Jump to content

लोकहितवादींची शतपत्रे/टीपा

विकिस्रोत कडून









टीपा









१. विद्या

पृष्ठ ६६: बुधवारचे वाड्यातील इंग्रजी शाळा
 १८२१ साली पुण्यात विश्रामबागवाड्यात 'संस्कृत पाठशाळा' सुरू करण्यात आली. तिला १८४२ साली इंग्रजीच्या वर्गाची जोड देऊन तिचे रूपांतर इंग्रजी शाळेत करण्यात आले. त्या आधी १० वर्षे सरकारने पुण्यात वेगळी इंग्रजी शाळा काढली. ही शाळा बुधवारवाड्यात होती.

पृष्ठ ६६: त्या ठिकाणी... लायब्ररी सुरू झाली
 ७ फेब्रुवारी १८४८ रोजी बुधवारवाड्यात 'पुणे नेटिव्ह जनरल लायब्ररी' ची स्थापना केली गेली. दक्षिणेतील सरदारांचे एजंट जे. वार्डन यांची या स्थापनेमागे प्रेरणा होती, तर लोकहितवादी, मोरो रघुनाथ ढमढेरे, आबासाहेब पटवर्धन, पदमनजी पेस्तनजी इत्यादी मंडळींचा स्थापनाकार्यात पुढाकार होता.

पृष्ठ ६७: अज्ञान दूर होण्याचा उपाय पुण्यातच केला असे नाही
 जितांवर केवळ सत्ता चालवावी असे इंग्रजांना कधीच वाटले नाही. आपण सत्ता गाजवीत आहोत त्या समाजाचा अभ्यास करावा आणि आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना द्यावा, अशी प्रेरणा मोठमोठ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या व इतरांच्याही मनात निर्माण व्हावी, अशी धडपड मॅकिटॉश, एल्फिन्स्टन, माल्कम यांच्यासारख्या इंग्रज अधिकाऱ्यांनी मोठ्या कसोशीने केली. या धडपडीतून 'लिटररी सोसायटी' सारख्या संस्था जन्माला आल्या. पुण्यातील लायब्ररीची स्थापना यातूनच झाली. आणि इ. स. १८३८ मध्ये अहमदनगर येथे वाचनालय सुरू झाले तेही अधिकाऱ्यांच्या ज्ञानप्रसारक प्रयत्नांमुळेच होय.

पृष्ठ ६८: बाजीराव पेशव्यांचे अंमलात
 दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत अपराध्यांना अत्यंत अमानुषपणे वागविले जात असे व कमालीच्या क्रूर शिक्षा केल्या जात असत. घाशीराम कोतवालाला बाजीरावाने लोकांच्याच स्वाधीन केले व वाटेल ते शासन करण्यास मोकळीक दिली, असे इतिहासावरून समजते. घाशीरामाला लोकांनी हालहाल करून मारले अशी इतिहासाची साक्ष आहे. खुद्द बाजीरावाने विठोजी होळकरास हत्तीच्या पायाखाली मारले, हे ऐतिहासिक सत्य आहे. (अधिक माहितीसाठी 'महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना' हे डॉ. रा. शं. वाळिंबे यांचे पुस्तक पहा. पृष्ठे १७, १८, २०)

पृष्ठ ७०: बाजीराव पेशवे यांचे अपराध
 कमालीची भोगलोलुपता हेच दुसऱ्या बाजीरावाच्या वृत्तीतील महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. बायकांच्या मेळाव्यात घुटमळत राहणे हेच त्याच्या जीवनाचे सार होते. आपल्या सुखात कसलाही व्यत्यय येऊ नये, यासाठीच त्याचा सतत आटापिटा चाललेला असावयाचा, त्याच्या सुखाच्या आड कोणी आले तर त्याच्या मनात नेहमी दंश राहत असे आणि त्याचे तळपट करण्याच्या बाबतीत वाटेल ते कृत्य करण्यास त्याला दिक्कत वाटत नसे. १८०१ साली माधवराव रास्त्यांना विश्वासघाताने अटक करून त्याने रायगड येथे डांबून ठेवले, यावरून हेच दिसते. बाजीरावाचे चारित्र्य हे असले असल्यामुळे राज्याचा बंदोबस्त, न्यायदान, शिक्षण या बाबतीत त्याचे पूर्ण दुर्लक्ष झाले.

पृष्ठ ७३: पूर्वी इंग्रज.. याहूनही मूर्ख होते
 रोमनांच्या अंमलात, इसवी सनाच्या पाचव्या शतकापर्यंत, इंग्रज लोक रानटी अवस्थेतच होते. रोमनांच्या पकडीतून मोकळीक मिळेपर्यंत इंग्लंड संस्कृतीच्या अगदी खालच्या पायरीवर होते.

पृष्ठ ७४: हिंदुस्थानातील लोक दोन हजार वर्षांपूर्वी मोठे पराक्रमी होते
 लोकहितवादींच्या एकूण लिखाणातील सुरावरून असे वाटते की, फार वर्षांपूर्वी हिंदुस्थानातील लोक मोठे पराक्रमी होते, असे त्यांना तेथे सुचवावयाचे असावे; पण १०व्या शतकाच्या अखेरीपर्यंतही हिंदुस्थानातील लोक पराक्रम करीत होते. गुप्तांच्या अमदानीत सुवर्णयुग निर्माण झाले होते. राजकारण, अर्थकारण, शास्त्र, साहित्य, कला अशा अनेक क्षेत्रांत मानवी प्रज्ञेचे व प्रतिभेचे मुक्त आविष्कार सतत होत होते, हे ऐतिहासिक सत्य आहे. अर्थात् हे लोकहितवादींसारख्या इतिहासाच्या व्यासंगी व्यक्तीला विदित नसेल असे म्हणता येणार नाही, तथापि उपरिनिर्दिष्ट विधानातील 'दोन हजार' या शब्दांवरून काहीसा गैरसमज होण्याचा संभव असल्यामुळे येथे हा खुलासा करणे अवश्य वाटते.

पृष्ठ ८७: शिकंदर बादशहास जो गुरू होता
 शिकंदर- ख्रि. पू. ३५५-३२३. हा मॅसिडोनियाचा राजा दुसरा फिलिप व एपिरोटची राजकन्या ऑलिपियस यांचा मुलगा. ॲरिस्टॉटल हा त्याचा गुरू. त्याच्याविषयीची दंतकथा लोकहितवादींनी प्रस्तुत स्थळी उल्लेखिली आहे.

पृष्ठ १००: निर्णयसिंधू, मनोरमा, कौमुदी इत्यादिक ग्रंथ
 निर्णयसिंधू हा एक प्रसिद्ध धर्मग्रंथ, यात अनेक धर्मविषयक व आचारविषयक नियमांची चर्चा केली असून निर्णयविवेकही केला आहे. मनोरमा, कौमुदी हे असेच वेगवेगळ्या विषयांवरील प्राचीन ग्रंथ. 'मनोरमा' या ग्रंथात शांकरभाष्यावर टीका लिहिण्यात आली आहे, तर कौमुदी या ग्रंथात व्याकरणाशास्त्राचे विवेचन केले आहे.

पृष्ठ १०२: अहिल्याबाईने सोळा कोट रुपये धर्मादाय केला
 मल्हारराव होळकरांनी आपली पत्नी गौतमाबाई हिच्या नावे ठेवलेली रक्कम तिच्या पश्चात अहिल्याबाईस मिळाली. अन्नदान, वस्त्रदान, विहिरी खोदणे, तळी बांधणे, घाट बांधणे या कामांत आपल्या जवळील रकमेचा व्यय तिने केला. प्रजेचे किंवा सरकारचे द्रव्य या कामी तिने मुळीच वापरले नाही.

