Jump to content

लोकहितवादींची शतपत्रे/२. हिंदूंचे धार्मिक जीवन

विकिस्रोत कडून









२. हिंदूंचे धार्मिक जीवन










शिमग्याचा दुराचार

पत्र नंबर ४ : ९ एप्रिल १८४८

 लोकांत वाईट गोष्टीचा परिचार त्वरित पडतो, व चांगले गोष्टींचे ग्रहण होण्यास बहुत उशीर लागतो, हा एक साधारण नियम आहे. व दुसरा एक नियम असा आहे की, जी एखादी चाल काही कारणावरून एक वेळ पडते, तीच पुढे काही काळाने अंधपरंपरा चालू लागते. तसेच हे होळीचे माहात्म्य आम्हास दिसते. हल्ली हे पाच दिवस होळीचे आहेत, हे प्रत्येक ठिकाणी लोक अधर्माने क्रमीत आहेत. व त्यात मूर्ख आणि उनाड लोकच आहेत असे नाही. बहुत संभावित, शहाणे व थोर लोक अंशतः त्यात मिसळून आपला अपमान करिताहेत. तेव्हा त्यांस संभावित हे नाव शोभते काय ? नाही; सगळे सारखेच योग्यतेचे असे म्हटले पाहिजे.
 परंतु हा दोष त्याजकडेस आहे असेच केवळ नाही. हा संगतिदोष लहानपणापासून आसमंतात भागी ही दुष्कृत्ये पाहिल्याने प्राप्त होतो. आणि एकदा निर्लज्जपणाच्या भावना मनात ठसल्या म्हणजे त्या जात नाहीत. उलट्या इतक्या सुदृढ होतात की, आम्ही आता लिहितो आहो, हे किती थोड्यांस आवडेल आणि किती बहुतांस आवडणार नाही, हे आमच्याने सांगवत नाही; परंतु जर त्यांनी विचार केला तर त्यांस आम्ही म्हणतो, हे खरे वाटेल यात संशय नाही. वाचणाराने असे म्हणू नये की, माझा बाप, माझा आजा, माझे शेजारी, हे सर्व असे कर्म प्राचीन काळापासून करीत आले व मीही लहानपणापासून त्यातच वाढलो; तेव्हा त्याचे विरुद्ध जे हे भाषण ते उपयोगी काय ? तर आमची त्यांस अशी प्रार्थना आहे की, तुम्हास ईश्वराने विचारशक्ती दिली आहे. तेणेकरून सारासार पहा. यद्यपि शास्त्राचा आधार थोडासा असेल तरी शास्त्रात आणखी बहुत सत्कर्मे लिहिली आहेत ती सर्व तुम्ही करता काय ? आणि जर करीत नाही, तर मग भ्रष्टपणास मात्र शास्त्राचा आधार तुम्ही कशाकशाकरिता धरता ? सार कोणते व असार कोणते, हे पहाणे तुम्हाकडे आहे.
 ईश्वराने तुम्हास जिव्हा दिली आहे. तिचे योगाने कुत्सित, बीभत्स व निंदायुक्त भाषणे करिता आणि लज्जास्पद मूर्खपणाचे स्वर काढिता हा थोरपणा काय ? आम्ही तर याला मनुष्यपणाही म्हणणार नाही. मग थोरपणा म्हणू कोठून ? रानात जनावरे फिरतात व त्यासारखे हे लोक फिरतात. त्यांस लज्जा कशी वाटत नाही ? बापाचे श्राद्ध किंवा कपिलाषष्ठीचा पुण्यकाल आला तर आनंदाने गरिबास त्यांच्याने दोन पैसे धर्म करवत नाही. आणि शिमग्यात दुष्ट स्त्रियांचे पोषणाकरिता उल्हासाने हे द्रव्य देतात. तेव्हा साजिंदे व भडवे हे पूर्वजन्मीचे ऋणी असतील असे वाटते. जितके देऊळ पवित्र तितकेच हे व्यभिचारगृह अपवित्र असे असून त्यात पापाचा साठा करीतात, हे नरकाचे साधन करीतात, की नाही बरे ?
 आमचे हे पुणे शहर आहे, तत्रापि आपल्या लग्नाच्या स्त्रिया व सख्ख्या आया यांस पोटास घालावयाची किती एकास भ्रांती असली, तरी त्यांनी कर्ज काढून कसबिणीच्या हातात दोन रुपये दिले नाहीत तर त्यांस असे वाटते की, आमची मंडळी (ज्याचे सोबतीत फिरतो ती) आम्हास हसेल. ही लज्जा बाळगून हरेक प्रकारे करून चार रुपये ते मिळवितात आणि त्यांचा पातकात व्यय करतात. जे भले मनुष्य असतात, त्यासही ते पिशाच्चरूप स्नेही नरकात ओढतात. आणि आपल्यास शाबास मानून असे समजतात की, यंदाचा शिमगा चांगला केला. आम्ही धन्य आहो. चोरांचे मंडळींत जो चोरी शिताफीने करितो, त्यांस इतर चोर वाहवा म्हणतात, तशीच ही अवस्था आहे.
 याप्रमाणे पुणे शहरात आमचे पाहण्यात पुष्कळ आहे. पुणे द्रव्याने हलके आहे खरे, परंतु दुष्कर्मात तेथील लोक द्रव्यवान शहरापेक्षा अधिक आहेत. व बहुत लोक आपले सामर्थ्याची पराकाष्ठा करून रांडांचे ताफे बाळगण्याचा खर्च जीवादारभ्य करीतात. त्यात लहान मुले पाहून त्यांची मला फार करुणा येते. कारण की, हे भ्रष्ट झालेले लोक आपले उदाहरण त्यांस देऊन त्यासही आपले शाळेत विद्वान करतात. नंतर ते वाढल्यावर कसे होतील, याचे लक्षण सहज ध्यानात येईल. मला वाटते की, पाच दिवस हे लोक नर्कवास करतात. कारण की, त्यांचे कानी, मुखी, मनी व चित्ती पातकाशिवाय दुसरे काहीही नसते. 'कुरीयर' नामक इंग्रजी पत्रात असे लिहिले आहे की, सरकारने हा सण बंद करण्याचा बेत करावा. तो असा की, दरबारात या सणाबद्दल सुट्या आहेत, त्या बंद कराव्या व पुण्यास रात्रीच्या तोफा बंद करता त्या करू नयेत. व माजिस्त्रेट साहेब यांणी कोणी दांडगाई किंवा वाईट भाषण अगर दंगा करील त्यांस मोठे शासन करावे.
 हे सर्व बेत सरकारने केले तर चांगले आहेत. लोकांस वाईट मार्गातून काढल्यासारखे होईल. परंतु सरकार प्रस्तुत असे करीलसे दिसत नाही. कारण सरकार स्वतंत्र नाही. त्यांस विलायतेहून अधिकाऱ्यांची पत्रे वारंवार येतात की, हिंदू लोकांचे रिवाजास व चालीस व धर्मास अगदी अटकाव करू नये. आमचे लोकांचे माहात्म्य इकडे काही नाही, तरी विलायतेस मोठे आहे असे दिसते. व ही मसलतीची व राजकारणी गोष्ट आहे. इंग्रजांस असे वाटते की, जर आपण लोकांचे चालीविरुद्ध काही केले, तर हिंदुस्थानचे राज्य आपले बुडेल व लोक आपल्यास हाकून देतील? यास्तव ते जपून चालतात. अशी त्यांची मसलत आहे.
 परंतु ते कसेही असो, दुसऱ्यांनी करू नको म्हटल्यावर मग करू नये, हे शहाणपण नव्हे. चांगली गोष्ट असेल ती स्वयमेव अंगीकारावी. होळी अगदी बंद झाली तर फार चांगले आहे. व या दुराचारास शास्त्राची आज्ञा आहे, असे आम्हास वाटत नाही. येविषयी आमचे मत खरे आहे किंवा नाही, हे कोणी विद्वान मनुष्य आम्हास लिहून उत्तरी कळवितील तर आम्ही फार खुशी आहो. परंतु ते कसेही असो. होळीचा मूर्खपणा इतका उघड आहे की, त्याविषयी लिहिणे हे वृथा श्रम आहेत. परंतु लोकांस मूर्खपणा फार, याजमुळे त्यांचे ध्यानात येत नाही. व दुसरे असे आहे की, मूर्ख लोक यांचे हाती द्रव्य व अधिकार फार आहेत. याजमुळे त्यांचे उत्तेजन दुष्कर्मास फार आहे. म्हणून ते सुधारणा करण्यास तुच्छ मानतात. परंतु आम्हास धीर पुष्कळ आहे.

♦ ♦


शाक्त मार्ग

पत्र नंबर ६ : २३ एप्रिल १८४८

 हिंदू धर्मात बहुत ग्रंथ आहेत. मला वाटते की, सरासरी शंभर एक असावे. असेच दुसरे धर्मातही आहेत. परंतु या पंथांपैकी एक दुर्घट पंथ तंत्राचा आहे. म्हणजे रुद्र, यामल व योनीतील तंत्र वगैरे ग्रंथ आहेत. त्यात शक्ती-उपासना करण्याचा मार्ग लिहिला आहे. तो बंगाल देशात व गौड व उडीसा (ओरिसा) प्रांतात पूर्वीपासून चालतो. तेथील लोक शक्ती-उपासना तंत्राधाराने करतात. म्हणून या देशात ते लोक मंत्री व सामर्थ्यवान आहेत. अशा गप्पा फार आहेत.
 त्याचे खरेपण किंवा खोटेपणा काय असेल ते असो. त्याचा विचार मी सांप्रत करीत नाही. परंतु मला बहुत खेद होतो की, तो पंथ अलीकडे दक्षिणेत पुणे इत्यादी ठिकाणी बहुत चालू लागला आहे. त्याचे कारण पाहिले असता लक्ष्मी प्राप्त व्हावी, पुत्रकामना इत्यादिक वासना तृप्त व्हाव्या, म्हणून उपासना करतात, असे शाक्त सांगतात; परंतु मला वाटते की, ते काही नाही; त्यांची मद्य मांस खाण्याची व्यसनेच प्रमुख आहेत. ती पुरती होण्याकरिता निमित्त करून किती एक निर्लज्जपणाने आपले घरी दारूचे कारखाने करून मद्य तयार करतात. व किती एक विकत घेतात व ते जरी गुप्तपणाने असे करतात तरी त्याचे श्रीमुखाची दुर्गंधी जेथे बसतील तेथे प्रगट होऊन हे शाक्त आहेत, असे सर्वांस समजते व किती एक मस्त होऊन घरी व रस्त्यात सापडतात. या गोष्टी प्रसिद्ध आहेत, परंतु त्यांच्या प्रतिबंधाचा उपाय कोणी लोक समजून करीत नाहीत. किंबहुना त्याजवर झाकण घालून जो तो म्हणतो की, हे अपेश डोकीवर कोणी घ्यावे ! हे कलियुग आहे. मी तुम्हास थोडासा या प्रकरणाचा इतिहास कळवितो. तो मी श्रमेकरून समजून घेतला आहे. यास्तव हा दुष्ट पंथ सुटण्याकरिता प्रगट व्हावा.
 या पंथांतील लोक आहेत त्यांस वाममार्गी किंवा वामाचारी असे म्हणतात आणि शाक्त हेही नाव त्याचे प्रसिद्ध आहे. प्रथमतः ज्यांस मद्यमांस खावे अशी बुद्धी होते, तो जो दुसरे वाममार्गी आहेत याचे भजनास लागतो. नंतर ते एक दिवस बहुधा अमावास्या किंवा अंधारी रात्र अशी योजतात आणि त्या दिवशी त्या उमेदवारास आपले धर्मात घेण्याचा संस्कार करीतात, तो असा की, त्या दिवशी मध्यरात्रीस आठ असामी वाममार्गी आणि आठ स्त्रिया एक एक वेगळा जातीची असावी, म्हणजे विधवा, ब्राह्मणी, परटीण, न्हावीण, कळावंतीण, गौळीण, कोष्टीण, सोनारीण, सुवाशीण एकूण आठ, त्या गुरूच्या घरी मिळोन येतात; आणि तेथे स्थंडिल घालून आठ कलश मद्याचे व मांस असे मांडतात. अग्नि पेटवितात आणि त्याजवळ काली म्हणजे देवीची मूर्ति मांडितात. नंतर प्रत्येक पुरुष स्त्रीचे शेजारी बसतो आणि पूजा करीतात. नंतर प्रतिज्ञा करवीतात की, 'मी आजपासून जातिनिषेध मानणार नाही व मद्य-मांस भक्षीन व स्त्री स्वकीय किंवा परकीय यांचे ठायी निषेध किंवा व्यभिचार मानणार नाही, मला सर्व सारखे आहे. येणेकरून मला भगवती मेल्यावर मोक्षास नेवो. आणि या जन्मी सुखसंपदा देवो.' अशी प्रार्थना व प्रतिज्ञा करतात.
 नंतर पूजा संपूर्ण झाली म्हणजे तंत्र शास्त्रांतील काही उपदेश करीतात. आणि नित्य पूजेचा मार्ग सांगतात. यानंतर तो वामाचारी दीक्षित झाला. मग त्याने पुनरपि अंधेरी रात्रीस पूजेचा बेत केला म्हणजे तशा स्त्रिया जमवून ते सोबती जमवून बसावे; आणि स्त्रियांस ते भैरवी म्हणतात व आपल्यास भैरव म्हणतात व दारूस सिद्ध म्हणतात; अशी विलक्षण नावे घेऊन कोणी नग्न होऊन नग्न स्त्रियांची पूजा करीतात आणि तिचे ठायी देवीचे स्तापन करतात. किती एक व्यभिचार करीतात आणि एक महार किंवा मांग यांचे हातचे जेवतात. शिवरात्रीस व एकादशीस देखील अशी कर्मे करीतात आणि त्यांचे आणखी पुष्कळ विधी आहेत. कोणी आपले कपाळी कुंकू लावून तांत्रिक टिळकाची खूण बाळगतात. कोणाची खूण तोंडाची घाण असत्ये; मग ते आपल्या मंडळीत आपल्यास मोठे सामर्थ्यवान म्हणवितात. कोणी म्हणतात आम्ही ज्यास शाप देऊ त्यांस मारू; कोणी म्हणतात की आम्हास देवी दिसते; कोणी म्हणतात की, आम्ही जे चिंतू ते कार्य करू. अशी अनेक प्रकारची कर्मे ते आपल्या अंगी भासवितात, परंतु वागवीत नाहीत; तेणेकरून लोकांत निंदेस मात्र पात्र होतात.
 असे भ्रष्टाचार हल्ली ब्राह्मण लोकांत चालू लागले आहेत. त्यांनी वैदिक मार्ग, अग्निहोत्र, ज्ञानप्राप्ती, वेदपारायण, पुराण-मार्ग, शालिग्राम-पूजा इत्यादिक धरून स्वस्थपणाने भगवंताचे भजन करावयाचे, ते सोडून या नरकवासरूप पंथात पडून राहिले आहेत. मला तर वाटते की, याचे साधन नरक मात्र आहे. असे जे दुष्ट लोक नीतिभ्रष्ट करतात, त्यांस ईश्वर शासन केल्याशिवाय राहणार नाही. पेशव्यांचे राज्यात ब्राह्मण धर्माचा काहीसा बंद होता, कारण की ते नियंते होते; परंतु हल्ली तर ब्राह्मण अतिशूद्रापेक्षाही वाईट कर्मे करतात. त्यांस कोणी शासन करणार नाहीसा झाला आहे. जे चार गरीब आहेत ते भितात की कोणी अब्रूची अर्जी कोडतात करील. मग हुकूमनामा होईल. हे कष्ट कोणी भोगावे ? परंतु, मला वाटते की, अद्यापि वाममार्गी ब्राह्मण फार नाहीत. दक्षिणमार्गी जर सगळे जमले, तर त्यांस ताळ्यावर आणावयास उशीर नाही. किती एक लोकांनी जेवावयास जाणे सोडले व किती एक घरात बसतात, कोणाच्या घरी जात नाहीत, असे त्रासले आहेत. परंतु कोणामध्ये असा धीर होत नाही की, सर्वांस बोलावून याचा निर्बंध करून बंदोबस्त करावा आणि मूळचे पवित्र स्थितीवर ब्राह्मण धर्म आणावा, म्हणजे शुद्ध ज्ञान-मार्ग, शास्त्रविचार, परमेश्वराचे आराधन करणे इत्यादीक मार्ग स्थापावे आणि मंत्रतंत्र व जारणमारण इत्यादिक गोष्टी किमयासारख्या अशक्य, परंतु अडाणी लोकांस भुलविण्याकरिता ब्राह्मण लोक प्रतिष्ठा दाखवून दुष्ट कर्मे करीतात. ही एकदम बंद होतील तर चांगले आहे.
 पूर्वी इराण देशात असा एक मजदाद (मेहदी ?) नामक खोटा पैगंबर होऊन व्यभिचार नाही, असे मत चालू करीत होता. परंतु नशरिवात राजाने त्यांस फाशी दिले, तेव्हा ते मत आटपले. तसे या दुष्ट वाममार्गी लोकांस मोठे शासन झाले पाहिजे. व यांची घरे व रात्रीच्या बैठका यांचा पत्ता लावून नीतीचे रक्षण करावे हे चांगले. नाही तर काय होईल ते ईश्वर जाणे. मनुष्याची कल्पना चालत नाही. आणखी याविषयी पुढे मजकूर लिहू.

♦ ♦


वाईट चालीचे प्रकार

पत्र नंबर १३

 आपले लोकांच्या मूर्खपणाच्या समजुती चालतात. त्यांपैकी ३० प्रसिद्ध झाल्या. त्यांची पुरवणी आणखी खाली लिहिली आहे, ती प्रसिद्ध व्हावी-
  (३१) स्त्रियांनी केला तो व्यभिचार; पुरुषाचा व्यभिचार करण्याचा पुरुषधर्म आहे, असे समजतात.
 (३२) सोदा तो शहाणा.
 (३३) सालसपणाने व खरेपणाने द्रव्य मिळत नाही.
 (३४) ज्याची सद्दी त्याचे राज्य; ज्यास काळ अनुकूल त्यांस सर्व भाळतात. मुलींचा व जनावरांचा पायगुण चांगला-वाईट असतो, असे समजतात.
 (३५) महार हिंदू आहेत व आपले देवाची पूजा करतात व धर्म मानतात; तरी म्लेंच्छांपेक्षा नीच कसे ?
 (३६) कार्यापुरती मैत्री व कारणापुरते आर्जव; तसाच रोगापुरता वैद्य.
 (३७) संसार सोडल्यावाचून ईश्वरप्राप्ती नाही.
 (३८) स्त्रियांचा पुनर्विवाह केला तर धर्म बुडेल व ब्राह्मणांची अब्रू जाईल.
 (३९) बैरागी वगैरे लोक घरेदारे, रोजगारधंदा सोडून फिरतात, त्यांस खाण्यास दिले तर पुण्य आहे.
 (४०) अब्रू गुणावर नाही, परंतु द्रव्यावर व मोठे कामावर आहे. बहुधा कोणाचे द्रव्य किंवा काम अपराधाखेरीज गेले, तर अब्रू गेली म्हणतात. हे कसे ?
 याचा विचार करून जे उत्तर देतील, त्यांचे आम्ही उपकार मानू. खरे असेल त्याचा स्वीकार व लबाड असेल त्याचा अनादर करावा, इतकीच आशा आहे.

♦ ♦


वैराग्य


पत्र नंबर २६ : १३ ऑगस्ट १८४८

 मनुष्यमात्राने आपले परलोकांचा विचार करावा, एक हे सर्व गोष्टींहून उत्तम आहे; असे असता किती एक सांसारिक जन लौकिक विचार मात्र करतात. एक क्षणभरदेखील ईश्वराचे स्मरण करीत नाहीत. याहून मोठे आश्चर्य काय आहे ? मनुष्यास ईश्वराने बुद्धी दिली आहे, तिचा उपयोग इतकाच की, इतर सर्व जनावरांपेक्षा हे जनावर श्रेष्ठत्व पावून आपले कर्त्याचे उपकार जाणून त्याची कीर्ती आणि दया वर्णन करील; परंतु हा सन्मार्ग सोडून किती एक गैर रस्त्याने जात आहेत. आणि क्षणभंगुर देहाचे पोषणाकडे सर्व लक्ष देऊन आपले जे महत्कल्याण, ते करून घेत नाहीत.
 पहा, कित्येक मेहनतीचे कामात पडले आहेत. किती एक चाबूकस्वार, किती एक कारकून, कित्येक मजूर, किती एक शास्त्री व कित्येक वैदिक आहेत. कित्येक सूर्यादयादारभ्य नाचतात व संत म्हणवितात; परंतु हे सर्व देवास जाणत नाहीत. केवळ पोटाकरिता उद्योग संपादून असतात. याचा दाखला असा आहे की, गोसावीबोवास जर बिदागी कमी पोचली, तर त्यांस राग येतो. पुराणिकास तांदूळ मिळाले नाहीत, तर त्यांस संताप येतो. भटास दक्षणा मिळाली नाही, तर तो रागावतो. असेच बहुतेक लोक आहेत. तेव्हा कोणी धर्मसंबंधी किंवा प्रपंचासंबंधी द्रव्याचे आशेवाचून काम करीत नाहीत, हे स्पष्ट आहे. यास्तव यापैकी कोणी साधूचे अभिधान पावण्यास योग्य नाहीत.
 मला असे वाटते की, संसार आणि परमार्थ ही दोन कामे पृथक आहेत. त्याची मिसळ करू नये. परंतु किती एक लोक फक्त संसाराकरिता काही कामे करतात आणि ती देवाकरिता केली असे म्हणतात. मला एक साधू असा ठाऊक आहे की, त्याची पूजा व भजन किंचित होते; तत्रापि त्याजकडे लोक फार येऊ लागले, तेव्हा त्याची पूजा वाढली. म्हणजे, दांभिकपणाने तो चार घटिका अधिक बसू लागला व तेच लोक कमी होताच पुन्हा मूळचे प्रमाणे झाला. हा केवढा नीचपणा आहे !
 देवाने सर्वदा माझे भजन करा, म्हणून मनुष्यावर ओझे घातले नाही. तो इतकेच भजन मागतो की, जे आपले आणि आपले कुटुंबाचे व इतर जनांचे काम आहे, ते सर्व चांगले रीतीने करून नंतर जी वेळ सापडेल, ती क्षणभर असो अगर घटकाभर असो, स्नान संध्येत किंवा प्रार्थनेत आणि नामस्मरणात घालवा. म्हणजे त्यातच अनंत वर्षे तपश्चर्या केल्याचे पुण्य आहे. संपूर्ण जग ईश्वराने निर्माण केले आहे व त्याची व्यवस्था होण्याकरिता सूर्य-चंद्र, रात्र-दिवस, प्रत्येक जिवाचा भक्ष, रोगास औषध व मनुष्यास विचार आणि थोरपणा इतकी दिली आहेत. त्याचे कारण असे आहे की, ज्या ज्या ठिकाणी जे जे व्हावयाचे; ते यथास्थित होऊन मनुष्याने सर्वदा ईश्वराचे उपकार, शहाणपण, नेम व रचना यांची आश्चर्यकारक स्तुती करून रमत असावे. सूर्य उगवला असता निद्रा करावी किंवा रोग झाला असता औषध घेऊ नये, अगर मनुष्य झाला असता विचार टाकून देऊन जनावरांसारखे फिरावे, असे विचारास योग्य दिसत नाही. यास्तव उत्तम हेच की मनुष्याने आपले कर्म करावे.
 श्रीकृष्णाने गीतेच्या ठाई हाच अभिप्राय अर्जुनास सांगितला आहे. अर्जुन विषाद पावून वैराग्य घेत होता. तेव्हा कृष्णाने त्याची समजूत केली की, 'अरे षंढा, तू भितऱ्यासारखा वैराग्य काय घेतोस ? जे आपले कर्तव्य आहे, ते कधीही टाकू नको. त्याचे आचरण कर. आणि सुखदुःख मात्र मानू नको. वैराग्य हे मूर्खपण आहे. आशा व दुःख जे लाभालाभापासून होते ते मात्र सोडावे. परंतु संसारी जे आपले कर्म लोकांस प्रगट होऊन चालत आले आहे, ते टाकू नये.' या उपदेशावरून जन्माचे सार्थक कसे होईल, याचे उत्तर सहज निघत आहे. आपण काय करितो, वस्त्रप्रावर्ण नेसतो, खातो, पितो व कुटुंबाचे पोषण करितो. हे सर्व व्यर्थ आहे, येणेकरून ईश्वरप्रीति होत नाही, असे जे म्हणतात, त्याचे मत ईश्वरी वचनास विरुद्ध व विचारासही विपरीत आहे, कारण पृथ्वीवर अनेक मनुष्ये निर्माण झाली आहेत, अनेक देश आहेत, त्यात आपण एक मनुष्य आहो. तेव्हा या जगत्समुदायात आपल्यास अनेक प्रकारचे संबंध प्राप्त झाले आहेत. त्यांचा त्याग करणे ठीक नाही व हा केवळ भित्रेपणाच होय, ज्यास संसार चालवावयास धैर्य नाही, तो पुढे काय करणार ? संसार म्हणजे यत्किंचित गोष्ट आहे व या आयुष्यात थोड्याचा विचार ज्यास होत नाही, त्यांस अगम्य ईश्वराचा विचार कसा समजेल ? ज्या देशात ईश्वराने आपणास घातले आहे, त्या देशात आपली योग्यता व बुद्धी येणेकरून आपण काय करावे, याचा विचार करावा आणि योग्य असेल, ते करावे.
 वैराग्यापेक्षा संसार सुयुक्त रीतीने चालविला असता बरा. कारण जर ईश्वराचे मनात आपल्यास रानटी व अविचारी करण्याचे असते, तर त्याने वाघाच्या किंवा दुसऱ्या काही रानवट जनावराच्या जन्मास घालून डोंगरात राहणारे केले असते.
 परंतु जापेक्षा मनुष्याचे जन्मास घातले आहे, त्यापेक्षा असे दिसते की, आपण विवाह करावा, स्त्री करावी व स्त्री असली तर तिने भ्रतार करावा. प्रजा होईल, तिचे संरक्षण करावे. अतिगरीब यांचे पोषण करावे. मनुष्यासारखे वागावे विचाराने चालावे. जे उत्तम आहे, ते करावे. इतर लोकांस उपकारांनी मैत्र करावे. जे आपले हातून यथाशक्ती होईल ते कल्याण करावे. लोकांचे व आपले कुटुंबाचे हित करावे. सदाचरणाने वागावे. अनीतीने वागू नये, नम्रता धरावी. राग, लोभ, मूर्खपणा करू नये. विनाकारण कोणाला उपद्रव करू नये. प्रपंचसंबंधी नानाप्रकाराची दुःखे व सुखे आली तर तेणेकरून प्रमाद किंवा ग्लानी होऊ नये. अशा रीतीने वागून यथाशास्त्रसुख अनुभवावे. अशा मनुष्यास आम्हास वाटते की, वैराग्यापेक्षा अधिक श्रेय आहे.
 वैराग्य हे मूर्खपणा आणि ईश्वराने जे दिले व ज्याकरिता मनुष्य-देह केला, त्यांस टाकून जनावराप्रमाणे रानात फिरणे आहे; कारण जे कर्म आपणास सांगितले आहे, ते न केले तर आपले जन्माचे सार्थक होत नाही. जन्माचे सार्थक म्हणजे ज्याकरिता जन्म घेतला, त्याचे सर्व अर्थ म्हणजे हेतू परिपूर्ण करणे. आता प्रथम प्रथम हेतू हाच की; ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये या सर्वांचे यथास्थित व्यापार करणे व शास्त्रयुक्त चालणे व आश्रमाप्रमाणे व वर्णाप्रमाणे वागणूक करणे. थंडी लागू नये म्हणून ईश्वराने कापूस निर्माण केला आहे. आणि आम्ही जर आपले शेतात पिकवून, त्याचे वस्त्र करून, त्यांस अनुभवविले तर आम्ही काही पातक केले, असे होईल काय ? इतके खरे आहे की, चोरी करून दुसऱ्याचा कापूस आणू नये व लोभाने कोणाचे वस्त्रहरण करू नये; कारण जसा आपला जीव तसा दुसऱ्याचा आहे. जशी तुम्हास तुमचे मालाची चोरी आवडत नाही, तशी दुसऱ्यास आवडत नाही. दुसऱ्यास काय आवडत नाही, ते करू नये. जमिनीची चाकरी करून जे मिळेल, ते खाण्यास आपल्यास सर्वोपरी अधिकार आहे. आणि त्यात दोषही नाही. यात जे दोष मानतात, ते आपल्या विचाराचा उपयोग करीत नाहीत; म्हणून त्यांस मूर्खपणाने 'जर तुम्हास मी पाहिजे असेन, तर तुम्ही सर्व सोडा' अशी ईश्वराची आज्ञा आहे, असे वाटते.
 ज्या नवऱ्याने आपले स्त्रीस दागिने दिले आहेत, तो नवरा तिला असे म्हणणार की नाही, 'जर तुला माझी आवड असेल, तर आपले हातातील बांगड्या देखील फोडून टाक.' शहाणा नवरा असे म्हणेल काय ? नाही. तिला जे दागिने आपण दिले, ते घालताना पाहून तो फार संतोष पावेल. कारण दागिने देण्याचे कारण तेच होते. तद्वत् मनुष्यास आपले कर्माचे व नीतीचे ठाई निष्ठा पाहून ईश्वर आनंद पावेल, यात संशय नाही. त्याने जी पदवी आपल्यास दिली आहे, तिचा त्याग करण्याचा हेतू काय ? ईश्वर असा क्रूरपणा आपण निर्माण केलेल्या प्राण्याजवळ करणार नाही. कारण असे जर असते, तर मनुष्यास इतकी जास्ती अक्कल त्याने कशास दिली असती ? सर्व सारखेच केले असते. परंतु त्याचा हेतू हाच की, त्या अकलेचा उपयोग कसा करतो आणि जी जी कर्मे मी त्याच्या वृत्तीवरून व बुद्धीवरून त्यांस सुचविली आहेत, ती ती तो यथास्थित करतो की नाही! हेच ईश्वर पहात असेल, असे अनुमान सिद्ध आहे.
 वैराग्यास काही आधार नाही. आणि तेणेकरून ईश्वरप्राप्तीही नाही, किंबहुना ईश्वरक्षोभ मात्र होईल, असे दिसते. याप्रमाणे बुद्धीकरून परलोकासंबंधी जो विचार झाला आहे, तो लिहिला आहे.

