माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो.../गुलामगिरीकडे आता पुन्हा जाणे नाही
Appearance
गुलामगिरीकडे आता पुन्हा जाणे नाही
माझी खात्री आहे की काही वर्षे जातील आणि स्वातंत्र्याच्या सूर्याला घाबरणाऱ्या घुबडांचे दिवस संपतील आणि त्यावेळी आपलीच नातवंडे आपल्याला विचारायला लागतील की, हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांनी 'हातामध्ये आता पुन्हा बेड्या घालायच्या नाहीत, स्वतंत्र व्हायचे' असे ज्यात ठरवले त्या सांगलीमिरजच्या अधिवेशनाला तुम्ही खरेच हजर होता? अशा जागी तुम्ही सर्व उपस्थित आहात, मलाही हजर राहण्याची संधी लाभली हे केवढे मोठे भाग्य!
नाना पाटील आणि म. फुले
अधिवेशनाच्या या नगराचे नाव 'क्रांतिसिंह नाना पाटील नगर' आणि जेथे थोडे दिवस प्रतिनिधी अधिवेशन चालले त्याचे नाव 'महात्मा जोतिबा फुले सभागृह'. या नामकरणात चांगला संयोग साधला आहे. १९४२ साली महात्मा गांधींनी इंग्रजांना 'चले जाव' म्हटले आणि तरुणांना सांगितले की, 'करा किंवा मरा; यापुढे गुलामगिरी स्वीकारू नका.' सगळे नेते तुरुंगात गेले, गांधीजी तुरुंगात गेले. लोकांपुढे कोणी मान्यवर नेता बाहेर राहिला नाही अशा वेळी सातारा जिल्ह्यामध्ये शेती करता करता शड्डू ठोकून पहिलवानी करणारी काही तरुण पोरे एकत्र झाली आणि सातारा जिल्हातरी इंग्रजांपासून स्वतंत्र झाला अशी परिस्थिती करून टाकली, जिल्ह्यातील इंग्रजांचे राज्य संपवून टाकले. त्या तरुणांचे नेतृत्व करणाऱ्या नाना पाटलांचे नाव शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची घोषणा करणाऱ्या या नगराला देण्यात मोठे औचित्य साधले आहे.
सभागृहाला म. जोतिबा फुल्यांचे नाव देण्यात आले आहे. इंग्रज आल्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी तलवार हाती घेऊन येणारा हा तरुण. ते म्हणायचे, 'इंग्रज हिंदुस्थानात आले आहेत हे खरे आहे. त्यांच्या येण्याने आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले असले तरी त्यांच्या येण्याने एक थोडासा चांगला भागही साधला आहे. इतके दिवस आपल्या संस्कृतीमध्ये – 'भटशाही'मध्ये शूद्रांना शिकायचा अधिकार नाही, येथील ग्रंथ वाचायची परवानगी नाही, परदेशात काय ज्ञान आहे त्याचा तर संबंधही येऊ देत नाहीत. अशा तऱ्हेने सर्वत्र भिंती बांधलेल्या, हात बांधलेले, पाय बांधलेले अशा गुलामगिरीच्या अवस्थेत आपण होतो. इंग्रज आले, त्यांनी शाळा काढल्या. शूद्रांची, अतिशूद्रांची मुलेसुद्धा शाळेत जाऊ लागली. थोडे थांबा. ती मुले शहाणी होऊ द्या. ती शहाणी झाली की मग सगळा देश एकत्र होईल, 'एकमय' होईल. मग, आपण इंग्रजांच्या विरुद्ध 'एक राष्ट्र' म्हणून लढू शकू.' हा संदेश त्यांनी दिला. जोतिबांचे दुर्दैव असे की त्यांना 'नाना पाटील' भेटला नाही. जोतिबांची परिस्थिती राष्ट्रवाद्यांपुढे अशी झाली की पुण्याच्या म्युनिसिपालिटीच्या निवडणुकीत त्यांना अवघी तीन मते मिळाली. जर का एका काळी जोतिबा फुले आणि नाना पाटील म्हणजे जोतिबांचा विचार आणि नाना पाटलांची धडाडी एकत्र झाले असते तर काय झाले असते या प्रश्नाचे उत्तर या पुढचा काळ देणार आहे असे आज या अधिवेशनास हजर असलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येवरून आणि त्यांच्यातील जोशावरून दिसते.
शेतीचा इतिहास
अधिवेशनाचा विषय फार मोठा आहे. हल्ली सगळ्याच पक्षसंघटना 'ऐतिहासिक' हा शब्द इतक्या वेळा नुसताच वापरतात की त्याचा अर्थच हरवून बसला आहे. आपले हे अधिवेशन ऐतिहासिक कसे ठरणार आहे?
फार वर्षांपूर्वीची म्हणजे हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट. मनुष्य जंगलात फिरत होता. जंगलात फिरता फिरता जी काही शिकार मिळेल ती खावी, जी काही कंदमुळे मिळतील ती खावी, जो काही निवारा मिळेल तेथे रात्र काढावी असे वन्य प्राण्यांसारखे जीवन मनुष्य टोळ्या करून जगत होता. संस्कृतीच्या इतिहासात याला 'अन्नचयन युग' म्हणतात.
मनुष्याला या वणवणीतून मायबहिणींनी सोडविले. पुरुषांनी शिकार करून किंवा गोळा करून आणलेल्या अन्नाचे वाटणीचे काम स्त्रियांकडे होते. याचा पुरावा जुन्या ग्रंथांमधून मिळतो. वाटणीचे काम करण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीची परिस्थिती काय असते हे मायबहिणींना चांगले अनुभवायला मिळते. सगळ्यांना वाढून झाल्यानंतर जेव्हा बाईची जेवायची वेळ येते तेव्हा जे काही उरले सुरले असेल ते खाऊन कदाचित् बाईला अर्धपोटीच झोपायला लागते. अशाच अर्धपोटी झोपावे लागलेल्या आपल्या एखाद्या खापरखापर... आजीपणजीच्या लक्षात आले असावे की आपल्या आजूबाजूला जे काही गवत वाढते त्याला जे दाणे लागतात ते चावून खाल्ले तर पोट भरते. अन्नधान्याचा शोध लागला, ते अन्नधान्य जमिनीत टाकले तर त्यातून रोप उगवते आणि त्याला पुन्हा दाणे लागतात हे कळले आणि मनुष्याला शेतीचा शोध लागला. हा शोध पुरुषांनी नाही, स्त्रियांनी लावला.
