Jump to content

लोकहितवादींची शतपत्रे/४. स्त्रीजीवन

विकिस्रोत कडून









४. स्त्रीजीवन










लहानपणाच्या लग्नापासून अडचणी

पत्र नंबर २

 तारीख ५ वी, माहे मार्च सन मजकूरचे पत्रांत 'प्रवासी' याने पत्र लिहिले, ते आपण कृपा करून लोकांत प्रसिद्ध केले, त्यातील मजकूर पाहता फार समर्पक आहे. यास्तव त्याचे अनुमोदनार्थ हे पत्रही प्रसिद्ध कराल असा हेतू आहे.
 सांप्रत काळातील लोक अल्पायुषी व रोगिष्ट असतात, असे महाराष्ट्र देशातील लोक म्हणतात. व त्याचे प्रतिपादनार्थ वृद्ध पुरुष अंगापिंडाने सुदृढ असतात. त्याचे उदाहरण दाखवितात. असे होण्याचे कारण प्रवासी याने लिहिले आहे त्याजवरून साफ दिसत आहे की, लोकांच्या चाली आणि नीती भ्रष्ट झाल्यामुळे हा परिणाम निदर्शनास आला आहे. केवळ काळाचे सत्तेने अशी गोष्ट घडते असे नाही. हा तर निश्चय दिसतो; परंतु अविचारी लोक मनास येईल तसे बोलतात आणि कारण लक्ष्यात आणीत नाहीत. त्यामुळे त्यांस आपली नीती ही सुधारता येत नाही. जर लोक थोडासा विचार करतील व शास्त्राज्ञा कशी आहे, हे पाहतील तर हल्लीचे उत्पत्तीतील लोकही पूर्वीचे लोकांप्रमाणे सुदृढ आणि दीर्घायुषी होतील व असे झाले म्हणजे पूर्वीचे लोकांप्रमाणे पराक्रमीही होतील; परंतु असे न करिता बहुत लोक व त्यात मुख्यत्वेकरून ब्राह्मण फार वाकडे आणि अशास्त्र चालतात.
 हल्ली लग्नाचे दिवस आहेत. याजमुळे किती एक ठिकाणी वारंवार असे पाहण्यात येते की, मोठे मोठे संभावित गृहस्थांचा मुलगा पाच वर्षांचा झाला, म्हणजे ते काळजीत पडतात. ती त्यांची काळजी दोन प्रकारची असते; एक मुलाचे लग्न लौकर कसे होईल आणि त्यांस हुंडा पुष्कळ कसा मिळेल? यास्तव मोठा प्रयत्न करून ही दोन्ही कार्ये साधितात आणि सात आठ वर्षांचे मुलास बरोबरीची मुलगी मिळाली किंवा ती विद्रूप व हीनकुलोत्पन्न असली, तरी द्रव्याच्या आशेने ती करतात, व मग लग्न उभे राहिले, म्हणजे आपल्यास धन्य मानून कर्ज करून पुष्कळ खर्च करतात. या प्रकारे करून कर्जबाजारी होऊन ते लग्न कोणीकडून तरी दगडीवर दगड घालून सिद्धीस नेतात. पुढे लवकरच 'प्रवासी' याने जे परिणाम लिहिले आहेत. ते निदर्शनास येतात आणि बहुधा बापाचे, आईचे डोळ्यादेखत पुत्राचे व सुनेचे वाकडे पडते व पहिल्याने जी जोडी गोजिरवाणी दिसते, ती मग शत्रूप्रमाणे दिसू लागते. जो विद्या करण्याचा काळ व जा वयात शरीर बळकट व्हावयाचे, त्या समयी पुत्र संसारी व मुलाबाळांचा धनी होतो. मग त्याची विद्या तरी कशी संपूर्ण होईल? आणि शरीरात जोम कसा येईल?
 घोडा किंवा बैल मेहनतीसाठी तयार करावयाचा असेल तर त्यांस घोडीचे व गाईचे दर्शन होऊ देत नाहीत. याचे कारण हेच की, मग तो वळू होईल आणि मेहनतीची कामे करावयास अयोग्य होईल. तसेच मनुष्याविषयी आहे; कारण मनुष्य तरी एक जनावरच आहे. व या जनावरास ईश्वराने बुद्धिकौशल्य इतरांपेक्षा अधिक दिले आहे, असे असता रानचे जनावरांपेक्षाही मूर्खपणाने कोणी कोणी वागतात. तेव्हा त्यांस ईश्वराने बुद्धिविशेष व विचार दिल्याचा उपयोग काय आहे? कोणी अल्प वयात मुलास यौवन प्राप्त आहे किंवा नाही, याचा संशय आहे. तो इतक्यात स्त्रीविषय- लुब्ध झाल्याने त्यांस दुर्गुण आणि अपौरुष प्राप्त होते. आणि त्याचा बदलौकिक झाला, म्हणजे सर्व कुळाचाही होतो, मग त्याचे बापाने लवकर लग्न करून शिफारस मिळविल्याचे त्यांस बक्षीस काय मिळाले बरे? व्यभिचार मात्र अशाने बहुत वाढला आहे आणि विप्रस्त्रियांनी इतर जातीपेक्षा ताळ टाकला आहे. हे बहुधा लोक समजतात. व पूर्वीपासून बाजीराव पेशवे यांचे अमलात लोकांमध्ये भ्रष्टाकार होऊन जी अधर्म-प्रवृत्ती उत्पन्न झाली, तीस लोकांचे अज्ञानाने उत्तेजन आले आहे व येणेकरून ब्राह्मणधर्मास फार लज्जा आली आहे. ही दूर करण्याकरिता आपले सारख्यांनी भगीरथ प्रयत्न केला पाहिजे. वारंवार लोकहितासंबंधी मजकूर आपण प्रगट केल्यास काळेकरून तरी त्या गोष्टी हृदयात ठसून नीती आणि धर्म यांचे स्थापन होईल.
 यास्तव ही माझी विनंती सर्व लोकांस कळवावी की, ज्या चाली एक वेळ पडतात, त्या जरी वाईट असल्या, तरी लोकांस फार लाडक्या वाटतात. याजमुळे त्यांचा त्याग करण्यास अनमान होतो व जे लहान किंवा गरीब आहेत, ते तर अगदीच धजत नाहीत. ते मोठे लोकांकडे पाहून दबतात. यास्तव कोणी संभावित लोकांनी आरंभ केल्याशिवाय हे होणार नाही. महाराष्ट्र देशात जे मोठाले गृहस्थ आहेत, त्या सर्वांस बहुत करून मुलेबाळे आहेत. त्यांणी ही गोष्ट मनात वागवून केली, तर इतर लोक त्यांचे पाठीमागे चालू लागतील. जसे बाजीराव याचे राज्य बुडाले, तेव्हा शूरांचा फार तोटा पडला, तसे आता इतके मूर्खपण पसरले आहे की, लोकांस मार्ग दाखविण्याजोगे शहाणे देशात नाहीत, असे अवर्षण का पडले?
 लहानपणी बापांनी आपली मुले शहाणी केली, तर किती एक चांगले निघतील आणि लग्न हे केव्हा तरी त्याचे स्वसामर्थ्याने घडेल; परंतु मुलास रोजगारधंदा नाही, शहाणपण नाही व पुढे कसा निघतो त्याचा अंकुर दिसत नाही, तो त्याचे गळ्यात मुलगी बांधून जोखिमांत घालावा व त्याची विद्या, आयुष्य सर्व बुडवावे यात काय लाभ होतो? लग्न बापाने केले, म्हणजे त्यात काय मोक्षसाधन आहे? ज्याचा तो आपले पराक्रमाने करील, तर फार चांगले; आणि मोठेपणी लग्न झाले, म्हणजे लग्संबंधी शपथा व वचने साक्षीनिशी व ईश्वरास स्मरून घ्यावी लागतात. ती पुरुषाचे मनात सार्थ वागतील, आणि त्याप्रमाणे तो वर्तेल; परंतु लहानपणी हे सिद्धीस जात नाही व खाण्यापिण्याची सोय झाल्यापूर्वी स्त्री व मुले गळ्यात पडतात. मग त्याणें पोटास मिळवावे? किंवा स्त्रीचे बरोबर राहावे?
 थोडके दिवसांत पुण्यात असा पर्याय झाला की, एके संभावित गृहस्थाचे मुलाने एक गरीब व्यापाऱ्याची मुलगी फसविली, म्हणून तोहमा उत्पन्न झाला होता. कोणी लबाड मनुष्य होते, त्यांस सरकारातून शासन होऊन निवारण झाले; परंतु कारण पाहिले असता त्या स्त्रीचे लग्न झाल्यापासून नवस बाहेरगावी पोट भरावयास गेला होता व त्याचे पश्चात ती कन्या यौवनदशेस आली. तेव्हा तिने एक द्रव्यवान शेजारी गृहस्थ होता, त्याचे संबंधाने बहुत कुकर्मे केली, याजमुळे तो नवरा पुन्हा पुण्यात आला, तेव्हा त्याने ते वर्तमान ऐकून स्त्रीचा त्याग केला; असे ऐकण्यात आले आहे. तेव्हा यात अपराध कोणाचा? हे वाचणाराचे लक्ष्यात येईलच.
 माझे म्हणणे इतकेच की, असे दुराचार घडतात व फार ठिकाणी घडले आहेत, त्याचा विचार करून जे चांगले गृहस्थ आहेत, त्यांनी काही तजवीज काढावी, म्हणजे बरे होईल. नाही तर पापवृद्धी फार होत आहे, तीस कोण आवरील तो आवरू.

♦ ♦


पुनर्विवाह


पत्र नंबर १०: १४ मे १८४८

 सांप्रत आपले लोकांमध्ये हा केवढा अनर्थ आहे की, स्त्रियांस पती वारल्यावर पुनरपि लग्ने करू देत नाहीत! ईश्वराने स्त्री व पुरुष सारखे उत्पन्न केले व उभयतांचे अधिकार समसमान आहेत. असे असता पुरुषास पुन्हा विवाहाची आज्ञा आणि स्त्रियांस मात्र मनाई, हा केवढा जुलूम आहे?
 चार शहाणे लोक मनावर घेऊन हे कार्य करतील, तर किती एक जीव विनाकारण दुःखात व अपराधात पडत आहेत, त्यांचे संरक्षण होईल; परंतु हे भाषण साधारण लोकांचे कर्णी पडले, म्हणजे त्यांस असे वाटेल काय? नाही. ते म्हणतील की, आम्ही भूदेव, आमचे शास्त्र ईश्वरोक्त आहे; त्याचे उल्लंघन आम्ही करणार नाही, व काशीपासून रामेश्वरापर्यंत ब्राह्मणांचा दबदबा आहे, तो जाऊन लोक थट्टा करतील; व जुने चालीस विरुद्ध येईल. आणखी ते म्हणतात की, 'त्यात काय आहे? ज्या स्त्रीच्या नशिबी सुख नाही, तिचाच नवरा मरतो.' अशी मूर्खपणाची प्रमाणे दाखवितात.
 परंतु त्यांस असे समजत नाही की, आमच्या ज्या कन्या त्यांचे रक्षण करण्याचा आमचा धर्म असून त्यांचा असा घात करू नये व आमचे लोकांमध्ये पुष्कळ शास्त्र जाणते व ग्रंथ पाहणारे व विद्वान म्हणून मिरवणारे आहेत; परंतु त्यांस खरे विद्वान असे कोणी म्हणेल काय? नाही, ज्यास आपण सुखी कोणत्या रीतीने होऊ हे कळत नाही व जे आपले कन्यांचा सर्वस्वी घात करतात, ते विद्वान कशाचे? हा एक चमत्कार आहे की, पाच वर्षांपासून पंधरा वर्षेपर्यंत कन्येचा पुनर्विवाह करावा, म्हणून शास्त्राज्ञा आहे; तीदेखील मानीत नाहीत. शास्त्राज्ञा आहे ती झाकून ठेवितात, हा केवढा अनर्थ आहे?
 अहो लोकांनो! तुम्ही आपले कन्याचे वध करणारे आहात. सांप्रतचे ब्राह्मणास शिकवणे फार अवघड आहे. चालीविरुद्ध गोष्ट त्यांचे कानी पडली, म्हणजे ते नाक मुरडतात आणि म्हणतात, 'छे:, हे काय? त्यात काय आहे? पूर्वापार चालत आलेली चाल असून तीस विरुद्ध कसे बोलता? आमचे वडील तर लक्षावधी रुपये मिळवीत होते. आता आम्ही हलक्या अवस्थेप्रत पावलो, म्हणून अशी बुद्धी झाली.' जसा एखादा पहिलवान एक पल्ला ओझे उचलणारा असतो आणि त्यांस क्षयरोग झाला, म्हणजे तो औषध घेत नाही. तो म्हणतो, की, 'अरे माझे पल्लाभर उचलायचे बळ होते, तेव्हा मी औषध घेतले नाही. आता मी थकलो, आता औषध घेऊ काय? मी कधी घेणार नाही.' आणि औषध तुच्छ मानून जर्जर होऊन मरण पावतो. तसे ब्राह्मण लोक मूर्ख होऊन विचार करतात आणि म्हणतात की, 'अहो, आमचे पूर्वज विश्वामित्र, त्याने नवी सृष्टी केली; अगस्तीने समुद्र प्राशन केला; दुर्वासाने शापाने विष्णूने दहा जन्म धारण केले व भृगूने लक्ष्मीनारायणास लाथ मारली; असे आम्ही देवांचे देव आणि सर्वाहून वरिष्ठ; आम्हास शहाणपण शिकवावयास कोणी समर्थ नाही.'
 "अरे अरे!" फुकट हे ब्राह्मण लोक गर्वाने जळतात! मागील गोष्टी मनात कशास आणतात? मी तुम्हास पुसतो की, जेव्हा तुम्ही आपले जावयाचे मरणाची खबर ऐकता आणि तुमची कन्या तर लहान, तिचे आणि जावयाचे अजून दर्शन झाले नाही; असे असता त्या लहान अर्भक बालकाविषयी तुम्ही आपले मनात निष्ठुरपणा का आणिता? आणि आपले कन्यांस तुमचे तुम्हीच खाटीक का होता बरे? अरे परकी लोक यांनी जर तुमच्या कन्या रस्त्यातून जाताना पाहिल्या, तर त्यांची अवस्था पाहून अंतःकरण चरचरा भाजते आणि दया उत्पन्न होती; परंतु तुम्ही आईबाप, भाऊबंद, शहाणे व विचार करणारे व बरे-वाईट जाणणारे असे असून एवढा तुमच्या घरातील अनर्थ तुमच्याने दुर कसा होत नाही? तुम्ही आपल्या स्त्रिया व कन्या मूर्खपणाचे अवस्थेत जन्मापासून बाळगिल्या आहेत; म्हणूनच हा तुमचा जुलूम त्यांजवर चालतो व त्या सोसतात.
 जर त्यांस थोडेसे ज्ञान असते, तर त्यांनी त्याचा विचार काढून ते पुनर्विवाह करू नये म्हणतात, त्यांचे श्रीमुखात दिली असती, यात संशय नाही; परंतु अज्ञान आणि भोळसरपणामुळे सर्वत्र जुलूम चालतो, असा नेम आहे. त्याप्रमाणे हे झाले आहेत. जर आपल्या देशात दहा स्त्रिया विद्वान असत्या आणि त्या जर विधवा झाल्या असत्या, तर त्यांनी आपला पुनर्विवाह करण्याचे ठरविले असते. आणि दुष्ट ब्राह्मणांचे तंत्रात त्या कधी राहिल्या नसत्या, यात संशय नाही.
 परंतु आजपर्यंत ब्राह्मणांनी मोठी सावधगिरी केली की, कन्यांस विद्या शिकविली नाही. हे अनर्थ घरोघर आहेत. आईबाप शेकडो आहेत, किती एक दुःखाने विव्हळ आहेत; परंतु त्याचा उपाय त्यांस सुचत नाही. बरे, असे पहा की, पुनर्विवाह जे इतर लोक करतात ते काय ब्राह्मणांपेक्षा कमी आहेत? कन्येचे दुसरे लग्न केल्यास ब्राह्मणास काय लहानपणा येईल? व त्यात काय लाज आहे? ब्राह्मणांनी सर्व धर्म कोठे चालविले आहेत? किती एक अधर्म करतात, त्यातच त्यांची गणना करून हे दुःख त्यांनी दूर करावे. यात काही अप्रतिष्ठा नाही, आणि यात काही अधर्म नाही, आणि असे केले, तर काही भ्रष्टाकार जाईल; परंतु हे त्यांचे मनात कधी येईल न कळे.
 आज काळी तर वृद्ध लोक आहेत, त्यांची समजूत पडणे अवघड आहे, त्यांचे मन त्या दुष्ट बुद्धीशी बहुत दिवस राहून तन्मयच झाले आहे व तसेच अलीकडील जे लोक ते वृद्ध लोकांच्या समागमाने बसले आहेत. सांप्रत विद्या म्हणजे कागद लिहिता यावा व वाचता यावा, दुसरे त्यांस काही ठाऊक नाही. असे जरी अविचारी आहेत, तर ते नाक मुरडतात. त्यांचे कानी अशी गोष्ट पडली तर त्यांचे अंतःकरणास शस्त्र लागते; त्याचे त्यांस कारण पुसले तर सांगता येत नाही. त्यांस 'चाल' इतका शब्द मात्र ठाऊक, बाकी काही विचार नाही व ते सद्बोधास वाईट मानितात. तेव्हा जे गुजराथेतील रजपूत कन्या उपजताक्षणी मारतात, ते अधिक किंवा दक्षिणी ब्राह्मण जे आपले कन्यास दुष्ट कर्मात प्रवीण करतात आणि पुनर्विवाह करू देत नाहीत, ते अधिक, याचा न्याय करणे लोकांकडे आहे.

