, तर त्याच्या योगाने लवकर सुधारणा होईल. हल्ली जे कामगार आहेत, ते इंग्रजापेक्षा स्वदेशाचे हित करण्यास उदार आहेत. याजपासून देशाचे कल्याण काय होणार?
 आज जे लोक आहेत, त्यांस काही कळत नाही. ज्ञान व विद्या हे विषय त्यांचे स्वप्नात देखील नाहीत. गर्विष्ठ ब्राह्मणांच्या समजुती त्यांचे मनात आहेत. फक्त पैसा मिळविण्याकरिता साहेब लोकांचे आर्जव करून पोट भरितात. या लोकांच्याने काम कधी चांगले होणार नाही. याजकरिता चांगले लोकांची योजना सरकारातून करावी. आता सरकारचाकरीस लोक आहेत, हे फार हलक्या प्रतीचे, यांस काही ज्ञान नाही. फक्त आर्जव करावे, इतके त्यांस समजते. व साहेब लोक किती एक स्तुतिप्रिय असतात, त्यांची आर्जवाने मर्जी खुषी होते, आणि ते त्यांस मोठी जागा देतात. याप्रमाणे अवस्था आहे.
 तात्पर्य, कोणत्याही प्रकारे या लोकांची बरी गत नाही. सरकार या प्रकारचे व लोक या प्रकारचे, मग दरिद्र असले तर नवल काय? यास्तव या लोकांस माझी विनंती आहे की, तुम्ही जरी हलक्या कुळातले असाल तरी तेच तुम्ही बिरीद बाळगावे असे नाही. थोरपणा धरावा. तुमचे नशिबाने हे इंग्रज इकडे आले, म्हणून तुमच्यासारख्यांस जागा मिळतात. तर तुम्ही देशातील लोकांची अब्रू राखा.

♦ ♦


स्वदेशप्रीती


पत्र नंबर ६७: ८ जुलाई १८४९

 या देशातील शास्त्री, पंडित यांस व ज्यास आपले धर्माचा अभिमान आहे व जे धर्म जाणतात, त्या सर्वांस माझे काही प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे कोणी देतील तर मी त्यांचे आभार मानीन आणि न देतील तर मी आपल्यास विजयी म्हणेन.
 (१) पुराणे ही काव्ये समजावी किंवा वेदशास्त्राप्रमाणे त्यांस मानावे?
 (२) वेदातील धर्म व पुराणातील धर्म (देवता, आचार, कर्मे इत्यादी) वेगळा आहे की नाही?
 (३) सांप्रत हिंदू धर्म बिघडला आहे की नाही? व त्यांस सुधारणे जरूर आहे की नाही?
 (४) आचार प्रमुख मानावा किंवा नीती प्रमुख मानावी?
 (५) हल्ली हिंदू लोकांवर जे प्रसंग आले आहेत, ते सर्वांस विदित आहेत. त्यातून तरणोपाय होण्याकरिता उपाय करणे अवश्य आहे; परंतु त्या उपायास सांप्रतचे काळी धर्म अगदी बुडोन अज्ञान पसरले आहे, हे विघ्न आहे किंवा नाही?
 (६) वेद, शास्त्रे, पुराणे याचा सारांश ग्रंथ करून सर्व लोकांस तो धर्मपुस्तकाप्रमाणे देणे बरोबर आहे किंवा नाही? किंवा प्रत्येकाने दहा उंट पोथ्या वाचाव्या, तेव्हा त्यातील काही धोरण कळणार, असेच गूढ राहू द्यावे? अर्थ करणे बरे की पाठ करणे बरे?
 (७) जातिधर्मास कूळ मुख्य किंवा वर्तणूक मुख्य?
 (८) पुराणातील व तंत्रातील धर्म काही काही नीतीस विपरीत आहेत. जसे शाक्त दारू पितात, जारकर्म करतात, इत्यादी, आणि काही युक्तीस प्रतिकूल आहे. म्हणजे ग्रहण भलतेच रीतीने वर्णन केले आहे व पृथ्वीचे स्वरूप मनास येईल तसे कल्पनेने लिहिलेले आहे. याजवर भरवसा ठेवावा व आंधळ्यासारखे होऊन जे उघड खरे दिसते, ते खोटे म्हणावे, यात परिणाम आहे की काय?
 (९) सांप्रत लोकांमध्ये किती एक चाली मुळीच आधार नसता पडल्या आहेत, म्हणजे लवकर लग्न करावयाचे इत्यादी. या मोडणे जरूर आहे की नाही?
 (१०) वास्तविक धर्माचे तात्पर्य हल्ली कोणास कळत नाही. शास्त्रीपंडित हे लोभावर दृष्टि ठेवून लोकांस बरा वाटेल तो शास्त्रार्थ सांगतात. याजमुळे धर्म अगदी ग्लानीस आला आहे. याचा अभ्युदय करणे जरूर आहे की नाही?
 (११) अशा मोठाल्या गोष्टी ईश्वराने कराव्या, असे म्हणून उगेच बसणे बरे किंवा उद्योग करावा; त्यात ईश्वर सहाय्य होतो, हे मानणे बरे?
 (१२) संस्कृत ग्रंथ आहेत, त्यांचे मराठी करून ज्ञान वाढविणे हे बरे किंवा ब्राह्मणांचे हक्क त्यात काही बुडत आहेत?