सुरुवातीला जमिनीची मशागत म्हणजे काठीने जमीन उकरणे एवढेच बाया करायच्या. त्यामुळे फारसे पीक येत नसे. मग, पुरुषांनी जमीन उकरण्यासाठी नांगर आणि नांगराला बैलासारखा शक्तिशाली प्राणी जोडण्याची कला शोधून काढली. अशा तऱ्हेने जमीन नांगरली म्हणजे अमाप पीक येते याचा शोध मनुष्याला लागला; म्हणजे मनुष्याने नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावून त्याचा वापर केला आणि 'अन्नासाठी दाही दिशा' अवस्थेतून स्वतःची सुटका करून घेतली. खळ्यामध्ये धान्याची रास तयार होऊ लागली, उद्याची भ्रांत संपलीच, पण वर्षभर धान्य वापरूनसुद्धा उरू लागले. शेतीत बचत (surplus) तयार झाली.
बचतीतून भांडवल
मग, चौघा भावांच्या लक्षात आले की आता चौघांना अन्न तयार करण्यासाठी सगळ्यांना शेतीत कष्ट करण्याची गरज नाही. मग त्यांनी असे ठरवले की एका भावाने जंगलात जाऊन लाकडे तोडावीत आणि सगळ्यांना राहाण्यासाठी, थंडी, वारा, उन, पाऊस यांपासून सर्वांचे संरक्षण करण्यासाठी घर बांधावे. तीन भाऊ शेतीत राहिले, चौथ्याने जंगलात जाऊन लाकडे तोडून आणून घर बांधले, त्याच्या अन्नाची व्यवस्था शेतीतील तीन भावांनी केली. निसर्गातील संकटांपासून संरक्षण मिळाल्यामुळे त्यांना तोंड देण्यात खर्ची पडणाऱ्या शक्तीची बचत झाली आणि पुढच्या काळात शेतीतील पीक आणखी वाढले. मग, आणखी एक भाऊ नव्या बचतीच्या आधारे शेतीतून बाहेर पडला आणि त्याने झाडांच्या साली आणि कापसासारख्या तंतुंपासून शरीराचे एरवीही रक्षण करणारी वस्त्रे शोधून काढली.
अशा तऱ्हेने एकदा पोटाचा प्रश्न सुटला की माणसाची प्रगती व्हायला लागते. घराची व्यवस्था झाली, कपड्यांची व्यवस्था झाली असे करता करता डोक्यावर फिरणारा पंखा, आकाशात उडणारे विमान, सर्व येणारा कॉम्प्युटर या सर्व गोष्टी होण्यामागचे मूळ कारण म्हणजे मनुष्याने अन्नासाठी 'दाही दिशा' फिरण्याचे सोडून शेती करून अन्नधान्याची रास तयार करायला सुरुवात केली हे होय. शेतीचा शोध लागला म्हणून मनुष्याची प्रगती झाली, म्हणून जगाची प्रगती झाली. म्हणजे, शेतीतच मनुष्याच्या प्रगतीचा उगम आहे.
लुटीची व्यवस्था
दुर्दैवाने, ही प्रक्रिया काही सातत्याने सुखांतपणे चालत राहिली नाही. शेतकऱ्याला वाटले की आता चिंताच नाही. शेतकऱ्याला वाटले की आता पीक घ्यायचे आणि प्रगती करायची, आणखी पीक घ्यायचे आणि आणखी प्रगती करायची. त्यांच्या आजूबाजूला दुसरे काही लोक होते ज्यांना अजून शेतीचे ज्ञान अवगत झाले नव्हते, ते यांच्याकडे अचंब्याने पाहत होते. 'हे काय चमत्कार करीत आहेत? आयती शिकार चालून आल्यावर जितकी मौज होत नाही तितकी मौज या शेतकऱ्यांची दिसते आहे.' त्यांनी असा विचार केला की यांच्या खळ्यावर धान्य साठले की आपण दोनचार जणांनी दांडुके घेऊन जायचे आणि धान्य घेऊन यायचे, धान्य घेताना शेतकऱ्यांनी जर विरोध केला तर दांडुक्यांनी त्यांना हाणायचे आणि धान्य काढून घेऊन यायचे. धान्याची रास खळ्यात उभी करण्याचे शेतकऱ्याचे काम चारसहा महिन्यांचे आणि ते हस्तगत करण्याचे या लुटारू दरोडेखोरांचे काम चार तासांचे.
काम इतके सोपे झाले म्हणजे त्या कामाची मागणी खूप वाढते. दुधासाठी गाईम्हशी ठेवल्या तर पोराच्या ओठाला लावण्याइतपतही दूध घरी उरत नाही. त्यामुळे आम्हाला गाईम्हशी द्या असे कोणी म्हणत नाहीत. पण दुधाची सोसायटी काढली म्हणजे एका वर्षात माडी होते त्यामुळे जो तो दूध सोसायटी काढण्याची धडपड करतो. तसेच, त्याकाळीही शेती करण्याचा प्रयत्न करणारांवर, शेतीतील पीक लुटणाऱ्या लुटारूंचे राज्य सुरू झाले.
हा इतिहास आहे. हे लुटारू पहिल्यांदा दोन-चार-पाच होते, पाचाचे पन्नास झाले, असे वाढता वाढता लुटारूंच्या असे लक्षात आले की हे जर का असेच चालत राहिले तर शेती कोणी करणारच नाही. मग त्यांनी नियम तयार केले. कुणब्याच्या पोरांनी शेतीच केली पाहिजे, दुसरे काही करता कामा नये, वगैरे वगैरे नियम तयार झाले. म्हणजे जातीची भिंत घालून टाकली. अशा भिंतीभिंतीत शेतकऱ्यांना कोंडले. शेतकऱ्यांनी कोणते बियाणे वापरायचे ते त्यांनी नाही ठरवायचे, जे पणजोबांनी वापरले तेच वापरायचे, आपली अक्कल वापरायची नाही. अशा तऱ्हेने शेतकरी गुलामीत पडला. कारण, जसे पोपट गोड गोड बोलून करमणूक करतो म्हणून त्याला पिंजऱ्यात कोंडतात, कावळ्याला कोणी पिंजऱ्यात ठेवीत नाही तसेच शेतकरी एका दाण्याचे शंभर दाणे करतो म्हणून त्याला गुलामीत ठेवण्यात आले.
ही जुनी कहाणी आहे.
आज या हजारो वर्षांच्या कहाणीचा शेवट येतो आहे. तो शेवट समजावून सांगण्याआधी मी आणखी एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट किमान ऐशी वर्षे जुनी आहे.