♦ ♦


नाना पंथ

पत्र नंबर २७ : २७ आगस्ट १८४८

 सांप्रत हिंदुस्थानात अनेक मतांचे व जातीचे लोक आहेत. त्यांतील काहींचा इतिहास लिहितो.
 हिंदू लोकांस तर आपले देशातील वर्तमानाची खबर नाही, परंतु बाहेरील पुष्कळ लोक येथे येऊन राहिले आहेत. प्राचीन काळी हिंदू लोक आता आहेत, तसे नव्हते. ते परदेशांत जात-येत होते. अलीकडे मात्र त्यांचे असे झाले की, जसा एखादा धाव घेता घेता थकून पुराण प्रसिद्ध मुचकुंदाप्रमाणे निद्रा करितो, तसे या लोकांचे झाले आहे. बहुत काळपर्यंत सर्व देशाहून हिंदुस्थान प्रमुख आणि पराक्रमी, असा मान पावून हल्ली निद्रिस्त झाले. आता या दीर्घ निद्रेतून ते दुसरे कोणतेही उपायेकरून जागृत झाले नाही. तरी दरिद्राजनें करून तरी जागृत होतील. यात संशय नाही.
 (१) एक हजार वर्षांच्या पूर्वी क्रिस्तियन धर्म युरोपखंडात वृद्धिंगत झाला. व बहुत लोक तो धर्म अंगीकारून देशोदेशी गेले. तेव्हा किती एक किरिस्ताव हिंदुस्थानातही मलबारदेशी आले व त्यांनी आपले धर्मात किती एक लोक आणले. ते अद्यापि मलबारात आहे. त्यांचे नाव सेंट वेमी किरिस्ताव. त्यांची चाल व वर्तणूक बहुत करून हिंदूंप्रमाणेच आहे. म्हणजे त्यामध्ये ब्राह्मण, शूद्र अशा जाती आहेत व परस्पर लग्ने होत नाहीत. धर्म मात्र हिंदूंचा नाही. पुढे पोतुगीज लोक इकडे येऊन त्यांनी गोव्यात ठाणे बसविले. त्यानंतर त्यांनी गरीबगुरीब लोकांस जबरीने व द्रव्याने आपले धर्मात आणिले, व ते बहुतकरून युरोपियन लोकांप्रमाणे वागतात. असे किरिस्तावांचे दोन इतिहास आहेत.
 (२) अरबस्तानात महमदी धर्म चालू होऊन मुसलमान झाले, तेव्हा किती एक बादशहाही मुसलमान झाले आणि आपले रयतेस मुसलमान होण्याकरिता इजा देऊ लागले. त्याकाळी इराण देशात जरदस्ताचा अग्निपूजेचा धर्म चालत होता. तेथील बादशहा मुसलमान होऊन रयतेस उपद्रव करू लागला. तेव्हा तेथील जे धर्मतत्पर लोक होते, ते जहाजात बसून हिंदुस्थानात सुरतेस आले; तेथील राजा हा समुदाय पाहून भयभीत झाला व पुढे त्याने त्याजपासून तरवार धरणार नाही, म्हणून करार लिहून घेऊन आपले प्रांतात राहू दिले. त्यांस सरासरी आठ-नऊशे वर्षे झाली. ते पारशी लोक हल्ली आपली पहिली भाषा सोडून गुजराथी भाषा बोलून इकडील लोकांप्रमाणे राहतात. व त्यांनी किती एक इकडील चालीही धरल्या आहेत. त्यांचे धर्मपुस्तक जेंद अवेस्ता हे मात्र मूळचे भाषेत आहे.
 (३) जेव्हा मुसलमानी धर्म चालू झाला, तेव्हा त्या धर्मातील पुष्कळ लोक इकडे येऊन धर्म शिकवू लागले, त्यात एक मौलवी अरबस्तानातून गुजराथेत आला व आपली जाती व धर्म छपवून एका स्वामीजवळ शिष्यात राहिला. व तेथे त्याने हिंदू धर्माचा अभ्यास केला. आणि मग त्या स्वामीस बोध करण्यास आरंभ केला. व आपला धर्म प्रतिपादन केला. तेव्हा स्वामीने तो धर्म खरा समजून आपले शिष्यासहित स्वीकारला ते लोक बोहारी झाले. या गोष्टीस पाचशे वर्षे झाली. गुजराथी भाषेत बोहारी या शब्दाचा अर्थ व्यापारी असा आहे. हे मूळचे गुजराथेतील हिंदूच होते. पुढे बाटून मुसलमान झाले.
 (४) हिंदुस्थानात पूर्वी एकही मुसलमान नव्हता. परंतु मुसलमानांनी स्वारी करून हा मुलूख काबीज केल्यावर ते लोक हा देश चांगला पाहून इकडून गेले नाहीत. येथेच आपल्या सैन्यासहित राहिले. ते लोक हल्ली सर्व हिंदुस्थानात इकडील लोकांत मिसळले आहेत. रोहिले व पठाण हैद्राबादेस राहिले व लखनौ आणि दिल्ली या ठिकाणी मोगल राहिले.
 (५) कोळी, गोंडवनातील गोंड व भिल्ल हे लोक बाहेरील देशातून इकडे आले नाहीत. हे या देशाचे मूळचे मिराशी आहेत, असे दिसते; कारण संस्कृत भाषेचा यांचे भाषेत लेशही नाही. व हिंदू धर्माची गोष्ट त्यांस काही मान्य नाही. त्या लोकांस सांप्रत जे आपणांस हिंदू लोक म्हणवितात त्यांनी जिंकले आहे. पूर्वी हिंदू लोक हे पंजाबकडून आले व त्यांनी उत्तरेस अंमल बसविला, आणि देशाचे नाव पुण्यभूमी असे ठेविले. महाराष्ट्र व कर्नाटक हे देश हिंदुस्थानचे राजाकडे बहुत काळ नव्हते. तेथील लोकांस ते घडशी, राक्षस व रावणाचे सेवक असे म्हणत होते. पुढे हिंदू लोकांनी जिंकीत जिंकीत सर्व देश जिंकला. तेव्हा ते मूळचे लोक डोंगरात व रानात जाऊन राहिले. ते अद्यापि तेथेच राहतात. असे या लोकांचे मूळ आहे.
 आता किती एक स्वदेशीय लोक असून, ते नाना प्रकारचे पंथास लागले आहेत. त्याविषयी थोडासा इतिहास लिहितो. तेणेकरून हिंदू धर्म प्रमुख असता, त्यापासून दुसरे पंथ कसकसे निघाले आहेत, त्यांची गोष्ट समजेल.
 (१) हिंदू लोकांचे येण्यापूर्वी हिंदुस्थानात कोणता धर्म असेल तो असो. हल्ली जे या देशात राहणारे लोक, यांचा मुख्य धर्म वेदशास्त्राचे आधारे करून आहे व त्यासी विपरीत एक बुद्ध धर्म म्हणून आहे. गयेस एक पंडित झाला. त्याने हा धर्म स्थापिला आहे. तो पंडितच बौद्ध अवतार. त्याचे ठिकाण अद्यापि गयेस आहे. त्याचा धर्म वेदांशी विरुद्ध आहे, यास्तव ब्राह्मणांनी महाप्रयत्न करून तो बुडविला. तत्रापि बंगाल्याचे पलीकडे व ब्रह्मदेशांत तो अद्यापि चालत आहे. लंकेतही तोच धर्म चालतो, पण त्यात काही काही फरक आहेत. तथापि मूळ एकच. (२) त्यानंतर दुसरा जैन पंथ. हा धर्म देशांत आहे, व याचे धर्माधिकारी स्वामी जागोजाग आहेत. हे मत काही वर्षांपूर्वी फार चालले होते. परंतु कुमारिल भटाने बहुतकरून ते मोडिले व त्या मताचे लोकांनी ग्रंथ केले होते, तेही बुडविले. एक अमरकोश मात्र ठेविला आहे. जैनांचे मत असे आहे की, ही सृष्टी अविनाशी आहे. यज्ञ व श्राद्धादि करणे जरूर नाही. अद्यापि त्यांचे मत जागोजाग चालत आहे. (३) नानक व गुरू गोविंद हे पंजाबचे मुलखात झाले. त्यांनी आपण स्वतः ग्रंथ लिहून एक नवीन धर्म चालू केला. त्यात जैनमताचे लोक, मुसलमान व हिंदू या जातीचे लोक आहेत. त्यांचे नाव शीख म्हणजे शिष्यार्थी शब्द आहे. नानक याचे जन्मास दोनशेपन्नास वर्षे झाली. तो पहिल्याने हिंदू होता. नंतर मुसलमान होऊन मक्केस गेला व संन्यासी बहिरागी यांचे मेळ्यात फिरला. नंतर त्याने आपणांस ईश्वराची अशी आज्ञा झाल्याचे प्रगट केले की, यवन व हिंदू हे मूर्खपणाने उगीच भांडतात. ईश्वर एकच आहे. त्यांस सर्वांनी भजावे व परस्पर कलह मोडून उत्तम धर्म लोकांस शिकवावा. याप्रमाणे त्याने ग्रंथ लिहून लोकांस आपले धर्मांत आणले. या धर्माचे दोहीही धर्माशी विरुद्ध नाही. पुढे दिल्लीचे बादशहा औरंगजेब वगैरे झाले, त्यांनी त्या लोकांस उपद्रव दिला, याजमुळे त्या लोकांनी जमून आपले संरक्षणाकरिता मुलूख बळकाविला व अलीकडे रणजितसिंग वगैरे यांनी पुष्कळ मुलूख मिळविला आहे आणि स्वतंत्र राज्य केले आहे. असे शीख लोकांचे मूळ आहे. आता त्या धर्मात कोणीही जातो. त्यांस निषेध नाही.
 (४) हिंदुस्थानात कबीर म्हणून एक कवि व साधू झाला होता. त्याचे पंथात वागणारे लोकही पुष्कळ आहेत. त्यांस कबीरपंथी म्हणतात. कबीराचे मतही असेच होते की मुसलमान व हिंदू हे आपसांत धर्माचे विरुद्ध भावाने व्यर्थ भांडतात. मुख्य धर्म हाच की, कोणाचे वाईट करू नये व परमेश्वराची भक्ती करावी. लोकांस उपद्रव करीतात ते धर्म बुडवितात.
 (५) शंकराचार्य स्वामीपासून संन्याशी व गोसावी मत झाले. शंकराचार्य हे मुख्यत्वेकरून वेदान्तशास्त्राचे प्रतिपादक होते. यास्तव त्यांनी कलियुगात शास्त्राप्रमाणे संन्यास निषिद्ध असतानाही चालू केला व त्यांचे फार शिष्य होते, त्यांनी शूद्रासदेखील संन्यास देऊन गोसावी केले. संसार सोडला पाहिजे, हा त्यांचा मुख्य अभिप्राय आहे; परंतु हल्लीचे गोसावी वेदान्ताप्रमाणे किती चालतात, हे लोकांस ठाऊकच आहे.
 (६) मध्व स्वामींनी कर्नाटकात वैष्णव मत स्थापिले. तसेच वल्लभाचार्य

म्हणून एक गुजराथेत होता, त्याने वैष्णव मतच परंतु एक वेगळ्या तऱ्हेचे काढिले. सांप्रत वैष्णवांचा व शैवांचा बहुत विपर्यास आहे. कर्नाटक प्रांती असे वैष्णव आहेत की, ते शैवाचे पंक्तीसदेखील जेवीत नाहीत. परंतु शैव आपल्यास स्मार्त म्हणवितात आणि वैष्णवास पाखांडी म्हणतात. वैष्णव अद्वैत- वेदान्तास मानीत नाहीत. (७) महाराष्ट्र देशात एक रामदासस्वामीचा पंथ आहे. परंतु त्याचे कोणाशी विरुद्ध नाही. तसेच तुकाराम, ज्ञानेश्वर हे साधू झाले. त्यांचे मत बहुतकरून शूद्र लोकांत चालू आहे व किती एक ब्राह्मणही त्यात आहेत; परंतु विद्वान ब्राह्मण बहुधा त्यात नसतात. याचेही मत साधूपणाचे आहे. यांचे शत्रुत्व कोणाशी नाही. हे मत हल्ली दोनशे वर्षांपासून चालू आहे. यांचे मुख्य मत असे आहे की, नीतीचे आचरण, सारासार विचार आणि कीर्तन करावे.
 (८) बंगाल्यात एक चैतन्य म्हणून मनुष्य होता. त्याचे मत बहिरागी लोक धरितात. व चैतन्याचे मताचे लोक सांप्रत पुष्कळ आहेत, ते गोसावी यासारखेच आहेत.
 (९) तंत्र-शास्त्राचे आधाराने चालणारे एक शाक्त मत आहे. यातील लोक फार दुष्ट आहेत. हे बंगाल्यात पुष्कळ आहेत व हल्ली महाराष्ट्र देशात यांचा पर्वकाळ पुष्कळ झाला आहे. यामल इत्यादि ग्रंथ आहेत. त्यात रुधिराध्याय म्हणून आहे. त्यात शक्तीस भक्ष कसकशाचा द्यावा, हे लिहिले आहे. ते जर कोणी वाचून पाहिले, तर तो आश्चर्य करील व त्याचा लिहिणारा खाटिकाहूनही निर्दय आणि लोकांस मूर्ख करणारा होता असे म्हणेल. वारुणीप्राशनाचा त्यांस किमपि निषेध नाही व अंगपूजा म्हणजे स्त्रीचे आराधन त्यात श्रेष्ठ धरिले आहे. याहून ईश्वरास क्रोधकारक दुसरे काय असावे ? हे मत कोणी खरे मानणार नाही. मनुष्याचे बुद्धीस इतकी काळिमा येऊन ते ईश्वरास सोडून तंत्रांत लिहिल्या मार्गास लागले. आणि इतक्या निर्लज्जपणास व ईश्वरास क्षोभकारक अशा वर्तणुकीस लागले, हे पाहून दुःख वाटते. अस्तु.
 असे हे पृथक् पृथक् धर्म आहेत व याशिवाय आणखीही किती एक आहेत. परंतु हिंदुस्थानात जगन्नाथास व गिरीस सर्व जातीचे लोक सर्व धर्मविचार सोडून खातात व पितात. गिरीस देवळात मात्र असे चालते आणि जगन्नाथात सर्व गावांत याप्रमाणे वर्णसंकर करीतात. जगन्नाथाचे मूळ असे आहे की, श्रीकृष्णांनी देह ठेविल्यानंतर तो देह जगन्नाथास आणिला व मूर्ती करून त्यात त्या देहातील अस्थी भरल्या आणि त्या मूर्तीस देवळात ठेविले. कोणी म्हणतात की, प्राचीन हिंदू राजे यांनी ही मूर्ती बसविली आहे. असो. याचे मूळ काय असेल ते असो, परंतु जातीचा विचार त्या ठिकाणी नाही. हे जगप्रसिद्ध आहे.

♦ ♦


विधिनिषेधरूप धर्माचे मूळ

पत्र नंबर २८ : ३ सप्टेंबर १८४८

 धर्मशास्चे व नीतिशास्त्राचे मूळ काय आहे, याचा विचार करता दिसते की, प्रथमतः ईश्वराने पृथ्वी निर्माण केली व सर्व सृष्टीतील पदार्थ, सूर्य, चंद्र इत्यादी केले आणि नंतर मनुष्य उत्पन्न केला. तेव्हा प्रथम जो मनुष्य होता, तो सुखी असेल; कारण त्याचे कुटुंब एकटेच. सर्व सृष्टीचा धनी तोच. नद्या, जमीन, झाडे या सर्वांचा अधिकारी तो एकच. तेव्हा तो पाहिजे तेथे रहात असेल. जेथे पाहिजे तेथे बसत असेल. जेथे पाहिजे तेथे पेरीत असेल. त्या काळी त्या कोणी मुजाईम नव्हता. याजमुळे तो अर्थात सुखी असेल.
 असे काही दिवस चालल्यानंतर त्याचे कुटुंब वाढले आणि एका घरात रहात होते, तेच लोक फार होऊन त्यांचा गाव झाला. तेव्हा एकाने जमीन लागवडीस आणली. ती चांगली पाहून त्याचे भावांस लोभ उत्पन्न झाला; कारण लोभ, क्रोध, मोह हे मनुष्याचे मनात आहेतच; परंतु त्यांस प्रसंग आल्याशिवाय ते दृष्टोत्पत्तीस येत नाहीत. सांप्रत ही मनुष्ये किती एक चोर व किती एक लबाड असे गुप्त रूपाने आहेत. जे चोर आहेत ते श्रीमंत असले म्हणजे त्यांस चोरी करावयाचे अगत्य असत नाही, हे पुष्कळांचे पाहण्यात आहे. एका मनुष्याने स्त्री केली म्हणजे तिचा स्वभाव भिन्न असल्यामुळे तिचा भ्रतार वारंवार क्रोधाविष्ट होतो आणि तिचे व त्याचे पटत नाही. पुढे ती स्त्री मेली म्हणजे दुसरी करतो. आणि ती सहनशील व नम्र असली म्हणजे तिचा भ्रतार पहिल्याने भांडत होता, तोच सुखाने तिजजवळ रहातो. याचे कारण काय की, क्रोध येण्याचे कारण कमी होते. आणि असेच जर सर्व मनुष्यास जसे पाहिजे तसे प्राप्त होईल, तर कोणी कोणास उपद्रव करणार नाही.
 परंतु ईश्वरी संकेत असा आहे की, जसजसे पदार्थ मनुष्यास पाहिजेत, तसतसे त्याने ते निर्माण केले पाहिजेत. ते जर फुकट मिळतील तर कोणी दुराचरण करणार नाही. परंतु या लोकी भ्रांती व अज्ञान फार आहे. तेणेकरून ईश्वराने मनुष्यास जे पदार्थ उद्योगाने शोधून काढण्यास सांगितले आहेत, त्यातून किती एक सांपडावयाचे आहेत, त्याचा अंत नाही. परंतु जर सर्व सापडतील तर सर्व लोक सुखी होतील; परंतु असा काळ कधी येईल हे तर्कानेही समजणे अशक्य आहे. यास्तव मनुष्यमात्राचा धर्म असा असावा की, हे पदार्थ शोधण्याचा उद्योग सर्वदा करावा. कवीने म्हटले आहे की,

अनर्थमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम् ।
अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः ।

 असा सर्वज्ञ मनुष्य कोठे आहे की, योग्यायोग्य जाणून विचार करील आणि असा वैद्य कोठे आहे की, ज्यास सर्व वनस्पतींचा निर्णय कळेल, आणि असा शब्दाचा अर्थ जाणणारा कोठे आहे की, प्रत्येक शब्दाचा अर्थ कोणत्या भाषेत, कसा होतो हे समजेल ? ही गोष्ट घडत नाही. तत्रापि मनुष्याने असा उद्योग करावा की, जितके समजेल तितके शिकत जावे. असे करता करता मरणानंतर तरी ईश्वर सर्व आपला खजिना त्यांस दाखवील व मग त्यांस अत्यंत

सुख होईल. आणि सर्वज्ञ मनुष्य झाला, तर मग त्याचे हातून काही विपरीत घडावयाचे नाही. आणि इतकाच भेद स्वर्गास व मृत्युलोकास आहे. येथे भ्रांती आहे म्हणून दुःख आणि तेथे भ्रांती नाही व ज्ञान आहे, म्हणून सुख. असो.
 परंतु ईश्वर संकेताने झाले ते कोणाच्याने फिरवत नाही. याजकरिता ईश्वराने अक्कल दिली आहे. त्या अकलेच्या जोराने मनुष्याने एकमेकांचा बुद्धिबळे करुन ज्ञानाचा पाठलाग करावा. म्हणजे त्याचे पोटी सुख आहे, गोष्ट सिद्ध आहे. परंतु पूर्वी सांगितले की, मनुष्यास प्रसंग आल्याखेरीज त्याचे गुण दृष्टीस पडत नाहीत आणि प्रसंग दैववशात् कोणास मिळतात व कोणास मिळत नाहीत. तेव्हा जगाचे आरंभी जेव्हा लोकांची वृद्धी होत चालली होती, तेव्हा हे प्रसंग वाढत चालले. एकाची संपत्ति पाहून दुसऱ्यास लोभ झाला व त्याने ती दिली नाही; म्हणजे त्यांस राग यावा. एकाने एक जमिनीचा तुकडा घेतला व तो नीट केला. त्याजवर दुसरा उगाच दावा करू लागला, म्हणजे त्या उभयतांचे भांडण व्हावे. तसेच एक सुंदर स्त्री झाली, तिचे एकाने परिग्रहण केले व तिच्यावर दुसऱ्याने नजर ठेवली. तेव्हा एक म्हणू लागला की, ही माझी स्त्री. हिचे मी परिपालन केले आणि आता हिला हा कोण नेणार ? तेव्हा अर्थातच कज्जा झाला. अशाच स्थितीत काही काळपर्यंत लोक समाईक होते.
 पाहिजे ती जमीन घ्यावी. पाहिजे त्याने स्त्री घ्यावी. धर्म मुळी काही नसेल आणि असण्याची त्या काळी गरज नव्हती. कारण जोपर्यंत दुसऱ्यास दुःख होत नाही, तोपर्यंत पाप नाही. आणि स्वर्गास इच्छित पदार्थ प्राप्त आहेत. तेथे कोणी माझी अप्सरा म्हणत नाही, पाहिजे तेथे राहतात व पाहिजे त्याचा स्वइच्छ उपभोग करतात; परंतु अज्ञान आणि भ्रांती मृत्युलोकांत फार. येथे चालेना व लोकांत कलह फार उत्पन्न होऊ लागले.
 तेव्हा जे लोक होते, त्यांतील जो प्रमुख बळवान होता, त्याने नेम करून दिले की, जी जमीन ज्याने घेतली, तीच त्याने वहिवाटावी; दुसऱ्याची घेऊ नये. तसेच जाणे जी स्त्री वरिली ती त्याची झाली. तिजवर कोणी दावा करील, तर त्यांस शासन होईल. तसे स्त्री जाणे वरिली, त्याने परस्त्रीचा लोभ करू नये. कारण तेणेकरून त्याचे स्वस्त्रीस दुःख होते. आणि असे ठरले की, ज्याने स्त्री केली. त्याने तिचे पालन करावे. आणि तिला पुत्र होतील ते त्याचे वारीस समजावे. असे परस्परांचे दुःख टाळण्याकरिता अनेक नियम केले.
 तेव्हा लोकांत पद्धत पडली आणि जो बळकट होता, तोच त्यांचा राजा झाला. त्याचे आज्ञेत इतर लोक राहू लागले; परंतु पहिल्याने लोक भाषा बोलू लागले, ह्या वेळेसच ते अक्षरे लिहू लागले नसतील; कारण भाषेच्या मागील हे प्रकरण आहे. पहिल्याने लोक एकमेकांस निरोप सांगून पाठवीत असतील व जेव्हा लोक दूर दूर गेले आणि दोन कोश वस्ती होती, ती पन्नास कोश झाली, तेव्हा सांगून पाठविणे अवघड पडू लागले. तेव्हा मग लोकांनी लेखनविद्या काढली असेल; परंतु लेखनविद्या निघण्यापूर्वी बहुत काळ गेला असेल, आणि लेखनाचे पूर्वी हे शास्त्र व राजाने सांगितलेले नियम साधारण भाषेत व कविता -प्रबंधात स्मरण राहण्याकरिता पाठ करून ठेवीत असतील आणि जागोजाग नाना प्रकारचे नियम चालत असतील.
 असे होताना काही दिवस गुदरल्यावर मागील नियम रद्द करून दुसरे राजे झाले. त्यांनी दुसरे त्यांस जे नीट दिसले ते नियम केले असतील. असे होता होता बहुत नियम झाल्यानंतर जाति झाल्या असतील. पहिला धंदा शेतकीखेरीज दुसरा नसेल. कारण पिकविणे व खाणे हे मनुष्यास मुख्य कर्म जगण्याकरिता जरूर पाहिजे. हे जर लोक न करतील, तर जीव जगणार नाहीत व पिकवावयाचा उद्योग हाच ईश्वराने लोकांस लावून दिला असेल; कारण त्याएवढा धंदा दुसरा कोणताही नाही. परंतु पुढे असे झाले की, दोनशे चारशे लोक शेत करणार झाले. तेव्हा चारशे नांगर तयार करणे, हे एका मनुष्याचे काम झाले. तेव्हा सुतारकाम ज्याचे त्याने घरोघर करावे, त्यात सुख नाही, याजकरिता एकाने ते पत्करिले. मग तो लोकांपासून चरितार्थास दाणे घेऊन नांगर पुरवावे. असे काम करू लागला, तेव्हा तो सुतार झाला.
 पुढे इतकी पुष्कळ लाकडे रानातून तोडून आणावयास व नांगर करावयास त्यांस फावेना, म्हणून दुसरा एक मनुष्य लक्कडवाला झाला. तसेच इतके लोक घरे बांधून राहू लागले, तेव्हा गवंडी झाला व नेम व शास्त्रार्थ पुष्कळ झाले. तेव्हा ते पढून इतर लोकांस सांगावयास जरूर पडली, तेव्हा ब्राह्मण झाले. त्यांनी सर्व नेम व धर्म शिकून लोकांचे दाण्यावर उपजीविका करावी, असे ठरले. कोणी कज्जा करील तर त्याने ब्राह्मणास पुसावे व त्याने शास्त्रार्थ सांगावा असे झाले. असे होता होता लोक देशोदेशी राहिले. तेव्हा एका देशात लोक चांगले सुखी आहेत, असे पाहून दुसरे देशातले लोक गरीब होते ते इकडे येऊन त्यांस लुटावयास त्यांनी आरंभ केला. तेव्हा या देशातील लोक किती एक क्षत्रिय झाले. म्हणजे त्यांनी दुसरे उद्योग सोडून शिपाईगिरी पत्करली आणि कबूल केले की; सर्व लोकांचे आम्ही परराष्ट्रापासून पालन करू. कोणास उपद्रव लागू देणार नाही. आम्हास घरी खावयास द्यावे. ते लोकांनी कबूल केले. पुढे जो शेतकरी त्याने दाणे घेऊन बाजारात जावे ही गैरसोय पडू लागली. तेव्हा एकाने व्यापार आरंभिला. म्हणजे तो दाणे घेऊन इतरांस देऊ लागला. अशाच व्यापारावर आपले पोट भरू लागला.
 असे एकमेकांचे सोईकरिता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे चार वर्ण प्राचीन काळी उत्पन्न झाले; तेव्हा प्रत्येक लबाडी करू लागले. म्हणून प्रत्येक वर्णाने कसे वागावे, याचा निर्बंध होण्याकरिता कोणी शास्त्र लिहिले, त्याजवरून त्याचा बंदोबस्त करू लागले; परंतु शास्त्रासही लोक मानीनात. तेव्हा राजास नेमणे जरूर झाले. आणि राजाच्यानेही कारभार नीट चालेना, म्हणून राजाने कसे चालावे इत्यादीसंबंधी राजनीती झाली व क्रमाक्रमाने राजाचे अमलदार, मंत्री, प्रधान आणि सैन्य हे त्याचे ताब्यात लोकांचे सुखाकरिता आले.
 पुढे दाणे घरोघर पोचवावयाचे अडचण पडू लागली, म्हणून सुवर्ण व रुपे या धातू बहुतमेहनतीने तयार होतात, त्याचे तुकडे करून ते द्रव्य चालू लागले. येणेकरून अशी सोय झाली की, ज्या ठिकाणी आपल्यास काही खरेदी करावयाचे असेल, तेथे ते तुकडे घेऊन गेले म्हणजे त्याचे बदला जो पाहिजे तो जिन्नस मिळावा. घरोघर गाड्यांवर घालून दाणे नेणे जरूर नाही. पुढे हे सोन्याचे तुकडे लोक खोटे करून आणू लागले. तेव्हा राजाने वरती शिक्का करावा असे ठरले; तेव्हा रुपये व मोहरा चालू झाल्या. याप्रमाणे धर्मशास्त्रे व नीतिशास्त्राचे मूळ आहे.
 ईश्वराने विचार दिला आहे, तेणेकरून जे वाईट दिसले, ते सर्वसंमतीने काढून टाकले व जे चांगले होते, ते ग्रहण केले. शास्त्र लोकांचे सुखाकरिता केले आहे. शास्त्राचा मुख्य हेतू हाच आहे की, लोकांमध्ये व्यवस्था व्हावी, ज्याचे त्यांस मिळावे. कोणाची जबरी कोणावर होऊ नये. मालकी कायम रहावी. प्रजेने नीट वागावे. राजाने प्रजेचे सुखावर नजर देऊन वसूल घ्यावा; जास्ती घेऊ नये. व खर्च बेताने करावा. कारण लोकांचे मेहनतीचा पैसा घेऊन राजाने आपले सुखाकरिता व हिताकरिता व डामडौलाकरिता निरर्थक शिपाई व अंमलदार बाळगणे यांजकडे खर्च करणे उचित नाही; व अयोग्य मनुष्यास कामावर न ठेवणे हाही राजाचा मुख्य धर्म होय, तर धर्म म्हणजे नियम लोकांकरिता केले आहेत ते व जी आपली योग्यता त्या योग्यतेप्रमाणे व्यापार करणे म्हणजे ब्राह्मण असल्यास विद्या व शूद्र असल्यास कृषिकर्म करणे हाच धर्म आहे. याप्रमाणे बरोबर चालून प्रतारणा न करणे व कोणास दुःख न देणे हा मुख्यार्थ आहे. आणि धर्माचे मूळ व शास्त्राचे मूळ विचाराने हेच कळते.