पृष्ठ १०८: बाजीरावासारखे मनास येईल तसे द्रव्य
 दुसऱ्या बाजीरावाने मन मानेल तसे द्रव्य ब्राह्मणास वाटले. या बाबतीतील रियासतकार सरदेसायांनी दिलेली माहिती लक्षात घेण्याजोगी आहे. श्रीमंतास देण्याचा सुमार नाही. इ. स. १७९७च्या श्रावणमासात ब्राह्मण सालाबादापेक्षा जास्त आले. प्रथमदिवशी तीस हजार आले. गुदस्ता वीस हजार होते. दुसऱ्या दिवशी छत्तीस हजार शिधा पावले. शिवाय तीन हजार रिकामे आले. यंदा साठ हजारपर्यंत ब्राह्मण होईल अशी बोलवा आहे.... गेल्या वर्षी दीड लक्ष दक्षिणा होती ती यंदा दुप्पट झाली. श्रीमंतांनी आपल्या हाते दोनशे, चारशे, बाराशे, चवदाशे, दोन हजापर्यंत दक्षिणा दिली... श्रीमंतानी मोहरा, होन, पुतळ्या, रुपये, मोती वगैरे मिळून खिचडी करून वाटली... मेजवान्या, लग्ने यासाठीही असाच हजारोनी खर्च केला. (पेशवे दप्तरात याची बरीच माहिती मिळते.)

पृष्ठ ११६: शहाणे पुरुष एलफिन्स्टनसाहेबाप्रमाणे
 एलफिन्स्टन- माऊन्ट स्टुअर्ट एलफिन्स्टन (१७७९- १८५९) पेशव्यांच्या दरबारचा रेसिडेंट. दक्षिणेचा कमिशनर. मुंबईचा गव्हर्नर (१८१९- १८२७). हा अतिशय बुद्धिमान, धूर्त व धोरणी अधिकारी होता. 'Report on the Conquered Territories ofl the Peshwas' हा त्याचा अहवाल वाचनीय आहे.
 हेस्टिंग्ज- मार्क्विस ऑफ हेस्टिंग्ज (१७५४- १८२६) १८१३-१८२३ या काळातील हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल. पेशवाईचा शेवट याच्या कारकीर्दीत झाला.

पृष्ठ ११६: कोर्ट डैरेक्टर गवरनरादिक
 कोर्ट डैरेक्टर- ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाचे सभासद धोरण ठरविण्याचे व नेमणुका करण्याचे अधिकार यास होते.
 गव्हर्नर- हिंदुस्थानातील प्रमुख प्रांतांचे अधिकारी. मुंबई, कलकत्ता व मद्रास या तीन ठिकाणी हे होते. १७७३ साली रेग्युलेटिंग ॲक्टान्वये गव्हर्नरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कलकत्त्यास गव्हर्नर जनरलची योजना करण्यात आली.

पृष्ठ १२३: ग्रंथ करणाऱ्यास खप नाही
 इंग्रजांच्या अमदानीत सुरुवातीस नवी छापील पुस्तके लोक हाती धरण्यास तयार होत नसत. छापील ग्रंथ हा चरबीयुक्त शाईने छापलेला, तो हातात धरणे म्हणजे भ्रष्टाचार अशी समजूत याच्या मुळाशी असे. यामुळेच पुस्तके खपत नसत. हरि केशवजी यांचे एक पुस्तक ७ हजार रुपये खर्च करून छापले; पण त्याची एकही प्रत खपली नाही अशी नोंद 'Selection from Educational Record' मध्ये मिळते. (ग्रंथ खपावे यासाठी तुपाच्या शाईत ते छापण्याचा व शाई शुद्ध आहे, असा निर्देश करण्याचा प्रयोग काही मंडळींना यामुळेच करावा लागला. या प्रयोगातून निर्माण झालेले एक 'तुपातले गुरुचरित्र' प्रसिद्ध आहे.)

पृष्ठ १२६: जसे पारशी लोक... विद्यावृद्धीचे उदाहरण
 पाश्चात्त्य विद्येचे महत्त्व पारशी लोकांनी फार लवकर ओळखले आणि नव्या विद्या आत्मसात करण्यास त्वरित प्रारंभ गेला. एलफिन्स्टन, इन्स्टिट्यूशन, ग्रांट वैद्यकीय शाळा यांसारख्या शैक्षणिक संस्थांतून पारशी लोकांनी मोठ्या संख्येने आधुनिक शिक्षण घेतले. यामुळे त्यांची दृष्टी व्यापक झाली, अंगी औदार्य बाणले; आणि मग त्यांनी सुधारणाविषयक कार्यक्रम तातडीने हाती घेतला, 'स्टुडन्टस लिटररी असोसिएशन' सारख्या संस्थेतून निबंध वाचून स्त्रीशिक्षणादी सुधारणांचा आग्रहाने पुरस्कार केला. पारशी लोकांनी औद्योगिक सुधारणांसही स्थान दिले व व्यापारात हिरिरीने भाग घेऊन कर्तृत्व दाखविले. बयरामजी कर्सेटजी, नवरोजी फर्दुनजी, दादाभाई नवरोजी, नसरवानजी वाडिया, फ्रामजी कावसजी, जमशेटजी जिजीभाई आदी व्यक्तीचें कार्य या दृष्टीने लक्षात घेण्याजोगे आहे. (अधिक माहितीसाठी पु. बा. कुलकर्णीलिखित 'नाना शंकरशेट यांचे चरित्र' पाहावे.)

पृष्ठ १२८: कल्याणोन्नायक मंडळी
 'पुणे पाठशाळे' चे प्रमुख मोरशास्त्री साठे यांनी मंडळीची स्थापना केली. जनमानसावर चांगले संस्कार करण्याचा व लोकमतास नवे वळण लावण्याचा हेतु या स्थापनेमागे होता, परंतु तो फारसा सफल झाला असे त्या मंडळीच्या कार्यावरून वाटत नाही, लोकहितवादींच्या दृष्टीने तर मंडळीचे कार्य अनर्थकारक ठरलेले दिसते. पृष्ठ.... वरही 'कल्याणोन्नायक मंडळी' चा उल्लेख लोकहितवादींनी पुन्हा केला आहे. त्यावरूनही हेच दिसून येते
 (लोकहितवादींचे म्हणणे बरोबर नसल्याचे ग. त्र्यं. माडखोलकरांनी सूचित केले आहे. पाहा- 'चिपळूणकर- काल आणि कर्तृत्व' पृ. ५१-५५)

२. हिंदूंचे धार्मिक जीवन

पृष्ठ १३६: तो पंथ अलीकडे... पुणे इ. ठिकाणी बहुत चालू
 शिवाची शक्ती हीस आराध्य दैवत मानणारा पंथ तो शाक्तपंथ. जातिबंधने त्यास अमान्य. मद्य-मांस-मैथुनादी 'पंच मकार' या पंथात फार बोकाळलेले. १८४८च्या सुमारास पुण्यामध्ये हा पंथ फार जोरात होता असे तत्कालीन 'ज्ञानप्रकाशा 'तील उल्लेखावरून दिसते.

पृष्ठ १४२: पुराणप्रसिद्ध मुचकुन्दाप्रमाणे निद्रा करतो
 मुचकुन्द हा मांधाता राजाचा सर्वांत धाकटा मुलगा. तो फार प्रतापी होता. त्याने अवधी पृथ्वी पादाक्रान्त केली. दैत्यांशी लढणाऱ्या देवांना साह्य केले. तेव्हा देवांनी याला वर मागण्यास सांगितले. 'आपल्या निद्रेचा जो भंग करील तो जळून खाक व्हावा व त्या क्षणी आपल्याला विष्णूचे दर्शन व्हावे' असा वर त्याने मागून घेतला... पुढे एकदा हा गुहेत झोपलेला असताना कृष्णाने आपला शेला याच्या अंगावर घातला. मागून तेथे आलेल्या दुष्ट कालयवनाने शेल्यामुळे मुचकुंदासच कृष्ण समजून त्याला लाथ मारली, तेव्हा मुचकुंद जागा झाला आणि वराप्रमाणे कालयवन जळून गेला.