व्यापारबंदी - युद्धाचे मूळ
पहिले महायुद्ध झाले. एका बाजूला जर्मनी आणि दुसऱ्या बाजूला फ्रान्स, इंग्लंड वगैरे दोस्त राष्ट्रे. त्यामध्ये जर्मनीचा पराभव झाला. पहिल्यांदा युद्धामध्ये रणगाडे वापरले गेले, मशीनगन्स वापरल्या गेल्या. लाखो लोक मेले, शहरे उद्ध्वस्त झाली, बेचिराख झाली. जर्मनी शरण आला, युद्ध संपले आणि तहाच्या वाटाघाटी चालू झाल्या. जेत्यांच्या मनामध्ये प्रचंड राग होता. यांच्यामुळे आपली शहरे उद्ध्वस्त झाली, प्रचंड नुकसान झाले; यांना अशी शिक्षा तहाच्या अटींत दिली पाहिजे की जर्मन लोकांची पुन्हा युद्ध करण्याची हिंमत होता कामा नये. त्यासाठी दोस्त राष्ट्रांनी ठरविले की, जर्मनीवर अशी खंडणी लादायची की पुन्हा सैन्य उभे करण्याची ताकद त्यांच्यात राहू नये. खंडणी लादली एवढेच नव्हे तर त्यापलीकडे जाऊन जर्मनीमधील कोळशाच्या आणि लोखंडाच्या खाणी असलेले प्रांत फ्रान्सने, इंग्लंडने बळकावून घेतले; त्यांच्यातील जे जे काही चांगले होते ते बळकावून घेतले आणि शिवाय वार्षिक खंडणी लादली. म्हणजे, जर्मनीची स्थिती हिंदुस्थानातील शेतकऱ्यांसारखीच झाली. नाइलाजाने का होईना, खंडणी द्यायची म्हटले तरी द्यायची कशी? असा प्रश्न जर्मनीसमोर उभा राहिला. खंडणी द्यायची तर आपल्या चलनात द्यायची नसते, ज्याला खंडणी द्यायची त्याच्या चलनात द्यायची असते. जर्मनीपुढे प्रश्न उभा राहिला की जेत्यांच्या चलनात रक्कम मिळवायची कशी? परकीय चलन मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या देशांशी निर्यात व्यापार करणे. तहामध्ये दोस्त राष्ट्रांनी जर्मनीकडे जे जे काही चांगले होते ते बळकावून घेतले होते, त्यामुळे जर्मनीकडे विकण्याजोगे असे काही राहिलेच नाही. या कोंडीमुळे जर्मनीमध्ये हिटलरचा उदय झाला. हिटलरचा वित्तमंत्री डॉ. शाख्त याने जर्मनीला या कोंडीतून बाहेर काढण्याची जबाबदारी घेतली. त्याने आधी हुकूम काढला की दुसऱ्या कोणत्याही देशाचा माल आम्ही जर्मनीत येऊ देणार नाही. सर्व आयातीवर बंदी घालण्यामागे डॉ. शाख्त याची कल्पना अशी होती की या आयातबंदीमुळे, आपण निर्यात करून मिळविलेले परकीय चलन आपल्याच हाती राहील. असे झाल्यानंतर बाकीचे देश स्वस्थ थोडेच राहणार आहेत? जर्मनीने आयातबंदी केल्याबरोबर फ्रान्स, इटली, स्पेन इत्यादी सगळ्याच देशांनी आयातबंदी केली. परिणामी, जगातला व्यापार बंद झाला. जोपर्यंत शेजारणीशेजारणी निदान दही, साखर वगैरेची देवघेव करीत असतात तोपर्यंत त्यांच्यात भांडण होत नाही; पण, एकमेकींमध्ये उसनेपासने करण्याचे व्यवहारसुद्धा होत नसले तर अगदी किरकोळ गोष्टींवरूनही शिवीगाळ होते. तशीच, सगळ्याच देशांनी केलेल्या आयातबंदीमुळे जगभरचा व्यापार थांबल्याने जगभर शिवीगाळ सुरू झाली. जर्मनी एका बाजूला, फ्रान्स, इंग्लंड इत्यादी दोस्त राष्ट्रे दुसऱ्या बाजूला यांच्यातील ताणतणाव वाढत गेले आणि परिणामी, दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले. या दुसऱ्या महायुद्धात जग आणखी बेचिराख झाले.
सारांश, जागतिक व्यापार टाळायचा प्रयत्न केला तर 'हिटलर' चा उदय होतो; व्यापार बंद होतो, युद्ध होते. व्यापाराला पर्याय फक्त युद्ध आहे.
मागल्यास ठेच, पुढचा शहाणा
दुसरे महायुद्धसुद्धा संपले, जर्मनी हरला. यावेळी अमेरिका दोस्त राष्ट्रांच्या बरोबर होती. अमेरिकेने ठरवले की गेल्या वेळची चूक आपण करायची नाही. कारण, गेल्यावेळी शरणागत जर्मनीवर खंडणी लादली आणि पुन्हा महायुद्ध झाले. यापूढे खंडणी लादण्याऐवजी 'उलट खंडणी' द्यायची. म्हणजे जेत्या देशाने पराभूत देशाला खंडणी देण्याचा 'मार्शल प्लॅन' अमेरिकेने पराभूत राष्ट्रांसमोर ठेवला. त्या प्लॅनने मार्शलच्या कल्पनेनुसार योग्य तो परिणाम साधला आणि पराभूत देशांच्या अर्थव्यवस्था सावरल्या गेल्या.
जागतिक व्यापारचर्चा
दोन महायुद्धांच्या दाहक अनुभवानंतर सगळ्या देशांनी एकत्र येऊन ठरवले की हिटलरच्या कारवायांमुळे जगाचा जो व्यापार संपला तो आंतरराष्ट्रीय व्यापार पुन्हा चालू करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या व्यापाराचे नीतिनियम तयार करण्याकरिता एकमेकांत विचारविनिमय व्हावा यासाठी त्यांनी General Agreement on Tariff and Trade (GATT) नावाची संस्था स्थापन केली. १९४२-४३ सालापासून चर्चा सुरू झाली. त्याकाळी सर्व देशातील 'स्वदेशी जागरण मंच' वाल्यांचा जोर होता. त्यात सदस्य राष्ट्रांपैकी एका बाजूला समाजवादी रशिया, सर्व जगाशी जोडणारे सर्व दरवाजे बंद करून आमचे आम्ही राज्य चालवू असे म्हणणारे होते. त्यामुळे वाटाघाटीत यश येत नव्हते. चर्चांचे गुऱ्हाळ बरीच वर्षे चालल्यानंतर अखेरी वाटाघाटीत यशाचे चिन्ह दिसू लागले आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात चांगले वागणे म्हणजे काय यासंबंधी नियम ठरविण्यात आले आणि त्या नियमांचे पालन व्यवस्थित होते आहे ना याकडे लक्ष ठेवण्यासाठी एक संस्था जन्माला आली तिचे नाव जागतिक व्यापार संघटना (World Trade Organisation) म्हणजेच संक्षेपाने WTO.
