Jump to content

लोकहितवादींची शतपत्रे/६. हिंदूंचे आर्थिक जीवन

विकिस्रोत कडून









६. हिंदूंचे आर्थिक जीवन










आर्जवीपणा व डौलीपणा

पत्र नंबर १८

 सांप्रत काळी दोन दुर्गुण हिंदू लोकांत फार उत्पन्न झाले आहेत. एकाचे नाव दिवाळखोरी व दुसऱ्याचे नाव गुलामगिरी; अशी आम्ही त्यांस नावे ठेवितो. याहून दुसरे शब्द आम्हास सुचत नाहीत व जे या दुर्गुणानुगामी आहेत त्यांनी कीर्ती किंवा धन संपादन केले, असे लोकांस वाटून त्यांचा आचार अधिकाधिक वृद्धिंगत होत चालला आहे.
 आम्हास मोठा चमत्कार वाटतो की, ज्या पुरुषास एक महिन्याचे वीस रुपये मिळत आहेत त्याने थोराचे नादी लागून तीस रुपयांचा खर्च करावा, यात काय कीर्ती आहे? परंतु असे करणाराचे मनात येते की, "साखरेचा खाणार, त्याला देव देणार." अशी म्हण लोकांत चालत आली आहे, परंतु मला तिचा खरेपणा काही वाटत नाही. गरिबाचे मनात येते की, मी थोरासारखा वागून त्यांचे मंडळीत मिरवेन; आणि तेणेकरून माझी मान्यता वाढेल. परंतु अशा डौलाने योग्यता चढत नाही. इतकेच होते की, तोंडावर कोणी मूर्ख म्हणत नाहीत. निष्पक्षपाती असेल, तो तोंडावरही म्हणतो. बाकी सामान्यतः पाठीमागे म्हणतात.
 आता बहुत लोक असेही पाहण्यात येतात की, पाच रुपये महिन्याची मिळकत आणि पंधरा रुपयांचे त्यांच्या डोकीला पागोटे. एक म्हण आहे की, "मिजाज बादशहाची आणि अवलाद भडबुंजांची" अशी ते वहिवाट करीतात आणि पैसा नाहीसा झाला म्हणजे काही कामकाज वगैरे असेल तर लाच वगैरे घेऊन किंवा कोणास फसवून, बाता मारून, लबाड्या करून चार रुपये उपटतात. त्याजवर पोट भरावे व ते नाही तर बापआई याजवळ काही संपदा असली तर घरात उचकाउचक करावी; व तेही नाही तर शेवटी बाहेर चोऱ्या कराव्या, मग अब्रू जाईल ती जाईल; राहील ती राहील.
 परंतु त्यांचे लक्ष्यांत असे वागत नाही की, वस्त्रप्रावर्ण, डौल आणि ढोंग यात थोरपणा काही नाही. आपले मिळकतीप्रमाणे आपण खर्च करावा. थोरांचे गुण घ्यावे. पण त्यांचा खर्च आपल्यास काय होय? थोरांनी विहिरीत उडी टाकली तर आपण कशास टाकावी? हे त्यांस कळत नाही. ते थोरांची बरोबरी करण्यास जातात व थोरांनी एके ठिकाणी पाच रुपये खर्च केला, तर आपणही करतात. आणि असे मनात आणीतात की, यांचे बरोबरीने खर्च केला, आता आम्हास याची योग्यता आली, असे लोक समजतील. परंतु जाणणारे आहेत, ते आपल्या मनात यांस मूर्ख म्हणून समजून उगेच बसतात. इतके हे दिवाळखोरीचे वर्णन झाले.
 आता गुलामगिरी हा तर दुर्गुण सर्व हिंदू लोकांचा आहे, असे मला वाटते. यातून एकही मुक्त नाही. याजवर किती एक मूर्ख आपल्यास गोष्टी सांगणारे आर्जवी इत्यादी दुर्लौकिकाचे हुद्द्यावर मुकरर करीतात. आणि त्यांचा बहुधा मतलब असा असतो की, थोरांस दुर्गुण व नाना प्रकारच्या खोडी लावाव्या, अखेरीस त्यांस बुडवावे. जोपर्यंत त्याजजवळ अर्थ आहे, तोपर्यंत त्यांस भुलवून पैसा घ्यावा व त्याजकडे कामकाज असले तर त्याजवळ लोकांची मध्यस्ती करून लाच देववावी व आपणही काही खावी व नेहमी स्तुती करावी व ते जे म्हणतील त्यांस रुकार द्यावा. नेहमी बरोबर फिरावे. असे लोक बहुत झाले आहेत व बहुधा द्रव्याची ठिकाणे अशा लोकांनीच वेष्ठिली आहेत.
 यातच भटभिक्षुक यांस मानले पाहिजे, कारण हे आर्जवी लोक आहेत. ते काही धर्मरक्षक नव्हत. परंतु त्यांचा व्यापार इतकाच की, यजमानाने चोरी व लबाड्या इत्यादी गुन्हे करून द्रव्य आणिले तरी चिंता नाही, भटास खावयास घातले म्हणजे झाले. इतकाच त्यांचा हेतू. आणि द्रव्यवानाने कसेही कर्म केले ती त्यांस शास्त्रार्थ काढून द्यावा; असे लबाड लोक बहुत धर्म म्हणून बाळगतात. परंतु ते उभयलोकी अकल्याणकारक आहेत. कोणताही श्रीमंत पहा, त्याचे घरी पंक्तीबारगीर फार असतात. परंतु त्याची निवड केली तर शेकडा दोनचार उपयोगी निघतात. बाकी सर्व गुलागगिरी करणारे होत; असे विचारी आहेत यांचे मनात येईल. अस्तु.