पृष्ठ १४२: क्रिस्तियन धर्म युरोपखंडात वृद्धिंगत झाला
 पॅलेस्टाइन हे ख्रिश्चन धर्माचे मूलस्थान. तेथे रोमन लोकांचे वर्चस्व होते. त्या वेळी रोमन साम्राज्यात ख्रिश्चनांचा अतिशय छळ झाला. नीरो (इ. स. ६४), डॉमिशियन (इ. स. ८५), टॅजन आणि सम्राटांच्या अमलात व पुढे इ. स. २५० नंतर तर ख्रिस्त्यांचा अनन्वित छळ झाला. कॉन्स्टन्टाइन (इ. स. ३१३) या सम्राटाने ख्रिश्चन धर्माकडे औदार्याने पाहिले व त्यावरील नियंत्रणे काढून टाकली. त्यानंतर इ. स. ३७९- ३९५ या काळात थियोडोशियसच्या कारकीर्दीत ख्रिश्चन धर्म हा राजधर्म झाला; आणि मग तो झपाट्याने युरोपात व इतर ठिकाणी प्रसार पावला.

पृष्ठ १४३: इराण देशांत जरस्ताचा अग्निपूजेचा धर्म
 झरतुष्ट्र (सुमारे इ. स. पूर्वी ९ वे शतक) या पारशी धर्मसंस्थापकाचा जन्म मीडियाचे पश्चिमेस असलेल्या अट्रोपेटन या गावी झाला. याने पर्शियन लोकांना नव्या धर्मांची तत्त्वे सांगितली. सत् व असत् यांच्या संघर्षात शेवट सत्याचा विजय होऊन कल्याण होते; तेव्हा अहिरिमनचे अनुयायित्व न पत्करता अहुरमज्दाचे अनुयायित्व पत्करावे. सद्विचार, सत्शब्द, सत्कृत्य यांच्या परिपालनाने साधुत्व येते असा त्यांच्या तत्त्वप्रतिपादनाचा आशय होता. हिंदुधर्मातील काही तत्त्वांशी ही तत्त्वे जुळती आहेत. झरतुष्ट्राचे हे प्रतिपादन 'अवेस्ता' नावाच्या धर्मग्रंथात वाचावयास मिळते.

पृष्ठ १६०: कोणी म्हणतात शिव अधिक
 भक्तिपंथातील दोन संप्रदाय म्हणजे शैव संप्रदाय व वैष्णव संप्रदाय हे होत. शैव संप्रदाय आपल्या तत्त्वज्ञानात 'शिवा'स अग्रस्थान देतो, तर वैष्णव संप्रदाय विष्णूस मुख्य दैवत मानतो. एका काळी या दोन संप्रदायांत दैवतविरोधावरून रणे माजली. पुढे शंकराचार्यांनी पंचायतनपूजा सुरू करून दोन पंथांचा समन्वय साधण्याचा व त्यातील वैर कमी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

पृष्ठ १८९: बाजीराव राज्यावर होता तेव्हा... स्त्रिया भ्रष्ट
 दुसरा बाजीराव केवळ कलावंतिणींच्याच नादी लागलेला होता असे नव्हे, तर चांगल्या कुलीन स्त्रियांच्याही मागे लागला होता हे त्याने दिलेल्या बक्षिसांच्या नोंदीवरून दिसून येते. बायकांच्या घोळक्यात काळ घालविल्याशिवाय व रासवट विदूषकी चाळे केल्याशिवाय, इतकेच नव्हे तर किळसवाणे व्यभिचार पाहिल्याशिवाय, त्याचा एक दिवस जात नसे. त्याच्या वाड्यात येणाऱ्या बायका बहुधा थोरामोठ्यांच्या घरातील असत आणि जे सरदार आपल्या घरांतील स्त्रिया वाड्यात पाठविण्यास खळखळ करीत त्यांच्यावर बाजीरावाचा अनावर संताप होई. खंडेराव रास्त्याने आपल्या घरातील बायका वाड्यात पाठविण्यास नकार दिला याच कारणामुळे बाजीरावाने त्याचा काटा काढला आणि माधवराव रास्त्याचा त्याने जो दीर्घकाळ छळ केला त्याच्याही मुळाशी बहुधा हेच कारण असावे. बापू गोखल्यावर प्रथम बाजीरावाचा राग होता आणि नंतर तो राग मावळून त्याच्यावर बाजीरावाची बहाल मर्जी बसली याचे कारण बापू गोखल्याने आपल्या घराची बेअब्रू होण्यास संमति दिली हेच होते असे माहितगार लोक बोलत असत. एलिफिन्स्टनच्या लिखाणात व त्याच्या कृष्णाजी बल्लाळ गोडबोले लिखित चरित्रात याविषयीचे उल्लेख मिळतात. (डॉ. रा. शं. वाळिंबे यांच्या 'महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना' या ग्रंथावरून. पृष्ठे ३१-३२)

पृष्ठ १९५: यास आधार शांडिल्याची स्मृति
 शांडिल्य हा अश्वलायन सूत्रातील गोत्रांच्या यादीत असून शांडिल्य सूत्रे भक्तिज्ञानाविषयी आहेत. एक स्मृति, धर्मसूत्र व तत्त्वदीपिका शांडिल्याच्या नावावर आहे.

पृष्ठ १९५: विशिष्टाद्वैत
 रामानुजाचार्यांनी प्रतिपादिलेले वेदान्तमत. शंकराचार्यांचा मायावाद आणि अद्वैतसिद्धान्त ही दोनही खरी नसून जीव, जगत व ईश्वर ही तीन तत्त्वे जरी भिन्न असली तरी जीव (चित) व जगत (अचित) ही दोनही एका ईश्वराचेच शरीर असल्यामुळे चित- अचित- ईश्वर एकच होय. शरीरातील या सूक्ष्म चित-अचित यापासून पुढे चित-अचित किंवा अनेक जीव व जगत निर्माण होतात. ब्रह्म हे अद्वैत खरे, परंतु केवळ अद्वैत नव्हे तर विशिष्ट अद्वैत होय.

पृष्ठ २०१: जेवणापलीकडे त्यास कर्तव्यच राहिले नाही
 या संदर्भात १८६८ सालच्या ना. वि. जोशी लिखित 'पुणे वर्णना'तील पुढील उतारा लक्षणीय आहे-
 "या वेळच्या लोकांची स्थिती म्हटली म्हणजे अशी होती की, सुग्रास खावे आणि रिकामटेकड्या गप्पा मारीत बसावे. माहिती म्हटली म्हणजे इतकीच की, इंग्रज हा कलकत्ता म्हणून एक बेट आहे तेथील राहणारा. याहून विशेष माहिती म्हटली म्हणजे ब्राह्मणभोजनास किती शेर तूप लागते, उन्हाळ्यात किती पायल्यांचे पुरण, पावसाळ्यात किती पायल्यांचे, हिवाळ्यात किती पायल्यांचे, याप्रमाणे कोशिंबिरी- भाज्यांचा सुद्धा सारखा बेत उरकण्याजोगा तोलाने सांगत. याचे नेहमी संभाषण म्हटले म्हणजे विशेषेकरून जेवणाविषयी व ग्रामण्याविषयी असावयाचे. त्यांची विद्या दोन प्रकारची होती एक कारकुनी व दुसरी याज्ञिकी.
 "शूरत्वाविषयी म्हणावे तर ते लोकांत अगदी नव्हते. पाचशे वर्षांपूर्वीच्या लोकांची आणि आताच्या लोकांची जर शूरत्वाविषयी तुलना करून पाहिली तर शेवटील बाजीराव येईपर्यंत त्यांच्यात काहीतरी शौर्य होते. परंतु बाजीरावाने लोकांस अगदी नादान करून विषयनिमन करून सोडले; पराक्रमहीन, निर्लज्ज, दुर्गुणी, स्त्रैण, मूर्ख, अशक्त, उन्मत्त, कपटी, अविश्वासू, स्वहित न जाणणारे, दूरदृष्टिहीन, आळशी, पुष्कळ खाणारे असे केले. पराक्रम, विद्या, सावधान या गुणांचे मौल्य अगदी गेले. ऐषआरामाच्या बाबी वाढल्या. साखरभात खाणारास मान व मौल्य आले. राज्याचा बंदोबस्त गेला. आणि जसे एखादे घर सर्व ठिकाणी कुजके, पडीत, खिळखिळे होते, तसे राज्य झाले; तेणेकरून प्रभू राज्यभ्रष्ट होऊन धुळीचे दिवे खात गेले." (पृ. ७०) याच 'पुणे- वर्णना'त 'ज्ञानप्रकाशा'तील एक उतारा- असाच बाजीरावकालीन- पुण्यातील समाजस्थितीवर प्रकाश टाकणारा देण्यात आला आहे. जिज्ञासूंनी डॉक्टर वाळिंबे यांच्या 'महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना' या पुस्तकातून (पृ. ३७-३८) तो वाचावा. ('पुणे वर्णन' हे पुस्तक अतिदुर्मिळ आहे.)
 उदरपरायण, भोजनभाऊ ब्राह्मणांवर लोकहितवादींनी अनेक ठिकाणी कोरडे ओढले आहेत. त्याचे करणे अस्थानी नव्हते हे लक्षात यावे एवढ्यासाठीच दीर्घ उतारा येथे उद्धृत केला आहे.

