Jump to content

लोकहितवादींची शतपत्रे/५. जातिभेद

विकिस्रोत कडून









५. जातिभेद










जातीविषयी विचार

पत्र नंबर २२

 हिंदू लोकांचे काही वर्णन लिहावयाचे असले, तर मुख्यत्वेकरून ब्राह्मण लोकांचे लिहावे. म्हणजे त्यात सर्व लोकांचे स्थितीचे वर्णन आले; कारण हिंदू लोकांत विद्येचे महत्त्वाचे मुख्य मालक ब्राह्मण आहेत; व त्यांची मते लोकांमध्ये प्रबल आहेत. यास्तव आम्ही बहुधा हिंदू लोकांचे वर्णन लिहावयाचे असले, म्हणजे ब्राह्मणाचेच लिहू व तेणेकरून सर्वांचे वर्णन झाले, असे समजावे.
 प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे लोकांचे चार वर्ण आहेत. ते अशा प्रकारचे वर्ण दुसऱ्या देशांत नाहीत. हिंदुस्थानात मात्र अशी व्यवस्था आहे. ते चार वर्ण असे- एक ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चवथा शूद्र. शास्त्रात असे लिहिले आहे की, हे चारी वर्ण कुळपरंपरा चालावे. जो ब्राह्मण त्याचा वंशही ब्राह्मणच. तसे, जो शूद्र त्याचा वंशही शूद्रच, असा नियम स्मृतिरूप धर्मशास्त्रात आहे, परंतु ते शास्त्र लिहिण्यापूर्वी व पश्चात असा नियम चालला असेलसे वाटत नाही, कारण वाल्मीक ऋषी हा प्रथम कोळी होता व नंतर ऋषी झाला. गाधि राजा क्षत्रिय असता ब्राह्मण झाला. पाराशर ऋषीने शूद्र स्त्री केली. हरिश्चंद्र राजाने काशीस जाऊन महाराचे कर्म पत्करिले व किती एक राजे क्षत्रिय असता ब्राह्मण झाले. तसेच, दुसरे ब्राह्मण असता क्षत्रिय झाले, अशी वर्णने पुराणात लिहिली आहेत. आणि मोठ्या कुळात राजे वगैरे जे लिहावयासारखे झाले, त्यांची नावे पुराणात सापडतात. तेव्हा त्या काळी अशी बहुधा चाल असेल, परंतु सर्वांची नावे पुस्तकात लिहिली गेली नाहीत, म्हणून पक्के समजत नाही. तथापि चाल पुष्कळ होती, असे विचारे करून सिद्ध होते. आणि उत्तम मार्ग हाच की, कर्मे करून जातीचा आणि वर्णांचा निश्चय असावा.
 ब्राह्मण असून शूद्राहूनही नीच कर्म करील, तर तो ब्राह्मण नव्हे. तसेच क्षत्रियाने ब्राह्मणकर्म केले, तर तो ब्राह्मण व्हावा, असे केले नाही, तर किती एक अयोग्य लोक ब्राह्मणाचे नावाने मिरवतील. आणि किती एक वास्तविक ब्राह्मण शूद्राचे नावाने आच्छादित राहतील. जर कोणी राजाने असा नियम केला की, जे हल्ली कामदार आहेत, त्याजकडे ती कामे वंशपरंपरा चालवावयाची, तर ते जोपर्यंत आहेत, तोपर्यंत ती कामे बरोबर चालतील. पुढे त्यांचे मुलगे वगैरे अर्थातच मूर्ख निघतील; कारण बापाप्रमाणे मुलगा निघतो असा निश्चय नाही. यास्तव ज्याचे त्याचे स्वयमेव गुण पाहून त्याची योजना करावी, हा उत्तम पक्ष होय. नाहीतर घालमेल होऊन जे शहाणे ते मागे राहून मूर्ख मंडळी परंपरेच्या कायद्याचे जोराने सर्व मोठे मोठे कामात शिरू लागेल व मग त्या राज्यात काय व्यवस्था होईल बरे?
 बाकी चार भेद हिंदुस्थानात आहेत. इतर देशांत नाहीत असे नाही. प्रत्येक मुलखात चारी वर्ण आहेतच. (१) पंडित, (२) शिपाई, (३) सावकार आणि (४) चाकर हे सर्वत्र आहेत. याशिवाय तर कोठेही चालावयाचे नाही. परंतु अंतर इतकेच आहे की, अन्य देशांत हे धर्म परंपरा चालत नाहीत. वाणी आहे आणि त्याचा मुलगा बुद्धिमान निघाला, तर तो पंडितामध्ये जातो. आणि पंडिताचा मुलगा मूर्ख निघाला, तर तो चाकरात जातो. अशा रीतीने हे चारी वर्ण सर्व देशांत आहेत.