♦ ♦


लग्नाविषयी विचार

पत्र नंबर १५

 सांप्रत काळी ब्राह्मण लोकांत स्त्रियांचे हाल व विपत्ती बहुत होतात व कन्या झाली म्हणजे लोक नाक मुरडतात. याचे कारणाचा विचार केला असता सहज कळून येईल. बहुधा मोठे गृहस्थाचे कुळात कन्या जन्मली म्हणजे त्यांस असे वाटते की, माझे घरात अवदसा शिरली, व जर कन्या मेली तर ते सुखी होतात. याचे कारण लोकांमध्ये काही मूर्खपणाच्या चाली आहेत. कच्छ देशात झाडीज रजपूत म्हणून एक जातीचे लोक आहेत, ते आपल्या कन्या मारितात. कारण की तसे न केल्याने खर्चवेच व नवरा पाहण्याची मेहनत पडते. दक्षिणी ब्राह्मण लोक आहेत हे तरी आपले कन्येविषयी बहुत अडचणी भोगतात. त्या अडचणी आपले देशातून जातील तर लोक बहुत सुखी होतील.
 (१) कन्यादान ब्राह्मणाहून इतर जातीशी करावे किंवा न करावे याचा विचार दुसरे वेळेस करू. परंतु इतकी तरी मोकळीक असावी की, देशस्थ किंवा कोकणस्थ वगैरे ब्राह्मणजातीचा वर असावा. अमुक एक जातीचा पाहिजे हे नसावे, म्हणजे मोठी अडचण दूर होईल व संबंध यथायोग्य होतील. किती एक लोक नवरा मुलगा श्रीमंताचा मिळत नाही म्हणून गरीब मुलास घरजावई करतात तसे करण्यास नको. व आईबापांस संकट पडणार नाही; व मुलीचेही कल्याण होईल. आणि तिचे जन्माचे दुःख सुटेल. हा एक लाभ.
 (२) ज्योतिषी यांस लग्नासंबंधी काही एक पुसू नये. गणमैत्री, खडाष्टक आणि मुहूर्त हे पाहण्याची काही गरज नाही; येणेकरून फार अकल्याण होईल. चांगले सुस्थळ मिळावे व सर्व गोष्टी अनुकूल झाल्या तरी हे जोशी यांचा विध्वंस करतात; पहा बरे, आजपर्यंत ब्राह्मणांनी जोश्यांचे अनुमताने लग्ने केली तरी बहुत विधवा झाल्या आहेत. व बहुत विघ्ने आली आहेत. तेव्हा परिणाम पाहता या फुकट अडचणी वेडेपणाच्या आहेत. जोश्याचे नादी लागून लोकांनी आपला घात करू नये.
 (३) मुलीचे लग्नास पैका खर्च करतात, तो आपले योग्यतेप्रमाणे व मिळकतीप्रमाणे करतात असे नाही. लोकांचे खुशीप्रमाणे करतात. हा मोठा मूर्खपणा आहे. लोकांचे संतोषाकरिता आपले धन उधळावे याचे कारण काय? नेमका खर्च बेताप्रमाणे करावा हे उत्तम. फार पैसा खर्चिल्याने मुलीस काही नफा होतो असे नाही. व आईबापांसही नाही. त्यापासून चार लबाड व आळशी पोसतात इतके मात्र होते.
 (४) मुलीचे लग्नास अमुक वय असावे हा नियम असू नये. आठ नऊ वर्षे मुलीस झाली म्हणजे आईबापांस काळजी पडते की, आता या पोरीचे लवकर लग्न केले पाहिजे; नाहीतर आम्हास लोक हसतील की, पहा यांनी आपली मुलगी केवढी वाढविली? अजून लग्न नाही! परंतु ही सर्व वेडेपणाची समजूत आहे; याचा बेत कशास पाहिजे? लहानपण विद्या शिकविण्यात घालावे व पुढे सरासरी वीस वर्षाचे आत तिला कळू लागले म्हणजे तिचे व आईबापांचे संमतीने लग्न करावे. येणेकरून बहुत फायदे होतील. आजच्या काळात आईबाप मुलीची लग्ने जबरदस्तीने करतात म्हणून त्यांस आपली मुलगी आपले स्वार्थाकरिता विकावयास सापडते, हा केवढा जुलूम आहे बरे?
 आता किती एक म्हातारे पुरुष मरणास पात्र, ज्यांच्या तोंडात एकही दात राहिला नाही, डोळ्याने न्याहाळवत नाही, अंगावर सुरकत्या पडल्या आहेत, असे वयस्कर लोक आपल्यास तरुण स्त्रिया नऊ-दहा वर्षांच्या करतात. हा केवढा चमत्कार आहे! जर स्त्रियांना स्वसत्तेत लग्न करू दिले तर, अशा प्रेतरूप पुरुषांस त्या वरतील की काय? तेव्हा या चालीने फार वाईट होते व जे विद्या करण्याचे वय, ते सासऱ्यास राहण्यात व हाल सोसण्यात जाते व लवकर लग्नाचा संबंध झाल्यामुळे कोणतेही प्रकारे सुखावह होत नाही. आणि जनावराप्रमाणे मुली वाढतात, परंतु जी भये धरून लहानपणी लग्न करिता, तीच पुढे येतात. चुकत नाहीत.
 (५) स्त्रियांचा पुनर्विवाह होत नाही. याजमुळे मुलीचे जन्माचे मोठे संकट प्राप्त होते. कारण तिचा नवरा मेला म्हणजे सर्वस्वी घात हाऊन ती आईबापांचे येथे येऊन राहणार; तेव्हा आईबापांस असे होते की, जन्मापर्यंत हिला आम्ही खायास घालावे त्यापेक्षा ही मेली तर बरे; कारण अन्न घालून तरी सुख नाही. तिचे विद्रूप आणि हाल इतकेच पाहावयाचे. आणखी सासरचे लोक म्हणतात की आमचा मुलगा मेला तेव्हा या रांडेचा पायगुण वाईट. मग ही कशास पाहिजे? असे म्हणून तिला वाईट कामे सांगतात, आणि अमेरिका खंडात गुलाम नेऊन त्यांचे हाल करीत होते, मारून काम घेत होते व त्यात तो मनुष्य मेला तरी फिकीर करीत नव्हते; तद्वत किंवा पृथ्वीवर एक लांब प्रदेश आहे, त्या स्थळी अशी चाल होती की, मनुष्यास मारून खावे व किती एक ठिकाणी अशी चाल होती की, कोणास मुलगी झाली तर तिला जिवंत पुरावे व आणखी एक ठिकाणी अशी चाल होती की, ज्याचे घरात जुळी जन्मतील त्याने आपली बायको गावकऱ्यास व पोरे रानातील जनावरास खाण्यास टाकावीत; अशा अनेक चाली पृथ्वीवर होत्या. व असे चमत्कारिक दुष्ट लोक पृथ्वीवर होते. मला वाटते, की पूर्वी दैत्य आणि राक्षस होते म्हणतात, ते असलेच लोक असतील. राक्षस म्हणजे मानवाचे शत्रू तेव्हा जे मनुष्याचे मांस भक्षितात ते राक्षसच होत. असे पूर्वी हिंदुस्थानात असतील व यावरून अशी कल्पना होते की, पूर्वी हिंदू लोक सीथिया देशातून हिंदुस्थानात आले त्या वेळेस त्यांस हे राक्षस इकडे आढळले, तेव्हा त्यांची वर्णने पुराणात त्यांनी लिहिली आहेत. अस्तु.
 या दुष्ट लोकांपासून ही पृथ्वी आता निर्धूत होत चालली आहे व किती एक घातकी चाली लोक सोडीत चालले आहेत, परंतु असे हे रानटी लोक व हिंदू लोक जे आपल्यास मोठे थोर व सुधारलेले शहाणे म्हणवितात, यांनी अशा अनर्थकारक चाली पुढे चालवाव्या, हे मोठे आश्चर्य आहे.
 पूर्वी परशरामभाऊ पटवर्धन यांची मुलगी विधवा झाली. तेव्हा त्यांनी मार्तंड वगैरे पुस्तकांवरून असे ठरविले की, पुनरपि विवाह करावा; परंतु राज्यात नाना फडणीस मोठे शहाणे होते. त्यांनी त्यांस विघ्न केले आणि सांगितले की, 'तुम्ही असे करू नका. कारण एकाने केले म्हणजे सर्व करतील.' तेव्हा ते सिद्धीस गेले नाही. ही गोष्ट केवढी झाली; तत्राप त्यांचे लोक वर्णन करतात, आणि सांगतात की, पानसे हे तोफखान्यावरील सरदार होते. त्यांचे घरी सत्तावन्न बोडक्या होत्या. हे मोठे शहाणपण समजतात. परंतु मला वाटते की, हा मोठा अनर्थ आणि मनुष्ययज्ञ होय. पहिले लोक दांडगे होते, व बायकांस घरात कैदेत ठेवीत व पाहिजे तसे हाल करीत. त्यांची स्तुती काय करावयाची आहे? वंशवृद्धी व्हावयाची तिचा नाश व किती एक जिवांस दुःख, यांचे कारण कोणाचे लक्षात न येऊन शंकराचार्यांस धर्माचे मोठे अध्यक्ष म्हणविता व शास्त्रीपंडित आहेत ते सर्व आंधळे, उंटाचे कतारीसारखे एकाच्या नाकात वेसण तो दुसऱ्याचे, तेव्हा ओढत ओढत चालतात. लोकांचे हित कसे होईल, याचा विचार करीत नाहीत. जर स्त्रियांचा पुनर्विवाह केला तर किती लोक सुखी होतील! व मला खचित वाटते की, यामुळे एका जिल्ह्यात सरासरी शंभर बाळवध होत असतील. या मानाने पुण्यात व आसमन्तात प्रांती शंभर कोसात दोन तीन हजार लेकरे मारली जातात. मग कच्छ आणि काठेवाड येथील कन्याहत्त्या व हे सारखेच नव्हे काय?
 दक्षिणेतील ब्राह्मणाच्या विधवा पुत्र व कन्या या दोघांस एकंदरच मारतात; आवडनिवड करीत नाहीत. इतके असूनही लोक डोळे झाकतात आणि म्हणतात की, आमची चाल आहे व हिच्या जर विपरीत केले तर सर्व बुडेल; परंतु काय बुडेल, हे कोणी सांगत नाही! कोणी म्हणतात की, अरेरे! असे शास्त्र आहे व मनूने असे स्मृतीत लिहिले आहे. परंतु त्यांस मी एक प्रश्न करितो; मनूने असे ठरविले आहे की, ब्राह्मणाच्या स्त्रीने एक वेळ नवरा मेला तर पुनरपि लग्न करू नये, तिने आयुष्य तसेच घालवावे किंवा आपल्यास जाळून घ्यावे; परंतु मनु हा जर ईश्वरांश होता तर त्याने अशीही सत्ता पृथ्वीवर का प्रकट केली नाही की, जर आपण असे शास्त्र केले तर असेही करू की कोणे एकेही ब्राह्मणाचे स्त्रीचा नवरा मरणार नाही? प्रथम स्त्री मरावी, नंतर नवरा मरावा; असा क्रम जर पृथ्वीवर घातला असता तर मी म्हटले असते की मनु ईश्वर होता व ब्राह्मण हे ठीक करतात. आणि मनु हा ईश्वर-अंश असे मी समजलो असतो. परंतु ज्यापेक्षा तसे नाही, मरावयाचे ते मरतात व जगावयाचे ते जगतात. त्याचा बंदोबस्त मनूच्याने काही होत नाही; शास्त्रे करून त्यांस लोकांस सांगावयास मात्र येते, घात चुकत नाही असे आहे, तर मग त्यांस फिरविण्यास काय चिंता आहे?
 अहो, नवरा मरणे हे कोणाचे स्वाधीन नाही. ते ईश्वराधीन आणि स्त्री व नवरा यांचा संबंध संसारापुरता आहे. तेव्हा एखाद्या ब्राह्मणास मी जर सांगितले की, तुम्ही यज्ञोपवीत घेतले आहे, हे तुमचे अखेरीचे आहे. जर हे तुमचे अंगावर तुटले तर त्या दिवशी तुम्ही त्यासहवर्तमान जाळून घ्यावे किंवा आम्ही तुमचे पाच पट काढून तुम्हास विद्रूप करून जन्मपर्यंत तुमचे हाल करू व बोडकीप्रमाणे तुम्हास ठेवू; तर त्या ब्राह्मणास ते आवडेल काय? तद्वत् स्त्रीचा नवरा तिला थोर व त्याचे आज्ञेत चालावे हा धर्म खरा, परंतु जर तो मेला तर काय उपाय आहे? दुसरा वरावा हे ठीक आहे. याविषयी थोडके लिहिले आहे. पुढले प्रसंगी तपशीलवार लिहू.

