Jump to content

माझी माय सरसोती

विकिस्रोत कडून

माझी माय सरसोती माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली !!

माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता --भागवत
पावात समावत आणि मातीमधी उगवत !!

आरे देवाचं दर्सन झालं झालं आपसुक
हिरीदात सुर्याबापा दाये अरूपाच रूप !!

तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी
देवा तुझ येनजान वारा सांगे कानामधी !!

फुलामधी समावला धरत्रीचा परमय
माझ्या नाकाले इचारा नथनीले त्याचं काय !!

किती रंगवशी रंग रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरिरंग रंग खेये आभायात !!


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.