♦ ♦


बुद्धीने ईश्वर किती कळतो त्याविषयी


पत्र नंबर २९ : १० सप्टेंबर १८४८

 ईश्वराने मनुष्यास ज्ञान दिले आहे. तेणेकरून मनुष्याची व जनावराची स्थिती वेगळी दिसते. कारण, जनावरे व मनुष्ये एकदम उत्पन्न झाली असता जनावरे आहेत तशी आहेत. कोणी जनावर असे नाही की ते पहिल्याने रानात रहात होते व आता त्याने गाव वसविला आहे किंवा कापड विकू लागले आहे. परंतु मनुष्य मात्र दररोज अधिक शहाणे होत आहे. आणि मनुष्याचा मोठेपणा सर्व अकलेवर आहे. जर विचार नसता तर पहिल्याने जो मनुष्य झाला, त्याचप्रमाणे अजूनपर्यंत लोक असते. परंतु तसे नाही.
 पूर्वी पाण्याने काळ मोजीत होते. आता घड्याळे झाली. प्राचीन काळी निरोप पाठवीत होते, आता लिहू लागले. नाना प्रकारची शास्त्रे लिहिली, पत्र पाठविण्यास पहिली मुजरद माणसे पाठवीत होते. आता डाक बसली. आणि डाकेचाही उशीर समजून वाफेची गाडी ही सुलभ रीती काढली. अशी मनुष्य दिवसेंदिवस आपले सुखाची वृद्धी करीत आहेत. हा स्वभाव मनुष्याचा आहे. इतर जनावरांचा नाही. याचे कारण त्यांस वाचा नाही, हेच बहुतकरून असावे. किंवा त्याचे मन मनुष्याहून वेगळे रीतीचे असेल. मनुष्य बरेवाईट याचा विचार करणारे जनावर आहे, इतकेच या जनावराचे लक्षण अधिक आहे. बाकी धर्म इतर जनावरांहून यामधे अधिक नाहीत. मरण, जन्म, भक्षण सर्व इतर जीवजंतूप्रमाणे आहे, तेव्हा मनुष्याचे ठाई अक्कल एवढी मात्र अधिक दिसते. हे देणे ईश्वराचे आहे. येणेकरूनच हे जनावर आपल्या उत्पन्नकर्त्यास जाणते आणि सृष्टीकडे पाहून विचार केला तर ईश्वर आहे हे जाणण्यास अवघड नाही.
 कारण मनुष्याचे ज्ञानास साधने दोन आहेत. एक इंद्रिय णि दुसरे मन. इंद्रियाचे धर्म शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श याही करून जड किंवा अजड यांचे ज्ञान होते. जड म्हणजे पृथ्वी इत्यादिक. ज्ञान नेत्रांनी होते. परंतु वायू हा दृष्टीस पडत नाही. कारण तो फार पातळ आहे. यास्तव त्याचे ज्ञान स्पर्शेकरून समजते, तसेच उजेडाचे ज्ञान पाहून होते. कारण त्यांस धरावयास शरीर नाही; परंतु रूप आहे. तसेच एक विण्याची तार वाजविली, तिचा जोराने वायूचा भंग होतो आणि नाद उत्पन्न होतो. तो नेत्रास व शरीरास समजत नाही. कारण रूप नाही व जडत्व नाही. तेव्हा त्याचे ज्ञान कर्णेकरून होते. अशी पांच ज्ञानेंद्रिये आहेत. मला वाटते की, ही पांच इंद्रिये आपणास आहेत, म्हणून पाच विषयांचे ज्ञान होते. परंतु आणखी कित्येक इंद्रिये जर असती तर दुसरे कित्येक विषयांचे ज्ञान झाले असते, कारण जितकी इंद्रिये तितकेच ज्ञान.
 जो बहिरा किंवा आंधळा आहे, त्याला चार विषयांचे ज्ञान मात्र होते; रूपाचे किंवा नादाचे ज्ञान होत नाही. कदाचित एक सहावे इंद्रिय मस्तकास किंवा आणखी कोठे असते तर कोणत्या पदार्थाचे किती वजन आहे हे किंवा दुसरे काही पाहिल्याने व त्याचे चलनाने कळले असते. असे कित्येक चमत्कार या सृष्टीत आच्छादित असतील; परंतु पंचेद्रिय मनुष्यास ते ठाऊक नाहीत. असो. तेव्हा हे पांच विषय पांच इंदियेंकरून कळतात, हे उघड दिसते.
 या पांच इंद्रियांचा राजा मन आहे. त्याचा विषय काय, याचा विचार केला असता असे दिसते की, अनुमान करणे हे त्याचा विषय आहे. जसे आपण व्याघ्राची वाणी ऐकली म्हणजे कानांनी शब्दांचा मात्र ग्रह झाला. परंतु हा शब्द कोणाचा याची कल्पना मन करते आणि मागील गोष्टी ज्या पाहिलेल्या आहेत, त्या एकत्र करून तर्क करते की, हा व्याघ्राचा शब्द आहे, हा तर्क चालविणे मनाचा व्यापार आहे. परंतु हा मनाचा तर्क चालण्यास काही तरी दरम्यान पदार्थ पाहिजे, तेणेवरून तर्क चालतो. जर मध्ये काही पदार्थ नसेल तर मनाचा व्यापार बंद होतो. कारण मन जरी विशाळ व अती शीघ्रगती आहे, तत्रापि ते देहामध्ये कैदेत आहे. मनुष्याने देह टाकल्यावर त्याचे मनास जसा व्यासंग असेल आणि कर्माचा अभ्यास असेल तशी गती होईल. पिशाच्च इत्यादिक होतात, हे तरी पापकर्मे करून आपले मनास दूषित करतात.
 देह हा मनास आणि जिवास तुरुंग आहे. स्थूलाचे कारणाने त्याच्या शक्ती आखडत्या आहेत. मनावाचून इंद्रियांचे विषय ग्रहण होत नाहीत व इंद्रियावाचून मनाचे विषय ग्रहण होत नाहीत. जेव्हा इंद्रिये पदार्थ पाहतात तेव्हा पुढे मनाचा तर्क चालतो. ईश्वर आहे किंवा नाही, याचा सिद्धान्त करण्यास मन उपयोगी पडते. या अद्भुत जगाकडे पाहिले म्हणजे तर्क चालू लागतो. परंतु तर्क इंद्रियांचे पाठीमागून चालतो. इंद्रिये जेथपर्यंत जातात त्याचे पलीकडे मनाची उडी पडते. जेव्हा मनुष्य सृष्टी पाहतो तेव्हा त्याचे दृष्टीस एक शेत पडले, अशी कल्पना केली, तर रंगरूप इंद्रियांनी व्यक्त झाली. आणि मनाने इतके सुचविले की, इतका क्रम कर्त्याविना झाला नाही. तेव्हा शोध केला तो एक मनुष्य सांपडला. त्यांस पुसले की, हे शेत कसे झाले ? त्याने सांगितले, बी पेरले होते, त्याजमुळे झाले. तेव्हा आम्ही बी पेरून पाहिले, तो बी पेरले असता उगवते, हा नेम सृष्टीचा आहे. हे संयोगाचे फळ आहे, असे कळले.
 पण एक कल्पना राहिली की, मृत्तिका आणि बीज या जड पदार्थांचा योग झाला असता उगवण्याचे कारण काय ? यास उगवितो कोण ? जर त्यांस कर्ता नाही तर बी, पाणी आणि मृत्तिका एकत्र राहावी, त्यांस अंकुर फुटू नये, असे आहे. हे तिन्ही पदार्थ स्वस्थ का राहू नयेत ? जर त्यांस काही चौथे कारण नाही, तर त्यांनी स्वस्थ असावे. जर सृष्टीस कर्ता कोणी नसता, तर हे पदार्थ न उगवते. जसे एक घड्याळ आहे; त्याचे आतील सर्व भाग वेळ काढून एका भांड्यात ठेविले, तर त्याच संयोग करणारा असल्याखेरीज त्याचे घड्याळ व्हावयाचे नाही, असे हे जगाचे महान घड्याळ कर्त्यावाचून मृत शरीरासारखे नासले, कुजले असते. परंतु तसे नाही. त्याचा क्रम आणि जीवजंतूच्या आयुष्याच्या मर्यादा इत्यादी कार्यास सुचवितात आणि प्रत्येक पदार्थ पाहिला म्हणजे ईश्वराची मूर्ती दिसते आणि त्याची युक्ती आणि पराक्रम विदित होतात. आणि हे व्यक्त पदार्थ पाहून त्यांचे कारण तोच ईश्वर आहे, असे दिसते.
 परंतु ईश्वर हा निष्कारण आहे; कारण तो अव्यक्त आहे. जर व्यक्त होऊन त्याचे स्वरूप कळले, तर त्याविषयी आम्ही कल्पना करू; परंतु ईश्वर प्रत्यक्ष दिसत नाही; ज्ञाने करून मात्र गम्य आहे. तेव्हा त्याचे कारणाचा तर्क होत नाही. कारण पदार्थ व्यक्त असल्यावाचून तर्क व बुद्धी चालत नाही. जसा एक चितारी आहे, त्याने कलम हातात घेतले आणि तो चित्र काढू लागणार; तेव्हा त्याचे मनात आले की, मी आता चित्र काढीन; परंतु ते कसे येईल आणि त्यानंतर त्याजहून आणखी चांगले येईल की नाही ? ही जर कोणी कल्पना करू लागला तर चालणार नाही. कारण एक चित्रापर्यंत तर्क त्या कलमावरून आणि चितारी याजवरून चालेल की, हा संयोग झाला आहे; म्हणजे येथे रंग आहे, शाई आहे. त्यापेक्षा चित्र काढणार, हे तर्कास आले व रंग चांगले व कलमे चांगली, यांजवरून उत्तम चित्र काढावयाचा हेतू आहे असे समजलो; परंतु जर कोणी म्हणेल की पहिल्याने चित्र काढील त्याच्याहून दुसरे चांगले येईल की नाही ? तर कोणाचा तर्क चालेल काय ? जेव्हा पहिले चित्र पाहिले, तेव्हा त्या व्यक्त पदार्थावरून दुसऱ्याचा तर्क होईल. परंतु अव्यक्त पदार्थाविषयी तर्क करण्यास मनास शक्ती नाही. यास्तव ईश्वराचे कारण नाही, असे झाले.
 मनुष्यास तो अनादि आहे. आता त्याची शक्ती पाहिली, तर हा सर्व जगाचा कारखाना त्याचा आहे, तेव्हा सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, विस्तव इतक्याचा कर्ता तो आणि जागोजाग त्याची युक्ती पाहता मनुष्याच्या मनाला शक्ती आहे का त्याबाहेर ईश्वराची शक्ती आहे ? कारण मनुष्याच्याने मोजवणार नाही.
 जेव्हा ईश्वर आहे, हे कळले व तो पराक्रमी आहे इतके ज्ञान अल्पमती मनुष्यास झाले, त्याजवरून त्याचे पूजन आणि भजन इत्यादी निघाले. धर्ममार्ग निघाला. त्याचे भय उत्पन्न झाले. परंतु ईश्वर आहे. आणि तो महान पराक्रमी आहे. त्याचे शक्तीस दुसरे काही तुल्य नाही, असे मात्र कळते, यापलीकडे काही कळत नाही. जे कोणी भयाकरिता व लोकांस नीतीने वागण्याकरिता सांगतात की एकवीस नरक आहेत. ते सर्व भयाकरिता आहेत. तथापि खोटे म्हणवत नाही. जे जे ईश्वरास म्हणावे ते त्यांस योग्य दिसते. कोणी म्हणेल की, ईश्वर असे करितो, तर ते खरे म्हटले पाहिजे. कारण की, तो अत्यंत पराक्रमी व अनादी आहे. तेव्हा त्याचे माहात्म्य तसेच आहे. परंतु जे विचारास येत नाही. ते मात्र मत मान्य करू नये. नाही तर ईश्वरास सर्व शोभते. मग कोणाची जिव्हा व कोणाची बुद्धी ही कशीही वदो, परंतु चांगले मात्र असावे.
 आणि ईश्वराचे अगम्य बुद्धीपासून सर्व धर्म उत्पन्न झाले; याहून जास्ती ईश्वराचे काही एक कळत नाही. वेदांत व शास्त्रांत दोन शब्दांनी ईश्वराचे वर्णन केले आहे. 'तत् सत्' या शब्देकरून सृष्टीहून वेगळा असे दर्शविले. म्हणून दूरदर्शित सर्वनाम घातले आणि दुसरा शब्द 'सत्' आहे. म्हणजे आस्तिक्य वाक्य भाव. हे वर्णन बरोबर, खरे आणि विचारयुक्त आहे. यावरून हजारो पुराणिक, कोणी म्हणतो नारायण क्षीरसागरात होता, कोणी म्हणतो वैकुंठात होता, अशी नाना प्रकारची वर्णने आहेत ती खरी आहेत आणि खोटी आहेत कारण ईश्वर सर्वत्रच आहे. परंतु या सर्वांहून त्या दोन शब्दांनी जसे ईश्वराचे सत्य स्वरूप वर्णन झाले, तसे कोठेही नाही. बाकीची वर्णने ज्याची मने अडाणी आहेत त्यांस उपयोगी. परंतु वास्तविक ते आहे, म्हणजे सृष्टीहून महत्कारण वेगळे आहे, इतके जाणतो. कसे आहे? काय आहे ? त्याचे वर्णन पुराणात सांगितले आहे की, ब्रह्मदेव प्रथम पुरुष निर्माण झाला आणि विचार करू लागला तो गड़प झाले. तेव्हा ते आहे. ही श्रुती म्हटली येणेकरून तात्पर्यार्थ सांगितला.
 मला वाटते की, ब्रह्मदेव म्हणजे विचार, हा ईश्वराचा शोध करता करता घोटाळ्यात पडला आणि ईश्वर तर सर्वत्र आहे. एक गोष्ट आहे की, नानक, शीख लोकांचा गुरू, हा एके दिवशी पश्चिमेस पाय करून निजला होता, तो फकीर लोक तेथे आले. त्यांनी पुसले की, "अरे, पश्चिमेस ईश्वराचे स्थान मक्का आहे. तिकडे तू पाय का ठेवितोस ?" त्याने उत्तर दिले की, "मी हिंदू नाही व मुसलमानही नाही. मी विचाराने, धर्माने चालतो. तुम्हास जिकडे देव नाही असे दिसत असेल तिकडे माझे पाय उचलून ठेवा. तुमचा शास्त्रार्थ मला समजत नाही." असे बोलताच फकीर विरस झाले आणि नानकाचा धर्म कबूल करते झाले.

♦ ♦


मानास व दानास पात्र

पत्र नंबर ३५ : १९ नोव्हेंबर १८४८

 एक मनुष्य दुसरे मनुष्याचा मान करतो, यास दोन कारणे आहेत. एक त्याचे आर्जव म्हणजे लाभदृष्टी व दुसरा कृतोपकार. आता इंग्रज लोकांस हिंदू लोक मानितात. आणि ज्यांचे त्यांजवळ काम नाही, तेदेखील त्यांस नरमतात. याचे कारण पाहू गेले तर मला वाटते की, अज्ञानी जर दोन इंग्रज लहान मोठे पदवीचेही एका जागी मिळाले तरी ते इतके लवणभंजन करीत नाहीत. पण हिंदू म्हटला म्हणजे फारच करितो. एकादा साहेब आला म्हणजे रस्त्यातील माणसे पैस होतात. मामलेदार व मुनसफ यांचे घशास कोरड पडते व किती एक घेरी येऊन डोळे पांढरे करतात, अशाही गोष्टी ऐकण्यात आहेत. याचे कारण काय ? जर हिंदू लोक विलायतेस जाऊन त्यांची सर्व प्रकरणे ध्यानात आणतील, तर मग मला वाटते की, इतके अज्ञान, मोह आणि अतिशय मान राहणार नाही.
 मागे एलफिस्तन साहेब वगैरे यांनी आपले ग्रंथात असे लिहिले आहे की, जोपर्यंत हिंदू लोक आमचा मान देवाप्रमाणे अज्ञानाने करतात, तोपर्यंत आम्ही त्यांचे मुलखात राहू. पुढे राहणे कठीण आहे. जसे एखादे मोठे जनावर एखाद्याचे दृष्टीस पडले म्हणजे चपापतात. तसेच इंग्रज लोकांपुढे हिंदू लोकांचे होते. त्यांचे स्थान, कर्म, रीत, व्यवहार काही एक हे लोक जाणत नाहीत. याजमुळे इंग्रजांचा फार नफा आहे. या अवस्थेत हिंदू लोक जितके दिवस राहतील तितके दिवस त्यांची येथे वस्ती होईल, हा नेम आहे. जोपर्यंत जुने लोक आहेत, तोपर्यंत ही व्यवस्था अशीच चालेल, पुढची उत्पत्ति ज्ञानात श्रेष्ठ होईल, यात संशय नाही.
 पहा, इंग्रजांनी आपले शहाणपणाने या लोकांस किती घेरले आहे ! व्यवहार व राज्य सर्व त्यांचे हाती गेले आहे. याचे कारण अक्कल आहे. अक्कल कशापासून ? तर विद्येची प्रसृती व विचार इंग्रजांमध्ये फार आहेत. हिंदू लोकांमध्ये एकही नाही. मोठा धर्म आणि दान करावयाचे झाले म्हणजे दोन हजार भटांस जेवण घालतात. कोणी पाच हजार खर्च लावून देऊळ बांधतात. कोणी मनास येईल तसा पैसा टाकतात. त्यांस योजना नीट कळत नाही. आमचे लक्षात एक गृहस्थ येतो. त्याने दोन लक्ष रुपये धर्मादायास काढले. त्यापैकी देवळास पन्नास हजार गेले. पंचवीस हजार ब्राह्मणभोजन, दहा हजार खर्च देऊन लग्ने केली, असा व्यय केला. हे पाहून मला वाटते की मूर्खपणाची हिंदू लोकांपुढे हद्द झाली. हे दोन लाख रुपये जर नीट खर्च केले असते, तर किती उपयोगाची कामे झाली असती बरे ? किती दरिद्राचा ऱ्हास होता. किती ज्ञान व शहाणपण पढवावयास येते ?
 परंतु मातीत पैसा कितीही घातला तरी त्याचा काही फायदा आहे काय ? माणसे ही जिवंत माती. त्यांस काही सुखाचा उपयोग व्हावा, हे टाकून मातीचा शोभेत द्रव्य खर्च करून काय उपयोग ? जर हिंदू लोकांस वास्तविक धर्म करावयाचा असेल तर इतकाच करावा की, जेणेकरून लोकांचे अज्ञान दूर होईल. पुस्तके व विद्या वाढतील व जेव्हा हे लोक मूर्खपणाच्या मार्गातून सुटतील, तेव्हाच सुखवृद्धी होईल.
 किती एक लोकांस हा चमत्कार वाटला आहे की, आम्ही शहाणेसुरते लोक आहो आणि आम्हास 'लोकहितवादी' वेडे व मूर्ख म्हणतात, याचे कारण काय ? आम्ही त्यांस सांगतो की, जेव्हा आम्ही तुम्हांस ज्ञानी इंग्रजाशी मिळवून पाहतो तेव्हा खरेच वेडे व शहाणे लोकांमध्ये जितका फरक दिसतो तितका फरक तुम्हामध्ये दिसतो. रोगापासून तुम्ही वेडे नाहीत, परंतु ज्ञानाचे तुळणेत वेडेच आहात. आयुष्याचा उपयोग कसा करावा ? आपला जन्म लोकांस कोणत्या प्रकाराने उपयोगी करावा ? आपण पृथ्वीवर होतो याची मागे स्मृती रहावी, याविषयी उपाय करावा. सारासार विचार करून ईश्वराचे भय बाळगावे

व खरेपणा धरावा, हे कोणी पाहत नाही.
 धर्मात्मे लोक पुष्कळ आहेत व आम्ही धर्म फार केला, असे म्हणतात. परंतु आंधळ्यास त्यांनी जेवावयास घातले काय ? दीनगरिबांस वस्त्रे दिली काय ? अज्ञान्यांस ज्ञानी केले काय ? दुर्जनास सुजन केले काय ? कोणता परोपकार आपले लोकांमध्ये त्यांनी केला ?
 हल्ली इंग्रज लोक सर्व जिन्नस विलायतेतून आणतात व इकडील व्यापारी कोष्टी वगैरे उपाशी मरतात. तर त्या विद्या इकडे आणून लक्षावधी जिवांचे हित करण्याचा उद्योग कोणी केला आहे काय ? नाही.
 कोणी म्हणतो, मी कार्तिकमासी निरांजने दिली; कोणी म्हणतो, मी वैशाखात मडकी दिली, आवळे दिले, हा धर्म कशाचा? हा मूर्खपणा आहे. भटांनी वेड लावावे आणि गृहस्थांनी त्याचप्रमाणे नाचावे. यजमानास सांगावे की, उष्णकाळी क्षीरभोजन करावे, म्हणजे यजमान पुण्य जाणून तसे करितो. पण वास्तविक यामध्ये पुण्य कशाचे ? आळशी लोक द्रव्य खाऊन जातात. आणि मालकास पुण्य पुण्य म्हणून ठकवितात, इतकेच आहे. वास्तविक पुण्य हेच की, यथायोग्य पात्र पाहून धर्म करावा. तान्हेला आहे त्यांस पाणी द्यावे. कुंभ भरून ब्राह्मणास दिला व त्याने तो जाताना टाकून दिला, कारण त्याचे घरी हौद आहे व विहीर आहे. मग त्याला यजमानाच्या कुंभातील पाण्याचे काय करावयाचे आहे ? अर्थातच तो ते मडके ओतून टाकतो. तेव्हा हा धर्म कसा ? परंतु हाच धर्म आहे, असे जे म्हणतात ते मूर्ख नव्हत काय ?

♦ ♦


स्नान-संध्या

पत्र नंबर ३६ : २६ नोव्हेंबर १८४८

 वास्तविक धर्म सोडून व ईश्वराची भक्ती सोडून हिंदू लोक विलक्षण मार्गास लागले आहेत. ते असे की, किती एक लोक स्नानसंध्यादि कर्मे करतात. त्यांस वाटते की, मोक्षाचे साधन हेच आहे. प्रातःकाळी उठून स्नानसंध्या करावयास बसून, डोकीस रुद्राक्षांच्या माळा घालून, भस्मलेपन करून, ढोंग करून, चार घटका बसावे म्हणजे त्यात ईश्वराची भक्ती झाली. मग सर्व दिवस वाईट कर्मे व असत्य भाषणे करून, लोकांच्या माना मुरगाळाव्या, तरी चिंता नाही. परंतु आम्हास असे वाटते की, हे स्नानसंध्या करणारे आपले आयुष्य व्यर्थ घालवितात, त्यात काही ईश्वरप्राप्ति नाही. ते बकध्यानी, मूर्ख व ढोंगी आहेत. असे म्हटले आहे की,

यं मां सेवेत सततं न नित्यं नियमान्बुधः ।
मान्यतत्त्वं कुर्वाणो नियमान् केवलान् भजन् ॥

(मनु. अध्याय ४ श्लोक २०४)


परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् ।

(व्यास)

 या वचनेकरून असे ठरते की, नीती आणि सदाचरण हे लोकांचे कल्याण करण्यामध्ये आहे. याशिवाय पुण्य नाही. केवळ जे कर्माचे भजन करतात, ते ढोंगी आहेत. नीतिपर वर्तणूक असावी, हे प्रथम कर्म होय. नंतर कर्माची खटपट केली सारखी, न केली सारखी. याशिवाय कबीर म्हणतात, 'मन चंगा तो खाथोटमें गंगा.'
 याप्रमाणेच कलियुगी साधु झाले त्यांचे मत आहे. तस्मात् ढोंग करणारास पुण्यवान् जाणतात हे खोटे आहे. एका फारशी ग्रंथात पाहण्यात आले आहे की, एका अन्यायी राजाने एका पुण्यपुरुषास विचारले की, 'मी ईश्वराचे भजन कोणत्या रीतीने करावे ?' तेव्हा त्या साधूस त्याची वर्तणूक ठाऊक होती म्हणून त्याने उत्तर केले की, 'ईश्वराचे भजन तुला उत्तम हेच आहे की, तू सर्व दिवसभर आणि रात्री निजत जा.' तेव्हा राजाने पुसले, 'असे का' तेव्हा त्याने उत्तर दिले की, 'याचे कारण ईश्वराचे मुख्य भजन करणे म्हणजे त्याने जे जीव उत्पन्न केले, त्यातील ज्ञानी जीव जो मनुष्य त्याचे कल्याण करावे. आणि ही गोष्ट तुला निद्रा लागल्याखेरीज होणार नाही. कारण तुझ्या जागृतीने किती एक मेले जातील व अन्याय होतील. याजकरिता दुष्टास झोप हीच ईश्वरभक्ती आहे.' तेव्हा तो राजा त्या साधूस शरण गेला व त्याने जुलूम सोडून दिला.
 या दृष्टान्तावरून असे ठरते की, कर्माची खटपट करण्यामध्ये ईश्वरभजन नाही. ईश्वराचे भयाने वर्तणूक केली म्हणजे तीच भक्ती आणि तेच पूजन. तत्रापि जो अशी खटपट व ढोंग करितो त्यांस लोक पुण्यवान म्हणतात, हे आश्चर्य आहे. अमका गृहस्थ त्याचे कर्म इतर कसेही असो, परंतु प्रातःकाळी उठल्यापासून प्रहरभर स्नानसंध्या करण्याचा त्याचा नेम मोठा सदृढ आहे. असो. त्याने पूर्वजन्मी असेच केले. त्याचे फळ या जन्मी त्यांस आले आहे. या जन्मी स्नानसंध्या करतो. त्याचे फळ त्यांस पुढले जन्मी येईल, असे म्हणतात आणि त्याचे वाईट कामावर पडदा घालितात. हा मूर्खपणा आहे. ज्याचे कर्म वाईट असते आणि ज्याने जन्मभर दगडावर पाणी ओतले आणि झाडाची फुले तोडून रास केली. तरी देव त्याजवर कृपा करील काय ? नाही, सद्धर्माची मुख्य खूण हीच की, मनुष्याचे कल्याणाकडे लक्ष असावे. परंतु मनुष्याचे कल्याण करणे म्हणजे लुच्चे, सोदे यांचे रक्षण करणे किंवा फुकट जेवणारे लोक यांची पंगत माजविणे नव्हे. पात्रापात्र पाहून अज्ञान जे आहेत त्यांस शहाणे करण्याची योजना करणे. जे रोगी आहेत, त्यांस औषधपाणी करणे, जे दरिद्री व पीडित आहेत, त्यांस सुख देणे, आईबापांचा प्रतिपाळ व मान करणे हीच नीती व हेच पुण्य. जो देवावर एकही फूल घालीत नाही, परंतु वर्तणुकीने पवित्र व नीतिमान आहे आणि परक्याचे दुःख जाणतो तो चांगला, जो लाख तुळशी रोज वहातो व आईबाप वा भावाचा शत्रू, इंद्रियभ्रष्ट व लोकांचे उपयोगी किमपि पडावयाचा नाही, तो चांगला नव्हे. नामदेव म्हणतो,

जग चालले उफराटे, कोण जाणे खरें खोटें ।
जित्या तुळशी बेला तोडा, पूजां निर्जीव दगडा ।
मुष्टी धरुनि मेंढा मारा, ब्राह्मण म्हणती यज्ञ करा ।
नामा म्हणे सर्व खोटे, भजन चाललें उफराटें ।

 याप्रमाणे साधूची भाषणे आहेत. याजवरून उनाड ब्राह्मणास राग येईल, कारण की येणेकरून त्याची फी बुडते, जर कोणी अभिषेक करील किंवा तुळशी वाहील, तर त्यांस पैसा मिळेल. किती एक लोक आपले भजनाची मजुरी ब्राह्मणास सांगतात. ती अशी की, ब्राह्मणांनी उपास करावा व त्यांस दक्षणा द्यावी. हे नफे ब्राह्मणांचे बुडतील. याजकरिता सदरील मत खरे आहे तरी ब्राह्मणांचा व भट मंडळींचा असा अभिप्राय पडतो की, डामडौल केले पाहिजेत. कारण त्याशिवाय त्यांचा निर्वाह नाही; परंतु खरी गोष्ट आहे ती त्यांणी कबूल करावी आणि लोकांचे अज्ञान दूर व्हावे, हेच चांगले. बहुधा जे ढोंगी स्नान-संध्या करणार असतात, ते तर फारच लबाड असतात, असे बहुधा पाहण्यात आहे. त्यांस असे वाटते की, आम्ही ईश्वराची भक्ती फार केली. आता काही केले, तरी चिंता नाही; परंतु हे बातळ आहे. अशा करण्याने ईश्वरप्राप्ति नाही; सत्कर्माने मात्र ईश्वर मिळतो.
 किती एक लोक असे आहेत की, हातात माळ घेऊन रोज लाख वेळ राम राम म्हणतात. असे करण्यास त्यांस त्यांच्या गुरूंनी सांगितलेले असते; परंतु अशी बडबड घशास कोरड पडेपर्यंत जरी केली, तरी त्यापासून फळ काहीही होणार नाही. जर लबाडी सोडली, तर मात्र फळ होईल. मग देवाचे नाव घ्या किंवा नको. जर आपण ईश्वराचे प्राणी आहोत, तर त्याचे भजन आपण असे केले पाहिजे की, जेणेकरून त्याची प्रीती आपणणांवर होईल. ज्या गृहस्थाचे आपणास साधन करावयाचे असते, त्याचे नाव जर घेत बसलो, तर काही उपयोग आहे काय ? तर त्यांस कृपा येईल, असे केले पाहिजे. त्यांस प्रिय आचरणाने त्याची प्रीती संपादन करावी. जर त्याचे घरी तगाद्यास बसले आणि म्हटले की अमके दे तर जाईन, तर तो मूर्खपणाचा निर्धार होईल. उत्तम पक्ष हाच की, मनुष्याने मनुष्याचे कल्याण करावे. देवाचे भय धरून नीतीने चालावे, म्हणजे ईश्वर प्रसन्न होतो. त्याचे जे प्राणी त्यांस उपद्रव केला आणि देवाचे नाव घेतले व त्यावर खंडीभर पाला घातला, तर त्यात पुण्य कशाचे ? यास्तव लोकांनी जर कोणास चांगलेवाईट म्हणावयाचे असेल तर त्याच्या स्नानसंध्येकडे पाहू नये; त्यांचे वर्तणुकीकडे पहावे. कारण स्नानसंध्या हे केवळ पोकळ आचरण आहे. त्यात काही उपयोग नाही. खरे पुण्य ते वेगळे आहे. याजकरिता पुष्कळ अनुष्ठाने केली, तरी त्यात जीव नाही. ब्राह्मणांकडून मजुरी केली, तरी सारखेच. त्यापेक्षा मजुरांची मजुरी बरी. चार ब्राह्मण लावून अभिषेक करावा, त्यापेक्षा चार मजुरदार लावून रस्ता नीट करावा, हे चांगले; कारण ती लोकहिताची मजुरी आहे. यास्तव स्नानसंध्या करण्यात काही पुण्य नाही.