 ही चाल या लोकांत बहुत आहे. आणि जे केवळ गरीब आहेत, ज्यांस खावयास नाही, तेच असे करीतात असे नाही. ज्यास स्वार्थ आहे त्यासही ही निर्लज्जपणाची गुलामगिरी करावी असे वाटते. आणि आपल्याहून थोर म्हटलेले असतात, त्यांचे ते आर्जव करतात? बहुत स्तुती करतात आणि आपले घरून त्यांचे घरी जाऊन पायमळणी करतात. तेणेकरून त्यांस असे वाटते की, आम्ही त्याच्यासारखे होऊ आणि आमची प्रतिष्ठा अधिक होईल. परंतु लोक त्यांस मूर्ख मात्र म्हणतात. आणखी काही होत नाही. पहिला थोरपणा आणि स्वतंत्रपणा असतो, तोही जातो.
 आम्ही किती एक लोक असे पाहिले आहेत की, जोपर्यंत शिरस्तेदारी, नाझरी किंवा असा दुसरा कोणता मोठा हुद्दा कोणा माणसाकडे आहे तोपर्यंत त्याजकडे हरवक्त लोक येतात. व मेजवान्यांची बोलावणी येतात. जसे कोणी म्हणेल की, याचा व त्यांचा परमस्नेह हर एक प्रकारे "जीवश्च कंठश्च" आहे; परंतु त्याजकडील काम गेले म्हणजे तो जर मरावयास भूमीवर काढला असेल तर तो जिवंत आहे काय, असा समाचारही घेत नाहीत. व पूर्वी ज्यांचे बंधू असे म्हणवीत होते, त्यांचा मुलगा भीक मागू लागला तरी त्यांस एक दिवस देखील बोलावीत नाहीत. कामावरून दूर झाला म्हणजे बोलावण्याचे यादीतून त्याचे नाव निगते. असे ते स्नेही. या प्रकारे करून आर्जवी लोक वेष घेऊन लोकांस बुडवितात. त्यांचा सर्व काळ हाच उद्योग. हे लोक "असतील शिते तर मिळतील भुते" याप्रमाणे आहेत आणि इतकेही करून नफा काय? पोट मात्र भरते आणि मेले तर पाठीमागे व जिवंत असताना दुष्कीर्ती लोकांत होते. असे आयुष्य घालविण्यापेक्षा गरीब राहून मेहनत करावी व स्वतंत्रपणाने भाकर मिळाली तर ती आगंतुकीपेक्षा बरी, परंतु हा स्वतंत्रपणाचा लाभ कोणास कळत नाही. मुळापासून हिंदुस्थानात एकतंत्री राज्य. याजमुळे लोक सतकी गुलामगिरी करावयास शिकले. दुसरे कारण दिसत नाही.
 नाना फडणीस यांची गोष्ट सांगतात की, मराठे लोकांत नाना फडणीस शहाणा प्रधान होता. तो बाजीराव झाल्यावर बडतर्फ झाला व त्यांस काही कामकाजही नाहीसे झाले. तेव्हा कोणी त्याचे मित्राने सुचविले की, आता तुमचा वृद्धापकाळ झाला व बाजीरावाचे तुमचे नीट नाही, त्यापेक्षा सरकारात विनंती करून काही पोटापुरती नेमणूक करून घेऊन काशीस जावयाचा बेत करावा. त्याजवर त्यांनी उत्तर दिले की, स्वामींची सेवा मरणापर्यंत करावयाची; आपले कामावर मरावे, असे सांगितले आणि, त्याप्रमाणे केले, तात्पर्य, मराठे लोकांची चाल याप्रमाणे आहे की, जन्मपर्यंत चाकरी करावी, चाकरीसारखे दुसरे सुख मानीत नाहीत. हाही गुलामपणाच आहे.
 चाकरी हे नित्यकर्म होय. हे कामापुरते करावे आणि सामर्थ्यानुसार लवकर सोडावे. परंतु जे लबाड लोक आहेत ते नेहमी नीटपणे चाकरी करीत नाहीत. यास्तव बहुत दिवस ते चाकरी करतात. सरकारी चाकरी हे लोकांचे धर्माप्रमाणेच काम आहे. व हे नीट करण्याहून दुसरा सद्धर्म कोणता नाही. असे मनात न आणितार ते असे समजात की, सरकार चाकरी चांगली मिळाली म्हणजे आपणास भूमीतील द्रव्य सापडेल; मग पाहिजे तसे करावे, लोकांस बुडवावे आणि आपले घर भरावे. द्रव्य मिळविण्याचा हाच हंगाम आहे, असे जाणून त्याप्रमाणे ते जुलमाची वहिवाट करतात. म्हणूनच अशी लबाडी करावयाचे ठिकाण सोडून त्यांच्याने जाववत नाही. इतकाच नेटीव लोकांचे स्वभावाचा अर्थ दिसतो आणि जो शोधून पाहील त्यांस असेच वाटेल की, हे लोक फार अप्रामाणिक व लोकांस बुडविण्याविषयी धुरंधर आहेत. याची म्हण अशी आहे की, 'सरकारचे खाऊ नये तर कोणाचे खावे?'
 तर मनुष्यास स्वस्थतेचे सुख व व्यापार-शेतकी वगैरे धंदे यातील थोरपणा समजेल तर ते चाकरी तुच्छ मानतील. परंतु ते कळत नाही. याजमुळे अशी दुराशा धरून लोक दुष्टपणा करतात. याजमुळे आपले लोक आपल्या राज्यास मुकले आहेत. कारण स्वदेशीय राजाचा जुलूम लोकांस सोसवत नाही. इंग्रज व परकी दुसरे बरे वाटतात. अस्तु. नेटीव लोकांनी आपला लुटारूपणाचा स्वभाव गुलामगिरी आणि दिवाळखोरी ही सोडून स्वदेशी लोकांचे हिताविषयी विचार केला पाहिजे. गुलामगिरीपासून दिवाळखोरी होते. जर मनुष्य आपला स्वतंत्रपणा राखील तर त्यांस दुसऱ्यासारखे करण्याची जरूर नाही. गुलामगिरी आणि दिवाळखोरीपासून लुटारूपणा वगैरे अनर्थ होतात.