WTO आणि हिंदुस्थान
विश्वनाथ प्रतापसिंग पंतप्रधान असताना या वाटाघाटींतून तयार झालेला व्यापारासंबंधी नेमनियमांचा मसुदा त्यांनी माझ्याकडे पाठवला. तो पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले की मोठा चमत्कार झाला आहे. सगळ्या जागतिक व्यापारात अमेरिकेचा हिस्सा ५१% आणि हिंदुस्थानचा हिस्सा ०.१%. खरे तर ५१% हिस्सा असलेला देश सर्वांवर हुकुमत गाजवून सांगू शकतो की आम्ही सांगू ते सर्वांनी ऐकलेच पाहिजे आणि जागतिक व्यापार संघटना उदयाला येण्याआधी अमेरिका सुपर-३०१ च्या रूपाने तशी वागतही होती. अशी ही प्रबळ अमेरिका मुकाट्याने कबूल करते की जागतिक व्यापार संघटनेमध्ये आम्ही इतर सर्व राष्ट्रांच्या बरोबरीने बसतो, ५१% हिस्सा असलेल्या अमेरिकेला मत एक आणि ०.१% हिस्सा असलेल्या हिंदुस्थानलाही मत एक. हा मोठा चमत्कार जागतिक व्यापार संघटनेच्या निमित्ताने घडला आहे. इस्लामच्या शिकवणुकीमुळे नमाजाला बसताना अमीर आणि गरीब यांनी एकाच सतरंजीवर बसावे तसा हा प्रकार आहे. वाटाघाटीत आणि निर्णय प्रक्रियेत श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव न करता सर्वच देशांना समान अधिकार ही एकच गोष्ट जागतिक व्यापार संघटनेचा करार स्वीकारायला, विशेषत: जागतिक व्यापारातील हिश्श्याच्या संदर्भात गरीब राष्ट्रांच्या दृष्टीने पुरेशी आहे; पण सुरुवातीला आपल्या देशाने ते कबूल केले नाही. तेथे वाद व्हायला लागले आणि करारावर सह्या व्हायला उशीर व्हायला लागला. तेवढ्यात अमेरिकेसारख्या प्रगत श्रीमंत राष्ट्रांनी कराराच्या मसुद्यात काही नवीन अटी घालायला सुरुवात केली. उदाहरणार्थ, ज्या देशांमध्ये बालमजूर आहेत त्यांच्याशी आम्ही व्यापार करणार नाही, ज्या देशामध्ये मजुरांना योग्य असे कायदे नाहीत त्यांच्याशी आम्ही व्यापार करणार नाही. ज्या देशात पर्यावरणाची काळजी घेतली जात नाही त्यांच्याशी आम्ही व्यापार करणार नाही....म्हणजे, आपल्याकडील 'स्वामी अग्निवेश' जी भाषा बोलत होते ती भाषा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बोलू लागले आणि आपले त्यात मोठे नुकसान झाले. तरीही चांगला व्यापार म्हणजे काय, चांगले व्यापारी म्हणजे काय हे जगाच्या इतिहासात प्रथमच जागतिक पातळीवर ठरले.
शेतकरी संघटनेचा उदय
जागतिक व्यापारातील हिंदुस्थानचे स्थान याबद्दलच्या या चर्चेत आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. इंग्रज इथे असताना शेतकऱ्याचे शोषण होत होते, शेतकरी गरीब होत होता. जोतिबा फुल्यांनी ही वस्तुस्थिती कायम प्रकाशात ठेवली. एक दिवस इंग्रज निघून गेले, सुरुवातीला आपण अन्नधान्यासाठी जगावर अवलंबून होतो, पण दहावीस वर्षांत हे परावलंबन संपले. पंजाब हरियानातील बहाद्दर शेतकरी एकरी वीस वीस क्विंटल गहू पिकवू लागला, आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालो आणि तरीसुद्धा शेतकऱ्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा काही हटला नाही, शेतकऱ्याची गरिबी काही हटली नाही. जास्त पिकवावे तर कर्जाचा बोजा वाढतो, गरिबीही वाढते, उत्पन्न कमी येते असा अनुभव सतत येऊ लागल्यानंतर शेतकरी संघटनेचा उदय झाला आणि शेतकरी संघटनेने पहिल्या प्रथम विचार मांडला की, 'आम्हाला सरकारकडून सूट नको, सबसिडी नको, काही नको. सरकार आम्हाला कोण देणारे? आमच्या शेतात एका दाण्याचे शंभर दाणे होतात; सरकारच्या कारखान्यात एक किलो लोखंडात कणभरही वाढ होत नाही. मग ते कसे काय शेतकऱ्यांना मदत करणार? सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या कारभारात हात घालायचे सोडून द्यावे.' शेतकरी संघटनेने घोषणा दिली – 'सूटसबसिडीचे नाही काम, आम्हाला हवे घामाचे दाम.' ही घोषणा जरी शेतकरी संघटनेची असली तरी तिच्या मागची प्रेरणा आहे महात्मा गांधींची. ते म्हणाले होते, "गरिबांकरिता 'हे करू, ते करू' असे सगळेजण म्हणतात; पण गरिबाच्या पाठीवरून उतरायला कोणी तयार होत नाही. बाकी काही करण्याच्या गप्पा मारण्यापेक्षा गरिबांच्या पाठीवरून उतरा, त्याला मोकळेपणाने काम करू द्या. म्हणजे मग, गरिबी झटकन पळून जाईल." 'गरिबी हटाव, गरिबी हटाव' म्हणून निवडणुका जिंकून गरिबी हटत नाही. गरिबी हटवायचा मार्ग सोपा आहे. 'गरिबी टिकावी आणि वाढावी म्हणून सरकार जे प्रयत्न करते ते सोडून दिले तर गरिबी आपोआप नाहीशी होईल.
