बळीचे राज्य येणार आहे!/शेतकऱ्यांचे तंत्रज्ञान स्वातंत्र्य

विकिस्रोत कडून

शेतकऱ्यांचे तंत्रज्ञान स्वातंत्र्य



 ध्या जैविक बियाण्यासंबंधी सर्व जगभर चर्चा चालू आहे. बरेच जण त्यांच्या विरोधात आहेत. या बियाण्यांसंबंधी शेतकरी संघटनेची भूमिका वेगळी आहे.
 फार पूर्वीपासून आपले वाडवडील आपल्या शेतात जे काही पीक आले असेल त्यातले चांगले जे काही असेल ते पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून बाजूला काढून ठेवत असत. एखाद्या मालाचे दाणे मोठे असणे म्हणजे चांगले असेल तर मोठे मोठे दाणे निवडून बियाणे म्हणून वेगळे ठेवले जायचे. असे पिढ्यान् पिढ्या चालले म्हणजे त्या वाणाचा आकार मोठा मोठा होत जातो.
 हरित क्रांतीच्या वेळी काय केले? जर का मोठ्या दाण्याचे उत्पादन पाहिजे असेल तर मोठ्या दाण्याच्या रोपाच्या फुलांचे पुंकेसर आणि लहान दाण्याच्या रोपाच्या फुलांचे स्त्रीकेसर यांचा संकर घडवून आणून असे वाण तयार केले गेले की त्याला खते आणि औषधे पुरेशा प्रमाणात मिळाली तर भरघोस पिक ते देते. वाण चांगले नसेल तर कितीही खते आणि औषधे दिली तरी त्याचा काही उपयोग होत नाही. पण वाण चांगले असेल तर ते खताला आणि औषधाला प्रतिसाद देते आणि उत्पादन वाढते. अशा वाणांच्या विकासाने हरित क्रांतीला सुरुवात झाली. उत्पादन वाढले पण समस्याही उभ्या राहिल्या. या वाणांना खते आणि औषधे जास्त वापरावी लागतात. त्यामुळे खर्च जास्त होतो एवढेच नव्हे तर खताऔषधांच्या अतिवापरामुळे निसर्गाचा, पर्यावरणाचा नाश होऊ लागला ; नद्यांमधील मासे मरू लागले, नद्यांचे पाणी दूषित होऊ लागले.
 हरितक्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे ही समस्या उभी राहिलेली दिसायला लागल्यानंतर काही मंडळींनी धोशा लावला की खतांचा आणि औषधांचा वापर सोडून द्या आणि नैसर्गिक शेती करायला लागा आणि मग गावोगाव नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरू झाले. खताच्या ऐवजी गायीचे शेण वापरायचे आणि औषधांच्याऐवजी गायीचे मूत्र वापरायचे. आर्थिक उपलब्धीचा काही हिशोब मांडलाच गेला नाही.
 त्या काळात लिहिलेल्या एका लेखात मी लिहिले आहे की प्रगती ही अशा तऱ्हेने मागे जाऊन होत नाही. जर नैसर्गिक शेतीमुळे प्रचंड पीक येत असते आणि लोकांना भरपूर खायला मिळाले असते तर या देशामध्ये दुष्काळ कधी पडायलाच नको होता. कारण हजारो वर्षांपासून आपली शेती नैसर्गिकच आहे. आतापर्यंत आपण कधी खते आणि औषधे वापरतच नव्हतो. या समस्येवर तोडगा पुढची शास्त्रीय पायरी गाठल्याने मिळेल, मागे गेल्याने नाही. प्रगती कधी मागे गेल्याने होत नाही, पुढे गेल्याने होते.
 मी एका भाषणात एक कल्पना मांडली होती. एखादा रोग होऊ नये म्हणून माणसांना जसे इनॉक्युलेशन करतात तसे झाडांना करता आले तर हा प्रश्न सुटू शकतो. औषध फवारणी करून आपण संपूर्ण झाडांना औषधाची अंघोळ घालतो. त्यातले फारच थोडे औषध रोगनिवारणासाठी आवश्यक असते. उरलेले सारे निसर्गातील प्रदूषणाला कारणीभूत होते. माणसांना जसे इंजेक्शन किंवा सलाईनच्या माध्यमातून आवश्यक तितकेच औषध देण्याची सोय आहे तशी झाडाच्या बाबतीत करता आली तर खर्चही वाचेल आणि पर्यावरणालाही धोका राहणार नाही.