♦ ♦


देवपूजा

पत्र नंबर ३७ : ३ डिसेंबर १८४८

 शास्त्रामध्ये सर्व धर्मप्रकरणी बहुत मार्ग लिहिले आहेत. कोणी म्हणतात, जिवास भजावे, जीव तोच शिव आहे. व कोणी म्हणतात शिव अधिक आणि कोणी म्हणतात विष्णू, इत्यादी अनेक मते आहेत. तसेच अग्निसेवा, यज्ञ इत्यादिक श्रौत मार्ग आहेत. कोणी सूर्योपासक, कोणी शाक्त व फार अमंगळ आहेत. त्यांची पूजा सर्वांहून मूर्खपणाची आहे. ती केवळ मूर्ख व अविचारी असतील, ते मात्र स्वीकारतील. असे हे अनेक मार्ग आहेत.
 परंतु माझे मत सर्व मार्गांतील एक मार्ग खरा आहे, तो कोणता म्हणाल तर ऐका. मी त्यांस शास्त्रातून प्रमाणही काढून देईन. तो असा की, ईश्वर काही मनुष्यास दृष्ट नाही, त्याचे अस्तित्व सृष्टीकडे पाहिल्याने मात्र समजते. याप्रमाणे सर्व लोकही कबूल करीतात. तेव्हा देवाचे भजन करणे योग्य व तो सर्वांहून वरिष्ठ आहे, परंतु त्याचे भजन करावे कसे, हे कळले पाहिजे. ईश्वरास जर आम्ही फुले अर्पण केली, तर पहा बरे, त्याने पृथ्वी निर्माण केली, तेव्हा त्यांस काही कमी आहे काय ? तसेच त्यांस नैवेद्य दाखवावा, तर तो उपाशी आहे काय ? त्यांस कोणताही उपचार करावयास मनुष्य योग्य नाही, कारण तो परिपूर्ण आहे. याजविषयी पूर्वीचे ऋषींचे मत असेच आहे.
 परंतु लोक सामान्यतः मूर्ख आहेत. त्यांस वास्तविक ईश्वर कळत नाही. याजकरिता ते त्यांस बळेच स्वरूप देऊन सगुण करून ठेवितात. त्याचे वर्णन असे करितात की, त्याचे हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहे. म्हणजे त्याचा अर्थ इतकाच की, तो लोकांस शासन करणारा आहे. चक्रे करून त्याचा अनादिपणा व अनंतपणा प्रगट होतो. ईश्वराची स्वरूपे अनेक प्रकारची वर्णन करतात. मूर्ख लोकांस ईश्वर कळण्याकरिता ही वर्णने केली, परंतु सार इतकेच की ईश्वर एकच आहे. त्यांस ब्राह्मणही नाकबूल नाहीत. परंतु त्या एक ईश्वराचे मनुष्याने मनन करावे. त्याचा विचार केला असता परमात्मा जो भगवान त्यांस मनुष्यांनी मूर्खपणाने भजावे. हेही अयोग्य हे व देवास लहान मानून मूर्ती करतात. याची निंदा गीतेत दोन ठिकाणी केली आहे, ते श्लोक -

अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥

(अध्याय ७, श्लोक २४)

 या प्रकारे करून ईश्वरास मूर्त मानणे हे मूर्खत्व आहे. ईश्वर अमूर्त हे त्याचे कृत्यावरून समजते; कारण की, त्याणे केलेली सृष्टी ती देखील मापता येत नाही. तेव्हा तिचे कर्त्यास परिमित जाणणे हा केवढा अपमान आहे ? यास्तव ईश्वराचे वर्णन आणि भजन करावे. इतकेच त्यांस पुरे. हृदयी त्याचे चिंतन करावे. हेच त्याचे थोरपणास योग्य आहे. आणि इतर उपचार नैवेद्यादिक त्यांस करू नयेत, मनुष्यास करावेत. काही देणे असल्यास देवास देऊ नये, कारण देव उणा व उघडा नाही. यास्तव मनुष्यास दिले तर देवास दिल्याहून अधिक आहे. ईश्वराचे दर्शन होत नाही. तेव्हा त्याचे ध्यान मनेकरून करावे. जे काही कृत्य आणि उपचार करावयाचे ते पात्रापात्र पाहून मनुष्याचे ठायी करावे हे उत्तम. आणि दयाधर्मास पात्र मनुष्य आहे, ईश्वर नाही. ईश्वर वर्णनास मात्र योग्य. जे काही अर्पण करावयाचे आहे, ते मनुष्यास करावे, देवास नको. तो सर्वत्र पूर्ण आहे.
 दगडास भजन आणि नैवेद्य कशास पाहिजे ? त्यापेक्षा ब्राह्मणास बरा, कारण तो प्रत्यक्ष खाणारा आहे. ईश्वराचे व्यक्त स्वरूप ही सृष्टी आहे. तेव्हा या व्यक्त स्वरूपाचे ठायी काय ते अर्पण करावे. दगड हा काही ईश्वराचे प्रत्यक्ष स्वरूप नाही. दगडापेक्षा जिवंत पदार्थ बरा, त्यांस क्षुधा आहे व तृष्णा आहे. त्यांस सोडून दगडापुढे अन्न ठेवावे, यात काय फळ ? एखादा गरीब अंधकारात बसला आहे. दरिद्राने पीडित आहे, ज्यास पैसा मिळत नाही, पैशाचे तेल आणून देऊन उजेडात बसविले तर बरे किंवा ते सोडून त्यांस अंधारातच ठेवून देवळातील मूर्तीजवळ पैशाचा कापूर नेऊन जाळावा हे बरे ? कोणत्याने ईश्वर तृप्त होईल ? ईश्वराने जे पदार्थ सजीव निर्माण केले आहेत, त्याचे रक्षण करावे, ते सोडून देवळातील दिवे लावावे तर काय फळ ?
 मला वाटते की, या गोष्टीचा ईश्वरासही क्षोभ येईल, कारण विचारेकरून असे कळते की, ईश्वराची इच्छा मनुष्याने मनुष्यास सांभाळावे. केवळ देवाची पूजा करावी त्याचा उपयोग काय ? जी गावची रयत आहे, तिने पाटलाकडे जाऊन त्याचे आज्ञेत वा वागावे किंवा गवरनरसाहेबापुढे जाऊन रहावे ? गवरनर त्याविषयी काय करू शकेल ? तद्वत मनुष्याने चांगला मार्ग सोडून गरिबास उपयोगी पडावयाचे सोडून कापूर देवळात जाळला तर उपयोग काय ? या मूर्खपणाने किती एक पैका व्यर्थ खर्च करतात व त्यांस धर्म म्हणतात. आणि त्यापासून लोकांचा काही उपयोग घडत नाही.
 असे किती एक लोक व्यर्थ द्रव्य टाकतात; त्यांस जर सांगावयास गेले, तर त्यांचे डोकीत लहानपणापासून वेड भरलेले असते, म्हणून ते ऐकणार नाहीत, आणि विचारही करणार नाहीत. असे दृढ मूर्ख ते आहेत. यास्तव त्याचे अंतःकरणात बोध व्हावा, म्हणून हे पत्र मी लिहिले आहे. वास्तविक धर्म कोणता आहे, ते त्यांणी समजावे, हे उत्तम आहे.

♦ ♦


डोले करण्याची चाल

पत्र नंबर ४२ : ७ जानेवारी १८४९

 सांप्रत हिंदू लोक धर्माभिमानरहित भ्रष्ट झाले आहेत. हे त्यांचे कृतीवरून समजते पहा, जातीचे हिंदू लोक असून मुसलमानाचा धर्म आचरितात. हल्ली पुण्यात मुसलमानांचे डोले दहा पाच होतात आणि हिंदू लोकांचे शंभर होतात. व हे लोक जसे बापाचे श्राद्धाची व काशीयात्रेची काळजी व तयारी करितात, तसा उद्योग करून डोले करतात, हे हिंदू धर्मास मोठे लांच्छन नाही काय ?
 जे हिंदू धर्मास जाणत असतील व खरे पंडित असतील त्यांस हा दुराचार पाहून लाज वाटावी, परंतु तेही डोळेझाक करतात, हा केवढा आंधळेपणा आहे ? अज्ञान फार झाल्यामुळे मुसलमानांपुढे बसून त्यांचा संस्कार आपले देहास करून घेऊन फकीर होतात. यात व ख्रिस्ती धर्माचा बाप्तिस्मा घेण्यात काही अंतर नाही, एक मुसलमान होतो, दुसरा इंग्रज होतो. दोघांचा संस्कार सारखा आहे. परंतु याजविषयी लोकांस अगदी शरम नाही. ते कर्ज काढून ताबूत करतात. व अडाणी लोक त्यांस नवस करतात. तसेच ब्राह्मण लोकही काही काही भ्रष्ट झाले आहेत असे माझ्या ऐकण्यात आहे. ब्राह्मणांच्या बायका ताबूत निघतात त्या दिवशी नवसाच्या घागरी ताबुताचे पुढे ओततात, देवावर अभिषेक करावयाचा सोडून अशी कर्मे करतात, तेव्हा ईश्वराचा क्षोभ या लोकांवर कसा होणार नाही ? व्हावा हेच योग्य. हे लोक अज्ञानाने जनावरांपेक्षादेखील मूर्ख झाले. हिंदू धर्म बुडोन गेला. आता धर्म म्हणून कोणी जाणत नाही. लग्ने, मुंजी या चाली पडल्या म्हणून करतात. त्या धर्म काहीच समजत नाहीत. मुसलमानांची चाल संपूर्ण हिंदू लोकांनी घेतली आहे. जर या देशात कोणी विद्वान असते तर आजपर्यंत यांचा प्रतिबंध करण्यास यत्न करिते.
 पण पेशवे व त्यांचे पदरचे मोठमोठे शास्त्री असून त्यांणीदेखील हा विचार केला नाही. हिंदू लोक मुसलमान होत, त्यांस मदत मात्र करीत गेले, परंतु त्याची बंदी करावी, हे त्यांस योग्य होते. जांस हिंदुस्थानात धर्मस्थापना करावयाची असेल त्यांणी शंकराचार्यांसारखे सर्व हिंदुस्थानात धर्म सांगत फिरले पाहिजे, तेव्हा हे ताबूत करण्याचे काम बंद होईल; नाही तर मोठा हा अधर्म आहे. यावरून हिंदू लोकांची चित्ते समजतात.
 चालीस विरुद्ध काही केले तर मात्र वाईट म्हणतात. अधर्म म्हणजे काय, याचे त्यांस ज्ञान नाही व धर्म याचा अर्थही कळत नाही. घरात चाल चालत आली असते त्याप्रमाणे आंघोळ करतात, भस्म लावतात, फुले आणून पूजा करतात. त्याचा अर्थ त्यांस कळत नाही. डोले करतात, ते मुसलमानांचे अन्न एके ठिकाणी बसून खातात. त्यांस कोणते प्रायश्चित्त असावे ? हिंदू धर्माशी विरुद्ध मुसलमान व ख्रिस्तीयन लोक सारखेच आहेत. आणि ख्रिस्तीयन कोणी झाला तर सर्व लोक त्याविषयी आश्चर्य करतात. परंतु हे हजारो लोक मुसलमान होतात, याविषयी ते स्तुतीच करीतात. त्यापेक्षा जी गोष्ट फार प्रघातात पडली ती नीट दिसते आणि जिचा प्रघात पडला नाही, ती वाईट दिसते, तात्पर्य खरे-खोटे, वाईट- बरे कोणी पहात नाही, चालीवर जातात.
 हिंदू लोकांमध्ये दुसरा एक दुर्गुण असा आहे की, त्यांस डौल आणि इतमाम फार आवडतो. जर इंग्रज लोक ताबुतासारखा काही धर्म काढून पुष्कळ पैसा खर्च करतील तर बहुत हिंदू लोक त्यांचे धर्मात जातील. परंतु शुष्काशुष्की कार्य होत नाही. हिंदू लोक ज्या ठिकाणी डौल असेल त्यांस चांगले व थोर म्हणतील व ती गोष्ट करतील. याचे कारण ज्यांचे ठायी अज्ञान फार, ते डौलाने फसले जातात. जर खरे खरे सांगितले तर त्यांची आवड बसत नाही. पहा की, मुसलमान लोक हिंदुस्थानात परदेशाहून येऊन येथे त्यांणी वास्तव्य केले व धर्म चालू केला व हिंदू लोकांना ती मौज वाटली म्हणून हिंदू लोकही नवस करतात, व त्यांस देव मानतात. जर या डोल्यांमध्ये तमाशा आणि डौल नसता तर कोणी हिंदू लोक त्यांस न स्वीकारते, यात संशय नाही.
 हिंदू लोकांची मने फार हलकी आहेत. त्यांस राजाही तसाच पाहिजे. राजाजवळ डौल असला म्हणजे त्याने अन्याय केले तरी चिंता नाही. पहा, बाजीरावाचे वर्णन भट व भडवे पुष्कळ करतात. कोणी म्हणतात की, दोन्ही काळ ते वेळेस संध्या करीत होते. ब्राह्मण भोजन घालीत होते. श्रीमंत असे होते, तसे होते. पण वास्तविक त्यांचे गुण कसे होते, ते काही कोणी बोलत नाही, कारण त्यांच्या संपत्तीने हे लोक भुलले होते आणि या लोकांमध्ये द्रव्य हीच अब्रू आहे. अब्रू आणि द्रव्ये ही निराळी नाहीत.

सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते ।

 या श्लोकेकरून कवीने लोकांचे मूर्ख समजुतीचे वर्णन केले आहे आणि याप्रमाणे प्रत्यक्षच आहे. इंग्रज लोकांनी हिंदू लोकांस नाव दिले आहे की, "सेमी बार्बरस" म्हणजे "अर्धे रानटी" तसे हे लोक आहेत खरे. हे पूर्ण रानटी म्हणावे तर नागवेउघडे फिरत नाहीत. एवढेच कमी आहे.
 परंतु या लोकांस ज्ञान अगदी नाही आणि भोळसर फार. जो लाथ मारावयास योग्य, त्याचे हे पाया पडतील आणि त्याने थोडासा डौल घातला तर त्यांस महाराज म्हणतील आणि भुलतील. असे हे लोक विलक्षण आहेत. वरवर भाषण करावयाची त्यांस फार खोड आहे. कोणतेही गोष्टीचा त्यांस अभिप्राय पुसला, तरी त्यांस उत्तर देता येत नाही व त्यांस काहीच कळत नाही. खाणेपिणे याचे मात्र त्यांस ज्ञान आहे. परंतु ते ज्ञान जनावरांसही स्वभावेकरून असते. मनुष्यास मुख्य सुशिक्षा व नीती यांची मूळ तत्त्वे माहीत पाहिजेत, परंतु ब्राह्मणांस हे काहीच नसते. पूर्वी ब्राह्मण अर्थज्ञ होते. धर्माचा विचार करीत होते, ग्रंथ लिहीत होते. पढवीत होते व धर्मात वाईट असेल ते सुधारीत होते. असे मागील ग्रंथांचे परंपरेवरून दिसते.
 हल्ली लहान मुलांस ब्राह्मण लोक मुंज झाली म्हणजे भटाचे स्वाधीन करतात. परंतु त्याचे ज्ञान गुरूस व शिष्यास काहीच नसते. विद्या या शब्देकरून ज्ञानाचा अर्थ होतो. ज्यामध्ये ज्ञान नाही ती अक्षरे वाळल्या झाडाप्रमाणे आहेत. याजकरिता ज्ञान असले पाहिजे. परंतु ब्राह्मण लोक अज्ञानी फार आहेत. हे भटांचे काम झाले. नंतर पंतोजी याचे काम असे आहे की, त्याणे लिहावयास व वाचावयास शिकवावे. आणि वेताळपंचविशी आणि शुकबाहात्तरी ही वरवर वाचवावी. या दोन्ही बखरी मूर्खपणाच्या माहेर आहेत. त्यापासून नीती येणार नाही. अशी शिक्षा असल्यावर कोण मूर्ख होणार नाही ?
 यास्तव मला वाटते की, शास्त्री, पंडित व जे कोणी शहाणे असतील ते असोत. परंतु बहुतकरून पढतमूर्ख फार आहेत. जे लोक-हितेच्छू असतील त्यांणी शास्त्राधारे एक ग्रंथ करावा की, जेणेकरून सर्व आपले ब्राह्मणांस धर्माचे ज्ञान सुलभ रीतीने होईल. आणि हा ग्रंथ चालते भाषेत असावा, आणि मुंज झाली म्हणजे संध्या वगैरे कर्मानुष्ठान करावयाचे त्याचे अर्थही त्यात असावे. आणि जे जे ब्राह्मण लोक करीतात त्याचे तात्पर्य त्यात असावे. तसला ग्रंथ मुंज होताक्षणी मुलास पढवावा म्हणजे त्यांस आपला धर्म काय हे तरी कळेल. व एणेकरून धर्माचा उद्धार होईल. सार्थ ग्रंथ पढविल्यावाचून काही उपयोग नाही. मुंजीत बहुल्यावर मुलास बसवून उपदेश केला, तर त्यांस आणि डोल्यांत फकीर व्हायचे समयी मुसलमान कलमा पढतो तो उपदेश करून घेणारास फळ सारखेच आहे. याचा किंवा त्याचा त्यांस अर्थ ठाऊक नाही. बापाने मुंज केली आणि पुढे फकीराने फकीर केले, तात्पर्य एकच. एकास वाईट म्हणणे व दुसऱ्यास चांगले म्हणणे, हे ज्ञान झाल्यावाचून होत नाही.
 जेव्हा एकाचा अर्थ कळेल आणि हे चांगले असे वाटेल, तेव्हा दुसरे वाईट म्हणेल. नाही तर म्हणणार नाही. सांप्रत हिंदू लोकांस आपला धर्म अमूक व अमूक गोष्ट चांगली आहे, हे समजत नाही, जे ओघास येईल ते चांगले म्हणतात व जसा प्रसंग येईल तसे करीतात. धर्म नाही, कर्म नाही, चांगले काय व सत्य काय याची ओळख नाही व ज्ञानही नाही. याजपासून हे सर्व अनर्थ झाले आहेत.

♦ ♦


निरुद्योगीपणाच्या चाली


पत्र नंबर ४३ : १४ जानेवारी १८४९

 या काळी लोकांस काही उद्योग नव्हता, पीक फार येत होते व खावयास लोक कमी होते, त्या काळी वेळ जाण्याच्या किती एक युक्ती काढल्या आहेत. जसे आता इंग्रज लोक सक्त मजुरीची शिक्षा देतात, याचे कारण असे आहे की, जे आळशी लोक असतात, ते चोऱ्या करून उपजीवन करतात, त्यांस मेहनत करण्याची सवय लागावी, म्हणून अशी शिक्षा देतात.
 तद्वत हिंदुशास्त्रात किती एक कलमे आहेत, त्यांचा उपयोग पाहिला असता काही एक नाही व त्यात नीती किंवा विद्याही नाही. फक्त काळ मात्र जावा अशी कामे त्यात कित्येक आहेत. ती कोणती ते ऐका. पुराणात असे आहे की, एक एक तांदूळ निवडावा आणि लक्ष तांदूळ मोजून देवावर घालावे. माझे पाहण्यात कित्येक धर्मशील अशा स्त्रिया आल्या आहेत की, त्यांनी चातुर्मासात चार महिने आपले डोळ्यांत रक्त उतरून घेऊन पाच लाख तांदूळ आणि गहू मोजले व त्यांच्या पुड्या बांधून मोठ्या प्रयत्नाने त्या देवास वाहिल्या. किती एक स्त्रिया अशा आहेत की, पाच वर्षेपर्यंत वाती करतात, रुद्रवाती, दगडवाती, धोंडेवाती अशा प्रकारच्या कापसाच्या वाती सगळा दिवस त्यात घालून तयार करतात. आणि एका दिवशी त्याजवर दहा रुपयांचे तूप घालून देवळात जाऊन त्या जाळतात, यापलीकडे काही मूर्खपणा राहिला नाही. त्यांस पुसले तर म्हणतात की, उपाध्येबावांनी असे करावयास सांगितले आहे व यामध्ये फार पुण्य आहे!
 अहाहा ! काय हे पुण्य ! इतकी वर्षे जर उपयोगी विद्या वगैरे शिकण्यात खर्च केली तर केवढा लाभ होईल ? व केवढी योग्यता होईल ? परंतु पुराणिक देवळात बसून ऐकणारास फार वेड लावतात की, मी एक स्त्री पाहिली, तिचा नेम तर फारच विलक्षण होता. तिने गाई दाणे घालावे आणि तिचे शेणात जे दाणे पडतील ते शेण घेऊन गोमूत्रात धुवावे. आणि ते दाणे निवडून दळून त्याची भाकरी करून खावी. याप्रमाणे चार महिने तिने शेणातील दाण्यांवर उपजीविका केली. कधी पसाभर व कधी चार पैसे भार सापडत, तितकेच खाऊन ती राही. आणि भटजीबाबा तिचे व्रत मोठे व ती मोठी पुण्यवान बायको म्हणून स्तुती करीत. आणखी अशीच कित्येक व्रते आहेत. त्यांचा अर्थ पाहिला तर दुसरा काही नाही, परंतु बायकांचा वेळ जात नाही, तो सुलभपणे जावा आणि त्यांस काही उद्योग, सुख सापडावे, म्हणून या युक्ती केल्या आहेत.
 परंतु भोळसर लोक हेतू जाणत नाहीत. दुसरे असे आहे की, कार्तिक मासी लोक दीपदान करीतात व करंड्याफण्याची वायने देतात. हा धर्म अगदी उलटा आहे. कारण दोन पैशांचे टिवळे, त्यात दमडीचे तूप घालून ब्राह्मणास देतात. त्यापासून जो दान घेतो त्याला काही उपयोग नाही. आणि निरुपयोगी पदार्थ करण्यात कारीगरांचा वेळ मात्र जातो. तसेच भटाचे करंड्याफण्या करतात, त्यात काय अर्थ आहे ? ते जिन्नस् कोणाचेही उपयोगी नाहीत. व्यर्थ पैसा जातो. दान घेणारास त्याचा उपयोग नाही व लोकांसही नाही आणि देणाराचे मात्र नुकसान. तेव्हा असली मूर्खपणाची दाने हे लोक कशाकरिता करीतात ? दान करण्याचा हेतू न जाणून शास्त्रात लिहिले आहे की, दीपदान करावे, म्हणून करतात. परंतु शास्त्रकारांचा हेतू जाणून दान करीत नाहीत. मला वाटते एक समई गरिबास दिली आणि टिवळी पन्नास वर्षे दिली तरी फळ सारखेच आहे. परंतु लोक मूर्खपणाने जावयाचे गोष्टीसारखे शास्त्र चालवितात.
 एक जावई घरून निघून सासऱ्याचे घरी जाऊ लागला. तेव्हा त्याचे बापाने त्यांस सांगितले की, सासरा काही गोष्टी पुसेल तर काहींस होय म्हणावे व काहींस नाही म्हणावे. जावयाने तेवढीच गोष्ट ध्यानात ठेवली आणि हेतू सोडून व आपली बुद्धी चालविण्याची सोडून दिली. पुढे सासऱ्याची गाठ पडली तेव्हा प्रथम प्रश्न त्याने केला की, "केव्हा आताच आला ?" त्याने "होय." म्हटले. दुसरा प्रश्न "व्याह्याची प्रकृती बरी आहे ?" त्याने "नाही" म्हणून उत्तर दिले. तेव्हा सासऱ्याने पुसले "अहो; फार प्रकृती बिघडली आहे काय ?" जावयाने उत्तर दिले की, "होय." "आम्ही भेटीस गेलो तर भेट होईल की नाही ?" त्याने "नाही" म्हणून जबाब दिला. तेव्हा व्याही घाबरा झाला आणि जावयास घेऊन व्याह्याचे घरी आला, तो तो यथास्थित आहे. मग चौकशी केली तो जावयाने असे सांगण्याचे कारण समजले.
 जसा हा मूर्ख जावई सांगितल्या शब्दाप्रमाणे वागला आणि बुद्धी चालविली नाही, विचार केला नाही तसे हिंदु लोक सांगितल्या शब्दाचे आहेत. त्यांस हेतू समजणे हे ठाऊक नाही. याप्रमाणेच पाठ करणारे लोक आहेत. कोणी गीता पाठ करतो, कोणी विष्णुसहस्रनामाचा पाठ करितो, कोणी सप्तशती वाचतो, कोणी वेद पाठ करतो. परंतु त्यांचा अर्थ त्यांस समजत नाही. पाठ करणारे लोक भारवाहक व वेडे आहेत. पण लोक ते अगदी विसरले आणि पाठ करणाऱ्या लोकांचे फार दंभ वाढले. मला वाटते की, एक अष्टकच संहिता सार्थ म्हणेल व शास्त्र जाणेल तर तो घनपाठ्यापेक्षा श्रेष्ठ. परंतु पाठ करणारे हे अगदी मूर्ख आणि मुख्य हिंदू लोक या स्थितीवर येण्याचे कारण व विद्या बुडण्याचे कारण मला हेच दिसते की, लोक नुसते पाठ करण्यावर फार प्रीती करू लागले. तेणेकरून अर्थ सुटताच अनर्थ झाला. पाठ करावे म्हणून कोठे कोठे वचने सापडतील. परंतु ती वचने जावयाचे बापाने सांगितलेले बोधाप्रमाणे आहेत. तो हेतू सोडला असता काही उपयोग नाही.
 यास्तव लोकांनी या चाली सोडून द्याव्या आणि शास्त्राचे हेतू जाणावे, हेच उत्तम. नाही तर आणखी विद्येचा संहार होऊन लोक अती नीच अवस्थेला पावतील. यास्तव जे जे लोक विद्येचे मित्र असतील त्यांनी सार्थ शिकण्याची पद्धती सुरू करावी म्हणजे विद्येचा व ज्ञानाचा उद्धार होईल. आणि ज्या पुष्कळ मूर्खपणाच्या चाली आहेत त्या पोकळ आहेत, असे समजून लोक टाकतील. अशा चालीतून लोकांस मुक्त करावे, हाच ब्राह्मणाचा मुख्य धर्म. परंतु ब्राह्मण पोटार्थी व परस्वाधीन झाले. याजमुळे धर्मसुधारणेस त्यांस तोंड राहिले नाही व ते ताटाखालची मांजरे झाले.
 विद्या पुढे व्हावी, अशी ज्याची इच्छा असेल, त्यांणी यास झटावे. कारण दोन हजार वर्षांत हिंदुस्थानात विद्येचे शून्य झाले आणि फार फार वाईट चाली लोकांत पडल्या. त्यांचा उपमर्द झाला पाहिजे. आणि विद्येचा विचार करणे हिंदू लोकांमध्ये नाहीसे झाले, याजमुळे त्यांस क्षीणपणा फार आला, रांडपणा फार आला, शूरत्वहीन झाले, अभिमानरहित झाले व विचारशून्य व मूर्ख झाले. मागे काय होते, पुढे काय होईल, येविषयींचा तर्क बुडाला. आज आठशे वर्षांपासून हिंदू लोकांच्याने स्वराज्य रक्षवले नाही. आठशे वर्षांत मुसलमान, इंग्रज वगैरे पाळीपाळीने येऊन येथे राज्य करतात व आपलेच लोकांचे सैन्य ठेवून आपलेच लोकांस मारतात याचे कारण 'ज्ञानशून्यता'.
 आपले लोकांस राज्यकुशलता असती तर मुसलमान हिंदुस्थानात शिरून हस्तिनापूर व अयोध्या, येथे नबाब बादशहा कशास स्थापन झाले असते ? तसेच कित्येक अनर्थपता मुसलमान लोकांनी केले ते झाले नसते. परंतु हिंदू लोक अज्ञानात बुडाले, याजमुळे त्याचे घरचे त्यांस पहावयाची शक्ती नाहीशी झाली. हे राजेरजवाडे आहेत, त्यांचेकडे पाहिले म्हणजे समजते. त्यात मुख्य तर ब्राह्मण हे पढतमूर्ख झाले आहेत. त्यांणी सर्व लोकांच्या विद्या बुडविल्या आणि आपलीही हानी केली.