सरकार कमी तितके नामी
शेतकरी संघटनेने गेली वीस बावीस वर्षे स्वातंत्र्याची मागणी सातत्याने केली. इतर सगळ्यांनी शेतकरी संघटनेला विरोध केला. पण मनुष्याच्या विकासाचा इतिहास सगळा आपल्या बाजूने आहे; काठीने जमीन उकरून शेती करणाऱ्या बाईपासून हिटलरच्या शाख्तपर्यंतच्या इतिहासाचा आपण जो आढावा घेतला त्यावरून हे स्पष्ट होते. म्हणून आता तुमचा आणि माझा सोन्याचा दिवस उगवतो आहे. आता संपूर्ण जगात सिद्ध झाले आहे की सरकार जिथे जिथे हात घालते त्या त्या गोष्टीचे वाटोळे झाल्याखेरीज राहत नाही. सरकारने एखादी गोष्ट करतो म्हटले आणि चांगले झाले असे कधीच होत नाही. खरे तर जनतेच्या मनात भावना असते की सरकारकडे काही जबाबदारी सोपवली की काही तरी चांगले होईल. उदाहरणार्थ, समजा शेतामध्ये काम करणाऱ्या शेतमजुराला योग्य मजुरी मिळत नाही, किमान वेतनसुद्धा मिळत नाही. मग काही मंडळी सरकारला सल्ला देतात की या कामावर देखरेख करणारा एक इन्स्पेक्टर नेमा. मग, नेमलेला इन्स्पेक्टर शेतमालकाकडे जातो, तिथे बसून चहापाणी घेतो, मजुरांकडून थोडे पैसे खातो, मालकाकडूनही थोडे पैसे खातो; मजुरी वाढण्याचा काही संबंधच नाही. दोन वर्षांनी त्यांच्या लक्षात येते की इन्स्पेक्टर नेमूनही परिस्थितीत काही फरक पडत नाही. मग, सूचना येते की एक कमिशनर नेमा. त्यानेही भागत नाही म्हणून मग दिल्लीत एक किमान वेतन मंत्रालय उघडा अशी सूचना केली जाते. काम होत नसेल तर सरकार कमी करण्याऐवजी सरकार वाढविण्याचा खटाटोप जगभर चालत राहिला. आता ते संपले आहे. समाजवाद संपला आणि समाजवादाचे नारे देणाऱ्या रशियाचा बट्ट्याबोळ झाला. आता 'सरकारचा हस्तक्षेप जितका कमी तितके चांगले' असे आपले तत्त्व मान्यता पावले आहे.
शेळी आणि कसाई
शेतकरी आणि उद्योजक, इतके दिवस गुलामीत ठेवलेले, आता त्या गुलामीतून सुटू लागल्यावर गुलामीत ठेवणाऱ्यांना गोड नक्कीच वाटणार नाही. शेतकरी आणि सरकार यांच्यामधील नाते स्पष्ट करताना मी नेहमी 'शेतकरी हा शेळी आहे आणि सरकार कसाई आहे' अशी उपमा वापरतो. शेळीला वाटते हा आपल्याला चारा घालतो, पाणी देतो, निवाऱ्याला ठेवतो; गळ्यात दोरी घालून फिरवत असला तरी बरा गोड मालक आहे. हा कसाई प्रेम दाखवीत होता, सूट देत होता, सब्सिडी देत होता ते कशाकरिता हे शेळीला शेवटच्या दिवसापर्यंत कळत नाही. ज्या दिवशी कापायची आहे त्या दिवशी जास्तीत जास्त मांस मिळावे यासाठी हे प्रेम होते हे शेळीला फक्त शेवटच्या दिवशी कळते. शेळी जर कसायला म्हणाली की, 'तुला खायला हवे तर मला का मारतो; तुला काय कोबी मिळत नाही का बटाटे मिळत नाही?' कसाई त्यावर म्हणतो, 'कोबी, बटाटे खूप मिळतील, पण तुला मारल्याखेरीज माझा धंदा होणार नाही.' एखादी संधी साधून शेळी पळून जाऊ लागली तर कसाई तिला तसे पळू देणार नाही, धरून आणून परत बांधून ठेवील. त्याचप्रमाणे जोतिबा फुल्यांच्या काळापासून ज्यांनी शेतकऱ्यांना गुलाम केले त्या मंडळींनी नव्या नव्या युक्त्या लढवून शेतकऱ्यांना बंदिस्त व्यवस्थेत अडकवून ठेवण्याच्या कारवाया केल्या. यावेळी त्यांनी आणखी नव्या युक्त्या काढायला सुरुवात केली आहे.
कसायांच्या युक्त्या
त्यांच्या या युक्त्यांकडे बारकाईने लक्ष ठेवायला पाहिजे. कारण स्वातंत्र्याची ही लढाई मोठी अटीतटीची आहे. जोतिबा फुल्यांनी म्हटले, इंग्रज आला हे चांगलेही झाले; काही तरी शिकू या त्यांच्याकडून. राष्ट्रवादी म्हणायला लागले काही शिकायला वगैरे नको. 'मुलीचे लग्न लहान वयात करू नये' असा कायदा करायचे सरकारने ठरवले तेव्हा त्यावेळचे स्वदेशीवाले लोकमान्य टिळक म्हणाले, 'कायदा चांगला आहे, पण सरकारला जर असा कायदा करायला आपण मान्यता दिली तर सरकारला आपल्या सामाजिक जीवनात हस्तक्षेप करण्याची सवय होईल.' 'म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो' अशा मथळ्याखाली त्यांनी त्यावर अग्रलेख लिहिला आहे. तेव्हा, आपली लुटालुटीची व्यवस्था बिघडू नये म्हणून या मंडळींनी 'राष्ट्रवादी' म्हणून छान नाव घेऊन चळवळ उभी केली; इंग्रजांचे जे जे काही असेल ते वाईटच आहे असे जनतेच्या मनात भरायला सुरुवात केली. म्हणजे, 'चांगले असेल तेसुद्धा घ्यायचे नाही' याला 'राष्ट्रवाद' म्हणायचे! जोतिबा फुल्यांनी इशारा दिला होता की माझी मांडणी बाजूला ठेवून जर स्वातंत्र्याची चळवळ चालवली तर स्वातंत्र्य येईल, पण ते खरे स्वातंत्र्य असणार नाही, ती पुन्हा 'पेशवाई'च असेल.
आणि १९४७ साली जे स्वातंत्र्य आले ते पेशवाईचे आले आणि त्यांनी 'समाजवादा'चा नवा टिळा लावला आणि आपणही इंग्रज गेल्याच्या आनंदात त्या समाजवादाला पार भुलून गेलो. एकदा आपण 'राष्ट्रवादा'च्या नावाने फसलो आणि एकदा 'समाजवादा'च्या नावाने फसलो आणि शेतकऱ्याच्या सर्व शत्रूंनी शेतकऱ्याचा जगाशी संपर्क येऊ दिला नाही. शेतकऱ्याला शहाणा होऊ द्यायचे नाही, बाकी त्या काहीही मागावे!
दुतोंडी स्वदेशी
आता समाजवादाचा जागतिक पाडाव झाल्यानंतर शेतकऱ्यांचे शत्रू नवीन, 'स्वदेशी' नावाची युक्ती घेऊन पुढे आले आहेत. ते म्हणतात, 'तुम्ही आंबे परदेशात पाठवले तर आम्हाला चांगले आंबे खायला मिळणार नाहीत' उलट, चांगली चांगली फळे परदेशातून आणली तर हेच स्वदेशीवाले ओरड करतात की, 'आमच्या शेतकऱ्यांचे काय होणार?' 'ओली पडो का सुकी पडो' आपल्याला फुकटात राबायला मिळालेला शेतकरी स्वतंत्र होता कामा नये, तो गुलामच राहिला पाहिजे असे ज्यांना वाटते ती मंडळी आता स्वदेशीचा झेंडा हातात घेऊन आणि वाटेल त्या भाकड कथा सांगून शेतकऱ्यांना घाबरवायचा प्रयत्न करीत आहेत.