पृष्ठ २०४: मुंबईत... धर्म बुडाला...
 या संदर्भात 'प्रभाकर' पत्रातील पुढील पत्र पाहण्याजोगे आहे. पत्रलेखक 'हिंदुधर्माभिमानी' आपल्या १६-१-११५२ च्या पत्रात लिहितो- "..आश्चर्याची व दुःखाची गोष्ट म्हणजे येथे (मुंबईत) येताच तेथील हिंदूंची मने बहकून गेली आहेत असे मला आढळून आले! काही लोक म्हणतात पुनर्विवाह करा, कित्येकांस आपल्या मुलीबाळी शाळेत पाठवाव्या असे वाटू लागले आहे! आणि कित्येक तर जातिबंधने तोडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत!.. वजनदार... गृहस्थही अशा कार्यास हातभार लावीत आहेत!... जगन्नाथ शंकरशेट यांची स्वधर्मावरील श्रद्धा सर्वप्रसिद्ध आहे. परंतु त्यांचे दाखवावयाचे दात वेगळे व खावयाचे दात वेगळे आहेत." (नाना शंकरशेट यांचे चरित्र- पु. बा. कुलकर्णी; पृ. ११० वरून)
 मुंबईमधील सुधारणांकडे सनातनी लोक कोणत्या दृष्टीने पहात होते याची कल्पना या पत्रावरून येईल व लोकहितवादींचे उद्गार किती अर्थपूर्ण आहेत हे लक्षात येईल.

३. आमचे वर्णगुरू

पृष्ठ २१५: ब्राह्मण... लोक यांणी दीडशें वर्षे राज्य केले; परंतु असे काही (शोधन वगैरे) केले नाही
 एका प्रसंगी नदीचे पाणी हटविण्यासाठी नाना फडणविसाने इंग्रजांकडून 'कळ' (यंत्र) आणविली. 'कळी'शिवाय पाणी हटणार नाही हे नानास कळले; पण 'कळ' आपणच निर्माण करावी हे त्याच्या मनात आले नाही किंवा आले असले तरी त्यातून काही निष्पन्न झाले नाही. याचे कारण शोधप्रवृत्तीच त्या काळात नष्ट झाली होती. यामुळे साध्यासुध्या वस्तूंसाठी सुद्धा लोकांना परकीयांकडे पहावे लागत असे. या संदर्भात, न. चिं. केळकर यांनी 'मराठे व इंग्रज' या ग्रंथात जे लिहिले आहे (समग्र केळकर वाङ्मय, खंड ७, पृ. ३०४) ते लक्षात येण्याजोगे आहे- "पल्लेदार तोफा, बंदुका, पाणीदार तलवारी व कट्यारी, होकायंत्रे, दुर्बिणी वगैरे युद्धोपयोगी पदार्थ, तसेच घड्याळे, हंड्या झुंबरे, आरसे, उत्तम रेशमी कपडा, तलम बारीक मलमल वगैरे व्यवहारोपयोगी पदार्थ याकरिताही त्यांना (मराठ्यांना) इंग्रज, चिनी, मुसलमान वगैरे लोकांच्या तोंडाकडे पहावे लागे... या जिनसा उत्पन्न करण्याची इच्छा त्यांना फारशी झाली नाही." ही इच्छा का झाली नाही याची मार्मिक मीमांसा इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी 'राधामाधवविलासचंपू' च्या प्रस्तावनेत (पृ. १०७) फार चांगली केली आहे. तीही या ठिकाणी लक्षात घेण्याजोगी आहे. "उत्तम, रेखीव व नेमके हत्यार बनविण्याची कला पैदा होण्यास शास्त्रीय ज्ञानाची जी पूर्वतयारी राष्ट्रात व्हावी लागते ती त्या काळी महाराष्ट्रात नव्हती. शहाजीच्या हयातीत युरोपात डेकार्ट, बेकन इत्यादी विचारवंत, सृष्ट पदार्थ संशोधनकार्याचे वाली, ज्यारीने पंचभूतांचा शोध लावण्यास लोकांना प्रोत्साहित करीत होते. आणि आपल्या इकडे एकनाथ, तुकाराम, दासोपंत.. इत्यादी संत पंचभूतांना मारून ब्रह्मसाक्षात्कारात राष्ट्राला नेऊन मुक्त करण्याच्या खटपटीत होते. अशांना स्क्रू, टाचणी, बंदूक व तोफ यांचा विचार वमनप्राय वाटल्यास त्यात नवल कसचे?"
 हिंदुस्थानातील लोकांनी आपल्या राजवटीत शोध केला नाही हे यावरून स्पष्ट होईल. (अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी प्रा. द. के. केळकर यांच्या 'संस्कृतिसंगम' व 'उद्याची संस्कृती' या ग्रंथातील अनुक्रमे 'विचारदौर्बल्याचे शेवाळे' व 'धर्मांची रेशमी काढणी' ही दोन प्रकरणे वाचावी.)

पृष्ठ २१८: त्यांची ती कायम.. पेशव्यांचेच बुडाले
 शिंदे, होळकर, गायकवाड, हे पेशव्यांचे सरदार होते. पेशवे त्यांचे प्रभु असले तरी त्यांच्या प्रदेशात (संस्थानात) त्यांचा अधिकार असे. १८१८ साली पेशव्यांचे राज्य बुडाले. पण इतर 'संस्थानिक' होऊन पूर्ण शरणागती पत्करून टिकून राहिले.

पृष्ठ २२१: जर छापखाना व डाक हिंदुस्थानात असती
 'अव्वल इंग्रजी' मध्ये सुज्ञांना मुद्रणविद्येचे (महत्त्व लक्षात आल्यामुळे) फार अगत्य वाटले हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या 'अनेकविद्यामूलतत्त्वसंग्रहां'तील पुढील विधानांवरून लक्षात येईल. "छापण्याची युक्ती न निघती तर वर्तमानपत्रे व नियमित काळी निघणारी पुस्तके न होती. हल्ली पृथ्वीवर एका महिन्यात जितके कागद छापले जातात, तितके हाताने लिहावयाचे असते तर कोट्यवधी मनुष्ये लागली असती. परमेश्वराने अप्रतिम व अत्युत्तम कला, विद्यास्वातंत्र्य- सौजन्य-संपत्ति इत्यादी उत्तमोत्तम गोष्टी उत्तरोत्तर वाढाव्या म्हणून पाठविली."
 इंग्रजी अमलात मुद्रणविद्येविषयी जे अगत्य लोकांस वाटले ते पेशवेकालीन महाराष्ट्रातील लोकांस वाटले नाही. "योगवासिष्ठासारख्या एका पोथीची नक्कल करून घेण्यास त्या काळी सुमारे ४०० रुपये खर्च येई." (पेशवेकालीन महाराष्ट्र- वा. कृ. भावे; पृ. १०५) पण एकाच वेळी अनेक प्रती तयार करणाऱ्या छापखान्याची कल्पना कोणास सुचली नाही किंवा सुचली असली तरी कायम स्वरूपात मूर्त करण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. शिवछत्रपतींनी छापखाना काढण्याचा प्रयत्न केला असे म्हणतात; पण तो यशस्वी झालेला दिसत नाही. नाना फडणविसाने लाकडाच्या ठोकळ्यावर अक्षणे कोरून गीता छापण्यास सुरूवात केली असे उल्लेख मिळतात; पण नानाच्या प्रयत्नासही विशेष फळ आलेले दिसत नाही. ख्रिस्ती मिशनरी हिंदुस्थानात आल्यावर (१९ व्या शतकाच्या प्रारंभी) मुद्रणविद्या प्रसार पावू लागली. तोपर्यंत तिचा अभावच होता. राज्य गेले त्याचे मूळ यात आहे या लोकहितवादींच्या म्हणण्यात फार खोल अर्थ आहे.