 इतके त्रयोदश (द्वादश?) विध माझे प्रश्न आहेत. त्यातील तारतम्य जाणून कोणी उत्तर द्यावे व उत्तर देतेसमयी जे कोणी शहाणे आहेत, त्यांस पुसावे.
 किती एक लोक ज्यांचे अज्ञान दृढ आहे, ते या सर्व प्रश्नांची उत्तरे बाळकासारखी तत्काळ देतील; कारण की ब्राह्मणांचा असा स्वभावच आहे की, जर त्यांचे समजुतीविरुद्ध काही बोलले, तर ते अगदी वाईट असे समजतात. कारण की, ते मुळी आपल्यास देव समजतात. त्याचमुळे गर्व होऊन आम्ही थोर, आम्ही करतो ते चांगले, आम्हास कोण नाव ठेवणार आहे? अशा समजुतीने त्यांचे वादविवाद नाहीसे होऊन, लोक थंड झाले आहेत. एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट, हे ठरविणे त्यांस कळत नाही. एक गोष्ट सांगतो व बाकीचे माना डोलवितात, त्याचा विचार करीत नाहीत. हे अत्यंत गर्वाचे व मूर्खपणाचे लक्षण आहे. याजकरिता माझे प्रश्न साधारण नाहीत, अपूर्व आहेत व असे आजपर्यंत कोणी केलेही नसतील, म्हणून यांची उत्तरे देण्यास शास्त्री, पंडित, धर्मवेत्ते व इतर लोकहितेच्छू असतील, त्यांनी सर्व गोष्टीचा दूरवर विचार करून व सर्व कल्पना आणि तर्क ध्यानात आणून उत्तरे दिली पाहिजेत. मी रागाचे किंवा घाईचे उत्तर मागत नाही; विचाराचे व सत्याचे उत्तर मागतो.
 याकरिता जे कोणी अज्ञानाचे दास नसतील, त्यांनी मन मोकळे करून भागवताचे वाक्याप्रमाणे "मनःपूतं समाचरेत्" खरे दिसेल ते बोलावे. खऱ्याची लाज धरू नये. ज्यांणी स्वदेशाचेच हिताचे विचार केले आहेत व जे सर्व शास्त्रे जाणतात, व जे बहुश्रुत व देशोदेशीचे इतिहास जाणतात, त्यांसच हे प्रश्न सुलभ जातील, असे मला वाटते. कारण जे लोक विचारी आहेत, त्यांचे मन अज्ञानाचे दास्यत्व किंवा कोणत्याही मताचा पक्षपात करीत नाही; वास्तविकपणाने व विचाराचे धोरणाने सुबुद्धी करून ते चालतात. यास्तव माझे देशचे लोक विविध जातीचे आणि मुख्यत्वेकरून ब्राह्मणजातीचे (कारण की ब्राह्मण हिंदू लोकांचे धर्माध्यक्ष आहेत) याजकरिता त्यांस माझी अशी प्रार्थना आहे की, माझे प्रश्नांची उत्तरे द्यावी. व मी त्या गोष्टीचे 'होय' म्हणून प्रतिपादन करणार आहे. तेव्हा कोणाचा पक्ष सिद्ध होतो हे पाहू? आणि सिद्ध झाल्याअंती सर्वांनी तसेच आचरण करावे आणि स्वदेशाचे हितास झटावे ही मुख्य धर्मसुधारणा आहे.
 स्वदेशास जे हितावह ते करावे. जसे आपण मातोश्रीस वंद्य मानतो व तिच्या पोटी जे आले ते सर्व बंधुप्रीतीने वागतात. तद्वत् या जमिनीवर जे आपण आहोत ते सर्व एकमेकांचे बंधू आहोत व हा देश आपणा सर्वांची मातोश्री आहे. याजकरिता कोणी सुखी व द्रव्यवान असतील, त्यांनी बहुत लोक उपाशी मरतात व दरिद्री आहेत, त्यांचे रक्षण होण्याचा प्रयत्न करावा. आपण सर्वांनी आज दोन हजार वर्षेपर्यंत यथेच्छ सुखाने झोप घेतली व काही उद्योग केला नाही. म्हणून आता तरी जागृत होऊन काय आहे ते पाहू व बुद्धीचा उपयोग करू.
 मेल्यावर आपण एकमेकांस उपयोगी पडणार नाही. तेव्हा या जन्मात ही संधी लोकांवर उपकार करण्याची आहे, ही सोडू नये व आयुष्याचा व्यय दुसऱ्याचे हिताकरिता करावा. तो व्यय सुखकारक आहे, आणि दुसऱ्यास सुखप्राप्ती करणे हे स्वतां आपणास लहान सौख्य नाही. तुम्ही जेव्हा निर्वेध बसाल तेव्हा तुम्ही चांगले काम केले असेल, त्यांस आठवून केवढे सुख पावाल; परंतु वाईट काम केले, तर कुत्र्याचे मरणाने मराल, याजकरिता मी इतका तुम्हास विनवीत आहे.