 आता जैविक तंत्रज्ञान विकसित होत आहे. प्रत्येक जीवमात्र सूक्ष्म कणापासून सुरू होतो. या कणामध्ये कॉम्प्युटरच्या प्रोग्रॅमप्रमाणेच एक प्रोग्रॅम असतो आणि त्या प्रोग्रॅमनुसार त्या जीवमात्राची कणाकणाने वाढ होते. जैविक तंत्रज्ञानाच्या परिभाषेत या कणांना जनुक (Gene) म्हणतात. या जनुकाच्या प्रोग्रॅममध्ये प्राण्याच्या डोळ्याचा रंग निळा असणार अशी आणखी असेल तर तो निळाच होणार, नाही तर नाही.
 शास्त्रज्ञांनी जनुकातला हा प्रोग्रॅम पाहिला, कोणत्या जागी कोणता नियम असतो ते पाहिले. सध्या वादग्रस्त ठरलेले कपाशीचे बोलगार्ड बियाणे हे या जनुकांच्या अभ्यासातून निर्माण झाले आहे. शास्त्रज्ञांनी साध्या कापसाच्या बियाण्याच्या जनुकाचा अभ्यास केला त्याचबरोबर बोंडअळीला तोंड देण्याची ताकद असलेल्या वाणाच्याही जनुकाचा अभ्यास केला. जनुकातील ज्या घटकामुळे बोंडअळीला प्रतिकार करणाचा गुणधर्म या वाणात येतो तो घटक साध्या कापसाच्या बियाणाच्या जनुकामध्ये त्यातील संबंधित घटकाऐवजी घालून नवीन बियाणे विकसित केले. हे बियाणे असे तयार झाले की त्यापासून तयार होणाऱ्या रोपांची पानेच बोंडअळीला मारक ठरतात आणि परिणामी फारशी औषधे फवारावी न लागताच पीकसंरक्षण होते.
 मी जागतिक कृषी संघटनेच्या चर्चासत्राला गेलो होतो तेथे दोन नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ हजर होते. त्यांनी जैविक तंत्रज्ञानाचे जे भावी चित्र समोर ठेवले त्यावरून असे दिसते की जनुकांतील अशा तऱ्हेच्या बदलांच्या साहाय्याने शेतकऱ्यांच्या हाती बियाणी येऊ लागली तर सध्याची बरीचशी कारखानदारी अनावश्यक ठरेल. कारण, वाणांतल्या जैविक बदलाने आजच्या कारखानदारी मालांची उपयुक्तता थेट शेतीउत्पादनातच निर्माण होऊ शकेल. येत्या शतकात जैविक शास्त्राची प्रगती इतकी होईल की कोणाही माणसाला आजारपण घालविण्यासाठी डॉक्टरकडे जाऊन औषध घेण्याची गरज राहणार नाही, शेतीतून मिळणारे अन्नच त्याच्यापासून रोगांना दूर ठेवेल.
 जैविकशास्त्राच्या या झेपेमुळे ज्यांचे हितसंबंध धोक्यात आले आहेत त्यांनी या शास्त्राविरुद्ध काही लोकांना उभे केले आहे. बोलगार्ड या कापसाच्या बोंडअळी प्रतिकारक बियाण्यांच्या आंध्र आणि कर्नाटकातील प्रायोगिक शेतीवर जाऊन या लोकांनी तेथील रोपे उपटून टाकायला सुरुवात केली; पण तेथील शेतकरी जागरूक होते, त्यांनी दुसऱ्या दिवसापासून आपल्या शेतांचे संरक्षण स्वतः करायला सुरुवात केली. दुदैवाने, शेतकऱ्यांच्या फायद्याच्या या तंत्रज्ञानाला विरोध करणाऱ्या लोकांना डॉ. नंजुंडस्वामींसारख्या शेतकरी नेत्याचे नेतृत्व लाभले आहे.
