माझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

माझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर
माझं इठ्ठल रखूमाई उभे इटेवर

टाय वाजे खनखन मुरदुंगाची धुन
तथे चाललं भजन गह्यरी गह्यरीसन

टायकर्‍यांचा जमाव दंगला दंगला
तुकारामाचा अभंग रंगला रंगला

तुम्ही करा रे भजन ऐका रे कीर्तन
नका होऊं रे राकेस सुद्ध ठेवा मन

आता सरला अभंग चालली पावली
जे जे इठ्ठल रखूमाई ईठाई माऊली

शेतामंदी गये घाम हाडं मोडीसनी
आतां घ्या रे हरीनाम टाया पीटीसनी

उभा भक्तीचा हा झेंडा हरीच्या नांवानं
हा झेंडा फडकावला झेंडूला बोवानं

आतां झाली परदक्षीना भूईले वंदन
हेचि दान देगा देवा आवरलं भजन

आतां फिरली आरती भजन गेलं सरी
बह्यना देवाचीया दारीं उभी क्षनभरी


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg