Jump to content

लोकहितवादींची शतपत्रे/३. आमचे वर्णगुरू

विकिस्रोत कडून









३. आमचे वर्णगुरू










कन्याहत्या, गवरनरसाहेबांची बदली व ब्राह्मण लोकांचे अज्ञान

पत्र नंबर ५

 हिंदुस्थानातील वाईट चाली बहुतेक बंद होत चालल्या आहेत. इंग्रजांचे अमलातील मुलखात हत्या व खून, हिंदू लोक धर्म जाणून हमेश करीत होते, ते त्यांनी बंद केले.
 तत्रापि अद्याप गुप्तरूपेकरून गुजराथेत कन्याहत्या झाऊज लोक करतात. तेथील बंदोबस्त करण्याकरिता बडोद्याचे रेसिडेंट व पूर्वीचे गवरनर डंकिनसाहेब वगैरे यांनी बहुत मेहनत केली; तेव्हा काही मनाई झाली, तत्रापि अद्यापि पोरे मारतात. त्याचे कारण असे की, रजपूत लोकांचे राज्य एके कन्येचे हातून जाईल, असे त्यांस कोणी ब्राह्मणाने भविष्य सांगितले आहे. जसे कंसास नारदाने सांगितले होते, तसे हे आहे. यास्तव ते मुळी ठेवीत नाहीत. हा मूर्खपणाचा परिचार बंद व्हावा, म्हणून पेशजीप्रमाणे हल्लीचे साली इंग्रजी व गुजराथी भाषेत २ ग्रंथ करावे व जो चांगले करील, त्यांस ६०० व ४०० रुपये बक्षीस मिळतील, म्हणूस सरकारने जाहीरनामा लाविला आहे.
 आनरबल क्लार्कसाहेब गवरनर जाऊन त्याचे कामावर लॉर्ड फॉकलंड गवरनर येणार म्हणून वर्तमान ऐकिले आहे. त्या लॉर्डास हिंदुस्थान प्रकरणी माहिती नाही म्हणून ऐकण्यात आहे; परंतु तो कुलीन, थोर व विलियम फोर्थ- माजीराजा याचा जावई आहे, असे म्हणतात. हल्लीच्या गवरनरास गुणावरून नेमले होते. व त्यांनी थोडके दिवसात सत्कीर्ती चांगली संपादन केली. आता हे जातात, येणेकरून लोकांस जे सुख होते, तितके पुढे होणार नाही, असे दिसते.
 हिंदू लोक जे आजकालपर्यंत गाढ निद्रेत आहेत. ती जाण्यास बहुत ग्रंथ व बहुत ज्ञान पसरले पाहिजे व असे होण्यास बहुत काळ पाहिजे. व त्यांस मुख्य अडचण अशी आहे की, सांप्रत काळचे द्रव्यवान ब्राह्मण लोक हे यास आडवे येतात; म्हणून हे लोक जाऊन नवी प्रज्ञा होईल तोपर्यंत हिंदू लोकांची सुधारणा होईल, असे दिसत नाही. इतर जातीचे लोक तर सांगितलेले ज्ञान ग्रहण करावयास सिद्ध आहेत. परंतु ब्राह्मण लोक तसे नाहीत. पूर्वीपासून त्यांची समजूत अशी पडलेली आहे की, आम्ही पृथ्वीवर देव आहो; व देवही आमचे हाती आहेत व आमचे आशीर्वादाने व श्रापाने पाहिजे तसे होईल; २१० : शतपत्रे

व पृथ्वीवर लोक आमच्याइतके शहाणे कोणी नाहीत व देशाशिवाय पृथ्वीवर काही देश नाहीत; इंग्रज लोक हे समुद्रांतील बेटांतील माकडांसारखी मनुष्य इकडे आली आहेत; व रामासारखा विजयी अवतार होईल तेव्हा त्यांचे सैन्य त्यांस घालवील; व कंपनी सरकार ही कोणी एक स्त्री आहे, इत्यादी वेडगळपणाच्या समजुती बहुतेक ब्राह्मणांच्या हाती आहेत. व जो जो ब्राह्मण लोक श्रीमंत होतात, तो तो ज्ञान कमी होते. जे मोठाले सरदार व जहागिरदार आहेत, त्यांस पृथ्वीवर काय होते याची खबर नाही. झोपेत, निशेत व स्त्रियांच्या संगतीत ते निमग्न असतात; परंतु येणेकरून काय उपयोग ?
 बाजीराव पेशव्यांचे शाळेतील शिष्य बहुत जहाले आहेत; त्यांस अतिशय गरिबी आल्याशिवाय भ्रांती जाईल, असे दिसत नाही. जशी नवज्वरास बहुत लंघने पाहिजेत, तसे आहे. विद्येचा उपयोग पोटास मिळवावयाचा इतके मात्र लोक समजतात; पण ते मनात असे आणीत नाहीत की, सांगून इतके ग्रंथ व व्यासांनी अठरा पुराणे लिहिली हे काय ? यांस वेतन कोणी ठरविले होते ? विद्यावृद्धीची चाल ब्राह्मणांसी सोडली, म्हणून त्यांची अशी अवस्था झाली आहे. पुढले पत्री आणखी याविषयी लिहून पाठवू.

♦ ♦


ब्राह्मणांचे आचार

पत्र नंबर ११

 पूर्वी ब्राह्मण लोकांचा काय पवित्रपणा व धर्मनिष्ठपणा असेल, तो असो; परंतु हल्ली तर तो आम्हास काही दिसत नाही.
 थोडे दिवसांमागे एक दिवस पुण्यातून रात्रीस जात असताना पाहिले, तो रामजीचे देऊळ आहे, तेथे बहुत लोक जमा झाले होते आणि बहुत कलावंतिणी येऊन बसल्या होत्या. तेव्हा शोध लाविला तो अस समजले की, त्या देवळात दरसाल एक मनुष्य ब्राह्मण जातीचा आहे, तो प्रयत्नेकरून नाच, गाणे इत्यादी समारंभ करून देवाचा उत्साह करितो. हे ऐकून मला असा चमत्कार वाटला की, देवाचे देऊळ ही पवित्र जागा; त्या ठिकाणी असा भ्रष्टाचार जे करतात. ते स्वधर्माप्रमाणे चालतात, असे कसे म्हणावे ? हिंदुस्थानप्रांताची खबर ऐकली आहे की, तिकडे देवळात कसबिणीस येऊ देत नाही; व जेथे गरती स्त्रिया बसतात, तेथे रांडांस बसू देत नाहीत; परंतु पुण्यात हा बंद काहीच नाही. कुळीण स्त्रिया आणि कसबिणी एके जागी मिळतात. आणि देऊळ म्हणजे भजन, पूजन, चिंतन यांची जागा; तेथे पवित्र अंतःकरणाने देवाचे सान्निध्य व्हावे, असा पश्चात्ताप व्हावा व पापबुद्धी जावी, म्हणून देऊळ बांधतात आणि यास्तव सहस्र घरे बांधली आणि एक देऊळ बांधले. याचे पुण्य सारखे, असे शास्त्र म्हणते. त्याचे कारण हेच की, भगवंताचे सेवेकरिता ते स्थान. तेथे लोकांनी जाऊन परलोकसाधनाचा विचार करावा; म्हणून त्यांचे माहात्म्य अधिक. जर तेथे तमाशे, नाच, लावण्या म्हणावयाच्या असल्या, तर देऊळ बांधले आणि गावची चावडी बांधली सारखेच आहे.
 परंतु एका चांगल्या उद्देशाने देऊळ बांधतात, आणि त्याचा उपयोग असा भलता होतो, हे केवढे लोकांचे निर्लज्जपण आणि अज्ञान आहे ! ब्राह्मण जे आपले वर्तणुकीने लोकांस नीती लावणारे, ते प्रमुखत्वें करून अशा कर्मांत पडतात. पुण्यात किती एक ठिकाणी आणखी असे पाहिले आहे की, कसबिणीच्या घरांत देवळे स्थापिली आहेत. आणि तेथे ब्राह्मण जाऊन अभिषेक, पूजा वगैरे करतात. ज्या घरात पाऊल ठेवले, तर ब्राह्मण पतित व्हावयाचे, त्या ठिकाणी धर्माची शोभा आणि त्यांस उत्तेजन आणणारी देवालये ती बांधली जातात, आणि तेथे ब्राह्मण जपानुष्ठाने करतात; तेव्हा हे कर्म कसे ? अद्यापि पुण्यात किती एक धर्मनिष्ठ ब्राह्मण आहेत. ते अशा देवळास देऊळ असे मानीत नाहीत आणि तेथे जातही नाहीत.
 एका गृहस्थाने एका कसबिणीचा पैका वहिवाटीस घेऊन ती मेल्यावर देऊळ बांधले व त्या ठिकाणी एक पुराणिक मोठा वक्ता आहे, त्यांस आणावयाकरिता तो गृहस्थ प्रयत्न करीत होता; परंतु त्याने कबूल केले नाही. मागे श्रीशंकराचार्यस्वामी येथे आले होते, तेव्हा एक गृहस्थ बहिष्कृत आहे, त्याने अशी मसलत केली, स्वामीचे चरण आपले घरास लागून अन्न, जलप्राशन झाले म्हणजे, ते ब्राह्मणांचे गुरू, तेणेकरून आपण सहज ब्राह्मणांत आल्याप्रमाणे होईल, असे मनात आणून त्याने स्वामीस काही पैका देण्याचे कबूल करून आपले घरी आणले, परंतु तीच मेजवानी त्यांची शेवटची झाली. म्हणजे कोणी एक मनुष्याने ज्या जेवणास जाण्याचे निंद्यकर्म स्वामींनी केले, असे तपशीलवार लिहून, त्याचे दरवाजास एक जाहीरनामा लाविला. असा सर्व लोकांचा आवेश जाणून स्वामींनी त्याच दिवशी कूच केला. जर काही दिवस अधिक राहिले असते, तर स्वामींनी लोकांची धर्म विचक्षणा करण्याचे एकीकडे राहून त्याचेच वर्तणुकीची विचक्षणा, आमचे शहरात पूर्वापार धर्मसभेची जागा आहे, तेथे झाली असती; परंतु ही गोष्ट चुकली, हे बरे झाले.
 तात्पर्य, ब्राह्मणांनी लोभ फार अंगीकारिला. आता ब्राह्मणांचा संतोष किंमतीने विकत घ्यावयाचा आहे. दुसरे काही करावयास नको. जे म्हटले ते कर्म ब्राह्मण करतील व आळसामध्ये आपले पोषण व्हावे, अशी तजवीज काढतील. त्यांस जेवावयास व दक्षिणा मिळाली, म्हणजे झाले. धर्म, अधर्म, अनुशासन, यांचा विचार ते करीत नाहीत. मला वाटते की, आता कुळंबी धर्मात्मे निघतील; परंतु ब्राह्मण निघणार नाहीत. सर्व जातीपेक्षां ते नीचपणास उतरले आहेत. त्यांच्यामध्ये आता गर्व मात्र शेष राहिला आहे. ज्ञान, न्याय, नीती व गुण काही नाही. किती एक ब्राह्मण हल्ली तुकाराम व ज्ञानेश्वरपंथी झाले आहेत व गळ्यात माळा व वीणा घेऊन रस्त्यावर नाचतात. ज्यांस वैराग्य साधन करावयाचे, ते असे करतील काय ? दररोज नवीन संत होतात व मग पैका जमल्यावर त्याची भांडणे लागतात. किती एक शिष्य त्यांस सोडून जातात व बावांना शिव्या देतात. व बावांची कर्मे पाहिली, तर उच्चार करवत नाही. कोणी व्यभिचारी, कोणी चोर, कोणी लबाड असे आहेत; सारांश, ते साधू नव्हत. परंतु भोंदू साधू आहेत. ते द्रव्याच्या लोभाकरिता जेथे पुष्कळ लोक जमतात तेथे कथा, भजन करतात व लोक जमत नाहीसे झाले, म्हणजे चालते होतात. असे लोकांना ठकवीत फिरतात. आणि आपण काही उद्योग न करता भीक मागून यथास्थित पोट भरितात व लोक तरी किती आंधळे आहेत पहा ! असे लबाड ठगास साधू म्हणून कबूल करतात. साधूने कसे राहावे याविषयी तुकारामाचा अभंग कसा आहे-

हरिभक्त जे म्हणवीती, हीना दीना का मागती ।
देखुनी सभेचा समुदाय, दावी भक्तीचा हा भाव ।
कथेमध्ये हालवी ढोंग, संत नव्हे तो बेसंग ।
पाहुनि स्त्रियांचा तो मेळा, काढि सुस्वर तो गळा ।
तुका म्हणे नव्हे योग, पोटासाठी केले ढोंग ॥१॥
जेथे कीर्तन करावे, तेथे अन्न व सेवावे ।
तट्टू बैलांशी दाणा, तेथे मागू नये जाणा ।
बुका लावू नये भाळा, गळा घालू नये माळा ।
तुका म्हणे तेचि संत, बाकी सगळे ते हो जंत ॥२॥

 याप्रमाणे असून वेदशास्त्र सोडून तुकारामपंथ धरतात. मग त्यासारखे तरी का आचरण करीत नाहीत ? त्यांचे चित्त सर्व काळ लोकांस लुटण्याकडे असते. त्यांस आणखी उद्योग काही नाहीत. गंध म्होरकीदार, मुद्रा चक्रीदार व शेंड्या घेरेदार राखाव्या व ढोंग माजवावे; यांत फळ काय होणार ? असे खोटे साधू इतर ढोंगी लोकांपेक्षा शासनास अधिक पात्र आहेत असे मला वाटते.

