Jump to content

जीव देवानं धाडला

विकिस्रोत कडून

जीव देवानं धाडला जल्म म्हणे 'आला आला'
जव्हा आलं बोलावणं मौत म्हणे 'गेला गेला'

दीस गेला कामामधी रात नीजमधी गेली
मरणाची नीज जाता जलमाची जाग आली

नही सरलं सरलं जीव तुझ येन जान
जसा घडला मुक्काम त्याले म्हनती रे जीन

आला सास, गेला सास जीव तुझं रे तंतर
अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर!

येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप
काम करता करता देख देवाजीच रूप

ऐक ऐक माझ्या जीवा पीडयेलाच कण्हणं?
देरे गांजल्याले हात त्याच ऐक रे म्हनन

अरे निमानतोंडयाच्या वढ पाठीवर्हे धांडा
नाच नाच माझ्या जीवा संसाराचा झालझेंडा

हास हास माझ्या जीवा असा संसारात हास
इडा पीडा संकटाच्या तोंडावर्हे काय फास

जग जग माझ्या जीवा असा जगणं तोलाचं
उच्च गगनासारख धरीत्रीच्या रे मोलाचं


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.