 परंतु हिंदुस्थानात त्याची वेगळाली कुळे झाली आहेत, आम्हास वाटते की पूर्वी जातीत फेरफार होण्याची चाल असे. रावण ब्राह्मणाचा मुलगा. परंतु दैत्य झाला; कारण तो महा दुष्ट होता. याजवर किती एक लोक असे म्हणतील की, ते मागले युगातील लोक. त्यांचे उदाहरण आता घ्यावयाचे नाही, परंतु हे म्हणणे उपयोगी नाही; कारण वर्ण, व्यापार व जात तर मागील युगातीलच आहे. व मागील युगात तरी माणसेच होती. देवाचे अवतार जरी झाले, तरी मनुष्ये होतीच. प्रत्येक जीव देव नव्हता; व आतासारखेच सर्व लोक तेव्हाही होते. म्हणजे दुष्ट होते व सुष्टही होते. फरक इतकाच की, आता विचार करीत नाहीत. बहुधा चालीवरून चालतात.
 सांप्रत काळचे ब्राह्मण कोणी विद्वान आहेत काय, असे पाहिले तर सर्वांस दिसेल की, हे भट विद्वान नाहीत. शुद्ध टोणपे दिसतात. त्यांस काहीच ज्ञान नाही. जसे बैरागी अंगास राख लावून भीक मागतात, तसे कोणत्या तरी वेशाने हे पोट भरतात. हे स्वभावाने आळशी व काम करावयास नको. तेव्हा निर्लज्जपणाने भीक मागून पोट भरितात. एवढाच त्यांचा रोजगार आहे. मला वाटते की; त्यापेक्षा आचारी, पाणके बरे. व हे त्याहून निंद्य. कारण हे हरामाचे खातात. आणि लोकांस यापासून काही उपयोग नाही. ब्राह्मणांचा स्वधर्म असा आहे की, आपली सद्वर्तणूक आणि पवित्रपणा बाळगून विचार करीत अरण्यात स्वस्थ बसावे म्हणजे तेच मुनी व ऋषी होत. व असे त्यांचे कर्म पवित्र व वागणूक निर्दोष म्हणून राजे ब्राह्मणास थरथर कापत होते. व सर्व लोक त्यांचे भय बाळगीत होते. अशा कथा आहेत, व ते आपले सत्कर्मेकरून व उपदेशेकरून सर्वांस सुशिक्षा लावीत होते, व धर्मसुधारणेचा आणि लोकहिताचा विचार करीत होते. तेव्हा लोकही त्यांस मानीत होते. त्या प्रकारचा एक तरी ब्राह्मण काशीपासून रामेश्वरापर्यंत आता आहे काय?
 आताचे ब्राह्मण असे आहेत की, जेवावयापुरती काळजी करतात. सकाळपासून पोट कोठे भरेल, याचा शोध करून जेवावयास मिळाले, म्हणजे उताणे पडतात. किंवा स्वस्थ गोष्टी सांगत बसतात. कोणी म्हणतो की मी ५० लाडू खाल्ले. कोणी म्हणतो की मी शेरभर तूप प्यालो. सारांश जे भटांचे मंडळीत क्षणभर बसतात ते जाणत असतील की, त्यांचे भाषण किती उपयोगाचे व किती शास्त्रपर आहे. त्यांचा मोठा गुण ज्यावरून ते आता प्रशंसा पावतात, तो खावयाचा आहे. म्हणजे जो फार खाईल तो उत्तम भट. गृहस्थही मूर्खच असतात. त्यांस वाटते की, ब्राह्मण जितके खातील तितके आम्हास विशेष पुण्य लागेल.
 मी एका गृहस्थाचा खरा वृत्तान्त जाणतो की, त्याचा बाप मेला आणि त्याजजवळ पाच हजार रुपयांची जिनगी होती. तेव्हा त्याचे मनात काय वेड भरले, ते न कळे. त्याने असा बेत केला की, हे सर्व रुपये ब्राह्मण भोजनात घालावयाचे. मग त्याने चार वर्षेपर्यंत शेकडो ब्राह्मणास यथेच्छ परोपरीने भोजन घातले. आणि आपली सर्व जिनगी गमावली. तेव्हा मला असा चमत्कार वाटतो की, हे ब्राह्मण फार दुष्ट आहेत. त्या गृहस्थास कोणी असे म्हटले नाही की, अरे, तुम्ही, पोरे बाळे व बायका जेणेकरून मरतील; असा हा धर्म कोठला? तू आपले कुटुंबाचे रक्षण कर.' असा उपदेश कोणी एकाही ब्राह्मणाने केला नाही. सर्वांनी त्याचे सरेतोपर्यंत खाल्ले व सरल्यावर घरोघर निघून गेले.