♦ ♦


विधवापुनर्विवाहाविषयी

पत्र नंबर १६: ४ जून १८४८

 आपले लोकांत पुनर्विवाह चालू करण्यास फार अवघड नाही, परंतु मूर्ख लोकांची अडचण फार आहे. नाही तर मला खास ठाऊक आहे की, बहुतांचे मनात हा धर्म वागला आहे; व किती एक लोक या अनर्थकारक चालीस त्रासले आहेत. व आईबाप मुलीचे दुःख पाहून केवळ पोटात दगड घालतात.
 ही दुष्ट रीती हिंदुस्थानात लोकांचे अज्ञानामुळे किती एक वर्षं चालली; परंतु राजाचा जुलूम फार झाला म्हणजे प्रजा दंगा करिते व कायद्याचा जुलूम झाला म्हणजेही लोक त्याचा त्याग करतात. तसे सांप्रत काळी बहुत लोकांचे मनात पुनर्विवाह करण्याचे आहे. परंतु शास्त्रीपंडित अनुकूल करण्यास पाच चार लाख रुपयांचे काम आहे. जर इतके कोणी देईल तर आता ही चाल चालू होईल. ब्राह्मणास एक एक शालजोडी दिली म्हणजे त्याजकडून कोणतेही कामास अनुमोदन देण्यास आळस होणार नाही; परंतु आजकाळी इतका मुबलकपणाने कोणी खर्च करील असा सामर्थ्यवान व शहाणा आपले लोकांमध्ये नाही. कोणी द्रव्यवान आहेत ते मूर्ख आहेत. त्यांना दिवस उजाडल्याची व मावळल्याची शुद्ध नाही.
 तेव्हा माझे म्हणणे असे आहे की, ज्या लोकांचे मनात ही गोष्ट कर्तव्य आहे, त्यांनी एक सभा करून अनुमती घ्याव्या. प्रथमतःच पाच-चारशे संमती पडतील, यात संशय नाही. व असेच जागोजाग होईल. मग इतके लोक जमल्यावर त्यांस कोणी प्रतिबंध करणार नाही. सरकार तर अशा सुधारणुकीस अनुकूल आहे; किंबहुना आपले लोक जातीबाहेर टाकतील तर काय चिंता आहे? सांप्रत सर्व ब्राह्मण वगैरे हिंदू लोकांनाही इंग्रजास जातीबाहेर ठेविले आहे. म्हणून इंग्रजांचे काय कमी झाले? व ब्राह्मणांचे काय अधिक झाले? उभयतांचे सारखे आहे. मूर्ख लोकांचे मताप्रमाणे चालावे यात काही हित नाही. दोन हजार लोक एकत्र जमले तर ती एक प्रजाच होईल. तीस कोणाची गरज नाही. तिने ब्राह्मणांप्रमाणे धर्म आचरावे आणि पुनर्विवाहाविषयी मात्र सुधारणा करावी. आता त्याबद्दल मूर्ख लोक काय दोष देतील तो देवोत; परंतु अशा हितकारक सुधारणेस उशीर किमपि करू नये.
 ही पुनर्विवाह करणारी जात उभी राहिली म्हणजे अर्थातच इतर ब्राह्मण त्यांस येऊन मिळतील व काही दिवसांनी सर्व एक होतील. पुनर्विवाह हिंदू लोकांचे सुधारणेचे मूळ आहे, व त्यात निम्मे सुधारणा आहे. व तेणेकरून फार लाभ आहेत. हे पाहून कोणा गृहस्थाची मुलगी विधवा झाली म्हणजे त्याचे मनात येईल की, आपले मुलीचा घात करावा आणि मूर्ख ब्राह्मणांचे जातीत राहावे, त्यापेक्षा सुधारक हिंदू जातीत का जाऊ नये? तेथे काय कमी आणि येथे काय जास्ती आहे? असे लोक पुष्कळ मिळतील. परंतु प्रथमतः करण्यास कोणी धजत नाही, हा वेडेपणा आहे. त्यात काही ब्राह्मणाचे बुडत नाही. व काही थोरपणा कमी होत नाही आणि धर्म बुडत नाही. परंतु त्यांनी वेडेपणाने धर्म, रीती, चाली, शास्त्र हे सर्व एकत्र केले आहे.
 पहा, सांप्रत काळचे लोक इतके मूर्ख आहेत की, त्यांस चाल म्हणजे काय, असे कोणी पुसले तर ते म्हणतात की, अरे, चाल म्हणजे धर्म; परंतु त्यांस असे कळत नाही की, धर्म, चाल व शास्त्र ही सर्व वेगळाली आहेत. परंतु हे लोक इतके विद्वान व समजूतदार असते तर मूर्खपणाने स्वतःचे घातास का प्रवर्तक होते?
 शास्त्र यद्यपि असेल की, स्त्रीचा पुनर्विवाह करू नये, तर शास्त्र हे कायदे आहेत व जे अनहितकारक कायदे असतील ते सोडून दुसरे करण्यास काही चिंता नाही. मला वाटते की मनुष्ये लवकर संपवावीत व लोक वृद्धिंगत होऊ नयेत, म्हणून स्त्रियांनी पुनर्विवाह करू नये, असे ठरविले नसेल ना? ब्राह्मणांचे ताब्यात त्यांनी राहावे व आपला नवरा गेला, मेला, रुसला तर मला त्राता कोणी नाही, तस्मात् यांचीच आर्जवे करावी असे स्त्रियांस वाटावे, म्हणून ब्राह्मणांनी त्यांस आपल्या दासी करण्याकरिता आपले जाळ्यात त्यांस धरले. सर्व प्रजा व राजे इत्यादी त्यांनी आपले ताब्यात घेतले आहे. मग स्त्रिया तरी कशा सुटतील?
 ब्राह्मणांनी शास्त्र केले की, राजाने प्रथम ब्राह्मणांचे प्रतिपालन करावे, नाही तर त्याचे राज्यात वाईट होईल. परंतु असे लिहिले नाही की, राजाने सर्वांचे प्रतिपालन करावे. ब्राह्मणांचेच विशेष करावे, हे कशास पाहिजे? याचप्रमाणे ब्राह्मणांची पोटे भरावी व त्यांचे महात्म्य राजापासून आपले स्त्रियांपर्यंत सारखे या भूमीवर राहावे व ब्राह्मणांचे कोठे न्यून पडू नये, यास्तव हे शास्त्र आहे. ब्राह्मणास मडकी द्यावी, फळे द्यावी, धान्याच्या राशी द्याव्या, इतक्या युक्ती याजकरिता केल्या की, त्यांस काही न्यून नसावे. परंतु या सर्व युक्ती लोक अज्ञान व ब्राह्मण मात्र शहाणे होते, तेव्हा चालल्या. आता ज्ञान सर्व ज्ञातीत प्रसृत झाले आहे, म्हणून आता या तजविजी सर्व व्यर्थ होतील. आणि ब्राह्मण व इतर जात सारखीच होईल.
 जो विद्वान तोच ब्राह्मण; जो शूद्राचे आचरण करितो तो ब्राह्मण कशाचा? असे होऊन भेद आहे तो अर्थातच निघेल व जुने शास्त्र स्त्रियांस दासी करण्याकरिता केले ते फिरेल. ब्राह्मण पहिले भिकारी व रानात राहणारे होते, त्यांस खावयास मिळावयाचीही भ्रांत होती व स्त्रियांस सुखप्रद काही नव्हते, म्हणून त्या नाखूष राहून कदाचित पळून जातील किंवा त्यांस कोणी घेऊन जाईल, यास्तव हे अवघड शास्त्र केले आहे की, स्त्रीने सती जावे, नाही तर पुनर्विवाह करू नये, विधवा जन्मपर्यंत असावे व विद्रूप व्हावे. अलंकारशून्य असावे व दोनदा जेवूही नये. याचे तात्पर्य पहाल तर (एक) पुनर्विवाह करू नये; या आपले हितार्थ ब्राह्मणांनी शास्त्र केले; व त्यापासून हे सर्व उत्पन्न झाले. पुन्हा लग्न करू नये म्हटले. तेव्हा अर्थातच स्त्रिया व्यभिचार करतील; पण त्यांस वरण्यास कोणा पुरुषाची इच्छा होऊ नये म्हणून केश काढून बोडक्या करण्याचे शास्त्र केले, म्हणजे त्यांस कोणी पुरुष अनुकूल होणार नाहीच. हे तात्पर्य. असो.
 हे सर्व जुलूम आहेत व स्त्रियांस विद्या शिकवू नये म्हणतात. याचेही कारण हेच आहे की, त्यांनी जर शास्त्राभ्यास केला तर त्या विरुद्ध गोष्टीस प्रतिकार करतील. सारांश, एकदा मनुष्य जसा स्वतंत्र कारभार करण्यास इच्छितो व मध्ये दुसरा कोणी असेल तर त्यांस हाकून देऊन आपण एकटे बसावयाचे करितो तद्वत् पहिले ब्राह्मण होते. त्यांचा असा मतलब की आपली बरोबरी कोणी करू नये; म्हणून त्यांनी कायदा केला की, शूद्रांनी व स्त्रियांनी पोथी उघडू नये. व जर त्यांस काही शास्त्र पहावयाचे असेल तर त्यांनी ब्राह्मणांचे मुखांनी ऐकावे. ज्या वेळेस हे कायदे केले त्या वेळेस तरी लागलेच लोकांनी हे ग्रहण केले असतील असे म्हणवत नाही. बहुत कालेकरून पहिले लोकांची योग्यता मोठी, असे समजू लागले. मग जसजसा तो जुना होतो तसतसे लोक त्याचे भजन करतात व अगदी आंधळे होतात. अस्तु.
 स्त्रियांचे हाल विपत्ति, जनावराप्रमाणे अवस्था, ज्ञानशून्यता व पुरुषांची क्रूरता प्राचीन शास्त्राधारे बहुत दिवस चालली, पण आता तरी हा ईश्वरी क्षोभ जावो आणि जसे पुरुष तशा स्त्रिया आहेत, असे आंधळ्या हिंदू लोकांस समजो, ही माझी अतिशय इच्छा आहे, तर जे सुधारक हिंदू असतील त्यांनी या कामास निर्भयपणाने प्रारंभ करावा.