♦ ♦


हिंदू लोकांनी उद्योग करण्याची आवश्यकता

पत्र नंबर ४४: २१ जानेवारी १८४९

 प्राचीन काळचे हिंदू लोक हे आपले देशात स्वस्थ होते, परकी लोक या देशात फार येत नव्हते व प्रजा थोडी होती, हे प्राचीन काळचे इतिहासावरून कळते. कारण दक्षिणभागी हिंदुस्थानात पहिली वस्ती थोडी व अरण्ये फार होती. हिंदुस्थानात उत्तरभागी मात्र लोक रहात होते व तेही फार थोडे असतील. हे याजवरून दिसते की, त्या वेळचे राज्याच्या राजधान्या फार जवळ जवळ होत्या; म्हणजे अयोध्या, मथुरा, कानपूर, हस्तिनापूर इत्यादी; याजवरून त्या राजाचे राज्य संक्षेपित होते, यात संशय नाही. व लोकही विरळा असतील आणि पीकपाणी फार, यामुळे शिल्लक रहात असेल.
 कारण जितके लोक खाणारे होते तितक्यांचे उद्योगाने जे पिकत होते ते फाजील रहात होते, याजमुळे आळसांच्या प्रवृत्ती निघाल्या. आता तसे नाही. आता लोक फार वृद्धिंगत जहाले व त्यांस खावयास मिळत नाही; कारण सर्व उद्योग करीत नाहीत. जितके लोक उद्योग करतात तितक्यांचे उद्योगाचे उत्पन्नावर आळशी लोक फार जाले, त्यांचा निर्वाह होत नाही. तत्रापि उद्योग करण्याचे या लोकांस अजून समजत नाही.
 मुख्यत्वेकरून ब्राह्मण लोक उद्योगाचे शत्रूच आहेत. ते पहिल्याप्रमाणे पहातात; परंतु त्यांचे शापाचे ढोंग होते, ते अगदी गेले, त्यांस जेवावयास दिल्हे म्हणजे ईश्वर तृप्त जहाला; त्यांचे मुख तेच देवाचे मुख; त्यांचा हात तो देवाचा हात; हे ढोंग लोकांस कळून आले. हे फुकट खाणारे असे लोक समजतात. परदेशचे लोक या देशात आले, त्यांनी तर या ढोंगाची परिस्फुटता फारच केली. सर्व आळशी लोकांस पुरेल अशी सामग्रीही या देशात नाही. जसे एका घरात दहा मनुष्यांचे अन्न असते, तेथे पंचवीस पाहुणे आले म्हणजे घरच्या माणसांनी उपाशी रहावे तरच पाहुण्यांचा काही निर्वाह होईल. तशी या देशाची हल्ली स्थिती आहे. पहिल्याने मुसलमान लोक या देशात आले. बाहेरचे लोक जे येतात ते काही मेहनत करण्यास येत नाहीत; ते आयते खावयास येतात. तेव्हा हजारो मोगल लोक नबाब, अमीर, सरदार हे या लोकांचे उद्योगावर खाऊ लागले. मग अर्थातच या लोकांस कमती पडू लागली.
 नंतर अलीकडे इंग्रज इकडे आले. तेही काही इकडे शेतभात मळाटळा करण्यास आले नाहीत. ते इकडे श्रीमंत होऊन चार पैसे इकडून घेऊन घरी जावे यास्तव येतात. व ते शहाणे आहेत. तेव्हा ते गरीब लोकांप्रमाणे का खपतील बरे? त्यांनी सुखाचा जागा, मोठाली कामेकाजे उपटली. हजारो इंग्रज लोक अमीरांप्रमाणे इकडे येऊन रहातात. व हजारो इंग्रज शिपाई इकडे येतात. इतक्या या लोकांचे पोषण हिंदू लोकांचे मेहनतीने जे उत्पन्न व्हावयाचे त्यातच होते. वास्तविक म्हटले तर फार पाहुणे आले म्हणजे त्यांनी उपाशी रहावे. परंतु हे साधारण पाहुणे नव्हत. ते शूर, विद्वान्, गुणी व जबरदस्त आहेत. तेव्हा आपले लोकांपुढे ठेविलेल्या पत्रावळी त्यांनी ओढल्या आणि हे लोक त्यांचे तोंडाकडे पहात बसले. याजमुळे या लोकांस पाऊस पडूनही दुर्भिक्ष आहे. कोणत्याही देशात तेथील लोकांचा सुखेकरून निर्वाह व्हावा, इतके पीक होते; परंतु जर बाहेरचे लोक त्यात पुष्कळ आले तर जमिनीने अन्न सर्वांस कोठून पिकवावे व पुरवावे? याजमुळे हे लोक भिकारी झाले आहेत. अमीरपणा, शिपाईगिरी, राज्यकारभार या लोकांकडे होता तेव्हा कोणतेही प्रकारचे दुर्भिक्ष नव्हते. कारण देशात जे उत्पन्न होत होते ते खाऊन ते स्वस्थ होते. ही गोष्ट स्पष्ट रीतीने कळण्याकरिता मी थोडा अजमास करून हिशेब लिहितो.
 सरासरी हिंदुस्थानात एकंदर पाच लक्ष कोस औरस चौरस आहेत. त्यापैकी अडीच लक्ष कोस राने, डोंगर, नद्या, खडक, झाडे, घरे, शहरे इत्यादिकांमुळे नापीक आहेत. ते वजा देऊन बाकी अडीच लक्ष कोस चांगले पिकाचे आहेत. आणि एकंदर या देशात माणसे दहा कोट आहेत. तितक्यांना अन्न पाहिजे तेव्हा याची वाटणी बसविली तर दर एक कोसास चारशे माणसे पडली. त्यात चारशे माणसांपैकी निम्मे स्त्रिया. बाकी दोनशेपैकी शंभर माणसे उद्योगावाचून म्हणजे आजारी, वृद्ध, बाळे, आंधळे वगैरे व्यंग व व्यापारी, अंमलदार, तमासगीर, श्रीमंत हे सरासरी शंभर. बाकी शंभर राहिले, ते काम करणारे. इतक्यांनी मेहनत करून चारशे लोकांचा निर्वाह करावा. तेव्हा शंभर माणसे एक कोस जमिनीत खपली तर चारशांचे पोट भरण्याइतके उत्पन्न करतील, किंबहुना जास्ती करतील.