♦ ♦


ब्राह्मणां अज्ञानचे

पत्र नंबर १७ : ११ जून १८४८

 या देशचे लोकांचे असे मत आहे की, ईश्वराचे सृष्टीत स्त्रिया थोड्या आणि पुरुष फार निर्माण केले आहेत व याचे उदाहरण ते असे दाखवितात की, किती एक पुरुष लग्न झाल्याखेरीज असतात आणि स्त्रिया लग्न झाल्याखेरीज असत नाहीत.
 याजवरून बहुत पुरुषांस स्त्रिया मिळत नाहीत; असे अनुमान ते करतात; परंतु मला वाटते की, हा मूर्खपणा आहे; कारण स्त्रियांस एकदा विवाह करण्याचा व पुरुषांस दोन तीन वेळ विवाह करण्याचा अधिकार आहे. यास्तव स्त्रिया तिकडे जास्त जातात आणि इकडे कमती येतात, तर करिता स्त्रियांस पुनरपि लग्न करण्याचा अधिकार मिळेल, तर पुरुषांस कधी कमती येणार नाही. व स्त्री-पुरुष सृष्टीत समसमान आहेत, तेव्हा पुरुष लग्नाशिवाय रहावे व स्त्रिया न रहाव्या, याचे काही कारण दिसत नाही; परंतु मनुष्याच्या रीतीत व नियमात व वर्तणुकीत याचे कारण आहे. म्हणजे ब्राह्मण लोकांनी हा मोठा अनर्थ मांडला आहे की, स्त्रियांस पुनः लग्न का करू देत नाहीत ! ही गोष्ट त्यांस इतकी बरी वाटते की, त्याविषयी जर कोणी भाषण केले, तर त्यांस मनापासून वाईट वाटते व अतिशय दुःख होते ते म्हणत की येणेकरून आमचा पूर्वापार धर्म वसिष्ठापासून चालत आलता त्यांस अपाय होईल व सर्व लौकिक बुडेल आणि आपण सारे या पापामुळे नरकात जाऊ, असे मोठमोठे विद्वान आहेत, त्यांचे देखील मनात येते. व जे गृहस्थ भट वगैरे अडाणी लोक आहेत ते तर लौकिकावाचून दुसरी गोष्ट जाणतच नाहीत.
 परंतु मला वाटते की, ही समजूत अगदी खोटी आहे. पुनर्विवाहापासून धर्मास, कर्मास व लौकिकास अपाय नाही. सर्व चांगले आहे. मनात जे मिथ्या आहे ते खरे वाटते. ईश्वरास भजावे हा मात्र धर्म आहे. लग्न इत्यादी रीतिभातीशी धर्माचा काही संबंध नाही. पूर्वी देवरोत्पत्ती होती. ऋषी मांस खात होते व इतर जातीचे लोक ब्राह्मण होत असत. असे वाल्मिक व व्यास यांचे उदाहरणावरून समजते व असे दिसते की, त्या वेळचे ब्राह्मण ज्ञानी होते. आताचे सारखे मूढ नव्हते व आमचे जातीने आमचे शास्त्राचे बाहेर चालू नये, असे म्हणत नव्हते. सारासार विचार पहात होते व जर काही एक अनर्थ वाटला, तर तो बंद करून दुसरी रीती स्थापीत होते. असे अनेक स्मृती आहेत त्या पाहिल्यावरून वाटते. दर एक स्मृतिरूप ग्रंथात वेगळाली मते आहेत; याजवरून असे दिसते की, प्रत्येक स्मृतिकार एकेक राजाचा आश्रित असेल व त्याने आपापले राजास लागू पडतील तसतसे कायदे केले. याजवरून ते शहाणे होते, असे दिसते.
 एका गृहस्थाने एक बाग केला. तेथे झाडे लावीत; ती मेली तर तो पुनः दुसरी झाडे लावी. तेणेकरून त्याचा बाग चांगला रहात होता. हा दृष्टांत ब्राह्मणाचे शास्त्रांस लावू. यांच्या शास्त्राच्या बागेत पूर्वी झाडे लावली. ती वाळून गेली, तरी लोक त्या झाडांशी बांधून घेऊन हित- अनहितावर हल्ली काही लक्ष्य देत नाहीत. सरासरी लक्ष्य देण्याचा विचार शंकराचार्यांपर्यंत चालला; परंतु अलीकडे सुमारे दोन हजार वर्षांत लोक आंधळे झाले, विचार करीत नाहीत व ब्राह्मण पूर्वी पोथीपुस्तक पाहणारे व रानात राहणारे, ते जाऊन आताचे ब्राह्मण मजूरदार व घरंदाज झाले; व ते, कोण श्रीमंत आहेत ? फुकट जेवावयास कोण घालील ? आणि दक्षणा कोण वाटील ? अशी वाट पहातात त्यांची योग्यता पाहिली, तर दोन ओळी पाठ म्हणतात इतकीच, परंतु अर्थाचे नावाने शून्य ! तेव्हा त्यांस विद्वान म्हणावे किंवा नाही, याचा संशय येतो.
 कारण जास अर्थपरिज्ञान नाही, नुसती अक्षरे वाचून पाठ म्हणतात, त्याचे ते शब्द, जशी जनावरांची ध्वनी तद्वत आहेत. कारण जनावरांची आणि मनुष्यांची ध्वनी सारखीच आहे. मनुष्यामध्ये जास्ती इतकेच आहे की, ते जी ध्वनी करतात, तिचा अर्थ करून समजतात व दुसऱ्यास कळवितात. हे मनुष्याचे विशेष लक्षण आहे, ते लक्षण अलीकडील ब्राह्मणांचे ठायी आढळत नाही. तेव्हा हे आपणांस बुद्धी, विचार, ज्ञान, शक्ती, मन, चित्त इतकी असून ती बंद करून पोटे भरण्याकरिता मात्र पाठ करतात. तेव्हा त्यांस विद्वान कोण म्हणेल ? व ब्राह्मणांची मते बहुधा नीट असत नाहीत. त्यांचे चित्त जेवणावर व पैशावर असते. मूर्ख लोकांत प्रतिष्ठा मिरवावी व फुकट पोट भरावे, म्हणून ते चार अक्षरे पाठ करतात, परंतु त्यांस ज्ञानी आणि विचारी कोण म्हणेल ? ते भारवाहक असे आहेत. मग त्यांची वर्तणूक तरी चांगली कोठून असणार ! अलीकडे पुण्यात एक दशग्रंथी विद्वान ब्राह्मण सदरी लिहिले प्रकारचा होता; त्यांस मॅजिस्ट्रेटाकडून चोरीबद्दल एक वर्षाची शिक्षा झाली. याजवरून या सर्व गोष्टी मनात आल्या, त्या कळविल्या आहेत.
 मला वाटते की, बहुत वैदिक व शास्त्री हे वाकड्या समजुतीचे लोक आहेत. व हिंदुस्थानचे विद्येचा स्वभाव असा दिसतो की, त्यातील विद्वान् बहुधा मोठा मूर्ख आणि भलतेच समजुतीचा असतो. मनुष्याहून पृथक् बुद्धी त्यास येती, अडाणी मते वगैरे त्यांस फार भासतात, यांचे काय कारण असेल ते असो. त्याचा पुढे विचार करू.
 इंग्रज लोकांनी जगातील बहुत गोष्टींचा शोध केला आहे व त्याचे खालोखाल मुसलमान लोक आहेत; कारण फारशी भागवत, भारत व वैदिक ग्रंथ अकबर बादशाह वगैरे यांचे हुकुमावरून ब्राह्मण धर्म प्रसिद्ध होण्याकरिता लिहिले आहे, तेव्हा इंग्रजांचे खाली शोधक व उद्योगी हे लोक दिसतात. ब्राह्मण लोक व मराठे लोक यांनी शंभर दीडशे वर्षे राज्य केले, परंतु असे काही केले नाही व त्या काळी इंग्रज व मुसलमान हे लोक हिंदुस्थानात होते. परंतु त्याजविषयी कोणी शोध किंवा पुस्तक केले नाही. यावरून हिंदू लोक निद्रिस्थ आहेत, असे दिसते. यांचे शहाणपण, अक्कल, विद्या व कला बाहेर गेली व बाहेरची आणावयास यांस संकट पडले, हा केवढा चमत्कार !
 पेशवाईत ब्राह्मण लोकांनी फक्त जेवणाचे पदार्थ नवे काय काय होतील व रेशमी व भरगच्ची पोशाख अंगावर कुत्री भोकावयाजोगे काय काय तयार होतील, याचा विचार करण्यात मात्र वेळ घालविला. काही विद्येपासून हित, मनाची सुधारणा व राज्याचा बंदोबस्त केला नाही, हे उघड आहे. जे हिंदुस्थानात पहिले प्रतीचे ब्राह्मण त्यांजवाचून दुसरे कोणी वाचू नये, असे नेम आहेत. त्या ब्राह्मणांचा मूर्खपणा आहे. तेव्हा इतर जातींची व्यवस्था सहजच समजेल तस्मात् हे लोक मूर्खपणात आहेत, हाच निश्चय खरा व त्यांस जागृत करण्याकरिता इंग्रजांस पाठविण्याची योजना ईश्वराने केली आहे, हाही निश्चय खरा आणि त्याप्रमाणे हा बेत सिद्धीस जाऊन हे लोक ज्ञानी व सावध होऊन सुखी व्हावे, हीच आता आशा आहे.

♦ ♦


ब्राह्मणांचे महत्त्व


पत्र नंबर २० : ९ जुलाई १८४८

 मला एक संशय आहे की, हल्लीचे काळी कोणी वास्तविक ब्राह्मण आहेत किंवा नाहीत. माझ्या मताने म्हणाल तर कोणीही नाहीत, असे मला वाटते. आता ब्राह्मण जसे इतर रोजगारी व मजदूर लोक, तसेच आहेत. पढावयाचा त्यांचा व्यापार आहे; परंतु त्यांस अर्थज्ञान पाहिजे ते नाही. आपल्याला असे म्हणवितात की -

देवाधीनं जगत्सर्वं मंत्राधीनं च दैवतम् ।
ते मंत्रा ब्राह्मणाधीनं ब्राह्मणो मम दैवतम् ॥ १॥

 अर्थ- देवाचे स्वाधीन सर्व जग आहे व देव मंत्राचे स्वाधीन आहेत; पण ते मंत्र ब्राह्मणांचे स्वाधीन; म्हणून ब्राह्मण हे माझे स्वतःचे दैवत आहे असे खुद्ध परमेश्वर म्हणतो.
 आता याजवरून ब्राह्मण हे देवाक्षाही जास्ती आहेत, असे झाले; परंतु असले मत मूर्खाशिवाय कोणी ऐकेल काय ? जेव्हा लोक अनाडी होते, तेव्हा ब्राह्मणांनी आपला शक पराकाष्ठेचा चालविला. इतर लोक ज्ञानी होतील आणि त्यांचा नफा व फुकट जेवण बुडेल, याजकरिता त्यांनी असा नेम केला की, दुसरे जातीने शिकू नये. जे काय वाचणे ते ब्राह्मणांचे तोंडून इतर लोकांनी ऐकावे. येणेकरून पुराणिकांचे तांदूळ, भटांची दक्षिणा, श्राद्धाची क्षीर व लग्नाच्या पोळ्या ब्राह्मणांनी आपल्याकडे पुष्कळ पिकविल्या व त्याप्रमाणे हे आजपर्यंत निभावले, परंतु आता निभणे मला दिसत नाही; कारण आता चारी जातीचे लोक हुशार झाले आहेत. आणि जे ब्राह्मणांनी आपल्या नफ्याकरिता ठरविलेले होते, ते अलीकडे मोडले आहे.
 विद्येचा सर्वांस सारखा उपयोग होत आहे व विद्याही चौपट वाढली आणि कृत्रिमपणाचा थोरपणा बुडत चालला. विद्या झाकलेली होती, तोपर्यंत तिचा मोठा बाऊ वाटत होता; पण आता उघड झाली, तेव्हा सर्व न्यायच होईल. मला वाटते की, ब्राह्मणासारखा गर्विष्ठ पृथ्वीवर दुसरा कोणी नसेल; कारण त्यांनी जरी आपला धर्म व कर्म सोडिले, किती एक लबाड लुच्चे आहेत, किती एक मूर्ख आहेत, किती एक भडवेपणाचे रोजगार करतात, किती एक रांडांचे मागे तबले वाजवितात, असे असे निर्लज्ज झाले आहेत, तरी त्यांस असे वाटते की, आम्ही इतके केले, तरी उत्तम कुळंब्यापेक्षा आम्ही चांगले व श्रेष्ठ आहो. यास प्रमाण-

दुःशीलोsपि द्विजः पूज्यो न च शूद्रो जितेन्द्रियः ।
दुःशीलापि दुहेद् गावो न खरीं शीलवर्तिनीम् ॥१॥

अर्थ- चांगल्या शीलाचा नसला तरी ब्राह्मण पूज्य आहे. मोठा जितेंद्रिय झाला, तरी शूद्र पूज्य नाही. यास उदाहरण, गाय लाथाळ असली, तरी तीच दुधास योग्य, गाढवी गरीब असली तरी ती योग्य नाही.
 मला ब्राह्मणांचे व इतर लोकांमध्ये भिन्नपणा काहीच दिसत नाही. ब्राह्मण मरतात, जन्मतात व हातपाय त्यांस इतरांसारखेच असतात. मग इतरांपेक्षा त्यांचे मध्ये काय फरक आहे ? व ब्राह्मणाला गर्व कशाकरिता असावा ? त्याचा मुख्य गुण काय ती विद्या; तिचे तर त्यांचेमध्ये शून्य पडून काळे झाले आहे, तेव्हा आता कोणी काही पाठ करील, तर त्याला तेवढ्यावरून थोर म्हणावे काय ? त्याचा उपयोग काय ? बैलाच्या पाठीवर साखरेच्या गोण्या घातल्या तर त्याला जसा त्याचा उपयोग नाही, तद्वत ब्राह्मणांनी पुष्कळ पाठ केले, पण अर्थ ठाऊक नाही व ज्ञान नाही, तर हातात तंबाकू व दुसरे हातात चुना आणि तोंडात वेदपठण, हे तरी उत्तम आहे काय ? तेव्हा असे भ्रष्ट झाले ते ब्राह्मण म्हणावे किंवा त्यांस दुसरे काही म्हणावे ?
 वास्तविक म्हटले तर इतर जातीचे मनुष्यास जातीचा गर्व नसतो वा आपले हलके जातीचे समजुतीमुळे तो नम्रपणाने वागतो आणि ब्राह्मण मूळचा भिकारी असला तरी मी हिऱ्याचे जातीचा आहे, असे समजून जरी कोळसा असला तरी गर्वी असतो व मी सर्वांहून थोर, अशी त्याची समजूत असते. तशात त्यांस पैसा मिळाला किंवा काही सोय झाली म्हणजे तर त्याएवढा गर्विष्ठ कोणी नाही. मग तो कोणास मोजीत नाही. आपला मीपणा मिरवितो.
 आता वास्तविक पाहिले तर कोणत्याही युगात ब्राह्मणास राज्यावर किंवा अधिकारावर कोणी बसविले होते असे नाही. जे विद्वान ब्राह्मण असतील, त्यांचा राजाने सन्मान करून त्यांस संग्रहास बाळगावे, असे आहे; परंतु अधिकाराचे उपयोगी ते नाहीत. हे तर स्पष्ट आहे. ब्राह्मणाकडे राज्य असेल तर इतर जातीचा काय परिणाम होईल ? व ब्राह्मण किती माजोरीपणा करतील ? मला वाटते की, स्वभावेकरून किंवा विद्येचे जोराने जे निर्मळ असतील, ज्यांनी आपला गर्व टाकला असेल व आपण आणि इतर जातीचे लोक सारखे आहेत असे ज्यांस वाटेल, त्यांस मात्र अधिकारावर ठेवावे. इतर ब्राह्मणांस ठेवू नये. कारण इतर जातीपेक्षा महत्त्वाचे गैरसमजुतीमुळे ते वाईट आहेत; पण हल्ली बहुधा सर्व रोजगार ब्राह्मणांनी बळकाविले आहेत. म्हणजे एकीकडे भटांनी धर्म व दुसरीकडे गृहस्थांनी रोजगार अशा दोन्ही बाजू धरून इतर लोकांस आत येऊ देऊ नये, अशी शक्कल केली होती.
 परंतु ईश्वरास हे कसे आवडेल ? त्याने जी उत्तम योजना करावयाची ती केली. यास्तव आता सर्व जातींचे अधिकारी होतात, हे ठीक आहे. कारण ब्राह्मणांचा गर्व व आढ्यता फार. तेव्हा इतर जात त्यापेक्षा बरी. तसेच ब्राह्मणांचा स्वार्थ पाहण्याचा स्वभाव इतका आहे की, त्यांस आपला नफा मात्र दिसतो. दुसरे काही दिसत नाही. पहा की, शिंदे, होळकर, गायकवाड या सर्वांस पेशव्यांबरोबर राज्ये मिळाली. त्यांची ती अद्यापि कायम आहेत व पेशव्यांचेच बुडाले, याची कारणे काय ? तर यास जी कारणे आहेत ती अशी-
 (१) ब्राह्मण कोणाचे ऐकावयाचे नाहीत. (२) ब्राह्मणांस गर्व फार, याजमुळे ते सर्वांस तुच्छ मानतात व म्हणतात की, आमच्यापेक्षा शहाणा कोण आहे ? (३) देवब्राह्मण यांचे जवळ जवळ नाते आहे. तेव्हा देव आपले रक्षण करील, असे म्हणून ब्राह्मण भलतेच करतात. (४) ब्राह्मणांकडून इतर वर्णांचा द्वेष होतो. (५) ब्राह्मणांस रयत राजी होत नाही. (६) ब्राह्मणांची स्नानसंध्या माजली, म्हणजे राजकीय काम व पराक्रम होत नाही. (७) ब्राह्मणांस अडचणी फार, त्यामुळे प्रवासात हे निभत नाहीत. (८) ब्राह्मणांस सोवळे फार; (९) ब्राह्मण आपल्या लोकांशी द्वेष करतात व परक्यांचे गुलाम होतात, (१०) ब्राह्मण स्वार्थ फार पाहतात आणि त्रास आणतात. (११) यास असे वाटते की, आम्ही ब्राह्मण आहो; कोणी काही दिले तरी त्याचा धर्म झाला म्हणून ते लोकांस नागवितात.