♦ ♦


स्त्रियांची स्थिती

पत्र नंबर ३०: ८ आक्टोबर १८४८

 सांप्रत काळी हिंदू लोकांचे स्त्रियांची अव्यवस्था व दुर्दशा फार आहे. स्त्रिया पुरुषांवर अमल करीत असतात व त्याचे स्वभावाप्रमाणे बहुत लोकांस वागावे लागते. त्यांचे गुण लहान मुलांस प्राप्त होतात. त्याजमुळे स्त्रिया शहाण्या असणे जरूर आहे. ज्या देशात स्त्रियांचे अधिकार लोक मानीत नाहीत त्या देशात लोकांची स्थिती वाईट असते. हिंदू लोकांत फारच मूर्खपणा आहे; यास्तव स्त्रियांची दुर्दशा फार आहे. प्राचीन काळी असे नव्हते.
 कारण मागील काळचे कथेवरून पाहिले असता असे दिसते की, पूर्वी हिंदू लोकांत स्त्रियांचा मान फार होता. हल्ली लग्नात स्त्रिया पुढे चालतात व मागे पुरुष असतात, व पुण्याहवाचन वगैरे धर्मसंबंधी काही एक कर्म स्त्री बरोबर बसल्यावाचून होत नाही. याजवरून स्त्रियांचा प्रमुखपणा मानला आहे असे दिसते. राज्याभिषेकामध्येही राणीस मान फार आहे.
 आता ब्राह्मणांच्या समजुती आहेत, त्या पूर्वी असत्या तर शास्त्रात प्राचीन ब्राह्मण असे न लिहिते. तेव्हा आता स्त्रियांचा अपमान होण्यास कारण काय, याचा शोध लाविला असता असे दिसते की, हिंदुस्थानात इंग्रज येण्याचे पूर्वी मुसलमान आले, त्यांस सांप्रत आठशे वर्षे जाली. तेव्हा त्या लोकांच्या रानटी चाली फार होत्या. त्या सर्व हिंदू लोकांस लागल्या. म्हटले आहे की, "यथा राजा तथा प्रजा" व "राजा कालस्य कारणम्" असे भारतात आहे. हिंदू लोकांच्या सुंदर स्त्रिया पाहून मुसलमान जबरीने घेऊन जात, याजमुळे स्त्रियांस झाकून ठेवणे जरूर झाले व मुसलमान लोक फार मूर्ख आहेत; त्यांची चाल जनानखाना तुरुंगासारखा असावा अशी आहे, तीच चाल हिंदू लोकांस लागली आहे. मुसलमान लोक यांचे राज्य पाचशे वर्षे हिंदुस्थानात चालले. त्यामध्ये हिंदू लोकांची स्थिती फार बदलली, भाषा बदलली, फारशी शब्द चालू झाले. जमाखर्च, हिशेब, गाणे, रीतभाती सर्व मुसलमानांच्या चालू झाल्या. पूर्वी संस्कृत सनदा देण्याची चाल होती, ती जाऊन फारशी सनदा देऊ लागले. पेशव्यांचे राज्य होते तरी त्या वेळी हिंदू लोकांस मूळचे स्थितीस आणावयाचा प्रयत्न कोणी केला नाही. जास्ती जास्ती घसरतच गेले. हिंदू लोक ताबूत करू लागले. फकीर होऊ लागले. धर्मभ्रष्ट झाले. त्याजमुळे हिंदू लोक स्त्रियांचा अपमान करून त्यांस जनावराप्रमाणे मानू लागले. पूर्वी रामाबरोबर सीता सभेत बसत होती. पांडव द्रौपदीसहित बसत होते. पण लोकांची मने आता इतकी बिघडली आहेत की, जर त्यांस हे सांगितले, तर ते देव होते, असा जबाब देतात; परंतु असे लक्षात आणीत नाहीत की, ती माणसेच होती. देवांनी अवतार घेतले तरी माणसांचे चालीप्रमाणे ते वागले. तेव्हा त्या वेळच्या मनुष्याच्या चाली तशाच होत्या. त्याप्रमाणे आताही चालावयास चिंता नाही. आणि हिंदू लोकांच्या मूळच्या चाली त्याच आहेत. परंतु हल्ली त्यांस ही गोष्ट मोठी वाईट वाटते व इंग्रज लोकांत स्त्रियांचा मान ठेवण्याची चाल आहे, हे त्यांस मोठे आश्चर्य वाटते व ते म्हणतात की, हा फार निर्लज्जपणाचे व्यभिचारवृद्धीचे कारण आहे.
 परंतु हिंदू लोकांस शहाणपण नाही. व त्यांचे मन हल्ली मूर्खपणाने, दुष्ट बुद्धीने व वाईटपणाने इतके भरले आहे की, ते शुद्ध होण्यास हिंदुस्थानात ज्ञानाची फार प्रसृती झाली पाहिजे व लोक सुधारले पाहिजेत व पूर्वीचे मूर्ख वृद्ध लोक आहेत ते सर्व मेले पाहिजेत. जेव्हा नवीन प्रजा शहाणी व पुष्कळ होईल तेव्हा लोकांच्या रीतीभाती बदलून चांगल्या होतील यांत संशय नाही. परंतु त्यांस किती एक वर्षे पाहिजेत.
 ज्ञान म्हणजे काय; हे लोकांस ठाऊक नाही. इंग्लंडातील थोरली सनद, पार्लमेंट, फराशीस यांची राज्यक्रांती, रूमचे राज्याचा नाश, अमेरिका खंडात युरोपियन लोकांची वस्ती, लोक सत्तात्मक राज्य या शब्दांचा अर्थही बहुत हिंदू मनुष्यांस ठाऊक नसेल. हे इतिहास इकडे प्रसिद्ध होण्यास बहुत दिवस पाहिजेत. हल्ली ज्यांस लिहिता वाचता येते ते शहाणे, र, ट, फ करता येते ते बोलणारे, व दंगालूट झाली म्हणजे ती राज्यक्रांती, इतके या देशातील लोकांस ठाऊक आहे. पृथ्वीवर काय आहे व लोक कसे आहेत, याविषयी त्यांस काही कळत नाही. पुराणिक एक पोथी सोडून बसला म्हणजे सर्व आनंदाने डोलतात व रावणास दहा डोकी व सहस्रार्जुनास हजार हात, पृथ्वीचा अंत नाही, उत्तर समुद्राचा ठिकाण नाही, दुधाचा व दह्याचा समुद्र आहे व पृथ्वीवरील काही देशांत घोडमुखी माणसे आहेत, इत्यादी गोष्टी ऐकल्या म्हणजे सर्व आनंदाने डोलतात, बायका फार खूष होतात व पुरुष म्हणतात की, आम्ही आज मोठे ज्ञान संपादन केले. त्यांस असे ठाऊक नाही की, चमत्कारिक परंतु या खोडसाळ गोष्टी दहा-पाच हजार वर्षांपूर्वी लिहिले गेले आहेत. तर हल्ली पृथ्वीची स्थिती कशी आहे व तिजवरील राजे कसे आहेत व समुद्र कसा आहे व लोक कसे आहेत याचा विचार केला पाहिजे, म्हणजे खरे ज्ञान वाढेल. केवळ लहानपणचा अंगरखा व मोठेपणाचा अंगरखा सारखा नाही. तेव्हा व्यास व वाल्मीक यांनी ग्रंथ लिहिले त्यापुढे अलीकडे कोणी ग्रंथ लिहिले नाहीत व शोध केला नाही. तेव्हापासून हिंदू लोक स्वस्थ निद्रेत आहेत. त्यांची बुद्धी पुढे चालण्याची बंद झाली.
 परंतु इंग्रज वगैरे लोक यांनी उद्योग चालविला व त्यांनी नवीन ग्रंथ पुष्कळ केले. ते पाहिल्यावाचून हे लोक समजणार नाहीत. मागील पेशवाईतील जे शहाणे आहेत, ते म्हणतात की, त्यात आहे काय? इंग्रजांचा लाभकाळ होता म्हणून हे इकडे आले. त्याजवळ आमच्यापेक्षा जास्ती शहाणपण काही नाही. त्यांस जर कोणी वेडे म्हटले तरी त्यांस फार राग येतो आहे. हे उत्तर करतात की, आम्ही पेशवाईत लाखो रुपये मिळविले व फौजा बाळगिल्या, त्या आम्ही मूर्ख म्हणून बाळगल्या नाहीत. आणि आताचे लोक, नवीन ज्यास काही ठाऊक नाही, ते आम्हास वेडे म्हणतात, यास काय म्हणावे? आमचे नशीब असते तर आम्हांस कोणी वेडे म्हणते ना. परंतु आमचे नशीब वाईट म्हणून आमची शहाणपणे अदृश्य झाली आहेत, असे ते म्हणतात.
 वास्तविक पाहिले तर, पहिले जुने लोक आहेत ते शुद्ध बैल आहेत. त्यांस खाण्याचे व पिण्याचे मात्र ज्ञान आहे. व ते जनावरासारखे कर्म करतात. परंतु माणसासारखे काही करीत नाहीत व त्यांस काही ठाऊक नाही. मोठ्या प्रमाणात तोंड घालावयाची देखील त्यांस योग्यता नाही. व इंग्रज कोठले, हे काही त्यांस ठाऊक नाही. व इंग्रजांनी अलीकडे ज्ञान किती वाढविले आहे. याची त्यांस खबर नाही. अन्नवस्त्र इतक्यापर्यंत त्यांची समजूत आहे. जास्ती काही नाही. जेव्हा सगळे मूर्ख होते तेव्हा त्यातच ते पराक्रमी झाले.
 परंतु आता नवीन मंडळींत ते मूर्खासारखे दिसतात. कारण की, इंग्रजांचे योगाने हिंदुस्थानात बहुत प्रकारचे ज्ञान वाढले आहे व ते जाणे संपादले त्यासच त्याची गोडी; इतरांस नाही. तेव्हा या जुन्या मंडळींचा गर्व व्यर्थ आहे. त्यांनी असे समजावे की, आम्ही शहाणे, असे म्हणून नवीन लोकांची निंदा करू नये. कारण की, त्यांची अक्कल आता सर्व उजेडात आली. व ते पूर्वी लंगड्या गाईत वासरू प्रधान म्हणून शहाणे होते, परंतु आता नाहीत. त्यांजमध्ये पराक्रम, विद्या व शौर्य नाही. लिहिण्यावाचण्याची भ्रांति. प्रवास ठाऊक नाही. व लढाईची कला ठाऊक नाही; मग त्यांनी गर्व कशास करावा?
 हल्ली पुण्यात जे गृहस्थ आहेत त्यांच्या अवस्थेचा विचार व त्यांचे शहाणपण पाहिले म्हणजे सर्व हिंदू लोकांचा वृत्तान्त कळतो. जसा कोणी मेला म्हणजे त्याचे नावे वृषोत्सर्ग सोडतात; तशी मराठ्यांची राजधानी गेली आणि बाजीरावाचे नावाचे इंग्रजांनी पोळ सोडले म्हणजे इंग्रजांनी कोणास जहागिरी व कोणास पेनशने दिली आहेत ती ते खातात आणि पोळासारखे फिरतात. याचप्रमाणे सर्व हिंदू लोकांची ज्या ज्या ठिकाणी संस्थाने आहेत व जेथे ब्राह्मणांस खाण्याची सोय आहे, तेथे असेच आहे, पहा! लोक किती धुंदीत आहेत? किती आपले ठिकाणी गर्वात आहेत? राज्यात काय होते याचा त्यांस ठिकाण नाही.
 सांप्रत पुण्यात पुस्तकगृह आहे. पण त्यात कोणी जुन्या लोकांपैकी किंवा ज्याजवळ खाण्यापुरता पैका आहे तो येत नाही. असे अलीकडील ब्राह्मण आहेत. कोणास ज्ञानाची आस्था आहे. असे नाही. मग इतर लोकांची अवस्था काय पहावयाची आहे? अशा समयी स्त्रियांची अवस्था सुधारणे अवघड आहे. बहुतकरून आणखी दोनशे वर्षे, निदान शंभर वर्षे, तरी पाहिजेत, तेव्हा हे लोक जागृतीत येतील. आता हे लोक आहेत त्यांच्या दोन चार पिढ्या झाल्या पाहिजेत व ज्ञान वाढले पाहिजे. पुरुष शहाणे झाले म्हणजे अर्थातच स्त्रिया शहाण्या व ज्ञानी होतील. अल्पवयात लग्न आणि जन्मपर्यंत विधवा रहाणे, या दुष्ट चाली मोडल्याखेरीज काही एक सुधारणा व्हावयाची नाही.

♦ ♦


पुनर्विवाह


पत्र नंबर ७०: ६ आगस्ट १८४९

 ब्राह्मण लोकांच्या विधवा पाहून फार हळहळ वाटते. त्यांस कोणता उपाय करावा? हे ब्राह्मण तर स्वहितास आंधळे, म्हणून पुनर्विवाह करू देत नाहीत. प्रत्येकाचे घरी विधवा नाही, असे नाही. आणि किती एकांच्या कन्या अशा लहानपणी विधवा झाल्या आहेत की, त्यांस नवरा म्हणजे काय, ते ठाऊक देखील नाही आणि त्यांचे पुन्हा लग्न नाही; हा केवढा जुलूम आहे!
 हे सर्व शास्त्री, जुने लोक मेले म्हणजे हे लौकर होईल. सांप्रत अडचण आहे. किती एक पोरी व्यभिचारी निघतात. पोरे मारतात पण त्यांस लग्न करून नांदिवल्या तर फार चांगले होईल. हजारो जीव मरतात आणि दुःखी होतात आणि बोडकी झाली म्हणजे तिचे हाल करतात. तिला जेवावयास कमी घालितात; सर्व प्रकारे तिचे हाल. तिला हजामत करविण्याची लज्जा. तात्पर्य, सर्व गोष्टी तिला प्रतिकूल होतात. जी आज सुंदर सौभाग्यवती दिसते, तीच उद्या केशरहित, अलंकाररहित होते आणि तिचे तोंड पाहिले तर देखील वाईट म्हणतात. तेव्हा विधवांचा अपमान केवढा होतो! त्यांजला असे वाटते की, आमचा जीव व्यर्थ; जन्मास येऊन सुख नाही. आमचे तोंड पहात नाहीत. लग्नकार्यास आम्ही कामास नये. बरे आम्हास दुखणे लागले तर सर्व इच्छितात की, मरतील तर बऱ्या. आम्हाला लुगडी घ्यावयास कोणी नाही. स्त्रियांस नवरा म्हणजे त्यांचा भर्ता व सोबती. ईश्वराने त्यांस निर्बल केल्या आहेत. त्यांस पुरुषांचा आश्रय असला म्हणजे त्यांस मोठे बल असते. परंतु ते बल त्यांचे दैवाने गेले तर त्यांनी काय करावे? तथापि त्यांस पुन्हा नवरा करण्याची परवानगी नाही. हा शास्त्राचा अतिशय जुलूम आहे.
 मला वाटते की, असे निर्दय, मूर्ख आणि आंधळे लोक या चारी खंड पृथ्वीत नसतील आणि कोणत्या तरी शास्त्रावरून असा जुलूम दुनियेत झाला नसेल! बायका अगदी गरीब; त्यांस अबला असे म्हणतात. आणि त्यांची अवस्था अशी करतात, हे कोठे फेडतील? आजपर्यंत बायका किती जाळिल्या आहेत? अजून जिवंत किती जाळितात? याविषयी कोणी दुष्टाभिमान धरून एकदम सर्वजण एकत्र होऊन हे कार्य करावे. तुम्ही न कराल तर सर्व लोक कधी तरी करतीलच; यात संशय नाही. परंतु यश घ्याल तर बरे आहे. इतके दिवस तुम्ही स्त्रियांस या देशांत दुःखात घातल्या; अजून तरी त्यांस तुमच्या ब्राह्मणी पाशापासून सोडवावे.
 मनूचे वचन असो, याज्ञवल्क्याचे असो, कोणाचेही असो, ब्रह्मदेवाचे का असेना; "बुद्धिरेव बलीयसी," असे आहे. त्यापेक्षा तुम्ही जे उघड पहाता त्यांचा बंदोबस्त शास्त्रात नाही म्हणून करीत नाही, हे योग्य नाही. शास्त्रास एकीकडे ठेवा, आपली बुद्धी चालवा, विचार करून पहा. घातक वचनावर हरताळ लावा. हा प्रसंग तुम्ही कसा जाणत नाही? मी तुम्हा सर्वांस असे म्हणतो की, तुम्ही आपल्या मुली व बहिणी विधवा पाहता तेव्हा तुम्हास लाज वाटत नाही काय? त्यांस सुखी करण्यास तुम्हास सामर्थ्य आहे, परंतु तुम्ही करीत नाही, हा मूर्खपणा आहे.
 तुम्ही आजपर्यंत बायकांचे शाप घेतलेत. व पुढे घेता, त्याचे झाडे कोठे द्याल? अहो, जिचा नवरा मरतो तिचा अधःपात होतो, ती दुःखी होते; आणि तुम्ही तशा अवस्थेत निर्दयपणाने तिचे केश काढिता, आणि तिचे अंगावरचे दागिने काढून घेता हा काय धर्म आहे? आणि तुम्ही असे म्हणता की, तिचे दैव वाईट म्हणून तिचा नवरा मेला; परंतु तुम्ही दुष्ट म्हणून तिला दुसरा नवरा करून देत नाही. दुर्दैवी मनुष्याशी दुष्टपणा करणे हे फार नीचपणाचे काम आहे. बायकांचे नवरे प्रारब्धाने मरतात. त्यांस दुसरा करण्यास मना करता, आणि हा धर्म आहे असे समजता! हा धर्म कशाचा बरे? धर्मशास्त्र हा केवळ कायदा आहे. व्यावहारिक गोष्टी करता त्यातील एका वाक्यास हरताळ लावली म्हणून काय झाले?
 आणि लोक तरी कोठे आता धर्मशास्त्राप्रमाणे चालतात? किती एक चालत नाहीत. अधर्म करतात. असे तुमच्या डोळ्यांपुढे असून तुम्ही आपल्या बहिणींची व पोरींची बुद्ध्या घरे बुडविता, हे तुम्हास कसे बरे वाटते? नाही. तुमच्या पोरीची दया तुम्हास येत नाही. तुम्ही आपल्या पोटात दगड कसे घालता? याजकरिता माझे ऐका, आणि स्त्रियांस पुरुषांसारखे अधिकार आहेत असे ठरवा आणि हा धर्म चालू करा. स्त्रियांनी विद्या करावी. जाणतेपणी पुरुषाचे व स्त्रीचे लग्न व्हावे हे चांगले. आणि जिचा नवरा मरेल तिने खुशी असल्यास दुसरा नवरा करावा. म्हणजे तुम्ही फार सुखी व्हाल. लग्न लवकर करून पोरांचे आयुष्य संपविता व प्रजा निर्बल व भिकारी करता, आणि विधवांस दुःख देऊन हाल करता, याची पारणी कोठे फेडाल?
 आता पुरे करा. आजपर्यंत विधवा जाळिल्या तितक्या पुरे करा. तुम्ही म्हणाल की, इंग्रज लोकांनी जशी सती बंद केली, तसेच हेही करावे. परंतु शतपत्रे: २६९ विधवांची लग्ने करावयास इंग्रज इकडे आले नाहीत. तुमची तुम्हास खबर नाही. मग त्यांस कशास असावी! ते दूरचे लोक. तुम्ही मेलेत तर त्यांस सुतक येणार नाही, हे ध्यानात धरा.