 दुसरे उदाहरण, बाजीराव पेशवे यांनी अनंत ब्राह्मण जेवावयास घातले. त्यांस तर नेहमी हेच वेड होते; परंतु त्यांतील एका ब्राह्मणाने तरी असे म्हणावयाचे होते की, 'अरे राजा, तुझे कर्म प्रजा पालन करावयाचे, ते तू नीट कर, प्रजेपासून जुलमाने पैसा घेऊन रिकामे ब्राह्मणास जेवू घालू नको; कर कमी कर; बंदोबस्त नीट ठेव. व्यभिचार करू नको; राज्य बुडवू नको; फौज नीट बाळग हेच तुला स्वर्गास नेईल; लूट करून ब्राह्मणांस घातल्याचा उपयोग नाही.' असे एकाने तरी सांगितले काय? नाही.
 तस्मात् हे ब्राह्मण लुटारू आहेत. हे धर्माचे नाव करून लुटतात. पेशव्यांचे राज्यात एकच ब्राह्मण होता आणि जोपर्यंत तो होता, तोपर्यंत ते राज्य कृतयुगाप्रमाणे चालले. त्या ब्राह्मणाचे नाव रामशास्त्री होय. एके दिवशी माधवराव पेशवे स्नानसंध्या करीत असता शास्त्रीबोवा भेटीस गेले आणि त्यांनी विनंती केली की, "मला आज्ञा द्यावी. मी काशीस जातो. कारण आमची कर्मे तुम्ही करावयास लागला. तेव्हा आता आम्ही राहणार नाही."
 श्रीमंतांनी पुसले, "हे काय?" त्यांनी सांगितले की,
 "तुम्ही ब्राह्मण जातीचे खरे; परंतु तुम्ही स्नानसंध्येचा धर्म सोडून क्षत्रियांचा धर्म घेतलात. आणि शिपाईगिरी करून राज्य करिता. आता स्नानसंध्या केली तर ब्राह्मणाचे कर्मही साधावयाचे नाही. व वेळ फुकट जाऊन क्षत्रियांचे कर्मही बुडवाल. आणि कोणतेच कर्म न केलेसे होऊन नरकात जाल. तर तुम्ही जी वेळ स्नानसंध्येत घालता तीच वेळ रयतेस दाद देण्यात घालवा. व येथून दोनशे कोसपर्यंत तुमचे अमलात कामगार कसे काय करतात, हे पहा. जप कशाचा करिता? जर तुम्हास जप करावयाचा असेल, तर राज्य सोडा. आणि दुसरा कोणी गादीवर बसवा आणि वनात चला. तुम्हीआम्ही बरोबर जाऊ व असे करावयाचे नसेल, तर राज्य चांगल्या रीतीने नीट करा. लोकांचे घात करू नका. अशी स्नानसंध्या ईश्वरास मान्य होणार नाही." असे सांगून त्या दिवसापासून त्याने श्रीमंतास प्रातःकाळी दरबारात येऊन बसावे, असे ठसवून दिले. याचे नाव ब्राह्मण व याचे नाव सारासार विचार.
 ज्याने आपले अकलेस आले, ते खरे जाणून सुचविले; भीड धरिली नाही; तोच धन्य. तसेच, जेव्हा घाशीराम कोतवालाने काही माणसे मारली, तेव्हा रामशास्त्री याजकडे नाना फडणीस यांनी शास्त्रार्थ नेला आणि सांगितले की, 'मी तुमचा स्नेही आहे व माझा स्नेही घाशीराम आहे. त्यापक्षी याचा जीव जाऊ नये असे करावे.' त्यांनी सांगितले की, 'मी वास्तविक असेल तेच सांगेन, तुमचा प्रपितामह आला तरी सत्याचा अव्हेर तुमचे भिडेमुळे मी करणार नाही.' आणि त्यांनी तसेच श्रीमंतांस सांगितले व त्याजवरून त्याचा वधही झाला. सारांश जे असे असतील ते ब्राह्मण. नाही तर सहस्रभोजनास पुष्कळ जमतात तेव्हा विचारावे, तुमचे नाव काय?
 'ब्राह्मण.'
 'येते काय?'
 'शंख.'
 'जेवता किती?'
 'चार शेर.'
 'करता काय?'
 'आगांतुकी.'
 वाः हे ब्राह्मण कशाचे? आताचे शास्त्री याजवळ म्हटला तो शास्त्रार्थ तयार आहे. 'भटजीबुवा, असत्य भाषण केले, तर काय करावे?'
 उत्तर- 'ब्राह्मणास पुतळी दक्षणा द्यावी.'
 याजवरून हल्लीचे ब्राह्मणात काही विचार, नीती किंवा पवित्रपणा नाही. शास्त्री व भट मजूरदार आहेत. जसे हेलकऱ्यास चार पैसे दिले, म्हणजे कोसभर जातो व आठ पैसे दिले म्हणजे दोन कोस. तद्वत् पाच रुपये दिले म्हणजे प्रायश्चित्त व शालजोडी दिली म्हणजे दारू प्याली तरी चिंता नाही. तो निर्दोष. असा ब्राह्मणांचा रोजगार आहे.