♦ ♦


गृहस्थ आणि भिक्षुक यांचा भेद

पत्र नंबर २१ : १६ जुलई ९८४८

 मागील अंकात एक पत्र आहे. त्यात ब्राह्मणांचे शापापासून नाश होतो व ब्राह्मण स्वधर्माप्रमाणे चालतात, असे वर्णन केले आहे. त्याचे उत्तर लिहितो ते असे-
 जर ब्राह्मण लोक आपल्या धर्माप्रमाणे चालावयाचा उद्योग करीत आहेत तर मग मुळी ब्राह्मणवर्णाच्या दोन जाती, एक गृहस्थ व एक भट अशा बहुत दिवस चालू आहेत, याचे कारण काय ? ब्राह्मणांनी विद्याभ्यास करावा हा धर्म सोडून ते गृहस्थ कसे झाले ? याचे कारण मला इतकेच वाटते की, ब्राह्मणवर्ग पहिला थोडा होता, तेव्हा लोकांस त्याचे सहज पालन करता येत होते व पुष्कळ वाढला तेव्हा तितक्यांचे पालन कसे होईल ? बरे, इतके ब्राह्मण अधिक झाले, म्हणून काही आंधळे, पांगळे, लंगडे, रोगी, वृद्ध, बाळ हे कमी झाले नाहीत व त्यांचे पोषणही केले पाहिजे. तेव्हा हे वास्तविक गरीब लोक व शिवाय ब्राह्मण, इतक्यांचे पोषण लोकांच्याने होईना, याजमुळे ब्राह्मणांनी गृहस्थपणा धरून इतर जातीचे रोजगार म्हणजे क्षत्रियांची शिपाईगिरी, वैश्यांचा व्यापार व शूद्राची चाकरी ही सर्व पत्करली व तेणेकरून ब्राह्मणांचे धर्मापासून पतन आपल्या आपण झाले. हे काही नीच लोकांनी केले, असे नाही.
 हल्ली ब्राह्मण लोक तर धर्माप्रमाणे वागण्याचा उद्योग करीत नाहीत; परंतु त्यांचा मोठा उद्योग इतकाच आहे की, कोठे तरी उद्योगावाचून फुकट जेवण मिळावे, असे स्थळ पाहून तेथे शिरावे. धर्माविषयी आपणास काय कळते, याविषयी जर कोणीही ब्राह्मण आपले अंतःकरणात विचार करून पाहील तर त्याचे सहज ध्यानात येईल. ब्राह्मणात फारसे विद्वान व नीतिवान आहेत, असे दिसत नाही. जसे इतर वर्णांचे लोक आहेत, त्याचप्रमाणे हेही आहेत. यांचे अंगी काही ज्ञानाचा थोरपणा नाही व भट तर बहुधा भोजनभाऊ आहेत. आणि गृहस्थ चाकरी व व्यापार करून पोट भरितात. तेव्हा धर्मप्रवर्तक ब्राह्मण आता कोठे आहेत ? कोठेच नाहीत. म्हणून हल्लीचे ब्राह्मणांस इतर जातीचे लोकांपेक्षा अधिक मान देणे योग्य नाही. जर कोणी देईल, तर तो अज्ञानी व आंधळा असावा, यात संशय नाही. ब्राह्मणांची बुद्धी अशी आहे की, सर्व अधिकार व द्रव्य आपल्यास असावे व विद्येचा थोरपणा घालवून ते द्रव्याचा थोरपणा पाहू लागले आहेत. आता जर कोणी शूद्र जातीचा कारकून झाला, तर सर्व ब्राह्मण लोक त्याजकडे डोळे वटारून पाहतात, त्यांस असे वाटते की, आमचा धर्म लिहिणे- पुसणे करावयाचा असून कुणबी आमचा वृत्तिच्छेद करतात.
 सारांश, त्यांस धर्मात थोरपणा आहे, तसाच सांसारिक थोरपणा असावा म्हणजे आपण सर्वांहून मुख्य होऊन बसावे, असे वाटते. आपण राजाप्रमाणे राहू, सर्व रयत काम करील. आम्ही मांडीवर मांडी चढवून खात जाऊ, पोटावर हात फिरवू व यजमानाची स्तुती करू असे त्यांचे मनात येते, परंतु त्यांस वाटत नाही की, आपण फुकट खाण्याची इच्छा करितो, तशी फुकट खाण्यायोग्य लोकांची चाकरी कोणती करितो ? धर्म कोणास शिकवतो ? व कोणती विद्या वाढवितो ? जसा एखादा अमीर असतो, त्यांस वाटते की, गुलामांनी सर्व प्रकारे सेवा करावी, तद्वत् ब्राह्मणांस वाटते की, आम्ही मोठे आहो. आमची सेवा सर्व लोकांनी करावी, आम्हाकरिता शेते पिकवावी, आम्हाकरिता घरे बांधावी, अन्नछत्र घातले, तरी तेथे फक्त आम्हा ब्राह्मण जातीस मात्र जेवावयास घालावे, इतर जातींस घालू नये, असे त्यांस वाटते.
 ब्राह्मणांनी अन्नछत्रे घातली आहेत, तेथे कोणी ब्राह्मणांखेरीज दुसरा वर्ग जेवील काय? जरी अत्यंत पीडित, रोगी, थकलेला व शूद्र येईल, तरी ते निर्दयपणाने त्यांस नाही म्हणतील. आणि श्रीमंत, धट्टाकट्टा व मूर्खाचा राजा असा ब्राह्मण आला, तरी त्यांस जेवावयास घालतील. तेव्हा हा धर्म कशाचा ? त्यांच्या दुष्ट स्वभावाने एकमेकांत वितुष्टे मात्र पडली आहेत. आणि प्रत्येक जातीचे लोक जसे वेगळाले देशाचे लोक जसे आपसांत भांडतात तसे हे एक देशचे लोक असून, आपल्यात वेगवेगळे देशचे शत्रूप्रमाणे भांडतात, येणेकरून सर्वांची चित्ते फुटली आहेत व कोणामध्ये ऐक्य नाही. हा इतका या देशाचा फायदा ब्राह्मणांनी केला आहे.
 ब्राह्मणांचा धर्म काय, हा प्रश्न जरी पाच हजार ब्राह्मणांचे सभेत केला, तरी त्याचे उत्तर कोणी एकही देणार नाही, परंतु दक्षणा सर्व मागतील. तेव्हा हे भट कशाचे ? जसे इतर जातीचे सुतार, न्हावी, माळी तसेच हे मूर्ख राघूसारखे पढणारे, वेदविक्रयेकरून पोट भरणारे व निर्लज्जपणाने भीक मागून काम न करिता खाणारे आहेत. हे लोकांस सांगत फिरतात की ब्राह्मणांस द्यावे, म्हणजे मोठा धर्म आहे. कुळंब्यास काही देऊ नये. कुळंबी जरी म्हातारा व आंधळा असला तरी चिंता नाही. त्याने मेहनत करावी, हाच त्याचा धर्म आहे. अहाहा ! काय हा आपलपोटेपणा ! ब्राह्मणांस ब्रह्मदेवाने फुकट खावे म्हणून सनद करून दिली आहे काय ? बाजीरावाने ब्राह्मणांस पुष्कळ खावयास दिले. त्याचे ब्राह्मणांच्या आशीर्वादाने काय झाले ? अन्न मात्र व्यर्थ गेले आणि त्याचा नाश व्हावयाचा तो झालाच; तर ब्राह्मणांनी याचा विचार करावा. ब्राह्मणांच्या आशीर्वादाने होणार काय ? जे ईश्वर इच्छील ते घडेल. ब्राह्मणांच्याने काही होणार नाही हे मला पक्के ठाऊक आहे आणि आजपर्यंत ब्राह्मणांनी अज्ञानी लोकांस फसवून जे खाल्ले, ते आता सर्व उघड व्हावयाची वेळ आली आहे.

♦ ♦


ब्राह्मण लोकांचा स्वभाव


पत्र नंबर ४८ : १८ फेब्रुवारी १८४९

 हिंदू लोकांमध्ये निर्लज्जपणा हे एक त्यांच्या दुःखास मोठे कारण आहे. पहा, एक जण लाच खातो व त्यांस सरकारातून शासन होऊन त्याची धिंड काढतात, हे पाहून लोकांस दहशत पडावी; परंतु ते काही नाही. जे त्याचे कामावर बसतात, ते लागलीच लाच खाऊ लागतात. तसेच इतर सर्व गोष्टींमध्ये दुर्गुणास लोक भीत नाहीत.
 याचे कारण असे की, या लोकांमध्ये छापखाने व वर्तमानपत्रे वगैरे फार नाहीत; याजमुळे त्यांस निर्लज्जपणाचे भय वाटत नाही. छापखान्यामध्ये जितके अधिक ग्रंथ छापतात, तितकी लोकांची सुधारणा होते; कारण कोणी काही अपराध केला तर तो छापला जातो आणि प्रसिद्धीस येतो, याजमुळे त्यांस असे भय प्राप्त होते की, माझी अपकीर्ती सर्व जगात होईल; आणि माझे स्नेही, मित्र परदेशात आहेत, त्यांसही कळेल. आणि माझे मागे ही लिहिलेली गोष्ट राहून अपकीर्ती मागे राहील. या भयाने लोक अपराध किंवा वाईट कामे करीत नाहीत आणि जरी अद्यापि ज्याची अपकीर्ती छापणारांनी लिहिली त्याने स्वतः मूर्खपणाने वाईट कामे सोडली नाहीत; तत्रापि त्याची फजिती होऊन त्याचे वंशातले पुढचे लोक आणि इतर लोक हे सावध होतात की, अमक्याने वाईट काम केले, त्याची अपकीर्ती जहाली. तेव्हा आपण केले तर तसेच होईल, त्यामुळे ते करीत नाहीत. एणेकरून छापखाना हे लोकांस मोठे बंधारण आहे. तसेच लोकही शहाणे होतात व त्यांस कोठे काय होते, हे कळते आणि सावध राहतात.
 जर छापखाना व डाक हिंदुस्थानात असती, तर परके लोक हिंदुस्थानात सुलभपणे आले, तसे आले नसते; परंतु या लोकांचे दुर्भाग्य, तेणेकरून छापखान्याचा फायदा त्यांस कळत नाही. जे ब्राह्मण प्राचीन समजुतीचे अद्यापि पुष्कळ आहेत, त्यांस असे वाटते की, छापखान्याचा काय उपयोग आहे ? बुकात पैका घालून काय फळ ? पृथ्वीवरच्या बातम्या ठेवून आम्हास काय करावयाचे आहे ? आपले घरातले पण पहावे. मोठ्या गोष्टी कशास पाहिजेत ? अशा ते रांडगोष्टी सांगतात.
 असे हे हिंदू लोक शिथिल आणि मूर्ख, म्हणून या दशेस आले. जर पेशव्यांचे अमलांत इंग्रज मोठे आहेत व त्यांची काय अवस्था आहे, हे लोकांस कळले असते, तरा राज्य न घालवते; परंतु पोटार्थी भट, त्यांनी गोड खाण्याशिवाय दुसरे काही मनात आणलेच नाही. गोड खाण्यास मिळाले, म्हणजे सर्व ब्राह्मण एकत्र डोंगळ्याप्रमाणे जमतात व मग त्याचे अवधान फार लागते. कोठे मुक्तद्वार किंवा ब्राह्मण- संतर्पण किंवा उत्साह आहे, अशी वार्ता आली की, ब्राह्मण मोठ्या हौसेने तेथे जमतात. दुसरी काही राज्यकारभाराची किंवा ज्ञानवृद्धीसाठी सभा असेल, तर हालणार नाहीत ? तात्पर्य, या जातीची नजर जेवण आणि दक्षणा याहून पलीकडे जात नाही व याहून दुसरा मोठा कारभार पृथ्वीवर आहे, असे या जातीस वाटत नाही.
 एकास लाथ मारली तर दुसरा 'का' म्हणावयाचा नाही. इतके तर हे भित्रे, रांड्ये व निर्बल आहेत. यांचमध्ये साहस, धैर्य आणि खरेपणा ही प्रायशः नाहीत. साहस म्हणजे मोठे कार्य डोकीवर घेणे, धैर्य म्हणजे आपल्यावर किंवा दुसऱ्यावर जुलूम कोणी करील, तर न सोसणे आणि खरेपणा म्हणजे लबाडीचे व्यापारात न शिरणे. यांपैकी एकही गुण याजमध्ये नाही. जनावरासारखे हे मूर्ख आहेत, जशा शेतात पुष्कळ चिमण्या खावयास जमतात व त्यांस एक काठी उगारली, म्हणजे त्या भुरकन् उडून जातात, तसे हे ब्राह्मण लोक आहेत. यांची पंगत करावयास मात्र चांगली; परंतु दुसरा काही उपयोग नाही आणि सांप्रत पहा की, पेशव्यांचे राज्य गेले, हे वाईट जहाले, असे जे ब्राह्मण लोक म्हणतात, ते एवढ्याच कारणाने म्हणतात की, त्यांस खावयास मिळत नाही. ब्राहण लोक इतके दुर्बुद्धी आहेत की, त्यांस खावयास द्या व मग काही करा, चिंता नाही. पोटास घालावे आणि पायपोस मारावे, त्यांस लज्जा वाटणार नाही. आणि त्यांची म्हण अशी आहे की, पोटावर मारू नका, पाठीवर मारा, म्हणजे जेवावयास घाला मग काही करा. याप्रमाणे फक्त जेवणाची मात्र काळजी. पोटाचा विचार ब्राह्मण लोकांस पहिल्याने आहे; मग पाठीमागून सर्व. परंतु बहुधा तेवढा बंदोबस्त असला, म्हणजे ते उजवे किंवा डावे बाजूस पहावयाचे नाहीत, हे आम्ही लिहिलेच आहे.
 याविषयी कोणास खोटे वाटेल तर त्याने स्वदेशीय राजधानीतील लोकांकडे पहावे आणि त्यांस पुसावे की, 'इंग्रज हिंदुस्थानात कोठे कोठे राज्य करतात ?' ते म्हणतील की, 'छी ! इंग्रज कोठे आहेत ? आमचे संस्थानात तो एक ताम्रमुखी मात्र असतो.' याचप्रमाणे पेशवाईत अवस्था होती. पुण्यात वकील होता, तेवढी गोष्ट मात्र दरबारातील वागणारे यास माहीत. इतर लोकांस तेही माहीत नव्हते कोणी सुखी असेल तर त्यांनी प्रवास करावा असे नाही. परंतु ग्रंथद्वारे किंवा वर्तमानपत्रद्वारे त्यांस वर्तमान तरी माहीत असावे !
 एखादे गांवडे कुलकर्ण्यास पुसा की, कलेक्टरसाहेब यांची नेमणूक कोण करितो, त्यांस पगार काय आणि गवरनरसाहेब कोण आहेत व कोठून आले ? तर त्यांच्याने काही सांगवणार नाही. ज्या शहरामध्ये काही गोष्ट आहे तीच गोष्ट त्या शहरात ठाऊक नसते. पुण्यामध्ये शाळा आहे, लायब्ररी आहे व छापखाना आहे. हीच गोष्ट पाचशे रुपये महिना पगार किंवा पेनशन खाणारास पुसा म्हणजे ठाऊक नाही असे तो म्हणेल. कारण की, हिंदू लोक शोध करण्यात फार आळशी आहेत. कोणी कोणी शोध करणारे आहेत. परंतु लोकांच्या घरच्या गोष्टी व चहाड्या एवढे मात्र ते मनास आणतात. दुसऱ्या उपयोगी गोष्टी काही मनास आणीत नाहीत. व थोर आहेत ते जेवतात आणि निजतात. अशी त्यांची अवस्था आहे.
 मागे सांगतात की, दिल्लीचे बादशहाने, मिरची तिखट आहे किंवा कसे हे पुसले होते; व सूर्य हा पदार्थ काय आहे, हा प्रश्न पुसला होता. तद्वत् हल्लींही ऐकण्यात आहे की, कर्नाटकातील सरदारांपैकी एकाने पोलिटिकल एजंटास विचारले की, तुम्ही समुद्र पाहिला आहे किंवा नाही ? व आणखी एक वेळ असा प्रश्न केला की, 'कृष्णातीरी घाट आहे तो पाण्याने वहात का नाही ?' तेव्हा एक हुषार जवळ होता, त्याने सांगितले की, 'महाराज, पाण्याने घाट वाहून जातो, परंतु आमच्याजवळ हत्ती आहेत, त्याजकडून पुन्हा ओढून आणून जाग्यावर ठेवतो.' तेव्हा त्या मूर्खाची समजूत पडली. अशा किती एक अज्ञानपणाच्या गोष्टी ऐकण्यात आहेत. त्याचे वर्णन करून उपयोग काय? परंतु असे आहे तरी ज्यास खावयास मिळते त्यांस जरी फाशी द्यावयास काढले तरी वाचणे किंवा ज्ञान शिकणे, ही गोट त्याच्याने व्हावयाची नाही.
 या लोकांच्या इतक्या समजुती आकुंचित जहाल्या आहेत की, वर्तमानकाळचा विचार करतात, उद्याची काळजी करीत नाहीत. लाच खाल्ला म्हणून एकाची धिंड निघाली, काय चिंता आहे ? आपण मिळेल तोपर्यंत पैसा खाऊ; ज्या दिवशी काळ फिरेल त्या दिवशी पहातच आहोत. याप्रमाणे काळास दूषण देतात; पण आपण कर्मे कोणती करतो, याचा विचार करीत नाहीत. आणि इतके निर्लज्जपणास दुसरे कारण असे आहे की लोक शहाणे नाहीत. कुळंबी ते अडाणी कुळंबी; व ब्राह्मण ते शतपट मूर्ख आहेत. तेव्हा जो वाईट काम करतो, त्यांस असे वाटत नाही की, मला हे लोक वाईट म्हणतील. आणि वास्तविक पाहिले तर जे लोक वाईट कामे करतात, त्यांची निंदा पाठीमागे लोक पुष्कळ करतात; परंतु भित्रे आहेत, त्याजमुळे त्यांचे तोंडावर होत नाही. व त्याचा त्याग करून सर्वांनी हलका मानणे व त्याचा लोकांत हरतऱ्हेने पाणउतारा करणे, हे धैर्य लोकांस नाही.
 जी गोष्ट घडते ती सहज घडते; परंतु प्रयत्नपूर्वक काही घडत नाही. वाईटास वाईट म्हणावे व शहाण्यास शहाणे म्हणावे, हे शहाणपण लोकांस नसल्यामुळे लोकही पाहिजे तशी वर्तणूक करतात. खोटे बोलणे व लबाडी करणे हे तर त्यांचे अंगी पडले आहे. त्याचा विधिनिषेध ते जाणतच नाहीत. लबाडी ही लज्जेची गोष्ट, ही लोकांमध्ये समजूत नाही; असे हे लोक मूर्ख आहेत. जर त्यांस काही गोष्ट सांगितली तर तिचा अर्थ कळत नाही व न्याय करता येत नाही. असे लोक अज्ञानात आहेत.