♦ ♦


दया


पत्र नंबर ४७ : १ फेब्रुवारी १८४९

 हिंदू लोकांची अंतःकरणे पराकाष्ठेची थंड आहेत. ही उष्ण करण्यास महान उपाय पाहिजेत. त्यात मुख्यत्वेकरून ब्राह्मण लोक फार निर्दय व शैत्यान्तःकरणी आहेत. असे की जर कोणी मरत असेल, तर किंवा दुखणेकरी असेल तर ते त्याजकडे पाहिल्याशिवाय वाटेने स्वस्थ जातील.
 या दुर्गुणाची निंदा पुराणात कोठे कोठे केली आहे. त्यावरून असे सिद्ध होते की, हा दुर्गुण प्राचीन काळापासून या लोकांत आहे. एके ठिकाणी व्यासांनी अलंकारपूर्वक असा दुर्गुण वर्णन केला आहे की, एके समयी श्रीशंकर व पार्वती हे संवादात म्हणाले की, शिवानी काशीक्षेत्र निर्माण केले त्या ठिकाणी जे लोक जातात ते सगळे मोक्षास जातील की काय ? असे पार्वतीने पुसले. तेव्हा शंकर म्हणाले की, काशीस जाण्याने सर्वांस मोक्ष होतो, असे नाही. जे सदय अंतःकरणाचे आहेत, ते जरी गेले न गेले तरी मोक्षास पात्र आहेत.
 तेव्हा याची प्रचीती दाखवावी, म्हणून उभयता कैलासाहून निघाली. एकाने व्याघ्रस्वरूप व एकीने गायत्रीस्वरूप धारण केले; आणि काशीचे वाटेवर यात्रेमध्ये चिखल होतो, त्यात गाय बुडाली आहे आणि पलीकडे कोरडी जागा आहे. तेथे व्याघ्र उभा आहे व तो गाईवर टपून बसला आहे, असे दाखविले. त्या वाटेने हजारो लोक जात होते. परंतु ते सर्व यात्रेवर नजर देऊन गाईची मोकळीक न करता पुढे गेले. एक ब्राह्मण मात्र दयावान होता त्याच्याने पुढे जाववेना, तेव्हा त्याने व्याघ्रावर शस्त्र धरून त्यांस पळवून लावले, आणि गाईस बाहेर काढले. त्यासमई शिवास पार्वतीने सांगितले की, इतक्या यात्रेमध्ये एवढा मात्र प्राणी मोक्षास पात्र आणि यास मात्र यात्रेचे फळ आहे. कारण की त्याची वासना सत्कर्मावर आहे. बाकीचे लोक सत्कर्मास न जाणून यात्रा मात्र करतात. ती निर्फळ होय.
 याजवरून तात्पर्य असे की, दया हे मोठे स्वर्गाचे द्वार आहे; परंतु सांप्रतकाळचे लोक आमचे पाहण्यात असे आले आहेत की, त्यांची अंतःकरणे पाषाणाप्रमाणे कठीण आहेत. ते आपले अंगावर दहा हजारांचे जवाहीर व शंभर रुपयांचा पोषाख वापरतील; परंतु जवळ एक भिकारी चिंध्या पांघरलेला आणि उपाशी दीनवाणीने मागावयास आला, तर त्यांस काही देणार नाहीत. अशा गोष्टीची त्यांस लज्जा वाटत नाही व दुसऱ्याचे दुःख पाहून मनास कोमलता येत नाही. वास्तविक पाहिले असता जे श्रीमंत आहेत, त्यांणी गरिबांस पाहिले म्हणजे त्यांस लज्जा यावी; आणि अंतःकरण विरघळावे.
 कारण की, भिकारी आणि श्रीमंत यांचे शरीरामध्ये किंवा बुद्धीमध्ये काही फरक नसतो. इतकेच की कालेकरून एकाने दुसऱ्याचे हरण करून फार माल जमविला असतो व दुसऱ्याचा तो हरण जहाला म्हणून तो भिकारी असतो. ईश्वराने पृथ्वीवर पदार्थ निर्माण केले. हे सर्वांस सारखे पोचावे हा त्याचा हेतू होय. परंतु मनुष्यामध्ये जितके शहाणपण, तितकाच मूर्खपणा आणि अज्ञान आहे. याजमुळे पन्नास लोकांस लुटून एक श्रीमंत होतो.
 पन्नास कुळंबी गावातील नांगर धरून मेहनत करतात आणि एक जहागिरदार किंवा इनामदार त्यांस कोंडा ठेवून त्याचे दाणे घेतो आणि आपण रेशीमकाठी धोतरे नेसतो व कामकाज काही एक करीत नाही. हे माहात्म्य एकाचे आणि दुसरे गरीब बिचारे इनामदारापेक्षा शहाणे असले तरी आपल्या मेहनतीचा हिस्सा त्यांस देतात, हे आश्चर्य आहे.
 आणखी जर एक गोष्ट सांगितली, तर याविषयी पक्की खात्री होईल. प्राचीन काळी एक विचारशील मनुष्य शेतात बसत असे आणि भिक्षा मागून खाई. त्याणे एक दिवस पाहिले की, एक विलक्षण जनावराची टोळी जिचे नाव जाणते पक्षी ते सरासरी दोनशे त्या शेतात आले. तेव्हा दाणे पुष्कळ पडले होते. ते सर्वांनी सारखे खावे, ते सोडून त्यांणी काय केले. त्या पक्ष्यांपैकी एक रोगिष्ट व निर्बल होता त्यांस त्यांनी एका पारावर बसविले आणि बाकीचे सर्व शेतात जाऊन त्यांनी आपले शक्तीप्रमाणे दाणे जमा करून त्या रोगिष्ट पक्ष्याजवळ आणून रास घातली आणि आपण काही न खाता त्या पक्षिराजाच्या सभोवते बसले आणि तो पक्षिराज त्या दाण्याचे राशीवर नाचे आणि उडवी, परंतु कोणास काही देत नसे. आणि कर्मास त्या पक्ष्यांपैकी बलिष्ठ होते, ते सहाय्य होऊन इतर पक्षी जरी क्षुधेने व्याप्त होते तथापि त्यांस काही खाऊ देत ना. जरी त्यांणी ती रास घातली होती, तरी त्या राशीपैकी कोणी खावयास लागला, तर सर्व पक्षी एकत्र जमून या अपराधी पक्ष्यास मारून टाकीत. असे दोनचार पक्षी मारले.
 हे त्या पाहणाऱ्या मनुष्यास आश्चर्य वाटून, तो आपले मित्राकडे गेला आणि त्यांस त्याने हे वर्तमान विदित केले. आणि म्हणाला पक्ष्यांची जात काय मूर्ख आहे ? आपण उपाशी मरतात आणि रोगिष्टाकडून आपण संचय केलेले धान्य नाशिवतात. तेव्हा तो म्हणू लागला की, "अरे बाबा, याचे तुला आश्चर्य का वाटले? या गोष्टी तर प्रत्येक दिवशी मनुष्यामध्ये पाहण्यात येतात. एक राजाचे क्षयरोगी पोर असते, परंतु त्याचे सर्व लोक आर्जव करीतात आणि त्यांस दौलत देतात व आपण उपाशी मरतात. बरे, त्याणें स्वतः काही काम केले आहे काय ? नाही. तत्रापि लोक आंधळ्यासारखे त्यास बलिष्ठ मानितात. आणि त्यांस किनखापाच्या, मखमलीच्या कापडावर बसवितात व त्याच्याहून हजारपट शहाणे असतात, भीक मागतात, चिंध्या देखील त्यांस मिळत नाहीत. आणि राजाचे घरी कोणी एक पैसा चोरला, तर त्यांस फाशी देतात व त्यांस सर्व वहावा म्हणतात. आणि न्याय चांगला झाला म्हणतात.
 याणें चोरी का करावी? अशी आश्चर्ये लोकांमध्ये आहेत. त्यावरून जितके श्रीमंत व जितके थोर पदवीस आलेले आहेत. त्यांस असे वाटते की, आम्ही नालायक असून हे आम्हास प्राप्त झाले आहे. याजवर आमचे हक्क. परंतु ही समजूत मूर्खपणाची आहे. आपणाहून लहान लोकांचे सुखाकडे याचा उपयोग करावा, म्हणजे याचे सार्थक जहाले. मला वाटते की, प्राचीन काळचे शास्त्रकारांनी ब्राह्मणास भिक्षा मागावयाचा धर्म लावून दिला आहे. याचे कारण हेच दिसते की भिक्षान्नासारखे दुसरे अन्न पवित्र नाही. ही गोष्ट खरी आहे, परंतु जे श्रीमंत आहेत, त्यांस क्षणभरही पश्चात्ताप होत नाही. जाणी धर्माने द्रव्य संपादन केले आहे, त्यांस हजारात एक सापडेल. बाकी तर लबाडीने द्रव्य मिळविलेले आहेत. त्यात हिंदू लोकांमध्ये तर क्वचितच धर्मवान श्रीमंत आहेत. श्रीमंतास असे वाटते की, आम्ही या मालाचे मालक आहो, आम्हास हे भिकारी त्रास का देतात ?
 परंतु वास्तविक पाहिले तर त्यांस लाज वाटावी, हेच योग्य, कारण ते जे सुख भोगितात, ते लोकांचे मूर्खपणामुळे भोगितात. तेव्हा त्या मूर्खावर काही तरी दया करणे योग्य आहे. यास्तव सर्व धर्मांत दान देणे हा मोठा धर्म सांगितला आहे. सर्व धर्म याविषयी मिळतात. मोक्षाचा मार्ग दानधर्म आहे. परंतु हिंदू लोकांस दानधर्म करण्याची सवय आहे, तो दानधर्म नव्हे. वास्तविक धर्म असा की दुसऱ्याचे जे न्यून आहे, ते परिपूर्ण करावे. आणि लोकांस ज्ञानवृद्धी करून शहाणे करावे.
 परंतु हा धर्म या लोकांस कळत नाही. हिंदू लोकांमध्ये एकमेकांचा कळकळा अगदी नाही. उलटे एकमेकांचा नाश करून त्यात थोरपणा मानणारे बहुत आहेत. जर अन्यायाने एकाचा नाश जहाला, तर इतर स्वस्थ जाग्यावर बसून त्याचे हाल पाहतील. एकावर अन्याय जाहला तर सर्वांनी त्याचा न्याय होण्याकरिता मदत करावी, हे शहाणपण त्यांस नाही. यास्तव मुसलमानांनी हिंदुस्थानात प्रवेश केला, इंग्रज लोकही आले व पुढेही किती एक येणार. परंतु या लोकांस दुःख व अन्याय सोसण्याची चाल व सवय पडली आहे. तिची त्यांस लाजच वाटत नाही. व दया नाही म्हणून हे अनर्थ या देशात आहेत. आणि लोक एकमेकांचे अंतःकरण जाणण्याजोगे शहाणे होतील, तोपर्यंत हे अनर्थ दूर होणार नाहीत, असे मला खचित वाटते.

♦ ♦


मन हेच ईश्वरी शास्त्र

पत्र नंबर ५३ : २५ मार्च १८४९

 ईश्वराने जे प्राणी निर्माण केले, त्यामध्ये उत्तम प्राणी मनुष्ये आहेत, कारण की, त्यांस ज्ञान बुद्धी दिली आहे. तेव्हा मनुष्याने या जन्मामध्ये वर्तणूक कशी करावी, याचा नेम काही ईश्वराने त्याचे स्वभावातच दिला आहे किंवा नाही याचा विचार करता असे दिसते की, "मनुष्याचे मन हेच त्याचा नियम आहे." यास प्रमाण भागवतातही असे आहे की, "मनःपूतं समाचरेत्" जे मनास पवित्र वाटेल, त्याप्रमाणे आचरण करावे हेच ठीक.
 मला वाटते की, जसे सरकारातून एखादे कामगारास नेमतात आणि सरकारचे हुकूम कसे चालावे याविषयी लेख पाठवितात, याप्रमाणे तो ताकीद देतो. तद्वत् मनुष्यास मन हे ईश्वराने दिले आहे. हा सर्वांचे चित्तास अनुभव आहे आणि जी वाईट गोष्ट ती मनास वाईट वाटते व चांगली ती मनास चांगली वाटते. गैर माहितही असली तरी चांगल्यास चांगला म्हणतो व वाईटास वाईट म्हणतो. याचा अनुभव मूर्ख मनुष्यासही आहे, तेव्हा मन हाच मनुष्याचे वर्तणुकीचा ईश्वरी नेम आहे. जशी भारती गदापर्वात कथा आहे की, दुर्योधनाने पांडवांची बालके मारीली, परंतु हे ऐकून ऐकणारे म्हणतात, की, 'अरेरे! काय तो दुष्ट होता ! चांडाळ होता.' याप्रमाणे मनाची ध्वनी निघते. वास्तविक पाहिले तर त्या गोष्टीस व ऐकणारास काही संबंध नसतो. परंतु वाईटाचा निषेध व चांगल्याचा अंगीकार हे मनाचे धर्म आहेत व ही ईश्वराचीच प्रेरणा आहे.
 बरे, असे आहे तर मग मनुष्य याविरुद्ध का चालतात ? कोणी म्हणतो की, आमचे बापांनी व वडिलांनी केले आहे. तसेच आम्ही करू. कोणी म्हणतो की, आमच्या देशाची चाल आहे, कोणी म्हणतात की, आमचे गावातील चाल अशीच आहे. याप्रमाणे मनुष्य मूर्ख होऊन, वास्तविक मार्ग सोडून वाकडी चालू लागली. तसेच मन इतके भ्रष्ट झाले की, दुसऱ्याचा प्राण घेणे, हेही त्यांस बरे वाटते.
 किती एक लोक असे निष्ठुर आहेत की, सती जाणे चांगले म्हणतात ! परंतु वाईट गोष्टीस चांगले जे म्हणतात, त्यांचे मन साक्षी असते. ते मनापासून म्हणत नाहीत. दुसरे काही कारणाने म्हणतात. कोणी शास्त्राचे ओढीवर जातात. कोणी रूढीवर जातात. आणि त्यांस ही गोष्ट वाईट, असे मनात येते. तरी मनाची ध्वनी दाबून दुष्ट बुद्धिप्रेरित भाषण करीतात, हे मोठे आश्चर्य आहे. मला वाटते की, जे साधु झाले व शास्त्रकार झाले त्यांणी मन शुद्ध करण्याकरिता पुष्कळ ग्रंथ लिहिले व पुष्कळ शिकविले आणि नेमही पुष्कळ केले. परंतु ती गोष्ट साधली नाही. लोकांचे मन वाकडे तिकडे जाते. तर लोकांनी वास्तविक सत्य स्मरून मनात विचार केला, तर त्यांस किती एक गोष्टी ज्या लोकांमध्ये चांगल्या म्हणून चालतात त्या वाईट असे समजेल. परंतु हिंदू लोक अजून आपल्या ठिकाणी विचार करू लागले नाहीत. व मन हेच मोठे शास्त्र आहे व लिहिलेली शास्त्रे सर्व याचे खाली आहेत, असे त्यांस वाटत नाही.
 हल्ली वाईट चाली चालतात. त्यांतील एक दोन मी वर्णन करितो. प्रथम मला दुसरी कोणतीही चाल इतकी वाईट वाटत नाही की, जितकी हल्लीची लग्नाची चाल वाईट आहे. हिंदू लोकांमध्ये पहावे तर कोणी ऐंशी वर्षाचा पुरुष रस्त्याने चालला आहे किंवा कामावर आहे असे कोठे आढळत नाही. याचे कारण काय ? बहुत लोक असे पाहण्यात येतात की, स्वतः क्षयरोगी व पंचवीस वर्षे झाली नाहीत तो पांचचार रोगिष्ट पोरे उत्पन्न झाली आहेत. स्त्रीस वार्धक्य-दशा प्राप्त होऊन पुरुषाचे केस पिकलेले, अंगात शक्ती नाही, कोठे बाहेर जाण्यास सामर्थ्य नाही, असे आढळतात. मग परमुलखात कशाने जाणे होणार ? शिपाईगिरी वगैरे राहिले. परंतु पोटास मिळवून खाण्याची देखील पंचाईत. असे पुरुष दरिद्री बहुत आढळतात. मुख्यत्वेकरून श्रीमंत लोक तर अगदीच नालायक होत चालले आहेत.
 याचे मुख्य कारण मला लहानपणाचे लग्नासारखे कोणतेही दिसत नाही. लग्नाने मनुष्य स्वर्गास जातो, म्हणून शास्त्र आहे. परंतु त्याचा हेतू जाणत नाहीत. आणि मला असे पुष्कळ आढळले की, स्वतः भिकारी, अन्नाची पंचाईत, रोगी, अशक्त, परंतु वीस वर्षे झाली नाही तो स्वतः किंवा त्याचे आईबाप लग्नाचे मोठे काळजीत पडतात. आणि लोकांजवळ भीक मागतात. आणि लोकही त्यांस "त्याचे लग्न पाहिजे कशास ? त्याची प्रकृती नीट झाली आणि रोजगार-धंदा करू लागले व संसार करण्याचे ज्ञान व स्त्रीस खावयास घालावयाचे सामर्थ्य आले म्हणजे 'लग्न करा' असे म्हणत नाहीत. परंतु उलटे असे म्हणतात की, ब्राह्मणाचे लग्न होत आहे, त्यांस साहित्य केले तर पुण्य आहे; असे म्हणून पैका देतात. आणि अशा मुलग्यास मुलगी कोण देतो ? म्हणून मुलीच्या बापास लाच देऊन त्याची पोरगी याचे गळ्यात बांधतात. मग लग्न झाले की दोघांनी झोळ्या घ्याव्या आणि दारोदार भीक मागत फिरावे. आणि विद्या वगैरे सर्व बुडवून त्याने स्त्रीच्या काळजीत पडावे. अशी अवस्था होऊन तो लवकर मरतो. मग विधवा स्त्री झाली म्हणजे तिचे हाल या लोकांमध्ये कसे आहेत, हे सर्वांस माहीतच आहे.
 लोक डोळेझाक करून आपले पोरांची व पोरींची त्वरित लग्ने करतात. येणेकरून दोघांचे दुःख वाढते; व बापास लहानपणी पोरे व सुना चांगल्या दिसतात, परंतु त्यांचे पाठीमागे त्यांचे हाल कुत्रा खात नाही. याचा विचार हे लोक करीत नाहीत व लग्नाची घाई करतात. येणेकरून अल्पजीवी, अशक्त, पराक्रमहीन व मूर्ख झाले आहेत. पंधरावीस वर्षांचा मुलगा झाला नाही; तो लोक म्हणतात की, लग्न का झाले नाही ? आणि त्यांस आईबाप असले तर त्याचा प्राण जाऊ लागतो; त्या वेळेस सांगतात की, कसेही करा, पण याचे लग्न करा. या मूर्खपणास काय म्हणावे ?
 याविषयी व स्त्रियांस विद्या शिकविण्याविषयी लोकांनी जरूर विचार करावा. स्त्रिया वाईट म्हणून पुष्कळ लोक म्हणतात. कोणी म्हणतात की, "स्त्रीबुद्धिः प्रलयं गतः" परंतु यांसारखे शतमूर्ख पृथ्वीत नाहीत. जसे पुरुष तशाच बायका स्वभावाने व बुद्धीने आहेत. परंतु ईश्वराने त्या घरचे कामास योजिल्या आहेत व पुरुषास बाहेरचे कामास व रोजगारास वगैरे निर्माण केले आहे. परंतु शहाणपण सारखेच आहे. जे लोक स्त्रियांस वाईट म्हणतात, त्याणी पक्के समजावे की, ही मूर्खपणाची समजूत आहे. आणि प्रायशः असे आहे की, जी स्त्री वाईट, तिचा नवरा वाईट असतो आणि नवरा चांगला असला तर त्याची स्त्री कदापि वाईट असावयाची नाही.
 स्त्रियांस शहाण्या करणे जरूर आहे. व लग्नाकरिता जे धर्म करितात त्यांणी विचार करावा. धर्म मागणारे भटात फार थोडे योग्य व गरीब असतात. कोणी म्हणतो की, मी गणपतीच्या देवळात चातुर्मास अनुष्ठान करितो, त्याची समाप्ती करण्याकरिता मला पैका द्या तेव्हा असे लोकांस धर्म करणे हा मूर्खपणा वाढविणे आहे.

♦ ♦


आचार


पत्र नंबर ५८ : २९ एप्रिल १८४९

 हिंदू लोकांमध्ये सांप्रत आचार फार माजला आहे. म्हणजे किरकोळ निरर्थक कर्मे आणि ढोंगे फार होऊन, त्यांतील बीजरूप जी नीती ती भ्रष्ट झाली आहे.
 ब्राह्मणाच्या घरात जाऊन पाहिले म्हणजे आचार किती असतात, ते लक्षात येतात, म्हणजे सोवळेओवळे हे एकच प्रथम; नंतर पुरुषाचे सोवळे, बायकांचे सोवळे, कित्येक ठिकाणी देशस्थ ब्राह्मणाचे हातचे म्हणून कोकणस्थांच्या बायका जेवीत नाहीत. पिठास पाणी लागले, म्हणजे ओवळे झाले; खरकटे, शिळे, उष्टे हजारो नेम आहेत. जेवताना वाढणाराचा स्पर्श झाला, तर पुनः आंघोळ केली पाहिजे; उष्टे-विटाळ म्हणजे आंचवण्यापूर्वी कोणास स्पर्श न करणे; दाणे भाजले म्हणजे ओवळ्यांनी खाण्यास चिंता नाही; परंतु हिरवे दाणे खाऊ नये आणि त्यांस पाणी लागले म्हणजे विटाळ झाला. जेवून उठला, म्हणजे पुनः अन्न खाऊ नये व प्रोक्षण करण्याच्या पूर्वी खाऊ नये. व जेथे जेवले तेथे शेणपाणी लावल्याखेरीज दुसरा जेवावयास बसत नाही. अन्नास जो हात लागला, तो तसाच अंगास लागला, तर अंग धुतले पाहिजे. मुकटा, धाबळ, रेशमी कापडे सोवळी, कापूस ओवळा, म्हणजे धुतल्याशिवाय तो घेऊन जेवीत नाहीत.
 परंतु वास्तविक विचार केला. तर रेशीम करण्यात बहुत हिंसा होते. असे असून ते पवित्र व कापूस झाडाचे फूल ते ओवळे, हे कसे असेल ? याचा ठराव किंमतीमुळे पूर्वी शास्त्रकर्त्यांनी केला किंवा कसे ? याचा ठिकाण लागत नाही. पितांबर पन्नास वर्षे धूत नाहीत; परंतु धोत्रे रोज धुतात आणि धोब्याजवळ दिली, तर ती सर्वदा ओवळी होतात. तेव्हा हे सर्व चमत्कारिक नियम ज्यामध्ये ब्राह्मणांस तीस घटका जातात, त्याचा उपयोग पाहिला, तर काही नाही; परंतु लोक म्हणतात की, जितके ज्यास होईल, तितके त्याणे करावे. म्हणून जे भटभिक्षुक आहेत, ते ढोंग दाखविण्याकरिता फारच करतात. शंकराचार्यांचे वंशातील शिष्य, जे संस्थानी आहेत, त्यांचे येथे पाहिले, तर आचार इतका आहे की, तो पाहण्यानेदेखील कंटाळा येतो मग त्याचा त्रास कोण सोशील ?
 पन्नास ठिकाणी पाणी शिंपतात. दोनशे ठिकाणी हात धुतात. तीनशे ठिकाणी पाय व जागोजाग नेत्रस्पर्श आणि जागोजाग मार्जन आणि देवपूजा व सोवळे मनस्वी करतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत असे ढोंग करतात आणि कोणी जेवावयास वगैरे बोलाविले, तर मग फारच लांबलचक करीतात, म्हणजे लोकांस वाटावे की, पुण्यवान प्राणी आहे. मनाची स्थिती पाहिली, तर ज्ञानशून्य. एवढा आचार ब्राह्मणांनी खटपटीचा अंगीकारला आहे.
 परंतु हा चौघांत चालवावयाचा नव्हे. याची खात्री ज्या ठिकाणी मोठा समुदाय होतो, तेथे पहावे. चिंचवडचे ब्राह्मण भोजन, निगडीचा उत्साह, तसेच मोठमोठे ठिकाणी जेथे पुष्कळ लोक जमतात किंवा प्रवासास निघतात. तेव्हा आचार निभत नाही. कारण की, उष्ट्यावर, खरकट्यावर पाय देत चालतात. एकमेकांस विटाळ होतो. शेण लावल्याचा शास्त्रार्थ करीतात; परंतु उष्ट्या अन्नावर दुसरी पाने मांडतात आणि लोक त्यावर जेवितात व त्यांस म्हणतात हा देवाचा प्रसाद, येथे काही चिंता नाही. घरी मात्र अनाचार करू नये. याजमुळे ब्राह्मण लोक हे फार नालायक आहेत. यास गावास जाणे, लढाईस जाणे,

समुद्रात प्रवास करणे इत्यादिकांचा त्रास. कारण की, त्यांस प्रथम भय, दुसरे काही नसते, पण मी जेवू कसा ? माझे सोवळेओवळे कसे चालेल ? मला भांडी कोण देईल ? माझे शिजवील कोण ? इत्यादी काळजी त्यांस पडतात. याजकरिता ब्राह्मण लोक बहुधा घरी राहणारे लोक व चोरट्यासारखे आपले घरी दडून राहणारे. त्यांस कधी फार करून बाहेर पडावयाची वेळ आली म्हणजे त्यांचा प्राणान्त होतो; परंतु अशा घातकारक चाली सोडून द्यावयास काय अवघड ?
 ब्राह्मण लोकांनी सर्व जातींस मूर्ख ठरविले आणि आपण शहाणे झाले; परंतु आपण तरी पराक्रम केला असे नाही. आपल्याभोवती रिकामे घोळ पुष्कळ उत्पन्न करून ठेवले आहेत. येणेकरून ते सर्व लोकांस घेऊन आपण बुडाले, असे झाले आहे. जर इतर लोकांस लिहिण्याची व शास्त्र वाचण्याची परवानगी असून, ते विद्वान असते, तर स्वतःच पराक्रम केला असता; कारण की इतर जातीस आचाराच्या अडचणी नाहीत; परंतु ब्राह्मणांनी सर्वांचा नाश करून आपण बुडाले. आता इतर जातीचे लोक शहाणे होऊन पराक्रम करीत तो फार दिवस पाहिजेत. नाही तर आजपर्यंत इतर जातीचे हिंदू लोकांनी विलायतेस जाऊन पृथ्वी कशी आहे, याचे ज्ञान वगैरे मिळविले असते. मग ब्राह्मण याच देशात आपले घरोघर राहते, तर त्यांची काही फिकीर नव्हती. अस्तु.
 सांप्रत ब्राह्मण लोकांनी याचा विचार करावा. आपण पराक्रमी व प्रवास करण्यात व लढाईस वगैरे योग्य होण्यास आपल्यास कोणत्या चाली सोडल्या पाहिजेत. आणि त्या सोडाव्या हे उत्तम, हे एक आणि दुसरे ब्राह्मण लोकांमध्ये नित्याचा आचार तसाच नैमित्तिक आहे. तोही रद्द करण्याजोगा आहे. म्हणजे पोर जन्मास आले त्या घटकेपासून भटाचे अनुष्ठान व पूजा व सोवळेओवळे सुरू होते. कोणी म्हणतो अन्नप्राशनसंस्कार, कोणी म्हणतो दगडसंस्कार, कोणी म्हणते षष्ठीसंस्कार, त्याची पूजा आणि व्यवधाने फार आहेत. तसेच, लग्न हेही हिंदू लोकांमध्ये मूर्खपणाने होते. लग्नाचे संकल्प, प्रतिज्ञा वगैरे सर्व भट संस्कृत भाषेत आपण पाठ करितो, आणि बडबड करितो. त्यांतील शब्द कोणास समजत नाहीत. त्याचा उपयोग काय ? हे सर्व संस्कार लग्नेसुद्धा मराठी भाषेत वगैरे उतरून त्याप्रमाणे करावे. हे गुह्य कशाकरिता पाहिजेत ? परंतु हे लोकांस कळत नाही.
 घरात लहान मुलगा किंवा मुलगी असली, म्हणजे तिला आचार शिकविण्यास प्रारंभ होतो. नीती वगैरे वास्तविक सदाचार शिकवीत नाहीत. पोरीस वाती लावाव्या, निरांजने लावून तूप जाळावे, तीळतांदूळ वहावे. नाना प्रकारची मूर्खपणाची व्रते करावी आणि त्याबाबतचा कहाण्या तिजला शिकवितात. आणि तो दृढ भाव करतात. तसेच, पुरुषाला सोवळेओवळे हे ब्राह्मणाच्या घरी श्रम करून मुलास शिकवितात; परंतु मोठी गोष्ट म्हणजे नीती शिकवावयाची ती रहाते. याजमुळे परिणाम असा झाला आहे की, नीती म्हणजे काय? हे कोणास ठाऊक नाही. ते अगदी विसरले. आता आचारावरून चांगला-वाईट मनुष्य जाणतात. व असे बहुत ठिकाणी आढळत आहे की, जी स्त्री शिंदळ, लबाड असते, ती तुळशीस प्रदक्षिणा घालण्यात, वाती जाळण्यात प्रमुख असते. नदीतले पाणी दहा-वीस घागरी देवावर ओततात, इत्यादी नेम शिंदळ स्त्रिया भक्तीने करतात आणि शिंदळकी वाईट, हे त्यांस स्वप्नातही माहीत नसते. तसेच पुरुषात जे चोर, लाचखाऊ, लोकांचा माना मोडून पोट भरतात, इंद्रियभ्रष्ट; पण त्यांचे सोवळेओवळे सर्वांहून अधिक; जेवताना बोलत नाहीत, पूजा करताना बोलत नाही, हे असे नेम ते निष्ठेने करतात; पुष्कळ पैसा खर्च करून तुळशी- फुलांचा संहार करीतात; परंतु आमची वर्तणूक वाईट हे त्यांचा स्वप्नी नसते व लोकही म्हणत नाहीत की, तो आचार कसला करतो ? वर्तणुकीने फार वाईट आहे. याविषयी लोकही आंधळे झाले आहेत. तेही सोवळ्यावर व देवपूजेवर न्याय करतात, नीती आणि सदाचरण याविषयी लोक अगदी आंधळे झाले आहेत.