अधिवेशनाचे निर्णय
या सर्व पार्श्वभूमीवर येथे प्रचंड संख्येने जमलेल्या शेतकरी स्त्रीपुरुषांनी या अधिवेशनात महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुळात पश्चिम महाराष्ट्रात इतक्या मोठ्या संख्येने शेतकरी स्वातंत्र्याचा उद्घोष करायला जमतात हीच मोठी ऐतिहासिक घटना आहे. कारण,येथील सहकार सम्राटांनी इतके दहशतीचे वातावरण तयार केले होते की धीर बांधून कोणी शेतकरी संघटनेच्या सभेला हजर राहिले तर त्यांची यादी सभा संपायच्या आत एखाद्या डायरेक्टरच्या हाती पडायची. त्यामुळे वीस वर्षांपूर्वी या भागात शेतकरी संघटनेची एखादी सभा घेणे मोठे मुश्किलीचे काम होते. म्हणूनच ही उपस्थितीही ऐतिहासिक आहे.
गुलामगिरीचा त्याग
आमची परिस्थिती अत्यंत वाईट आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही गरीब आहोत, आमच्या जमिनी नापीक झालेल्या आहेत, आमच्या जमिनीच्या पोटातील पाणी संपत आले आहे, आमच्याकडे यंत्रे नाहीत, तंत्रे नाहीत, काही नाही; जे होते ते जुनेपुराणे आणि मोडकळीस आले आहेत, आम्ही कर्जबाजारी झालो आहोत हे खरे आहे. दुसरीकडे, जगातील इतर सरकारांनी त्यांच्या शेतकऱ्यांना पोसून पोसून बलदंड केले आहे हेही खरे आहे; नवीन तंत्रज्ञानाचा त्यांच्याकडे वापर होतो त्यामुळे त्यांची उत्पादकता वाढली हेही खरे आहे. म्हणजे जागतिक बाजारपेठेत स्पर्धेला उभे राहाणे म्हणजे एका बाजूला एक बलदंड पहिलवान आणि दुसऱ्या बाजूला एखादे लहान पोर उभे राहावे अशी लढाई आहे याची आम्हाला जाणीव आहे आणि तरीदेखील येथे जमलेल्या आम्ही शेतकरी भावाबहिणींनी ठरवले आहे की जे काही तोडकेमोडके आमच्या हाती आहे त्यांच्या साहाय्याने आम्ही या स्पर्धेत उतरण्याचा निर्धार केला आहे. औरंगजेब सर्व साहित्यानिशी आला म्हणून इथले मावळे डगमगले नाहीत, हाती तलवार नसली म्हणून काय झाले? मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने नांगराचे फाळ मोडून त्याचा सामना केला हा आमचा गौरवशाली इतिहास आहे. गुलामगिरीत जगण्यापेक्षा स्वातंत्र्यात मेलेले चांगले.
दुसऱ्या लोकांना हा निर्धार समजत नाही. त्याला तसेच कारणही आहे. एखादा वाघ, समजा, पिंजऱ्यात आहे. एक दिवस चुकून पिंजऱ्याचे दार उघडे राहिले तर वाघ असा विचार करीत नाही की आपण बाहेर गेलो तर काय होईल, आपल्याला इथल्यासारखे आयते खायला मिळेल का नाही? असा विचार करीत असेल तो वाघ असणार नाही. दरवाजा उघडा सापडला तर पहिल्यांदा तो छलांग मारून जंगलाकडे जातो, स्वतंत्र होतो. कुत्रा मात्र विचार करतो की इथे भाकरी तर मिळते की नाही? सुटून गेलेला कुत्रा पुन्हा पुन्हा मालकाकडे परत येतो, दोन लाथा बसल्या तरी भाकरी तर मिळते ना यातच त्याला समाधान वाटते. ज्यांना स्वातंत्र्य हवे असते ते वाघ असतात आणि स्वातंत्र्याचे ज्यांना भय वाटते ते कुत्रे असतात. मग, कुत्रे आणि वाघ यांच्यात संवाद होईलच कसा? म्हणून, आपला स्वातंत्र्याचा निर्धार हा दुसऱ्या लोकांच्या आकलनाबाहेरचा आहे.
त्यांचे काही असो, आम्ही येथे जमलेले सर्व शेतकरी हे शिवरायांची परंपरा राखणाऱ्या मावळ्यांचे वंशज आहोत आणि ज्या कसायाने पन्नास वर्षे आपली मान कापली त्यांच्याकडे, स्वातंत्र्याच्या असिधाराव्रताला घाबरून त्या कसायाच्या दावणीला परत जाणार नाही.
जिंकण्याची खात्री
या लढाईत उतरणार म्हणजे काही आम्ही राजपुतांसारखे केसरिया-जोहार करून बलिदानाची लढाई करणार नाही. ही लढाई लढून आम्ही जिंकणार आहोत याची आम्हाला खात्री आहे. कारण, शेतीला जे जे काही लागते त्यातील मुबलक सूर्यप्रकाश आमच्या बाजूने आहे, गंगायमुनेपासून कृष्णाकावेरीपर्यंतच्या सगळ्या वाहत्या नद्यांचे पाणी आमच्या बाजूने आहे आणि आमच्याकडील माणूस चाळीसपन्नास रुपये मजुरीवरसुद्धा आनंदाने कामे करतात, शेतकऱ्याच्या घरची माणसेही मजुरीचा विचार न करता कामे करतात म्हणजे आमच्याकडे कार्यक्षम मनुष्यबळ उदंड आहे. नेदर्लंडमध्ये फुलांच्या शेतीत काम करणाऱ्या माणसाला दिवसाला २००० रुपये मजुरी आहे, त्या तुलनेत आमच्याकडील मनुष्यबळ स्वस्तही आहे. या सर्व जमेच्या बाजू लक्षात घेतल्या तर या जगात अशी कोणतीही ताकद नाही जी आमच्याशी टक्कर देऊ शकेल. फक्त, आमचे हे जे फायदे आहेत ते चांगल्या तऱ्हेने वापरण्याचे आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. तेव्हा, यापुढे गुलामगिरी करणार नाही हा आपला पहिला ठराव झाला.
लढ्याची रणनीती
हा ठराव अमलात आणायचा म्हटले तर बंदिस्त व्यवस्थेतील लाभांना सोकावलेले घटक आपल्याला तसे सुखासुखी करू देणार नाहीत. त्यासाठी आधी लढावे लागेल. या लढ्याची रणनीती या ठरावात मांडायची आहे.
१. आम्ही आता स्वतंत्र झालो आहोत. शेती कशी करायची याची आम्हाला अक्कल आहे. आम्हाला दिल्लीच्या कृषिभवनाची गरज नाही आणि मुंबईतील कृषिमंत्र्यांचीही गरज नाही.शेतीतून सरकारचे उच्चाटन करा.