♦ ♦


लग्ने

पत्र नंबर ९०

 हिंदू लोकांमध्ये लग्नसंबंधाविषयी विचार केला तर पृथ्वीवर असे कोणतेही लोक नसतील. (प्रथम) मुलीस तर मुदतीचा कायदा लावून दिला आहे. पूर्वीचे कायदे करणारे ऋषी यास लग्नाची फार घाई असे आणि त्यांचे मनात मुलीस त्वरित देऊन टाकाव्या व कोणीकडून तरी लग्न होऊन प्रजावृद्धी व्हावी, अशा धोरणाने त्यांनी ठरविले की, आठ वर्षांचे आत मुलगी दिली तर उत्तम. निदान दहा वर्षांचे आत तर मुलगी दिलीच पाहिजे. यामुळे वर हाणे प्रशस्तपणी होत नाही. जशी खताची मुदत जाऊ लागली म्हणजे कोणी तरी वकील पाहून, फिर्याद लावून टाकावी, मग काही होऊ; तसे आठ वर्षांची मुलगी झाली म्हणजे बापास तातड लागते.
 (दुसरे), अशी त्वरित लग्ने केल्यामुळे मुलीस विद्याभ्यास होत नाही. (तिसरे), लग्नास मुहूर्त पाहतात व जातक पाहतात त्यात गुणाकार, भागाकार कमीजास्त समविषम आला म्हणजे एकनाड, खडाष्टक वगैरे येऊन पटत नाही, असे म्हणतात. यामुळेही चांगले वर टाकावे लागतात. (चौथे,) गोत्र प्रवर एक असू नये, म्हणून ठराव आहे. त्यानंतर (पाचवी,) अडचण अशी आहे की देशस्थ, कोकणस्थ, यजुर्वेदी, ऋग्वेदी, कण्व, माध्यंदिन, गुजराथी व दक्षिणी ब्राह्मण इत्यादी हजारो भेद आहेत. त्यामध्ये विवाह-व्यवहार होत नाही. अशा अनेक अडचणी घालून त्यापासून फल कोणते झाले म्हणाल, तर सुंदर रत्नासारख्या मुलींची धुळधाणी आणि दुर्दशा झाली. बरे, इतक्या अडचणीतून त्यांस बरावाईट नवरा मिळाला व तो देवी, गोवर, जरीमरी इत्यादी रोगांनी मारला, तर ती बिचारी जन्मपर्यंत विधवा. तिकडून सासरा, दीर, सासू, जावा यांनी म्हणावे की, करंटी अवदसा नवरा मारून तोंड कशाला दाखवते? बाप आपले घरी का ठेवीना? बरे इकडे माहेरी यावे तो भाऊ, बहिणी म्हणतात, आमचे घरी तुझे काय आहे! इथे कशाला येतेस? बरे, रस्त्यात फिरले तर लोक म्हणतात की, बोडकी पुढे आली. आता पुढे पाऊल कसे टाकावे? त्याप्रमाणे त्या पोरीने आपली तिन्ही वये काढावी लागतात.
 बरे, कोणाचा आश्रय करावा तर तेथे तरी टीका होते की, रंडकी मुंडकी तूप- दही कशास हवे? गादी निजावयास कशास हवी? तेव्हा तिने बैराग्यासारखे संसारात राहून दिवस काढावे लागतात. याप्रमाणे खाटिकाचे घरी मेंढराचीही दुर्दशा नाही. तो त्यांस एक वेळ सुरी लावतो. त्या वेळेस मात्र काय दुःख होते तेवढेच. परंतु तेथपर्यंत तो हाल करीत नाही. आणि हे हिंदू लोक किती दुष्ट आहेत की, जे आपल्या स्त्रियांची अशी दुर्दशा करतात, त्यांस जगात तरी कोठे दुसरी तुळणा मिळेल की काय? यास्तव या सर्व अडचणी मोडून स्वयंवर व्हावे, हेच प्रशस्त आहे. स्वयंवर होऊ लागले म्हणजे बाकीच्या अडचणी सर्व आपल्या आपण जातील आणि लग्न हे ज्याचे त्याचे काम आहे. त्यात इतरांनी पडणे अयोग्य आहे. बाप जरी झाला तरी त्याने लग्नाचे काम मुलीचे इच्छेवर व मुलाचे इच्छेवर ठेवावे, हे योग्य.
 परंतु अज्ञानी लोकांस दया नाही व स्वजातीचा कळवळा नाही. अज्ञानाने ते आपले मुलीविषयी व बहिणीविषयी खाटकाहून खाटीक होऊन गेले आहेत. आता ते बुद्धिपुरस्सर असे झाले नाहीत व त्यांस इतर कामात माणसाची तर काय परंतु जनावरांची देखील दया आहे. परंतु अज्ञानाचा जोर मोठा, म्हणून स्त्रियाकरिता असा दुष्टपणा होतो. आता हा जरी त्यांनी बळेच किंवा बुद्धया केला नाही तरी स्त्रियांस फळ सारखेच आहे.
 (दुसरे) लग्नास विनाकारण खर्च करतात; आणि लौकिक संपादन करतात व भटा-भिक्षुकांस गावयास गोष्टी पुष्कळ होतात. परंतु लग्नाचे खर्चाचे जुलुमामुळे हजारो लोकांस कर्ज होऊन ते दरिद्री झाले आहेत. शास्त्राप्रमाणे लग्न पाच रुपयांत होईल. परंतु त्याचा लौकिक इतका वाढला की, दहा रुपये महिन्याची ज्यास प्राप्ती आहे, त्यांस दोनशे रुपये खर्चास पाहिजेत. उभय पक्षांची समजूत पडत नाही. दोघेही खराबीस येतात. मनुष्याचे पोटाचे कर्ज इतके होत नाही. कारण नित्यापुरते मनुष्य मिळवितोच. परंतु एकदम दोनशे रुपये कर्ज केले, म्हणजे त्याचे व्याजदेखील सावकाराचे फिटत नाही. असे किती कर्जभरी झाले आणि किती कुळंबी खर्चाचे पेचात आले. याचा दीर्घ विचार केला तर हा मोठा अनर्थ आहे, असे दिसते. परंतु याजविषयी लोक काही विचार करीत नाहीत. पाच रुपयांत सर्व लोक लग्ने करितील, तर कर्ज होण्याचे मूळच उपटून जाईल.
 पूर्वीचे ऋषी वगैरे शास्त्र करणारे होते, त्यांनी ही मोठी चूक केली की, मुलीचा विवाह स्वच्छंदाने व्हावा, तो न होऊ देता जबरदस्तीने करण्याची चाल घातली. तिच्यापासून होणारे अनर्थ आता अगदी स्पष्ट दिसू लागले आहेत. तरी नियम लोक फिरवीत नाहीत. मागाहून शास्त्राचा ओघ पाहिला तर जुने नवे होत आलेच आहे. हजारो शास्त्रांचे नियम ऋषींनी फिरविले आहेत. परंतु लोक असे म्हणतात की, हे ऋषींनी केले. आता ऋषी कोठे आहेत?
 परंतु मी त्यांस पुसतो की, ऋषी म्हणजे काय? जे ग्रंथकर्ते त्यांसच ऋषी म्हणतात. आपण नवे ग्रंथ केले तर आपण ऋषि होऊ. कायदे करणे हे तर राष्ट्राचे काम आहे. कोणी जर असे म्हणेल की, लहानपणी माझी आई मला बाळकडू पाजीत होती आणि आता मी म्हातारा झालो आहे व मला अर्धांगवायू झाला आहे; तर मी औषध कसे घेऊ? माझी आई कोठे आहे? तर त्या वेड्यास लोक हसतील की नाही? आई मरून बहुत वर्षे झाली. पण आता रोग झाला तर वैद्याकडून जे औषध मिळेल ते घ्यावे. तद्वत् आता मरून गेले ते ऋषी कोठून आणावेत? आपण ऋषी होऊन शास्त्र यथायुक्त असेल ते ठरवावे, हेच योग्य. सांप्रत इंग्रज सरकार दर दिवशी नवे कायदे करतात. त्यावरून सर्व व्यवहार, राज्यकारण व फौजेचा बंदोबस्त होतो. आणि लग्नाकार्याविषयी क्षुल्लक ठराव आपण केले तर चालणार नाहीत की काय?
 परंतु या लोकांत कोणी चांगला पुढारी सुधारणा करणारा नाही व जरी कोठे असला तरी लोक इतके हलके स्थितीस आले आहेत की, त्याचे ते ऐकणार नाहीत. पूर्वी शंकराचार्य, भास्कराचार्य इत्यादी झाले, त्याचे ग्रंथ लोकांनी मान्य केले. परंतु अलीकडे अज्ञान फार दृढ झाले आहे, सांप्रत हे लोक शिकविण्याचे स्थितीत नाहीत. यास्तव यांचा पुढारीपणाही कोणी घेत नाहीत. जसे लहान अर्भकास पंतोजी शिकवील. परंतु अगदी इस्पितळात वेडे आहेत, त्यांस कोणी उजळणी शिकवू शकेल की काय ?