♦ ♦


धर्मसुधारणा


पत्र नंबर ६४ : १७ जून १८४९

 कालमहात्मे करून हिंदू धर्माची सुधारणा करणे जरूर आहे. त्याशिवाय या लोकांचा परिणाम लागणार नाही. चार लोक त्याचे मनात स्वदेशाचे कल्याण आहे. त्यांणी एकत्र होऊन धर्मसुधारणा करावयास आरंभ करावा, हे मला बरे वाटते. व असे करण्यात एक मोठा लाभ आहे तो हा की, सरकार अनुकूल आहे. तेव्हा चार टोणपे शास्त्री पंडित यांस कशास आपण भ्यावे ? याचे हातून फार झाले, तर त्याचे विपरीत जे करीतील त्यांस जातीबाहेर ठेवण्याचे होणार; तर जात म्हणजे काय? ज्या समुदायामध्ये लोक पुष्कळ जमतात, ती जात होते व एकटा असला म्हणजे तो बहिष्कृत होते, पहिल्याने शीख लोक झाले, तेव्हा ते बहिष्कृत होते व पुढे पुष्कळ झाले तशी तीच स्वतंत्र एक जात झाली.
 त्याचप्रमाणे पहिल्याने किरिस्ताव धर्म सुरू झाला. तेव्हा पूर्वीचे धर्माचे जे पंडित होते त्यांणीं काही दिवस त्यांस भ्रष्ट म्हणून ठरविले व पुढे ते पुष्कळ जमले तेव्हा जे भ्रष्ट म्हणत होते तेच उलटे भ्रष्ट झाले. इंग्रजांनी किरिस्ताव धर्म घेतला तेव्हापासून पुढे तो धर्म पुष्कळ भ्रष्ट झाला. याजकरिता त्यांतील कोणी एका पंडिताने धर्मसुधारणा केली, तेव्हा त्यांस लोकांनी पुष्कळ वाईट म्हटले. परंतु चार लोक एक जागी जमले व लग्नसोयरीक आपसांत होईल इतका समुदाय असला म्हणजे कोणी या शास्त्री लोकांस पुसत नाही असे करण्यास आधार आहे. शंकराचार्यांनी किती एक शास्त्रमते रद्द केली; किती एक चालू केली. असे कालकरून शास्त्रास चालन पाहिजे. ईश्वरासंबंधी धर्म आहे तो मात्र अचल आहे. परंतु शास्त्रांतील कायदे जरूर वरचेवर फिरले पाहिजेत. यास्तव स्वदेशाचे हितकर्ते यांणी इतका विचार करावा की, आपले पक्षात पुष्कळ लोक येतील की नाही ? मला वाटते की, या गोष्टीची काळजी नको. धर्मसुधारणा प्रसिद्धपणे चालू केल्यास बहुत लोक आपल्यास येऊन मिळतील. पुष्कळ लोकांच्या मनात आहे, परंतु संधी नाही. यास उपाय नाही. मुख्य धर्मसुधारण्याची कलमे अशी आहेत.
 (प्रथम) सर्वांनी ईश्वराचे भजन अंतःकरणापासून करीत जावे. (दुसरे) जसा आपला जीव तसा दुसऱ्याचा जीव मानावा. (तिसरे) मुंज, लग्न, प्रेतक्रिया तीन संस्कार ठेवून बाकीचे सर्व रद्द करावे. (चवथे) जे कर्म करणे ते स्वभाषेत अर्थ समजेल असे करावे. भजन, पूजन, संस्कार सर्व ज्यांचे त्यांचे भाषेत करावे. संस्कृत भाषा पाहिजे ते शिकतील; परंतु ज्यांस येत नाही त्यांणी संस्कृत भाषेत कर्म करणे जरूर नाही. (पाचवे) प्रत्येकास आपले विचाराप्रमाणे आचार व बोलण्या-लिहिण्याची मोकळीक असावी. त्यांस प्रतिबंध असू नये.
 (सहावे) स्त्रीपुरुषांचे अधिकार धर्मसंबंधी कामात व संसारात एकसारखे असावे. येणेकरून पुनर्विवाह व मोठेपणी लग्न झाले. (सातवे) आचारापेक्षा नीती प्रमुख असावी. आचाराचे महत्व हल्ली आहे तसे असू नये. आता किती एक बायका लबाड असतात; परंतु पिंपळाच्या प्रदक्षिणा अंतरीत नाहीत; हे काही उपयोगी नाही. (आठवे) अर्थाशिवाय काही एक म्हणू नये. (नववे) मनुष्यमात्रास तुच्छ मानू नये. जाति- अभिमान नसावा. सर्वांशी सारखे दयापूर्वक वर्तावे. सर्वांचे कल्याण करावे. (दहावे) स्वदेशाची प्रीती व त्याचे कल्याण विशेषेकरून मनात वागवावे. (अकरावे) ज्यास जो पाहिजे तो त्याणे रोजगार करावा. (बारावे) गुणेकरून व योग्यतेकरून जातिभेद मानावा. कुलेकरून मानू नये. (तेरावे) सरकारहून प्रजेचे अधिकार अधिक असावे, म्हणजे जे जे रयतेच्या हिताचे कायदे आहेत, ते सरकारशी भांडून घेत जावे. (चवदावे) राजाने जे नियम केले असतील, ते व जे ईश्वरी बुद्धिसूचित नेम आहेत ते मानावे.
 (पंधरावे) विद्यावृद्धीकरिता सर्वांनी मेहनत करावी. दुःखितांस सुख, रोग्यास औषध, मूर्खास ज्ञान व दरिद्र्यास द्रव्य शक्त्यनुसार देण्यास अंतर करू नये. (सोळावे) शेवटचे कलम असे आहे की, सत्याने सर्वांनी चालावे. सत्याचे विरुद्ध वर्तणूक करू नये. विद्येमध्ये ज्या ज्या सत्य गोष्टी आहेत, त्यांचाच शोध करण्यास आळस करू नये आणि सापडतील त्या सर्व प्रसिद्ध कराव्या व विद्या व ज्ञान संपादन करण्यास सर्व सारखे, अशी मोकळीक असावी.
 या दर एक कलमाविषयी एक ग्रंथ उदाहरणेसहित करावा, असे माझे मनात फार आहे. व इतक्या गोष्टी मी लिहिल्या आहेत. त्यांस काही शास्त्र व हिंदू धर्म प्रतिकूल नाही. सर्व हिंदू धर्मातीलच आहे; परंतु त्याचा शोध मात्र केला पाहिजे. एके ठिकाणी सापडणार नाही. परंतु चहोकडून मिळविले म्हणजे सापडेल.
 जसा गीतेत एक ईश्वर आहे; इतर देवता भजू नयेत, अशी स्पष्ट वाक्ये पुष्कळ आहेत; ती घ्यावी. जरी ती पुराणास विरुद्ध असतील तरी पुराणे सोडावी. जे चांगले ते घ्यावे. जातीविषयी वेदाचे मत घ्यावे. कारण की, संस्कृत भाषेत अनंत ग्रंथ आहेत. ज्या ज्या ऋषींच्या जसे मनात आले तसे त्यांणी लिहिले आहे. तेव्हा त्यात एकच पुस्तक आपल्या उपयोगी सापडणार नाही. परंतु सर्वांचे ऐक्य केले तर करता येईल. याप्रमाणे एक ग्रंथ करून त्यात शुद्ध नीती प्रतिपादन करावी. आणि हिंदू लोकांचे विशेष नाव ठेवावे. आणि त्यांणी कसे गावे त्याचे नियम त्यात ल्याहावे. आणि तेच पुस्तक आपले शास्त्र समजून त्याप्रमाणे चालावे.
 खचित एकट्या ऋषीने आपल्या अकलेने लिहिलेले शास्त्रापेक्षा चार मते पाहून जे शास्त्र आपण तयार करू, ते सर्वांपेक्षा उत्तम होईल, यात संशय नाही. शे-दोनशे लोकांनी याप्रमाणे नाव धारण करून वेगळी फळी पाडावी. मग आपलेमध्ये हा धर्म चांगला असे पाहून पुष्कळ लोक येतील. ज्या मुलीचा नवरा मरेल ती एखाद्या सोद्याबरोबर जाते, त्यापेक्षा आपले धर्मात येऊन एखाद्याशी लग्न करणार नाही काय ? हजारो करतील. हिंदू धर्मात सांप्रत ज्या ज्यांस अडचणी पडतील ते सर्व तोटा करून या शुद्ध धर्मात मिळतील. मग आपली मंडळी प्रबळ झाली म्हणजे जे पाहिजे ते कार्य करता येईल.
 सांप्रत एकमेकांचे विरोध व विभक्तपणे फार आहेत. कोकणस्थ देशस्थांशी सोयरीक करीत नाहीत. या अडचणी मोडून लोक गंगाजळ- निर्मळ होतील आणि त्यांचे एक मत व एक धर्म होईल. आणि जे पाहिजे ते करता येईल. असे केल्यावाचून सांप्रतकाळी हिंदू धर्म भ्रष्ट झाला, त्याचे हातून आम्ही सुटणार नाही. हा धर्म सुधारला पाहिजे. माझे सुधारण्याचे तात्पर्य असे नाही की. सर्वांनी एकजात व्हावे. कारण की हल्ली नीच जातीचे लोक मोठेपणात आले नाहीत. याकरिता त्यांची सोयरीक कोणी अर्थातच करणार नाही. ज्यास पांच रुपये महिना आहे, तो आपले योग्यतेचा गृहस्थ पाहील. केवळ गावाबाहेरच्या महाराशी अथवा भिकाऱ्याशी लग्न करणार नाही, हे उघड आहे.
 परंतु माझा हेतू इतकाच की, विरोध मोडावे आणि लोकांनी परस्पर ममतेने वागावे व जसे जसे कालेकरून हे अज्ञानपाश सुटतील तसे तसे सोडवावे, परंतु या कार्यास आरंभ करावा म्हणजे बरे पडेल. बहुत लोक वाट पाहतात. ब्राह्मण महाराची निंदा करतात. त्यांस शिवत नाहीत व इंग्रजांजवळ प्रीतीने बसतात. हे पाहून मला आश्चर्य वाटते. शास्त्राप्रमाणे पाहिले असता महार बरे; परंतु इंग्रजांचे मंडळीत ब्राह्मण असू नयेत. तत्रापि हे ब्राह्मण मूर्ख. त्यांस समजत नाही; म्हणून मी हा उपाय योजिला आहे.

♦ ♦


नीति-प्रशंसा


पत्र नंबर ६५ : २४ जून १८४९

 मी आपले पत्रात ब्राह्मण जातीवर पुष्कळ हल्ला केला आहे. याजकरिता किती एक ब्राह्मणांस वाईट वाटत असेल. त्यांस मी त्यांची क्षमा मागून अशी विनंती करतो की, ब्राह्मणांचे दोषविवेचन मी फार केले आहे. याचे कारण आमचे लोकांत मुख्य ब्राह्मण. ते जे करतील तसे इतर वर्ततात. गाव-खेड्यांत देखील जो कुळकरणी, त्याचे पाया पडतात. म्हणून ब्राह्मणांचे सुधारणुकेस्तव मी झटतो. त्यांची सुधारणा झाली, म्हणजे सर्व हिंदू लोकांची जहाली.
 त्यांचे अज्ञान पाहून मला दया येते. राग येत नाही. जे मी लिहिले आहे, ते सर्व त्यांचे हिताकरिता आहे. मला खात्री वाटते की, सांप्रत काळी माझे पत्राचा आक्षरशः अर्थ करून त्यांतील आशय जाणतील. असे ब्राह्मण कोणी नाहीत. कदाचित हजारांत एक असेल. कारण की त्याचे अज्ञान अतिशय आहे. बाळपणापासून जी सवय झाली, ती सवय मोठेपणी कितीही सांगितले तरी जात नाही; परंतु मी आशा करितो की, पुढे जे होतकरू मुलगे आहेत ते ही पत्रे पाहून अज्ञानातून सुटतील आणि माझे अभिप्रायाचा विचार करतील. मग त्यांस जे पसंत वाटेल, ते ती करोत.
 आजचे ब्राह्मण असे आहेत की, हे पत्र हाती धरताच टाकून देतील व म्हणतील हे काय ? भलतेच लिहिले आहे. असो, त्यांचे अज्ञान त्यांचे कामास दिवसेंदिवस येत आहे. परंतु मला वाटते की, म्हातारे जुने ब्राह्मण आहेत ते असोत; परंतु नवीन उमेदवार त्यांनी आपले अंतःकरण ज्ञानेकरून व विचारेकरून पवित्र करावे, म्हणजे पुष्कळ फायदा होईल. मागील पत्रांत धर्मसुधारणा लिहिली आहे. ही बहुतांस भयंकर व किती एकांस दुर्घट वाटून किती एक पंडित व शास्त्री पुराणातील वाक्ये वर्णसंकर, कली इत्यादी म्हणतील, हे मला कळत आहे; परंतु महाराज, तुम्ही विचार कराल तर हा वर्णसंकर नव्हे. आता जो आहे तो वर्णसंकर खरा. जे ब्राह्मण भडवेपणा करतात, त्यांस तुम्ही पंक्तीस घेता व नीतिमान शूद्रास नीच मानता, हा वर्णसंकर खरा. शास्त्राचा आधार माझे मतास पुष्कळ आहे व तुम्ही विचार केला असता सापडेल. वेडात शिरू नका. ही धर्मसुधारणा झाल्याशिवाय तुमचा बंद खुला होणार नाही.
 आता जो धर्म चालला आहे, हा धर्म नव्हे; हा बेबंद, गोंधळ आहे. यात काही नाही. नीती नाहीशी झाली व धर्म बुडाला. मला तर धर्म कोठे दिसत नाही म्हणून धर्माची स्थापना करण्याचा माझा यत्न आहे व असे झाले असता पुष्कळ नीतिवान पुरुष होतील व जे गैरनीतीने चालतील तेच भ्रष्ट म्हणावे, केवळ आचारात जपून वागले, तर उपयोग नाही. आचार हे केवळ सोंग आहे. नीतीचे ज्ञान व्हावे, म्हणून आचार सांगितला आहे, हे तुम्हास क्षणभर विचार केला तर कळेल, पहा की, शास्त्रात असे लिहिले आहे की, ग्रहणास श्राद्ध करावे, म्हणजे बाप मोक्षास जातो. बरे, ग्रहणात जो ब्राह्मण जेवतो, त्यांस जर पाप लागते असे आहे, तर दुसऱ्यास पापात घालून बापास मोक्ष कसा होईल हे सांगा. एकाचे डोके मारल्याने दुसरा जिवंत होतो काय ? तात्पर्य, शास्त्र करणाराचे मत असे दिसते की, ग्रहणात जेवले तर पाप मुळीच नाही. हे त्यांस ठाऊक होते. कारण की, ग्रहण छाया पडल्यामुळे होते. त्यात जेवले म्हणून पाप कशाचे ? नित्य शुक्ल पक्षात चंद्रावर सावली असते; त्यामुळे अंगुलमात्र चंद्र कमी अधिक होतो, हेही ग्रहणच आहे. कारण की ज्या कारणाने ग्रहण, त्याच कारणाने शुक्ल व कृष्णपक्षींचा अधिक उणा चंद्र होतो. याजमुळे चांदण्यात कोणी जेवीत नाहीत की काय ?
 तो शास्त्रकर्ता इतके समजत होता, परंतु ग्रहणात ब्राह्मणास जेवावयाचे निमित्ताने त्यांस रुपये मिळवून द्यावयाचे होते; याजकरिता हा धर्म लावून दिला. वस्तुतः पाप नाही, हेच खरे. आणि पुराणकर्त्यांनी लिहिले आहे की, ही पुराणे आम्ही स्त्रिया व क्षूद्र इत्यादी जातीस वाचण्याकरिता केली आहेत, याजमुळे असे दिसते की, इतर जाती अज्ञानात ठेवून ब्राह्मण जातीजवळ मात्र वास्तविक ज्ञान ठेवावे, असा त्यांचा हेतू होता. म्हणून त्यांनी पुराणात ब्राह्मणांचे पाहिजे तसे महात्म्य व नाना प्रकारच्या वेड लावावयाच्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्याचा अर्थ लाक्षणिक समजला पाहिजे. जसा चंद्र कमी होतो, म्हणून क्षयरोग आहे, असे कवींनी वर्णन केले आहे व अधिक होतो म्हणून त्यांस बळ अमृत आहे, असे लिहिले आहे.
 परंतु खरे नाही; केवळ कवींची कल्पना आहे. इत्यादी गोष्टी अशा असता मला चमत्कार वाटतो की, हल्ली हे मुंबईचे व इतर ठिकाणचे परभू व सोनार ब्रामणात शिरण्याचा हेवा, मत्सर व उद्योग कशाला करतात ? त्यापेक्षा आपण सर्व मिळोन एक होण्याचा यत्न केला, तर बरे होईल. किती एक परभू ब्राह्मण व्हावे, अशी इच्छा करतात. ते ब्राह्मणांसारखे गंध लावतात व देवपूजा वाढवतात. परंतु मला तर हे मूर्ख वाटतात. इतका प्रयत्न करून ब्राह्मणांत येऊन फायदा काय ? किती एक नमस्कारासाठी भांडतात, मला वाटते की, महारास देखील नमस्कार करावा. त्यात आहे काय ? या किंचित गोष्टीचा वाद कशास पाहिजे ? परंतु ब्राह्मणास प्रारंभापासून पैसा काढण्याचे साधन या युक्तीने होते. परभू ब्राह्मणांची संध्या वगैरे मुलांस शिकवितात. त्यापेक्षा एखादे सार्थ नीतीचे अगर धर्माचे पुस्तक का शिकवीत नाहीत ? ही भटांची मजुरी कशास शिकवितात ? यात काय आहे ? मला तर काही वाटत नाही.
 परंतु हे दोन्ही जातीचे लोक मूर्ख आहेत. ते ब्राह्मण व्हावयास पाहतात. अशी ही तऱ्हा चालली आहे. तेव्हा आता धर्मसुधारणा निघेल तर हे सर्व तंटे मिटतील. व आपला धर्म शुद्ध आणि सुंदर म्हणून पुष्कळ लोक यास साह्य करतील. यात संशय नाही. हे कोणी तरी मनावर घेणे जरूर आहे.

♦ ♦


देवळे व नेमधर्म

पत्र नंबर ७४ : ९ सप्टेंबर १८४९

 हिंदू लोकांमध्ये द्रव्याची व्यवस्था चांगली होत नाही. लोक मूर्ख आहेत. यामुळे किती एक प्रकारे ते खर्च करतात. त्यात काही फायदा होत नाही. द्रव्य व्यापारात असावे किंवा धर्माकडे तरी लागावे. या लोकांस द्रव्याचा व्यय करता येत नाही. लक्षावधी रुपये खर्च करून देवळे बांधितात आणि त्यात मोठे धर्मकृत्य केले, असे समजतात; परंतु बहुधा हे धर्मकृत्य केले असे होत नाही.
 आज पुण्यात शेकडो देवळे व हजारो मारुती. मारुतीचे जन्माचे दिवशी कोणतेही रस्त्यास मारुतीचा उत्साह नाही, असे बहुधा होत नाही व किती एक देवळे पडून गेली आहेत. कित्येक अनावस्थेत आहेत. किती एक देवळे कसबिणीकडे भाड्याने आहेत व कित्येक देवळांचा दुर्लौकिक होऊन वाईट नावे पडली आहेत. भांग्या मारुती, खुन्या मुरलीधर, छिनाल बालाजी, मोदीचा गणपती इत्यादी नावे पडली आहेत. येणेकरून असे समजते की हिंदू लोकांत देवांची, देवळांची मर्यादा नाही. बरे, इतकी देवळे असता आणखी बांधावयाची काय गरज? परंतु मूढ लोक अद्यापि आणखी बांधितात. कोणी आपल्या घरी बांधतो व कोणी वेगळी जागा घेऊन बांधतो व म्हणतो की, हे मोठे

धर्मकृत्य आहे.
 पुण्यात आणखी देवळे बांधणारासारखे आणखी कोणी या जगात मूर्ख दिसत नाहीत. लाखो रुपये जे अशा मूर्खपणाने खर्च करतात. ते अगदी ज्ञानशून्य व अविचारी म्हणावे; परंतु या लोकांचा वेडेपणा घालविण्याचा प्रयत्न भट व शास्त्री आणि पंडित करीत नाहीत. ते उलटे असे करणारांस जाऊन सांगतात की. अमके पुराणात असे लिहिले आहे की, देऊळ बांधल्याशिवाय जन्माचे सार्थक होत नाही व मागे अहिल्याबाईने नर्मदातीरी अडीचशे देवळे रांगेने बांधली. केवढी ती बाई धन्य होय ! असे सांगून त्या मूर्खास फारच चढी देतात. ज्यांचे कर्म लोकांचा मूर्खपणा दूर करावयाचे, तेच त्यांस वृद्धिकर्ते होतात. याचे कारण असे आहे की, ब्राह्मण लोकांची उपजीविका या कामावर आहे. म्हणून ते असा मूर्खपणा वाढवून दोन पैसे आपणांस मिळावे, असा बेत अल्पमती करीतात. त्यांस केवळ नफ्याची बुद्धी आहे. म्हणून ते या अज्ञानाचे सांप्रत पोसिंदे आहेत. आणि ते प्रयत्नपूर्वक अज्ञान वाढवितात व संपूर्ण देशातील लोक विचारहीन आहेत याजकरिता त्यांस कळत नाही. हे जे सांगतात, त्याजवर भरवसा ठेवितात आणि अडाणी जातीचे लोक वगैरे यास ब्राह्मण व भट फार फसवितात, वास्तविक धर्म त्यांस कळत नाही.
 वास्तविक धर्मात काही तरी दया आणि शांती या गुणांचे निदर्शन झाले पाहिजे व ती दयाही भलभलत्यावर उपयोगी नाही. जे सुशील, उपयोगी व लोकांची सेवा करतात, त्याजवरच असावी. याखेरीज व्यय करणे मूर्खपणा आहे. अहिल्याबाईने धर्म केला, तो पैसा यथाव्यय उत्तम प्रकारे झाला असता, तर फायदा होता. परंतु तिचा धर्म असा होता की, काशीहून पाणी आणून दक्षिणेत स्नान नित्य करावे; एक बाह्मणाकडून नित्य काशीस जातो, असे म्हणवावे आणि दुसऱ्याकरवी जाऊ नये असे म्हणवावे व त्यात महान पुण्य मानून पैका द्यावा. आता असा धर्म जेथे होतो, तेथे लोक किती आळशी होतील व किती मूर्ख असतील ? मेहनती कुळंबी वगैरे लोकांपासून त्यांचे शरीर पिळून, द्रव्य घेऊन, ते आपले आळशी भटांस दिले म्हणजे केवढा राज्यात जुलूम होईल ? परंतु असे झाले आहे आणि कोट्यवधी रुपये याप्रमाणे खर्च झाले आहेत. हेच सांप्रतच्या मूर्खपणाचे कारण होय !
 निकामी भटांस पोषणार्थ पैका देतात आणि त्यात लोकांस पुण्य वाटते. याजमुळे ब्राह्मण भ्रष्ट होतात, दुसरे काही करीत नाहीत; परंतु ज्या गृहस्थाचे घरी भट असतो, त्याचा प्रयत्न एवढाच असतो की, भटशस पैका द्यावयाच्या वाटा नाना प्रकाराने यजमानास सुचवाव्या. संक्रांत आली, म्हणजे त्यांस सांगावे की तिळपात्रे द्यावी म्हणजे पुढे फार फळ आहे. दशाहार आला, म्हणजे वायने देववावी. आणि त्यात पाहिले, तर एकही पदार्थ उपयोगाचा नसतो. वीतभर सूप, बोटात जावयाच्या नाहीत अशा दोन बांगड्या; कोणत्याही कामाच्या उपयोगी पडावयाचा नाही, असा एक करंडा आणि चार पैसे, त्या मूर्ख गृहस्थास नाना प्रकारे गोष्टी त्याकडून सांगून देववितात; आणि चार पैसे मिळाले, एवढाच लाभ मानून इतर जिनसा टाकून देतात. याप्रमाणे वर्षांत किती वेळ करतात, याचा ठिकाण नाही व ब्राह्मणांस पुण्यकाळ किंवा व्रताचा दिवस सांपडणार नाही असा कोणताही दिवस वर्षांत नाही. त्याविषयी पुराणात तयारी आहेच. असा व्यर्थ खर्च गृहस्थाकडून करवितात आणि मग त्यांस जी प्राप्ती होते, जीवर हा खर्च व त्याचा जरुरीचा खर्च जातो. मग चांगले कामास खर्च करावयास त्यांस सामर्थ्य कोठून राहणार ? भट सर्व मिळून जातो आणि मूर्ख यजमान असला, म्हणजे भटाचे त्याचे फारच जमते.
 यजमान वारंवार भटास पुसतो, हे कर्म चांगले सांग झाले ना ? भट म्हणतो, "सांग सामर्थ्याप्रमाणे झाले; परंतु आणखी चार आणे जास्ती खर्च करता, तर बरे होते. उदककुंभावर दक्षणा फारच थोडी पडली." मग भोळसर यजमान असला, म्हणजे त्यांस तेच खरे वाटते आणि भटाचे सांगितल्यावरून चालतो. मुख्यत्वेकरून बायका फारच मूर्ख व अज्ञान असतात. याजमुळे या देशातील स्त्रियांस भट फार फसवितात.
 काय काय चमत्कार आहेत, ते लिहिताना पुरणार नाहीत. एखादी विधवा स्त्री झाली, म्हणजे तिच्याजवळ दोन पैसे असले, तर ते हरण करण्यास भट कारण होतात. तिला सांगतात की, बाई तुमचा नवरा मेला; आता मुले कोणाची, आणि बाळे कोणाची ? तुम्ही आपले जन्माचे सार्थक करून घ्या. या जन्मी वैधव्य प्राप्त झाले, असे पुढे तरी होऊ नये म्हणून काही प्रयत्न करा. हा पवित्र वैशाख आहे; किंवा कार्तिक आहे; अगर चातुर्मास्य आहे. पुष्कळ नेमधर्म व देवब्राह्मण याजकडे व्यय करीत जा; म्हणजे ईश्वर संतुष्ट होईल. देवाचे तोंड ब्राह्मण आहेत. त्यांस मिळाले म्हणजे देवास पोचले. आणि पहा, देवळात इतके लोक पैसे देतात; परंतु देव घेत नाही. ब्राह्मण घेतात. का की, देवाचे तोंड ब्राह्मणच. अशा गोष्टी सांगून त्यांजकडून दोन पैसे असतील, ते बाहेर काढवितात व स्त्रियांस मूर्खपणामुळे कित्येक गोष्टी ज्या उपहासास कारण, त्या खऱ्या वाटतात. मग बाई नेम धरते की, रोज नित्य दान किंवा नित्य गोप्रदान करावयाचे आणि भटजीबाबास द्यावयाचे. असे भटजीबाबा स्वस्थ बसून काही उद्योग न करता खातात. याप्रमाणे धर्माची व्यवस्था होती. याजमुळे किती एक हजार गरीब लोक उपाशी मरतात, पण त्यांची दया कोणास येत नाही; आणि हे निरुद्योगी भट अज्ञान व आळस यांचे चौकीदार ! सर्व धन खातात.
 याप्रमाणे देऊळ बांधण्याचा मूर्खपणा आहे. याजकरिता हल्ली जे गृहस्थ असे म्हणतात की, घरी भट नित्य पंक्तीस असल्याखेरीज अन्न घेऊ नये. त्यांणीं विचार करावा आणि भटासारखे पशू होऊ नये.

♦ ♦


मद्यपान

पत्र नंबर ७६ : २३ सप्टेंबर १८४९

 अलीकडे इंग्रजी राज्य झाल्यापासून लोकांस सद्गुण लागावयाचे, एकीकडे राहून, महान भयंकर व त्वरित वृद्धी पावणारा असा एक दुर्गुण लोकांमध्ये प्रगट झाला आहे. तो कोणता म्हणाल तर दारू पिणे. पहा की, पूर्वीचे राज्यात दारू कोणी पीत नव्हते व उत्पन्नही कोणी करीत नव्हते. ब्राह्मण व मराठे राज्य करणारे. तेव्हा ते दारू उत्पन्न करणारास नीच मानीत आणि आपली झाडे त्यांजला दारू करण्यास दिली तर त्यांस बहिष्कृत करीत. आणि कोकणात अशी चाल होती की, दारू करणारा हातात दारू घेऊन जर अंगावरून गेला, तर दर्शनदोषास्तव स्नान करीत आणि दारू प्यालेला ब्राह्मण कधी आढळत नव्हता. जर कदाचित कधी कोणी पाहिला तर लोक त्यांस निंद्य मानून कधीही जातीत घेत नव्हते व ज्या गावात तो रहात असे, तेथे त्याचे फार हाल होत असत. त्याचे लग्नकार्य व्हावयाचे नाही व कोणी त्याजकडे जेवावयास जात नव्हते. असा त्याचा धिक्कार करीत असत. जर कोणी अतिशूद्रादिकांकरिता दुकान घातले तर एकीकडे छपवून चोरून घाली. परंतु तेथे कोणी बहुतकरून जात नव्हता. व भाविक लोक त्या रस्त्याने जात येत नव्हते व सरकार अशा व्यापाऱ्यापासून उत्पन्नाची आशा करीत नव्हते. म्हणून लोकांस मना करता येत होते.
 परंतु हल्लीचे सरकारची फार विपरीत वर्तणूक आहे. सप्टेंबरचे दहावे तारखेचे पुण्याचे 'ज्ञानप्रकाशात' सरकाराविषयी एक कलम लिहिले आहे व त्यांस दृष्टान्त तेल्याचा दिला आहे, तो खरा दिसतो, पहा की, सरकार लोकांच्या स्थितीकडे किमपि पहात नाही. द्रव्याची आशा धरून दुर्गुणावर उत्पन्न करतात. आणि प्रसिद्धपणे दुर्गुण वाढू देतात. जर त्यांनी उत्पन्न सोडले, तर त्यांस मनाई करण्यास तोंड होईल व जर उत्पन्न करतील तर त्यांस दुर्गुण बंद करण्यास तोंड नाही. कारण की, एका हाताने दारूची विक्रीचिठी देतील, आणि दुसरे हाताने लोकांस पिऊ देऊ नका, म्हणून सांगतील, हे नांदणार नाही. यास्तव त्यांणी उत्पन्न सोडून दिले पाहिजे; म्हणजे त्यांचा दाब बसेल आणि मनाईकरिता कायदे करता येतील. याप्रमाणे विलायतेतही कायदे झाले आहेत. मग या देशात सरकारने असे करण्याचा हेतू कोणता ?
 अद्याप हा दुर्गुण लोकांमध्ये विस्तीर्ण व दृढ झाला नाही, तोपर्यंत सहज मोडता येईल. नाही तर जर सरकारने अशीच वर्तणूक आणखी कित्येक वर्षेपर्यंत चालविली तर अवघड पडेल. यास्तव हे त्वरित झाले पाहिजे. मद्यपान करणे, हे फार वाईट कर्म आहे. येणेकरून द्रव्य, शक्ति, बुद्धी ही नाशाप्रत पावतात, ज्या गावी दारूची दुकाने आहेत तेथील लोक किती खराब झाले असतात व विलायतेतही असेच आहे. ज्या ठिकाणी दारूची दुकाने आहेत त्याचे शेजारी राहणारे लोकांस दुर्गुण लागून ते सर्वस्व घालवून बसतात आणि भिकारपण येते. त्यांची पोरेबाळे उपाशी मरतात. व जे मेहनत करून मिळवितात ते पुरेनासे होते. कारण या दुर्गुणास व्यर्थ पैसा बहुत खर्च करावा लागतो. यास्तव सर्व पैसा इकडे जातो. आणि करमत नाहीसे होते. अखेरीस दारू पिणाराची बुद्धी मंद होते, आळस वाढतो, काम होत नाही; आणि सर्व प्रकारे त्याची हानी होते. याप्रमाणे किती एक लोक हल्ली होत चालले आहेत.
 सामान्यतः लक्षात आणा की, इंग्रज लोक मोठे आहेत; परंतु त्यांची बुद्धी हिंदू लोकांइतकी नाही. त्यांस बारीक गोष्ट व अवघड गोष्टी यांची समजूत होत नाही, हे जे इकडे इंग्रज लोक कामावर येतात, त्यांचे वर्तणुकीवरून समजते. आणि हिंदू लोक ब्राह्मण वगैरे यांची बुद्धी बहुत जलद व समज चांगला, परंतु आळसाने व्यर्थ गेला. व सुशिक्षा नाही. येणेकरून चांगली बुद्धी वाईट कामाकडे लावतात. परंतु तसे इंग्रज लोक नाहीत. त्यांस लहानपणापासून शिक्षा चांगली असते. याजकरिता ते विद्येमध्ये निपुण असतात व उद्योगाने परिपूर्ण असतात.
 तत्रापि ही गोष्ट खचित आहे की, इंग्रज लोकांचे बुद्धीस मंदपणा असतो, याचे कारण दुसरे काही नाही. दारू वगैरे मादक पदार्थ भक्षण करतात. येणेकरून त्यांचे बुद्धीस जरा येते. आणि जेव्हा एखादा मुकद्दमा सोपा असतो व त्यात काही तक्रार नाही असते, तेव्हा तो त्यांस समजतो. परंतु जो मुकद्दमा तक्रारीचा असतो व ज्यांस बहुत घोटाळा असतो, तो किती जरी समजाविला, तरी समजत नाहीत मग न समजताच हुकूम देतात, हे आम्ही नित्य पहातो व असेच सर्व ठिकाणी आहे. इंग्रज लोक बारीक कज्जे व तक्रारी सर्व बरोबर समजणारे क्वचित आहेत. आणि असले तरी त्यांस बुद्धी नीट ठेवावी लागते. फार श्रम होत नाहीत. दरम्यान हवा बदलून आराम विश्रांती घेतात, तेव्हा पुन्हा बुद्धी ताळ्यावर येते आणि त्यांस कामकाज सुचते.
 परंतु हे आमच्या लोकांस नको. हे पन्नास वर्षे सारखे काम करीत असले तरी त्यांस बुद्धी ताळ्यावर आणावी लागत नाही. व नाना फडणीस वगैरे मेहनती लोक होते ते एक दिवसही कामाखेरीज बसले नाहीत. याचे कारण हेच की, आमचे अन्न निर्मळ आणि इंग्रज लोकांचे अन्न बुद्धी मंद करणारे जड आहे. परंतु त्यांचे देशाची हवा शीतळ आहे. याजमुळे ते उद्योगी असतात. आमचे देशात हवा उष्ण येणेकरून लोक आळशी आहेत. ते जर मद्यमांस खाऊ लागले, तर फारच आळशी होतील.
 दारूसारखा दुष्ट पदार्थ दुसरा नाही व या पदार्थाचे व्यसन फार बलाढ्य आहे. एकदा लागले, तर सुटत नाही. व सर्वस्वी गेले आणि सर्वांचा नाश झाला, तरी काही सुटत नाही. हे व्यसन मोठे घातकी आहे. यास्तव शासन नेमून याजपासून लोक परावृत्त केले पाहिजेत. परंतु हे दारू पिणारांचेच राज्यात होईल काय ? अस्तु. व्हावे हे चांगले. ते आपण स्वतः दारू पितात. परंतु टाकतील तर त्यासही चांगले आहे. आमचे लोकांस हे व्यसन न लागावे इतके तरी त्यांनी केले पाहिजे. जरी आज ते उत्पन्नावर व लोभावर दृष्टी देत असतील, तरी हे करणे सरकारास योग्य नाही. कारण आज थोडे उत्पन्न होईल. परंतु लोक जर भिकारी झाले आणि दरिद्री होऊन काही उपयोगी नाहीत असे झाले, तर मग सरकार त्याजपासून काय घेईल ? सरकारची मातोश्री लोक आहेत. त्यांस त्यांजला रोगी, आळशी, अशक्त करून मग त्यांचे पोरांचे पोषण कसे होईल ? याजकरिता उत्पन्न सरकारने अगदी सोडून मनाई करावी म्हणजे लोक जगतील. नाही तर या सरकारखाली जी रयत आहे, तीस हे व्यसन कधी सुटावयाचे नाही व इंग्रज लोक या देशातून गेले तरी इकडे या लोकांत हे व्यसन राहून त्यांचे पाय इकडे लागले होते, हे स्मरण इतिहासातच राहील असे नाही; परंतु प्रत्यक्ष लोकांचे स्थितीत राहील. याजकरिता हा बदलौकिक करणारे उत्पन्नाची बाब सोडून देतील, तर चांगले होईल.
 ही गोष्ट आमचे मूर्ख लोक आहेत त्यांस ठाऊक नाही. व त्यांनी दारू पिण्यापासून अनर्थ काय आहेत, ते पाहिले नाही. परंतु हे जर काही दिवस चालले तर लवकरच पहातील. सांप्रत लोक हौसेने दारू पितात व तिचे गुण वर्णितात; ते असे की, ही बळ आणणारी आहे. कोणी म्हणतात की, ही रोगनाशक आहे. कोणी म्हणतात की, यज्ञातदेखील सुरापान आहे. कोणी म्हणतात यंत्रशास्त्राप्रमाणे ही शुद्ध आहे. याप्रमाणे म्हणून हल्लीचे पंडित, शास्त्री व गृहस्थ पुण्यात व इतर ठिकाणी निर्लज्जपणाने दारू पितात. शूद्रादिक पितात हे सोडून द्या. परंतु प्रत्यक्ष ब्राह्मण व शास्त्रीदेखील शाक्त होऊन कुकर्म करतात. दारू व मांस खावयास मिळावे, म्हणून शाक्त होतात आणि पूजेचे निमित्त करून मनास वाटेल तितकी दारू पितात.
 ब्राह्मण लोकांचे मुख्य शहर पुणे आहे. तेथे आम्हास पक्केपणी समजले आहे की, शास्त्री, पंडित व गृहस्थ मिळून पाचशे असामी दारू पिणारे आहेत. त्यांतील किती एक मस्त होऊन रस्त्यावर पडतात, किती एक चोरून आपले घरी यंत्रे ठेवून दारू काढतात. गूळ किंवा तांदूळ कुजवून भट्टया घरी लावतात आणि लाल तांबडे डोळे करून, कपाळी तांबडा शेंदूर किंवा कुंकवाचे टिपके लावून प्रसिद्धपणाने फिरतात व तोंडास घाण येतच असते; तसेच तोंड धरून लोकांत येतात. परंतु कोणी त्यांस बहिष्कृत करीत नाहीत. याजवरून ब्राह्मण लोक अतिशूद्राचे योग्यतेबरोबर आले आहेत किंवा नाहीत, ते पहावे. जे ब्राह्मण अशी कामे करतात, ते ब्राह्मण म्हणावे की काय ?
 ब्राह्मण लोकांची नीती बुडाली; व त्यांस चांगले कोणते व वाईट कोणते हे कळत नाही; व चांगल्यांचा प्रयत्न करून त्याची स्थापना करावयाची हे त्यांस ज्ञान नाही. यास उदाहरण, बाजीराव राज्यावर होता तेव्हा जे त्याचे अंकित होते, त्यांच्या स्त्रिया त्याने भ्रष्ट करून नाना प्रकारची कुनीती केली. परंतु त्यांस प्रतिकार कोणाच्याने करवला नाही. पुण्यात शास्त्री व पंडित त्या वेळेस बहुत होते परंतु साखरभात खाऊन 'वाहवा' म्हणत गेले. याप्रमाणे त्या मूर्ख, चांडाळ, दुष्ट व अतिशूद्राहूनही नीच प्रभूस राज्यावर भटांनी व गृहस्थांनी रक्षण केला त्याचे परिणाम आज सर्वांस त्यातून बहुधा ब्राह्मणांस प्राप्त झाले आहेत.
 त्या वेळेस तो अधिकारी होता, म्हणून कोणाचा उपाय चालला नाही, असें जर म्हणतील, तर हल्ली जे शाक्त पुण्यात आहेत, हे काही अधिकारी नाहीत. कोणी द्रव्यवान आहेत खरे, पण त्यांचे पारिपत्य बाकीचे सर्व ब्राह्मण मिळून का करीत नाहीत ? हा माझा प्रश्न सर्वांस आहे. जे दारू पीत नाहीत, त्यांनी हा विचार करावा. दारू पिणारे प्रसिद्ध आहेत व सर्वांस ठाऊक आहेत व पिणारे आहेत त्यांचे तोंडच साक्ष देईल. ते फार नाहीत. यांचे पंक्तीस जेवणे, त्यांचे घरी जाणे, सोयरगत करणे, हे का चालू देतात ? एकदम त्यांस बहिष्कार घालीत नाहीत. परंतु हतवीर्य हे ब्राह्मण, यांस ज्ञान नाही, शक्ती नाही; नीती कोणती, अनीती कोणती हे जाणत नाहीत. आणि निर्लज्जपणाने दारू पिणारांचा सहवास करतात. कोणी भिक्षुक म्हणून करतात. कोणी चाकर म्हणून, कोणी स्नेही म्हणून, कोणी मित्र म्हणून, कोणी मूर्ख म्हणून करतात.
 जर त्यांस जातीचे भय किंवा बहुत लोक नीतिमान आहेत, त्याजपासून भय प्राप्त होईल; तर या सर्वांमध्ये आपण निंद्य आहो, असे वाटेल. स्वस्थपणाने दारू पितात, त्यांचे तोंडाची घाण सर्व लोक घेत फिरतात. हे धर्मशास्त्रात केवढे विपरीत आहे ? तंत्रशास्त्र व शाक्तमत हे नरकाचे द्वार आहेत व या मताचे लोक नरकात जातील, यात संशय नाही. व या मताचा पोथ्या कोणी केल्या असतील त्या असोत, परंतु ते उत्तम पुरुष नव्हते; व त्या सर्व पोथ्या उकिरड्यावर टाकण्याच्या लायक आहेत; यास्तव येविषयी लोकांनी सावध व्हावे.