♦ ♦


चार वर्णांची सांप्रतची स्थिती

पत्र नंबर २३

 सांप्रत ब्राह्मण जे आहेत, ते नावाचे आहेत व ब्राह्मणपणा फक्त कुळात आला आहे. गुणात नाही, हे मागील पत्रात बरेच सिद्ध झाले.
 आता दुसरा वर्ण क्षत्रिय. याचे काम म्हटले तर यांनी देशाचे रक्षण करावे. या वर्णाची जबाबदारी ब्राह्मणांहून कमी, ब्राह्मणांनी लोकांस शहाणे करावे आणि क्षत्रियांनी शिपाईगिरी करून स्वराष्ट्र रक्षावे व नीतीप्रमाणे राज्य करावे. विद्येकरिता त्यांनी ब्राह्मणाचा प्रतिपाळ करावा व व्यापार नीट चालून सुबत्ता व्हावी, म्हणून वैश्यांचे रक्षण करावे. तसेच शूद्रांचे धारे कमी करून ओझे हलके करावे, असे तीन वर्णास सुखेकरून नांदवावे.
 श्रीकृष्णांनी अर्जुनास गीतेत बोध केला, तो असा आहे की, 'आपल्या धर्माप्रमाणे वर्तणूक कर. त्यात तुला मोक्ष आहे व इहलोकी कीर्ती आहे.'
 असे सांगून अर्जुन वैराग्य घेत होता, त्याला प्रपंचात आणले आणि त्याजकडून राज्य करविले, व लढाई करविली. असा क्षत्रियांचा धर्म आहे.
 हल्ली असा कोणी नाही. शूरत्व त्या मुलखातून गेले व परदेशचे लोक राज्य करतात. क्षत्रिय धर्माचा लवलेशदेखील राहिला नाही. ही गोष्ट कबूल करावयास अवघड नाही. हिंदुस्थानात रजपूत आहेत, ते क्षत्रियच आहेत; पण जसे हल्लीचे ब्राह्मण आहेत, तसेच ते निस्तेज व हतवीर्य आहेत. यांस लुटावयाची बुद्धी मात्र राहिली आहे. लोकांचे कल्याणाची बुद्धी नाही. व दक्षिणेत असे मत आहे की, क्षत्रिय वर्ण बुडाला. ही गोष्ट खरी आहे. जे क्षत्रिय आहेत, ते त्या कुळातील असोत; परंतु ज्यापेक्षा ते आपल्या धर्मास अनुसरत नाहीत, त्यापेक्षा ते क्षत्रिय नव्हत. हल्ली कोणी क्षत्रिय असते, तर राज्य परकी लोकांचे हाती का जाते? व धर्मही बुडता ना? तस्मात् ब्राह्मण व क्षत्रिय हे दोन्ही वर्ण नाहीत.
 आता तिसरा वर्ण वैश्य. या वर्णाचे लोक अद्यापि तैलंगण देशात कोमटी वगैरे आहेत; परंतु त्यांनी आपला धर्म सोडून दिला. व्यापार ते करते तर परकी लोक इकडे येऊन व्यापार करते ना! परंतु असे झाले, त्यापेक्षा वैश्यवर्णही बुडाला याप्रमाणे तीनही वर्णांचा अभाव झाला. आणि चवथा वर्ण शूद्र तेवढा मात्र बाकी राहिला आहे.
 आता ब्राह्मण लोक बहुतकरून चाकरी करून पोट भरतात, व भट देवपूजा पत्करतात; तरी ती गुरवकी झाली. तस्मात् वास्तविक ब्राह्मण कोणी नाहीत. सांप्रत जितके लोक हिंदुस्थानात आहेत, तितक्यांचा एक वर्ण मला दिसतो की, हे सर्व शूद्र आहेत. इतर वर्णांची नावे मात्र घेतात; परंतु त्यांचे गुण व कर्म नाही.
 हिंदुस्थानात तीनही वर्णांचे काम इंग्रज चालवितात. कसे म्हणाल, तर इंग्रज लोक शहाणे व विद्वान आहेत. तेव्हा ब्राह्मणांचे कर्म त्यात आले. दुसरे शिपाईगिरीचेही कसब त्यात आहे. हल्ली या देशात इंग्रजांचे लष्कर बलवत्तर आहे तेव्हा क्षत्रियांचे काम तेच चालवितात. व तिसरा वर्ण वैश्य. त्यांचा व्यापारही इंग्रजच करतात. इकडील देशचे लोकांकडे फारसा व्यापार राहिला नाही.