 परंतु काळेकरून लोकांमध्ये श्रीमंती वाढत चालली, तो आळशी लोक वाढत चालले. म्हणजे जो एकटा श्रीमंत आहे तो आपणच कामे केल्याशिवाय खातो असे नाही. त्यांस चाकर पाहिजे, घोडे पाहिजेत. परीट धुवावयास पाहिजे, शिंपी शिवावयास पाहिजेत, ऊन लागेल म्हणून अब्दागिरी पाहिजे. रस्ता दिसत नाही म्हणून मशालजी, चोपदार इत्यादी मिळून तो एकटा पंचवीस माणसे घेऊन बसला. आणखी जो जो श्रीमंती वाढली तो तो गाणारे पाहिजेत, वाद्ये वाजविणारे पाहिजेत, देवपूजा करावयास भट पाहिजे व पंक्तीस दहा पाने पाहिजेत, हे अनर्थ झाले. तत्रापि सर्वांचा भार शंभर माणसांनी सोसला आणि सुखेकरून राहिले. परंतु आता काय झाले की, या लोकांच्या ताटात इंग्रज लोक, मुसलमान लोक आले व काही बरोबर घेऊन आले नाहीत. आमच्यापैकी खावयास आले आणि तेही एकटे खाणारे नव्हेत. एक एक असा श्रीमंत की, त्यांचे मागे पन्नास रिकामे माणूस कोणी घोडे खाजविणारा, कोणी रथ हाकणारा, कोणी हिशेब लिहिणारा, कोणी कारकून, कोणी कपडे नेसविणारा, कोणी शिजविणारा, कोणी पोराला दूध पाजणारा असे होते. कारण ते स्वता काही काम करावयाचे नाहीत. याजमुळे हा समुदाय चारशांमध्ये येऊन पोचला व आपले लोक जे श्रीमंत होते हे काही आपली खोड टाकीत ना. ते श्रीमंती असावी अशी इच्छा करणार व इंग्रज तशीच इच्छा करणार. तेव्हा दोघांचा निर्वाह चालेना आणि आपले लोक भिकारी होत चालले.
 ब्राह्मण म्हणतात की, आजपर्यंत आम्ही काम कधी केले नाही व पुढे करणार नाही. स्त्रिया काम करावयाच्या नाहीत. तेव्हा इतक्या सर्वांचा निर्वाह कसा होईल? याजमुळे जरूरी येऊन पडली की, आपले लोकांनी श्रीमंती सोडावी आणि ती सर्व इंग्रजांकडे द्यावी, तरच निर्वाह होईल. व काही काळ असेच चालले तर आपले लोकांत एकही श्रीमंत वाचणार नाही. कारण श्रीमंती राहणे अवघड पडेल. इतक्यांचा निर्वाह होत नाही. याजमुळे हे लोक अर्थातच भिकारी झाले. त्यात आणखी या देशातील कामे व व्यापार इंग्रजांनी घेतले. जड्ज तेच; माजिस्त्रेट तेच; वस्त्र विकणारे तेच; माल आणणारे तेच; टकसाळ घालणारे तेच व शिपाई तेच. इतक्या लोकांची कामे पूर्वी आमचे लोकांमध्ये होती तेव्हा ठीक होते. परंतु ती सर्व त्यांचे हाती गेली, तेव्हा ज्या ज्या लोकांची कामे त्यांनी घेतली ते ते लोक रिकामे झाले आणि उपाशी मरू लागले. यात त्यांनी इतक्या सर्वांस अन्न कोठून पुरवावे?
 तेव्हा परिणाम असा होईल की, आपले लोक सगळे शेतभात करणारे होतील. आणि श्रीमंत, सावकार व अमलदार इंग्रज होतील. जितकी मेहनत करून पिकवावयाचे काम, तितके आपले लोकांकडे राहील. जितके सुखाने खाऊन रहावयाचे काम तितके ते लोक बळकावतील. तेव्हा अर्थातच हे लोक भिकारी झाले. परंतु इतकी मजल येऊन पोचली नाही. कारण अद्याप कोठे काही संस्थाने आहेत व ती जरी धुंदीत आहेत तरी द्रव्यवान आहेत. याजमुळे चार माणसांचा निभाव होतो व हिंदू लोक सुखी आहेत, असे नजरेस पडतात. परंतु हे फार दिवस चालणार नाही. कारण जी संस्थाने आहेत, ती मृतप्राय होऊन राहिली आहेत. कोणामध्ये शहाणपण नाही. ती एका पाठीमागून एक जाणार. अस्तु.
 असा प्रसंग आला, तेव्हा आपले लोकांस सुखी होण्याची युक्ती कोणती म्हणाल, तर अशी आहे की, जितके इंग्रज लोकांचे व्यापार व रोजगार इकडे कमी होतील तितके या लोकांस जास्ती सुख आहे. याजकरिता या लोकांनी विद्या व ज्ञान यांचे प्राप्तीस झटावे व इंग्रजांप्रमाणे शहाणे व्हावे आणि जे व्यापार ते करतात ते आपण करावे. कोणी म्हणतील की, त्यांस द्रव्य अनुकूळ आहे आणि या लोकांजवळ द्रव्याची अनुकूळता नाही, तर ही गोष्ट खरी; परंतु त्याचा निर्णय आज लिहिणे जरूर नाही; जेव्हा सर्व लोक पुढे सरावे अशी इच्छा करतील व रानटीपणाच्या समजुती सोडून देतील, तेव्हा अनुकूलता सहज होईल.