♦ ♦


दया

पत्र नंबर ७९ : २१ ऑक्टोबर १८४९

 श्रीमंतांचा व गरिबांचा या जगात दूरचा संबंध आहे, तरी परलोकात फार जवळचा संबंध आहे. याकरिता दया हा आपला एकमेकांचा प्रथम धर्म आहे. सर्व धर्मांचे सार दया आहे.
 गरीब हा श्रीमंतांचे जुलमाने होतो. काही जन्मतः कोणी गरीब नसतो. याकरिता सर्वांवर दया करावी हा उत्तम मार्ग सर्वदा न्याय दयेच्या अनुषंगाने करावा. आणि असे मनात वागवावे की, आम्ही मरणानंतर ईश्वरापाशी दया मागू. त्याचे दयेवाचून आमचा परिणाम लागणार नाही. म्हणून जर आपण दुसऱ्यापाशी दया मागण्यास सिद्ध आहो, तर तसेच आपण करून दाखविले पाहिजे, तरच आपले मागणे पसंत होईल. सर्व जीवजंतू ज्ञात-अज्ञात हे दयेस पात्र आहेत. परंतु हिंदू धर्मात यज्ञादिक कर्मे आहेत, ती ईश्वरापासून झाली असतील, असे मला वाटत नाही. दुसऱ्या जनावरांवर आपले पाप ठेवून त्याजला मारावे, म्हणजे त्याचे दुःखाने आपले पाप जाईल; ही गोष्ट विचारास विरुद्ध आहे परंतु याप्रमाणे चाल बहुत दिवसांपासून आहे.
 ज्या काळी ईश्वराने माणसे निर्माण केली त्या काळी ती अमक्या कारणाकरिता केली, असे पक्के समजत नाही. परंतु अमुक रीतीने चालावे व अमुक रीतीने न चालावे, ईश्वराने प्रत्येक माणसाचे बुद्धीस प्रेरिले आहे, हे खचित आहे. ईश्वराने आपली बढाई वाढवावी, म्हणून माणसे केली असे नाही. ईश्वरास माणसांच्या कीर्तनाने अधिक थोरपणा येतो, हे मिथ्या आहे. तत्रापि मनुष्यांनी जो आपला निर्माणकर्ता असेल, त्याची सेवा करावी, हाच धर्म योग्य आहे. व नीतीने वागावे म्हणजे सुख होते. परंतु यज्ञ करण्यास सांगितले असेल, असे वाटत नाही. यज्ञ करणे हे अनुचित व अविचारी कर्म आहे. हे बहुधा मनुष्यांनी योजिले असावे. प्रथम मला वाटते, ईश्वराने इतकाच धर्म लावून दिला असेल की, यांनी चांगली वर्तणूक करावी आणि ईश्वरावर भार ठेवून वागावे, एवढाच धर्म होता.
 हे अशावरून वाटते की, इतर धर्म सर्व माणसांस लागू पडत नाहीत. जर इंग्रजांचा धर्म खरा म्हणावा तर अलीकडे उत्पन्न झाला. तेव्हा त्याचे मागे व ज्या देशात तो धर्म माहीत पडला नाही त्या देशातील माणसे नरकात गेली की काय ? हे बरोबर नाही. तशीच मुसलमानांचे धर्माची अवस्था आहे. ईश्वरप्रेरित धर्म सर्वांस सारखा कळावा. जशी त्याने लोकांस खाण्यापिण्याची सोय करून दिली, तद्वत धर्माचीही तयारी केली असेल, व जर जनावरांचे यज्ञ यास धर्म म्हणावा तर त्याविषयीही ऐक्यता होणार नाही व जनावरे वेगळाली प्रत्येक देशात आहेत. तेव्हा त्यांपैकी कोणत्या जनावराच्या रक्ताने ईश्वर संतुष्ट होतो, तेही बरोबर कळत नाही व यज्ञ करता करता माणसे माणसांचा यज्ञ करू लागली व जर इतर जनावरांचा यज्ञ देवास पाहिजे, तर मग माणूस, सुंदर जनावर, याचा यज्ञ का नको ? तस्मात् यज्ञाचा धर्म अगदी खोटा आहे. आता हा धर्म खोटा आहे, असे दिसते.
 याजवर कोणी अशी तक्रार करतील की, शरण गेल्याने देव पापे सोडतो असे जर आहे, तर एक दिवस ईश्वरास शरण गेले, म्हणजे पापमुक्त होऊ. तर त्याचे उत्तर आहे असे की, ईश्वर न्यायी आहे व दयाळू आहे. हे दोन्ही गुण ईश्वरास आहेत. म्हणून तो पापाचे शासन करील हेही खचित आहे, परंतु शासन करण्यास तो स्वतः अधिकारी आहे, असे म्हणावे तर न्यायास विपरीत होते; परंतु तसे नाही. न्याय व दया होते, याचा पर्याय असा आहे की, ईश्वराने आपल्यास प्रतिबंधकारक काही नेम केला नाही. तेव्हा पापास दंड हे खचित. परंतु जे पापी शरण येतील, देवाचे भय ठेवतील, व शरण आल्यापासून पुनरपि पाप करणार नाहीत. ते पापी मुक्त होतात. एकीकडे शरण जावे आणि दुसरीकडे पाप करावे, हा अर्थ त्याचा नाही.
 यास आधार गीतेत असा आहे, "मामेकं शरणं व्रज" ; "मला शरण ये, म्हणजे पापमुक्त होशील आणि तरशील." दुसरे ठिकाणी असे सांगितले आहे की, "ददामि बुद्धियोगं" म्हणजे शरण येतो, तो भावबळाने चांगला होतो. पुनरपि पाप करीत नाही. तेव्हा ईश्वरास जो प्राणी शरण गेला, त्यांस अशी बुद्धी झाली, म्हणजे तो प्रसाद असे समजावे, व त्या प्रसादाचा दाखला असा आहे की त्याने पाप सोडून द्यावे म्हणजे तो शरण गेला हे खचित, व त्याचा भाव बसला हे खचित; आणि ईश्वराची कृपा त्याचे ठिकाणी राहिली हे खचित. नाही तर हातात माळा घेऊन लबाड लोक भजन करतात आणि खोटे बोलतात व पापकर्म सोडीत नाहीत, म्हणून ते शरण झाले असे आम्ही मानीत नाही.
 जगात नाना प्रकारच्या युक्ती काढल्या आहेत; परंतु मी वरती धर्माचे मूळ लिहिले आहे, याप्रमाणे एक साधूच्या मुखातून मी ऐकले आहे. परंतु गीतेची वाक्ये त्याने अशी जुळली ती ऐकून मी समजलो, धर्माचे तात्पर्य एकच आहे. ख्रिस्तीयन म्हणतात की, मनुष्यामध्ये आणि ईश्वरामध्ये एक जामीन रदबदलीस पाहिजे. असेच मुसलमानांचे धर्मात आहे, व तो सर्व पापे आपले शिरावर घेतो, असे मत आहे; पण मला वाटते की, मध्यस्थाची योजना धर्म लावून देणारांनी ईश्वरावर भाव बसण्याकरिता जशा मूर्ती हिंदू लोकांनी केल्या, तशी जामिनाची व मध्यस्थाची युक्ती काढली आहे. परंतु मुख्य तात्पर्य हेच आहे की, ईश्वर न्यायी आहे; तथापि दयाळू आहे व शरणागतांस रक्षितो.
 जर एखाद्याने असा नेम केला की, मी जितके चोर आढळतील तितक्यास मारीन; परंतु जर कोणी चोर मला शरण येऊन वचन देईल की, पुन्हा चोरी करणार नाही. आजपर्यंत अज्ञानाने झाले ते क्षमा करा, मी पुन्हा करणार नाही तर त्यांस माफी देऊन जे चोर दांडगे असतील त्यांस मात्र मारीन, तर तो पुरुष न्यायी आणि दयाळू म्हणावा किंवा नाही ? त्याने चोरास सुटण्याकरिता एक मध्ये संधी ठेवली म्हणून त्याचे न्यायास विरुद्धता येत नाही. ईश्वर तर दयाळू आहे. त्याणे प्रत्येक जन्मात वारंवार संधी ठेवली आहे. जो जो मनुष्य जन्मास येईल त्यांस संधी आहेच. तरणोपायास मनुष्यजन्म आहे. या जन्मी न केला तर पुन्हा ईश्वर जन्मास घालील तेव्हा तरी करावा. अशा त्याने दयाळूपणाने वाटा ठेविल्या आहेत. म्हणून त्याचे न्यायास विरुद्धता येत नाही. इंग्रजांचे मताप्रमाणे एकच संधी आहे. पण हे बरोबर नाही.
 अशक्त जीवावर दया करणे हा मुख्य ईश्वरभजनाचा मार्ग आहे. दयेविना धर्माचे व कर्माचे सार्थक नाही. परंतु किती एक लोकांस आम्ही या जगात मरणार याचे विस्मरण होते व मग ते आपणांस आणि दुसऱ्यास एक नजरेने पहात नाहीत. जो घोड्यावरून जातो, त्यांस पायांनी कोण चालतो हे दिसत नाही आणि आमचे लोकांस दया फार कमी आहे. मूर्खपणास दया समजतात, म्हणजे अपराध्यास सोडणे हे दया नाही. न्यायास विरुद्ध न येता सोडणे ही मात्र दया. असेच दया म्हणजे अज्ञानास ज्ञान द्यावे; गरिबास द्रव्य, रोग्यास औषध, निराधारास व भुकेल्यास अन्न इत्यादी स्वभावाने द्यावे व त्यात संतोष मानावा. गरिबास पहाताच कळवळा यावा, असे सत्पुरुष थोडे आहेत परंतु जन्माचा हाच उपयोग आहे.

♦ ♦


भक्ती, कर्म आणि ज्ञान

पत्र नंबर ८३ : २५ नोवेंबर १८४९

 हिंदू लोकांचा धर्म वास्तविक विचाराने पाहिला तर फक्त इतकाच आहे की, परमेश्वर जो एक, त्याचे भजन करावे; आणि त्यावर भाव बसण्याकरिता काही तरी मध्यस्थासारखे दगडाची मूर्ती, गुरू किंवा नदी काही तरी घेऊन त्याचे आश्रयाने भक्ती दृढ करावी. आणि भाव पक्का ठरला म्हणजे त्या मध्यस्थाचीही गरज नाही व कोणत्याही कर्माची गरज नाही. आणि वेदशास्त्र यांच्याही आज्ञा त्यांस मानावयास नकोत.
 जे पुरुष संसारात आहेत त्यांस मात्र वेदशास्त्र शासन करते; परंतु परमार्थावर लक्ष देऊन जे संसार सोडितात त्यांस त्यांचे शासन नको, ही गोष्ट सर्व कबूल करतात. जरी ते म्हणतात की, शास्त्र ईश्वरापासून निर्माण झाले तथापि ते असे म्हणतात की, व्यवहार नीट चालण्याकरिता मात्र ते कले, मोक्षाचे साधन शास्त्र नाही. तसेच ज्ञान म्हणजे मनुष्याने सारासार विचार पाहून परमेश्वराशी ऐक्यता पावून रहावे म्हणजे त्यांस शास्त्राची गरज नाही. यावरून ज्ञान हे सर्व कर्ममार्गाहून व शास्त्राहून अधिक आहे. व ज्ञान हे फक्त मनुष्याचे अकलेपासून फळ आहे, तेव्हा अक्कल हीच मोक्षाचे साधन आहे आणि अकलेपासून जो ज्ञानधर्म उत्पन्न झाला, त्याने मोक्षाचे साधन होते.
 व्यवहार व संसार यथास्थित होण्याकरिता पूर्वपार अनुभवावरून किंवा मनुष्यांनी व्यवस्था लक्षात आणून जे नियम ठरविले ते शास्त्र; व यज्ञ, पूजा इत्यादी जे धर्म आहेत तेही त्याप्रमाणे होत. ते काही ज्ञान नाही मग मनुष्यांनी केले असता अथवा शुद्ध समुदाय मताने झाले असता सर्वांनी मानावे म्हणून ईश्वरप्रणीत असे ठरवून ग्रंथांची योग्यता वाढविली. ज्ञानावाचून मोक्ष नाही व प्राण्यामध्ये धन्य वसिष्ठ व ब्रह्मदेव हे देखील ज्ञानी होऊनच मुक्ती पावतात; परंतु प्रजेस व्यवहार समजण्याकरिता नियम बांधले की, दारू पिऊ नये, सोने चोरू नये. या गोष्टी सर्वांस अनुभवावरून वाईट वाटून हे नियम ठरविले असतील, हे उघड आहे. किंवा ईश्वराने सांगितले किंवा प्रेरणा केली, असे म्हटले तरी शोभेल. धर्म म्हणजे व्यवहार व ज्ञान म्हणजे मोक्षाचे साधन.
 एका राजाची गोष्ट आहे की, त्याने आपली स्त्री एकास अर्पण केली. त्याविषयी दुसऱ्याने पुसले की, तुझ्या मनात काही राग आला होता की नाही ? त्याने सांगितले की, नाही. तेव्हा त्यांस पाप लागले नाही. याप्रमाणे त्या व्यवहारामध्ये महान पातकाच्या गोष्टी, त्याही ज्ञानी यांचे ठायी निर्दोष होतात. कारण की त्यांचे ठायी मनास विकृती नाही. मन शुद्ध असले म्हणजे त्यांस धर्मांचा प्रतिबंध नाही. मनास विकृती असल्यास त्याने धर्माप्रमाणे वागले पाहिजे असे आहे.
 तात्पर्य इतकेच की, हिंदू धर्मात कोणतेही मत नाही असे नाही. भजन करण्याचे मार्ग दुष्ट तंत्रापासून तो संन्यासापर्यंत आहेत. नाना प्रकारचे देवाचे भजन करणे हे सर्व आहे. संस्कृत भाषेत कोणताही शब्द असला तरी अर्थ करतात व कोणतेही भाषेतील शब्द असो, अक्षरे असली म्हणजे अर्थ करतात, तद्वत् हिंदुशास्त्र आहे. त्यात काही व्यंग नाही. जे मत म्हटले ते आणि जो शास्त्रार्थ पाहिजे तो त्यात आहे. परंतु सर्वांचे तात्पर्य काढले तर इतके निघते की, या धर्मांमध्ये मुख्य तीन मार्ग आहेत, ते असे. एक ज्ञानमार्ग, दुसरा भक्तिमार्ग, तिसरा कर्ममार्ग / यांचा इतिहास खाली संक्षेपाने लिहितो.
 (१) ज्ञानमार्ग- यास आधार उपनिषदे, काही पुराणे व प्राकृत ज्ञानेश्वरी, दासबोध यांसारिखे ग्रंथ आहेत व त्यांचे आचरणारे तूर्त बैरागी किंवा विरागी किंवा संन्यासी व परमहंस गोसावी इत्यादी लोक आहेत. ज्ञानमार्गांनी संसार बाह्यात्कारी नव्हे, परंतु अंतर्यामापासून सोडिला पाहिजे. कदाचित संसारात असले तर अलिप्त असले पाहिजे, वांछना, इच्छा व आशा नसाव्या व ईश्वर व मी एकच आहे, असे म्हणून ईश्वराचे एकत्रपणाचे चिंतनात असावे, भोग नसावा, कर्म नसावे, शरीराची, मिळकतीची काळजी, खबरदारी नसावी, अद्वैत- मत सोडावे; पूजन व पूज्यभाव सोडावा; परंतु मायागुणाने व्याकुळ होऊन आपणास देही मानले होते. परंतु ही माझी भ्रांती गेली. असे कल्पून त्यात राहावे म्हणजे मरणान्ती सायुज्य पद प्राप्त होते. म्हणजे जशी कल्पना तशीच सिद्धी होते. या मतास अनुसरणारे श्रीशंकराचार्य व ज्ञानेश्वर हे कलियुगी व पूर्वी श्रीकृष्ण, जनकराजा, शुकस्वामी इत्यादी झाले आहेत.
 (२) भक्तिमार्ग- यास आधारी शांडिल्याची स्मृती आहे व यास भक्तिशास्त्र असे नाव आहे. तसे भागवत व गीता इत्यादिक आधार आहेत व त्या मार्गाचे प्राचीन काळी आचरणारे प्रल्हाद, उद्धव, हनुमान इत्यादिक; यांनी भक्ती केली व अलीकडे तुकाराम, नामदेव हे सर्व साधू याच मार्गातील होते. या मार्गात असे आहे की, द्वैतमत धरावे. मी वेगळा, ईश्वर वेगळा असे मानावे. मी सेवक, तो यजमान असे जाणावे आणि भक्ती करावी, क्षमा मागावी, समीपता मरणानंतर इच्छावी; प्राणी वेगळा, ईश्वर वेगळा, असे समजावे. किरकोळ शास्त्रातील कर्मे काही करू नयेत. फक्त सगुण देवावर भक्ती ठेवून असावे; जेथे कर्म करावयाचे येथे त्याचीच उपासना करावी व ही भक्ती एका परमेश्वराची असावी किंवा त्याचा अवतार किंवा तत्प्रतिमा मूर्ती असून त्या मार्गाने भगवंताचे सेवन करावे. हा मार्ग बहुत लोकांस आवडतो व वैष्णव यांचे मत हेच आहे. विशिष्टाद्वैत, रामानुज, राघवाचार्य वगैरे यांचे हेच मत आहे. ते म्हणतात की, माया ईश्वरकृपेवाचून दूर व्हावयाची नाही. याजकरिता सेवक- भावाने भजावे हेच उत्तम. परंतु वेदान्ती म्हणजे ज्ञानमार्गी यांचे हिशेबाने भक्तिमार्ग खालची पायरी आहे.
 (३) कर्ममार्ग- त्यांस आधार स्मृती, श्रुती व पुराणे आहेत. पूर्वी वसिष्ठ वगैरे ऋषी जांणी यज्ञ, याग, तप, अग्निहोत्रे वगैरे केली ते सर्व कर्ममार्गी होते व जे व्यवहारांत गृहस्थ आहेत, लग्ने करतात व घरात राहतात, ते सर्व कर्ममार्गी होते. कर्ममार्गांत एका देवाची भक्ती नाही व ज्ञानही नाही. याजकरिता ही कनिष्ठ पायरी पण प्रथमची आहे. यामध्ये पंच तत्त्वांचे भजन आहे व स्नान, संध्यादिक कर्मे, व्यवहार इत्यादिक आहेत. त्यामध्ये ईश्वराचे विशेष ज्ञान नाही, अनेक देवता आहेत, त्यांस संतुष्ट करून स्वर्ग इच्छा करावी, इतकेच यात आहे व इंद्रिये दमन वगैरे करावे यात काही कर्ममार्गी ऋषीदेखील मोठे रागीट असत व शाप देत हे प्रकरण मांत्रिक आहे.
 एकूण हे तीन मार्ग प्रसिद्ध आहेत. सर्व हिंदू लोक या तिहींतील एका मार्गात बहुधा असतात. आमचे मत असे आहे की, तिन्ही मार्गामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. त्या घेऊन जे शहाणे असतील त्यांनी परमेश्वराची भक्ती करावी, जगात दया करावी; यांत सर्व आले. ज्ञानमार्ग व कर्ममार्ग यांत घोटाळा दिसतो.

♦ ♦


नीति - प्रशंसा

पत्र नंबर ८८ : १३ जानवारी १८५०

 आमचे लोकांची सुधारणा व्हावयास मुख्य काय पाहिजे, याचा विचार केला असता असे दिसते की, मुख्य त्यांस विद्या पाहिजेत. विद्या कोणत्या म्हणाल तर हल्ली ज्या विद्या सत्यप्रतिपादक व वास्तविक जे व्यवहार आणि राज्यनाती यांना दर्शक आहेत, त्या विद्या प्रगट झाल्या पाहिजेत.
 पूर्वीच्या विद्या ज्या संस्कृतद्वारा येतात, त्या उपयोगी नाहीत. कारण त्यात असत्य गोष्टी फार आहेत व मूर्खपणाच्या समजुती फार आहेत. त्या विद्या प्राचीन काळच्या लोकांच्या, इतकेच जाणून त्या आता एकीकडेच ठेवून दिल्या पाहिजेत व नूतन ज्या कळा, शिल्प इत्यादी निघाल्या आहेत, त्या ग्रहण केल्या पाहिजेत. पूर्वीच्या चुकांनी ज्या भरलेल्या विद्या आहेत, त्या उपयोगी नाहीत. लहान मुलांस अठराही पुराणे पढविली तरी त्यांस काय ज्ञान येईल बरे ? याचा विचार पहा; त्यांतील असत्सिद्धान्त तेही आता दाखवितो.