 तेव्हा बाकी चवथा वर्ण शूद्र. त्यांनी शेतकी करावी व चाकरी करावी. त्याप्रमाणे हिंदुस्थानातील सर्व लोक हल्ली वागतात. हे सर्व चाकर आणि शेतकरी आहेत. सर्व विद्येप्रकरणी थोरपणा व सैन्याधीशत्वं व व्यवहारप्रकरणी ऐश्वर्य, ही सर्व इंग्रजांकडे आहेत. आता जे ब्राह्मण म्हणवितात, ते उगेच व्यर्थ अभिमान बाळगितात. एकाचे नाव त्याजवळ बहुत द्रव्य असल्यामुळे नवलाख्या पडले व पुढे त्याचे पणतू व नातू भिकारी झाले तरी त्यांस नवलाखे म्हणत असते; परंतु त्यांस ते शोभेना. लोक थट्टा करू लागले, तद्वत् ब्राह्मण लोक नीच व हीन झाल्यामुळे त्यांचा सर्वस्वी मान गेला. आता चार सरदार वगैरे आहेत; पण ते असे दिसतात की, जसे महामारीचा उपद्रव होऊन एका गावात दहा मनुष्ये मरतात व चारपाच असामींचा वाखा होऊन मरणोन्मुख होऊन पडतात. का तर क्षणभराने ते मरावयाचेच. तद्वत् आताचे सरदार आहेत.
 यावर कोणी लोक असा वाद करतील की, अजून शिंदे, होळकर, रास्ते व पटवर्धन आहेत. परंतु उपयोग काय? ते आहेत नाहीत सारखे. इंग्रजांनी सारखे आपले शहाणपणाने राज्य काबिज केले आहे. त्यांचे पराक्रमापुढे हे सर्व लोक अडाणी दिसतात. हे परम आळशी लोक आहेत व अज्ञानेकरून मदांध आहेत. याजमुळे मुलखात काय होते, हे त्यांस दिसत नाही. अद्यापि ज्याजवळ खाण्यापुरती सोय आहे, ते म्हणतात की, आमचे लेकीस व आमचे मुलास काही चिंता नाही. सर्व लोक भिकारी झाले तर झाले. असे म्हणून स्वस्थ बसतात. त्यांच्यामध्ये शहाणे इंग्रज अंमल करीतात. हे जसे एक गुराखी असला म्हणजे पन्नास गुरे हाकतो त्याप्रमाणे आहेत. याचे कारण काय? गुराख्याला शहाणपण असते व गुरास ते काही नसते. त्यांना जिकडे फिरविले तिकडे फिरतात. आणि गुराखी शहाणा असतो, म्हणून सर्व गुराची वागणूक त्याचे ध्यानात असते. याजमुळे पन्नास गुरांचे वास्तविक बळ पाहिले, तर एक मनुष्यापेक्षा शंभरपट जास्ती आहे. पण उपयोग काय? ते आंगचे बळ, अकलेचे नव्हे.
 आमचे पन्नास मण बळ अकलेच्या पाव रतीस हात जोडून असते. उदाहरण, हत्ती अंकुशाने आज्ञेत असतो. जर त्यांस शहाणपण असते, तर तो महातास फेकून देण्यास उशीर न करता. सारांश, अक्कल ही सर्वांपेक्षा जास्त आहे व ती मनुष्यास ईश्वराची देणगी आहे. कोणी शहाणे व कोणी लोक वेडे असे पर्याय आहेत. हिंदू लोक इतर देशांचे लोकापेक्षा इतके नीचपणास का पावले आहेत? याचा विचार केला तर कारणे सापडतील. परंतु कित्येक लोक असे म्हणतात की, कारणे कशाची? सर्व सद्दीचा आणि नशिबाचा खेळ आहे. तर त्यांस असे उत्तर आहे की, सद्दी आणि नशीब अंशतः खरे आहे. परंतु सर्वांस ते लागू नाही. मी म्हणतो हल्ली इंग्रज एवढ्या पदवीस आले आहेत की, समुद्राचे व पृथ्वीचे मालक ते आहेत. व त्यांचा शहाणपणा वगैरे अधिक आहे. हा परिणाम कारणावाचून घडला नाही.