पृष्ठ २२२: पुण्यात वकील होता
 पुण्याच्या दरबारात इंग्रजांचे वकील (मॅलेट, इंचबर्ड...) थोरल्या माधवरावाच्या कारकीर्दीपासून राहू लागले. मराठ्यांना 'वकील आहे.' एवढीच खबर असे. वकिलाचे धोरण, त्याच्या राजकारणाचे मर्म जाण्याची कुवत त्यांच्यात नव्हती.

पृष्ठ २३६: बाजीरावाने गंगाधरशास्त्री याजला मारले
 गंगाधर कृष्ण पटवर्धन हे मेणवलीचे राहणारे. पेशव्यांच्या वाड्यात कर्नाटक प्रकरणाच्या दप्तरात ते कारकून म्हणून काम करीत. पेशवे व गायकवाड यांच्यामधील बेबनाव मिटविण्याच्या कामी त्यांनी नेमणूक झाली होती. त्या वेळी दुसऱ्या बाजीरावाने त्यांचा खून आपला कारभारी त्रिंबकजी डेंगळे याच्याकरवी पंढरपूर येथे करविला असा लोकापवाद आहे. (१४ जुलै १८१५) (या प्रकरणाच्या अधिक माहितीसाठी 'मराठे व इंग्रज' हे न. चिं. केळकर यांचे पुस्तक पाहावे. पृ. १०४- १०६)

पृष्ठ २४०: पूर्वी होळकरांनी... पुणे शहर लुटून लोकांस मारिले
 अमृतराव (दुसऱ्या बाजीरावाचा भाऊ) याच्या अमलाखाली पुणे असताना १८०२ साली यशवंतराव होळकराने पुण्यावर धाड घातली. बाजीरावाने त्याच्या भावास- विठोजीस क्रूरपणे मारले. त्याचा सूड उगविण्यासाठी यशवंतराव नोव्हेंबर महिन्यात पुण्यावर चाल करून आला. त्याने पुण्यात मन मानेल तशी लुटालूट केली. शस्त्रागार, अंबाऱ्या, सोने, रूपे, जवाहिर, कापड सारे त्याने लुटून नेले. लूट करताना त्याने लोकांवर अनन्वित अत्याचार केले. 'पुणे-वर्णन' कर्ते ना. वि. जोशी लिहितात (पृ. ६६), "त्या वेळेस होळकर हे नाव ऐकण्यापेक्षा यमाजीपंत याचे नाव ऐकण्यास लोकांस बरे वाटे." (होळकर प्रकरणाच्या अधिक माहितीसाठी व 'पुणे-वर्णना'तील लुटीच्या व अत्याचारांच्या तपशीलवार वर्णनासाठी डॉ. रा. शं. वाळिंबे यांचा 'महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना' हा ग्रंथ पाहा. पृ. २०-२३).

पृष्ठ २४४: वेदान्ती आहेत त्यांस, असे समजत नाही
 उपनिषदात सांगितलेले तत्त्वज्ञान ते वेदान्त. पण शंकराचार्यप्रणीत अद्वैतासच सामान्यतः वेदान्त म्हणून संबोधिले जाते. जीव व ब्रह्म एक आहे; जग हा केवळ भास आहे असे अद्वैत वेदान्त सांगतो. लोकहितवादींस हे म्हणणे मुळीच मान्य नाही. ते जगाचा विचार आध्यात्मिक पातळीवरून न करता ऐहिक भूमिकेतून करतात. त्यामुळेच परब्रह्माचा विचार करणारे त्यांना मूर्ख वाटतात आणि इहलोकातील गांजलेल्या जीवास ज्ञान सुख देणारे त्यांना खरे वेदान्ती वाटतात.

पृष्ठ २४५: दक्षणा ग्रंथकर्त्यास द्यावी
 सेनापती खंडेराव दाभाडे यांनी तळेगाव येथे विद्वानांना दक्षिणा द्यावयास सुरुवात केली. ५ लक्ष रुपये दरवर्षी वाटले जात. इ. स. १७३० मध्ये खंडेराव दाभाडे याचा मुलगा त्रिंबकजी याचा बाजीराव बल्लाळ पेशवे याने धोरणीपणाने पराभव केला. नंतर दक्षिणा पुण्यात वाटण्यास प्रारंभ झाला. एलफिन्स्टनने दक्षिणा वाटण्याचा क्रम पुढेही चालू ठेवला, पण कालांतराने दक्षिणा देण्याचे सरकारने हळूहळू बंद केले. १८४९ साली निम्मी दक्षिणारक्कम मराठी ग्रंथांना उत्तेजन देण्यासाठी सरकारने 'दक्षिणा प्राइझ कमिटी' निर्माण केली. असे करावे ही मागणी सरकारकडे काही एतद्देशीयांनीच केली होती, असे लोकहितवादी सांगतात.

पृष्ठ २४६: म्हणजे एक पुरंदरचे बंड मोडले
 १८२१ साली 'पुणे-संस्कृत- पाठशाळा' स्थापन झाली. १८२३ साली ती बंद करावी अशी सूचना कंपनीच्या डायरेक्टरांनी केली; पण ती एलफिन्स्टनने फेटाळली. पाठशाळेत प्रचलित असलेल्या संस्कृत- शिक्षणात लोकहितवादींस अनर्थाचे मूळ दिसत असल्यामुळे पाठशाळेचा विध्वंस प्रथम करावा असे ते म्हणतात. हे म्हणत असताना लोकहितवादींनी पाठशाळेचा (आणि 'कल्याणोन्नायक मंडळी'चाही) अधिक्षेप 'पुरंदरचे बंड' या शब्दात केला आहे. 'पुरंदरचे बंड' असा शब्दप्रयोग करण्याचे कारण ठामपणे सांगता येण्याइतकी स्पष्टता येथे नाही. तथापि दूरान्वयाने अर्थ लावता येईल, तो असा- माधवराव पेशव्यांच्या कारकीर्दीत इ. स. १७६४ मध्ये पुरंदर किल्ल्यावर कोळ्यांनी एक छोटेसे बंड केले. वस्तुतः कोळी हे तेथील रखवालदार; पण त्यांनीच हे विपरीत कृत्य केले. या कृत्यासारखेच कृत्य पुण्यातील 'कल्याणोन्नायक मंडळी' चे सभासद व 'पाठशाळे'चे अभिमानी हे करीत आहेत. हे विद्वान, पंडित यांनी खऱ्या विद्येचे रक्षण करावयाचे, तर हे जुन्या, गतार्थ विद्येची कड घेतात, ग्रामण्यादिकांत शक्ती खर्च करतात; म्हणजे एक प्रकारे कोळ्यांच्या बंडासारखेच हे विद्याविरोधी बंड होय, असे लोकहितवादींना येथे सुचवावयाचे असावे.

४. स्त्री जीवन

पृष्ठ २५५: (१) विश्वामित्राने नवी सृष्टी केली; (२) अगस्तीने समुद्र प्राशन केला; (३) दुर्वासाचे शापाने विष्णूने दहा जन्म धारण केले व (४) भृगूने लक्ष्मीनारायणास लाथ मारली.
 (१) विश्वामित्राने त्रिशंकूला सदेह स्वर्गी चढविण्यासाठी प्रतिसृष्टी निर्माण केली अशी कथा आहे.
 (२) पूर्वी राक्षस समुद्रात लपून राहून देवांना त्रास देत असत. तो चुकविण्यासाठी इंद्राने अग्नि आणि वायू यांना समुद्र शोषण्याची केलेली आज्ञा त्यांनी न मानल्यामुळे त्यांस इंद्रशापामुळे मृत्युलोकी जन्म घ्यावा लागला. तो त्यांनी अगस्तीच्या रूपाने घेतला; आणि समुद्राचे शोषण करून देवांना राक्षसांच्या त्रासातून मुक्त केले.
 (३) विष्णूने जे दशावतार घेतले ते येथे अभिप्रेत आहेत.
 (४) श्रीवत्स हा श्राद्धदेवाचा पुत्र. त्याचा विवाह ठरला, त्यावेळी चातुर्मास असल्यामुळे मुहूर्त मिळेना. श्रीवत्साला विवाह लवकर उरकावयाचा असल्यामुळे तो क्षीरसागराकडे गेला व त्याने झोपलेल्या विष्णूच्या छातीवर लाथ मारून त्यास जागे केले व आपला विवाह उरकला, अशी भागवतात कथा आहे.