♦ ♦


राज्यांविषयी विचार

पत्र नंबर ७८: १४ आक्टोबर १८४९

 सांप्रत काळी हिंदू लोक मूर्ख; त्यांस राज्यकारभार करता येत नाही व आपले राज्य सांभाळण्याची ताकद नाही. याजकरिता पहा त्यांस किती संकटे प्राप्त झाली आहेत की, गवरनरापासून असिस्टंट व कलेक्टरापर्यंत व कमांडर चीफपासून एनसाईन व सोजीरपर्यंत दुसरे देशचे लोक भाड्याने आणले आहेत. ते कसे म्हणाल तर त्यांनी लाखो रुपये पगार आम्हापासून घ्यावा आणि स्वदेशास जावे. त्यांची घरेदारे इकडेस काही नाहीत. त्यांचे हाती पैसा गेला तो इकडे अगदी यावयाचा नाही. अशा प्रकारचे लोक आम्हास भाडेकरी आणून राज्यकारभार करावा लागतो.
 हेच भाडेकरी जर इकडे राहतील आणि आम्हा लोकांमध्ये घरेदारे बांधतील तर एवढे दरिद्राचे कारण राहणार नाही. पूर्वी मुसलमानांचे राज्य होते, तरी मुसलमान जे इकडे आले. ते इकडे राहिले. याजमुळे ते आमचेच देशचे झाले. आणि जसे स्वदेशात सर्व श्रीमंत नसतात परंतु काही लोक श्रीमंत असतात; तसे मुसलमान श्रीमंत लोक होते व त्यांचा परकी भाव गेला. तद्वत् इंग्रज लोक इकडे राहतील, तर ते आमचे देशचे होऊन त्यांस व आम्हास काही विशेष अंतर राहणार नाही.
 परंतु सांप्रत काळी फारच विपरीत झाले आहे. आता या देशचे लोक इंग्रजांइतके काबील होऊन त्यांचेबरोबर शहाणपणास येण्यास युगे पाहिजेत; परंतु त्यांस एक युक्ती आहे की, जर विलायत सरकारशी व कंपनी सरकारशी फूट झाली किंवा काही तंटा झाला आणि इकडील गवरनर जनरल वगैरे येथील सर्व राज्य बळकावून राहिले व पुन्हा परत जाण्याच इरादा ठेविला नाही, तर एकदम आमचे लोक शहाणे होतील आणि राज्याचे अधिकारात इंग्रजांचे समागमे शिरतील व इंग्रजही आता जसे त्यांस दूर मानतात, तसे मानणार नाहीत. एक, दोन, तीन पिढ्या इंग्रजांच्या इकडे झाल्या, म्हणजे ते आमच्यातील होतील किंवा फराशीस वगैरे राज्यातील लोक यांनी हिंदुस्थानच्या दरम्यान समुद्राची वाट बंद केली, तर इकडचे इंग्रज इकडेच राहतील व मग त्यांस इकडची काळजी लागेल.
 सांप्रत त्यांस इकडची काळजी नाही व इंग्रज लोक राज्य करतात; परंतु याजमुळे किती एक जास्ती खर्च वगैरे अडचणी अशा आहेत की, इंग्रजांकरिता इंग्रजी व मराठी दप्तर बाळगावे लागते; परंतु आणखी इंग्रजांस इकडील किती एक गोष्टी समजत नाहीत. तथापि ते लोक याजपेक्षा हजारो पट शहाणे आहेत. यामुळे अडचणी असूनही लोक कबूल करीत नाहीत. कारण की, याचे शहाणपण सर्व लोकांस बुडविण्याकरिता उपयोगास येते.
 आमचे राजे असतात, ते किती मूर्ख असतात! याचे उदाहरणास बाजीराव पेशवा व सातारचा राजा व दौलतराव शिंदे ही उदाहरणे घ्या म्हणजे समजेल. सातारचा राजा जसे एखादे चित्र समजून न्यावे तसा रेसिडेंटाकडे जातो आणि घरात पाहिजे तितकी दारू पिऊन मस्त होऊन रहातो. काही न्यायकारभार करीत नाही. बसला असता तेथून लोकांनी हात धरून उचलले पाहिजे. ही त्याची शक्ती, एक पत्र सरकारातून आले, तर त्याचा जाब लिहिणे तो माहीत नाही. राज्यात खबर काय हे, हे यांस ठाऊक नाही. रयतेकरवी विद्या करविणे हे त्यांस ठाऊक नाही. फार कशाला? राजे तर केवळ पशू असतात; परंतु थोर लोकांकडे पहा की, यांस किती ज्ञान असते? दर एक थोर माणसास वकील पाहिजे. वकिलाशिवाय बोलता येत नाही. व एखादे पत्र आले, तर त्याचा जाब लिहून कामदारास दाखवत फिरतात आणि मनास येईल तसे यजमानास सांगतात.
 बहुधा असे होते की, वकीलच मालक होता. आणि मोठे लोक स्वतां मूर्ख असून त्यांजला काही समजत नही. भलतेच करतात. आणि वकील लोक हे बहुधा तंटे उत्पन्न करणारे असतात. आणि यजमानास यात गुंतवून मग आपलेशिवाय काही होऊ नये, असे करतात. जे काम व्हावयाचे नाही, ते यजमानास सांगतात की, आम्ही करतो. आणि सरकारचा अंमलदार त्यांस लांच वगैरे देऊन याजकडून होईल असे म्हणतात. व मग यजमानास असे भासवितात की, त्या वकिलाचा प्रवेश फार, आमच्याने न होईल ते काम हा करील. सर्व कामदार यांस अनुकूल आहेत. असे करून मग वकिलास जरूर पडते की, कामदारावर त्याचे पोटिस्त व यजमानास वेड लावण्यास कामदार अनुकूल आहेत. याजकरिता कामगारास कधी मेजवानी, कधी यजमानाशी भेट करून देऊन, सर्व काळ कामगारांचे आर्जव करून त्यांस लाच देतात आणि यजमानास बुडवितात. त्यांचे घरातून हजारो रुपये काढले, तरी त्यांपैकी निम्मे आपण खातात आणि निम्मे कामदारास देतात, याप्रमाणे सर्व जहागिरदार व मोठाले लोक यांची हकीकत आहे.