♦ ♦


भटांनी लावून दिलेले वेड

पत्र नंबर ६१ : २० मे १८४९

 हिंदू लोक हल्ली आहेत, त्यापेक्षा चांगले होण्यास त्यांनी बहुतेक आपली मूर्ख मते सोडली पाहिजेत. प्रथम ही मूर्ख मते उत्पन्न कशी झाली म्हणाल, तर त्याचे कारण लिहितो.
 प्राचीन काळी हिंदू लोकांनी विद्या बहुत केल्या. पुढे असे झाले की, ब्राह्मण लोकांनी नवीन विद्या अधिक अधिक शोधावयाचा सोडून ते काव्ये करू लागले आणि वेद पाठ करू लागले. अर्थ सोडून दिला आणि धर्मशास्त्रात असे आहे की, आपला कुलाचार रक्षावा. त्याप्रमाणे जे मागे बापाने केले तेच मुलाने करावे, अशी समजूत पडली आणि जो जो हे मूर्ख होत चालले तो तो मागले लोक त्यांस देवासारखे दिसू लागले.
 निरक्षर भट म्हणू लागले की, व्यास अवतारी होता व त्यांनी गणिताचे ग्रंथ केले. ते देव होते, असे म्हणून मागले ग्रंथ मात्र वाचावे. पुढे काही करू नये, असे झाले. तेव्हा अज्ञान फार वाढले व त्यांस साधन मुख्य पुराणे आणि माहात्म्ये लिहावयाची, हाच काही दिवसपर्यंत पंडितांचा रोजगार होता. तेव्हा त्यांनी मनास येईल ते लिहिले. कोणी कावेरी माहात्म्य, कोणी करवीरमाहात्म्य, कोणी शालिवाहनचरित्र, कोणी नाशिक माहात्म्य, कोणी अग्निपुराण, कोणी गणपतिपुराण अशी लिहिली. प्रत्येकात त्यांचा हेतू इतकाच होता की, एखाद्या देवाचे वर्णन करून ईश्वर त्यात आणून ठेवून ब्राह्मणास पैसा मिळण्याची तजवीज पहावी.
 तशीच व्रतमाहात्म्ये. कोणी म्हणाला सोमवारी उपास करावा, कोणी म्हणाला मंगळवारी, कोणी शनिवारी. दर एकाची कथा व त्याची देवता आणि त्याचप्रमाणे अमक्याने केले आणि त्याचे अमुक कार्य झाले व तसे जो करील, त्याचे तसेच होईल, म्हणून लिहिले; पण हे सर्व कवीचे लाघव आणि ब्राह्मणाचे कार्य करावयाची तजवीज आहे, असे उघड दिसते व याचा खोटेपणा उघड दिसतो. वर्षात तीनशे साठ दिवस व त्याहून अधिक व्रते आहेत. तसेच दर एक पुराणात दर एक देवाचे वर्णन, त्याचे नाव, अमके दैत्य त्याने मारले तो ईश्वर, त्यांस भजावे, इतरास भजले तर नरकाचे साधन, याप्रमाणे लागलाच शेरा, असे दर एकात आहे. दर एकात सृष्टीची उत्पत्ती, देवाचे चरित्र व भविष्ये याप्रमाणे सर्व तयारी केली आहे. तेव्हा कोणते देवास भजावे, कोणती व्रते करावी किंवा तीनशे साठही दिवस व्रते करावी ?
 धर्मशास्त्र पाहिले तर तो पर्याय काही वेगळाच आहे. वेद पाहिला तर त्यात काही वेगळेच आहे. वेदात अवतार आणि नाना प्रकारच्या देवता आणि व्रते हे काही नाही. फक्त होमाशी कारण आहे. याचा मेध, त्याचा मेध हे सर्व त्यात आहे. तेव्हा वेदशास्त्र व पुराणे यांचा धर्म पाहिला, तर अगदी वेगवेगळा दिसतो. पुराणात नित्य कर्म पाहिले, तर सगळा एक दिवस करावयास पुरणार नाही, इतके धर्म त्यात आहेत; पण त्यात काही नीती आहे, असेही नाही. कासोटा असा घालावा, गंध असे लावावे. शौचास अमुक कोस जावे, तोंड असे धुवावे, हेच फार आहे. याप्रमाणे नेम करणारास काय वाटले असेल, ते त्याचे त्यांसच ठाऊक. बरे, असे.
 याचा आजपर्यंत कोणीच विचार केला नाही. अलीकडे भट वगैरे झाले, यांनी काही ग्रंथ केले आहेत, पण ते त्याहून अधिक. गोपीनाथ भटजींनी अमुक भट्टी केली, गणेश भटांनी अमुक भट्टी केली. अशा शेकडो भट्टया केल्या आहेत, परंतु त्यात काय आहे ? संस्कृताचा अर्थ फार लोकांस कळत नाही, परंतु जर त्यांचा अर्थ कळावयाजोगा असता, तर मला वाटते की, लोक मागचे ते ग्रंथ समुद्रात नेऊन टाकते; परंतु ते भ्रमात आहेत. बरे, भरली मूठ सव्वा लक्षाची आहे. तेच बरे. श्राद्ध करावयाची कल्पना लिहावयास पन्नास पत्रे लागली आहेत. तसेच हर एक संस्काराच्या रीती फार मूर्खपणाच्या आहेत.
 लग्नाचा, उष्टावणाचा, देवपूजेचा पद्धती आणि कोणते कर्म असे नाही की त्याविषयी ग्रंथ नाही. शौच्यविधीवरदेखील एक ग्रंथ आहे. त्यात मनुष्यांनी शौच्य कसा करावा, हेच लिहिले आहे. वास्तविक पहा बरे, याचा काही उपयोग आहे काय ? कशाला भट या संस्काराच्या कंठाळभर पोथ्या बाळगतात ? यात काय आहे ? याचा काय उपयोग ? लोकांचे सुख व ज्ञान वाढवावयाची त्यात एक देखील गोष्ट नाही. मूर्खपणा वाढवावयाच्या गोष्टी आहेत. त्या ग्रंथांनी वेड लावले एवढे मात्र झाले.
 अज्ञान्यास अजरामर करण्याकरिता या पोथ्या लिहिल्या आहेत, असे मला वाटते व त्यांची फजिती होऊ नये, म्हणून त्या गुप्त ठेवितात. कोणी सोडू नयेत व कोणी भलत्यानेच वाचू नयेत म्हणतात, याचे कारण हेच. जर त्यात खरे ज्ञान असते, तर कोणीही वाचले तरी चिंता काय ? परंतु ग्रंथ लिहिणारांची खात्री होती की हे गुप्त ठेवले, तर त्यांचे माहात्म्य राहील. हे भुसाचे लाडू आहेत. हे त्यांस माहीत होते. याप्रमाणे हे भट वेडे झाले आहेत. मनुष्य काही उद्योग करील किंवा विचार करील, तर त्यांस त्या भटाचे संगतीने वेळ सापडावयाचा नाही.
 हल्ली कर्नाटकांतील एक सरदार याजकडे पाहिले; म्हणजे समजते की, त्याचा वेळ हातपाय धुण्यात जातो. दिवसातून दोनशे वेळ पाय धुतो. पाचशे वेळ चूळ भरतो ! यास हे काय वेड किंवा शहाणपण आहे ?
 तसेच बाजीरावाकडे पहा. हा पुरुष मराठ्यांचे राज्यास बुडविण्यास कारण झाला. असे का झाले, याविषयी विचार केला तर इतकेच दिसते की, यास जन्मापासून नाना फडणिसाने कोपरगावी भटाचे शाळेत ठेवला होता. म्हणून मोठेपणी केवळ भटच निपजला. याच्या राजकीय गुणाचे अंकुर जळून गेले. याप्रमाणे पूर्वीचे पेशवे भटाचे शाळेत नव्हते. कोणी असे म्हणतात की, राज्यास अयोग्य व्हावा, म्हणून नाना फडणिसाने त्यांस बुद्धया भट केला; परंतु तोच राज्यावर आला, हे देशाचे प्रारब्ध. अस्तु. त्यांस वेड लागले. त्याने राज्य केव्हा करावे, कारभार केव्हा करावा आणि हे नित्य कर्म केव्हा करावे, हे जाणले नाही.
 आणि या कर्माचा फायदा काय ? जोपर्यंत निर्मळ वाटे, तोपर्यंत कोणीही हात धुतोच आहे. त्यांस अमुक वेळ हात धू, म्हणून सांगावयास कशाला पाहिजे ? परंतु इतक्या मूर्खपणाच्या गोष्टीस ब्राह्मण मात्र मान देतात. आणि कोणी उपास, कोणी व्रते, कोणी अनुष्ठान, असे सगळा दिवसभर करतात. ज्याजवळ पैसा त्यांस भट घेरतात आणि हा उपदेश करतात; आणि पुराणिकबाबास घेरतात व वेड लावतात. कोणी सांगतो, आवळीचे झाडाखाली जावे, पूजा शतपत्रे : २२७

करावी, कापुसाच्या वाती जाळाव्या. त्याप्रमाणे अज्ञान बायका करतात. हे वेड त्यांस भट लावितात.
 हे सर्व यांनी सोडून दिल्याखेरीज याची बरी गत मला दिसत नाही. मग ईश्वराची इच्छा.

♦ ♦


ब्राह्मणांची शिक्षणपद्धती

पत्र नंबर ६२ : ३ जून १८४९

 सांप्रत ब्राह्मण लोक हे काही उपयोगी नाहीतसे झाले आहेत. याचे कारण त्यांस सरकारी काम सांगितले, तर लाच खातात; लोकांस उपद्रव करतात व आपले जातीचा अभिमान धरतात. येणेकरून महार, चांभार इत्यादि जातीस त्यांचे पुढे येण्यास देखील योग्यता नाही, असे म्हणतात.
 तस्मात् यांनी भिक्षा मागून वनात रहावे, हेच काम यास चांगले योजिले होते; परंतु ते सोडून या गृहस्थीपणात, सरदारीत व कारकुनापणात यास कोणी बोलाविले बरे ? यांचे वाचून अडले होते काय ? ते आपले संतोषाने दुसरे व्यापार करू लागले. तेव्हा आता त्यांस हे योग्य आहे की, त्यांनी आपल्यास व दुसऱ्यास सारखे मानावे, हे खरे. ब्राह्मण लोक अनिवार झाले आहेत व मूर्ख आहेत. याचे कारण त्यांस सुशिक्षा नाही. ब्राह्मणाचा मुलगा सातआठ वर्षांचा झाला, म्हणजे त्यांची मुंज करतात. नंतर भट व पंतोजी यांचे स्वाधीन होतो. आणि त्यांस ज्ञान, उपदेश किंवा कला-कौशल्य-विद्या हे काही एक शिकवीत नाहीत, ईश्वराचे भय व आपला वास्तविक धर्म त्याचे मनात कशाने येईल ?
 श्रीमंताचे पोर असले तर भट त्यांस वेद शिकवितात व तो फक्त पाठ करवितात. मग तो मुलगा जसा त्याचा गुरू टोणपा, तसा त्याचा शिष्य टोणपा होतो. बरे, ब्राह्मणास ज्या रीतीने वेद शिकवितात, त्याचा काही तरी उपयोग आहे? फक्त अक्षरे तोंडाने उरात रक्त पडे तोपर्यंत घोकून पाठ करतात. त्यापेक्षा दगड फोडावयाची मजुरी का सांगत नाहीत ? अक्षर मराठी झाले, म्हणजे मुलगा शहाणा झाला. बाप म्हणतो माझा मुलगा रुद्र पाठ म्हणतो, पवमान पाठ म्हणतो. आणि भटाच्या तोंडच्या मूर्खपणाच्या गोष्टी ऐकतो. तो असा दृढमूर्ख होतो की, त्याचे मनात जे येते, ते मोठे दृढ होते; कदापि निघत नाही.
 त्यास वाटते पृथ्वी शेषावर आहे. ग्रहणात राहू चंद्रास खातो. हिंदुस्थानाएवढीच पृथ्वी. पलीकडे गतीच नाही. ब्राह्मण सर्व जगात श्रेष्ठ, भूदेव. जितक्या विद्या आहेत, त्या सर्व शास्त्रात आणि पुराणात आहेत. त्याखेरीज काही नाही. वेदाचा अर्थ करू नये. पुराण, शास्त्र ब्राह्मणाखेरीज कोणी वाचू नये. परदेशास गेले, तर भ्रष्ट होतो. अशा नाना प्रकारच्या समजुती त्यांच्या पडून ते शतमूर्ख होतात.
 अशी थोर श्रीमंतांची मुले पुण्यात मला शेकडो आढळतात व मोठाले वयोवृद्ध कित्येक आहेत, त्यांची तर संख्याच नाही. वर्तमानपत्रे व बुके या द्वाराने ज्ञान मिळविणे, हे तर त्यांचे कुळाचे शत्रू वाचणे व लिहिणे त्यांचे बापाचे वैरी, असे लोक आहेत. यास ईश्वर कोणत्या रीतीने ताळ्यावर आणील ते आणो. ईश्वराने ब्राह्मणांचा गर्व हरण करावयास दरिद्रांजन योजिले आहे. तरी त्यांचे डोळे अजून उघडत नाहीत. शास्त्र पुराणे घेऊन बसतात. पुराणात मूर्खपणा भरला आहे व ती फक्त ब्राह्मणास लाभ होण्याकरिता केली आहेत. यास्तव मला वाटते की; ब्राह्मणांची मुंज झाली, म्हणजे त्यांस विद्या पढवावी. काही चांगले ग्रंथ नवीन पद्धतीचे करून त्यात नीती व ईश्वराचा भजनाचा गोष्टी घालून व इतर भूगोल, खगोल इत्यादि वास्तविक आहेत, तशा गोष्टी लिहून ते ग्रंथ पढवीत जावे. म्हणजे मूर्खपणा जाऊन तो मुलगा चांगला तयार होईल. असे ग्रंथ कोणी तरी केले पाहिजेत.
 नाही तर लोक सांप्रत काळचा शिक्षेचे रीतीने फारच मूर्ख होतील. शास्त्री, पंडित आणि त्यांस होय होय म्हणणारे गृहस्थ, हे काय बोलतात ते देखील त्यांस कळत नाही. कोणी सांगतो की, सप्त समुद्र आहेत. कोणी म्हणतो मेरु मध्ये आहे. कोणी म्हणतो, सात समुद्र रथाचा चाकांनी पाडले. कोणी म्हणतो अगस्ति मुतला. याचे तोंडास कोणी हात लावावा ? असे बोलणे ऐकून मला वाटते की, हे इस्पितळातले वेडे आहेत काय ? कोणी म्हणतो, हे इंग्रज जलचर (पाण्यातले राहणारे) आहेत. कोणी म्हणतो, ते वानर आहेत. कोणी म्हणतो त्यांस रामाचा वर आहे. तेव्हा माझे मनात येते की, तुम्ही बोलता हे डुकर आहा !
 शेकडो लोक संभावित, सरकारचे चाकर, मोठे कामावर आहेत, पण त्यांस शपथ जर घातली की, तुम्ही आपले कामाशिवाय कधी काही ग्रंथ किंवा काही वाचले होते काय ? तर ते गंगाजल हातात घेऊन सांगतील की, नाही. असे अक्षरशत्रू आहेत. या लोकांस वाचणे ठाऊक नाही. पाठ करणे ठाऊक आहे. 'प्रातःस्मरामि' पाठ करतात. देवपूजा पाठ करतात. भट तर दशग्रंथ पाठ करतात व कित्येक मूर्ख 'जटापाठी' आहेत, म्हणजे मागेपुढे, उलटीसुलटी अक्षरे पाठ करतात. याचा उपयोग काय ?
 पण या ब्राह्मणांचा केवढा मान लोक करतात ? घनपाठी बुवांस शालजोडी द्या, रुपये द्या आणि मूर्खपणा वाढवा. कित्येक जुन्या ठशाचे लोक शंख करतात की, वेदविद्या बुडाली. पण महाराज, ही विद्या हवी कुणाला ? पाठ करावयाची मजुरी कशास ? अर्थासहित दोन अध्याय का म्हणा ना ? त्यातील ज्ञान समजून घ्या. म्हणजे दोन अध्याय अध्ययन घनपाठी टोणप्यापेक्षा बरे. पाठ करावयाची ही विद्या कोणत्याही देशात नाही. ,क एक अक्षर मागे-पुढे, उलटे-सुलटे पाठ केले, म्हणजे काही दूध निघते की काय ? सार्थ वेद म्हणावा. मग तो किती का होईना ? दशग्रंथी म्हणून मिरवतात कशाला ? हे तर मला बैल असे वाटतात. याचकरिता मी प्रार्थना करतो की, हा मूर्खपणा सोडून वाटेवर यावे.