पृष्ठ २५८: पूर्वी हिंदू लोक सीथिया देशातून हिंदुस्थानात आले
 पूर्वी भारतात उत्तर आशियातील अनेक भटक्या टोळ्या आल्या. त्यातील एक टोळी ही सीथियन होती.

पृष्ठ २६१: पुनर्विवाह हिंदू लोकांचे सुधारणेचे मूळ आहे
 पुनर्विवाहविषयक खल अव्वल इंग्रजीत बाळशास्त्री जांभेकरांपासूनच सुरू झाला होता. त्यांनी १८३७ सालच्या 'दर्पण'च्या काही अंकांत (१८ ऑगस्ट, ८ व १५ सप्टेंबर १८३७ च्या अंकात) या विषयावर तीन लेख लिहून व अन्य प्रस्तावना वगैरे लिहून एतद्विषयक अनुकूल मतप्रदर्शन केले होते. (पाहा - बाळशास्त्री जांभेकर ग्रंथ, खंड २रा. संपादक- ग. गं. जांभेकर, पृ. १३०-१३५ व २९३). यावरून पुनर्विवाहात सुधारणेचे मूळ आहे हे त्या काळात कसे प्रतीत होऊ लागले होते हे स्पष्ट होते. पुढे पुनर्विवाह प्रकरण चांगलेच धसाला लागले होते, हे त्या काळातील गाजलेल्या पुनर्विवाहावरून व विष्णुशास्त्री पंडितांसारख्यांनी केलेल्या वादावरून सहज लक्षात येते. (अधिक माहितीसाठी लोकहितवादी व न्या. रानडे यांची चरित्रे पाहा.)

पृष्ठ २६४: इंग्लंडातील थोरली सनद
 इ. स. १६८८ मध्ये इंग्लंडमध्ये रक्तविहीन राज्यक्रांती होऊन इ. स. १६८९ मध्ये ३रा विल्यम व मेरी ही अधिकारारूढ झाली. त्या वेळी त्यांच्याकडून भाषणस्वातंत्र्य, निर्वाचनस्वातंत्र्य, राजावरील पार्लमेंटचे नियंत्रण इत्यादी कलमे असलेली एक हक्कांची सनद (Declaration of Rights) पार्लमेंटने संमत करून घेतली व तिला पुढे कायदेशीर रूप दिले. यासच (इंग्लंडातील) हक्कांची सनद असे म्हटले गेले.

पृष्ठ २६४: फराशीस यांची राज्यक्रांती
 १६ व्या लुईच्या कारकीर्दीत इ. स. १७८९ मध्ये फ्रान्समध्ये समाजातील सामाजिक, आर्थिक, राजकीय असंतोषाचा उद्रेक एका मोठ्या राज्यक्रांतीच्या रूपाने झाला. या क्रांतीच्या वेळीच 'स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व' या तत्त्वत्रयींचा उद्घोष प्रथम केला गेला आणि परिणामी राज्यसत्ता संपुष्टात येऊन लोकसत्तेचा उदय झाला.

पृष्ठ २६४: रूमचे राज्याचा नाश
 इ. स. १४५३ मध्ये रोमन साम्राज्याच्या राजधानीवर- कॉन्स्टॅटिनोपलवर तुर्कांनी धाड घातली तेव्हा रोमन सत्ता लयास गेली आणि त्याबरोबरच मध्ययुगाची- तमोयुगाची इतिश्री झाली. याप्रमाणे १५ व्या शतकाच्या मध्यावर रोमन साम्राज्याचा शेवट झाला असला तरी ४थ्या, ५ व्या शतकापासूनच ही प्रक्रिया चालू झाली होती.

पृष्ठ २६५: अमेरिका खंडात युरोपियन लोकांची वस्ती
 १४९२ साली अमेरिकेचा शोध लागला. ६ वा एडवर्ड व मेरी ट्यूडर यांच्या कारकीर्दीत ज्यांचा छळ झाला त्यांनी मग तेथे जाऊन वसाहत केली. पुढे एलिझाबेथच्या काळात व्यापारामुळे वसाहतीत वाढ झाली व अनेक इंग्रज तेथे जाऊन राहिले. पुढे स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स येथील लोकांनीही तेथे जाऊन वसाहती केल्या.

पृष्ठ २६८: शास्त्रास एकीकडे ठेवा... विचार करून पाहा
 अंधश्रद्धेची कास सोडून बुद्धीची- विवेकाची कास धरण्याचा हा आग्रह म्हणजे इंग्रजांच्या आगमनामुळे झालेल्या युगांतराचा परिपाक होय. 'अव्वल इंग्रजी' मधील नवशिक्षितांनी एकसारखा असा आग्रह धरलेला दिसतो. "शोध व विचार यापासून उपयोगी फले होतात.. प्रतिघटका नवे ज्ञान काहीतरी माहीत करून देतात" (दर्पण - २ मार्च १८३२), "ईश्वराने आपणास बुद्धि दिली आहे तिच्या योगाने विचार करावा" (हिंदू लोकांच्या सणाविषयी निबंध- पुरवणी - बाबा पदमनजी), यांच्यासारख्या विधानांवरून हेच दिसून येते.

पृष्ठ २८५: तुम्ही मंडळी स्थापन केली याचा मला संतोष आहे
 लोकहितवादींनी 'कल्याणोन्नायक मंडळी' वर टीका केली असली तरी विशिष्ट मर्यादेपर्यंत तिचा गौरवपूर्वक उल्लेखही त्यांनी केलेला दिसतो. यावरून लोकहितवादींची टीका वैयक्तिक नसून तत्त्वमूलक कशी होती, हे उघड होण्यास प्रत्यवाय नाही.

५. जातिभेद

पृष्ठ २८७: ते शास्त्र लिहिण्यापूर्वी व पश्चात असा नियम असेल असे वाटत नाही
 लोकहितवादींचा कयास खरा आहे. 'जन्मतः शूद्र असलेला माणूस संस्कारांनी द्विजपदवीस योग्य ठरतो,' 'ज्याच्या ठायी संस्कारजन्य शील दिसून येईल त्यास ब्राह्मण म्हणावे, 'शूद्राअंगी ब्राह्मणाचे गुण असल्यास त्यास ब्राह्मण म्हणू नये.' अशी अनेक वचने संस्कृत वाङ्मयात आढळतात. (जिज्ञासूंनी 'अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ' व 'स्पर्शास्पर्श' ही श्रीधरशास्त्री पाठक व पंडित सातवळेकर यांची पुस्तके पाहावी.)

पृष्ठ २८९: बाजीरावास तर नेहमी हेच (जेवणावळीचे) वेड होते.
 १८०५ ते १८०९ या चार वर्षांच्या काळात केवळ इंग्रज अधिकाऱ्यांना मेजवान्या ('बडा खाना') देण्यासाठी (दुसऱ्या) बाजीरावने जवळजवळ तेरा हजार रुपये खर्च केले असे पेशवे दप्तरातील कागदपत्रांवरून (क्र. २२) दिसते. (पाहा - महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना- डॉ. रा. शं. वाळिंबे, पृ. २८.) इतरांसाठी केलेल्या मेजवान्या व रोजच्या पंक्ती वेगळ्याच. यावरून बाजीरावाचे भोजनवेड स्पष्ट होईल.

पृष्ठ २९१: शूरत्व या मुलखातून गेले
 पृष्ठ --- वरील 'पुणे वर्णना'तील उतारा या संदर्भात पुन्हा लक्षात घेण्याजोगा आहे.

७. आमचे राजकारण व राज्यकर्ते

पृष्ठ ३२६: त्यास फ्रेंच रिवोल्युशन म्हणतात
 पृष्ठ —-- वरील ('फराशीस यांची राज्यक्रांती' यावरील) टीपा पाहा.