 कर्नाटक प्रांतात जहागीरदार वगैरे आहेत. त्यांची तोंडे माणसासारखी आहेत, म्हणून मात्र त्यांस माणसे म्हणावी. नाहीतर ते केवळ जनावरेच आहेत. त्यांचे मनास व जनावरांचे मनास काही अंतर नाही हे सर्व इंग्रज लोकांस कळते. व पोलिटिकल एजंट व रेसिडेंट हे सर्व जाणून आहेत. परंतु ते सावध आहेत. याजकरिता त्यांस राखून ठेवतात. एकदम अन्यायाने बुडवीत नाहीत; परंतु त्यांची किंमत व योग्यता समजती. किती एक सरदार असे समजतात की, कायद्यात व कानूत काही नाही. एजंट करील ते होईल. यास्तव दरबारात कधी बोलाविले, तर मनास येईल तसे बोलतात व मनास येईल ते मागतात.
 किती एक सरदार इतके मूर्ख आहेत की, ते साहेब लोकांस म्हणतात, तुम्ही देवाप्रमाणे आम्हास आहा. तुम्ही जे कराल ते होईल; अशी भाषणे ऐकून शहाणे लोक या बोलणारांची आपले मनांत किंमत करीत असतील, ते मनात समजावे. अस्तु. याप्रकाराचे आमचे लोक लहान व वेडे आहेत. त्यांस न्याय, नीती व वाकबगिरी नाही. असे असून जो बेवकूब असतो, त्यांस चांगला माणूस असे म्हणतात. ज्यास काही कळत नाही, त्यांस थोर, संभावित म्हणतात व जो अन्याय करितो, त्यांस दयाळू म्हणतात. अशा नाना प्रकारच्या वाकड्या समजुती आहेत. लोकांस अन्याय करून देतो, त्यांस म्हणतात हा थोर व भिडस्त आहे. जो सरकारचा पैसा लुटू देतो किंवा रयतेकडून लाच घ्यावयास फुरसत देतो त्यांस उदार म्हणतात. दुसऱ्याची लबाडी धरून देतो त्यांस लबाड म्हणतात व सरकार म्हणजे त्यांस असे वाटते की, जसा समुद्र; त्यातील कितीही पाणी खर्च केले, तरी ते सरावयाचे नाही, तद्वत् सरकारचा पैसा सहज खर्चावा.
 कोणी विरुद्ध म्हणाला; तर म्हणतात की, अरे तुझ्या पदरचे काय गेले? सरकारचा पदरचे जाते, सरकारास काय कमी? सरकारचे खाऊ नये, तर खावे कोणाचे? सरकारास लुटू नये, तर काय गरिबास लुटावे? या प्रकारचा पहिल्या काळचा समजुती आहेत. ज्या काळी लोक बेवकूब, श्रीमंत व राजे होते, तेव्हा ते आपल्या चाकरास पाहिजे तशी वर्तणूक करू देत होते. त्या समयीची समजूत अद्यापि राहिली आहे; परंतु आता पहिलेप्रमाणे उदारत्व, न्याय व थोरपणा नाही. आताचा थोरपणा व उदारत्व फार शुद्ध आहे. चंदुलाल लोकांची घरे बुडवून धर्म करीत होता. तसे असता त्यांस चांगला म्हणत होते. हे प्रकार लोकांनी सोडले पाहिजेत व सरकारविषयीचा वाकड्या समजुती सोडल्याशिवाय या लोकांस लायकी येणार नाही. सरकार यांचे हाती आले, तर मनास येईल तसा खर्च करतील, पैसा नाहीसा झाला, म्हणजे लोकांची घरे लुटतील. असे गैरशिस्त हे लोक आहेत. यांस कायदा, कानू व शहाणपणा नाही. याकरता राज्य करण्यास इंग्रज लोक जरूर झाले.
 आताप्रमाणे कधी कोणी पूर्वी राज्य केले नव्हते. रामाचे राज्य चांगले म्हणून कीर्ती आहे; परंतु हल्लीचे राज्यात एक कमी आहे की, लोकांस रोजगार व श्रीमंती नाही; परंतु शहाणपण नाही म्हणून या गोष्टी नाहीत. शहाणपण असेल व लोकांचे हाती राज्य असेल, स्वदेशीय अंमलदार असतील आणि त्याजकडून जशी इंग्रजाकडून इकडे निष्पक्षपाताने वर्तणूक होते अशी होईल, तर इंग्रजांचे राज्याहून शंभरपट सुख होईल, आणि मग रामराज्यही मागे सरेल. यात संशय नाही. परंतु असे होण्यास लोकांस समजू लागले पाहिजे. व कायदाकानू ठाऊक नाहीत म्हणून वकील लोक वगैरे फसवितात. तसे लोक नसून जाचा त्यांस आपला प्रपंच सावधगिरीने करता येतो. इतके झाल्याअंती याच कायद्याने व याच नियमाने हे लोक राज्य बहुत उत्तम करतील. इंग्रज करतात; पण त्यांस परकीपणा आहे, व स्वदेशीय लोक रोजगार नाही याजमुळे एकंदर भिकारी झाले.
 परंतु हे जर उत्तम झाले, जातिअभिमान सोडून सर्व लोकांचे हितास झटणारे झाले; सर्वांस विद्या करविण्याचा यत्न करू लागले. ब्राह्मण श्रेष्ठ इत्यादी मूर्ख समजुती सोडून राज्य करू लागले, महार, रामोशी, कैकाडी, कोमटीदेखील यांनी सुधारले आणि मोठे कामाचा लायक झाले, तर ईश्वर कृपा करणार नाही असे नाही.