♦ ♦


अर्थावाचून पाठ करणे

पत्र नंबर ६३ : १० जून १८४९

 मला वाटते की, ब्राह्मण लोकांनी आता अर्थावर चित्त द्यावे. केवळ पाठ म्हणणे यात काही फळ नाही. पाठ म्हणावे, अशी आज्ञा शास्त्रात आहे, तिचा अर्थ तसा घेऊ नये. ते उगीच लोकांची भक्ती बसण्याकरिता लिहिले आहे. त्यात काही उपयोग किंवा वास्तविकपणा नाही. हे त्यांनी मनात आणावे. ब्राह्मण लोक मूर्ख, म्हणून अर्थाचा अनर्थ करतात. खरा अर्थ समजत नाहीत. जे लिहिले आहे, तसेच तर्क केल्यावाचून भलतेच समजतात. याजमुळे शेकडो गृहस्थ रोज गीता, विष्णुसहस्रनाम वाचतात. हा मूर्खपणा आहे की नाही बरे ? मला वाटते की, असे फक्त पाठ करणारे यांस काही कळत नाही आणि ब्राह्मण लोक सरासरी कामावर नेमले, तर मग त्यांचे ऐश्वर्यानुरूप स्नानसंध्या वाढते. ती कोणती म्हणाल तर एकादष्णी म्हणजे पाणी देवावर ओतावे, तुळशीची झाडे लावावी. तुळशीसहस्रनामे इत्यादिक पूजा वाढवून वेळ खर्च करावा व अज्ञान वाढवावे. कोणाचे मनात ईश्वराविषयी काही नसते. जितके ब्राह्मण हल्ली आहेत, तितक्यांस जर देव कसा आहे, वगैरे ईश्वराविषयी कोणी एक प्रश्न विचारला, तर त्याच्याने उत्तर देववणार नाही. व मनुष्याचा धर्म काय, हेही त्यांस कळत नाही. वास्तविक पाहिले तर गृहस्थ व भट हे उभयता जितका वेळ ज्ञान मिळावयास पाहिजे, त्याचे चौपट खर्च करतात. पण उपड्या घागरीवर पाणी होते. त्यांचे आयुष्य व्यर्थ होऊन त्यांस स्वता व इतरांस उपयोग होत नाही. अर्थाचे अनर्थ बोलत बसतात. ब्राह्मण लोक पूर्वी सर्व जातीमध्ये प्रमुख होते खरे, परंतु आता तर मला नीच वाटतात. कारण की, हलके जातीचे लोक, काही सांगितले तर ऐकतात व त्यांची अंतःकरणे चांगली गोष्ट ग्रहण करण्यास पात्र असतात; परंतु ब्राह्मणांस गर्व फार. त्यातील प्रत्येकास असे वाटते की थोर काय ते आपण. सर्वांनी आपली पूजा करावी. याजमुळे त्यांस काही सांगितले, तर ते ऐकत नाहीत, पिसाळलेले आहेत. एका अंगाने दरिद्र व दुसऱ्या अंगाने त्यांचा गर्व, अभिमान व अज्ञान येणेकरून ते पूर्ण झाले. त्यांस असे वाटते की, ब्राह्मणांच्या महत्त्वाच्या गोष्टी पुराणात लिहिल्या आहेत, त्या अक्षरशः खऱ्या आहेत. आणखी असे समजतात की, शेवटी ब्राह्मणांचा जन्म होतो. नंतर तेथे संन्यास घेऊन मोक्षास जातो.
 परंतु हे लिहिणे आम्ही किमपि ऐकत नाही. हे फक्त ब्राह्मणांचे महत्त्वाकरिता लिहिले आहे. ब्राह्मण हे मोक्षास पात्र व इतर लोक नाहीत, असे म्हणण्यास ब्राह्मणांमध्ये आता कोणता गुण आहे ? संन्यासी चोऱ्या करतात, ब्राह्मण भडवेपणा, दरवडे इत्यादिक अपराधास अनुसरले आहेत. त्यांस मोक्ष कसा होईल ? हे मत केवळ खोटे आहे. अन्य जातीचे अनेक साधू झाले, ते दुर्गतीस गेले, असे कोण म्हणेल ? जुने काळचे लोकांस दुसरे देशचे लोकांचे वर्तमान काही ठाऊक नव्हते, म्हणून इतके ब्राह्मणांचे महत्त्व लिहिले आहे. इंग्रज लोक हेही असेच मत बाळगतात. ते म्हणतात की, ख्रिस्तीयनाखेरीज कोणी मुक्तीस जात नाही. म्हणजे सर्व हिंदू नरकास पात्र आहेत, असेच मुसलमान म्हणतात.
 तस्मात् हा सर्व घोटाळा आहे. यात काही हशील नाही. ज्याचे तो आपले वर्णन करितो. याप्रमाणे ब्राह्मणांचे थोरपण आहे; परंतु ते खेरीज करून लोक असे मूर्ख आहेत की, त्यांस अर्थदेखील करता येत नाही ! पुराणे म्हणजे केवळ काव्ये आहेत. त्यात कोठे लिहिले आहे की, गंगा यमुनेप्रत बोलते; समुद्र यमुनेस म्हणाला; चंद्र रात्रीस म्हणाला; सूर्य अग्नीस म्हणाला; अशी पुष्कळ वाक्यं आहेत. त्याचा अर्थ हल्लीचे पुराणिक प्रत्यक्ष गंगा व यमुना देवता आहे, तीच बोलली असा करतात. आणि त्यांस आताचे लोक खरे मानतात. लोकही असे समजत नाहीत की, नद्या प्रत्यक्ष जड पदार्थ; त्यांस कवीने सजीव मानून लाघव केले आहे. तसाच चंद्र रात्रीशी कसा बोलेल ? त्यांस काही तोंड किंवा जीभ आहे काय ? परंतु खरे मानितात. जड पदार्थांचे कवीने सजीव वर्णन केले असले म्हणजे झाले. त्यांस वाटते की, या देवताच आहेत. तसाच सूर्याचा रथ लक्ष योजने चालतो, असे म्हणतात. तेही कवीचे लाघव आहे. त्याचा अर्थ पुराणिक सांगतात तसा घ्यावयाचा नाही; परंतु पुराणिक लोकांस फार वेड लावितात. व लोकही मूर्ख होऊन सर्व निर्जीव पदार्थास जिवंत मानून कोणी उमऱ्याची पूजा, कोणी ताकमेढीची पूजा, कोणी दरवाज्याची, कोणी मुसळाची, कोणी जात्याची, कोणी दिव्याची अशा पूजा करतात. यात किती मूर्खपणा आहे ? मुलांचे वाढदिवसाचे दिवशी ताकमेढीची पूजा, दसऱ्याचे दिवशी न्हावी धोकटीची पूजा करतात, त्यांस नैवेद्य दाखवितात. बरे, न्हाव्याची धोकटी किंवा ताकमेढी नैवेद्य खाईल काय ? धोकटीत कसली देवता आहे ? व ताकमेढ एक वाळलेले लाकडाचा तुकडा. त्यात देवता कोणती आहे ? लग्नामध्ये हे चमत्कार दृष्टीस पडतात. उपाध्या, मूर्ख, तो हजार ठिकाणी पूजा मांडतो. मडक्याची पूजा, घागरीची पूजा आणि तशात हे सर्व संस्कृत भाषेने करतात, म्हणून त्याचा अर्थ कोणास कळत नाही. परंतु आत पाहिले, तर शुद्ध वेड आहे.
 मी गर्भादानाचा विचार थोडासा वाचून पाहिला आहे. त्याजवरून मला वाटते की, त्यातील प्रकरणी भटासमोर निर्लज्जपणाने जी कर्मे करावयास सांगितली आहेत, ती जर मराठी भाषेत बोलतील तर यजमान उपाध्यास जोडे मारून हाकून देईल व म्हणेल की, माझ्या बायकोची इतकी फजिती चौघांमध्ये करावयास मी काय तुमचे केले आहे ? असे त्यात आहे. नाना प्रकारची वचने आणि येथे हात लावा, तेथे हात लावा इत्यादि. ते मला बोलण्यात लाज वाटती. या प्रकारचे संस्कार करणारे वेडे होते, यात संशय नाही आणि लोकांनी कसे ग्रहण केले असेल ते असो. जर या गोष्टी उघड्या होतील, तर खचित रद्द होतील. भटांनी अर्थ करावयाचे सोडिले. त्याजमुळे इतके अज्ञान वाढले आहे. नीती, ज्ञान ते काही पहात नाहीत. फक्त पोथ्या सोडून पाठ करीत बसतात आणि त्यात सर्व धर्म आहे, असे समजतात. याचमुळे नीती बुडाली, धर्म बुडाला व अज्ञान मात्र शिल्लक राहिले आहे आणि ब्राह्मणांचे हाडास भिनले आहे.

♦ ♦


भटाचा विद्येचा निरुपयोग


पत्र नंबर ७१ : १२ आगष्ट १८४९

 पूर्वी एका पत्रात सांप्रत काळचे ब्राह्मणाचे स्थितीविषयी लिहिले होते. त्याचा जबाब पुण्यातील 'ज्ञानप्रकाश' पत्रात नंबर २२ यात एका 'यथार्तवादी'ने दिला आहे.
 त्यात त्याने आमचे सहा निश्चय कबूल केले आहेत. (एक) ब्राह्मण अज्ञान; (दुसरा) अर्थ समजल्यावाचून ते जप वगैरे करतात, हे ठीक नाही; (तिसरे) देवाविषयी त्यांस काही कळत नाही; (चौथे) मनुष्यांनी कसे वागावे हे समजत नाही; (पाचवे) हल्लीचे ब्राह्मण हे कनिष्ठ जातीपेक्षा चांगले नाहीत व (सहावे) ते गर्विष्ठ फार. या निश्चयांचे त्याने उत्तर दिले आहे; परंतु त्याचे उत्तरात काही अर्थ दिसत नाही. त्याने केवल भटासारखे लिहिले आहे. शेवटी आपण म्हणतो की, हल्लीचा मूर्खपणा ब्राह्मण सोडतील तर बरे होईल ! अस्तु.
 याचा भाव पहिले उत्तरात असा आहे की, मला सर्व ब्राह्मणांची हकीकत कशी समजली? याचे प्रतिउत्तर असे आहे की, सर्व ब्राह्मणांची हकीकत समजावयास काय अवघड आहे ? ब्राह्मण अज्ञानी किती आहेत, याचे वर्णन मी किती करावे ? भटात व अतिक्षुद्रांत मला इतकेच अंतर दिसते की, एक बोलता राघू व एक न बोलता राघू, परंतु ज्ञान एकच. ब्राह्मण वेद वगैरे पाठ म्हणतात; परंतु अर्थज्ञतेविषयी उभयतांची योग्यता समान आहे. अतिशूद्र गरीब, ते आपला लहानपणा जाणतात; परंतु भट मूर्ख असून ज्ञानी समजतात व गर्व करतात, हा एक त्यामध्ये दुर्गुण अधिक आहे. हे ज्याचे मनास ठसावयास हवे असेल, त्याने वेदाच्या शाळेकडे पहावे. तेथे मुले शिकतात काय ? व देवाविषयी व आपले धर्माविषयी विचार करतात किंवा फक्त राघूसारखे पाठ करीत बसतात.
 भटांनी लोकांस किती वेडे लाविली आहेत ? व किती गैरसमजुती पाडल्या आहेत, त्याचा अंत नाही. ब्राह्मणभोजनादिक हा धर्म समजतात; परंतु निरुद्योगी माणूस भीक मागावयाचा व्यापार करतात आणि भिक्षेचा उपयोग काही करीत नाहीत; विद्या वाढवीत नाहीत; अर्थेकरून अंतःकरण पवित्र करीत नाहीत; जिव्हेचा उपयोग मनास एकीकडे ठेवून करतात. त्यांस धर्म केला असता पुण्य कशाचे आहे ? जसे पात्रावर मिठापासून भातापर्यंत वाढलेले असते, त्याचप्रमाणे मनुष्यास मनापासून इंद्रियांपर्यंत ईश्वराने वाढून दिले आहे. त्यात मन हे उत्तम भाताप्रमाणे; त्याचा धिक्कार करून लवणच जे भक्षितात, त्यांस किती मूर्ख म्हणावे ?
 देवाचे हिताचे विचारांत ब्राह्मण आजपर्यंत कधी तरी पडले आहेत काय? पडावयाचे त्यांस सामर्थ्य तरी आहे ? व योग्यता आहे ? जर या देशात पार्लमेंट झाले आणि त्यांत सर्व जातीचे लोक पाठविले, तर त्यामध्ये महारांपेक्षा भट अधिक शहाणपणाने आपले देशाचे हिताविषयी बोलतील काय ? व कोणत्याही गावात पहा की, गावचा कुळकरणी, जोशी हे ब्राह्मण असतात याचमुळे त्यांजवर कपटाच्या व खोटे कागद-पत्रांच्या वगैरे फिर्यादी होतात व वास्तविक हे लोक रयतेस बुडवितात. व साक्षीही खरी देत नाहीत. ब्राह्मण कुळकरणी यांस शिक्षा होऊन ते तुरुंगांत पडतात. व गावचे महाराची साक्ष खरी समजतात व ते अडाणी असून गावची चाकरीही नीट करतात; कुळकरण्यापेक्षा गावकऱ्यास कमी ठकवितात व दगाबाजीही कमी करतात. व हक्काची चाकरी करून हलाल खातात, तसे कुळकरणी करीत नाहीत.
 याजवरून ब्राह्मणांची योग्यता समजती. मोठे शहरात पहाल तर तुम्हास असे वाटेल की, इतके भट येथे आहेत, यांस खावयास मिळते, त्याबद्दल कोणती चाकरी करतात ? असे जर मनात आणिले, तर तुम्ही काय म्हणाल ? मला तर एक मनुष्य दाखवा की, भटांनी शाळा घालून कोणी तयार केले किंवा कोणास विद्वान केले किंवा ग्रंथ केले किंवा ज्ञान सांगितले किंवा लोक सुधारले किंवा मजुरी केली असे काही तरी मला या भटांचे व भिक्षुकांचे खाण्याचे मोबदला त्यांचा उपयोग दाखवा! चांभाराचा उपयोग मी तुम्हास सांगतो व दर एक मनुष्याचे पायात जोडे दाखवितो. तुम्ही आम्हास भटांची निशाणी दाखवा. बाजीरावाकडून भटांनी व शास्त्री यांनी भलभलतेच सांगून अनुचित कर्मे करविली. व मुसलमान लुटून आपण केसरी भात जेवले. राजास नीती काहीच सांगितली नाही. फक्त ब्राह्मणभोजन घाल म्हणून सांगितले. आणि कलियुगाचा कर्ण म्हणून त्याचे वर्णन केले. आणि बिघडवून राज्याचा व त्याचे कुळाचा सत्यानास केला. याचे कारण हे भटच आहेत.
 असे जे हे ब्राह्मण लोक, यांचे शहाणपणाचे प्रतिपादन 'यथार्थवादी' करितो. त्याने काही तरी नावासारखी करणी करावी. त्याचे बोलण्यात जर काही वास्तविक भाग असला, तर मी कबूल करीन. माझे द्वेषी कोणी आहेत, असे नाही; परंतु मी ज्याचे अज्ञान त्यांस कळविण्याकरिता झटत आहे, परंतु ते ग्रहण करण्यास ब्राह्मणांस इतके अवघड पडले आहे की, त्यांस बोध न होता निंदा वाटते. भट व शास्त्री अमुक कामास लावावयाचे उपयोगी आहेत, हे कोणी तरी सांगावे. यांस मरणाचे समयी बोलावले तर ईश्वराविषयी काही न सांगता द्रव्य हरण करतील व ते असे म्हणतील की, काही पैसा असला तर सर्व प्रायश्चित्त करा आणि आमचे हातावर उदक सोडून आम्हास द्या. म्हणजे तुम्ही देवाजवळ जाल. अशी पैसा काढावयाची तजवीज सांगतील. श्रीमंताचे घरी भट गेला, तर सर्व सांगेल आणि गरिबाचे घरी गेला, तर त्याच्याजवळ पैसा नाही, असे पाहून त्याचे मनात येईल की, हा भिकारी, यांस मोक्षास नेण्यास पैशाशिवाय मी काय सांगू ? पैसा असता तर मग काही तरी सांगितले असते. पैशाशिवाय ईश्वरप्राप्ती होत नाही. जे द्रव्यवान तेच धर्म करून देवाजवळ जातात. हे मत ब्राह्मण लोकांमध्ये चालू आहे. त्याप्रमाणे भट गरिबाजवळ मुळीच जाणार नाहीत. श्रीमंताजवळ पैसा काढावयाकरिता जमतात. अशी या भटांची वर्तणूक आहे.
 भट एखाद्याचे घरी त्याचा नातलग असला, म्हणजे यजमानाचे मनात त्यांस काही तरी पोचवावे असे असते. मग भट सांगू लागतो की, चार महिने नित्य दान करावे. रोज देवापुढे पैसा ठेवावा. नैवेद्यास रोज साकर असली पाहिजे. असे सांगून ते सर्व आपण घेतो. याप्रमाणे यजमानापासून शेंपन्नास रुपये मिळवून निर्वाह करतो. बरे, यात काही उपयोग किंवा धर्म झाला काय ? प्रत्येक गृहस्थाचे घरी भट म्हटला म्हणजे बहुधा बायकोचा भाऊ असतो. याप्रमाणे नाती असतात. मग बायकोही आपल्या भावास पैसा पोचविण्याकरिता नवऱ्यास सांगते की, पुढे चातुर्मास आला आहे; दर व्यतिपातास गोप्रदानाबद्दल दोन रुपये देत जा. मग ते आपले भावास देवविते. याप्रमाणे किती एक लोक ठकले जातात; परंतु हा व्यय काही चांगला झाला की काय ? याप्रमाणे माझे उत्तर पहिल्या कलमाचे आहे.
 आता दुसरे कलमाचा जबाब लिहिला आहे, त्याचे उत्तर. परमेश्वराचे स्मरण करतात, असे 'यथार्थवादी' म्हणतो; परंतु कोणता ब्राह्मण देवाचे स्मरण करतो ? जर कोणी मरण पावत असला किंवा श्राद्ध असले, तर ब्राह्मणाचे स्मरण करण्याची रीती अशी आहे की, वेदाचे दोनचार वर्ग मोठ्याने म्हणतात; परंतु जो मरत असतो, त्यांस किंवा जो म्हणतो, त्यांस त्यातील अर्थ काही समजत नाही. ईश्वराचे स्मरण करण्यात काही तरी ईश्वराचा विचार झाला पाहिजे. जे २४ पाठ गीतेचे किंवा विष्णुसहस्रनामाचे ३०० पाठ करतात, किंवा कोटिलिंगे सकाळपासून सारा दिवस करतात, त्याजकडून वास्तविक काही भजन झाले की, काय ? व त्यांस ईश्वराजवळ गती मिळेल की काय ? व त्यांस आपण लहान, मनुष्याची शक्ती लहान असे वाटेल की काय ? जे नित्य पाठ करतात आणि अर्थ समजत नाहीत, ते ईश्वराविषयी काय समजले ? व त्याचे अंतःकरण व मन शुद्ध कसे झाले ? कपाळाशी भट कटकट करितो, तेणेकरून त्याचे अंतःकरण बरे झाले काय ? व जे अर्थ समजत नाहीत, ते परमेश्वराचे वचनावर भरवसा ठेवून कसे चालतील? जर मुनसफास कानडी गोष्ट येत आहे, तर त्यापुढे मराठी कायदा ठेवला आणि त्याजवर जुलूम करून त्याजकडून पाठ करविला आणि त्यांस काही अर्थ त्यातील समजला नाही, तर तो मुनसफ त्या कायद्याप्रमाणे फैसल्ले करील काय ? तसेच हे जप करणारे भट वगैरे लोक ईश्वरास आपले बडबडीने प्रसन्न करतील काय ? निंदा खरी असेल, तर तो बोध म्हणावा; निंदा म्हणू नये, हे 'यथार्थहितवादीचे' मनात का येत नाही ?