♦ ♦


हिंदू लोकांची द्रव्योपयोगाविषयींची समजूत


पत्र नंबर ५१ : ११ मार्च १८४९

 मागील पत्रात विद्येचा उपयोग विद्वान लोक या देशात करीत नाहीत, म्हणून लिहिले आहे. व आता एक गोष्ट आम्हास सुचली आहे की, द्रव्यवान लोक द्रव्याचाही उपयोग करीत नाहीत. द्रव्य कोणत्या रीतीने वृद्धिंगत करावे, हे त्यांस अश्रुत आहे व द्रव्य वृद्धिंगत केले असता फार उपयोग होईल, हे त्यांस कळत नाही.
 यास प्रमाण-प्रथम लग्न, मुंज वगैरेमध्ये समारंभात हिंदू लोक पुष्कळ द्रव्य खर्च करतात, व भटांस खावयास घालून उधळितात. दुसरे प्रमाणे- हे लोक द्रव्य असले म्हणजे लागलेच दागिने करतात आणि घरात साठवितात. त्यांस असे तर वाटत नसेल ना. द्रव्य जसे आम्ही अन्यायाने मिळविले तसे अन्यायाने खर्च करावे? किती एक लोक म्हणतात की, जितका खर्च केला तितकी अधिक जमा होते. किती एक म्हणतात की, साखरेचा खाणार त्यांस देव देणार! किती एक म्हणतात की, नशिबी असेल त्यांस द्रव्य मिळेल. या प्रकारची किती एक मूर्ख मते चालू आहेत व त्यांस भट वगैरे लोक साहकारी आहेत. ते म्हणतात की, द्रव्यवान आहे तो पुण्यवान आहे. द्रव्याने मोक्षास जातो. म्हणजे त्यांस सध्या खावयास मिळते.
 बहुधा अन्यायानेच हिंदू लोकांमध्ये द्रव्य संपादन केलेले असते. कोणी स्वकष्टार्जित मेहनतीने मिळवीत नाहीत, म्हणून असा मूर्खपणाने व्यय करतात. जो मेहनतीने मिळवितो तो असे कधी करणार नाही. जे द्रव्यवान आहेत त्यांस व्यापार करण्याचे वगैरे ज्ञान नसते व ते बहुधा मूर्ख असतात. म्हणून त्यांचे प्रथम कर्तव्य हे असते की, दहा हजारांचा जडावांचा कंठा, पन्नास हजारांची पोची, छपन्न हजारांची आंगठी इत्यादी पदार्थ घेऊन घरात ठेवावे. साधारण श्रीमंतांकडे पहा की, त्यांचे घरी दागिने जितक्या किंमतीचे असतात तितका पैका त्यांचा व्यापारात किंवा कोणत्याही उद्योगाचे कामात नसतो. जशा मुंग्या बिळात धान्य साचवून ठेवतात, त्यांस पेरावयास समजत नाही. आणि ते धान्य सरले म्हणजे पुन्हा शोधावयास जावे व कोणाचे सापडेल ते आणून पुन्हा साठवावे, पुन्हा खावे असे त्या करतात; तद्वत् हिंदू लोक आहेत.
 माझे म्हणणे या लोकांनी अलंकार अगदी टाकावेत असे नाही. परंतु ज्यांजवळ लाख रुपये आहेत याने फार झाले तर दहा पाच हजारांपर्यंत भूषणे वगैरे जिन्नस बाळगावे व बाकीचा पैसा उपयोगास लावावा. परंतु श्रीमंत लोक ज्याजवळ द्रव्य आहे, ते पैसा रोख काही बाळगीत नाहीत आणि उपयोग करीत नाहीत. म्हणतात की, रोख पैसा कशास पाहिजे? सोने घेऊन टाकले म्हणजे घरात राहील आणि द्रव्याचा पायात बिड्या पडतील; मग कोठे जाणार नाही. कालदेशवर्तमान आहे; आपली मुलेमाणसे मोडून खातील असे म्हणतात. परंतु हे लोक किती मूर्ख आहेत हे याजवरून पहावे. यांस असे कळत नाही की, द्रव्य ही चालती वस्तू जितकी अधिक फिरेल तितकी चांगली. यास्तव व्यापार इत्यादी मोठी कामे अंगीकारावी व धर्म तरी यथायुक्त करावा.
 परंतु ते काही न करून द्रव्य घरात बाळगतात, उराशी धरून निजतात आणि मरतेवेळेस काळजी करतात की, माझे इतके धन आहे याची व्यवस्था कोण करील? रात्र आली म्हणजे म्हणतात की, माझे घरावर आज दरवडा तर यावयाचा नाही ना? अशी काळजी करतात. चोऱ्या होतात. एकदा चोरी झाली म्हणजे सर्व द्रव्य घेऊन जातात. किती एकाची मुले वाईट निघतात, ती द्रव्य उधळून टाकतात. किती एकांच्या बायका लबाड निघून द्रव्याचा नाश करतात. जी द्रव्याची गाठोडी बांधून ठेवतात ती थोडेच दिवसांत नाहीशी होतात व अशा द्रव्यसंग्रहाने मुले अवश्य वाईट निघतात. कारण की, त्यांस प्रथम शिक्षा ही लागते की, घरातून बाहेर जाऊ नये; कारण गेले तर द्रव्य कोठे ठेवावे? यास्तव रात्रंदिवस घरात बसतात आणि त्यातले मोडून खातात.
 वास्तविक पाहिले तर मुलास बापाने पंचवीस वर्षांपर्यंत खावयाची बेगमी ठेवली आणि त्यांस शहाणे केले म्हणजे पुष्कळ जाहले. जो बाप मुलास जन्मापर्यंत पुरेसे साचवून ठेवतो आणि त्यांस विद्या वगैरे शिकवीत नाही, परंतु आळशी व निरुपयोगी मूर्ख करतो, तो त्याचे अनहितकर्ता आहे. व देशाचा लुटणारा आहे; कारण की, सर्वांचा पैसा हरण करून त्याने आपले घरी मूर्खाचे जीवन होण्याकरिता व लबाडी वृद्धिंगत होण्याकरिता ठेविला, असे होते.
 यास्तव जे बाप मुलास पुष्कळ द्रव्य ठेवतात, त्यांनी त्या द्रव्याचा उपयोग करता यावा, अशी मुले चांगली करावी. परंतु त्यांचे कपाळी बहुधा मूर्ख पुत्र असावे असे असते व असे करण्यास तेही कारण होतात. पैसा अशा रीतीने साचवून ठेवण्याची खोड या लोकांस लागली आहे. याजकरिता बहुत लोकांस दुःख होते. कारण या रीतीने सुखवृद्धी व्हावयाची ते मार्ग ज्यांचे हातात असतात, तेच त्या मार्गांस बंद करतात आणि आपण मूर्ख होऊन द्रव्याचा व्यय मूर्खपणाने करतात. हा सांप्रदाय फार वाईट आहे. यास्तव ज्या ज्या जवळ द्रव्य आहे, त्यांनी त्यांनी चांगला विचार करावा की, याचा उपयोग कोणता करावा? आणि जेणेकरून लोकांचे हित होईल व आपले द्रव्याची वृद्धी होईल असे उपाय करावे.
 हिंदू लोकांत अनंत गोष्टी कमी आहेत व त्यांस अजून पुष्कळ शहाणे करावयाचे आहेत, अशा कामात द्रव्य घालतील तर मोत्यांचा कंठ्या, पोच्या, शिरपेच घातल्यापेक्षा शोभा अधिक पडेल. यात संशय नाही.