♦ ♦


इंग्लिश सरकार

पत्र नंबर ८९: २० जानेवारी १८५०

 आमच्या लोकांच्या रीती अगदी बदलल्याशिवाय या देशाचे हित होणार नाही व या लोकांस स्वतः राज्य चालविण्याचे सामर्थ्य असल्याखेरीज इंग्रज लोक या देशातून गेले तरी उपयोग होणार नाही. पुन्हा गर्दी होईल व बेबंदी, अंदाधुंदी, भालेराई, होळकरी गर्दी व पेंढारी अशा गोष्टी पुनरपि होतील आणि कोणाचा जीव व घरदारही निर्भय राहणार नाही. जो जबरदस्त त्याचे हाती सर्व जाईल व जो निर्बल असेल तो उपाशी मरेल. सर्व त्याचे हरण होईल.
 यास्तव सूज्ञांनी इंग्रज जाण्याची इच्छा कदापि करू नये. याप्रमाणे सरकार व याप्रमाणे चांगले सुधारलेले लोक हिंदू लोकांस सोबतीस कदापि मिळणार नाहीत. इंग्रजांचे गुण पाहून हे लोक केही तरी शिकतील; परंतु याचे दरम्यान इंग्रज लोक हिंदू लोकांस अगदी भिकारी करू लागले, तरी इंग्रज सरकारशी भांडून ज्या ज्या कायदेशीर तजविजी आहेत, त्या करीत जाव्या. जसे मोठ्या चाकऱ्या हिंदू लोकांस देत नाहीत व हिंदू लोकांशी बहुत भेद ठेवतात. हे मोडण्याचा यत्न केला असता प्राप्त होईल. आणि भेद मोडतील हे साध्य आहे. परंतु अगदी इंग्रजांचे राज्य जाऊन हिंदूचे होणे म्हटले म्हणजे पुनरपि हिंदू लोकांस मूर्ख करणे आहे. अस्तु.
 हे ईश्वरही करणार नाहीच. कारण की, अशा अघटित घटना होणे त्या माणसांच्या कृतीने होत नाहीत; ईश्वरसत्तेने होतात. जेव्हा हिंदू लोकांचा मूर्खपणा जाईल तेव्हा ईश्वर इंग्रजास या देशातून जाण्याची आज्ञा करील. जेव्हा ज्वर जातो तेव्हाच मुखास रुची येते. असा प्रकृतीचा स्वभाव आहे. ही गोष्ट त्वरित सिद्धीस जाणार नाही. हिंदू लोक आज आंधळे आहेत. ते डोळस व्हावयास काय उपाय करावे? हे कळविणे योग्य आहे. असे जाणून हिंदू लोक जे आपले स्वदेशीय परमप्रिय होत, त्यांस मी उपदेश करतो. हा त्यांनी लक्षात आणावा. माझी निश्चयरूप खात्री आहे की, असे लोक झाल्याशिवाय हे लोक कदापि सुधारणार नाहीत.
 हे कोणते म्हणाल, तर प्रथम ज्ञान मिळविणे. ते ज्ञान कोणते, वेदांचे ज्ञान नव्हे. स्वधर्मसंबंधी जी पुस्तके आहेत, त्यातील सारांश व जो बोध साधुसंत इत्यादी लोकांनी सारासार विचार करून सांगितला आहे. त्यावरून ईश्वराची दृढ भक्ती व पवित्र अंतःकरणाने ध्यान करावे. हे ज्ञान प्रथम पाहिजे. हे या लोकांस नाही. कोणी ढोंगाने देवपूजेची भांडी मांडून सकाळी प्रहरभर पूजा करीत बसतो; परंतु देवाविषयी त्यांस लेशभर ज्ञान असेल तर शपथ! अंतःकरण पवित्र नाही, नीती नाही. केवळ ढोंगी गारुड्याचे जसे पेटारे असतात, तद्वत् ते संबळ्या मांडून बसतात, तर असा प्रहर दोन प्रहर बसून वेळ घालवला, तर उपयोग काय? त्यात ईश्वराची पूजाही झाली नाही, उद्योगही झाला नाही. केवळ तो आयुष्याचा वेळ व्यर्थ मेला असे जाणावे.
 हिंदू लोक हे धर्म म्हणून किती उपद्व्याप करतात, याचा ठिकाण नाही, कोणी जन्मापासून लुच्चा, लबाड, नित्य घरे बुडविणारा व खोटी शपथ करणारा असतो; परंतु सकाळी उठून बागेत जाऊन स्वहस्ताने तुळशी तोडून नेमाने आणतो. हा नेम कधी टळत नाही. तसे अग्निहोत्री हे नाना प्रकारच्या खटपटी करतात. विस्तव पेटवून त्याचे आराधनेत वेळ घालवितात; परंतु त्यांचे अंतःकरणाची शुद्धता नसते, व त्यांस नीती नसते. त्यांचे आयुष्य केवळ कर्मठपणात जाते. यास्तव त्यांच्याने दुसरा काही उपयोग घडत नाही. यांस एक आणि दोन किती म्हणून पुसले, तर तीन समजत नाहीत. व्यवहारातील त्यांस गम्य नसते. लोक त्यांस पवित्र समजतात आणि पैसा देतात; म्हणून त्यांचे रक्षण होते. नाही तर ते कशाचे उपयोगी नाहीत. लोकांस उपयोगी त्यांच्याने काही व्हावयाचे नाही.
 असेच भट व शास्त्री हे तर महामूर्ख होत. गोंधळी बरे, पण शास्त्री अधिक मूर्ख. त्यांस लिहिता येत नाही; वाचता येत नाही; व्यवहार कळत नाही वा हिशेब समजत नाही. कोणी पुसले की, तुम्ही जन्मापासून केले काय? तर ते म्हणतात की, कृष्णातीरी अमक्याचे घरी जेवणाची सोय होती, तेथे जेवीत होतो व आता बारा वर्षे अधयन करून तयार झालो आहे. कोणाशीही वाद करू, पोथ्या सर्व पाठ आहेत; साठ हजार कौमुदी अवगत आहे. उपस्थिती चांगली आहे. याप्रमाणे हे एवढाले मोठे पंडित असतात; पण त्यांस यत्किंचित ज्ञान नसते. त्याजकडे काही कारभार सांगा आणि मग त्यांचा चमत्कार पहा की, ते किती भितील, किती गोष्टी लोकांस पुसतील! त्यांस लिहिणार दुसरा पाहिजे, हिशेब करता येत नाही, स्वतः बुद्धी नाही, शहाणपण नाही, कोणत्याही कामाच्या उपयोगी ते पडत नाहीत.
 जसे जन्मास आले म्हणजे अज्ञान, तसेच ज्ञान असून स्वतः उपजीविका मिळविण्याचे सामर्थ्य नाही. त्यांस कोणी असा श्रीमंत पाहिजे की, नेहमी पाचशे रुपये घरी पोचवील आणि शालजोड्या देईल. असो. असा मान करून कोणी त्यांस जवळ ठेवले, म्हणजे मग शास्त्रीबाबा बहुत शोभतात. परंतु श्रीमंताचा आसरा नसू द्या, म्हणजे मग त्यांची काय अवस्था होईल ती पहा. हे काय करतील? यांस काही व्यवहारी विद्या येतच नाही. व्यापारधंदा काही कळत नाही व कायदाकानू काही माहीत नाही. असे गोळे असतात. अशा लोकांचे तुम्ही काय कराल?