♦ ♦


ब्राह्मणांचे ईश्वरी ज्ञान

पत्र नंबर ७२ : २६ आगष्ट १८४९

 मागील पत्रातील अवशेष मजकूर राहिला आहे, तो संक्षेपेकरून लिहितो.
 ब्राह्मणांस ईश्वराविषयी बहुत कळते, असे 'यथार्थवादी' म्हणतो. त्याचे उत्तर असे आहे की, अमुक बरे आणि अमुक वाईट, हे प्रथम ब्राह्मणास कळत नाही. लक्ष ब्राह्मणांची सभा असली व त्यांस एक प्रश्न केला तर उत्तर येणार नाही. फार कशास, कोणासही इतकाच प्रश्न करावा की, जर कांदा खाल्ला तर नीतीस वाईट आहे काय ? त्याचे उत्तर ब्राह्मण काय करतील ते पहा ! ईश्वराविषयी ब्राह्मणांचे एकमत नाही. कोणी तीन ईश्वर म्हणतात; बहुत ईश्वर म्हणतात; कोणी वेदास ईश्वर म्हणतात; कोणी २४ पदार्थांस ईश्वर म्हणतात; पुराणे तर सर्वांस ईश्वर म्हणतात. व व्याकरणी अक्षरास ईश्वर म्हणतात. याप्रमाणे अनेक भेद आहेत. ब्राह्मणांस ईश्वराविषयी खरे ज्ञान जर असते, तर जी हल्ली त्यामध्ये वेडे आहेत, ती नसती.
 कोणी म्हणतात, द्यावे तसे घ्यावे; किती एक म्हणतात, कष्टी फळ आणि तपी राज्य, म्हणजे तप केल्याविना ईश्वर फळ देत नाही. कोणी म्हणतात की, ईश्वराने देखील कृष्ण अवतारी लबाड्या वगैरे केल्या, अशी उदाहरणे दाखवितात. किती एक गोष्टी मी ब्राह्मणांचे तोंडून ऐकल्या आहेत व त्या अगदी वास्तविक विचारेकरून ईश्वराचे जे गुण दिसतात, त्यांस विरुद्ध आहेत. किती एक म्हणतात की, ब्राह्मणाचे मुखी पडले की, देवाचे मुखी पडले. किती एक म्हणतात, "ते मंत्रा ब्राह्मणाधीनं" तस्मात् "ब्राह्मणो मम दैवतम्." किती एक म्हणतात की, ईश्वराचे भजन ब्राह्मणाचे भजन केल्यापोटी आहे. किती एक ईश्वराची सेवा म्हणजे उपास वगैरे ब्राह्मणांकडून करवितात. किती एक म्हणतात की, ज्याच्या पुण्याचा प्रताप आहे, त्याजपुढे देवाचा उपाय नाही. कोणी म्हणतात की, जग हाच ईश्वर आहे. दुसरे म्हणतात की, आपला जीव हाच ईश्वर आहे. तिसरे म्हणतात की, विष्णू ईश्वर आहे. चौथे म्हणतात, विष्णूस आयुष्य आहे व शिव ईश्वर आहे. आणखी म्हणतात की, संन्यास घेतल्यावाचून ईश्वर मुक्ती देत नाही. इत्यादी ईश्वराविषयी वाद आहेत. याजवरून ब्राह्मणास किती कळते, हे उघड दिसते.
 भट तर अगदीच मूर्ख; परंतु शास्त्री, पंडित, पुराणिक नीति, ज्ञान व धर्म जाणत नाहीत. मोठे नीतीविरुद्ध कर्म असले, तरी ते क्षुल्लक मानतात. आणि मोठे वाईट कर्म आहे, ते चांगले म्हणतात, त्यात काही पाप नाही, असे मानतात.
 पाचवे प्रश्नाचे उत्तर देण्याची जरुरी नाही; कारण यथार्थवादीच्याने उत्तर देववले नाही. केवळ काही ल्याहावे म्हणून लिहिले आहे. सहावे. किती एक ब्राह्मण अतिशय गर्विष्ठ आहेत. मला खचित दिसते की, इतर लोक सुधारतील आणि ब्राह्मण लोक मागे राहतील; कारण त्यांस उपदेश ठीक वाटत नाही. सर्वांस तुच्छ मानून ब्राह्मण आपणास सर्वांहून श्रेष्ठ असे समजातात. जरी त्यामध्ये काही श्रेष्ठत्व नसले तरी श्रेष्ठत्व भोगावे असे वाटते. पैसा प्राप्त झाला, म्हणजे बाजीरावाने गंगाधरशास्त्री याजला मारले त्याचा दोष मानणार नाहीत. ब्राह्मण म्हणतात की, द्रव्य खर्च केल्यास सर्व दोष दूर करून देऊ. याजमुळे ब्राह्मणांसारखे नीच लोक कोणीच नाहीत. ते सर्व गुन्हेगारांस द्रव्याने पावन करतात. प्रायश्चित्त भाडेकऱ्याप्रमाणे होते. असे जर दोष जातील तर मग ईश्वराचा न्याय कोठे राहिला ? परंतु साधारण ब्राह्मण ईश्वराचा न्याय जाणत नाहीत व दुष्ट कर्माची भीती त्यांस वाटत नाही. ते म्हणतात की, काय चिंता ? कामदाराने पैसा खाल्ला तरी तो ब्राह्मणाच्या घरी पडला, असे म्हणून लुटतात. आणि त्याची कर्मे पाहिली तर अन्नछत्रे घालितात. परंतु तेथे एकटे ब्राह्मणास मात्र सोय असते. दुसरा कोणी येऊ देत नाहीत. इतका पक्षपात करतात.
 तात्पर्य ब्राह्मण लोक हल्ली दुसरा काही व्यापार करीत नाहीत. गरीब, अज्ञानी लोकांस लुटून आपला निर्वाह करतात. तेली असला म्हणजे त्यांस सांगतात, तू आपल्या घाण्याची पूजा केलीस तर तेल फार निघेल. असे म्हणून त्याजपासून चार रुपये काढतात. कुंभारास म्हणतात आव्याची पूजा केली, म्हणजे विटा चांगल्या निघतात. आणि शेतकरी कुणब्यास म्हणतात की, तुझ्या दाण्याची रास करून तिची पूजा करावी, म्हणजे बरकत येईल. याप्रमाणे लूट आणि कपट करतात. वास्तविक पाहिले, तर कुळंबी, माळी वगैरे अडाणी व नीच जातीचे लोकांस खरा धर्म व खरी नीती सांगावी आणि ढोंग व अज्ञान काढून टाकावे; परंतु ते बळेच त्यांस अज्ञानात ठेवतात. आपला चरितार्थ नीट चालावा व लोकांनी आळशांस खावयास द्यावे, इतकाच त्याचा हेतू आहे. ब्राह्मणांचा पक्ष घेतला, परंतु त्या पक्षास बळ नाही. कर्नाटकातील स्वामी व आचार्य हे दिवसास लूट करतात, व लोकांस ठकवितात. मुद्रा देत जातात आणि अज्ञानी लोक त्यांस मान्य करतात आणि आचार्यांचे व स्वामींचे ज्ञान पाहिले, तर मुद्रेने मोक्षास नेणार व पैशाने स्वर्ग दाखविणार, ही त्यांची मते किती खोटी आहेत, हे सहज समजते.