♦ ♦


हिंदू लोकांचा व्यापार

पत्र नंबर ५७: २२ एप्रिल १८४९

 सांप्रत हिंदू लोक भिकारी होत चालले आहेत व त्यांस रोजगारधंदा नाही. याचे कारण मला असे दिसते की, या लोकांचा व्यापार अगदी बुडाला; इंग्रज व दुसरे देशचे लोक फार शहाणे होऊन या लोकांस सर्व जिनसा पुरवितात. आणि हे मुकाट्यांनी स्वस्ताईमुळे खरेदी करतात.
 यास्तव या लोकांनी एकत्र होऊन जर असा कट केला की, आपले देशांत दुसरे मुलखाचा जिन्नस आला तरी घ्यावयाचा नाही; आपले देशांत पिकेल तेवढाच माल घ्यावा; आपले लोक कापडे जाडी वाईट करतात, परंतु तीच नेसावी. इकडे छत्र्या करतात, त्याच घ्याव्या, म्हणजे या लोकांत व्यापार राहून इकडे सुख होईल. परंतु हे लोक असे करीत नाहीत. आणि थोडी किंमत म्हणून लोकांचा जिन्नस विकत घेतात. वास्तविक पाहिले तर हल्ली दाणे मात्र इकडे पिकवून हे लोक खातात. अजून दाणे परदेशातील येऊ लागले नाहीत. बाकी सर्व पहावे ते परदेशचे आहे. आमचे कपडे, आमची छत्री, आमची चाकू-कात्री, आमचे घड्याळ, आमची गाडी, आमची बुके, सर्व परदेशातील आहेत. आम्ही दाणे मात्र आपले खातो. यामुळे सर्व व्यापार बुडाला. उदमी, मजुरदार, कसबी, कारागीर घरी बसले. आणखी तर काय सांगावे, परंतु आमचे रुपये, आमचे घरास सनकाड्या देखील युरोपच्या. इकडे लोक पैशाच्या शंभर सनकाड्या देतात. त्या पेटवावयास विस्तव पाहिजे; ठेवावयास मोठी जागा पाहिजे; परंतु विलायतेचा सनकाड्या सुंदर पेटीमध्ये तयार करून भरलेल्या पैशाचा शंभर मिळतात. विस्तव पेटवावयास नको. अशी सोय पाहून आम्ही आपले देशचा लोकांचा सनकाड्या घेत नाही. परंतु याजमुळे आमचे लोक किती भिकारी झाले आहेत!
 याजकरिता सर्वांही असा कट करावा की, जे आपल्या देशांत पिकेल तेच. नेसू, तेच वापरू, कसेही असो. आणि तितक्यात चांगल्या विद्या व जिन्नस उत्कृष्ट करावयास विद्या शिकू. आम्हास मिळेल तसेच घेऊन आम्ही काळ काढू. मग हजारो खंडी कापूस इकडून विलायतेस कशास जाईल? कापूस विकणारांनी असा बेत करावा की, इंग्रजास इकडे तयार केलेली कापडे द्यावी, परंतु कापूस देऊ नये. येणेकरून हे लोक सुखी होतील. सांप्रत आपलेच लोक आपल्या लोकांस मारीत आहेत. जशी बाहेरची चांगली स्त्री पाहून घरची लग्नाची स्त्री टाकून तिचे पाठीस लागतात आणि भुलतात, तसे या लोकांचे झाले. येणे करून हाहाकार झाला आहे आणि जो तो शेत करू लागला. दुसरा व्यापार काही नाही.
 परंतु शेत करण्यात तरी काय नफा? वर्षभर मजुरी मरेमरेतो करावी तरी लंगोटी आणि शिळी कोंड्याची भाकर देखील मिळावयाची भ्रांति. बहुत दाणे पिकवितात, परंतु घेतो कोण? पैसा दुसऱ्या देशांत चालला. श्रीमंत लोक, ज्याजवळ लाखो रुपये आहेत, ते विलयती जिनसा घेतात आणि पैसा उडवितात. त्यांचे पोटास पावशेर दाणे पाहिजेत, त्याची मात्र किंमत रयतेकडे जाते. बाकी हजारो रुपये विलायतेस थेट जातात. याप्रमाणे हमेश चालले आहे. असा कट करणे वगैरे उपयोगी गोष्टी आहेत, त्या पुराणिक, हरदास यांनी लोकांस सांगाव्या, त्या टाकून दुसऱ्या गोष्टी सांगतात आणि याजकडे लक्ष्य देत नाहीत.
 लोक भिकारी झाले, याचे कारण कोणी मनात आणीत नाहीत. जर हरदास व कथेकरी यांनी अशी मते घेतली आणि लोकांस जर भरविली, तर बहुत लोक एकत्र होतील. कारण की, ही गोष्ट उघड आहे. परंतु देव आधी बुद्धी नेतो मग भांडवल नेतो. तशी या लोकांची बुद्धी पापाचरणाकडे गेली. नंतर या संकटात ते आले, परंतु सर्व मागील पुराणातील कथा एकीकडे ठेवून हल्लीचे लोकांची स्थिती सुधारण्याबद्दल लोकांस उपदेश केला. तर महान पुण्य आहे. तसे हे हरदास करीत नाहीत. चांगल्या गोष्टी छापखान्यातून निघाव्या, असेच नाही. हरदासांनीही काढाव्या व त्यांस लोक एकत्र करण्याची फार शक्ती आहे, कारण की, ते चौघांत उभे राहून उपदेश करण्याचा आरंभ करतात. त्यांनी असे उपयोगी विषय लोकांस शिकविले, तर सर्व आख्यानांहून ही आख्याने चांगली होतील.
 आणखी लोकांस समजवावे की, तुम्ही मूर्ख आहा. विचार करीत नाही. यास्तव विचार करा. व विद्या करा. व विलायतेतील लोकांप्रमाणे अक्कलवान व्हा. म्हणजे तुम्हास लक्ष्मी अनुकूल होईल. छापखाने पुष्कळ ठेवा. पुष्कळ ग्रंथ वाचा, म्हणजे तुम्हास सर्व बातम्या लागतील. लष्करच्या भाकऱ्या कोण भाजतो, असे म्हणू नका. परदेशांत गेले तर विटाळ होतो; ही कल्पना सोडा. म्लेंच्छांच्या देशांत जाऊ नये, म्हणून अटकाव होता. पण आता तुमचा देश म्लेंच्छांचा झाला. तेव्हा तो शास्त्रार्थ राहिला नाही. तात्पर्य विद्या करां. विद्वानांचे ऐका. मदोन्मत्त होऊ नका. अशा प्रकारचा कथा सांगितल्या. तर फार फायदा होईल.
 हे गोसावी कथा करतात, हे व्यर्थ लोकांस आणखी मूर्ख करतात. कारण की अमानुष गोष्टी त्यांस सांगतात. काळवयन आला आणि कृष्णाने त्याला मुचकुंदाचे हातून जाळिला. रामास संकट पडले, तेव्हा मारुतीने एक पाय लंकेत आणि दुसरा अयोध्येत ठेवला. भीष्म ऐकेना तेव्हा अर्जुनाने पाशुपतास्त्र व नारायणास्त्र सोडिले, या गोष्टी सांगून काहीतरी उपयोग आहे काय? आता लोक भिकारी आहेत. याजवर सोन्याची वृष्टी होत नाही व मागील गोष्टी झाल्या, तशा आता होत नाहीत, यात संशय नाही. तस्मात् अमानुष कथा लोकांस सांगितल्या, तर लोकांस काही उपयोग नाही. त्यांस आळशी अधिक करण्याचा मात्र उपयोग आहे.
 परंतु त्यांस काही माणसासारख्या कथा सांगाव्या की, अमुक राज्य हे कशाने गेले? दिल्लीचे राज्य, बाजीरावाचे राज्य, का गेले? काय व्यंग त्यात होते हे काढावे. तसेच विलायतेत राज्य कसे आहे? परंतु या गोष्टी आपले लोक मूर्ख आहेत, त्यांस सांगितल्यावर ते म्हणतील की, राज्य कशाने गेले? तर सद्दी फिरली म्हणजे राज्य जाते. हे काळाचे माहात्म्य. इंग्रजांची सद्दी फिरेल तेव्हा त्यांचेही राज्य जाईल. परंतु हे काही उत्तर नाही. लोक अगदी मूर्ख झाले आहेत. त्यांची चित्ते मागील अमानुष गोष्टींवर फार आहेत.
 यामुळे त्यांस वाटते की, अवतारी पुरुष होईल, तेव्हा आमचे कल्याण करील. हे मनुष्याचे कृत्य नव्हे. अशा मूर्खपणाच्या समजुती आहेत. परंतु जरी ईश्वर सर्व गोष्टी घडवितो, तरी मनुष्यांनी मूर्खासारखा नशिबावर भरवसा ठेवून आळशीपणात राहू नये. जो उद्योग करतो, त्यांस ईश्वर सहाय्य होतो. म्हणून लोकांनी उद्योग करावा, हेच उत्तम. सद्दी या शब्दाचा अर्थ पाहिला तर काही नाही; लोकांचा मूर्खपणा आहे.