२. संपूर्ण जग बाजारपेठ म्हणून एक होते आहे. युरोपमधील सर्व देशांनी, जे दुसऱ्या महायुद्धात एकमेकांविरुद्ध लढले त्यांनी एकत्र येऊन एक सामूहिक बाजारपेठ तयार केली आणि हिंदुस्थानात या राज्यातला माल त्या राज्यात जाऊ देत नाहीत, जाऊ दिला तर त्यात शेकडो अडथळे आणतात. हे आता चालायचे नाही. शेतीमालाच्या व्यापारासाठीहिंदुस्थान ही एक बाजारपेठ, सामूहिक बाजारपेठ व्हावी. कोणताही शेतीमाल हिंदुस्थानातील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विनाअडथळा नेता आला पाहिजे.
३. शेतीमालाच्या वाहतुकीवर बंधने लादताना 'जीवनावश्यक वस्तू कायद्याचे निमित्त पुढे केले जाते. हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा.
४. खरे तर, पन्नास वर्षे सातत्याने शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या इंडिया शासनाने आपल्या चुकीच्या धोरणामुळे देश बुडतो आहे याची दखल घेऊन शेतकऱ्यांची आणि देशाची आर्थिक स्थिती सावरून त्यांना प्रगतीच्या मार्गावर आणण्यासाठी, अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील राष्ट्रांसाठी जसा 'मार्शल प्लॅन' आखला आणि अमलात आणला तशी एखादी योजना आखावी अशी अपेक्षा करण्यात काही गैर नाही; अशी योजना दोघांच्याही हिताची बाब ठरेल; पण ज्या सरकारचा खजिना इतका रिता झाला आहे की त्यांना त्यांच्या नोकरांचे पगार भागविणेसुद्धा शक्य होत नाही त्याच्याकडून 'मार्शल प्लॅन'ची अपेक्षा काय करणार! त्याऐवजी, आपण एक व्यावहारिक तोडगा काढला आहे. परदेशात शेतीउपयोगी अवजारे आणि साहित्य आपल्याकडील किमतीच्या तुलनेत निम्म्याहून कमी किमतीत मिळतात. हिंदुस्थानात खते जितकी महाग आहेत तितकी महाग दुसऱ्या कोणत्याही देशात नाहीत. याचे कारण यातील प्रत्येक मालावर सरकारचा कर आहे. शेतीवर तुम्ही पन्नास वर्षे सातत्याने अन्याय केला, शेतीला लुटले त्याची भरपाई करण्यासारखी तुमची आर्थिक परिस्थिती नाही, तर मग परदेशातून येणाऱ्या शेतीउपयोगी औजारे आणि साहित्य यावर फायदा कमावण्याचे बंद करा, त्यावरील सर्व आयात कर रद्द करा. ही मागणी मी वित्त मंत्रालयासमोर शेतकऱ्यांच्या वतीने ठेवणार आहे.
५.आम्ही ही आर्थिक लढाई लढण्यास समर्थ आहोत. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा बागुलबुवा कोणी कितीही दाखविला तरी मागे पाऊल घेण्याइतके आम्ही कमकुवत नाही. ज्या शेतकऱ्यांनी पंडित नेहरूंच्या शेतकरीविरोधी धोरणाशी लढाई केली, ज्या शेतकऱ्यांनी इंदिरा गांधींच्या शेतकरीविरोधी धोरणाशी लढाई केली, राजीव गांधींसारखा शत्रू पचवला, नरसिंहरावांसारखा शत्रू सांभाळला त्या आम्हा शेतकऱ्यांना दोनपाच कंपन्यांना तोंड देणे काहीच अवघड नाही. आम्ही पण कंपन्या काढू. आतापर्यंत, शेतकऱ्यांनी धंदा करायचा म्हणजे सहकारी संस्थाच काढाव्यात आणि शहरातील लोकांनी धंदा करायचा म्हणजे कंपनी काढायची असा भेद होता. शेतकरी कंपनी काढतो म्हणाले तर त्याला परवानगी नाही. त्यांचा आपला एकच धोशा – 'सहकार जरी अयशस्वी झाला असला तरी सहकार यशस्वी झालाच पाहिजे!' 'बिना सहकार नहीं उद्धार!' सारखे छान 'काव्य' गाऊन सहकार महर्षांनी शेतकऱ्यांना लुटले. आम्ही या सहकाराचा सुरुवातीपासूनच धिक्कार केला आहे. आज आम्ही या सांगली-मिरज अधिवेशनातून या सर्व सहकारवाल्यांना आव्हान देतो की त्यांनी बाजारपेठेत उतरून दाखवावे. शेतकऱ्यांच्या लुटीला ते इतके सोकावले आहेत की बाजारपेठेत ते एक दिवससुद्धा तगू शकणार नाहीत. सरकारच्या छत्राखाली, शेतकऱ्यांवर झोनबंदीसारखे, बिनपरतीच्या ठेवींसारखे निर्बंध लादून काम करणारी ही ऐतखाऊ माणसे जागतिक बाजारपेठेत चोवीस ताससुद्धा टिकू शकणार नाहीत. आम्ही या अधिवेशनात असे ठरवीत आहोत की आम्हाला अशा तऱ्हेची व्यवस्था उभी करायची आहे की जिच्यामध्ये कंपन्यांची कार्यक्षमता असेल आणि सहकारी व्यवस्थेतला सहभाग असेल. सरकारने आमच्या या प्रयत्नांत मध्येमध्ये आड येता कामा नये.
सामर्थ्य आहे चळवळीचे
शेतकरी संघटनेच्या तुम्हा सर्व पाईकांचे कौतुक आहे की देशावर जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात संकट चालून येते आहे अशी भीती समोर दिसताच देशाच्या पंतप्रधानांनी, मी सत्तारूढ राष्ट्रीय आघाडीशी कोणत्याही स्वरूपात संबंधित नसताना, किंबहुना त्यांच्याविरोधात लढलो असतानाही, देशापुढील संकटाच्या निवारणासाठी मदतीकरिता मला हाक मारली आहे आणि मी तेथे गेलो आहे तो तुम्हा सर्वांच्या अनुमतीने गेलो आहे आणि मी कायम तुमच्याबरोबरच राहणार आहे. सहाव्या मजल्यावर गेल्यानंतर इंडियात सामील होणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरांसारखा मी बेइमान होणार नाही. इतके दिवस आम्ही धनुष्यबाणच पाठीवर लावून फिरत होतो, आता पाठीवरील धनुष्यबाणाच्या जोडीला मंत्रालयातील 'वेद'सुद्धा आपल्यासमोर पडले आहेत, आमच्याकडे नवीन हत्यार आले आहे. मला त्यांनी मी बुद्धिमान आहे म्हणून नाही बोलावले, मी हाक मारली की तुम्ही शेतकरी लाखोच्या संख्येने जमता या ताकदीची दखल घेऊन त्यांनी मला बोलावले आहे. शेतकऱ्यांना आंदोलन करावे वाटले तर शेतकऱ्यांचा फक्त शेतकरी संघटनेवर विश्वास आहे हे त्यांना माहीत आहे म्हणून त्यांनी मला तेथे बोलावले. त्यामुळे तुम्ही हेही लक्षात ठेवायला हवे की माहेरचा आधार कमकुवत झाला आहे असे कळले की सासरी पोरीला चांगले वागवीत नाहीत. माझ्या शब्दाखातर लाखो लोक उठतील हे जोपर्यंत त्यांना खात्री आहे तोपर्यंतच मी जे काही म्हणतो ते ते मान्य करणार आहेत. तेव्हा आपली संघटनेची ताकद टिकवून ठेवली पाहिजे, वाढवत राहिली पाहिजे. मी तेथे गेलो आहे आता सर्व काही सुरळीत होईल असे म्हणून गाफील राहून चालणार नाही.