♦ ♦


पुनर्विवाह


पत्र नंबर ९९

 जो दिवस उजाडतो, त्या त्या प्रत्येक दिवशी असे अनुभवास येते की, ब्राह्मण जातीत स्त्रियांचा पुनर्विवाह त्वरित चालू करणे जरूर आहे. ही जात हतभाग्य आहे, याजमुळे आपली सुधारणा हे समजत नाहीत व त्यांचे प्रारब्धी अजून पुढे किती एक दिवस महान दुर्घट भोक्तृत्व आहे, यास्तव त्यांचे बुद्धीस हे कर्तव्य अजून स्पष्ट दिसले नाही.
 जशी बहुत काळाची ग्रंथी असते, ती लवकर सुटत नाही. तद्वत त्यांची बहुतकालिक ही समजूत पडली आहे, ती त्यांचे बुद्धीचा त्याग लवकर करीत नाही. दृढपणाने चिकटून बसली आहे. ती इतकी की, जरी मोठाले षड्शास्त्रपंडित, ज्यांची बुद्धी व विचार चपळ झाले आहेत व युत्तिप्रयुक्ती त्यांस सांगता येतात, परंतु पुनर्विवाहापासून नफा काय आहे, येविषयी त्यांची बुद्धी केवळ शून्य असोन अंतःकरण निर्दय व क्रूरकर्मी प्रवृत्त झाले आहे.
 ब्राह्मण लोकांमध्ये लग्नाची घाई बहुत करतात. याजमुळे किती एक मुलगे व मुली आठ वर्षांच्या देखील विवाहित होतात. आणि पुढे दोनचार वर्षांचे आत विपरीत गोष्ट घडून भर्ता निधन पावतो. त्या काळी वास्तविक पाहिले, तर त्या स्त्रीस आपली जाती किंवा नाते कळत नाही. केवळ बाल, अज्ञान आणि परस्वाधीन अशी व्यवस्था तिची असते; परंतु पुनरपि तिचा विवाह करीत नाहीत. आणि मायबाप आपले मन क्रूर व निर्दय, दृढ पाषाणवत् करून स्वकन्येची विपत्ती पाहतात. ती विपत्ती एक पर्यायाची नाही; परंतु अनेक पर्याय त्यात असतात. ते ब्राह्मणास विदित आहेतच. आणि जामात मेल्याचे दुःख सर्वांहून ब्राह्मणास अधिक आहे.
 कारण की कन्येस प्रारब्धयोगाने पती नाहीसा झाला, हे एक; खर्चवेच झाला तो व्यर्थ गेला, हे दुसरे. ही दोन दुःखे आहेत. जरी पुनर्विवाहप्रवृत्ती चालू झाली, तथापि ही चुकणार नाहीत. याशिवाय, ब्राह्मणांच्या दुःखाचा महजर फार लांब आहे. तो असा की, पुनश्च पती जरी प्रिय, सुशील, विद्वान, सधन असा साध्य असेल, तरी अप्राप्त, यास्तव जन्मपर्यंत तिचा निर्वाह कसा चालेल? अन्न कोण घालील? याची काळजी. वंशाचा छेद झाला. यद्यपि सासऱ्याचे घरी खावयापुरती सोय असली, तरी तेथे सर्व माणसे विधवा स्त्रीस काम जास्ती सांगतात. आणि हाल करतात. आणि तिला कोणी मालक नाही, म्हणून निराश्रित होत्साती सर्वांचे दुष्ट शब्द तिला सहन करावे लागतात. दागिन्यांवर वांच्छा जाता कामा नये. चोळी घालिता कामास नये. काळे लुगडे नेसता कामास 'नये. कुंकू व नाहाण करता कामास नये. फार तर काय, दुसऱ्याने जेवावयास बसली, तर लोक हासतात व उपहास करतात. याजकरिता एकपोटी, एकवाढी जेवण करावे लागते. कार्यप्रयोजनास जाता नये, मंगळ कार्यास अपशकुन होतो; तोंड पाहिले तर वाईट शकुन झाला म्हणतात; म्हणून लज्जेने दूर राहावे लागते; असा दुःखात जन्म काढावा लागतो.
 या गोष्टी जेव्हा आईबापांच्या मनात येतात, तेव्हा म्हणतात की, मेला जावई मोठा दुष्ट. इचा कोणी पूर्वजन्मीचा वैरी, दावेदारी होता. इचा छळ करण्याकरिता जन्मास येऊन इच्याशी लग्न करून मेला. असे श्राप देत असतात. दर एक दिवसास आईबापांस परम दुःख होते. जो जो मुलगी वाढत जाते, तो तो त्यांचे रक्तमांस जाऊन कृश होतात. आणि कन्या जिवंत असता मेली अशी समजूत करून दुःखाचे सहन मोठ्या धैर्याने करतात.
 परंतु या सर्व दुःखाचे मूळ पाहिले, तर कोठे आहे? ज्याच्या त्याच्या समजुतीत आहे. आपणच होऊन गैरसमजुतीने आपला गळा कापावयास प्रवर्तक झाला असतो. त्यांस असे वाटते की, मी हे सर्व दुःख सहन करीन आणि असे करण्यात माझी धन्य आहे. असे जे कोणी प्राचीन काळचे मूर्ख समजुतीचे लोक आहेत ते म्हणतात व किती एक म्हणतात की, काय करावे, दुष्ट जात ही ब्राह्मणांची पडली. जर पुनर्विवाह करावा, तर लोक हसतील, ही गोष्ट मनातील काढता देखील येत नाही. आणि माझे मनातील दुःख कोण जाणतो? तस्मात् सर्व देशचे, जातीचे, शेजारी, नातलग इत्यादिक सोडावे, त्यापेक्षा ही मुलगी मेली म्हणावे हे बरे, असे समजून किती एक उगेच आहेत.
 परंतु इतक्यावरून इतके सिद्ध होते की, ब्राह्मणांमध्ये समजूत व विचार अगदी नाही. परदुःख जाणतच नाही. आपले देशचे लोकांचे दुःख किंवा आपले जातीचे दुःख किंवा आपला शेजारी याचे दुःख किंवा आपला मित्र यांचे दुःख मनात आणीत नाहीत व त्यांचा कळवळा करीत नाहीत. दुसऱ्याची मुलगी विधवा झाली तर त्यात आपले काय गेले? असे म्हणून अशा दुसऱ्याचे महान संकटाविषयी विनोद व उपहास करतात.
 अरे! अरे! काय हे दुष्ट, चांडाळ ब्राह्मण आहेत आणि कोण यांचे पुढारी पंडित शास्त्री आहेत! या जातीचे पुढारी दुसरे कोण होतील? बरे यांचे संगतीने सर्व ब्राह्मण लोक दुर्भाग्य होऊन दीनवाणे झाले आहेत. गरीब, तरुण दुर्भाग्य स्त्रियांचे हाल पाहून या चांडाळांस दया येत नाही. पुनर्विवाहाची गोष्ट कोणी बोलला, तर त्यांस असे वाटते की, हा कोणी राक्षस धर्म बुडविणारा आहे. याचे ऐकू नये. असे हे विचारास पराङ्मुख झाले आहेत.
 परंतु मला असे वाटते की, सर्व ब्राह्मणजातीने निश्चय करून पुनर्विवाह चालू करण्याचा शिरस्ता घालावा व पंडितांचे ऐकू नये. दोन-चारशे लोकांनी असा एक कटाव केला, म्हणजे पंडित उगीच रहातील किंवा सामील होतील. परंतु त्यांच्याने द्वेष होणार नाही व काही उपद्रव होणार नाही. पंडितांस सामर्थ्यहीन करण्यास एक कटाव मात्र पाहिजे, मला वाटते की, असे होण्यास बहुत दिवस नकोत. हे पंडित, शास्त्री मूढशिरोमणी आहेत. आणि त्या गृहस्थादिकांस शास्त्र सांगणारे म्हणवितात, त्यांस कनिष्ठ जातीचे ठरवावे आणि चांगले शहाणे लोक जे धर्माचे संरक्षण, धर्माचे कल्याण, सुखोत्पत्ती करतील त्यांस पुढारी करावे.
 त्यांस असे समजत नाही की, पूर्वी ब्राह्मण कंदमुळे खाणारे व रानात राहणारे व थोडके होते. याजमुळे त्यांच्या स्त्रियांशी लग्ने झाली तरी चिंता नव्हती. व त्या काळचे व त्या स्थितीस लागू असे केलेले शास्त्र आहे. ज्या शास्त्रात पुनर्विवाह करू नये, असे लिहिले आहे. त्यात आणखी किती एक गोष्टी आता उपयोगी नाहीत, अशा आहेत. पहा की, बारा वर्षे ब्रह्मचर्य, वेदाभ्यास, गृहस्थाश्रम याप्रमाणे सर्व काळ तपश्चर्या करीत भिक्षा मागून असावे. याप्रमाणे कोणी आज करीत आहे किंवा कोणी करील की काय? सती जावे असे त्यात आहे. परंतु ही मूर्ख रीती नाहीशी झाली किंवा नाही?
 ज्याने पुनर्विवाह करू नये म्हणून ठरविले त्याच्यावर चढ, जाणे सती जावे म्हणून ठरविले, त्याने केला. असे कायदे करणारे यांची स्त्रियांविषयी किती गैरसमजूत होती, हे उघड दिसते, कारण की, त्यांस स्त्रिया म्हणजे जनावरे वाटत असतील. एका खाटकाने एक बकरू देवीस द्यावे म्हणोन सांगितले; त्याजवर दुसरा शहाणा निघाला, तो पाच द्यावी, म्हणोन सांगतो. याप्रमाणे किती गरीब जनावरांचा प्राण जातो. आपल्यास लाभ होतो त्यापेक्षा गेले काय? "देवो दुर्बलघातकः" याप्रमाणे हे शास्त्रार्थ जाणावे. देशकालवर्तमान पाहून यांस मागे ठेवावे. जसे इतर बहुत रद्द आहेत, तसे हेही समजावे आणि हल्लीचे ब्राह्मणाचे रोजगार, धंदे आहेत, त्याप्रमाणे शास्त्रही पाहिजे. तात्पर्य, सारासार विचार करावा. चांगली गोष्ट विचाराने दिसेल ती अंगीकारावी.

♦ ♦


पुनर्विवाह


पत्र नंबर १०२

 हल्ली 'कल्याणोन्नायक मंडळी' पुण्यातील पंडितांनी उभी केली आहे. या मंडळीचे दोन-तीन उद्गार तुमचे पत्रद्वारे आले, त्याजवरून या मंडळीचे ज्ञानाची व विचाराची प्रशंसा अत्यंत झाली व येणेकरून पाठशाळेत विद्या कोणत्या प्रकारची शिकतात, याची प्रसिद्धी दिगंतापर्यंत होईल.
 या प्रकारची विद्या प्राप्त होऊन हे लोक देशाचे कल्याण करण्यास समर्थ कसे होतील, हे आश्चर्य आहे. या विद्येचा उपयोग इतकाच दिसतो की, जे लोक अज्ञानात आहेत त्यांस मात्र आपली विद्या मोठी आहे अशी भ्रांती दाखवून पैका उपटावा. म्हणून लोकांस सावध करणे अवश्य आहे. मागील एक पत्री या मंडळीतील एकाने पुनर्विवाहाविषयी पत्र लिहिले ते वाचून बहुतेक समजदार लोक यांनी काय म्हटले असेल बरे? हे हल्ली शके १७७२चे शालिवाहनाचे वर्ष चालले आहे. या वर्षी अशी मूर्खपणाची गोष्ट पत्रद्वारे प्रसिद्ध करतात, ही कशी मान्य होईल? जेवहा हिंदू लोक भोळसर व पंडित सांगतात तसे ऐकणारे होते, तेव्हा त्यांनी सती जावे म्हणून सांगितले, तेच लोकांनी कबूल करून आपल्या सुना, मुली, बहिणी जिवंत जाळल्या. विधवा स्त्रियांची लेणी वगैरे घेऊन त्यांची हजामत करू लागले आणि फार तर काय परंतु त्यांचा अशुभ प्रश्न दर्शनेकरून होतो, त्यांस एकदा जेवण द्यावे व हाल करावे. म्हणून जे प्रतिपादन करतील ते कलियुगातील राक्षस माणसे खाणारेच समजावे.
 त्यांच्या पुनर्विवाहाविषयी ज्या समजुती आहेत, त्यांतील एकही योग्य नाही. त्यांस असे वाटते की, काही तरी लिहिले म्हणजे झाले. दर एक शब्दास नवीन कोटी म्हणतात; परंतु त्यात अर्थ व ज्ञान काय याचा विचार करीत नाहीत. आजचे काळी मूर्खाचेही मनात असे नाही की, पुनर्विवाह न व्हावा. हे पंडित सांप्रत काळचे विद्येशी व ज्ञानाशी आपले जीर्ण ज्ञान (परंतु वास्तविक पाहिले तर तो मूर्खपणाच होय, त्यास) युद्धास उभे करतात मग हे जय पावतील कसे? ही गोष्ट खरी आहे की, जो काळपर्यंत जुने वेडसर लोक आहेत, तोपर्यंत हे पंडित आपले ज्ञान मिरवतील परंतु त्याचा परिणाम नाही. पंडिताचा धर्म म्हणजे जितका लोकांनी केलेला मूर्खपणा आहे तितका त्यांचा धर्म. वास्तविक विचार व ईश्वरभक्ती व लोकहित हे त्यांनी टाकून दिले आहे.
 पंडितांनी हिंदू धर्मास काळिमा लाविली आहे. त्यांस विद्वान म्हणावे कोणी? हे पंडित व हे भट खरे विद्वान असते तर या देशाची माती का होती? ज्या देशात शंभरांत एखादा विद्वान आहे त्या देशाकडे पहा किती सुधारणा झाली आहे? त्या लोकांचे झेंडे पृथ्वीवर या टोकापासून त्या टोकापर्यंत लागले आहेत. आमचे देशातील हे पहा विद्वान! की त्यांची संख्या म्हटली तर पुण्यातच विद्वान म्हणविणारे भट व पंडित हजार आहेत व दर एक गृहस्थाचे घरी दोनचार विद्वान आहेत, इतकी विद्वानांची स्वस्तता आहे. परंतु विद्या पाहिली तर शून्य! हे फुकट खातात व जेवणाच्या गोष्टी व ग्रामण्ये व प्रायश्चित्ते शोधीत असतात. यांनी लोकांचे हित कधी मनात आणले आहे? व आपलेकडून पलीकडे कधी पाहिले आहे? हे जाति- अभिमानाने मरतात. जरी यांनी हित केले तरी म्हणतील की, "गोब्राह्मणहिताय च." हे सर्व लोकांचे हित कदापि करणार नाहीत.
 हे विचारतात की, सुधारणा म्हणजे काय? तर याचे उत्तर असे आहे की, आपुली विद्या अपूर्ण व यत्किंचित असता, ती पूर्ण म्हणून गर्व करिता; सार्वजनिक हिताचा मार्ग तुम्हास दिसत नाही, तो दिसावा, याचे नाव सुधारणा, हे समजा.