 आता ही कारणे कोणती याचा विचार करावा. तसेच हिंदू मूर्ख झाले याची तरी कारणे आहेत. जसा शरीरात रोग होतो याचे कारण काय? हे त्या समयी लक्षात आले असते तर त्याचा उपाय केला असता. परंतु रोगाने वेढल्यानंतर तरी विचार करावा. मग असे म्हणू नये की, हे नशिबाने झाले. तसे म्हणणे हे अगदी वेडेपणाचे आहे.
 मला वाटते की, जाती, धर्म वेगळाले केले त्याजमुळे एकमेकांचे मनात द्वेष येऊन विभक्तपणा फार झाला. हे एक कारण असेल, किंवा ब्राह्मणांनी आपले कर्म विद्या वाढवावयाचे असून सोडून दिले आणि इतर लोकांसही शिकवावयाचे बंद केले. येणेकरून कोठेच काही नाहीसे झाले. हे एक कारण. आणखीही असे कारण आहे की, सांप्रत लोकांची समजूत वेडी झाली आहे. मागे वैद्यशास्त्र, ज्योतिष व कोश वगैरे जे काही ग्रंथ झाले, ते करणारे देव व ऋषी होते. त्यांची शक्ती आता कोणास यावयाची नाही, असे म्हणून त्यांनी विद्या सर्व बंद पाडली. व अलीकडे सरासरी १५०० किंवा २००० वर्षांत ग्रंथ कोठे झाले नाहीत. व या घालमेलीत संस्कृत भाषा तर अगदीच बुडाली.
 अलीकडे कोणी कवींनी वगैरे ग्रंथ केले आहेत. परंतु ते नवीन ग्रंथ नाहीत. ते ग्रंथ संस्कृत ग्रंथांचे तरजुमे आहेत. आणि कोणास असे वाटत नाही की आपण कल्पना वाढवून नवीन ग्रंथ करू किंवा देश फिरून पृथ्वी कशी आहे तिचा शोध कर. या लोकांची बुद्धी अगदी गेली आहे. आणि पूर्वीचे ग्रंथात जितके शहाणपण आहे तितके पुष्कळ मानून ते राहिले आहेत. येणेकरून अलीकडील दोन हजार वर्षांत नवीन युक्ती निघाल्या नाहीत व कोणी काढल्या तरी ग्रहण करीत नाहीत. पहिली चाल अशी होती की, भांड्यास भोक पाडून त्याने दिवस, घटिका मोजीत होते. आता अलीकडे घड्याळे निघाली आहेत. येणे करून भांडे बाळगावयास नको. घड्याळ जवळ बाळगिले म्हणजे सुलभपणाने दिवस, वेळ कळतो. परंतु अद्यापि जोशी वगैरे पाण्याचा उपयोग करतातच. कोणी घड्याळावर लगीन लाविले असा नाही.
 याजवरून असे दिसते की, एक गरीब ब्राह्मण होता तो पंचा नेसत असे. पुढे त्याचा मुलगा दौलतवान झाला तथापि तो पंचाच नेसे; आणि सांगे की, आमचा बाप पंचा नेसत होता. याप्रमाणे आम्हीही नेसतो. आपला कुळाचार आहे तसे करावे हेच बरे. लोकांनी त्यांस पुष्कळ सांगितले तेव्हा त्याने रोज नेसावयाचा टाकून देऊन श्राद्धपक्षास नेसावयाचा बेत केला; परंतु मरेतो पर्यंत त्याने पंचाची खोड टाकली नाही. तसे हे हिंदू लोक दिसतात. यांची जी चाल मूळची आली आहे त्याप्रमाणे करण्याची इच्छा त्यांस फार असते. त्याचा उपयोग असो नसो, मूर्खपणा असो अथवा शहाणपणा असो, परंतु त्या वेळेस काळ कसा होता व आता कसा आहे, याचा सारासार विचार कोणीच करीत नाही. मागील चाल म्हणजे काय तो धर्म, असे समजतात. परंतु वास्तविक पाहिले तर धर्माशी आणि चालीशी फार अंतर आहे.