चोरांच्या बंदोबस्तासाठी
महाराष्ट्रात शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. शेतकऱ्यांच्या विहिरीवर निर्बंध घालणारे भूजल विधेयक आणण्याचा सरकारने विडा उचलला आहे, कापूस खरेदीचा एकाधिकार त्याच भ्रष्ट आणि लुटींच्या पद्धतीने चालू आहे, थकीत वीजबिलांपोटी विद्युत महामंडळाचे अधिकारी वीज कनेक्शनच तोडू लागले आहेत, त्यामुळे उभी पिके जळून जाऊ लागली आहेत, गेल्या पन्नास वर्षांत दरवर्षी शेतकऱ्यांना उणे सबसिडीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांनी लुबाडीत आले आहे याचा कबुलीजबाब सरकारने दिला असूनही बँकांचे अधिकारी शेतकऱ्यांकडील किरकोळ कर्जाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन जप्ती करीत आहेत त्याची बेइज्जती करीत आहेत. यावर काय उपाय करायचा? तुमच्या घरी येऊन कोणी तुमच्या लक्ष्मीला जर हात लावायला लागला तर तुम्ही काय पंचायतीत जाऊन विचारीत नाही, आता काय करू म्हणून! बँकेचे अधिकारी असोत, वीज मंडळाची माणसे असोत का पोलिसही असोत; सरकारी नोकर जोपर्यंत तो कायदेशीर काम सनदशीर मार्गाने करीत असतो तोपर्यंतच सरकारी नोकर असतो. वर्दी घालून एखादा पोलिस तुमच्या घरी आला आणि चोरी करू लागला तर तो पोलिस नसतो, तो वर्दी घातलेला चोर असतो आणि नागरिकांना स्वसंरक्षणाचा हक्क कायद्याने दिला आहे. तेव्हा, कोणीही सरकारी अधिकारी किंवा पोलिस तुमच्या घरी येऊन बेकायदेशीरपणे काही कारवाई करू लागला तर त्याला सरकारी वर्दीतील चोर-दरोडेखोर समजून कायद्याने दिलेले स्वसंरक्षणाचे हत्यार वापरा आणि या नगराचे 'क्रांतिवीर नाना पाटीलनगर' हे नाव सार्थ करा.
समारोप
या अधिवेशनात स्वातंत्र्याचा उद्घोष झाला आहे. शेतीचा शोध लागल्यापासून शेतकऱ्यांच्या माथी बसलेला शोषणाचा बोजा दूर होण्याची वेळ येऊन ठेपली आहे, ही संधी हुकविण्यासाठी स्वातंत्र्यसूर्याला घाबरणारी घुबडे नाना तऱ्हेने घुत्कार करून तुमच्याही मनात भीती भरविण्याचा प्रयत्न करू लागतील. तिकडे लक्ष न देता या अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र आलेले जोतिबा फुल्यांचा स्वातंत्र्याचा विचार आणि नाना पाटलांची ताकद यांचा योग्य मेळ घालून यापुढे वागू लागलो तर जगातील कोणतीही राक्षसी ताकद आपल्या स्वातंत्र्याच्या आड येऊ शकणार नाही.
सारांश
बऱ्याच दिवसांपासून सरकारे दिवाळखोरीत निघाली आहेत, आपल्या नोकरांचे पगार भागविण्याइतकेही पैसे त्याच्याकडे नाहीत. त्यांच्याकडे शंभर रुपये जमा झाले तर त्यातील सत्तर रुपये नोकरांचे पगार देण्यातच जातात. अशा प्रकारचे सरकार देशाचे काही भले करू शकत नाही. तेव्हा, एखाद्या दारूड्याच्या कारभारणीची जी अवस्था होते तीच अवस्था आज आपली झाली आहे. कारभारणीने आपले दागिने उतरवून दिले तरी त्याची तो दारूच पिणार, त्याचे व्यसन वाढतच राहणार; त्याच्यात काही सुधारणा होणार नाही आणि घरातही काही सुधारणा होणार नाही. त्यामुळे माझ्या मते, प्रत्येक दारूड्याच्या कारभारणीने आपल्या दारूड्या नवऱ्याच्या हाती एकही पैसा न देणे हे तिचे कर्तव्य बनते. त्याचप्रमाणे, आज आम्ही निर्णय घेतो आहोत की यापुढे सरकारला एक पैसाही देणार नाही; वीज बिले भरणार नाही. आम्ही कर्ज फेडणार नाही कारण आम्ही मुळात देणेच लागत नाही; ९६-९७ या केवळ एका वर्षात ज्या सरकारने शेतकऱ्यांकडून १ लाख १३ हजार कोटी रुपये लुटून नेले आहेत ते अवघ्या १३ हजार रुपयांच्या कर्जासाठी आमच्या घरावरील छप्पर काढू शकत नाहीत. इतके असूनही सरकारी अधिकारी जर वसुलीसाठी जप्ती करू पाहत असतील किंवा अटक करण्याचा विचार करीत असतील तर समजा की हे सरकारी अधिकारी नाहीत, सरकारी वर्दीतील लुटारू आहेत आणि स्वसंरक्षणासाठी नाना पाटलांच्या मार्गाने आम्हाला जे करणे शक्य होईल ते आम्ही करू. आजपर्यंत शेतकरी दीनवाणाच दिसत होता, या लढाईत तो अशी तडफ दाखविणार आहे की त्याच्या दर्शनाने आजपर्यंतचे त्याचे शोषक थरथर कापायला लागतील.
(१२ नोव्हेंबर २००० शेतकरी संघटना आठवे अधिवेशन सांगली-मिरज.)
(शेतकरी संघटक २१ नोव्हेंबर २०००)
◼◼