 बरे, लोकांस उपदेश करण्यास योग्य म्हणावे, तर तेही नाही. त्यांचे हातून चांगला उपदेश व्हावयाचा नाही व धर्माची सुधारणा व्हावयाची नाही. केवळ उकिरड्याचा ढीग आणि त्यांचे पटणे सारखे आहे. मला कोणी तरी दाखवावे की, शास्त्र्यांचा अमुक उपयोग आहे. काही दिसत नाही. ज्या देशात असे लोक मूर्खशिरोमणी आहेत, तेथे दरिद्र, कुनीति, अज्ञान, मूर्खपणा हेच वृद्धिंगत होत जातील. व हल्लीचे गृहस्थ जे आहेत, ते बदलून दुसरे प्रकारचे झाले पाहिजेत. यांच्या आधारावर हे सर्व मूर्खपणा वाढवितात. सरकारचा आसरा आता नाही; परंतु रयतेचा खुशीचा आसरा अजून फार आहे. तो देऊ नये असे या गृहस्थांस कळले पाहिजे.
 कोणी गृहस्थ एका भटापासून एक चंडी म्हणवितो, आणि त्यांस रुपया देतो. कोणी गृहस्थ शास्त्र्याचे बोलणे करवितो व त्यांस शालजोडी देतो व कोणी अग्निहोत्र्यास इनाम देतो. याप्रमाणे देऊन निरुपयोगी माणसे वृद्धिंगत करतात. हेच देणे उपयोगास लागले, तर किती फायदा होईल? द्रव्यवान असेल त्याने आपले द्रव्य नदीत टाकले, तरी तो व्ययच झाला व व्यापारात ठेविले किंवा धर्म केला, तरीही व्ययच झाला; परंतु चांगले कोणते, याचा विचार करावा. एक लबाड कांबळेबाबा म्हणून उत्पन्न झाला. त्याने चार लुच्चे जमा करून ढोंग उभे केले. ते मुळी पुण्यात उभे केले. त्याचे मूळ प्रसिद्ध आहे व त्या बाबाचे दुराचरणही प्रसिद्ध आहे. तो चार मजूरदार उभे करून ढोलकी, झांज, वीणा वाजवीत लोकांची कानठळे बसवीत तो पुण्यात ओरडत फिरे. याप्रमाणे तो लबाड ढोंगी सर्वांस ठाऊक असून त्यांस पैका मिळाला. व लोक त्याचे आचरण न पाहता, व त्याने आपली स्त्री त्यागिली व आणखी किती लबाड्या केल्या, त्या मनात न आणता त्याचे पायावर डोकी ठेवतात, त्यास पैसा देतात व फुले घालितात. हे तमाशे पुण्यातील सर्व लोकांस माहीत आहेत. जसे तमाशाचे फडावर लोक मिळतात, तसे या बाबाचे भोवते तुळशीबागेत लोक जमत आणि त्याची कोणी थट्टा करीत; परंतु भजन करणारे शेकडो होते. म्हणून त्यांस द्रव्य मिळाले. तो बाबा बडोद्यास गेला व मुंबईस गेला; परंतु त्याने द्रव्यच मिळविले. कोठे भिकारी झाला नाही. तस्मात् सर्व ठिकाणी हिंदू लोक सारखे मूर्ख आहेत.
 म्हणून धर्म कोणास कळत नाही. ईश्वराचे भय कोणाचे मनात नाही. परधर्म त्यांस वाईट वाटतो; परंतु एक चमत्कार पहा की, जो प्रथम स्वधर्म टाकून दुसरा धर्म घेतो, त्याची हेळणा फार होते. जो मूळचा परधर्मी किंवा दोन चार पिढ्यांचा आहे, त्याचे द्वेष लोक करीत नाहीत. याचे कारण की लोकांस धर्माचा द्वेष येत नाही; परंतु चाल व जात मोडण्याचा येतो. धर्म कसा काय हे ते जाणत नाहीत. रूढी जाणतात. व त्या रूढीविरुद्ध जे चालतात, सर्वांस शहाणपण येऊन ते धर्मात्मे झाले पाहिजेत.
 नीती, ज्ञान विस्तीर्णतेने लोकामध्ये प्रसिद्ध झाले पाहिजे. व ढोंगी लोक नाहीसे झाले पाहिजेत. वरती उदाहरण एकच लिहिले आहे. परंतु असे किती एक ढोंगी लोक या हिंदुस्थानात फिरून गृहस्थांचा पैसा खात आहेत त्यांचा उपयोग काही नाही. हे लोक कमी होऊन, वास्तविक विद्वान वाढून ते आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांस करतील व जे लोकांची नीती, व धर्म व सदाचरण वृद्धी करण्याचा प्रयत्न करतील, त्यांस मात्र लोकांनी द्रव्य देऊन त्यांचे चालवावे.
 असे न करतील, तर मग त्यापेक्षा मजुरी करणारे बरे. ते आपल्या पोटास मिळवून खातात. परंतु असे लोक फुकट खावयास योग्य नाहीत. जे उगेच ढोंग माजवून बसतील आणि लोकांस सांगतील की, आम्ही देवाजवळ पारायण केले, आम्ही उपास केले. आम्ही प्रदक्षिणा घातल्या. आम्ही नवस केला. आम्ही तपश्चर्या केली. आम्ही पंढरपुरी राहतो, आम्ही आळंदीस राहतो, व आम्ही यात्रा करतो; तर या लोकांस देण्याचा संबंध काय?
 एकाने पंचविसावे वर्षी संन्यास घेतला आणि मग यात्रा करण्याकरिता पैसा मिळविला. मला वाटते की, हा मूर्ख संन्यासी आहे. याला रोजगाराने पैसा मिळविण्याचा टाकून संन्याशी व्हावयास कोणी सांगितले? बरे, संन्यासी झाला, तर मग भीक मागत का फिरावे? तसेच यात्रेकरू, तसेच लग्ने करण्याकरिता पैसा मागणारे, हे सर्व लोक बेवकूब आहेत. हे सर्व उद्योग करून पोट भरतील तर चांगले व गृहस्थांनी असा विचार द्रव्ये करून कदापि वृद्धिंगत करू नये.
 मला मोठा चमत्कार वाटतो की, एक मनुष्य येतो आणि म्हणतो- माझे लग्न व्हावयाचे आहे; मला दोनशे रुपयांचे साहित्य पाहिजे. ज्या मनुष्यास साहित्य नाही; तो लग्न करतो कशास? तसेच बैरागी शंभर आसामींचा मेळा घेऊन फिरतात. ते सगळे जर चाकरी ठेविले, तर एक रिजमिंट चांगले भरेल, असे ज्वान बळकट असतात, आणि म्हणतात की, आम्ही यात्रा करीत फिरतो व त्यांस लोक पैसा देतात. पण ही ढोंगे मोडून सर्व लोकांस शुद्धीवर आणले पाहिजे. तसेच विद्वान जे लोक आहेत, त्यांनी स्वदेशाचे व्यवहार, रोजगार व द्रव्य यांची वृद्धी कशाने होईल? जगात वर्तमान काय चालले आहे? लोकांची दशा काय झाली आहे? याचा विचार केला पाहिजे. केवळ व्याकरण पढून जन्म घालवून उपयोग नाही. ही रीत मोडेल, तेव्हा या देशाची सुधारणा होईल, हे सत्य आहे.