♦ ♦


वर्णविचार


पत्र नंबर ३९: १७ डिसेंबर १८४८

 हल्ली ब्राह्मण जातीस मोठा अभिमान आहे. त्यांस असे वाटते की, आम्ही श्रेष्ठ, आमच्यासारखा कोणी पृथ्वीवर नाही. इतर लोक कसेही असले तरी आमची योग्यता पावणार नाहीत.
 परंतु जातीविषयी कोणी गर्व करू नये. आपले कर्म तशी आपली जाती आहे. जात म्हणजे कर्मावरून योग्यता. क्षत्रिय म्हणजे त्यांनी युद्ध करावे, ब्राह्मण म्हणजे त्यांनी विद्या करावी. सोनारांनी सुवर्णाचे काम करावे. परीट यांनी वस्त्रे धुवावी. हीच कामाची नावे आणि जात. जातीची सोय वेगळी खाण नाही. सर्वांचे मूळ एक. याविषयी तुकारामांचा अभंग असा -

तुम्ही नका करूं गर्व । निज जाती म्हणुनी सर्व ॥
शुक्रशोणिताची खाणी । तुम्हा आम्हा एकच योनी ॥
रक्तमांस चर्महाडें । सर्वां ठायीं सम पाडें ॥
अन्न उदक घरोघरी । निष्ठा नाही हो दूसरी ॥
तुका म्हणे हेंचि खरें । नाहीं देवाशीं दुसरें ॥ १ ॥

 याजवरून उघड न्याय होत आहे की, जातीचा अभिमान मानणारे मूर्ख आहेत. आणि जाती व्यवहारावरून आणि कर्मावरून झाल्या आहेत, यात संशय नाही. येविषयी मनूचे वचन आहे की, ब्राह्मणाचा शूद्र होतो आणि शूद्राचा ब्राह्मण होतो -

(अध्याय १०वा)

शूद्राय ब्राह्मणाज्जातः श्रेयसा चेत् प्रजायते ।
शूद्रो ब्राह्मणतामेती ब्राह्मणश्चैती शूद्रताम् ।
क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यास्तथैव च ॥ (६५)

(अध्याय ७वा)
कुबेरश्च धनेश्वर्यं ब्राह्मण्यं चैव गाधिजः ॥ (४२)

 इत्यादी वचने करून असे सुचविले आहे की, धर्माचे फेरफाराने क्षत्रियाचा ब्राह्मण होतो, शूद्राचा ब्राह्मण होतो, असे आहे.
 मग आता दुसरे जातीचे लोक ब्राह्मणांचा गर्व हरण करण्याकरिता बळेच नमस्कार करतात, बळेच अग्निहोत्र घेतात इत्यादी खटपट करीतात. आणि ब्राह्मणांचा मत्सर करतात, यात त्यांस लाभ म्हटला तर काही नाही. ब्राह्मणांचे कर्म कोणी सुखाने करणार नाही. वास्तविक त्यात सुख नाहीच. फार उपद्रव. त्रास व कष्ट आहेत; परंतु तितकेही सहन करून नीच जातीचे लोक ब्राह्मणपणा मिळविण्याकरिता जो जो खटपट करीतात, तो तो ब्राह्मण चिडतात आणि दोघांचे वादविवाद सुरू होतात. त्यात अर्थ पाहिला तर काही नाही. माझे मते हल्लीचे ब्राह्मण आणि नीच जातीचे लोक हे दोघेही एकसारखेच आहेत. कारण की, उंच म्हणविणारे यांची व नीच म्हणविणारे यांची कर्मे समान आहेत. येविषयी प्रमाण-