♦ ♦


पुनर्विवाह

पत्र नंबर १०४

 अलीकडे दोन पत्री 'कल्याणोन्नायक मंडळीत' प्रमुख यांनी आपले मत मोठे गूढ ज्ञान प्रगट केले आहे. ते कोणते म्हणाल, तर पुनर्विवाह करू नये हे! यांस असे वाटते की, ब्राह्मण जातीत पुनर्विवाह करणे वाईट, आणि त्यांस शास्त्र व युक्ती अनुकूल नाही. व त्यात काही लभ्यही नाही. याजकरिता मोठे डौलाने दोन-तीन वेळ पत्रे त्यांनी लिहिली आणि उत्तर मागितले.
 त्यास असा विचार करणाऱ्या पुरुषांशी वाद करणे म्हणजे आंधळ्यापुढे मशाल धरणे किंवा प्रेताच्या तोंडाशी औषधाची वाटी लावणे याप्रमाणे आहे. हे पहिल्या काळचे वेडे. यांस काहीच युक्तायुक्त समजत नाही. मी तरुण लोकांच्या सुधारणेकरिता लिहितो आणि पुनर्विवाहाचे प्रतिपादन करितो ते ऐका.
 शास्त्रीपंडितांच्या कोट्या करणे म्हणजे अशा आहेत की, शब्द प्रमाण आहेत की नाही, असे पुसतात. म्हणजे तुमचा आजा होता, हे तुम्हास ऐकून ठाऊक, आहे हे खरे मानता की नाही? उत्तर खरे आहे तेव्हा शब्द प्रमाण जहाला. यास्तव ग्रहणात स्नानदान करावे, म्हणून विधी सांगितला आहे, तो खरा की, नाही याप्रमाणे कोटी करतात.
 परंतु तो शब्द प्रमाण मानला, म्हणून हा शब्द प्रमाण नाही. तुम्ही म्हणाल की, "तुम्ही प्रेत आहा" तर मी शब्द प्रमाण घेऊन खरे मानावे की काय? शब्द प्रमाण कोठे कोठे मानू? जेथे विचार व युक्ती बसत नाही, तेथे मानणार नाही. याप्रमाणे शास्त्रीपंडितांचे वाद आहेत. भलतेच आकाशाचे टोक पाताळास मिळवितात आणि म्हणतात की, आम्ही मोठी कोटी केली परंतु विचार केला तर केवळ मूर्खपणा होय. अशा कोट्या करून पंडितांनी या देशात अज्ञान वाढविले आहे. कोठे झरा असला, म्हणजे त्यांस गंगा म्हणतात आणि माहात्म्य वाढवितात. अद्यापपर्यंत त्यांस विचार करणे म्हणजे काय, याचे भान नाही.
 हिंदुस्थानात एक झरा आहे. त्याचे मूळ एका माहात्म्यात लिहिले आहे की एका राजाचे बायकोने स्वयंपाक करीत असता राग येऊन पाणी ओतून टाकले. तो झरा झाला. दुसरे, गाईचे तोंड खरबरीत आहे त्यांस ते म्हणतात की, कृष्णाने उष्ट्या शिताचे हाताने तिला मारल्यापासून ते तसे झाले. तुळशीला म्हणतात की, ही एक स्त्री होती. तिने विष्णूचे आराधन केले, ती तुळस झाली. उंबराची फुले सोन्याची आहेत, ती देव नेतात. घोड्यास पंख होते. याप्रमाणे जे जे स्वाभाविक होते ते उलटे लोकांस समजून दिले आहे.
 याप्रमाणे हे लोक मूर्ख असतात. याजपासून विचार खरा कसा निघेल? पुनर्विवाहास शास्त्राधार नाही, असे कोणी म्हणतात व कोणाचे मते अनुकूलता आहे. त्यास, आम्ही पुनर्विवाह करणाऱ्याचे पक्षी आहो. ते असे की, शास्त्र असो किंवा नसो. परंतु हित जाणून शास्त्र एकीकडे ठेवून ही रूढी घालावी. किती एक रूढीने शास्त्र रद्द होते. कालमानेकरून शास्त्र बंद करावे लागते. जसे, मुंज केल्यावर बारा वर्षे कोण रहातो? तद्वत् जे घातुक ते टाकले पाहिजे. शास्त्र म्हणजे लोकांस सुख होण्याकरिता रीती घातलेली आहे. त्यातून जर विपरीत काही असेल तर एकीकडे ठेवल्यास चिंता काय? जसे इंग्रजांनी सती बंद केल्या, त्यांस तुम्ही वाईट म्हणाल की काय? तसेच, पुनर्विवाह चालू करण्यात बहुत फायदे आहेत. एक मुख्य असा की, स्त्रियांचा अधिकार पुरुषांप्रमाणे चालू झाला. विचारास हेच येते की जो अधिकार संसार संबंधी व सुखाविषयी पुरुषांस आहे, तोच स्त्रियांस असावा. जर पुरुषास पुनर्विवाह करण्यास चिंता नाही; तर स्त्रियांसदेखील नाही. कारण की, आचार आणि धर्म ईश्वरी नेमानुसार असावे. जसे चोरी न करणे, व्यभिचार न करणे, इत्यादी नीती स्वस्थता होण्याकरिता ठरविली; परंतु ग्रहणात स्नान करावे, हा नीतीचा नेम नाही. नीती म्हणजे जे नेम सर्व देशांत, सर्व धर्मांत सारखे चालतात आणि आचार म्हणजे कल्पित नेम. एक राष्ट्रात मानले जातात. दुसरे राष्ट्रांत मानीत नाहीत. तेव्हा दुसऱ्यास दुःख देऊ नये, हा नीतीचा नेम आहे. आपल्यास दुःख वाईट लागते, तसे ते दुसऱ्यासही वाईट आहे.
 आपले कोणी चोरले तर ठीक नाही. तसेच आपण दुसऱ्याचे चोरू नये. ईश्वरी संकेतास अनुसरून जो शास्त्रार्थ असेल, तो आम्हास मान्य आहे; त्यांस विपरीत असेल तो मान्य नाही. हेच शास्त्राचे रूप आहे. खरे बोलावे, नम्रता धरावी, दुसऱ्यास साह्य करावे, इत्यादी धर्म जे आहेत, ते विचाराने सिद्ध होतात व अंतर्याम याविषयी साक्षी देते की, हे खरे धर्म आहेत. बाकीच्या ज्या खटपटी आहेत, त्या हे मुख्य धर्म राखण्याकरिता योजिल्या असतील, हे स्पष्ट आहे; परंतु त्यांची गरज जेव्हा नाहीशी होईल, तेव्हा सुधारणा पाहिजे, आणि ते मुख्य धर्म राहाण्याकरिता ज्या खटपटी पाहिजे असतील, त्या कराव्या. जसा अंगरखा करतात हा अंगास वारा लागू नये, इजा होऊ नये व हवेपासून रक्षण व्हावे, म्हणून करतात. मग पुढे चार वर्षांचे मूल होते, तेव्हा जो अंगरखा केला तोच तिसावे वर्षी उपयोगी पडेल की काय? तो बदलला पाहिजे. कारण जर तुम्ही मुख्य हेतूची स्मृती कराल, तर तेच योग्य आहे की, तो लहान अंगरखा टाकून नवा करावा. जर तुम्ही मुख्य हेतूस विसरलेत, तर तोच ठेवाल.
 तद्वत् हल्लीचे हिंदू लोक इतके मूर्ख झाले की, तुळशी वहाणारास चांगला म्हणतात; परंतु खरे बोलणारास म्हणत नाहीत. याप्रमाणे जुन्या काळच्या खटपटी त्यांस बऱ्या वाटतात. व मुख्य हेतू समजत नहीत, पोरपणाचा अंगरखा बापाने दिला तो कसा टाकावा, म्हणून तोच तिसावे वर्षी घालावयाचा यत्न करून अनर्थ करतात.
 तद्वत् या काळी स्त्रियांस पुन्हा विवाह करण्याची परवानगी देणे हे प्रशस्त आहे. ईश्वराने जितके पुरुष तितक्या स्त्रिया उत्पन्न केल्या आहेत. व त्या परस्वाधीन; तेव्हा त्यांचा विसावे वर्षी नवरा मेला तर जन्मपर्यंत कोण सांभाळ करील बरे? त्यांस कोण सुख देईल? त्यांनी आपला जीव कोठे ठेवावा? मनातील सुखदुःख कोणास सांगावे? अन्नवस्त्राकरिता कोणाकडे पहावे? लहान मूलबाळ असेल तर याचा परामर्ष कोणी घ्यावा?
 ब्राह्मण लोकांमध्ये किती एक घरे असतील की जेथे एका एका गृहस्थाची चार पाच तरुण मुले ज्वानीत मरून गेली. आणि त्यांच्या तरुण स्त्रिया पाठीमागे राहिल्या आहेत. जवळ काही नाही. त्या बोडक्यांकडे पाहून आईबाप झुरतात. त्यांस खावयास घालावयास नाही म्हणून श्रमी; आणि त्या लज्जेने जशा समुद्रात टाकाव्या त्याहूनही अवघड प्रसंगी दुःखाचे सागरी बसतात. अन्नाची सोय नाही. जरी तारुण्य आणि लावण्य असेल तरी बळेच वेडेविदरे स्वरूप करून बसतात. आणि शास्त्री पंडित म्हणतात की, त्या बाईने पूर्वजन्मी वाईट तपश्चर्या केली म्हणून हे फळ असे प्राप्त झाले. ईश्वराने उन्हात उभी केली हे पूर्वजन्माचे दुष्कृताचे फळ. म्हणून आता तरी व्रते करा, आणि आमचे पोट जाळा. म्हणजे सुकृत होऊन सात जन्म वैधव्य प्राप्त होणार नाही. असे सांगून भोळे व गरीब जिवांस फसवितात.
 मला तर असे वाटते की, स्त्रियांचे दुःख इतके भारी आहे की, त्याची स्मृती झाली तर रोमांच उभे राहतात आणि आईबापांस दुःखाचे पर्वत पडतात. आणि दुष्काळात पाऊस पडत असता राहतात. अरेरे! हा अनुभव घरोघर आहे. इतके असून जुन्या काळाची ही समजूत दृढ बसली आहे की, आपली पोरे आपण मारतात. हे ब्राह्मण लोक आपल्या मुली मारल्या पेक्षा अधिक दुःखात ठेवतात. त्या दुःखास पारावार नाही. अद्यापि या सुधारणेविषयी उलटे बोलणारे आहेत. परंतु जसा व्याघ्र रानात माजला तर सर्वजण जाऊन मारतात; तसे या उलटे बोलणारांचा लोक धिक्कार का करीत नाहीत? व याविषयी एकमत का होत नाही? बारा, पंधरा, वीस, तीस वर्षांच्या पोरीचे गळे कापतात. हे पाहून अंतःकरण खवळून न जावे काय? ही मूर्ख समजूत पडून गेली आहे. स्त्रियांनी पुनर्विवाह केला म्हणून त्यात काय तुमचा नामोश झाला? तुमच्या पोरी, बहिणी सुखेकरून नांदतील; हल्ली जो कल्होळ दृष्टीस पडतो तो पडणार नाही. पोरे आणि बाळे घेऊन पतीशिवाय काय काय उपासतापास, दुःखे या विधवा भोगितात? परंतु भले हिंदू हो, धन्य तुमची! तुम्हीच आपल्या मुलीचे खाटीक स्वस्थपणाने होता! तुमच्यासारिखे राष्ट्र आणि तुमच्यातील विद्वानासारखे विद्वान यांस तुलना पृथ्वीवर कोठेही मिळणार नाही, हेच खरे.
 पुनर्विवाह झाल्याने व्यभिचार कमी होईल, व्यवस्था चांगली राहील. पतित स्त्रियांस पती होतील आणि सुखी राहतील. आणि त्यांनी असे रहावे हा ईश्वराचा संकेत आहे. स्त्रीपुरुषांचे विधिरूप लग्न होऊन त्यांनी नांदावे असा क्रम; त्यांस विघ्न करणारे शास्त्रातील नेमधर्म आहेत. फक्त पुरुषांनीच स्त्रियांस जनावरांप्रमाणे पशू मानून त्यांजवर पाहिजे तसा जुलूम चालविला आहे. त्यात नीती नाही, धर्म नाही, सत्कर्म नाही व युक्ती नाही. मागे करीत आले व लिहून ठेविले म्हणून पुढे करतात; परंतु त्याची काही मर्यादा पहा. लक्षावधी स्त्रिया उपाशी मरतात. घर नाही, दार नाही, वस्त्र नाही, आणि हे दुष्ट पंडित अशा प्रकरणी दैत्यासारखे निष्ठुर होऊन बोलतात. त्यांस काय म्हणावे?