♦ ♦


इंग्रज सरकार

पत्र नंबर ९४

 इंग्रज सरकार या देशात आहेत, याविषयी लोक उघड नाही, तरी मनातले मनात कुरकुर पुष्कळ करतात व मुख्यत्वेकरून भट, पंडित, शास्त्री हे तर फार हैराण आहेत; परंतु माझे मत असे आहे की, या देशास हेच सरकार ठीक आहे.
 प्रथम असे पहा की, मागले सरकार किती वाईट व मूर्ख होते. जिकडे-तिकडे जुलूम होत होता. हे हल्ली जे इंग्रज सरकारचे पदरी मराठे अंमलदार आहेत, त्यांची वर्तणूक कशी आहे, हे पाहिले म्हणजे ध्यानात येते. याच प्रकारचे मागे सर्य लोक होते. त्यांनी देशाची सुधारणा व विद्यावृद्धी काहीच केली नाही. फक्त भट, वैदिक व मूर्ख लोकांचे पोषण करून रक्षिले. तसेच पेंढारी, रामोशी, काटक, डाकवदे, ठक, चोर इत्यादिकांस राखिले आणि देशात लूटसांड पुष्कळ करीत.
 होळकर स्वतः श्रीमंताचा चाकर असता त्याने पुणे लुटिले, व लोकांचे हाल केले. अशा सरकारास कोण चांगले म्हणेल? जो बळकट असेल, तो मात्र पोटभर खाई. पाहिजे त्याने शेतभात, गांवघर लुटावे; दादफिर्याद कोठे लागत नव्हती. हल्ली हैदराबाद, ग्वाल्हेर येथे वर्तमान काय आहे ते पहा, म्हणजे मागील राजाचे सर्व लक्षात येईल.
 तेव्हा मागील राज्य अगदी वाईट होते हे सिद्ध आहे. याशिवाय हल्ली आमचे लोकांस राज्य मिळाले तर तीच अवस्था करतील. तेव्हा हेही उपयोगी नाही. बरे, दुसरे देशचे लोक मोगल, फराशीस वगैरे आले, तर तेही वाईट लोक आहेत. यास्तव इंग्रज हेच सुधारलेले चांगले लोक आहेत. यांचे राज्य या देशात आहे, हेच चांगले. व ईश्वराने हे आम्हास चांगले राजे दिले आहेत. हे खचित दिसते. याहून चांगले राजे आम्हास कदापि मिळणार नाहीत. याशिवाय हे सरकार लोकांची सुधारणा करण्याकरता अत्यंत मेहनत करीत आहे. त्यांस विद्या शिकविते. तीही कशा रीतीने शिकविते की लोकांत तर जुलूम वाटू नये.
 त्यांची देवस्थाने वगैरे सर्व कायम पहिल्यप्रमाणे ठेवून त्यांची मर्जी राखून, त्यांस वाईट न वाटता शिकविण्याची तजवीज चालविली आहे. इतक्या युक्तिप्रयुक्तीने कदापि कोणी राजा या लोकांस शहाणा करणारा होणार नाही. इंग्रज लोक अत्यंत सुधारलेले म्हणून या रीतीने त्यांनी विद्यावृद्धीचे व लोकसुधारणेचे व त्यांच्या जुन्या मूर्ख समजुती जाण्याचे काम चालविले आहे. इतकी तजवीज कोण करील? आता येऊन जाऊन इतकेच म्हणतात की, अद्यापि ते लोकांस मोठ्या चाकऱ्या देत नाहीत; परंतु मोठी चाकरी देण्यास लायक लोक अद्यापि झाले नाहीत.
 ज्या लोकांस लाच खावा हे पाप वाटत नाही, ज्यास ब्राह्मणापेक्षा कुळंब्याचा जय कमी व्हावा, असे वाटते; त्यांस विद्यावृद्धी व्हावी असे वाटत नाही, लोकांस कायदे कोणचे असावे. पहिले शास्त्र कोणत्या योग्यतेचे व पुढे कायदे कोणत्या योग्यतेचे असावे, हे समजत नाही; व कायदा राज्यास असावा, हे अवश्य आहे किंवा नाही; हे राजास कळत नाही; व आपले जातीचा अभिमान धरावा हे वाटते, व पक्षपात करावा हे वाटते, व फौजेस कवाईत पाहिजे, हे वाटत नाही. सुधारणा काय पाहिजेत, हे माहीत नाही; व्यापारवृद्धी होण्याची रीती ठाऊक नाही; अशा लोकांस चाकरी कशी देतील? ज्या काळी हे लोक सुधारतील, त्या वेळी खचित त्यांस मोठ्या चाकऱ्या देतील.
 या लोकांस सरकार म्हणजे लोकांचा कारभार करणारे आहेत, त्यात अन्याय केले, तर सर्व लोकांचा घात होईल, हे त्यांस वाटत नाही; सरकारास लुटावे, सरकारचा पैसा खावा, सरकारचे काम जहाले तर जहाले, न जहाले तर न जहाले असे त्यांस वाटते; अशा लोकांस मोठी चाकरी काय उपयोगी? यास्तव हे लोक सुधारल्यावर त्यांस अधिकार देण्यास कमी करणार नाहीत हे लोकांनी पक्के समजावे. याजकरिता सरकारचे कृपेस पात्र होण्याची इच्छा मात्र धरावी.
 परंतु सांप्रत काळी लोक अगदी उलटे करीत आहेत. लाच खातात, लबाड्या करतात, विद्यावृद्धीस मदत करीत नाहीत; सर्व सरकारने करावे, असे इच्छितात. व जर सरकार चांगले करीत असेल तर वाईट समजतात, व सरकारास लोक सुधारण्याचे कामात अगदी मदत करीत नाहीत. सरकारने आज जर असे म्हटले की, अनुष्ठानाचा व अमुक देवस्थानाचा खर्च व्यर्थ होत आहे. तो मोडून अमुक विद्यावृद्धीचे काम करितो, तर लोकांस पसंत होणार नाही. दक्षणा पहिली मूर्ख रीतीने देत होते, तिचा काहीच उपयोग नव्हता. तेच रुपये जर नीट खर्च केले, तर बहुत उपयोग होऊन लोक शहाणे होतील; परंतु असे जर केले, तर लोक खुषी नाहीत.
 लोकांस असे वाटते की, पहिला मूर्खपणा कायम ठेवावा; आळशीपणाचे स्वभाव कायम ठेवावे. म्हणजे ते सरकार चांगले, परंतु लोकांनी या दुर्बुद्धी सोडून देऊन सरकारास हरएक कामात मदत करावी, हे योग्य. म्हणजे सरकारास आनंद होतो आणि त्याचे हातून सुधारणा पुरतेपणी होते. हल्ली फार तर काय परंतु जेथे म्हणून सरकारी शाळा आहेत, तेथे लोकांच्या कमिट्या आहेत, परंतु त्या पंचांस पुसले तर कदी त्यांनी शाळा पाहिली नाही, असे सांगतील व शाळा आहे किंवा नाही, याविषयी संशयात्मक बोलतील. जे सुपरिटेंडेंट येतात, त्यांस पंचांस शोधावे लागते व बळेच परीक्षेचे दिवशी उभे करतात, ते मनापासून मेहनत करीत नाहीत.
 कोणी जर सरकारी कामदार असला, तर त्यांस सरकारी काम विशेष नसले, तरी तेच ओझे वाटते व दुसरे काम करावयास कंटाळा येतो. जर कामदार तरुण असला, तर लबाडीचे कामात, नाच तमाशात रात्रंदिवस काळ घालवितो. त्याच्याने सरकारी काम देखील चित्त घालून करवत नाही, मग शिवाय काम होणार कोठून? व जर तो म्हातारा जुना कपी असला, तर त्यांस सरकारी काम आटपून घरी जाऊन स्नानसंध्येत संध्याकाळी व प्रहरभर सकाळी गोष्टी सांगत देवतार्चन पुढे मांडून बसावे लागते. त्यांस सरकारी कामाशिवाय दुसरे काम पाहणे व शाळा पाहणे, हे तर असे वाटते की, व्यर्थ काळ गेला. यात धर्म नाही, पुण्य नाही, देवपूजाही नाही. तेव्हा कशास करा?
 देवपूजा प्रहरभर केली, म्हणजे चार भिक्षुक वगैरे मूर्ख येतात, ते म्हणतात की, 'वाहवा! दादासाहेब मोठे भक्तिवान, पुण्यशील. दोन प्रहर स्नानसंध्येत घालवितात व सरकारी काम संभाळून नित्य नेमाने हे चालवितात.' अशी स्तुती करतात. ती गोष्ट लागून त्याला शाळा पाहण्याचे मोठे संकट पडते.
 याप्रमाणे लोकांचे उदासीन स्वभाव आहेत. विद्यावृद्धीविषयी व शिवाय किती एक दुसरे प्रकरणांत असेच आहे. सरकारास मदत मिळत नाही. यास्तव सरकारचा उपाय नाही. तर हे स्वभाव लोकांनी सोडले पाहिजेत.