त्र्यहेण शूद्रीभवती ब्राह्मणः क्षीरविक्रयात् ।
 इत्यादी वचने धर्मशास्त्रात आहेत. त्याप्रमाणे म्हटले, तर सर्व ब्राह्मण काही तरी दोषाने शूद्राचे योग्यतेस आले आहेत. आता कुळाचार मात्र राहिला आहे. दोरी जळाली पण पीळ राहिला. तसे हे आहे.
 ब्राह्मणांस आपले कर्म काही ठाऊक नाही. सर्व प्रकारचा व्यापार, चाकऱ्या, धंदे हे करतात; विद्याशून्य व ज्ञानशून्य आहेत, हे ब्राह्मण कशाचे? असे असता अभिमानाकरिता दुसरे लोक झटतात, हेही अज्ञान आहे. असो, भले लोकांनी जातीचा अभिमान कधी करू नये; त्यात काही हशील नाही. लोकांस असे वाटते की, ब्राह्मणांनी रामोशाची सोयरगत करावी काय? तर असे नव्हे. साधारणतः असे कधीही होणार नाही. जे ब्राह्मण आहेत, हे ब्राह्मणांतच बहुधा सोयरगती करतील. ब्राह्मणांची सोयरीक मिळेल ती टाळून बळेच परिटाचे घरात शिरणे जरूर नाही. व कोणी तसे करणारही नाही. ज्या लोकांमध्ये जाती नाहीत त्या लोकांमध्येही असे करीत नाहीत. मोठा मुसलमान मोठे मुसलमानाशीच संबंध ठेवितो. ही परंपरा चाल आहे, बळेच कोणी अगदी शेवटल्याचे घरी जात नाही.
 यास्तव जातिअभिमान सोडला, तरी जाती कायम राहतील. यात संशय नाही. परंतु तंटे व भांडणे मोडतील. मत्सर करणार नाहीत. इतका फायदा होईल. सर्व लोक एकत्रपणाने वागतील. ब्राह्मण असे म्हणणार नाहीत की, अमका तो महार आहे. त्याचे तोंड पाहू नये. त्याचा विटाळ होतो. हा वेडेपणा मात्र जाईल. मग तो महार अर्थातच ब्राह्मणांचे गर्विष्ठपणाचे शब्द ऐकून नीट इंग्रजांचे घरी जातो आणि म्हणतो, ब्राह्मण आता फार माजले. मी त्यांस हात दाखवीन. इंग्रज लोकांचे फौजेत नीच जातीचे लोक फार असतात; कारण त्यांस ब्राह्मण लोक तुच्छ मानतात. त्यांस उष्टे खावयास घालतात व केवळ जनावरांप्रमाणे समजतात. याजमुळे त्यांस उपाय सुचतो, तो ते करीतात. आणि ब्राह्मणांचे काम काढीतात. हा परिणाम जातिअभिमानाचा आहे. ब्राह्मण आपसांतदेखील फुटले आहेत. देशस्थ, कोकणस्थ, पळशे, कुडाळे, जौळ, ख्रिस्ती, तीरगुळ, कराडे, किरवत, शेणवी इत्यादीक ब्राह्मणांच्या जाती असून, त्यांचे दरम्यान अनेक विपर्यास आले आहेत. आणि ते परस्परविवाह करीत नाहीत. ही चाल वाईट आहे.
 ब्राह्मणांशी ब्राह्मणांनी खुशाल सोयरीक करावी. त्यांस त्याविषयी अटकाव असू नये. जर कोकणस्थाची जात मिळेल तर कोकणस्थाने कोकणस्थाची सोयरीक करावी; परंतु देशस्थाची करण्यास प्रतिबंध नसावा. जसे ज्यास सोईचे वाटेल, तसे त्याने करावे. बहुधा जो तो आपले जातीची आणि आपले देशाची मुलगी करील हे उघड आहे; जरी प्रतिबंध नसला, तरी दक्षिणेचा राहणारा गुजराथ्याची मुलगी करणार नाही, हे उघड आहे; परंतु याचा प्रतिबंध नसावा. आता जातीचे फार भेद जहाले. मराठे लोकांतही जातकुळाचा भेद, ब्राह्मणांचा पाहून झाला आहे. सात कुळातील मराठे विधवेचे लग्न करीत नाहीत. हा सर्व मूर्खपणा आहे. यात काही शहाणपण नाही; परंतु लोकांस जे मोठे वाटतात, त्याप्रमाणे ते चालतात. यास्तव हे लोक अभागी आहेत. ईश्वर त्यांस सुबुद्धी देवो.

♦ ♦