♦ ♦


उद्योगप्रशंसा


पत्र नंबर ६८: २२ जुलई १८४९

 हिंदू लोकांची बुद्धी फारच क्षीण झाली आहे, याजमुळे ते कितीएक गोष्टी विनाकारण तुच्छ मानतात. जर कोणी एखादे गृहस्थास सांगितले की, इंग्रज लोकांमध्ये विद्या फार आहे व ते लढाईत जय मिळवितात, याचे कारण विद्या आहे, तर तो उत्तर देईल की, कशाची विद्या? सद्दी फिरली म्हणजे असेच होते. प्रारब्ध अनुकूल झाले, म्हणजे विद्या वगैरे सर्व येते. व ज्या मनुष्यास दैव अनुकूल नाही, त्याचे ठायी सर्व गुण असले, तरी व्यर्थ दिसतात.
 भर्तृहरि वगैरे कवी यांनी फक्त प्रारब्ध वर्णिले व उद्योगाची प्रशंसा सोडून दिली. येणेकरून लोकांमध्ये हे मत आता असे प्रबल झाले आहे की फक्त दैवावर भरवसा ठेवून लोक बसतात. क्षणभर देखील विद्या काय आहे, याचा विचार करीत नाहीत. रामाने रावण जिंकला तेव्हा वानरांनी राक्षसात मारिले इत्यादी दृष्टान्त देतात. आणि जी जी सुधारणुकीची गोष्ट तिजवर भरवसा ठेवीत नाहीत. जर कोणी ग्रंथ किंवा वर्तमानपत्र हाती दिले तर म्हणतात की, यात काय आहे? याने काय ज्ञान वाढणार आहे? आजपर्यंत हेच कोठे होते? इत्यादी भाषणांनी उद्योग व्यर्थ मानितात. हे मोठे दुर्दैव आहे. ईश्वरइच्छेने हे लोक असेच नाहीसे होणार असले, तर कोणाचा काय उपाय आहे? परंतु मला कठीण दिसते व या लोकांचा परिणाम भयंकर आहे, असे भासते. कालेकरून हे सर्व ख्रिस्तीयन धर्मात जातील. किंवा स्वधर्मास जाणून सुधारून त्याची स्थापना करतील हे समजत नाही.
 इंग्रज इकडे राज्य करतात, ते आताच आम्हास गुलामाप्रमाणे मानतात व आफ्रिकेत लोक आहेत ते इतके मूर्ख आहेत की, त्यांच्याने राज्य किंवा एकत्रपणा काही होत नाही. याजमुळे जो पाहिजे तो त्यांस धरून विकावयास रानच्या जनावराप्रमाणे देशांतरी नेतो. तद्वत् या हिंदू लोकांची स्थिती होईल. काही दिवसांनी इंग्रज येथे येऊन घरेदारे करून राहू लागतील. म्हणजे बहुतकरून आमचे रोजगार गेलेच आहेत; व जे राहिलेले आहेत, ते समूळ जातील; कारण की ते लोक शहाणे आहेत. मग आम्हास दर एक इंग्रजांच्या घरी गुलामगिरीची कामे करावी लागतील. आणि सर्व मोठेपणा, धनीपणा इंग्रजांकडे जाईल. असे होता होता उत्तर अमेरिकेत इंग्रज लोक राहिले आणि चारपाचशे वर्षांत तेथील लोक सर्व मरून नाहीसे झाले. व सर्व इंग्रजांचीच वस्ती झाली. तसा हा देश केवळ इंग्रजांचे वस्तीचा होईल की काय? अशा प्रकारचे प्रश्न माझे अंतःकरणात येतात व यांची विवंचना करता करता ईश्वरइच्छा काय आहे ते समजत नाही.
 म्हणून या देशांत जे राहिलेले, सुधारलेले लोक आहेत, त्यांस मात्र मी पुसतो की, तुम्हासही जर सर्व गोष्टी भयंकर दिसतात, तर तुम्ही स्वस्थ कसे बसलेत? लौकिक रीतीत, चालीत, धर्मात सुधारणा करावयास झटावे तर सर्व लोक आपल्यास वाईट म्हणतील, म्हणून तुम्हास भय वाटते काय? परंतु मला वाटते की, शंभर मूर्खानी वाईट म्हटले तर आणि एका शहाण्याने चांगले म्हटले तर ते चांगले म्हणणे अधिक; याजकरिता लोकापवाद मूर्खाचा आपण मानू नये. हे लोक अतिशय वेडे आहेत; आणि याजवर भ्रांती पडली आहे. येणेकरून जसा मद्यपि मनुष्य मस्त असतो व त्यांस काही सुचत नाही, तसे हे लोक भुलले आहेत व यांस काळाने घेरले आहे, म्हणून असा आळस करतात.
 मी पुष्कळ सामर्थ्यवान पुरुषांस विचारले की, तुम्ही याविषयी काही उद्योग करता काय? तर म्हणतात की, ईश्वरइच्छा असेल तसे घडेल; आपल्याच्याने काय होणार आहे? रती फिरली म्हणजे काही उपाय चालत नाही. जसे होणार तसे होऊ, आपला आपण विचार पहावा. इत्यादी पोरांसारखी मूर्खपणाची भाषणे करतात. आणखी जर त्यांस म्हटले की, शिखांचा पराभव इंग्रजांनी विद्येने केला; तर म्हणतात काही नाही. सर्व नशिबाने केले. याप्रमाणे नशिबावर त्यांची श्रद्धा आहे. त्यांस एखादे कारण दाखविले तर त्याचा विचार करीत नाहीत. आणि यात काय आहे, असे म्हणतात असा या लोकांचा चमत्कार आहे.
 विद्या म्हणजे काय, हे काही एक त्यांस ठाऊक नाही व लष्कराचे, कवाइतीचे फळ काय हे माहीत नाही. ज्यांनी याचा विचार मुळीच केला नाही, ते देखील धिक्काराने म्हणतात की, यात काय आहे? कशाची कवाईत? व कशाचे शहाणपण? विदुराचे शहाणपण थोडे होते काय? पण काय झाले? अशी उत्तरे हरएकांविषयी अर्थ न जाणता धीटपणाने देतात. कारण त्यांची श्रद्धा दैवावर आहे. त्यांस असे वाटते की, आमच्या ज्या पूर्वापार समजुती आल्या आहेत त्या खऱ्या. याजमुळे हे लोक उद्योग करीत नाहीत; यास्तव कोणीतरी या लोकांची समजूत व्हावयाजोगा ग्रंथ लिहून प्रकट करावा की, दैव म्हणजे काय? मुळी तो पदार्थ; नाही. नाव मात्र आहे. व आळशी लोकांस हा फार प्रिय आहे; परंतु वास्तविक पाहिले तर ईश्वरइच्छा अशी आहे की, सर्वांनी उद्योग करावा. रामाने लंकेत जाण्याचा उद्योग केला की नाही? मग वानराच्या हातून सिद्धी होऊ द्या. परंतु उद्योग करणे आवश्यक आहे, मुळीच उद्योग सोडून राम अयोध्येत बसला असता तर रावणास मारू शकता काय?
 ईश्वरइच्छा खरी, परंतु जसे तुम्ही त्यांस प्रार्थाल तशी तुम्हास सिद्धी होईल. तुम्ही संसारात आहा, परंतु उद्योग केला तर मोक्षास जाल की नाही? ईश्वरइच्छा तुमचे भावनेप्रमाणे व प्रार्थनेप्रमाणे आहे. ईश्वराची प्रार्थना करणे, याचाच भाग उद्योग करणे आहे. उद्योग न करता कोणी प्रार्थील तर ईश्वराचे क्षोभास मात्र तो पात्र होईल. याजकरिता तुम्ही दैवावर भार ठेवू नका. दैव पांगळे आहे.