♦ ♦


डौल व नेटिव राजे

पत्र नंबर ९८

 आमचे लोकांची बुद्धी अद्यापि सुधारली नाही. यामुळे त्यांस अद्यापि असे वाटत नाही की, आम्ही मूर्ख आहो.
 इंग्रज वगैरे युरोपियन आपणास केवळ मूर्ख म्हणतात व आम्हास दुसऱ्यापासून बुद्धी शिकोन घेतली पाहिजे. एखादा सरदार याचा डौल पाहिला, म्हणजे त्यांस असे वाटते की, वाहवा, हा मोठा सरदार, याचा डौल फार, हा थोर. परंतु त्याची योग्यता व गुण पहात नाहीत. फक्त त्याचे सोनेरूपे पाहून त्यांस चांगला म्हणतात. गाईकवाड यांचा डौल पाहून सर्व लोक म्हणतात की, पहा यांची गजान्त लक्ष्मी, आणि इंग्रज हे भिकारी यांस स्वारी नको, चोपदार, हत्ती, उंट काही नको. असे म्हणतात.
 पण कोणी असे मनात आणीत नाही की, या डौलाचा काही उपयोग नाही. इंग्रज लोक डौलाची गरज ठेवीत नाहीत; फक्त कामाची गरज ठेवतात. बरे, निरुपयोगी डौल लोकांस दाखवावयास बाळगत नाहीत. दहाच माणसे बाळगतात; परंतु चांगली, सर्व उपयोगी पडावी अशा रीतीची बाळगतात; परंतु आमचे राजे डौली त्यांस आम्ही थोर, हे स्वारी मोठी करून दाखवावयाचे असते; परंतु पराक्रमहीन, गुणहीन, त्यांस कोणी पुसत नाही. गोंधळी व ते बराबर. याजमुळे ते दहाशांच्या खर्चात ५० माणसे बाळगतात; परंतु ते काही उपयोगी पडावयाचे नाहीत. असे असतानाही देशातील आळशी लोक त्यांस चांगले म्हणतात. हे केवढे आश्चर्य आहे!
 कोणास हा विचार कळत नाही की, हे गोंधळी, वऱ्हाडी, दिसतात चांगले; सोने, रुपे, हिरे यांचे दागिने अंगावर घालून नटतात व सजतात, परंतु त्यांच्या तोंडात कोणी मारली, तर त्यांचा हातदेखील वर होत नाही. इतके अज्ञानी व अशक्त असतात. मग त्यांचा उपयोग काय? याजकरिता हा डौल काही उपयोगी नाही. राजाने जितका लोकांच्या रक्षणार्थ खर्च लागेल. तितकाच करावा. अधिक केला, तर तो दोषी व चोर होतो; परंतु ही गोष्ट राजे मनात आणीत नाहीत. आणि राज्य हाती लागताच लोकांची गरज सोडून देतात आणि मनास येईल तसे उडवितात. त्यांस त्याची लाज वाटत नाही. याजकरिता डौलाची प्रीती अगदी करू नये तर बरे.
 फौज पाहिजे व उपयोगाच्या सर्व गोष्टी पाहिजेत. तसेच आमचे लोक धर्म करणे, तोही उपयोग मनात आणून करीत नाहीत, याजमुळे बहुत पैसा व्यर्थ जातो; परंतु लोक असे मूर्ख आहेत की, जो मनुष्य अशी पैशाची उडव करितो, त्यांस चांगले म्हणतात व आळशी लोकांचे पोषण व निरुपयोगी व्यय पाहिला, म्हणजे त्यांस चांगले म्हणतात. अशा गोष्टीस चांगल्या म्हणणारांत प्रमुख कसबिणी आणि भट आहेत. हे लोक बहुत लोकांस वेडे करतात. पैशाची उधळपट्टी जितकी होईल, तितकी त्यांस हितावह आहे, म्हणून उत्तेजन देऊन उधळपट्टी करतात; मग त्यात जरी मोठाले अनर्थ झाले, तरी चिंता नाही; परंतु आपले पोट भरले, म्हणे झाले. कदाचित म्हणतात, त्याने इतका अन्याय केला; परंतु ब्राह्मणभक्त व ब्राह्मणाचे घरात सर्व पैका घातला. तस्मात् तो पुण्यवान प्राणी आहे.
 याजमुळे जो आता लोकांमध्ये संभावितपणे वागतो, त्यांस मुख्य गोष्ट ही करावी लागते की, भटांची मर्जी राखिली पाहिजे, भटास देणे हे मोठे लौकिकाचे धोरण आहे. जरी कोणास असे वाटले की, भटास देणे निरुपयोगी आहे. तरी त्याचा उपाय नाही. ही लौकिकाची गोष्ट आहे. जर भटास दिले, तर लौकिक होतो. 'धर्मात्मा धर्मात्मा' म्हणून भट उठवितात; नाही तर निंदा करतात. गाईकवाडास म्हणतात की, तेरा हजार रुपये इंग्रजी शाळेस दिले, ते भटास देते, तर बरे होते. धर्म करावयाचा टाकून शाळेस पैसा कशास दिला? असे म्हणतात. तात्पर्य, शाळा घालणे, विद्या वाढविणे हे त्यांस धर्मकृत्य वाटत नाही. टोणपे भटास लौकिकाकरिता देतात, त्यांस धर्म म्हणतात.
 याजमुळे असे सिद्ध होते की, ब्राह्मण आपले पोट भरावयाचे मात्र उद्योगात असतात. काही उपयोगी काम न करिता व विद्या न करिता फक्त शास्त्रीबुवा, मोठे थोर, म्हणून बसल्या जाग्यावर जो देईल तो धर्म, असे समजतात. शाळा घालणे हा धर्म त्यांस वाटतच नाही. हा केवढा चमत्कार आहे? प्रथम त्यांस असे वाटते की, शिकावयाचे काही राहिलेच नाही. संहिता पाठ म्हणतो, आता विद्या शिकावयाची राहिली काय? असे वाटून त्याशिवाय विद्या शिकविण्यास कोणी पैसा देईल, तर त्यांस दुःख वाटते. आणि व्यर्थ पैसा टाकला असे वाटते.
 परंतु या मूर्खास असे कळत नाही की, पाठ म्हणणे व अक्षरे तीन तीन वेळा उलटसुलट म्हणणे ही विद्या नव्हे, हा मूर्खपणा आहे. यास्तव असा मूर्खपणा वाढविणारे, त्यांस द्रव्य देऊन पाठ म्हणणारे मात्र पढविले, असे होईल. नवीन विद्या काय शिकविली, नवीन इतिहास त्यांस काय कळला व लोकातील दुर्गुण त्यांनी कोणता कमी केला, नवीन शोध त्यांनी काय लाविले, हे पहावे. फक्त जेथे राहतील तेथे पुष्कळ श्राद्धे करवतील; क्षीर व दक्षणा मिळवतील. एवढा मात्र या विद्वानांचा उपयोग आहे. हे विद्वान कसे, हे कोणी विचार करून पहात नाही.
 जे फक्त पाठ म्हणविणारे, अक्षरशत्रू, अर्थ काही कळत नाही, धड व्यवहारप्रकरणी बोलता येत नाही, त्यापासून राज्याचे विचार व लोकांस चांगल्या रीतिभाती व शहाणपण लावणे कसे होईल? मूर्ख कुळंबी, शेतभात करणारे व बिगारी याहूनही निरुपयोगी भट आहेत, त्यांस विद्वान म्हणतात. आणि असली विद्या वाढावी, म्हणून इच्छितात, ही चूक आहे. आजपर्यंत ही विद्या वाढून लोकांची घरे बुडाली. इंग्रज लोक इकडे येऊन आम्हास शिकवू लागले, आम्हास शहाणपण नाहीसे झाले; आम्हास काही ठाऊक नाही, हे भटाचे विद्येचे परिणाम झाले. जर हे लोक खरी विद्या म्हणजे ज्ञानाचा शोध करावयाचा तो करिते, तर इंग्रज इकडे येण्याचे पूर्वी आम्हीच त्यांचे देशात का गेलो नसतो? परंतु त्यांचे देशाची वार्तादेखील इकडे ठाऊक नाही. मग जाणार कोठून? वास्तविक विद्या काय ती त्यांस कळत नाही व पुढे पाऊलही टाकीत नाहीत. आपसांत रडत बसतात; परंतु विचार कोणीच करीत नाहीत. लग्नाचे आमंत्रण केले, तर पाचशे लोक येऊन चार घटका येऊन बसतील; परंतु विचाराचे सभेस जमावयाचे असेल तर एकही येणार नाही व एकाच्यानेही भाषण व विचार सयुक्त होणार नाही.
 असे हे लोक निर्बल व वेडे झाले. मग त्यांच्या तोंडात प्रथम मुसलमानांनी मारली. नंतर इंग्रजांनी मारली, याचे आश्चर्य काय आहे? त्यांच्याने आपले रक्षण होईना, उगेच बसवेना, आपसांत भांडू लागले. चोऱ्या, दरोडे घालू लागले. रोज स्वतः दरोडे घालू लागले. तेव्हा त्यांचे पारिपत्य करण्याकरिता इंग्रज यांची योजना ईश्वराकडून ये देशात झाली, हे सर्वोत्कृष्ट आहे. लोकांनी असे जाणावे की, हे लोक आम्हास उत्तम गुण व चांगल्या नीती व विचार व विद्या देऊन जातील यात संशय नाही.

♦ ♦