 आपली शेतकरी संघटनेची भूमिका काय आहे? हे जे काही नवीन तंत्रज्ञान आहे ते कदाचित नुकसान करणारे असेलही; त्याचे काही वाईट परिणाम असतीलही. विरोध करणारी मंडळी कधी कधी अगदी मूर्खासारखा युक्तिवाद करतात. ते म्हणतात, 'बोंडअळीला प्रतिकार करण्यासाठी कपाशीच्या वाणातील जनुकातला एक घटक बदलला तर त्याच्या संपर्कानेसुद्धा, नको असताना, दुसऱ्या पिकाच्या वाणात तो गुणधर्म जाईल' अशा तऱ्हेचे आचरट युक्तिवाद करून, शेतकऱ्यांच्या हाती आर्थिक सत्ता जाण्याला फक्त ज्यांचा विरोध आहे त्यांनी जो प्रचार चालविला आहे. त्यांच्याविरुद्ध उभे राहणे ही शेतकरी संघटनेची भूमिका आहे. कोणतीही नवीन गोष्ट आली तेव्हा तिला तीव्र विरोध करणारी मंडळी सर्वकाळ असतात. आगगाडी आली की तिला विरोध करणारे होते, कारखाने आले त्यांना विरोध करणारे होते, खाणींनाही विरोध करणारे होते. हे सर्व घुबडासारखे दिवाभीत आहेत.
 जितके आपण प्रयोग करतो तितकी ज्ञानाची प्रगती होते; जितके आपण प्रयोगाला नाकारू, तितकी 'ब्राह्मणी'व्यवस्था तयार होते; जे काही ज्ञान आहे ते आमच्याकडे आहे. बाकी कोणी प्रयोग करण्याची गरज नाही, बाकी कोणी ग्रंथ वाचू नये, आम्ही जे काही म्हणतो ते तुम्ही ऐका असे म्हणणारांची 'ब्राह्मणी'व्यवस्था तयार होते. बियाणे कोणते वापरायचे ते आम्ही तुम्हाला सांगू, तुम्ही प्रयोग करू नका हा ब्राह्मणीवाद शेतकऱ्यांना जैविक तंत्रज्ञानापासून दूर ठेवण्याकरिता वापरला जात आहे.
 शेतकरी संघटनेची या विषयावरची भूमिका साधी आणि सोपी आहे. या तंत्रज्ञानाचे जर काही वाईट परिणाम असतील तर ते वाईट परिणाम दूर करण्याकरिता अजून नवीन तंत्रज्ञानच उपयोगी पडेल. जसे हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानातील दोष दूर करण्याकरिता जैविक तंत्रज्ञान पुढे आले तसे जैविक तंत्रज्ञानातील दोष दूर करण्याकरिता पुढील शास्त्रीय पायरी चढावी लागेच, त्याऐवजी 'शेण आणि मूत' नाही वापरून चालणार.
 शेतकरी संघटनेची भूमिका एवढीच आहे की तंत्रज्ञान आणि शेतकरी यांच्यामध्ये कोणी भिंती बांधू नयेत. शेतकऱ्यांना खुलेपणाने प्रयोग करायची संधी मिळू द्यावी. त्यांचा त्यांना निर्णय घेऊ द्या की अमुक एक बियाणे वापरले तर पुढच्या वर्षी नवीन बियाणे विकत घ्यावे लागते तरी ते परवडते की नाही ते. कोणी तरी दिल्लीत बसून ते ठरवता येणार नाही.
 शेतकरी प्रयोगशील आहे, त्याला तंत्रज्ञान निवडीचे स्वातंत्र्य असायला पाहिजे. दुसऱ्या कोणाच्या ओंजळीतून तुटपुंजे तंत्रज्ञान स्वीकारण्यात शेतकऱ्यांना स्वारस्य नाही हे सिद्ध करण्यासाठी, इतर राज्यांत नवीन वाणांच्या प्रयोगांना विरोध होत असला तरी महाराष्ट्रातले शेतकरी नवीन वाणांचे प्रयोग आपल्या शेतीमध्ये करून त्यातले फायदे तोटे पडताळून पाहतील.

(दिनांक १६ जून १९९९ रोजी पुणे येथे शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या

बैठकीसमोर श्री. शरद जोशी यांनी केलेल्या भाषणातील तंत्रज्ञानविषयक भागाचे शब्दांकन.

शेतकरी संघटक, ६ जुलै १९९९)