पृष्ठ ३२६: मागे पेशवाईत... दंगे झाले
 (१) पानिपतच्या युद्धात सदाशिवरावभाऊ (भाऊसाहेब) धारातीर्थी पतन पावले, पण त्यांचा पत्ता लागला नाही. याचा फायदा पुढे माधवराव पेशव्यांच्या कारकीर्दीत सुखनिधान नावाच्या माणसाने घेण्याचा प्रयत्न केला व बरीच गडबड उडविली.
 (२) चतुरसिंग भोसले हे धाकट्या शाहूचे सख्खे भाऊ. ते हुशार व धाडशी असल्याचे आणि म्हणून छत्रपतींच्या गादीस लायक असल्याचे रियासतकार सरदेसाई सांगतात. इ. स. १८०३ मध्ये इंग्रजांची मदत घेऊन दुसरा बाजीराव पेशवेपदावर आला हे त्यांना आवडले नाही. म्हणूनच पुढे शिंदे व इंग्रज यात झालेल्या धुमश्चक्रीत त्यांनी शिंद्यांची बाजू घेतली.
 (३) ब्रिटिशांच्या अमदानीत महाराष्ट्रात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक छोटे मोठे उठाव झाले. १८४६ मधील उमाजी नाइकांचे दरोडे दंगे हे यातीलच होत.
 (४) उमाजीच्या दंग्यासारखेच राघू भांगऱ्याचे १८४४ मधले दंगे होत. त्याने इंग्रजांचे अधिकारी व पोलिस ठार मारून आणि सरकारचा पाठपुरावा करणाऱ्या लोकांची नाके कापून सरकारला सळो की पळो करून सोडले.
 (५) पेंढारी हे लूटमार करणारे लोक शिंदे-होळकरांसारख्या मराठे सरदारांच्या फौजात यांची पथके असत. युद्ध आटोपले म्हणजे मग ही पेंढाऱ्यांची पथके मोकाट सुटून उच्छाद मांडत. पुढे पुढे त्यांचा उपसर्ग समाजास फारच पोहोचू लागला. (कालांतराने इंग्रजांनी त्यांचा पक्का मोड केला.)
 (६) महादजी शिंदे मरण पावल्यावर त्यांच्या स्त्रिया लक्ष्मीबाई, भागीरथीबाई, यमुनाबाई आणि अंगवस्त्र केशरी यांच्यावर सर्जेराव घाटगे यांनी अत्याचार करून त्यांना जबरदस्तीने नगर येथे अटकेत ठेवले (१७९८). दुसऱ्या बाजीरावाचा भाऊ अमृतराव व यशवंतराव होळकर यांनी आणि बुंदेलखंडातील लखबादादा यांनी या स्त्रियांची बाजू घेतली. यातून जे वादंग निर्माण झाले ते तीन चार वर्षे टिकले.
 (७) दुसरा बाजीराव व परशुरामपंत प्रतिनिधी यांचे संबंध सलोख्याचे नव्हते. तेव्हा बाजीरावाचे सेनापती बापू गोखले यांनी परशुरामपंतास कैद करून मसूरच्या गढीत डांबून ठेवले (१८०६). पंतांची रखेली ताई तेलीण हिने वासोटा किल्ल्याच्या आश्रयाने पुंडावा केला. (पुढे धान्य अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे व अन्य रसद मिळणे शक्य नसल्यामुळे ८ महिन्यांनी तिला गोखल्यांपुढे दाती तृण धरून जावे लागले.)

पृष्ठ ३२७: इंग्लंड देशाचा वृत्तान्त काढून पाहावा
 (१) जॉन राजा (११९९ - १२१५)- 'मॅग्नाचार्टा' ही ६३ कलमी मोठी सनद त्याने जनतेला दिल्यामुळे अनियंत्रित राजसत्ता नियंत्रित झाली.
 (२) चार्लस राजा १ ला (१६२५ - १६४९)- 'राजाची ईश्वरदत्त सत्ता' या तत्त्वाच्या जोरावर त्याने मनास येईल तसा राज्यशकट हाकला. पण शेवटी वेंटवर्थ, पिम, इलियट, हॅम्पडेन यांसारख्या पुढाऱ्यांच्या हक्कांच्या मागणीच्या खलित्यावर ('पिटिशन ऑफ राईट्स') त्याला स्वाक्षरी करावी लागली (१६२८) यामुळेच पार्लमेंटशी असलेले संबंध बिघडून त्यातून युद्ध उद्भवले आणि त्यात त्याचा पराभव झाला. १६४९ मध्ये त्याला फासावर चढविण्यात आले.
 (३) जेम्स राजा २ रा (१६८५ - १६८८)- राज्यकारभार चांगला न केल्यामुळे त्याच्या राज्यातील संत्रस्त नागरिकांनी त्याचा जावई हॉलंडचा राजपुत्र विल्यम यास राजपद स्वीकारण्याचे आवाहन केले (१६८८). नंतर जेम्सने फ्रान्समध्ये पलायन केल्यावर जे सत्तांतर झाले त्यास रक्तशून्य राज्यक्रांती असे इतिहासात म्हणण्यात आले.

पृष्ठ ३२७: जेव्हा जैनमत झाले होते तेव्हा
 (इ. स. ७०० च्या सुमारास) कुमारिलभट्टांनी बौद्ध मताचे खंडन करून वैदिक धर्माची प्रतिस्थापना केली, बौद्ध व जैन तत्त्वज्ञानांच्या अतिरेकामुळे समाजावर जे संस्कार झाले होते ते वैदिक तत्त्वज्ञानाच्या पुरस्कारामुळे नष्ट झाले.

पृष्ठ ३२७: तस्मात् ती "रिवोल्युशन" म्हणावी
 शिवाजीमहाराजांनी फार मोठी क्रांती केली. त्यांनी कलियुग कल्पना नष्ट केली, हरिहर हिंदूंना पाठमोरे झाले आहेत. आपले देवच मुसलमानांना वश आहेत हा घातकी समज जनमनातून समूळ काढून टाकला; अदृष्टफलप्रधान कर्म उच्छिन्न करून टाकून 'महाराष्ट्र धर्मा' ची संस्थापना केली, पतितांची शुद्धी, परदेशगमन, समुद्रप्रवास हे नवे आचार सुरू केले. जन्मजात श्रेष्ठत्व कमी करून गुणास मोल दिले, वतनदारी मिरासदारी मोडून काढली. अशा अनेक नव्या गोष्टी त्यांनी केल्या. (पाहा- 'शिवछत्रपतींचे क्रांतिकार्य' हा डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचा लेख- 'वैयक्तिक आणि सामाजिक कार्य' या निबंधसंग्रहामध्ये.)

पृष्ठ ३२८: अमेरिका व सुइजरलंड यांनीही लोकांचे राज्य स्थापन केले.
 अमेरिकेतील संयुक्त संस्थाने व युरोपातील स्वित्झरलंड यांनी लोकमतराज्यपद्धती सुरू केली हे सांगून लोकहितवादींना भावी राज्यपद्धतीविषयी काही सांगावयाचे आहे.

पृष्ठ ३२८: इंग्रजांचे काही जिल्ह्यांत दंगे झाले आहेत
 १८३८-१८४८ या काळांत झालेल्या चार्टिस्ट चळवळीस अनुलक्षून हे विधान केले आहे. व्हिक्टोरिया राणी अधिकारपदावर आली त्या वेळी देशात अशांतता होती. रिफॉर्म बिल मान्य झाल्यावर आपली दुरवस्था नाहीशी होईल अशी कामगारवर्गाची समजूत होती, पण ती व्यर्थ ठरली. अपुरी मजुरी, भरमसाट महागाई, वाढती बेकारी यामुळे गरीब वर्गाची स्थिती फार वाईट झाली. ती सुधारण्यासाठी १८३७ साली फिअर्गस, ओकोनॉर व विल्यम लोबेट यांनी चळवळ सुरू केली. त्यात मागण्यांची सनद (The People' Charter) तयार करण्यात आली. त्यामुळे ती चार्टिस्ट चळवळ म्हणून ओळखली गेली. या चळवळीमुळे १८३९ मध्ये बरेच दंगे झाले.