♦ ♦


धर्मव्यवहारासंबंधी खोट्या समजुती

पत्र नंबर ७३: २ सप्टेंबर १८४९

 सांप्रत हिंदू लोकांमध्ये ज्या वेड्या समजुती आहेत त्यांचे मूळ बहुतकरून हेच आहे की, पुराणे वगैरे जे ग्रंथ आहेत त्यात जे लिहिले आहे त्याचा अर्थ यथास्थित व वास्तविक रीतीने कोणी समजत नाहीत व कवीचा भाव जाणत नाहीत. अर्थाचा अनर्थ करतात. याची उदाहरणे,
 लंका सोन्याची म्हणून वर्णन केले आहे, परंतु त्याचा अर्थ इतकाच की, तेथील लोक द्रव्यवान होते. केवळ तेथील भूमी व घरेदारे सोन्याची होती हा अर्थ नव्हे. परंतु लोक अज्ञानी असल्यामुळे सोन्याचीच लंका होती असे समजतात व त्यांस सहायभूत अलीकडील काही किरकोळ कवि जे झाले, त्यांनीही खरा अर्थ काढावयाचा सोडून ते लोकांचे मताचे पोषण करीत गेले. त्यामुळे अडाणी लोकांच्या समजुती दृढ झाल्या. अमृतराय, मोरोपंत हेही आपले कवितेमध्ये लंका सोन्याची होती, असे वर्णन करतात. त्यापेक्षा हेच खरे, असे लोक म्हणतात. कोठे पुराणात असे लिहिले आहे की, कलियुगात भूमी मृत्तिकारूप आहे, तशी पूर्वी नव्हती. मागे कृतियुगी सुवर्णाची भूमी व त्रेतायुगी रुप्याची भूमी व द्वापारात ताम्रभूमी होती; परंतु याचा अर्थ इतकाच घ्यायचा की, त्या त्या काळी, कवींच्या मते लोक त्या मानाने सुखी व धनवान होते. केवळ सोन्याचीच भूमी होती असे नव्हे. सारासार विचार पहावा, तो पहात नाहीत आणि पुराणिकही वेड लावण्याजोगे अर्थ करून सांगतात. त्याजमुळे खरेखुरेच लोक वेडे झाले आहेत.
 शास्त्रात पाहिले तर ठीक आहे, व त्याचे हेतू व त्या वेळची व्यवस्था व काळ पाहून निर्णय केला पाहिजे. तेव्हा ब्राह्मण हे रानात रहात होते. त्या समयी त्यांस जोडे द्यावे असे लिहिले आहे, ते ठीक आहे; कारण की सर्व काम सोडून विद्या करण्याकरिता रानात ते जाऊन बसतात, त्याचे चालविणे आवश्य आहे. आणि असे ब्राह्मण होते त्या काळी इच्छा भोजन, गृहदान, वर्षभर दाणापाणी व अर्घ्यपादप्रक्षालन हे सर्व ठीक होते, कारण की, ब्राह्मणांमध्ये कोणास अन्न मिळत नव्हते, तेव्हा शहरचे व्यापारी, उदमी व राज्यकर्ते यांनी जर त्यांस न द्यावे, तर त्याचे कसे चालेल? परंतु ते ब्राह्मण कसे होते की, व्यासासारिखे, आणि अठरा अठरा पुराणे लिहिली. केवढा त्यांचा उद्योग म्हणावा? किती एक ग्रंथ केले! वेदाचा शोध लावून ते एकत्र जमविले! शाळा घातल्या! व ज्ञानवृद्धी केली! असो. ती ज्ञानवृद्धी बरी की वाईट, परंतु त्या काळी बरी होती. कारण त्या काळी लोक अगदी मूर्ख होते, म्हणून नाना प्रकारचे धर्म कोणीकडून ब्राह्मणांचे चालावे आणि विद्यावृद्धी सदोदित व्हावी, ही तजवीज त्यांणी केली.
 परंतु जेव्हा ब्राह्मणांस समजले की, आम्हास द्यावे हा धर्म लोकांस कळला; आणि त्यांचा हेतू सर्व लोक विसरले, हे पाहून ते रानातून उठोन गावात आले व पोथ्या बांधून ठेवू लागले. व वेद पाठ करू लागले. अर्थ टाकला व पशूसारखे झाले. परंतु आता लोकांनी पहावे की, अशा ब्राह्मण लोकांस पैसा देण्यास योग्य नाही. हे आळसाचे सागर आणि अज्ञानाचे रक्षक झाले. कारण अज्ञान टाकून त्यांचा परिणाम नाही. जर अज्ञान मोडावे तर त्यांचा पैका बुडतो. व ते उपाशी मरतात. व त्यांस सरकारची उपजीविका काही नाही. याजमुळे त्यांस हे मूर्खपण रक्षण करणे जरूर झाले. परंतु लोकांचे डोळे उघडून वास्तविक दान कोणते ते समजतील. तेव्हा भटांचा थोरपणा सहज मोडेल. परंतु बहुत लोक अद्यापि भटांचे नादी लागले आहेत. व पाठ म्हणण्याकडे द्रव्य जाते ते व्यर्थ जाते, त्याचा उपयोग होत नाही, याजकरिता विचार करून पहावा, व शास्त्रात जरी काही लिहिले असले तरी त्याचा हेतू व शास्त्र करणाराचा मानस जाणावा म्हणजे ठीक होते. केवळ शब्द घेऊ नये. म्हणजे उघड सर्व दिसू लागेल व लोक ताळ्यावर येतील.
 कोणती मूर्खपणाची गोष्ट असो, परंतु त्यात दोन पैसे जर भटास मिळण्याचे असतील तर त्यांस अनुकूल होण्यास भट आळस करीत नाहीत. व गृहस्थ बोलून चालून मूर्ख म्हणवितात. वास्तविकच आहे की, त्यांस काही समजत नाही व वाचता देखील येत नाही. मग विचार करायचे दूरच आहे. याजकरिता भट हे अगदी नाहीसे झाले पाहिजेत व गृहस्थांनी व इतर जातीचे लोकांनी भटाचा नाद सोडून द्यावा. परंतु त्यांस ज्ञान आल्याखेरीज हे होणार नाही. त्यांस काही काळ पाहिजे.
 मोठी अविचारी म्हटली म्हणजे सांप्रत भट मंडळी आहे. त्यांस काही ठाऊक नसले तरी ते होय म्हणतात. व इंग्रज लोकांचे राज्य लंकेत आहे असे म्हटले तर खोटे म्हणतात. व पुराणातील उदाहरणे दाखवून समाधान करतात. आपला गर्व सोडत नाहीत. आपल्यास पूर्वीच्या विश्वामित्र जमदग्नीच्या तुळणा देतात. याजमुळे अनाडी लोक फारच भितात. आणि भटांचा आशीर्वाद हे मोठे उत्तम नाणे समजतात व त्यांस मोल देऊन ते खरेदी करतात. जर कोणी मेला तर जसे गयावळ यांनी 'सरक भयो' म्हटल्याखेरीज मुक्ती होत नही अशी समजूत आहे, तद्वत् भटांचेही माहात्म्य आहे.
 भट जेवल्याखेरीज कोणतीही गोष्ट पुरती होत नाही. जन्म, मरण, लग्न इत्यादी सर्वांस भट पाहिजेत. व ते नसतील तर अडाणी म्हणतात की अमका मेला पण भटांच्या तोंडात घास पडला नाही. असे समजून प्रयत्न करून खर्च करतात. म्हणून ही मोठाली श्राद्धे व गयावर्जने होतात. परंतु लोकांस असे वाटत नाही की, जो मेला त्याने जे कर्म बरेवाईट केले असेल त्याप्रमाणे त्यांस ईश्वरी फळ देईल. मग त्यांस गयेचे माहात्म्य काय? गयेस मोक्ष होतो तर तेथे गेल्याने तरी सुटका नाही. तेथील गयावळ यानी मोक्षाची परवानगी दिली पाहिजे. आणि मनुष्यास ते खरेच वाटते. म्हणून गयावळाचा संतोष करावयाकरिता हजारो रुपये देतात व तेही लुटून घेण्यास कमी करीत नाहीत. परंतु कोणी असे समजत नाही की, एक माणसाचे म्हटल्याने दुसरे माणसास मुक्ती कशी होईल? व हे कोण? त्याची आमची गती एक! मग त्याचे तोंडचे म्हटल्याने काय होते? परंतु हा सर्व मूर्खपणा आहे. भटांनी सर्वांस मोह घातला आहे व अज्ञानपाशाने बांधले आहे. ते ज्ञान आल्यावाचून सुटणार नाहीत.

♦ ♦


ब्राह्मणांचा लोभ


पत्र नंबर ७५: १६ सप्टेंबर १८४९

 ब्राह्मण लोक यांची अलीकडची बुद्धी कशी आहे, याचे उदाहरणार्थ मी तुम्हास एक प्रमाण लिहून कळवितो.
 पूर्वी होळकरांनी व बाजीरावाचे बंधू अमृतराव यांनी पुणे शहर लुटून लोकांस मारिले व पीडिले. त्यात किती एक मुले व बायादेखील ठार मेल्या व किती एक बायांनी जीव दिले. याप्रमाणे द्रव्य हरण केले. लोकांस राखेचे तोबरे दिले आणि कानात आणि बेंबीत बंदुकीची दारू घालून उडविली. धुऱ्या दिल्या. तक्त्यात माणसे पिळली. तवे तापवून त्यांजवर उभी केली व तेल कढवून पोरांच्या देखील अंगावर शिंपले. इतके करण्याचा हेतू की, लोकांनी लवकर पैसा द्यावा. तेव्हा किती एक निर्धन होते, त्यांस असे केल्याने ते मरण पावले. असे नाना तऱ्हेचे अन्याय व निर्दयपणाची व्यवस्था जो राजा म्हणवीत होता, त्यानेच केली आणि असे अन्यायाचे द्रव्य चार कोटी रुपये घेऊन अमृतराव काशीस पळून गेले.
 तेव्हा तेथील ब्राह्मणांनी हा पुष्कळ द्रव्य घेऊन आला आहे, याचे हरण कसे होईल, याविषयी तजवीज योजिली. आणि त्यांस जातीत न घेण्याचा मनोरथ दर्शविला. आणि त्यांस कळविले की, तुम्ही अन्यायाने द्रव्य आणले आहे. याजकरिता तुमचे पंक्तीस भोजन कोणी करणार नाही. तेव्हा अमृतराव हा मूर्खाचा शिरोमणी होता; त्याने त्याचे भय मानिले. मग ब्राह्मणांनी सांगितले की, हे तुम्ही जे द्रव्य आणिले आहे, त्यापैकी निम्मे ब्राह्मणद्वारा धर्मादाय करावे, म्हणजे तुम्ही जातीत याल. तेव्हा त्याचे बोलणे कबूल करून त्याने मोठा धर्मादाय ब्राह्मणभोजने, अन्नछत्रे, यज्ञ व नाना प्रकारची दाने काशीस केली. मग ब्राह्मणांनी त्यांस जातीत घेतले व त्याची स्तुती करू लागले. आणि तो दुष्ट अमृतराव सर्व प्रकारे शुद्ध केला.
 आता याविषयी विचार केला, तर ब्राह्मण हे किती नीच व दुष्टाचा प्रतिपाल करणारे आहेत, हे सहज लक्षात येते; कारण की, ज्या दुष्टाने द्रव्य अन्यायाने मिळविले, तो ब्राह्मणांस द्रव्य दिल्याने शुद्ध झाला कसा? जर त्या ब्राह्मणांनी असे सांगितले असते की, हे द्रव्य ज्याचे ज्याचे आणले आहे, त्यांस व्याजासुद्धा परत पाठवावे, आणि आम्हास यातील काही एक नको, तर काही प्रायश्चित्त मात्र होते.
 परंतु हे लोभिष्ट ब्राह्मण यांस न्याय, दया नाही आणि धर्म नाही. केवळ आपल्या नफ्यावर दृष्टी ठेवून कितीही अन्यायाने कोणी द्रव्य मिळविले असले, तरी त्याची स्तुती करतात. आणि जर कोणी न्यायाने द्रव्य मिळवून त्यांस दिले नाही, तर त्याची खचित निंदा करण्यास चुकत नाहीत. म्हणतात की, अहो, या गृहस्थाकडे केवढा रोजगार? या कामावर दुसरा होता, तो केवढा खर्च करीत होता. धर्म किती? ब्राह्मणांचा सन्मान किती? किती वेळ इच्छाभोजने? किती दक्षणा देत असे? तो पुरुष दैवशाली होता. त्याचे हातून ब्राह्मणांस पोचले; परंतु हा हल्ली जो मनुष्य आहे, त्यांस काही द्रव्य मिळवता येत नाही. हा केवळ हाडकपाळी आहे. लग्न केले, मुंज केली, पण कधी सभा किंवा दोन हजार ब्राह्मण घरी जेवले, असे झाले नाही. व्यर्थ याचा जन्म आहे! मोठा अधार्मिक! असा त्याचा डांगोरा पिटीत फिरतात. याजमुळे सांप्रतचे गृहस्थ व कामदार यांस त्यांनी भ्रमात घातले आहे.
 कामदारांस असे होते की, मी अन्यायाने द्रव्य मिळवीन; परंतु यांची तोंडे बंद करीन तर बरे. नाही तर मी चौघांत चांगला दिसणार नाही. इतके दिवस दक्षिणेत इंग्रजांचे राज्य आहे. त्यांपैकी जे कामदार झाले, त्यात बाबा भिडा, ठाण्याचा प्रिन्सिपल सदर अमीन हा लाच खात नसे, ही गोष्ट प्रसिद्ध आहे. परंतु सर्व ब्राह्मण त्याची निंदा करतात. त्याचे गुण पहात नाहीत. आणि तो जेवावयास घालीत नव्हता, हा द्वेष करून त्याविषयी वाईट बोलतात.
 तस्मात् भट लोक जे आहेत, हे केवळ भाडेकरी; परंतु मजुरासारखे नव्हत. मजुरदार मजुरी करून उगेच राहतात; परंतु हे मजुरी करण्यात लोकांची नीती बिघडवितात. आणि त्यामध्ये अज्ञान वाढवून दुर्गुणवृद्धी मनापासून करतात. त्यातील मुख्य समजुती अशा आहेत की, सर्व दानधर्म ब्राह्मणद्वारा. ब्राह्मणाखेरीज पैसा दिला, तर तो धर्म नव्हे. आणि भटांचा युक्ती तरी किती आहेत? त्या अशा की, पिंपळाचा पार बांधावा, अशी आज्ञा शास्त्रात आहे; परंतु पार कोणी बांधला तर ब्राह्मणाकडून मुंज करवावी लागते. म्हणजे पाराइतके द्रव्य त्यांस मिळते. याप्रमाणे सर्व ठिकाणी ब्राह्मण द्रव्यहरण करण्यात हुषार.
 घर बांधिले तर ब्राह्मण पाहिजे. मंडप घातला तरी देखील तो पाहिजे. लिहावयास आरंभ केला तर भट पाहिजे. सर्व प्रकरणांत लहानथोरांस भटाशिवाय होत नाही, अशी समजूत लोकांची पाडून त्यांस असे दृढ केले आहेत की जर इतर जातींचा मनुष्य मरत असला, तर कोणा गृहस्थास दया येत नाही. पण भटांची सहस्रभोजने करतात. कारण त्या गृहस्थास असे वाटते की, यात लोकांस व इतर कामास भटाखेरीज जो पैसा जाईल तो व्यर्थ. त्याचे फळ ईश्वर देणार नाही. याजकरिता सांप्रतचे गृहस्थांची व्यवस्था अशी आहे की, ते पाहिजेत तशी कर्मे करून द्रव्य मिळवितात. व त्याचे बहुधा दोन हिस्से करतात. एक घरात राहतो व दुसरा भटाकडे जातो. याजमुळे आळस फार वाढला आहे आणि उपयोगी कामे व व्यापार सर्व बंद झाला.
 गृहस्थ पन्नास हजार रुपये मरतेवेळेस किंवा लग्नात खर्च करील; परंतु एक पैसाही ज्ञानवृद्धीस, व्यापारास किंवा लोकसुखाकडेस उपयोग व्हावा, म्हणून खर्चणार नाही. तेव्हा अशी ज्या ठिकाणी व्यवस्था आहे, तेथे लोक कसे सुधारतील? ब्राह्मणांचा दुसरा एक चमत्कार आहे; तो असा की, उपास, पूजा व धर्मकृत्ये ते मजुरीने करतात. व पुण्य विकत देतात. हा एक मोठा विलक्षण चमत्कार आहे. दुसऱ्याबद्दल उपास करावा आणि त्यांस पुण्य विकावे, याचा अर्थ काय? जर कोणास ताप येत असला तर तो भटास उपास करावयास सांगतो आणि भटापासून पुण्य विकत घेतो. म्हणजे आठचार आणे भट घेऊन यजमानास सांगतो की, तुमचे व्रत मोडले नाही. तुम्ही उपास केल्याप्रमाणे फळ आहे. अशी युक्ती करतात.
 याशिवाय हजारो तऱ्हेने लोकांकडून पैसा काढतात. हिंदू लोकांची सुधारणा होण्यापूर्वी भटांनी विद्या जरूर शिकली पाहिजे; उद्योग केला पाहिजे. किंवा इतर लोकांनी भट हे बेवकूफ आहेत, असे समजून त्यांचा कुजलेले फळासारिखा त्याग करावा. आणि आपल्यास दान करणे तर चांगल्या रीतीने विद्यावृद्धीकडे करीत जावे. असे केल्यानंतर भय अर्थातच मोडतील आणि वास्तविक विद्वान पुढे सरतील. आजचा काळी लोकांपाशी भटामुळे पैसा उरत नाही. याजमुळे ते बहुधा विद्यावृद्धीस प्रतिकूल आहेत.
 सांप्रत दोन्ही पक्ष, भट व गृहस्थ व इतर जातीचे लोक हे सर्व सारखे मूर्ख आहेत. यापैकी कोणी तरी शहाणा पाहिजे व कोणास तरी दुसऱ्यांशी कसे वागावे, हे समजले पाहिजे. सांप्रत भट इतर लोक अज्ञानांधकाराने भ्रमिष्ट होऊन चालले आहेत. यास्तव लोकांनी विचार करावा आणि याचा उपाय योजावा. भट विद्वान होतील आणि पाठ करणे सोडतील तर चांगले होईल.