क्ष रइक्षुसुरासर्पीदधिक्षीरजलार्णवः ॥

हे सागराचे ज्ञान होईल. स्त्रियांचे गुण कसे आहेत, हे वृद्ध चाणक्यात दुसरे

अध्यायात एका श्लोकात दाखविले आहे की,

"अनृतं साहसं माया, मूर्खत्वमतिलोभता
अशौचत्वं निर्दयत्वं स्त्रीणां दोषाः स्वभावजाः"

 हे तो समजेल. आणखी,

"विप्रपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्"

 हे समजेल आणि,

"यथा नयंति रागास्ते न गंगा न सरस्वती"

 म्हणजे गाईल तो मोक्षास जाईल, हे समजेल इत्यादिक अज्ञानभरित वाक्यांचा संग्रह होऊन तेणेकरून मूढमती मात्र होईल. यास्तव या प्राचीन काळच्या विद्या काही उपयोगी नाहीत. या विद्या जितक्या वाढतील तितके अज्ञान दृढ होईल. आणि हा देश कधी सुधारणार नाही.
 याप्रमाणेच शास्त्रे आहेत. व्याकरणशास्त्रात शब्द हाच ईश्वर असे प्रतिपादन आहे. मीमांसांत वेद हाच ईश्वर असे प्रतिपादन आहे. धर्मशास्त्रात यज्ञादिक खटपट केली म्हणजे मोक्ष होतो. बापास पिंड दिला म्हणजे मोक्ष होतो; पुत्र असला म्हणजे २१ पिढ्या स्वर्गास जातात, इत्यादिक प्रतिपादन केले आहे. तसेच दर एक पुराणांत देवता, विशेष उपासना लिहिल्या आहेत. त्यात तंत्रे वगैरे आहेत. त्यात तर अतिशय मूर्ख मते प्रतिपादन केली आहेत. तशात ही शास्त्रे व पुराणे प्राचीन काळची ज्ञाने आहेत. इतक्याकरिता पढावी; परंतु त्याप्रमाणे व्यवहारात वर्तणूक केली तर अशुद्ध होईल यात संशय नाही. यास्तव या पढण्याचा संशय होऊन वास्तविक विद्या वृद्धिंगत झाल्या पाहिजेत, असे लिहिले म्हणून धर्माविरुद्ध होत नाही.
 हिंदु लोकांचा धर्म केवळ समुद्राचे वर्णनातही नाही व स्त्रियांचे वर्णनातही नाही. धर्म हा ईश्वराचे वर्णन आहे. त्यात दुसरे अधर्म मिश्र झाले आहेत. ते मात्र जातील व केवळ भक्तिज्ञान हे धर्म रहातील. कर्ममार्ग कमी होईल, व मूर्ख समजुती कमी होतील. व वास्तविक धर्म लोकांत प्रकट होईल. ईश्वरभक्तीचा भाग राहून बाकीचा भाग सुधारेल. या सर्व समजुतीसच धर्म म्हणणारे आहेत. ते मूर्ख व या पृथ्वीचे वगैरे ज्ञानविषयी शास्त्राविरुद्ध लिहिले तर धर्माविरुद्ध होत नाही. परंतु बहुत लोकांस असे वाटत नाही याचे कारण अज्ञान आहे व या प्राचीन ग्रंथकारांनी व्यवहाराची व धर्माची पुस्तके वेगळाली लिहिली नाहीत म्हणून व्यवहाराचा व धर्माचा भेद राहिला नाही. अस्तु. हा भेद आता लोकांस समजेल. शास्त्राचे प्रमेय लोक समजत नाहीत. शास्त्री, पंडित अर्थांचा अनर्थ करतात व काही काही गोष्टी ज्या आहेत, त्यांचा यथार्थ अर्थ समजत नाहीत. आता पहा की, एका ठिकाणी पुराणात असे लिहिले आहे की,

विप्रावदर्शनात् क्षिप्रं क्षीयन्ते पापराशयः ।
वंदनान्मंगलावाप्तिरर्चनादच्युतं पदम् ॥१॥
आधिव्याधिहरं नृणां मृत्युदारिद्र्यनाशनम् ।
श्रीपुष्टिः कीर्तिदं वन्दे विप्रश्रीपादपंकजम् ॥२॥
सागरे सर्वतीर्थानि पदे विप्रस्य दक्षिणे ॥३॥

 याप्रमाणे ब्राह्मणांचे वर्णन केले आहे, ते खरे समजून लोक ब्राह्मणांच्या पायाचे तीर्थ पितात. सदावर्ते ब्राह्मणाकरिताच घालतात. ब्राह्मणांची पूजा केली, तर मोक्ष होतो, असे समजतात. यास प्रमाण पुराणांचे दाखवितात. की, प्राचीन राजे व श्रीकृष्णदेखील ब्राह्मणांची उष्टी काढीत होते. याप्रमाणे ब्राह्मणांस चढवून दिले आहेत. तेव्हा अशा गोष्टींवर किती विश्वास ठेवावा, याचे प्रमाण लोकांस समजत नाही व पुराणिक आणि हरिदास असाच उपदेश करून लोकांस वेड लावितात. याचा विचार लोकांनी करावा. ब्राह्मण हे मनुष्य. यांचे पायांचे पूजन केले म्हणजे मोक्ष कसा होईल ? हे विलक्षण मत आहे.
 याप्रमाणे लक्षावधी गोष्टी आहेत, याचप्रमाणे लोक क्षुल्लक धर्म व महान् धर्म यांचा भेद जाणत नाहीत. महान व परम धर्म असे की, सत्य बोलणे, दया करणे, क्रोध न धरणे, शांती धरणे, चोरी, अभिलाषा न करणे, व्यभिचार न करणे इत्यादी नीतीचे धर्म याविषयी अभिमान सोडून क्षुल्लक धर्म सांगतात. ते असे की, तुम्ही तुळशी वहाव्या, बेल वहावा, चंदनाची खोडे झिजवावी, वाती जाळाव्या, काळे वस्त्राने विटाळ होतो; काडी मोडली म्हणजे ब्राह्मणहत्या होते, शंखोदक घेतले म्हणजे पाप जाते, वाती तुपात घालाव्या, डबीत मंगळसूत्र द्यावे. सारांश, इत्यादी मूर्खपणाच्या गोष्टीस धर्म असे माझ्याने म्हणवत नाही. याविषयी लोकांस वेड लावून हे करवितात; परंतु परम धर्म कोणास सांगत नाहीत.
 पहा की, कामदार मोठाले असतात; त्यास कोणी असे सांगत नाही की तुम्ही लाच खाऊ नका, खरे काम करा, लबाड बोलू नका. हे सांगायचे सोडून त्यांचे पूजन करावयाचे ढोंग, देवपूजेची भांडी, ढोल व देव्हारे वाढवितात आणि त्यास दुनीतीचे मार्ग शिकवितात. ब्राह्मणांची मते अशी आहेत की, चोऱ्या केल्या तरी चिंता नाही. ब्राह्मणांस भोजने घातली, म्हणजे मग त्याचे पाप नाही. किती एक लोक गळ्यात शालीग्राम बांधतात व खांद्यावर तुळशीची झाडे घेतात, आणि पंढरपूरची यात्रा करतात, परंतु हे लोक अशा कर्माने तरतील काय ? जो मनुष्य जन्मात लोकांचे कल्याणाची गोष्ट मनात आणीत नाही, दया करीत नाही व ईश्वराचे भजनपूजन ज्ञानाने करीत नाही, तो शालीग्राम दगड गळ्यात बांधून ईश्वरापाशी कसा जाईल ? तसेच ज्या स्त्रीने व्यभिचारकर्म केले, तिने तांदूळ निवडून लाखोल्या वाहिल्या व पुष्कळ वायने दिली, तर ईश्वरास ती प्रिय होईल काय ? परंतु ब्राह्मण आळशी यांस पैसा मिळाला पाहिजे, म्हणून ते नानाप्रकारची वेडे लोकांस लावून पैसा काढितात.
 तसेच शास्त्री, पुराणिक हे लोकांस अनर्थ सांगून भ्रष्ट करतात. हे सर्व पोटाकरितां आहे व हे माझेच मत आहे असे नाही. पूर्वी तुकाराम इत्यादी साधू होते. त्यांनीही ब्राह्मणांची लबाडी जाणून अभंग केले आहेत की,

पोटासाठीं केलें ढोंग, तेथें कैचा पांडुरंग ? ।
द्रव्यलोभाचें कीर्तन, तेथें कैचा नारायण ? ॥

इत्यादीक. बहुत साधूंनी ब्राह्मणांच्या लबाडीविषयी वर्णन केले. ज्ञानेश्वर म्हणतात की,

जपतपक्रियाधर्म, वाउगाची व्यर्थ नेम |

तसेच रामदास म्हणतात की,

नको कंठ शोषू बहू वेदपाठीं,
नको तूं पडूं साधनांचे कपाटीं ।

 तेव्हा याजवरून असे सिद्ध होते की, हे किरकोळ नेमधर्म जे आहेत, त्यात काही नाही; हे सर्व व्यर्थ आहेत. ईश्वराचे मनाने भजन, पूजन करावे व मन शुद्ध ठेवावे हाच धर्म. स्नान केले नाही, तर दुःख वाटू नये आणि लबाड बोलले तर दुःख वाटावे. परंतु ही भावना आमचे लोकांची नाही, हे लोक आचाराकरिता प्राण देतात आणि विचार मुळीच करीत नाहीत. भस्म लावले म्हणजे शुद्धी होते, असे समजतात. परंतु पन्नास वेळ भस्म लावले व दोनशे वेळ अंग धुतले तर मनाचे मळ जातील काय ?
 ईश्वर शरीरास पहात नाही; मनास पाहतो. मुख्य मन शुद्ध पाहिजे; परंतु हल्लीचे ब्राह्मण पैसा काढण्याकरिता हे सांगत नाहीत. फक्त आचार, जेणेकरून पैसा मिळावयाचा, तेच सांगतात, सर्व धर्म आता लोकांच्या पैशावर आला आहे, पैसा दिला म्हणजे पाप जाते, प्रायश्चित्त होते, ईश्वर प्रसन्न होतो, असे ब्राह्मण सांगतात; याचकरिता हे असे सांगणारे सर्व मूर्ख आहेत. याजवर भरवसा ठेवू नये. धर्म कोणता, याचा विचार करावा, केवळ क्षुल्लक धर्मावर भरवसा ठेवू नये. त्यात काही नाही; परंतु जर कोणी शास्त्राचे प्रमेय न पाहतील व मूर्खपणाने भलतेच अर्थ काढतील आणि ब्राह्मण लोकांच्या बुद्धी ऐकतील तर त्याचा परिणाम लागणार नाही. आजपर्यंत ही दशा ब्राह्मणांच्या बुद्धीने झाली आहे. पंडित व शास्हे मूर्ख आहेत, त्यास अर्थ नीट करता येत नाही. ते फक्त मूर्खपणा वाढवितात व लोकांस वेडे करीतात. यास्तव यात काही खऱ्या गोष्टी नाहीत; केवळ निर्फळ आहेत.

♦ ♦


दान-धर्म करणे

पत्र नंबर ९१ : १० मार्च १९५०

 सांप्रत काळीच आमचे लोक मतिभ्रष्ट फार झाले आहेत, असे नाही. हे मुळापासून असेच आहेत; परंतु आता त्यांचा मूर्खपणा व मतिभ्रष्टपणा विशेष प्रगट मात्र झाला आहे.
 पूर्वी हे लोक स्वसत्तेत होते व आता ते परसत्तेत गेले आहेत. पूर्वी त्यांस परदेशाचे लोक भेटले नव्हते. व विशेष विद्वान व विशेष युक्तिवान अशा लोकांशी त्यांची गाठ पडली नव्हती, म्हणून या देशाचा मूर्खपणा विशेष उघड झाला नव्हता. जरी हे मूर्ख होते, तरी यास हसावयास दुसरा कोणी नव्हता. एकाने ग्रहणात चंद्रास राहू खातो असे म्हटले तर दुसरा म्हणत असे की, त्याचे भोवती लोकालोक पर्वत आहेत. यास्तव मूर्खपणा आपसांत झाकून जात होता.
 पहिले काळचे राजेदेखील असे मूर्ख होते की, त्यांनी सनदा घेऊन इनाम गाव करून दिले आहेत; परंतु त्याविषयी असे त्यांचे मनात येत नव्हते की या ब्राह्मणांचे चालवावे कशाकरिता ? हा करितो काय ? आळसात वय घालविण्याने राजास अभीष्ट व कल्याण कसे होईल ? हे किमपि मनात आणीत नव्हते. याप्रमाणे अन्नछत्रे, दक्षिणा व खिचडी वगैरे नाना प्रकारची धर्मकृत्ये करीत.
 परंतु त्यांचा हेतू इतकाच की, ब्राह्मणांचे चालवावे. यामुळे ब्राह्मणांनी विद्या करणे सोडून दिले. फुकट मिळाल्यावर श्रम कोण करितो ? जुने ग्रंथ पाहून निर्वाह करू लागले. जुने ज्योतिष, जुने वैद्यक, जुने धर्मशास्त्र, हेच संपूर्ण आहे, असे त्यांस वाटू लागले. राजांनी तीच प्रवृत्ती घातली आणि ब्राह्मणांस आळशी केले. जेवणापलीकडे त्यास कर्तव्य राहिलेच नाही. ब्राह्मणाचे हातून विद्यावृद्धी व्हावी व लोकांची सुधारणा व्हावी व जो वतन खातो, त्याचे हातून काम व्हावे, हे कोणाचे लक्ष्यातच नाहीसे झाले. त्यास सुखी ठेवावे आणि त्यांनी आशीर्वाद द्यावा, म्हणजे त्यात सर्व आहे असे समजू लागले व अद्यापि बहुतकरून अडाणी लोक हेच समजतात. आणि या प्रकारचा धर्म करीतात. उद्योगवृद्धी होण्याचा धर्म करीत नाहीत.
 कोणी असा नाही की शाळेकरिता किंवा तारवांत बसून, किंवा देशांतरास जाऊन नाना प्रकारचे पदार्थांचा व लोकांचा शोध करण्याकरिता, किंवा ग्रंथ करण्याकरितां अमुक एक वस्त्र करण्याची वगैरे रीत आहे, ही सुधारण्याकरितां रुपये खर्च केले आहेत. असा एकही पुरुष आढळत नाही; परंतु ब्राह्मणांची लक्षभोजने व सहस्रभोजने तशीच दक्षिणा, तशीच यात्रा, इत्यादिकांत पैसा उधळलेले लोक गावोगाव आहेत. वास्तविक पाहिले, तर, जन्मापासून भट हे धर्माचे खातात; पण करतात काय ? याचा हिशेब कोणी पुसला, तर उत्तर नाही. पूर्वी अहिल्याबाईसारखी धर्मकृत्ये करणारी झाली, तरी तिणे धर्म केला तो व्यर्थ गेला. तिने आपले ज्ञानाप्रमाणे उत्तम केले आणि तिला जे चांगले वाटत होते व तिच्या देशात जे मोठे शहाणे होते, त्यांचे अनुमत पडावयाजोगे तिने सर्व केले. जे तिला ठाऊक नाही, ते होईल कोठून ? असो.
 आम्ही तिला शब्द लावीत नाही, परंतु आजपासून पुढे धर्म करावयाचा तो असाच की काय ? एवढे आम्हास तात्पर्य कळविले पाहिजे. हे लोक समजावयास लागतील तर बरे. व जितके लवकर समजतील तितके चांगले. जो तो धर्म करण्याची इच्छा बाळगितो व हिंदू लोकांप्रमाणे धर्मावर दुसरे लोकांचे चित्त नाही. यास्तव विशेषकरून आम्हास त्यांचे लक्ष्यात ही गोष्ट आणून दिली पाहिजे की ते ज्या गोष्टीस धर्म म्हणतात, तो धर्म खरा आहे की नाही ? अशा प्रकारचा दानधर्म केल्यास ईश्वराजवळ पसंत पडेल की काय ?
 आम्हास वाटते की मूर्खपणाचा धर्म कदापि भगवंतास मान्य होणार नाही. धर्मच्या रीती दोन आहेत. एक गरिबास त्याचे शरीराचे रक्षणार्थ व सुखाकरिता धर्म द्यावा. दुसरा, ज्ञानवृद्धी होण्याकरिता व लोकांस बोध होऊन मन सुधारण्याकरिता धर्म द्यावा. या दोन प्रकारांहून हिंदूचा कोणत्या प्रकारात धर्म आहे बरे ? कोणी म्हणतील की भटास आम्ही जेवावयास घातले, तर त्याचे शरीरास सुख होते. म्हणून हा पहिल्या प्रकारचा धर्म झाला; परंतु तसे नाही. पहिल्या प्रकारच्या धर्मास पात्र कोण, याचा विचार केला पाहिजे. शरीराचे पोषणाकरिता धर्म करणे याजवर गरीब व व्यंग यावाचून कोणाचा दावा नाही व त्यामध्ये जाति, नियम वगैरे काही अडचण असू नये. व दुसरे प्रकारचा धर्म जो आहे, जो विद्वानांस मात्र करावा व त्यास कोणतेही प्रकारची काळजी न ठेवता त्यांनी लोकांस ज्ञान सांगावे व लोकांस शहाणे करावे. या प्रकारचे पंतोजी वगैरे धर्माध्यक्ष व उपदेश वगैरे सर्व यास पात्र आहेत. तेव्हा असा धर्म करण्यास भट व पंडित हे पात्र आहेत की काय ? यांस पहिल्या प्रकारचा धर्म करावा, तर हे आंधळे, लंगडे, पांगळे नाहीत. व दुसऱ्या प्रकारचा धर्म करावा, तर यांची योग्यता दुसऱ्यांस शहाणे करण्याची नाही. व यांस काही स्वतः समजत नाही; हे दुसऱ्यांस कसे शिकवतील ? यांस धर्म कळतच नाही. सोदे, लबाड, भडवे, आर्जवी, कुटाळ असतात, त्यांच्याहूनही यांची वर्तणूक बरी नसते, हे सर्वांस प्रसिद्ध आहे. भट हे गृहस्थांचे घरी सर्व वाईट कर्म करतातच. तसेच शास्त्री पंडित आहेत. यांच्या वर्तणुकी बाजीरावाने वाईट कर्म करून उघड केल्या. तेव्हा त्यास धर्म केल्याने हा धर्म कोणत्या प्रकारचा होईल ? अलीकडे एकाने काशीयात्रेस जाताना लाख रुपयांचे जिन्नस, पवित्रके, नथा वगैरे सुवासिनींस व भटास वाटावयाकरिता खरेदी करून बरोबर नेले, व याप्रमाणे सर्व धनवान करतात व लाखो रुपये विष्णुपदावर घालतात व गयावळांस देतात, परंतु हा धर्म होतो की काय ? आळसाची मात्र वृद्धी होते. यापासून फळ काय होते, ते मला समजत नाही. जन्मापासून असे मूर्ख व अज्ञानाने आंधळे लोकांपासून पैसा काढून त्याजवर निर्वाह, काही एक काम न करता, करणारे हे भट व शास्त्री यांस आणखी पैका दिला, तरी त्यांच्या पूर्वीच्या खोडी जातील काय ? त्यांनी काम करावे, उद्योग, प्रयत्न व लोकांची सुधारणा करावी, हे जरूर आहे. हे कदापि समजणार नाहीत. इंग्रजी राज्यात असा धर्म बहुत श्रीमंत लोक कमी झाल्यामुळे बंद जहाला; यास्तव इंग्रज लोकांस ब्राह्मण लोक वाईट म्हणतात; त्यांस दुसरे काही समजत नाही.
 स्वसत्ता गेली व स्वराज्य गेले. हे आपले देशांतील सर्व लोकांस अनिष्ट आहे; इत्यादि स्वदेशाभिमानाच्या गोष्टी त्यांस ठाऊक नाहीत. त्यांस जेवावयास मिळाले, म्हणजे कोणीही राज्य करीत असले, तरी चिंता नाही; त्याची स्तुती करतील; असे हे ब्राह्मण स्वार्थतत्पर आहेत. स्वदेशाचे व इतर जातीचे लोकांविषयी त्यांचे मनात काही येत नाही. फक्त आपले जेवण व मान कमी जहाला, एवढ्याचेच त्यांस दुःख आहे व बाजीरावाने इतके वाईट केले, तरी त्यांस ते अद्याप चांगला म्हणतात, त्याची स्तुती करतात व त्यांस धर्मप्रभू म्हणतात. तस्मात् या ब्राह्मणांच्या समजुती किती बदलल्या पाहिजेत ! अस्तु.
 आमची सर्व लोकांस विनंती आहे की, आपली प्रतिष्ठा या श्वानरूपी भटांमध्ये मिरवण्याकरिता त्यांस कदापि धर्म करू नये. जो धर्म कराल, त्यांस सत्पात्र आहे, असे पूर्वी लक्षात आणा. एक अगदी भिकारी, दरिद्री लंगडा, पांगळा, रोगादिक प्रारब्धाचे योगाने भिकारी झालेला आणि जर त्याचा काही उपाय चालत नाही, तर त्यांस आसरा द्या. आणि दुसरे, जे पुस्तके लिहितील व लोकांस शहाणे करण्यास मेहनत करतीलव जे वर्तमानपत्रे व ग्रंथ इत्यादी उपयोगी वस्तू छापून प्रगट करतील, त्यांस तुम्ही मोठे विद्वान् व लोकांचे हितकर्ते समजून त्यांस सत्पात्र जाणून धर्म करा; व त्यांचे ग्रंथ घेऊन लोकांमध्ये वाटा व हीच वायने समजा; तीच संक्रांतीची तिळपात्रे, श्रावणीची दीपदाने, माघस्नानाची संपूर्णे, चातुर्मासाची संपूर्णे व तुळशी आणि लाखोल्या त्याच समजा. ज्ञानवृद्धीत पुण्य आहे, असे माना. लाखो लोक अज्ञानी स्थितीत आहेत, त्यांस काहीही कळत नाही. त्यांस ज्ञानी करण्यापेक्षा दुसरा योग्य धर्म कोणता ? यास्तव मरतेसमयी देऊळ बांधावयास सांगू नका; पण नवे छापखाने व नवी पुस्तके करण्यास सांगा. देवळे पुष्कळ आहेत, तितकी पुरेत. हे समजा.

♦ ♦


भिकारी

पत्र नंबर : ९२

 आमचे लोकांत सोवळ्याओवळ्यामुळे अनेक अडचणी पडल्या आहेत. जर ब्राह्मणास एका गावाहून उठून दुसऱ्या गावास जावयाचे आहे, तर किती खटपट केली पाहिजे की, बरोबर भांडी व वस्त्रे घेतली पाहिजेत. कारण की, दुसऱ्या जातीचे येथे जाऊन त्यांचे भांड्यात खाता येत नाही. बरे आणखी कोठे कोठे धर्मशाळा वगैरे नाहीत, म्हणून कोठे जाऊन उतरावे, तर आपला जिन्नस चोरीस जाईल की काय, याचे भय पडते. सर्व गावात फिरून एका ठिकाणाहून लाकडे, दुसरे ठिकाणाहून पीठ असे जमवून आणावे लागते. जर कोणाचे घरी उतरले आणि त्याची जात भिन्न असली, तर त्याचे पाणी उपयोगी नाही. व त्याची मदत उपयोगी नाही. व त्याचा स्पर्शही उपयोगी नाही. तेव्हा स्वतः पाणी नदीवरून आणावे व पुनः लागले, तर आणखी हेलपाटा द्यावा, असे तापत्रय घडतात. यास्तव ब्राह्मणांकरिता अन्नछत्रे घालतात. तेणेकरून हे ब्राह्मणांचे श्रम जावे इतकाच त्याचा हेतू आहे.
 या देशात ब्राह्मणास बाहेर प्रवास करणे म्हणजे अतिशय दुःखकारक आहे. याजकरिता जर दर एक गावी एक घर बांधून, त्यात सर्व सोयी केल्या, तर फार चांगले होईल. परंतु जातीमुळे अडचणी फार आहेत. तत्रापि प्रवासी लोक जातीचा विधिनिषेध फारसा बाळगीत नाहीत. बरोबर शिजलेले अन्न घेतात. त्यांस कोणी शिवले, तरी तेच खातात, त्यांचे रीतीप्रमाणे एक घर सर्व जातीस बांधले, तरी त्यात सर्व प्रवासी लोक राहतील. यात संशय नाही. आणि सुख फार होईल. पहा, आता पुण्यात असे नाही म्हणून प्रवासी कोणी आला, तर त्याला उतरावयास जागा बहुधा मिळत नाही, कदाचित् मिळाली तर ती देवळात किंवा धर्मशाळेत. व त्यांस कोणी सामान देणार नाही. हात धुवावयास नदीवर गेले पाहिजे. लाकडे शोधून आणली पाहिजेत. याजकरिता जरूर आहे की, एका माणसाने अशा धर्मशाळेचे मुखत्यार होऊन त्याने पैसा घेऊन सर्व पुरवावे व जातीप्रमाणे प्रत्येकाचा धर्म राखावा, इतकी तजवीज झाली तर बरे पडेल.
 मुंबईचे वाटेने असे ब्राह्मण लोक आहेत. परंतु जेथे ब्राह्मण लोक आहेत, तेथे कुळंबी जावयाचा नाही. जेथे कुळंबी जातो, तेथे महार जाणार नाही. या अडचणी अतिशय आहेत. या युक्तीनेच दूर केल्या तर होतील. नंतर ब्राह्मण लोक प्रवास करू लागतील. सांप्रत ब्राह्मणास जर चौफट नफा जाहला, तर घराबाहेर जाणार नाहीत. ते म्हणतात पुण्यात दहा रुपये नफा बरा; पण मुंबईस पन्नास रुपये नको. ते म्हणतात की, या विटाळात कोण जातो ? येथून जाण्याचे तापत्रय, आपला ब्राह्मणी विचार व आचार कसा चालेल ? कोठे प्रवासाला जावे ? इत्यादी विचार करून ब्राह्मण लोक बहुतकरून घराबाहेर पडत नाहीत. जर कदाचित् उपाय नाहीसा झाला, तर मात्र पडतील. तरी त्यांस फार अमंगळ वाटेल. त्यांस वाटेल की आज पंधरा दिवस मुंबईत मी राहिलो खरा, परंतु जरी दोन पैसा नफा झाला, तरी धर्म बुडाला, पाणी विटाळाचे प्यालो, शिवाशिवी जहाली; निर्मळपणा काही राहिला नाही. सोनार, परभू यांचा संपर्क जाहला. आणि याप्रमाणे हजारो ब्राह्मण म्हणतात. ब्राह्मणांची रीत अशी की, घरात सोवळे-ओवळे माजवावे व पुढे पाणी शिंपून मागे चालावे. ग्रहण पडले म्हणजे सर्व घरांतील टाकून द्यावे. आंघोळी कराव्या कुळंब्यांचा शब्द कानी पडू देऊ नये. हे त्यांस गोड वाटते, म्हणून बाहेर पडावयाचा कंटाळा आणि त्रास करतात.
 दुसरे आणखी बहुत प्रकार गैरशिस्त या देशात आहेत. त्यांपैकी काही खाली लिहितो. भिकारी लोक जे आहेत, त्यांचा कर सर्वांवर आहे. धर्माप्रमाणे त्यांस देणे योग्य आहे. परंतु पहा की, भिकारी लोकांच्या अव्यवस्था आमचे लोकांमध्ये किती आहेत ? भिकारी लोकांमध्ये दोन पक्ष समजले पाहिजेत. एक पक्ष धर्माध्यक्ष भिकारी, आणि दुसरा पक्ष अशक्त भिकारी. आता पहिले पक्षात शास्त्री, पंडित, हरिदास, पुराणिक, वैदिक, जोशी, भट, तपस्वी हे सर्व जाणावे. दुसरे पक्षात हर एक जातीचे आंधळे, पांगळे, लंगडे, व्याधिष्ठ, दरिद्री. वयाने लहान, अज्ञान इत्यादी सर्व जाणावे. आता पहा की, दुसरे पक्षाचे भिकारी लोकांकरिता कोणी काहीच धर्म करीत नाही. हिंदू लोक अज्ञान दूर करण्याकरिता आणि रोग जाण्याकरिता आणि विद्या होण्याकरिता काही धर्म करतील, हे तर होणार नाही. कोणी मेला व त्यांचे पोराचे रक्षण करण्याकरिता कोणी नाही. तर त्याजकरिता कोणी धर्म करणार नाही.
 जात पाहून धर्म करतात. तैलंग ब्राह्मण भिक्षेकरी असला तर त्यांस तांदूळ घालतात, तोच गुजराथी असला तर जोंधळे घालतात, बहिरागी असला तर कदाचित् पीठ घालतात. माधुकरी मागणारा जर ब्राह्मण असला तर आत येऊ देतील, नाही तर मधुकरी कदापि घालणार नाहीत. जेवताना दुसरे जातीचा शब्द कानावर पडला असता विटाळ जहाला म्हणतील. जर रक्तपिती होऊन वृद्धापकाळाने व रोगाने उद्या मरणार, असा मनुष्य परजातीचा रस्त्यावर पडला असेल व त्यांस अन्न चार दिवस खावयास मिळाले नसेल, तर त्याजकडे कोणी पाहणार नाहीत. शेकडो ब्राह्मण लोक घोड्यावर जातील, परंतु त्या गरिबाकडे डोळादेखील करावयाचे नाहीत. आणि तो जर महाराचे जातीचा असला तर त्यांस शिवणार नाहीत व पाणी देणार नाहीत. तो तेथे अन्नावाचून मरेल. असे किती एक नित्य मरत आहेत. त्यात गाव खेडे असले तर काही तरी सांभाळ होईल; परंतु शहरात लोक अगदीच पुसणार नाहीत. जर गाय बैल मरत असेल तर त्यांस कोणी तरी ब्राह्मण जपतील; परंतु अन्य जातीच्याच अगदीच पाहणार नाहीत. याप्रमाणे गरिबांच्या धर्माची व्यवस्था आहे.
 शिवाय आणखी चाल अशी आहे की, पुण्यासारख्या शहरात आगांतुक ब्राह्मण आहेत; ते लोकांस उपद्रव करून पोट भरतात व असेच जेथे तेथे ब्राह्मणांची वस्ती आहे, तेथे आगांतुक आहेत. तैलंग देशांतून बाह्मण पोट भरावयास इकडे देशांतरास येतात, परंतु ते रोजगार धंदा किंवा शेतकी काही करीत नाहीत; फक्त आगांतुकी करतात. याप्रमाणे आळशी ब्राह्मण शेकडो आहेत. त्यांस कामकाज, विद्या व उद्योग न करिता लोक संरक्षण करतात. आणि गरीब धर्मास पात्र जे आहेत, त्यांस कोणी पुसत नाही. आणि लग्नकार्य जहाले म्हणजे कोणी पाचशे रुपये दक्षणा, कोणी हजार रुपये दक्षणा वाटतात. ती वाटण्याची रीती अशी आहे की, जो बळकट व दांडगा असेल, त्यांस मात्र ती दक्षणा पोचेल. रोगी, अशक्त, लहान असला तर त्यांस कदापि पैसा मिळावयाचा नाही. याप्रकारे दक्षणा वाटतात व जेवावयासही याप्रमाणेच घालतात.
 आता पहिल्या पक्षाचे म्हणजे धर्माध्यक्ष मिकारी यास पैका देण्याची रीती तरी चांगली नाही. त्यांस पैसा देणे, तो त्यांजपासून लोकांचा काही फायदा व्हावा ही त्याची बुद्धी नाही. फक्त त्यांस दिले म्हणजे पुण्य होते, ही समजूत आहे. याजकरिता उपयोग कोणीच पहात नाही. कोणी अनुष्ठाने करतो. म्हणजे शिवरात्रीचा अतिरुद्र म्हणजे एक दोन तीनशे ब्राह्मण जमा करावे, एकेकास दोन रुपये द्यावे आणि त्यांस आणून स्वस्थ बसवावे. एक तिळाचा होम करितो. बाकीचे सर्व त्याजकडे पहातात. असे अकरा हजार होम झाले म्हणजे अतिरुद्र झाला. याबद्दल खर्च दोन-तीन हजार होतो, तो ब्राह्मणांस पोचतो. आता त्याचा उपयोग पाहिला तर पांच हजार ब्राह्मणांचा वेळ व्यर्थ गेला. दोन-तीन हजार रुपये खर्च जहाले; त्यापासून विद्या वाढली नाही, शहाणपण वाढले नाही, उद्योग झाला नाही, विचार झाला नाही; काही एक नाही. एक मूर्खाचे समजुतीप्रमाणे खर्च जहाला इतकेच फळ.
 याप्रमाणे हजारो अनुष्ठाने आहेत. कोणी म्हणतो, शतचंडी; कोणी म्हणतो अभिषेक. याप्रमाणे आळशी लोक स्वस्थ जेवण, दक्षणा घेतात आणि बसतात.धर्माचे रक्षण करीत नाहीत; गोरगरिबाची तजवीज करीत नाहीत; लोकांस धर्मार्थी व धर्मतत्पर करावे ते नाही. फक्त आपले पोट आणि यजमानाची स्तुती, अशी मात्र ते आळशी लोक कामे करतात. व त्यांस जो पैका देतात, तो काही उपयोगाकरिता देत नाहीत. असा धर्म करणे हे फक्त आळशीपणाची वृद्धी करणे आहे, याप्रमाणे अनुष्ठाने, जप वगैरे जितक्या ब्राह्मणांचा मिळकती आहेत, त्या सर्व अशाच आहेत. व प्राचीन काळापासून चालत आलेल्या दक्षिणा, खिचडी, सभा, देवस्थाने या प्रकारची आहेत. त्यांची सुधारणा लोकांशिवाय होणार नाही. लोक सुधारले म्हणजे अर्थातच सर्व त्यांचे पुढारी सुधारतील, किंवा त्यांचे पुढारी सुधारतील. तेव्हा लोक सुधारतील. परंतु सांप्रतचे धर्मात सर्वांचे कल्याण होणे, हे अगदी होत नाही.

♦ ♦