पृष्ठ ३४७: (१) नारदासारिखे गायनशास्त्री, (२) कपिलासारखे शास्त्रज्ञ.
 (१) प्रसिद्ध नारदमुनी- तंबोरी छेडीत ईश्वरगुणगान करीत सर्वत्र संचार करणारे- हे येथे अभिप्रेत आहेत.
 (२) कपिल-सांख्य हे सहा दर्शनांतील एक दर्शन (तत्त्वज्ञान) त्यांचे हे प्रवर्तक.

पृष्ठ ३०५: ज्योतिषशास्त्रावर व लीलावती वगैरे ग्रंथ
 भास्कराचार्य (इ. स. ११४४). प्रख्यात भारतीय ज्योतिषशास्त्रज्ञ. 'सिद्धान्तशिरोमणि' आणि 'करणकुतूहल' हे त्यांचे ज्योतिष- गणितविषयक ग्रंथ. सिद्धान्तशिरोमणि ग्रंथाचा पहिला खंड पाटीगणित किंवा लीलावती हा अंकगणित व महत्त्वमापन यावरचा स्वतंत्र ग्रंथ असून दुसरा खंड बीज-गणितावरचा आहे.

पृष्ठ ३४८: कलियुग निघाले आहे... हा ईश्वरसंकेत
 कलियुग हे चौथे युग. कलियुग कल्पना ब्राह्मणग्रंथातून आढळते. (तै. ब्रा. १५) तैत्तिरीय संहितेत युगकल्पना आहे, परंतु त्या ठिकाणी कृत, त्रेता व द्वापर ही तीनच नावे आढळतात. ब्राह्मण ग्रंथात मात्र चारही युगांची नावे आली आहेत.
 याची वर्षसंख्या चार लक्ष बत्तीस हजार वर्षांची असून मगा नक्षत्री सप्तर्षी आले म्हणजे कलियुगास प्रारंभ होतो. हे युग सर्वांत खालच्या प्रतीचे मानतात व त्यात माणसे भ्रष्ट होतात, वाटेल तसे आचार करतात आणि परिणामी यातना भोगतात अशी समजूत आहे.
 कलियुगकल्पनेचा पगडा मराठी माणसांवर शिवछत्रपतींच्या अगोदरच्या काळात फारच होता. नमुन्यासाठी 'महिकावतीच्या बखरी'तील पुढील अवतरण पाहा- "कलियुगांत असा (हिंदू राज्ये नष्ट होण्याचा) प्रकार होणार अशी भाक लक्ष्मीनारायणाने दिली होती. ती शके १२७०त खरी ठरली. हरिहर गुप्त झाले, ऋषी बदरिकाश्रमी गेले, वसिष्ठही गेले. सूर्यवंशी, चंद्रवंशी क्षत्रिय यांची शस्त्रविद्या लुप्त झाली."

पृष्ठ ३५६: (इंग्रज राज्य बळकावतील) असा जर विचार पाहिला असता
 लोकहितवादी म्हणतात तसा विचार मराठ्यांच्या मनात आला नव्हता असे नाही. इंग्रज हे वरकड साहूकार नव्हत' यांसारखे मार्मिक उद्गार बखरवजा ग्रंथातून व पत्रांतून आढळतात; त्यावरून हे उघड होते, पण मराठ्यांनी विचार केला तसा आचार केला नाही हेही तितकेच सत्य आहे.

पृष्ठ ३६५: विदुरनीति
 धृतराष्ट्राचा भाऊ व महामंत्री विदुर याने महाभारतातील उद्योगपर्वात राजा धृतराष्ट्राला उपदेश केला आहे (अ. ३३-४०). त्याने माणसाच्या गुणदोषांची चर्चा करून आदर्श व्यक्तित्व कसे असते हे स्पष्ट केले आहे.

पृष्ठ ३७३: (१) भालेराई (२) होळकरी गर्दी (३) पेंढारी अशा गोष्टी पुनरपि होतील
 (१) भालेराई- संभाजीच्या वधानंतर मुसलमानांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी आपली ठाणी बसविली. राजाराम मुसलमानांशी मुकाबला करण्याच्या प्रयत्नात होताच. पण मधल्या काळात रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञेवरून मराठ्यांनी मुसलमानांची ठाणी उठविण्याचे प्रयत्न स्वतंत्रपणे केले. रूपाजी व बाबाजी भालेराव या नावाचे दोन सरदार या कामी मराठ्यांचे पुढारी होते. त्यांनी जी गडबड उडवून दिली तिला त्यांच्या नावावरून 'भालेराई' असे म्हटले गेले.
 (२) होळकरी गर्दी - पृष्ठ—- वरील (पूर्वी होळकरांनी पुणे शहर लुटून लोकांस मारिले ही) टीप पाहा.
 (३) पेंढारी- मोगलांच्या पडत्या काळात हे लोक पुढे आले. वाटेल त्या राज्याच्या सैन्याबरोबर बाजारबुणगे म्हणून हे जात असत. यांना नेहमीचा पगार असला तरी लुटीतील काही भाग आणखी दिला जात असे. यांनी स्वतंत्रपणेही पुष्कळ लूटमार केली. इंग्रजांच्या राजवटीत यांचा आश्रय तुटला. तेव्हा तर यांच्या लूटमारीस फारच ऊत आला. (पुढे लॉर्ड हेस्टिंग्जने त्यांचा नायनाट केला.)

♦ ♦
पत्रांचा मूळ क्रम व या आवृत्तींतील पृष्ठांक
पत्र नं. पृष्ठांक  पत्र नं. पृष्ठांक
... ३१९ २७ ... १४२
... २५१ २८ ... १४६
... ६६ २९ ... १५१
... १३३ ३० ... २६३
... २०९ ३१ ... ७९
... १३५ ३२ ... ३३२
... ६८ ३३ ... ८३
... ७० ३४ ... ३३६
... ३२१ ३५ ... १५५
१० ... ३५४ ३६ ... १५७
११ ... २१० ३७ ... १६०
१२ ... ३२३ ३८ ... ३३८
१३ ... १३८ ३९ ... २९५
१४ ... ३२६ ४० ... ३४१
१५ ... २५४ ४१ ... ३४४
१६ ... २६० ४२ ... १६२
१७ ... २१३ ४३ ... १६६
१८ ... २९९ ४४ ... ३०२
१९ ... ७३ ४५ ... ३४७
२० ... २१६ ४६ ... ३५०
२१ ... २१८ ४७ ... १६९
२२ ... २८७ ४८ ... २२१
२३ ... २८९ ४९ ... ३५३
२४ ... ७६ ५० ... ८५
२५ ... ३२९ ५१ ... ३०४
२६ ... १३९ ५२ ... ३५६
पत्र नं. पृष्ठांक  पत्र नं. पृष्ठांक
५३ ... १७२ ८१ ... १०५
५४ ... ३५८ ८२ ... १०७
५५ ... ८८ ८३ ... १९३
५६ ... ९० ८४ ... ११०
५७ ... ३०८ ८५ ... ११४
५८ ... १७५ ८६ ... ११७
५९ ... ९४ ८७ ... ३१३
६० ... ३६१ ८८ ... १९६
६१ ... २२४ ८९ ... ३७३
६२ ... २२७ ९० ... २६९
६३ ... २२९ ९१ ... २००
६४ ... १७८ ९२ ... २०३
६५ ... १८१ ९३ ... १२०
६६ ... ३६४ ९४ ... ३७४
६७ ... ३६७ ९५ ... १२३
६८ ... ३११ ९६ ... २४३
६९ ... ९७ ९७ ... १२६
७० ... २६७ ९८ ... ३७७
७१ ... २३२ ९९ ... ३७२
७२ ... २३५ १०० ... ६३
७३ ... २३७ १०१ ... १२८
७४ ... १८३ १०२ ... २७५
७५ ... २४० १०३ ... २४५
७६ ... १८६ १०४ ... २७४
७७ ... ९९ १०५ ... २८०
७८ ... ३६९ १०६ ... २८२
७९ ... १९० १०७ ... २४६
८० ... १०२ १०८ ... २८२