♦ ♦


ब्राह्मणांचे पुढारीपणापासून अनहित व वेदान्त


पत्र नंबर ९६

 आमचे लोकांत ब्राह्मण पुढारी झाले, याजमुळे फार घात झाला. जर कुळंबी, क्षत्री इत्यादिक पुढारी असते, तर बरे होते.
 कारण ब्राह्मणांच्या हातापायांत बिड्या आहेत, त्यांस जर सांगितले की, पृथ्वीवर बहुत देश हिमालयाचे पलीकडे आहेत, तर ते खोटे म्हणतात व उत्तर समुद्राचा अंत नाही, असे म्हणतात. बरे, या गोष्टींचा शोध करण्याकरिता आपण फिरावयास जाऊन स्वनेत्राने सर्व देश पाहून येत नाहीत. आमचे लोक इंग्रज लोकांच्या सर्व गोष्टी व भूगोलविद्या मिथ्या म्हणतात. तर स्वतां पाहून येण्याकरिता पैसा खर्च करून फ्रान्स, पोर्तुगाल, चीन, विलायत, उत्तर समुद्र व लापलंड इत्यादिक देशांत फिरावयास ब्राह्मण पाठवून त्याचे हातून लिहून बखरी आणून प्रसिद्ध कराव्या, म्हणजे लोकांची भ्रांती जाईल आणि लोकांवर उपकार होतील. परंतु ब्राह्मणांस परदेशात जाण्याचा प्रतिबंध आहे. याजकरिता हे न करून उगेच बसल्या जाग्यावर लंका बिभीषणाचे राज्य, दुधाचा समुद्र, सोन्याची जांभळे इत्यादी पुराणातील मत खरे असेच म्हणत असतात. याजमुळे इतर जातीचे लोक अधिक भ्रांतीत पडतात. जर हे दुसरे जातीचे लोक पुढारी असते, तर परदेशात जाते व ब्राह्मण लोकांचे डोळे उघडते; परंतु ते आता घडत नाही. ब्राह्मण लोक प्रतिबंधात पडले व त्यांच्यामुळे इतर जातीचे लोक सर्व प्रतिबंधात पडून आंधळ्यासारखे घरच्या उंबऱ्यापर्यंत चाचपीत बसले आहेत, हे मोठे वाईट झाले.
 आता ब्राह्मणांचे प्रतिबंध मोडून त्यांस बाहेर काढावयास व त्यांच्या जुन्या समजुती सर्व मोडावयास बहुत काल लागेल, परंतु त्यांस काही उपाय नाही. जे मराठे राजे वगैरे आहेत ते ब्राह्मणाधीन आहेत. याजमुळे ते काही उद्योग करीत नाहीत व स्वतां त्यांस लिहितावाचता येत नाही. त्यांस काहीच खबर नाही. जवळचे ब्राह्मण असतात, त्यांस तर या सर्व गोष्टींचा कंटाळा आहे. याजकरिता ते आपलेबरोबर नावेत सर्व लोकांस बसवून बुडत आहेत व त्यांस बाहेर काढावयास इंग्रज लोक यत्न करताहेत; परंतु तूर्त आमचे लोकांची संख्या जास्ती आहे. याजमुळे इंग्रज लोकांचा उपाय चालत नाही.
 हे वेडे लोक पाहून मला तर फारच दुःख वाटते व जे दयाळू आहेत व जे लोकांचे हित इच्छिणारे आहेत, त्यांस असेच दुःख वाटेल जे भिकारी आहेत, ते काही बरे आहेत. दरिद्राचे योगाने ते काही तरी गोष्टी ऐकतात. परंतु श्रीमंत लोक व ब्राह्मण जातीचे मनुष्य हे तर फार अंदाधुंद आहेत. ब्राह्मणांस घरी राहण्यापुरती सोय झाली म्हणजे पुरे. तो आपल्या ठिकाणी मस्त होऊन पुराणातील गोष्टी वाचीत बसतो. किंवा वेदान्त काढतो, म्हणजे हे सर्व मिथ्या. या लोकांस सुख होऊन तरी उपयोग काय? व याचे कल्याणास झटावे कशास? असे त्यास वाटते. हे सर्व मिथ्या म्हणतो. कोणी 'बालोन्मत्त पिशाच्चवत्' असे भागवतात आहे, ती वृत्ती धारण करून वेड्यासारखे फिरतात आणि माझा जीव ईश्वरास मिळाला, व मी जीवनमुक्त आहे असे समजून शेवटी संन्यास घेतात. म्हणजे देहाचे सार्थक झाले, असे त्यांस वाटते. आणि दगडासारखे पढतात. सर्व आशा, रुचि बळेच सोडितात आणि निरुपयोगी होतात, ही वेदान्त्याची स्थिती.
 कर्मठ आहेत ते अग्निहोत्र घेऊन बसतात, म्हणजे यज्ञयागात सरासरी जन्म व्यर्थ जावा, अशी तजवीज करतात. लोक आंधळे आहेत, त्यांस डोळे द्यावे, ज्ञान शिकवावे, व सुखी होण्याचे मार्ग दाखवावे, हे मनात देखील आणीत नाहीत. असे मूर्ख असतात. भट, वैदिक शास्त्र्यांच्या बुद्धीचा प्रकाश तर सर्वांस दिसतच आहे. याप्रमाणे बहुतकरून ब्राह्मण लोक आळशी किंवा मूर्ख असतात, याची चित्ते लोकांकडे नाहीत. वेदान्ती आहेत, त्यांस असे समजत नाही की, आम्ही लोकांस मिथ्या मानले, तरी लोक मिथ्या झाले की काय? अवर्षणात लोकांस धनधान्यसमृद्धी मानिली, तरी झाली की काय? मानल्याने मिथ्या होतात कसे? तुम्ही आपल्या मनात काही तरी समजूत केली आणि लोक व जग हे सर्व खोटे आहे, असे म्हटले, तरी इतके प्राणी सुखदुःखात, अज्ञानात व मूर्खदशेत आहेत ते सुटले की काय? मग मानल्याचा उपयोग काय? रोगी बहुत आहेत; त्यांस वैद्याने निरोगी मानले; म्हणजे त्यांचा रोग जातो की काय?
 तद्वत् हे मूर्ख वेदान्ती आहेत. त्यांस मी म्हणतो की, तुम्ही आपणांस काही नको असे म्हणा, व सर्व आशा सोडून ईश्वरावर भार ठेवा, हे चांगले; पण व्यर्थ आयुष्य घालवू नका व ज्ञान, विद्या व सुख इत्यादिकांचे वृद्धीस झटा. तुम्ही सर्व जग जरी मिथ्या मानले, तरी आम्ही सर्वांनी असे मानले नाही. याजकरिता आम्हाकरिता तुम्ही झटून आमचे कल्याण करा. म्हणजे तुमचा वेदान्त खरा आहे. असा विलक्षण व आळशी वेदान्त उपयोगी काय?
 तुम्ही निराश झालेत, तर तुम्ही आपल्याकरिता काही करू नका, तुम्ही निराश व आम्हीच ईश्वर असे मानणारे नाही, याजकरिता आमच्यावर दया करा. आमच्याकरिता जे तुम्हास कर्तव्य ते करा. दगडासारखी वृत्ती करून तेच सार्थक असे म्हणू नका.

♦ ♦


पंडितांची योग्यता

पत्र नंबर : १०३

 ज्यास समजत नाही, त्याने उगेच बसावे, हे बरे; बोलू नये, म्हणजे शहाणपणाचा ठाव लागत नाही, असे आहे.
 परंतु तो मार्ग सोडून 'कल्याणोन्नायक मंडळी' ने आपले ज्ञान प्रसिद्ध करावयास इच्छा केली, हे पाहून मला फार आश्चर्य वाटते. याचे ज्ञान कोणाचे उपयोगी नाही. लोकांचे कल्याण हे कसले करतात? त्यांस प्रथमच प्रश्न उलगडत नाही. हे पुसतात की, सुधारणा म्हणजे काय? यास आपली सुधारणा झाली पाहिजे, हेच कळत नाही. आम्ही सर्वज्ञ व भूदेव व आमच्या पोथ्यांत सर्व ज्ञान आहे, व आम्हास काय आणखी कर्तव्य आहे? असे वाटते. हे अजून पहिल्याच धड्यात आहेत?
 ज्या गोष्टीचे सिद्धान्त सर्वतोमुखी झाले आहेत, त्याचे निवारण हे करतात. हे शास्त्री, पंडित व भट हे मूर्ख असता विद्वान म्हणून हिंदुस्थानात मोडतात. यामुळे देशाची फार बुडणूक झाली. इतर लोक यांनी अज्ञानात बळेच ठेविले आहेत. दक्षणा दोन पैसे मिळवायची असली, म्हणजे हे कावळ्यासारखे जमतात व पैशाकरिता सर्व दिवस घालवितील, परंतु उद्योग करावयाचे नाहीत.
 पुण्यात दक्षणा ग्रंथकर्त्यास द्यावी म्हणून कोणी इंग्रज शाळेतील लोकांनी सरकारास लिहिले, त्याजबद्दल पाठशाळेतील पंडितास अत्यंत क्रोध येऊन त्यांणी एकत्र जमून सभा केली, परंतु एणेकरून काही फळ झाले नाही. सरकारने उत्तम बेत मान्यच केला. या पंडितांनी गवगवा करून काही उपयोग झाला नाही. त्याची अप्रतिष्ठा होऊन गेली, व सरकारने जे करावयाचे ते केले. पंडितांनी आपला मूर्खपणा मात्र जगात प्रसिद्ध केला. हे सुधारणेचे महा वैरी आहेत. असे हे गुण यांचे प्रसिद्ध झाल्यामुळे सरकारातून पाठशाळा हे दुर्गुणांचे माहेरघर व मूर्खपणाचे बीज मोडून टाकावे, असा बेत झाला आहे. तेव्हा पंडितांची योग्यता किती आहे, हे यावरून पहा.
 हे बाबांस मात्र फशिवतात. व्रते, उपवास, प्रायश्चित्ते वगैरे पोट भरावयाचे मार्ग तेवढे ठेवण्याचा प्रयत्न यांचा आहे. दुसरे यास काही नको. हे विद्येचे भुकेले नाहीत. ग्रंथ वाढविण्यास उत्सुक नाहीत. देशकंटक आहेत. लोकांचे सुधारणेविषयी व हिताविषयी प्रयत्न करावयास अनुकूल नाहीत. राज्य कसे चालले आहे? व लोक बरे अवस्थेत कशाने येतील? नवीन कायदे काय पाहिजेत? याचा विचार करीत नाहीत. सोरटपणाची गोष्ट, खराब चाल, स्वहित, सोदेगिरी, सुधारणुकीची बंदी व आपसांत कलह लावून ग्रामण्ये करून चार पैसे मिळवावयाचे, अशी कुत्सित कर्मे करण्यास हे पंडित कसे जुडतात की, जशा मोहळाच्या माशाच मधावर बसतात.
 यांणी लोकहिताचा प्रयत्न केला, असे कोणास आजपर्यंत स्मरण नाही. त्यांनी आपल्या पोटावर व शालजोड्यांवर नजर देऊन सर्व देश खराब केला! जोपर्यंत काही मूर्ख लोक देशात आहेत व ते मानतात, तोपर्यंत त्यांची ग्रामण्ये चालतील व काही दिवसांनी हे जुने लोक गेले, म्हणजे पंडित उताणे पडतील, परंतु या गोष्टीस दहावीस वर्षे आणखी पाहिजेत. म्हणजे आम्हीच या पंडितांचा तमाशा पाहू. तथापि प्रथम पाठशाळेचा विध्वंस झाला पाहिजे, म्हणजे एक पुरंदरचे बंड मोडले.

♦ ♦


खरा धर्म करण्याची आवश्यकता

पत्र नंबर १०७

 'कल्याणोन्नायक मंडळी'ने आपले शहाणपण दाखविण्याकरता दोन विषय पुढे काढले. (एक) संस्कृत भाषेतील ग्रंथ सर्वोत्तम व त्यात सर्वोपयोगी ज्ञान आहे. (दुसरा) पुनर्विवाह करू नये व विधवा बायकांनी मीठ सोडून वगैरे जेवीत जावे व उपासतापास करून रहावे. पुनर्विवाह करून उपयोग नाही. दोन विषयांची उत्तरे समर्पक झाली असता त्यांजकडून काही उत्तर आले नाही.
 तेव्हा मी या पंडितांची प्रार्थना करून त्यांस सांगतो की, लोकांचे हित तुमच्याने होणार नाही. व तुम्हाकडून सुधारणा करविण्यास जे झटतात, ते भ्रांतीत आहेत. कारण लोकांचे हित इच्छिणे हे तुमचे वतनवृत्तीस विरुद्ध आहे. लोक जितके मूर्खपणात असतील व बायका जितक्या वेड्या असतील तितके तुमचे पीक अधिक. असे असता तुम्हाकडून हित होईल कसे? अग्नी घर विझवावयास जाईल काय? व मांजर उंदिरास सोडून देईल काय? या गोष्टी घडणार नाहीत. तुम्ही पुराणिक, भट व पंडित या सर्वांचे हित लोकांचे मूर्खपणात आहे. लोक खरा धर्म करू लागले तर तुमची उपजीविका कशी चालेल? बायकांची व्रते, सहस्रभोजने, दांपत्य-पूजने, चातुर्मासाचे नेम, दक्षिणा, शांति, भूयश्री, संपूर्णे ही जाहली तर तुमचे पोट भरणार. शाळांत, पुस्तकालयांत तुम्हास काय भाग आहे बरे?
 लोक शहाणे झाल्याअंती असे होईल की, शाळा, ग्रंथ व विद्या वाढतील; गरीब, आंधळे, लंगडे यांस खावयाची सोय होईल, व रोगी यांस औषध देण्याची सोय होईल असे करण्यास तुम्ही धर्म म्हणाल काय? चांगल्या रीतीने कोणी धर्म करावयास इच्छील तर आम्ही त्यांस सांगू की, 'अरे बाबा, हा धर्म नव्हे. जेणे करून गरीब, आंधळे, पांगळे अन्नास मिळतील व धष्टपुष्ट आहेत ते उद्योगास लागतील आणि लोक विद्वान होतील असे धर्म करा.' असे तुमच्याने लोकांस सांगवेल काय? ही गोट कदापि घडणार नाही. तुम्ही असेच सांगाल की, "अरे शाळा कशास? यांस पैसा देऊ नये. देऊन काय पुण्य आहे? ब्राह्मणाचे मुखी घातले तर पुण्य आहे. पुस्तके कशास? यातील ज्ञान काय उपयोगी आहे? ब्राह्मण बोलावून त्यांस दाने करावी. गुप्तदान केले म्हणजे पुढले जन्मी मिळते; केळीचे दान सुवर्णसहित केले म्हणजे पुत्र होतो. एक गोप्रदान केले तर अनंत कोटी पापे जातात. देवास अलंकार करून द्यावे. ब्राह्मणास सुवर्णाचे दागिने करून वाटावे. यात पुण्य आहे. ब्राह्मणास भोजन दिले म्हणजे राज्य चिरकाल चालते. जरीमरी उठत नाही. शत्रूचा नाश होतो. रोग परिहार होतात." असे तुम्ही सांगाल, तर तुमचे पोट भरेल.
 तुम्हास एखाद्या वेड्या बाईने पुसले की, मी जेवताना बोलत नव्हते, हा माझा नेम होता व त्याचे संपूर्ण काय करावे? तर तुम्ही काय सांगाल? "अगे बाई, वामनव्रत काय उपयोगी आहे? त्या काळी ही युक्ती काही तरी ब्राह्मणांस धर्म व्हावा म्हणून सांगितली. परंतु आता इतकेच की, चार मुलांस २५ रुपयांचे ग्रंथ घेऊन वाचावयास द्या म्हणजे त्यात मोठा धर्म झाला." असे तुमच्या तोंडाने कधी तरी येईल? दगडास घाम येईल, सूर्य पश्चिमेस उगवेल परंतु तुम्ही हे कधी सांगणार नाही.
 तुमच्या देखत एखादा लबाड उठून मी सांबबाबा म्हणून साधूचा वेष धरून मुंबई, बडोदे, असे ठिकाणी लोकांस फसवून पैसा आणतो आणि तुमचे देखत रांडा बाळगून असतो. त्याचे हजारो लोक पाया पडतात, आणि धर्म करतात, व अशा लबाडास पोशितात. परंतु यांस कशास पैसा देता? हा लबाड धर्मास योग्य नाही, असे तुमच्याने म्हणवेल? कदापि म्हणवत नाही. तुम्ही असे म्हणाल की, ब्राह्मणजातीचा आहे, तस्मात् त्यांस धर्म सर्वांनी करावा, पुण्यच लागेल. व तो देवाचे नाव घेतो, याजमुळे त्याची सर्व पापे जळून गेली. त्याचे पायावर डोकी ठेवावयास चिंता नाही. असे सर्व तुम्हास ठाऊक आहे की, जर यांस असे नाव ठेवावे आणि लोकांस जागृत करावे, तर आम्ही या सांबबुवाहून अधिक चांगले नाही. जे त्याचे गुण तेच आमचे, असा तुमचा कट आहे. याजवर कोणी हल्ला करील तो करो.
 अज्ञानवृद्धीस आपले हिताकरिता झटता आणि जितके जितके ज्ञान वाढेल त्यांस नास्तिकपणा असे नाव देता. मूर्खास आस्तिक, भाविक, धर्मिष्ठ असे म्हणणे तुम्हास जरूर आहे. जर तुम्ही 'कल्याणोन्नायक' असाल तर खरा धर्म कोणता, तो आपले स्वहित सोडून सांगावा. पुराणिकाने पुराण कसे सांगावे, हरदासाने कथा कशी करावी, ती त्यांस सांगा. एक म्हणतो, विष्णूस तुळशी वाहिल्या म्हणजे हजार जन्माचे पाप जाते. त्यामुळे जो लबाड श्रोता आहे तो म्हणतो की, पुराणिकबाबाने हे चांगले सांगितले. मी पाप करीत जाईन आणि तुळशी वहात जाईन. त्यांस वास्तविक नीती आणि धर्म सांगूनही रिकामी खटपट त्याजकडून टाकवा. परंतु हे तुमचे काम नव्हे असे आम्हास वाटते.

♦ ♦