♦ ♦


एकत्र राहण्याची चाल

पत्र नंबर ८७: ६ जानेवारी १८५०

 आमचे लोकांमध्ये अशी चाल आहे की, कुटुंबाचे माणसातील सर्वांनी एकत्र रहावे, यापासून लाभ किंवा विभक्त राहिल्यापासून लाभ याचा विचार केला, तर असे नजरेस येते की, एकत्र राहण्याची चाल बहुत काळापासून चालत आली आहे. व लोकांमध्ये तिची प्रतिष्ठा अधिक मानितात. दोघे बंधू पाहिले तर त्यांस प्रथम हा प्रश्न विचारतात की, विभक्त किंवा एकत्र आहा? एकत्र म्हणाले म्हणजे ते भले माणूस आहेत, असे समजतात.
 परंतु उद्योगवृद्धी होण्यास विभक्त राहण्याची चाल चांगली आहे. ती कशी म्हणाल, तर ऐका. एक बंधू रोजगारावर असला म्हणजे त्याचे इतर बंधू, पुतणे, चुलते, मामा, उभय पक्षांचे लोक त्याचे आसमंतात येऊन राहतात व जरी त्यांस सामर्थ्य असले, तरी याचे घरी जेवतात; काळ व्यर्थ घालवितात व उद्योग काही करीत नाहीत. बळे मूर्ख होतात व निर्लज्जपणाने अन्न खातात. यास्तव इतके लोक रिकामे बसून खाणारे निरुपयोगी असतात.
 सामान्यतः श्रीमंताचे घरी पाहिले तर पन्नास पाने पंक्तीस असतात. त्यात बहुतकरून चाकर एकदोन व बाकी सर्व आप्तसंबंधी असतात. ते काही उद्योग करीत नाहीत. घरचा एकटा जो मिळविता असतो, त्यासही त्यामध्ये थोरपणा वाटतो की, मी सर्व कुटुंबाचा स्वामी आहे. माझे घरी सर्व माझे कुलातील ३१४: शतपत्रे जेवतात, मी कुटुंबवत्सल आहे. आणि लोकही त्याचे वर्णन अधिक करतात. त्यांस म्हणतात की, 'अहो, अमका गृहस्थ केवढा कुटुंबी आहे! त्यांस कुळदीपक म्हणावे, पहा की, ज्याचे पंक्तीस पन्नास पाने होतात' व सरकारात अर्जी करणे झाल्यास ही मोठी सबब लिहितात की, आम्ही कुटुंबवत्सल आहो, आमचे सरकारने चालवावे व प्राचीन काळच्या सनदा पाहिल्या तर त्यात हेच शब्द असतात की, "अमके भटजी, याचे कुटुंब मोठे व याचे कुटंबाचे चालवल्यास श्रेयस्कर आहे, असे जाणून कुटुंबाचे योगक्षेमार्थ अमुक गाव दिला आहे." याजवरून कुटुंबाचे एकाने चालवावे व सर्वांनी उगीच बसावे, हा धर्म परंपरागत चालत आला आहे.
 परंतु यापासून अनर्थ होतात; व आळसाची प्रवृत्ती फार होते. मागले काळी कसे निभले असेल ते असो; पण आम्हास हे तर विलग व अवघड दिसते. एकट्याने मिळवावे आणि सर्वांनी खावे आणि तो मरेल त्या दिवशी सर्वांनी वर हात करून जावे किंवा भीक मागावी, हे अगदी वाईट आहे. आणि असे बहुत लोक भट वगैरे आढळतात. त्यांस जर प्रश्न केला की, 'तुम्ही इतके दिवस काय केले?' तर ते उत्तर देतात की, 'काय करावे? अमका गृहस्थ दैवशाली होता, सर्व कुटुंबाचा योगक्षेम तो करीत असे, त्याचे घरी आज पन्नास वर्षे सुखेकरून भोजन केले, आता तो मेला. तेव्हापासून कोठे उभे रहावयास थारा नाही. शंभर मनुष्यांचे अन्न गेले. त्याचे पदरी बहुत लोक असत व बहुतांचे तो चालवी. आता आम्हास काही आधार नाही.' अशी चाल या लोकांची पडली आहे.
 प्रत्येक श्रीमंताचे पाठीमागे निरुपयोगी लोक शेकडो असतात व त्यात जहागिरदार वगैरे असले, तर त्यांजवर जशा मोहोळांवर माशा बसतात त्याप्रमाणे आळशी लोक बसतात. किती एक आप्त म्हणून असतात, किती एक बायकोचे भाऊ म्हणून असतात. किती एक भट, पंडित, शास्त्री यांस पंक्तीस घेऊन जेवले म्हणजे पुण्य आहे; म्हणून हे बाळगलेले असतात. किती एक आर्जवी असतात, त्यांनी स्तुती करावी. म्हणजे महाराजांनी म्हटले की "आज सूर्य पश्चिमेस उगवला." तर त्यांनी "होय." म्हणावे आणि काय? (सुप्रयुक्त) भाषण केले तरी "महान बुद्धिवान बरे," अशी स्तुती करावी. याप्रमाणे हे लोक दुसऱ्यास वेडे करतात. असे किती एक निरुपयोगी लोक असतात.
 याप्रमाणे प्रत्येक श्रीमंताचे घरी वहिवाट असती. यांचे विरुद्ध कोणी बोलले, तर त्यांस ते म्हणतात की, 'तो त्यांच्या अन्नावर उठला' परंतु या वाकड्या समजुती टाकून ज्याने त्याने उद्योग करावा, हे बरे. स्वउद्योगाने घोंगडी मिळविली तर ती लोकांच्या शालजोडीस मागे सारते. यास्तव श्रीमंतांनीही आपले पदरचे व कुटुंबाचे लोकांस शहाणे व उद्योगी करावे हे चांगले. केवळ आपण मेलो तर बाकीच्यांनी भिक्षा मागावी, अशी तजवीज आपले थोरपणाकरिता करून ठेवावी, हा थोरपणा नव्हे, हा मूर्खपणा आहे. व पदरच्या लोकांनीही मनात आणावे की, हे चांगले नाही. अस्तु.
 एकत्र कुटुंबाचा असा परिणाम होतो. आता यापासून काही लाभही आहेत. एक भाऊ अशक्त किंवा विपत्तीत असला, तर त्याची उघडीक पडत नाही. कार्यप्रयोजन जसे एकाचे, तसेच दुसऱ्याचे होते, सांभाळ होतो. परंतु हे केवळ एकत्र राहिल्याने होते असे नाही. विभक्त असल्यानेही हे होईल. उभयता भावांचे सौजन्य असले म्हणजे एकमेकांस विपत्ति अनुपपत्ती काळी सहाय्य करतील. एकत्र असले म्हणजेच करतात असे नाही. यास्तव विभक्त असले म्हणजे बरे. परंतु विभक्त असून बंधुधर्म सोडू नये. आमचे लोकांत बहुधा विभक्त असले म्हणजे अत्यंत वैर असते आणि वैर पडल्याशिवाय विभक्तपणा येत नाही. हे चांगले नाही. तर विभक्त राहून एकमेकांनी सुहृदभावाने रहावे व उद्योग केल्यावाचून राहू नये, इतकेच तात्पर्य आहे.
 सांप्रत काळी जो श्रीमंताचे घरी परिवार असतो तो केवळ मूर्खपणास कारण आहे. आम्ही स्वतः एका श्रीमंताचे घरी पाहिले की, त्यांचे वय सरासरी पंचवीस वर्षांचे होते. त्यांस जहागीर मोठी आहे. त्याचे पदरी रोज पन्नास पाने होत होती. त्यात बहुतकरून आप्तमंडळी व किती एक भट, शास्त्री, पंडित, कथेकरी व पुराणिक होते व वैद्यही होते. त्यात वैद्य हे उपयोगी आहेत. त्यांची गोष्ट खेरीज; परंतु बाकीचे लोक केवळ आर्जवी आणि यजमान जरी अक्षरशत्रू आणि मूर्खशिरोमणी होता, तरी प्रत्येकजण त्याची अतोनात स्तुती करीत होते. कोणी पंडित म्हणे, 'या पुरुषाची बुद्धी केवढी विशाल आहे. कोणताही विषय काढला तरी त्यात समजूत आहेच.' कोणी आप्त होते ते म्हणत की, 'हा मोठा या कुळात दैवशाली आहे. आमचे सर्वांचे आयुष्य यांस होऊ. आज पन्नास-शंभर मनुष्ये याचे पदरी आहेत. शेकडो मनुष्ये मरोत, परंतु त्यांचा पालनवाला न मरो.' अशा अनेक गोष्टींनी त्यांस मूर्ख करून ठेवतात.
 या गृहस्थाची अवस्था पाहून मला फार आश्चर्य वाटले आणि त्यात आणखी एक चमत्कार पाहिला की, इतक्यात किती एक जण त्यांस पुनर्विवाह करण्याची मसलत देत आणि सांगत की, दुसरी बायकों करावी, कारण पुत्र नाही. म्हणजे सरासरी त्यांस पुरती पंचवीस वर्षे नव्हती तो पुत्राची काळजी; व पुत्राकरिता अनुष्ठाने करीत दहा ब्राह्मण बसले होते. आणि लग्न पुन्हा करावयाची तयारी करणे हा केवढा मूर्खपणा आहे? अस्तु.
 याप्रमाणे आमचे लोकांमध्ये प्रत्येक श्रीमंताचे घरी हीच अवस्था आहे व राजे वगैरे यांचे घरी तर याहून अधिक असते. सर्वत्र पहा की, कोठे कोणी राजा शहाणा आहे असे नाही व त्याचे पदरी प्रधान इत्यादी असतात तेही मूर्ख. ते त्यांस विद्या शिकवीत नाहीत. व जुन्या काळच्या पुराणातील मते बाळगणारे व आपले ठिकाणी विद्वान म्हणविणारे पंडित यांस पुसले तर त्यांस विद्या माहीत नसते. जसे विक्षिप्त असतात, त्याप्रमाणे त्यांचे बोलणे. कोणी म्हणतो, पृथ्वी कमलपत्रासारखी आहे. कोणी म्हणतो, यवन हे पूर्वीपासून आहेत; परंतु त्यांस काही देश नाही. समुद्रात कोठे लहान जागा आहे. तेथे त्यांचा वास आहे. पृथ्वीचा अंत हिमालयाजवळ आहे. व पृथ्वीभोवती सात बेटे आहेत. समुद्र दह्याचे व दुधाचे आहेत. इत्यादीक मूर्ख मते शिकवून श्रीमंतांस निरुपयोगी करतात व त्यांचे हातून लोकांस काही उपयोग होत नाही; व ही पुराणातील मते खोटी आहेत, अशी खात्री लोकांची झाल्यावाचून त्यांची बुद्धी शाश्वत पावणार नाही.
 ज्या काळी ही पुराणातील मते व शास्त्रीपंडितांशी मते कल्पित कादंबरीच्या खोट्या व पोरकट गोष्टीसारखी आहेत अशी खात्री होईल, त्याकाळी या लोकांची भ्रांती जाईल; आणि हे ताळ्यावर येतील.

♦ ♦