बळीचे राज्य येणार आहे!
प्रकाशकाचे मनोगत
शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचे समग्र साहित्य आम्ही प्रकाशित करत आहोत. शेती आणि शेतकरी आंदोलन याबाबत त्यांनी लिहिलेले लेख यापूर्वी शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती या पुस्तकात संग्रहीत झालेले होते. त्यानंतर त्यांनी केलेली मांडणी पुस्तकरूपाने आलेली नव्हती. त्यांची इतर पुस्तके प्रकाशित करत असताना आवाका मोठा असल्यामुळे नेमक्या याच विषयावरच्या पुस्तकाला उशीर झाला. शेतकरी संघटना अडचणी आणि मार्ग ही लेखमाला त्यांनी सर्वांत पहिल्यांदा १९७९ मध्ये साप्ताहीक वारकरी मध्ये लिहिली. या पूस्तकाला परिशिष्ट म्हणून ती आम्ही जोडली आहे. शेतकरी संघटनेच्या उभारणीबाबत त्यांची मते सुरुवातीपासूनच स्पष्ट होती हे त्या लेखमालेवरून लक्षात येते. शेती आणि सहकार या विषयावर त्यांनी एक लेखमाला साप्ताहीक ग्यानबामध्ये १९८७ मध्ये लिहिली. तीसुद्धा या पुस्तकात समाविष्ट आहे. बाकी सर्व लेख प्रामुख्याने १९८९ नंतर लिहिलेले लेख आहेत. शरद जोशींनी सर्वांत जास्त लिखाण १९९० ते २००० याच काळात शेतकरी संघटकमधून केलेले आहे आणि ते सर्व आता ग्रंथरूपात येते आहे. शेतकरी एकजुटीचा काळ असे आवाहन त्यांनी अगदी अशात- श्री. श्रीरंगनाना मोरे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात केले आहे.
शरद जोशी यांच्या टीकाकारांना आम्ही वारंवार ही विनंती करीत आलो आहोत, की त्यांनी त्यांचे लिखाण आधी डोळ्याखालून घालावे. त्यांची संपूर्ण मांडणी तपासावी आणि नंतरच त्या संदर्भात टिपणे करावीत. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हे सर्व विचारधन वाचकांसमोर देता आलं याचा प्रकाशक म्हणून आम्हाला आनंद तसेच समाधानाची भावना वाटते आहे.