♦ ♦


पुनर्विवाह

पत्र नंबर १०५

 पुनर्विवाहाची चाल ब्राह्मण जातीत पडली असता मोठी सुधारणा होईल. पुनर्विवाह न करू देणे हा महान अविचार आहे. आणि हे लोक भोळसर म्हणूनच यांनी हा कहर सोसला.
 आता किती एक विचार करून पाहू लागले की, आमच्या जातीत बायकांस इतका अधिकार नाहीसा करून त्यांस जनावरांप्रमाणे मानितात व दुःखसागरी लोटून देतात. पुरुषावर स्त्रीची प्रीती अधिक असावी व तिणे त्याला देवच मानावा. आणि तिने त्याचा नाश कदापि इच्छू नये. या हेतूने हा धर्म स्थापन केला असेल. परंतु हे कारण अयोग्य आहे. या पृथ्वीवर ब्राह्मण जातीत स्त्रियांस दीनत्व विनाकारण प्राप्त होते. आजपर्यंत दोन चार हजार वर्षे तरी हा कायदा चालू असेल, परंतु याविषयी कोणाचे तोंड उघडले नाही. सर्व लोकांच्या डोळ्यांवर झोप होती. युरोपियन लोक इकडे आले त्यांच्या सहवासाने हिंदू लोकांस विचार आला. त्यामुळे त्यांचे नेत्र उघडले. त्यांनी सती बंद केली. हे मोठेच यश घेतले. आता पुनर्विवाहवादही चालू लागले.
 पूर्वीची रीत अशी होती की, चालीप्रमाणे मुकाट्याने चालावे, कोणी विचारू नये. बायकोस जिवंत जाळू लागले. आणखी याचे वर्चस्व चालते तर पुराणात एखादा आणखी श्लोक घालते की आईबरोबर लेकीने व भावाबरोबर बहिणीने जळावे; असाही कारखाना चालता; परंतु मसुलमान या देशात आल्यापासून ब्राह्मणांचे माहात्म्य संपले. इंग्रजांनी तर त्यांस जर्जर केले. आमच्या देशापलीकडे काय आहे याचा विचार ब्राह्मणांनी व पंडितांनी केला नाही. परंतु त्यांची झोप जाऊन त्यांनी जागृत व्हावे म्हणून त्यांची व परदेशीय यांची गाठ देवाने घातली. जसे पांडवांचे अक्षौहिणी सैन्य मेले आणि रामाचे युद्धात पद्मेच्या पद्मे मेली. त्याचप्रमाणे आज इतकी वर्षे हजारो बायका जिवंत जाळल्या; व बळेच भादरून दुःखाचे विहिरीत टाकल्या.
 याप्रमाणे ब्राह्मणांनी युद्ध केले. परंतु निर्दय पुरुषांनी काही विचार केला नाही. ते भटांचे व पंडितांचेच मानीत होते. पुढे ग्रामस्थ म्हणजे शूद्र वृत्ति करून पोट भरू लागले. ब्राह्मणांत ती एक आडजात निघाली व तेही पंडितांसच मानू लागले; परंतु कोणाचा धीर असा झाला नाही की, अरे हा माझा शास्त्रार्थ आहे म्हणतात खरा; परंतु किती एक शास्त्रार्थ लौकिकाकरिता एकीकडे ठेविता व विचाराने सारासार पाहता, तसेच हे घातकी वचन म्हणून टाकावे आणि जो विधी विचारास विरुद्ध असेल त्या विधीचा निषेध करावा. हेच योग्य आहे. आणि हा अनर्थ तर उघड आहे. किती एक स्त्रिया दुःखसागरात लज्जेने दीन होऊन, व्यभिचारी होऊन मेल्या.
 'कल्याणोन्नायक मंडळी'चा सभासद लिहितो की, अशा स्त्रियांनी एक वेळ जेवावे, चांगले अन्न खाऊ नये, उपासतापास करावे, यात्रा कराव्या. परंतु बळेच त्यांस अडचणीत घालून हे सांगावे काय? नवरा मरणे ही प्रारब्धाची गोष्ट आहे व तत्संबंधी जुलूम फक्त हिंदू लोकांच्या अज्ञानी व गरीब बायकांनीच सोसला आहे. जेव्हा या स्त्रिया विद्वान होतील तेव्हा या पंडितांस चरण- संपुष्टांनी पूजा अर्पण करतील; यात संशय नाही. परंतु याच कारणास्तव ब्राह्मण लोक स्त्रियांस शहाण्या करण्यास असे प्रतिकूल आहेत, जुलुमाने शास्त्र जेथे चालू आहे तेथे जरूरच आहे की बायका जनावरांप्रमाणे नीच अवस्थेत राखल्या पाहिजेत. स्त्रिया सुशिक्षित होतील, तेव्हा आपला अधिकार स्थापतील. आणि संसारसुखास हानी करणारे पंडितापासून असा तहनामाच करून घेतील. परंतु सांप्रत बायका अगदी जनावरे पडल्या म्हणून पंडितांस संधी सांपडली आहे.
 हिंदू लोक सुधारत नाहीत? तोपर्यंत मोठ्या पदवीवर येण्यास योग्य नाहीत. पहा, जर एखादा पंडित न्यायाधीश केला आणि त्यापुढे ब्राह्मणी स्त्रिया विधवा गर्भपात करून आल्या तर तो त्याजला बळेच महान अपराधी असे जाणून मोठी शिक्षा देईल. परंतु त्यांस असे वाटणार नाही की, आमचे शास्त्राने एवढी अडचण घातली आहे की, ती तोडण्यालायक आहे. याजमुळे ही स्त्री अपराधी कमी आहे, असे त्यांस किमपि वाटणार नाही.

♦ ♦


पुनर्विवाह


पत्र नंबर १०६

 पुनर्विवाहाची चाल पाडणे, हे शास्त्रविरुद्ध म्हणतात; परंतु लोकांचे हिताकरिता करावे हेच माझे म्हणणे आहे. जसा दुष्काळ पडला असता श्राद्ध करावयाचे असल्यास ठेवावे; कारण की, पोटास मिळून आपला जीव जगत नाही, तर खर्च कशास करावा? तद्वत् चांगली व्यवस्था होईल तो नियम करावा; आणि जे पूर्वी शास्त्र लिहिले तेच सर्व काळ चालले पाहिजे, असे म्हणणे हा मूर्खपणा आहे.
 जसे पूर्वीचे वैद्यक आहे. परंतु त्यात आता जी सुधारणा झाली असेल ती घेतली पाहिजे; तसेच ज्योतिष, तसेच धर्मशास्त्र. यात फेरफार केले पाहिजेत; व त्यातील नियम सुधारले पाहिजेत. किती एक रद्द करण्याजोगे जे होते ते लोकांनी कोणास न पुसता रद्द केले आहेत. कारण की तसे करणे जरूर पडत गेले. ब्राह्मणांनी राज्य करू नये; परंतु पेशवे यांनी केले. मुंजीनंतर बारा वर्षे गेल्यानंतर लग्न करावे; ते सोडून पूर्वीच करीतात. अशा शास्त्रविरुद्ध चाली लोकांनी स्वमताने हजारो काढल्या आहेत. त्यांस शास्त्री म्हणतील की या बहुत दिवसांच्या आहेत. तेव्हा मला इतकेच पुसावयाचे की, बहुत दिवस गेले म्हणजे बहुत दिवसांच्या होतात. परंतु या माणसांनी केल्या किंवा ईश्वराने केल्या. हे पहा. तसेच एकदा संमत देऊन पुनर्विवाहाची चाल घातली म्हणजे या लोकांचा स्त्रियांवर जुलूम नसावा. जे सरकार लोकांवर जुलूम करते त्यांजवर लोक बंड करतात. जे शास्त्र लोकसुखास विरुद्ध आहे त्यांस लोक सोडतात, हा निश्चय. याजकरिता जे सुखास आडवे येईल ते दूर करावे. लग्नाचा नियम हा धर्म नव्हे; ही रीत आहे. लोकांमध्ये व्यवस्था होण्याकरिता केला, तो जर वाईट असे स्पष्ट दिसेल तर दुसरे नियम करण्यास चिंता नाही.
 तुम्ही म्हणाल की, लोकांस व्यभिचार करण्यास सांगावे म्हणजे सुख आहे. परंतु येथे तुम्ही चूक करिता व्यभिचाराने लोकांत व्यवस्था राहणार नाही. जरी एकास सुख झाले तरी दुसऱ्यास ते दुःख आहे. याजकरिता आपले सुखरक्षणाकरिता व्यभिचार सोडावा. साधारण नियम असा आहे की, एकाचे सुख दुसऱ्याने हरण करू नये. सर्वांनी व्यभिचार केला असता लोकांची दुर्दशा होईल. म्हणून तो अधर्म व नीतीचे विरुद्ध व त्याचेच नाव पाप. ज्याचे साधारण परिणाम चांगले वजे सर्व मुलखात चालू झाल्याने लोकांचे काही वाईट होत नाही आणि चांगले होते, तेच पुण्य व तोच धर्म, असे माझे मत आहे.
 ज्या काळी ऋषींनी शास्त्र लिहिले त्या काळी त्याचे सर्व नियम लोकांचे सुखवृद्धीकरिता व व्यवस्थेकरिता लिहिले; त्यांनी लोकांचे घात व्हावे असे जाणून लिहिले नाही. बरे, यांस लोक बहुतकाळपर्यंत मानीत आले. ते फिरविण्यास आपण चांगला विचार करावा. उगेच दांडगाईने मोडू नये खरे; परंतु पुनर्विवाहाचा निषेधी दुष्ट परिणाम सर्वांस समजला आहे. परंतु अंध परंपरेस भितात इतकेच. यास्तव जितकी त्वरा होईल तितकी अशा समयी करावी. कारण की, एक घटका उशीर झाला तर हजारो स्त्रियांस समुद्रांत लोटून दिल्याचे पातक डोकीवर बसते.
 यास्तव लोकांस मी उपदेश करितो की, अगदी भिऊ नका. रस्ता सुखाचा व सोयीचा आहे. तुमची सुधारणा करावी हे पंडितांचे उपजीविकेस विरुद्ध आहे. तुम्हास शहाणे करण्यास विद्या पाहिजे. नवीन ग्रंथ हजारो पाहिजेत. शाळा पाहिजेत; हे खरे आहे. आता एक गृहस्थाजवळ एक लाख रुपये आहेत; असे म्हणा; आणि तो धर्म करावयास इच्छितो. आणि त्याने जर शाळा व ग्रंथकर्ते व पुस्तकगृहे इत्यादिकांस धर्म केला तर पंडितांचे व भटांचे हाती एक पैसा तरी जाईल? तेव्हा या धर्मास ते अनुकूल होऊन आपला रोजगार कसा बुडवतील? यास्तव ते असे सांगतात की, भट भिक्षुकांस बोलाव आणि दोन रुपये दर एकास दे. आणि शंभर गोप्रदाने कर, शंभर प्रायश्चित्ते कर. आणि दहा दहा रुपयांचा विषय एका एका ब्राह्मणांस पोचीव. आणि एक सहस्र भोजन घाल, एक इच्छाभोजन घाल, एक कोट तुळशी घाल, ब्राह्मणद्वारा महारुद्रकर, पाच शालजोड्या विद्वान भटास दे. मोठाले पंडित गावात आहेत, त्यांची संभावना कर; दर एक स्त्रीस नथ दे, भटास धोतरजोडा दे, म्हणजे महान धर्म होऊन मोक्षास जाशील. या गोष्टीचे उलटे ते कधी तरी सांगतील? तस्मात् या सुधारणेस ते सर्वथैव विरुद्ध आहेत. म्हणून त्यांची आशा धरतील मूर्ख आहेत.

♦ ♦


पुनर्विवाह वगैरे सुधारणा


पत्र नंबर १०८

 'कल्याणोन्नायक मंडळी'ने आपली विद्वत्ता बाहेर दाखविण्याकरिता दोन प्रश्न प्रथम काढिले. एक संस्कृत विद्या सर्वांहून वरिष्ठ व दुसरा पुनर्विवाह करू नये. या दोहोंची समर्पक उत्तरे झाली. आणखी माझे त्यांस उत्तर आहे की, तुम्ही असे मनात आणा, मी जर एक कायदा केला की, पुरुषाची स्त्री मेली तर त्यांस श्मश्रू करून लागलाच संन्यास द्यावा; व घराबाहेर काढून द्यावा व त्या दिवसापासून त्याचा रोजगार, व्यापार सर्व बंद, त्याने गंध देखील लावू नये. आणि हा कायदा चालू करण्याचे मला सामर्थ्य असते, तर पुरुषांनी काय म्हटले असते?
 आता पंडित म्हणतात की, बायकांस परवानगी दिली तर त्या नवरे मारतील. परंतु माझे उत्तर हे आहे की, इतर देशांत व जातीत परवानगी आहे म्हणून पुरुषांनी आपल्या बायका मारून दुसऱ्या केल्या आहेत की काय? पुरुषास परवानगी असावी आणि बायकांस नसावी काय? जी कारणे तुम्ही दाखविता ती पुरुषांसही लागू आहेत. मग आम्ही असे म्हणू की, पुरुषाची बायको मेली म्हणजे त्याचे सौभाग्य गेले. मग त्याने मीठ खाऊ नये, तीर्थयात्रा कराव्या व विधवेसारखे होऊन असावे. तर मग पंडितांस केवढा चमत्कार वाटेल बरे?
 अहो, हा प्रत्यक्ष अनर्थ, यांस विचार कशास पाहिजे? अनेक गोष्टींची सुधारणा आमचे लोकांत केली पाहिजे. विद्वान कोणास म्हणावे? हे समजले पाहिजे. विद्या म्हणजे काय? हे समजले पाहिजे. कर्ममार्ग वृथा आहे. नीती हाच मार्ग खरा; हजार तुळशी वाहिल्यात काही नाही, मन शुद्ध पाहिजे; चांगले ग्रंथ नवीन तयार होऊन ते प्रसिद्ध व्हावे असे केले पाहिजे. पुनर्विवाहादिक चाली घातल्या पाहिजेत. लोक विचार करू लागतील अशी युक्ती पाहिजे. लोक विद्वान होतील अशी युक्ती पाहिजे. अधिकारावर असल्यास कोणती प्रकारची वर्तणूक असावी, खरेपणा इत्यादी सद्गुण असावे, या सर्व सुधारणेच्या गोष्टी लोकास कळाव्या म्हणून 'कल्याणोन्नायक मंडळी'ने मेहनत करावी व सांप्रतचा मूर्खपणा सोडून द्यावा.
 तुम्ही म्हणाल की, विधवेचे लग्न करावे, असे अनुमत दिल्यास आम्हास सर्व जन हसतील. तर बाबांनो, हे खरे आहे, लोक हसतील खरे, परंतु पाच चार वर्षांनी चांगले म्हणतील, तुम्हास योग्य वाटेल तसे करा. लोकांस भिऊ नका. तुम्हास लोकांचे कल्याण कर्तव्य असेल तर चांगला मार्ग दाखवा. लोक मूर्ख होऊन राहिले आहेत. म्हणून त्या मूर्खपणास तुम्ही साहाय होऊन वाढवू नका. तुम्ही शहाणे आहा हे दाखवा. जर तुम्ही लोकांसारखे मूर्ख आहो असे दाखवाल व लोकास प्रिय ते बोलाल तर तुमचे नावास बट्टा आहे. याजकरिता तुम्ही मोठाले मान्य पंडित आहा, तेव्हा हा प्रसंग फुकट घालवू नका; त्याचे सुधारणेस तुम्ही लागा. सरकार जबरीने किंवा ईश्वरसत्तेने किंवा आम्हासारखे जे पुढे होतील ते आपली मते चालू करतील, परंतु तुम्ही आपली विटंबना होऊ देऊ नका.
 हे झाल्याखेरीज राहणार नाही. तुम्हास कळत नाही म्हणून तुम्ही संशयात आहा. तुम्ही जरी पन्नास हजार ग्रंथ पाठ केले असले तरी तुम्ही घोके आहा. तुमचे ज्ञान निरुपयोगी जाणून तुम्ही लौकर शुद्धीवर या. हे माझे तुम्हाजवळ मागणे आहे. तुम्ही मंडळी स्थापन केली याचा मला संतोष आहे. हे करणे तुमचे चांगले आहे. परंतु भलतेच बोलता म्हणून वारंवार तुम्हास सुचवितो. तुम्ही चांगले रीतीने विचार करा व पहिला वेडेपणा सर्व सोडून द्या. विचाराने चाला म्हणजे सर्व आहे. तुम्ही लोकांचे कल्याण करा ही माझी तुम्हास शेवटची विनंती आहे.

♦ ♦